Monday, January 31, 2022

टिपू सुलतान खरंच स्वातंत्र्यसेनानी होता का?

 

Tipu Sultan – The Imprecise Hero #नेपोलियन_जॉर्जवॉशिंग्टन_मराठे_कॉर्नवॉलीस

चार्ल्स कॉर्नवॉलीस हा अवलिया त्रिखंडात लढलेला मनुष्य होता,जगभरातील महान सेनानींशी लढण्याची अथवा बरोबर काम करण्याची त्याला संधी मिळालेली. अमेरिकेत जॉर्ज वॉशिंग्टन सोबत लढताना १७८२ साली याला पराभव स्वीकारावा लागला, भारतात आल्यावर दक्षिणेतील राजकारणासाठी त्याचा महादजी शिंद्यांशी संबंध आला. १७९२ साली मराठ्यांनी याच्यासोबत आघाडी करत टीपू सुलतान चा पराभव केला, १८०२ साली कॉर्नवॉलीस ने नेपोलियन सोबत फ्रांस मध्ये अमेंस चा तह घडवून आणला.

टीपू आणि आंतरराष्ट्रीय राजकारण : टीपू विरुध्द युद्धात इंग्रज आघाडी करून उतरले याला कारण फ्रेंच राजकारण. फ्रेंचांनी अमेरिका,ऑस्ट्रिया,स्पेन,मॉरीशस अश्या अनेक ठिकाणी इंग्रजाविरुद्ध आघाड्या उघडल्या . अमेरिकेत जॉर्ज वॉशिंग्टन सोबत ते इंग्रजांविरुद्ध लढले, भारतात तर फ्रेंचांना आघाडी करण्यासाठी टिपू सारखा मुरब्बी सेनानी लाभला.फ्रांस चा राजा लुईस याने आणि नंतर नेपोलीयन ने सुद्धा टिपू ला मदत देण्याचे मान्य केले होते.हे मुख्य कारण आणि अनेक कारणे यामुळे इंग्रजांना टिपू शी कधीना कधी लढावे लागणारच होते. मराठ्यांविरुद्ध च्या लढाई साठी मदत मिळावी म्हणून त्याने आपले वकील तुर्कस्तान,अफगाणिस्तानात पाठवले. नेपोलियन नेही टिपू ला इंग्रजांच्या विरुध्द लढण्यास इजिप्त मधून १५०००० सैन्याची मदत देण्याचे कबूल केले होते , पण नाईल च्या युद्धात पराभव झाल्याने ते होऊ शकले नाही .

टीपू आणि मराठे : टीपू च्या बापाने म्हणजे हैदर अली ने १७७२ च्या शांततेच्या तहानंतर सुद्धा मराठ्यांचा कृष्णा आणि तुंगभद्रे च्या मधला भूभाग १७७४ आणि १७७८ साली बळकावला होता, जो टीपू ने गादीवर आल्यावर द्यायला नकार दिला. मराठ्यांशी आणि इतरांशी केलेले तह वारंवार मोडल्याने ‘विश्वासघातकी’ शासक अशी टिपू ची ओळख बनली.सुलतान-उत-तारीख या आपल्या डायरीत टिपू ने तुकोजीराव होळकरांचा उल्लेख ‘सर्वात मोठा नालायक’ असा केलाय तर पेशव्यांना ‘हरामखोर’ म्हंटले आहे. टिपू च्या अश्या धोरणाने दक्षिणेतील स्थिती इतकी अस्थिर झाली कि महादजी शिंदे,तुकोजी होळकर,मुधोजी भोसले यांना उत्तरेच राजकारण सोडून टिपू प्रकरणात हात घालावा लागला. इकडे पुणे आणि सातारा येथून हि पेशवे आणि छत्रपतींकडून टिपू वर मोहीम काढण्यासाठी आदेश निघाले .

१७९२ आणि १७९९ साली झालेल्या तिसऱ्या आणि चौथ्या मैसूर युद्धात मराठ्यांनी भाग घेतला.कॉर्नवॉलीस च्या नेतृत्वाखाली झालेल्या तिसऱ्या युद्धात टिपू चा मोठा प्रदेश मराठे,इंग्रज आणि निजामाला मिळाला तर चौथ्या युद्धात वेलस्ली च्या नेतृत्वात सैन्याने जोरदार मुसंडी मारत श्रीरंगपट्टनं जिंकले या निकराच्या लढाईत टिपू चा मृत्यू झाला.

टिपूला संपवून मराठ्यांनी कोणतीही चूक केली नाही हे नमूद करावेसे वाटते. पेशव्यांना बर्याचदा यात दोषी धरतात, पण टिपू चे राजकारण हे उत्तरेतून दक्षिणेत आले. या प्रकरणात जास्त पुढाकार महादजी शिंदे यांनी घेतला,त्यांनी मॅकफ़र्सन आणि कॉर्नवॉलिस या दोन्ही जनरल्स ना टिपू विरुद्ध पुण्यातर्फे हालचाल करण्यास भाग पाडले, जे गरजेचेही होते.

ब्रिटिशांशी युद्ध करणे टिपू साठी निरुपाय होता,राष्ट्रप्रेम नव्हते. याच टिपू आणि हैदर अली ने १७६९ साली इंग्रजांशी करार केलेला,जर मैसूर वर भविष्यात मराठ्यांकडून आक्रमण झाले तर इंग्रज टिपू ला मदत करतील असा.

उत्कृष्ठ सेनानी : सेनानी म्हणून टिपू ची कारकीर्द वाखाणण्याजोगी होती. आक्रमक,मुत्सद्दी आणि आधुनिक युद्धशैली मुळे टिपू ने मराठे,निजाम आणि इंग्रजांच्या विरुध्द अनेक युद्धे जिंकली . इंग्रजांना रॉकेट च्या हल्ल्याने चकित करत आर्थर वेलस्ली (वेलिंग्टन),कॉर्नवॉलीस सारख्या जागतिक दर्जाच्या योद्ध्यांना ही माघार घ्यायला लावली.रॉकेट च्याअविष्काराचे श्रेय हैदर आली आणि टिपू ला द्यायलाच हवे.

धर्मांध आणि असहिष्णू टिपू :

सुलतान-उत-तारीख या आपल्या डायरीत टीपू कुर्गी लोकांचा उल्लेख ‘Whore Sons’ असा करतो.
मीर हुसेन किरमानी हा टीपूचा इतिहासकार म्हणतो ‘१७८८ साली त्याने कुर्ग आणि कालिकत वर मोहीम काढली त्यात सुमारे ६०,००० सैन्य होते. कुर्ग मधली कुशालपुरा,तालकावेरी,मडिकेरी मधली अनेक गावे जमीनदोस्त करण्यात आली.थलीपराप्पू ,त्रीचम्बरम सारखी अनेक मंदिरे पाडण्यात आली, मडिकेरी येथील प्रसिध्द ओमकारेश्वर मंदिरास क्षती पोचू नये म्हणून त्याच्या कळस काढून त्याऐवजी घुमट लावण्यात आला. भगवती मंदिरा सारखी अनेक मंदिरे कायमस्वरूपी झाकण्यात आली.विल्यम लोगन च्या मलबार मन्युएल आणि लुईस रैस च्या मैसूर ग्याझेटियर मध्ये टीपू ने सुमारे ८००० मंदिरांना उपद्रव केल्याचे म्हंटले आहे.

कुर्ग मधील सुमारे ३०,००० पेक्षा जास्त लोकांचे जबरदस्ती धर्मांतर करण्यात आले, याचा उल्लेख टीपू ने कर्नूल चा नवाब रणमस्त खान याला लिहिलेल्या पत्रात केला आहे.आजही हे लोक कुर्ग मध्ये ‘कोडावा मापीलाज’ (कुर्गी मुस्लीम) म्हणून ओळखले जातात. कालीकत ची अवस्था सर्वाधिक भयावह होती, बर्थोलुम्यू या जर्मन प्रवाश्याने लिहिलेल्या ‘Voyage in East Indies’ या प्रवासवर्णनात याचे उल्लेख आलेत “टीपू साहेब ची ३० हजार माणसे फक्त कत्तल करण्यासाठी पुढे चालत होती त्यामागे टीपू स्वतः हत्तीवर आणि मागे पुन्हा ३० हजार सैन्य असा लवाजमा होता.चौकाचौकात फासावर लटकवलेल लोक दिसत होते, अनेकांचे धर्मांतर केले,नकार देणार्यांना मारण्यात आले. अनेकांना नंग्न करून हत्तीच्या पायाला बांधण्यात आले.युद्धबंदी स्त्रिया सैनिकांना देण्यात आल्या”

टिपूची अंगठी- वेलस्ली च्या नोंदीनुसार आणि ज्या ऑक्शन हाऊस कडे हि ‘राम’ कोरलेली अंगठी आहे त्यांच्यानुसार हि अंगठी टिपू च्या बोटात नसून त्याच्या पॅलेस मध्ये केलेल्या लुटीत मिळाली आहे.

टिपूची श्रींगेरी मठावरील श्रद्धा – टिपू च्या कारकीर्दी साठी शतकोट चंडी यज्ञ मठातर्फे केला गेला.या यज्ञानंतर टिपूला प्रचंड यश प्राप्त झालं. त्यामुळे टिपू ची मठावर प्रचंड श्रद्धा होती.मराठ्यांनी संतापाच्या भरात जरी हा मठ लुटला असला तरी याची नंतर पूर्ण भरपाई मराठ्यांनी केली.

काही मंदिरांना वर्षासन देऊन हजारो मंदिरे टिपू पाडत असेल तर औरंगजेबालाही सहिष्णू राजा म्हणायला काही हरकत नाही,त्यानेही हजारो मंदिरांना वर्षासने,इनामे दिली होती. अफजल खानाने वाई तील मंदिरांना वर्षासने दिल्याची पत्र आहेत,म्हणून दक्षिण भारतात शेकडो मूर्ती तोडणारा ‘बुत शिकन’ अफझलखान हा सहिष्णू शासक असू शकतो का ?

टिपूची एकंदर वादग्रस्त कारकीर्द पाहता सम्राट अकबर (उत्तरकालीन) , दारा शुकोह आणि इब्राहिम आदिलशाह (1556-1627) या सहिष्णू मुस्लिम राजांशी तुलनेत टिपू कुठेच बसत नाही. शिवरायांशी तुलनेचा तर विचारच नाही होऊ शकत.

Saturday, January 29, 2022

रामगड / माहूरगड / माहूरचा किल्ला

  आज आपण माहुरगड आणि परिसराची माहिती घेणार आहोत. माहूर, नांदेड जिल्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. नांदेडपासून १४० कि.मी.वर असलेले महाराष्ट्रातील असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान म्हणजे श्रीक्षेत्र माहुरगड. महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पिठापैकी माहूरगड हे एक पुर्ण पीठ आहे. श्री रेणुकादेवी जगदंबेचे हे ठिकाण समुद्रसपाटीपासून २६०० फूट उंच डोंगरावर वसलेले असुन या ठिकाणी भक्तांचा वर्षभर वावर असतो. माहुर गाव नांदेड जिल्ह्याच्या टोकाला असल्याने तेथे जाण्यासाठी मुंबईहून नंदिग्राम एक्सप्रेसने किनवट गाठावे व तेथुन ५० कि.मी.वरील माहुरला एसटी किंवा खाजगी वहानाने जाता येते. ऋषीमुनींची तपोभूमी म्हणूनही माहूर गाव प्राचिन काळापासून अस्तित्वात असुन पुराणातील परशुराम कथा या भागाशी जोडलेल्या आहेत. .श्रीरेणुकादेवी मंदिर, अनुसयामाता मंदिर, देवदेवेश्वर मंदिर इ. धार्मिकस्थळे माहूरला आहेत. इतिहास प्रेमींसाठी रामगड उर्फ माहूरचा किल्ला, माहूर संग्रहालय, सोनापीर दर्गा, पांडवलेणी आणि राजे उद्धवराव उर्फ उदाराम देशमुख यांचा वाडा अश्या अनेक ऐतिहासिक वास्तुसुद्धा माहूरमध्ये आहेत.आठव्या शतकातील वाकाटक काळातील लेणी येथे पहायला मिळतात.
    मराठवाड्यातील नांदेड जिल्हा, किनवट तालुका येथील माहुरगडावर श्रीदत्तात्रेय, श्रीरेणुका, अनसूया इत्यादींचा निवास असल्याने दत्तभक्तांना माहूरची ओढ नेहमीच असते. माहूरगड हा सह्याद्रीचा भाग असून येथे दत्तात्रेय निद्रेसाठी येतात असा समज आहे. स्कंदपुराणातील सह्याद्रिखंडात रेणुकामाहात्म्य आणि कालिकाखंडात आमली (माहूर)- माहात्म्य अशा दोन कथा आल्या आहेत. ब्रह्मदेवास सृष्टीची रचना करण्यास सोयीचे व्हावे म्हणून विष्णूंनी एक नमुना म्हणून सृष्टीच्या अगोदर हे क्षेत्र सात कोस लांब व सात कोस रुंद अशा विस्तृत प्रमाणावर निर्माण केले. या क्षेत्राला चार दरवाजे आहेत.
 १) पूर्वेकडील हाटकेश्र्वर असून येथे बंजरा नदीवर धबधबा आहे.
२) दक्षिणेस पैनगंगेच्या काठी फुलसावंगी गावाजवळ एका टेकडीवर विमलेश्र्वराचे स्थान आहे.
३) पश्र्चिमेस इज़नी गावाजवळच्या पहाडात दर्दरेश्र्वर आहे.
४) उत्तरेकडे सिद्धेश्वर व कापेश्वर अशी स्थाने आहेत.
   माहूर अथवा मातापूर या क्षेत्राच्या तीनही बाजूंनी पैनगंगा नदी वाहते. नदी ओलांडून गेल्यावर दोनचार मैलांवर पहाडाच्या पायथ्याशी माहुरक्षेत्र हे गाव आहे. रेणुकामाता, दत्तात्रेय व अनसूया यांची शिखरे गावाच्या पार्श्र्वभूमीस लागून स्वतंत्रपणे आहेत. पैनगंगा नदीसही पौराणिक पार्श्र्वभूमी आहे. विदर्भातील लोणारक्षेत्रात लवणासुरास विष्णूंनी मारले. म्हणून ब्रह्मदेवाने श्रीविष्णूचे पाय कमंडलूतील पाण्याने धुतले. भगवंताच्या चरणतीर्थातून पावन होणारी जी नदी ती पैनगंगा झाली. हिलाच पुढे प्रणिता अथवा प्राणहिता असे नाव मिळाले.
  ‘प्रणिता प्रदक्षिणा वाहते । दुजें वैकुंठ महीवतरें’ असा महिमा या क्षेत्राचा विष्णुदासांनी वर्णन केला आहे. आमलीग्राम, सिद्धपूर, देवनगर, मातापूर अशी विविध नावे निरनिराळ्या युगात या क्षेत्रास मिळालेली दिसतात. काशीक्षेत्रापेक्षाही याचे महात्म्य मोठे असल्याने ‘जवा आगळी काशी’ असे माहूरसंबंधाने म्हटले जाते. काशी क्षेत्रास जसा काळभैरव तसा या क्षेत्रास झंपटनाथ हा क्षेत्रपाल कोतवाल आहे.

  रेणुका शिखराचा गर्द वनराईने अच्छादलेला परिसर

 या माहूर क्षेत्रात जगदंबा रेणुका, दत्तात्रेय व देवदेवेश्र्वर या प्रमुख दैवतांचा वास असल्याने सर्वच भाविकांना याची ओढ नित्य असते. जमदग्नी, रेणुका, परशुराम यांची स्थाने येथेच आहेत. जमदग्नीच्या चितेवर रेणुका सती गेली ती येथेच. दत्तात्रेय या प्रसंगी उपस्थित होते. चितेतून गळ्यापर्यंतच निघालेली रेणुका आज येथील रम्य शिखरावर निवास करून आहे. शिखराच्या पायथ्याशी मोवाळा नावाचा एक तलाव असून त्याला मातृतीर्थ म्हणतात. या तीर्थात स्नान केल्याने सर्व पातकांचा नाश होतो. रेणुकाशिखरापासून तीन मैलांवर दत्तात्रेयांचे शिखर आहे. हे संस्थान गोसावी महंतांच्या ताब्यात होते. तूर्त तेथील व्यवस्था सरकार पाहते. येथील मंदिरात दत्ताच्या पादुका व महादेवाची पिंड आहे. दत्तस्थानापासून खालच्या बाजूस सर्वतीर्थ आहे. जवळच अमृतकुंड असून येथेच प्रथम परशुराम व दत्तात्रेय यांची भेट झाल्याचे सांगतात. दत्तशिखराच्या दक्षिणेस मैल-दीड मैलावर अनसूयेचे शिखर असून तेथे अत्री ऋषींचा आश्रम होता. दत्तात्रेय व अनसूया यांच्या मूर्ती या शिखरावर आहेत. दत्तात्रेयांच्या चरित्रातील अनेक सुरस कथा याच भागात घडल्याचे सांगतात.
           माहुर-मातापूर या रेणुकामातेच्या निवासस्थानी तीन कोटी तीर्थस्थाने आहेत. त्या स्थानांचे दर्शन घेतले तरी मोक्षप्राप्ती होते असे मानले जाते. म्हणून तर ते तीर्थक्षेत्र पवित्र होय. मातापूरचा अपभ्रंश म्हणजे माहुर. ते अनसूयेचे माहेरही आहे. रेणुकादेवीचे अनादि अनंत रूप स्वयंभू आहे. रेणुकेचे मुखकमल कमलाकार, सिंदुरचर्चित, रक्तवर्ण आहे. भाविक लोक माथा रेणुकामातेच्या चरणी सुमारे दोनशेपंचावन्न पायऱ्या चढून येऊनही न शिणता प्रसन्न मुद्रेने टेकवतात. त्यांना तिचा चांदीचा मुकुट, तिची भेदक नजर व तिचे तेजोमयी रूप चकित करते.
  सुरवातीला आपण रेणुकादेवी आणि इतर मंदीरांची माहिती घेउया आणि नंतर माहुरगडाची माहिती घेउया.
 महाराष्ट्रातील साडेतीन शक्ती पीठातील एक पूर्ण पीठ माहुरची रेणुका देवी आहे.

देवीची आख्यायिका
   रेणुका मातेच्या तांदळयाची का पूजा केली जातो? याबाबत अनेक पुराण कथा आहेत. 
      मातापूर (माहुरगड) चा महिमा रेणुका महात्म्यातून गायिला गेला आहे. रेणुका हीच एकवीरा अदिती आहे. त्यापैकी एका पौराणिक दाखल्यानुसार माता पार्वतीने कुळन (कान्यकुब्ज ) देशाच्या रेणू राजाने कन्याप्राप्तीसाठी भागीरथीच्या तीरावर केलेल्या यज्ञातून ती प्रकटली. तिचे नाव रेणू ठेवण्यात आले. तिचे स्वयंवर झाले आणि शंकराचा अवतार मानल्या गेलेल्या जमदग्नी ऋषीसोबत तिचे लग्न झाले. इंद्राने स्वयंवरात दिलेल्या कामधेनू, कल्पतरू, दिव्य चिंतामणी, परीस व सिद्धपादुका या गोष्टी सोबत घेऊन, रेणुका पतीच्या सोबत त्यांच्या घरी आली. तिला वसू, विश्वावसू, बृहद्भान, बृहकरत्न आणि परशुराम हे पाच पुत्र झाले.
   रेणुका स्नानासाठी नदीवर एकदा गेली असताना, तेथे गंधर्वाची स्त्रियांसह कामक्रीडा पाहून ती क्षणभर रमली. तिला पतीची आठवण राहिली नाही. त्यामुळे तिला घरी परतण्यास निमिषभर विलंब झाला. तपस्वी पतीने ते सर्व अंतर्ज्ञानाने जाणले नि क्रोधाच्या भरात त्यांनी त्यांच्या एकेका पुत्राला त्यांच्या पत्नीचा शिरच्छेद करण्यासाठी पुकारले! पहिल्या चारही पुत्रांनी मातेच्या वधास नकार दिला. जमदग्नी ऋषींनी त्यांनाही शापसामर्थ्यांने भस्मसात केले. परशुरामाने मात्र आईला पितृआदेशानुसार ठार केले. पित्याने त्यावर प्रसन्न होऊन त्याला वर मागण्यास सांगितले. तेव्हा त्याने प्रथम त्याच्या चारही भावांना जिवंत करण्याची विनंती केली. पित्याने ती मान्य करून मृत पुत्रांना जिवंत केले. परशुरामांनी माता रेणुकेलाही जीवदान मागून घेऊन, तिला तिने केलेल्या अपराधातून सन्मानाने मुक्त केले! जमदग्नींनी घडलेल्या घोर प्रसंगाला कारणीभूत ठरलेल्या क्रोधाला दूर केले.
   सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी कामधेनू गाय जमदग्नीकडे होती. राजा सहस्त्रार्जुनाला या कामधेनूचा मोह झाला. त्याने जमदग्नीकडे मागणी केली, मात्र ती फेटाळली. 
महिमावती नगरीच्या राजाने- सहस्रार्जुनाने अतिथी होऊन, जमदग्नीकडे जाऊन त्यांची ‘कामधेनू’ बळकावण्यासाठी कपट कारस्थान रचले आणि जमदग्नी पुत्र परशुराम आश्रमात नसल्याची संधी साधून सहस्त्रयर्जुनाने आश्रमावर हल्ला केला. जमदग्नीला ठार केले, रेणुकेलाही एकवीस जखमांनी घायाळ केले आणि कामधेनू हिरावून नेली. परशुराम त्यावेळी तप करण्यास गेलेले होते. त्यांना ते तपाचरणानंतर परतले तेव्हा ती घटना कळली. त्यांनी सहस्रार्जुनाला ठार करण्याची प्रतिज्ञा मातेपुढे केली. त्याने महापराक्रम करून सहस्त्रार्जुनाचा वध केला नि पुढे पृथ्वी निःक्षत्रिय एकवीस वेळा केली.
  रेणुकेने परशुरामाला त्याच्या पित्यावर अग्निक्रिया करण्यासाठी जेथे कोरी भूमी आहे तेथे घेऊन चल असे सांगितले. परशुराम एका कावडीत माता-पित्यांना ठेवून कान्यकुब्ज नगरीतून निघाला. तो प्रथम विष्णुपुरीतील निरजतीर्थास गेला. नंतर काशी, कुरुक्षेत्र, द्वारका, तपोवन, द्वीप, समुद्र आदी क्षेत्रे पार करत अंती कृष्णामलकी गावी आला. तेच पुढे मातापूर-माहुर म्हणून प्रसिद्ध झाले! तेथे श्री दत्तात्रेयाने कोरी भूमि दाखविली. येथेच पित्यावर अंत्यसंस्का्र कर, असे सांगितले.
   परशुरामाने बाण मारुन मातृतीर्थ व सर्वतीर्थ निर्माण केले. या पाण्याने स्नान घालून जमदग्नीवर अंत्यसंस्का्र केले.  तेथून जवळ दत्तात्रेय यांचा आश्रम आहे. दत्तात्रेय यांनी रेणुकेला नमस्कार केला आणि तिचा गौरव ‘हे माते! देवी सुरेश्वरी! तू एकटी या जगात वंदनीय आहेस’ असा केला. रेणुकामातेने दत्तात्रेय यांना पतीवर विधियुक्त अग्निसंस्कार करण्यासाठी विनंती केली आणि स्वतःची त्यांच्याबरोबर सहगमनाची इच्छाही बोलून दाखवली. त्यावर परशुराम म्हणाले, “आई! मी तुझ्यावाचून ह्या सह्याद्रीवर एक क्षणही राहू शकत नाही.” तेव्हा रेणुकामातेने परशुरामांना सांगितले, की “मी जरी अग्निप्रवेश केला तरी मी नंतर सर्व तीर्थांसहित, देव, मुनी, किन्नर आदींसहित, तेथेच वास्तव्य करीन.” तेव्हापासून सर्वजण त्या जगन्मातेचे गुणगान गाऊ लागले- माता रेणुका सती गेली. सती गेलेल्यान मातेच्या विरहाने परशुराम दुःखी झाला. तोच आकाशवाणी होऊन,तुझी आई जमिनीतून वर येईल. फक्त तू डोळे मिटून तिचे स्मरण कर, डोळे उघडून पाहू नको,असे सांगण्या त आले. परंतु परशुरामची उत्सुकता शिगेला पोचल्याने त्याने लवकरच डोळे उघडून पाहिले. तोपर्यंत रेणुका मातेचे मुखच वर आले होते. हीच तांदळास्वारुपातले मुख असलेली माहूरची रेणुका होय.
 मेळे आले योगिनीचे । चरण वन्दिती रेणुकेचे ।।
येऊनी गणपती । की शयना पती | चकचकित सरस्वती ।
वाणी खुंटली द्वेषाची । वार्ता काय मानवाची ।
ऐसा जिचा गुण महिमा । न कळे योगी जना सीमा ।।
अंबेचा गुणमहिमा असा गाता गाता मातापूरमहिमाही वेगळया रूपाने गायला जातो.
मातापूर उंच पर्वत । आंबेपर्यंत । अंबे अवघड घाट । अरण्य महाडोंगर | वृक्ष लागले दाट कठीण, मार्ग हा दिसतो। पुढे न कळे वाट । दुष्टी देखे मळपीठ।।

 

        मातापूरची पूर्वीची अवघड वाट आता सुकर झाली आहे. अर्थात, डोंगर चढून शिखरावर पोचताच रेणुकामातेची प्रसन्न मूर्ती अवघा शीणभार घालवते. मुळात जमदग्नी हे भगवान शंकर आहेत नि ही एकवीरा रेणुका म्हणजे गंगा आदितीच आहे! उभयतांचे ते अवतार लोककल्याणासाठी आहेत. परशुराम यांच्या रूपाने साक्षात् विष्णुभगवंत रेणुकामातेच्या पोटी त्याच कार्यासाठी अवतरले असे मानले जाते.
मंदिर इतिहास
   माहूर गडावर कमलमुखी रेणुकेचे सुंदर कमलाकार मंदिर आहे. हे मंदिर अनादी काळापासून येथे असावे असे सांगंण्यात येते. हे मंदिर यादवराजा देवगिरी यांनी सुमारे 800 ते 900 वर्षापूर्वी बांधले. मंदिराच्या मुख्य दरवाजाची पुर्नबांधणी ही इ.स. 1546 मध्ये झाली असून त्या संबधीचा शिलालेख मुख्य दरवाजावर अंकित केला आहे. हया मंदिराचा विस्तार तीनशे नव्वद वर्षापूर्वी शालिवाहन राजाने इ.स. 1624 च्या सुमारास केला आहे.
   हे मंदिर वास्तुशास्त्राच्या नियमानुसार उभारण्यात आले आहे. मंदिर हे गाभारा व सभामंडप या दोन भागात विभागले गेले आहे. गाभाऱ्यात कोणालाही प्रवेश दिला जात नाही. गाभाऱ्यात प्रवेशव्दासर चांदीच्या पत्र्याने मढविलेले आहे. देवीचा मुखवटा हा 1.524 मीटर (5 फुट) उंचीचा आहे आणि त्याची रुंदी 1.2192 मीटर (4 फुट) इतकी आहे.
 दक्षिणाभिमुख चांदीने मडविलेल्यात प्रवेशव्दारातून आपण प्रत्यक्ष रेणुकेच्या मंदिरात प्रवेश करतो. रेणुकेच्या विविध पुजा-अर्चनेने व पुजाऱ्याच्या गाभाऱ्यातील मंत्र विधीने वातावरणात चैतन्य निर्माण होते.तद्वतच तेला तुपाच्या नंदादीपामुळे वातावरण प्रसन्न होते.जेंव्हा नम्र होऊन पूर्वाभिमुख असलेला रेणुकेच्या तांदळा स्वरुप तेजपुंज मुखकमलाचे दर्शन आपणास होते.
रेणुका देवीचे मंदीर
देवीचा विड्याचा प्रसाद
रेणुका देवीचा तांदळा

  रेणुकामातेचे स्वरूप तांदळारूपातील अतिशय सुंदर आहे. भव्य नाक, तेजस्वी नयन नि लोभस ओठ शोभिवंत! पाच फूट उंचीचा तिचा मुखवटा गाभाऱ्यात सिंहमुखासनावर विराजित आहे. तो अत्यंत रेखीव व देखणा आहे. मुखवट्यास दोन नऊवारी लुगडी नेसवतात. तिच्या भाळी आलटून पालटून ‘ॐ ऐं हीं क्लीं चामुंडायै विच्चे’ या मंत्रातील एकेक अक्षर कलात्मकतेने आलटून पालटून रेखाटतात. त्यामुळे मुखवटा खुलून दिसतो.भक्तांकडे कृपादृष्टी टाकणारे सुवर्णनैन, रक्तवर्ण सिंदुरचर्चित मुखावरील शोभा ही अवर्णनीय आहे. डोक्यावर चांदीचा टोप रेणुकेने परिधान केला आहे. पितांबर नेसल्याने ती अधिक मंगलमुर्ती दिसते. विविध सुवर्णाभुषणे तिने परिधान केली आहेत. भाळी मळवट भरलेला असुन, मुखामध्ये तांबुल आहे. हजारो सुर्याचे तेज तिच्या मुखावर प्रगटलेले आहे. अत्यंत चित्तवेधक - भेदक नजर सरळ आपल्या –हदया मध्ये जाते.
रेणुकामातेचा वास समुद्रसपाटीपासून अठराशे फूट उंचीवर, निसर्गरम्य वातावरणातील माहुरगडावर आहे. तिचे वास्तुशास्त्रानुसार उभारलेले मंदिर मनमोहक आहे. रेणुकामहात्म्य व कालिकाखंड यांमधील आमलीग्राम (माहूर) महात्म्य यात माहुरक्षेत्राचे वर्णन सविस्तर आले आहे. त्या क्षेत्रास कृतयुगात आमलीग्राम, त्रेतायुगात सिद्धपूर, द्वापारयुगात देवनगर म्हणून ओळखत आणि कलियुगात त्यास मातापूर म्हणून ओळखतात. माहुरची ख्याती महाराष्ट्रातील उत्तर काशी म्हणूनही आहे.
   शिवाय सभामंडपाच्या परिसरात अग्रपूजेचा मान असणाऱ्या महाकाली व महालक्ष्मीच्या व तुळजाभवानीची मूर्ती आहेत.खालच्या बाजुला परशुराम मंदिर, दर्शनी भागात गणपती मंदिर, विष्णू कवी मठ,पांडवतीर्थ,औदुंबर झरा, जमदग्नी स्थान, अमृत कुंड, आत्मबोध तीर्थ, मातृतीर्थ,रामतीर्थ इ.आहेत.माहुरगडावरील सभामंडपात परशुराम गणेशरूपात रेणुकामातेच्या समोर बसले आहेत. तिच्या डाव्या बाजूला परशुरामाचा पाळणाही आहे. परशुरामाची मूर्ती पाळण्यात आहे. सभामंडपाच्या बाहेर दक्षिण दिशेला जे शिवलिंग आहे ते जमदग्नीचे स्थान मानले जाते. त्या शिवलिंगाचे दर्शन रेणुकेच्या दर्शनापूर्वी घेण्याची प्रथा आहे. नंतर परशुराम आणि त्यानंतर परशुरामाची माता रेणुकादेवी असे दर्शन घेत जाण्याचा प्रघात आहे. रेणुकामाता मंदिराच्या दक्षिणेला तुळजाभवानी आणि अलिकडे महालक्ष्मी यांची मंदिरे आहेत. त्या गडाच्या पुढे प्रभू दत्तात्रेयांचे मंदिर नि अत्री ऋषींचा आश्रम आहे, तर डावीकडील रामगड किल्ल्यात कालिकामातेचेही मंदिर आहे. त्याच परिसरात सती अनसूयेचेही मंदिर आहे. परशुरामाचे आणखी एक मंदिर गडाच्या पायथ्याशी आहे. तेथे महानुभाव पंथीयांचेही दत्तमंदिर आहे. शिवाय, त्या परिसरातील पाच तलाव मातृतीर्थ, मोवाळे, इंजाळे, गरुडगंगा आणि सर्वतीर्थ या नावांनी परिचित आहेत.

माहूरगडावर साजरे केले जाणारे सण

नवरात्रोत्‍सव
      देवी महात्‍म्‍यात नवरात्राचे अनन्‍य साधारण महत्‍व आहे. हा नवरात्र उत्‍सव म्‍हणजेच आदीशक्‍तीच्‍या पराक्रमाचा – शौर्याचा, रणसंग्रामाचा पवित्र काळ, सतत नऊ दिवस रणचंडीकेने दृष्‍ट राक्षसां सोबत घणघोर युध्‍द करुन,आपला पराक्रम दाखविला तो हा कालखंड. महिषासूर हया राक्षसा सोबत सतत नऊ दिवस युध्‍द करुन त्‍याचा वध केला. तो हा कालखंड अश्विन शुध्‍द प्रतिपदेपासून देवीने हा पराक्रम करुन विजया दशमीस विजय संपादन करुन आई सिंहासनावर विराजमान झाली. असा हा कालखंड हयाच कालखंडास "शारदीय नवरात्र" असेही म्‍हणतात.शारदीय नवरात्रोत्‍सव रेणुकेच्‍या गडावर अतिशय शुचिर्भूत वातावरणात, नि:सिम श्रध्‍देने साजरा केला जातो.
     अश्विन शुध्‍द प्रतिपदेला घटस्‍थापने ने हया मंगल पर्वास सुरवात होते. विधीवत पूजा-अर्चना करुन हया मंगल दिनी एका दगडाच्‍या कुंडामध्‍ये मातृका भरुन त्‍यावर विवीध पाच प्रकारचे धान्‍य टाकल्‍या जाते. त्‍या कुंडावर मातीचा कलश ठेऊन विडयाची पाने व श्रीफळ ठेवल्‍या जाते व त्‍या कुंडाच्‍या बाजूला पाच ऊस उभारुन पूष्‍पहार अर्पण केल्‍या जातो व प्रतिपदेपासून नवमी पर्यंत तेलाचे व तुपाचे अखंड नंदादीप तेवत ठेवल्‍या जातात. त्‍याच प्रमाणे प्रतिपदेस घटस्‍थापने पासून ते दस-यापर्यंत पायस म्‍हणजे दहिभात, पूरणपोळीचा नैवेद्य नियमीत दाखविला जातो. घटस्‍थापनेपासून चार दिवसा पर्यंत गडावर रेणुका मंदीरा मध्‍ये संपूर्ण, विधीवत, यथासांग पूजा विधी नियमीत केल्‍या जातात.
     नवरात्रातील पंचमीस/ललितापंचमीस देवीचे मुखकमल अत्‍यंत आकर्षक आणि चित्‍तवेधक दिसते. हया दिवशी देवीची अलंकार पूजा केली जाते. महापूजा व महाआरती केल्‍या जाते व सर्व भावि‍क भक्‍तांना महाप्रसादाचा लाभ दिल्‍या जातो व सुर्यास्‍तापूर्वी देवीचे अलंकार उतरुन महाआरती केल्‍या जाते. रात्रो जागरण,गोंधळ व गायक कलवंताच्‍या हजेरीमधून उदो उदो केला जातो.  नवरात्रातील सप्‍तमीस जवळील महाकालीच्‍या गडावर जाऊन महाकालीची यथासांग पूजा केली जाते व महाकालीस महावस्‍त्र अर्पंण केल्‍या जातात. देवीचे अलंकार सूर्यास्तापूर्वी उतरवल्यावर तिची महाआरती होते. वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेले कलावंत त्यांची संगीतसेवा पंचमीला सादर करतात. विख्यात गायकनट बालगंधर्व ते भजनसम्राट अनुप जलोटा अशा दिग्गजांनी तेथे संगीतसेवा केली आहे. 
        सप्तमीला महाकाली गडावरील महाकालिकेच्या मंदिरात जाऊन, तिची विधिवत पूजा करून, तिला महावस्त्र अर्पण करण्याची प्रथा आहे. 
       अष्‍टमीस पहाटे विधीवत देवीची सर्व पूजा विधि झाल्‍यानंतर गुप्‍त अजाबळी दिला जातो व नंतर यज्ञास सुरूवात होते. अष्टमीला तर रेणुकामातेची यथाविधी पूजा पहाटेच्या प्रसन्न वेळी दिमाखात केली जाते. नवरात्रोत्सवात सप्तशतीचा नित्यपाठ होतो. होमामध्‍ये औंदूबर, खैर, पिंपळ, वटवृक्ष, आघाडा या समिधा टाकल्‍या जातात. दहीभात, धान्‍य, पाचवृक्षाची लाकडे, अदी होमामध्‍ये अर्पण केल्‍या जातात. या पूर्वी नवग्रहाची पूजा केली जाते. सर्वच देव देवतांना अवाहन करुन यज्ञास सुरूवात होते.यज्ञाला पूजेनंतर लगेच सुरुवात होते. तो यज्ञ चालू असताना सप्तशतीचे पठण सुरूच असते. मात्र सप्तशती पठणातील आठव्या अध्यायाला यज्ञविधी थांबवला जातो आणि रेणुकामातेला पंचामृतादी पूजाद्रव्याने स्नान घालून तिची महापूजा होते. नवीन वस्त्र परिधान केलेली देवी शोभून दिसते. सप्तशतीचे पठण देवीला महानैवेद्य दाखवल्यावर नवव्या अध्यायापासून पुन्हा सुरू होते. यज्ञाचाही पुन्हा आरंभ केला जातो. नववा अध्याय पूर्ण झाल्यावर अष्टमीच्या यज्ञाचीही सांगता होत असते. 
   नवमीस दिवसभर अष्‍टमी प्रमाणेच पूजा विधी केली जाते. नवमीचा यज्ञ होऊन मंत्राचा जप केल्‍या जातो व जप करुन यज्ञात पुरण-पोळीची आहुती दिली जाते व अजाबळी यज्ञ कुंडात दिला जातो नंतर महाआरती पूजा होऊन नवमी यज्ञाची सांगता होते.  दशमीस म्‍हणजे दस-यास देवीचे मुख्‍य ध्‍वज उतरवून त्‍या पवित्र खांबास पंचामृताने स्‍नान घालून शेंदुर,हळद,कुंकू लावून विधिवत पूजा केली जाते व त्‍या व त्‍या देवी ध्‍वजपताक्‍यास नविन वस्‍त्र चढविल्‍या जाते.निशाणाचे ते नववस्त्र एकावन्न मीटर लांबीच्या कापडाचे असते. विजयादशमीला निशाण उतरल्यानंतरची रेणुकामातेची शृंगारपूजा मंगलस्नानासह केली जाते. तिला महावस्त्र अर्पण करून पुरणपोळीचा महानैवेद्य दाखवला जातो. तो सोहळा नयनरम्य असतो. पायसाचा नैवेद्य दाखऊन महाआरती केल्‍या जाते व नंतर गडावरील सर्वच देवी-देवतांजवळ पताका चढविल्‍या जातो. नंतर रेणुकेचा पुत्र परशुरामाची पालखी सजवून त्‍या मध्‍ये परशुरामाची मुर्ती ठेवल्‍या जाते. त्‍या पालखीची मिरवणूक काढून ती पालखी सीमोल्‍लंघना करीता वरदायीच्‍या पहाडावर जाते. ही परशुरामाची पालखी जेव्‍हा रेणुका गडावर प्रवेश करते. तेव्‍हा रेणुकेच्‍या व्‍दारा समोर पालखी समोर अजाबळी दिला जातो व रेणुकेस आपटा रुपी वृक्षाची पाने अर्पण केली जातात व महानैवेद्य दाखविल्‍या जातो.  नवरात्रीच्‍या पूण्‍य काळात देवीच्‍या विविध रुपाच्‍या दर्शनाचा लाभ भाविकास होतो. हया काळा मध्‍ये रेणुकेच्‍या मुखकमलाचे दर्शन घेतांना विविध नऊ रुपे पहावयास मिळतात.वरदायीच्या डोंगरावर जाऊन, म्हणजे सीमोल्लंघन करून स्वस्थानी परतते. मिरवणूक परतताना रेणुकामातेच्या मंदिराद्वारी येताच मातेला आपट्याच्या पानांचे सोने वाहून, महानैवैद्य दाखवून, महाआरतीनंतर तांबूल भरवून नवरात्रोत्सवाची सांगता होते.
कोजागरी पौर्णिमा
     अश्विन शुक्लपक्ष म्हणजेच कोजागरी पौर्णिमा गडावर मोठया उत्साहात साजरी होते. त्यात दिवशी देवीची संपूर्ण पुजा केली जाते व रात्री भजन, किर्तन आयोजित केल्या जाते. पंचखाद्य टाकून दुध घोटलेला प्रसाद पूर्ण चंद्र पाहून हा नैवेद्या देवीस दा‍खविला जातो व महाआरती केल्या जाते आणि उपस्थित सर्व भाविकास हा मधुर प्रसाद वितरीत केल्या जातो.
       श्रावण शुध्‍द त्रयोदशीस सकाळीच रेणुकेची पंचामृताने स्‍नान घालून विधीवत संपूर्ण पुजा केली जाते. हया दिवशी संपूर्ण अलंकार चढविल्‍या जातात. पितांबर नेसविल्‍या जातो. भाळी मळवट भरुन शृंगारीत केल्‍या जाते व पुरण-पोळीचा नैवैद्य दाखवून, मुखी तांबुल भरविला जातो व सर्व भाविकांना महाप्रसादाचा लाभ दिल्‍या जातो. श्रावण समाप्‍तीस ‘ परंजण ’ असे म्‍हणतात. विशेष म्‍हणजे हया संपूर्ण श्रावणमासा मध्‍ये देवीची सेवा करणारे पुजारी अनुष्‍ठान करतात व हया कलावधीत सप्‍तशतीचे पठन नियमीत चालू असते.
दिपावली
     दिपावलीस संपूर्ण दिप प्रज्वलित करून रेणूकेचे मंदीर प्रकाशमय केल्या जाते. संपूर्ण भक्ती ने पुजा अर्चने नंतर मंदिराच्या सभा मंडपात लक्ष्मी पुजन केल्या् जाते.
शाकंभरी नवरात्र
       ह्या शाकंभरी नवरात्राचे महत्व असे आहे की, जेव्हा भूतलावर महाभयंकर दुष्काळ पडला. पाण्याशिवाय जीवमात्रांना जगणे अशक्य झाले. तेव्हा ऋषी-मुनी-देव तपस्वी व भक्तांनी देवीची अराधना केली. तेव्हा प्रसन्न होऊन देवीने तिच्या शरीरा पासून वनस्पती म्हणजे शाक निर्माण केली. ही वनस्पती विश्वातील जीवजंतूना दुष्काळात अन्न म्ह्णून पुरवून त्यांना जगवीले. देवीने उत्पन्न केलेल्या संजीवनी शाक वनस्पतीमुळे जीवरक्षा झाल्याने देवीस शाकंभरी म्हणून ओळखू लागले. असा शाकंभरी नवरात्रोत्स व दुर्गाष्टमी ह्या दिवशी प्रारंभ होतो. नित्य नियमाने संपूर्ण पुजा अर्चना झाल्या नंतर दही भाताचा नैवेद्या व पुरण पोळीचा नैवेद्या दाखवून आरती केली जाते. हा उत्सव पंधरा दिवस चालतो. शुध्दू अष्टजमीस काळ भैरव जयंती होते. एकवीस वडयाची माळ घालून विधीवत पुजा केल्या जाते. व शुध्द नवमीस शाकंभर नवरात्राची सांगता होते. ह्या दिवसी दुध घोटून त्या चा नैवेद्य दाखवीला जातो व प्रसाद वितरीत केला जातो.
मार्गशिष चंपाषष्ठी
       मार्गशिष चंपाषष्ठीला गडावर खंडोबाचे पुजन केल्या जाते.बाजरीची भाकरी, वांग्याचे भरीत व पातीचा कांदा असा नैवेद्य ह्या दिवशी खंडोबास भरविला जातो.
मकर संक्रांत
      पौष शुक्लं म्हणजे मकर संक्रांत ह्या दिवशी तिळ गुळाचा नैवेद्य दाखविला जातो.
होळी
     संपूर्ण पुजा विधी झाल्या नंतर गडाच्या उत्तरेस होलीका पुजन केले जाते. तेव्हा देवीस पातळ,खण, नारळ, बांगडया पुष्प हार अर्पण करून पुजा केली जाते व होळी पेटवीली जाते. नंतर मातृतिर्थ, वनदेवी , आणि विष्णूकवी मठ येथे ही होळी पेटविली जाते. यासह विविध सण व उत्सव मोठया उत्साहाने साजरे केले जातात. ह्या शिवाय प्रत्ये्क दिवशी गडावरील पुजारी देवीची नित्ये नियमाने सेवा करतात. प्रत्येक दिवशी भल्या पहाटे रेणुकेच्या मुखकमलावर शेंदुर लावल्या जातो व पंचामृतादिने स्नान घालून हळद कुंकू भाळी लावल्या जाते. मंत्र पठण व सप्ताशतीचे पाठ केल्या जातात. नंतर महावस्त्र अर्पण करून पुरण पोळीचा नैवेद्य अर्पण केल्या जातो व मुखी तांबुल भरवील्या जातो. महाआरती केल्याच नंतर गडावरील सर्वच देव देवतांची पुजा केली जाते. नित्य नियमाने संपूर्ण देवस्थानची व्यवस्था पाहणारे व पुजा विधी करणारे पुजारी हे येणाऱ्या भक्तगणांची सेवाही मोठया श्रद्धेने करतात.
       वरील सर्व सण उत्सवाचे अवलोकन केल्यास आपणास सहज लक्षात येते की, ही देवी सर्व सामान्यांची अराध्य देवता आहे. आर्य भारतात येण्यापूर्वी भारतवर्षा मध्ये सिंधू संस्कृती ही प्रसिध्द व प्रगत होती हे आपणास ज्ञात आहे. ह्या सिंधु संस्कृ्ती मध्ये राहणा-या प्रत्येकांची अशी धारणा व विश्वास होता की, आपली उत्पत्ती आई-वडीला पासून झाली असल्याने ह्या जगाची उत्पती ती आई-वडीलांन पासून झालेली आहे. विश्वा्चे कोणी आई-वडील आहेत असे समजून हीच वडीलांची व आईचे प्रतिके अनुक्रमे शिवलिंग व जगन्माता होय. ह्या विश्लेषणा वरून लिंगपुजा व देवीची उपासना आर्याच्यां आधीही सिंधु संस्कृतीत चालत आलेली आहे व रेणुकेस मातंगी हे ही नाव आहे. विष्णु रूपी परशुरामाची माता, शिवरूपी जमदन्गींची कांता ही रेणुका असल्यामुळे श्री रेणुका शाक्‍त व वैष्णव ह्या दोन्ही पंथांना पुजनीय आहे.
        नाथ संपद्राय-पंथ, दत्‍तसंप्रदाय,शाक्‍त संप्रदाय, आनंदसंप्रदाय, महानुभाव संप्रदाय, वारकरी(भागवत), सूफी संप्रदाय, समाजाच्‍या धारणेसाठी अतिरिक्‍त अहभावनेने धर्म संप्रदायाचे निर्माण झालेले मतभेद समाप्‍त करून सर्वधर्म संप्रदाय समन्‍वयाना श्री क्षेत्र माहूर येथील प्रयत्‍न भारतात इतरत्र आढळत नाही. अशी संप्रदाय समन्‍वयाची देणगी माहूरच्‍या भूमीचे धर्मोशाक्‍तांनी दिली.
माहूरगड परिसरातील तीर्थस्‍थळे व प्रेक्षणीय स्‍थळांची माहिती
  श्रीदत्‍त शिखर मंदिर व माता अनुसया मंदिर :-
मातापूर’ अर्थात माहूर या नावाने श्रीदेवीच्या साडेतीन शक्तिपीठांपकी एक महत्त्वाचे तिर्थक्षेत्र ‘प्राचीन दत्तक्षेत्र’ म्हणूनही तितकंच प्रसिद्ध आहे. अतिशय प्राचीन अशा या क्षेत्री असलेल्या ‘दत्तशिखरा’वर श्रीदत्तात्रेयांचा वास आहे. माहूर गावापासून  चार-पाच कि. मी. अंतरावर असलेल्या दत्तशिखरावरील मूळ मंदिर १०-१२ फूट एवढय़ाच लांबीरुंदीचे आहे. मूळ मंदिराची बांधणी संवत १२९७ मध्ये महंत मुकुंदभारती यांनी केली. येथे आपणांस एकमुखी दत्ताची मूर्ती पाहावयास मिळते. येथे ‘भारती’ परंपरेतील गोसाव्यांचा नित्य वावर आहे. दत्तस्थानापासून मलभर अंतरावर सती अनुसयेचे मंदिर आहे. येथून जवळच अत्री ऋषींच्या पादुका व आश्रम आहे. येथील दत्तमंदिराच्या प्रशस्त आवारात दत्तपादुका, शिविलग आदी स्थापित आहेत. श्रीदत्तात्रेय हे संचारी दैवत आहे. दत्तात्रेयाचा आश्रम सिंहाचळाजवळ प्रयागवनात आहे. तो स्वेच्छाविहारी अर्थात संचारी असल्याने माहूर, पांचाळेश्वर, कोल्हापूर ही त्याची विहारस्थाने आहेत. यांतील माहूर हे पुरातन दत्तक्षेत्र दत्तात्रेयाचे शयनस्थान समजले जाते. तो पांचाळेश्वरी स्नान करतो आणि कोल्हापुरी भिक्षाटन करतो, अशी श्रद्धा रूढ आहे. मात्र दिवसाची अखेर अर्थात निद्रास्थानासाठी मात्र तो मातापूर ‘माहूर’ येथे सती अनुसयेच्या वात्सल्यभरल्या कुशीत येतो. दत्तमहाराजांसारखे सर्वश्रेष्ठ दैवतही अखेर आईच्या ओढीने या दत्तशिखरावर येते हीच या क्षेत्राबद्दलची अपूर्वाई आहे.







  




   


माहूरला आधी मुनी अत्री आणि महासती अनसूया तिसर्या डोंगरावर राहत असत जे आजही आहे. तिथे श्री दत्तात्रेय, श्री दुर्वास आणि चंद्र जन्म झाला. चंद्र हे ब्रम्हा रूप, दुर्वास हे शिव रूप आणि दत्त हे विष्णू रूप मानले गेले. दुर्वास मुनी चा छोटा आश्रम आजही आहे. दत्त शिखर अलीकडचे आणि सर्वात उंच, आणि त्याआधी माता रेणुका शिखर. परशुरामांना मातृशोक झाल्यानंतर सहस्रार्जुनावरचा क्रोध आवरेना, तेंव्हा काही मुनींनी त्यांना माहूरला जाऊन दत्त मुनींना भेटा असे सांगितले. ते पार्थिव घेऊन तिथे गेले आणि दत्त मुनींनी त्यांचे सांत्वन केले. जिथे गडाखाली तीर्थ आहे तिथे संस्कार केले. म्हणून आजही मातृ संस्कार करण्यासाठी बरेच जण तिथे जातात. जवळचे शिखर हे आईच्या नांवे होईल म्हणून सांगितले. ते तिसरे शिखर. माहूर जवळ (हिवरा संगम जि यवतमाळ येथे) पूस आणि पेनगंगा संगम होऊन नदी उत्तरवाहिनी होते, म्हणून ते पवित्र ठिकाण.   
 दत्तशिखर व अनसूयाशिखर येथून भोवतालचा प्रदेश फारच रमणीय दिसतो. दत्तशिखरावरही अनसूया, विठ्ठलरखुमाई यांच्या मूर्ती आहेत. दत्तमंदिराबाहेर लक्ष्मीनारायण व धुनीधर दत्त अशी दोन मंदिरे आहेत. धुनीतील दत्ताचे भस्म प्रासादिक मानले जाते. दरवाज्यासमोर पश्र्चिमेस उजव्या सोंडेचा गणपती आहे. जवळच कामाक्षीचे लहानसे मंदिर आहे. आसपास गोसावी महंतांच्या अनेक समाध्या आहेत. अनसूया पहाडावर अनसूया व दत्तात्रेय यांच्या मूर्तीखेरीज अत्रिऋषींच्या पादुका आहेत.
       याच माहुरगडावर दासोपंत, साधुमहाराज, विष्णुदास इत्यादींना दत्तप्रभूंचा साक्षात्कार झाला. मातृतीर्थाजवळच श्रीविष्णूदासांचा मठ आहे. विष्णूदासांचे बंधू श्रीगुरुदासमहाराज यांचीही समाधी येथेच आहे. दत्तप्रभू, अत्री, अनसूया यांची भक्तिपर स्तवने विष्णूदासांनी अतिशय लडिवाळ व वात्सल्यपूर्ण भाषेत केली आहेत. रेणुका व दत्तात्रेय यांची वाङ्मयीन पूजा श्रीविष्णूदासांनी केलेली आपण पाहिली आहेच. दत्त, रेणुका, अनसूया, देवदेवेश्र्वर, परशुराम, अत्री इत्यादींच्या वास्तव्यामुळे अनेक भाविकांचे चित्त माहुरगडाशी निगडित झालेले दिसते. येथील पहाडावरील दाट झाडी व एकांत यांचा शोध अनेकांना झाला असल्यास नवल नाही. अलीकडे धनोडे येथे पैनगंगेवर मोठा पूल झाल्याकारणाने रेणुकामाता व दत्तप्रभू यांच्या दर्शनार्थ येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. चैत्री पौर्णिमा, नवरात्र, दत्तजयंती अशा प्रसंगी येथे मोठीच यात्रा भरत असते.
   माहुर गावालगतच पायथ्याशी महानुभवांच्या ताब्यात असलेले सुप्रसिद्ध देवदेवेश्र्वर हे दत्तस्थान आहे. रेणुका व दत्तात्रेय यांच्या आज्ञेने एकदा ब्रह्मदेव क्षीरसमुद्रावर गेले आणि त्यांनी विष्णूला माहूरात आणले. विष्णूंनी येताना आवळीचे झाड बरोबर आणले. विष्णू दत्तात्रेयांच्या आश्रमात आल्यावर परशुरामाने रेणुकेच्या सांगण्यावरून विष्णूच्या पोटात शिरून शंकराची प्रार्थना केली. परशुराम दत्तात्रेयांच्या आश्रमात जगाचे रक्षण करण्यासाठी म्हणून तीन देवांच्या रूपाने राहू लागला. हाच देवदेवेश्र्वर म्हणून प्रसिद्धीस आला. दत्तात्रेयांचेही मन येथे रमले व ते आवळीच्या झाडाखाली ध्यानधारणा करू लागले. पिंगलनाग नावाचे ऋषीही या ठिकाणी दत्तात्रेयांच्या कृपेने महादेवाच्या रूपात राहिले. देवदेवेश्र्वर याप्रमाणे महादेव व विष्णू यांचे स्थान असून महानुभाव दत्तप्रभूंच्या रूपात या स्थानास महत्त्व देतात. रोज सायंकाळची आरती येथे पाहण्यासारखी असते. दत्तप्रभूंना आळविताना अनेकांच्या अंगातील पिशाच्चबाधा दूर होते. देवदेवेश्र्वराच्या खालच्या बाजूस पद्मतीर्थ आहे. शंखतीर्थ, बद्रितीर्थ अशी काही स्थाने येथून जवळच आहेत.
   माहूरगडावरील किल्ल्यात एक ब्रह्मतीर्थ असून त्यास विंझाळे म्हणतात. याच गडावर महाकालिकेचीही मूर्ती आहे. जम नावाच्या एका रजपूत राजाने हा किल्ला सहाव्या शतकात बांधला असल्याचे सांगतात. याचे स्मारक म्हणून ‘जमठाकरी’ नावाच्या एक सण नागपंचमीसारखा आषाढ शु. पंचमीस साजरा करतात. किल्ल्यात गौतम झरा आहे. माहुरच्या वायव्य दिशेस पहाडात कोरलेले पांडवलेणे आहे. तेथील तीर्थास पांडवतीर्थ म्हणतात. रेणुकाशिखरापासून चार मैलांवर कैलासटेकडी आहे. येथे एक शिवलिंग आहे. रेणुकेपासून अर्ध्या मैलावर औदुंबर झरा आहे. अत्रिकुंड, चरणतीर्थ, आत्मबोधतीर्थ, कमंडलुतीर्थ, कज्जलतीर्थ, मूलझरी, रामतीर्थ अशी आणखीही काही पवित्र स्थाने माहुरगडावर आहेत. जमदग्नीच्या खोरीत सूर्यतीर्थ, चंद्रतीर्थ, पापमोचन केदा, मुद्गलेश्र्वर, ऋणमोचन, काशी, प्रयाग, कपिला, भान, परशू, गदा, रामगया इत्यादी नावांची क्षेत्रे आहेत.
माहूरगडाविषयी विशेष सांगायचे झाल्यास, गडावर जाणारा रस्ता पूवी खूप धोकादायक होता. आधी तर लोक पायी जायचे. नंतर डांबरी रस्ता बांधण्यात आला, माहूरवरून जेव्हा पहिली एसटी गड चढली, तेव्हा त्या गाडीचा ड्रायव्हर मुसलमान होता आणि त्याने देवीचा जयजयकार करून गाडी सुरु केल्याचा किस्सा माहुरातले लोक सांगतात. हा रस्ता एवढा कठीण कि खूप अपघात व्हायचे. अर्थात वेग कमी असल्याने फार वाईट काही घडायचे नाही, मात्र गाडी बंद पडणे, तोल जाणे वगैरे.. गडावर जाणारे शेवटचे वळण तर हेअरपिन टर्न, आणि जवळपास ३० अंश चढाचा, पहिल्यांदा येणारा नवखा दुचाकीस्वार तिथे हमखास पडणार. 
     पाऊस झाल्यानंतर लगेच गेलात तर माहूरगडची खरी मजा कळेल तुम्हाला. माहूरगडचे जंगल खूप मोठे आहे.  पौर्णिमेला लोक माहूरची परिक्रमा करतात. परिक्रमेमध्ये माहूरच्या पायथ्यापासून सुरु करून संपूर्ण जंगलाला प्रदक्षिणा घालतात. जंगलात बिबटे, अस्वल मुबलक असल्याने खूप सावधपणेच फिरावे लागते. पुसदकडून येणाऱ्या घाटात स्वयंभू शिवपिंड आहे, ज्यावर १२ महिने झऱ्यासारख्या ओहोळातून पाणी पडत राहते. (पूर्वी एसटीतुन लक्षपूर्वक पाहिल्यावर हि पिंडी दिसायची, आता मंदिर बांधले आहे. ) तिथून पुढे गाव सुरु झाल्यावर डाव्या बाजूला सोनापीर दर्गा आहे. सोनापीरच्या थोडं पुढे पायी गेल्यावर पांडवलेणी लागतात. दाताळा मोताळा तलाव, तलावावरून रेणुकादेवी मंदिरापर्यंत जाणारी पायवाट सगळे काही बघण्यासारखे, रेणुकादेवी गडावरून त्या वाटेने तलावावर अंघोळीस जायची/ जाते अशी आख्यायिका आहे. पहाटे पहाटे या तलावावर वाघ यायचे पूर्वी. ते देवदेवेश्वर मंदिर, (स्थानिक भाषेत देवदेवसरी) महानुभाव पंथीयांसाठी विशेष असे हे मंदिर फार गूढ आहे. एरवी साखळ्यांनी बांधलेले निपचित पडलेले लोक,ज्यात महिला, पुरुष आणि लहान बालके सुद्धा असतात, संध्याकाळच्या आरतीच्या वेळी मोठमोठ्याने "सोड दत्त्या सोड" म्हणत शिव्या देतात, आवारातल्या खांबावर चढतात, उड्या मारतात वगैरे अचाट प्रकार सुरु असतात.   

    मातृतीर्थ : 
माहूर पासून दक्षिणेस दीड किमी अंतरावर आहे. रेणुकामातेने आपल्‍या अहिताग्नि पतीसह अग्निप्रवेश केल्‍यानंतर हृया ठिकाणी और्ध्‍वदहिक सर्व उत्‍तरक्रिया भगवान दत्‍तात्रयांनी परशुरामांकडून करून घेतले ते हे प्रसिध्‍द मातृतीर्थ हृया ठिकाणी धार्मिक पिंडदान व श्राध्‍दविधीसुध्‍दा केल्‍या जातात.आजही रेणुकादेवीच्या स्नानासाठी येथील पाणी नेलं जातं.
    वनदेव : देवदेवेश्‍वर पासूनदक्षिणेस दोन किमी अंतरावर हे वनदेव देवस्‍थान आहे. वनात असलया मुळे त्‍या ठिकाणास वनदेव असे म्‍हणतात. हृया ठिकाणी यदुराजाने तपःश्‍चर्या करून दत्‍तात्रयांना प्रसन्‍न करून घेतले होते. तेव्‍हा दत्‍तात्रयाने मी कोणापासून कोणता गुण घेतला अशा चोवीस गुणाचे वर्णन युदराजास या ठिकाणी सांगितले आहे.
यवतमाळहून महामार्गानं माहूरला जाताना अवघ्या १५ किमीवर 'मनदेव' नावाचं क्षेत्र आहे. तेथील महादेवाच्या सुंदर मंदिरामागं एक तलाव आहे. 

    कैलासटेकडी : 
 वनदेवपासून एक किमी अंतरावर आहे. कैलासटेकडी ही सहयाद्री पर्वतावरील सर्वात उंच टेकडी असून अत्‍यंत जागृत ठिकाण आहे. दत्‍तात्रयांच्‍या पादुका ह्या ठिकाणी आहे. हृया ठिकाणी भगवान दत्‍तात्रयांनी गोरखनाथांना दर्शन दिले होते असे हे पवित्र ठिकाण आहे.
    वसंत विष्‍णूकवीचा मठ : 
माहूरपासून दक्षिणेस दीड किमी अंतरावर कलियुगात रेणुकामातेने संत विष्‍णूदासांना साक्षात दर्शन दिलेले पवित्र स्‍थान. हृयाच ठिकाणी संत विष्‍णूदासांची समाधी आहे व ज्‍या स्‍वरूपामध्‍ये रेणुकेने विष्‍णूदासांना दर्शन दिले ते मूळस्‍वरूप चित्र हृया ठिकाणी आजही दर्शनार्थ आहे. हे साक्षात्‍कार स्‍वरूपचित्र स्‍वतः विष्‍णुदासांनी काढलेली आहे. माता रेणुकेनं दर्शन दिलेलं रूप ते वनस्पतींच्या सहाय्यानं तयार केलेल्या रंगांनी हुबेहूब रेखाटत.
    झंपटनाथ मंदिर : झंपटनाथ मंदिर हे माहूर पासूनदक्षिणेस एक किमी अंतरावर आहे. झंपटनाथ हा कालिकामातेचा पुत्र असून माहूरचे ग्रामदैवत आहे.मातृतीर्थाकडं जाणाऱ्या रस्त्यावर 'झंपटनाथा'चं मंदिर आहे. 'तुझ्या आज्ञेवाचून हा गड कुणी चढणार नाही आणि कुणी चढल्यास त्याला माझं दर्शन पावणार नाही', असा वर रेणुकामातेनं झंपटनाथास दिला होता. त्यानुसार भक्तगण खरोखरच प्रथम झंपटनाथाचं दर्शन घेऊन मातृतीर्थावर स्नान करतात आणि मगच गड चढून रेणुकादेवीचं दर्शन घेतात. 
जमदग्नी खोरी :
झंपटनाथाच्या मंदिरानंतर येतं ती 'जमदग्नी खोरी'. हे जमदग्नी ऋषींच्या तपश्चर्येचं ठिकाण समजलं जातं. तपश्चर्येसाठी इथली नीरव शांतता किती उपयोगी होती याचा अनुभव येतो. पुढं 'मूलझरी' नावाचं तीर्थस्थान लागतं. पौराणिक कथेनुसार आजही इथं झाडं उगवत नाहीत. जमिनीतून सतत भस्म बाहेर येत राहतं. हे भस्म कपाळी लावूनच भक्तगण पुढं जातात. अर्धा रस्ता चालून गेल्यावर सतत वाहणारं गोमुख लागतं. त्याचा उगम आणि ते कसं निर्माण झालं, याबद्दल काहीच माहिती उपलब्ध नाही. त्यानंतर रेणुकामातेच्या मंदिराच्या पायथ्याशी आपण पोहोचतो. तिथून ३०० पायऱ्यांचा गड चढून गेल्यानंतर रेणुकामातेचं दर्शन होतं.
    भगवान परशुराम मंदिर : श्री रेणुकामाता मंदिराच्‍या दक्षिणेला देवी गडावरून पायथ्‍याशी पन्‍नास पाय-या उतरल्‍यानंतर आहे.
    महाकाली मंदिर : रेणुका मंदिराच्‍या उत्‍तरेला रामगड किल्‍लामध्‍ये महाकालीचे स्‍थान आहे. गोंडराजांनी देवीची प्रतिष्‍ठापना केली आहे.
      सती सयामाय मंदिर :  माहूरपासून आठ किमी अंतरावर असून महासती अनुसया मातेची सयामाय ही भगिनी आहे.
    सर्वतीर्थ : श्री दत्‍तशिखर संस्‍थानच्‍या पायथ्‍यापासून अगदी जवळ हे स्थान आहे. शिखर संस्‍थाना वर दत्‍तप्रभूस या तीर्थाच्‍या जलानेच अभिषेक होतो.
    देवदेवेश्‍वर : माहूर शहरातच असून भगवान श्री दत्‍तात्रायाचे हे निद्रास्‍थान आहे. श्री चक्रधर स्‍वामी मंदिर ही येथे आहे.हे महानुभावांचे पवित्र स्‍थान आहे.
    दरगाह शेख फरीदबाबा : शेखफरीद हे परम दत्‍तभक्‍त असून त्‍यांना दत्‍तात्रयांनी दर्शन देवून कृपांकित केले आहे. हिंदू मुस्लिमांचे श्रध्‍दास्‍थान आहे. येथील निसर्गरम्‍य परिसरातील धबधबा हे प्रेक्षणीय स्‍थळ आहे.

    सोनापीर बाबा दरगाह : माहूर शहराला लागूनच 1 किमी अंतरावर आहे. सूफीसंताचा हा पवित्र दरगाह असून हिंदू-मुस्लिमांचे श्रध्‍दास्‍थान आहे.
     माहुर शक्तिपीठाचा आणि दत्तस्थानाचा परिचय करुन घेतल्यावर आपण वळणार आहोत इथल्या एतिहासिक भटकंतीकडे ! आधी माहुर परिसराचा इतिहास समजून घेउ आणि मग माहुरच्या रामगडाची भ्रमंती करुया. 
  इतिहासात पैनगंगा खोऱ्यावर नियंत्रण करण्यासाठी हा किल्ला महत्वाचा होता. राष्ट्रकुटांच्या काळात हे गाव महापूर या नावाने ओळखले जात असे. याचाच अपभ्रंश होउन सध्याचे माहूर नाव प्रचलित झालेले आहे. या महापूर गावाजवळील डोंगरावर असणारा किल्ला आज माहूरचा किल्ला म्हणून ओळखला जातो. राष्ट्रकुटाच्या ताब्यातील हा किल्ला यादवांच्या ताब्यात त्यांनी किल्ल्याला दुसरा तट बांधला. किल्ल्याचा दुसरा तट रामदेवराव यांनी बांधल्याने त्यांनी किल्ल्याचे नाव रामगड ठेवले. यादवांच्या काळात रामगड किल्ला प्रशासकीय विभागाचे प्रमुख ठाणे होते. आदिया बल्लाळसिंह शिरपुरच्या गादीवर असताना त्यानी माहूरचा भाग आपल्या ताब्यात घेतला. गोंडवनाचा विस्तार करताना हा किल्ला दक्षिण गोंडराज्यात सामील झाल्यावर या किल्ल्याचा पहिला तट यमाजी ठाकुर यांनी बाधंला. चौदाव्या शतकात रामगड किल्ला गौंड राजांच्या ताब्यात होता. बहमणी सुलतान अल्लाउद्दीन हसनशहाने इ.स.१३५० मध्ये रामगडवर चाल केली तेव्हा राजा तलवारसिंहने खंडणी देऊन बहामनी संकट टाळले. सन १३७२ मध्ये तलवारसिंहचा मुलगा केशरसिंह गादीवर आला.पुढे दिनकरसिंहाच्या ताब्यात रामगड असताना इ.स. १४१२ मध्ये बहामनी सुलतान फ़िरोजशहाने रामगडवर चाल केली पण त्यांना रामगड जिंकता आला नाही तेंव्हा सुभेदार दिनकर सिंहाबरोबर तह करुन तो निघून गेला. इ.स.१४२२ मध्ये बहामनी सुलतान अहमदशहा वलीने रामगडवर अचानक हल्ला करून माहुरच्या डोंगराळ भागात प्रचंड कत्तली करुन लुटालुट केली. मात्र माहुरचा किल्ला त्यावेळी जिंकता आला नाही. पुढे १४२७ मध्येही त्याने पुन्हा हल्ला केला. माहुरच्या रामगडाला त्याने वेढा घातला,मात्र गड अभेद्य आणि अजिंक्य राहिला. पण लगेच पुढच्याच वर्षी १४२८ मध्ये त्याने माहुरवर हल्ला केला.दुर्दैवाने यावेळी ठाकुर जयसिंह गाफील होता. त्याने शरणागती पत्करुन रामगड सुलतानाच्या हवाली केला.मात्र किल्ला ताब्यात घेतल्यावर सुलतानाने दहा हजार लोकांची व गौंडराजा जयसिंह व त्याच्या सैन्याची कत्तल करून त्यांच्या बायका मुलांना सक्तीने इस्लाम धर्म स्विकारायला भाग पाडले. रामगड किल्ल्याचे नाव बदलून अहमदाबाद असे ठेवले. त्याने या गडाला दक्षीण विदर्भाचे प्रमुख ठाणे बनवुन खुदावंत खान याची सुभेदार म्हणून नेमणुक केली. ठाकुर जयसिंहाची स्मृती म्हणून माहुरचे लोक हा दिवस स्मरणदिन म्हणून साजरा करतात.त्यादिवशी ठाकुरवुबाची यात्रा भरते व ज्वारीच्या पिठाचा वापर केलेला प्रसाद खातात.
इ.स.१४८० मध्ये बहामनी सुलतान तिसरा महंमद शहा याने आपला कर्तूत्ववान मंत्री महंमद गावान याच्या मदतीने राज्याची व्यवस्था नीट राखण्यासाठी गुलबर्गा, भागानगर, विजापुर, देवगिरी, जुन्नर, तेलंगण्,राजमुंद्री, वारंगळ, वर्हाड, गाविलगड्,माहुर असे सुभे तयार केले.माहुर सुभ्याचे मुख्य ठाणे माहुरगडावर होते.नांडेदपासून कौंडीण्यपुरापर्यंत आणि प्राणहिता नदीपासून बुलढाण्यापर्यंत माहुर सुभ्याचा विस्तार होता. महंदम गावानचा खुन झाल्यावर खुदावंतखानाने बहामनी सत्तेविरुध्द बंड केले आणि किल्ल्याच्या आश्रयाने बहामनी साम्राज्याला बरेच दिवस झुलवले. जवळजवळ १५ वर्ष त्याने कारभार पाहिला.शेवटी बहामनी सुभेदार अमीर बरीद याने किल्ला ताब्यात घेऊन खुदावंत याला ठार मारले व हा सुभा आपल्या अखत्यारीत आणला.उत्तरेकडील तटास लागुन खुदावंत यांची दर्गा आहे. अमीर बरीद याने जरी अल्लाउद्दीन इमादशहाच्या वतीने हा किल्ला ताब्यात घेतला असला तरी त्यांचे आपापसात पटत नव्हते.माहुरचा बुलंद आणि बांका किल्ला जर बरीदच्या हाती राहिला तर पुढे आपल्याला जड जाईल हे इमादशहाने हेरले व स्वतःच माहुरगडावर स्वारी केली.तेव्हा बरीदने खुदावंदखानाच्या मुलाच्या हाती माहुरच्या किल्ल्याचा ताबा दिला आणि तो निघून गेला. अमीर बरीदने जिंकलेले माहूर इमादशहाने आपल्या राज्याला जोडून टाकले.



  पुढे इ.स.१५७२ मध्ये नगरच्या निजामशहाने वर्हाड भागत स्वारी केली आणि इमादशाही संपली. यावेळी निजामशहाने माहूर किल्ला जिंकून घेतला. मुघल सम्राट अकबराने मे १५२९ मध्ये निजामाकडून माहूरचा किल्ला घेतला. त्याने उदाजीराम याला पंचहजारी मनसब देऊन माहूरवर नेमले. पुढे किल्ल्यावर या घराण्याचा अनेक पिढ्या ताबा होता. यावेळी वर्हाड सुभ्यात असणार्या तेरा जिल्ह्यात माहुर हा एक जिल्हा होता.माहुरगड हे इ.स. १६०० ते १७१९ या काळात जिल्ह्याचे ठाणे होते.
             याचा इतिहास असा.मध्ययुगीन वऱ्हाडच्या राजकारणात लखुजी जाधवराव यांच्यानंतर नाव येते माहूरच्या उदाजीराम (Raja Udaram) यांचं. इसवी सनाच्या १७व्या-१८व्या शतकात वऱ्हाडात एक अनंत नावाचे कवी होऊन गेले. त्यांच्या “भक्तरहस्य” या काव्यात माहूरच्या राजे उदाजीराम यांच्या भाग्योदयाची कथा आढळते. भक्तरहस्यातील सगळाच भाग विश्वसनीय वाटत नाही. त्यामुळे यात निवडक भाग घेतलेला आहे. उदाजीराम यांचे मूळ नाव उद्धवजी रामजी. जसे मुघल कागदपत्रांमध्ये जाधवराव चे ‘जदूराय’ झाले, तसेच उद्धवजी रामजीचे ‘उदाजीराम’ झालेले आहे. सुरुवातीच्या काळात हे उदाजीराम वाशिम जवळच्या सावरगावचे कुळकर्णी होते. त्यांना फार्सी भाषेचे उत्तम ज्ञान होते. आजचे औरंगाबाद म्हणजे त्याकाळचे खडकी हे शहर अहमदनगरच्या निजामशाहीतील एक महत्त्वाचे शहर. भक्तरहस्यानुसार पद्माजी नावाच्या एका सत्पुरूषाच्या सांगण्यावरून उदाजीराम खडकी येथे आले. आपले कुळकर्णी पद सोडून खडकीला आल्यावर उदाजींनी एका अमीराचा वसिंदा म्हणजे लेखक म्हणून काम केले. खडकी मध्ये उदाजींनी प्रतिष्ठा कमावली. याच काळात त्यांनी सैनिकी शिक्षण घेतले असावे.  काही काळातच त्यांनी एका अमीरामार्फत दिल्ली गाठली. दिल्लीला त्यांचे मामा सरकारी दफ्तरात कामाला होते. त्यांच्या मदतीने उदाजींनी तिथे सरकारी दफ्तरात काम मिळवले. त्यांची कार्यकुशलता थेट बादशाह अकबराच्या कानावर गेली. त्याने उदाजींना काही कामगिरी दिली. ती उत्कृष्टपणे पार पाडून त्यांनी बादशहाची मर्जी संपादन केली. काही काळ दिल्लीतच गेला.
       पुढे ई. स. १५९५-९६ मध्ये अकबराने वऱ्हाड जिंकून घेतले. त्यात माहूर हे एक अत्यंत महत्त्वाचे ठाणे होते. पण चाँद बिबीने तहाचा मान राखला नाही. आणि माहूर बालाघाट प्रांत मुघलांच्या हवाली करण्यास तिथले निजामशाही किल्लेदार विलंब करू लागले. याच काळात अकबराने उदाजींना माहूरच्या किल्ल्याची किल्लेदारी आणि वाशिमची वतनदारी दिली. उदाजींचा जनसामान्यांवर चांगला पगडा होता असा उल्लेख मुघल कागदपत्रांमध्ये सापडतो. कदाचित याचा फायदा घेण्याचा उद्देश अकबराचा असावा. किंवा उदाजींनीच बादशाह कडून किल्लेदारी मागून घेतली असावी. माहूरला त्यावेळी इंद्रजिव नावाचा राजपूत जमीनदार होता. तो लोकांस उपद्रव करित असे, असे ‘भक्तरहस्या’त कवीने म्हटले आहे. पुढे त्याची जमीनदारी काढून टाकण्यात आली. निजामशाही आणि मुघल यांच्यात वऱ्हाडासाठी संघर्ष सुरू होता. त्यात माहूर कधी निजामशाही अंमलाखाली तर कधी मुघलांच्या अंमलाखाली असे. वऱ्हाडच्या त्या प्रदेशात अराजकता माजली होती. लुटालुट आणि जाळपोळ नेहमीचा प्रकार होता. ई. स. १६०० मध्ये चाँद बिबीचा खून झाला. निजामशाही मलिक अंबराच्या अधिपत्याखाली आली.* याच घटनेच्या मागेपुढे उदाजींनी मुघल नोकरी सोडून निजामशाहीत प्रवेश केला. हळू हळू उदाजीराम पंडित निजामशाहीचे चार हजारी मनसबदार झाले आणि एक महत्त्वपूर्ण सरदार म्हणून नावारूपास आले. त्यांच्या मुलखातल्या लोकांमध्ये त्यांना मान्यता होती. निजामशाहीतील बलाढ्य सरदार लखुजी जाधवराव यांच्याशी उदाजीराम यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. जाधवराव आणि उदाजीराम यांच्यातील संबंधांवर पुढच्या काही भागांत प्रकाश पडेलच. पण वऱ्हाडच्या इतिहासात जे दोन महत्त्वपूर्ण सरदार झाले त्यात एक सिंदखेडचे राजे लखुजी जाधवराव आणि दुसरे माहुरचे उदाजीराम पंडीत हे होत. उदाजीराम हे एक अत्यंत हुशार, कार्यकुशल, प्रजाहितदक्ष पण कारस्थानी सरदार होते. त्यांची एक उत्तम प्रशासक म्हणून ख्याती होती. दानधर्मामध्ये ते दख्खन मधील सरदारांच्या अग्रभागी असत. लखुजी जाधवरावांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी बऱ्याच लढाया लढल्या आहेत. पैठण पासून मेहकर पर्यंत लखुजी जाधवरावांच्या तर मेहकर पासून माहूर पर्यंत उदाजीराम यांच्या जहागिरीचा मुलुख होता. असे जवळ जवळ अर्धे वऱ्हाड पुढे त्यांची जहागिर होते. रायबागन ही उदाजीराम पंडीत यांचीच पत्नी. श्रीशिवभारतात त्यांचा उल्लेख कवींद्र परमानंदांनी ‘उदारामश्चाग्रजन्मा ख्यातः क्षात्रेण कर्मणा’ म्हणजे ‘क्षात्रकर्मा मुळे प्रख्यात असा उदाराम ब्राह्मण’ असा केला आहे.
           जहांगिर बादशहाचा मुलगा शहाजहान याने बापाविरुध्द बंड पुकारले तेव्हा उदाजीराम शहाजहांच्या बाजुने होते. शहाजहांन विरुध्द जहांगीरने शहाजादा परवीज व महबतखान यांना पाठविले. तेव्हा लखुजी जाधव, उदाजीराम व आतमखान ह्या सरदारांच्या सहाय्याने शहाजहांन व-हाडातुन ओरीसा बंगालकडे निघाला. बुऱ्हानपूरहून बंगालकडे जाताना शहाजहान याने माहूर किल्ल्यावर मुमताज व औरंगजेबासह मुक्काम केला तेव्हा औरंगजेब सहा वर्षाचा होता. यानंतर माहुरचे राजे उदाराम देशमुख व मोघल घराणे यांचा स्नेहसबंध अधिक बळकट झाला.उदाराम यांचे मुळ नाव उद्वव रामचंद्र कुलकर्णी, पण त्यांनी मोघल सल्तनतीची सेवा केली म्हणून त्यांना उदाराम हि पदवी मिळाली आणि राजे हा किताब मिळाला.
 या उदाराम देशमुखांच्या संदर्भात एक प्रसंग सांगितला जातो.एकदा उदाराम काही कामानिमित्त जहांगिराच्या दरबारात गेले होते.ते दिसायला देखणे नव्हते.या पराक्रमी सरदाराची टिंगल करावी अशा उद्देशाने सलिम उर्फ जहांगीरने एक आरसा घेतला,त्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहून आरसा दरबारी मंडळीत फिरवला.प्रत्येकाने त्यात आपले तोंड पाहिले.आरसा उदाराम देशमुखांकडे आला. त्यावर त्यांनी आपली तलवार काढली व त्यात आपले प्रतिबिंब बघीतले आणि आरसा पुढे पाठविला. या गोष्टीचा दरबारी मंडळींनी गहजब केला. तेव्हा उदाराम म्हणाले 'बादशहा आमची इज्जत तलवारीच्या ताकदीवर करतात'.यावर बादशहा खुष झाला आणि त्याने त्यांना 'उदाराम' हि पदवी दिली आणि राजे हा किताब दिला.उदाराम नंतर त्याचा मुलगा जगजीवनराम किल्लेदार बनला.हे जगजीवनराम पराक्रमी होते.त्यांनी शहाजहानला अडचणीच्या काळात मदत केली. त्याने किल्ल्याची दुरुस्ती केल्याचा उल्लेख मिळतो. इ.स.१६५८ ला त्याचा मृत्यु झाला. त्याच्या नंतर त्याचा अल्पवयीन मुलगा बाबूराव याच्याकडे सुत्र गेली. त्याच्या वतीने त्याची आई सावित्रीबाई कारभार पाहात असे. वऱ्हाड प्रांतात हरचंदराय नावाच्या सरदाराने बंड केले. हे बंड सावित्रीबाईने मोडून काढले व हरचंदराय राजपूत याचा पराभव केला. वऱ्हाड प्रांतात मोगली अंमल कायम राहिला.तिची कर्तबगारी आणि शौर्य पाहून औरंगजेबने तिला पंडीता रायबाघन हा किताब दिला. औरंगजेबाने जगजीवनराम व मुलगा बाबुराव यांना सोनेरी नक्षी असलेली 'शहानामा' या ग्रंथाची एक प्रत नजर केली.त्याआशी जहांगीर याने उदाराम यांना एक सुंदर रत्नजडीत कट्यार ही नजर केली होती. 



मात्र हे शुर घराणे शिवछत्रपतींच्या स्वराज्याच्या प्रयत्नांना मदत न करता परकीय धर्मांध आक्रमकांची सेवा करत राहीले. शिवकाळात औरंगजेबाच्या आदेशावरून शाहिस्तेखानाच्या सैन्याबरोबर स्वराज्यावर चालून आलेली हि मुघलांची मनसबदार पंडिता रायबाघन उंबरखिंडीच्या लढाईत होती. थोरले बाजीराव पेशवे यांनी माहूरची लुट केल्याचा उल्लेख आहे. अठराव्या शतकात माहूरचा किल्ला नागपूरकर भोसल्यांनी मुघलांकडून जिंकून घेतला. त्यानंतर तो किल्ला निजामाने मराठ्यांकडून जिंकून घेतला. इ.स.१७२४ मध्ये हैद्राबादच्या निजामाने आपले स्वतंत्र राज्य घोषीत केले.त्याच्या प्रदेशात माहुरचा समावेश झाला.नासिरजंग निजाम असताना वर्‍हाडातील गोपाळराव या जमीनदाराने माहुरचा किल्ला जिंकून घेतला.त्यावेळी माहुरचा किल्लेदार होता हिर्जुल्लाखान.नासिरजंगाने आपला मामा हिमायतखान याच्या हाताखाली फौज पाठवून किल्ला पुन्हा जिंकून घेतला.
इ.स. १७५७ मध्ये मराठ्यांनी निजामाचा काही मुलुख जप्त केला होता व त्याचा कारभार जानकोजी शिंदे पाहु लागले.पुढे १७६१ ते १७७५ नरपतसिंग यांनी निजामाच्या वतीने येथे कारभार केला.ह्याच घराण्यात सन १८०४ पर्यंत माहुरचा किल्ला होता.१२ नोव्हेंबर १९४८ रोजी पोलिस कारवाई झाल्यावर माहुर हैद्राबाद संस्थानातील मुलुखाप्रमाणे स्वतंत्र भारतात सामिल झाले.१ ऑक्टोबर १९५६ रोजी आदिलाबाद जिल्ह्यातील किनवट तालुका ( माहुर किल्लाही) नांदेड जिल्ह्यास जोडण्यात आला व त्याचा समावेश महाराष्ट्र राज्यात झाला.

 





         माहूर येथे रेणुकादेवीचे मुख्य स्थान असल्यामुळे वर्षभर माहूर भक्तांनी गजबजलेले असते. येथे येणारे सर्व भाविक रेणुकादेवीचे, अनुसयामातेचे (दत्तात्रयांची आई) आणि दत्तशिखर येथे दत्तात्रयांचे दर्शन घेऊन निघून जातात. माहूर येथे येणाऱ्या भाविकांपैकी बोटावर मोजता येतील एवढे भाविक माहूरच्या किल्ल्याला किंवा रामगडला भेट देतात. आता आपण या माहुरच्या गडाची भटकंती करुया.
    माहुर गडाचा नकाशा

माहूर किल्ला गावापासून ८ कि.मी.वर असुन किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. यातील पहिला मार्ग म्हणजे खिंडीतुन रेणुका मातेच्या मंदिरात जाण्यासाठी जेथुन पायऱ्या सुरु होतात त्याच्या समोरील बाजुस असणाऱ्या दुकानांच्या मागुन नव्याने बांधलेल्या पायरीमार्गाने १० मिनिटात आपण महाकाली बुरुजापाशी पोहोचतो तर दुसरा मार्ग या दुकानापासुन सरळ रस्त्याने साधारण १० मिनिटावर आहे. येथे तटबंदी फोडून किल्ल्यात तलावाकाठी असणाऱ्या महानुभाव पंथीयांचे ठिकाणावर जाण्यासाठी पायऱ्याचा मार्ग बनवलेला आहे. पायऱ्यांच्या सुरवातीलाच एक कमान आहे. 

महाकाली बुरुजास दुहेरी तटबंदी असुन वरील बुरूजातून खालील तटबंदीत येण्यासाठी दोन लहान दरवाजे आहेत. 






 यातील एक दरवाजा दगड कोसळुन बंद झालेला असुन दुसऱ्या दरवाजाने बुरूजात बांधलेल्या पायरीमार्गाने आपला महाकाली बुरुजावर म्हणजेच किल्ल्यात प्रवेश होतो. 
महाकाली बुरुजाची उंची ४० फ़ुट असुन बुरुजाच्या बाहेरील बाजुस दोन शरभशिल्पे आहेत तसेच आतील एका ओवरीत महाकालीची स्थापना केलेली आहे. 
महाकाली मंदिराजवळ असलेला दगडी रांजण आपल्याला नाणेघाटातील दगडी रांजणाची आठवण करून देतो.
 महाकाली मंदिराच्या समोरील भागात सैनिकांच्या राहाण्यासाठी कमानदार ओवऱ्या असुन बुरूजात काही ठिकाणी टेहळणीसाठी खिडक्या तसेच तोफांसाठी जंग्या आहेत. 








बुरुजाच्या आतील भागात मधोमध एक उध्वस्त दिपमाळ असुन शेजारी दोन दगडी तोफगोळे दिसुन येतात.

 महाकाली बुरूज हा किल्ल्यात सर्वात उंच भाग असुन येथुन किल्ल्यातील खुप लांबवरचा परीसर दिसुन येती. माहुरगड समुद्रसपाटी पासून २६५० फूट उंचावर असुन साधारण त्रिकोणी आकाराचा गडाचा बालेकिल्ला ४५ एकर परिसरावर पुर्वपश्चिम पसरला आहे तर किल्ल्याच्या पश्चिमेस असणारी माची ४२ एकरवर पसरली आहे.
 बालेकिल्ल्याला १९ बुरूज असुन माचीचे बुरूज तेथील जंगलामुळे पहाता येत नाही. किल्ल्याच्या उत्तर व पश्चिम भागात जेथे किल्ल्याचे दोन मुख्य प्रवेशमार्ग आहेत त्या ठिकाणी किल्ल्याला दुहेरी तटबंदीचे सरंक्षण दिले आहे. यातील उत्तर भागातील दुहेरी तटबंदी लहान प्रमाणात असुन पश्चिम भागातील दुहेरी तटबंदीत किल्ल्याची माची वसली आहे. माचीच्या या भागात काही वास्तू असुन हा भाग डुक्कर किल्ला म्हणुन ओळखला जातो. 
महाकाली बुरुजावरून गडाच्या डावीकडील तटबंदीपासुन फांजीवरून गड फिरण्यास सुरवात करावी. गडाची तटबंदी हि निरनिराळ्या कालखंडात बांधली गेली असुन तटबंदीत चुना दगड तसेच विटांचा वापर केला आहे. सध्या पुरातत्त्व खात्याने या तटबंदीचे व किल्ल्याचे दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.
 गडाच्या तटबंदीवरील चर्या आजही सुस्थितीत असुन ठिकठिकाणी तटाखाली उतरण्यास पायऱ्या आहेत. या तटबंदीवरून दक्षिणेकडील निशाण बुरुजाकडे जाताना तटाला सहा बुरूज असुन निशाण बुरुजाच्या अलीकडे एक उध्वस्त मस्जिद आहे.
 


  मस्जिदसमोर एक छोटा हौद असुन बाहेरच्या भिंतीवर फ़ुलांची नक्षी कोरली आहे. देवळाचे मस्जिदमध्ये रुपांतर करतांना देवळातील मुळ खांब तसेच ठेवलेले आहेत. मस्जिद पाहून तटबंदीवरून आपण दक्षिण टोकावरील ढालकाठीच्या म्हणजेच निशाण बुरुजावर पोहोचतो. निशाण बुरुजाची उंची ६० फ़ूट असुन बुरुजाचा वरील भाग पुर्णपणे ढासळला आहे. बुरुजावरून किल्ल्याची बाहेरील तटबंदी तसेच गडावर येणारी वळणदार डांबरी सडक व दुरवरचा प्रदेश दिसतो.

 निशाण बुरुजावरून तटबंदीकडील वाटेने पुढील टोकाकडे म्हणजेच पश्चिमेकडील धन बुरुजाकडे निघावे. गडाच्या दक्षिण भागाला असणारी हि तटबंदी खुप मोठया प्रमाणात ढासळलेली असुन या तटबंदीवरून आपण हत्ती दरवाजावर असलेल्या हवामहाल या उध्वस्त वास्तुत येतो. 

 या वास्तूच्या मध्यभागी पाण्याचा हौद असुन त्यात कारंजे आहेत तर एका बाजुला हत्ती दरवाजावरील झरोके आहेत. झरोक्यातून येणाऱ्या हवेने व हौदातील कारंजाच्या पाण्याने या वास्तुत थंडावा निर्माण केला जात असे त्यामुळे या वास्तूला हवामहल म्हणून ओळखले जाते. हवामहल पाहून पश्चिमेकडील दरवाजाने काही पायऱ्या उतरून आपण हत्ती दरवाजात येतो. 







हा दरवाजा उदाजीराम यांचा मुलगा जगजीवनराम यांनी बाधंला आहे. आपण किल्ल्याच्या आतून बाहेर निघत असल्याने दरवाजाच्या आतील भाग दिसतो. दरवाजाच्या आतील चौथऱ्यावर दोन्ही बाजूस गोलाकार खांब आणि कमानदार छत असुन याची रचना एखाद्या राजसदरे प्रमाणे आहे. स्थानिक लोक या जागेला घोड्याच्या पागा म्हणतात तर काही ठिकाणी याचा उल्लेख चिनी महाल म्हणुन येतो. या वास्तूची एकंदर रचना पहाता या वास्तूचा उपयोग कचेरीसाठी होत असावा.

गडाचा हा दरवाजा उत्तराभिमुख असुन बालेकिल्ल्याच्या तटबंदीत बांधला आहे. दरवाजाची उंची एखादा हत्ती यातुन अंबारीसह सहज जाऊ शकेल इतकी आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजूला चुन्यात कोरलेली अस्पष्ट शरभशिल्प असुन वर डाव्या बाजुला निळ्या पर्शियन टाइल्सचे तुकडे दिसुन येतात.
 

 
 

दरवाजाच्या वरील बाजुस हवा महालाचे ६ झरोके असुन दरवाजाच्या दोन्ही बाजूला दोन मोठे बुरूज व समोरील बाजुस तटबंदी आहे. या तटबंदीच्या खाली असणारा भाग म्हणजेच किल्ल्याची माची किंवा डुक्कर किल्ला. या माचीवर खुप मोठया प्रमाणात झाडी वाढली असल्याने तेथे जाता येत नाही पण या तटबंदीवर उभे राहुन माचीवरील अवशेष पहाता येतात. हत्ती दरवाजा उर्फ चिनी दरवाज्याच्या खालील भागात जो माचीसारखा भाग आहे तिथे एक शिलालेख आहे.
या अवशेषात दोन घुमट असलेले दर्गा व एका उध्वस्त वास्तूचे अवशेष दिसतात. यातील एक दर्गा खुदाबंदखान याचा असुन दुसरा फरीदशाही दर्गा म्हणुन ओळखला जातो. किल्ल्यावर येण्याचा हा राजमार्ग असल्याने हत्ती दरवाजापुढे संरक्षणासाठी दरवाजांची साखळी उभारली होती. 



 



 हत्ती दरवाजातून थोडे खाली उतरल्यावर डाव्या बाजुला गडाचा दुसरा पश्चिमाभिमुख दरवाजा असुन या दरवाजावर जाण्यासाठी दोन्ही बाजुला पायऱ्या आहेत. हा दरवाजा मात्र आकर्षक नाही.इथून उतरणारी वाट आपल्याला थेट माहुर गावात घेउन जाते.
या दरवाजापुढे काही अंतरावर गडाचा तिसरा उत्तराभिमुख दरवाजा असुन दरवाजाच्या उजव्या बाजूला काही ओवऱ्या आहेत. या घोडेपागा असाव्यात. 
या मार्गावरील चौथा दरवाजा बाहेरील तटबंदीत असून तो पूर्वाभिमुख आहे पण पुढे मोठया प्रमाणात जंगल वाढले असल्याने आपल्याला तिसऱ्या दरवाजापुढे जाता येत नाही. येथुन मागे फिरून परत किल्ल्यात आल्यावर तटबंदी डावीकडे ठेवून सरळ पुढे चालत जावे. या वाटेवर अनेक उध्वस्त वास्तूंचे चौथरे पहायला मिळतात. या ठिकाणी राणीमहाल होता. 
 
 
पुढे गेल्यावर एक दरवाजा असुन या दरवाजाच्या अलीकडील भागात काही ओवऱ्या आहेत तर पुढील भागात दरवाजाला लागुन किल्ल्याच्या पूर्व टोकावर भव्य असा दुहेरी धन बुरुज आहे. या बुरुजाच्या बाहेरील भागात जाण्यासाठी खालील बाजुस दरवाजा असुन सध्या हा दरवाजा दगड ढासळून बंद झाला आहे. 
धनबुरुजावरून तटबंदी डावीकडे ठेवत पुढे गेल्यावर तटबंदीवरुन खाली उतरण्यासाठी जीना आहे. या धन बुरुजाच्या नावावरुन काही गैरसमज आहेत.इथे गुप्त धन पुरलेले आहे असे समजून बर्‍याच लोकांनी खणून पाहिले.मात्र तटबंदीचे नुकसान होण्यापलिकडे त्यातून काही साध्य झाले नाही.





  या जिन्याने आपण तटाखालील चोर दरवाजापाशी पोहोचतो. हा चोर दरवाजा पाहून किल्ल्याच्या आतील भागात असणाऱ्या वास्तूकडे निघावे. या वास्तूबाहेर पाण्याचा बांधीव सुकलेला हौद असुन समोरच्या भिंतीत कमानदार दरवाजा आहे. हि वास्तू राजमहाल,दारुकोठार, अंबरखाना या नावानी ओळखली जाते. साधारण १२ फुट उंचीच्या या वास्तुच्या आतील भागात आडव्या रांगेत तीन आणि उभ्या रांगेत चार अशा बारा कमानी असुन डाव्या बाजुच्या भिंतीत दोन तर उजव्या बाजुला एक खिडकी आहे. या खिडकीबाहेरील अवशेष पहाता येथे या वास्तुला सलग अशी दुसरी वास्तू असावी असे वाटते. 
 
येथुन परत तटबंदीवर येऊन पुढे चालत गेल्यावर एक ७ फ़ुट लांबीची तोफ़ पहायला मिळते. येथुन पुढील भागातील तटबंदी ढासळली असल्याने तटबंदीवरून खाली येऊन पुरातत्त्व खात्याने बांधलेल्या वाटेने गड उतरण्यास सुरवात करावी. 

 
वाटेत एक पाण्याचे मोठे तळे असुन त्यास इंजाळे अथवा परवेश तलाव म्हणतात. तलावाच्या काठावर महानुभावपंथीयांचे स्थान आहे. कधीकाळी तलावाच्या एका पुर्ण बाजुस असणाऱ्या पायऱ्या मोठया प्रमाणात ढासळल्या असुन तलाव कोरडा पडला आहे. उत्तर दिशेस असणारी टेकडी ब्रह्मतिर्थ म्हणुन ओळखली जाते. या टेकडीवरील दगड महानुभाव पंथिय लोक नेउन पुजतात.येथुन पुढील पायऱ्यांनी गडाखाली उतरणारी दुसरी वाट आहे पण या वाटेने न जाता सरळ गेल्यावर तटबंदीला लागुन दोन मनोरे असलेली उध्वस्त वास्तू दिसते. 

या वास्तुच्या आत पहारेकऱ्याच्या खोल्या आहेत. या वास्तुच्या पुढे डाव्या बाजुस किल्ल्यावर येणारा दुसरा राजमार्ग असुन येथे आतील तटबंदीत एक दरवाजा आहे. या दरवाजाबाहेरील दोन बुरूज दोन वेगळ्या कालखंडात बांधले असल्याने एक बुरूज चौकोनी तर दुसरा गोलाकार आहे. 

या दरवाजातुन काही अंतर खाली गेल्यावर बाहेरच्या तटबंदीतील दुसरा मुख्य दरवाजा आहे. या भागातील बुरूज व तटबंदी पुर्णपणे कोसळली असुन केवळ दरवाजा शिल्लक आहे. हे दोन्ही दरवाजे पाहून मुळ वाटेवर परत आल्यावर आपली गडफ़ेरी पूर्ण होते. गडावर वाढलेली बेसुमार झाडी आणि तिथल्या जंगलात असलेले वन्य प्राणी पहाता गडावर मुक्काम न करणेच योग्य.तसेही माहुर गावात मुक्कामासाठी सोयी आहेत्,शिवाय गावातून गड बघणे काही तासाचे काम.पायथ्यापासुन संपूर्ण गड पाहाण्यासाठी ५ तास लागतात. 
 




   माहुरच्या गडाला वर्षभरात केव्हाही भेट दिली तरी चालण्यासारखे असले तरी गणपतीचे आगमन होणार्‍या भाद्रपद महिन्यात भेट दिल्यास अवघा गड झिनियाच्या फुलांनी नटलेला पहायला मिळतो. रेणुकादेवीचे दर्शन घेउन रामगड किल्ला, लेणी, मातृतीर्थ आणि हत्तीखाना ही सर्व ठिकाणे पाहाण्यासाठी संपूर्ण दिवस लागतो.

“माहूर येथील हत्तीखाना”
 पुरातन वस्‍तुसंग्रहालय

हे संग्रहालय माहूर शहरातच स्थित असून येथे आदिवासी बंजारा सांस्‍कृतिक ठेवा जपून ठेवला आहे. पुरातन पाणी, नाणी, शस्‍त, प्राण्‍यांचे सांगाडे, विविध प्राचीन दगडी व विविध धातूच्‍या मूर्त्‍या व हस्‍तशिल्‍पे येथे जतन करून ठेवल्‍या आहेत.






 
 



 

माहूरची पांडवलेणी :-

माहूरच्या जुन्या बसस्टँडजवळ असलेल्या टेकडीच्या एका भागात लेणी कोरण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. एक प्रचंड सभागृह आणि त्यात गाभारा कोरण्यात आला आहे. ही लेणी राष्ट्रकूटकालीन असावी, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. असंख्य खांबांचे हे सभागृह मोठे आकर्षक आहे. खांबांची आणि एकूण रचनेची भव्यता नजरेत भरते. 15 मीटर उंचीचे हे सभागृह असल्याने व सभागृहाची लांबी रुंदी खूपच असल्याने सभागृह वैशिष्ट्यपूर्ण ठरते. गर्भगृहाच्या द्वारपट्टीवरील द्वारपालाचे भव्य शिल्प लक्ष वेधून घेतात. अजिंठा-वेरूळची आठवण यावी एवढी भव्यता याही शिल्पात आहे. गाभाऱ्यात भव्य शिवलिंग प्रतिष्ठापित आहे. ही लेणी पांडवलेणी म्हणून संबोधिली जातात.
पांडव लेणी..किरण मुधोळकर
     माहुर येथे असलेली लेणी पर्यटकांची वाट बघत असतात. पांडवलेणी माहूर एसटी स्थानकापासून जास्तीत जास्त १५ मिनिटावर असूनसुद्धा येथे फारसे कोणीही येत नाही.माहूर येथील लेणी उत्तराभिमुखी असून एका टेकडीत कोरलेली आहेत. लेण्यांकडे जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. लेणी साधारणपणे ६व्या ते ७व्या शतकात म्हणजे राष्ट्रकुट काळात कोरलेली आहेत. ही हिंदू लेणी असून लेणी संकुलात चार लेणी आहेत. संकुलाच्या मध्यभागी दगडी खांबांनी युक्त असे मोठे लेणे आहे. या लेण्याच्या दर्शनी भागात दोन पूर्ण स्तंभ आणि दोन अर्ध स्तंभ आहेत. वरांड्यातून मुख्य दालनात प्रवेश करताना सहा पूर्ण स्तंभ आणि २ अर्ध स्तंभ आपले लक्ष वेधून घेतात. या खांबांवर शंकर, पार्वती, दुर्गा, महिषासुरमर्दिनी आदी शिल्पे कोरलेली आहेत. पण खांबाना पांढरा रंग मारलेला असल्यामुळे मूर्ती पटकन ओळखता येत नाहीत. या दालनाला जोडून गर्भगृह आहे. गर्भगृहात शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. गर्भगृहाच्या दरवाज्यावर दोन्ही बाजूला द्वारपालांची भव्य शिल्प कोरलेली आहेत. गर्भगृहाला पूर्ण प्रदक्षिणा मारता येते.मुख्य लेण्याच्या डाव्या बाजूला दोन अर्धवट कोरलेली असून एका लेण्यात गणपतीची मूर्ती कोरलेली आहे, दुसरे लेणे रिकामे आहे. मुख्य लेण्याच्या उजव्या बाजूला असलेल्या लेण्यांच्या दर्शनी भागात दोन पूर्ण आणि दोन अर्ध स्तंभ आहेत. स्तंभांच्या पलीकडे मोठा वरंडा असून वरांडाच्या दोन्ही बाजूना विहार कोरलेले आहेत. हे दोन्ही विहार दिसायला सारखे असून दोघांच्याही दर्शनी भागात दोन पूर्ण आणि दोन अर्ध स्तंभ कोरलेले आहेत. या लेण्याच्या अंतर्भागात आणखीन तीन लेणी कोरलेली असून यात देवतांच्या मूर्ती पण कोरलेल्या आहेत. पण लेण्यात असलेल्या अंधारामुळे या मूर्ती पटकन दिसून येत नाहीत. या तिन्ही लेण्यात दगडी बाकसुद्धा कोरलेले आहेत.पांडव वनवासात असताना भीमाचे आणि हिडिंब राक्षसाचे युद्ध, भीम आणि हिडिंबेचा विवाह आणि घटोत्कचाचा जन्म याच पांडवलेण्यांच्या परिसरात झाला, असा स्थानिक लोकांचा समज आहे.
  तीन क्रमांकाची लेणी कला आणि स्थापत्याच्या दृष्टीने विशेष उल्लेखनीय असून पूर्वाभिमुख असलेल्या या लेणीत सर्वाधिक शिल्प आहेत. यात द्वारपाल, कुबेर, गजलक्ष्मी, मुष्ठीयोद्धे, स्त्रीशिल्पे, सिंह, शिवपार्वती, गणेश या चित्राची रेलचेल आहे़ लेणी चार दक्षिणमुखी असून या लेणीत कोरीव गणेश शिल्प आहे. पाच क्रमांकाच्या लेणीचे दालन रिकामे आहे. या लेणीच्या पाठीमागील भिंतीत नागदेवतेचे पंचमुखी कोरीव शिल्प आहे़ अमेरिकेतील मिशीगण विद्यापीठातील कला आणि स्थापत्याचे अभ्यासक प्रो़ वॉल्टर स्पिक यांनी सर्वप्रथम माहूर येथील लेण्याचे सर्वेक्षण करून खोदकामाचा कालखंड राष्ट्रकुट इ़स़ ७५७ ते ९५४ काळातील असल्याचे नमूद केले. वेरूळ, कंधार, मान्यखेट या राष्ट्रकुटाच्या राजधान्या होत्या़ धाराशिव आणि माहूर येथील लेण्यांमध्ये साम्य आहे़ भगवान श्रीकृष्णांनी पाच पांडवांना माता कुंतीसह श्रीक्षेत्र माहूरला याच पांडव लेणीच्या भुयारी मार्गाने पाठविले. त्यामुळे या लेणीला पांडव लेणी नाव पडले, अशी आख्यायिका सांगितली जाते. सदर लेणी १२ जानेवारी १९५३ रोजी औरंगाबाद पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहेत. परंतु मागील ६५ वर्षाच्या काळात पुरातत्त्व विभागाकडून या पांडव लेण्याचा कसलाही विकास झालेला नाही. किंबहुना येथे रस्ता, विद्युत व्यवस्था नसल्याने ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचा असलेला हा ठेवा आज विकासापासून दूर राहिला आहे. त्यामुळेच पर्यटकही या लेण्यांकडे पाठ फिरवित असल्याचे विदारक चित्र आहे.

जाण्याचे मार्ग: -
    माहूर येथे जाण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्थानक किनवट. किनवट पासून माहूर साधारणपणे २० कि.मी.वर. पण किनवट येथे फार कमी गाड्या थांबत असल्यामुळे शेगाव किंवा अकोले सोयीचे.
जेवण आणि राहण्याची सोय : माहूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असल्यामुळे येथे राहण्यासाठी भरपूर धर्मशाळा / भक्त निवास आणि जेवणासाठी भरपूर उपहारगृहे उपलब्ध आहेत.
टीप : उन्हाळ्यामध्ये ह्या भागात पाण्याचे दुर्भिक्ष असल्यामुळे माहूरला भेट देण्यासाठी हिवाळा हा योग्य मोसम आहे.
 संदर्भ :-
१) नांदेड जिल्हा गॅझेटीयर
२) ईये महाराष्ट्राच्या देशी -प्र.के.घाणेकर
३) https://mr.vikaspedia.in/education/apala-maharashtra
४) www.trekshitiz.com  हि वेबसाईट
५) www.durgbharari.in  हि वेबसाईट
६) http://www.dattamaharaj.com/
७) https://warkarirojnishi.in
८) https://varhadnama.blogspot.com/2020/03/blog-post.html
९) यशोधन - डॉ म. खु. देशपांडे यांचा निवडक लेख संग्रह, संपादक – प्रा. राम शेवाळकर, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई.
१०)  Maasir ul Umara
११) Berar Under the Mughals – Md. Yaaseen Quddusi
१२) कवींद्र परमानंद कृत श्री. शिवभारत         


esakal.com

माहूरचा ‘रामगड’

सकाळ वृत्तसेवा

Updated on: 

9 लेख बाकी

ओंकार वर्तले - ovartale@gmail.com

भटकंती म्हटली की आपल्याला ठरावीक प्रदेश आणि ठिकाणेच डोळ्यासमोर येतात; पण ‘डोळस भटकंती’ ही जिल्ह्यांच्या, राज्यांच्या सीमा कधी पाहत नाही. महाराष्ट्राच्या एका टोकावर असलेल्या नांदेड जिल्ह्यातही अशीच काही दुर्लक्षित ठिकाणे दडली आहेत. तेलंगणा राज्याला लागून असणाऱ्या या जिल्ह्यात साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पीठ आहे. माहूरची रेणुकादेवी. हा भाग विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर येतो.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक या ठिकाणी कायम येत असतात. माहूरचा लौकिक केवळ धार्मिक अंगाने नसून तो ऐतिहासिकसुद्धा आहे. माहूर म्हणजे देवीचे स्थान हे समीकरण अगदी घट्ट बसले आहे. याच माहूरमध्ये एक बलाढ्य किल्ला उभा आहे. रामगड नावाचा. गावामुळे याला माहूरगड असेही संबोधले जाते. विशेष म्हणजे, श्री रेणुका माता आणि किल्ला ही दोन्हीही ठिकाणे अगदी जवळजवळ आणि एकाच डोंगररांगेवर असून केवळ एका खिंडीने विलग झाली आहेत. खिंडीत आलो की डाव्या बाजूला माहूरगड आणि उजव्या बाजूला रेणुका मातेचे मंदिर आहे.

मराठवाड्यात अजंठा डोंगररांग वगळता डोंगरी किल्ले अगदी अपवादात्मक परिस्थितीत आढळतात; पण माहूरसारखे किल्ले याला छेद देतात. माहूर किल्ला पाहण्यासाठी दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग हा महाकाली बुरूजावरून जाते. रेणुका मातेचे मंदिर आणि किल्ल्याचा महाकाली बुरूज यामधील खिंडीतून जो रस्ता जातो त्या रस्त्यावरून पायवाटेने महाकाली बुरूजापाशी पोहोचतो. रेणुका मातेच्या मंदिराच्या पायऱ्या चढताना किंवा रस्त्यावरून जो मोठा बुरूज दिसतो तो म्हणजेच महाकाली बुरूज.

किल्ल्यावर जाणारा दुसरा मार्ग हा रेणुकादेवी मंदिरापासून साधारणपणे एक किलोमीटरवर आहे. रेणुका मातेच्या मंदिराच्या पुढे दत्तात्रेय आणि अनसूया मातेची शिखरे आहेत. या शिखरांकडे जाणाऱ्या रस्त्यावर रेणुका माता मंदिरापासून जवळच पायऱ्यांचा मार्ग आहे; पण हे दोन्हीही मार्ग पाहायचे असतील तर आपण एका मार्गाने चढून दुसऱ्या मार्गाने खाली यायचे. त्यासाठी महाकाली बुरूजाच्या मळलेल्या वाटेने निघायचे. थोडं पुढे गेलो की पायऱ्यासुद्धा लागतात. या पायऱ्या जीर्णोद्धारीत आहेत. एका दिंडी दरवाजातून आपण महाकाली बुरूजामध्ये प्रवेश करतो. या महाकाली बुरूजाची खरी विशालता येथे आल्याशिवाय समजणार नाही. या बुरूजामध्ये महाकाली देवीचे प्राचीन मंदिर आहे, त्यामुळेच बुरूजाचे नाव महाकाली पडले असावे.

महाकाली मंदिराच्या समोरच्या भागात म्हणजेच बुरूजाच्या आतील भागात कमानदार ओवऱ्या आहेत. या ठिकाणी टेहळणीसाठी काही खिडक्यासुद्धा दिसतात. महाकाली बुरूजावर तोफांसाठी जंग्या आहेत. एकाच वेळी अनेक तोफा ठेवता येतील, अशी रचना केलेली दिसते. या बुरूजावरून रेणुका मातेचे मंदिर, किल्ल्याचे अंतरंग, माहूर गाव, मंदिराच्या उजवीकडे असलेली खोल दरी व त्यातून जाणारा वळणावळणाचा रस्ता एवढ्या गोष्टी स्पष्ट दिसतात. किल्ल्यावरील सर्वात नयनरम्य जागा हीच आहे.

याच महाकाली बुरूजावरून दोन तट दोन बाजूंस निघतात. आपण डाव्या तटाने पुढे गडफेरीस निघायचे. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे किल्ल्याच्या आत बरीच झाडी आणि जंगल आहे. त्यामुळे चालताना सावधगिरी बाळगूनच मार्गक्रमण करावे. हा तट अनेक ठिकाणी ढासळलेला दिसतो. याच मार्गाने गेलो की नक्षीदार खांबांनी तोललेली इमारत, तसेच याच्याच पुढे काही अंतरावर घरांची जोती आपल्याला दिसतात. याच वाटेवर असलेला हत्ती दरवाजा हाच गडाचा मुख्य दरवाजा. या हत्ती दरवाजात आपण किल्ल्याच्या आतून प्रवेश करतो, त्यामुळे प्रथम देवड्या दिसतात. प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस भक्कम खांब आणि कमानदार छत आहे. हे ईशान्यभिमुख प्रवेशद्वार असून किल्ल्याच्या आतील तटबंदीत बांधलेले आहे.

हे भव्य प्रवेशद्वार म्हणजे माहूरचे आभूषणच आहे. पूर्वी या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला चुन्यात बनवलेली शरभशिल्प होती; पण कालौघात ती नष्ट झाली. याच्याच पुढे किल्ल्यावर येण्याचा मुख्य मार्ग होता. हा मार्ग थेट माहूर गावात जातो; पण हा मार्ग आता जंगलामुळे बंद झालाय. या दरवाजातून थोडेसे खाली उतरल्यावर उजव्या बाजूला देवड्या दिसतात. देवड्यांच्या पुढे आग्नेयभिमुख दरवाजा आहे. हत्ती दरवाजापुढेच घोड्याच्या पागा असलेली इमारत आहे. हिलाच चिनी महाल असेही म्हणतात. या वास्तूत असलेली अनेक खांबांची कमानदार इमारत पाहण्यासारखी आहे. याच्याच पुढे आपल्याला हवामहल, राणी महाल, धान्य कोठाराची इमारत आदी अवशेष दिसतात. किल्ल्यातच असणाऱ्या तलावाजवळचे महानुभाव पंथीयांचे मंदिरसुद्धा पाहण्यासारखे आहे.

माहूरच्या किल्ल्याबाबत इतिहासात डोकावताना शिवाजी महाराजांच्या काळातला एक संदर्भ येतो. तो म्हणजे शिवरायांनी कारतलबखानाच्या सैन्याचा उंबरखिंडीत केलेला पराभव हा सर्वांनाच माहीत आहे. त्या मोघल सैन्यात रायबाघन नावाची एक शूर स्त्री सरदार होती. ती याच माहूरगडाची. तिचे नाव सावित्रीबाई; पण तिची कर्तबगारी आणि शौर्य पाहून औरंगजेबाने पंडिता रायबाघन हा किताब सावित्रीबाईला दिला. असा हा माहूर किल्ला अवशेषांनी नटलेला; पण अतिशय दुर्लक्षित.

माहूरची राष्ट्रकूटकालीन  लेणी

या माहूरमध्ये आणखी एक गोष्ट दडली आहे ती म्हणजे लेणी. ही हिंदू लेणी स्थानिक भाषेत पांडव लेणी म्हणून ओळखली जाते. रेणुका मातेला जाण्याच्या अगोदरच मुख्य बाजारपेठेतूनच एक रस्ता डावीकडे या लेण्यांकडे जातो. त्यामुळे बाजारपेठेत कोणालाही विचारले की तुम्हाला याचा पत्ता सहज मिळून जातो. अगदी पाचच मिनिटांत तुम्ही वाहनाने या लेणींच्या जवळ पोहोचता. तेथून पायऱ्यांची एक वाट खाली उतरली आहे. हा भाग खूप दुर्लक्षित आहे. अगदी मोजकेच पर्यटक या लेणींना भेट देतात. या पायऱ्यांच्या वाटेने आपण अगदी दहाच मिनिटांत या लेणींसमोर येतो. ही लेणी उत्तराभिमुखी असून या लेणी समूहात एकूण चार लेणी आहेत.

मध्यभागी दगडी खांबांनी तोललेले असे मोठे लेणे आहे. याच्या दर्शनी भागात दोन पूर्ण स्तंभ आणि दोन अर्ध स्तंभ आहेत. व्हरांड्यातून मुख्य दालनात प्रवेश केला की आपल्याला एकूण सहा पूर्ण स्तंभ आणि दोन अर्ध स्तंभ आपले लक्ष वेधून घेतात. या खांबांवर शंकर, पार्वती, दुर्गा, महिषासुरमर्दिनी आदी शिल्पे कोरलेली आहेत; पण झालेल्या झिजेमुळे सध्या यांची ओळख पटवणे खूप अशक्य झाले आहे. या दालनाला जोडून गर्भगृह आहे.

मुख्य लेणीच्या डाव्या बाजूला असलेल्या एका लेणीत गणपतीची मूर्ती कोरलेली आहे. उजव्या बाजूला असलेल्या लेणींच्या दर्शनी भागात दोन पूर्ण आणि दोन अर्ध स्तंभ आहेत. स्तंभांच्या पलीकडे मोठा व्हरांडा असून दोन्ही बाजूंना विहार कोरलेले दिसतात. हे दोन्ही विहार दिसायला सारखे असून दोघांच्याही दर्शनी भागात दोन पूर्ण आणि दोन अर्ध स्तंभ कोरलेले आहेत. या लेणीच्या अंतर्भागात आणखीन लेणी कोरलेली असून यात दगडी बाकसुद्धा कोरलेले आहेत.

असे म्हणतात, की ही लेणी राष्ट्रकूट राजवटींच्या काळात कोरली गेली. राष्ट्रकुटाचा कालखंड हा महाराष्ट्राच्या बाबतीत वैभव संपन्न असा कालखंड होता. वेरूळचे प्रसिद्ध कैलास मंदिरसुद्धा यांचीच निर्मिती. तर अशाचप्रकारे या भागातही लेणी खोदण्याचा प्रयत्न झाल्याचे इतिहास अभ्यासक सांगतात. स्थानिक लोकांमध्ये ही लेणी पांडवांनी बांधल्याचे आपल्याला ऐकवले जाते. पांडव वनवासात असताना भीमाचे आणि राक्षसाचे युद्ध, भीमाचा विवाह आणि घटोत्कचाचा जन्म याच पांडवलेणीच्या परिसरात झाला, असाही येथील स्थानिक लोकांचा समज आहे. आपणही अशा आख्यायिका ऐकतच आपली भटकंती सुरू ठेवायची.

माहूर येथे रेणुकादेवीचे स्थान असल्यामुळे वर्षभर माहूर भक्तांनी गजबजलेले असते. येथे येणारे सर्व भाविक रेणुकादेवीचे, अनसूया मातेचे (दत्तात्रयांची आई) आणि दत्तशिखर येथे दर्शन घेऊन निघून जातात; पण माहूर येथे असलेली लेणी आणि किल्ला सहसा कोणी पाहत नाही. अगदी मोजकेच पर्यटक भेट देतात. प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असल्यामुळे येथे राहण्यासाठी भरपूर धर्मशाळा / भक्तनिवास आणि जेवणासाठी भरपूर उपाहारगृहे उपलब्ध आहेत; पण एक गोष्ट मात्र अडचणीची आहे ती म्हणजे या भागात असणारा उन्हाचा तडाखा. त्यामुळेच माहूरला भेट देण्यासाठी चालू असलेला हिवाळा हा योग्य मोसम आहे.




*श्री रेणुका माता आख्यान - भाग २* ======================= पहाटेच्या वेळेस गौतमी नदीच्या काठावर असलेल्या आश्रमात जाग यायची ती पक्ष्यांच्या मधुर आवाजाने. जमदग्नी ऋषीच्या आश्रमात चिवचिवाट सुरु व्हायचा पण त्या आवाजाचा त्रास ऋषीमुनींना काही होत नसे. ते आपले ध्यानस्थ बसलेले असायचे. मग आईची लगबग सुरु व्हायची. ध्यानस्थ बसलेल्या आपल्या शिवस्वरूप स्वामींना आई वंदन करायची. नदीवर जाऊन स्नान करून आश्रमातील पुढील कार्यासाठी तयार व्हायचे. नित्यनेमाचे हे आचरण आईस अंगी पडले होते. निसर्गातीळ प्रत्येक घटकांची थोरवी अगाध. शुभ स्पंदनाची ..प्रसन्नतेची ती जाणीव आश्रमाच्या सभोवतालीच्या झाडे, वेली, पशु पक्षांनाही होत असे. त्या काळोख्या अंधारात आई नदीवर जाणार म्हणून पशु ही ओरडत असत.. गाईच्या हंबरण्याबरोबरच .. सिहाची गर्जना ही एकसाथ ऐकु येत असे. मोर व विविध पक्षी सुस्वर ..मंजुळ आवाजात गात असत. पहाटेच्या वाऱ्यांनी वेली ..झाडे झुडपे आपला आनंद व्यक्त करत असत. सर्वांच्या मुखी आईचा जयघोष होत असे. जमदग्नी प्रियं देवीम रेणुकामेम मातरम सर्वारंभे प्रसिद त्वम नमामि कुलदेवताम सजीव निर्गुण हा भेद दूर करून सर्वांसोबत राहणारी रेणुका जगदंबा माता..हिचा सर्वाना आधार वाटल असे. आई आमच्या सोबत राहते याचेच भाग्य निसर्गातील प्रत्येक जीवाला होत असे. आई स्नान आटोपून परत येताना .. आश्रमाच्या दारापासून पक्षी परत एकदा मंजुळ स्वरात आवाज करायचे..काही पक्षी उंच झाडावर बसून आपल्या चोची मधून आणलेल्या उमलत्या फुलांनी व पाकळ्यांनी आईच्या मस्तकी पुष्पवृष्टी करायचे. आश्रमाकडे जाणारी ती वाट रंगीत फुलांनी उमलून जायची. आईच्या केसांमध्ये रंगीत फुलांच्या पाकळ्या शोभून दिसायच्या.. ती ही हास्य मुद्रेने आकाशाकडे पाहायची. त्या मातृ जाणिवेमधून सर्व जीव धन्य धन्य होऊन जायचे. मृत्यूलोकामधील हा जन्म कसा का असेना पण मातेच्या सेवेकरिता आहे हा अभिमान पप्रत्येकाच्या हृदयी असायचा. थोड्यावेळाने सूर्यनारायण उदयास यायचे.. झाडझूडपांनी आच्छादित आश्रमात भूलोकीच्या भास्करानी आपले सुकृत सांभाळले होते. एक ठराविक वेळी.. झाडा झुडुपांमधुन एक तेजस्वी किरण आईच्या चरणावर स्थिर व्हायचा. या वंदनाने सूर्येदेव ही आनंदायचे.. ब्रह्माण्डामाधील श्रीमातृकाशक्तीचे नित्य पुजन ही दिव्य अशी सेवाच होती. आजचा दिवस काहीतरी वेगळाच होता... नदीवर येताक्षणी तिने देवलोकीच्या एका गंधर्वराजास त्याच्या अनेक स्त्रियासह जलक्रीडा करत असताना पाहिले. त्या गंधर्वलोकीच्या ऐश्वर्यास.. उंची वस्त्रे, विविध अलंकार, तेथील मोहून टाकणारी फुले, चंदन कस्तुरी चा घमघमाट .. बघून .. तिचे मन चलविचलित झाले. क्षणभर ती बावरली. आपण ही असे ऐश्वर्य भोगले तर.. या क्षणभरीच्या विचाराने रेणूकामाता मोहित झाली. मनाचे पतिव्रतेचे शिवपूजक स्वरूप भंगले. मनाची भ्रांती सुरु झाली..मनाच्या तन्मयतेचे पावित्र्य डळमळले. ( गंधर्वराजाचे आकर्षण, गंधर्वराजाचा चाललेला स्त्रियांबरोबर श्रुंगार म्हणजेच काम..एवढाच अर्थ नाही. काम हा खूप खोलवर अर्थाचा शब्द आहे. कां सोस्मिता मधील "कां" ब्रह्मस्वरूप आहे ..तर आकर्षण पोटीचा काम हा दालनातील किंवा जलसरोवर येथील स्त्रीशृंगार किंवा स्त्रीसहवास , अरण्यामधील मृगया , द्यूत खेळणे. याला कामविकार म्हणतात कारण ते भोगणे आहे.. क्षत्रीयाना किंवा गंधर्वराजा तो कर्म अधिकार आहे. भोगणे म्हणजे वासनामय कामनेत गुरफटणे.. तपस्वी ब्राह्मणाना तो नाही कारण कर्म कार्यकारणाचे स्वरूप तपस्याच आहे. ) आज नदीवरून येताना आईच्या तेजस्वी चेहऱ्यावर निस्तेजाची व्याकुळता दिसत होती. पाऊले टाकताना आई आज आनंदात दिसत नव्हती.. जगत्जननी असल्याने तिची अशी स्पंदने निसर्गात ही उमटत होती. आज पक्ष्याचा मधुर किलबिलाट नव्हता ना मोरांचा थयथयाट,, सारे कसे शांत वाटत होते.. पण त्या शांततेमध्ये आईच्या ह्रदयी प्रचंड खळबळ होत होती. आश्रमा मध्ये गेल्यावर आपले स्वामी कसे वागतील यांची तिला भीती वाटत होती. आश्रमात येता क्षणी जमदग्नी ऋषीवरांचा क्रोध तिला अग्नीप्रमाणे भासला. थरथरत ती उभी राहिली. आई आश्रमी आल्यावर जमदग्नी ऋषीनी तिला बोलायला सुरु केले. " तुझ्या मनातील विषय वासनाचे स्वरूप या आश्रमात नाही. तेव्हा तू आश्रम सोडून निघून जा. या आश्रमात मध्ये तुला ते वैभव मिळत नाही. ते वैभव किंवा आकर्षण माझ्याकडे नाही म्हणून माझ्या त्यागापेक्षा तूच या आश्रमाचा त्याग कर. तुला जे ऐश्वर्य उपभोगायचे ते तुला बाहेरच मिळेल. " स्वामींचे बोलणे तिला तीक्ष्ण शस्त्राप्रमाणे तिच्या हृदयावर आघात करू लागले. प्रत्येक वाक्यांबरोबर तिच्या डोळ्यांमधून अश्रू सुरू झाले. तिच्या उर धडधडू लागला. डोळे मिटून ती सर्व सहन करू लागली. कारण तिच्यापाशी बोलण्यासारखे काहीच नव्हते .. डोळ्यातील अश्रुने व देहातीत भयाने अंगावरची वस्त्रे ओलीचिंब झाली. " तू जाणार नसशील तर मी तुला इथेच मरण देतो " या वाक्यांनी ती सावरली. तिला वाटत होते की स्वामी शाप देतील..किंवा जीवावर बेतले तरी स्वामीचरणी देह विसावला त्याच्यासारखे सुख नाही. तो क्षण आश्रमामध्ये थरकाप उडवणारा होता. जगतजननीला साक्षात शिवस्वरूप जमदग्नी ऋषी क्रोधाने ओरडत होते.. निसर्गातील सर्व जीव शांत बसले होते. सूर्यनारायणाने आपले तेज कमी केलेले .. वायुदेव नसल्याने झाडेझूडपे स्थिरावली होती. गाईचे हंबरणे नव्हते.. फक्त ऋषीवरांचा क्रोधध्वनी आसमंतात घुमत होता. स्वर्गलोकातही देवादिकांनी गर्दी केली होती. आता पुढे काय होईल .. सर्वांच्या मनातील विचार वाऱ्यासारखे घोंघावत होता. जमदग्नी ऋषीचा हा क्रोध कुणी पहिला नव्हता. आपली प्रिय पत्नी म्हणून रेणूकामातेवर प्रीती होतीच. तिच्यामुळे आपले जीवन सुखाचे व समृद्धीचे आहे याची जाणीवही त्यांना होती. महान ऋषीवर पराशर , शांडिल्य व इतर ऋषी जेव्हा आश्रमात येत, तेव्हा सर्व ऋषीवर रेणुकामातेला वंदन करायचे याचे त्यांना कौतुक असायचे. तिच्यासारखी पतिव्रता नाही याचे देवादिकांना ही कौतुक. शिवशक्ती स्वरूपातील दोघांचे तपाचे सामर्थ्य ऋषीना माहीत होते. कुणाच्याही कर्मातला विषयभोगाचा अडसर हा दोघांना बाधक याची त्याना कल्पना होती. मनीच्या विषयवासना या प्रथम धिक्कारून क्रोधीत शब्दाने जाळून टाकायच्या म्हणून त्यांनी हा क्रोधीत अवतार धारण केला होता. आपल्या पुण्याचा अर्धा वाट आपल्या पत्नीस मिळणार आहेच पण विषयवासनाच्या आकर्षणापोटी पुर्नजन्माचे,दुर्गतीचे ओझे नकॊ. आपली प्रिय पत्नी आपल्या सोबत कायमच हवी हे अंतरीचे वात्सल्य ही होते. मनीचे आकर्षण अश्रुनी वाहून झाले पण मनीच्या विषयवासनेचा स्पर्श देहातीत रक्तामध्ये कणकणाने भरला गेला.. तो शुद्ध करण्यासाठी पुढचे नाट्य घडणार होते ..




   

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...