पांडवकालीन पांडेश्वर
http://mr.upakram.org/node/3195
जेजुरी पासून दहा किलोमीटर अंतरावर पांडेश्वर आहे,महाराष्ट्रातील बहुतेक मंदिरे पांडव कथेशी जोडलेली असतात तसेच या मंदिराविषयी सांगितले जाते ते 'पांडव कालीन किंवा पांडवानी एका रात्रीत मंदिर उभारले असल्याने या क्षेत्राला पांडेश्वर असे म्हणतात' अशी लोकधारणा आहे .या मंदिराला गौरवशाली वारसा आहे या मंदिराचे बांधकाम तब्बल सोळाशे वर्षापूर्वीचे असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. मुळचे चैत्यगृह नंतरचे शिखर ,दगडी मुखमंडप ,नदीकाठचा तट लगतच्या ओवा-या ,मराठा कालीन भित्तीचित्रे , रंगकाम आदी बाबींमुळे सोळाशे वर्षातील मंदिर रचनेतील बदलांचा आलेख दर्शवणारा ठेवा म्हणून इतिहास संशोधक व अभ्यासक याकडे पाहतात. भाविक भक्तांसाठी भव्य शिवलिंग तर पर्यटकांसाठी शिल्प व वास्तुरचना यांचे आकर्षण आहे.४३ बाय २३ बाय ७.५ सेंटीमीटर आकारांच्या विटांचे बांधकाम आपणास खूप काही सांगून जाते.मंदिरातील लंबगोलाकृती गाभारा व त्या पुढील गजपृष्ठाकार व आयताकृती छताचा सभा मंडप व जुन्या विटांचा वापर,उत्कृष्ठ गिलावा संशोधकांच्या दृष्टीने मोलाचा ठरला आहे .विटांच्या या प्राचीन वस्तूला चौथ्या शतकात आकार मिळाला असावा तर पुढील जोडकाम सतराव्या किंवा अठराव्या शतकात झाले असावे.दगडी मुख मंडपाच्या बाहेरील पाच फुटी द्वारपालांची शिल्पे तसेच मंडपात २४ व बाहेर २ अशी देकोष्ठ पाहण्यासारखी आहेत.सूर सुंदरी व देवतांची शिल्पेही येथे आहेत जालवातायने,प्रवेश द्वाराच्या मधोमध मंदारक ,भिंतीच्या पायाशी असणारी धर्म-यश नक्षी या सा-या गोष्टी कोरीव लेण्यांसारख्या आहेत.
अधिक माहितीसाठी लॉग इन करा www.jejuri.in
आपला अभिप्राय व सूचना संकेतस्थळावर जरूर नोंदवा....
COMMENTS
स्वागत आहे
उपाध्ये गुरूजी जेजुरी [आपले नाव आवडले. आपण तिथे पुजारी वगैरे आहात काय ? ] देवा तुझी सोन्याची जेजुरी संकेतस्थळ आवडले. आरपार अभिव्यक्तिचं आणि ऐसपैस असे संस्थळाचे रुप दिसते आहे. च्यायला, मी दोनेक वर्षापूर्वी विद्यार्थ्यांची ट्रीप घेऊन गेलो होतो जेजूरीला. लै मजा आली होती. पण हे पांडेश्वर काही पाहण्यात आले नव्हते. मला देवदर्शनाची आवड असल्यामुळे असे लेखन मला वाचायला आवडते. अजून् येऊ द्या. माहितीबद्दल आभारी.
-दिलीप बिरुटे
[धार्मिक]
मस्त
चित्रातील फोटोवरून तरी मंदिर प्रेक्षणीय वाटते. जास्त छायाचित्रे उपक्रमवर टाकली तर बरे होईल. म्हणजे मंदिरातील पुरातन भाग कोणता व मागच्या 100 वर्षात बांधलेला कोणता हेही लगेच कळेल. दक्षिण भारतातील देवळात बर्याच वेळा जुन्या सुंदर शिल्पांच्यावर भयानक दिसणार्या आधुनिक प्लॅस्टरकामाचे जोड दिलेले दिसतात. त्यामुळे एकूण प्रकरण बेगडी व भयानक दिसते. तसला प्रकार येथे नसेल अशी आशा आहे. उपाध्ये गुरुजी हा आयडी सध्या काही फुटकळ वाहिन्यांच्यावर स्वत:ला राशीतज्ञ म्हणून घेणार्या व्यक्तीच्या नावाचा उपहास करण्यासाठी तर घेतले नाही ना? अशी शंका येते. खुलासा झाल्यास बरे.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
मंदिर
पहिल्यांदाच पाहिले. जेजूरीला कधी जाणे झाले नाही.
उपाध्ये चांगले सांगतात.
ते येथे असल्यास काही शंका आहेत त्या विचारता येतील.
शिवा
चांगली माहिती
मंदिराबद्दल अधिक विस्तृत माहिती उपलब्ध असल्यास आवडली असती. शक्य असल्यास उपक्रमावरच आणखी प्रकाशचित्रेही टाकावीत.
पांडेश्वर
छायाचित्र आवडले. भेट देण्याच्या स्थळांच्या यादीत नाव टाकत आहे. जेजुरी बद्दलही ऐकले आहे.
पांडेश्वर या नावाने पांडवांचा बोध झाला नाही. कदाचित पांडवेश्वर नाव जास्त योग्य ठरले असते. फोटोत शिखरही दिसत नाही.
तुम्ही चैत्यगृह म्हणता म्हणजे बौद्धांच्या काही खुणा आढळतात का? विटांचा आकार ही वेगळाच आहे. मंदिराच्या आसपास कुठे उत्खनन झाले होते का? इतर ऐतिहासिक माहिती मिळाली तर अजून बरे बाटेल. जेजुरीची ही अशीच माहिती द्या. तुमच्या संकेतस्थळाला भेट दिली. शिलालेख भाग पाहिला. आवडला.
प्रमोद
वा
वा.
अधिक चित्रे या पानावर बघता येतील.
जुन्या बांधकामाची शैली सोळाशे वर्षे नव्हे तर हजार वर्षांपूर्वीची आहे. शिवाय मराठेशाहीत जीर्णोद्धारही झालेला आहे - काही वास्तू त्या काळातल्या आहेत.
अशीच माहिती देत जावी. पुढील प्रवासवर्णनासाठी सुभेच्छा.
जुने व नवे बांधकाम
दुवा उपलब्ध करून दिल्याबद्दल धनंजय यांचे आभार. मी माझ्या आधीच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे या दुव्यावरच्या फोटोतून जुन्या बांधकामाची शैली व ग्रेस नवीन बांधकामात दिसत नाही. नवीन बांधकाम भडक व बेगडी वाटते आहे. जेंव्हा अशा जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला गेला तेंव्हा नवीन बांधकाम जुन्यात मिसळून जाईल याची काळजी न घेतल्याने असे झाले असावे. मंदिराचा दर्शनी फोटो बघून मी हे मंदिर बघण्यासाठी जाण्याचा बेत ठरवत होतो. परंतु या दुव्यावरील फोटो बघितल्यावर माझा उत्साह एकंदरीत बराच कमी झाला.
उपाध्ये गुरुजींना विनंती की जुनी मंदिरे आहेत ती जपा त्याला सिमेंट कॉन्क्रीटची ठिगळे लावू नका. तरच पर्यटक जेजूरीला येतील.
लोणी भापकरची मध्ययुगीन मंदिरे पाहून परत फिरलो ते पांडेश्वरचे असेच शिल्पसमृद्ध मंदिर पाहण्यासाठी.
वाटेत मोरगावच्या मयुरेश्वराचे दर्शन करण्यासाठी थांबलो पण महादरवाजाच्याही पुढे आलेली प्रचंड गर्दी पाहून तसेच परत फिरलो. मोरगाव-जेजुरी रस्त्यावर मोरगावपासून ५/६ किमी अंतरावर मावडी गावातून उजवीकडे पांडेश्वरला जाणारा फाटा आहे. खडबडीत रस्त्यावरून १५/२० मिनिटातच पूर्ण कोरड्या असलेल्या कर्हेवरचा पूल पार करून पांडेश्वर गावात पोहोचलो.
गाव बहुत प्राचीन, तशी साक्ष देणारे अवशेष या गावात भरपूर आहेत.
मंदिराच्या वाटेवरच एक वीरगळ आणि त्याशेजारीच नागाची प्रतिमा कोरलेला एक दगड आहे. समोरच एका भग्न मंदिराचे अवशेष विखुरलेले आहेत. अवशेषांवरून हे मूळचे शिवमंदिर असावे असे वाटते.
१. पांडेश्वर मंदिराच्या अलीकडे असलेला वीरगळ आणि नागप्रतिमा
ते बघूनच पांडेश्वरच्या मंदिरात प्रवेश केला. ह्या मूळच्या हेमाडपंथी मंदिराचा मूर्तीभंजकांचा तडाख्यात सापडल्यामुळे शिवकाळात पुन्हा जीर्णोद्धार झालेला दिसतो.
पांडेश्वर मंदिर हे पांडवांनी बांधले अशी दंतकथा. इथल्या मंदिराच्या आवारात कुंती, धर्म, भीम, नकुल आणि सहदेव अशी लहान लहान मंदिरे बांधली आहेत. मूर्तींच्या जागी शेंदूर फासलेले दगड आहेत. अर्जुनाचे मंदिर मात्र येथे नाही. ते येथून जवळच असलेल्या जवळार्जुन नावाच्या गावात आहे अशी माहिती तेथे मिळाली. मात्र आवारात एका धनुर्धारी वीराची मूर्ती असलेला दगड कोरलेला आहे तिलाच अर्जुनाची मूर्ती असे स्थानिक लोक मानतात. मंदिर अर्धे हेमांडपंती शैलीचे तर वरचा अर्धा भाग नंतरच्या काळात नागरी शैलीत जिर्णोद्धारीत केलेला आहे.
मुख्य मंदिराच्या पुढ्यातच भव्य असा नंदीमंडप असून त्यात नंदीची देखणी मूर्ती कोरलेली आहे. कर्हेपठाराच्या ह्या भागातील इथल्या बहुतेक सर्व प्राचीन शिवमंदिरांच्या पुढ्यातले नंदीमंडप शैलीच्या दृष्टीने अगदी सारखे आहेत. नक्षीदार कलाकुसर केलेले हेमाडपंती शैलीतील खांब, नकसकाम केलेले छत आणि स्तंभांच्या मधोमध नंदीची देखणी मूर्ती अशी यांची रचना.
नंदीमंडपाच्या मागच्या बाजूला एक निमुळता स्तंभ बांधलेला असून त्यावर जाण्यासाठी आतूनच अरूंद पायर्या बांधलेल्या आहेत. स्तंभावर काही मूर्ती कोरलेल्या आहेत. ही बांधणी शिवकाळातली दिसते. ह्या स्तंभाच्या समोरच कर्हेचे आता ऐन पावसाळ्यातही कोरडेठाक असलेले पात्र आहे. मंदिराच्या आसपासच्या नदीच्या पात्राला लांबरूंद, प्रशस्त दगडी घाटाने बंदिस्त केले आहे. ह्या देखण्या घाटामुळे पूर्वीच्या काळी कर्हा भरभरून वाहात असावी असे वाटते.
२. धनुर्धारी वीराची मूर्ती

३ मंदिराच्या पुढ्यातील स्तंभ
४. स्तंभाच्या आतमधून वर जाण्यासाठी आतील बाजूस कोरलेल्या पायर्या

५. मंडपातला नंदी

स्तंभ बघून पांडेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी आलो. मंदिराचे देखणेपण सामावले आहे ते याच प्रवेशद्वारात. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना विष्णूच्या 'जय', 'विजय' द्वारपालांसारखे द्वारपाल कोरलेले आहेत. अतिशय सुंदर दिसत असलेले हे दोन भव्य द्वारपाल मूर्तिभंजकांच्या तडाख्यामुळे विद्रूप झाले असले तरी त्यांचे मूळचे देखणेपण अजिबात लपत नाही. पायात तोडे, कटीवस्त्र, मेखला, कमरपट्टा, गळ्यात नक्षीदार माळ, छातीवर रूळणारे पदक, बाहूंना बाजूबंद, कानात कुंडले, मस्तकी नक्षीदार दाक्षिणात्य शैलीचा निमुळता मुकूट, त्यापाठीमागे चक्र आणि मुकुटावर सावली धरलेले दगडी छत्र अशी यांची रचना.
मंदिराच्या समोरीला बाजूस ह्या दोन्ही द्वारपालांच्या बाजूंना जाळीदार गवाक्षे, फुलाफुलांची नक्षी कोरलेली आहे. भिंतीत जागोजागी कोनाडे आहेत. एक दोन कोनाड्यांतील देखण्या मूर्ती शाबूत असून बाकी सर्व कोनाडे रिकामेच आहेत.
समोरील बाजू बघून मंदिराच्या अंतर्भागात प्रवेश केला. आतमध्ये चालुक्य शैलीतील ऩक्षीदार स्तंभ आहेत. स्तंभांच्या शिरोभागी फणा काढलेले नाग कोरलेले आहेत तसेच स्तंभांच्या मध्यभागी व्यालमुख, तसेच वेलबुट्टीदार नक्षी कोरलेली आहे. मूळच्या मंदिराच्या गाभारा बहुधा उद्ध्वस्त झाला असावा. हल्लीचा गाभारा नागरी शैलीत बनवलेला असून त्यातच अतिभव्य अशी शिवपिंडी विराजमान आहे. इतकी भली मोठी पिंडी फार क्वचितच पाहावयास मिळते. पाटेश्वर इथल्या काही शिवपिंडी इतक्या मोठ्या आकाराच्या आहेत.
६. मंदिराचे देखणे प्रवेशद्वार

७. देखणे द्वारपाल

८. द्वारपाल

९. जाळीदार गवाक्ष

१०. कोनाड्यातील मूर्ती

११. मंदिराचा अंतर्भाग

१२. भव्य शिवलिंग

पांडेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन बाहेर आलो. मंदिराला नदीच्या बाजूने घाटाबरोबरच एक प्रशस्त तटसुद्धा बांधून काढलेला आहे. तटाच्या आतल्या बाजूच्या भिंतीवर विविध मूर्ती कोरलेल्या आहेत. तटात खालच्या बाजूला इस्लामिक शैलीत बांधलेली कमानीकमानीची रचना असलेली प्रशस्त ओसरी असून तटावर जायला दोन ठिकाणांहून जिने खोदले आहेत. तटाचे हे बांधकाम बहुधा आदिलशाही सरदार मुरार जगदेवाच्या काळात झालेले असावे. तट चांगला रूंद असून सभोवतालचा परिसर मोठा सुरेख दिसतो. तटाच्या वरतून बघत असता तटाच्या बाहेर बाभळीच्या काट्यांत एक वृंदावन दिसले. तट उतरून मंदिराच्या बाहेर पडून समाधीपाशी गेलो. रूंद दगडी चौथरा आणि त्यावर देखणे वृंदावन अशी याची रचना. इकडील रहाळात इतकी चांगली समाधी दुसरी दिसली नाही यावरून ही एका नामांकित सरदाराची असावी हे उघड आहे.
समाधीपासून तसेच पुढे जाता आता पूर्ण भग्नावस्थेत असलेले अजून एक लहानसे शिवमंदिर आहे, नव्हे उद्ध्वस्त दगडांच्या ढिगार्यात असलेले शिवलिंगच ते.
१३. मंदिरासभोवती असलेली तटबंदी

१४. मंदिराच्या आसपासची पांडवांची मंदिरे

१५. इस्लामिक स्थापत्यशैलीतील कमानदार रचना

१६. तटाच्या भिंतीत कोरलेल्या मूर्ती

१७ तटाच्या भिंतीत कोरलेल्या मूर्ती

१८. जवळच असलेले देखणे समाधी वृंदावन

हे बघूनच परत पांडेश्वरापाशी येऊन बाहेर पडू लागलो तर मंदिराच्या नदीकाठावरील असलेल्या दरवाजापाशी दोन वीरगळ दृष्टिस पडले. एक वीरगळ नेहमीसारखाच युद्धाचा प्रसंग असलेला, घोडेस्वारांशी एकट्यानेच भाल्याचा उपयोग करून लढत असलेल्या वीराचा तर दुसरा वीरगळ मात्र अगदी वेगळा वाटला. ह्या वीरगळावर वीर चक्क वाघाशी झुंज देतांना दाखवला आहे. उघड आहे ह्या वीराचा मृत्यु वाघाशी झुंज देतांना झालेला असावा.
१९. मंदिर पायर्यांपाशी असलेले वीरगळ

२०. वाघाशी लढताना झालेल्या मृत्युशी संबंधित वीरगळ

हे वीरगळ बघून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. सासवडला जाण्यासाठी पांडेश्वर गावातून नाझरे मार्ग धरला. वाटेत अनेक जुनी मंदिरे दिसली, अचानक कोथळे गावानजीक एका लहानश्या टेकाडावर एक लहानसे शिवमंदिर व पुढ्यातच एक वीरगळ दिसला. हे मंदिरही पांडेश्वराइतकेच जुने असावे. तशाच प्रकारच्या पुढ्यातला नंदीमंडप, नक्षीदार स्तंभांचा अंतर्भाग असलेले. मंदिराच्या आवारात ३/४ वीरगळ तसेच वीरगळ कोरण्यासाठी आयताकारात कापलेल्या कित्येक शिळा आहेत. नंदीमंडपाच्या बाजूलाच काही मूर्ती कोरलेल्या आहेत. शेजारीच एक सतीशिळा आहे. वरच्या बाजूला चंद्र सूर्य, खालच्या बाजूला कैलासवासी झालेले पती पत्नी शिवलिंगाची पूजा करताना दाखवले असून मधल्या भागात संपूर्ण शिळा भारून टाकलेला आशीर्वादपर मुद्रेतील सतीचा हात अशी याची रचना.
२१. कोथळे शिवमंदिर

२२. नंदीमंडप

२३. मंदिराच्या आवारातील वीरगळ

२४. मंदिराच्या आवारातील अजून एक वीरगळ

२५. आवारातील काही मूर्ती

२६. सतीशिळा

हे मंदिर बघूनच पुढे निघालो. सासवड गाठून आता भुलेश्वरच्या मार्गाला लागलो. भुलेश्वराचे दर्शन झाले. अर्थात ह्या अतिशय देखण्या मंदिरावर आधीही येथे लिखाण झालेले असल्याने परत त्यावर लिहिणार नाही. भुलेश्वराचा घाट उतरल्यावर एका रोचक ठिकाणाला भेट दिली त्यावर अत्रुप्त आत्मा लवकरच लिहितील.
तल्या शिवलिंगाविषयीच्या काही मतांविषयी मतभेद आहेत.
वरील दुव्यात रुद्राला निराकार म्हटले आहे. The Supreme Shiva doesn’t have a form and every form is his form. The Shiva Lingam represents him, the Supreme Shiva¸ who is formless.
पण वैदिक वाड्मयात रूद्राविषयी बरीच वर्णने आढळतील.
रूद् धातूपासून रूद्र हा शब्द बनला आहे. रूद् म्हणजे रडणे, ओरडणे किंवा प्रकाशणे अथवा ताम्रवर्णी असेही अर्थ आहेत.
रूद्राला हात, पंजे आणि इतर दृढ अवयव आहेत, त्याचे ओठ सुंदर आहेत, त्याच्या केसांची वेणी घातली आहे, तो सुवर्णालंकार धारण करतो, सोन्याची व चकाकणारी माळ धारण करून तो रथात बसतो असे रूद्राविषयी वर्णन ऋग्वेदात आले आहे.
तर अथर्ववेदात रूद्राला तोंड, जिव्हा आणि दात आहेत, त्याचे पोट काळे आणि पाठ तांबडी आहे, तो नीलकण्ठ असून त्याच्या डोक्यावर निळ्या रंगाचा तुरा आहे, तो कातडे वापरतो आणि पर्वतांत राहतो, धनुष्यबाण हे त्याचे प्रमुख आयुध असून तो कधीकधी वज्र धारण करतो, रोंद तोंडाचे, ओरडणारे आणि मांसभक्षक कुत्रे त्याजपाशी आहेत असे म्हटले आहे.
रूद्रालाच ऋग्वेद आणि इतर वेदांत एकाच वेळी भयानक आणि संहारक आणि त्याचवेळी भयनाशक आणि कल्याणकारक म्हणूनही संबोधलेले आहे.
रूद्र ही मूळची अनार्य देवता असे मानले जात असल्याने वैदिक देवतांत रुद्राचा समावेश होऊनही त्याची मूळची संहारक असलेली अनार्य प्रतिमेची स्मृती कायम ठेवली आहे.
आता काहीसे लिंगाविषयीची- सजीव सृष्टी जर योनि आणि लिंग यांच्या संयोगाने उत्पन्न होते तर निर्जीव सृष्टी तशाच तर्हेने उत्पन्न होत असली पाहिजे तेव्हा हेच जगाचे आदिकारण असल्याचे मानले जाऊन सयोनीलिंग स्वरूपात लिंगपूजा प्रचारात आली.
बाकी शिवलिंगांचे प्रकारही रोचक आहेत. सयोनी लिंग, अयोनीलिंग, धारालिंग, चतुर्मुखलिंग, मुखलिंग, अष्टोत्तरशत लिंग, सहस्त्र लिंग्,हे सर्व प्रकार पाटेश्वरच्या डोंगरात दिसून येतात तर लिंगोद्भव प्रतिमा पुण्यातल्या त्रिशुंड गणपती मंदिरात दिसून येते.
श्रीक्षेत्र पांडेश्वर
महाराष्ट्रातील बहुतेक मंदिरे पांडव कथेशी जोडलेली असतात तसेच या मंदिराविषयी सांगितले जाते ते 'पांडव कालीन किंवा पांडवानी एका रात्रीत मंदिर उभारले असल्याने या क्षेत्राला पांडेश्वर असे म्हणतात' अशी लोकधारणा आहे .या मंदिराला गौरवशाली वारसा आहे या मंदिराचे बांधकाम तब्बल सोळाशे वर्षापूर्वीचे असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. मुळचे चैत्यगृह नंतरचे शिखर ,दगडी मुखमंडप ,नदीकाठचा तट लगतच्या ओवा-या ,मराठा कालीन भित्तीचित्रे , रंगकाम आदी बाबींमुळे सोळाशे वर्षातील मंदिर रचनेतील बदलांचा आलेख दर्शवणारा ठेवा म्हणून इतिहास संशोधक व अभ्यासक याकडे पाहतात.
श्रीक्षेत्र पांडेश्वर विषयी अधिक माहितीसाठी लॉग इन करा http://www.jejuri.in/around_jejuri
आपला अभिप्राय व सूचना संकेतस्थळावर जरूर नोंदवा..
आणी हे २ फोटू....


१)स्तंभ
२) स्तंभा-आतून दिसणार्या पायर्या
अजून काही माहिती या मंदिरा बद्दल..
१. पांडवानी बांधलेली या मंदिरात ध्युत/सारीपाट (लुडो) कोरला आहे मंदिराच्या दरवाज्या जवळच.
२. मी प्रत्यक्ष पाहिल नाही, ऐकीव माहिती, मंदिराच्या बांधकाम वेळी चुना गाळन्या साठी वापरलेले एक मोठं जात देखील आहे. आता ते गावातील लोकांनी ढकलून बाजूला नेऊन ठेवल आहे.