Thursday, November 25, 2021

गोमाशी लेणी

 ज्या वृक्षाखाली ध्यान करताना सिद्धार्थ गौतम म्हणजेच गौतम बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली तो "बोधिवृक्ष"! हे वाक्य पहिल्यांदा शाळेच्या पुस्तकात वाचलेले! शाळेच्या धड्यात पाहिलेले ते चित्र आजही डोळ्यासमोर आहे!

१७ तारखेच्या वारसा सहलीमध्ये "गोमाशी लेणी" ला भेट दिली. छोट्याश्या गुहेत स्थिरावलेली बुद्धप्रतिमा पाहिली आणि शाळेच्या धड्यात कागदावर रेखाटलेले चित्र "सचित्र" झाले! मी आपसूकच नतमस्तक झाले!

कोंडाणे लेणीला भेट देऊन पाली मार्गे आम्ही "गोमाशी लेणी" इथे आलो. "गोमाशी" रायगड जिल्हा आणि सुधागड तालुक्यातील हे गाव! गोमाशी गावापासून साधारण एक किमी लांब! कोलाडगाव देखील जवळच!

जवळच्या हमरस्त्यावरूनच काय परंतु रस्त्यापासून आत चालायला सुरुवात केली तरीही कल्पना आली नाही. "गोमाशी लेणी" इतकी एकांतात, जंगलात, डोंगराच्या खोबणीत कोरलेली लेणी आहे. लेणी कडे जायला थोड्या पायऱ्या आहेत.









पायऱ्या चढून गेल्यावर एकच गुहा दिसली. गुहेच्या प्रवेशद्वारातून गुहेत प्रवेश केला. 


स्तिमित झाले. समोर पद्मासनात ध्यानस्थ अवस्थेत, बोधिवृक्षाखाली विराजमान, गौतम बुद्धाची सुबक-सुरेख कोरीव शिल्प! जरा निरखून बघितले तर उजवा हात जमिनीला स्पर्श केलेला आणि डावा हात डाव्या पायाला!    






गुहेबाहेर, डोंगराच्या पल्याड होणारा सूर्यास्त, गुहेवर वर्षाव झालेले तांबूस सूर्यकिरण, आसमंतात भरून राहिलेली शांतता, संथ वाहणारी सरस्वती नदी आणि समोर ध्यानस्थ बुद्ध! "कपिलाषष्ठी योग"! एक अत्यंत "दुर्मिळ योग" अनुभवला!

उत्सुकतेपोटी नंतर थोड "गुगल सर्च" केल. दोन गोष्टींनी वेधून घेतलं. पहिलं विख्यात वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. हेमा साने यांनी लिहिलेले " बुद्ध परंपरा आणि बोधिवृक्ष" नावाचे पुस्तक. त्यांनी लिहिले आहे, "पद्मासनातील बुद्धाने त्याचा हात जमिनीला टेकला, जणू तो सूचित करू इच्छित होता की भूमी साक्ष आहे, सिद्धार्थ अविचल होता. तो त्याच्या ध्यान धारणेपासून ढळला नाही. तो त्याची भूमिस्पर्श मुद्रा! (पुस्तकातील चित्र सोबत जोडत आहे) ह्या घटना ज्या वृक्षाखाली घडल्या, सिद्धार्थ ला जेथे शाश्वत सुख शांतीचा मार्ग सापडला व तो बुद्ध झाला, तो वृक्ष होता पिंपळ, अश्वत्थ! सिद्धार्थचा ज्ञानवृक्ष बोधिवृक्ष! Wisdom Tree! "

गुगल ने दाखवलेला दुसरा संदर्भ " Gomashi Monastery , near Kolasd, Maharashta". (सोबत जोडत आहे) त्यात नमूद केले आहे की गोमाशी लेण्यांचा प्रथम शोध Rev J. E. Abbott यांनी १८८९ मधे लावला. १९५४ साली या लेण्याला संरक्षित स्मारक असे घोषित करण्यात आले.

त्या लेखा खाली एक संदर्भ दिला आहे. तो पुढीलप्रमाणे: पुण्यातील डेक्कन कॉलेज चे प्राध्यापक, डॉ. श्रीकांत गणवीर यांचा " Buddhist Caves at Gomashi in Konkan"  हे शीर्षक असलेला रिसर्च पेपर IPRA, vol3, issue2, April-June, 2009, 55-57 ह्या जनरल मध्ये प्रकाशित झाला आहे.
अशी ही दुर्मिळ "गोमाशी लेणी"!


"फिरस्ती महाराष्ट्राची" तर्फे शंतनू परांजपे आणि अनुराग वैद्य यांनी ही लेणी भेट आयोजित केल्याने शाळेतील धडा आज साक्षात सचित्र समोर दिसला! लेणी परिसरातील मांगल्य, पावित्र्य मी अनुभवले.
नक्की भेट देऊन तुम्ही तुमच्या परीने तो अनुभव घ्या! 

http://www.savitakanade.com/2019/02/blog-post_21.html
गोमाशी लेणी ही अतिशय निसर्गरम्य ठिकाणी वसलेली आहेत. शेजारून वाहणारी सरस्वती नदी, डोंगरातील खोब्ण्यात कोरलेले लेणे आणि आजूबाजूला असलेला जंगल परिसर यांच्यामुळे या लेण्याची सफर अत्यंत आल्हाददायक होते. दूर दिसणारे सुधागड आणि तैलबैल यांचे दर्शन घेत घेत आपण पुरातत्व विभागाने बांधलेल्या पायऱ्या चढायला सुरुवात करतो आणि केवळ पाचच मिनिटांमध्ये लेण्यांच्या जवळ पोहोचतो.
या अनगड पण सुंदर लेण्यांबद्दल सविस्तर माहिती 'फिरस्ती महाराष्ट्राची' या पुस्तकात दिली आहे. ती आवर्जून वाचावी




Tuesday, November 16, 2021

ठाणाळे लेणी

 महाराष्ट्रात विविध ठिकाणी कोरीव लेणी तसेच चैत्यगृह, विहार व स्तूप आहेत. त्याप्रमाणे सुधागड तालुक्‍यातदेखील खडसांबळे, गोमाशी आणि ठाणाळे अश्या तीन ठिकाणी लेणी पहायला मिळतात. मात्र बहुतेक पर्यटक भेट देतात ते पालीच्या बल्लाळेश्वराला आणि उन्हवर्‍याच्या गरम पाण्याच्या कुंडाना. हौशी दुर्गभटके सरसगड आणि सुधागडाची दुर्गयात्रा करतात.हल्ली दोन्हीकडे सर्वसामान्य पर्यटकांचाही राबता वाढला आहे.मात्र फार क्वचित कोणी हि लेणी किंवा शैलकृत्य बघायला जातात.आज आपण ठाणाळे लेण्याची माहिती अभ्यासणार आहोत. २००० वर्षांपूर्वीच्या महत्त्वाच्या व्यापारी मार्गावर (चौल बंदर ते देशावरची गावे) - दुर्ग (सरसगड, सुधागड, तेलबैल, घनगड), घाटवाटा (सवाष्णी, वाघजाई) आणि पावसाळ्यात वर्षावासासाठी खोदलेली लेणी (खडसांबळे, ठाणाळे) अशी नक्षी या परिसरात विखुरलेली आहे.काळाच्या झंझावातासोबत बरंच काही हरवून गेलं असलं, तरी अजूनही जाणवताहेत या दुर्ग-लेणे-घाटवाटांनी अनुभवलेल्या या मातीतल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाची आणि संस्कृतीची स्पंदनं जाणवता आणि त्यासाठी तरी लेण्यांना भेट द्यायलाच हवी!!!

       ठाणाळे गावालगत प्राचीन लेणी आढळतात. त्यांनाच ‘ठाणाळे लेणी’ असे म्हणतात. पालीपासून १२ किमी अंतरावर नाडसूर गाव आहे. या गावाच्या उत्तरेकडे दोन किमीवर ठाणाळे हे गाव. तिथून साधारण एक-दीड तास पायी डोंगरावर चालत जाऊन ठाणाळे लेण्यांपर्यंत पोहोचता येते. साधारणतः या लेण्यांचा कालखंड इ. स.पूर्व दुसऱ्या शतकापासून ते पाचव्या शतकापर्यंतचा आहे.

      रायगड जिल्ह्यातील बौद्ध (थेरवाद) लेणी-समूह. या लेणी ‘नाडसूर लेणी’ या नावानेही ओळखल्या जातात. वास्तविक पाहता ही लेणी ठाणाळे गावाच्या हद्दीत असून ती येथून जवळही आहेत. परंतु सुरुवातीच्या काळात संशोधक नाडसूरमार्गे तेथे पोहोचल्यामुळे ‘नाडसूर’ हे नामाभिधान रूढ केले होते. ही लेणी पाली-सुधागडपासून वायव्येस सुमारे २७ किमी. अंतरावर आहेत. पालीहून ‘पेडली’ १० किमी. व तेथून ठाणाळ्यापर्यंत ७ किमी. अंतर पार करून आल्यानंतर पुढे पायवाटेने डोंगरात सुमारे ५ किमी. वर घनदाट जंगलात ही लेणी खोदली आहेत. येथे पोहोचण्यासाठी खोपोली-पाली हा मार्गही सोईस्कर आहे.   
  पालीवरुन ठाणाळे गावाला जाणारी बस पकडावी किंवा स्वतःचे वाहन असेल तर अधिक उत्तम. पाली ते नाडसुर एस.टी.बसच्या फेर्‍यांचे वेळापत्रक
                    सकाळी ७.१५,९.४५, ११,१.३०, २.४५, ३.४५, ६.८.१५
  नाडसूरवरुन परतीच्या बसची वेळ चौकशी करुन नक्की करावी म्हणजे लेणी बघुन त्याप्रमाणे परतीचे नियोजन करता येईल.ठाणाळे गावात दुकाने/ घरगुती हॉटेल्स आहेत.त्यामुळे या परिसरातील इतर भटकंती करताना त्याला जोडून ठाणाळे गावात मुक्काम करुन देखील हि लेणी पहाता येतील. ठाणाळे गावात लेण्यांना जायच्या वाटेची चौकशी केली, तर गाईड घ्याच असा आग्रह होतो.बहुतेकदा गाईड अवाजवी किंमत मागितात. स्वतः जाऊ म्हणल्यावर वाटेची सपशेल चुकीची माहिती दिली जाते.लेण्यांपाशी पाणी नाही, तेव्हा गावातच पाणथैल्या भरुन घ्यायच्या.
 
 ठाणाळे गावातून दिसणारा लेण्यांचा डोंगर
 
 गाईड घेउन किंवा स्वतःच वाट शोधून ठाणाळे लेण्यांकडे निघाले कि मंद चढाची गच्च झाडीतली वाट सुरु होते.ठाणाळे गावातून लेणी अगदी समोर दिसली तरी प्रत्यक्षात तिथे पोहचायला तास, दिड तास लागतात. गावातून बाहेर पडल्यावर समोर दरी असल्याचे लक्षात येते.दरी डावीकडे ठेवत त्या दरीच्या काठावरुन वर चढायला लागायचे. उजवीकडे सवाष्णी घाटाची गर्द झाडीभरली सोंड दिसते. पण सवाष्णी घाटाच्या वाटेने थेट ठाणाळे लेण्यांकडे उतरणे अवघड. 

 
 
 
 
   वाटेत होणारे लेण्यांचे दर्शन
 
पाऊण तासानंतर सह्यकड्यांच्या कुशीतली ठाणाळे लेणी खुणावू लागतात.

 




 पावसाळी ओढा
 
वरच्या अंगाला दोन डोंगर जोडलेले दिसतात. त्या जोडातून एक धबधबा पडतो. सप्टेंबर, ऑक्टोबरपर्यंत त्यातून पाणी निथळते. या मोठ्या ओढ्यापाशी दोन खुणांचे बाण. एक डावीकडे. दुसरा बाण उजवीकडच्या उभ्या चढावर नेणारा.
 याच त्या बाणाच्या खुणा
 
 उजवीकडच्या बाणावर मोट्ठी फुली मारून तिकडे जाऊ नये, असं सांगणारा. मात्र डावी वाट हि चुकीची असून हि उजवी वाटच आपल्याला लेण्याकडे नेते.असे असून इथे फुली का काढली हे समजत नाही.कदाचित ट्रेकर्सच्या वाटा चुकाव्यात, असा हेतू असेल!??
उजवीकडची वाट उभ्या चढावरून डावीकडे लेण्यांपाशी घेऊन जाते. 

 
 
वाटेत आपल्याला सुरेख झाडीचे टप्पे लागतात.त्यामुळे उन्हाचा फारसा त्रास होत नाही.इथवर खडी चढाईमुळे आपण  दमतो.पण आता चढाई संपून आडवी वाट ( ट्रॅव्हर्स ) चालायचा असतो. साधारण दिड तासात आपण लेण्यांपाशी पोहचु शकतो. 


 अखेरीस आपण लेण्यापाशी येउन पोहचतो.
शोध
    हा तेवीस लेण्याचा समूह सर्वप्रथम रेव्हरंड जे.ई. अ‍ॅबोट  मराठी मिशन मुंबई यांनी जानेवारी इ.स.१८८९ मध्ये पाहिला. तत्कालीन सुप्रसिद्ध पुरातत्त्व तज्ज्ञ हेन्री कझिन्स या संशोधकाच्या नजरेसमोर आणल्यामुळे कझिन्सने त्याच वर्षी ठाणाळे लेण्यांना भेट दिली आणि इ.स.१९११ मध्ये त्याने "नाडसूर आणि खडसामला लेणी Caves at Nadasur and Kharasamla हे पुस्तक प्रकाशित केले. खडसामला किंवा खडसांबळे लेणी नेणावली लेणी समूह ठाणाळे लेणीच्या दक्षिणेस नऊ किमी अंतरावर आहे. ठाणाळ या शब्दामधील ठाण म्हणजे स्थान अर्थात पूजास्थान असा केला जातो. इ.स.पू. दुसऱ्या शतकात ठाणाळे लेण्याची निर्मिती झाली असावी.    
यानंतर ग. ह. खरे (१९४५), ल्यूडर (१९१२), मो. ग. दीक्षित (१९४२), विद्या दहेजिया (१९७२), म. न. देशपांडे (१९८१), म. के. ढवळीकर (१९८४) इ. संशोधकांनी या लेणींवर कमी-अधिक प्रकाश टाकला.
म. न. देशपांडे यांनी, नाशिकच्या पांडू लेणीतील एका शिलालेखात उल्लेखिलेला ‘सिरिटन’ पर्वत म्हणजेच आजचे ठाणाळे असावे, असा तर्क लावला आहे. यासाठी त्यांनी ठाणाळे लेणीत असणाऱ्या ‘श्री’ म्हणजे लक्ष्मीच्या चार शिल्पांचा दाखला दिला आहे. या परिसरात ‘खडसांबले’ व ‘गोमाशी’ या नावाची इतर लेणीही आहेत.    
अ‍ॅबट यांच्या मतानुसार चौल बंदराकडून देशाकडे जाणार्‍या प्राचीन मार्गावर हि लेणी आहेत. संशोधक श्री.म.न.देशपांडे यांच्या मते चौल बंदरापासून वाघजाई घाटातून मावळात जाणारा प्राचीन मार्ग या लेण्यांजवळून जातो. ठाणाळे,खडसांबाळे व गोमाशी हे लेणीसमुह चौल बंदराच्या आश्रयाने खोदले गेले असावेत.काही संशोधकांच्या मते चौल बंदरातून नागोठणे खाडीमार्गे बोरघाटातून मावळात जाणार्‍या प्राचीन मार्गावर या लेणी आहेत.
    इ.स. पाचव्या शतकानंतर मात्र बौध्द भिक्षुंनी या लेण्यातील वास्तव्य बंद केले.अलीकडच्या काळात ब्रिटिशांशी लढताना वासुदेव बळवंत फडके यांनी या लेण्यांमध्ये आश्रय घेतला होता.     

ठाणाळे लेणी          

 रचना
    येथील सर्व लेणी पश्चिमभिमुख आहेत. या लेणी समुहात एक चैत्यगृह, एक स्मारक स्तुपसमुह व उर्वरीत २१ विहार आहेत. बहुतांश लेण्याच्या दगडात तांबड्या मुरुमाचा थर असल्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. तरीसुध्दा लेणे क्रमांक ३,७,८,१३ व १५ दखलपात्र आहेत. बहुतेक विहारांची रचना पुढे व्हरांडा व मागे दालन अशी आहे. त्यात झोपण्यासाठी ओटे आहेत.या लेण्या पश्चिमाभिमुख असून त्या दक्षिणोत्तर पसरल्या आहेत.कझिन्सने मात्र येथील एकूण लेणींची संख्या १८ सांगितली आहे. येथील प्रस्तरामध्ये एक लाल रंगाचा ठिसूळ पट्टा (bole) आल्याने लेण्यांत आवश्यक फेरफार केल्याचे दिसून येते.
   या लेणी साधारण आहेत आणि इ.स.पू. पहिल्या शतकातील आहेत. यामध्ये दोन चैत्य, दोन स्तूप आणि बाकीचे विहार आहेत. या लेण्यांमध्ये बौद्ध स्थापत्याचा प्रभाव दिसतो. त्यातील काही शिल्पे सुबक असून काही पूर्णावस्थेत नाहीत असेही दिसते. लेण्यांतील चैत्यविहाराच्या छतावर अप्रतिम नक्षीकाम आहे.      
        आता आपण एकेक लेण्याची सविस्तर माहिती घेउया. 
लेणे क्र. १ व २:-
  या दोन्ही लेणी समोर दालन व मागे छोटी खोली अशी रचना असलेल्या आहेत. पहिल्या लेण्यात दोन तर दुसर्‍या लेण्यात तीन ओटे आहेत.    
Panorama of Thanale Caves
लेणे क्र. ३:-
   हे लेणे ८.५ मी ५ मी आकाराचे लेणे असून हे स्तुपस्मारक आहे, म्हणजे याठिकाणी अनेक स्तुप एकत्रित कोरले आहेत. इथे सहा एकाश्म म्हणजे एकाच दगडात कोरलेले तर दोन देवळीतील असे एकुण आठ स्तुप आहेत. याशिवाय इथे पाच बांधीव दगडमातीचे स्तुप होते असे म्हणतात.म्हणजे इथे तेरा स्तुप होते. या सभागृहाच्या मागच्या भिंतीत उजव्या बाजुस देवळी असून त्यात एक पुर्ण स्तुप कोरलेला होता तर उजव्या भिंतीतवर स्तुपाचे उठावाचे शिल्प होते. एकाच दगडात कोरलेले एकाश्म स्तुपांचा आकार १ ते १.६ मीटर व्यास आहे.श्री. देशपांडे यांच्या मते या एकाश्म स्तुपात पाच बांधीव स्तुप होते ,जे आता नष्ट झालेले आहेत. सभागृहाच्या मागील भिंतीत दोन खोल्या असून त्यात शयनओटे आहेत.
  एकुण अवशेष विचारात घेता या लेण्याच्या सुरवातीला प्रतिकात्मक स्तुप्,त्याच्यामागे भिक्षुंसाठी खोली किंवा विहार कोरला असावा, इथल्या पहिल्या स्तुपावर वेदीका कोरलेली नाही , मात्र स्तुपाच्या अंडावर असलेल्या खाचेत हार्मिका बसवत असावेत. स्तुपाच्या मागे छताला खाचा आहेत्,याचा अर्थ मागच्या विहाराला लाकडी दरवाजा असावा.

  या लेण्यात सुरुवातीस एक प्रतीकात्मक अलंकरणविहीन स्तूप व त्यामागे एक भिक्षुगृह कोरले गेले. त्यानंतर थोड्याच कालावधीत दक्षिणेच्या बाजूस लेणी वाढवून पहिल्या स्तूपाच्या जोडीला दुसरा एकाश्म स्तूप खोदला गेला. या बौद्ध विहारातील आणखी काही भिक्षू मरण पावल्यावर त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आणखी दोन स्तूप निर्माण केले गेले. यासाठी ही लेणी उत्तरेकडे रुंद करण्यात आली. यानंतरच्या काळात स्तूप क्र. १ च्या मागे असलेले भिक्षुगृह काढून टाकून त्याच्या थोडे दक्षिणेस एकानंतर एक असे अलंकरण केलेले दोन स्तूप खोदले गेले. चौथ्या अवस्थेत भिक्षुगृहाजवळील दक्षिणेकडील भिंतीवर एक वेदिका, चैत्यगवाक्ष आदींनी अलंकृत असा कोनाडा करून त्यात स्तूप कोरला गेला. याचा दर्शनी भाग अजिंठ्याच्या क्र. ९ च्या चैत्यगृहाच्या दर्शनी भागाशी मिळताजुळता आहे. यानंतर असाच एक, पण नक्षीविरहित अर्धगोलाकृती कोनाडा दक्षिणेकडील भिंतीत कोरला गेला. त्यामधील स्तूप अपूर्ण आहे. यानंतर जागा शिल्लक नसल्याने आवश्यकतेनुसार दगडमातीचे बांधीव स्तूप उभारण्यात आले होते. स्मृतिस्तूप खोदण्याची व उभारण्याची अशी परंपरा पितळखोरा, भाजा व कान्हेरी येथेही दिसून येते.
   सर्वात प्राचीन अस्णार्‍या भाजे लेणीत स्तुपावर अलंकरण नाही, म्हणजे सुरवातीला स्तुपावर जास्तीचे कोरीवकाम करण्याची प्रथा नव्हती,मात्र इथल्या स्तुपावर वेदीका अलंकरण आहे,याचा अर्थ हे स्तुप इ.स.पुर्व तिसर्‍या शतकाच्या शेवटी किंवा दुसर्‍या शतकाच्या सुरवातीला कोरले असावेत. इथे असलेल्या तीन व चार क्रमांकाच्या स्तुपांवर पिरॅमिडच्या आकाराच्या हार्मिका आहेत.असे काम साधारण इ.स. पुर्व लेण्यांमध्ये आढळते. हार्मिकेवर यष्टी बसवण्याची सोय दिसत नाही.मात्र फुलांच्या माळा अडकवण्यासाठी खुंट्या बसवण्यासाठी छिद्रे आहेत.
  या लेण्याच्या सभागृहाच्या मागच्या भिंतीत एक कोनाडा करुन त्यात पुर्णाकृती स्तुप कोरला आहे. हि शैली अजिंठा लेणे क्रमांक ९ या चैत्यगृहाच्या दर्शनी भागात पहायला मिळते.यावरुन हे काम इ.स.पुर्व पहिले शतक किंवा थोडे नंतरचे असावे. जेव्हा अखंड दगडात सहा स्तुप कोरले त्यामुळे चैत्यगृहात आणखी स्तुप कोरण्यासाठी जागा शिल्लक राहीली नाही.त्यामुळे उपलब्ध मोकळ्या जागेत दगडमातीचे पाच स्तुप उभारले गेले असावे.असे बांधीव स्तुप उभारण्याची प्रथा पितळखोरे,भाजे ,कान्हेरी इथे दिसते.   
   श्री.देशपांडे यांनी १९५२ साली उत्खनन केल्यामुळे या लेण्यांचा कालखंड निश्चित करता आला. उत्खननात ठोके मारलेली अशोककालीन सात चांदीची नाणी, मातीचे भाजलेले भांडे ,भाजलेल्या मातीतून तयार केलेली स्तुपाची छोटी प्रतिकृती असे अवशेष सापडले. सापडलेली नाणी एकतर लाल मातीच्या भांड्यात ठेवलेली असावीत किंवा स्तुप क्रमांक १ व २ मध्ये असलेल्या हार्मिकेच्या खोबणीत असावीत.या लेण्यातील स्तूपांचा बदलत जाणारा आकार, शैली, अलंकरण व स्तूपांच्या सहज प्रत्ययास येणाऱ्या क्रमांकांवरून साधारणपणे पाच वेळा येथे फेरबदल झाल्याचे मत म. न. देशपांडे यांनी मांडले आहे. 
लेणे क्रमांक ४,५ व ६:-
    चौथ्या लेण्यात प्रवेश करण्यासाठी समोर डाव्या बाजुस पायर्‍या आहेत.मागील भिंतीत उजव्या बाजुस साधा शयनओटा व डाव्या बाजुस देवळीतील ओटा आहे. डाव्या भिंतीत एक खोली असून त्यातही ओटा आहे.
    पाचव्या लेण्यात दोन दालने असून दोन दालनांच्या मध्ये भिंत व त्यात प्रवेशद्वार आहे.या लेण्यात एकुण तीन शयनओटे तसेच डाव्या दालनात पाण्याचे टाके आहे.
सहाव्या लेण्याची रचना थोडी वेगळीच आहे.इथे समोर दालन, मागे उजव्या बाजुस खोली अशी रचना आहे.दालनाच्या मध्यभागी २ मी X २ मी चौरसाकृती तर १ मीटर खोलीचा टबसारखा खड्डा आहे.त्यापुढे एक गोल खड्डा आहे.मागे एल आकाराचा ओटा आहे.डाव्या भिंतीलाही सलग ओटा आहे. मागे असलेली खोलीही साधी आहे.एकंदरीत रचना बघता हे लेणे प्रसाधनगृह म्हणून वापरले जात असावे. 
लेणे क्र. ७:-
  हे लेणे प्रशस्त आहेच शिवाय इथे शिल्पकलाही पहायला मिळते. हे लेणे ठाणाळे लेणीसमुहाच्या मध्यभागी आहे.याच्याच शेजारी ८ क्रमांकाचे चैत्यगृह आहे. हा एक विहार असून समूहातील सर्वांत विस्तीर्ण असा आहे. याच्या रचनेवरून मूळचा लहान विहार नंतरच्या काळात मोठा केल्याचे दिसून येते.याची लांबी १२.१८ मीटर, रुंदी ९.७५ मीटर तर उंची २.७५ मीटर आहे. याच्या तीनही भिंतीत मिळून आठ भिक्षुगृहे असून तिन्ही भिंतीना मिळून ७० से.मी उंचीचा ओटा आहे. ओट्याला लागून तीन जीने आहेत.उजव्या भिंतीत तीन, डाव्या भिंतीत एक तर मागील भिंतीत चार अश्या आठ खोल्या आहेत.
 ठाणाळे लेणी



   मुळात या लेण्यात स्तंभविरहित मंडप होता व त्याच्या दोन्ही बाजूंस दोन भिक्षुगृहे होती. त्यानंतर या मंडपात ७ नवी भिक्षुगृहे खोदण्यात आली. उंचावर व पुढे ओटा असलेल्या या भिक्षुगृहांत प्रवेश करण्यासाठी तीन छोटे सोपान कोरले गेले. देशपांडे यांच्या मते सुरवातीला फक्त सभागृह व दोनच खोल्या असाव्यात.मात्र जशी आवश्यकता वाटली तसे खोल्या वाढवण्यात आल्या.
 
सभागृहाच्या डाव्या भिंतीवर चैत्याकार कोरलेला कोनाडा असून त्याला लागून भिक्षुगृहाची खोली आहे. कोनाड्याच्या दोन्ही बाजुस चौकोनी आकार कोरलेले आहेत.त्यातील एकावर प्राकृत ब्राम्ही शिलालेख कोरलेला आहे. या शिलालेखात राजवंश व तिथीचा उल्लेख नाही.मात्र त्यात गोदत म्हणजे दान देणारा तसेच शिवगनक म्हणजे गोदतचा पिता या व्यक्तीच्या नावाचा उल्लेख आहे. शिलालेखाचा सारांश असा आहे कि 'शिवगणकपुत्र गोदत्त याची देणगी नमुद केली आहे'.कोनाड्याच्या चैत्यकमानीत सुंदर नक्षीकाम बघायला मिळते.तसेच भिक्षुगृहाच्या प्रवेशद्वाराची कमान सरळ नसून आत वाकलेली आहे.हि शैली इ.स.पुर्व दुसरे व पहिले शतकात होती.

      भिक्षुगृहाच्या प्रवेशद्वारावर असणार्‍या दोन्ही बाजुस शिल्पपट असून मध्यभागी वेदीकापट्टी व हार्मिकायुक्त स्तुपाचे उठावशिल्प आहे.त्याच्या एका बाजुस पुरुष व दुसर्‍या बाजुस स्त्री हातात फुले घेउन पुजा करीत आहे.या स्तुपाचा काल लेणी क्र.३ शी समकालीन असावा. भिक्षुगृहात शयनओटा असून वरच्या भागात जाळीदार खिडकी आहे.

लेणे क्र. ७ च्या आतील भाग, ठाणाळे लेणी.

    सभागृहाच्या मागच्या भिंतीत चार भिक्षुगृहे आणि चार कोनाडे आहेत.प्रत्येक भिक्षुगृहात झोपण्यासाठी दगडी ओटा, जाळीदार खिडकी, दरवाज्यावर चैत्याची नक्षी तर काही ठिकाणी शिल्पपट अशी रचना आहे.चैत्याकृती कोनाड्याच्या वर शिलालेखासाठी चौकोनी जागा सोडली असली तरी त्याठिकाणी शिलालेख नाहीत. या सर्व भागावर गिलाव्याचे अवशेष आहेत.त्यावर काही ठिकाणी रंगाचे अवशेष दिसतात.

 

 प्रत्येक देवळीत कोरलेले उठाव आडवे तसेच सुर्यकिरणासारखे मधून बाहेर जाणारे आहेत.तर कमानीत विवीध प्राणी आणि मानवाकृती कोरल्या आहेत. यामध्ये पहिल्या देवळीत पाच फण्याचा नाग्,दुसर्‍या देवळीत समोरासमोर मोहरा घेतलेले बैल.तिसरीत नक्षीकाम तर चौथ्या कोनाड्यात सोंडेत कमळ घेतलेला हत्ती दाखवला आहे. हि चिन्ह सातकर्णी सातवाहन या राजाच्या नाण्यावर दिसून येतात. यावरुन लेण्याचा काळ इ.स.पुर्व दुसर्‍या शतकाचा पुर्वार्ध असावा.
 
मागच्या भिंतीवर उजव्या बाजुस गजलक्ष्मीचा शिल्पपट आहे. यामध्ये गजलक्ष्मी कमलदलात उभी असून तीच्या दोन्ही बाजुला कमळात उभे असलेले हत्ती तीला अभिषेक करीत आहेत. या शिल्पाच्या दक्षिण बाजुला ४५ से.मी.X  ४५ से.मी. आकाराचे दांपत्याचे दोन शिल्पपट आहेत.

 सभागृहाच्या डाव्या बाजुला पाच फण्याच्या नागाचे मोठे वेटोळे कोरले आहे. प्रवेशद्वाराच्या एका बाजुला जाळीदार खिडकी असून दुसर्‍या बाजुला चैत्याच्या आकाराचा कोनाडा आहे.त्याच्या खालच्या बाजुला सिंहीण व छावा यांचे शिल्प आहे तर दोन्ही बाजुस वेदीका आणि शिलालेख कोरण्यासाठी चौकोन आहेत.अशीच रचना आपल्याला नाशिकच्या त्रिरश्मी लेण्यात पहायला मिळते. 
 
दुसर्‍या भिक्षुगृहाचे प्रवेशद्वारही चैत्य कमानीच्या आकाराचे आहे. त्याच्या माथ्यावरही गजलक्ष्मीचे शिल्प कोरले आहे. गजलक्ष्मीची हि दोन शिल्प सांची स्तुप क्रमांक २ व भारहुतच्या लेण्यातील गजलक्ष्मीच्या शिल्पाशी मिळती जुळती आहेत.मात्र सांची किंवा भारहुतपेक्षा ठाणाळे लेण्यातील गजलक्ष्मी शिल्पाचे कोरीवकाम अधीक उत्तम असल्याचे अभ्यासिका विध्या देहेजिया यांचे मत आहे.
 मूळच्या विहारातील छतावर एक उत्कीर्ण व रंगीत छत्र आहे. या छत्रावर कमळाची सुंदर नक्षी आहे. या विहाराचा दर्शनी भाग बहुधा लाकडी प्रवेशद्वारे व वातायने आदींनी युक्त असावा, असे दिसते.

विहार, लेणे क्र. ७, ठाणाळे लेणी.

     श्री.देशपांडे यांच्या मते हि भिक्षुगृहे इ.स.पुर्व दुसर्‍या शतकाच्या मध्यकाळात कोरली असावीत.मात्र हि भिक्षुगृहे नंतर कोरलेली असावीत असे गृहित धरले तर मुळ लेणी इ.स.पुर्व दुसर्‍या शतकाच्या पुर्वार्धात किंवा इ.स.पुर्व तिसर्‍या शतकाच्या उत्तरार्धात कोरली असावीत. या लेण्याच्या प्रशस्त ओट्यामुळे प्रवेशद्वाराच्या रुंदीची कल्पना करता येते. ओट्याच्या बाहेर हस्तीदंती फासा सापडला आहे. त्याच्या चारही बाजुला वर्तुळे कोरली असून त्यात कमळाचे पान कोरले आहे.या लेण्यातील गिलावा आणि रंगरंगोटी बहुधा इ.स. पाचव्या शतकात केली असावी.
 लेणे क्रमांक ८ :-
  ठाणाळे लेणी समुहातील हे एकमेव चैत्यगृह आहे. त्यात स्तंभ नाहीत. हा चैत्यगृह (७.३३ x ४.८१ मी. व ४.५८ मी. उंच) स्तंभ-विरहित व गजपृष्ठाकृती असून त्याचा दर्शनीभाग मुळात खुला होता व त्याला पूर्वी प्रवेशद्वार असल्याचे दिसून येते. याचा पुढचा भाग उघडा असला तरी इथे लाकडी दरवाजा असावा. या चैत्यगृहाच्या दक्षिण भिंतीत एक ब्राम्ही शिलालेख आहे.त्यात दिलेल्या माहितीप्रमाणे मित ( मित्र ) दान देणारा, संघरखित ( संघ रक्षित ) व थूपसख ( स्तुपसख ) या व्यक्तींचा उल्लेख असून शिलालेखाप्रमाणे हा स्तुप उभारण्यासाठी मित याने दान दिले.
 
चैत्यगृह, लेणे क्र. ८, ठाणाळे लेणी.  
 
 हे लेणे नेमके कधी कोरले याच्या काळावरुन पुरातत्व अभ्यासकात मतभेद आहेत. शिलालेखाच्या लिपीवरुन देहेजीया या लेण्याच्या निर्मिती काळ इ.स. पुर्व ७०-७५ असा ठरवतात. तर ढवळीकर हा काळ इ.स. पहिल्या शतकातील मानतात. लेण्यांचा शोध लावणार्‍या अ‍ॅबेटच्या मते हा काळ इसवी सन पुर्व पहिले शतक असावा.तर या लेण्यांचा विशेष अभ्यास केलेल्या कझेन्सच्या मतानुसार इ.स.पुर्व दुसरे शतक तर देशपांडे यांच्या मतानुसार इ.स.पुर्व तिसर्‍या शतका अखेर किंवा इ.स.पुर्व दुसर्‍या शतकाच्या सुरवात असा असावा.
       चैत्यगृहाच्या मध्यभागी असलेल्या स्तुपाच्या अंडावर वेदीकेची नक्षी नाही तसेच त्याचा आकार भाजे स्तुपाप्रमाणे लंबुळका आहे, अंडाच्या वरच्या बाजुला हार्मिकेसाठी खाच असून मौल्यवान वस्तु किंवा अवशेष ठेवण्यासाठी खोबण खालच्या बाजुला आहे. स्तुपाच्यासमोर एक ओटा कोरलेला आहे.स्तुप तसेच हा ओटा यावर जाड रंगीत गिलाव्याचा थर होता.यावरुन हा ओटा पाचव्या शतकातील असावा.स्तुपाच्या प्रदक्षिणा मार्गावर एक लोखंडी भाल्याचे पाते सापडले.ते बहुधा इ.स. पुर्वीच्या काळातील असावे. तसेच चैत्यगृहाच्या जमीनीवरही गिलाव्याचा थर होता असे दिसून येते. यावरुन या चैत्यगृहाचा काळ इ.स.पुर्व दुसरे किंवा तिसरे शतक असावा.हे चैत्यगृह भाजे चैत्यगृह ज्यात स्तंभ कोरले आहेत्,त्याच्याही आधीचे असावे. परंतु ढवळीकरांच्या मते, या लेण्याचे विधान व स्तंभविरहीत लेणे पाहता हा स्तूप इ. स. पहिल्या शतकाच्या उत्तरार्धात कोरला असावा.
लेणे क्रमांक ९:-
    सध्या या पडक्या लेण्यात समोर दोन ओटे, मागे भिक्षुगृहाची खोली व तीच्यात शयनओटा आहे.या लेण्याच्या प्रवेशद्वाराच्या वर ३० से.मी. X १५ से.मी आकाराचे च १५ से.मी. खोलीचे सहा चौकोनी खड्डे आहेत.दोन कोनाड्यातील अंतर ७० से.मी ते १ मीटर आहे. या कोनाड्यात लाकडी किंवा दगडी वासे घालून लेण्यात वरचा मजला आवश्यकतेप्रमाणे निर्माण केला असावा. अर्थात सध्या हा भाग पुर्ण कोसळला आहे.
 लेणे क्र. १० व ११:-
  दहाव्या लेण्याचा समोरचा भाग कोसळला आहे. याची रचना समोर दालन व मागे भिक्षुगृह अशी आहे. भिक्षुगृहात दगडी शयनओटा आहे.अकरावे लेणे म्हणजे साधे भिक्षुगृह आहे.यामध्ये झोपण्यासाठी दगडी ओटा व पाण्याचे टाके आहे.
लेणे क्र. १२:-
  मागेपुढे दोन दालन व भिक्षुगृहाचे हे मोठे लेणे आहे. दालनाचा आकार ३ मी लांब व ९ मीटर रुंद आहे. त्याच्या उजव्या व डाव्या बाजुस दोन भिक्षुगृह आहेत. डाव्या बाजुचे भिक्षुगृह पडले आहे, तर उजव्या बाजुच्या भिक्षुगृहात झोपण्यासाठी दगडी ओटा आहे.या दालनात उजवी बाजु सोडून L आकाराचा ओटा आहे.या ओट्यांची कमी उंची बघता या लेण्याचा वापर भोजनगृहासारखा केला जात असावा.
लेणे क्र. १३:-
उजव्या बाजुला असलेल्या पाच्,सहा पायर्‍याच्या जीन्याने या लेण्यात प्रवेश होतो. लेण्यासमोर एक भिंत असून भिंतीच्या मागे ९ मीटर लांब व १.५ मीटर रुंद व्हरांडा आहे. डाव्या बाजुस एक लहान ओटा असून तीन पायर्‍या चढून एका खोलीत प्रवेश करता येतो. हि खोली पडली आहे.व्हरांड्याच्या मागे उजव्या बाजुस L आकाराचा ओटा असून डाव्या बाजुस दालन आहे.त्याला प्रवेशद्वार व खिडकी आहे.याशिवाय एक कोनाडा,ओटा आणि भिक्षुगृह या लेण्यात आहे.
  हे लेणे दिसायला साधे असले तरी लेण्यात प्रवेश केल्यावर दर्शनी भिंतीवर चित्र रंगवलेली असावीत.आता त्याचे अवशेष दिसतात.यात बुध्दप्रतिमा असावी असा अंदाज आहे.अभ्यासकांच्या मते हि चित्र वाकाटककालीन आहेत.
 चौदावे लेणे कडा तुटल्याने नष्ट झाले आहे.
 लेणे क्र. १५:-
   उंचावर खोदलेले लेणे थोडे अपूर्ण असले तरी महत्त्वाचे आहे. समोर दालन्,व्हरांडा व मागे दोन भिक्षुगृह अशी या लेण्याची रचना आहे. दर्शनी भागी भिंतीवर दोन्ही भिक्षुद्वारांच्या मध्ये एक उत्कीर्ण स्तूप कोरला आहे.अर्थात सध्या व्हरांडा आणि त्याच्या डाव्या बाजुचे भिक्षुगृह नष्ट झाले आहे,चैत्यकार प्रवेशद्वारावरील गजलक्ष्मीचे शिल्प भग्नावस्थेत आहे.दालनाला प्रवेश्द्वार्,दोन्ही बाजुला खिडक्या, आत कोनाडे अशी याची रचना पहायला मिळते. 
 
माशावर आरूढ दांपत्य, लेणे क्र. १५, 

मागील भिंतीत दोन भिक्षुगृहे आहेत.या भिक्षुगृहांच्या प्रवेशद्वाराच्या मध्ये उठावाचे शिल्प आहे,जे नाशिकच्या लेण्यामध्येही पहायला मिळते.या स्तुपाची स्थापना इ.स. पहिल्या किंवा दुसर्‍या शतकात केली असावी.येथे माशावर आरूढ दांपत्याचे शिल्पही कोरलेले आहे.
 लेणी क्र. १६ ते २३ :-
   लेणी क्र. १५ नंतर कडा कोसळल्यामुळे पुढील लेण्यांचा क्रम ठरवता येत नाही. बहुतेक लेण्यांचा आतला भाग दगडमातीने भरला आहे.शेवटची दोन लेणी मात्र बर्‍या अवस्थेत आहेत. त्यांच्या मध्ये ब्राम्ही लिपीत शिलालेख असलेले पाण्याचे टाके आहे. लेणी क्र. १६ व १७ यांच्यामध्ये असलेल्या या ब्राम्ही शिलालेखाचे वाचन संशोधक श्री. देशपांडे यांनी असे केले आहे.
  (पु) छरकस पुजावतीया अन्तेवा
 सिपकरस दान वोढी
    याचा अर्थ पुष्करच्या ( राजस्थानातील तीर्थक्षेत्र ) पुजावती नामक भिक्षुणीचा पकरस नावाच्या शिष्याने पाणपोढीचे ( पाण्याचे टाके ) दान दिले. पुष्करचा उल्लेख नाशिकच्या दहाव्या लेण्यातही ऋषभदताच्या लेखात असून लिपीच्या शैलीवरुन इ.स. दुसर्‍या शतकातील असावा. 
याचे महत्व असे राजस्थानातील पुष्करपासून मथुरा,उज्जैन, महिष्मती,नाशिक्,सोपारामार्गे येथे भिक्षुंचा वावर असे. शेवटच्या दोन लेण्यांना २२ आणि २३ असा क्रमांक देता येईल. दोन्हीमध्येही तीन्,तीन शयनओटे आहेत. 
  ठाणाळे समुहातील बहुतेक लेणी द्विगभ्भ किंवा तिगभ्भ म्हणजे दोन किंवा तीन भिक्षुंची सोय असणारी आहेत. देशपांडे यांच्या मतानुसार या लेणी भाजे लेणींपेक्षा जुन्या आहेत. कमीतकमी पाच वेळा या लेण्यात काही ना काही बदल होत गेले. यात खोदकाम्,रंगकाम केले गेले. पाचव्या शतकानंर चौल बंदराचे महत्व काहीसे कमी झाले किंवा चौलकडुण मावळात जाणार्‍या मार्गात काहीसा बदल झाला असावा. त्यामुळे हा बौधविहार ओस पडला असावा. हीच भिक्षुगृहे पाचव्या शतकात महायान भिक्षूंनी वापरली असती तर त्यांनी तेथे बुद्ध-बोधिसत्त्व शिल्पे न कोरता भिंतीवर गिलावा लाऊन त्यावर चित्रे रंगविली. अशीच महायान काळातील चित्रे भाजा, पितळखोरे आणि अजिंठा येथील क्र. ९ व १० येथील चैत्यगृहांत दिसतात.
पुढे हिंदू संप्रदायांनी त्याचा उपयोग केला नाही.आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांनी येथे आश्रय घेतला होता. 
    एकंदरीत आपल्या प्राचीन संस्कृतीचा आणि इतिहासाचा मागोवा घ्यायचा असेल तर ठाणाळे लेण्यांना भेट देणे आवश्यकच आहे.
 संदर्भग्रंथ :-
१) रायगड जिल्हा गॅझेटीयर
२) सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो ट्रेकर्स
३) इथे महाराष्ट्राचीये देशी - प्र.के.घाणेकर
४)  Cousens, H. ‘An account of the Caves at Nadsur and Kharsambla’, ASWI (Vol.XII), Bombay, 1891.
५) देशपांडे, म. न. ‘ठाणाला बौद्ध लेणी: स्थापत्य व कला’, विदर्भ संशोधन मंडळ वार्षिक, नागपूर, १९८१.
६)  मंजिरी भालेराव, श्री. साईप्रसाद बेलसरे यांचे लिखाण


 ठाणाळे (नाडसूर) ता. सुधागड, जि. रायगड पालीपासून २३ कि.मी. बुद्धलयन लेणी, एक चैत्यगृह, एक स्मारक स्तूपसमूह (Memorial Stup Complex) आणि २१ विहार लेणी आहेत. या लयन समूहातील काही लेणी भाजेपेक्षा जुनी असावीत असे त्यांनी मत नोंदवले. किमान पाच वेळा येथे परिवर्तन, खोदकाम  व रंगलेपन (चित्रे) केले गेले. चौलचे, बंदर म्हणून महत्त्व संपले, तसे पाचव्या शतकानंतर ही लेणी ओस पडली. लेणे क्र. तीन हे स्मारक स्तूपगृह आहे. विशेष म्हणजे, या लेण्यांचा नंतर अन्य कोणी उपयोग केला नाही. या लेण्यांचा अभ्यास करताना, लेण्यांची साफसफाई करताना त्यांनी घेतलेल्या दक्षतेमुळे तत्कालीन अवशेष उपलब्ध होऊ शकले. म्हणजे पुढे उपयोगात न आल्यामुळे काही वस्तू तशाच धूळ व मातीत गाडल्या गेल्याचे दिसून आले आहे. याला पुरातत्त्वीय भाषेत Cultural Debris म्हणतात. ते साफ करून मूळ वापरातील भूमी तपासण्याची संधी त्यांना मिळाली ती त्यांच्याच कार्यपद्धतीमुळे. येथे वासुदेव बळवंत फडके काही काळ राहिले होते.

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...