Monday, January 3, 2022

माहूरची पांडवलेणी

 

माहूरच्या जुन्या बसस्टँडजवळ असलेल्या टेकडीच्या एका भागात लेणी कोरण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. एक प्रचंड सभागृह आणि त्यात गाभारा कोरण्यात आला आहे. ही लेणी राष्ट्रकूटकालीन असावी, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. असंख्य खांबांचे हे सभागृह मोठे आकर्षक आहे. खांबांची आणि एकूण रचनेची भव्यता नजरेत भरते. 15 मीटर उंचीचे हे सभागृह असल्याने व सभागृहाची लांबी रुंदी खूपच असल्याने सभागृह वैशिष्ट्यपूर्ण ठरते. गर्भगृहाच्या द्वारपट्टीवरील द्वारपालाचे भव्य शिल्प लक्ष वेधून घेतात. अजिंठा-वेरूळची आठवण यावी एवढी भव्यता याही शिल्पात आहे. गाभाऱ्यात भव्य शिवलिंग प्रतिष्ठापित आहे. ही लेणी पांडवलेणी म्हणून संबोधिली जातात.
पांडव लेणी..किरण मुधोळकर
  पण माहुर येथे असलेली लेणी पर्यटकांची वाट बघत असतात. माहूर येथील लेण्यांना पांडवलेणी म्हणून ओळखले जाते. पांडवलेणी माहूर एसटी स्थानकापासून जास्तीत जास्त १५ मिनिटावर असूनसुद्धा येथे फारसे कोणीही येत नाही.माहूर येथील लेणी उत्तराभिमुखी असून एका टेकडीत कोरलेली आहेत. लेण्यांकडे जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. लेणी साधारणपणे ६व्या ते ७व्या शतकात म्हणजे राष्ट्रकुट काळात कोरलेली आहेत. ही हिंदू लेणी असून लेणी संकुलात चार लेणी आहेत. संकुलाच्या मध्यभागी दगडी खांबांनी युक्त असे मोठे लेणे आहे. या लेण्याच्या दर्शनी भागात दोन पूर्ण स्तंभ आणि दोन अर्ध स्तंभ आहेत. वरांड्यातून मुख्य दालनात प्रवेश करताना सहा पूर्ण स्तंभ आणि २ अर्ध स्तंभ आपले लक्ष वेधून घेतात. या खांबांवर शंकर, पार्वती, दुर्गा, महिषासुरमर्दिनी आदी शिल्पे कोरलेली आहेत. पण खांबाना पांढरा रंग मारलेला असल्यामुळे मूर्ती पटकन ओळखता येत नाहीत. या दालनाला जोडून गर्भगृह आहे. गर्भगृहात शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. गर्भगृहाच्या दरवाज्यावर दोन्ही बाजूला द्वारपालांची भव्य शिल्प कोरलेली आहेत. गर्भगृहाला पूर्ण प्रदक्षिणा मारता येते.मुख्य लेण्याच्या डाव्या बाजूला दोन अर्धवट कोरलेली असून एका लेण्यात गणपतीची मूर्ती कोरलेली आहे, दुसरे लेणे रिकामे आहे. मुख्य लेण्याच्या उजव्या बाजूला असलेल्या लेण्यांच्या दर्शनी भागात दोन पूर्ण आणि दोन अर्ध स्तंभ आहेत. स्तंभांच्या पलीकडे मोठा वरंडा असून वरांडाच्या दोन्ही बाजूना विहार कोरलेले आहेत. हे दोन्ही विहार दिसायला सारखे असून दोघांच्याही दर्शनी भागात दोन पूर्ण आणि दोन अर्ध स्तंभ कोरलेले आहेत. या लेण्याच्या अंतर्भागात आणखीन तीन लेणी कोरलेली असून यात देवतांच्या मूर्ती पण कोरलेल्या आहेत. पण लेण्यात असलेल्या अंधारामुळे या मूर्ती पटकन दिसून येत नाहीत. या तिन्ही लेण्यात दगडी बाकसुद्धा कोरलेले आहेत.पांडव वनवासात असताना भीमाचे आणि हिडिंब राक्षसाचे युद्ध, भीम आणि हिडिंबेचा विवाह आणि घटोत्कचाचा जन्म याच पांडवलेण्यांच्या परिसरात झाला, असा स्थानिक लोकांचा समज आहे.
  तीन क्रमांकाची लेणी कला आणि स्थापत्याच्या दृष्टीने विशेष उल्लेखनीय असून पूर्वाभिमुख असलेल्या या लेणीत सर्वाधिक शिल्प आहेत. यात द्वारपाल, कुबेर, गजलक्ष्मी, मुष्ठीयोद्धे, स्त्रीशिल्पे, सिंह, शिवपार्वती, गणेश या चित्राची रेलचेल आहे़ लेणी चार दक्षिणमुखी असून या लेणीत कोरीव गणेश शिल्प आहे. पाच क्रमांकाच्या लेणीचे दालन रिकामे आहे. या लेणीच्या पाठीमागील भिंतीत नागदेवतेचे पंचमुखी कोरीव शिल्प आहे़ अमेरिकेतील मिशीगण विद्यापीठातील कला आणि स्थापत्याचे अभ्यासक प्रो़ वॉल्टर स्पिक यांनी सर्वप्रथम माहूर येथील लेण्याचे सर्वेक्षण करून खोदकामाचा कालखंड राष्ट्रकुट इ़स़ ७५७ ते ९५४ काळातील असल्याचे नमूद केले. वेरूळ, कंधार, मान्यखेट या राष्ट्रकुटाच्या राजधान्या होत्या़ धाराशिव आणि माहूर येथील लेण्यांमध्ये साम्य आहे़ भगवान श्रीकृष्णांनी पाच पांडवांना माता कुंतीसह श्रीक्षेत्र माहूरला याच पांडव लेणीच्या भुयारी मार्गाने पाठविले. त्यामुळे या लेणीला पांडव लेणी नाव पडले, अशी आख्यायिका सांगितली जाते. सदर लेणी १२ जानेवारी १९५३ रोजी औरंगाबाद पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहेत. परंतु मागील ६५ वर्षाच्या काळात पुरातत्त्व विभागाकडून या पांडव लेण्याचा कसलाही विकास झालेला नाही. किंबहुना येथे रस्ता, विद्युत व्यवस्था नसल्याने ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचा असलेला हा ठेवा आज विकासापासून दूर राहिला आहे. त्यामुळेच पर्यटकही या लेण्यांकडे पाठ फिरवित असल्याचे विदारक चित्र आहे.
 माहूर वस्तुसंग्रहालय, माहूर (ता. किनवट, जि. नांदेड ) : 
   स्थापना वर्ष १९८४. प्रदर्शनीय वस्तूंची संख्या १,२५१. वंजारी समाजाच्या दैनंदिन जीवनाची कल्पना देणाऱ्या वस्तू मुख्यत्वेकरून येथे आहेत. त्याशिवाय मध्ययुगीन नाणी, शिल्पे वगैरे वस्तू आहेत.याशिवाय कलाकुसरीच्या अनेक वस्तू व पुरातन शिल्पे ठेवली आहेत. त्यातील अंगठ्याएवढी बालाजीची मूर्ती पाहण्यासारखी आहे. 
कसे जायचे
  • नांदेडपर्यंत - नांदेड हे लोहमार्गानुसार मध्य रेल्वेवर येते. मुंबईपुणेहैद्राबादऔरंगाबाद तसेच बंगळूर येथून नांदेडला आगगाडीने थेट जाता येते.
  • माहूरपर्यंत - नांदेड ते माहूर अशी एस्‌‍टीची बससेवा महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ चालविते. हा प्रवास सुमारे तीन तासाचा आहे.
  • माहूर गांव ते टेकडीवरील मंदिर - शहरातून टेकडीच्या माथ्यावर जाण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या गाड्या धावतात. त्याऐवजी काही खाजगी सेवादेखील मिळतात.
  • नागपूर ते माहूर हे अंतर (वर्धा-यवतमाळ-मार्गे) रस्त्याने सुमारे २२० किलोमीटर आहे. या प्रवासासाठी राज्य परिवहन मंडळाच्या गाड्या व काही अत्यल्प खाजगी वाहनेही मिळतात.

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...