Monday, January 3, 2022

पोहाळे लेणी

 कोल्हापूरचा प्राचीन ईतीहास

प्राचीन काल -
हा काल श्री महालक्ष्मीच्या स्थापनेपूर्वीचा म्हणजे इसवीसनाच्या सुमारे ९व्या शतकापर्यंतचा मानला जातो. या काळात नदीकाठावरील टेकडीवर ब्रह्मपुरी हे वसाहतीचे केंद्र होते.
भगवान श्रीकृष्ण आणि कोल्हापूर
आपल्या सगळ्यांनाच प्रश्न पडला असेल की मथुरे जन्मलेला द्वारकेचा राणा भगवान श्रीकृष्ण कोल्हापुरात आला कधी आणि त्यांचा आणि कोल्हापूरचा संबंध काय? तर या विषयी हरिवंशपुराण आणि करवीर महात्म्य या दोन ग्रंथांत फार सुंदर उल्लेख मिळतात करवीर महात्म्य उल्लेखाप्रमाणे भगवान श्रीकृष्ण दोन वेळेला कोल्हापुरात आले एकदा बलरामा सोबत कालयवन वधासाठी आणि दुसऱ्या वेळी आपल्या सोळा सहस्त्र स्त्रियांच्या मानसिक पापाच्या परिवारासाठी. हरिवंशात मात्र भगवान एकदाच कोल्हापुरात आले तेही कालयवन राक्षसाच्या वधावेळेला असा उल्लेख आहे .कालयवन अर्थात जरासंधाने बोलावलेला दुष्ट सेनापती. कंसाचा सासरा असलेल्या जरासंधाने श्रीकृष्णाचा सूड घेण्याच्या उद्देशाने सतरा वेळेला मथुरेवर आक्रमण केले सतरा वेळा तो पराजित ही झाला पण मथुरेचे अतोनात नुकसान झाले अठराव्या वेळी मात्र त्याने कालयवन नावाच्या दुष्ट दैत्याला पाचारण केले हा दैत्य गांधार देशाच्या पलीकडून आला असा उल्लेख आहे अशा कालयवनाला रणांमध्ये लढण्याचा दांडगा अनुभव होता त्यामुळे सर्व मथुरावासी यांनी भगवंतांना सांगितले की कालयवनाचे वैर हे तुमच्याशी आहे मथुरेच्या बाकी जनांशी नाही तेव्हा योग्य तो निर्णय करा. भगवंतांनी युद्धाला आव्हान दिले आणि आपला रथ कालयवन त्याच्यासमोर येऊन उभा केला कालयवन आला बघून भगवान रथातून उतरले आणि रणातून पळत सुटले असा उल्लेख आहे यामुळेच भगवान श्रीकृष्णाला रणछोड असे नाव मिळाले. भगवंतानी रण सोडलं खरं पण त्यांनी सह्याद्री पर्वताच्या घनघोर करण्यामध्ये ओढले आणि त्यांचा पाठलाग करत सध्याच्या विशाळगडाच्या पाठीमागे असलेल्या मुचकुंद नावाच्या राजाच्या गुहेत शिरले मुचकुंद राजाला वरदान होते की जो कोणी त्यांची झोप मोडेल तो जळून भस्म होईल .भगवंत गुहेत आले आणि त्यांनी आपला शेला मुचकुंद राजावर पांघरला कालयवनाने रागाने कृष्ण समजून मुचकुंदाची झोपमोड केली आणि तो जळून भस्म झाला. करवीर महात्म्य आपल्या कथेप्रमाणे इथे येताना भगवान श्रीकृष्णांनी गाय रुपी रंभेचा चा उद्धार केला तो परिसर म्हणजे केखले आणि जाखले तसंच कालयवनाबरोबर युद्ध करताना भगवंताने मारलेल्या उडी मुळे पर्नाळपर्वत दोन योजन खाली आला असा उल्लेख आहे आजही जाखले गावात गोपालेश्वराचे मंदिर आहे. पुढे करवीर महात्म्य तल्या कथेप्रमाणे भगवान श्रीकृष्णाच्या सोळा सहस्त्र राण्यांच्या हातून काही मानसिक पाप घडले त्याची निष्कृती करायला भगवान आपल्या परिवारासह करवीरात आले. इथे आल्यानंतर आज जयंती आणि गमतीचा संगम असलेल्या म्हणजे हुतात्मा पार्क च्या परिसरात त्यांनी वास्तव्य केले इथे जणू प्रती द्वारका तयार झाली या द्वारकेला पाहून ,या द्वारकाधीशाला आणि भगवान शंकरांना एकत्र पाहून नारद मुनी आपला शाप विसरले अशा ठिकाणी करवीर यात्रा करताना एके वेळी माता देवकीने भगवान श्रीकृष्णाला विनंती केली हे पुत्रा तुझ्या बाल लीलांचे कौतुक अवघ्या जगात गायलं जातं पण तुझी जन्मदाती असूनही मला मात्र हे भाग्य नाही तेव्हा भगवान श्रीकृष्णाने बाळ रूप धारण करून मातेला अगदी पूतना वध आतापासून ते गोवर्धन पर्वताच्या उद्धारा पर्यंत सर्व बाळलीला करून दाखवल्या जिथं भगवंतांनी यमुनेचे खेळ केले ती जागा म्हणजे गोकुळ शिरगाव. जिथं पर्वत उचलला ती जागा गिरगाव याच परिसरात असलेले वसुदेव ग्राम अर्थात वाशी इथे वसुदेव आणि तप केले अशा रीतीने या करवीर क्षेत्राला व्रजभूमी चा महात्म्य प्राप्त करून देणारे भगवान श्रीकृष्ण यांनी आपल्या मुखाने पंचगंगा महात्म्य सांगितले याशिवाय सर्व पापांचा परिवारासाठी शक्ती चतुष्क म्हणजे एकवीरा पद्मावती प्रत्यंगिरा आणि अनुगामिनी अशा चार देवतांचे दर्शन घेण्याची आज्ञा केली आहे .भगवंताची ही बाळलीला या क्षेत्री झाली याचा संदर्भ कोणी खोटा म्हणेल तर याला जोडून दुसरा संदर्भ देतो तो म्हणजे माशेल गावच्या देवकी कृष्णाचा. कथेनुसार भगवान श्रीकृष्ण कालयवनाचा वध करण्यासाठी दक्षिणेत आल्यावर माता देवकी आणि संपूर्ण परिवार ओढीनं दक्षिणेला आले. सावळ्या परब्रम्हाला बघून देवकीचा उर वात्सल्याने भरून आला. तिने जगदीश्वर श्रीकृष्णाला बाळ रूप कल्पून उचलून घेतलं आणि आपल्या छातीशी धरलं तिथल्या तिथल्या पुराणातल्या उल्लेखानुसार हा प्रसंग करवीर घडला म्हणून आजही गोव्यातील माशेल गावी एकमेव अशी देवकीने कडेवर घेतलेल्या बाळकृष्णाची एकमेव मूर्ती आहे एकूणच या जगात व्यापक श्रीकृष्णाचे करवीराशी अर्थात कोल्हापूर बरोबर देखील अनोखे नाते आहे.
 कोल्हापूर आणि नारदमुनीवर्य
भारतीय पुराणकथातील चेष्टेचं, कलह करवणारं किंवा वेळ आलीच तर घाबरून पळ काढणारं एक विदुषकी पात्र अशी एक चुकीची व्यक्तिरेखा म्हणून नारदांची प्रतिमा उभी केली गेलीय आणि टि व्ही मालिकांनी याला खत पाणीच घातल .
वास्तविक देवर्षी नारद हे ब्रम्हदेवाचे मानसपुत्र विख्यात गायक आणि हरिभक्त. त्यांनी लिहिलेली भक्तीसुत्र म्हणजे परमेश्वर प्राप्तीचा राजमार्गच . अखंड ईशस्मरण हे यांचं वैशिष्ट्य.नारद ही अशी विभूती आहे जी मनोवेगान सर्वत्र संचार करते. त्यांना देव मानव दैत्य तिघेही आदराने नमन करतात. नारद मुनी प्रत्येकाला त्याच्या हिताचा सल्ला देतात. आपण अनेक व्रते क्षेत्र माहात्म्यं पाहीली तर लक्षात येईल की नारदांनी वेळप्रसंगी लोकहितार्थ प्रश्न विचारून ती व्रते क्षेत्र माहात्म्ये प्रकाशित केली आहेत.
नारद हे पहिले वार्ताहर पण या वार्ता पोहचवण्यात त्यांचा वैयक्तिक स्वार्थ काहीच नाही सृष्टी चक्राचा समतोल साधण्या करता घटनाक्रमाला गती आणण्याच काम नारद करतात. साध उदाहरण घ्या सोडा किंवा मोहन न घालता देखिल भजी होतात पण जर मोहन किंवा सोडा घातला तर त्यांची खुसखुशीत होण्याची प्रक्रिया जलद आणि सोपी होते हेच नारदांच अस्तित्व . विधिलिखित घटना जलद घडून येण्यासाठी देवर्षींची भूमिका महत्वाचीच. भक्तांचा आवाज देवा पर्यंत पोहोचवणारे माध्यम म्हणजे नारद मुनी. यामुळे त्यांना शाप ही मिळाले त्यातील एक म्हणजे दक्ष प्रजापतीने दिलेला चंचल पणाचा शाप त्यामुळे नारद कुठेही स्थीर राहू शकत नाहीत अपवाद फक्त कोल्हापूराचा . उद्यम नगर भागात हुतात्मा पार्क बाग आहे तिथे द्वारकाधिश श्रीकृष्णाचे एक मंदिर आहे जे प्रति द्वारका म्हणवले जाते त्याच्या समोर आज फक्त नारदांच्या पादुका आहेत.तिथली नारदांची मूर्ती आता टाऊन हाॅल मध्ये आहे एकदा नारद कृष्ण दर्शनाला करवीरात आले आणि शिव हरीला , देवीला एकत्र पाहून आणि या क्षेत्राच्या प्रभावाने शाप मुक्त होऊन कोल्हापूरातच राहीले त्या आदि वार्ताहर किर्तनकुल शिरोमणी देवर्षीना अभिवादन !
  एका आख्यायिकेनुसार, प्राचीन काळी केशी राक्षसाचा मुलगा कोल्हासुर हा इथं राज्य करत होता. त्यानं सगळ्यांना त्रस्त करून सोडलं होतं म्हणून देवांच्या प्रार्थनेवरून महालक्ष्मीनं त्याच्याशी युद्ध केलं. हे युद्ध नऊ दिवस चाललं होतं.अश्विन शुद्ध पंचमीला महालक्ष्मीनं कोल्हासुराचा वध केला. कोल्हासुर महालक्ष्मीला शरण गेला आणि त्यानं तिच्याकडं, आपल्या नगराची कोल्हापूर व करवीर ही जी नावं आहेत ती तशीच पुढंही राहावीत, असा वर मागितला. त्यानुसार या नगरीला कोल्हापूर वा करवीर या नावानं ओळखलं जातं. कोल्हापूरचे श्री महालक्ष्मी मंदिर महाराष्ट्रातील साडेतीन शक्ती पीठांपैकी एक आहे.प्राचीन भारतातील विभिन्न पुराणांनी १०८ शक्तीपीठांची सूची तयार केली आहे कि जिथे शक्तीची देवी प्रकट झाली आहे.यामध्ये करवीर क्षेत्राची श्री महालक्ष्मी (जेथे आजचे वर्तमान कोल्हापूर शहर आहे) चे विशेष महत्त्व आहे.श्री महालक्ष्मी मंदिर कोल्हापूरच्या सहा शक्तीपैकी एक आहे कि जिथे कोणतीही इच्छा पुरी होण्याबरोबर मुक्तीही मिळू शकते.यासाठी या स्थळाला काशीच्या तुलनेत अधिक महत्त्व प्राप्त होते. ही ती जागा आहे कि जिथे विष्णू ची पत्नी श्री महालक्ष्मी ला मोक्ष मिळण्यासाठी प्रार्थना करते.
  श्री महालक्ष्मी आणि श्री विष्णू दोघेही नेहमी करवीर क्षेत्रामध्ये राहतात असे म्हंटले जाते आणि ते दोघेही हे करवीर निवास महाप्रकाश्याच्या वेळेस पण सोडणार नाहीत.करवीर क्षेत्र नेहमीच धन्य आहे असे मानले जाते कारण महालक्ष्मी आपल्या उजव्या हाताने आई जगदंबेच्या रुपात प्रकट होते यासाठी हे क्षेत्र सर्वच प्रकारच्या विनाशापासून सुरक्षित आहे.भगवान विष्णू स्वतः या क्षेत्राला वैकुंठ आणि क्षीरसागर या दोन स्थानांपेक्षाही अधिक पसंत करतात.कारण इथे त्यांची पत्नी लक्ष्मी चे निवासस्थान आहे.म्हणूनच या क्षेत्राच्या महानतेने अनेक संताना व कवींना आपल्याकडे आकर्षित केले आहे. या करवीर क्षेत्राने आपल्या भक्तांवर केलेले प्रेमानी दिलेले आशीर्वाद हे अतुलनीय आहे.असेही मानले जाते कि श्री दत्तात्रेय अजून पण या ठिकाणी दान करण्यासाठी दुपारच्या वेळेस येतात.
  महालक्ष्मी मंदिर वास्तुकला रचनेवर जे नक्षी कामाचे संकेत आहेत त्यावरून असे सांगण्यात येईल कि हे मंदिर चालुक्य शासन काळातील म्हणजेच ६०० ते ७०० काळातील असावे.मंदिराची बाहेरची संरचना आणि स्तंभांची कलाकृती हा कलेचा एक अद्भूत नमुना आहे. देवीची मूर्ती रात्नापासून बनवली आहे ही जवळ जवळ ५००० ते ६००० वर्षापूर्वीची असावी असे मानले जाते.महालक्ष्मी ची मूर्ती ही ४० किलो वजनाची आहे.कोल्हापूर पर्यटनामध्ये महालक्ष्मी मंदिर हे प्रमुख स्थान आहे.यासाठीच देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक भेट देतात
  कोल्हापूर हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर असून प्राचीन काळापासून दक्षिण काशी या नावाने ते प्रसिद्ध आहे.महालक्ष्मी मंदिर आणि जोतिबाचे मंदिर यामुळे हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणूनही ओळखले जाते. तसेच ऐतिहासिकदृष्ट्या कोल्हापूर महत्त्वाचे शहर असून प्राचीन काळापासून ते विविध राजघराण्याचे राजधानीचे ठिकाण होते.
   हिंदू धर्मशास्त्रानुसार, प्राचीन काळी केशी राक्षसाचा मुलगा कोल्हासुर हा इथे राज्य करीत होता. याने राज्यात अनाचार व सर्वाना त्रस्त करून सोडले होते. म्हणून देवांच्या प्रार्थनेवरून महालक्ष्मीने त्याच्याशी युद्ध केले. हे युद्ध नऊ दिवस चालले होते . आणि अश्विन शुद्ध पंचमीस महालक्ष्मीने कोल्हासूर या राक्षसाचा वध केला होता. त्यावेळेस कोल्हासूर महालक्ष्मीला शरण गेला आणि त्याने तिच्याकडे आपल्या नगराची कोल्हापूर व करवीर ही नावे आहेत तशीच चालू ठेवावीत असा वर मागितला. त्याप्रमाणे या नगरीला कोल्हापूर वा करवीर या नावाने ओळखले जाते. ["श्री करवीर निवासिनी"]
   एखाद्य़ा शहराच्या इतिहासाचे साद-पडसाद तेथील लोकजीवनावर व विविध संस्थांवर प्रकर्षाने जाणवतात. कोल्हापूर शहराच्या आजच्या वैभवशाली विस्ताराचे बीज त्याच्या इतिहासात शोधता येते. प्रांगैतिहासिक व इतिहासकाळात भारतीय जनजीवनात जी विविध स्वरूपाची स्थित्यंतरे घडून आली ती करवीरच्या परिसरातही प्रकटतात.इ.स.पूर्व १ ल्या शतकापासून ते इ.स. ९ व्या शतकापर्यत ऐतिहासिक कालखंडात कोल्हापूर येथील वसाहत आजच्या ब्रह्यपुरीच्या टेकडीवर होती. ब्रह्यपुरीच्या टेकडातील अवशेषांचे अन्वेषण व उत्खनन असे दर्शविते की, सातवाहन काळात या परीसरात समृध्द व सुसंस्कृत लोकसमुदाय वस्ती करून रहात होता. इ.स. २२5 ते 55० पर्यत वाकाटक,कदंब,शेद्रक व मौर्य या प्राचीन राजघराण्यांचे राज्य होते. इ.स.550 ते ७53 या कालखंडात बदामीच्या चालुक्य घराण्याची सत्ता येथे प्रभावी होती.
     इ.स.६३४ मध्ये या घराण्यातील राजा कर्णदेव याने महालक्ष्मी मंदिराच्या उभारणीस प्रारंभ केला. बहुतेक सर्व चालुक्य सम्राट कोल्हापूरास ‘दक्षिण काशी' व ‘महातीर्थ' संबोधितात. इ.स.७53 ते ८5० या कालखंडात दक्षिणेस राष्ट्रकूटाची सत्ता प्रस्थापित झाली. तेव्हा कोल्हापूरसुध्दा त्यांच्या सत्ताक्षेत्रात आले. पुढे इ.स. १२१० पर्यत शिलाहारांनी येथे राज्य चालविले. अशा प्रकारे ऐतिहासिक काळात शिलाहारांचे एक प्रमुख सत्ताकेंद्र या नात्याने कोल्हापूर शहराने मोलाची कामिगरी बजावली आहे. या घराण्यातील राजा गंदरादिव्य याच्या काळातील शिलालेखात या नगरीचा उल्लेख ‘महातीर्थ' असा आढळतो. त्याने महालक्ष्मी मंदिराचे बांधकाम पू्र्ण केले. या सम्राटाची बहिण चंद्रिकादेवी हिचा विवाह चालुक्य नरेश दुसरा विक्रमादित्य याच्याशी झाला व परिणामी कोल्हापूरचे वैभव वाढीस लागले.
  ब्रह्यपुरी, उत्तरेश्वर, खोलखंडोबा, रंकाळा, पद्माळा, रावणेश्वर ही प्राचीन काळातील कोल्हापूरची नैसर्गिक केंद्रस्थाने होती. म्हणजे कोल्हापूर शहराचा हा परिसर प्राचीन काळातील ओळखला जातो. उपरिक्त सर्व केंद्रांचे स्वरूप छोटया खेड्यासारखे होते. इ.स.च्या ९ व्या शतकात महालक्ष्मी मंदिराची स्थापना झाली. त्यामुळे ही सर्व ग्रामस्थाने एका प्रबळ सांस्कृतिक व आर्थिक केंद्रबिंदूत बांधली गेली. शिलालेख, वाड्मयीन साधने वास्तुकला या प्रमुख निकषांच्या आधारे महालक्ष्मी देवालायाचा कालखंड हा ९ व्या शतकाच्या (राष्ट्रकूटांचे युग) मागे नेता येत नाही, असे पुरातत्वज्ञ मानतात.
  कोल्हापूर या स्थल नामाचा भौगोलिक व सांस्कृतिक बंध तपासणे हेसुध्दा तेवढेच महत्वाचे आहे.दक्षिण काशी म्हणून करवीर पीठाचा उल्लेख वाड्मयात आढळतो. महालक्ष्मीने आपल्या शुभदायक करांनी या नगरीला प्रलयकाळाच्या संकटातून सुरक्षित उचलेले म्हणून त्यांस‘ करवीर ’असे सार्थपणे संबोधिले जाते. असे व्युत्पत्ती मेजर ग्रॅहॅम यांनी सूचित केलेली आहे, तर महालक्ष्मी देवीने आपल्या हाताने उचलून धरले ते ‘करवीरनगर’ असा उल्लेख ‘करवीर महात्म्या’ त आढलते. हरि पुराणातही ‘करवीर’ असेच नामभिधान आढळते.

पोहाळे लेणी

 कोल्हापुरला आलेल्या प्रत्येक पर्यट्काचा उद्देश हा ज्याप्रमाणे आई अंबाबाईचे दर्शन हा असतो. त्यानंतर त्याची आपसुक पावले श्री श्रेत्र जोतिबाकडे वळतात. जोतिबा म्हणजेच वाडी रत्नागिरीला आपण वडणगे, कुशिरे मार्गाने जोतिबाकडे जाताना जोतिबाच्या पायथ्याशी पोहाळे गावाच्या माथ्याशी पोहाळे लेणी कोल्हापुर पासुन 15 कि.मी. अंतरावर आहेत. रस्तालगतच खाली काही अंतर चालुन गेल्यानंतर डोंगराच्या कुशीत पोहाळे लेण्याचे दर्शन होते.
     पोहाळे लेणी समुह हा एकुण सहा लेण्यांचा आहे.यातील चार लेणी स्वरुप तर दोन पाण्याच्या टाक्याच्या स्वरुपात आहेत.सातवाहन काळात कोल्हापुर हे बौध्द धर्मीयांचे महत्वाचे केंद्र होते.गेल्या शतकात सापडलेल्या विटांनी बांधलेल्या स्तुपात स्मॄती करंडक सापडला त्याप्रमाणे ग्रीक आणि रोमन प्रभाव असलेल्या ब्राँझ मुर्ती कोल्हापुरात सापडल्या आहेत. अश्याच स्मृतीखुणा आपल्याला पोहाळे परिसरात सापडतात.पोहाळे गावाचे मुळ नाव पद्मालय ( म्हणजे कमळांचे घर अर्थात तळे ) असे होते.

    आपण पोहाळे लेण्याजवळ पोहचतो ही लेणी देखील गजपृष्ठकार असुन अलंकृत नाही यामुळे ती हिनयान पंथीय असावी याची ओळख पटते. आपल्या डावीकडे पाण्याची पोडी (कुंड) दिसतात. डोंगरातुन वाहत येणारे पाणी साठवण्याची तसेच पाण्याचा निचरा होऊन वास्तु सुस्थितीत राहण्याची ही नेटकी व्यवस्था आहे. येथे वरील बाजुने प्रणाल (पन्हळ) असुन तिचे पाणी या पोडींमध्ये येते. लेण्यांमध्ये सुरुवातीस पोडी त्यानंतर आपल्याला तीन गुहा /लेण्या दिसतात. 
त्यानंतर आपण चैत्यगृहात येतो.येथील चैत्यगृह ३ मीटर रुंद, ९.७० मीटर लांब आणि ३.६ मीटर उंच आहे.चैत्यगृहासमोर प्रांगण आहे. आतील २.४० मीटर व्यासाच्या स्तुपाची आज दुरावस्था झालेली असली तरी त्यावरील कोरलेले छताचे अवशेष दिसून येतात. गाभा-यात स्तुप आहे; त्यासमोर सध्या शंकराची पिंड व समोर नंदी आहे. तथापि मागील स्तुप त्यावरील हर्मिका तुटली आहे मात्र स्तुपाच्या वरील बाजुच्या छतावरुन तेथे हर्मिका असावी असे वाटते. नेहमीप्रमाणे याही लेण्याचे ब्राम्हणी लेण्यात संस्करण करण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. 

 त्याच्या बाजुस विहार आहे हा प्रशस्त असुन 35*32*9 इतका आहे तो स्तंभावर पेलला आहे. मुखमंडपाच्या पुढच्या भागात सहा अष्टकोनी स्तंभ होते. यावरील एका स्तंभावर चंद्र, सुर्य, घोडा कोरणेत आला आहे. त्याच्या बाजुस चिंतन मननाची छॊटॊ अनेक दालने आहेत. सभागृहाची समोरची भिंत सोडून उरलेल्या तिन्ही बाजुला शयनकक्ष कोरलेले आहेत.
सध्या लेण्याच्या डाव्या व उजव्या बाजुची बरीच पडझड झाली आहे. 
 उरलेल्या दोन लेण्यांच्या प्रांगणालगत काही खोल्या आहेत.या लेण्यासमोरच दोन खोदीव पाण्याची टाकी आहेत.त्यातील एका टाक्याला एक मुख तर दुसर्‍या टाक्याला सोन मुख आहेत.  
    या लेण्यांसमोरही पाण्याचा योग्य निचरा करणेकरिताचे छॊटे पाट आहेत. लेण्यांतील खिडक्या- दरवाजांची रचना पाहता स्वच्छ, खेळती हवा राहणेच्या दृष्टिने केलेली व्यवस्था आढळते. तसेच पावसाच्या पाण्यापासुन संरक्षण होणेकरिता समोरील छत दरवाज्याच्यापुढे असुन व्हरांडा आहे, तर दोन्ही बाजुच्या भिंतीना खिडक्या (दालने) असुन बाजुचा भाग भिंतींनी पुर्ण  बंद आहे. या भागात पडणा-या पावसाच्या पध्दतीचा देखील लेणी खोदताना अभ्यास केला आहे. येथील खडक जांभा असल्यानेच लेण्यांची पडझड झाली आहे. सध्या लेण्यासमोर मध्यावर एक पिंपळाचे झाड आहे. येथे बाराही महिने पाणी उपलब्ध आहे. 
 पोहाळे येथील लेणी समुह शैलस्थापत्याच्या दृष्टीने  अत्यंत महत्वाचा असून तो तिसर्‍या किंवा चौथ्या शतकात खोदला गेला आहे असे अनुमान आहे.याची कारणे अशी चैत्यगृहाचे स्तुपाचे छत्र छतातच कोरले आहे. विहाराचा स्तंभ असलेला मुखमंडप व आतील तीन भिंतीना लागून असणार्‍या चौदा खांबामुळे तयार झालेल्या तीन मार्गिका आणि त्यात असलेले अष्टकोनी स्तंभ हि रचना जुन्नरजवळील गणेशलेण्यासारखी आहे. म्हणुनच हा विहार हीनयान पंथाचा प्रभाव ओसरून महायान पंथाचा बहराचा काळ यामधील काळात हि लेणी कोरली गेली असावीत.
      आपण अगदी कमी वेळात हे सुरेख लेण पाहु शकता तर जोतिबाला जाताना गाडी या थांब्यावर थोडया वेळाकरिता नक्की थांबवा.
 पांडवदरा लेणी
पन्हाळागडजवळच्या मसाई पठारावर इंजोळे गावापासून दीड किलोमीटर अंतरावरील गर्द झाडी असलेल्या डोंगरमाथ्यावरील कडय़ात खोदण्यात आलेली इ.स. पूर्व तिसर्‍या शतकातील लेणी पांडवलेणी म्हणून ओळखली जातात.

बोरबेट

पळसंबे येथुन काही अंतर गेल्यानंतर बोरबेट गावाच्या टोकाशी असणा-या डोंगरावर चढाई करुन वर गेल्यास आपण बोरबेट पठारावर पोहोचतॊ. या पठारावर  हिनयान पद्धतीची लेणी आहे सध्या येथे मोरजाई देवीचे मंदीर आहे. येथे अनेक वीरगळी, सती शिळा  आहेत.या लेण्यापर्यंत पठारावरुन जात असता तीन दग़डी चौकटी लागतात, येथे दरवाजा किंवा तटबंदीचे अवशेष अस्तित्वात नाहीत मात्र या चौकटी मात्र दिमाखात उभ्या आहेत. लेण्याच्या प्रवेशद्वाराजवळ दिपमाळ तसेच दगडी समाध्या इतिहासाचे साक्षीदार उन वारा सहन करत उभी  आहेत. येथे अनेक दगड अस्ताव्यस्त पसरले आहेत. त्यावरुन ते तटबंदीचे दगड असावेत असे निदर्शनास येते. सध्या येथे पाण्याची कोणतीही व्यवस्था नाही तसेच पोडी आढळत नाही. त्यामुळे सोबत जाताना पिण्याचे पाण्याची व्यवस्था करावी. सध्या या लेण्याच्या दर्शनी भागात पडझड झाल्याने दगडी बांधकाम केलेले असल्याचे बाजुचे कातळावरुन दिसुन येते.





इ. स. पुर्व दुस-या शतकात सातवाहन काळात बौद्ध भिक्खु, सार्थवाहक यांनी स्थानिक आदिवासीचे (स्थानिक लोकांचे) नागरीकरणाचे प्रयत्न केले. व्यापारीदृष्टीने  त्यांना ज्ञान दिलेः पळसंबा हे पळस व आंब्यापासुन रेशमी कापडाकरिता केशरी रंग बनविण्याचे व निर्यात करण्याची शक्यता वर्तवण्यात येते. त्या अनुशंगाने पळसंबे कदाचित चिंतनाचे व बोरबेट हे व्यापारी ठिकाण असण्याची शक्यता आहे.
https://mrudaghandha.blogspot.com/ 

अश्मयुगीन खजिना : चक्रेश्वर

निसर्गाने मुक्तहस्ताने ज्याचेवर सौंदर्याची उधळण केली, औदार्य दाखवलेला निसर्गाच्या संपन्नतेने नटलेला सुंदर मनोहारी अशी ओळख असणारा कोल्हापुर जिल्हा. कोल्हापुरच्या दक्षिणेस कोकणात फ़ोंडा घाटातुन जातानाच्या हमरस्त्यात राजर्षिंच्या दुरदृष्टीकोनातुन उभारलेल्या राधानगरी धरण परिसरापासुन सहा (६) कि. मी अंतरावर  सह्याद्रीच्या कुशीत चक्रेश्वरवाडी हे निवांत शांत टुमदार गाव डोंगरमाथ्यावर वसलेले आहे.  चक्रेश्वरवाडी हे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील भोगावती साखर कारखान्यानजीकचे एक छोटे व दुर्लक्षित खेडेगाव. आज या गावात अश्मयुगीन संस्कृती, इ.पू. पहिले शतक ते इ.स. ८ वे शतक आणि १२ व्या ते १४ व्या शतकातील यादव काळ अशा मानवी इतिहासातील तीन महत्वपूर्ण टप्प्यांतील अवशेष आढळल्याने प्रसिध्दीस येत आहे. येथे पूजेसाठी वापरल्या जाणार्‍या शिवलिंगाच्या उत्क्रांतीतील सुरुवातीचे सयोनी शिवलिंग, मानुषलिंगयुक्त शिवलिंग, मुखलिंग असे सर्व प्रकार तसेच पंचसुत्री, त्रिसुत्री आणि सर्वतोभद्र असे परंपरेनुसार दिसणारे प्रकार आढळले आहेत. त्यामुळे हा परिसर म्हणजे तंत्रमार्गी शैव सांप्रदाय कापालीक काळातील असावा असे मत अभ्यासकांनी मांडले आहे. 

  चक्रेश्वरवाडी गाव, येथील शिलावतरुळाची टेकडी आणि तपसा हे क्षेत्र असा दोन अडीच कि.मी.चा परिसर म्हणजे अभ्यासकांसाठी आणि जिज्ञासू पर्यटकांसाठी मोठा खजिना आहे. शिला वतरुळाच्या टेकडीवर पश्चिम बाजूच्या परिसरात विशिष्ट टप्प्यावर शिलावतरुळे असलेले असंख्य पाषाण आहेत. टेकडीवरील शिलावतरुळे किंवा क्षितीजवतरुळ म्हणजे अश्मयुगीन सामुहिक दफनभूमी असण्याची शक्यता आहे. या शिलावतरुळातून अवकाशाच्या अद्भूत आणि विराट दर्शनाची अनुभूती घेण्यासारखीच आहे.

 गावाच्या मध्यावर रस्त्याच्या डावीकडे चक्रेश्वराचे हेमाडपंथी मंदिर लागते. गावालगतच्या टेकडीवरील चक्राकार शिळांवरुनही या गावाचे नामकरण चक्रेश्वरवाडी झाले असावे. गावाच्या मुख्यरस्तावरुन येणारा रस्ता थेट मंदिरात पोहोचतो येथील मंदिर रचना मुखमंडप, सभामंडप,अंतराळ व गर्भगृह अशी असुन ते त्रिमुखी पुर्वाभिमुखी आहे. मंदिराच्या सभामंडपात दिपमाळेकडे मुख असणारी गणेशाची मुर्ती असुन त्याचे दर्शन आपण मंदिरात प्रवेश करताना होते. त्याच्या मागील तीन नंदी महादेवाचे पिंडीकडे तोंड करुन उभे आहेत. गर्भगृहात रेखीव पिंड आहे. सभागृहात भैरव, कार्तिक स्वामी. महिषासुरमर्दिनी,इ देवतांच्या मुर्ती आहेत. येथे टप्प्यांची रचना असलेले शिखर आढळुन येते. मंदिरासमोर सुबक अष्टकोनी हत्ती व घोड्याच्या मुखांनी अलंकृत गणेशाची मुर्ती असणारी दिपमाळ आहे.प्रतिवर्षी चार – पाच मे रोजी कोवळे सुर्यकिरण शिवलिंगास स्पर्श करते. याच दिवशी शुन्य सावलीचा अनुभव दुपारी १२.३० वाजता दिपमाळेशेजारी घेता येतो. मंदिराच्या स्थापनेच्या काळात मुखमंडप खुला असावा कालांतराने त्याचे बाजुस भिंत घातल्याचे दिसुन येते 

या मुखमंडपातील व्दाराजवळील अस्पष्ट शिलालेखावरुन मंदिराचा जिर्णोद्धार वा बांधणी इ. स. १४९९ मध्ये झाली असण्याची शक्यता आहे, मंदिर पंचायतन आहे. वाकोबा. विठठल-रुक्मीणी, महालक्ष्मी अशा देवतांची मंदिरे शेजारी आहेत. येथे महालक्ष्मी मंदिरात महासरस्वती, वीरभद्र, महाकाली सोबत सप्तमातृका असुन त्या वाहनांवर विराजित आहेत.  मंदिराच्या डाव्या बाजुस वीरगळ, विविध पिंडी, जुना शिलालेख तसेच गधेगळ आहेत. तसेच उजवीकडे वीरगळ, नागशिळा आहे.

    पश्चिम महाराष्टातील प्रत्येक गावात वीरगळी, नागशिळा, सतीशिळा आढळतात. कोल्हापुरच्या बीड व त्याच्या शेजारील गावात मोठ्या प्रमाणात वीरगळी आहेत. गधेगळी या मात्र कोकण परिसरात आढळुन येतात. त्यांचा कालखंड शिलहार राजवटीचा मानला जातॊ. जो शिळेवरील विहीत केलेला नियम हुकुम यांचे पालन करणार नाही त्यांना दगडावर चित्रीत केलेप्रमाणे अभद्र शापवाणी (स्त्रि गधे मैथुन शिक्षा) वचने कोरली आहेत. 
अशा दोन गधेगळी या मंदिराच्या परिसरात आहेत. मंदिराच्या उजवीकडे चौकोनी पुष्यकरणी असुन ती बारामहिने पाण्याने भरलेली असते तीच गंगाबाब. तेथुन पुढे भुंगिरा आहे (भुंगीरा म्हणजे जमीनी खालील गुहा)त्याचे उत्खनन झालेनंतर एतिहासिक पुराव्यात भर पडेल. या मंदिराच्या डावीकडे अदिलशाही शैलीतील दर्गा आहे. 
पुढे गावातील ग्रामपंचायतीसमोरील मैदानात दगडी गुंड्या आहेत (गोलाकार गोळ्यसारखे मोठे दगड) या होळी, गावातील जत्रा तसेच रंगपंचमी दिवशी गावातील लोक पाच सात अशा विषम संख्येत प्रत्येकी एका बोटावर उचलण्याचा प्रघात बरीच वर्षांपासुन चालत आलेला आहे. याची माहिती मंदिराचे सध्याचे पुजारी सुरेश गुरव यांनी दिला. त्यामागेही काही खास कारण असण्याची शक्यता आहे, जे आज कालऒघात विस्मृतीत गेले आहे. 

         तेथुन पुढे गावाच्या उत्तरेस साधारणपणे दिड कि. मी अंतरावर तपस्या गुहा आहे, स्थानिक बोलीभाषेत ती तपशाची गुहा अशी तीची ओळख आहे.  तपस्या महायान लेणी समुह या समुहात सुरवातीच्या लेण्यात शिवलिंग असुन पुढील लेणी समुहात सुरुवातीस तीन ध्यान मग्न बुद्ध मुर्ती शेजारी एका राजाची (सम्राट अशोक) यांची मुर्ती, शेवटच्या लेण्यात बुध्द मुर्ती आहे ती सुस्थितीत आहे. तेथील उभी बुद्ध मुर्ती मात्र झिजलेने ओळखता येत नाही. लेणी समुहाच्या समोर स्तुप सादृश्य रचना आहे. उजवीकडे शंकराचे मंदिर आहे ही जागा गंगासागर महाराज यांचे मालकिची असुन त्यांची ही सातवी पिढी आहे. तपस्या लेणी समुह ही पोहाळे प्रमाणे सम्राट अशोक कालीन असावी. या लेणी समुहात तपस्येकरिता खास दालन असुन तेथे वायुविजनाची सोय आहे मात्र या दालनात दोन्ही बाजुने येणारा प्रकाश आत येत नसल्याने ही ध्यान साधनेकरिताचे सुंदर वास्तुकलेचे उदाहरण आहे. लेणी पाहुन होईपर्यंत सुर्यमावळतीकडे झुकल्याने आम्ही परत गावातील आडापर्यंत आलॊ तेथुन पुर्वेस असणा-या टेकडीवर शिळावर्तुळ पाहण्यास जाउ शकतो.

        
 टेकडी चढुन खालुन दिसणा-या झाडाच्या खाली असणा-या मंदिराजवळ येऊन पोहोचतॊ. यास छत नाही हे ठिकाण शिवालय म्हणुन ओळखले जाते. येथे दोन वर्तुळाकार दगड असुन त्यावर मेगलिथिक बांधकाम शैलीप्रमाणे (500 BCE) दगडी रचना त्यावर वर्तुळ, कंकाळ, प्राणी मनुष्याकृती कोरल्या आहेत. तेथेच पुढे कोडबाव आहे, अभ्यासकांचे मते हे ज्वालामुखी मुख असावे गावातील प्रचलित दंतकथेनुसार या ठिकाणी पुर्वी ज्वालामुखी वाहत होती पुर्वजांनी येथे कपडे घालुन ती बंद केली कदाचित प्राचिन काळी ज्वालामुखी बाबत योग्य माहिती ज्ञात नसल्याने ज्वालामुखी थंड झालेनंतर ही कथा प्रचलित झाली असावी. पुढे या टेकडीवरील सर्वात उंच ठिकाणी शिलावर्तुळ आहे त्यावर उभे राहिल्यास आकाश धरणीला पुर्व – उत्तर ४० कि.मी. व दक्षिण-पश्चिमेस २५ कि.मी. अंतरावर असल्याचे भासते. अवकाश संशोधनाकरता ही जागा उपयुक्त असल्याचे अनेक खगोल शास्त्रज्ञांचे मत असुन त्याबाबत अभ्यास सुरु आहे. येथुन सुर्योदय सुर्यास्त अनुभवणे ही एक पर्वणीच आहे. शिलावर्तुळे म्हणजे दगड गोलाकार रचनेत मांडले जातात. अशी शिलावर्तुळे नागपुर, माहुरझरी इथे आढळली आहेत तेथे झालेल्या संशोधनानुसार ती अश्मयुगीन दफ़नभुमी असावी मृत व्यक्ती पुरल्यानंतर तेथे गोलाकार दगडरुपी स्मारक उभारले जायचे. हेही शिलावर्तुळ अश्मयुगीन स्मारक असावे.
अशाप्रकारे अश्मयुग, मोर्यकाळ, यादवकाळ ते आजअखेरीच्या इतिहासाचे चक्रेश्वरवाडी साक्षीदार आहे. तसेच चक्रेश्वरवाडी दुधगंगा व भोगावती नदीच्या मध्ये असुन येथुन कोकणात जाताना नदी पार करण्याची गरज नसल्याने हा जुना व्यापारी मार्ग असल्याचे वरील पुराव्यांनी अधोरेखित केले आहे. एकमात्र नक्की काळोघात प्रत्येक ठिकाणाचा वापर बदलत गेला. असा आहे अश्मयुग ते आजअखेरच्या काळाचा मुकसाक्षीदार !







 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...