Tuesday, March 29, 2022

बेडसे लेणी

 संपूर्ण भारतात एकूण १००० लेण्या आहेत, त्यापैकी ८०० हून अधिक एकट्या महाराष्ट्रात आहेत. या  ८०० पैकी बऱ्याच लेण्या अतिउंच डोंगरावर व दऱ्यामध्ये असल्यामुळे एकट्या पडल्या आहेत. अश्या सगळ्यांपैकी पर्यटकांपासून दूर असलेली लेणी म्हणजे बेडसे लेणी.
कार्ला, भाजे अशा लेणीसमुहामधील बेडसे ही एक लेणी. नेहमीच्या सहलींच्या वर्दळीपासून दूर एकांतातील हे बौध्दकालीन लेणं. आडवाटेवरील हे लेणी असल्याने सर्व सामान्यांपासून ती आजवर तुटलेली व अपरिचित अशी राहिली. बेडसे लेणीला फारसे कोणी येत नसल्याने अर्थातच येथे खूप शांतता असते. अस्वच्छतेचा कुठे मागमूसही नाही. याचे खरे श्रेय येथे न येणार्‍या पर्यटकांनाच द्यायला हवे. पुरातत्व विभागाने बेडसेची निगा चांगली राखली आहे. वरपर्यंत चांगल्या पायर्‍या तयार करून घेतल्या आहेत. कार्ला लेणीप्रमाणे या ठिकाणी प्रवेश तिकीटघर नाही. एक रखवालदार असतो तेवढाच.


    आपल्याकडे पायथ्याच्या गावावरून किंवा डोंगराच्या नावावरून, मंदिराच्या नावावरून एखाद्या ठिकाणाला नाव देण्याची परंपरा आहे. या ही लेण्यांना डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या बेडसे या गावावरून बेडसे लेणी असे नाव मिळाले. याचा अनेकजण ‘बेडसा’ असा चुकीचा इंग्रजीत उल्लेख करतात. या गावाजवळ भातराशी नावाच्या दुर्गम पहाडात ही बौद्ध लेणी आहेत. लेणी पूर्व दिशेला आहे. त्यामुळे सूर्योद्याच्या वेळी संपूर्ण आसमंत सुंदर दिसतो. 
बेडसे लेण्यांचे काल्पनिक चित्र
लेण्यांचा कालावधी : -
  इ.स. पूर्व पहिल्या शतकाच्या काळातील हे शिल्प सौंदर्य आहे. साधारण २१०० वर्षांपूर्वीची ही लेणी. हीनयान पंथाची ही लेणी आहेत. महाराष्ट्रातील अतिप्राचीन लेण्यांपैकी एक आहे. विसापूरच्या एका बाजूला लोहगड आणि दुस-या बाजूला बेडसे लेण्यांचा डोंगर आहे. अतिशय सुंदर असलेल्या या बेडसे लेणीला भारत सरकारने दिनांक २६ मे १९०९ महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले. निसर्गाच्या रम्य सानिध्यात बेडसे हे गाव महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यात वसलेले आहे. मावळ प्रांताचे प्राचीन नाव मामड असे होते. मारकुड हे प्राचीन नाव सुद्धा या लेणीला होते असे या लेणी मध्ये कोरल्या गेलेल्या शिलालेखांवरून स्पष्ट होते. या लेणी वर ब्राम्ही शिलालेख प्रामुख्याने आढळतात.
बेडसे लेण्याकडे जाणार्‍या मार्गाचा नकाशा
जावे कसे ?
   पुण्यावरून जाताना कामशेतवरून पवनानगर कडे जाणारा रस्ता डावीकडे वळतो. त्या रस्त्याने जायचे थोड्याच वेळात घाट लागतो घाट पार केल्यावर रस्ता द्रुतगती महामार्गाच्या खालून जातो लगेचच उजवीकडच्या डोंगरात लेणी व पायर्‍या दिसतात. बेडसे गावाला जाणारा फाटा पुढेच आहे. कामशेतवरून अगदीच ८/१० किमीच अंतर आहे. पवनानगर वरून तर फक्त ५/६ किमी असेल. दुचाकीवरून जाण्यासारखेच आहे. कामशेत खिंडीतून पवनानगरकडे जाणारा हा रस्ता चांगला आहे. वरून मावळ परिसर छान दिसतो.२० मिनिटांतच बेडसे या गावच्या वळणावर पोहाचतो. तेथून १.५ किलोमीटरवर लेणी डोंगरात कोरलेली आहे. विशेष म्हणजे लेणीच्या पायर्‍यांपर्यंत जाणारा हा रस्ता सुद्धा एकदम डांबरी. ‘गाव तेथे एसटी व एसटी तेथे रस्ता’ ही योजना महाराष्ट्र सरकारने चांगलीच राबविलेली दिसते. कार्ले-भाजे लेण्यांपेक्षा काहीशी दुर्लक्षित त्यामुळे इथे वर्दळही कमी असते. पायथ्याशी पार्कींगला सहज जागा मिळून जाते. लेण्यांच्या पायथ्याशी कृष्णाई नावाचे हॉटेल आहे, तिथे चहा नाश्‍त्याची सोय होऊ शकते. इथे ग्रामीण टुरिझम च्या नावावर चालणारे आणि स्विमिंग पूल असणारे एक भले मोठे हॉटेल आहे.खालून डोंगराकडे दृष्टिक्षेप टाकला की, लेण्यांच्या खाचा/गुहा दिसून येतात. पूर्वाभिमुख असलेल्या या लेण्यांचे सौंदर्य अजून खुलून दिसते, ते सकाळच्या वेळी. सुवर्ण किरणांनी न्हाऊन निघालेले चैत्यगृह आणि खांब पाहणं म्हणजे अद्भुत अनुभव आहे.
बेडसे लेणी असणारा सुमती डोंगर
०४. डोंगर चढण्या करिता पायऱ्या आणि निसर्गाचे दर्शन

बेडसे लेणीकडे चढणारा पायरी मार्ग
DSCN3155 copy.jpg
 बेडसे लेणी परिसरातून दिसणारे पवन मावळाचे दृष्य
 
बेडसेच्या लेणीपर्यंत पोहचण्यासाठी शेवटपर्यंत पायर्‍यांची सोय करण्यात आलेली आहे. काहीवर्षांपूर्वी पायर्‍यांची दुरवस्था झाली होती. पुरातत्व खात्याने आता मात्र या पायर्‍या छान दगड कापून बांधलेल्या आहेत. आजुबाजूला डोंगरावरून आलेल्या पाण्याच्या ओहळासाठी मधेच काही ठिकाणी वाट करून देण्यात आलेली आहे. पावसाचे पाणी वाहून जावे, साठून राहू नये, यासाठी काही उंबरे पण केले आहेत. तरीही मधून मधून काही जुन्या पायऱ्याही दिसून येतात.या ४०० पायऱ्या चढून आपण अर्ध्या तासात लेण्यापाशी पोहचतो.चढताना दोन्ही बाजूला विस्तृत कठडे असल्यामुळे वाटेत दमल्यावर तिथे बसायचा विचार मनात आला, तर झटकून टाकावा कारण बरेचदा त्या कठड्यांच्या जवळ साप ऊन खात बसलेले असतात. बेडसे लेणीला फारसे कोणी येत नसल्याने येथे निरव शांतता असते. अस्वच्छतेचा कुठे मागमूसही नाही. 
कधी जावे :
 पावसाळ्यात हिवाळ्यात आवश्य जावे. साधारणपणे पाऊस कमी झाल्यावर नाहीतर धो-धो पाऊस. शक्यतो उन्हाळ्यात टाळावे. हिवाळ्यात डोंगरावर नाना प्रकारची फुल झाडे उगवतात. पळस, पांगारा, चाफ्याची पांढरी फुलांनी हा परिसर फुलून जातो. पावसाळ्यात व हिवाळ्यात बेडसेचा हा परिसर निसर्गरम्य दिसतो.
खालून पायर्‍याने चढताना बेडसे लेण्याचे २ अजस्त्र खांब खुणावत असतात. प्रथमदर्शनी तरी लेणी लहानच वाटतात. साधारण अर्ध्या तासातच आपण लेण्यापाशी पोहोचतो. खालून जे अजस्त्र खांब दिसतात ते चैत्यगृहाचे आहेत. डावीकडे २/३ टाकी, छोट्या गुहा व एक लहानसा स्तूपही आहे. टाकीवरच पाली भाषेतील एक शिलालेखही लिहिलेला आहे.
लेण्यांचे प्रांगण
बेडसे लेण्यांचे प्रवेशद्वार. 
    चैत्यगृह बाहेरून नीटसे दिसत नाही. कारण ते खोदत असतानाच त्याच्या पुढ्यातील कातळ तसाच ठेवला असावा बहुधा छताकडील काम करण्यास आधार मिळावा, पाऊस, वादळ आत चैत्यगृहात येऊ नये म्हणून तो ठेवलेला असावा. भाजे किंवा कार्ले लेण्यांमध्ये अशा प्रकारची व्यवस्था दिसत नाही. येथील प्रवेशमार्ग डोंगर मधोमध फोडून त्याचे दोन भाग केले आहेत. जनावरे आत येऊ नये म्हणून पुरातत्व विभागाने छोटेसे एक लोखंडी गेटही येथे उभारले आहे. समोर दोन मोठे कातळ असल्याने चैत्यगृह बाहेरून दिसत नाही. दोन कातळांच्या खिंडीतून गेल्यावर भव्य नजारा दृष्टीस पडतो.
    बेडसे लेणीसमुह हा पूर्वाभिमुख असल्यामुळे फोटोग्राफी करायची असल्यास सकाळी लवकर आलात तर उगवती सूर्यकिरणांमुळे संपूर्ण लेणी प्रकाशाने उजळवून निघालेली असतात. अश्या वेळी बेडसे लेण्यांचे फोटो खुपच उत्कृष्ट येतात.
Bedse Caves
बेडसे लेणीचे प्रथमदर्शन

०५. लेणीचे (चैत्य गृहाचे) प्रवेश स्थळ

      पायऱ्या चढून पूर्ण झाल्यानंतर आपण सुंदर अश्या लेणीच्या अंगणात आपण पोहचतो. हे चैत्यगृह बाहेरून पूर्णपणे दिसत नाही. लेणी खोदत असतानाच त्याच्या पुढ्यातील खडक तसाच ठेवला आहे. असे वाटते की तत्कालिन कामगारांना छताकडील काम करण्यास सोपे जावे म्हणून तो खडक तसाच ठेवला असावा. यावरून ही लेणी कशी खोदली जायची याची कल्पना येते. 
     आपण लेण्यांजवळ पोहोचताच सर्वप्रथम भव्य खांब दिसून येतात.  ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकात (इ.स.पूर्व पहिल्या शतकाचा उत्तरार्ध), एका एकसंध पाषाणात, “आधी कळस मग पाया’ असे वरून खाली फक्त छिन्नी हातोडीने इतके भव्य लेणे खोदण्यात आले. कार्बन डेटिंग मध्ये असे दिसून आले आहे की लेण्यांचा वरचा भाग हा खालील भागापेक्षा जुना आहे म्हणजे या लेण्या वरून खाली कोरलेल्या आहेत. गुहेच्या बाहेर एक छोटा स्तूप आहे, पूर्वी आधी छोट्या प्रमाणावर शिल्पाची/छोट्या स्तूपाची निर्मिती करून ते काही वर्षांकरिता तसेच सोडण्यात यायचे. त्यावर ऊन, वारा, पाऊस याचा कसा परिणाम होतोय याचा अंदाज घेऊन पुढचे काम केले जायचे. भिक्षु एक दोन वर्षांनी परत त्याच स्थानी आले की त्याचे निरीक्षण करून पुढचे काम करणे योग्य असेल का नाही ते ठरवत. त्या काळात आधी छिन्नी आणि हातोड्याने एक मोठे भोक पाडून त्यात लाकूड ठेवले जायचे व सतत पाण्याचा मारा केला जायचा, त्यामुळे लाकूड फुगायचे व खडकाला तडा जायचा आणि तो खडक तोडणे सोपे व्हायचे.लेण्या इथेच का कोरल्या गेल्या तर येथे डोंगरावर पाणीसाठा उपलब्ध असल्याने, हि जागा निवडली गेली.
    घाटमाथ्यावर कोरलेली ही लेणी. त्यात भिक्षूंचे ध्यानमंदिर म्हणजे चैत्यगृह आणि वर्षा विहार म्हणजे राहण्याची सोय, असे दोन विभाग पडतात. मोठा स्तूप, कलते खांब, चैत्याकार गवाक्षे तसेच वेदिका व लाकडी हर्मिका ही सर्व रचना इथे दिसून येते. 
बेडसे लेण्याचा नकाशा



बेडसे लेण्याच्या प्रवेशद्वाराशी असणारे खांब
चैत्यगृहाचा प्रवेशमार्ग डोंगर मधोमध फोडून त्याच्या दोन दरडींमधून केलेला आहे. त्या खिंडीतून आत जाताच चैत्यगृहाचे विशाल स्वरूप एकदम समोर येते. चैत्यगृहाचा समोरील व्हरांडा किंवा आगाशी सुमारे १० मीटर लांब आणि ५ मीटर रुंद आहे या आगाशीला बांधलेले सुंदर कोरीव खांब आपले डोळे दिपवून टाकतात. हे खांब बांधताना दोन्ही बाजूला दोन खांब आणि मध्यभागी दोन खांब या पद्धती मध्ये बांधलेले आहेत. ह्या खांबांचे वैशिष्ट्य म्हणजे मधले दोन खांब पूर्ण स्वरूपाचे आहेत आणि दोन्ही बाजूचे दोन खांब हे अर्धस्तंभ आहेत. दोन अजस्त्र खांब, षटकोनी बांधणीचे, कुंभाकार तळखडा, घंटेच्या आकाराचा शीर्षभाग, त्यावर आमलक असलेला चौरंग व त्यावर घोडे व बैलांवर बसलेल्या स्त्रीपुरुषांच्या जोड्या. सारेच कसे नजाकतीने कोरलेले. बाजूच्या दोन्ही भिंतीनाही असेच अर्धे खांब कोरलेले जणू ते भिंतीत रूतले आहेत. त्यावरही असेच कोरीव काम. या दर्शनी खांबांच्या आधारावर असलेला व्हरांडा तसेच त्याच्या बाजूला चिटकून असलेल्या खोल्या आणि या खांबांच्या मागे कातळात खोदलेले सुंदर चैत्यगृह यापेक्षा सर्वात जास्त मनाला भुरळ घालतात ते या शिल्पाचे आकर्षक स्तंभांवर. बेडसे लेण्यांचे आगळे वेगळे वैशिष्ट्य दर्शवणारे हे सुंदर स्तंभ पायापासून थेट छताला चिटकलेले आपल्याला आढळतात. अंदाजे २५ फूट उंचीचे स्तंभ आहे. हे स्तंभ म्हणजे बेडसे लेणीचे वेगळेपण ठरतात. अशा प्रकारचे स्तंभ इतरत्र आढळत नाहीत. भव्य दिव्य अशा स्तंभांना पर्सिपोलिटन धतीर्चे स्तंभ असे म्हणतात. प्राचीन पर्शिया (इराण) इथल्या एका ठिकाणाचे नाव पर्सिपोलिस. तिकडून अशा प्रकारची कला निर्माण आली.आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतक्या दूर वसलेल्या संस्कृतीचा प्रभाव मौर्याच्या कलेवर पडला आणि त्याची छटा आपल्याला इथे पाहायला मिळते. ही एक कमालच आहे.पर्सिपोलिटन स्तंभ म्हणजे खाली कुंभाकार तळखडा, त्यावर षटकोनी किंवा अष्टकोनी स्तंभ, स्तंभशीर्षावर आमलक, आमलकावर हर्मिकेची उतरती पायर्‍यांची रचना आणि सर्वात शिरोभागी किचक अथवा बैल, हत्ती, स्वार अशी छताला आधार देणारी रचना. बेडसे लेणीतील स्तंभ ह्यांचे उत्कट उदाहरण आहे. असेच स्तंभ कार्ले चैत्य, नासिक लेण्यांतील गौतमीपुत्र विहार, नहपान विहार, लेण्याद्री येथेही पाहावयास मिळतात.
a
नाशिक लेणी (लेणी क्र. १०, नहपान विहार)
a
ह्याच्या व्हरांड्यातील स्टंभ षटकोनी असून स्तंभशीर्षावर हत्ती, सिंह असून मागील बाजूस स्फिन्क्स आणि ग्रिफिन आहेत.

a

गौतमीपुत्र विहार (लेणी क्र. ३ देवी लेणे)

येथील स्तंभांनाच सातकर्णी स्तंभ असे देखील म्हणतात. हे स्तंभ अष्टकोनी असून तळभागी कुंभ नाही, इतर रचना मात्र पर्सिपोलिटन स्तंभासारखीच.

a

कार्ले चैत्यातील पर्सिपोलिटन स्तंभ

बेडसे लेण्यांच्या स्तंभावर अश्वावर स्वार असलेले युगुल शिल्प. युगुलांचे अलंकार स्पष्टपणे दिसतात. अश्वाची नाकपुडी, डोळे अशा बारीकसारीक गोष्टी देखील अद्याप ठळक दिसतात.
Bedse Caves: Columns

आत शिरताच जे चार खांब दिसतात. एकेक खांबांच निरीक्षण केलं की, खाली चौथरा, त्यावर कलश, त्यावर अष्टकोनी खांब आणि त्यावर उमललेलं सुरेख कमळ, अश्‍वारूढ, गजारूढ स्त्री आणि पुरुष दिसून येतात. या स्तंभाचे कोरीवकाम देखील मोठे वैशिष्ट्यपुर्ण आहे. नीट निरीक्षण केले तर अष्ट्कोनी स्तंभाच्या वर कोरलेले कमलदल आणि त्याची प्रत्येक पाकळी इतकी नाजुकपणे कोरलेली बघून थक्क व्हायला होते.याच्यावर असलेला अमलक म्हणजे आवळ्यासारखा आकार आणि त्याच्याबाहेर चौकटीसारखी असणारी फ्रेम एकाच पाषाणात कोरलेली आहे. हे कोरताना एक चुक झाली तरी त्यात बदल किंवा दुरुस्ती करण्यासाठी काहीच संधी नाही.हे काम करणार्या कारागिरांना खरोखर वंदन. याच्यावर हार्मिकेसारखा चौथरा असून त्यावर घोडे व बैलांवर बसलेल्या स्त्रीपुरुषांच्या जोड्या असे शिल्प येथे कोरलेले दिसते. विशेष म्हणजे घोड्यांना लगाम नाही बहुधा हे काम रंगकामातून दाखवले जात असावे. तसेच येथील कोणत्याही घोड्याच्या पाठीवर खोगीर दिसत नाही. या लेण्यांमध्ये जरी बसलेल्या घोड्याचे शिल्प आहे, पण घोडा हा कधीच बसत नसतो, हत्तींना सुळे नाहीत, पण त्याजागी खोबणी दिसतात, तिथे खरेखुरे हस्तीदंत बसविले जात असावेत असा अंदाज बांधता येतो.नीलगाय आणि बैलावर आरूढ स्त्री-पुरुष असे शिल्पही दिसते. हे संपूर्ण स्त्री - पुरुष तसेच पशू अत्यंत बारीक निरीक्षण करून कोरलेले आपल्याला पहायला मिळतात. यातील उजव्या बाजूच्या अर्धस्तंभशीर्षावर नीलगाय आहे.नीलगाय हा प्राणी उत्तर महाराष्ट्रात आणि मध्य भारतात दिसतो.त्याचे इथले शिल्प कसे कोरले असावे असा प्रश्न पडतो. या सर्व प्राण्यांवर आरुढ झालेल्या स्त्री - पुरुषांची शिल्पअत्यंत प्रमाणबद्ध कोरलेल्या आपल्याला पहायला मिळतात. हे स्त्री-पुरुष हातातील कंकण, माळा, कर्णफुले, अशा विविध आभूषणांनी नटलेले आहेत.प्रत्येक पुरुषाच्या डोक्यावर शिरस्त्राण दिसते. या मूर्तीमुळे प्राचीनकाळातील महाराष्ट्राची संस्कृती आणि पेहेराव आपल्याला कसे होते हे समजते.इतक्या रेखीव मूर्ती त्याकाळी फक्त छिन्नी हातोड्याने कशा बनवल्या जात असतील? खरंच अद्भुत आहे. त्यातून हा अग्निजन्य खडक (बसाल्ट) अतिशय टणक आणि कठीण.



चैत्यगृहाच्या बाहेर असलेल्या दोन दरडींवर वर जाण्यासाठी पावठ्या खोदलेल्या आहेत. त्या चढून वर गेलो तर लेण्याचे एकदम वेगळ्याच कोनातून अतिशय सुरेख दर्शन होते. आपण त्या दोन खांबाच्या शिरोभागाच्या अगदी जवळ असतो. खालून न दिसलेले कोरीव काम आता अगदी पुढ्यातच दिसते. चैत्यगृहाची कमानही अगदी समोरच दिसत असते. जवळून हा सर्वच देखावा अतिशय भव्य वाटतो. पूर्वजांच्या कौशल्याने मन अगदी विस्मित होते.


प्रासाद व गवाक्षांची जाळीदार रचना.

Bedse Caves: Gate

०८. सुंदर कलाकृती

०१. बेडसे लेणीचा समोरून घेतलेला फोटो. पिंपळ पानाची कमान.

पिंपळपानाकृती चैत्यप्रवेशद्वार

   दोन खांबाच्या बरोबर मध्ये चैत्यगृहाचे पिंपळपानाकृती कमान असलेले प्रवेशद्वार. त्यावर नक्षीदार जाळी कोरलेली. बाजूच्या दोन्ही भिंतींवर अनेक मजली प्रासादांचे देखावे. त्यामध्येच गवाक्ष, एकावर एक चढत जाणारे अतिशय सुंदर कोरीवकामाने सजलेले. खालचे बाजूला विश्रांतीसाठी विहार खोदलेले.लेणीचे आणखीन वेगळेपण म्हणजे त्याचा सजलेला अलंकृत भव्य दर्शनी भाग. आखीव, रेखीव प्रत्येक मजल्यावर छोटी चैत्यतोरणे, गवाक्षे, वेदिकापट्टी सारं काही प्रमाणबद्ध आहे. व्हरांडाच्या अन्य भागावरही चैत्यकमानी, वेदिकापट्टींचे नक्षीकाम केलेले. या व्हरांडातच शेजारच्या भिंतीत प्रत्येकी दोन विहार आहेत.उजवीकडच्या एका विहाराच्या वरती एक लेख कोरलेला आहे.



ह्याचे वाचन:
नासिकान अनदस सेठिस पुतस पुसणकस दान-
अर्थ: नासिकवासी शेठ आनंद ह्याचा पुत्र पुष्यणकाचे दान-
 
नासिकचा कोणी दानशूर व्यक्ति प्रवास अवघड असण्याच्या त्या दिवसात इतक्या दूरवर येऊन दान देतो हे लक्षणीय आहे. लोहगड-विसापूरमधील खिंड ही चौल बंदरामधून देशावर जाणार्‍या व्यापारी मार्गावर होती असे वाचले आहे. नाशिकमधील व्यापार्‍याला त्या कारणाने अनेकदा ह्या भागामध्ये येजा करावी लागत असणार असा तर्क.
  नाशिकच्या आनंद नावाच्या व्यापाऱ्याच्या मुलाने ही खोली बांधली असल्याचा उल्लेख त्यावर आहे. एका शिलालेखात या भागाचे नाव ‘मारकुड’ असल्याचा उल्लेख देखील सापडतो. ज्या धनिकांनी, व्यापाऱ्यांनी अथवा राजांनी ही लेणी खोदण्यासाठी अनुदान दिले त्यांची नावे इथे ब्राह्मी लिपीमधील शिलालेखात आढळून येतात. पण ज्यांनी इतकी अद्भुत शिल्प खोदली मग ती कार्ले भाजे लेणी असूदेत किंवा अगदी वेरूळची लेणी; या शिल्पकारांची नावे मात्र कुठेही दिसून येत नाही. इतक्‍या सुबक आणि रेखीव मुर्त्या, शिल्पकाम पाहून मनोमन खात्री पटते : हे अनाम शिल्पकार, वास्तुरचनाकार खरे प्रतिभावंत. 

हर्मिका व तिच्यावरील लाकडी कमलपुष्पाकृती छत्र

  पिंपळाकृती कमानीतून आत एका ओळीत दिसणारे खांब, समोर मधोमध चैत्य. खांब किंचित चैत्याच्या दिशेने झुकलेले. वेदी, मेढी, हर्मिका अजूनही ठशठशीत. विशेष म्हणजे हर्मिकेवरचे लाकडी छत्र सुमारे २००० वर्षांपूर्वीचे अजूनही शाबूत. कमलपुष्पांसारखी देखणी रचना असलेले. प्राचीन स्थापत्यकलेचा अजूनही शाबूत असलेला एक चमत्कारच.दरवाज्यातून आतमध्ये गेल्यावर आतील चैत्यगृह आणि त्याचे झुकते खांब एक वेगळीच रचना दर्शवतात. मुख्य चैत्यगृह हे २६ झुकत्या खांबांवर उभे केलेले आहे. चैत्यगृह हे अत्यंत साधेच आहे. येथील स्तुपाची लाकडी हार्मिका आजही लक्ष वेधून घेते.बेडसे लेण्यांमधील चैत्यलेणे हे संपूर्ण बेडसे लेण्याच्या समूहात एकुलते एक आहे. हे चैत्यगृह सुमारे १५ मीटर लांब आणि ७ मीटर रुंद आणि १० मीटर उंच असे बांधलेले आपल्याला बघावयास मिळते.आतल्या बाजूस असलेल्या भिंतीमधील खोल्या व व्हरांड्याच्या शेवटी खडकातच कोरलेले चैत्यगृह. या सगळ्यात सर्वात आकर्षक दिसतो तो स्तूप.  मुख्य पुजावस्तु आधीच्या काळातील स्तुपापेक्षा वेगळा असून तो दंडगोलाकार आहे.स्तुपाच्या निरनिराळ्या उंचीवर कठडे कोरलेले दिसतात.हे कठडे म्हणजे प्रदक्षिणापथ असल्याचे सुचवले आहे. हे कठडे आणि हार्मिका एकाच पाषाणात कोरलेले आहेत. हार्मिकेवर लाकडी यष्टी आणि छत्र आहे.
पूर्वी बेडशाच्या छतालाही लाकडी तुळया होत्या. तुळया पुढे चोरल्या गेल्या असे वाचण्यात आले. चैत्याची हर्मिका अजूनही चांगल्या स्थितीत आहे.GBPP च्या गॅझेटमध्ये ( Gazetteer of the Bombay Presidency : Poona Part III ) लिहिले आहे की ‘सन १८४४ मध्ये या लेण्यांची पाहणी केली असता छताकडील लाकडी अर्धगोलाकार तुळव्या शाबूत दिसल्या. १८६१ मध्ये भेट देणाऱ्याने अशी नोंद केली आहे की लाकडी तुळव्यांचे तुटलेले तुकडे खाली पडले आहेत. 
हर्मिका म्हणजे स्तूपाचे अण्ड आणि छत्र यामधील पायऱ्यापायऱ्याची चौकोनी रचना. बौद्ध धर्मात सात स्वर्गांची संकल्पना असल्याने बरेचदा ह्या हर्मिकांच्या पायऱ्या संख्येने सात आढळतात. हर्मिकेच्या सर्वात वरच्या थरात एक खड्डा असतो, त्यात बहुतकरून बुद्धाचा किंवा बौद्ध धर्मातील प्रमुख गुरूंचा एखादा अवशेष (अस्थी, दन्त, केश इ.) असतो व त्यावर छत्र असते.
Bedse Caves Dagoba

 ०७. स्तूप 

स्तूप

बेडसे लेणीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे कलते खांब, झुकलेल्या भिंती, गजपृष्ठाकृती छत,चैत्याकार गवाक्षांची आणि वेदिकांची रचना स्तुपावर असलेली विस्तीर्ण लाकडी हार्मिका. खां साधेच आणि अष्टकोनी आहेत यावरुन या लेण्याचे प्राचीनत्व सिध्द होते. चैत्यगृहात बुध्दाच्या मुर्तीएवजी प्रतिक म्हणून स्तुप कोरला आहे. याचा अर्थ हि लेणी हीनयान किंवा थेरवादी पंथाने कोरली आहेत. एकंदरीत इथली रचना बघता हि लेणी इ.स.पू. १ ल्या शतकातील उत्तरार्धात या लेण्या कोरली गेली असावीत. या लेण्याची आजचे नाव जरी बेडसे असले तरी या लेण्यामध्ये एका शिलालेखाच्या वाचनातून या लेण्याचे नाव ' मारकुड ' असे आपल्याला समजते. बेडसे लेण्यांच्या या प्राचीन पाउलखुणा शोधत आपण एक एक वास्तुविशेष निरखत फिरायला लागलो इथे येणारे व्यापारांचे तांडे आपल्या डोळ्यासमोर येतात.पर्जन्यकाळात विसापुरच्या आणि भातराशी डोंगरातून येणारे बौध्द भिक्षुंचे तांडे मनचक्षुसमोर उभे रहातात आणि लेण्याचे प्रयोजन स्पष्ट होते.
०६. चैत्यगृह (बुद्धिस्ट प्रार्थना दालन)
    प्रत्येक चैत्यकमानीमध्ये फुला-पानांची सुंदर नक्षी कोरलेली दिसते. दालनात एकूण २६ खांब आहेत.गुळगुळीत स्तंभ आणि त्यावरील नक्षीकाम पाहताना त्याकाळातील शिल्पकाराला हात जोडावेसे वाटतात.  या खांबाच्या आतल्या बाजूने प्रदक्षिणा घालत असताना मानसिक शांती लाभते. चैत्यगृहातील सुरुवातीचे दोन खांब सोडले तर बाकी उर्वरित सर्व अष्टकोनी आकाराचे आहेत.

फोटोतील पहिल्या दुसऱ्या व तिसर्‍या स्तंभावर त्रिरत्नाचे प्रतीक आहे,तर पहिल्या स्तंभावर समोर पंच्चशिलेचं प्रतीक आहे शेवटी अवकाशाचे प्रतीक आहे आणि बाकी सारे फुले आहेत.

 यातील उजवीकडच्या काही खांबांवर कमळ, चक्र, त्रिरत्न आदी मंगलचिन्हे कोरलेली आहेत.

बेडसे लेण्यांचा पहिला फोटो हेनरी क्यूसेन्स यांनी १८७९ मध्ये काढला. याच दरम्यान कुणी ब्रिटिश अधिकारी येणार असल्याने चुना फासून मूळ चित्रे नष्ट केली गेली.

सन १८७९ मध्ये बेडसा लेण्यांचा पहिला फोटो हेनरी क्युसेन्स याने काढला आणि मग जगाला या सुंदर लेण्यांची माहिती झाली. त्यावेळी बेडसा गावाची लोकसंख्या अवघी २२० होती. 
      या चैत्यगृहात १८६१ पर्यंत हा प्राचीन सुंदर चित्रकाम केलेले टिकून होते. त्यावर्षी कुणी मोठा इंग्रज अधिकारी ही लेणी पाहण्यास येणार होता. त्याच्यासाठी साफसफाईचे करण्यात आली. सरकारी लोकांनी ही लेणी साफ केली. त्यामध्ये तग धरून असलेली चित्रेही पुसून गेली.
ही हीनयान पंथीयांची गुहा असून ते मूर्तिपूजक नाहीत त्यामुळे बुद्धाची मूर्ती आढळून येत नाही. पूर्वी इथे खांबांवर बुद्धाची आणि त्यांच्या शिष्यांची काही रंगीत चित्रे होती. ही चित्रे १८६१ पर्यंत अस्तित्वात असल्याची नोंद बॉम्बे गॅझेटियरमध्ये सापडते. त्यानंतर कोणी बडा इंग्रजी अधिकारी येणार म्हणून स्थानिक इंग्रज अधिकाऱ्याने ही सर्व चित्रे खरवडून काढली आणि त्यावर सफेदीचा हात दिला आणि अजून एका अनमोल ठेव्याला आपण मुकलो.
   आर्श्चय कारण्यासारखी गोष्ट बेडसेतील चैत्यगृहात व विहारात पहावयास मिळाली ती म्हणजे मावळ प्रदेशात जोराचा पाऊस पडतो परंतु आतमध्ये पाण्याची ओल, कुठे तरी टिपटिप पाणी पाजरणे असा प्रकार येथे दिसला नाही. यावरून त्याकाळच्या स्थापत्यकारांचे कौतुकच करावयाचे वाटते.
बेडसा लेण्यांमध्ये तीन कोरीव लेख आहेत. बेडशातील लेखांचे वाचन बर्जेस-इंद्राजी ह्यांच्या पुस्तकात असे दिले आहे:त्यातील दुसरा एका स्तूपामागील शिळेवर कोरला आहे. तो असा आहे:

ह्याचे वाचन:
....य गोभूतिनं आरणकान पैण्डपातिकानं मारकटवासीनं यूपो
....वासिना भतासाळमितेन कारित
(आरणक = संस्कृत आरण्यक = अरण्यवासी, पैण्डपातिक = संस्कृत पिण्डपातिक = भिक्षेवर उपजीविका करणारा, मारकुटवासीनं = ’मार’ नावाच्या (आता विस्मृत) पर्वतावर राहणारा, ह्या सर्व विशेषणांचे आदरार्थी बहुवचन वापरले आहे.)
अर्थ - हा स्तूप गोभूति नावाच्या अरण्यवासी आणि मार पर्वतावर राहणार्‍या भिक्षूंसाठी xxxवासी भट्टाषाढमित्राने बनविला.
“मारकुडवर रहाणाऱ्या, भिक्षेवर उदरनिर्वाह करणाऱ्या आरण्यक गोभूतीचा हा आषाढमित्र भट्टाने बाांधलेला स्तूप आहे”. या शिलालेखावरून असे समजते कि बेडसे लेणीचे पूर्वीचे नाव 'मारकुड' असे होते. 





 खरतर हे चैत्यगृह हेच बेडसे लेणी मुख्य आकर्षण म्हणता येईल.ते पाहून बाहेरच्या बाजूस आलो असता चैत्यगृहाच्या डाव्या बाजूस आपल्याला एक खांब बांधून काढलेली खोली दिसते ती खोलीचे छत अर्धवर्तुळ आकारात तयार केलेली आपल्याला पहावयास मिळते तसेच या खोलीत पाण्याचा चर देखील पहायला मिळतो. पाणी वाहून जाण्यासाठी दगडात केलेली हि योजना पाहण्यासारखी आहे.या खोलीच्या बाजूस अर्धवट खोदलेले बाकडे दिसते तसेच त्याच्या बाजूस एक पाण्याचे टाके बघावयास मिळते तसेच त्याच्या शेजारी अजून एक पाण्याचे टाके बघावयास मिळते. येथील कुंडातील काठोकाठ भरलेले स्वच्छ थंडगार पाणी म्हणजे तहानलेल्यासाठीं अमृतकुंभच आहेत.पुरातत्व विभागाने सध्या तरी या ठिकाणी लोखंडी जाळी टाकून बंद केलेले आहेत. या कुंडांसाठी दान महादेवी सामदिनीका यांनी दिल्याचा तेथे उल्लेख आहे.त्या टाक्यावर एक ब्राम्ही शिलालेख आपल्याला पहावयास मिळतो तो शिलालेख पुढीलप्रमाणे:-
 
 
 
 

ह्याचे वाचन:
महाभोयबालिकाय म(हा)देवि-
य महारठिनिय सामडिनिकाय
(दे)यधम आपदेवणकस वितियिकाय-
अर्थ - महाभोजाची कन्या महादेवी (राजकन्या) सामदिनिका, आपदेवणकाची द्वितीय पत्नी हिचा दानधर्म
(महाभोज हा ह्या भागातील कोणी अज्ञात राजा दिसतो.)
 
तसेच फिरून परत आपण चैत्यागृहाच्या समोर उभे ठाकतो.बेडसेच्या चैत्यगृहाप्रमाणे विहारही आगळा-वेगळा आहे. चैत्यगृहाप्रमाणे त्याची चापाकार रचना आणि बाजूने भिक्षुकांसाठी राहण्यासाठी खोल्या.चैत्यगृहाच्या बाहेर पडल्यावर उत्तरेच्या दिशेस पाण्याची कुंडे आणि मोठे विहार दिसते.
 
 
 
चैत्यागृहाच्या उजव्या बाजूस आपल्याला एक उत्तमरित्या कोरलेली खोली दिसते.याच खोलीला चिटकून अखंडपणे खोदलेले देखणा विहार दिसतो. बेडसे येथील विहार हे गजपृष्ठाकार ( म्हणजे या विहारांचे छत हत्तीच्या पाठीसारखे गोलाकार आहे,सपाट नाही ) आहे. 
 ०९. विप्पसना केंद्र


या विहारमध्येच जवळपास अकरा खोल्या खोदलेल्या असून त्यांच्यावर उत्कृष्ट कोरीव काम केले आहे. या खोल्यांमध्ये म्हणजे शयनकक्ष आहेत त्यामुळे इथे झोपायला कोरीव दगडी बाक दिसतात. 
  १०.  विप्पसना खोली
वेदिकापट्टी आणि चैत्याकार कमानींनी या सर्व खोल्या एकमेकांना जोडलेल्या आहेत.या विहाराचा बाहेरील काही भाग काळाच्या ओघात पडल्याचे स्पष्ट दिसून येते.या विहाराच्या उजव्या बाजूस सलग खोदलेल्या दोन खोल्या दिसतात. तसेच विहाराच्या उजव्या बाजूने साधारण ५० फुट उंच गेल्यास दोन छोट्या लेण्या खोदल्या आहेत परंतु त्यामध्ये कोणत्याही सुविधा दिसत नाहीत. संपूर्ण लेणे नीट बघितले असता भिक्षुंसाठी अध्ययन आणि अध्यापनासाठी इथे बऱ्याच सोयी केलेल्या आहेत असे पहावयास मिळते. इथे विहाराच्या एका टोकाला एक दगडात कोरलेलं काहीतरी आहे. पण James Ferguson यांच्या नोंदीमध्ये याची नोंद नाही त्यामुळे हे नंतर कोणीतरी उगीचच विद्रुपीकरण केले आहे असे वाटतं.
     नुकतेच बेडसे येथील प्राचीन बौद्ध लेणीपासून काही अंतरावर दोन गुहा आढळून आल्या असून, त्यातील एका गुहेत शिवलिंग आढळले आहे. बेडसेतील राम ज्ञानू दहिभाते, राम हनुमंत दहिभाते, मयूर दहिभाते व सुरेश तोडकर हे रानभाज्या आणण्यासाठी डोंगरात गेले असताना त्यांना या दोन गुहा आढळून आल्या. एक लहान गुहा दगडावर दगड रचून बंद केलेल्या स्वरूपात आढळून आली तर दुसरी गुहा वाढलेल्या झाडांमुळे दिसत नव्हती. स्थानिक नागरिकांनी रचलेले दगड काढून लहान गुहेत धाडस करून आतमध्ये गेले असता त्यांना दीड फूट खोल पाण्याच्या कुंडात छोटे काळ्या पाषाणातील शिवलिंग दिसले.
पहिली गुहा
- गुहेचे तोंड खूप लहान असल्याने फरफटत जावे लागते
- वीस फूट लांब आहे
- दीड फूट खोल पाण्याच्या कुंडात काळ्या पाषाणातील शिवलिंग

  दुसरी गुहा
- दुसऱ्या गुहेचे तोंड मोठे असून 30 फूट लांब
- आत गेल्यावर गुहा निमुळत्या स्वरूपाची आहे
- गुहेत एक माणूस झोपू शकेल अशी जागा

    पूर्वी बेडसे लेणी कोरण्याचे कामे चालू असताना तात्पुरत्या स्वरूपात राहण्यासाठी किंवा त्याअगोदर ध्यानधारणा करण्यासाठी या नैसर्गिक गुहांचा वापर केला असावा. लहान गुहेत पाण्याचे कुंड आहे आणि त्या कुंडात बारा महिने पाणी राहत असावे म्हणून इथे राहण्यासाठी वापर केलेल्या व्यक्तीने किंवा ध्यानधारणा केलेल्या व्यक्तीने कुंडात पिंड ठेवली असावी, असा अंदाज आहे.यासंदर्भात अधिक संशोधन होणे गरजेचे आहे.
   अजून काय पाहाल :
बेडसे लेण्यांना भेट देण्याबरोबरच आपण परिसरातील कार्ला लेणी, भाजे लेणी, लोहगड, विसापूर, तिकोनागड, पवनानगर येथील पवना धरण, प्रति पंढरपूर, नारायणी धाम, सोमाटणे फाट्यावरील टेकडीवरील गणेश्,तळेगावजवळील ईंदोरे गावातील गढी हे पाहु शकतो. उन्हाळ्याच्या उत्तरार्धात आपण बेडसे लेण्यांना भेट दिली तर पवना धरणाच्या पाण्यात ६ महिने बुडालेले वाघेश्वर मंदीर ( व्याघ्रेश्वर मंदीर ) पाणी कमी असल्याने बाहेर आले असल्यास पाहु शकतो.
 
संदर्भ :-
१) पुणे जिल्हा गॅझेटीयर
२) आडवाटेवरचा महाराष्ट्र- प्र.के.घाणेकर
३) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
४) धम्मचक्र टीम, https://dhammachakra.com/beautiful-historic-and-extremely-enchanting-bedse-caves-4579-2/
५) www.ferfataka.blogspot.in
६ ) Cave Temples of India:- James Burges and James Fergusson. 1880.
७) https://www.dainikprabhat.com/a-trip-to-the-bedside-caves/
 ८)  श्री.राज बलशेटवार, सागर बोरकर यांचे लिखाण















No comments:

Post a Comment

Aihole

 आयहोळ येथील डोल्मेन :        सध्या बहुतेक पर्यटक आयहोळला चालुक्यांच्या सुरवातीच्या काळात बांधलेल्या मंदीरांना भेट देण्यासाठी येतात. मात्र ल...