Thursday, December 29, 2022

हरिश्चंद्रगड ( भाग १ )

  अहमदनगर, पुणे आणि ठाणे या तीन जिल्ह्याच्या सीमेवर एैसपैस पसरलेला हरिश्‍चंद्रगड हा भटक्‍यांची सर्वार्थाने 'पंढरी'. वर्षानुवर्षे येथे गडकऱ्यांचा राबता अव्याहतपणे सुरू आहे.हरिश्चंद्रगड म्हणजे नगर जिल्ह्याचे महाबळेश्वर !  माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा अजस्त्र पर्वत म्हणजे हरिश्चंद्रगड, एखाद्या स्थळाचा अथवा गडाचा किती विविध प्रकारे अभ्यास करता येतो याचा सुरेख नमुना म्हणजे हरिश्चंद्रगड. या गडाचा इतिहास कुतूहलजनक तर भूगोल हा विस्मयकारक आहे.क्षेत्रफळाच्या दृष्टीने हरिश्चंद्रगड हा महाराष्ट्रामधला सर्वात मोठा किल्ला असावा. लांबी रुंदीच्या बाबतीत हा गड प्रचंड पसरला आहे. निसर्गतःच याला एखाद्या आश्चर्याप्रमाणे असलेला कोकण कडा आणि अतिशय उंच असं तारामती शिखर, या गोष्टी लाभल्या आहेत. पूर्वीच्या काळी गडावर राबता चांगलाच होता हे नक्की. त्याशिवाय हरिश्चंद्रेश्वराच्या देवळाची आणि पुष्करणीची शिल्पकला बहरली नसती. समोरच्या खोदीव गुहा तर त्याही पूर्वीच्या असाव्यात. संपूर्ण गडावरच्या शिवलींगांची मोजणी केली तर शेकड्यांच्या घरात सापडतील. खालचं केदारेश्वराचं शिवलिंग तर अतिशय सुंदर. नाही म्हंटलं तरी गडावर अजून 'किल्ला' म्हणण्याजोगं असं बऱ्यापैकी बांधकाम शिल्लक आहे. बालेकिल्ल्याचे काही अवशेष आहेत. कोकण दरवाजा, जुन्नर दरवाजाच्या कमानींच्याही काही खुणा शिल्लक आहेत. एकूणच गड बघायचं म्हंटलं तर आठवड्याभराची सुट्टी काढून यायला हरकत नाही 
 गडावर असलेला मुबलक पाणीसाठा, मुक्कामासाठी उपलब्ध गुहा, एैसपैस पसरलेली वनसंपदा, ऐतिहासिक मंदिर यामुळे बारा महिने अभ्यासक, ट्रेकर्स, फोटोग्राफर्स यांची मांदियाळी येथे जमलेली असते. हरिश्‍चंद्रगडावरचा कोकणकडा म्हणजे सह्याद्रीचा अदभुत आविष्कार, पावसाळा सुरू होण्याच्या आधी कधी गडावर आले तर 'इंद्रवज्रा'चे विस्मयकारक दृश्‍य येथे हमखास दिसते. गडाच्या या वैशिष्ट्यांमुळे हरिश्‍चंद्रगडावर मुक्काम न केलेला ट्रेकर सापडणे विरळा ! ट्रेकर आहे आणि हरिश्चंद्रगड पाहिलेला नाही, अशी व्यक्ती सापडणं जवळजवळ अशक्यच. भटक्यांची पंढरी म्हणून नावाजल्या गेलेल्या ह्या सर्वांगसुंदर आणि सर्वगुणसंपन्न गिरिदुर्गावर ट्रेकर्स व पर्यटकांची बाराही महिने रीघ असते.हा किल्ला इतर किल्ल्यांहून अतिशय वेगळा असून प्राचीन काळातील दुर्ग जसाच्या तसा पाहावयाचा असल्यास हरिश्चंद्रगड हा किल्ला डोळ्यासमोर उभा राहतो. गडास एकूण तीन शिखरे असून त्यांची नावे तारामती, रोहिदास आणि हरिश्चंद्र अशी आहेत. यामधील तारामती हे शिखर सर्वोच्च असून त्यांची उंची समुद्रसपाटीपासून १४०० मीटर आहे.
   महाराष्ट्राच्या प्राचीन दुर्ग संस्कृतीचे प्रतीक असा हा हरिश्चंद्रगड हा नुसताच गड नसून खऱ्या अर्थी हरिश्चंद्र पर्वतच आहे.































      अर्थात दुर्ग प्राचीन आहे हे निसंशय ! हरिश्चंद्रगडाचा इतिहास सुरु होतो तो पुराणकाळापासुन. स्कंद, अग्नी, मस्त्य आणि पद्म पुराणांत हरिश्चंद्र पर्वताची महती वर्णने केलेली आहे. देवी भागवत, बृहन्नीलतंत्र, प्राणतोषिणीतंत्र, दत्तात्रेयतंत्र, कृत्यकल्पतरु ,तंत्रालोक, गुह्याष्टक, अग्निपुराण अशा अमेक ग्रंथातून हरिश्चंद्रगडाचा उल्लेख 'हरिश्चंद्र-चंद्रिका' नावाने झालेला दिसतो. हा गड १०८ शक्तिपीठांपैकी एक असून श्राध्द करण्याजोगे पुण्यक्षेत्र असल्याचे मानले जाते.अभ्यासकांच्या मते यादव, सातवाहन काळाच्या काळात हा गड नावारूपाला होता. पुराणातले काशीमहात्म्य, दक्षिणप्रयोग महात्म्य, देवी भागवत, विष्णूपूराण, स्कंदपूराण, मत्स्य पुराण, पद्मपुराण, अग्नीपुराणादी काव्यात हरिश्चंद्रगडाचा उल्लेख असल्याचे निरीक्षण ज्यष्ठे अभ्यासक दिवंगत रा.चिं.ढेरे यांनी नोंदविले आहे.
    डॉ. वा.वि.मिराशी यांनी आपल्या टिपणात हरिश्चंद्रगडाच्या नावाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांनी नाशिकच्या अंजनेरी येथे भोगशक्ती राजाच्या काळातील दोन ताम्रपटांचा उल्लेख केला आहे. या पैकी एक ताम्रपट इसवी सनाच्या आठव्या शतकातला असून त्यात जयपूर नगरातील यात्रेकरिता व मंदिरे, अन्नछत्राकरिता नाशिक जिल्हा व उत्तर कोकण भागातील काही प्रदेशावर कर बसविण्याचे निर्देश आहेत. दुसर्‍या ताम्रपटात कालउल्लेख नाही, त्यात समगिरिपट्टानातील व्यापार्‍यास दिलेल्या काही सवलतींचा व तेथील गुन्हेगारांना दिलेल्या जाणार्‍या दंडात्मक शिक्षेचे निर्देश आहेत. या ताम्रपटात स्वामीचंद्र-सिंहवर्मन-भोगशक्ती अशी वंशावळ दिलेली असून स्वामीचंद्राला 'हरिश्चंद्रवंशस्यालंकारभूत:' असे विशेषण लावले आहे. मिराशींच्या मते हरिश्चंद्र हा पौराणिक राजा नसावा, तर खरोखरच भोगशक्तीचा वंशज असावा. त्याने हरिश्चंद्रगडावरचे शिवालय बांधून तेथे प्रतिष्ठापना केलेल्या शिवलिंगाला आपले नाव दिले असावे.ढेरे म्हणतात त्या प्रमाणे भारताच्या प्राचीन इतिहासात देवालये बांधणार्‍यांनी त्यास आपली नावे दिल्याची उदाहरणे आहेत.
         हरिश्चंद्र, तारामती आणि रोहिदास अशी येथील शिखरांची नावे असल्यामुळे या किल्ल्याचा संदर्भ थेट राजा हरिश्चंद्रापर्यंत जोडला आहे. गडाची निर्मिती ५ व्या किंव्या ६ व्या शतकात त्रेकुटक अथवा कलचुरी या राजघराण्यांच्या काळात झाली असावी असे मानले जाते. कलचुरींचे मांडलिक म्हणून भोगशक्तिचे घराणे येथे राज्य करीत होते. दहाव्या शतकात शिलाहार राजा झंझ याने गोदावरी ते भीमा दरम्यान बारा नद्यांच्या उगमस्थळी बारा शिवालये बांधली त्यात मंगळगंगेच्या उगमावर हरिश्चंद्रेश्वर हे शिवालय बांधले. याच काळात येथे विविध लेण्या कोरल्या गेल्या आहेत. तेराव्या शतकात योगी चांगदेव येथे वास्तव्यास असताना त्यांनी तत्त्वसार ग्रंथाची रचना येथेच केली. ग्रंथातील १०२८ ते १०३३ दरम्यानच्या ओव्यांमध्ये याबाबतचे उल्लेख येतात. ‘शके चौतिसे बारा । परिधावी संवत्सरा । मार्गशिर तीज (तेरज) रविवार । नाम संख्य ॥(१०२८ ) हरिश्चंद्र नाम पर्वतू! तेथ महादेवो भवतु !! सुसिध्द गाणी विख्यातु! सेविजे जो!! (१०२९ ) हरिश्चंद्र देवता ॥ मंगळगंगा सरिता । सर्वतीर्थ पुरविता सप्तस्थान । ब्रम्हस्थळ ब्रम्ह न संडीतु । चंचळ वृक्षु अनंतु । लिंगी जगन्नाथु । महादेओ ॥ जोतीर्थासि तीर्थ । केदारांसि तुकिनाति । आणि क्षेत्री निर्मातिबंधु हा ॥ (१०३०). या ओवीत शके १२३४ मधे हरिश्चंद्रगडावर हा ग्रंथ पूर्ण केल्याचा उल्लेख दिसुन येतो. तेराव्या शतकात ज्ञानदेव निवृत्ती आणि इतर भावंडे यात्रापर्वात येथे येऊन गेल्याचे इतिहास सांगतो. ज्ञानदेवांनी योगी चांगदेवांचे गर्वहरण केले.चांगदेव ज्ञानेश्वरांचे शिष्य बनले. पुढे ज्ञानेश्वर माउलींनी संजिवन समाधी घेतलयावर विरक्त होउन चांगदेवांनी हरिश्च्ण्द्रगडावर निवास केला.
  शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या सुरत लुटीनंतर हा किल्ला स्वराज्यात दाखल झाला. सभासद बखरीत शिवाजी महाराजांनी वसवलेल्या किल्ल्यांच्या यादीत या किल्ल्याचा उल्लेख येतो. तसेच शिवकाळात हरिश्चंद्रगड किल्ल्याबद्दलचा उल्लेख पर्णालपर्वतग्रहणाख्यानम् या संस्कृत काव्यग्रंथात मिळतो. या काव्यग्रंथाचा कर्ता कवी जयराम पिंडे तंजावरच्या व्यंकोजीराजे भोसले यांना शिवाजी  महाराजांनी मुघल आणि आदिलशाहीचे कोणकोणते किल्ले कसे जिंकले यांचे वर्णन करताना ग्रंथाच्या पहिल्या अध्यायातील ३७ व्या श्लोकात चावंडचा उल्लेख करतो.
                                             तथैव चामुण्डगिरी हरिश्चंद्रस्तथैव च।
                                             महिषोष्यड्सरस्तावद गृहीतावतिसंगरात्।। ३७।।
       याचा अर्थ असा कि त्याचप्रमाणे चामुण्डगिरी (चावंड), हरिश्चंद्रगड, महिषगड (?) आणि हडसर हे (किल्ले) सुद्धा (शिवाजी महाराजांनी) निकराने लढून घेतले.परंतु या श्लोकाला दुजोरा देईल असा समकालीन अन्य पुरावा मिळालेला नाही. वास्तविक जयराम पिंडे हे शिवाजी महाराजांचे समकालीन होते.त्यांचे दोनच ग्रंथ आज उपलब्ध आहेत. पैकी एक 'राधा माधव विलास् चंपु' आणि 'पर्णालपर्वग्रहणाख्यान'.त्यांच्या इतर ग्रंथाचा शोध सुरु आहे.वर दिलेल्या श्लोकाला दुजोरा मिळेल असा समकालीन पुरावा अजून पुढे आलेला नाही. 
पुढे औरंगजेबाच्या दक्षिण मोहिमेत हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. पेशवाईत १७४७–४८ दरम्यान हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी (कर्णाजी) शिंदे यांची नियुक्ती केली. १७५१ मध्ये गडावर काही डागडुजीची कामे करण्यात आली. या किल्ल्याच्या खर्चासाठी २० गावांचे उत्पन्न लावून देण्यात आलेले होते. शाहू रोजनिशीत सुद्धा या किल्ल्याचा उल्लेख सापडतो. पुढे १७७५-७६ मध्ये या किल्ल्याचा हवालदार म्हणून संताजी सावंत याची नेमणूक केलेली तत्कालीन कागदपत्रांतून आढळते. 
      पेशवाईच्या उत्तरार्धात घडलेली एक दंतकथा या भागात प्रचलित आहे. हरिश्चंद्रगडाचा किल्लेदार मेल्यावर गडासाठी नवा किल्लेदार नेमण्यासाठी पेशव्यांनी एक दवंडी पिटली. गडाच्या नेहमीच्या रुळलेल्या वाटा सोडून जो कोणी नव्या वाटेने गडावर यशस्वी चढाई करेल, त्याला गडाची किल्लेदारी दिली जाईल अशी अट घातली गेली. साखरप्याचे शांडील्य गोत्री जोशी निर्धन होते. कोळीसर गावचा लक्ष्मीकेशव, गुहागरचा व्याडेश्वर आणि कोल्हापुरच्या अंबाबाईचे हे उपासक. या जोशींपैकी विष्णुपंताची बहिण जुन्नर परिसरात दिली होती. विष्णुपंत उदरनिर्वाहासाठी तिथे आले होते. त्यांनी हि दवंडी एकून प्रयत्न करण्याचे ठरवले. बहुधा नळीच्या वाटेने चढून त्यांनी हरिश्चंद्रगडावर निशाण फडकावले आणि जोश्यांचे झाले 'हरिश्चंद्रगडकर'. पुढे विष्नूपंताना १८१८ च्या इंग्रजांच्या विरुध्द झालेल्या युध्दात वीरमरण आले.पुण्या-मुंबई कडे तुम्हाला हरिश्चंद्रे किंवा हरिश्चंद्रकर आडनावाचे लोक सापडतील ते मुळचे कोकणामधील चिपळूणचे जोशी पण पेशव्यांनी नेमलेले किल्लेदार म्हणून त्यांचे आडनाव हरिश्चंद्रकर जोशी असे झाले. 
     इंग्रज-मराठे अखेरच्या युद्धात कर्नल साईक्स याच्या फौजेने हा गड काबीज केला (मे १८१८). यावेळी लढताना किल्लेदार विष्णुपंत जोशी यांना वीरमरण आले. याच कर्नल साईक्सने १८३५ मध्ये किल्ल्याच्या कोकणकड्यावरून वर्तुळाकार इंद्रधनुष्य ज्याला इंद्रवज्र म्हणतात, ते दिसल्याची नोंद केलेली आहे. नंतर अहमदनगरचा जिल्हाधिकारी (कलेक्टर) हेन्री पॉटींजर याच्या हुकमानुसार तत्कालीन शिवनेर तालुक्याचा कमाविसदार रामराव नरसिंह याने बोइट याच्या ताब्यात हा किल्ला दिला (१४ जून १८१८). पुढे १८ डिसेंबर १८१८ मधे हा किल्ला पाडण्यासाठी कॅप्टन म्याकिंटोश या भागात आला. त्याने गडावर जाणाऱ्या वाटा,पाण्याची टाकी तसेच तटबंदी उद्ध्वस्त केली. १८३६ ते १८४३ दरम्यान हरीसन नावाचा इंग्रज अधिकारी नगर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी असताना त्याने या गडाचे थंड हवेचे ठिकाण म्हणुन विकास करण्यासाठी प्रयत्न केले. त्याने मंदीराकडील लेण्यांजवळ एक बंगला देखील बांधला पण लवकरच तो आगीत जळुन खाक झाल्याने विकासाचे प्रयत्न मागे पडले. या बंगल्याचा चौथरा आजदेखील आपल्याला पहायला मिळतो.
     माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या चरित्रात, ते ठाण्याचे उपजिल्हाधिकारी असताना (सन १९२९) गडावर आल्याचा उल्लेख आहे. त्यांना गडावरच थंडी वाजून आल्याने त्यांना डोली करून खाली नेण्यात आल्याचा मजकूर त्यांच्या चरित्रात आहे. त्याखेरीज कितीतरी योगी सिद्धसाधक तेथे येऊन गेल्याचे उल्लेख आहेत. शैव, वैष्णव तसेच शाक्त संप्रदायांचे अवशेषही तेथे सापडतात.
        

हरिश्चंद्रगडांच्या वाटांचा नकाशा

हरिश्चंद्रगडाशी संलग्न असलेल्या वाटा :-

     अश्या या प्राचीन आणि  ठाणे, पुणे आणि नगर या तीन जिल्ह्यांत पसरलेल्या गडावर जाण्यासाठी विवीध पर्याय आहेत. साधारण १७५० एकरवर पसरलेल्या या गडावर जाण्यासाठी एकुण १२ वाटा असुन या वाटांवर सहा दरवाजे आहेत. हे दरवाजे नष्ट झाले असले तरी त्यांचे अवशेष या मार्गावर पहायला मिळतात. या १२ वाटा म्हणजे १.पाचनई २. वेताळधार ३.गणेशधार ४.राजमार्ग ५.खिरेश्वर ६.कोतुळ ७.लव्हाळे ८.राजधरची वाट ९.जुन्नर दरवाजा १०.माकडनाळ ११.नळीची वाट (भवानी नाळ) १२.बैलघाट. 
     यातील काही वाटा टोलारखिंडीत एकत्र येतात. कोणतेही साहस न करता संपुर्ण किल्ला पहायचा असल्यास खिरेश्वर व पाचनई या वाटा सोयीच्या असुन आज याच दोन वाटा प्रामुख्याने वापरात आहेत. या दोन्ही गावात जाण्यासाठी एस.टी.बसची सोय आहे. यातील एका वाटेने वर चढुन दुसऱ्या वाटेने खाली उतरल्यास दोन दिवसात संपुर्ण किल्ला पाहुन होतो पण यासाठी एक रात्र गडावर मुक्काम करणे गरजेचे आहे. 
     ह्या वाटांची यादी काढताना एका गडावर चढणाऱ्या इतक्या वाटा कशा काय असू शकतात? याचे कारण म्हणजे हरिश्चंद्रगड ज्या तीन जिल्ह्यांच्या म्हणजेच ठाणे, पुणे व नगर ह्यांच्या सीमेवर उभा आहे, ह्या तिन्ही जिल्ह्यांमधून पूर्वी गडावर चढणारे तीनच राजमार्ग म्हणजेच आजच्या काळात Official Gates असावेत.
१. पुणे जिल्ह्यातून खिरेश्वरकडून येणारा राजमार्ग
२. ठाणे जिल्ह्यातून सादडे घाट व नंतर बैलघाट, हा ऑफिशियल म्हणता येईल. कारण ठाणे जिल्हा कोकणात असल्याने ह्याच दरवाजाला कोकण दरवाजा हे नाव आहे.
३. नगर जिल्ह्यातून लव्हाळी गावातून चढणारी राजदरवाजाची किंवा पायऱ्यांची वाट.
हरिश्चंद्रगडाशी संलग्न अनेक वाटांनी गडावर लोक येत असतात. यातील काही वाटा रोजच्या वापरातील आहेत, तर काही जवळपास मोडायला आलेल्या. आतापर्यंत माहीत झालेल्या व हरिश्चंद्रगडाशी संबंधित असलेल्या वाटांची यादी खाली देत आहे. ह्यात गडावर थेट चढणाऱ्या वाटांबरोबरच गडाच्या विविध दिशांच्या पायथ्याच्या अनेक गावांमधून चढणाऱ्या व गडांच्या मुख्य वाटांना जाऊन मिळणाऱ्या वाटाही समाविष्ट करत आहे.
ही सर्व यादी सध्या माहीत असलेल्या वाटांची असून, ह्यात निश्चितच भर पडू शकते. त्यामुळे तुम्हाला खाली दिलेल्या वाटांच्या व्यतिरिक्त अजून काही वाटा माहीत असल्यास त्या नक्कीच सांगा.
A) नगर जिल्ह्यातून गडावर चढणाऱ्या वाटा
१. पाचनईची वाट/कपारीची वाट : नगर जिल्ह्यातील पाचनई गावातून गडावर येणारी सोप्या चढाईची व सध्या सगळ्यात जास्त वापरात असलेली वाट.
२. वेताळदार/वेताळधारेची वाट : पाचनई गावातून वाघ्या फाट्याच्या समोरून गडावर चढणारी लांबलचक वाट. ह्या वाटेवर वेताळ दरवाजाचे अवशेष, तटबंदी, पाण्याची टाकी व वेताळाचे मंदिर आहे. हरिश्चंद्रगडाच्या पुरातन मार्गांपैकी एक.
३. टोलारखिंड कोथळे बाजूने (तटाची वाट) : नगर जिल्ह्यातील कोथळे गावापासून टोलारखिंडीमार्गे गडावर चढणारी वाट. टोलारखिंडीतील तटबंदी ह्या वाटेने बघता येते.
४. गायवाट : पाचनई गावातून कपारीच्या वाटेने गडावर जाणाऱ्या वाटेच्या समोरच्या डोंगरावरून चढणारी स्थानिक पायवाट
५. बेटाची नळी : पाचनई गावातून सीतेच्या डोंगराच्या व हरिश्चंद्रगडाच्या मधल्या जंगलातून कोकणकड्यावर चढणारी वाट. अनेकदा पेठेच्या वाडीतील लोक थेट कोकणकड्यावर यायचं असल्यास ह्या वाटेचा वापर करतात.
६. परिचित राईची वाट : पाचनई गावातून परिचित राईच्या जंगलामार्गे कोकणकड्याजवळ येणारी वाट.
७. वाघरानाची वाट : पाचनई गावातून परिचित राईच्या जंगलामार्गे गडावर चढणारी व पूर्वीपासून वापरात असलेली स्थानिक पायवाट.
८. बैलघाट/कोकण दरवाजा : पाचनई गावातून भग्न दरवाजातून हरिश्चंद्रेश्वर मंदिर किंवा थेट कोकणकड्यावर चढणारी वाट. मंदिराकडे गेल्यास साठ पायऱ्यांची वाटही ह्यात बघता येते. ह्या वाटेवर दरवाजाची भग्न कमान, तसंच तटबंदी आहे. सादडे घाटाने चढून आल्यास किंवा सादडे घाटाकडे उतरायचं असल्यास ह्याच वाटेचा वापर होतो. हरिश्चंद्रगडाच्या पुरातन मार्गांपैकी एक.
९. पायऱ्यांची वाट/राजदरवाजा : पाचनईच्या अलीकडच्या लव्हाळी गावातून गडावर चढणारी वाट. ह्या वाटेवर दरवाजाचे व तटबंदीचे भग्न अवशेष आहेत. हरिश्चंद्रगडाच्या पुरातन मार्गांपैकी एक.
१०. गणपतीची वाट : पाचनईच्या अलीकडच्या लव्हाळी गावातून गडावर येणारी गुरांची वाट. लव्हाळीतील अनेक स्थानिक ह्या वाटेचाच वापर करतात. वाटेवर गणपतीची मूर्ती व एक गुहा आहे.

B) ठाणे जिल्ह्यातून गडावर चढणाऱ्या वाटा (वरील वाटांच्या क्रमांकावरून पुढे सुरू)
११. नळीची वाट : तांत्रिकदृष्ट्या कठीण व अतिशय वेळखाऊ अशी बेलपाडा/वालिव्हरे गावातून कोकणकड्यावर चढणारी वाट.
१२. सादडे घाट : बेलपाडा किंवा शेजारच्या केळेवाडी गावातून पाचनईजवळील ‘हपाट्याचा कडा’ इथे चढणारी वाट. ह्या वाटेने कलाडगड किंवा बैलघाटाने हरिश्चंद्रगड करता येतो. हरिश्चंद्रगडावर थेट चढत नसली, तरी गडाशी संलग्न असलेली वाट. काही लोक ह्या वाटेचा उच्चार करताना ‘साधले घाट’ असा करतात, जो पूर्ण चुकीचा आहे. ह्या वाटेत ‘अर्जुन सादडा’ची अनेक झाडे असल्याने ह्या वाटेला सादडे घाट हे नाव मिळाले आहे.
१३. करपदरा : बेलपाडा किंवा शेजारच्या केळेवाडी गावातून पाचनईजवळील ‘हपाट्याचा कडा’ इथे चढणारी वाट. ह्या वाटेने कलाडगड किंवा बैलघाटाने हरिश्चंद्रगड करता येतो. हरिश्चंद्रगडावर थेट चढत नसली तरी गडाशी संलग्न असलेली वाट. ‘करप’ नावाची भरपूर झाडं ह्या वाटेच्या दरीत असल्याने करपदरा हे नाव प्राप्त झालं आहे, असे स्थानिक सांगतात.
१४. थिटबीची नाळ/रोहिदास नाळ : माळशेज घाटातील थिटबी गावातून रोहिदास शिखरापाशी येणारी वाट. ही थेट गडावर जात नसली, तरी रोहिदास शिखर हा हरिश्चंद्रगडाचाच भाग मानला जात असल्याने ह्या वाटेचा उल्लेख केला आहे.
१५. माकडनाळ : बेलपाडा गावातून चढणारी वाट. ही रोहिदास शिखराजवळून हरिश्चंद्रगडाच्या आडराई ह्या भागाला जाऊन मिळते. ह्या वाटेने गड चढायचा असल्यास आडराईतून पुढे गेल्यावर तारामती नाळ किंवा जुन्नर दरवाजाचा वापर करता येऊ शकतो.
१६. खिदऱ्याचा दरा : माळशेज घाटातील थिटबी गावातून आडराईपाशी चढणारी वाट. ही थेट गडावर जात नसली, तरी ह्या वाटेने अर्धा गड चढून पुढे तारामती नाळ किंवा जुन्नर दरवाजाने हरिश्चंद्रगड चढता येईल.
१७. तवली : माळशेज घाटातील थिटबी गावातून आडराईपाशी चढणारी वाट. ही थेट गडावर जात नसली, तरी ह्या वाटेने अर्धा गड चढून पुढे तारामती नाळ किंवा जुन्नर दरवाजाने हरिश्चंद्रगड चढता येईल.
१८. तारामती नाळ : माळशेज घाटातील थिटबी गावातून तारामती शिखरापाशी चढणारी वाट. 

C) पुणे जिल्ह्यातून हरिश्चंद्रगडावर चढणाऱ्या वाटा
१९. टोलारखिंड : पुणे जिल्ह्यातील माळशेज घाटाजवळच्या खिरेश्वर गावातून गडावर चढणारी वाट. 
२०. जुन्नर दरवाजा/राजमार्ग : खिरेश्वर गावातून गडावर चढणारा राजमार्ग. हरिश्चंद्रगडाच्या पुरातन मार्गांपैकी एक.

 अर्थात या सर्वच वाटांची आपण माहिती घेणार नाही, पण पुणे जिल्ह्यातील खिरेश्वर गावातून चढणार्या वाटा, अहमदनगर जिल्ह्यातील पाचनई परिसरातील वाटा आणि ठाणे जिल्ह्यातील वालिवरे किंवा बेलपाडा गावातून चढणार्या अवघड आणि वेळखाउ वाटांची माहिती घेणार आहोत.

खिरेश्वरमार्गे :-

सर्वप्रथम पुणे जिल्ह्यातून चढणार्या वाटांची माहिती घेउया. या बाजुने चढायचे तर खिरेश्वर हे पायथ्याचे गाव आहे.पुण्याकडून येणारी मंडळी बहुधा याच वाटेचा वापर करतात. मुंबईहुन मुरबाडमार्गे माळशेज घाट चढुन आल्यावर आपण घाट माथ्यावरील खुबीफाट्यास पोहोचतो. खुबी फाट्यावरून ५ कि.मी. अंतरावर खिरेश्वर गाव आहे. थेट खिरेश्वरपर्यंत जाणारी बस पुण्यातील शिवाजीनगर स्थानकातून सुटते.


खिरेश्वर मार्गे चढणार्या वाटांचा नकाशा
खुबी फाट्यावरुन दिसणारा हरिश्चंद्रगड
पिंपळगाव जोगा जलाशय आणि हरिश्चंद्रगड
पिंपळगाव जोगा जलाशय आणि खिरेश्वर गावाकडे येणारा रस्ता

मात्र हि एकच बस असल्यामुळे तसेच वेळ सोयीची नसल्यामुळे उत्तम म्हणजे कल्याण-अहमदनगर मार्गावर भरपुर बसेस धावतात. या बसेस माळशेज घाटातून जाताना खुबी फाट्याला थांबतात. तिथून पायी खिरेश्वरला जाता येईल. किंवा पुणे-नाशिक रस्त्यावरील अळे फाटा इथे उतरुन खाजगी गाडीतून खिरेश्वरला जाता येईल किंवा खुबी फाट्याला उतरुन खिरेश्वरला पायगाडीने जाता येईल. सर्वात उत्तम म्हणजे स्वतःची गाडी असेल तर आदल्या रात्री मुक्कामाला खिरेश्वरला जाउन दुसर्या दिवशी सकाळी लवकर चढाईला सुरवात करता येईल.हरिश्चंद्रगडावर सध्या मुक्कामाला परवानगी नसल्यामुळे सकाळी लवकर जाउन संध्याकाळी पायथ्याशी परत येणे हाच मार्ग आहे.

पिंपळगाव जोग धरण येथील पुरातन शिवलिंग
पिंपळगाव जोग धरण येथील पुरातन शिवलिंग
पिंपळगाव जोग धरणाचा जलाशय व मागे दिसणारा शिंदोळा किल्ला

                          
          माळशेज घाटातला सूर्यास्त                                                                

                                          पिंपळगाव जोगे धरण

खिरेश्वर गाव एकेकाळी छोटेसे होते.मात्र आता इथे मुक्कामाच्या भरपुर सोयीसुविधा झाल्या आहेत. अलिकडेच खिरेश्वर गाव हे फिल्मच्या शूटिंग साठी प्रसिद्ध झाले आहे.मणिरत्नमच्या रावण चित्रपटाचे शूटिंग इथेच झाले म्हणजे त्या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेले ते निर्बीड अरण्य हे खिरेश्वर,माळशेज, हरिश्चंद्रगड ते रतनगड या भागात शूटिंग केली होते. खिरेश्वर गाव हे तिथल्या दह्यासाठी पण प्रसिद्ध आहे. स्थानिक लोक सांगतात कि मणिरत्नम जर इथे जवळपास आला तर न चुकता खिरेश्वर गावात येतोच .त्याला या गावातल दही फार आवडते .हा संपूर्ण भाग कळसुबाई - हरिश्चंद्रगड अभयारण्यात येतो. 

     खिरेश्वर गावातील प्रसिद्ध नागेश्वर मंदिर 

मंदिरातील शेषशायी विष्णु





गावाच्या अलीकडे एका ओढ्याच्या काठावर खिरेश्वराचे प्राचीन शिवमंदिर आहे. बाहेरून त्याची बांधणी ह्या भागातच आढळणार्‍या अन्य मंदिरांसारखीच - उदा. कुकडेश्वर - आहे. ते शिलाहारकालीन असावे असा तर्क आहे.  नागेश्वर मंदीराच्या इतिहासात डोकावले तर असे सांगितले जाते की पुरातन काळात या जुन्नर तालुक्यातील या भागात शिलाहार वंशातील झंज नावाचा राजा राज्य करत होता. शिवभक्तीच्या भुकेलेल्या या राजाने गोदावरी ते भीमा नदी दरम्यानच्या प्रमुख बारा नद्यांच्या उगमस्थानी बारा शिवालये उभारली. ही मंदिरे अत्यंत रेखीव, आखिव आणि शिल्पकलेने समृद्ध अशी ही मंदिरे त्यांनी साकारताना कुठीलीही कमतरता बाकी ठेवलेली दिसत नाही. याबाबतचा उल्लेख कोकणातील पन्हाळे येथे मिळालेल्या एका ताम्रपटात आला आहे, तो असा –
..ध्य: श्री झंझराजो दिवसकर इव ध्वस्तनि:
शेष दोष: शंभर्यो द्वादशोपि व्यरचयद
चिरा त्की तनानी स्वनाम्ना सोपानानी..
   गोदावरी ते भीमा दरम्यानच्या या सह्याद्रीच्या बालाघाट डोंगर रांगेतील बारा नद्याच्या  उगमस्थळी आपणास गोदावरी नदी जवळ त्र्यंबकेश्वर, वाकी नदी - त्रिंगलवाडीत, धरणाचे - तऱ्हेळे मंदिर, बामचे – बेलगाव मंदिर, कडवाचे – टाकेद मंदिर, प्रवरा नदीचे – रतनवाडीतील अमृतेश्वर मंदिर, मुळा नदीचे – हरिश्चंद्रगडावरील हरिश्चंद्रेश्वर मंदिर, पुष्पावती नदी – खिरेश्वरतील नागेश्वर मंदिर, कुकडीचे – पूरमधील कुकडेश्वर मंदिर, मीना नदिचे – पारुंडेतील ब्रह्मनाथ मंदिर, घोड नदीचे – वचपेतील सिद्धेश्वर मंदिर आणि भीमा नदीचे -भवरगिरी मंदिर. ही सर्व मंदिरे शिल्प कला व सौंदर्याने नटलेली आहेत, कोरीव कलेने भरभरून सजलेली आहेत. यातच पैकी एक खिरेश्वरमधील या नागेश्वर  मंदिराचा समावेश आहे.
       मंदिर उभे असले तरी त्याची बरीच पडझड झाली आहे. खिरेश्वरमार्गे हरीश्चंद्रगडावर जात असल्यास आवर्जुन पहावे असे हे मंदिर आहे. अंतराळ, गर्भगृह आणि कोरीव शिखर अशी रचना असणाऱ्या या मंदिराचा सभामंडप फार पूर्वीच कधीतरी ढासळला आहे. त्याजागी नव्याने कौलारू छताचा मंडप उभा केलेला आहे. परंतु, प्राचीन मंदिरालगतची ही रचना अशोभनीय वाटते. या नव्या मंडपातून नंदीचे दर्शन घेत अंतराळात आलो की नागेश्वरची कोरीव श्रीमंती पुढे येते. मंदिर अगदी छोटे - एक मंडप आणि छोटा गाभारा - आहे. बाहेरून साधे दिसणारे मंदिर आत नाना शिल्पांनी गजबजलेले आहे. विविध भौमितिक आकारातील स्तंभ, त्यांना छताशी दिलेले यक्षांचे आधार, भिंतीतील देवकोष्ठे आणि विविध निसर्ग रुपकांनी सजलेले गर्भगृहाचे कोरीव द्वार आपले लक्ष वेधून घेते. यातील दरवाजावरील शिल्पकाम पाहात असतानाच लक्ष जाते ते दरवाजाच्यावर असलेल्या एका मोठय़ा आडव्या शिल्पपटाकडे!अकराव्या शतकातील या मंदिराच्या गर्भगृहाच्या दरवाजावर शेषयायी विष्णु व त्याच्या परीवाराचे अप्रतिम कोरीव शिल्प आहे. शेषशाही विष्णूचा हा देखावा. तब्बल पाच फूट लांबीचा. शेषावर विराजमान झालेला विष्णू आणि त्याचे पाय चुरणारी लक्ष्मी! विष्णूच्या मस्तकामागे शेषनागाचा फणा आणि मूर्ति दिसत आहे. मंदिराच्या छतातून पावसाचे पाणी झिरपत राहते त्यामुळे शिल्पावर पाण्याच्या ओघळाचे डाग भरपूर पडलेले आहेत.  उठावातील हा देखावा डोळय़ांत साठवत असतानाच याच अंतराळाच्या छताला आणखी सोळा शिल्पपट दिसतात आणि आपण आश्चर्यचकितच होतो. रेखीव नक्षीच्या सोळा चौकोनांमध्ये हे शिल्पपट कोरलेले, जडवलेले आहे.
   विविध वैदिक देव-देवता, त्यांचे गण, वाहने, आयुधे अशा साऱ्यांचे हे शिल्पपट. एकेक करत हे शिल्पपट पाहू लागलो, की मग त्यांची ओळख पटत जाते. मूषकवाहन गणेश-रिद्धी, वृषभवाहन शिव-पार्वती, हंसवाहन ब्रह्म -सरस्वती, मयूरवाहन स्कंद-षष्टी, नरवाहन कुबेर -कुबेरी, मकरवाहन मदन-रती..जणू सारा स्वर्गलोकीचा देखावा पुढय़ात उलगडू लागतो. त्याचपैकी तीन मुर्त्या संपुष्टात आलेल्या आहेत. याच छताच्या मधोमध पिपळवृक्षाच्या मुळांनी मंदिरात प्रवेश केल्याने येथील एक मुर्ती तुटून नामशेस झाल्याने तेथुनच मुळांनी अपप्रवेश केल्याचे निष्पन्न होते. त्याच मुळांना घंटा अडकवण्यात आलेली आहे. ही मुळे वेळेत काढण्यात आली नाहीत तर पुढील काळात येथे मंदिर होतं असच म्हणाव लागेल. दुर्लक्ष-उपेक्षेनंतरही आज हा सर्व ठेवा सुदैवाने अद्याप शाबूत आहे. त्याला वेळीच संरक्षण देत तसेच त्याची माहिती आणि महत्त्व इथे लावले जाणे आवश्यक आहे.
   गर्भगृहात शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. याबरोबरच परिसरातही काही शिवलिंगे, वीरगळ, कोरीव अवशेष पडलेले दिसतात. मंदिराच्या आतील बाजूस दिसणारे शिल्पकाम बाह्य़ अंगावर फारसे दिसत नाही. पण यातही पाठीमागच्या बाजूच्या भिंतीत एका कोष्टकात विहार करणाऱ्या देवतेची मूर्ती दिसते. तिच्या पायाखाली पुन्हा वादन-कलेतील तीन छोटय़ा प्रतिमा दाखवल्या आहेत. या संपूर्ण मूर्तीचा ताल आणि तोल थक्क करणारा आहे.
      मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर गाभाऱ्याच्या छतास मध्यभागी एक छिद्र पडलेले असुन त्यात एक लोखंडी राॅड अडकवला आहे  व त्या राॅडला एक कमंडलू अडकवण्यात आला आहे कि ज्यातून सतत टिप टिप पाणी पिंडीवर पडत असते. त्या राॅड अडकवलेल्या ठिकाणाहून वर कळसाकडे पाहीले तर छतावरील संपूर्ण भाग मोकळा म्हणजे पोकळ असल्याचे समजते. याच कारणामुळे या स्वरूपात बांधलेल्या मंदिरांची पडझड झालेली असावी. पडझड होण्याचे दुसरे कारण म्हणजे आपण इंग्रजांचा दाखला देतो, किल्यांच्या बाबतीतही सुरूंग लावून उडवले अस आपण म्हणतो परंतू याला आपण जबाबदार नाही का? मी तर म्हणेन खजिन्याच्या हव्यासापोटी या सर्व वास्तूंचे वास्तव्यच संपुष्टात आपणच आणले आहे. आजपण अनेक ठिकाणी या प्रकारच्या वास्तू रात्री खोदलेल्या पहावयास मिळतात. याला वेळीच आळा घालणे खुपच गरजेचे आहे.
     मंदिराच्या बाहेर वर अनेक ठिकाणी मूर्ती बसवल्याचे चौरस निर्जन्य व कुतूहलाने कुणाचीतरी वाट पहात आहेत असा भास होतो. त्या मुर्त्या मंदिर परिसरात कुठेही दिसून येत नाहीत. मंदिराच्या पाठीमागे वर मध्यभागी असलेल्या तसेच गाभाऱ्याच्या प्रवेशव्दारावरील झोपलेल्या विष्णूच्या मुर्तीस आपाहीज  करण्यात आले आहे. तीचा एक हात व एक पाय निकामी झाल्याचे स्पष्ट दिसते. मंदिरालगत बाहेर  उत्तरेस चार कातळ कोरीव शिवलिंग दिसतात. व येथुन मंदिराच्या कळसाचे निरीक्षण केले तर मंदिर उत्तरेस झुकल्याचे संकेत मिळतात. मंदिर परिसरात अनेक भग्न अवशेष पहाता लक्षात येत कि या मंदिराची पुरातन रचना कमीत कमी एक एकरभर भू भागावर असावी, कि जी आज फक्त अर्ध्या गूंठ्यापेक्षाही कमी भू भागावर आहे.
   या मंदिराला स्थानिक नागेश्वराचे मंदिर म्हणुन ओळखतात.  मंदिराच्या पुर्वेस जवळच आपणास येथील एक दुर्लक्षित लेणी समुह असुन यातील एक लेणे बारा खांबावर तोललेले आहे. जवळच पाण्याचे बारमाही टाके आहे.तसेच येथे काही थडगी पहावयास मिळतात. मंदिराचा यात्रोत्सव महाशिवरात्रीच्या वेळी विविध उपक्रम राबविण्यात येऊन पार पडतो. यावेळी हजारो भाविक दर्शनासाठी रांगा लावतात. येणाऱ्या काळात या मंदिराचा जिर्णोद्धार केला गेला नाही तर हा वारसा नष्ट होइल.


 नागेश्वर मंदिर, खिरेश्वर

एका बाजूला अथांग पसरलेला नितांत सुंदर पिंपळगाव जोगा जलाशय, दुसऱ्या बाजूला आकाशापर्यन्त उंच हरीश्चन्द्रेश्वराचा पहाड, तिसऱ्या बाजूस माळशेज घाट, सतत विविध पक्ष्यांची व फुलपाखरांची वर्दळ, मनातलेही दुसऱ्याला ऐकू जाईल एवढी निरव शांतता. अशा ठिकाणी खिरेश्वर गावात नागेश्वर महादेवाचे मंदिर वसलेलं आहे. 
ठिकठिकाणी पडायला झालेल्या या मंदिराचे सौंदर्य आजही टिकून आहे. बाहेरून मंदिर साधारणच दिसते पण आत गाभाऱ्याबाहेर दरवाज्याच्या वरच्या बाजूला निद्रिस्त विष्णुंची प्रतिमा कोरलेली आहे. चेहऱ्यावरील भाव लक्ष्यवेधी आहेत. छतावर नंदीवर आरूढ झालेल्या शिवांच्या प्रतिमा आहेत. मंदिराबाहेर काही भग्न शिवलिंग व नंदी सापडतात.
मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यात एक ओढा आहे. पावसाळ्यात या ओढ्याला पाणी असते.
खिरेश्वर गावातून तोलार खिंडी ओलांडून हरिश्चंद्रगडावर जाता येते.
   












मुक्ताई मातेचे मंदिर खिरेश्वर
मुक्ताई मातेचे मंदिर खिरेश्वर 


मुक्ताई मातेची मूर्ती - मुक्ताई मंदिर, खिरेश्वर
मुक्ताई मातेची मूर्ती - मुक्ताई मंदिर, खिरेश्वर

याशिवाय गावात छोटे मुक्ताई मातेचे मंदीर दिसते.मात्र हे मंदिर तुलनेने नवीन असावे,

१) टोलारखिंडमार्गे :-

गावातून टोलारखिंड मार्गे गडावर जाण्यासाठी मळलेली सोपी वाट असुन या वाटेने गडावरील्र मंदिरापर्यंत जाण्यास चार तास लागतात. वाट सोपी असली तरी चढ असल्याने चांगलीच थकवणारी आहे. 
खिरेश्वर गावातून होणारे टोलारखिंडीचे दर्शन 
टोलारखिंडीच्या वाटेने दिसणारा खिरेश्वर परिसर
घनदाट झाडीतून चढणारी वाट
टोलार खिंडीचा परिसर



डिसेंबर नंतर या मार्गावर कुठेच पाणी नसल्याने पुरेसे पाणी सोबत बाळगावे. खिरेश्वर गावातुन सुरवात केल्यास टोलार खिंडीत येण्यास साधारण दीड तास लागतो. 

तोलारखिंड येथिल वाघ्रशिल्प
तोलारखिंड येथिल वाघ्रशिल्प

तोलारखिंड येथिल शिवलिंग
तोलारखिंड येथिल शिवलिंग

   या खिंडीत वाघाचे शिल्प कोरलेला दगड ठेवलेला असुन सरळ जाणारी वाट कोथळे गावात जाते तर डावीकडे कड्यावर चढणारी वाट आपल्याला हरिश्चंद्रच्या माथ्यावर घेऊन जाते. आता आपण नगर आणि पुणे यांच्या सीमेवर उभे राहतो. हा वाघ म्हणजे स्थानिक लोकांच्या मते संरक्षक देवता. याशिवाय इथे शिवलिंग ही दिसते.थोडी विश्रांती घेऊन पलीकडे न उतरता डाव्या बाजूच्या कातळात खोदलेल्या खोबणीत हात-पाय गुंतवीत वर चढू लागावे.

तोलारखिंड नंतर असलेला दगडाचा चढाईचा मार्ग
तोलारखिंड नंतर असलेला दगडाचा चढाईचा मार्ग




 
 




टोलारखिंडीच्या पुर्वबाजुला असणारा १४८८ मीटर उंचीचा कारकाईचा डोंगर

या कड्या मध्ये खोबण्या आहेत आणि लोखंडी खांब बसवले आहेत आणि त्यातूनच वाट कडून हा कडा चढावा लागतो (सोपी श्रेणी, फक्त चढताना खाली बघू नये )
बालेकिल्ला डाव्या हाताला ठेवत तारामती शिखराच्या परिसराकडे जाणारी वाट

 जसजसे वर चढू लागावे तसतशी दोन डोंगरामधली दरी आ वासून रुंदावत जाते. तिचे रौद्ररूप न्याहाळत माथ्यावर येतो. येथे थोडीशी तटबंदी दिसते. हरिश्चंद्रगडावर आल्याची ती पहिली खूण. तटबंदी पासुन अर्ध्या तासातच आपण तटबंदीच्या आत पोहोचतो. या वाटेने थोडे पुढे आल्यावर वाटेला दोन फाटे फुटतात. यातील जास्त मळलेली वाट थेट हरिश्चंद्र मंदीराकडे जाते तर कमी मळलेली वाट बालेकिल्ल्याच्या दिशेने जाते.
या झोपडी जवळून दोन वाटा फुटतात डावीकडची टोलार खिंडीकडे तर उजवीकडची वाट जुन्नर दरवाज्याकडे

 हरिश्चंद्रगडाच्या दक्षिण माथ्यावर तोलारखिंडीतून वर चढून गेल्यावर डाव्या हाताला व्होल्कॅनिक प्लगसारखी (म्हणजे भूगर्भातील लाव्हा बाहेर पडतो ते मुख) रचना दिसते. लाव्हा रस बाहेर पडण्याच्या क्रियेमुळे तो भूभाग बाजूच्या भूभागापेक्षा उंच झालेला आहे. तोच हरिश्चंद्रगडाचा बालेकिल्ला होय. बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी खास असा रस्ता नाही; मस्त रान तुडवत रस्ता शोधत जाणे हाच मार्ग!
पठारावरून दिसणारा बाल्ले किल्ला
पठारावरून दिसणारा बाल्ले किल्ला

पुढे डाव्या बाजूला गच्च झाडीतून डोके वर काढत रोखून राहणारा हरिश्चंद्र शिखर आपले लक्ष वेधून घेतो. गडाची तटबंदी पुर्णपणे घडीव दगडात बांधलेली असुन या बाजूची तटबंदी मोठ्या प्रमाणात ढासळलेली आहे. त्यात या दिशेला असलेला दरवाजा पण कोसळल्याने तुटलेल्या तटबंदीतुन आपण माथ्यावर प्रवेश करतो. गडाची दुसऱ्या बाजुस असलेली तटबंदी शिल्लक असली तरी त्यातील दरवाजा कोसळलेला असुन त्याचा केवळ चौथरा शिल्लक आहे. बालेकिल्ल्याचा माथा साधारण ३ एकरवर पसरलेला असुन त्यावर लहान-मोठ्या वास्तुंचे अवशेष तसेच पाण्याची लहान-मोठी चार टाकी पहायला मिळतात. यातील तटबंदीच्या काठावर असलेले एक टाके कोरडे पडलेले असुन एका टाक्यावर गणपतीचे शिल्प कोरलेले आहे. गडाच्या सर्वात उंच ठिकाणावर किल्लेदाराचा वाडा असुन या वाड्याच्या चौथऱ्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन केलेला आहे. वाड्याच्या बाहेरील बाजुस शिवलिंग असलेली दगडी घुमटी असुन आतील बाजुस पाण्याचे लहान टाके आहे. या पाचव्या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. बालेकिल्ल्याचा माथा समुद्रसपाटीपासुन ४४८२ फुट उंचावर असुन माथ्यावरून कळसुबाई, रतनगड, आजोबा, घनचक्कर, भैरवगड,कुलंग,अलंग, मदन  असा उत्तरेकडील, तर माळशेज घाट, भैरवगड, नानाचा अंगठा, जीवधन हा दक्षिण- पश्चिमेकडील प्रदेश नजरेस पडतो.
   हरिश्चंद्रगडावरील या शिखराची तटबंदी सोडल्यास या गडाला कोठे  तटबंदी नाही. गडमाथ्यावर पोहचले कि समोर एक रुळलेली पाउल वाट दिसते आणि खूप दूरवर फार हरिश्चंद्र गडाचे तारामती शिखर दिसते . या डोंगर माळावरुन सलग चालत, चढून उतरून मंदिरापर्यंत जाता येते .इथे वाट चुकण्याची काहीच शक्यता नाही कारण तुम्हाला ठराविक अंतरावर चहा,लिंबू सरबत,ताक विकणारे लोक सापडतील पण आता मंदिर जवळ जवळ  ८ कि.मी लांब आहे आणि वाट कधी दाट निर्बीड अरण्यातून तर कधी ओसाड माळरानावरून जाते आणि त्यात खूपच फसव्या वाटा असतात म्हणजे तुम्ही कुठेही वाट चुकलात कि हात पाय आपटून भोकाड पसरले तरी ऐकायला जवळपास कोणी नसते(अपवाद फक्त जंगली प्राण्यांचा ) म्हणून वाट चुकणार नाही याची काळजी घेणे खूपच आवश्यक आहे.
      इथे ताक लिंबू सरबत विकणाऱ्या लोकांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे .सगळे लोक जवळच्या कोथळे, लव्हाळी, कोहोने,पेठाची वाडी  गावातून एवढी पायपीट करून येतात हे एक आश्चर्य आहे कारण या वाटेवरून खूप कमी लोक फिरकतात तरी देखील हे लोक येथे ताक, सरबत विकायला येतात .त्यांचा उद्देश एकाच असतो कि इथे येणाऱ्या लोकांना वाट दाखवावी आणि ते हि पैश्यांची मागणी न करता म्हणजे तुम्ही त्यांच्याकडून तक सरबत घ्या अथवा नका पण ते तुम्हाला योग्य रस्ता दाखवतीलच याची खात्री आहे ( या भागात जवळ जवळ सर्व लोक माळकरी आहेत त्यामुळे त्यांना महाबळेश्वर, माथेरान , लोणावळा ,खंडाळा,भीमाशंकर,भंडारदरा   इत्यादी सारखे "पैसे घेतल्याशिवाय काहीही सांगायचे नाही"  चे वारे नाही लागले अजून ) .ताक सरबत विक्री तर त्यांच्या साठी गौण विषय आहे . त्यामुळे सगळीकडे चांगला अनुभवच येतो त्यांना धन्यवाद देत आपण आपल्या वाटेने चालू लागायचे.

कोथळेगावातून चढणारी वाट :-

   खिरेश्वर गावातून  टोलारखिंडीत चढणारी वाट पुढे उतरुन कोथळे गावी जाते. खिरेश्वर परिसरातील नागरिकाना जर कोथळ्याला जायचे असेल तर याच वाटेने जातात. खिरेश्वरवरुन कोथळे गावात जायचे म्हणजे पुन्हा माळशेज रोड वर जाऊन बस पकडून ओतूरला जाऊन दुसरी बस पकडून ब्राह्मणवाडा -कोतूळ ला जावे लागते आणि मग पुन्हा आणखीन बसने किंवा जीपने कोथळे ला जावे लागते म्हणजे वेळ भरपूर लागतो आणि पैसा हि त्या पेक्षा हि १९ कि.मी. ची पायपीट स्थानिकांना परवडते.अर्थात ज्यांना केवळ हरिश्चंद्रगड न बघता, मुळा खोर्यातील इतर दुर्ग जसे भैरवगड, कलाडगड, कुंजरगड बघून त्याला जोडून हरिश्चंद्रगड बघायचा असेल तर कोथळ्यावरुन टोलारखिंडमार्गे हरिश्चंद्रगड किंवा पाचनई मार्गे हरिश्चंद्रगड असे दोन पर्याय आहेत. कोथळेमार्गे हरिश्चंद्रगडला जाण्याची माहिती घेउया.
   मुंबईहुन दोन मार्गाने कोळथे या टोलारखिंडीच्या पायथ्याच्या गावी जाता येते.
१) मुंबई - कल्याण - मुरबाड - माळशेज घाट मार्गे ओतुर गाठावे (अंतर १५९ किमी). ओतुर एसटी स्टॅंडच्या बाजूने एक रस्ता बामणवाडा - कोतुळ (अंतर ३० किमी) - विहिर (कुंजरगडाच्या पायथ्याचे गाव) मार्गे कोळथे (अंतर २५ किमी) गावात पोहोचतो. ( एकुण अंतर २१४ किमी )
२) मुंबई - इगतपुरी - घोटी - भंडारदरा - मार्गे राजुर ( अंतर १५५ किमी ) गाठावे. राजुरहुन कोतुळला जाणार्‍या रस्त्यावर राजुरपासुन ४१ किमीवर कोथळे गाव आहे.एकुण अंतर १९६ किमी. अकोलेहून पाचनईला संध्याकाळी ६ वा. मुक्कामी बस आहे.कोथळेसाठी सकाळी १०.३० व संध्याकाळी ५,३० ला मुक्कामी बस आहे. अर्थात बसची खात्री नाही, तसेच या मार्गावर खाजगी जीपही तुरळक असतात.त्यामुळे या परिसरातील भटकंतीला स्वतःच्या वहानाशिवाय पर्याय नाही.  मुंबईहुन माळशेज घाटमार्गे ओतूर-बामणवाडा- कोतुळ- विहीर किंवा मुंबई-घोटी– भंडारदरामार्गे राजूर फाटा या मार्गाने कोथळे गावात जाता येते.
३) पुण्यावरुन या परिसरात जायचे झाल्यास दोन पर्याय आहेत. एकतर पुणे-नाशिक मार्गावरील आळे फाटा गाठून तिथून ओतुर गाठावे (अंतर  किमी). ओतुर एसटी स्टॅंडच्या बाजूने एक रस्ता बामणवाडा - कोतुळ (अंतर ३० किमी) - विहिर (कुंजरगडाच्या पायथ्याचे गाव) मार्गे कोळथे (अंतर २५ किमी) गावात पोहोचता येईल.  
    कोथळे मुक्काम करायची वेळ आल्यास गावातील मंदिरात १० जणांची राहाण्याची सोय होते. किंवा १० किमी वरील पाचनई गावात राहाण्याची व्यवस्था आहे .जेवणाची सोय मात्र स्वत: करावी लागेल किंवा १० किमी वरील पाचनई गावात जेवणाची सोय होते.

 कोतुळ गावातून कोळथे गावाकडे जाताना गावाच्या अर्धा किमी अलिकडे (राजुरच्या बाजुने येताना कोळथे गावाच्या पुढे ) एक कच्चा रस्ता टोलार खिंडीकडे जातो. इथे हरिश्चंद्रगड कळसुबाई अभयारण्य असा मोठा फलक लावलेला आहे. तसच टोलारखिंडीकडे असा बाण दाखवलेला फलकही बसवलेला आहे.


खाली दिसणारे कोथळे लव्हाळी गाव 
                                    

       याच वाटेने टोलरखिंडीतून सुमारे दीड तासाचा चढ चढून आपण वाघाचे शिल्प असणार्या ठिकाणी पोहचतो. इथून खिरेश्वरकडून येणारी वाट आपल्याला मिळते. बाकी वर्णन वर दिलेलेच आहे.                                

जुन्नर दरवाजा/राजघरची वाट :-

    हरिश्चंद्रगडावर या बाजुने चढणारी हिच वाट बहुधा मुळ मार्ग असावा. या वाटेवर असणारे एकंदरीत अवशेष बघता हा निष्कर्श निश्चितच काढता येतो. या वाटेने सहसा कोणी दुर्गारोही चढत नाही.मात्र गड बघून परत येताना या वाटेने उतरल्यास गडासंदर्भात असणारे आणखी प्राचीन अवशेष पहाता येतात. 
खिरेश्वर गावात असणार्या नागेश्वर मंदीराजवळ काही अंतरावर कातळात कोरलेली दोन लेणी असुन यातील एक लेणे बारा खांबावर तोललेले आहे. जवळच पाण्याचे बारमाही टाके आहे. 
 या लेण्याजवळूनच जुन्नर दरवाजाने गडावर जाणारी वाट आहे पण वाटाड्या सोबत असल्याशिवाय या वाटेने जाऊ नये. हि वाट सामान्य पर्यटकांच्या कुवतीबाहेर आहे. आपण या वाटेने उतराई समजून घेणार आहोत.
     टोलारखिंडीमार्गे गड चढून आल्यावर बालेकिल्ल्याच्या टेकडीवर चढणार्या वाटेवर आपल्याला डावीकडुन म्हणजे दक्षिणेकडून जुन्नर दरवाजाने बालेकिल्ल्याकडे येणारी पायवाट दिसते. 
जुन्नर दरवाजा पहायचा असल्यास किंवा या वाटेने उतरायचे असल्यास आपण या वाटेने चालायला सुरवात करायची. बालेकिल्ल्याला वळसा घालत जाणारी हि वाट १० मिनीटात एका उतारावर पोहोचते. 
इथून मोठा विस्तृत मुलुख दिसतो. आग्नेय दिशेला हाटकेश्र्वर पासून हडसर निमगिरी तर समोरचा सिंदोळा, उधळ्या, गुण्या, भोजगिरी ते पार नैऋत्येला देव दांड्या, नाणेघाट, भैरवगड ढाकोबा, गोरख मच्छिंद्र पर्यंतचा मुलुख डोळ्यात साठवून घ्यावा. 
आणखी एक टप्पा उतरत वाट सपाटीवर येते.इथे काही अंतर गेल्यावर पाण्याचे टाके दिसते.पाणी बऱ्यापैकी स्वच्छ आहे त्यामुळे थोड पिउन ताजेतवाने होउन पुढे निघायचे. 

समोर एक धार उजवीकडे उतरते त्याच धारेवर हरिश्चंद्र गडाचे नेढे आहे, जे खिरेश्र्वरहून चढताना व्यवस्थित दिसते.  
डावीकडे वळून किंचितसा अरुंद असा ट्रेव्हर्स लागतो ,तो सावकाश पार करून वाट खालच्या भागात पोहचतो. आता मागे उजवीकडे तारामती शिखर तर डाव्या हाताला बालेकिल्ला दिसत असतो.  या उताराने थोडे खाली आल्यावर डाव्या बाजुस कातळावर एका रेषेत खोदलेले काही खळगे पहायला मिळतात. या खळग्यांच्या खालील बाजुस कातळात खोदलेल्या दोन गुहा असुन एका गुहेशेजारी पाण्याचे टाके आहे. यातील एक गुहा राहण्यायोग्य असुन त्यात चार-पाच माणसे राहु शकतात तर दुसऱ्या गुहेच्या मध्यभागी सुबक पण भग्न शिवलिंग मांडलेले आहे. या गुहा पाहुन मूळ वाटेने अजुन थोडे खाली उतरल्यावर सपाटीवर एका मोठ्या वास्तुचे अवशेष पहायला मिळतात. वाटेने थोडे पुढे आल्यावर उघडयावर कातळात कोरलेले अजुन एक पाण्याचे टाके दिसते. या टाक्याच्या पुढील भागात गडाचा जुन्नर दरवाजा आहे. हा दरवाजा आपल्याला नाणेघाटाच्या घळीची आठवण करून देतो. हिच ती राजनाळेची सुरुवात. काही ठिकाणी कोरीव पायऱ्या आहेत. 

घळीच्या वरील दोन्ही बाजुस तटबंदी बांधलेली असुन घळीत उतरण्यासाठी पायऱ्या कोरलेल्या आहेत. दरवाजाची पुर्णपणे पडझड झालेली असुन केवळ बांधकामाच्या खुणा शिल्लक आहेत.रुंद अशा नाळेत काही टप्पे सावकाश उतरावे लागले. कधीकाळी हा राजमार्ग होता पण काळानुसार बरीच पडझड होत सद्या मात्र बिकट परिस्थिती आहे. 
काही ठिकाणी उभ्या कातळाकडे तोंड करून उतरणं भाग आहे, तेंव्हा आजूबाजूच्या कातळातले गोल आधार खळगे सहजीच हातात येतात.
 या घळीत साधारण १०० फुट खाली उतरल्यावर कातळात कोरलेली एक गुहा व तिच्या वरील बाजुस पाण्याचे टाके पहायला मिळते.



शिवलिंग आणि पूजक खोदलेले शिल्प, खोदलेल्या पायऱ्या, मेटाच्या जागा बघता, पूर्वी कदाचित हीच मुख्य वाट असेल असं वाटलं. 

 
नाळ आता बऱ्यापैकी रुंद झालेली असगे. डावीकडच्या धारेमधले आरपार छिद्र नेढे डोक्यावर येते. नाळ संपून धोंडे भरलेला ओढा सुरू होतो, ओढ्यात झुडुपे दिसतात. इथून एक वाट डावीकडे कड्याला चिकटून कारवीतून आडवी जाते. 
नाळेतून बाहेर येत वाटेला लागले कि मागे तारामती त्या पलीकडे रोहिदास तर दूरवर नाणेघाट आणि भैरवगड. तसेच खाली खिरेश्र्वर, पिंपळगाव जोगा धरण दिसतात. झाडी भरली आडवी वाट पार केल्यावर कळशा डोंगर आणि त्याची खिरेश्र्वर दिशेने उतरत गेलेली सोंड सामोरी येते. घळीच्या दुसऱ्या बाजुस खिरेश्वर गावाच्या दिशेने गेलेली गडाची सोंड असुन या सपाटीवर मोठ्या प्रमाणात घरांचे अवशेष आहेत. 
मोठ्ठी नैसर्गिक गुहा बाजूला ठेवत गच्च कारवीमधून पुढे धारेवर पोहोचायचे आहे. कळशा डोंगराला जोडणाऱ्या धारेवरचा मधला गवताळ घसरडा टप्पा सावकाश पार करून खिंडीत यावे.कोरांटीसारखी दिसणाऱ्या कारवीच्या जातीतल्या ‘आखरा’ नावाच्या झुडुपांमधून वाट आहे. कमरेएवढ्या उंचीची ही झुडुपं अतिशय बोचतात. चार वर्षांनी फुलणाऱ्या आखराचा मध औषधी असतो असे स्थानिक लोक सांगतात. उभ्या धारेवरची घसारायुक्त उतराई करुन सुळकेवजा डोंगरास डावीकडून वळसा घालून आडव्या वाटेवरून कोरीव पावठ्या न्याहाळत ओढ्याजवळच्या गच्च झाडीत विसावायचे. झाडीतून उतरणाऱ्या उभ्या वाटेने खिरेश्वर गावची सपाटी गाठली. राजनाळ उतरायला साधारण तीन तास लागतात... 
   राजघरच्या या वाटेने जाताना आपल्याला हरिश्चंद्रगडाचे नेढे दिसते.हेच नेढे खिरेश्वर गावातून देखील दिसते. अशीच नेढी उर्फ दगडला असलेली नैसर्गिक छिद्र अनेक गडावर आहेत, उदा. राजगड, मदनगड, मल्हारगड, लोहगड, इर्शाळगड वगैरे. यातील काही नेढ्यात जाता देखील येते. मात्र हरिश्चंद्रगडाच्या नेढ्यात जाणे म्हणजे जीवावरचे धाडस आहे. इथे जाण्याचा चित्तथरारक अनुभव जुन्नरचे माजी सैनिक श्री. रमेश खरमाळे यांनी घेतला. हा अनुभव आपण त्यांच्याच शब्दात वाचूया. 
खिरेश्वरच्या नेढ्याचा चित्तथरारक अनुभव
आमचा प्रवास जंगलवाटा तुडवत सुरू झाला तो हरिश्चंद्रगडावर जाणाऱ्या जुन्नर दरवाज्याने. माझ्या निरीक्षणातुन एक गोष्ट लक्षात आली की हरिश्चंद्र गडावर पुर्वी जाण्यासाठी मुख्य वाट म्हणजे हाच जुन्नर दरवाजा होय. कारण या वाटेवर कोरलेले पायरीमार्ग,हाताच्या बोटांच्या सपोर्ट साठी कातळात कोरलेल्या खोबण्या, घळीतील पाण्याचे टाके, विशिष्ट पद्धतीने खडकात कोरलेल्या पायर्‍या व घळीतील पायरीमार्गावर असलेल्या खिरेश्वर येथील नागेश्वर मंदिराचे दगडी शिल्प खुप काही सांगुन गेले. ही घळ जेथे संपते ते ठिकाण म्हणजेच हरिश्चंद्रगडाच्या बालेकिल्ल्याचा पायथा होय, म्हणुन या मार्गाला खुप महत्व. दुसरा संदर्भ म्हणजे जुन्नर तालुक्यातील असलेले सात किल्ले याच मार्गाने जवळचे. लवकरात लवकर व कुणाच्या निदर्शनास न येता छुप्यामार्गाने येथे पोहचण्याची ही वाट असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. असो
पाऊल वाटा झपझप तुडवत व मार्ग काढत आम्ही आता तीन चढाईचे टप्पे चढून वर आलो होतो. घड्याळात 10 वाजले होते. उजव्या हाताला ज्या ठिकाणी जायचे होते तो भाग दिसत होता. परंतु राॅकपॅच अवघड वाटत होता. आमच्या कडे कोणतेही चढाईचे साधन नव्हते. सोबत पाण्याच्या बाटल्या व न्याहरीची शिदोरी होती. कॅमेरा व ट्रायपाॅड बगलेत अडकवलेले होते. एक राॅकपॅच दत्ताने बोट करून दाखवत बोलला येथुन आपण चढूया. मी हो म्हटले व चढण्यास प्रारंभ केला. मध्यभागापर्यंत काहीच वाटले नाही परंतु तेथुन पुढे प्रसंग खुपच अवघड होता. दत्ताला सांगत होतो तुम्ही चढू नका. परंतु त्यांनी ऐकले नाही व तेथेच थरथर कापु लागले. त्यांना धिर देत देत सपोर्ट करत कसेबसे थोड्या सपाटीवर पोहचलो. जवळपास एकतास आमचा येथे खर्च झाला. त्या डोंगरावर चढण्यासाठी कुठून जागा मिळते का? ते मी त्यांना तेथेच थांबवत शोधू लागलो. डोंगराचा पुर्व, दक्षिण व पश्चिम भाग संपूर्ण पायाखाली घालत. चढाई मार्ग शोधु लागलो परंतु यश काही प्राप्त झाले नाही. खुप खिन्न व निराश झालो. कडेकपारीने जुन्नर दरवाजाकडे मित्रांना पुढे या आवाज देत चालू लागलो.

ते तिघे वाळलेल्या कारव्यांमधून मार्ग काढत घळीच्या वाटेकडे येत होते. मला आता जंगली जनावरांचा मार्ग मिळाला होता. मी पटपट चालू लागलो. घळीतील अर्धी वाट चढून मित्रांची वाट पाहू लागलो. बसल्या बसल्या मला पुरातन कोरीव खुणा उजव्या हाताला दिसुन आल्या. त्यांचा मागोवा घेत घेत मी पुन्हा अवघड कड्याकडे चालु लागलो. अतिशय निसरडी वाट व जवळपास 300 फुट शेजारी खोल दरी. परंतु प्रयत्न सोडायचे नाही हाच निश्चय मनी. आता एका अवघड राॅकपॅच जवळ आलो होतो.
तेथुन वर जवळपास पन्नास फुट वर चढायचे होते. चढता येईल का हा विचार करत असताना खाली दरीत उतरण्याचा एक पायरीमार्ग दिसु लागला. काळाच्या ओघात तो पुसला गेला होता. खडकात कोरलेल्या पायर्‍या होत्या. हाताच्या बोटांच्या सपोर्ट खोबण्या मात्र चांगल्या स्थितीत होत्या. वर वळुन पाहीले तर दहा बारा खोबण्या निदर्शनास आल्या. थोडा धीर आला. त्या खोबण्यांच्या मदतीने वर चढायला सुरुवात केली. चढणे अवघड होते परंतु भक्कम व विश्वासु सपोर्ट त्या खोबण्यांचा होता. मित्रांचा आवाज कानी येत होता सर तुम्ही कोठे आहेत. मी आवाज दिला तेथेच घळीत बसून रहा. मला तुमच्या पर्यंत यायला कमीत कमी दिड, दोन तास लागतील. मी कोठे आहे हे त्यांना समजने शक्य नव्हते. परंतु त्या घळीत त्यांना आवाज मात्र पोहचला होता. मी आता एका सपाट भागावर आलो होतो. माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता. मी दक्षिणेकडे चालू लागलो व पुढे पन्नास फुटावर जावून अचानकपणे थांबलो. गगनात मावेनासा झालेला आनंद क्षणात नाहीसा झाला. समोरचे दृश्य खुप भयानक होत. पुढे एक फुट रूंद एवढीच जागा होती. ज्या ठिकाणाची उत्सुकता होती त्या ठिकाणी पोहचता येईल का? हा प्रश्न होता. मी एकटाच होतो. सटकलो तर त्या कड्याला माझे नाव दिले जाईल हे मात्र नक्की. काय करावे सुचेना. पुर्वेकडे खिरेश्वर दृश्य, दक्षिणेकडे माळशेजघाट दृश्य तर पश्चिमेला तारामती शिखर दृश्य फक्त मान 180 डिग्री फिरवली की दिसत होते.दोन, तीन हजारहून जास्त खोल दर्या दोन्ही बाजूला राक्षसी रूपात दिसत होत्या. दृश्य मात्र लाजवाब परंतु भयानक रूपात. क्षणात स्वर्गात मी अवतरल्याचा भास मला झाला. येथुन परतायचे नाही हाच मी निर्णय घेतला. घोड्याच्या पाठीवर दोन बाजुला पाय सोडून बसावे तसा मी त्या दोन्ही बाजुला पाय खाली सोडत तीन हजार फुट खोल दरी असलेल्या कातळ भिंतीवर बसलो. हळु हळु पुढे सरकू लागलो. पुढे दहा फुट खोल कातळाच्या नैसर्गिक खाचेत उतरायचे होते. तेथपर्यंत अगदी धाडसाने उतरलो. या ठिकाणी तर जागा फक्त अर्धाफुट पेक्षाही कमी होती, परंतु भिती न बाळगण्याचे कारण म्हणजे येथील असलेला पक्का व भरोसेमंद खडक होता. येथुन पण मला ज्या ठिकाणाची उत्सुकता होती ते ठिकाण दिसत नव्हते. पुन्हा मनाचे खच्चीकरण झाले. आता खिरेश्वर बाजुने जवळपास पंचवीस फुट खोल उतरायचे होते. मार्ग अवघड होताच. फसलोच तर हेलिकॉप्टर शिवाय सुटका होणे नाही हे मात्र नक्की लक्षात येत होते. आणि सटकलोच तर खिरेश्वर गावात समाधी बनणार हे ही तीतकेच खरे होते.
आता आर या पार हाच पर्याय होता. धाडस करत मी खाली पंचवीस फुट उतरलो. व त्या कातळ कड्याचा आधार घेत समोरचे दृश्य पाहून नाचू लागलो. समोरच्या दृश्याचे वर्णन कोणत्या शब्दात करावे असे शब्दच सुचेनासे झाले. माझे ध्येय माझ्या समोर होते. परतीच्या मार्गाला काय वाढून ठेवलंय सर्व काही विसरून गेलो होतो. वाचताना वाचक निश्चितच माझी तुलना वेडा, सटकू किंवा अन्य काही करतील यात शंकाच नाही. परंतु मी जे काही पहात होतो अनुभवत होतो ते मात्र माझ्या जीवनात काही वेगळच होत. माझ्या समोर एक निसर्ग निर्मित जवळपास 35 ते चाळीस फुट लांबीचा पिस्तुल पुल होता. तो 2200 वर्षापासुन येथे असावा कारण येथील दृश्य पाहण्यासाठी कातळात कोरलेला मार्ग आजही दिसून येत आहे. कदाचित तो मार्ग आज चांगल्या स्थितीत असता तर जगातील लाखो पर्यटक येथील दृश्य पहायला निश्चितच आकृष्ट झाले असते. व जुन्नर तालुक्यातील खिरेश्वर गावचा इतिहास काही वेगळाच असता. मित्रांनो हे क्षण व हे निसर्ग वैभव मनाच्या कोपऱ्यात व सोबत असलेल्या कॅमेरात टिपायचे थोडेच विसरेल बर. हे तुमच्या पर्यंत पोचायलाच पाहिजे हा माझा नेहमीचा निर्धार असतो. मला माहित नव्हते कि मी माघारी पोहचेल की नाही परंतु ते कॅमेरात टिपण्याचा प्रयत्न करने गरजेचे होते. (हा थ्रिल प्रसंग आपण माझ्या “निसर्ग रम्य जुन्नर तालुका” या यूट्युब चायनलवर पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून सब्स्क्राईब करायला विसरू नका व इतर आपल्या मित्रमंडळीना पाहण्यासाठी शेर करायला विसरू नका.
https://www.youtube.com/c/NisargramyaJunnarTaluka… )
माझी एकाग्रता व एकनिष्ठता माझ्या कामी आली व आपले सर्वांचे “निसर्ग रम्य जुन्नर तालुका” पेजला असलेल्या अशिर्वादाने मी अतिशय जीवघेण्या प्रसंगातून मित्रांपाशी घळीत सुखरूप 2:00 वाजता पोहचलो. (आपणास विनंती असेल की आपण या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू नये) पुन्हा जुन्नर दरवाजाने चढण्यास सुरूवात केली. या जुन्नर दरवाजा मध्ये कोरलेल्या पायर्‍या काळाच्या ओघात व अतिवृष्टीच्या वेगाने वाहणाऱ्या पाण्याने लुप्त होत गेल्याने त्यांचे अवशेष मात्र पहावयास मिळतात. तसे जुन्नर दरवाजाने चढणे अवघड नाही. वर चढून गेल्यावर बालेकिल्ल्याचे रमणीय दृश्य दिसते. बालेकिल्ल्यावर दगडी तटबंदी पाण्याच्या टाक्या पाहता येथे 25 ते 30 जण येथे राहत असावेत असे येथील राहण्यासाठीचे बांधकाम अवशेषांवरून समजते.
बालेकिल्ल्यावर सध्या नवतरूणांनी श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्थापण्य केलेली प्रतिमा फारच सुरेख दिसत होती परंतु त्यावर छत असणे गरजेचे वाटले. यानंतर तारामती शिखर, गणेश लेणी व मंदिर परीसर भ्रमंती करत व दर्शन घेत कोकणकड्याचे अलौकिकतेचे डोळेभरून सौंदर्य पाहत परतीला लागलो.
एकदिवसीय हा प्रवास अगदीच दमछाक करतो परंतु निसर्ग सौंदर्य मात्र ही दमछाक क्षणात विसरण्यास भाग पाडते. पुन्हा जुन्नर दरवाजातून उतरताना सुर्यास्ताचे मावळतीचे विलोभनीय दृश्य “महाबळेश्वर “च्या सुर्यास्ताच्या ठिकाणाची आठवण करून देते. अगदी हुबेहुब सुर्य या ठिकाणाहून नभात लुप्त होताना दिसतो हे मात्र पाहण्यासारखे आहे. पुन्हा उतरणीला लागलो व त्या अंधुक प्रकाशात उतरणीच्या वाटेवर सरकत सरकत डोंगर पायथ्याशी पोहचलो. खिरेश्वर गावातील विजेचे दिवे जवळ जवळ येऊ लागले होते. त्या माळराणावरच्या कुसळीगवतावर पडणार्‍या पावलांचा आवाज घेत घेत चारचाकी पार्क केली तेथे पोहोचलो. चिंतामणीने पुन्हा ब्लॅक टी चा आग्रह केला. त्याला नाराज न करता चहाची चुस्की घेतली. घराच्या वाटेकडे लक्ष लागले होते. दत्ताचे आभार मानत पिंपळगाव धरणाच्या भिंतीवरील वरखाली असलेल्या रस्त्याने हळु हळु जुन्नरच्या दिशेने वाटचाल केली. ती विसावा घेण्यासाठी.

पाचनईमार्गे हरिश्चंद्रगड :-

 हरिश्चंद्रगडावर पुर्वी बहुतेक दुर्गभटके आणि पर्यटक खिरेश्वरमार्गे चढायचे. पुण्यावरुन पुणे-नाशिक मार्गावरील आळेफाटा किंवा मुंबईवरुन कल्याण्-अहमदनगर रस्त्यावरील माळशेज घाट चढून खुबीफाटा मार्गे खिरेश्वरला जाउन तिथून टोलारखिंडमार्गे हरिश्चंद्रगड असा ठरलेला मार्ग होता,मात्र या वाटेने गड गाठायला किमान तीन तास लागतात. त्यामुळे तुलेनेने कमी वेळाची आणि सोपी अशी पाचनई गावाकडची वाट आता प्रचलित झाली आहे. 



IMG_8330

IMG_8498
पाचनई गावातील घरे आणि मागे उभा असणारा हरिश्चंद्रगड 
पुणे ते पाचनई मार्गाचा नकाशा
 पाचनई गावातील वाघदेव

 पाचनई हे गाव समुद्रसपाटीपासून ८६६ मीटर उंचीवर असून येथून जाणारी वाट ही सदाहरित अशा अरण्यातून आपल्याला गडाच्या माथ्यावर घेऊन जाते. पाचनईमार्गे हरिश्चंद्रगडावर जाण्याची वाट नगर जिल्ह्यातून आहे. यासाठी जर मुंबईवरुन जायचे असेल तर मुंबई-नाशिक महामार्गावरील घोटी या गावी उतरावे. तिथून संगमनेर मार्गावरील राजूर या गावी यावे. राजुर - पाचनई हे अंतर २९ कि.मी असुन राजुर येथुन पाचनईला जाणारी एस.टी.बस आहे.
वाटेत दिसणारे आंबित धरण

तर पुण्यावरुन पाचनईला जायचे असेल तर पुणे -नाशिक रस्त्यावरील संगमनेरवरुन अकोले या तालुक्याच्या गावी जावे.अकोलेहून पाचनईला संध्याकाळी ६ वा. मुक्कामी बस आहे. दुसरा मार्ग म्हणजे तुम्हाला पुण्याहून ओतूर- ब्राह्मणवाडा -कोतूळ- कोहोने -लव्हाळी मार्गे पाचनई पर्यंत पोहोचावे लागते म्हणजे जवळ जवळ ४.५  ते ५ तास लागतात.
हरिश्चंद्रगडावरुन वहाणारे पाच धबधबे
 पाचनई गावामधून दिसणारे नाप्था आणि कलाडगड
 
 गावाच्या मागेच हरिश्चंद्रगडाचा पहाड आडवातिडवा पसरलेला आहे. पुर्वी अतिशय दुर्गम असणार्या या गावी आता बर्याच सोयी झाल्या आहेत.बर्यापैकी रस्ता झालेला आहे.गावात मुक्कामाची आणि जेवणाखाण्याची सोय होते.काही संपर्क क्रमांक :-
हॉटेल दुर्गा, हरिश्चंद्रगड 
हिरवळीने बहरलेला हरिश्चंद्रगड, धुक्याने लपेटलेला सह्याद्री, गडावरच्या मंदिरातील सुंदर शांतता, पाचनई परिसरातील पूर्ण प्रवाहाने वाहणारे खळाळते धबधबे आणि सोबतीला जीवलग मित्रांची मैफिल...एका परफेक्ट ट्रेकसाठी अजून काय हवं ??
सोबतच तुमच्या जीभेची काळजी घ्यायला असेल तव्यावरची गरमागरम भाकरी,झुणका,पाट्यावर वाटलेल्या घरच्या मसाल्यातल्या भाज्या व स्वादिष्ट उसळी,वाफाळता व घरच्या शेतातील आमटी भात, मिरचीचा ठेचा व अश्या अनेक अत्यंत चविष्ट घरगुती जेवणासाठी व टेंट कॅम्पिंगच्या सुखद अनुभवासाठी नक्की संपर्क करा.
सोबतीला तुमचं स्वतःच घर म्हणजेच हॉटेल दुर्गा !!
मार्गदर्शनासाठी गाईडची सोय
फोन न लागल्यास कृपया SMS करावा
संपर्क : 
संतोष येलमामे : 8605532254
प्रकाश सावळे : 7350826486 / 80087728231
नाफ्ता-डोमा शिखरांवरून सह्याद्रीचे विलोभनीय दृश्य दिसते. मी या भागात गेल्या 2 दशकांपासून भटकतोय, पण डोमा शिखरावर येण्याचा मुहूर्त आत्ता लागला.
या व्हिडिओमध्ये मी ही संपूर्ण पर्वत रांग समजावण्याचा प्रयत्न केलाय. एखादी चूक होऊ सुद्धा शकते, निदर्शनास आल्यास नक्की सांगावे.
नाफ्ता-डोमा शिखर सर करायचे असल्यास बजरंग भारमल, रा. पाचनई याला कॉल करा, अतिशय तयारीचा पठ्ठया आहे हा.
बजरंग भारमल - 9923268949
HOTEL GAARVA KOKANKADA HARISCHANDRAGAD...येथे सर्व ट्रेकर्स  सह्याद्रीच्या भटक्यांना घरगुती उत्कृष्ट जेवणाची व राहण्याची उत्कृष्ट सोय केली जाईल.  चुलीवरच्या जेवणाचा आस्वाद  घेण्यासाठी अवश्य भेट द्या. 
तसेच राहण्यासाठी टेंट (तंबू) उपलब्ध आहेत.
■पाहण्याची ठिकाणे■
◆केदारेश्वर गुंफा "शिवलिंग"
◆प्राचीन "गणपती" गुंफा लेणी आणि इतर लेणी समूह
◆कोकणकड्यावरील विलोभनीय दृश्य "सूर्यास्त"
◆महाराष्ट्रतील सर्वात उंच शिखरांपैकी शिखर "तारामती शिखर"
◆बालेकिल्ला
◆"चांगदेव ऋषींचे" तपस्थान
◆सहयाद्री पर्वत शिखरांची वेढलेले "पाचनई" गाव
■गडावर येण्यासाठी मुख्य पायवाटा■
◆पाचनई मार्गे 2 तास
◆खिरेश्वर मार्गे 4 तास
◆बेलपाडा मार्गे नळीची वाट 7 ते 8 तास
खाली  दिलेल्या नंबर्सवर नक्की संपर्क करा.
BHARAT Bharmal
◆9527612588◆
7039502182
फोन न लागल्यास SMS करावा
पाचनई पासून जवळच हापाटा कडा आहे, कोकणकड्याइतका विराट तर नाहीये, पण छातीत धडकी भरवणारा आहे. एका बाजूला सीतेचा डोंगर तर दुसऱ्या बाजूला आभाळाला भेदनारा नाफ्ता-डोमा शिखर. ही जागा हौशी पर्यटकांपासून अजूनतरी लपलेली आहे, पण वनखात्याने जागोजागी फलक लावल्याकारणाने आता इथे भविष्यात वर्दळ वाढेल. सर्व हौशी पर्यटकांना या जागेचे सौंदर्य अबाधीत ठेवावे अशी अपेक्षा.बाकी, इथून दिसणारा सूर्यास्त भन्नाट आहे

पाचनई गावातून चढणार्या वाटेवर  वनखात्याने सुरवातीला स्वागत कमान तसेच हर्सिश्चंद्रगड-कळसुबाई अभयारण्याचा फलक लावला आहे.

 
कळसूबाई हरिशचंद्रगड अभयारण्याची पाटी आपल्या स्वागताला हजर
गडाची वाट सुरु होतानाच भौगोलिक परीमाण दर्शवलेले आहे.  समुद्रसपाटीपासुनची उंची ४६७९ फुट (तारामती शिखर)
अतिशय सोपी आणि सहज जाता चढता येणारी ही वाट आहे. एकदा या वाटेवर पाय ठेवला की चुकण्याची शक्यताच नाही.
हीच ती वाट गडाकडे जाणारी आणि..समोर दिसणारा गड….
हा रस्ता मळलेला आहे. 
रूळलेली पायवाट
पायवाटेने जात असताना सहज मागे वळुन पाहीले तर हा सुंदर नजारा पाहावयास मिळतो

इथे याची आवश्यकता नाही








या वाटेवर रेलिंग बसवुन थोडा जो थरार होता तोसुद्धा उरलेला नाहीये.



इथे आपली वाट आडव्या समपातळीत कडा डाव्या हाताला ठेवून जाते
पाठमोरे दृश्य, कलाडगड आणी त्याचा अंगठा दिसतो आहे


बाकी वाटांच्या तुलनेत हि वाट सोपी आहे.
पाचनई गावाचा सुंदर नजारा

रस्ता खड्या चढणीवरून कातळभिंतीच्या खाली येऊन पोचतो. वाटेवर रेलिंग बसवलेले आहेत. इथे रस्ता उजवीकडे वळतो. इथून भिंतीच्या कडेकडेने रस्ता जातो .

..
 शेवटी रस्ता एका धबधब्याच्या सुरुवातीला येऊन थांबतो. इथे जरासे चुकण्यासारखे आहे . कातळ असल्यामुळे नक्की रस्ता कुठे जातो हे कळत नाही. 

जरा समोर पाहिले की एक बऱ्यापैकी रस्ता ओढा ओलांडून पुढे गेलेला दिसतो. इथेच नेमकी चूक होऊ शकते. हा ओढा इथे अजिबात ओलांडायचा नाही. भिंतीच्या कडेने आल्यावर ओढ्याच्या डावीकडूनच चालत राहायचे की पुढे परत रस्ता लागतो  इथे ओढा अजिबात ओलांडला नाही की बरोबर रस्त्याला लागतो. हा ओढा पुढे ओलांडला जातोच. 

हरीश्चंद्रेश्वराचे मंदिर जवळ यायला लागले की थोडीशी झाडाझुडुपांनी वेढलेली वाट आहे.

हाही रस्ता खूपच मळलेला आहे. समोरचा डोंगर चढला की कळते की आपण ज्या कातळभिंतीच्या कडेने आलो ती ज्या डोंगराचा भाग होती त्याच्या पलीकडे आलो आहोत. लांबवर कलाडगड, कात्राबाईची खिंडही दिसते. 

कपारीतून दिसणारा सुंदर धबधबा 

पावसाळ्यात या वाटेने आल्यास आपल्याला उधाणलेल्या निसर्गाचे दर्शन होते. शेवटी एकदाचे आपण गडमाथ्यावर येउन पोहचतो.

 

गडमाथ्यावरील पठार
हरिश्चंद्रगड’ व्हाया ‘गणेश दरवाजा’

 पाचनई जवळ असलेल्या लव्हाळी गावातून एक वाट हरिश्चंद्रगडावर चढते, ती म्हणजे गणेश दरवाज्याची वाट. काहीश्या अनवट वाटेची माहिती घेउया. लव्हाळी गावाच्या एका बाजूला भला मोठा डोंगर आडवा पसरलेला दिसतो. हरिश्चंद्रगडाचा भाग असलेल्या यालाच गणेशसोंड / गणेशधार तसेच वेताळधार असेही म्हणतात. साधारणपणे सांगायचे झाले तर गडाच्या मंदिरातील आवारात उभं राहून पूर्वेला पाहिलं तर मोठं पठार लाभलेली सोंड नजरेस पडते ती हीच. याच धारेच्या अल्याड पल्याड पाचनई आणि लव्हाळी.
555_2.jpg
फारशा वापरात नसलेल्या या गणेश दरवाजाच्या वाटेबद्दल माहितगार घेणं गरजेचं, गावातून सुरवातीला धनगर वस्तीत वाट येते. डावीकडे ओढ्याला समांतर अशी सपाट वाट. डाव्या हाताला भैरोबा दुर्ग, उजवीकडे वेताळ / गणेशधार तर समोर सरळ रेषेत टोलारखिंड. निघाल्यापासून पाऊण तासात ओढ्यात तयार झालेल्या नैसर्गिक कुंडा जवळील देवाच्या स्थानी आपण पोहचतो.
IMG_2272.JPG
शेंदूर लावलेले हे देवीच ठाणं, शुक्रवारी ग्रामस्थांची या देवीला ये जा असते. जागा बाकी भारीच रमणीय.

   इथून पुढची वाट वरच्या बाजूला सरकू लागते, लव्हाळीतील लोकांची गडावर जाण्यासाठी मुख्य वाट. वीस एक मिनिटांच्या चाली नंतर आपण आलो ती मळलेली वाट सरळ टोलार खिंडीत जाते. याच वाटेला डावीकडून म्हणजेच कोतुळ भैरोबा दुर्ग कडून येणारी वाट मिळते.मात्र आपले लक्ष्य गणेश दरवाजा ठरले असल्याने आपण उजवीकडे जाणारी बारीक वाट घ्यायची. पटकन सहजासहजी लक्षात न येणारी ही वाट त्या साठी कुणी माहितगार हवाच. आता खडी चढाई सुरू होते, खालचा झाडीचा भाग पार करून कातळ टप्प्यावर आलो आणि वळून पाहिलं विरुद्ध दिशेला भैरोबा दुर्ग मागे पडलेला दिसतो तर डावीकडे झाडी भरली टोलारखिंड बऱ्यापैकी जवळ वाटते.

IMG_2294.JPG

खिंडीला मागे सोडून वाट पुन्हा झाडीमध्ये शिरते, नागमोडी चढाई मात्र चांगलाच दम काढते, कड्याला उजवीकडे ठेवत कधी दगड धोंड्यातून तर कधी झाडीतून तर कधी लहान लहान कातळ टप्प्यातून वाट तिरक्या रेषेत वर जात मुख्य कड्याला बिलगते.
IMG_2332.JPG
इथेच शेंदूर फासलेला दगडाचा देव दिसतो. अर्थातच गावकरीच याचे भक्त ! आता अरुंद वाट वर जाऊ लागली, मधले किरकोळ कातळ टप्पे पार केले कि समोर येतात त्या कातळात कोरलेल्या दीड दोन फूट रुंद अशा पायऱ्या.
IMG_2340.JPG
  अंदाजे साठ सत्तर पायर्या चढाव्या लागतात.
IMG_2323.JPG
निरीक्षण केल्यावर एक जाणवलं ते म्हणजे या पायऱ्या असलेल्या मोठ्या कातळटप्प्यातच त्या बाजूचा टोलार खिंडीचा कातळटप्पा जो खिरेश्र्वरहून येताना लागतो. थोडक्यात दोन्ही एकाच आणि समान पातळीवर असाव्यात.
IMG_2391.JPG
पायऱ्या चढून जेव्हा वर आलो कि भैरोबा दुर्ग बराच खाली दिसु लागतो. आता सुरू होते ती कमरे एवढ्या झाडीतून चढाई. झाडी भरला चढाईचा टप्पा संपून वर मोठ्या नैसर्गिक गुहेजवळ येउन पोहचतो. 
    गुहेसमोर असलेल्या अर्धवर्तुळाकार कड्यावर वरून येणाऱ्या पावसाळी ओढ्यामुळे पाण्याची कुंड तयार झालेली दिसतात. बऱ्यापैकी प्रशस्त अशा गुहेत इथली मंडळी पावसाळ्यात गाई गुरे ठेवतात. गुहेला डावीकडे ठेवत वरच्या पठारावर यावे.
IMG_2402.JPG
बाजूलाच गणपतीचं स्थान तसेच या पठारावरील या कातळ भागात काही ठिकाणी पॉट होल्स आहेत.
IMG_2438.JPG
 आता पुढची चाल ही गवतातून आहे. लहानशी टेकडी चढून वाट उजवीकडे आडवी जाऊ लागते. इथून मागे वळून पाहिले तर भैरोबा दुर्गला जोडलेली डोंगर रांग तर पूर्वेला कारकाई कडील रांग सहज नजरेत येते.
IMG_2444.JPG
पुन्हा पंधरा वीस मिनिटांची खडी चढाई करत वर आलो तेव्हा बालेकिल्ला समोर येतो. बालेकिल्ला डावीकडे ठेवत आणखी एक टेकडी चढून वर आलो कि काही अंतरावर टोलार खिंडीतून वर येणारी वाट येऊन मिळते.
IMG_2459.JPG
आता इथून पुढची मंदिरा पर्यंतची वाट म्हणजे लहान चढ उतार असणारा हायवेच जणू.. न चुकता आपण इथून पुढे चालत राहिलो तर मंदिर आणि मुक्कामाच्या लेणीसमुहापाशी पोहचतो.

साधले घाट :-

   हरिश्चंद्रगडावर चढणार्या आणि प्रचंड चढाई असणार्या वाटांपैकी एक म्हणजे साधले घाट, खरतर साद्डे घाट.साधले घाट हे नाव चुकीचे आहे.या घाटाच्या परिसरात अर्जुन सादड्याची झाडे असल्यामुळे या घाटाला स्थानिकांनी सादडे घाट नाव दिले असावे. हा घाट कोकणकड्याच्या तळातील ठाणे जिल्ह्यातील बेलपाडा,वालिवर्हे या गावातून घाटावरच्या सहह्याद्री परिसरातील अहमदनगर जिल्ह्यातील पाचनई गावी चढतो.मात्र फार क्वचितच कोणी हा घाट चढून हरिश्चंद्रगडावर येतो.बहुतेक जण या घाटाने उतराई करुन बेलपाडा गाव गाठतात.आपणही या वाटेन उतरायचे कसे याचीच नाहिती घेउया. 

                                                             या ट्रेकचा नकाशा 

हि वाट हरिश्चंदगडाच्या माथ्यावरुन केदारेश्वराच्या उजव्या बाजूने सुरु होते.अर्थात पहिलीच वेळ असेल तर वाटाड्या आवश्यक आहे. थोडी चढाई केली कि एका पठारावरून वाट साधारण ईशान्येकडे वळते. काही पावलं चालून गेल्यावर काही नैसर्गिक रित्या तयार झालेल्या पायऱ्या लागतात. ह्यांना सात पायऱ्यांची वाट असं म्हणतात  साधारण ३०-४० मिनिटं चालून गेल्यावर एकदम वाट मुख्य वाट सोडून डावीकडे खाली झाडा-झुडपांच्या दिशेने वळला. आत्तापर्यंत पठारावरुन जाणारी वाट उतरायला सुरु करते. एक एक टेकाड उतरत आम्हाला कोकण दरवाज्याच्या दिशेने जायचं आहे. 'वाटाड्या नसेल किंवा आधी नीट माहिती नसेल तर हा नाका सापड्णे अवघड आहे. अर्थात  हा स्थानिक लोकांचा शॉर्ट कट आहे. उतार तीव्र आहेच पण आजूबाजूला गच्च झाडी लागते. ती पार करून, खरचटवून, ओरबाडून घेऊन खाली उतरलो कि खाली गेल्यावर कोकण दरवाजा लागला. दरवाज्याची कमान आता काही शिल्लक नाहीये, पण बाजूच्या बुरुजाचं भक्कम बांधकाम शाबूत आहे.त्या बुरुजावरून उजवीकडे चालत गेलो तर समोर कलाडगड आणि कोंबडा हे दोन किल्ले दिसतात. त्याच्या डावीकडे साधले घाट जिथून उतरतो ती जागा दिसते. सगळा विस्तीर्ण परिसर पटकन नजरेखाली घालायचा आणि दरवाजाच्या दिशेने पुन्हा परत यायचे. 
bailghat
बैलघाटाच्या वाटेतील तटबंदी

   या वाटेच्या एवजी आणखी एक पर्याय म्हणजे बैलघाटाची वाट.पण या वाटेने जायचे तर वाटाड्या आवश्यक आहे.बैलघाटाची वाट ही गडाच्या साधारण उत्तरे कडून खाली उतरते. बैलघाटाची वाट मोठ मोठ्या खडकांवरून खाली उतरते.  नळीच्या वाटे सारखे अवघड पॅच इथे नाहीत. पण मोठ्या खडकांतून उतरताना गुडघ्यांचा कस लागतो. ह्या वाटेने उतरताना तटबंदीचे काही अवशेषही पाहायला मिळाले. साधारण १.५ तासात बैलघाटाची वाट संपवून साधले घाटाच्या पठारावर आपण पोहचतो. येथे वस्ती फारशी नाही. इथून साधारण वायव्येला २ किमी वर साधले घाट सुरु होतो.
पाचनई गावातून सादडे घाटाकडे जाणारा रस्ता

    या कोकण दरवाज्यातून उतरताना काही वेळ आपल्याला उजव्या हाताला बांधीव तटबंदी सोबत करते.  पुढे तटबंदी संपून सरळसोट उभा कातळ आपल्या उजव्या हाताला लागत राहतो. तसंच डाव्या हातालाही थोडं अंतर सोडून एक उभा कडा आहे. 
 
 
 
 

















 
 
डोंगराच्या एका गचपणात सहजासहजी दिसणार नाही असा हा दरवाजा बांधलेला आहे. दोन्ही बाजूचे मूळ कडेच उंच उंच आहेत.त्यामुळे कदाचित दरवाजा आणि त्या बाजूच्या बुरुजांची आणि तटबंदीची उंची फारशी वाढवली नसावी. 
पुढे काही अंतर दगडांच्या वाटेने पार केल्यावर या संपूर्ण टेकाडाच्या पायथ्याशी येउन पोहोचतो.इथे भरपूर मोठी सपाटी दृष्टीस पडते. इथून पुढे समोर एका V आकाराची खिंड दिसते.इथे दोन डोंगरांच्या मधून आपल्याला खाली उतराइ करायची आहे, हाच तो सादडे घाट. 
sadhaleghat
साधले घाटाची सुरुवात

अर्थात इथून हा V आकार सुद्धा चांगलाच लांबवर दिसत असतो.इथून साधले घाट उतराया लागल्यावर आपल्याला अडीच-तीन तास तरी लागतात. पुढे वाट एका जंगलात घुसते. इथून सादडे घाट चालू होतो. तिथून काही पावलं चालून गेल्यावरच आपण एका मोठ्या तीव्र उताराच्या खिंडीच्या तोंडाशी येउन पोहोचलो. जंगल आता आपल्या पाठीमागे होतं. दोन्ही बाजूला उंच कडे आणि त्यांच्या मधून ही वाट उतरते. 
नळीच्या वाटेसारखी. नळीच्या वाटेवर पहिला रॉक पॅच आणि दुसरा रॉक पॅच च्या मध्ये जशी वाट आहे तशीच. हा साधारण २००-३०० मीटर्स चा सरळसोट उतार आहे. घाटातील मुख्य नाळ अगदीच तीनशे चारशे फुट सोपी आहे परंतु यानंतरची वाट उतरणीला अक्षरश: वाट लावणारी वाटली. सरकुन पडण्याची सगळ्यात जास्त भिती ते येथून पुढे. 

येथूनच उजविकडे आपणास भोकपाडा नेढे व नापता नेढ्याचे सुंदर दृष्य दिसते तर डाविकडील ३०० फुट उंचीचा सिलेंडर सुळका

पुढे ही वाट उजव्या बाजूच्या कड्याला खेटून खाली उतरते. दोन कड्यांच्या मधली वाट संपल्यानंतर जंगल सुरु होतं. वाट तीव्र उताराने जातेच, पण त्याच्या जोडीला आता पायाखाली दगडांच्या ऐवजी भुसभुशीत माती लागते. इतकी भुसभुशीत की त्यात एखादा मोठाला दगड बघून आपण त्यावर जरी पाय ठेवला तरी आपण त्या दगडासकट खाली घसरत जाऊ. पायाखालची भुसभुशीत जमीन, त्यामुळे पडल्यावर लागणारे दगड-गोटे आणि त्यावर कहर म्हणजे अजिबात न संपणारा असा हा लांबलचक रस्ता. त्यात इतके उतरून सुद्धा आपण जमिनीच्या सपाटीपासून अजूनही बरेच वर असतो.साधारण दोन तासाची उतराई याच पध्दतीने केल्यावर एका ओढ्याच्या समोर आपण येऊन पोहोचतो. 





ओढा अर्थातच पावसाळ्यात.इतर वेळी फक्त बाजूला पाण्याचं एक छोटंसं डबकं दिसते. वरच्या बाजूने पाणी झिरपते आणि खालच्या बाजूला पाण्याचा छोटासा ओघळ वाहताना दिसतो. इथेच मनसोक्त पाणी प्यायचे आणि भरुन घ्यायचे. 

अजूनही ओढ्याच्या दिशेला काही झाडांच्या मागे दरीच दिसत असते.इथून साधारण दीड ते दोन तासाची उतराई करुन आपला डोंगरउतार एकदाचा संपतो. घाट संपवून आपण सपाटीवर येतो. 


अर्थात सपाटी आली तरी बेलपाडा गाव अजून लांबच आहे.बऱ्याच वेळाची चाल झाली कि गावाची म्हणावी अशी पहिली खूण दिसते, ती म्हणजे पाण्याची टाकी. बरोब्बर आठ तासांच्या अतिशय खडतर  पायपिटीनंतर आपली हि सादडे घाटाची उतराई पुर्ण संपते.

महत्वाच्या नोंदी :

सुरवात : केळेवाडी शेवट:खिरेश्वर
मार्ग :केळेवाडी-सादडे घाट-कोकणकडा-गणेश गुहा-टोलार खिंड-खिरेश्वर 
एकूण चढाई उतराई :१५७० मीटर्स
श्रेणी :मध्यम

चढाई उतराईतील टप्पे:
वालीवरे:१७५ मीटर्स--केळेवाडी:१८० मीटर्स--सादडे घाट माथा:८२३ मीटर्स--कोकणकडा:११४४ मीटर्स--गणेश गुहा:११६४ मीटर्स--टोलार खिंड:९४६ मीटर्स--खिरेश्वर:६२९ मीटर्स (सर्वोच्च पॉईंट:१२१७ मीटर्स)
एकूण डोंगरयात्रा:१६.६ किमी




















































ठाणे जिल्ह्यातुन चढणार्या वाटेने :-

   हरिश्चंद्रगडासारखा आडवातिडवा पसरलेला मातब्बर गड सह्याद्रीच्या रांगेत अगदी मोक्याची जागा पटकावून बसला आहे. ठाणे,पुणे आणि अहमदनगर अश्या तीन जिल्ह्याच्या सीमा जिथे भिडतात, तिथेच हा प्राचीन दुर्गपुरुष समाधी लावून खडा आहे. नगर आणि पुणे जिल्ह्यातून चढणार्या वाटांचा आपण आढावा घेतला आहे. आता जाउया हरिश्चंद्रगडाच्या पश्चिम पायथ्याच्या ठाणे जिल्ह्यातून चढणार्या वाटांकडे अर्थात वोलिवट्याने. ठाणे जिल्हा जवळपास समुद्रसपाटीपासून थोडाच उंचीवर असल्यामुळे या बाजुने हरिश्चंद्रगडावर जायचे तर सहाजिकच प्रचंड मोठी चढाई करावी लागते. जवळपास दहा तासाची चढाईची क्षमता असणार्या आणि उंचीची भिती न वाटणार्या, वाटेतील रॉक पॅचची झट्या घेण्याची हौस असणार्या अस्सल भटक्यांची अंगातील रग जिरवणार्या या वाटा आहेत.सहाजिकच हि तयारी असणार्या भिडूंनी या वाटांच्या वाटेला जावे, बाकीच्यांसाठी पाचनई आणि खिरेश्वरवरुन सोप्या वाटा आहेतच. 
 

नळीच्या वाटेने चढाई व खिरेश्वर-टोलारखिंड्मार्गे उतराईचा नकाशा
  
 या वाटांसाठी सुरवातीचे ठिकाण म्हणजे बेलपाडा उर्फ वालिवर्हे. हे गाव एन कोकणकड्याचा पायथ्याशी वसले आहे.एखाद्या काळ्याशार अर्धवर्तुळाकृती पडद्यासारखे त्याचे रुप येथून दिसते. मावळतीचे सुर्यकिरण त्यावर पडून सह्याद्रीचा हा ठेवा एक वेगळ्याच रुपात बेलपाड्यातून दिसतो. हा नजारा प्रत्येक दुर्गभटक्याने किमान एकदा तरी पहायला हवा, त्याविना गत्यंतर नाही. आणि त्यासाठी एकदा तरी बेलपाड्यात पायधुळ झाडायलाच हवी.गाव तिथे एस.टी अशी घोषणा असली तरी अर्थात बेलपाड्याला कोणतीही बस येत नाही, त्यामुळे कल्याण-नगर मार्गावर धावणार्या एस.टी.बसने माळशेज घाटातील सावर्णे गावी उतरुन चालत बेलपाड्याला येणे , मात्र सावर्णे हे गाव अगदी छोटे आहे, त्यामुळे इथे उतरायचे तर नेमकी जागा माहिती असणे आवश्यक आहे.  
 
दहा बारा घरांची वस्ती असलेल्या सावर्णे गावातून बेलपाड्याला पायी निघाले कि वाटेत लागणारा ओढा पार करून अर्ध्या तासाच्या चढाई नंतर आपण एका खिंडीजवळ येउन पोहोचतो. 
खिंडीतून नाफ्त्याचा कडा समोरच दिसतो.इथे थोडा वेळ शांत बसुन आसमंत न्याहाळायचा .
खिंड उतरून शेत-शिवाराच्या वाटेने चाल सुरु ठेवायची. एका तासात आपण बेलपाड्याला पोहोचतो.वालीवारे म्हणजेच बेलपाडा होय,खरे तर ह्या गावाचे नाव वालीवरे आहे पण समस्त ट्रेकर्स मंडळीमध्ये बेलपाडाच प्रचलित आहे.
किंवा स्वत:ची खाजगी गाडी असेल तर उत्तम. अर्थात रस्ता कच्चाच आहे, त्यामुळे त्या तयारीने यावे. माळशेज घाटातील मोरोशीमधून बेलपाड्याला गाडीरस्ता जातो. बरेच जण खाजगी गाडीने बेलपाडा गावी येउन नळीच्या वाटेने चढाई करुन खिरेश्वरच्या मार्गाने उतराई करतात.काही जण नळीच्या वाटेनेच चढाई व सादडे घाटाने उतराई असा बेत आखतात.तर काही साहसवीर माकडनाळेने हरिश्चंद्रगड सर करायचा बेत आखतात.
 आपण नळीची वाट आणि माकडनाळेची वाट समजून घेणार आहोत.
बेलपाडा गावी आदल्या रात्री येउन मुक्काम केला तर भल्या सकाळी उन्ह व्हायच्या आत किमान नळीच्या तोंडाशी पोहचता येते.एकदा नळीच्या वाटेचा खडा प्रवास सुरु झाला म्हणजे चढत्या उन्हाचा त्रास होतो. नळीच्या वाटेच्या मार्गात कोठेही पाण्याचा शाश्वत स्त्रोत नाही, त्यामुळे जास्तीत जास्त पाणी सोबत घेणे आवश्यक आहे. पावसाळ्यात या वाटेने जाणे जवळजवळ अशक्य आहे, तर उन्हाळ्यात पाण्याच्या अभावाने न जाणेच योग्य होइल. तेव्हा नळीच्या वाटेने ह्ररिश्चंद्रगड हा टेर्क ऑक्टोबर ते फेब्रुवारी या कालावधीतच केलेला चांगला. ऑक्टोबरमध्ये नाळेत थोडे पाणी असते, नंतर मात्र या पुर्ण वाटचालीत एकदा बेलपाडा सोडले तर कोकणकड्याच्या माथ्यावरच पाणी मिळणार हे लक्षात ठेवावे. 
    बेलपाडा गावातून सकाळच्या वेळी हरिश्चंद्रगडाचा कोकणकडा एखाद्या रंगमंच्याचा काळ्या रंगाच्या बॅक ड्रॉपसारखा दिसत असतो.पुर्व मागच्या बाजुला असल्यामुळे सुर्य उगवला तरी बराच उशीरा दिसतो. त्याचा फायदा म्हणजे सुरवातीच्या वाटचालीत तरी चढते उन लागत नाही.   या रंगमंच्याला विंगा असाव्यात अश्या नाळा म्हणजे पावसाच्या पाण्यामुळे डोंगर कोरुन तयार झालेल्या दर्या दिसतात. या दोन्ही बाजुच्या विंगातूनच आहेत ठाणे जिल्ह्यातून हरिश्चंद्रगडावर चढणार्या दोन अतिशय अवघड वाटा,पैकी उत्तर बाजुने नळीची वाट थेट कोकणकड्यावर जाउन विसावते, तर दक्षिण बगलेतून दमसास काढत, प्रसंगी प्रस्तरारोहणाचा थराराचा अनुभव देणारी वाट रोहिदास शिखराच्या मागून तारामती शिखराच्या बाजुन हरिश्चंद्रगडाचा माथा गाठते. 

 बेलपाडा उर्फ वालिवरे गाव

गावात लावलेला हरिश्चंद्रगडाची माहिती सांगणारा फलक
 
         सूर्योदय व्ह्यायच्या आत निघाल्यास बाहेर अजूनही अंधार असतो. त्यातू बेलपाडा कोकणकड्याच्या अगदी कुशीत असल्याने येथे सूर्यकिरणे उशिरानेच पोहचतात. ह्याचाच फायदा घेऊन सूर्य वर यायच्या आत शक्य तेवढे अंतर कापणे फायद्याचे.अंधारातही कोकणकड्याच्या भव्यतेचा अंदाज येतो. माथ्यापासून सरळ ४०० मीटर्स तुटलेला अर्धवर्तुळाकार असा हा कडा आहे. खालून पाहिल्यास दोन्ही हात पसरून आपल्याला कवेत बोलावत असल्या प्रमाणे भासतो.

नळीच्या वाटेकडे
कोकणकड्याचा प्रचंड मोठा रंगमंच
 
   पहिल्यांदाच या वाटेने जात असल्यास गावातून शक्यतो वाटाड्या घेतलेला चांगला. गावातून मळलेली वाट थेट कड्याच्या दिशेन जाते. असे वाटते कि वाट थेट कड्याला भिडणार कि काय.दहा मिनीटाच्या चालीनंतर आपण एका सपाटीवर पोहचतो. सपाटीवरुन जाणारी वाट कोकण्कड्याच्या डाव्या बाजुने निघते. साधारण पाउण तास अशी वाटचाल केल्यावर दगडधोंड्याची रास लागते आणि एक ओढा लागतो.हा ओढा आपल्याला थेट नळीच्या वाटेला घेउन जातो.इथपर्यंतचे मार्गक्रमण आल्हाददायक वातावरणामुळे आणि मुख्यत्वे ऊन लागत नसल्याने फारसे न थांबता झालेले असते.

 
ओढ्यातून होणारी वाट्चाल आणी वाटेत असणारे पाण्याचे साठे

 पावसाळ्यानंतर लगेच आल्यास मध्ये काही ठिकाणी अजून पाणी वाहत दिसते. इथून पुढे पाणी नसल्याने इथे पाणी पिऊन घेणे योग्य. ओढ्यातील लहान, मोठ्या दगडावरुन अर्धा तास चालल्यावर ओढ्यातील भल्यामोठ्या दगडाच्या प्रचंड आकाराच्या पायर्या सुरु होतात.एखाद्या राक्षसासाठी केल्या असाव्यात अश्या या पायर्या. फेब्रुवारी पर्यंत या ओढ्याच्या दगडात मध्ये मध्ये पाणी असते.इथेच थोडी पोट्पुजा उरकून घ्यायची. 



नळीच्या वाटेची सुरवात





नळीच्या वाटेवरुन होणारे रोहिदास शिखराचे दर्शन

Kokankada
पुढे काहीच वेळात नळीच्या तोंडा पर्यंत येऊन पोहचतो. हीच नळीची सुरुवात असल्याची खात्री पटल्यावर नळीतून वरती चढायला सुरुवात करायची. मोठ -मोठ्या खडकांवरून कमीत कमी ताकद लावत वाट शोधत वर चढायला मजा येते. 
या घळीच्या भिंती ठिसुळ अश्या स्लेटच्या दगडाच्या बनल्या असल्यामुळे भक्कम नाहीत. शिवाय हाताने आधार घेतली कपार आणि पाय ठेवलेली खाच कधी निखळून जाईल याचा भरवसा नाही. अगदी मजबूत दिसणार्‍या दगडाला धरावे तर त्याचा मूठभर तुकडाच हातात येईल. नळीच्या वाटेत यांचा खच पडला असल्यामुळे या वाटेने वर चढताना दोन पावल वर चढावे तो एक पाउल घसरुन खाली अशी वाटचाल करावी लागते. या घळीत उंबर आणि इतर काही झाडे उगवलेली दिसतात. या चढणीत सात आठ ठिकाणी धबधब्याच्या भिंती वाट अडवतात. भिंतीवर सरळ न चढता त्यांच्या डाव्या किंवा उजव्या कोपर्यातून चढावे.
 


 Naali1
कातळातून ६०-७० अंशाची चढण

 थोड्याच वेळात पहिला तुलनेने सोपा प्रस्ताराचा टप्पा लागतो. तिथे उजव्या बाजूने मार्ग काढत वर सरकायचे. इथून पुढे असे छोटे मोठे प्रस्ताराचे टप्पे पार करत जायचे आहेत.काहीच वेळात पहिला मोठा प्रस्ताराचा टप्पा लागला. साधारण २० फूटाचा हा टप्पा आहे. खडकांमधील खोबणी शोधत शक्य तेवढे नैसर्गिक आधाराने वर चढायचे. अगदी वरच्या टप्प्यात आवश्यकता भासल्यास शहाणपणाने दोराचा आधार घेऊन वर चढायचे.






जर फार मोठा ग्रुप सोबत असेल तर नळीत आधीच चिंचोळी जागा असल्याने गर्दी होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक आहे. 
आतापर्यंत निम्म्या पेक्षा जास्त अंतर पार झाले असते. सलग साधारण ६०-७० अंशातील खडी चढण गेले ३-४ तास आपण चढत असतो. तिसरा रॉक  पॅच यायच्या आधीच खडतर वाट आहे. या वाटेवरून चालायचे/चढायचे म्हणजे अधे मध्ये थांबणे नाही. थांबला तो संपला. थांबला तर ज्या दगडांना तुम्ही धरलंय तो दगड एकतर हातात येईल,नाहीतर ज्या दगडावर थांबलाय तो तरी घसरून खाली पडेल. याचा अर्थ तुमचा तोल जाऊन तुम्ही खोल दरीमध्ये पडू शकता. ही वाट पार करून काही वेळात आपण नळीच्या वाटेतील प्रसिद्ध अशा उंबराच्या झाडाच्या पॅचपाशी पोहचतो.याला मुळीचा  पॅच असेही म्हणतात.
अतिशय चिंचोळी होते गेलेली घसाऱ्याची वाट, समोर आलेला डेड एन्ड आणि उजवीकडे साधारण २० फुटांचा काहीसा कठीण रॉक पॅच आणि त्याच्या वरती ते बाहेर डोकावणारे छोटेसे उंबराचे झाड.हाच पॅच या ट्रेकमधील सगळ्यात जास्त वेळ खातो. जर बरोबर वाटाड्या असेल तर तो बघता बघता सरसरत तो २० फुटांचा पॅच चढून वर झाडापाशी जाउन दोर झाडाला बांधून खाली सोडतो. 

Patch1

major patch
नळीच्या वाटेवर असलेला सर्वात अवघड रॉक पॅच

या पॅचची चढण एकदम ९० अंशातील आहे. मात्र थोडे खालच्या बाजूस सरकल्यास काही थोड्या पकडी ( होल्ड ) दिसतात ज्याचा वापर करून चढता येते. पण मागे तीव्र उताराची आणि घसारा असलेली नळीची वाट आहे त्यामुळे अतिशय जपून चढावे लागते. सरळ झाडाखाली येऊन दोराचा आधार घेत वर चढायचे असले तरी पाठीवर सॅक घेउन वर चढणे अजून अवघड जाते. त्यामुळे सॅक खालीच ठेवून चढायला सुरुवात केली तर सोयीचे पडते. नंतर रोपने सॅक वर आणता येतात. सुरवातीला १-२ दगडावर पकडी मिळतात.मात्र निम्मे अंतर गेल्यावर मात्र पक्के होल्ड शोधणे जिकीरीचे आहे. प्रस्तरारोहणाचे काही मुलभूत नियम आहेत त्यातला एक म्हणजे दोन हात आणि दोन पाय ह्या एकूण ४ आधारापैली पैकी कायम ३ आधार तरी हे पक्के असलेच पाहिजेत. शिवाय आपल्या शरीराचा गुरुत्वमध्य हा कातळभिंतीच्या शक्य तेवढा जवळ असला पाहिजे. इथे तसे होल्ड सापडत नसल्याने दोराचा होल्ड सारखा वापर करत उरलेला निम्मा टप्पा पार करून वर पोहचायचे.  

 एकदा का हा पॅच पार केला कि अर्धी लढाई जिंकलीच.मात्र हि जागा अरुंद आणि अपुरी असल्यामुळे इथे फार वेळ न थांबता पुढे निघायचे. त्यानंतर मोठ्या खडकाला वळसा घालून एक धोकादायक ट्रवर्स पार करायचा.एक छोटासा अर्धवर्तुळाकार ट्रॅव्हर्स मारून नळीच्या पलीकडच्या एका दुसऱ्या नळीत आपण शिरतो. 


ट्रवर्स पार करताना खोल दरीची भीषणता जाणवते. पण आता थोडीफार सवय झाल्यामुळे ही वाट लगेच पार होते. इथून परत १५-२० मिनिटांची चढण चढून आलो कि नळी संपत आलेली दिसते त्यामुळे उत्साहाने झपाझप पावले टाकत वर जायचे. नळी जिथे संपते तिथे एक छोटीशी खिंड आहे तिथे जाऊन विश्रांती घ्यायची. नळीची वाट संपल्यामुळे आपल्याला हायसे वाटते.इथून उजवीकडे नेहमीची पायवाट सुरु होते. इथूनच एक वाट खाली साधले घाटाच्या माथ्यावरील पठारावर उतरते. काही लोक नळीतून चढून इथूनच साधले घाटाकडे जाऊन तिथून परत खाली बेलपाड्यात उतरतात.
नळीची वाट चढून आल्यावर लागणारी खिंड
खिंडीच्या वरच्या बाजुला असलेले पठार
topview
खिंडीतून दिसणारा साधले घाटाच्या माथ्याचा परिसर
 
  आपले लक्ष्य मात्र कोकणकडा असल्यामुळे एकदा खिंडीत आलो कि तिथून मग लगेच उजवीकडील वाटेने वर चढू लागायचे. पुढे एक पठार लागते. ह्या पठारावर थोडी विश्रांती आणि पोटपूजा करायची, मात्र फार वेळ न रेंगाळता पुढे निघायचे.या पठाराला दाट झाडीने वेढले आहे. या मैदानातून आपल्या समोर असलेल्या कोपर्याकडे वाटचाल सुरु ठेवायची. साधारण दहा मिनीटात त्या कोपर्‍याच्या अलिकडे एक ओढा लागतो. त्या ओढ्यातून वाटचाल सुरु ठेवायची. 
   ही वाट झाडीतून वर चढत असल्याने उन्हाचा त्रास होत नाही.झाडीतील नागमोडी वाटेने जात एका छोट्या कातळटप्प्या पाशी आपण पोहचतो. हा टप्पा पार केला की आपण थेट कोकण कड्याच्या पठारावर पोहोचतो. इथे उजव्या बाजूला एक अरुंद सापटी आहे त्यातून चढणे सोपे असल्याने त्यातून अंग चोरत वर सरकायचे. इथून कोकणकड्याचा माथा साधारण अर्धा किमी वर आहे. पण अर्धवर्तुळाकार पसरल्याने इथूनही त्याचे दर्शन होते होते.


John
काहीच वेळात वाट कोकणकड्याच्या अलीकडच्या पठारावर येते. आता इथून काहीच वेळात आपण कोकणकड्यावर पोहोचतो. बेलपाड्यापासून इथवर  साधारण ५ ते ७ तास लागू शकतात.
    नळीच्या वाटेचे दिव्य पार करुन एकदा कोकणकड्यावर उभा राहिले कि सह्याद्री परिसराचा प्रचंड मोठा पट समोर येतो. 
इथून समोर न्हापता, उजवी कडे कलाडगड, त्याच्या मागे लांबवर कात्राबाई, घनचक्कर, भैरवगड असा सह्याद्रीचा पसारा दिसतो. सह्याद्रीतील डोंगरांची पारंपारिक नावे फार मजेशीर आहेत काही वेळा डोंगराच्या वैशिष्ट्यावरून घनचक्कर, खुटा, बुधला, नागफणी, नानाचा अंगठा अशी नावे तर काही ठिकाणी एकदम डोंगराशी जवळकीचे जोडणारी कात्राबाई, आजोबा, नवरा-नवरी, रवळ्या-जवळ्या अशी. बाकी सह्याद्रीत काही नावे ही एका पेक्षा जास्त डोंगरांना आहेत. भैरवगड हे त्यातलेच. इथून लांबवर दिसणारा हा शिरपुंजेचा, कोथळेचा भैरवगड, माळशेज उतरून गेल्यावर डावीकडे दिसणारा मोरोशीचा आणि खाली कोयना अभयारण्यातला, कणकवली जवळचा असे आणखी पाच वेगवेगळे भैरवगड आहेत.इथे निवांत बसून सुर्यास्त बघायचा आणि रात्री आपण चढून आलेल्या नाळेच्या वाटेच्या आठवणीत शांतपणे डोळे मिटायचे.

माकडनाळ

  सह्याद्री या नावाची आणि प्रदेशाची एक वेगळीच धुंदी आहे. एकदा तुम्ही या मायाजालात अडकलात, की मग या प्रेमळ पाशात स्वत्व हरवून एका वेगळ्याच विश्वात रमता. इथे असलेले गडकोट, घाटवाटा, नाळी, बेलाग सुळके मोहात पाडतात आणि मग आयुष्याची एक नवीन इनिंग सुरू होते.तसे पाहता भटक्‍यांना पूर्ण सह्याद्रीच आपलासा वाटतो. त्यात हरिश्‍चंद्रगड म्हणजे भटक्‍यांची पंढरीच. तारामतीचे खुणावणारे शिखर असो, की केदारेश्वराच्या गुहेतील थंडगार पाणी, गणेश गुहेतील भव्य देखणी मूर्ती असो, की आपला लाडका जिवश्‍च कोकणकडा! हरिश्‍चंद्रगड नेहमी नव्याने प्रेमात पाडतो. एखादा गड सर्वांगाने बघायचा असेल, तर त्याच्या सर्व वाटा, घळी हाच एक उत्तम पर्याय. त्यात हरिश्‍चंद्रगड म्हणजे तर अनेक बहुढंगी वाटांनी समृद्ध असलेले सह्याद्रीतील दुर्गरत्न! तोलारखिंड, राजमार्ग, पाचनई, तटाची वाट, सादळे घाट, माकडनाळ, नळीची वाट, थिटबीची घळ, गणेशधार, वेताळधार... या त्यातल्या काही वाटा. खिरेश्वर,पाचनई आणि नळीची वाट या प्रसिद्ध अन अगदीच वापरात असलेल्या वाटा तर जुन्नर दरवाजा राजमार्ग,सादडे घाट,बैल घाट,कोथळे(लव्हाळे) या कमी वापरातल्या वाटांनीही काही मंडळी हरिश्चंद्रगडावर पोहोचतात.
 नळीची वाट आणि माकड नाळेची वाट दाखवणारा नकाशा

    पण माकडाची नाळ ही एक दुर्गम आणि तांत्रिक चढाई असणारी वाट आहे.खुप कमी ट्रेकर या माकड नाळेच्या वाटेला जातात. वास्तविक एकेकाळी नळीच्या वाटेनेही खुप कमी जण हरिश्चंद्रगड चढायचे.आता मात्र नळीच्या वाटेवर राबता वाढला आहे.नळीच्या वाटेच्या बरोबर विरुध्द बाजुच्या कड्यावर असलेल्या या माकडनाळेच्या वाटेवर मात्र अजून खुप कमी जणांचा वावर असतो.याच कठीण वाटेची चढाई आपण माहिती करुन घेणार आहोत.
   खुबी गावातून दिसणारा हरिश्चंद्रगड..उंच शिखर तारामती..डावीकडे माकडनाळ खिंड 
     नळीच्या वाटेप्रमाणेच या वाटेची सुरवात ही सारखीच आहे. बेलपाडा किंवा वालिवरे गावी रात्री येउन मुक्कामी रहाणे सोयीस्कर.म्हणजे पहाटे लवकर उठून वाट्चालीला सुरवात करता येते. या वाटेची महत्त्वाची बाब अशी, की वाटेत पाणी नसल्यामुळे जे काही पाणी लागणार आहे, ते सुरुवातीलाच भरून घ्यावे लागते. 
      वालीवरे गावातून दिसणारा नाफ्ता 

सुरुवातीची तासभराची वाट्चाल नळीच्या वाटेनेच कोकणकड्याच्या पायथ्याला पोहोचायचे.नळीच्या वाटेतला तीन टप्प्यात पडणारा छोटासा धबधबा पार केल्यावर डावीकडची नळीची वाट सोडून सरळ मोठ्या ओढ्यातून पुढे निघायचे.२० मिनिटांत मोठ मोठ्या दगडांमधून वाट काढत भव्य कोकणकड्याच्या अगदीच पायथ्याला पोहोचतो,
वालीवरे गावातून दिसणारा कोकणकडा  
         
कोकणकड्याचं पायथ्यातून दर्शन 
                
   नळीची वाट हरिश्चंद्रगड 
माकडनाळेतुन  नळीची वाट हरिश्चंद्रगड 

 इथे कोकणकड्याचं वेगळंच रूप बघायला मिळते.डाव्या बाजूला नळीची वाटेचे रौद्र रुपातील दर्शन होते.समोर सरळसोट कोकणकड्याचा माथा अन उजवीकडे उंचच गेलेली माकडनाळ असा कॅनवास बघताना मानेचा चांगलाच व्यायाम होतो.मागे वालीवरे अन दूरवर नानाचा अंगठा दर्शन देतो.एव्हाना दीड तास तरी उलटलेला असतो. 
 इथे थोडी विश्रांती घ्यायची आणि मग उजवीकडून येणाऱ्या माकडनाळेला भिडायचे. छोट्या-छोट्या कोरड्या धबधब्यातून,नाळेच्या भिंतीवरून अन मोठाल्या दगडांवरून चढताना हात अन पायांचा उपयोग माकडनाळेत करावाच लागत होता.म्हणजे एकूणच ही नाळ चढायची तर बऱ्याच ठिकाणी माकडांसारखं चढाई करावी लागत होती म्हणून ही माकडनाळ असा अंदाज. 
 सकाळची वेळ आणि नाळेची वाट असल्यामुळे छानसा गारवा जाणवत असतो.नळीच्या वाटेपेक्षा माकडनाळेतील दगड अगदीच स्थिर असल्यामुळे भराभर उंची गाठत पुढच्या तासाभरात एका अवघड कातळटप्प्याच्या खाली आपण पोहोचलो.इथेपर्यंत पोहचायला साधारण दोन ते अडीच तास लागतात. 
माकडनाळ अवघड कातळटप्पा 

   हा रॉक पॅच उभा असून होल्ड्स लवकर सापडत नाहीत.अतिशय काळजीपूर्वक हा ७०-८० फूट टप्पा रोप लावून चढावा लागतो. उत्तम म्हणजे सॅक खाली ठेवून मोकळ्या अंगाने हा पॅच पार करुन मग रोपने सॅक वर घेतल्यास सोयीचे ठरते. किती जणांची तुकडी आहे, त्यावर इथे किती वेळ लागणार ते अवलंबून असते.मात्र कमीतकमी दीड ते दोन तास लागतातच. 
माकडनाळ माथ्यातून नळीची वाट हरिश्चंद्रगड

  आता उन्ह चढायला लागले असते. त्यामुळे आधी थंडगार असणारू माकडनाळ आता उन्हाने तापून निघालेली असते.२०-२५ मिनिटांची तीव्र चढाई करत माकडनाळ माथा गाठायचा. या ठिसूळ टप्प्याची चढाई संपवून आपण वर पोहचतो ते थेट शेंडी सुळक्‍याच्या बाजूला. नळीच्या वाटेवरून छोटासा दिसणारा हा सुळका बऱ्याच जणांना मोहिनी घालत असतो. 
उत्तरेला नळीच्या वाटेचा माथा अन माकडनाळ माथा समांतर उंचावर आहे असे लक्षात येते.रौद्र दिसणारे हरिचंद्रगडाची शिखरे,नळीची वाट अन माकडनाळ दृश्य माकडनाळेच्या खिंडीतून सुखावह असते.माथ्यावर चांगला झाडोरा बघून शिदोऱ्या उघडायच्या.एव्हाना निघून सहा ते सात तास झालेले असतात.
माकडनाळ खिंड अन शेंडी सुळका 

माकडनाळ माथ्यापासूनच पश्चिमेला रोहिदास शिखराकडे जायला वाट आहे(२-२.१५ तास).अर्थात आपले लक्ष्य मात्र तारामती शिखर असल्यामुळे हरिश्चंद्रगडावर जाण्याच्या वाटाने जायचे आहे. इथे आपल्यासमोर काही पर्याय आहेत. हरिश्चंद्रगडाच्या दक्षिण अंगाने तारामती नाळ, जुन्नर दरवाज्याची वाट आणि पारंपारिक खिरेश्वर गावातून चढणारी टोलारखिंडीची वाट असे तीन पर्याय आहेत.आपल्या सोयीनुसार आपण कोणत्याही पर्यायाने वर चढू शकतो. 
खिरेश्वर वाटेवर...मागे रोहिदास शिखर
 तारामती घळ वरचा टप्पा अन बालेकिल्ला 
  तारामती नाळेने वर चढल्यास थेट मंदीर परिसरात पोहचत असलो तरी या वाटेने जायचे तर वाटाड्या आवश्यक आहे. 
   सोपा मार्ग म्हणजे टोलारखिंड किंवा जुन्नर दरवाज्याने चढणे. यासाठी पूर्वेला खिरेश्वरकडे उतराई सुरु करायची .काही वेळ जंगलातून उतरल्यावर डावीकडे शेंडी सुळका लक्ष वेधून घेतो.उजवीकडे माळशेज घाटाचं सुंदर दृश्य अजून बराच वेळ सोबती असते.डावीकडे तारामती शिखर ५२० मीटर उंचावलेले दिसते.आता तापत्या उन्हात हरीशचंद्रगडाला वळसा घालून राजमार्गाला गाठायचे आहे.वाट चढाईची नसल्याने तितकासा त्रास जाणवत नाही पण एवढ्या मोठ्या पठारावर सावलीसाठी झाड नाही.अखेर तासाभराने जंगलटप्पा येतो. 
खिरेश्वर वाटेवर..हरिश्चंद्र शिखर अन नेढं 

 इथून थेट राजघरच्या वाटेला किंवा जुन्नर दरवाज्याच्या वाटेला लागता येते. किंवा आणखी तासाभराची वाटचाल करुन ऐसपैस राजमार्गाने ३० मिनिटांत खिरेश्वर गाठायचे आणि टोलार खिंडीच्या वाटेने गडाचा माथा गाठायचा.
टीप : माकडनाळ ही तांत्रिक चढाई असून पूर्वानुभवाशिवाय करणे घातक ठरेल. याकरिता प्रस्तरारोहणाचा अनुभव असणे महत्त्वाचे आहे.
महत्वाच्या नोंदी :
 १.माकडनाळेतील कातळटप्पा अवघड असुन कातळारोहणासाठी आवश्यक सर्व साहित्य गरजेचे. 
 २.नळीच्या वाटेपेक्षा माकडनाळीतील दगड स्थिर असून घसारा अन दृष्टीभय देणारे ट्रॅव्हर्स नाहीत.

सुरवात:वालीवरे शेवट:खिरेश्वर 
मार्ग: वालीवरे-माकडनाळ-जुन्नर दरवाजा मार्ग-खिरेश्वर 
श्रेणी:अवघड
एकूण डोंगरयात्रा: १३.२ किमी
चढाई उतराईतील टप्पे:
वालीवरे (२६०मीटर्स)-माकडनाळ माथा(८९५ मीटर्स)-खिरेश्वर(७०० मीटर्स)





























 

Light ची अपेक्षित साथ नसल्याने मग समोर कड्यावर गप्पा मारत बसलेल्या मंडळींची silhouette घेत होतो. तेवढ्यात श्रीनिधी ने कड्याच्या टोकावर बसून दोन हात पसरून ‘विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले’ ह्या style मधली pose दिली. अंधार पडला तसे सगळे बसले होते तिथे जाऊन बसलो. भास्करही आमच्या इथे येऊन बसला. मग गप्पा गोष्टीतून त्याने त्याचे अनुभव उलगडले. भास्करचे समोरच्याशी संवाद साधायचे कौशल्य अगदी त्याच्या व्यवसायाला पूरक आहे. त्याच्याशी बोलून इथले जनजीवन, येथील प्राणी, दुर्गम वाटा, इथे झालेल्या साहसी मोहिमा ह्याबद्दल बरीच माहिती मिळाली. त्यातच ह्यावर्षी पावसाळ्याच्या आधी कोकणकड्यावरून एका राजस्थानच्या तरुणाने मारलेल्या para-jump ची माहिती मिळाली आणि कमळू मामांनी त्याचा थरारक video पण दाखविला. कोकणकड्याशी निगडीत अशा बऱ्याच साहस कथा आहेत

https://www.saptahiksakal.com/sakalsaptahik-trekstory-swapnil-khot-marathiarticle-2820

https://www.prasannawagh.com/2018/04/blog-post_21.html

 https://www.misalpav.com/node/35965

  https://www.prasannawagh.com/2017/08/harishchandragad-sadhade-ghat-khiresshwar-sahyadri-ghatwat.html



मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...