Monday, January 3, 2022

खरोसा लेणी

 लेणी म्हटले की आपल्या डोळ्यासमोर अजिंठा, वेरुळ आणि सह्यद्रीच्या कानाकोपऱ्यांत काळ्या बेसॉल्टमध्ये खोदलेली सुबक लेणी येतात. बेसॉल्टव्यतिरिक्त महाराष्ट्रात, विशेषत: कोकणात आढळणारा दुसरा दगड म्हणजे जांभा दगड. हा दगड सच्छिद्र आणि ठिसूळ असल्याने लेणी खोदण्यासाठी हा दगड निकृष्ट प्रतीचा समजला जातो. त्यामुळे जांभा दगडात सहसा लेणी खोदलेली पाहायला मिळत नाहीत. कोकणापासून काहीशे मल दूर असलेल्या लातूर जिल्ह्यतील खरोसा गावाजवळ एक चक्क जांभा दगडाचा डोंगर आहे. लाखो वर्षांपूर्वी पृथ्वीच्या पोटात झालेल्या उलथापालथीमुळे या ठिकाणी या जांभ्या दगडाच्या डोंगराची निर्मिती झाली. ती का आणि कशी झाली, यावर भूगर्भशास्त्रज्ञांची अनेक मते आहेत. ती आपण बाजूला ठेऊ या. पण या भागात असलेल्या या वेगळ्याच प्रकारच्या लालसर रंगाच्या दगडाचे त्यावेळच्या लेणी खोदणाऱ्या कलाकारांना आकर्षण वाटले असेल आणि त्यातूनच या ठिसूळ दगडात त्यांनी लेणी कोरायचे आव्हान स्वीकारले असेल. इसवी सनाच्या सातव्या-आठव्या शतकात चालुक्य राजवटीत या लेण्यांची निर्मिती झाली असे मानले जाते.

     महाराष्ट्रामध्ये बहुतकरून बौद्ध आणि जैन धर्मीय लेण्या विपुल आढळतात. मात्र खरोसा लेणी दुर्मिळ अशा हिंदू लेण्यांपैकी एक आहे. अजूनही खास विशेषता म्हणजे हिंदू धर्मातील शैव आणि वैष्णव ह्या दोन्ही पंथाशी निगडित शिल्पे इथे कोरलेली आढळतात. त्यामुळे इथे तुम्हाला कित्येक शिवपिंडी दिसतील, तसेच नागदेवता, शिवतांडव, रावणाचे कैलास पर्वत उचलणे, गणेशमूर्ती, समुद्रमंथन अशी शैवपंथीय शिल्पे आढळतील. तसेच राम-लक्ष्मण आणि रावणसेनेचे युद्ध, वराहवतार, बळी अवतार, वामन अवतार, नरसिंह अवतार, विष्णुमूर्ती, श्रीकृष्णाने उचललेला गोवर्धन पर्वत अशी अनेक वैष्णवपंथीय शिल्पे देखील बघायला मिळतील. तसेच लेण्यांच्या प्रवेशद्वाराच्या बाजूला द्वारपाल, नागशिल्पे, हत्तीशिल्प, एकाश्मी मंदिरे देखील कोरलेली आढळतात.कल्पसमूह या मराठी ग्रंथात रसविद्येला उपकारक ठरणाऱ्या स्थानांमध्ये ‘खरोसा’ या स्थानाचा एक संदर्भ सापडतो. या लेणी समूहात ‘महादेव’ आणि ‘लकोला’ नावाची लेणी वैशिष्ट्यपूर्ण असून इतर लेणी दुय्यम प्रकारची आहेत.
  खरोसा लेणी दुर्मिळ असण्याचे अजून एक कारण म्हणजे येथील भौगोलिक रचना. आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेष करून काळ्या रंगाच्या मजबूत अशा बेसाल्ट खडकाच्या डोंगरांमध्ये लेण्या कोरलेल्या आढळतात. मात्र खरोसा लेणी कोरलेली आहे लालसर-जांभ्या रंगाच्या सच्छिद्र दगडांमध्ये. अशा प्रकारचा दगड बहुतकरून महाराष्ट्रामध्ये कोकण भागामध्ये जास्त प्रमाणात आढळतो. मात्र कोकणापासून कित्येक शेकडो किलोमीटर दुर असलेल्या मराठवाडा प्रांतामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये खरोसा गावामध्ये चक्क जांभ्या दगडाचा डोंगर आहे हे एक मोठ्ठे भौगोलिक आश्चर्य म्हणावे लागेल. अशा प्रकारचा खडक सच्छिद्र असल्यामुळे जास्त ठिसूळ असतो आणि लेणी कोरण्यासाठी निकृष्ट मनाला जातो. मात्र तरीही तब्ब्ल १२ लेण्यांचा समूह इथे घडवला गेला आणि आजही शेकडो वर्षांनंतरही बऱ्यापैकी सुस्थितीत आहे.

  लेण्यांची माहिती घेण्यापुर्वी आपण लातुर परिसराच्या इतिहासावर नजर टाकू.  लातूर जिल्हयाला प्राचीन ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. हे शहर राष्ट्रकूट घराण्याची राजधानी होते. त्यानन्तर हे शहर बऱ्याच राज्यकर्त्यांच्या ताब्यात गेले.. जिल्हा मुख्यालय लातूर हे "लट्टा" वा राष्ट्रकुट राजांचे मुळ निवासस्थान होते. राष्ट्रकुट राजा अमोघवर्ष पहिला हा लट्टालूट नगरचा अधिपती "स्वामी" असल्याचे नमूद आहे व त्यानेच हे शहर निर्माण केले. इ.स. ७५३ मध्ये बदामीच्या चालुक्यानन्तर आलेले राष्ट्रकुट राजे स्वतःला लट्टालूट पूर्वाशिष म्हणजे लट्टालूट निवासी असेच म्हणवून घेत. चालुक्य घराण्यातील "विक्रमादित्य" ६ व्या नन्तर त्याचा पुत्र सोमेश्वर तिसरा हा गादीवर आला. त्याने "अभिलाषीतीर्थ" हा ग्रन्थ लिहिला, त्यामुळे त्याला "सर्वज्ञ चक्रवर्ती" असे म्हणत. लातूर जिल्ह्यात त्याचे राज्य असल्याचा व त्याच्या कारकिर्दीची नोन्द असलेला कोरीव लेख सापडला आहे. त्यामध्ये लातूर येथील पापविनाशी देवीचे मन्दिर बान्धल्याचा उल्लेख आहे. सदर कोरीव लेख शके १०४९ (इ.स.११२९) मध्ये कोरल्याचा उल्लेख आहे. चालुक्यानन्तर हा भाग देवगिरीच्या यादवाच्या अधिपत्याखाली आला
     .इ.स. १३३७ मध्ये यादवांचे राज्य दिल्लीच्या सुलतानाच्या ताब्यात आले व दक्षिणेत मुस्लिम सत्तेचा अंमल सुरु झाला. इ. स. १३५१ मध्ये दिल्लीच्या सुलतानाच्या साम्राज्यातील हा भाग बहामणी साम्राज्यात आला. बहामणी साम्राज्याची राजधानी गुलबर्गा होती.

कसे जाल?
लातूर-निलंगा-बिदर रस्त्यावर लातूरपासून ४३ किमीवर व औसापासून २३ किमी अंतरावर खरोसा गाव आहे. गावापुढे डोंगरावर लेणी आहेत. एक पक्का रस्ता थेट डोंगरावरील लेण्यांपर्यंत जातो. रस्तामार्गे जाणे सोयीचे आहे.
 
लातूर-निलंगा रस्त्यावर लातूरपासून ४५ किमी अंतरावर खरोसा गाव आहे. गावाच्या पुढे रस्त्याला लागून असलेल्या छोटय़ा डोंगरावर १२ लेणी आहेत. महामार्गावरून थेट लेण्यांपर्यंत जाण्यासाठी रस्ता बनवलेला आहे. खरोसा येथील एकूण १२ लेण्यांमध्ये आवर्जून बघावे असेल आहे सर्वप्रथम येणारे दुमजली लेणे आणि  महादेव लेणे. बाकी लेण्यांमध्ये बरेचसे लहान-मोठे विहार खोदलेले आहेत. 
 
   खरोसा जवळील डोंगराच्या दक्षिणेकडील टोकाला ४५ फुट रुंदीचे एक भग्न लेणे आहे. त्याचे संपूर्ण छत आणि समोरचा भाग कोसळलेला आहे. या लेण्याजवळ असेच आणखी एक भग्न लेणे आहे. उत्तरेला क्रमशः छोटेसे शिखर असलेले एकाश्म मंदिर व १२ x ६ फुटाची एक ओबडधोबड खोली आहे. पुढे आणखी एक लहान एकाश्म मंदिर दिसते. यानंतर उत्तरेलाच पुढे काही अंतरावर या लेणी समूहातील मुख्य लेणी दिसतात. यांपैकी पहिल्या लेण्याचा आकार (११ ते १५ फूट रुंद व १३.२ ते १४.८ लांब) ओबडधोबड असून याच्या पाठीमागे एक देवताविरहित गर्भगृह आहे; तथापि हे लेणे कोणत्या पंथाचे आहे, हे सांगता येत नाही. या लेण्याच्या वरच्या बाजूला एक एकाश्म मंदिर आहे.

मुख्य लेण्यांतील दुसरे ओबडधोबड असलेले लेणे हे समोरच्या बाजूने २३ फूट व मागच्या बाजूला २५.८ फूट रुंद आहे. याची लांबी १६.५ फूट असून उत्तरेकडील भिंतीत एक ओबडधोबड खोली असून, दक्षिणेकडील बाजूसही खोली खोदण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. मागे मध्यभागी जिनाची किंवा तीर्थंकराची ६.१० फूट उंचीची बैठी मूर्ती कोरण्यात आलेली आहे. अलीकडच्या काळात ही मूर्ती गौतम बुद्धांच्या मूर्तीत रूपांतरित केली आहे. लेण्यासमोर एका खंडित स्तंभाचे अवशेष दिसून येतात. या लेण्यानंतर खडकात खोदकाम केलेले इतर काही अवशेष दिसतात.


दुसरे लेणे हे ब्राह्मणी (हिंदू) लेणे असून ते दोन मजली आहे.याचा आकार ७० फूट रुंद व ५० फूट लांब आहे. या लेण्याची विभागणी दोन भागांत केलेली आहे. उत्तरेकडील भागात समोरच एक उंच खंडित अष्टकोनी स्तंभ आहे. या स्तंभापुढे तळमजल्यात १६ चौकोनाकृती स्तंभयुक्त मंडप असून, पाठीमागे आयताकार खोलीवजा गर्भगृहात विष्णू, महेश आणि ब्रह्मा यांची शिल्पे कोरण्यात आलेली आहेत. तळमजल्याच्या दक्षिणेकडील मंडपात पोहोचण्यासाठी सात पायऱ्या आहेत. त्यात काही खंडित स्तंभ असून पाठीमागे गर्भगृहात संभवतः ब्रह्मा, विष्णू व महेशाची शिल्पे कोरण्यात आलेली दिसतात. या संपूर्ण लेण्याच्या दोन्ही टोकाला बाहेरून तसेच मध्यभागी लिंगयुक्त गर्भगृह आहेत.लेण्याच्या खालच्या आणि वरच्या मजल्यावर सभामंडप आणि गर्भगृह, प्रदक्षिणापथ अशी रचना पाहायला मिळते. दुमजली लेण्याच्या दोन्ही मजल्यांवर मोठाल्या खांबांवर तोललेला प्रशस्त सभामंडप कोरलेला दिसतो. वरील मजल्यावर जाण्यासाठी दगडी जिना कोरलेला आहे. वरच्या मजल्यावर जाण्यासाठी अरुंद जिना आहे.
 
 महादेव लेणीतील शिवपिंड
 
 गणपतीशिल्प
 
  उत्तरेकडील भागात असलेल्या जिन्याने वर गेल्यावर खांबांवर तोललेला भव्य सभामंडप आणि गाभाऱ्यात शिविलग पाहायला मिळते.वरच्या मजल्यावर पोहोचल्यावर उजव्या बाजूला एक छोटी खोली कोरलेली आहे ज्या मध्ये दोन सुंदर गणेशमूर्त्या कोरलेल्या आहेत. वर गेल्यानंतर सहा स्तंभ  असलेला मंडप असून मागे द्वारपालयुक्त आणखी चार स्तंभ आहेत. मागच्या स्तंभांच्या मध्ये ४ फूट व्यासाचे विशाल शिवलिंग आहे. दक्षिणेकडील मंडपात आठ स्तंभ असून, मागे प्रदक्षिणापथयुक्त गर्भगृहात ५.५ फूट उंचीचे ब्रह्मा, विष्णू व महेश कोरण्यात आलेले आहेत. या लेण्याच्या उत्तरेकडील पार्श्व भागावरही काही शिल्पे कोरण्यात आलेली आहेत.
  जिन्याने वर गेल्यावर खांबांवर तोललेला भव्य सभामंडप आणि गाभाऱ्यात शिविलग पाहायला मिळते.वरच्या मजल्यावर पोहोचल्यावर उजव्या बाजूला एक छोटी खोली कोरलेली आहे ज्या मध्ये दोन सुंदर गणेशमूर्त्या कोरलेल्या आहेत. 
 
दुमजली लेण्याच्या उत्तरेला चिकटून पुढचे लेणे खोदलेले आहे. हे उंचवट्यावर असून यात गर्भगृहयुक्त लहान-लहान खोल्या आहेत. यांमध्ये गणेश, विष्णू, शिव इ. शिल्पे कोरण्यात आलेली आहेत. या लेण्याच्या वर काही खोदकाम असून, उत्तरेला एकाश्म मंदिर आहे.

 खरोसा लेणी – महादेव लेणी
 
महादेव लेणी : -
   तिसरे  महादेव लेणे हे महत्त्वाचे लेणे आहे. दुमजली लेण्याच्या उत्तरेला काही अंतरावर सु. ६० फूट रुंद व ६९ फूट लांब ‘महादेव’ नावाचे लेणे आहे.येथे शैव आणि वैष्णव पंथांचा मिलाफ झालेला पाहायला मिळतो. महादेव लेणे हे एकूण १२ लेण्यांपैकी तिसरे लेणे असून विस्ताराने सर्वात मोठे आहे. या लेण्याचा पार्श्वभाग ४३.५. फूट असून समोर एक खुजा कठडा आहे. मंडपात समोरचे चार स्तंभ पकडून एकूण २६ स्तंभ आहेत. प्रदक्षिणापथयुक्त गर्भगृह सु. १६ फूट x ११ फुटाचे असून उंचीला ८ फूट आहे. गर्भगृह सर्वतोभद्र असून आत वेदीवर एक विशाल शिवलिंग आहे. गाभाऱ्याच्या बाजूने प्रशस्त असा प्रदक्षिणा मार्ग देखील कोरलेला आढळतो.
  गर्भगृहाच्या मुख्य द्वारावर दोन द्वारपाल असून दोन्ही बाजूंना दोन नाग कोरलेले आहेत. लेण्याच्या दोन्ही भिंतींवर अनेक पौराणिक शिल्पपट कोरण्यात आलेले आहेत, परंतु दगड ठिसूळ असल्या कारणाने बरीचशी शिल्पे पुसट दिसतात. दक्षिणेकडील भिंतीवर सामान्यतः वैष्णव तर, उत्तरेकडील भिंतीवर शैव शिल्पे कोरण्यात आलेली आहेत. या शिल्पांवर पूर्वी गिलावा केलेल्या खुणा दिसतात.
 दक्षिणेकडील भिंतीवर मुख्यतः मल्ल, नागदेवता तसेच विष्णू अवतारांपैकी वराह, वामन, नरसिंह, कृष्ण, राम इ. अवतार आहेत. उत्तरेकडील भिंतीवर रावणानुग्रह मूर्ती, शिव-पार्वती, तांडवनृत्य, भैरव इ. शिल्पे कोरण्यात आलेली आहेत. याशिवाय लेण्यात समुद्रमंथन शिल्पपट, संभवतः कार्तिकेय, द्वारपाल व इतर शिल्पे कोरलेली दिसतात. महादेव लेण्याच्या थोडेसे उत्तरेला एक खोली अर्धवट खोदलेली आहे.
 
 रावणाने कैलासपर्वत उचलणे
 
यांपैकी रावणानुग्रहाचे शिल्प तसेच वराह अवताराचे शिल्प खूपच सुंदर आहे. आपल्या दोन हातामध्ये तलवार धरून उरलेल्या एकूण अठरा हाताने रावणाने कैलास पर्वत उचलेला आहे. वरील बाजूस बसलेले शिव-पार्वतीचे शिल्प दिसते. रावणाचे सर्व हात, हाताची बोटे, अंगावरील अलंकार हे सर्व अगदी सुंदररीतीने बारकाईने कोरलेले आहे. 

 शिवतांडव
 Kharosa_6
 
 

लेण्याच्या बाहेरच्या भिंतीवर डाव्या बाजूला शंकर आणि उजव्या बाजूला कोदंडधारी राम आणि लेणी बांधण्यासाठी दान देणाऱ्या दाम्पत्याचे शिल्प कोरलेले आहे. आतल्या बाजूला सभामंडपाच्या डाव्या भिंतीवर शिवाची गजासुरवध, उमामहेश्वर, रावणानुग्रह इत्यादी शिल्पे कोरलेली आहेत. 
 
 श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलणे
 
तर उजव्या बाजूच्या भिंतीवर विष्णू अवतारातील गोवर्धन पर्वत उचलणारा कृष्ण, वराह, नृसिंह, वामन यांची शिल्पे कोरलेली आहेत. गाभाऱ्यात शिविलग आहे. गाभाऱ्याच्या दारावर द्वारपाल व नाग कोरलेले आहेत.
 
 राम लक्ष्मण आणि रावणसेनेचे युद्ध 
 
 नरसिंह अवतार
 
 समुद्रमंथन 
 
 वराह अवतार
 
गाभाऱ्याच्या िभतीवर राम-रावण युद्ध आणि अमृतमंथनाचे शिल्प कोरलेले आहे. श्रीविष्णूच्या वराह अवताराच्या शिल्पामध्ये वराहाच्या बाहुवर विराजमान झालेली पृथ्वीदेवीचं दर्शवली आहे. तसेच नरसिंह अवतार, समुद्रमंथन, राम-लक्ष्मण व रावनसेनेचे युद्ध, शिवतांडवनृत्य अशी अनेक सुंदर शिल्पे महादेव लेण्यामध्ये कोरलेली आढळतात.
लकोला’ लेणे :-
  पुढचे महत्त्वाचे लेणे म्हणजे लाकोले लेणे. यात महिषासुरमर्दनिी, गणेश यांची शिल्पे आहेत आणि गाभाऱ्यात विष्णूची मूर्ती आहे. या लेण्यात पायऱ्या चढून गेल्यानंतर चार स्तंभ लागतात. त्यानंतर मंडपात एकूण २४ स्तंभ आहेत. हे लेणे ४१ ते ४९ फूट रुंद असून सु. ५८ फूट लांब आहे. दक्षिणेकडील खोलीत पाठीमागे गणपती शिल्पासह स्त्री-पुरुषांच्या नृत्यमुद्रेतील प्रतिमा आहेत. गर्भगृहात विष्णूची ६ फूट उंच चतुर्भुज मूर्ती आहे.

   ‘लकोला’ लेण्याचा तलविन्यास व सामान्य वैशिष्ट्ये पाहता हे लेणे बदामी येथील तीन हिंदू लेण्यांसारखेच आहे. त्यामुळे जेम्स फर्गसन व बर्जेस यांनी या लेण्याचा कालखंड सहाव्या शतकाचा उत्तरार्ध मानला आहे. त्यांच्या मतानुसार एकंदरीत खरोसा येथील लेणी सु. इ. स. ५०० ते ७०० दरम्यान खोदण्यात आली. या दरम्यान या भागावर बदामी चालुक्य घराणे राज्य करीत होते. विराज शाह यांच्या मते, खरोसा येथील जैन लेणे सु. ८-९ व्या शतकात खोदण्यात आले असावे. खरोसा येथील लेणीसंभार पाहून पूर्वमध्ययुगात असलेले खरोसा लेण्यांचे महत्त्व अधोरेखित होते. तसेच शैव-वैष्णव पंथीयांच्या एकत्र साधनापद्धतीची प्रचीती येते.
     
   या लेण्याच्या उत्तर बाजूकडून पुढच्या लेण्यात उतरता येते. यात चार स्तंभ व अर्धस्तंभ आहेत. हे लेणे २१ फूट रुंद व २३ फूट लांब असून मागे एक गर्भगृह आहे. या लेण्यावर दोन खोल्या खोदलेल्या आहेत. यांपैकी एकात गणेश शिल्प आहे. यानंतर एक विशाल परंतु खडक कोसळल्याने भग्न झालेले लेणे आहे. 
 
 
 RenukaKharosa
याशिवाय सहाव्या-सातव्या लेण्यासमोर ठळकपणे दिसणारे हत्ती आपले लक्ष वेधून घेतात. लेण्यांच्या वरच्या बाजूला डोंगरमाथ्यावर रेणुकादेवीचे मंदिर आणि सीता न्हाणी नावाचा पाण्याचा साठा आहे. खासगी वाहनाने औसा किल्ला, खरोसा लेणी आणि निलंगा गावातील प्राचीन नीलकंठेश्वराचे मंदिर एका दिवसात पाहून होते.
   खरोसा लेणीची भेट हि खरंच आपल्याला आनंदाचा सुखद अनुभव देऊन जाते. येथील हिंदू देवदेवतांची सुंदर शिल्पे पाहून शेकडो वर्षांपूर्वी राबलेल्या त्या अज्ञात शिल्पकारांना नमन करावेसे वाटते. मराठवाड्याचा लातूर जिल्हा जिथं उंचच्या उंच डोंगर नाहीत. बहुतकरून सपाट भूभाग असलेल्या ह्या प्रदेशामध्ये असे सुंदर, दुर्मिळ शिल्परत्न असेल अशी कल्पनाच करवत नाही. खरोसा लेणीला केवळ इतिहासिक व धार्मिक नव्हे तर भौगिलिक महत्व देखील आहे. त्यामुळे अशी दुर्मिळ, लाल-जांभ्या दगडातील आणि शैव-वैष्णव पंथाचा सुरेख मिलाप असलेली खरोसा लेणी प्रत्येकाने आवर्जून बघावी.


 संदर्भग्रंथ :-
१) लातुर जिल्हा गॅझेटीयर
२) श्री. अमित सामंत यांचा ब्लॉग
३) https://www.loksatta.com/lokbhramanti/kharosa-caves-in-latur-1350741/ हा लेख
४)  Burgess, James, Report on the Antiquities in the Bidar and Aurangabad Districts, Vol.III, London, 1878.
५)  Fergusson, James & Burgess, James, The Cave Temples of India, (Reprint), Delhi, 1969.
६)   Shah, Viraj. Jaina Rock-Cut Caves in Western India, Delhi, 2008.



सुभेदार ( Subhedar )


                        महाराष्ट्रात वैशिष्ट्यपूर्ण अशी बरीच लेणी आहेत. काहींची प्रसिद्धी तर जगभर पोहोचली आहे. त्यांची कोरीव कलाकुसर आजही थक्क करते. इ.स. पूर्व दुसऱ्या शतकापासून त्यांच्या निर्मितीचा काळ समजतो. त्या काळात रोम, इजिप्त यासारख्या पाश्चिमात्य देशांशी कोकण किनारपट्टीवरील बंदरांतून व्यापार वाढीस लागला. सहयाद्री घाटाखालील किनारपट्टीची ही बंदरं आणि घाटावरून दक्षिणेकडील व्यापारी बाजारपेठा छोट्या छोट्या वाटेनं जोडली होती. मौर्य, सातवाहन काळात राजकीय, आर्थिक स्थैर्य आल्यानंतर तो भरभराटीचा काळ या प्राचीन व्यापारी मार्गांवर लेणी खोदण्यास पूरक मानला जातो. वेगवेगळ्या कालावधीत हिंदू, बौध्द आणि जैन लेण्यांची निर्मिती झाली. काही वेगवेगळी तर काही लेणी एकत्रित खोदलेल्या दिसतात. व्यापाऱ्यांना वाटेवर विसावा घेण्यासाठी या लेण्यांचा उपयोग होत असे. तर बौद्ध भिक्खू धर्म प्रचारासाठी भारतभर फिरत. त्यांच्या दिनचर्येतील नियम पाळण्यास, त्याचप्रमाणे त्यांची ध्यान साधना, उपासना सुसह्य व्हावी या उद्देशानेही तात्कालीन राजांनी लेणी कोरून घेतल्याचे दिसते. 

प्राचीन 'खरोसा लेणी', खरोसा, ता. निलंगा, जि. लातूर, महाराष्ट्र. (Ancient Kharosa Caves, Dist. Latur, Maharashtra)

                       त्यापैकी काहींची आज पडझड झालेली दिसते. त्यांची डागडुजी करणं आजच्या घडीला अशक्य दिसते. लातूरच्या 'निलंगा' तालुक्यातील 'खरोसा' लेणी ही त्यापैकी एक. ई.स. ५०० ते ७०० दरम्यान खोदलेल्या एकूण १२ लेण्यांचा हा 'एकाश्म' (Monolith) समूह 'खरोसा' गावाबाहेर टेकडीच्या दक्षिणेला दिसतो. त्यावेळी 'बदामी'चे चालुक्य घराणे या भागावर राज्य करीत होते. 'जांभ्या' (Laterite) खडकात ही लेणी कोरली आहेत. कोकणातील चिऱ्याचा दगड नजरेसमोर आणल्यास त्याची प्रचिती येईल. ठिसूळ, सच्छिद्र गुणधर्म असल्यानं काळानुरूप वातावरणीय परिणामांमुळे या लेण्यांची बरीच झीज झालेली दिसते. त्यापैकी या समूहातील काही लेणी टिकाव धरून आहेत, तर काही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. 

                   पहिल्यांदा 'बर्जेस' या स्कॉटिश अधिकाऱ्याच्या नजरेस ही लेणी आली. त्यानंतर १८८५  चे मुंबईचे ब्रिटिश गव्हर्नर 'जेम्स फर्ग्युसन' यानी या लेण्यांचा अभ्यास केला. जेम्स फर्ग्युसन हे 'डेक्कन एज्युकेशन सोसायटी'चे पाहिले देणगीदार होते. आजचे पुण्यातील 'फर्ग्युसन कॉलेज' ही त्यांची आठवण आहे. 

खरोसा लेणी समूहातील पहिली लेणी  (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)

                  या लेण्यांच्या समूहातील पहिलं लेणं अंदाजे १२×६ फुट कातळात खोदलेली एक लहान ओबडधोबड खोली दिसते. खोलीत मागे रिकामी गर्भगृह दिसते. 

दुसऱ्या लेण्यातील भगवान बुद्ध मूर्ती (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)

खरोसा लेणी समूहातील दुसरी बौद्ध लेणी (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)

                   या लेण्याच्या बाजूला एकमेव बौद्ध लेणं आहे. लेण्यांच्या प्रांगणात चार फूट उंच स्तूप दिसतो. लेण्यांच्या डावी उजवीकडे कोरलेली एक एक खोली दिसते. लेणी कुलूपबंद आहेत. बंद दरवाजाच्या जाळीतून आत भिंतीलगत भगवान बुद्धांची सहा फूट उंच बैठी मूर्ती दिसते. सध्या मूर्तीला रंग लावलेला दिसतो. 

दुमजली तिसरी लेणी, खरोसा लेणी (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)
 
दुमजली तिसरी लेणी, खरोसा लेणी (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)

तिसऱ्या लेण्यातील द्वारपाल मूर्ती, खरोसा. (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)

               या लेण्यांच्या बाजूला एकूण तीन भागात विभागणी केलेले तिसऱ्या विशाल सभामंडपाचे दुमजली लेणं आहे. लेण्याच्या डावी, उजवीकडे कातळात द्वारपालांच्या विशाल मुर्त्या कोरल्या आहेत. उजवीकडील मूर्ती थोडीफार दिसते. डावीकडील मूर्तीची पूर्ण झीज झाली आहे. लेण्याचे दर्शनी आधारस्तंभही कालपरत्वे झीज होऊन तुटलेले दिसतात. लेण्याच्या तळमजल्यात ८ चौकोनाकृती स्तंभांनी आधार दिलेले प्रचंड मोठे सभामंडप आहे. पहिल्या मजल्यावरही तितकेच आधारस्तंभ असून ते सध्या शाबूत दिसतात.  लेण्याच्या मागे गर्भगृहात शिव मूर्ती असावी. कातळाची झीज झाल्याने ती ओळखता येत नाही.

चौथी दुमजली लेणी, खरोसा लेणी (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)

लेण्यातील द्वारपाल मूर्ती, खरोसा. (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)
लेण्यातील द्वारपाल मूर्ती, खरोसा. (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)

  
चौथ्या लेण्याच्या तळमजल्याचे आधारस्तंभ  (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)
चौथ्या लेण्याच्या गर्भगृहातील ब्रम्हा, विष्णू, महेश शिल्पे  (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)

                       या लेण्यांच्या पुढे अंदाजे ७० फूट रुंद आणि ५० फूट लांब असे चौथं प्रशस्त दुमजली लेणं दिसतं. लेण्याची रचना दोन भागात केलेली दिसते. दर्शनी भागात झीज झालेली काही कोरीव शिल्पे दिसतात. लेण्याच्या समोर एक अष्टकोनी तुटलेला स्तंभही दिसतो. लेण्याच्या तळमजल्यात १६ चौकोनाकृती स्तंभांनी आधार दिलेला सभामंडप आहे.  पहिल्या भागातील लेण्यात मागे आयताकार गर्भगृहात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची शिल्पे कोरलेली दिसतात. गर्भगृहाभोवती प्रदक्षिणा मार्ग दिसतो.

लेण्याच्या पहिल्या मजल्यावर जाणाऱ्या पायऱ्या  (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)

पहिल्या मजल्याच्या गर्भगृहातील ब्रम्हा, विष्णू, महेश शिल्पे  (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)

                      या लेण्याच्या वरच्या मजल्यावरही याच ठिकाणी गर्भगृहात ब्रह्मा, विष्णू, महेश यांची शिल्पे कोरलेली दिसतात. या गर्भगृहांच्या भोवतीही प्रदक्षिणा करण्यास मार्गिका ठेवली आहे. या लेण्यातून आधीच्या दुमजली लेण्याच्या तळमजल्यावर जाण्यासाठी सहा सात पायऱ्यांची अंतर्गत व्यवस्था दिसते. सध्या त्या तुटल्या आहेत. दुसऱ्या भागातील लेण्यांच्या तळमजल्याच्या गर्भगृहात सुध्दा ब्रह्मा, विष्णू, महेश यांची शिल्पे कोरली आहेत.  

पहिल्या मजल्याच्या गर्भगृहातील विशाल शिवलिंग, खरोसा (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)

लेण्याच्या पहिल्या मजल्यावरील आधार देणारे कातळ स्तंभ, खरोसा (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)

                 लेण्याच्या पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी डावीकडे कातळ बोगदा आणि अंधारातून वर जाणाऱ्या पायऱ्या दिसतात. पायऱ्यांची झीज होऊन तुटलेल्या दिसतात. या पायऱ्या चढण्यासाठी टॉर्च ची गरज आहे. अंधारातून वर चढताना कपाळ सांभाळावं लागतं. वर गेल्यानंतर बहुस्तंभ असलेला मंडप दिसतो. मागे  द्वारपालांची रचना असलेले चार स्तंभ आहेत. मागच्या दोन स्तंभांच्या वैशिष्ठ्यपूर्ण गर्भगृहात चार फूट व्यासाचे आणि सहा फूट उंचीचे शिवलिंग आहे. तळ मजल्यावरील ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या बरोबर वर दुसऱ्या मजल्यावर हे विशाल शिवलिंग कातळात कोरलेले दिसतं. या भव्य शिवपिंडी समोर नकळत नतमस्तक होतो. हे आडव्या विस्ताराचं लेणं इथल्या असंख्य चौकोनी स्तंभांनी वरचा कातळ डोंगर तोललेला दिसतो. या पहिल्या मजल्यावर छताची उंची जेमतेम सहा फूट असावी. वेगळं, वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रचंड विस्ताराचा हा सभामंडप दिसतो. या भव्य लेण्याच्या तळमजल्याचे आधार स्तंभ झीज होऊन तुटले असून वरच्या मजल्याचे स्तंभ थोडेफार टिकाव धरून आहेत. लेण्याची सध्या दुरावस्था दिसत असली तरी त्याची भव्यता नजरेत भरते. 

महादेव लेणी, खरोसा (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)
 
महादेव लेणी, खरोसा (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)

 
महादेव लेण्यातील आधारस्तंभ, समोर नंदी आणि मागे शिवलिंग. खरोसा (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)
महादेव लेण्याच्या भिंतीवरील शिल्पपट. खरोसा (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)

              दुमजली लेण्याच्या बाजूलाच सुमारे ६० फूट रुंद आणि ७० फूट लांब 'महादेव लेणी' दिसतात. सभामंडपात एकूण २६ कोरीव स्तंभ आहेत. प्रत्येक स्तंभाचे कोरीव काम वेगवेगळं दिसतं. लेण्यांच्या गर्भगृहाभोवती प्रदक्षिणेसाठी मार्ग दिसतो. गर्भगृह अंदाजे ११ बाय १६ फुटाचे असून उंचीला साधारण ८ फूट असावे. आत वेदीवर विशाल शिवलिंग आहे. 

महादेव लेण्यातील कोरीव स्तंभ. खरोसा (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)
                     
महादेव लेण्याच्या भिंतीवरील शिल्पपट. खरोसा (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)

गर्भगृहाच्या चौकटीवरील द्वारपाल, नागदेवता. खरोसा (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)

                गर्भगृहाच्या मुख्य चौकटीवर दोन्ही बाजूस द्वारपाल असून दोन नागदेवता कोरल्या आहेत. लेण्यांच्या भिंतीवर अनेक पौराणिक शिल्पपट कोरले आहेत. दक्षिणेकडील भिंतीवर वैष्णव शिल्पांमध्ये मल्ल, नागदेवता, तसेच विष्णू अवतारंपैकी वराह, वामन, नृसिंह, कृष्ण, राम अवतार कोरलेले दिसतात. उत्तरेकडील भिंतीवर रावणानुग्रह मूर्ती, शिवपार्वती, तांडव नृत्य, भैरव इत्यादी शिल्पे कोरली आहेत. पूर्वी या शिल्पांवर गिलावा केला असावा. सध्या त्याचीही पडझड झाल्याचे दिसते. हा जांभा खडक ठिसूळ असल्याने बरीच शिल्पे झीज झाल्याने पुसट दिसतात. ओळखण्यास अडचणी येतात.  

महादेव लेणी, खरोसा (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)

                     या लेण्यांच्या पुढेच सहावं लेणं  दिसतं. ११ पायऱ्या चढून वर गेल्यानंतर चार स्तंभ दिसतात. लेण्याच्या सभामंडपात एकूण २४ स्तंभ दाटीवाटीने कोरलेले दिसतात. या लेण्याची लांबी रुंदी अंदाजे ५० फूट असावी. लेण्याच्या गर्भगृहात अंदाजे ५ फूट उंच श्री विष्णूंची चतुर्भुज मूर्ती दिसते. या लेण्याची सामान्य वैशिष्ट्ये 'बदामी' येथील हिंदू लेण्यांशी जुळतात. त्यामुळे अभ्यासाअंती 'जेम्स फर्ग्युसन' व 'बर्जेस' यांनी या लेण्याचा कालखंड सहाव्या ते सातव्या शतकाचा उत्तरार्ध मानला आहे. त्यावेळी या भागावर 'चालुक्य' घराणे राज्य करत होते. तर 'विराज शहा' या अभ्यासकांच्या मते इथले बौद्ध लेणे सुमारे आठव्या ते नवव्या शतकात कोरण्यात आले असावे. 

सहावं लेणं, खरोसा (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)
सहाव्या लेण्यातील श्री विष्णू मूर्ती, खरोसा (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)

 
सहावं लेणं, खरोसा (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)
  
सहावं लेणं, खरोसा (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)

सहावं लेणं, खरोसा (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)

                   यापुढील सातवं लेणं हे प्रचंड आडव्या विस्ताराचं दिसतं. या लेण्यांची उंची जेमतेम सहा फूट असून या ओबडधोबड लेण्यास प्रशस्त चौरस स्तंभांनी वरचा कातळ तोलून धरला आहे. या लेण्यात गर्भगृह दिसत नाही.

लेण्यांच्या समोरील रस्ता, उजवीकडे लेणी खरोसा (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)

                   पुढील आठव्या लेण्यातील मंडपाचे बहुस्तंभ कातळास आधार देताना दिसतात. आठव्या लेण्यास सभामंडप असून गर्भगृहात श्री विष्णूंची कोरीव मूर्ती दिसते.

सातवं लेणं, खरोसा (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)
सातवं लेणं, खरोसा (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)
आठवं लेणं, खरोसा (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)

आठवं लेणं, खरोसा (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)
नववं लेणं, खरोसा (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)

                   यापुढील नवव्या लेण्याच्या गर्भगृहात शिवपिंडी स्थापित दिसते. पिंडी समोर चौथऱ्यावर नंदी दिसतो. 

नवव्या लेण्यातील शिवपिंडी खरोसा

                  पुढील दहावं, अकरा आणि बारावं ही सर्व लेणी आकारानं लहान तसेच एकाश्म पद्धतीचीच दिसतात. ही सर्व दुय्यम स्वरूपाची असून अर्धवट सोडली आहेत.    

दहावं लेणं, खरोसा (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)

                  या लेण्यांपासून उजवीकडे वळून टेकडीवर जाणारी वाट या डोंगरावरील दर्ग्याच्या मागील बाजूस येते. दर्गा ओलांडून पुढे आल्यास डोंगराच्या दक्षिणेकडून या डोंगरावर येणारा आडवा पक्का रस्ता दिसतो.  

आकारावं लेणं, खरोसा (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)
बाराव्या लेण्यांकडे जाणारा रस्ता, खरोसा (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)

  
बारावं लेणं, खरोसा (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)

बाराव्या लेण्याजवळून डोंगरावरील दर्गा,खरोसा (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)

                  महाराष्ट्र वनविभागाने या डोंगरावर वृक्ष संवर्धनाचे काम हाती घेतल्याचे दिसते. डोंगरावर दिसणारे विविध पक्षी, सरपटणारे प्राणी आणि कीटकांची रंगीत छायाचित्रे आणि माहिती लोखंडी फलकावर पर्यटकांच्या माहितीसाठी लावलेली दिसतात.

डोंगरावरील दर्गा,खरोसा (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)
डोंगरावर रेणुकामाता मंदिराकडे जाणारा रस्ता, खरोसा (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)
 
श्री रेणुकामाता मंदिर, खरोसा (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)

श्री रेणुकामाता, खरोसा

               दर्ग्याच्या डावीकडे पुढे डोंगरावर रेणुका मातेचे प्राचीन देवस्थान आहे. मंदिराची निर्मिती सध्याचीच दिसते. १९९३ च्या भूकंपात जुन्या मंदिराची पडझड झाली पण मूर्ती मात्र सुरक्षित राहिली. त्यानंतर लोकवर्गणी आणि देणगीतून सध्या दिसणाऱ्या मंदिराची निर्मिती झालेली दिसते. 

                  या लेण्यांना भेट देण्यासाठी 'दादर बिदर' एक्सप्रेसने 'लातूर' गाठावे. तिथून २२ किमी वरच्या भुईकोट 'किल्ले औसा'ला भेट देऊन त्यापुढील २४ किमीवर 'निलंग्या'च्या आधी असणाऱ्या या प्राचीन लेण्यांना भेट देता येते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातूनही लातूरला येणाऱ्या एसटी बसेस आहेत. थोडा अधिक वेळ असल्यास या लेण्यांच्या पूर्वेला १० किमी  'निलंगा' तालुक्यातील प्राचीन 'नीलकंठेश्वर' मंदिरालाही भेट देता येईल.   

प्राचीन 'खरोसा लेणी', खरोसा, ता. निलंगा, जि. लातूर, महाराष्ट्र. (Ancient Kharosa Caves, Dist. Latur, Maharashtra)

                या लेण्यांची देखभाल आणि संरक्षणासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांची गरज आहे. येणारे पर्यटक इथे कचरा आणि गैरवर्तन करताना दिसतात. भारतीय पुरातत्व विभागाचे या लेण्यांकडे लक्ष गेलेले दिसत नाही.

               'खरोसा लेणी' समूहातील काही लेण्यांची दुरावस्था दिसते. कधी काळची ही वैभवसंपन्न लेणी आज कळा भोगताना दिसतात. काही लेणी अभ्यासू नजरेनं पाहिलं तर अप्रतिम आहेत. ठिसूळ जांभ्या खडकामुळे वेगाने झीज होत असली तरी शिल्लक कलाकृतींमधील शैव, वैष्णव आणि बौध्द पंथीय लेण्यांचा एकत्रित प्राचीन वारसा तसेच इथल्या महादेव लेण्याची ठेवण बघण्यासारखी आहे..

                                                        || श्री कृष्णार्पणमस्तु ||

येथे - जयवंत जाधव 

https://sahyadri300.blogspot.com/2024/02/
















No comments:

Post a Comment

Aihole

 आयहोळ येथील डोल्मेन :        सध्या बहुतेक पर्यटक आयहोळला चालुक्यांच्या सुरवातीच्या काळात बांधलेल्या मंदीरांना भेट देण्यासाठी येतात. मात्र ल...