सध्याच्या पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील महत्वाचे शहर म्हणून चाकण शहर ओळखले जाते. चाकण शहर पुणे-नाशिक महामार्ग क्रमांक ५० वर पुण्याचे उत्तरेस ४० कि.मी. अंतरावर वसलेले आहे. तसेच चाकण या ठिकाणीच मुंबई-अहमदनगर हा राज्य महामार्ग या राष्ट्रीय महामार्गास छेदतो. त्यामुळे दळणवळणाच्या दृष्टीने चाकणला महत्व प्राप्त झाले आहे. चाकणचे भौगोलिक स्थान १८ अंश ७५ अंश उत्तर रेखांश ७५ अंश ८५ अंश पूर्व रेखांश असे आहे.चाकणची समुद्रसपाटीपासूनची उंची ६४६ मीटर (२११९) फुट आहे.
आधुनिक काळात पुणे-नाशिक या राष्ट्रीय महामार्गावरील व अहमदनगर-मुंबई या मुख्य राज्य महामार्गावरील महत्वाचे ठिकाण म्हणुन चाकणला विशेष महत्व प्राप्त झालेले आहे. शेती आणि व्यापाराबरोबर विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) असल्यामुळं या परिसराला देशाच्या औद्योगिक विकासात एक महत्त्वाचं स्थान लाभलं आहे. ऑटोमोबाईल उत्पादनांचं देशभरातलं प्रमुख केंद्र म्हणून चाकण ओळखलं जातं. व्होक्सवॅगन, बेंझ, महिंद्रा, जग्वार, जनरल इलेक्ट्रिक, बजाज ऑटो, ह्युंदाई अशा नामवंत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ब्रॅंडसह ७०० पेक्षा लहान-मोठ्या उद्योग-आस्थापनांनी चाकण आणि परिसरानं भारताच्या औद्योगिक नकाशावर एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रगत औद्योगिक वसाहत (एम.आय.डी.सी.) व या औद्योगिक वसाहतीत जागतिकीकरणामुळे आलेल्या अनेक जागतिक कंपन्या, यामुळे चाकण अंतरराष्ट्रीय पातळीवर महत्वाचे औद्योगिक केंद्र म्हणून उदयास आले आहे. याशिवाय विशेष आर्थिक क्षेत्र (एस ई झेड) व प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ यामुळे चाकणच्या स्थानिक इतिहासाला विशेष महत्व प्राप्त होत आहे.त्याबरोबरच चाकणची एक विशेष ओळख स्वातंत्र्योत्तर भारतातल्या शेती आणि सामाजिक क्षेत्राशी जोडलेली आहे. शेतकऱ्यांचं प्रबोधन करून, लक्षावधी शेतकरी स्त्री-पुरुषांना संघटित करून देशव्यापी शेतकरी संघटना उभारण्याच्या शरद जोशी यांच्या क्रांतीकारी प्रयोगाची जन्मभूमी देखील हीच.
या चाकणमध्ये एक मध्ययुगीन भुईकोट आहे.चाकणचा किल्ला किंवा संग्रामदुर्ग ! याचीच आपण ओळख करुन घ्यायची आहे.

चाकणच्या प्राचीन इतिहासाविषयी काही दंतकथा व ऐकीव कथा या परिसरात आजही ऐकवयास मिळतात त्या पुढीलप्रमाणे.............
पांडव कालीन एकचक्रानगर म्हणजे आजचे चाकण होय. पांडवापैकी भीमाने बकासुराचा वध केला. ती जागा चाकणजवळ आहे असे मानतात. प्राचीन काळातील शांडिल्य ऋषीचा आश्रम चाकण या गावी होता.
रामायणातील एका युद्ध प्रसंगी दशरथ राज्याच्या रथाची कानखीळ ज्या गावी गळून पडली ते गाव कन्हेरसर या नावाने ओळखले जाते. हे गाव चाकणच्या पूर्वेस आहे. रथाच्या 9 चाकाची कानखीळ पडल्यानंतर रथाचे चाक ज्या ठिकाणी गळून पडले ते चक्रेश्वर म्हणजेच आजचे चाकण होय.वरील आख्यायीकांशी साधर्म्य असणारी नद्यांची नावे, गावांची नांवे, आजही चाकण परीसारात पहावयास मिळतात.
महाराष्ट्राचे आद्य सम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातवाहन राजवटीत पुणे/चाकण/जुन्नर या प्रदेशाची वर्णने आलेली आहेत. सातवाहन काळात जुन्नर-भीमाशंकर-चाकण-देहू या परिसरात भौद्ध भिक्खूनी निवासासाठी अनेक लेण्या कोरल्या आहेत. भंडारा डोंगरावरील लेणी चाकणच्या जवळ पश्चिमेस आहे. या लेण्यांमध्ये (गुहेत) बसून संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी अभंग रचना केली आहे.त्याचप्रमाणे चक्रेश्वर मंदीर, झीत्राई मंदीर, तुळजाभवानी मंदीर, खंडोबा देवस्थान, सोमेश्वर देवस्थान, इत्यादी प्राचीन वास्तू चाकणच्या स्थानिक इतिहासाच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत.
महाराष्ट्रात बौद्ध भिक्षूंनी उत्तरेतून येताना तत्त्कालीन शेतीसाठी प्रगत असणारा नांगर आपल्या बरोबर आणला. या नंगारास लोखंडी फाळ असल्यामुळे शेतीची मशागत चांगली होवू लागली. त्यामुळे शेतीचे उत्त्पन्न वाढले व या नंगारास प्रथम वापर महाराष्ट्रात जुन्नर-चाकण-देहू या परिसरात करण्यात आला.
सातवाहनानंतर शिलाहर राजवट महाराष्ट्रात प्रभावशाली बनली. या राजवटीत प्रशासकीय दृष्टीने अनेक विभागीय देश निर्माण करण्यात आले. त्यामध्ये सर्वात मोठा विभागीय देश म्हणून मौरींज देश व पुणक देश होते. त्यापैकी पूणक देशामध्ये चाकणचा समावेश होता. ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये चाकणचा उल्लेख चाकण चौ-र्येंशी असा करण्यात आला आहे. संत ज्ञानेश्वारांच्या आईचे वडील सिद्धेश्वरपंत कुलकर्णी यांच्याकडे चाकण व परिसरातील चोवीस गावांचे कुलकर्णी पद होते. संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी चाकण पासून जवळच आळंदी येथे आहे. आळंदी या तीर्थ क्षेत्राचे महत्व जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचले आहे. आळंदीहून दरवर्षी आषाढ महिन्यात निघणारा पालखी सोहळा व वारकरी दिंडी सोहळा पाहण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात. या आळंदीच्या पंचक्रोशीचा उल्लेख संत नामदेवांनी केलेला आहे. त्यामध्ये चाकणचा उल्लेख आला आहे.
मराठ्यांचा आद्य इतिहासकार ग्राड डफने चाकणचा किल्ला कोणी बांधला यावर लिखाण केले आहे. इ.स.१२९५ मध्ये बुशदीद हबशी नावाच्या माणसाने अल्लौउधीन खिलजी दक्षिणेत येण्यापूर्वी सुमारे शंभर वर्षे आधी हा किल्ला बांधला अशी नोंद ९१ कलमी बखर व इतर बखरीत आहे.त्यापुढे मधल्या काळातील चाकणचे उल्लेख येत नाहीत.
चाकणच्या किल्ल्याचा पाया कसा घातला व किल्ला कसा बांधला या विषयीची माहिती शिवकालीन-पत्र-सार-संग्रहाच्या तिसऱ्या खंडाच्या लेखांक क्रमांक २३४२ मध्ये सविस्तर आलेली आहे ती पुढीलप्रमाणे ......................
सं.१५१७ विक्रम २३४२
ष. १८३२ अश्विन षु . ५
इ. १४६० सप्टेंबर १९.
चाकणेस दुर्गाचा पाया उभारिला. ज्व्हारीसी फर्मात्ती केली. दर गावासी गाडा येक व वेठे दोन, येकु वेटा दुर्गच्या पायात वालीत येकु गाडयासांगते सोडीत, याबद्दल विलायती गयाल झाली. पद्मावती, गिरमटेक, गीरमालवड पाटील मोकदम गिरमा कान पाटील, पुणे देश अपुली मोकदमाई, परुसी माजुमियाच्या हवाली मोकादमी केली. गिरम्याची हसीचा वोवासीचा कोणी उभा राहील. थालपत्र दावील त्यास आरधी मोकादमी देईन राजन मियाचे ह्श्सीच वोसीचा अर्धी खाईल.”
वाकली-पत्र-सार-संग्रह या लेखंकावरून प्रस्तुत किल्ल्याचा पाया हा १९ सप्टेंबर १४६० रोजी घातला. ग्रड डफच्या मते अल्लाउद्दीन खिलजीच्या अगोदर १०० वर्षे म्हणजेच इ.स. १२९३-९४ मध्ये बुशदिद हबशी दक्षिणेत आला. या दोन्ही तारखामध्ये मोठी तफावत आहे. या ठिकाणी डफच्या नोंदीपेक्षा शिवकालीन-पत्र-सार-संग्रहातील लेखांक विशासाहर्ता असल्याने आपण तो ग्राह्य मानण्यास हरकत नाही अथवा ग्राह्य धरणे योग्य होईत. किल्ल्याचा तट बांधताना कधी कधी तटाच्या आत बाहेरच्या तटाला समांतर असा तट घातलेला आढळतो. अशा वेळी बाहेरच्या तटाला आतल्या तटाच्या दृष्टीने चिलखत असे म्हणतात. अशाच प्रकारचे चिलखत बुरुजालाही घातलेले असते. बाहेरच्या तटाला पडकोट म्हणतात. तटाच्या दरवाज्यातून प्रवेश करताच दरवाज्या समोर आतल्या बाजूस भिंत घालतात. मनुष्य आत जाताच त्यास डाव्या व उजव्या बाजूने वळावे लागते. त्यामुळे आतल्या भिंतीवर असलेला पहारेकरी त्या शत्रुपक्षाच्या अथव अनोळखी मनुष्यावर बंदुकीची गोळी/दगडांचा मारा करून त्याचा बंदोबस्त करू शकतात. या जागेस रणमंडळ असे म्हणतात. संग्राम दुर्गची बांधणी करताना अशाच रणमंडळाची बांधणी केली आहे.
इ.स. १४३६ मध्ये अल्लाउद्दीन अहमद शहा ( दुसरा ) हा बिदरच्या बहामनी राज्याच्या गादीवर बसला.त्याच्याच कारकीर्दीत सन १४४७ मध्ये एक दुर्दैवी घटना घडली. चाकणच्या किल्ल्यात दक्षिणी मुसलमान सरदारांकडून सय्यदी व परदेशी ( मोगल ) मुसलमानांची मोठी कत्तल करण्यात आली.हि हकिकत 'तारीखे फेरीश्ता' व बुर्हाणे मासिर' या ग्रंथामध्ये विस्तृतपणे लिहीली आहे.
दक्षिणी व परदेशी मुसलमानांमध्ये बहामनी दरबारातील वर्चस्वावरुन वाद होत असत.इ.स. १४४३ मध्ये अल्लाउद्दीन शहा बहामनीने कोकणातील किल्ले जिंकण्यासाठी मलिक उत्तेजारला रवाना केले.त्यासोबत ७००० दक्षिणी पायदळ व ३००० घोडदळ होते.हे मोहीमेसाठी चाकण हे त्यांनी केंद्र बनविले. मलिक उत्तेजारने कोकणात स्वारी करुन बराच प्रदेश व किल्ले ताब्यात घेतले. दाभोळच्या शिर्क्यांचा पराभव केल्यानंतर त्यांच्याच सांगण्यावरुन मलिक उत्तेजार शंकरराय मोरे यांचा खेळणा उर्फ विशाळगड जिंकण्यासाठी निघाला. खेळण्याच्या दुर्गम व अवघड जंगलातून जाताना मलिक उत्तेजार आणि फौजेचे बरेच हाल झाले.शंकरराय मोरेच्या फौजांनी हल्ले करुन मलिक उत्तेजारच्या बहुतेक फौजेची कत्तल केली.त्यातून वाचलेले काही सैनिक बिदरला पोहचले, तर सय्यदी व परदेशी मुसलमानांची फौज चाकण येथे दाखल झाली. बिदरला पोहचलेल्या दक्षिणी मुसलमानांनी ( सालार हमज ) शेर उल्मुल्क दखनी ( राजा रुस्तुम उर्फ निजाम उल्मुल्क ) याच्या मध्यस्थीने बादशहाला असे कळविले कि सय्यदी व मोघलांच्या सल्ल्याने मलिक उत्तेजार शंकररायच्या प्रदेशात गेला व त्यामुळे हि कत्तल झाली.आता ते बंड करुन चाकणचा किल्ला शत्रुच्या ताब्यात देणार आहेत. हि ( खोटी ) हकीकत समजल्यावर दारुच्या नशेत असलेल्या अल्लाउद्दीन सुलतानाने सर्व दक्षिणी व परदेशी मुसलमानांना मारायचा हुकुम दिला.
शेर उल्मुल्क मोठ्या फौजेसह चाकण येथे पोहचला.त्याने चाकणला वेढा दिला.कोटाच्या आतील सय्यदी व परदेशी मुसलमानांनी स्वतःला कोंडून घेतले व सुलतानाकडे खरी हकीकत लिहीलेली बरीच पत्रे रवाना केली.पण कोटाबाहेरील बंदोबस्त कडक असल्यामुळे एकही पत्र सुलतानापर्यंत पोहचले नाही. शेवटी आतील फौजेने प्रतिकार करण्यास सुरवात केली. शेर उल्मुल्कने कोकणातील अधिकची फौजही चाकणला बोलावून घेतली.दोन महिने हा बाहेरील वेढा व आतील प्रतिकार सुरु होता. जेव्हा कोटातील धान्य संपत आले तेव्हा आतील लोकांनी एक योजना ठरविली. थोड्या लोकांनी आत थांबून उरलेल्या सैन्याने बाहेर जाउन लढा द्यायचा व राजधानीला पोहचायचे ठरविले.हि हकिकत शेर उल्मुल्कला कळाली. 'जर हे सैन्य बाहेर येउन प्राणपणाने लढले तर त्यात आपलीही बरीच हानी होइल.तसेच सुलतानापर्यंत पोहचून जर त्यांनी खरी हकीकत सांगितली तर त्याचे पुढील परिणम भयंकर होतील.' हे लक्षात आलयावर शेर उल्मुल्क व निजाम उल्मुल्कने एक कट रचला. त्याने सय्यदी व परदेशी मुसलमानांना कळविएल कि आमच्या विनंतीवरुन बादशहाने तुम्हाला माफ केले आहे व तुम्हाला तुमच्या कुटुंब व मालमत्तेसह राज्याच्या बाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. अधिक खात्री देण्यासाठी त्याने बादशहाचा सहीसह हुकुमनामा दाखविला व कुराणावर हात ठेवून शपथ घेतली.
यावेळी चाकणमध्ये १२०० सय्यदी व १००० परदेशी मुसलमान होते.वरील दोन्ही दक्षिणी सरदारांच्या शपथांवर विश्वास ठेवून ते आपल्या कुटूंबकबिल्यासह किल्ल्याच्या बाहेर पडले.प्रवासाची सोय करण्यासाठी त्यांनी चाकणपासून काही अंतरावर मुक्काम केला.शेर उल्मुल्क व निजाम उल्मुल्क हे मोघलांचा विश्वास संपादन करण्याच्या प्रयत्नात होते. चौथ्या दिवशी त्यांनी सय्यदी व परदेशी मुसलमानांना दडपण आणुन किल्ल्यात मेजवानीला बोलावले. साधारण ३०० मुसलमान मेजवानीसाठी किल्ल्यात गेले. त्यांना मानाची वस्त्रे दिल्यावर भोजन करत असताना सर्वांची हत्या करण्यात आली.त्यानंतर चाकण बाहेरील छावणीवर हल्ला करुन एकाही पुरुषाला जिवंत सोडले नाही. यात प्रचंड नरसंहार झाला.या छावणीपासून दुर दोन मैल मुक्कामी असणार्या परदेशी मुसलमानांपैकी कासीम बेग, कुर्राखान कुर्द व अहमद बेग यांनी त्या छावणीतील हलकल्लोळ एकल्यावर विलंब न करता राजधानीच्या दिशेने घोडे दौडवले. कासिम बेगला अडविण्यासाठी शेर उल्मुल्क फौजेसह रवाना झाला.बर्याच चकमकीनंतर हसनखानच्या मध्यस्तीनंतर कासीम बेग सुलतानासमोर हजर झाला.तेथे सर्व हकीकत सांगितल्यावर सुलतानाने कसून चौकशी करुन सर्व दोषींना शिक्षा केली व कासिम बेगची मानसन्मानासह जुन्नर व दौलताबाद सरकारवर नेमणूक करण्यात आली.

मुहमद गावान
बहामनी राजवटीत चाकण गावचा उल्लेख स्पष्टपणे पहावयास मिळतो. बहामनी राजाचा मुख्य प्रधान मुहम्मद गावन देखील काही काळ चाकणच्या किल्ल्याचा किल्लेदार होता. याच्या काळात चाकण मध्ये मोठा शस्त्रांचा तळ होता. इसवी सन १४८६ मध्ये चाकणचा किल्ला व सभोवतालच्या प्रदेशावर देखरेखीसाठी मोहम्मद गावाने जैनुद्दीन अली तालीश या अधिकाऱ्यास नेमले होते. महमुद शहा ( दुसरा ) याच्या कारकीर्दीत त्याचा सरदार मलिक अहमद बहिरीने स्वतंत्र होण्यासाठी हालचाली सुरु केल्या. १४८६ मलिक अहमदने बहामनी सुलतानाला कळाविले कि जैनुद्दीन हा बंड करीत आहे. जैनुद्दीनही अश्याच प्रकारच्या तक्रारी मलिक अहमदविरुध्द सुलतानाकडे करीत असे.इ.स. १४९० ला अहमदनगर येथे निजामशाहीची स्थापना केल्यावर मलिक अहमद निजामशहाने बहामनी सत्तेच्या विरुध्द उघड हालचाली सुरु केल्या. जैनुद्दीन अली तालीश तसेच विजापुरचा अधिकारी युसुफ आदिलशहा याना बहामनी सुलतानाने मलिक अहमदच्या बंदोबस्तासाठी चाकणच्या किल्लेदारीवर पाठविले.त्यालाच मलिक अहमदने आपल्या बाजुला वळवून घ्यायचा प्रयत्न केला. पण पुढे निजामशहाच्या गोटातून सुटून तो आपल्या चाकणच्या ठाण्यावर पोहचला.त्याने बहामनीच्या फौजेशी हातमिळवणी करुन आपल्याविरुध्द काही हालचाल करु नये म्हणून मलिक अहमदने चाकणवर हल्ला करायचे ठरविले.आपले कुटुंब शिवनेरी किल्ल्यावर ठेवून मलिक अहमद चाकणच्या किल्ल्याकडे निघाला.रात्रीच त्याने चाकणच्या भुईकोटावर हल्ला केला. तटाला शिड्या लावून तो निधड्या छातीने तटबंदीवर चढला.किल्ल्याच्या आतील शिबंदी जागे होईपर्यंत मलिक अहमद स्वतः त्याच्या मुख्य सतरा अधिकार्यांसह आत शिरला व आतील शिबंदीला काही कळण्यापुर्वीच त्यांनी कत्तलीला सुरवात केली. किल्ल्यातील सैन्यानेही बराच प्रतिकार केला,मात्र जैनुद्दीन अलीसह किल्ल्यातील ७०० माणसे मारली गेली व चाकणचा किल्ला निजामशाहीत सामील झाला.

मलिक अंबर
इसवी सन १५९५ मध्ये अहमदनगरचा बहादुरशहा याने संग्राम दुर्ग किल्ला व चाकणचा परिसर मालीजीराजे भोसले यांना दिला. दिनांक २७ जून १६०९ मध्ये मलिक अंबरने चाकण गावातील काही जमीन मुरारीभट बिन गंगाधर भट ब्रह्मे यांस इनाम दिली होती.
पुढे मोघलांनी निजामशाहीचा प्रदेश जिंकून घेतला व शहाजीराजांना नोकरीवर ठेवून त्यांना जहागिरी म्हणून दिला.त्यात चाकणचा समावेश होता.पुढे सन १६३२ मध्ये शहाजीराजांनी मोघलांची नोकरी सोडली तरी जहागिरीचा प्रदेश त्यांच्याच ताब्यात होता. पोर्तुगीज विजरई कोंदी द लिज्जारीस याच्या रोजनिशीतील १० मे १६३५ ची नोंद अशी कि 'मोघलांनी निजामशाहीचा बराचसा मुलुख ताब्यात घेतल्यावरही शहाजीराजे व निजामशाहीचा लहान वारस ( मुर्तजा निजामशहा ) यांच्याकडे जो मुलुख आहे त्यात एक लाख महसुलाचा चाकणचा किल्ला आहे. ( याचा अर्थ चाकणच्या किल्ल्याच्या अंमलाखाली एक लाख उत्पन्नाचा प्रदेश होता )
इ.स. १६३७ मध्ये चाकणचा किल्ला व परगणा दिलावरखानाच्या अंमलाखाली होता. मात्र १६४९ च्या पुर्वी चाकणचा परगणा शहाजीराजेंना मोकासा म्हणून आढळून येत नाही. ७ जुन १६४९ चे चाकण परगण्यातीला कारकुनांना व देशमुखांना शिवाजी महाराजांनी पाठविलेले पत्र उपलब्ध आहे.त्यात 'हाली परगणा चाकण साहेबा अर्जानी जाहला आहे'. अशी ओळ दिसून येते.यावरुन हा भाग याच वर्षी केव्हातरी आदिलशहाकडुन शहाजीराजांकडे व त्यांचे वारस म्हणुन शिवाजीराजांकडे आला असावा. शिवाजी महाराजांनी स्वराज्य विस्तार सुरु केल्यावर स्वराज्याच्या चतुसीमा सुरक्षित करणे आवश्यक होते.आग्नेय बाजुला असलेली सुपे गढी व पुरंदर, दक्षिणेला असणारा शिरवळचा सुभानमंगळ, पश्चिमेकडे असणारे तोरणा,सिंहगड हे ताब्यात घेतल्यावर पुणे-नाशिक मार्ग सुरक्षित करण्यासाठी चाकण स्वराज्यात असणे आव्श्यक होते.सन १६४९ मध्ये चाकणचा भुईकोट शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात आला. वास्तविक स्वराज्य स्थापन व विस्ताराच्या वेळी शिवाजी महाराजांनी मुघलांच्या ताब्यातून संग्राम दुर्ग जिंकून घेतला. यावेळी किल्ल्याचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा हे होते. शिवाजी महाराजांनी संग्राम दुर्गची किल्लेदार फिरंगोजीकडे कायम ठेवुन, त्यास मराठी राज्याच्या सेवेस घेतले. त्यावेळेपासून ते शिवाजी महाराजांचा स्वामीभक्त नोकर बनले.
शिवभारत ग्रंथात चाकणच्या दुर्गाचा उल्लेख चक्रदुर्ग व संग्रामदुर्ग असा येतो. चक्रदुर्ग हे चाकण नावाचे संस्कृत भाषांतर आहे.हे नाव संकर्षण सकळकळेकृत शिवकाव्यातही आहे. पण चाकणच्या कोटाचे संग्रामदुर्ग हे नाव फक्त शिवभारतात ( अध्याय क्रमांक - २५.६५, २८.४६) आढळून येते. इतर कोणत्याही समकालीन किंवा उत्तरकालीन कागदपत्रात किंवा बखरीत हे नाव आढळून येत नाही. शिवाजी महाराजांच्या काळात किल्ल्यांची जुनी नावे बदलून नवी नावे ठेवण्यात आली. हि जुनी व नवीन नावे पुढे शाहु महाराजांच्या व पेशव्यांच्या कारकीर्दीत प्रचलित होती.पण चाकणचे संग्रामदुर्ग हे नाव पुढे कोठेही आढळत नाही.चाकण येथील महत्वाच्या लढाईमुळे परमानंदांनी चाकण्च्या भुईकोटाचा उल्लेख संग्रामदुर्ग असा केला असावा.
चाकणची लढाई :-
१६५९ च्या जुलै महिन्यामध्ये औरंगजेब मुघल बादशहा झाला. थोड्याच दिवसात त्याने आपला दक्षिणेकडील विशेषतः मराठ्यांविषयीच्या धोरणांमध्ये बदल केला. दक्षिणेच्या सुभ्यावर शहजादा मुअज्ज्मऐवजी शाहिस्तेखानाची नेमणूक केली. यापाठीमागचा त्याचा उद्धेश होता की, दक्षिणेत शिवाजी राजांनी वरचढ होवू नये. त्याचप्रमाणे अफझल खानाच्या वधानंतर अली आदिलशहा याने आपले सैन्य शिवाजी महाराजांवर पाढवून त्यांना कोंडीत पकडले. विजापुरकरांना मदत करून दोघांचा जो समान शत्रू त्याचा नाश करावा हे शाहिस्तेखानच्या स्वारीमागचे कारण होते.
शाहिस्तेखान हा औरंगजेबाचा मामा होता. शूर सेनापती व अनुभवी शासक होता. मराठ्यांवर स्वारीचे त्यास आदेश मिळताच तो मोठ्या सैन्यासह औरंगबादहून १६६० च्या जानेवारी महिन्यामध्ये निघाला. नव्या उमेदीने दख्खनच्या सुभ्यावर मुक्रर झालेला अमीरउल उमरा शाहिस्तेखान पाऊण लाख पागा लष्कर आणि बुलंद तोफखाना घेऊन पुण्यात दाखल झाला तो ९ मे १६६० रोजी !
औरंगबाद-अहमदनगर-सुपे-बारामती-शिरवळ-सासवड मार्गे दिनक ९ मे १६६० रोजी पुण्यात पोहोचला. शाहिस्तेखानाने पुण्यात आल्यवर लाल महालात म्हणजेच शिवाजीं महाराजांच्या राहत्या वाड्यातच तळ दिला. पुणे व आसपासच्या प्रदेशात खानाच्या सैनिकांनी वाटेल तसा धुमाकूळ घातला. चाकणचा प्रदेश उजाड केला. शाहिस्तेखानाने स्वत:च्या पराक्रामाचे दर्शन घडविण्यासाठी चाकणचा संग्राम दुर्ग किल्ला जिंकून घेण्याचे ठरविले. विजयी सेनापतीच्या अविर्भावात आता त्याने पुण्यापासून नऊ कोसांवर(३० किलोमीटर) असलेल्या चाकणच्या गढीला हात लावला.
पण चाकणचा भुईकोट फिरंगोजी नरसाळा या बुलंद काळजाच्या किल्लेदाराच्या ताब्यात होता. छत्रपती शिवाजीमहाराजांनी किल्ला जोपर्यंत लढविणे शक्य आहे. तोपर्यंत किल्ला लढविन्यास सांगितले होते. नाईलाज झाला तरच किल्ला मुघलांना देण्यास सुचविले होते. यावेळी शिवाजीमहाराज सिद्दी जौहरच्या पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले असल्याने चाकणला मदत मिळणे शक्य नव्हते. नेताजी पालकरांवर मदतीची जबाबदारी सोपविली होती. मात्र, त्याना पूर्ण करता आली नाही. चाकण कोटाचे क्षेत्रफळ साधारणपणे अडीच एकरांचं होतं. आणि शिबंदी मात्र तीन-सव्वातीनशे मावळा फक्त.! एवढ्या छोट्या भुईकोट किल्ल्यास जिंकण्याचा खानाने बेत केला आणि त्यासाठी किती फौज मुक्रर करावी तर २१ हजार आणि मोठा तोफखाना !
२१ जून १६६० रोजी शाहिस्तेखान हा पुण्याहून निघून चाकणला पोहोचला. त्याने किल्ल्याला वेढा घातला. त्याचा तळ किल्ल्याच्या उत्तरेकडे होता. शाहिस्तेखानाने चाकणवर स्वारी केली त्यावेळी संग्रामदुर्ग जिंकण्यासाठी शाहिस्तेखानाने पुढीलप्रमाणे सैनीकांची व्युव्हरचना केली.
उत्तरेस – स्वत: शाहिस्तेखान.शिपाई – गिरीधर, कुवर, वीरमदेव सिसोदीया ( ब्रम्हदेव सिसोदीया ) हवशखान, त्रिंबकजी भोसले, दादाजी भोसले व इतर बादशाही सैन्य.
पूर्वेस – किल्ल्याच्या पूर्व बाजूस मुख्य प्रवेशद्वार होते. त्याच्या समोर शमसुद्दीन खान, तोफखान्याचा प्रमुख मीर अब्दुल्माबूद, सय्यद हसन, उजबेगखान, खुदाबंद हबशी, दक्षिणेत नेमलेल्या त्याच्या फौजेसह राणा राज सिंगाचा नोकर,उदयपूरचा सरदार विजयसिंह, सुलतान अली अरब आणि अल्लायार बुखारी हे सरदार होते.
दक्षिणेस – किल्ल्याच्या दक्षिणेस राव भाऊ सिंग हाडा, सरफराज खान, जाधवराव आणि जौहरखान हबशी हे होते.
पश्चिमेस – किल्ल्याच्या पश्चिमेस राजा रायसिंग शिसोदिया यांची नेमणूक करण्यात आली.
शिवाय शाहिस्तेखानाने या वेढ्यासाठी दक्षिण सुभ्यातील निरनिराळ्या किल्ल्यातून तोफा मागविल्या होत्या. किल्ल्यासमोर लाकडाचे दमदमे उभे करण्यात आले. त्यावर तोफा चढविन्यात आल्या. मात्र सारेच व्यर्थ! अहोरात्र झुंजून मृगजळाप्रमाणे महिना लोटला पण यश आले नाही. तरी संग्रामदुर्ग तो एकाकी झुंजत होता. कोणत्याही बाजूने चाकणला मदत करणे जिजाऊसाहेबांस (मुक्काम राजगड) आणि नेताजी पालकरांसही (मुक्काम घोड्यावर) अशक्य होते. सर्व बाजूंनी चाकणचा संपर्क तुटला होता. चाकण एकाकी पडला होता. मोगल सागरात बेटा येवढा चाकण सर्व मारा सहन करीत झुंजत होता.
त्यावेळी पावसाचा जोरात मारा सुरू होता. मराठे किल्ल्याच्या आतून आगीचा भारी मारा करीत होते. मोगलही तोफांचा जोरदार मारा करीत होते. किल्ल्यातील सैन्य बाहेर येऊन त्यावर तुटून पडण्यासाठी एकही संधी सोडत नव्हते.
संग्रामदुर्गच्या पूर्वेस तटावर व प्रवेशद्वारावर चार व मध्ये एक भक्कम बुरुज होते. किल्ल्याभोवती ३० फुट खोल व १५ फुट रुंद खंदक होता. खंदकाच्या बाहेर परकोट होता. प्रत्येक बुरुंजावर तोफा होत्या. मराठ्यांनी किल्ल्यामधून मुघल सैनिंकावर तोफांचा मारा केला. मराठ्यांच्या प्रतिकारामुळे शाहिस्तेखानास किल्ला जिंकता येईना.
मोगल सैन्य चाकणच्या किल्ल्याजवळ येऊन ठेपले यावेळी शाईस्तेखान स्वतः तेथे हजर होता व त्याच्यासोबत बहुसंख्य सैन्य व तोफखाना होता. फिरंगोजी नरसाळा यांनी किल्ल्यातून बाहेरील परिस्थितीचा अभ्यास केला व किल्ला पूर्णपणे बंद करून टाकला. खानाची फौज किल्ल्याजवळ येताच फिरंगोजी यांनी सैन्यास इशारा केला व किल्ल्यावरून तोफगोळ्यांचा वर्षाव मोगल सैन्यावर होऊ लागला. बंदुकीच्या फैरीही सलग उडत होत्या. या हल्ल्याने मोगल फौज गांगरली त्यामुळे खानाने आपल्या तळास मराठ्यांच्या तोफांच्या टप्प्यापासून लांब जाण्यास सांगितले व तेथे आपला तोफखाना सज्ज करून त्याने चाकणच्या किल्ल्यावर तोफांचा वर्षाव सुरु केला.
तोफांचा मारा करूनही चाकणच्या किल्ल्यातील शिबंदी फुटत नाही हे लक्षात आल्यावर मोगलानी किल्ल्याच्या एकाच भागावर तोफांचा मारा केला व किल्ल्याच्या एका भागास खिंडार पाडले. मात्र एवढे होऊनही फिरंगोजी नरसाळा व मराठ्यांनी मोगलांस बिलकुल दाद दिली नाही व शर्थीने किल्ला लढवला. मराठ्यांचा पराक्रम पाहून खुद्द शाईस्तेखान अचंबित झाला व आता यातून मार्ग कसा काढावा या विचारातून त्याने फिरंगोजी यांना विविध प्रलोभने दाखवण्याचा प्रयत्न केला मात्र फिरंगोजी बधले नाहीत.
अशा रीतीने फिरंगोजी व मावळ्यांनी चाकणचा वेढा २५ दिवस लढवला. मोगलांचे अनेक सरदार व सैन्य हा किल्ला ताब्यात घेण्याच्या प्रयत्नांत नष्ट झाले मात्र मोगलांना यश मिळत नव्हते कारण छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यातून सहीसलामत सुटून येईपर्यंत चाकणचा किल्ला आपण लढवलाच पाहिजे या उद्देशाने फिरंगोजी व मावळे जीवाची बाजी लावून लढत होते.
या वेढ्यात मोगलांची मोठी हानी झाली मात्र पुणे प्रांत ताब्यात ठेवण्यासाठी चाकणचा किल्ला ताब्यात घेणे मोगलांकरीता अत्यंत महत्वाचे होते त्यामुळे त्यांनी आपली सर्व शक्ती एकवटून चाकणच्या किल्ल्यावर हल्ला सुरु ठेवला
दोन दिवसात किल्ल्या जिंकण्याची भाषा करणारा खान दीड महिना झाला तरी किल्ला हाती येत नाही पाहून रडकुंडीला आला होता. मराठे रात्री येऊन छावणीवर हल्ला करतायत आपल्या सैन्याला तटा पर्यंत जाता येत नाही तोफा चालत नाहीत अशा परिस्थितीत काय करू काय नको असे होऊन बसले. त्याचवेळी त्यांनी एक शक्कल लढवली व खंदक खानून तटाच्या खाली सुरुंग पेरणीची आपल्या सैन्याला आज्ञा केली. खानानं आपल्या छावणीपासून भुईकोटाच्या ईशान्य बुरुजापर्यंत जमिनीतून सुरुंग निर्माण करण्याचे योजिले होते. मोगल किल्ल्याच्या भिंतीपर्यंत खंदक खणीत आणू लागले. हे भुईखालचे भयंकर संकट किल्ल्यातील किल्लेदारास समजणे अशक्यच होते. आणि सुरुंग पूर्ण होताच तो सतरा जिल्हेज अर्थात १४ ऑगस्ट १६६० च्या मध्यरात्री अंदाजे (दोन अडीच वाजता) हा जमिनीखालून ठासलेला सुरुंग खानाने पेटविला. प्रचंड स्फोट झाला. ईशान्यबुरुज उडाला. खिंडार पडले.!

पूर्वेच्या कोपरयाचा अवघा बुरुज अस्मानात उडाला. त्या बुरुजावर भिवाजी यांच्यासह असलेले १२० मावळे सुद्धा आभाळात उडाले. दीन दीन च्या आरोळ्या अन गर्जना ठोकत मुघल त्या बुरुजाकडे पळाले. या प्रसंगामुळे मराठ्यांचे २६८ सैनिक झखमी झाले. मोगली सेना खिंडारातून किल्ल्यात शिरण्याचा प्रयत्न करु लागली पण मराठ्यांनी त्यांना किल्ल्यात शिरकाव करु दिला नाही. फिरांगोजी बाबांनी तरीही हार मानली नाही. ते लढत होते, मावळे लढत होते, हर हर महादेव चा गजर चालू होता. बुरुज पडलेल्या त्या दिवशी अख्खा दिवस मराठे झुंजत होते.
शाहिस्तेखान दमदम्यापाशी आला. तो किल्ल्यात घुसणे विषयी आपल्या सैनिकांना उत्तेजन देऊ लागला. मोगल पुढे सरसावले. शमसुद्दीन आणि राव भाऊसिंग यांनी कामगिरीची शर्थ केली, पण मराठ्यांनी उडून गेलेल्या तटाच्या मागे मातीचा तट उभा केला. त्याच्याआडून ते बंदुका, अग्नि गोळे आणि मोठमोठे दगड याद्वारे मोगलांशी लढा देऊ लागले. मोगलांना पुढे सरकण्याची हिम्मत होईना तो पर्यंत संध्याकाळ झाली मोगलांनी रात्र किल्ल्याच्या पायथ्याशी उघड्यावर काढली.चाकणला मदत होणे शक्य नव्हते.
मोगल सैन्य दुसऱ्या दिवशीचे किल्ल्यावर पुन्हा चालून गेले. त्यांनी तटावर ताबा मिळविला आणि ते किल्ल्यात घुसले. मराठ्यांचे सैनिक मारले गेले व बाकीचे आतील कोटात घुसले. शेवटी राहिलेले तरी वाचतील हा विचार फिरंगोजी बाबांनी केला अन पांढरे निशाण दाखवले.अखेर फिरंगोजीस कोटाचा ताबा सोडावा लागला. भाऊसिंग यांच्या मध्यस्थीने फिरंगोजी शाहिस्तेखानाला भेटले आणि त्यांनी किल्ला मोगलांच्या हवाली केला तो १५ ऑगस्ट १६६० रोजी.! दुसऱ्या दिवशी मराठे किल्ल्याबाहेर आले आणि मोघली सैन्याने चाकणचा संग्रामदुर्ग जिंकला. चाकणच्या गडावर हिरवं निशाण फडफडायला लागलं.
शाहिस्ताखान विजयी झाला होता पण त्यासाठी त्याला भारीच किंमत मोजावी लागली होती. यात मोगलांची २६८ माणसे ठार झाली आणि सुमारे ६०० माणसे जखमी झाली होती.
खानाने किल्ल्यात प्रवेश केला अन आतमध्ये त्याने पाहिलं, खान चकित झाला, मराठे नक्की कशासाठी लढत होते तेच त्याला कळेना. तो आपल्या साथीदारांना म्हणाला “ये मराठे इस टूटी हुई दिवारो के लिये लड रहे थे, या अल्लाह कैसे है ये मऱ्हाटे.” खानाने गड घेतला पण त्याला कळले मराठे काय चीज आहेत ते, त्या 56 दिवसांच्या रणकंदनात खानाच्या फौजेचे सुद्धा अविरत नुकसान झाले. संग्रामदुर्ग सुद्धा खानाच्या या नाचक्कीला हसला असेल.
औरंगजेबाने किल्ल्याचे नाव इस्लामाबाद ठेवले आणि तेथे उजबेग खान याची किल्लेदार म्हणून नेमणूक केली.आता योगायोग पहा कुठे चाकन आणि कुठे फ्रान्सचा व्यापारी जव्हेरी तावेर्निये.? पण ऐन वेढ्याच्या वेळी हा जव्हेरी चाकण येथे शाहिस्तेखानाला आपल्याजवळील रत्ने विकण्यासाठी म्हणून आला, आणि थोडक्यात का होईना, त्याने चाकणमधील आपले अनुभव लिहून ठेवले.!
यापूर्वीही तो जवाहिरे विकण्याच्या निमित्ताने पाच-सहा वेळा हिंदुस्थानात आला होता. प्रत्यक्ष औरंगजेबासही त्याने काही माल विकला होता. औरंगजेबाच्या मावशीचा नवरा वजीर मोहम्मद जाफर, मामा शाहिस्तेखान इत्यादींच्या बरोबर त्याचे स्नेहाचे संबंध होते.
१६५३ मध्ये तो हिंदुस्थानात आला असता त्याने अहमदाबादेस जाऊन शाहिस्तेखानाला माल विकला होता. आता १६६० मध्ये तो परत हिंदुस्थानात आला. त्याने सुरतेहून दिल्लीला शाहिस्तेखानाच्या नावे पत्र पाठविले. त्यावेळी शाहिस्तेखानाची नेमणूक दक्षिणचा सुभेदार म्हणून झाली होती. 'मला बुऱ्हाणपूरला येऊन भेटा' असे शाहिस्तेखानाच्या पत्राचे उत्तर जाईपर्यंत तो औरंगाबादेस आला होता. पण सुरतेचा प्रशासक त्याला लवकर जाऊ देईना. शेवटी त्याची सुटका झाली त्यावेळी त्याला कळले की, शाहिस्तेखानाने चाकणला वेढा घातला आहे. तेव्हा तो चाकणला पोहोचला. तो आपल्या ग्रंथात त्याचा उल्लेख 'चाॅपार' असा करतो.
तावर्निये लिहतो-
मी चाकणला पोहोचलो. युरोपहून आणलेला बहुतेक माल मी शाहिस्तेखानाला विकला. तो मला म्हणाला, 'माझ्या सैन्याला पगार देण्यासाठी मी सुरतेहून खजिना मागविला आहे. खजिना येताच मी तुमच्या जवाहिराची किंमत देऊन टाकीन.'
माझा त्याच्या बोलण्यावर विश्वास बसेना. इतके मोठे सैन्य आणि त्याचा पगार देण्यासाठी लागणारा पैसाही हा आपल्या जवळ बाळगून नाही. मला वाटू लागले की माझ्या मालाची पूर्ण किंमत देण्यात तो खळखळ केल्याशिवाय राहणार नाही.
'माझ्या आदरातिथ्यात काही पुणे पडता कामा नये असे शाहिस्ताखानाने आपल्या अधिकाऱ्यांना बजावून ठेवले होते. माझ्यासाठी रोज मांसाच्या चार थाळ्या आणि फळफळावळीच्या दोन थाळ्या येत; पण जवळजवळ रोजच मला शाहिस्तेखाना बरोबर जेवण घ्यावे लागे. त्यामुळे माझ्यासाठी म्हणून पाठविलेले भोजन माझ्या नोकरचाकरात वाटले जाई.'
नबाब शाहिस्तेखानाच्या सैन्यात पाच-सहा (रजपूत) राजे होते त्यांनीही मला मेजवान्या द्यावे अशी त्यांना आज्ञा करण्यात आली. त्यांच्या भोजनाचे प्रमुख प्रकार म्हणजे भात आणि भाज्या आपल्या पक्वान्नात ते मिरी आणि आले आणि इतर मसाले सपाटून वापरीत त्यामुळे त्यांच्या मेजवान्या नंतर माझी भूक जशीच्या तशीच राही. नबाबाच्या आदरातिथ्याचा हा प्रकार दहा-बारा दिवस चालला. विकलेल्या मालाची रक्कम मला आज मिळेल, उद्या मिळेल या आशेवर मी वाट पाहत बसलो होतो. पण शाहिस्तेखान हा आदरातिथ्यात उणे करीना आणि पैसे देण्याचे नाव काढीना. शेवटी त्याचा निरोप घ्यावा असे मी ठरविले.

मी शाहिस्तेखानाच्या तंबूवर गेलो. मला पाहून त्याला थोडे आश्चर्य वाटले नि तिरसटपणे तो मला म्हणाला-
"मालाची किंमत तुला मिळाल्याशिवाय तू काय म्हणून निरोप घेत आहेस ? आणि पैसे न मिळता तू निघून गेलास तर उद्या तुला ती रक्कम कोण देणार आहे?"
शाहिस्तेखानाचे हे शब्द ऐकल्यावर मीही त्याच्याप्रमाणे चेहऱ्यावर ताठरपणा आणला आणि त्याला म्हटले-
"आमचे (फ्रान्सचे) राजे आमच्या रकमेची व्यवस्था करतील. आमचे (फ्रान्सचे) राजेसाहेब अतिशय उदार आहेत. त्यांच्या प्रजाजनांपैकी व्यापाऱ्यांना परदेशात त्यांच्या मालाची किंमत मिळाली नाही तर ते संपूर्ण रकमेची भरपाई करून देतात."
"अस्से ! पण मग व्यापाऱ्यांना दिलेल्या रकमेची भरपाई तुमचे राजेसाहेब कशा रीतीने वसूल करतात?" शाहिस्तेखानाने विचारले.
यावर तावेर्निये याने दिलेले उत्तर अनेक दृष्टीने पाहण्यासारखे आहे. तो काळ मोगलांच्या वैभवाच्या शिखरावरचा. शाहिस्तेखान हा औरंगजेबाचा मामा, दक्षिणेचा सुभेदार, मोगल साम्राज्यातील सर्वश्रेष्ठ अमीर, सहस्रावधी सैन्यासह चाकणला वेढा घालून बसलेला सेनाधिपती ! अशावेळी शाहिस्तेखानाला उत्तर देताना कोणीही नम्रपणाची भाषाच काढील, पण या फ्रेंच माणसाचा ताठा आणि दर्प पाहा, तो म्हणाला-
"आमच्या रकमा आपल्याकडून वसूल करणे आमच्या राजेसाहेबांना मुळीच जड नाही. आमचे राजेसाहेब दोन-तीन युद्धनौका सूरत बंदरावर अगर त्या किनाऱ्यावरील इतर स्थळांवर पाठवतील. मक्केच्या यात्रेवरून तुमची जहाजे येथील. त्यांची (लूट करावी म्हणून) वाट बघत आमच्या युद्धनौका दबा धरून बसतील.
तावेर्निये पुढे म्हणतो-
माझे उत्तर शाहिस्तेखानाला झोंबल्यासारखे दिसले.
तिरसटपणाचा हा रोख चालू ठेवण्याची त्याला हिंमत झाली नाही. त्याने आपल्या खजिनदाराला बोलावले. औरंगाबादच्या खजिन्यावर मला माझ्या रकमेची हुंडी देण्यात यावी अशी त्याने तातडीची आज्ञा दिली. दुसऱ्या दिवशी मला हुंडी मिळाली. मी शाहिस्ताखानाचा निरोप घेतला. त्याचा राग नाहीसा झाला होता. पुन्हा हिंदुस्थानात आला असता भेटल्याशिवाय परत जायचे नाही असे त्याने मला सांगितले.'
असो, चाकणच्या वेढ्याचा थोडा का होईना पण उल्लेख ताव्हेर्न्ये ने केला आहे. मोगल साम्राज्याचे नाजूक मर्मस्थान म्हणजे आरमाराचा अभाव. नौका दलाकडे त्यांनी अक्षम्य असे दुर्लक्ष केले आणि नेमके तावेर्नियेने या मर्मावर बोट ठेवले. मक्केच्या यात्रेकरूंवर काय संकट ओढवेल याची जाणीव त्याने शाहिस्तेखानाला करून दिली. एका सामान्य व्यापाऱ्याने दिलेला दम पाहून शास्ताखान चरफडला असावा, पण तो करतो काय ?
दुसरे म्हणजे,
चाकण गढी ती केवढी ? महाराष्ट्रातील इतर भुईकोट किल्ल्यांच्या मानाने ती अगदी सामान्य म्हणावी लागेल. या एवढ्याश्या गढीवर सगळे मोगल सैन्य घसरले होते. पावसापाण्यात मोगलांचे हाल झाले. इतिहासकार मामूरी याचा बाप या वेळी वेढ्यात हजर होता. तो मोगलांच्या शौर्याचे वर्णन करण्याच्या भरात मराठ्यांच्या प्रतिकाराचा ही उल्लेख करून जातो-
'पावसाची झड लागलेली, दारुगोळा भिजलेला, किल्ल्यातील शिबंदी आणि बाहेर असलेले मराठ्यांचे सैन्य ईतके प्रखर हल्ले करीत की मोगल सैन्य धास्तावून जाई. या वेढ्याचे सुरूंगकाम करणारे आणि खंदक खणणारे सोडा, पण मोगल सैन्याचेच तीनशे सैनिक शहीद आणि सहाशे जखमी झाले.'
आणि खरेच या एका जबरदस्त अनुभवाने शाहिस्तेखानाने मराठ्यांच्या इतर किल्ल्यांवर हल्ला करणे सोडून दिले. खरेतर हा चाकणचा पराभव नसून मोगलांचा नैतिक पराभव ठरला !!
कारण या पश्चात शास्ताखान केवळ पुण्यात छावणी करून बसला व किल्ल्यांना झटण्याऐवजी खेड्यापाड्यांच्या मामुली लुटीवर आपल्या इभ्रतीची भूक भागवू लागला!!
तिकडे पन्हाळ्याच्या वेढ्यातूनही महाराज सहीसलामत निसटले होते. हे शास्ताखानास परवडणारे नव्हते आणि त्यात चाकण येथे झालेल्या प्राणहानीची भर ! सिद्दी जोहर सारख्या पराक्रमी सेनापतीवर आत्महत्या करायची वेळ आली. पण शाहिस्तेखान साहेब म्हणजे मोगल साम्राज्यातील सर्वशक्तिमान ! त्यास कुणी बोटही लावू शकत नव्हते, पण नियतीने काय वाढून ठेवले होते हे नवाब साहेबांच्या बोटांनाही कुठे ठाऊक होते.??
चाकण जिंकल्यानंतर शाहिस्तेखानाने मिळवलेल्य विजयाची नोंद करणारा फारशी भाषेतील शिलालेख संग्रामदुर्गच्या किल्ल्यामध्ये कोरविला आहे. शाहिस्तेखानाने संग्रामदुर्ग जिंकल्यावर बांधकामे केली. इतरही डागडुजी केली. कारभार व किल्लेदारी उझबेगखानानाकडे दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्यात लाल महालात शाहिस्तेखानाचा चांगलाच समाचार घेतला. शाहिस्तेखान पराभूत होवून उत्तरेकडे गेला. ओरंगजेबाने इ.स.१६६३ मध्ये शहजादा मुअज्जमची दक्षिणेच्या सुभेदारपदी नेमणूक केली. मुअज्जमने जुन्नर व चाकण येथे लष्करी तळ उभारले. चाकण शहर मुघलांनी जिंकल्याने ओरंगजेबास आनंद झाला. ओरंगजेबाने चाकण शहराचे नाव बदलून इस्लामाबाद असे ठेवले.
९१ कलमी व चिटणीस बखरीतील नोंदीनुसार या काळात चाकणच्या कोटाचे प्रमुख फिरंगोजी नरसाळा होते.चिटणीस बखरीनुसार फिरंगोजी नरसाळा हे आधी चाकण या दुर्गाचे आदिलशाही हवालदार होते.त्यांनाच या कोटाचे पुन्हा हवालदार नेमण्यात आले.शाहिस्तेखानाने बढती देण्याचे आमिष दाखवून सुध्दा ते खानाकडे न जाता शिवाजी महाराजांकडे परत आले. त्यामुळे चाकणच्या पराभवानंतर शिवाजी महाराजांनी फिरंगोजी नरसाळा यांस भूपाळगड किल्ल्याची किल्लेदारी दिली.पुढे पुरंदर तहानंतर औरंगजेबाने सन १६६८ मध्ये राजा हा किताब व पुणे,सुपे व चाकण हे परगणे जहागिरी म्हणून दिले. सन १६७० मध्ये शिवाजी महाराजांनी निळोपंत मुजुमदार यांना पुणे,इंदापुरसह चाकण भागाचा कारभार सोपवला.
इ.स. १६७१ मध्ये दक्खनचा मुघली सुभेदार दिलेरखानाने पुन्हा चाकणवर स्वारी केली. १६७१ च्या डिसेंबर महिन्यात त्याने चाकण जिंकले. इंग्रजांच्या पत्रानुसार व रॉबर्ट आर्मच्या ग्रंथातील नोंदीनुसार जानेवारी १६७२ ला दिलेरखानाने चाकण ताब्यात घेतले. हि हकीगत शिवाजीमहाराजांना रायगडावर असताना समजली. दिनांक १३ जानेवारी १६७२ रोजी महाराज महाडला आले. दिलेरखानाचा पराभव करण्यासाठी विविध किल्ल्यांवरील सैन्य एकत्र करून चाकण मधील दिलेरखानाच्या तळावर मराठ्यांनी हल्ला केला. चाकण काबीज केले. महत्वाच्या अनेक कैद्यांना संग्रामदुर्गवरून रायगडावर पाठविले. त्यामधील आजारी व जखमी कैद्यांची त्यांनी सन्मानपूर्वक सेवा करविली. ज्या मुघल सैनिकांनी व कैद्यांनी महाराजांकडे नोकरी करण्याची इच्छा प्रदर्शित केली, त्यांना आपल्याकडे नौकरी दिली. बाकीच्या कैद्यांना सोडून देण्यात आले. दिलेरखानाचा हा पराभव म्हणजे ओरंगजेबाचा पराभव होता. कारण दिलेरखान मुघलांचा दक्षिणेतील सुभेदार होता.ऑक्टोबर १६८२ ला चाकणच्या किल्लेदारीवर जांबाझखान हा मुघल अधिकारी होता.
दिलेरखानाच्या पराभवानंतर संग्रामदुर्ग किल्ला पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला. त्यानंतर महराजांनी मराठ्यांना चैथाई व सरदेश्मुखीच्या सनदा दिल्या. २ जून १७२४ च्या एका पत्रामधील उल्लेख संग्रामदुर्गच्या मालकी हक्काविषयीचा आहे. त्यामधील उल्लेखानुसार संग्रामदुर्गचा किल्लेदार मखदूम आलम हा होता. तो मोघल सरदार असून किल्ला आपणाकडे देत नाही असा आशय आबाजी पुरंदरे यांनी पहिल्या बाजीरावास कळविला होता. यानंतर संग्रामदुर्गचे सर्व किल्लेदार मरठी सरदार दिसून येतात.
इ.स. १६८५ मध्ये औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर याचा मोघलांनी चाक्णमध्ये पराभव केला. औरंगजेब बादशहा दक्षिणेत असताना चाकणचे काही उल्लेख आढळून येतात. १० जुलै १६९४ मध्ये बुर्हाणुल्ला यास चाकणची किल्लेदारी देण्यात आली. पुढे १ जुन १६९६ ला बुर्हानुल्ला मरण पावला. त्याच्या जागी कोथळीगडाचा किल्लेदार गुलाम अलिखान याची नेमणुक झाली. पण ८ जुन १६९६ ला सय्यद जाफरला किल्लेदारी देण्यात आली. १ सप्टेंबर १६९९ ला सय्यद जाफर बादशला पत्रातून कळवितो कि 'कडुस्,खेड भागात मराठ्यांनी छावण्या घातल्या आहेत.त्याचे मी पारिपत्य करेन'.
पुढे तीन वर्षांनी १९ मार्च १७०३ ला सय्यद जाफरला बादशहाने जांबाझखान हा किताब दिला व त्याला २१ मार्च १७०३ रोजी चाकणच्या किल्लेदारीवरुन बदलण्यात येउन तिथे कामताबखानाची नेमणुक झाली.
मे १७०३ ला चाकण येथे बर्हिजी पांढरे व दौतमंदखान यांनाही पाठविण्यात आले.तसेच मुहंमद हलीम याच चाकण येथील बक्षी व वाकेनवीस पदावर नेमण्यात आले.२८ जुन १७०३ मध्ये चाकणचा किल्लेदार कामयाबखान होता,त्यास बदलून तेथे अमानुल्लाखानाची नेमणूक करण्यात आली. पुढे येथूनच त्याने तुंग्, तिकोणा तसेच राजमाची हे दुर्ग जिंकण्यासाठी मोहीम आखली. यादरम्यान मराठ्यांचे अनेक छापे चाकण व परिसरात पडत होते.
मार्च-एप्रिल १७०४ च्या सुमारास औरंगजेबाचा मुक्काम चाकण येथे होता व पुढे खेड येथे हलविण्यात आला. ३१ ऑक्टोबर १७०४ ला चाकणच्या किल्लेदारीवर अमानुलाखानाच्या जागी लोदीखानाची नेमणुक करण्यात आली. १ नोव्हेंबर १७०४ ला चाकणचे इस्लामाबाद हे नाव बदलून मोमिनाबाद ठेवण्यात आले व कल्याण-भिवंडीचे नाव इस्लामाबाद ठेवण्यात आले.
चाकण जवळ खेड या ठिकाणी झालेली महाराणी ताराबाई व छत्रपती शाहू यांच्यातील इ.स. १७०८ ची लढाई या लढाईत छत्रपती शाहूंना विजय मिळाला.
पुढे औरंगजेबाच्या मृत्युनंतर मोघलांचा दक्षिणेतील अधिकारी म्हणून औरंगाबाद येथे निजामल्मुल्कचा अंमल सुरु झाल्यावर चाकणचा किल्ला त्याच्या अखत्यारीत आला. येथे अब्दुल रसुलखान यास किल्लेदारी देण्यात आली. यापुर्वी सैद माखनखान किल्लेदारपदी होता. सैद रसुलखान किल्लेदारपदी असतानाच ( २१ फेब्रुवारी १७२१ ) चा एक महजर उपलब्ध आहे.१७२४ मध्ये मखदुम आलम हा किल्लेदारपदी आला. पण जुन्या किल्लेदाराकडून किल्ला ताब्यात घेण्यासाठी फौजेसह हल्ला करावा लागला. यात परिसरातील नागरिकांना बरेच नुकसान सहन करावे लागले.
ऑक्टोबर १७२८ ला चाकण किल्ला जिंकून घेण्यासाठी जवळ एक गढी बांधायची योजना सुरु होती.पण घाई करुन किल्ला घेण्यासाठी चिमाजी अप्पा तयार नव्हते व तसे त्यांनी बाजीराव पेशव्यांना कळविलेही. बाजीराव पेशव्यांना त्यांचे म्हणणे योग्य वाटले व गढी न बांधता पिलाजी जाधवरावांच्या मध्यस्तीने तह करावा असे त्यांनी कळाविले.पण हा तह काही झाला नसावा. पुढे डिसेंबर महिन्यातच कृष्णाजी महादेव चिमाजी अप्पाना असे कळवितात कि गढीचा पाया चाकणकडून काही लोकांनी हल्ला केला. त्यात चाकणकरांचा एक घोडा व पाच्,सात लोक मरण पावले.डोक्याएवढ्या उंचीचा तट उभारला असून आणखी माणसे घेउन गढी बांधत आहोत. चाकण जिंकण्यासाठी गढी उभारली कि नाही, हे कळत नाही.पण चाकण काही जिंकता आले नाही.
सन १७३५ च्या डिसेंबर महिन्यापासून संग्रामदुर्गाचा कारभार मल्हार पुरंदरे यांचेकडे सोपविला. पहिल्या बाजीरावाच्या निधनानंतर नानासाहेब उर्फ बाळाजी बाजीराव पेशवे पदी आले. त्याना पेशवे दरबारातील विविध सरदारांचा विरोध होता. दमाजी गायकवाड त्यापैकी एक. १७४१ च्या प्रारंभी दामाजीने संगमनेरकडून पुण्याकडे जाताना संग्रामदुर्गचा किल्लेदार भास्कर गोपाळ व मराठी सैन्यास त्रास दिला. संग्राम दुर्गची झालेली हानी भरून काढल्याची नोंद नानासाहेब पेशव्यांच्या रोजनिशीमध्ये आली आहे.
माधवराव पेशव्यांच्या कारकिर्दीत संग्रामदुर्गचा कारभार कृष्णराव बापुजी पारसनीस यांचेकडे होता. माधवरावांची आर्थिक शिस्त कडक असल्याने, त्यांनी प्रशासनामध्ये फेरबदल करून आपल्या विश्वासातील माणसे महत्वाच्या पदावर नेमली. संग्रामदुर्गच्या किल्लेदारपदी कृष्णराव बापुची नियुक्ती हा त्याचाच एक भाग होय.
माधवरावांच्या कारकीर्दीच्या प्रारंभी राघोबादादा व माधवराव यांच्यात कलह उत्पन्न निर्माण झाला होता. राघोबाने मराठ्यांचा सरदार निजाम यास माधवरावास विरोध करून एका अर्थाने मदतच केली. निजाम पुणे परिसरावर चालून आला असता त्याने संग्राम दुर्गावर हल्ला केला. निजामाकडे उत्कृष्ट तोफखाना असल्यामुळे त्याने किल्ल्यावर तोफांचा मारा केला. मात्र त्यास संग्रामदुर्ग जिंकता आला नाही.
पूर्वी नानासाहेब पेशव्यांच्या कालखंडामध्ये त्यांनी आंग्रेचे आरमार बुडविले. तुळाजीस काही काळ संग्रामदुर्गच्या कैदखाण्यात टाकले. त्यावेळी तुळाजीस बाबाजी हंडेकर याने सहानभूतीपूर्वक मदत केली म्हणून हंडेकरासही कैदेत टाकले. त्यावेळी संग्रामदुर्गचा किल्लेदार नारायणराव कृष्ण हा होता. संग्राम दुर्गच्या कैदेत असताना तुळाजी आंग्रेस जीवनावश्यक वस्तूंची सर्वतोपरी मदत करावी मात्र पक्क्या बंदोबस्ताने ठेवावे. असा आदेश माधवरावांनी दिलेला दिसतो.
चाकणचा किल्ला भुईकोट असला तरी संरक्षक दृष्ट्या तो मजबूत होता. राज्यातील विविध भागालीत कैद्द्यांना चाकणच्या संग्रामदुर्गच्या बंदिवासात आणून ठेवत. माधवरावाने कर्नाटकात हैदरअलीशी जो संघर्ष केला. त्यामध्ये हैदर आलीचा सरदार सरदारखान मराठ्यांच्या ताब्यात सापडला. त्यास चाकणच्या किल्ल्यात ठेवण्यात आले होते. त्यावेळी चाकणचा कारभार नारायणराव कृष्ण यांचेकडे होता.संग्रामदुर्गचा कैदखाना प्रसिद्ध होता.मराठ्यांच्या इतिहासातील तोतया प्रकरणामध्ये सामील असलेला कानेर विश्वनाथ चोपडेकर यास २५ ऑगस्ट १७७६ रोजी संग्रामदुर्ग मध्ये अंधारकोठडीतच कैदेत ठेवले.तसेच सन १७७७ मध्ये दौलत बाबुराव यास कैदेत ठेवले. १७७८ मध्ये तुळाजी पवाराचा भाऊ बाहीरजी पवार यास कैदेत टाकले. हे दोघेही निजामास फितूर होते.तसेच इ.स. १७९६ मध्ये शिंद्यांचा दिवाण बाळोबातात्या कुंजर याने पेशव्यांचा खाजगी सेनापती बाबुराव फडके यास कैद करुन चाकणच्या भुईकोटात ठेवले होते.
इंग्रजांचा मराठ्यांचा प्रदेश व किल्ले जिंकून घेण्याची मोहीम सुरु असताना ३१ जानेवारी १८१८ ला एलफिस्टनने लोणंद येथून गव्हर्नर जनरलला पत्र लिहून त्यात या युध्दाचा धावता आढावा घेतला आहे. त्यात तो म्हणतो 'पुणे शहर शांत आहे.पण आजुबाजुचा प्रदेश पेशव्यांच्या लोहगड्,सिंहगड व चाकण येथील सैन्यामुळे अस्वस्थ आहे'.
लेफ्टनंट कर्नल डीकन २०-२१ फेब्रुवारी १८१८ ला सिन्नर येथे होता.तो २५ फेब्रुवारी १८१८ ला चाकणसमोर येउन पोहचला.पुण्याहून बॉम्बे युरोपियन रेजिमेंट्ची एक तुकडी डीकनला येउन मिळाली. या तुकडीकडे इतर तोफांसह बारा पौंड वजनाच्या लोखंडी व पितळेच्या काही हॅवित्झर तोफा होत्या. या तोफ पहिल्याच दिवशी निकामी झाली. त्याच संध्याकाळी किल्ल्याच्या पश्चिम बाजुस आतील कोटापासून २५० यार्ड अंतरावर तोफा हल्ल्यासाठी सज्ज करण्यात आल्या. ( डिकन जेथून तोफा व फौजेचे नेतृत्व करत होता ती जागा चाकण मुख्य कोटाच्या पश्चिमेस चाकण गावाच्या वेशीच्या बाहेर, सध्याच्या पुणे-नाशिक रस्त्याच्या परिसरात उभा होता ) जास्तीची गरज भासल्यास म्हणून २६ फेब्रुवारीला सकाळी बारा पौंडाच्या पितळी तोफाही आणल्या गेल्या.जादाच्या चार हॅवित्झर तोफा व थोडी फौज चाकणपासून दक्षिणेला मेदनकरवाडी- मुटकेवाडीच्या मध्ये व तेथून थोडे उत्तरेस शिक्रापुर मार्गाच्या पलीकडे अशा दोन ठिकाणी ठेवण्यात आल्या. कालपासून कोटाच्या आतून सुरु असलेला हल्लाही सुरु होताच. पण तो फारच कमकुवत होता.
त्याचवेळी कोटाच्या दक्षिणेकडे,चाकणपेठेच्या परिसरात १७ एत्तदेशीय मद्रास पायदळाच्या तीन तुकड्या ( 17th Madras Native Light Infantry ) व मेजर ग्रीनहीलच्या नेतृत्वाखाली बॉम्बे युरोपियन सैनिकांची एक तुकडी तैनात होती.तर उत्तरेच्या बाजुला ओढ्याच्या पलिकडे कॅप्टन डेव्हीसच्या नेतृत्वाखाली वर्हाड बटालियनची ( निजाम सैन्याची ) तुकडी सज्ज होती.
सकाळी दहा वाजता सैन्याने कोटावर हल्ला सुरु केला.भरपुर हल्ले करुनही आतील सैन्य हार मानीत नव्हते. शेवटी ( २६ फेब्रुवारी १८१८ ) संध्याकाळी इंग्रजांची इच्छा पुर्ण झाली व किल्ल्यातील तीनशे पन्नास सैनिक शरणागती पत्करुन बाहेर आले.या हल्ल्यात इंग्रजांचे फक्त चार ते पाच सैनिकच मृत्युमुखी पडले व काही जखमी झाले.आतील सैन्याचे काय हाल झाले याची माहिती उपलब्ध नाही. या मोहिमेनंतर इंग्रज सैन्याचा काही भाग जुन्नरच्या दिशेला व तोफखान्यासह उरलेले सैन्य लोहगडाच्या दिशेस गेले.
इंग्रजांच्या १८१८ च्या लढाईचा नकाशा :-
इंग्रजांची चाकण हस्तगत करण्याची हकीकत आपण बघीतली. याच लढाईचा एक नकाशा उपलब्ध आहे.हि लढाई व तात्कालीन चाकण भुईकोटाची रचना समजून घेण्यासाठी या नकाशा उपयोग होतो.१८२१ मध्ये प्रकाशित झालेल्या व्हॅलेंटाईन ब्लॅकर ( Valentine Blacker ) लिखीत Memoir of the Operations of the British Army in India during the Maharatta War of 1817,1818,1819 या ग्रंथात चाकणच्या शेवटच्या लढाई बध्दल माहिती देण्यात आली आहे,.याच ग्रंथातील क्र.२३ चा नकाशा हा चाकणच्या लढाईचा आहे. हा नकाशा दोन भागात असून एका भागात चाकण मुख्य किल्ल्याची रचना दाखविली आहे.
नकाशाच्या दुसर्या भागात चाकण परिसराचा भाग दाखवला आहे.मध्याभागी चाकणचा मुख्य कोट त्याच्या भोवती चाकणची पेठ/ गाव व या नगरास संरक्षण देणारी पुर्व-दक्षिण-पश्चिम दिशेस असणारी बुरुजयुक्त तटबंदी दाखवण्यात आली आहे.हि तटबंदी त्यावेळी उध्वस्त स्थितीत असल्याची नोंदही केली आहे,चाकण परिसरातील दोन ओढे, परिसरातील वाड्या,मार्ग व आसपासचे डोंगर अशा सर्व गोष्टी नकाशात दाखविण्यात आल्या आहेत.
मराठ्यांचा इतिहासकार ग्रँड डफ याने इ.स.१८३६ मध्ये चाकणच्या भुईकोटाचे वर्णन लिहून ठेवले आहे,.'हा किल्ला साधारण चतुष्कोनी आहे.त्याच्या पुढच्या बाजुस पुष्कळ बुरुज असून शिवाय कोपर्या कोपर्यावर उंच बुरुज घातलेले आहेत.किल्ल्याचा तट बराच उंच असून त्याच्या सभोवती खंदक आहेत. या खंदकाच्या उत्तरेच्या बाजुस मात्र पाणी आहे.इतर ठिकाणी तो कोरडा असून ३० फुट खोल व १५ फुट रुंद आहे.किल्ल्यात जाणारा दरवाजा पुर्वेच्या बाजुस असून आत जाण्यासाठी आणखी पाच्,सहा दरवाजे लागतात. तटाच्या पलीकडे पडझड झालेला भाग दृष्टीस पडतो'.

चाकण येथील नाणी :-
चाकण भुईकोट सन १६६० मध्ये शाहिस्तेखानाने जिंकल्यावर औरंगजेबाने चाकणचे नामकरण इस्लामाबाद केले. पुढील वर्षीपासून येथे याच नावाने चांदीचे रुपये पाडण्यास औरंगजेबाने सुरवात केली. हे नाणे पुढील काही वर्षापर्यंत चाकण येथे पाडले जात असे,हे साधारण अकरा ग्रॅमपेक्षा थोड्या अधिक वजनाचे नाणे आहे.नाण्यावर हिजरी वर्ष व जुलूस ( म्हणजे बादशहाच् राज्यारोहणाचे ) वर्ष इत्यादी अंक असत. 'सिक्का जद दरजहान चू बद्रे मुनीर शाह औरंगजेब आलमगीर सना जुलूस x मैमुनत मानूस जरब इस्लामाबाद ' असे बिरुद या नाण्यावर असे.
१७०४ मध्ये औरंगजेब बादशहाच्या हुकुमावरुन चाकणचे इस्लामाबाद हे नाव बदलून मोमिनाबाद करण्यात आले.पुढे शाह आलम ( द्वितीय ) बादशहाच्या कारकीर्दित त्याच्या नावाचा ५.७ ग्रॅम वजनाचा अर्धा रुपया व ११ ग्रॅम वजनाचा रुपया अशी दोन प्रकारची चांदीची नाणी येथे पाडली जात असत. या दोन्ही नाण्यावर जुलूस या फारसी शब्दात 'श्री' हे देवनागरी छापले जात असे.हे अक्षर चाकणच्या टांकसाळीचे चिन्ह होते.'सिक्का मुबारक बादशहा गाझी शाह आलम | मैमनत मानुस सना जुलूस जरब मोमिनाबाद चाकण' असा पुर्ण मजकुर रुपयावर छापला असे.
दुर्गदर्शन :-
चाकणच्या इतिहासाची सविस्तर माहिती घेतल्यानंतर आता आपण चाकणच्य भुदुर्गाची भटकंती करुया. पुण्यावरून येणाऱ्या लोकांनी पुणे नाशिक हायवेने चाकणच्या मुख्य चौकातून उजवीकडे वळावे. तिथून आत गेल्यावर बाजारपेठेत पुढे गेले की हाकेच्या अंतरावर किल्ला आहे.चाकण बस स्थानकापासून उजव्या हाताला गेल्यास मराठी प्रशाले समोरून प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यास किल्ल्याच्या मागच्या बाजूने आपला प्रवेश होतो. इंदुरीचा किल्ल्यापासून चाकणचा किल्ला १५ किलोमीटर अंतरावर आहे.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरणार असाल तर पुण्यातून नारायणगाव जुन्नरला जाणाऱ्या बसने चाकणमध्ये उतरून चालत पाच मिनिटात किल्ल्यावर जाता येते. मुंबईवरून येणारा लोकांनी तळेगाव चाकण मार्गे संग्रामदुर्गला जाता येते. तळेगाव हे जवळचे रेल्वे स्टेशन असून स्टेशनच्या बाहेरूनच चाकणला जाण्यासाठी एसटी किंवा खाजगी वाहने मिळतात.
खुद्द चाकणमध्ये राहणा-या लोकांना चाकणचा किल्ला आहे हेच माहीत नाही हि वास्तुस्थिती आहे. चाकणच्या किल्ल्यात प्रवेश केला कि समोरचं दृष्य पाहून आपण थक्क होतो. चाकणचा भुईकोट मधोमध फोडून म्हणजे समोरासमोरची तटबंदी फोडून जनतेस व वाहनांना जाण्या-येण्यास डांबराचा पक्का रस्ता बनवला होता. इतिहासाची केवढी क्रूर चेष्टा इथे केली आहे. अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे हि. काही वर्षानंतर 'इथे एक किल्ला होता' असे सांगावे लागेल,अशी चाकणच्या संग्रामदुर्गाची स्थिती आहे.आपण किल्ल्यात कधी येतो आणि कधी बाहेर पडतो हे कळेनासे होते.असे का झाले? आपला इतिहास जतन करावयाच्या जाणीवा बोथट झाल्या आहेत का? आक्रमकांविरुद्ध ज्या दुर्गानीच आपले स्वातंत्र्य आणि अस्मिता जिवंत ठेवली, त्या महाराष्ट्रातील दुर्गांची सद्यस्थिती पाहून यातना होतात.इतिहास जतन करण्याकडे लक्षच नाही.ते असते तर दुर्गांची अशी दारूण अवस्था झालीच नसती.

चाकणच्या बसस्थानकातून उत्तरेकडे जाणार्या रस्त्यावर जिल्हा परिषदेच्या शाळेच्या समोर चक्रेश्वर देवस्थानाची कमान दिसते. तिथूनच चाकण दुर्गाच्या ढासळलेल्या तटातून आपला कोटात प्रवेश होतो. चाकणचा किल्ला भुईकोट असून छोटेखानी असलेला चौकोनी आकाराचा आहे. किल्ल्याची तटबंदी ठिकठिकाणी ढासळलेली असून काही ठिकाणी तग धरून आहे. पुर्व व दक्षिण बाजूची तटबंदी काही प्रमाणात आजही तग धरुन उभी आहे. किल्ल्याची तटबंदी ५० ते ६० फूट उंच आहे.
चाकणचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वाभिमुखी आहे. हे आजही चांगल्या अवस्थेत आहे.
पण माणसांच्या मलमूत्रांनी ही जागा दूषित झाल्यामुळे तिथे जाणं अवघड झाले
आहे. सर्वत्र मानवी विष्ठेची घाण व घाणीची दुर्गंधी पसरलेली आहे. या
दुर्गात एक आश्चर्यकारक रचना आहे.झाड-झाडोरा वाढल्यामुळे हि योजना नीट
पाहता येत नाही.पूर्वेच्या बाजूला आत आल्यानंतर उजव्या बाजूला एक मोठे
प्रवेशद्वार लागते.तीच वाट आहे असे समजून कोणी चालू लागला कि,वाट हळू हळू
निरुंद होत जाते आणि सरतेशेवटी बंद होते.तटावरच्या लोकांना आत आलेला शत्रू
अलगद मारयात सापडतो.अशा रचनेला 'रणमंडळ' म्हणतात.ते चाकणच्या
संग्रामदुर्गात आहे.
चाकणचे मुख्य प्रवेशद्वार पुर्व दिशेला असून उत्तराभिमुख आहे.बाहेरुन दरवाजा दिसू नये म्हणून जिभीसारखी रचना असलेला मोठा बुरुज बांधलेला होता.इंग्रजांच्या नकाशाप्रमाणे मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यावर आणखी दोन दरवाजे लागतात.या दोन दरवाज्यामधील दालनाच्या छतावर एक लहान खिडकीसारखे बांधकाम होते.ज्यांचा वापर शत्रुवर ज्वलनशील पदार्थ टाकण्यासाठी होत असे. आतील दोन प्रवेशद्वारांच्या कमानी व पुर्व दिशेला असलेली भिंत नेमकी केव्हा पाडण्यात आली हे कळत नाही.इंग्रजांच्या नकाशात किंवा नोंदीमध्ये हि भिंत किंवा प्रवेशद्वाराची रचना पाडल्याचा उल्लेख नाही. एल.ड्ब्ल्यु. शेक्सपियर लिखीत ए लोकल हिस्ट्री ऑफ पुना अँड ईटस बॅटलफिल्ड या १९१६ ( किंवा १९१४ ) पुर्वी केव्हातरी हि भिंत व आतील प्रवेशद्वाराची रचना ढासळली आहे.
चाकणच्या कोटाचा खंदक बारा ते पंधरा फुट खोल असून सर्वसाधारण रुंदी तीस ते पस्तीस फुट आहे.या खंदकाच्या उत्तरेच्या भागातच पाणी साठविले जात असे. इतर तीन बाजूनी खंदक कोरडाच असायचा. प्रवेशद्वाराच्या मागच्या बाजुस व बुरुजाच्या बाजुला खंदकामध्ये दोन विहीरी होत्या.त्या आता बुजवल्या गेल्या आहेत. पण प्रवेशद्वाराच्या बुरुजाच्या बाहेरील बाजुस मोटेची रचना स्प्ष्ट दिसते.


मुख्य प्रवेशद्वाराच्या पडलेल्या भिंतीतून बाहेर आल्यावर खंडकाच्या पलीकडे पडकोटात प्रवेश होतो. या पडकोटाला ईशान्य-आग्नेय दिशेस दोन बुरुज आजेत.यांचे बांधकाम खालील भाग अघडीव दगड व वर विटांचा चुन्याचा वापर करुन केले आहे. मुख्य कोटाच्या तुलनेत हे बांधकाम तसे दुय्यम दर्जाचे वाटते. पडकोटालाही पुर्व व दक्षिण बाजुने खंदक होता.आता तो बर्यापैकी बुजला आहे.इंग्रजांच्या नकाशावरुन असे दिसते कि या पडकोटाचे प्रवेशद्वार उत्तर दिशेला होते.पण आता हा भाग ढासळला असल्याने त्या प्रवेशमार्गाची रचना आता समजून येत नाही. चाकणच्या कोटात प्रवेश करण्याचा मार्ग असा होता कि प्रथम उत्तरेकडून पडकोटात, मग खंदकातील दोन प्रवेशमार्ग व पुढे जिभीच्या बुरुजाकडून आत तीन प्रवेशद्वारांमार्गे मुख्य कोटात प्रवेश होत असे.पडकोटाचीही पुर्वेकडील तटबंदी पाडुन तिथून रस्ता केला आहे. या पडकोटात सध्या पोलिस वसाहत असून ती घरेही सध्या वापरात नाहीत.



किल्ल्याच्या तट, बुरुजाची बांधकामे पहाता, हे लक्षात येते कि येथील बांधकाम शत्रुचे हल्ले किंवा इतर काही कारणामुळे बर्याचदा ढासळले आहे. त्याची वेळोवेळी आव्श्यक तेवढी पुर्नबांधणी केली आहे. त्यामुळे बांधकामातील फरक अनेक ठिकाणी दिसून येतो. किल्ल्याच्या बांधकामात मंदीराच्या घडीव दगडांचा तसे वीरगळीचा बराच वापर केलेला दिसून येतो. उदा. पुर्व-पश्चिम तटावर बाहेरील बाजुस मंदीराच्या अधिष्ठाणाचे शिल्प असलेले दगड दिसून येतात. आग्नेय बुरुजाच्या बाहेरील तटावर स्त्री प्रतिमा दिसून येते. पश्चिम तटावर बाहेरील बाजुस एका दगडावर दोन लहान व्यालशिल्प आहेत. मुख्य प्रवेशद्वाराच्या बुरुजावर आतील बाजुला एक वीरगळीचा तुकडा व दरवाज्याबाहेर पडलेल्या दगडांमध्ये एक शिल्प दिसते.खंदकातील मोटेच्या बांधकामातील एक पुर्ण आकाराची वीरगळ वापरली आहे.खंदकाच्या बांधकामातही मंदीराचे नक्षीकाम असलेले काही खांब वापरले गेले आहेत.
 |
| दरवाजा |
किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वाभिमुख असले तरी सध्या पश्चिम कधी बाजूने गडामधे प्रवेश होतो. या किल्ल्याचे चार बुरूज मात्र आजही भक्कमपणे उभे आहेत. या किल्ल्याला एकूण नऊ बुरूज होते. पण त्यातील बरेचसे अस्तित्वात नाहीत. जे बुरूज अस्तित्वात आहेत, त्यावर गवताचे रान माजलेले आहे, आतील बालेकिल्ला तर केव्हाच नष्ट झालेला आहे. जेथे पूर्वी बालेकिल्ला किंवा किल्लेदाराचा वाडा होता.
 |
तोफगाडा
|
त्या मोकळया जागेवर एक ध्वज व चौथरा बांधून त्यावर एक छोटी उखळी तोफ ठेवलेली आहे.गडामध्ये प्रवेश केल्यानंतर बाजूला दामोदर विष्णू मंदिर पाहायला मिळते.
 |
| दामोदर विष्णू मंदिर |
दामोदरेश्वराच्या मंदिरालाच चक्रेश्वराचं मंदिर असेही म्हणतात. हे मंदिर उंच चौथ-यावर असून मधोमध कडुलिंबाचे झाड आहे. झाडाच्या खोडालाच उघडयावर चक्रेश्वराची नागफणा धारण केलेली दगडी शिल्पमूर्ती उभी करून ठेवलेली आहे. समोरच भिंतीला टेकवून विरगळाची दगडी शिल्पे उभी करून ठेवलेली आहेत.
तसेच मंदिराच्या समोरच रस्त्याच्या कडेला किल्लेदार फिरंगोजी नरसाळा प्रतिष्ठान मंडळाने ऐतिहासिक माहितीचा फलक उभारलेला आहे.
 |
| तोफा |
मंदिराच्या आत मध्ये दोन्ही बाजूला तोफा ठेवलेल्या आहेत.हि तोफ सह्याद्री प्रतिष्ठानने पुनर्जीवित केलेली त्याच प्रमाणे उत्खननामध्ये काही खांबांचे अवशेष ही आढळून आलेले दिसतात.
चक्रेश्वर मंदीराच्या डाव्या बाजुस एका मोठ्या वास्तुच्या जोत्याचे अवशेष दिसतात.या वास्तुचे २०१९ मध्ये पुरातत्वीय उत्खनन करण्यात आले होते.तेव्हा या वास्तुची रचना अधिक स्पष्ट झाली.हि चौरसाकृती वास्तु वाड्यासारखी दिसत असून या वास्तुच्या मध्यभागी एका हौदासारखी रचना आहे. या हौदाला आतून सर्व बाजुने चुन्याचा गिलावा देण्यात आला आहे.येथील उत्खनान तोफेचे गोळे मातीची भांडी,तळखडे व काही दगडी वस्तु आढळुन आल्या होत्या. तोफेच्या पश्चिम बाजूला मशिद असून या ठिकाणचे मंदिर व मशिद अलीकडच्या काळात बांधले असावे असे वाटते. या मशिदीच्या बाहेरील बाजुस फारसी शिलालेख आहे.

शिलालेखाती १०११ हे अंक फसली सनाचे वर्ष धरल्यास इसवी सन १६०१-०२ येते.या वर्षी किल्ला अमीरुल उमराने उघडला म्हणजे जिंकला व काही बांधकाम केले असा याचा अर्थ होतो. रंगरंगोटी केल्यामुळे त्यावरील मजकुरातील सर्व अंक व अक्षरे व्यवस्थित वाचता येत नाहीत, पण शिलालेखाचे जे वाचन शक्य झाले ते असे
xx बकशुद अमिरुलउमरा न ( ? ) तारिख
बाज शुद किलह बेबाजु अमिरुलउमरा १०११
म॑शिदीसमोरच्या पायर्यांनी तटबंदीवर चढता येते. या पायर्याजवळच एक् बुजलेली विहीर आहे,विहीरीवर पाणी काढण्यासाठी मोटेची रचना स्पष्ट दिसते.
उत्तरेकडील तटबंदीत मधला बुरुज बर्यापैकी ढासळला असून त्याचे अवशेष खंदकामध्ये पडले आहेत. पश्चिमेकडील बुरुज ( जेथील खंदक बु़जून आज रस्ता तयार करण्यात आला आहे ) तोफांनी उडवून पाहण्याचे श्रेय इंग्रजांचे. पुर्वेकडील बुरुजाचे वैशिष्ट्य असे कि हा बुरुज तटाच्या बाहेर तसेच आत पुर्ण दंडगोलाकारात उभारण्यात आला आहे.
त्या खोलीचा अर्धा भाग आता ढासळला आहे. या खोलीच्या आत चुन्याचा गिलावा देउन कोनाडे तयार करण्यात आले आहेत. तसेच संरक्षणासाठी खिडक्या व जंग्याही आहेत. या बुरुजावरील खोलीत खापरी नळाचा वापरही करण्यात आला आहे.
इशान्येकडील बुरुज हा एक मजली असून त्यावर पुर्वी बुरुजाच्या माथ्यावर जाण्यासाठी जिना होता असे दिसून येते.
 |
| बुरुज व जंग्या |
कोटाच्या संपुर्ण तटाच्या भिंतीचे बांधकाम खालपासून मजबुत दगडी चिर्यांनी तर वरील बांधकाम मात्र विटांमध्ये करण्यात आले आहे.याच विटांच्या बांधकामात जंग्या व खिडक्या तयार करण्यात आल्या आहेत. तटातील सर्व बुरुजांच्या पायथ्याचा घेर मोठा असून एक एक दगडाचे थर कमी होत वरील घेर कमी झाला आहे.
आग्नेय दिशेस असलेल्या बुरुजाचे विटांत व वरुन चुन्याचा गिलावा दिलेले बांधकाम विशेष आहे. या बुरुजाच्या दोन्ही बाजुस लहान मिनारासारखी व बाहेरील बाजुस चर्यासारखी पाकळ्यांची रचना केली आहे.
नैऋत्य बुरुजाच्या आत एक लहान पायरी मार्ग जात असून तिथे आत एखादी खोली असावी. पण काळोखामुळे व अवघड वाटेमुळे जास्त आत खोलवर जाऊन पाहता येत नाही.
कोटाच्या आत दक्षिण व आग्नेय बुरुजाला लागूनच मध्ये दोन खोल्याची चुना व ओबडधोबड दगडांची एक वास्तु आहे. या वास्तु शेजारीच नकाशात दाखविण्यात आली आहे.या वास्तु शेजारीच ब्रिटिशकालीन नकाशात दाखविण्यात आलेली विहीर असावी.
इथून पुढे दक्षिण बाजूला असणाऱ्या तटबंदीवर जाण्यासाठी रस्ता आहे. किल्ल्याच्या तटबंदीवरून आजूबाजूचा संपूर्ण परिसर दृष्टीक्षेपात येतो. सिमेंट वापरून तटबंदीची डागडुजी करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. गडाची तटबंदी तशी उंच असून दगड विटा मधील बांधकाम केले आहे दोन तीन टेहळणी बुरुज व बंदुकांचा मारा करण्यासाठी जागोजागी जंग्या नजरेस पडतात.
 |
दक्षिण दिशेचा बंद दरवाजा
 |
दक्षिण बुरुजावर भगवा ध्वज डौलाने फडकताना दिसतो. या बुरुजावरून चाकण शहराचं विलोभनीय दर्शन होत होतं.
या दुर्गाचे मुख्य वैशिष्टय़ म्हणजे चौफेर तटबंदीलगत असणारा खंदक आजही शाबूत असून तो पाहता येतो. काही ठिकाणी मात्र या खंदकात सांडपाणी सोडलेले आहे. या किल्ल्यात दोन पाण्याच्या विहिरी असल्याचा उल्लेख सापडतो पण आज त्यांचा मागमूसही लागत नाही.


सिमेंट वापरून तटबंदीची डागडुजी करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. गडाची तटबंदी तशी उंच असून दगड विटा मधील बांधकाम केले आहे दोन तीन टेहळणी बुरुज व बंदुकांचा मारा करण्यासाठी जागोजागी जंग्या नजरेस पडतात. प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस पहारेकर्यांसाठी देवडी पहायला मिळते. त्याचप्रमाणे काही कोरीव शिल्पे ही पाहायला मिळतात. या किल्ल्याला अतिक्रमणाने वेढले असून चाकण ग्रामपंचायतीचा चक्रपाणि मंदिराकडे जाणारा मार्ग किल्ल्या मधूनच केला आहे. किल्ल्या बरोबरच चक्रपाणि मंदिर ही पहावे मंदिर तलाव बगीचा व परिसर अतिशय सुंदर आहे.
कोटाच्या परिसरात आणखी काही मुर्ती व अवशेष आढळतात. पडकोटाच्या उत्तरेस तटाबाहेर एक जैन तीर्थकरांची मुर्ती आहे. कोटाच्या पुर्वेला काही अंतरावर रस्त्याच्या डाव्या बाजुस एक लहानसे मंदीर तयार केले आहे. तिथे बाहेर वीरगळीचे दोन तुकडे व एक गरुड शिल्प आहे.मंदीराच्या आत डाव्या उजव्या बाजुस एकमेकांची दर्पण प्रतिमा असावी असे शरभ शिल्प आहे. या शिल्पात शरभाने किंवा व्यालाने चारही पायामध्ये व जबड्यात हत्तीला पकडले आहे, असे कोरलेले दिसते.हे शिल्प महाराष्ट्रातील अनेक दुर्गावर कोरलेले दिसून येते.
किल्ल्याची सध्या मात्र प्रचंड दुरावस्था आहे. जिथे आपल्या बापजाद्यानी रक्त सांडलं, प्राणाची आहुती दिली अशा तट अन बुरुजांवर सिगारेटची थोटक, माव्याच्या पुड्या, त्या दगडांवर कोरलेली प्रेमी युगुलांची नावे अशा गोष्टी दिसतात. पुरातत्व खात्याचे लक्ष नाही, अन आपल्या पुढच्या पिढीला इतिहासाची किंमत नाही.किल्ल्याच्या खंदकात पूर्णपणे झाडीचे साम्राज्य आहे, बुरुज भग्नावस्थेत आहेत, दुर्दैवाने आतल्या वाड्यात पण आपण जाऊ शकत नाही एवढी बेकार परिस्थिती आहे.
अशा गोष्टी पाहून ऐतिहासिक पराक्रमाचा साक्षीदार असलेला हा गड ढसाढसा अश्रू
ढाळत असेल, ते मावळे, फिरंगोजी बाबा आकाशातून पाहत असतील तर त्यांना
सुद्धा अश्रू अनावर होतील कोटाची ही अवस्था पाहून. कृपया शासनाने या
अखेरच्या घटका मोजत असलेल्या दुर्गाकडे लवकरात लवकर लक्ष देऊन त्याच्या
संवर्धनास सुरुवात करावी, नाहीतर दुर्दैवाने चाकणमध्ये एक किल्ला देखील
होता अन तिथे हा रणसंग्राम घडलेला असे जर उद्या कोणाला सांगितले तर कोणाचा
विश्वास बसणार नाही.

चाकणच्या या भुईकोटाचे दुर्दैवाचे फेरे अद्याप संपले नाहीत अगदी अलिकडेच या कोटाबाबत झालेला प्रसंग म्हणजे चाकणच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याची नव्याने बांधण्यात आलेली भिंत सततच्या पावसाने कोसळली आहे. मात्र किल्ल्याच्या शिवकालीन भिंती आणि बुरूजाला अजूनही धक्का बसलेला नाही. त्यामुळे अलिकडच्या काळात बांधण्यात आलेल्या भिंतीचा पोकळपणा उघडकीस आला आहे. शासनाच्या पुरातत्व व वस्तूसंग्राहालय संचालनालय यांनी या ऐतिहासिक स्मारकाचे जतन व दुरूस्तीच्या कामासाठी सुमारे एक कोटी खर्चाचे अंदाजपत्रक जाहीर केले होते. एक कोटी रूपये खर्चातून दगडाच्या तोडी वापरून किल्ल्याच्या भिंतींची काही ठिकाणी दुरूस्ती करण्यात आली होती.मात्र अवघ्या तिन-चार वर्षातच झालेल्या नविन बांधकामाचा काही भाग सततच्या पावसामुळे कोसळला.
भारतीय पुरातत्व विभागाने केलेले उत्खनन :-
पूर्वी सारखाच संग्रामदुर्ग किल्ला हा दिसावा, यासाठी शासनाने किल्ला संवर्धन प्रकल्प हाती घेतला असल्यामुळे किल्ला संवर्धनाचे काम सुरू झाले आहे. त्यानुसार भारतीय पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली उत्खननाचे काम सुरू आहे. चार ते पाच फूट खोदल्यानंतर आता अनेक वस्तू बाहेर पडण्यास सुरुवात झाली. पुण्यातील डेक्कन कॉलेजच्या विद्यार्थी आणि पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली किल्ल्यातील मध्यभागी दोन ठिकाणांचे उत्खनन करण्यात आले. संपूर्णपणे शास्त्रीय पद्धतीने केल्या जाणाऱ्या उत्खननामधून शिवकालीन शस्त्रे, अस्त्रे यांचे अवशेष तसेच नाणी आणि काही अत्यंत दुर्मिळ अशा पुरातन वस्तू व वास्तूंचे अवशेष सापडले.आतापर्यंत येथे पुरातन खिळे, सुमारे पंधरा तोफेचे गोळे, प्राण्यांचे अत्यंत जुने अवशेष, लोखंडी वस्तू मिळाल्या.पायऱ्या, भितींही दिसू लागल्या 


किल्ल्याचा आराखडा तयार करण्यासाठी किल्ल्यामधे नकाशाच्या आधारे उत्खनन करण्यात येत आहे. जुन्या काळातील पुरातन वास्तू नकाशे, मोजमाप नकाशे तसेच किल्ल्याचा आराखडा उपलब्ध झालेला आहे. समोर आलेले संग्रामदुर्ग किल्ल्याचे नकाशे १८१८ मधील इंग्रज राजवटीतील असल्याचे स्पष्ट होत आहे. या नकाशांमुळे मूळ स्वरूपातील किल्ला समोर येत आहे. काही ठिकाणी उत्खननात पायऱ्या, भिंती दिसून आल्या आहेत. पूर्वी सारखाच संग्रामदुर्ग किल्ला हा दिसावा यासाठी उत्खननात प्रथम जोते तपासणी करण्यात येत आहे.
श्री चक्रेश्वर महादेव मंदिर, चाकण | Discover Maharashtra
Discover Maharashtra

श्री चक्रेश्वर महादेव मंदिर चाकण –
चक्रेश्वर
महादेव मंदिर खूपच पुरातन आहे. या मंदिराचे बांधकाम हे मराठा कालीन असावे
असे वाटते किंवा मराठा राजवटीत या मंदिराचे पुनर्निर्माण / जिर्णोद्धार
झाला असावा. असे वाटण्याचे कारण म्हणजे मंदिरातिल शिव पिंड खूपच पुरातन आणि
झीज झालेली आहे. शिवपिंडी वरील शिवलिंग हे पुणरस्थापीत असावे. मंदिर
परिसरात शांडिल्य ॠषिची खूप पुरातन समाधी आहे. या मंदिराच्या बाजूला अजून
एक समाधी मंदिर असून विठ्ठल रखुमाई मंदिर, संत नामदेव महाराज मंदिर आणि
तुळजाभवानी मंदिर पण आहे. याच मंदिर परिसरात कांहीं चालुक्य काळातील मंदिर
अवशेष व विष्णू देवतेच्या वराह व कुर्म अवतारातील खूपच सुंदर मुर्ती
आहेत.(चक्रेश्वर महादेव मंदिर, चाकण)
जानकारांचे मते चाकण किल्ला
परिसरात आठव्या शतकातील चालुक्य काळातील विष्णूचे दशावतार मंदिर होते. ते
मंदिर पाडून मंदिराचे दगड किल्ला तटबंदी बांधकामात वापरलेली आहेत. मंदिर
अवशेष वापरलेल्या खूना आजही तटबंदीत दिसून येतात. त्या दशावतार मंदिरातील
राहिलेल्या दामोदर , कुर्म आणि वराह मुर्ती आहेत. दामोदर मुर्तीचे संग्रामदुर्ग किल्ल्यात मंदिर असून वराह आणि कुर्म मुर्ती चक्रेश्वर मंदिर परिसरात ठेवलेल्या आहेत.
चक्रेश्वर
मंदिरासमोर एक खूपच सुंदर असी पुष्करणी आहे. पुष्करणी मधे बरेच कासव आहेत.
मंदिर समिती कासवांची उत्तम देखरेख आणि जपनुक करतात असे दिसते. मंदिर खूपच
सुंदर आहे पण ऑईल पेंट च्या अति वापरामुळे मंदिराचे पुरातन आणि नैसर्गिक
सौंदर्य झाकाळुन गेले आहे.
Jeevan Kawade
संदर्भ :-
१) पुणे जिल्हा गॅझेटीयर
२) साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !!-प्र.के.घाणेकर
३) महाराष्ट्र देशातील किल्ले-चि.ग.गोगटे
४) https://mpcnews.in/chakan-historical-items-are-found-in-the-excavations-of-sangramadurga-91559/
http://www.sangramdurg.com/
https://faktitihas.blogspot.com/2018/03/blog-post.html
https://marathibolimadhe.blogspot.com/2021/05/sangram-durg.html
https://mr.vikaspedia.in/education/apala-maharashtra/92e93993e93093e93794d91f94d930-91593f93294d932947/91a93e91592391a93e-91593f93294d93293e
https://www.yinbuzz.com/chakan-bhookot-sangramadurga-fort-4995
https://prahaar.in
संदर्भ ग्रंथ :- “चाकणचा इतिहास” लेखक :- डॉ. विलास सोमा गोर्डे