जगातला दुसऱ्या क्रमांकाचा पुरातन व्यवसाय (the second oldest profession in the World) म्हणजे हेरगिरी. जवळपास सर्व देशांकडे आज गुप्तचर संघटना किंवा संस्था आहेत आणि त्यांच्याबद्दल लोकांना कुतूहल, आदर, दरारा, भीती, तिरस्कार अशा विविध भावना असतात. गुप्तचर किंवा हेर हे अगदी पुरातन काळापासून अस्तित्वात आहेत. आर्य चाणक्यांच्या ‘अर्थशास्त्र ‘ मध्ये गुप्तहेरांचा उल्लेख सापडतो. विविध प्रकारची माहिती गोळा करण्यासाठी कशा प्रकारे हेरांना नियुक्त करावं, त्याच्या कसोट्या, शत्रूचे हेर कसे ओळखावेत याबद्दल विस्तृत विवेचन चाणक्यांनी करून ठेवलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा यशस्वी होण्यामागे बहिर्जी नाईक यांच्यासारख्या हेरांचा सह्भाग हा मोठाच आहे. आधुनिक काळात तर माहिती हेच सर्वात मोठं संसाधन असल्यामुळे हेर आणि हेरगिरी यांचं महत्व कमी होण्याऐवजी उलट वाढलेलंच आहे. सामान्य माणसांना हेर आणि त्यांचं आयुष्य याच्याबद्दल नेहमीच उत्सुकता असते. जेम्स बॉंडचा पहिला चित्रपट येऊन आज पन्नासपेक्षा जास्त वर्षे होऊन गेलेली आहेत पण तरीही त्याचे चित्रपट आजही गर्दी खेचतात. हेरकथा किंवा खऱ्याखुऱ्या हेरांच्या कामगिऱ्या वाचायला लोकांना प्रचंड आवडतं. अनेक लेखक उदाहरणार्थ जॉन ल कार, फ्रेडरिक फोरसाईथ, रॉबर्ट लडलम हे उत्कृष्ट हेरकथा लेखक म्हणून जगभर प्रसिद्ध आहेत. सोविएत रशियाची के.जी.बी.,अमेरिकेची सी.आय.ए., ब्रिटनची एम.आय.६, पाकिस्तानची आय.एस.आय. यांच्याबद्दल सर्वसामान्यांनाही माहिती असते. या सगळ्या संस्थांमध्ये आपल्या वेगळेपणाने उठून दिसणारी संस्था म्हणजे इझराईलची मोसाद.
मोसादचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे गुप्तता. इतर गुप्तचर
संस्थांविषयी बरीच माहिती पुस्तकांमध्ये किंवा आजकाल इंटरनेटवर मिळते. पण
मोसादविषयी फारच कमी माहिती आहे. अर्थात, तेच मोसादचं यश म्हणता येईल. काही
कारवायांशी मोसादचा काहीही संबंध नसतानाही त्यांच्याकडे बोट दाखवलं गेलंय.
काही बाबतीत मोसादचा त्यात सहभाग असल्याचा संशय आहे. कधी मोसादने अगदी
उघडपणे आपण एखादी कारवाई केली असल्याचं मान्य केलेलं आहे. पण असे प्रसंग
फारच कमी. या गुप्ततेमुळे मोसादचा झालेला एक अत्यंत मोठा फायदा म्हणजे
मोसादमध्ये दुसऱ्या कुठल्याही गुप्तचर संघटनेला आपला हेर घुसवणं जमलेलं
नाही. मोसादने मात्र जगातल्या जवळजवळ प्रत्येक गुप्तचर संघटनेमध्ये आपले
हस्तक घुसवलेले आहेत. त्यात इझराईलशी अजिबात शत्रुत्व नसलेले देशही आहेत.
त्याच्यामागचा हेतू एकच आहे – माहिती मिळवणं. "Where no counsel is, the
people fall, but in the multitude of counselors there is safety – जेव्हा
माहिती किंवा माहितगार माणसाची साथ नसते, तेव्हा तुमचं पतन होतं, पण
जेव्हा तुम्हाला सल्ला द्यायला अनेक लोक असतात, तेव्हा तुम्ही सुरक्षित
असता – हे मोसादचं ब्रीदवाक्य आहे.
असं असण्याचं एक अत्यंत महत्वाचं कारण – आणि मोसादचं दुसरं वैशिष्ट्य
म्हणजे तिथे काम करणाऱ्यांची संख्या. इतर गुप्तचर संस्था, जर कर्मचाऱ्यांची
संख्या बघितली, तर अवाढव्य म्हणाव्या लागतील. सी.आय.ए. ही जगातली सर्वात
मोठी गुप्तचर संस्था आहे. एक लाखाहून जास्त एजंट्स आज तिथे वेगवेगळ्या
प्रकरणांवर काम करत आहेत. शिवाय अनेक अर्धवेळ सी.आय.ए. एजंट्स – ज्यांना
सी.आय.ए.च्या भाषेत gofer असं म्हणतात, ते तर ५-६ लाखांच्या घरात असतील.
मोसादमध्ये जेमतेम ८०० ते १००० लोक – सगळ्या जगभरातल्या मोसाद स्टेशन्सची
मोजदाद केली तर – असतील. याचं एक कारण आर्थिक आहे. सी.आय.ए. ही
अमेरिकेसारख्या महासत्तेची गुप्तचर संस्था आहे. त्यामुळे त्यांचं
बजेटसुद्धा तेवढंच मोठं आहे. इझराईल हा कितीही झालं तरी एक छोटा देश आहे.
पण दुसरं कारण म्हणजे मोसादच्या निर्मितीपासूनच मोसादचा अरब दहशतवाद आणि
मुस्लीम कट्टरवादाशी असलेला संघर्ष. दुसऱ्या महायुद्धानंतर झालेली इझराईलची
निर्मिती ही पॅलेस्टिनी आणि इतर अरबांसाठी एक अपमानास्पद आणि संतापजनक
घटना होती. त्यामुळे संपूर्ण जगभर इझराईल आणि अरब यांच्यातलं छुपं युद्ध
खेळलं जाणार आणि इझराईलचा सूड उगवण्याची संधी अरब दहशतवादी जगभर शोधत
फिरणार, हे उघड होतं. अशा वेळी भरपूर लोक कामावर ठेवून सगळ्या जगाला आपण
कोण आहोत हे सांगण्यापेक्षा गुप्तपणे काम करणं हे मोसादचं धोरण होतं, आणि
गुप्तता ठेवायची असेल तर जितके कमी लोक तेवढं बरं – असा हा सरळ हिशोब आहे.
पण याचा अर्थ असा नाही की मोसादचं लोक कमी असल्यामुळे अडतं. इझराईलच्या निर्मितीनंतर जगभरातल्या ज्यू लोकांसाठी इझराईल हे एक हक्काचं घर आहे. पण अजूनही जगातल्या जवळजवळ प्रत्येक देशात ज्यू लोक आहेत. एवढंच नाही तर ते सुशिक्षित आहेत. त्यातले बरेच जण स्वतःच्या व्यवसायांत आहेत. काही जण बँका, विमा कंपन्या, पत्रकारिता अशा व्यवसायांमध्ये आहेत. ते ज्या देशांत आहेत, तिथे त्यांना मान आहे, किंवा नाझींप्रमाणे कोणी त्यांच्या जीवावर उठलेलं नाहीये. ते कदाचित त्या देशाचे निष्ठावंत नागरिकही असतील, पण त्याचबरोबर इझराईलशी त्यांची बांधिलकी आहे. धार्मिक म्हणा किंवा सांस्कृतिक, पण ती आहे हे निश्चित. मोसादकडे अशा लोकांची यादी असते. या लोकांसाठी sayan हा शब्द वापरला जातो. जेव्हा मोसादला एखाद्या कामगिरीसाठी मदत लागते, तेव्हा हे sayan कामाला लागतात. उदाहरणार्थ, एखाद्या कामगिरीसाठी स्थानिक चलनात भरपूर पैशांची गरज आहे. बँक मॅनेजर असलेला एखादा sayan ते पैसे कर्ज म्हणून उपलब्ध करून देतो. जर एखाद्या संशयास्पद व्यक्तीच्या घरावर पाळत ठेवायची असेल, तर स्थानिक प्रॉपर्टी ऑफिसमध्ये काम करणारा एखादा sayan त्या घराबद्दल संपूर्ण माहिती, अगदी नकाशासकट, पुरवतो. दुसरा एखादा रिअल इस्टेट एजंट असणारा sayan त्या घरासमोर असलेलं दुसरं घर मोसादच्या लोकांना नाममात्र भाड्याने मिळवून देतो. हे sayan network म्हणजे मोसादची फार मोठी ताकद आहे. हे sayan कोणीही असू शकतात. अगदी रस्ता झाडणारे सफाई कामगारसुद्धा. अनेक केसेसमध्ये मोसादला टेलिफोन खात्यात काम करणाऱ्या sayan नी बिनबोभाट अनेक टेलिफोन टॅप करून दिलेले आहेत.
मोसादचं तिसरं वैशिष्ट्य म्हणजे इझराईलच्या स्वातंत्र्यानंतर जवळजवळ लगेचच मोसादची निर्मिती झाली. ब्रिटीश साम्राज्य १७व्या शतकापासून सगळ्या जगभर पसरायला लागलं होतं. पण ब्रिटनच्या MI ५ आणि MI ६ यांची निर्मिती १९०९ मध्ये – जवळजवळ ३०० वर्षानंतर झालेली आहे. अमेरिकेच्या सी.आय.ए.ची निर्मिती व्हायला तर दुसरं महायुद्ध उजाडावं लागलं. तेव्हा नाझी जर्मनीच्या ताब्यात गेलेल्या युरोपमध्ये हेरगिरी करण्यासाठी अमेरिकेने Office of Strategic Services (OSS) नावाची संस्था स्थापन केली. युद्धानंतर OSS बरखास्त करण्यात आली, पण त्याच वेळी सोविएत रशियाबरोबर चालू झालेल्या शीतयुद्धाने अमेरिकेला हा निर्णय बदलावा लागला आणि सी.आय.ए.ची स्थापना करण्यात आली, ज्यात OSS मध्ये काम केलेल्या अनेक लोकांचा समावेश होता. रशियाबद्दल बोलायचं तर झारकालीन रशियामध्ये ‘ओखराना ’ ही अत्यंत प्रभावशाली आणि कार्यक्षम अशी सरकारी गुप्तचर संस्था होती. झारने त्यांचे सल्ले, विशेषतः रास्पुतिनबद्दलचे, ऐकले असते, तर रशियन राज्यक्रांती टाळता आली असती असं अनेक इतिहासकारांचं मत आहे. रशियन राज्यक्रांतीनंतर रशियामध्ये यादवी युद्धाचा डोंब उसळला होता. तेव्हा स्टॅलिनने ‘ चेका ’ नावाची संघटना उभारली होती. नंतर तिचं रुपांतर एन.के.व्ही.डी. आणि नंतर के.जी.बी. मध्ये झालं.
याउलट मोसादची निर्मिती इझराईलच्या जन्मानंतर लगेचच करण्यात आली. त्याचा इतिहास हा मोठा मनोरंजक आहे. आज जिथे इझराईल, जॉर्डन, सीरिया, लेबेनॉन हे देश आहेत, तो सगळा भूभाग सोळाव्या शतकापासून ते विसाव्या शतकापर्यंत – म्हणजे जवळजवळ ४०० वर्षे तुर्कस्तानमधल्या ऑटोमन साम्राज्याचा भाग होता. १९१४ ते १९१८ या काळात झालेल्या पहिल्या जागतिक महायुद्धात तुर्कस्तान जर्मनीच्या बाजूने लढला होता आणि युद्धात पराभूतही झाला होता. ज्याप्रमाणे विजेत्या दोस्त राष्ट्रांनी जर्मनीवर व्हर्सायचा तह लादून जर्मनीच्या सगळ्या वसाहती आपापसांत वाटून घेतल्या, तशीच पाळी तुर्कस्तानवरही आली. १९२० मध्ये फ्रान्समधील सेव्हरेस या ठिकाणी ब्रिटन आणि फ्रान्स यांनी तुर्कस्तानचा मूळ प्रदेश सोडून बाकीचं सगळं ऑटोमन साम्राज्य वाटून घेतलं. या साम्राज्यात असलेला सीरियाचा प्रदेश फ्रान्सला मिळाला आणि पॅलेस्टाईनवर ब्रिटनचा ताबा प्रस्थापित झाला. याच्या आधी १९१७ मध्ये, अगदी स्पष्टपणेच सांगायचं तर २ नोव्हेंबर १९१७ या दिवशी ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री आर्थर जेम्स बाल्फोर यांनी ब्रिटनमधल्या ज्यू धर्मियांचे नेते वॉल्टर रॉथशील्ड यांना एक पत्र पाठवलं होतं.
His Majesty's government view with favour the establishment in Palestine of a national home for the Jewish people, and will use their best endeavours to facilitate the achievement of this object, it being clearly understood that nothing shall be done which may prejudice the civil and religious rights of existing non-Jewish communities in Palestine, or the rights and political status enjoyed by Jews in any other country.
हा त्या पत्राचा मजकूर होता. हे पत्र नंतर बाल्फोर जाहीरनामा (Balfour Declaration) म्हणून प्रसिद्ध झालं. जर हा मजकूर नीट वाचला तर असं दिसतं की बाल्फोरनी ज्यू लोकांसाठी मातृभूमी द्यायचं किंवा त्यासाठी प्रयत्न करायचं आश्वासन दिलं होतं, पण त्याचबरोबर इतर जमाती किंवा लोकांचे हक्क डावलण्यात येणार नाहीत असंही म्हटलं होतं. आता पॅलेस्टाईनमध्ये मध्ययुगीन काळापासून ज्यू येऊन वसती करायला लागले होते. जेव्हा जेव्हा पूर्व युरोपियन प्रदेशांमध्ये – उदाहरणार्थ पोलंड, युक्रेन, रोमानिया, रशियन साम्राज्य – ज्यू धर्मियांवर अत्याचार व्हायचे, तेव्हा ते पॅलेस्टाईनचा आश्रय घ्यायचे. त्यामुळे तिथे आता ज्यूंची संख्या बऱ्यापैकी वाढलेली होती. त्याच सुमारास पश्चिम युरोपियन देशांमध्ये ज्यूंना अनेक हक्क मिळत होते. परिणामी आपली स्वतंत्र मातृभूमी असली पाहिजे हा विचार पूर्व युरोपियन ज्यूंमध्ये प्रबळ व्हायला लागला. जेव्हा सेव्हरेस करारामध्ये बाल्फोर जाहीरनाम्याचा समावेश झाला, तेव्हा या विचाराने उचल खाल्ली. ज्यू राष्ट्राची पॅलेस्टाईनच्या पवित्र भूमीत स्थापना व्हावी म्हणून चालू झालेल्या झिओनिस्ट चळवळीला मोठ्या प्रमाणात आश्रय मिळायला लागला. पुढे १९३३ मध्ये जर्मनीमध्ये नाझी राजवट प्रस्थापित झाल्यावर पश्चिम युरोपियन ज्यूसुद्धा पॅलेस्टाईनमध्ये यायला लागले. १९४५ मध्ये जेव्हा दुसरं महायुद्ध संपुष्टात आलं, तेव्हा ज्यूंची संख्या पॅलेस्टाईनच्या संपूर्ण लोकसंख्येच्या एक तृतीयांश झालेली होती. त्यात जर्मन छळछावण्या आणि मृत्युछावण्यांमधून वाचलेल्या ज्यूंचाही समावेश होता. महायुद्ध संपल्यावर ब्रिटन आणि फ्रान्स ही दोन्हीही राष्ट्रे कमजोर झालेली होती. त्यामुळे त्यांच्या वसाहतींमधून स्वातंत्र्याची मागणी जोरात व्हायला लागली. पॅलेस्टाईनही त्याला अपवाद नव्हतं. दरम्यान ब्रिटनमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये पंतप्रधान चर्चिल आणि त्यांचा पक्ष पराभूत झाले आणि क्लेमंट अॅटली यांच्या नेतृत्वाखाली मजूर पक्षाचं सरकार सत्तेवर आलं. या सरकारचा वसाहतींच्या स्वातंत्र्याला तात्विक पाठिंबा होता आणि आर्थिक कारणांमुळे वसाहती चालवणं शक्य नाही याची जाणीवसुद्धा होती. या सरकारने पॅलेस्टाईन प्रश्न नव्याने स्थापन झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाकडे सोपवला.
राष्ट्रसंघाने नियुक्त केलेल्या समितीने जो तोडगा सुचवला तो असा होता – एक अरब संघराज्य, एक ज्यू संघराज्य आणि जेरुसलेमवर आंतरराष्ट्रीय नियंत्रण. म्हणजे थोडक्यात पॅलेस्टाईनची फाळणी. या तोडग्यामुळे ज्यूंना जरी आनंद झाला असला, तरी अरब नेते संतापले होते. त्यामुळे पॅलेस्टाईनमध्ये यादवी युद्ध सुरु झालं. अमेरिकेने राष्ट्रसंघाच्या या योजनेला पाठिंबा दिला होता. पण यादवी युद्ध सुरु झाल्यावर पॅलेस्टाईनमधल्या ज्यूबहुल भागांमधून जवळजवळ एक लाख अरबांनी स्थलांतर केलं. त्यामुळे अमेरिकेचा असा समज झाला की आता पॅलेस्टाईनची फाळणी करायची गरज नाही आणि त्यांनी या योजनेला असलेला पाठिंबा काढून घेतला. त्यामुळे पॅलेस्टाईनमधल्या अरब नेत्यांचं मनोधैर्य उंचावलं. त्यांना इजिप्त, इराक, सीरिया, सौदी अरेबिया या अरब देशांच्या ‘अरब लीग’ चा पाठिंबा मिळाला. फेब्रुवारी १९४८ मध्ये ब्रिटिशांनी ट्रान्सजॉर्डनच्या (जॉर्डनचं आधीचं नाव) सरकारला पॅलेस्टाईनच्या अरबबहुल भागाचा ताबा घ्यायची परवानगी दिली. पण त्यांचं केवळ त्याने समाधान होण्यासारखं नव्हतं. त्यांनी ज्यूबहुल विभागात घुसखोरी करायला सुरुवात केली.
झिओनिस्ट ज्यूंनी स्वतःचं सैन्यदल आणि गुप्तचर संघटना स्थापन केल्या होत्या. यांना अनुक्रमे हॅगन्हा आणि शाई (Hagannah & Shai) अशी नावं होती. ज्यू नेता डेव्हिड बेन गुरियनने हॅगन्हामध्ये भरती होण्याचं प्रत्येक प्रौढ स्त्रीपुरुषांना आवाहन केलं. दरम्यान एक अनपेक्षित गोष्ट घडली. चक्क सोविएत रशियाने झिओनिस्ट चळवळीला आपला पाठिंबा जाहीर केला. अमेरिकेतून ज्यू हितचिंतकांनी दिलेल्या पैशातून रशियन शस्त्रास्त्रे विकत घेऊन हॅगन्हाचे सैनिक अरब लीगचा मुकाबला करायला सिद्ध झाले. हॅगन्हाचं नेतृत्व यीगेल यादीन या धुरंधर सेनानीकडे होतं. त्याच्या नेतृत्वाखाली हॅगन्हाने टायबेरियस, हैफा, जाफा, साफेद, बीसान आणि एकर ही सगळी महत्वाची शहरं दोन महिन्यांत आपल्या ताब्यात आणली.
मे १९४८ मध्ये आपण पॅलेस्टाईन सोडणार असल्याचं ब्रिटीश पंतप्रधान अॅटली यांनी जाहीर केलं होतंच. त्याप्रमाणे १४ मे १९४८ या दिवशी शेवटचा ब्रिटीश सैनिक पॅलेस्टाईनमधून बाहेर पडला आणि त्याच दिवशी डेव्हिड बेन गुरियनने तेल अवीवच्या म्युझियममध्ये इझराईल या ज्यू राष्ट्राची घोषणा केली. चाइम वाईझमन या देशाचे प्रथम राष्ट्रपती असणार होते आणि डेव्हिड बेन गुरियन पंतप्रधान. अमेरिका आणि रशिया या महासत्तांनी ताबडतोब या नवीन देशाला मान्यता दिली.
अरब लीगला अर्थातच काही फरक पडत नव्हता. त्यांनी इझराईलवर आक्रमण केलं. अरब लीगमध्ये सौदी अरेबिया, इराक, इजिप्त, सीरिया, ट्रान्सजॉर्डन आणि लेबेनॉन यांचा म्हणजे इझराईलच्या सर्व शेजाऱ्यांचा समावेश होता. सुरुवातीच्या पीछेहाटीनंतर हळूहळू हॅगन्हाच्या सैनिकांनी अरब सैन्याला पाठी रेटायला सुरुवात केली आणि अरब पॅलेस्टाईनमधले काही भाग आपल्या टाचेखाली आणले. नोव्हेंबर १९४८ पर्यंत मोठ्या लढाया बंद झाल्या आणि किरकोळ चकमकी उडायला सुरुवात झाली. अखेरीस फेब्रुवारी १९४९ मध्ये इझराईल आणि इजिप्त यांनी युद्धबंदी जाहीर केली. बाकीची अरब राष्ट्रे अजूनही युद्धाच्या आवेशात होती, पण युद्धाचा आर्थिक बोजा सहन करायची तयारी नसल्यामुळे हळूहळू एकेकाने काढता पाय घ्यायला सुरुवात केली. मार्चमध्ये लेबेनॉन, एप्रिलमध्ये ट्रान्सजॉर्डन आणि सर्वात शेवटी जुलैमध्ये सीरिया यांनी युद्धबंदी जाहीर केली. इराक आणि सौदी अरेबिया प्रत्यक्ष युद्धात फार कमी सहभागी होते आणि त्यांच्या सरहद्दी इझराईलला लागून नव्हत्या. त्यामुळे त्यांनी एकतर्फी युद्धबंदी केल्यावर इझराईलनेही त्यांच्याशी युद्धबंदी जाहीर केली. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मध्यस्थीने इझराईल आणि उर्वरित अरब पॅलेस्टाईन यांच्या नवीन सीमारेषा ठरवण्यात आल्या. पण अरब राष्ट्रांना त्या मान्य नव्हत्या. त्यामुळे पुढेमागे या राष्ट्रांशी आपल्याला लढावं लागणार हे इझराईलच्या राजकारण्यांना आणि सेनाधिकाऱ्यांना कळून चुकलं. त्यामुळे पंतप्रधान बेन गुरियन यांच्या पुढाकाराने एक गुप्तचर संस्था चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या वेळी इझराईलमध्ये तीन प्रमुख गुप्तचर संस्था होत्या – अमान (AMAN) ही सैन्याची गुप्तचर संघटना, शिन बेत (Shin Bet) ही अंतर्गत सुरक्षितता सांभाळणारी संघटना आणि परराष्ट्रखात्याचा राजकीय विभाग (Political Department). त्यांचा समन्वय साधण्यासाठी म्हणून अजून एक संस्था स्थापन केली गेली. तारीख होती १३ डिसेंबर १९४९ आणि या संघटनेचं नाव अगदी साधं होतं - the Institute किंवा हिब्रू भाषेत मोसाद!
क्रमशः
संदर्भ: https://en.wikipedia.org/wiki/Mossad
https://en.wikipedia.org/wiki/History_of_Israel
Gideon’s Spies – Gordon Thomas
The History of Mossad – Antonella Colonna Vilasi
स्थापना झाल्यापासून लगेचचा काळ हा मोसादसाठी अनेक कारणांमुळे खडतर
होता. सुरुवातीच्या काळात घडलेल्या दोन प्रकरणांमुळे मोसादची नाचक्की होऊ
शकली असती पण संघटनेच्या आणि देशाच्या नेत्यांनी दाखवलेल्या धडाडी,
निर्णयक्षमता आणि चिवटपणा या गुणांमुळे मोसादला या प्रसंगांमधून तावून
सुलाखून बाहेर पडता आलं.
पहिलं प्रकरण म्हणजे इसेर बीरीचं. १९०१ मध्ये जन्मलेला इसेर बीरी हा
हॅगन्हाचा सदस्य होता. १९४७ मध्ये तो हॅगन्हाची गुप्तचर संघटना असलेल्या ‘
शाई ‘ मध्ये भरती झाला आणि १९४८ मध्ये तिथे प्रमुखही झाला. उंच आणि सडपातळ
असलेल्या बीरीच्या चेहऱ्यावर नेहमी एक खिन्न हसू असे. त्याच्या
समर्थकांसाठी बीरी म्हणजे अत्यंत प्रामाणिक, अतिशय कमी गरजा असलेला पण
कर्तव्यकठोर असा माणूस होता मात्र त्याच्या विरोधकांच्या मते तो अत्यंत
महत्वाकांक्षी, निष्ठुर, आत्मकेंद्रित आणि असुरक्षित होता. हैफा शहरामध्ये
त्याची स्वतःची एक बांधकाम साहित्य बनवणारी कंपनी होती. अर्थात, हा कंपनीचा
मुख्य व्यवसाय जरी असला तरी कंपनी हॅगन्हासाठी छोटी शस्त्रंसुद्धा बनवत
असे. बीरीची आर्थिक परिस्थिती चांगली होती, आणि तो त्याच्या पत्नी आणि
मुलाबरोबर समुद्रकिनाऱ्याजवळ असलेल्या बात गालीम नावाच्या गावात एका
छोटेखानी बंगल्यात राहात असे.
शाईच्या प्रमुखपदी नेमणूक झाल्यावर बीरीवर सैनिकी हेतूंसाठी लागणारी गुप्त माहिती मिळवण्याची जबाबदारी टाकण्यात आली होती. त्या वेळी पॅलेस्टाईनच्या फाळणीचा प्रस्ताव अरब राष्ट्रांनी आणि पॅलेस्टिनी अरबांनी धुडकावून लावलेला होता आणि यादवी युद्धाला सुरुवात झालेली होती. इझराईलने मे १९४८ मध्ये स्वतःचं स्वातंत्र्य जाहीर केल्यावर शाई आणि हॅगन्हा या दोन्ही संघटना विसर्जित करण्यात आल्या. हॅगन्हाचं रुपांतर इझराईलच्या सैन्यदलात करण्यात आलं आणि शाईला नवीन नाव मिळालं – अमान. इझराईलची सैनिकी गुप्तचर संघटना. तिचं प्रमुखपद बीरीकडेच राहिलं.
त्यानंतर काही विचित्र आणि संपूर्ण देशाला हादरवणा-या घटना घडल्या. हैफा शहरापासून जवळ असलेल्या माउंट कार्मेल या ठिकाणी काही ट्रेकर्सना एक अर्धवट जळालेलं प्रेत मिळालं. कोणीतरी गोळ्या झाडून त्या माणसाची हत्या केलेली होती. प्रेताजवळ मिळालेल्या काही धागादो-यांवरून त्याची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं. त्याचं नाव होतं अली कासीम आणि तो शाईच्या अरब हेरांपैकी एक होता. त्याच्या मारेकऱ्यांनी त्याला गोळ्या घातल्यावर त्याला पूर्ण जाळून टाकण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांच्याजवळ बहुतेक पुरेसं पेट्रोल नसल्यामुळे कासीमचं प्रेत अर्धवटच जळलं होतं.
यानंतर काही आठवड्यांनी पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियनबरोबर एका अत्यंत महत्वाच्या आणि गुप्त अशा मीटिंगमध्ये बीरीने बेन गुरियनच्या मपाई या पक्षाच्या एका महत्वाच्या नेत्यावर तो देशद्रोही आणि ब्रिटीशांचा एजंट असल्याचा गंभीर आरोप केला. या नेत्याचं नाव होतं अब्बा हुशी. हा आरोप ऐकल्यावर बेन गुरियनचं धाबं दणाणलं. पहिल्या महायुद्धानंतर पॅलेस्टाईन ब्रिटीश साम्राज्याचा भाग होतं. तेव्हा झिओनिस्ट ज्यूंनी ज्यूंवर असलेल्या बंधनांविरुद्ध आवाज उठवला होता. ब्रिटिशांनीही त्यांचे हेर ज्यू समाजात घुसवण्याचा प्रयत्न केला होता. पण अब्बा हुशीसारखा मोठा नेता ब्रिटीशांचा हेर? बेन गुरियनची पहिली प्रतिक्रिया बीरीने केलेले सर्व आरोप धुडकावून लावण्याचीच होती. पण बीरीने ब्रिटीश हेरखात्याने अब्बा हुशीसाठी पाठवलेली दोन गुप्त पत्रं बेन गुरियनच्या समोर ठेवून अब्बा हुशीविरुद्ध बिनतोड पुरावा सादर केल्यावर त्यालाही काय बोलावं ते सुचेना.
त्याच सुमारास बीरीने ज्युल्स अॅमस्टर नावाच्या एका माणसाला अटक करण्याचा आपल्या सहाय्यकांना आदेश दिला. अॅमस्टर आणि हुशी हे जवळचे मित्र होते. अॅमस्टरला अटक झाल्यावर हैफापासून जवळ असलेल्या आत्लीत या ठिकाणी असलेल्या एका मिठाच्या खाणीवर ठेवण्यात आलं. तिथे मोजून ७६ दिवस त्याचा प्रचंड छळ करण्यात आला. कारण एकच. त्याने अब्बा हुशी देशद्रोही असल्याचं मान्य करावं. अॅमस्टर जरी अब्बा हुशीचा मित्र असला, तरी त्याला हुशीच्या राजकीय कारकिर्दीविषयी माहिती नव्हती. त्यामुळे त्याने आपल्याला कुठलीही माहिती असल्याचा इन्कार केला. त्याच्याकडून काही मिळत नाही हे समजल्यावर बीरीने त्याला सोडून द्यायचा आदेश दिला.
अॅमस्टरच्या अटकेनंतर घडलेली एक घटना हा तर कळस होता. ३० जून १९४८ या दिवशी तेल अवीवच्या गजबजलेल्या बाजारात कॅप्टन मायर तुबियान्स्की हा सैन्यातला एक अधिकारी आपल्या कुटुंबियांसमवेत खरेदी करत होता तेव्हा अचानक अमानच्या लोकांनी त्याला अटक केली आणि ते त्याला बेथ गिझ नावाच्या एका नुकत्याच इझरेली सैन्याच्या ताब्यात आलेल्या एका अरब खेड्यात घेऊन गेले. अमानला असा संशय होता की तुबियान्स्कीने जेरुसलेममध्ये त्याची नियुक्ती झालेली असताना इझरेली सैन्याच्या हालचालींविषयी अत्यंत गुप्त माहिती एका ब्रिटीश नागरिकाला दिली होती. हा नागरिक ट्रान्सजॉर्डनचा हेर होता आणि त्याने ती माहिती जॉर्डेनियन सैन्याला दिली होती. त्यामुळे जॉर्डेनियन सैन्याच्या तोफखान्याने इझरेली सैन्यावर अगदी अचूक हल्ला चढवला होता आणि इझरेली सैन्याचं मोठं नुकसान – मनुष्यबळ आणि साधनसामग्री या दोन्हीच्या अनुषंगाने – झालं होतं. तिथल्या तिथे कोर्ट मार्शल करून तुबियान्स्कीवर हे गंभीर आरोप करण्यात आले. त्याला त्याच्या बचावासाठी काहीही बोलण्याची संधी देण्यात आली नाही. कोर्ट मार्शलच्या नियमांप्रमाणे (इझरेली सैन्याने हे नियम ब्रिटीश सैन्याच्या नियमांप्रमाणे बनवलेले होते) आरोपी अधिकाऱ्याला आपल्या एखाद्या सह-अधिकाऱ्याला आपला वकील म्हणून नियुक्त करण्याचा हक्क होता. पण तुबियान्स्कीला हा हक्क नाकारण्यात आला. त्याच्यावर अरबांसाठी हेरगिरी करून देशद्रोह ठेवण्याचा आरोप ठेण्यात आला, तो सिद्ध झालाय असं जाहीर करण्यात आलं आणि त्याला वरच्या कोर्टात अपील करण्याची संधी वगैरे काहीही न देता मृत्युदंड देण्यात आला. एवढंच नाही, तर तो लगेच अंमलातही आणण्यात आला. बेथ गिझ ताब्यात घेणाऱ्या इझरेली सैनिकांमधून दहा जणांना फायरिंग स्क्वाड म्हणून निवडण्यात आलं आणि बाकीच्या सैनिकांसमोर त्यांनी तुबियान्स्कीला गोळ्या घातल्या. आपण कोणावर गोळ्या झाडतोय आणि का हेही त्या दहा सैनिकांना माहित नव्हतं. (आजतागायत इझराईलमध्ये नाझी क्रूरकर्मा अॅडॉल्फ आइकमन सोडला तर मृत्युदंड देण्यात आलेला मायर तुबियान्स्की हा एकमेव माणूस आहे.)
तुबियान्स्कीच्या कोर्ट मार्शल आणि मृत्युदंडामुळे आणि ज्या प्रकारे हा सगळा प्रकार झाला, त्यामुळे इझरेली सैन्यात मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरला. सरकारने ताबडतोब चौकशी करायला सुरुवात केली आणि त्यांना अली कासीमची हत्या, अब्बा हुशीविरुद्ध हेरगिरीचे पुरावे मिळणे आणि तुबियान्स्कीचं कोर्ट मार्शल यांच्यात एक गोष्ट समान आढळली. इसेर बीरी. अली कासीम हा अरब लीगचा डबल एजंट किंवा दुहेरी हेर असल्याच्या केवळ संशयावरून बीरीने त्याची हत्या करवली होती. कासीम दुहेरी हेर असल्याचा कुठलाही पुरावा नव्हता, तरीही.
अब्बा हुशीविरुद्ध पुरावे मिळणे हेही बीरीचंच कारस्थान होतं. बीरी आणि हुशी यांच्यात अमानच्या प्रमुखपदावरून चढाओढ होती. बीरीला हे प्रमुखपद मिळालं, पण हुशी आपल्याविरुद्ध कारवाया करेल आणि आपलं पद धोक्यात येईल या भीतीने बीरीने त्याला अडकवलं. जी पत्रं अब्बा हुशीच्या देशद्रोहाचा पुरावा म्हणून बीरीने बेन गुरियनच्या टेबलवर ठेवली होती, ती नकली होती, बनावट होती, सर्वात हादरवणारी गोष्ट म्हणजे अमानमधल्या नकली कागदपत्रं बनवण्यात उस्ताद असलेल्या एका अधिकाऱ्याने बीरीला ही पत्रं बनवून दिली होती. या अधिकाऱ्याला जेव्हा तुबियान्स्कीच्या कोर्ट मार्शलबद्दल समजलं तेव्हा त्याला बीरीचा संशय आला आणि त्याने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यासमोर आपल्या कृत्याची कबुली दिली. तुबियान्स्की निर्दोष असल्याचा पुरावा जरी मिळाला नसला तरी त्याच्यावर ठेवलेल्या आरोपाची पुनर्तपासणी केल्यावर असं आढळून आलं की ज्या दिवशी जॉर्डेनियन तोफखान्याने जेरुसलेमवर हल्ला केला असा आरोपपत्रात उल्लेख होता, त्या दिवशी शुक्रवार असल्यामुळे जॉर्डेनियन सैन्याने संपूर्ण दिवस युद्धबंदीचे निर्देश दिलेले होते. त्या दिवशी हल्ला तर सोडाच, एकही जॉर्डेनियन सैनिक आपल्या बराकीतून बाहेर पडलेला नव्हता.
बीरीच्या कृत्यांविरुद्ध एवढे पुरावे मिळाल्यावर बेन गुरियनने कारवाई करायचा निर्णय घेतला. बीरीला अटक करण्यात आली आणि त्याच्यावर सैनिकी आणि मुलकी अशा दोन्हीही कोर्टांमध्ये खटला चालवण्यात आला. दोन्हीकडे आरोप सिद्ध झाल्यावर त्याला अमानच्या प्रमुखपदावरून आणि इझरेली सैन्यातून बडतर्फ करण्यात आलं, आणि त्याने आधी केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे त्याला फक्त एक दिवसाच्या कैदेची शिक्षा सुनावण्यात आली.
बीरीचेही पाठिराखे होतेच. या लोकांनी जेव्हा पंतप्रधान बेन गुरियनची भेट
घेऊन बीरीसाठी रदबदली करायचा प्रयत्न केला, तेव्हा बेन गुरियनने त्यांना
फक्त एकाच वाक्यात उत्तर दिलं – इझराईल म्हणजे सोविएत रशिया नव्हे.
या प्रकरणामुळे इझराईलच्या नेत्यांना एक मोठा धडा मिळाला, की अनिर्बंध
सत्तेसाठी लोक कुठल्याही थराला जाऊ शकतात. त्यामुळे एक वटहुकुम काढून सर्व
गुप्तचर संस्था या पंतप्रधानांच्या कार्यालयाच्या अंतर्गत आणण्यात आल्या.
बीरीच्या अनुभवामुळे नव्याने स्थापन झालेल्या मोसादच्या संचालकपदासाठी बेन
गुरियनने काळजीपूर्वक एक असा माणूस निवडला, जो बीरीएवढाच अनुभवी होता पण
त्याला आंतरराष्ट्रीय राजकारणाची समज होती, अरेबिक भाषेवर प्रभुत्व होतं
आणि पडद्यामागे राहून सूत्रं हलवण्याची आवड होती. शिवाय सर्वात महत्वाचं
म्हणजे बेन गुरियनचा त्याच्यावर पूर्ण विश्वास होता. या माणसाचं नाव होतं
रूव्हेन शिलोह. डेव्हिड बेन गुरियनच्या बुद्धिबळातला वजीर!
जुन्या जेरुसलेम शहरात एका राब्बायच्या (ज्यू धर्मगुरू) घरी जन्माला आलेला रूव्हेन शिलोह हा मोसादचा पहिला संचालक. नेहमी कडक इस्त्रीचा सूट घालणारा आणि टापटीपीने राहणारा शिलोह इझराईलच्या निर्मितीआधी बरीच वर्षे इराकमध्ये एक पत्रकार आणि शिक्षक म्हणून राहात होता आणि तिथून त्याने ब्रिटीशांशी संधान बांधून हॅगन्हाची दोन कमांडो युनिट्स उभारली होती. यातलं एक युनिट हे प्रामुख्याने जर्मनीतून आलेल्या ज्यूंचं होतं. त्यांनी जर्मन शस्त्रास्त्रं वापरण्याचं आणि नाझी सैन्याप्रमाणे लढण्याचं प्रशिक्षण घेतलं होतं. त्या वेळी दोस्त राष्ट्रांच्या सेना जर्मनीमध्ये इटली, फ्रान्स आणि पोलंड इथून शिरण्याचा प्रयत्न करत होत्या पण जर्मन प्रतिकार हा अत्यंत प्रखर होता. या कमांडो युनिट्सनी जर्मनीमध्ये जाऊन नाझी सैन्यात गोंधळ माजवून पुढे येणाऱ्या दोस्तांच्या सैन्याला वाट सुकर करून देण्याचं काम केलं होतं. दुसरं युनिट हे अरेबिक भाषेत पारंगत असलेल्या आणि अरब सैनिकांप्रमाणे लढण्याचं प्रशिक्षण घेतलेल्या ज्यूंचं होतं. त्यांनी पॅलेस्टाईनमधल्या यादवी युद्धात आणि नंतर इझराईल निर्माण झाल्यावर अरब लीगशी झालेल्या युद्धात मोठीच कामगिरी बजावलेली होती. स्वतः शिलोहने सीरियाची राजधानी दमास्कसमध्ये जाऊन अरब लीगच्या सैन्याचा पूर्ण बॅटल प्लॅन पळवून आणलेला होता.
गुप्तता या गोष्टीने शिलोह पछाडलेला आहे असे त्याचे मित्र आणि विरोधक हे दोघेही म्हणायचे. त्याच्यावरून मोसादमध्ये एक विनोद होता, की तो दररोज आपल्या घरून ऑफिसमध्ये येतानासुद्धा इतकी गुप्तता पाळतो, की ड्रायव्हरने जर विचारलं की कुठे जायचंय तर शिलोहचं उत्तर असतं, “गुप्ततेच्या कारणांमुळे मी ते तुला सांगू शकत नाही!”
१९४९ च्या डिसेंबरमध्ये मोसादची औपचारिक स्थापना करण्यात आली पण सुरुवातीपासूनच या नवीन संघटनेला अडचणींचा सामना करावा लागला. परराष्ट्र मंत्रालयाच्या राजकीय विभागाचे लोक हे प्रामुख्याने अमेरिका किंवा ब्रिटन यासारख्या देशांमध्ये राहून आलेले लोक होते. मोसादच्या अधिकाऱ्यांनी दिलेले आदेश पाळायची त्यांची तयारी नव्हती. शेवटी पंतप्रधान बेन गुरियनच्या मध्यस्थीने हे ‘ बंड ‘ शमवण्यात आलं. जे अधिकारी मोसादच्या आदेशांचं उल्लंघन करतील किंवा त्यांचं पालन करणार नाहीत, त्यांना सरळ नोकरीवरून बडतर्फ करण्याची ताकीद देण्यात आली.
१९५१ मध्ये मोसादच्या पहिल्यावहिल्या ऑफिसर्सची बॅच प्रशिक्षण घेऊन बाहेर पडली. या ऑफिसर्सना मोसादच्या परिभाषेत असलेला शब्द म्हणजे कात्सा (katsa). या बॅचसमोर शिलोहने त्याच्या मनातली मोसादची संकल्पना मांडली – कुठल्याही देशाच्या गुप्तचर संस्था जे काम करतात, ते तर आपण करणारच आहोत, पण त्याशिवाय आपल्यावर अजून एक जबाबदारी आहे, ती म्हणजे जगभरात पसरलेल्या ज्यू धर्मीयांचं संरक्षण.
मोसादने त्याच अनुषंगाने जगभरात जिथे जिथे ज्यू धर्मीय स्थानिक राजवटींचा अन्याय सहन करत आहेत, तिथे तिथे शस्त्रांचं वाटप, ती कशी चालवायची याचं प्रशिक्षण, अगदीच गरज भासली तर तिथल्या लोकांना इझराईलमध्ये आणण्याची व्यवस्था करणं अशा स्वरूपाच्या अनेक कामगिऱ्या केलेल्या आहेत. पण सर्वात पहिली अशा स्वरुपाची कामगिरी करतानाच मोसादला एक जबरदस्त फटका बसला.
२२ मे १९५१, बगदाद, इराक. बगदादमधला रशीद स्ट्रीट हा रस्ता म्हणजे भली मोठी बाजारपेठ. याच रस्त्यावर ओरोस्दी बाक नावाचं एक मोठं डिपार्टमेंटल स्टोअर होतं. या स्टोअरच्या पाश्चिमात्य कपड्यांच्या विभागात आसद नावाचा एक तरुण नेकटाईजच्या काउंटरवर सेल्समन म्हणून उभा होता. आसद पॅलेस्टाईनहून आलेला निर्वासित होता. बगदादमध्ये येण्याआधी तो एकर शहरात राहात होता. मार्च १९४८ मध्ये हॅगन्हाच्या सैनिकांनी एकर शहरातून अरबांना हुसकावून लावलं आणि आसद आणि त्याच्या कुटुंबाला घराबाहेर पडावं लागलं. तिथून बगदादला जाण्याआधी आसदला काही पैशांची गरज होती आणि अचानक एक संधी त्याच्यासमोर चालून आली. त्याचा एक दूरचा भाऊ एकरच्या सैनिकी गव्हर्नरच्या ऑफिसमध्ये काम करत असे. तो अचानक आजारी पडला आणि त्याने आसदला त्याच्या जागी जायची विनंती केली. या ऑफिसचा ताबा आता इझरेली सैनिकांकडे होता आणि त्यांना कॉफी आणि इतर खाद्यपदार्थ देणं हे आसदचं काम होतं. त्यामुळे त्याने त्या ऑफिसमध्ये अनेकवेळा फेऱ्या मारल्या होत्या आणि अनेक अधिकाऱ्यांना आणि सैनिकांना कॉफी आणि खाद्यपदार्थ नेऊन दिले होते.
त्या दिवशी आपल्या काउंटरमागे उभं राहून ग्राहकांना न्याहाळताना आसदला अचानक एक ओळखीचा चेहरा दिसला. पहिल्यांदा आपल्याला भास झाला असावा असं त्याला वाटलं पण नंतर त्याने त्या माणसाला दोन-तीन वेळा त्याच्यासमोरून जाताना पाहिलं, त्याचा आवाज ऐकला आणि त्याची खात्री पटली. त्याने या माणसाला इझरेली सैन्याच्या गणवेशात पाहिलं होतं. एकरमधल्या सैनिकी गव्हर्नरच्या ऑफिसमध्ये. आसदच्या काउंटरवर फोन होता. तो उचलून त्याने सरळ पोलिसांना फोन लावला आणि आपण एका इझरेली सैन्याच्या अधिकाऱ्याला बगदादमध्ये पाहिल्याचं सांगितलं.
इझरेली सैन्याधिकारी म्हटल्यावर पोलिस ताबडतोब आले आणि त्यांनी त्या माणसाला आणि त्याच्याबरोबर असलेल्या दुसऱ्या माणसाला अटक केली. हा दुसरा माणूस उंच, बारीक आणि जाड भिंगांचा चष्मा लावणारा होता. त्याने पोलिसांना आपलं नाव निसीम मोशे असं सांगितलं आणि आपण ज्युईश कम्युनिटी सेंटरमध्ये एक सामान्य कारकून आहोत आणि या माणसाला शहर दाखवतोय असं सांगितलं. पोलिस दोघांनाही हेडक्वार्टर्समध्ये घेऊन गेले. तिथे त्यांनी दोघांनाही वेगळं केलं आणि पोलिसांच्या ठरलेल्या पद्धतीने ‘ विचारपूस ’ करायला सुरुवात केली. निसीम मोशे आपली कथा बदलायला तयार नव्हता. त्याला जे कोणी विचारतील त्यांना तो आपण क्म्युनिटी सेंटरमध्ये कारकून आहोत आणि या दुसऱ्या माणसाने शहर फिरून दाखवणार का असं विचारलं आणि चांगले पैसे द्यायचं कबूल केलं – ही एकच कथा ऐकवत होता. शेवटी वैतागून इराकी पोलिसांनी त्याला उलटं टांगून मारहाण आणि विचारपूस करायला सुरुवात केली. तो तरीही काहीही सांगत नव्हता आणि त्या दुसऱ्या माणसाबद्दल त्याला काहीही माहिती नव्हतं.
एका आठवड्यानंतर पोलिसही वैतागले आणि त्यांनी निसीम मोशेला सोडून दिलं. इकडे तो दुसरा माणूस, ज्याला आसदने ओळखलं होतं, तो आपलं नाव इस्माईल साल्हून आहे आणि आपण इराणी आहोत असं सांगत होता. त्याच्याकडे इराणी पासपोर्टही होता. पण इराकी पोलीसही मूर्ख नव्हते. एकतर तो इराणी दिसत नव्हता आणि त्याला अस्खलित अरेबिक येत होती पण फारसी भाषेचा गंधही नव्हता. शेवटी त्यांनी आपला हुकुमाचा एक्का काढला. आसद आणि त्याला तुरुंगात समोरासमोर आणलं. आसदला पाहिल्यावर या स्वतःला इस्माईल म्हणवणाऱ्या माणसाच्या चेहऱ्याचा रंग उडून गेला आणि त्याने आपण कोण आहोत याची कबुली द्यायला सुरुवात केली.
त्याचं नाव होतं येहुदा तागार. तो इझरेली सैन्यात कॅप्टनच्या हुद्द्यावर होता. इराकी पोलिस त्याला त्याच्या घरी घेऊन गेले आणि त्याच्यासमोर त्यांनी त्याच्या घराची कसून झडती घेतली आणि त्यात त्यांच्या हाताला घबाड लागलं. बगदादमध्ये अनेक वर्षांपासून अनेक ज्यू आणि इझरेली संघटना आणि हेरगिरी नेटवर्क्स कार्यरत होती. त्यातल्या काहींचा उद्देश हा इराकमधून ज्यूंना बाहेर काढून इझराईलमध्ये पोचवणं हा होता. काही नेटवर्क्स इराक, इराकी सैन्य आणि राजकीय परिस्थिती यांच्यावर लक्ष ठेवून होती आणि या संदर्भात माहिती मिळवणं, जमलं तर इराकी जनतेमधून इझराईलसाठी काम करू शकतील असे लोक हेरणं, त्यांचे कच्चे दुवे शोधून काढून त्यांना इझराईलसाठी काम करायला भाग पाडणं – अशी अनेक कामं आतापर्यंत बिनबोभाट चालली होती. काही नेटवर्क्स तर दुसऱ्या महायुद्धाच्या आधीपासून कार्यरत होती. या सगळ्यांची माहिती असलेली एक फाईल इराकी पोलिसांना तागारच्या घरात सापडली. आता तागारचं तर काही खरं नव्हतंच पण बगदादमधल्या सगळ्या ज्यूंचा जीवही धोक्यात होता, कारण त्या फाईलमध्ये असा स्पष्ट उल्लेख होता, की काही अजून महत्वाची कागदपत्रं आणि इतर माहिती ही बगदादच्या मध्यभागात असणाऱ्या मासुदा शेम्तोव्ह सिनेगॉगमध्ये होती. तसाही इराकचा इझराईल आणि ज्यू यांच्यावर राग होताच. अरब लीगमधल्या देशांना इझराईलवर हल्ला करायला इराकनेच भरीला पाडलं होतं. युद्धबंदी झालेली असताना ‘अजून युद्ध संपलेलं नाही, आणि इझराईलच्या अंतापर्यंत संपणारही नाही ‘ असं इराकी नेत्यांनीच ठणकावलं होतं. त्यामुळे आता इराकमधल्या आणि विशेषतः बगदादमधल्या ज्यूंची अवस्था बिकट होणार होती.
सर्वात मोठा विरोधाभास हा होता, की येहुदा तागारला बगदादमध्ये पाठवण्याचं प्रमुख कारण म्हणजे मोसादला बगदादमधली ही सगळी नेटवर्क्स तात्पुरती बंद करायची होती. त्यांचा आढावा घेऊन मग ती परत चालू करायची की नाही याचा निर्णय मोसादमधले वरिष्ठ घेणार होते, पण त्याच्या आधीच तागार पकडला गेला होता.
तागार बगदादमध्ये यायच्या आधी या सगळ्या नेटवर्क्समधला समन्वय साधणारा जो अधिकारी होता, त्याचं नाव होतं झाकी हवीव. हे अर्थातच खरं नाव नव्हतं. त्याचं खरं नाव होतं मोर्देचाई बेन पोरात. त्याचा जन्म इराकमध्ये झाला होता आणि तो इझराईलच्या निर्मितीपूर्वी शाईमध्ये काम करत होता. तागार बगदादला जाण्यापूर्वी बेन पोरात इझराईलला परत गेला होता. त्याचं कारण थोडं नाजूक होतं. त्याला आणि त्याच्या प्रेयसीला लग्न करायचं होतं. पण शिलोहने कसंबसं त्याचं मन वळवून त्याला एका शेवटच्या कामगिरीसाठी बगदादला पाठवलं होतं आणि आता तो पकडला जाण्याचा धोका निर्माण झाला होता.
इकडे त्या फाईलच्या आधाराने इराकी पोलिस आणि हेरखात्याने संपूर्ण इझरेली नेटवर्क उध्वस्त करायला सुरुवात केली. अनेक ज्यू पकडले गेले. काही जण कोठडीतल्या मारामुळे मरण पावले. ज्यांना जगायचं होतं, त्यांनी नाईलाजाने त्यांना असलेली माहिती पोलिसांना दिली. त्यांच्यामुळे पोलिसांनी बगदादमध्ये अनेक ठिकाणी धाडी घालून कागदपत्रं हस्तगत केली आणि अनेक ज्यू हेरांना अटक केली. शेम्तोव्ह सिनेगॉगमध्ये शस्त्रांचा मोठा साठ दडवलेला होता. १९४१ मध्ये इराकी सरकारने त्यांचे मित्र असलेल्या नाझी जर्मनीच्या चिथावणीवरून ज्यूंविरुद्ध कारवाया सुरु केल्या होत्या. त्यात १७९ ज्यू मरण पावले होते, दोन हजारांहून जास्त जखमी झाले होते, हजारो स्त्रियांवर अत्याचार झाले होते. पुन्हा जर असं झालं तर त्याचा मुकाबला करण्यासाठी म्हणून इराकमधल्या झिओनिस्ट ज्यूंनी शस्त्रं जमा करून ठेवायला सुरुवात केली होती. ती आता इराकी पोलिसांच्या हातात पडली होती. त्यांची संख्या बघून पोलिसांचेही डोळे विस्फारले – ४३६ हातबॉम्ब, ३३ मशीन पिस्तुलं, १८६ रिव्हॉल्व्हर्स, ९७ मशीनगन्स, ३२ धारदार गुप्त्या आणि २५००० काडतुसं!
इराकी पोलिसांच्या या दमनसत्रात एका माणसाचा उल्लेख वारंवार होत होता. झाकी हवीव. फार कमी लोकांनी त्याला प्रत्यक्ष पाहिलं होतं. पण हा माणूस होता कोण? आणि कुठे होता तो? शेवटी इराकी पोलिसांच्या एका हुशार डिटेक्टिव्हच्या डोक्यात एक कल्पना आली. त्याने ज्यांनी झाकी हवीवला प्रत्यक्ष पाहिलं होतं, त्या सर्वांना बोलावून त्यांच्याकडून त्याचं वर्णन परत एकदा ऐकलं आणि एक धक्कादायक निष्कर्ष काढला – निसीम मोशे म्हणून जो माणूस सुरुवातीला पोलिसांनी पकडला होता, तोच झाकी हवीव आहे. ताबडतोब निसीम मोशेने पोलिसांना दिलेल्या पत्त्यावर पोलिसांनी धाड टाकली. तिथे अर्थातच कोणीही नव्हतं. पोलीस वेडेपिसे झाले. संपूर्ण इझरेली नेटवर्क आपल्या इशाऱ्यांवर नाचवणारा माणूस त्यांच्या हातात आला होता, पकडलाही गेला होता पण....!
झाकी हवीवच्या शोधात सगळी पोलिस यंत्रणा कामाला लागली. बगदादशिवाय बसरा, फालुजा इत्यादी ज्यूबहूल शहरांमध्येही हवीवचा शोध सुरु झाला. पण तो कुठेही सापडला नाही, आणि त्याचं कारण म्हणजे तो अशा ठिकाणी होता, जिथे शोधायचं कुणाच्या मनातही येणार नाही. बगदादमधला तुरुंग!
पोलिसांनी तागारबरोबर निसीम मोशे उर्फ झाकी हवीव उर्फ मोर्देचाई बेन पोरातला अटक केली होती, पण एका आठवड्यानंतर त्याला सोडून दिलं होतं. तो घरी आल्यानंतर दोन दिवसांनी त्याच्या घराचा दरवाजा कोणीतरी जोरात ठोठावला, “दरवाजा उघड. पोलिस!” हा आपला शेवट असल्याचा विचार बेन पोरातच्या मनात आला. घराला मागून सटकण्यासाठी दरवाजा, खिडकी वगैरे काहीही नव्हतं आणि पकडल्यावर सगळे मार्ग एकाच ठिकाणी जाणारे होते – फाशीच्या तख्तावर. त्याने मन घट्ट केलं आणि दरवाजा उघडला. बाहेर पोलिस उभे होते. त्याला अटक होत असल्याचं त्यांनी सांगितल्यावर त्याने कारण विचारलं.
“काही विशेष नाही,” त्या पोलिसांमधला एकजण म्हणाला, “दोन महिन्यांपूर्वी तू एका मोटरसायकलला तुझ्या गाडीने ठोकलं होतंस, आठवतं का? आता कपडे घाल आणि आमच्याबरोबर चल.”
बेन पोरातचा स्वतःच्या कानांवर विश्वासच बसेना. तो या अपघाताविषयी विसरून गेला होता. त्याला कोर्टाकडून दंड भरण्याचा आदेश आला होता, आणि त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं. आता त्याच्या अटकेचा आदेश आला होता. पोलिस त्याला तिथून घेऊन सरळ कोर्टात गेले. तिथे न्यायाधीशांनी त्याला दोन आठवड्यांच्या तुरुंगवासाची शिक्षाही सुनावली. त्यामुळे बगदादमध्ये त्याला शोधायला इराकी पोलिस आकाशपाताळ एक करत असताना तो चक्क तुरुंगात होता.
दोन आठवडे पूर्ण झाल्यावर पोलिस निसीम मोशेला (ते त्याला त्याच नावाने ओळखत होते) हेडक्वार्टर्समध्ये घेऊन चालले होते. इराकी कायद्यांनुसार त्याच्या बोटांचे ठसे घेणं आणि त्याचा फोटो काढून तो पोलिस रेकॉर्डमध्ये ठेवणं गरजेचं होतं. हे झालं तर आपण संपलो याची बेन पोरातला जाणीव होती. झाकी हवीवसाठी चालू असलेला शोध त्याच्या कानांवर आलेला होताच. त्याला घेऊन दोन पोलिस शिपाई हेडक्वार्टर्सकडे जात होते. हा रस्ता बगदादमधल्या शुर्जा सुक या सुप्रसिद्ध आणि गजबजलेल्या बाजारातून जात होता.. तिथे गर्दीचा फायदा घेऊन बेन पोरात त्याच्याबरोबर असलेल्या दोन्ही शिपायांना चकवून पळून गेला. त्या शिपायांना अर्थातच तो कोण आहे हे माहित नव्हतं, आणि तशीही त्याची शिक्षा संपली होती. त्यामुळे त्या शिपायांनी त्याचा पाठलाग करायचा अजिबात प्रयत्न केला नाही. जेव्हा त्यांनी हेडक्वार्टर्समध्ये जाऊन हे सांगितलं, तेव्हा तिथे जवळजवळ भूकंप झाला. परत एकदा झाकी हवीव पोलिसांच्या हातून निसटला होता.
तेल अवीवमध्ये बेन पोरातच्या वरिष्ठांचं या सगळ्या घडामोडींकडे बारीक लक्ष होतं. त्यांनी तो इराकमध्ये जातानाच त्याला तिथून बाहेर काढायची योजना बनवलेली होती. तो बगदादमध्ये त्याच्या एका अरब मित्राच्या घरात लपून बसला होता. त्याच वेळी मोसादने इराकमधून ज्यूंना बाहेर काढण्याची एक जबरदस्त योजना कार्यान्वित केलेली होती.
इझराईलमधून आलेल्या कोणत्याही विमानाला इराकमध्ये प्रवेश नव्हता, पण
त्या वेळी बगदादमधल्या श्रीमंत इराकी लोकांमध्ये सुट्टीसाठी सायप्रसला
जायची फॅशन होती. त्यामुळे सायप्रसची राजधानी निकोशिया आणि बगदाद यांना
जोडणाऱ्या अनेक फ्लाईट्स होत्या. सायप्रसच्या सरकारी विमानसेवेच्या लोकांशी
संधान बांधून मोसादने या विमानांमधून अनेक ज्यूंना बगदाद ते निकोशिया आणि
तिथून तेल अवीव असं इझराईलमध्ये आणलं होतं. आता बेन पोरातलाही तसंच बाहेर
काढायची त्यांची योजना होती.
१२ जून १९५१ च्या रात्री बेन पोरात एकदम उंची सूट घालून बाहेर पडला.
त्याच्या मित्रांनी त्याच्या कपड्यांवर अरक नावाच्या स्थानिक दारूच्या
बाटल्या ओतल्या होत्या. त्यामुळे पोरातच्या अंगप्रत्यंगातून अरकचा डोकं
उठवणारा वास येत होता. झोकांड्या खात पोरात जात असताना त्याच्या जवळ एक
टॅक्सी येऊन थांबली आणि पोरात ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर जाऊन कोसळला आणि
झोपून गेला. उलटसुलट गाडी चालवत ड्रायव्हरने ती बगदाद विमानतळाच्या जवळ
आणली. तिथे पोरात बाहेर उतरला. विमानतळाच्या कुंपणाची तार एके ठिकाणी
कापलेली होती. तिथून तो आतमध्ये शिरला आणि एका ठिकाणी लपून बसला. इकडे
रनवेवर विमान उडायच्या तयारीत होतं. विमानाने टेक ऑफ साठी धावायला सुरुवात
केली. अचानक पायलटने दिव्यांचे प्रखर झोत कंट्रोल टॉवरच्या दिशेने वळवले.
हा बेन पोरातसाठी इशारा होता. तो आपल्या जागेवरून पुढे धावत आला. विमानाने
आता जमीन सोडली होती, पण त्याची मागची एक झडप अजून उघडी होती. अर्थातच
कंट्रोल टॉवरमधल्या लोकांचे डोळे अजूनही त्या प्रखर प्रकाशाने दिपले होते.
त्यामुळे तिथून बाहेर आलेला दोर आणि त्याला लटकलेला बेन पोरात त्यांना दिसू
शकले नाहीत. त्याला आत ओढून घेऊन झडप बंद झाली आणि विमान निकोशियाकडे
झेपावलं. बगदादवरून उडत जाताना विमानाच्या दिव्यांची तीन वेळा उघडझाप झाली
आणि बगदादमधल्या एका इमारतीच्या गच्चीवर जमलेल्या काही लोकांनी सुटकेचा
निःश्वास सोडला. त्यांचा मित्र सुखरूपपणे इझराईलच्या मार्गावर होता.
बेन पोरातने इझराईलमध्ये परत गेल्यावर आपल्या प्रेयसीशी लग्न केलं आणि
मोसादमधून निवृत्त झाल्यावर राजकारणात प्रवेश केला. पुढे तो पंतप्रधान
मेनॅचम बेगिन यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्रीही झाला.
बगदादमध्ये राहिलेले ज्यू इतके नशीबवान नव्हते. झाकी हवीव उर्फ बेन पोरात
पळून गेल्याचं इराकी पोलिसांच्या लक्षात आल्यावर ज्यूंचा छळ अजूनच वाढला.
इकडे तागार आणि इतर २१ ज्यूंवर राजद्रोहाच्या आरोपाखाली खटला भरण्यात आला.
बगदादमधले दोन मोठे ज्यू व्यापारी – शालोम सालाच आणि योसेफ बात्झरी हे त्या
२१ ज्यू आरोपींमध्ये होते. खटला संपल्यावर या दोघांनाही मृत्युदंड देण्यात
आला.
तागारवर खटला चालू होण्याआधी एकदा त्याला भल्या पहाटे अडीच वाजता झोपेतून
उठवलं गेलं. त्याच्या छोट्या कोठडीत बरेच पोलिस उभे होते. “तुला आत्ता
फासावर चढवायचा हुकुम आहे आम्हाला!” त्यातला एक तागारला थंडपणे म्हणाला.
“पण खटला अजून चालू व्हायचाय. त्याशिवाय तुम्ही कसं काय मला फाशी देताय?” तागार म्हणाला.
“अच्छा? आम्हाला तुझ्याबद्दल सगळं माहित आहे. तू इझरेली आहेस, हेर आहेस. अजून काही माहित असण्याची गरज नाही.”
त्यांनी कुठूनतरी एक राब्बायपण शोधून काढला होता. त्याने तागारला धीर दिला.
पण भीतीऐवजी तागार बुचकळ्यात पडला होता. पहाटे साडेतीन वाजता ते त्याला
वधस्तंभाकडे घेऊन गेले. जिथे प्रत्यक्ष फाशी दिलं जाणार होतं, तिथे
जाण्याआधी एका खोलीत त्याच्याकडून अनेक कागदांवर सह्या करून घेण्यात आल्या.
त्यानंतर तिथे उभ्या असणाऱ्या जल्लादाने त्याच्या बोटातल्या अंगठ्या आणि
घड्याळ या गोष्टी काढून घेतल्या. मग तो त्याला आत, जिथे वधस्तंभ होता, तिथे
घेऊन गेला. तिथे त्याला एका खालच्या दिशेने उघडणाऱ्या दरवाज्यावर उभं
करण्यात आलं. जल्लादाने त्याला स्वतःकडे पाठ करून उभं केलं होतं. त्याचे
हात पाठीमागे बांधलेले होतेच. त्याच्या पायांना जड पिशव्या बांधण्यात
आल्या. त्याच्या डोक्यावर काळा बुरखा घालण्याआधी जल्लादाने त्याला शेवटची
इच्छा विचारली. तागारने आपला मृतदेह इझराईलला पाठवण्यात यावा असं सांगितलं
आणि काळा बुरखा घालून घ्यायला नकार दिला. जल्लादाने आता त्या खोलीत हजार
असलेल्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे पाहिलं. तागारने डोळे घट्ट मिटून
घेतले..... आणि अचानक तो अधिकारी आणि त्याच्याबरोबर असलेले बाकीचे पोलिस
अधिकारीही त्या खोलीतून निघून गेले. जल्लाद अरेबिकमध्ये शिव्या घालत
असल्याचं तागारने ऐकलं. तो एवढी मेहनत करून फाशी न दिल्यामुळे त्याला जे
पैसे मिळणार नव्हते, त्याबद्दल वैतागला होता. त्याने तागारचे हात
बेड्यांमधून सोडवले आणि त्याच्या पायांना बांधलेल्या पिशव्याही तिथून
काढल्या. त्या क्षणी हा सगळा बनाव असल्याचं तागारच्या लक्षात आलं.
मृत्यूच्या एवढ्या जवळ गेल्यावर तो दयेची याचना करेल आणि आपल्याला अजून
काही माहिती देईल अशी पोलिसांची अपेक्षा होती. पण तागारने तोंडही उघडलं
नव्हतं.
पुढे खटला झाल्यावर त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. सालाच आणि बात्झरी यांना मात्र इराकने सोडलं नाही. दोघेही फासावर लटकले.
जवळजवळ ९ वर्षांनी एक अकल्पित घडलं. तागारला शिक्षा झाली, तेव्हा इराकमध्ये
राजेशाही होती. १९५८ मध्ये सैन्यप्रमुख अब्दुल करीम कासीम याने उठाव घडवून
आणून सत्ता काबीज केली. याच्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे १९६० मध्ये
त्याच्या जवळच्या साथीदारांनी त्याला उडवण्याची योजना आखली होती. या
योजनेची कुणकुण मोसादला लागल्यावर त्यांनी कासीमला सावध केलं आणि
त्याच्याबरोबर सौदा केला – येहुदा तागारच्या मोबदल्यात हा कट करणाऱ्यांची
नावं. कासीमने हे मान्य केलं आणि १९६० मध्ये, तब्बल ९ वर्षांनी येहुदा
तागारची मुक्तता झाली. जेव्हा तो तेल अवीवच्या विमानतळावर उतरला तेव्हा
अनेक लोक त्याच्या स्वागतासाठी जमले होते. आपल्याला एखादा अस्थिपंजर
झालेला, डोळे खोल गेलेला, वयापेक्षा जास्त म्हातारा दिसणारा माणूस भेटेल
अशी अनेकांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात एक हसतमुख, सडपातळ आणि चालीत
यत्किंचितही फरक न पडलेला एक माणूस त्यांना सामोरा आला.
“ तू एवढ्या वर्षांत वेडा कसा नाही झालास?” त्याला त्याच्या एका मित्राने विचारलं.
“कारण तुम्ही मला तिथून बाहेर काढाल याची मला खात्री होती!” तागार शांतपणे म्हणाला.
तागारने नंतरही मोसादच्या अनेक कामगिऱ्यांमध्ये भाग घेतला आणि तिथून निवृत्त झाल्यावर तो हैफा विद्यापीठात प्राध्यापक झाला.
रूव्हेन शिलोहचा झाकी हवीव आणि येहुदा तागारच्या प्रकरणाशी तसा काहीही
संबंध नव्हता, पण त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्याने १९५२ मध्येच
राजीनामा दिला होता. त्याच्या जागी पंतप्रधान बेन गुरियनने एका अशा माणसाची
नेमणूक केली जो पुढच्या काही वर्षांत एक जिवंत दंतकथा बनला आणि ज्याने
मोसादचा दरारा आणि दबदबा संपूर्ण जगभर प्रस्थापित केला. त्याचं नाव होतं
इसेर हॅरेल!
क्रमशः
संदर्भ
१. Gideon’s Spies – by Gordon Thomas
२. Mossad: The greatest Missions of the Israeli Secret Service – by Michael Bar-Zohar and Nissim Mishal
३. The Israeli Secret Services – by Frank A. Clements
४. The History of Mossad – by Antonella Colonna Vilaci
मोसाद - भाग ३
या सगळ्याची सुरुवात झाली होती, ती एका प्रेमप्रकरणातून. वर्ष होतं
१९५६. अमेरिका आणि सोविएत रशिया यांच्यातलं शीतयुद्ध ऐन भरात होतं.
रशियाच्या अंकित राष्ट्रांमध्ये कम्युनिस्ट राजवटींनी अगदी व्यवस्थित पाय
रोवले होते. या राष्ट्रांमधला एक महत्वाचा देश म्हणजे पोलंड. एडवर्ड ओखाब
हा पोलिश कम्युनिस्ट पक्षाचा सरचिटणीस होता. त्याची सेक्रेटरी होती
ल्युसिया बरानोव्ह्स्की. ल्युसियाचा पती पोलंडचा उपपंतप्रधान होता आणि
त्याच्या कामात तो दिवसभर व्यस्त असे. ल्युसियाला काम करण्याची तशी गरज
नव्हती, पण घरी बसून कंटाळा यायचा म्हणून ती ओखाबची सेक्रेटरी बनली होती.
अर्थात, तिच्या नवऱ्याच्या पदामुळे तिला तिथेही फारसं काम करायला लागत
नव्हतं.
एका पार्टीमध्ये तिची गाठ व्हिक्टर ग्रेव्ह्स्कीशी पडली. व्हिक्टर पोलिश
न्यूज एजन्सीमध्ये वरिष्ठ संपादक होता. सोविएत रशिया आणि इतर पूर्व
युरोपियन कम्युनिस्ट देश इथल्या घडामोडींवर तो लिहित असे. बहुश्रुत,
बडबड्या, विनोदी व्हिक्टर ल्युसियाला पहिल्या भेटीतच आवडला. त्यांच्या भेटी
वाढत गेल्या आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.
व्हिक्टरचं खरं नाव होतं व्हिक्टर श्पीलमन. तो ज्यू होता. अनेक वर्षांपूर्वी तो जेव्हा पोलिश कम्युनिस्ट पक्षात भरती झाला होता, तेव्हा त्याच्या एका मित्राने त्याला आपलं नाव बदलायचा सल्ला दिला होता. नाझींप्रमाणे कट्टर आणि खुनशी ज्यूद्वेष जरी पोलंडमध्ये नसला, तरी तो होता, हेही तितकंच खरं होतं. श्पीलमन असं उघड ज्यू आडनाव असलेल्या व्हिक्टरला पोलिश कम्युनिस्ट पक्षात पुढे जाता येण्याची सुतराम शक्यता नव्हती. त्यामुळे त्याने आपलं आडनाव बदलून पोलिश वाटेल असं ग्रेव्ह्स्की हे आडनाव घेतलं होतं. ‘
सप्टेंबर १९३९ मध्ये नाझींनी पोलंडवर आक्रमण केलं आणि दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात केली. ताब्यात घेतलेल्या प्रदेशाला ‘ज्यू मुक्त ‘ बनवणं नाझींनी लगेचच सुरु केलं होतं. त्यापासून कसाबसा जीव वाचवून व्हिक्टर आणि त्याचं कुटुंब रशियामध्ये पळून गेले. युद्ध संपल्यावर ते पोलंडमध्ये परत आले. १९४९ मध्ये त्याचे आई-वडील आणि धाकटी बहिण इझराईलला निघून गेले, पण कडवा कम्युनिस्ट असलेला व्हिक्टर मात्र पोलंडमध्येच राहिला. स्टॅलिन हा व्हिक्टरचं दैवत होता. त्याच्या संकल्पनेप्रमाणे कामगारांच्या आणि कष्टकऱ्यांच्या स्वर्गाची निर्मिती करणं हे त्याला आपलं जीवितकार्य वाटत होतं.
पण हळूहळू त्याची ही विचारसरणी बदलायला लागली होती. पत्रकार असल्यामुळे जगातल्या घडामोडी तो बघत होता. कशा प्रकारे पोलंड आणि इतर पूर्व युरोपियन कम्युनिस्ट देशांमध्ये सरकारी दडपशाही चालू झालेली आहे आणि स्वतंत्र विचार मांडणारे लोक कसे कम्युनिस्ट प्रचारयंत्रणेच्या रोषाला बळी पडताहेत, ते त्याला दिसत होतं. तशातच १९५५ मध्ये त्याचे वडील आजारी होते म्हणून त्यांना भेटण्यासाठी त्याला इझराईलला जायची संधी मिळाली. तिथलं आयुष्य बघून त्याला पोलंड आणि इतर कम्युनिस्ट देश आणि इझराईल यांच्यातला फरक जाणवला. तिथून पोलंडमध्ये परत आल्यावर त्याच्या मनात इझराईलमध्ये स्थायिक होण्याचे विचार घोळायला लागले.
अशा मनःस्थितीत असतानाच त्याची आणि ल्युसियाची भेट झाली होती. तिच्याबरोबरच्या प्रेमाला काय भवितव्य आहे, हे त्याला माहित होतं, पण ल्युसियाच्या भेटीचा मोहही सोडवत नव्हता. आजकाल तो तिला भेटायला तिच्या ऑफिसमध्येही जात असे.
एप्रिल १९५६ मधल्या त्या दिवशी तो असाच तिला भेटायला तिच्या ऑफिसमध्ये गेला होता. तिच्याशी गप्पा मारता मारता त्याची नजर तिथल्या एका लाल रंगाच्या फाईलवर पडली.
“काय आहे हे?” त्याने सहज विचारलं.
“हे? काही विशेष नाही. क्रुश्चेव्हचं भाषण आहे.” ती अगदी सहजपणे म्हणाली.
हे ऐकल्यावर व्हिक्टर हादरला. क्रुश्चेव्हच्या भाषणाबद्दल त्याने ऐकलं होतं पण अजूनपर्यंत त्या भाषणातलं एक वाक्यही त्याला कुठे वाचायला किंवा ऐकायला मिळालं नव्हतं, किंवा ते ऐकलेला किंवा वाचलेला कोणी माणूसही त्याला भेटला नव्हता. कम्युनिस्ट जगातल्या अत्यंत गुप्त रहस्यांपैकी होतं हे भाषण.
या भाषणामागची पार्श्वभूमी व्हिक्टरला माहित होती. १९५३ मध्ये स्टॅलिनचा मृत्यू झाला. नंतर त्याचा उजवा हात आणि केजीबीचा तत्कालीन प्रमुख लावरेन्ती बेरिया सत्ता काबीज करण्याची स्वप्नं पाहात होता. पण बेरियाविरुद्ध कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्युरोमध्ये संताप आणि तिरस्कार यांच्याशिवाय दुसरी भावना नव्हती. हे हेरून निकिता क्रुश्चेव्हने पॉलिटब्युरोमधल्या सदस्यांना बेरियाविरुद्ध फितवलं आणि बेरियाचा काटा काढून तो सोविएत युनियनच्या कम्युनिस्ट पक्षाचा सरचिटणीस झाला. म्हणजे दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर संपूर्ण सोविएत युनियनमधला आणि पर्यायाने कम्युनिस्ट जगातला सर्वात सामर्थ्यशाली माणूस.
१९३० च्या दशकात स्टॅलिनने त्याला जे जे आव्हान देऊ शकतील अशा लोकांना मार्गातून बाजूला काढण्याची देशव्यापी मोहीम चालू केली होती. जे स्वतंत्र विचारांचे असतील, ज्यांनी पूर्वी कधी स्टॅलिनला अगदी क्षुल्लक मुद्द्यांवरून विरोध केलेला असेल, जे जनमत बदलू शकतील, अशा प्रत्येकाला एन.के.व्ही.डी. या गुप्तचर संघटनेच्या हस्तकांनी अटक करणं आणि त्यांच्यावर तथाकथित खटले चालवून त्यांना त्यांच्या गुन्ह्यांच्या तीव्रतेप्रमाणे शिक्षा होणं हा १९३० च्या दशकातल्या सोविएत युनियनमधला दैनिक कार्यक्रम होता. या शिक्षा म्हणजे मृत्युदंड, तुरुंगवास, सक्तमजुरी यापैकी काहीही असायचं. त्यासाठी एन.के.व्ही.डी.ने खास छळछावण्या उभारल्या होत्या. या छावण्यांना ‘ गुलाग ‘ असं नाव होतं. सर्वसामान्य जनताही यात भरडून निघाली होती. १९४० मध्ये आपला कट्टर विरोधक लिऑन ट्रॉट्स्की याची हत्या स्टॅलिनने रेमन मर्कादर या मारेकऱ्याकरवी मेक्सिकोमध्ये घडवून आणली होती. १९४१ मध्ये नाझींचं आक्रमण झाल्यावरच हे दमनसत्र थांबलं होतं. पुढे युद्ध संपल्यावरही नाझींच्या ताब्यातल्या रशियन आणि इतर सोविएत युद्धकैद्यांना रशियन राजवटीने स्वीकारलं नव्हतं. स्टॅलिनने तर ‘ एकही देशभक्त सोविएत नागरिक हा युद्धकैदी नव्हता ’ असं जाहीर केलं होतं. अनेक युद्धकैद्यांना पुन्हा अटक करून गुलागमध्ये पाठवण्यात आलं होतं.
क्रुश्चेव्हने हे सगळे अत्याचार जवळून पाहिले होते. त्यांच्याविरुद्ध मत नोंदवलं तर आपलीही ट्रॉट्स्कीप्रमाणे गत होईल, हे त्याला कळून चुकलं होतं. त्यामुळे आपला राजकीय धूर्तपणा स्टॅलिनच्या किंवा त्याच्या निष्ठावंतांच्या नजरेत येणार नाही, याची पुरेपूर काळजी त्याने घेतली होती. पण कम्युनिस्ट पक्षाचं सरचिटणीसपद मिळाल्यावर हे आजवर गुप्त राहिलेले अत्याचार सर्वांसमोर आणायचा त्याने निर्णय घेतला.
कम्युनिस्ट पक्षाची विसावी परिषद १९५६ च्या फेब्रुवारी महिन्यात क्रेमलिनमध्ये आयोजित करण्यात आली होती. सर्व सोविएत गणराज्यांमधल्या कम्युनिस्ट पक्षांचे प्रतिनिधी आणि इतर देशांमधल्या कम्युनिस्ट पक्षांचे प्रतिनिधीही तिथे उपस्थित होते. २५ फेब्रुवारी या दिवशी, मध्यरात्रीच्या थोडं आधी सर्व परदेशी पाहुणे आणि प्रतिनिधींना सभागृहातून बाहेर जाण्याची विनंती करण्यात आली. जे रशियन प्रतिनिधी हॉटेलमध्ये परत गेले होते, त्यांना तिथून परत बोलावण्यात आलं. रात्री बाराच्या ठोक्याला क्रुश्चेव्हने भाषणाला सुरुवात केली आणि पुढचे चार तास तो तिथे जमलेल्या चौदाशे प्रतिनिधींसमोर अथकपणे बोलत होता.
त्याच्या भाषणातला एक शब्ददेखील पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये प्रसारित झाला नव्हता, तरी एका अमेरिकन पत्रकाराने दिलेल्या माहितीनुसार असं समजलं होतं, की या भाषणामध्ये क्रुश्चेव्हने स्टॅलिनच्या चेहऱ्यावरचा बुरखा टराटरा फाडला होता. स्टॅलिन, स्टॅलिनवाद, स्टॅलिनने पद्धतशीरपणे निर्माण केलेला आणि जोपासलेला आपल्या व्यक्तिमत्वाचा ‘ कल्ट ’ या सगळ्यांच्या या भाषणात क्रुश्चेव्हने ठिकऱ्या उडवल्या होत्या. पद्धतशीर पुरावे देऊन स्टॅलिनने केलेली आणि त्याच्या राजवटीत झालेली असंख्य दुष्कृत्यं त्याने सर्वांसमोर मांडली होती. कशा प्रकारे लेनिनच्या मृत्युनंतर झिनोव्हिएव, कामेनेव्ह आणि बुखारीन यांच्या मदतीने स्टॅलिनने ट्रॉट्स्कीला एकाकी पाडलं, देश सोडून जायला भाग पाडलं, आणि नंतर या सगळ्यांना एकमेकांविरुद्ध झुंजवून सगळ्यांचा काटा काढला, याचं वर्णन क्रुश्चेव्हच्या तोंडून ऐकल्यावर सभागृह निःस्तब्ध झालं. नंतर त्याने अजून एक गौप्यस्फोट केला, तो म्हणजे खुद्द लेनिनची स्टॅलिन आपला उत्तराधिकारी व्हावा अशी इच्छा नव्हती. तसं लेनिनने लिहून ठेवलं होतं. आता सर्व प्रतिनिधी हतबुद्ध झाले, कारण १९२४ पासून, म्हणजे लेनिनचा मृत्यू झाल्यानंतर आपणच त्याच्या विचारसरणीचे खरे वारस आहोत हे स्टॅलिनने अत्यंत पद्धतशीरपणे सर्वांच्या मनावर बिंबवलं होतं. या गौप्यस्फोटाचा परिणाम जबरदस्त होता. दोन प्रतिनिधींना सभागृहातच हृदयविकाराचा झटका आला. काही प्रतिनिधींनी भाषण संपल्यावर हॉटेलवर जाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. इतके दिवस, इतकी वर्षे मनाशी बाळगलेला विश्वास इतका तकलादू आणि कचकड्याचा ठरल्यावर कम्युनिस्ट जग मुळापासून हादरलेलं असणार हे उघड होतं.
केजीबीच्या यंत्रणेने आपली सगळी ताकद पणाला लावून हे भाषण कम्युनिस्ट जगाच्या बाहेर पडू दिलं नव्हतं. त्यातले थोडे मुद्दे बाहेर आले होते आणि काहींवर चर्चा वगैरे झाल्या होत्या, पण संपूर्ण भाषणाचा मसुदा केजीबीने यशस्वीरीत्या दडपला होता. सी.आय.ए. आणि एम.आय.६ या केजीबीच्या प्रतिस्पर्धी गुप्तचर संघटनांनी आपापल्या परीने या भाषणाचा मसुदा किंवा त्याच्याबद्दल जी मिळेल ती माहिती मिळवण्यासाठी जंग जंग पछाडायला सुरुवात केलेली होती. सी.आय.ए. ने तर त्याच्यासाठी अनौपचारिकरीत्या दहा लाख डॉलर्स एवढं प्रचंड इनाम ठेवलं होतं. त्या वेळी सी.आय.ए. चा संचालक असलेला अॅलन डलेस हा कट्टर कम्युनिस्टविरोधी होता. सोविएत रशियाची नाचक्की होईल अशी एकही संधी सोडायला तो तयार नसायचा. हे भाषण जर लोकांपुढे आलं तर संपूर्ण कम्युनिस्ट जगात आणि त्याच्याबाहेरही भूकंप झाला असता, स्टॅलिनवर वेडी भक्ती करणाऱ्या लोकांच्या श्रद्धेचा चक्काचूर झाला असता, आणि त्याचा सरळसरळ परिणाम सोविएत रशियाच्या पतनात होऊ शकला असता – ही डलेसची अटकळ होती.
पण अजूनतरी हे भाषण मिळवण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले होते.
व्हिक्टरच्या कानांवर उडत उडत बातमी आली होती, की ज्या दिवशी क्रुश्चेव्हने हे भाषण दिलं, त्याच्या आधी सर्व परकीय कम्युनिस्ट सदस्यांना निघून जायला सांगण्यात आल्यामुळे हे कम्युनिस्ट सदस्य वैतागलेले होते. सोविएत रशियाचा जर आमच्या राज्यकारभारात हस्तक्षेप असतो, तर एवढ्या महत्वाच्या घटनेच्या वेळी आम्हाला जाणूनबुजून का डावलण्यात आलं, हा प्रश्न विचारायला त्यांनी सुरुवात केलेली होती. त्यांच्यातला हा असंतोष अजून पसरू नये, म्हणून केजीबीने या भाषणाच्या काही प्रती इतर कम्युनिस्ट देशांमध्ये पाठवल्या होत्या, पण त्या अगदी उच्चपदस्थ व्यक्तींनाच बघायला मिळाल्या होत्या. ल्युसियाचा नवरा पोलंडचा उपपंतप्रधान आणि तिचा बॉस तिथल्या कम्युनिस्ट पक्षाचा सरचिटणीस असल्यामुळे तिला त्या भाषणाची एक प्रत मिळाली होती, आणि व्हिक्टर आता त्याच प्रतीकडे बघत होता.
ती प्रत पाहिल्यावर व्हिक्टरच्या डोक्यात एक अचाट कल्पना आली. त्याने
ल्युसियाकडे ती प्रत दोन-तीन तास वाचण्यासाठी मागून घेतली. आश्चर्याची
गोष्ट म्हणजे तिलाही त्यात काही वावगं वाटलं नाही. त्याला आनंद वाटेल अशी
कुठलीही गोष्ट करण्याची तिची तयारी होती, “संध्याकाळी चारच्या आत परत आणून
दे,” ती म्हणाली,
“ऑफिस बंद करताना मला ती परत तिजोरीमध्ये बंद करून ठेवावी लागेल.”
घरी जाऊन व्हिक्टरने संपूर्ण भाषण वाचून काढलं. त्याला रशियन भाषा चांगली अवगत होती. भाषण वाचून तो निःस्तब्ध झाला. स्टॅलिन, त्याची राक्षसी महत्वाकांक्षा, त्यापायी त्याने घडवलेलं हत्याकांड आणि दमनसत्र या सगळ्यांवर क्रुश्चेव्हने घणाघाती प्रहार केले होते. जवळजवळ दहा लाख लोकांना या दमनसत्रात अटक झाली होती आणि त्यातल्या ६,८०,००० लोकांना ठार मारण्यात आलेलं होतं. बाकीचे लोक गुलागमध्ये खितपत पडले होते. ठार मारल्या गेलेल्यांमध्ये ८४८ लोक कम्युनिस्ट पक्षाच्या कॉंग्रेसचे सदस्य होते. त्यांना कॉंग्रेसच्या बैठकीमधून बाहेर पडल्यावर अटक करून सरळ तुरुंगात नेऊन मारण्यात आलं होतं. पक्षाच्या केंद्रीय समितीमधल्या १३८ पैकी ९८ जणांना स्टॅलिनच्या थेट आदेशांवरून मारण्यात आलं होतं. सर्वात कहर म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर स्टॅलिनने विजयाचं सगळं श्रेय स्वतः घेतलं पण युद्धात मरण पावलेल्या सैनिकांचं एक साधं स्मारकही रशियामध्ये कुठेही उभारलं नव्हतं. (Russkiy Soldat किंवा Russian Soldier या नावाने प्रसिद्ध असलेलं हे स्मारक क्रुश्चेव्हच्या कारकीर्दीत उभारण्यात आलं.)
व्हिक्टरच्या मनात कम्युनिस्ट तत्वज्ञान आणि राजवट यांच्याविषयी शिल्लक असलेली थोडीफार आत्मीयता हे भाषण वाचून पूर्णपणे निघून गेली, आणि आपल्या मनात आलेल्या कल्पनेवर काम करायचं त्याने ठरवलं.
सर्व कम्युनिस्ट देशांमध्ये पोलंड हा नागरिकांवर त्यातल्या त्यात कमी बंधनं असलेला देश होता. पोलंडमधून अनेक ज्यू त्यावेळी इझराईलमध्ये स्थायिक होण्यासाठी जात असत. या लोकांना इझराईलच्या वकिलातीत एक हस्तलिखित अर्ज नेऊन द्यावा लागत असे. व्हिक्टरने भराभर असा अर्ज खरडला आणि तो घेऊन तो इझराईलच्या वकिलातीत गेला. तिथे बाहेर उभ्या असलेल्या पोलिश सैनिकांनी त्याच्या हातातला अर्ज पाहिल्यावर काही हरकत न घेता त्याला आत जाऊ दिलं. क्रुश्चेव्हच्या भाषणाची प्रत व्हिक्टरने आपल्या शर्टाच्या आत लपवली होती.
आत गेल्यावर व्हिक्टर याकोव्ह बार्मर नावाच्या माणसाला भेटला. बार्मर अधिकृतरीत्या जरी फर्स्ट सेक्रेटरी असला, तरी प्रत्यक्षात तो इझरेली प्रतिहेरसंघटना शिनबेतचा (किंवा शाबाक – ही संघटना या दोन्ही नावांनी ओळखली जाते) पोलंडमधला प्रतिनिधी होता.
बार्मरच्या हातात व्हिक्टरने भाषणाची प्रत दिली. पहिलं पान वाचल्यावरच बार्मरचे डोळे विस्फारले. त्याने व्हिक्टरला थोडं थांबायला सांगितलं आणि तो खोलीबाहेर पडला. एक तासाने तो परत आला, आणि त्याने ती प्रत व्हिक्टरला परत दिली. त्याने ती फोटोकॉपी करून घेतली असणार हे व्हिक्टरच्या लक्षात आलं. ती प्रत जशी आणली होती तशीच त्याने ती आपल्या कपड्यांत लपवली आणि तो वकिलातीबाहेर पडला. बाहेर कोणीही त्याच्याकडे ढुंकूनसुद्धा पाहिलं नाही. चार वाजायच्या आत ल्युसियाच्या ऑफिसमध्ये जाऊन त्याने तिला ती प्रत परत दिली. देताना अर्थातच आपले बोटांचे ठसे त्याच्यावर नाहीयेत याची काळजी त्याने घेतली होती.
इकडे १३ एप्रिल १९५६ या दिवशी तेल अवीवमधल्या शाबाकच्या ऑफिसमध्ये शाबाकचा संचालक अमोस मॅनॉर आपल्या ऑफिसमध्ये बसला होता, तेव्हा त्याचा सहाय्यक झेलीग कात्झ याने त्याच्यासमोर क्रुश्चेव्हच्या भाषणाची प्रत ठेवली. कात्झला त्यात काय माहिती आहे आणि ती किती स्फोटक आहे, याविषयी काहीही कल्पना नव्हती. मॅनॉरने जेव्हा ते भाषण वाचलं तेव्हा त्याचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. त्याने तडक मोसाद संचालक इसेर हॅरेलला फोन केला.
मॅनॉर आणि हॅरेल हे त्यावेळी इझराईलच्या गुप्तचर संघटनांमधले चमकते तारे होते. मॅनॉरचा जन्म रोमानियामध्ये एका श्रीमंत कुटुंबात झाला होता. त्याचं खरं नाव होतं आर्थर मेंडेलोव्हीच. त्याच्या डोळ्यांदेखत त्याचं संपूर्ण कुटुंब – आई, वडील, धाकटी बहीण आणि दोन मोठे भाऊ – ऑशविट्झमध्ये मारलं गेलं होतं. जानेवारी १९४५ मध्ये जेव्हा सोविएत सैनिकांनी ऑशविट्झ मुक्त केलं, त्यावेळी तिथे उरलेल्या काही कैद्यांमध्ये तोही होता. बुखारेस्टमध्ये परत गेल्यावर त्याने आलिया बेथ या संघटनेसाठी काम करायला सुरुवात केली. मुख्य काम म्हणजे रोमानियामधल्या ज्यूंना त्यावेळी पॅलेस्टाईनचे राज्यकर्ते असणाऱ्या ब्रिटीशांची नजर चुकवून पॅलेस्टाईनमध्ये पोहोचवणं. त्यावेळी ब्रिटीशांच्या नजरेत न येण्यासाठी त्याने अमोस हे नाव घेतलं. अर्थात हे काही त्याचं एकमेव नाव नव्हतं. जेव्हा त्याची स्वतःची इझराईलला जाण्याची वेळ आली तेव्हा रोमानियन पोलिसांनी त्याला जाऊ दिलं नाही. त्यांच्या अटकेतून तो निसटला आणि एका खोट्या झेक पासपोर्टवर त्याने इझराईलमध्ये प्रवेश केला. तो १९४९ मध्ये इझराईलमध्ये आला, तेव्हा रूव्हेन शिलोह मोसादचा आणि इसेर हॅरेल शाबाकचा संचालक होते. हॅरेलनेच त्याची नेमणूक शाबाकमध्ये केली आणि नंतर १९५२ मध्ये शिलोहने राजीनामा दिल्यावर जेव्हा हॅरेल मोसादचा प्रमुख झाला तेव्हा शाबाकच्या प्रमुखपदी त्याने मॅनॉरची निवड केली.
मॅनॉरच्या अनेक जबाबदाऱ्यांमध्ये इतर मित्रदेशांच्या गुप्तचर संघटनांशी संबंध वाढवून इझराईलसाठी माहिती मिळवणं ही एक मोठी जबाबदारी होती. सी.आय.ए.चे क्रुश्चेव्हचं भाषण मिळवण्यासाठी चाललेले प्रयत्न त्याला माहित होतेच. तो आणि हॅरेल या भाषणाची प्रत घेऊन सरळ पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियनना भेटले. त्यांनाही रशियन भाषा येत होती. त्यामुळे हे भाषण किती स्फोटक आहे, हे त्यांच्या लक्षात आलं. पण या भाषणाचं करायचं काय, याबद्दल त्यांच्या मनात संभ्रम होता.
अखेरीस हॅरेलने निर्णय घेतला. सी.आय.ए. संचालक अॅलन डलेसच्या कम्युनिस्टविरोधी भावना त्याला माहित होत्याच. त्यावेळी मोसाद आणि सी.आय.ए. यांच्यात अगदी मर्यादित स्वरूपाचं सहकार्य होतं. १९५१ मध्ये अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधान बेन गुरियन तत्कालीन सी.आय.ए. संचालक वॉल्टर बेडेल स्मिथला भेटले होते, आणि त्यांनी हे सहकार्य स्थापित केलं होतं. यानुसार सोविएत रशिया किंवा इतर कम्युनिस्ट देशांमधून इझराईलमध्ये येणाऱ्या ज्यूंकडून माहिती मिळवणं आणि ती सी.आय.ए.ला देणं हे प्रमुख काम होतं. या ज्यूंमध्ये अनेक जण सैन्यात काम केलेले होते. काहीजण तंत्रज्ञ आणि अभियंते होते. त्यामुळे त्यांच्याकडून मिळणाऱ्या माहितीमुळे सी.आय.ए.ला कम्युनिस्ट देशांच्या सैन्याविषयी आणि त्यांच्या एकूण तयारीविषयी चांगला अंदाज बांधता येत होता.
पण अजूनही सी.आय.ए.च्या दृष्टीने मोसाद म्हणजे एका छोट्या देशाची फारशी महत्व न देण्याजोगी संघटना होती. हॅरेलला ही परिस्थिती बदलायची होती आणि आता तसं करण्याची संधी मिळाली होती. बेडेल स्मिथ आणि त्यावेळी राष्ट्राध्यक्ष असलेले हॅरी ट्रुमन यांचं रशियाविषयी असलेलं धोरण हे अगदी बोटचेपं जरी नसलं, तरी ते तेवढं आक्रमकही नव्हतं. पण नंतर राष्ट्राध्यक्ष झालेले ड्वाइट आयझेनहॉवर आणि सी.आय.ए. संचालक अॅलन डलेस हे वेगळेच होते. आयझेनहॉवर दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांच्या युरोपमधल्या सेनांचे सरसेनापती होते. त्यावेळी पूर्व युरोपियन देशांना सोविएत तावडीतून वाचवण्यासाठी दोस्त राष्ट्रांच्या सेनांनी जर्मनीच्या पूर्व भागात चढाई करणं गरजेचं आहे, असं त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असलेल्या रूझवेल्टना निक्षून सांगितलं होतं. त्यांना ब्रिटनचे पंतप्रधान चर्चिल यांचाही पाठिंबा होता. पण स्टॅलिनला दुखवायला तयार नसलेल्या रूझवेल्टनी त्यांचं ऐकलं नाही आणि त्यामुळे पूर्व युरोप सोविएत टाचांखाली आला. याचा राग आयझेनहॉवर यांच्या मनात होताच. म्हणून तर त्यांनी अध्यक्षपदाची निवडणूक रूझवेल्ट यांच्या विरोधी असलेल्या रिपब्लिकन पक्षातर्फे लढवली होती. डलेसचा कम्युनिस्ट द्वेष तर प्रसिद्ध होताच.
या सगळ्या पार्श्वभूमीचा वापर आपल्याला मोसादची प्रतिमा उंचावण्यासाठी करून घेता येईल याची हॅरेलला खात्री होती. त्यामुळे मोसादने सी.आय.ए.च्या तेल अवीवमधल्या प्रतिनिधीला काहीही न सांगता या भाषणाची अजून एक प्रत मोसादचा वॉशिंग्टन डी.सी. मधला प्रतिनिधी असलेल्या इझ्झी दोरोतला पाठवली. दोरोतने ती सी.आय.ए.मधल्या प्रतिहेरखात्याचा प्रमुख जेम्स अँगलटनला दिली. १७ एप्रिल १९५६ या दिवशी सी.आय.ए. संचालक डलेस आणि राष्ट्राध्यक्ष आयझेनहॉवर यांनी ती पाहिली.
सी.आय.ए.मधल्या दुढ्ढाचार्यांना इझराईलसारख्या एका ‘ छोट्या ‘ देशाच्या, त्यांच्या एखाद्या डिपार्टमेंटएवढं बजेट असणाऱ्या मोसादने तोंडात बोटं घालायला लावली होती. अर्थात हे भाषण मोसादकडे येण्यात मोसादचं काहीच कर्तृत्व नव्हतं, पण त्यांनी त्या संधीचा वापर फार हुशारीने करून घेतला, हेही तितकंच खरं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे मोसादची प्रतिमा इतर मित्र देशांच्या गुप्तचर संस्थांमध्ये प्रचंड प्रमाणात उंचावली.
सी.आय.ए.ने तरीही हे भाषण सरळसरळ स्वीकारलं नाही. त्यांनी आपल्या अनेक सूत्रांकडून त्याच्या सत्यतेची खात्री करून घेतली आणि मग ५ जून १९५६ या दिवशी न्यूयॉर्क टाईम्सच्या पहिल्या पानावर हे भाषण छापलं गेलं. अपेक्षेप्रमाणेच त्याच्यामुळे कम्युनिस्ट जगात आणि जिथे जिथे कम्युनिस्ट प्रभावशाली होते, तिथे राजकीय भूकंप झाला. सोविएत युनियन, स्टॅलिन आणि एकूणच कम्युनिस्ट विचारसरणी यांच्यापासून अनेक लोकांनी फारकत घ्यायला, निदान आंधळा विश्वास न ठेवता प्रश्न विचारायला सुरुवात केली. अनेक इतिहासकारांच्या मते पोलंड आणि हंगेरी इथे १९५६ च्या शेवटी झालेले सोविएतविरोधी उठाव आणि नंतर १९६८ मध्ये झेकोस्लोव्हाकियामध्ये झालेलं सोविएतविरोधी आंदोलन यांच्यामागे या भाषणाच्या प्रकाशित होण्याचा बराच हात होता. प्रत्यक्षात सोविएत युनियनचं पतन अजून ३५ वर्षांनी, १९९१ मध्ये झालेलं असलं, तरी इतिहासकारांच्या मते १९५६ मध्ये क्रुश्चेव्हने केलेल्या भाषणाने त्याची अंशतः सुरुवात झाली होती. मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी स्वतःवरचा या भाषणाचा प्रभाव एका मुलाखतीत मान्य केला होताच.
इकडे वॉर्सामध्ये व्हिक्टरला पोलंड सोडून इझराईलला जाण्याची परवानगी मिळाली. त्याने एप्रिल १९५६ मध्ये अर्ज केला होता, आणि त्याला जानेवारी १९५७ मध्ये, बरीच लवकर ही परवानगी मिळाली. याच्यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे, कुणीतरी चक्रं फिरवलेली आहेत, आणि हे कुणीतरी मोसाद असण्याची शक्यता फार कमी आहे अशी व्हिक्टरची अटकळ होती. ती फार मजेशीररीत्या खरी ठरली.
इझराईलमध्ये आल्यावर व्हिक्टरला अमोस मॅनॉरच्या शिफारशीने परराष्ट्र खात्यात नोकरी मिळाली. त्यानंतर त्याला कोल इझराईल या इझराईलच्या सरकारी आकाशवाणीमध्ये पोलिश भाषेतल्या कार्यक्रमांचा निर्माता म्हणूनही काम मिळालं. या दोन नोकऱ्या व्हिक्टरच्या दिवसाचा बराचसा वेळ घेत होत्या. तेवढ्यात त्याला एक तिसरं – काहीसं अपेक्षित, बरंचसं अनपेक्षित – असं काम मिळालं.
इझराईलमध्ये अगदी सुरुवातीपासून ज्यूंच्या हिब्रू भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न चालू होते. अनेक ज्यू नागरिकांना हिब्रू भाषा येत नसे. त्यांच्यासाठी उल्पान ही हिब्रू भाषा शिकवणारी संस्था होती. ती कागदोपत्री जरी इझराईलच्या शिक्षण खात्याने चालू केली होती, तरी तिच्या शिक्षकवर्गापैकी निम्मे तरी लोक मोसादमध्ये काम करायचे. त्याचं एक कारण म्हणजे इथे हिब्रू शिकायला येणाऱ्या लोकांमध्ये रशियन आणि इतर पूर्व युरोपियन लोकांचा समावेश होता. व्हिक्टर इथे विद्यार्थी म्हणून हिब्रू भाषा शिकत होता.
एक दिवस, तास संपल्यावर तेल अवीवच्या गजबजलेल्या रस्त्यावर व्हिक्टरला एका सहाध्यायी विद्यार्थ्याने गाठलं. तो रशियन वकिलातीत काम करत होता. त्याने व्हिक्टरला त्याच्या कम्युनिस्ट भूतकाळाची आठवण करून दिली आणि भेटीच्या शेवटी केजीबीसाठी हेरगिरी करायची ऑफर दिली. व्हिक्टरला आता आपल्या अर्जावर एवढं लवकर काम कसं झालं, हे समजलं. त्याला इझराईलला पाठवण्यामागे केजीबीचा हात होता.
लगेचच हो न म्हणता व्हिक्टरने थोडी मुदत मागून घेतली आणि अमोस मॅनॉरशी संपर्क साधला. ही सगळी घटना ऐकल्यावर मॅनॉरला हसू आवरेना. “ वा वा ! हो म्हणून सांग त्याला !” कसंबसं स्वतःला सावरत तो म्हणाला. व्हिक्टरने त्या सहाध्यायी विद्यार्थ्याला दोन दिवसांनी होकार कळवला आणि मोसादच्या, किंबहुना हेरगिरीच्या इतिहासातल्या एका सर्वात यशस्वी डबल एजंटच्या कामगिरीला सुरुवात झाली.
अत्यंत काळजीपूर्वक मोसादच्या लोकांनी बनवलेली माहिती व्हिक्टर केजीबीच्या हेरांच्या हातात देत असे. त्याच्याकडून माहिती घेणारे केजीबी हेर त्याला इझराईलमधल्या इतर शहरांतसुद्धा बोलवत असत आणि व्हिक्टर विनातक्रार जात असे. त्याचे केजीबीमधले मित्र त्याला शक्यतो गर्दीच्या ठिकाणी भेटत असत. त्या गर्दीमध्ये बहुसंख्य लोक हे मोसादचे एजंट्स असायचे हे मात्र केजीबीला पुढची अनेक वर्षे समजलं नाही. व्हिक्टरकडून मिळणारी माहिती खोटी, मुद्दामहून मसाला घातलेली किंवा सरळसरळ बनावट असू शकेल अशी पुसटशीसुद्धा शक्यता केजीबीच्या लोकांना आली नाही. एकदाही त्यांनी त्याने पाठवलेल्या माहितीबद्दल शंका घेतली नाही.
एकच अपवाद म्हणजे १९६७ मध्ये इझराईल आणि इतर अरब देशांमध्ये झडलेल्या ‘ ६ दिवसांच्या युद्धाच्या ‘ वेळचा. त्यावेळी व्हिक्टरने पाठवलेल्या माहितीकडे केजीबीने दुर्लक्ष केलं. सर्वात मजेची गोष्ट ही, की नेमकी याच वेळी व्हिक्टरने अगदी खरी माहिती पाठवलेली होती.
![]()
त्यावेळी, इझराईल आणि इजिप्त एकमेकांची ताकद आजमावत होते. इजिप्तचा
राष्ट्राध्यक्ष गमाल अब्दुल नासरचा इझराईल सीरियावर मे महिन्यात हल्ला करेल
असा अंदाज होता. सीरिया म्हणजे इझराईलच्या ईशान्येला. परिणामी इझराईलची
दक्षिण सीमा म्हणजे नेगेव्ह वाळवंट कमजोर होईल आणि तिथून आपल्याला हल्ला
करता येईल अशी खूणगाठ बांधून नासरने नेगेव्हच्या जवळ असलेल्या सिनाई
द्वीपकल्पात (आशिया आणि आफ्रिका यांना जोडणारा त्रिकोणी प्रदेश) सैन्य
जमवायला सुरुवात केली, तिथे असलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या
शांतीसैनिकांना हाकलून दिलं, तांबड्या समुद्रातून इझरेली जहाजांना जायला
मनाई केली आणि इझराईलला आव्हान दिलं. इकडे इझराईलचा इजिप्तशी युद्ध
करण्याचा काहीही इरादा नव्हता. त्यावेळी पंतप्रधान असलेल्या लेव्ही एश्कोल
यांनी मोसादला सोविएत रशियाला इझराईलचा हेतू कळवायची सूचना केली. त्यावेळी
सोविएत रशिया आणि इजिप्त हे एकमेकांचे अगदी घनिष्ठ मित्र होते. इजिप्तच्या
सैनिकांकडे असलेल्या बंदुका, त्यातल्या गोळ्या, विमानं, रणगाडे वगैरे सगळी
मदत ही रशियाने दिलेली होती. त्यामुळे जर रशियाला इझराईलची भूमिका पटली, तर
रशिया इजिप्तवर दबाव आणेल, अशी पंतप्रधान एश्कोलना खात्री वाटत होती. हीच
माहिती व्हिक्टरने त्याच्या केजीबीमधल्या ‘ मित्रांना ‘ कळवली होती.
पण सोविएत नेत्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि नासरला थांबवण्याऐवजी त्याला अजून उकसवायला सुरुवात केली.
इजिप्तची सिनाईमधून नेगेव्हमध्ये घुसखोरी करण्याची योजना आहे, हे लक्षात येताच इझराईलने इजिप्तवर प्रतिहल्ला चढवला आणि अवघ्या सहा दिवसांत इजिप्त, सीरिया आणि जॉर्डन या तिन्ही देशांच्या सैन्यदलांना गुडघे टेकायला भाग पाडलं. दक्षिणेला सिनाई, ईशान्येला गोलन टेकड्या आणि पूर्वेला जेरुसलेम इथपर्यंत इझराईलच्या सीमा विस्तारल्या. सर्वात महत्वाचं म्हणजे सोविएत शस्त्रास्त्रं इझरेली सैनिकांनी आणि वैमानिकांनी कुचकामी ठरवली. त्यामुळे इजिप्त आणि सीरिया यांचे रशियाबरोबर असलेले संबंध बिघडले आणि मध्यपूर्व आशिया आणि उत्तर आफ्रिकेत रशिया पाय रोवू शकेल ही अमेरिकेची भीती दूर झाली.
इकडे व्हिक्टर ग्रेव्ह्स्कीवर याचा अगदी उलट परिणाम झाला. त्याने दिलेली माहिती खरी असल्याचं जेव्हा केजीबीच्या लक्षात आलं, तेव्हा त्यांनी त्याचा सत्कार करायचं ठरवलं. इझराईलच्या मध्य भागात असलेल्या एका अभयारण्यात तो त्याच्या केजीबी कंट्रोलरला भेटला. या कंट्रोलरने त्याला एका पदकाचा फोटो दाखवला. “तू जेव्हा शेवटी मॉस्कोला येशील, तेव्हा केजीबी प्रमुख स्वतः हे पदक तुला बक्षीस देतील.” तो म्हणाला.
१९७१ मध्ये व्हिक्टरने हेरगिरीमधून निवृत्ती स्वीकारली. केजीबीच्या लोकांना त्याचा हा निर्णय स्वीकारणं थोडं जड गेलं, पण व्हिक्टर आपल्या निर्णयावर ठाम होता. वयोमानामुळे आता हे झेपत नाही असं कारण त्याने केजीबीला सांगितलं. निवृत्तीनंतर तो मोसादसाठी भाषांतर आणि विश्लेषण हे काम करत होता.
केजीबीच्या पदकाच्या प्रसंगानंतर ४० वर्षांनी – २००७ मध्ये शाबाकचा तत्कालीन प्रमुख युवाल दिस्किनच्या हस्ते व्हिक्टर ग्रेव्ह्स्कीचा त्याने केलेल्या इझराईलच्या सेवेबद्दल गौरव करण्यात आला. त्यावेळी केलेल्या भाषणात व्हिक्टरने केजीबीच्या या पदकाचा उल्लेख केला तेव्हा श्रोत्यांना हसू आवरलं नाही.
स्वदेश आणि शत्रूदेश अशा दोघांनी जबरदस्त कामगिरीसाठी पदक देऊन गौरव केलेला व्हिक्टर ग्रेव्ह्स्की हा बहुधा जगातला एकमेव हेर असावा.
क्रमशः
संदर्भ -
Mossad - The Greatest Missions of the Israeli Secret Service -
by Michael Bar Zohar & Nissim Mishal
The History of Mossad - by Antonella Colonna Vilasi
Gideon's Spies - by Gordon Thomas
मोसाद - भाग ४
३ जानेवारी १९४६. न्यूरेम्बर्ग, जर्मनी. सगळ्या जगाला एका फटक्यात बदलून टाकणारं दुसरं महायुद्ध संपुष्टात आलं होतं. संहार, व्याप्ती, क्रौर्य या सगळ्याच बाबतीत एकमेवाद्वितीय असलेल्या या युद्धानंतर तशीच एक अभूतपूर्व घटना घडली होती. अमेरिका, रशिया, ब्रिटन आणि फ्रान्स या विजेत्या राष्ट्रांनी नाझी जर्मनीच्या नेत्यांवर त्यांनी युद्धापूर्वी आणि युद्धादरम्यान केलेल्या अत्याचारांबद्दल खटला भरला होता. ११ उच्चपदस्थ नाझी अधिकारी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे होते. २० नोव्हेंबर १९४५ या दिवशी हा खटला सुरु झाला आणि आता नाताळच्या सुट्टीनंतर न्यायालयाचं कामकाज परत सुरु झालं होतं. न्यायमूर्ती फ्रान्सिस बिडल यांच्यासमोर सरकारी पक्षाचा साक्षीदार म्हणून डिटर विस्लीसेनी नावाचा एक एस.एस. अधिकारी उभा होता. स्लोव्हाकिया आणि हंगेरी इथून ज्यूंना पोलंडमधल्या ऑशविट्झ मृत्युछावणीपर्यंत पोहोचवणं ही त्याच्याकडे असलेली जबाबदारी होती. प्रॉसिक्युटर रॉबर्ट जॅक्सन त्याला प्रश्न विचारत होते. बोलता बोलता विस्लीसेनी म्हणाला, की त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणावर ज्यूंना पाठवण्याचा हा जो आदेश आलेला होता, त्याच्या सत्यतेबद्दल शंका होती. तेव्हा त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने त्याला एस.एस. प्रमुख हाइनरिक हिमलरने सही केलेलं एक पत्र दाखवलं. या पत्रात असं स्पष्टपणे लिहिलेलं होतं: फ्युहररने ज्यूंच्या प्रश्नाचं अंतिम उत्तर (जर्मन भाषेत Endlosung der Judenfrage, इंग्लिश भाषेत Final Solution of the Jewish Question) कार्यान्वित करण्याचा आदेश दिलेला आहे. यावर जॅक्सनचा प्रतिप्रश्न होता: अंतिम उत्तर या शब्दांचा अर्थ तुम्हाला तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितला होता का? त्यावर विस्लीसेनीने होकारार्थी उत्तर दिलं: युरोपातील सर्व ज्यू वंशीयांचा योजनाबद्ध संहार.
विस्लीसेनी पुढे हेही म्हणाला: “ या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे संपूर्ण युरोपातून येणाऱ्या ज्यूंना वेगवेगळ्या मृत्यूछावण्यांमध्ये पाठवण्याची जबाबदारी होती. जेव्हा मी त्याला या अंतिम उत्तराची व्याप्ती विचारली, तेव्हा त्याने मला थंडपणे असं सांगितलं – ‘ मी जेव्हा मरेन तेव्हा अत्यंत समाधानाने मरेन कारण ६० लाख ज्यूंच्या मृत्यूची जबाबदारी माझ्या डोक्यावर असेल. त्यामुळे अगदी हसत हसत मी माझ्या थडग्यात प्रवेश करेन.’ ”
हे ऐकून संपूर्ण न्यायालय सुन्न होऊन गेलं. जॅक्सनने विस्लीसेनीला या वरिष्ठ अधिकाऱ्याचं नाव विचारलं. त्याने उत्तर दिलं – अॅडॉल्फ आइकमन!
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
या घटनेनंतर तब्बल ११ वर्षांनी मोसाद संचालक इसेर हॅरेलला इझराईलच्या पश्चिम जर्मनीमधल्या वकिलातीकडून एक अजब संदेश मिळाला. या संदेशात असं म्हटलं होतं, की पश्चिम जर्मनीमधल्या हेसे प्रांताचा अॅटर्नी जनरल डॉ. फ्रित्झ बॉवर याच्याकडे मोसादसाठी काही महत्वाची माहिती आहे आणि ती मोसादला देण्याची त्याची इच्छा आहे. हॅरेल अर्थातच बॉवरला ओळखत होता. १९३३ मध्ये हिटलर जर्मनीचा चॅन्सेलर बनल्यावर नाझींनी ज्यूंसाठी छळछावण्या उभारायला सुरुवात केली. यातली पहिली छावणी म्हणजे डाखाऊ (Dachau). इथे जे ज्यू सर्वात पहिल्यांदा पाठवण्यात आले, त्यांच्यामध्ये डॉ.बॉवरचा समावेश होता. पण तिथून त्याने सुटका करून घेतली आणि तो प्रथम डेन्मार्कला आणि तिथून स्वीडनमध्ये गेला. युद्ध संपल्यावर जर्मनीमध्ये परत आल्यावर त्याची राजकीय कारकीर्द सुरु झाली. डॉ.बॉवरसाठी राजकारणात पडण्याचा एकमेव हेतू होता नाझी गुन्हेगारांना लोकांसमोर आणून त्यांच्यावर खटले भरून त्यांना त्यांच्या गुन्ह्यांप्रमाणे शिक्षा होईल अशी व्यवस्था करणं. या कमी पश्चिम जर्मन सरकार कमी पडतंय अशी त्याची तक्रार होती, जी काही प्रमाणात खरीही होती. त्याचं मुख्य कारण म्हणजे जर्मन जनतेला आणि सरकारलाही आपला काळा भूतकाळ परत परत उगाळायची इच्छा नव्हती. दुसरं कारण म्हणजे युद्धापूर्वी आणि युद्धादरम्यान नाझी पक्ष किंवा एस.एस. किंवा दोन्हींचे सभासद असलेल्या पण या ना त्या कारणाने अटक न झालेल्या अनेक जणांनी योजनापूर्वक पश्चिम जर्मनीच्या केंद्रीय आणि प्रांतिक सरकारांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी शिरकाव केलेला होता. काही जण तर मंत्रिपदापर्यंत पोहोचले होते. पोलिस, सरकारी वकिलांचं ऑफिस, अंतर्गत सुरक्षा मंत्रालय – अशा अनेक ठिकाणी या पूर्वाश्रमीच्या नाझींनी जम बसवलेला होता. त्यामुळे पश्चिम जर्मनीमध्ये एखाद्या नाझी गुन्हेगारावर खटला भरून त्याला शिक्षा होणं ही खूप कठीण गोष्ट होती. याच कारणामुळे बॉवरची त्याच्याकडे असलेली माहिती पश्चिम जर्मन सरकारला देण्याची इच्छा नव्हती.
१९५७ च्या नोव्हेंबरमध्ये हॅरेलने शॉल दारोम नावाच्या एका मोसाद एजंटला डॉ.बॉवरला भेटण्यासाठी म्हणून जर्मनीला पाठवलं. तो आणि बॉवर फ्रँकफर्टमध्ये भेटले. तिथून परत आल्यावर दारोम हॅरेलला भेटला आणि त्याने बॉम्ब टाकला – डॉ.बॉवरच्या मते आइकमन जिवंत आहे आणि सध्या अर्जेन्टिनामध्ये दडून बसलेला आहे.
हॅरेलने त्याच्याकडे रोखून पाहिलं. अॅडॉल्फ आइकमन कोण आहे आणि कशा प्रकारे ५० ते ६० लाख पूर्व आणि पश्चिम युरोपियन ज्यूंच्या मृत्युला तो जबाबदार आहे, हे त्याला अगदी व्यवस्थित माहित होतं. युद्धानंतर आइकमन मरण पावला असा एक प्रवाद होता. काही जणांच्या म्हणण्यानुसार तो इजिप्त किंवा सीरियामध्ये होता. जगद्विख्यात नाझी शिकारी सायमन विझेन्थालच्या मते आइकमन दक्षिण अमेरिकेत होता. विझेन्थालने आइकमनच्या उर्वरित कुटुंबावर पाळत ठेवली होती. १९५२ मध्ये त्याचं कुटुंब ऑस्ट्रियामधून अचानक गायब झालं. त्यानंतर विझेन्थालने ते दक्षिण अमेरिकेमध्ये गेल्याचं शोधून काढलं होतं. पण नक्की कुठे हे त्यालाही माहित नव्हतं. आणि आता डॉ.बॉवरच्या मते आइकमन अर्जेन्टिनामध्ये होता.
दारोमने डॉ.बॉवरकडे ही बातमी कशी आली, ते हॅरेलला सांगितलं. काही
महिन्यांपूर्वी डॉ.बॉवरला एक पत्र मिळालं होतं. लोथार हरमान नावाच्या एका
माणसाने हे पाठवलं होतं. हरमानचे वडील ज्यू होते. नाझी जर्मनीमध्ये अशा
लोकांनाही ज्यू म्हणूनच मानण्याचा कायदा असल्यामुळे हरमानचाही नाझींकडून छळ
झाला होता. युद्धानंतर तो त्याची पत्नी आणि तरुण, सुस्वरूप मुलीबरोबर
अर्जेन्टिनामध्ये स्थायिक झाला होता. या मुलीचं नाव होतं सिल्व्हिया.
एका डेटिंग एजन्सीमार्फत सिल्व्हियाला एका तरुणाचं नाव आणि पत्ता मिळाला
होता. त्याला भेटून आल्यावर तिने आपल्या वडिलांना त्याचं नाव सांगितलं –
निक आइकमन. हरमानला आश्चर्याचा धक्का बसला. हा मुलगा अॅडॉल्फ आइकमनशी
संबंधित असू शकेल अशी शंका त्याच्या मनात आली आणि त्याने डॉ.बॉवरला पत्र
पाठवलं.
सायमन विझेन्थालकडून आइकमनचं कुटुंब ऑस्ट्रियाहून दक्षिण अमेरिकेत पळून
गेल्याचं डॉ.बॉवरला समजलं होतंच. आपले अधिकार आणि ओळखी वापरून डॉ.बॉवरने हे
शोधून काढलं, की आइकमनची पत्नी व्हेरा आणि तिची तीन मुलं ऑस्ट्रियाहून
अर्जेन्टिनाला पळून गेली आणि तिथे व्हेराने दुसरं लग्न केलं. हरमानच्या
पत्रामुळे ते अर्जेन्टिनामध्ये कुठे आहेत, त्याची कल्पना बॉवरला आली होती –
ब्युनोस आयर्स. अर्जेन्टिनाची राजधानी. व्हेरा अचानक ऑस्ट्रियामधून
मुलांसकट पळून गेली, कारण आइकमनने तिच्याशी संपर्क साधला असणार आणि तिथे
जाऊन तिने दुसरं लग्न वगैरे काहीही न करता दुसऱ्या नावाने राहात असलेल्या
आइकमनशी लग्न केलं असणार असा डॉ.बॉवरचा अंदाज होता.
ही माहिती जर आपण पश्चिम जर्मन सरकारला दिली, तर त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही, अशी सार्थ भीती डॉ.बॉवरला वाटत होती. शिवाय महायुद्ध संपल्यावर अनेक नाझी अर्जेन्टिनामध्ये स्थायिक झाले होते, आणि तिथल्या सरकारी विभागांमध्ये नोकऱ्या करत होते. त्यामुळे जरी पश्चिम जर्मन सरकारने अर्जेंटिनियन सरकारशी संपर्क साधून आइकमनच्या अटकेची आणि प्रत्यार्पणाची मागणी केली, तरी अर्जेन्टिनामधून त्याची अंमलबजावणी होईलच याची काही खात्री नव्हती. सर्वात वाईट म्हणजे जर आइकमनला कोणी त्याच्या मागावर असल्याची बातमी दिली, तर तो पुन्हा एकदा गायब होईल आणि मग त्याला पकडण्याची संधी परत येऊ शकणार नाही ही शक्यताही होतीच.
त्यामुळे बॉवरला ही कामगिरी इझराईलने, पर्यायाने मोसादने पार पाडावी असं वाटत होतं. ब्युनोस आयर्समधला हा माणूस खरोखर आइकमन आहे की नाही हे शोधून काढणं आणि जर तो आइकमन असेल, तर इझराईलने त्याच्या प्रत्यार्पणाची अर्जेन्टिनाकडे मागणी करणं किंवा आइकमनला तिथून उचलून इझराईलमध्ये आणणं आणि त्याच्यावर खटला भरणं – हे करावं, नव्हे, करायलाच पाहिजे, असं डॉ.बॉवरला वाटत होतं. अर्थात, बॉवर त्याच्या वैयक्तिक अधिकाराने हे बोलत होता. पश्चिम जर्मनीमधल्या एका प्रांताचा अॅटर्नी जनरल म्हणून नव्हे. तो मोसादच्या प्रतिनिधीला भेटतोय, हे फक्त हेसे प्रांताचा प्रेसिडेंट जॉर्ज ऑगस्ट झिन यालाच माहित होतं, आणि ते तसंच राहावं अशी बॉवरची इच्छा होती.
हॅरेलला ही माहिती दिल्यावर दारोमने त्याच्यासमोर एक कागद ठेवला. या
कागदावर आइकमनचा ब्युनोस आयर्समधला संभाव्य पत्ता लिहिला होता – ४२६१,
चकाब्युको स्ट्रीट, ओलीव्होस, ब्युनोस आयर्स.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
१९५८ च्या जानेवारीत मोसाद एजंट एमॅन्युएल ताल्मोर ब्युनोस आयर्समध्ये आला. चकाब्युको स्ट्रीटवरून त्याने अनेक फेऱ्या मारल्या, आणि जे काही दिसलं, ते त्याला आवडलं नाही. ओलीव्होस हा ब्युनोस आयर्समधला निम्न मध्यमवर्गीय भाग होता. इथली वस्ती ही प्रामुख्याने कामगारांची होती. बैठी, बऱ्या स्थितीतल्या झोपड्या म्हणावं अशी घरं होती. ४२६१ क्रमांकाचं घरही असंच होतं. त्याच्या छोट्या आवारात ताल्मोरला एक लठ्ठ आणि विटके कपडे घातलेली स्त्री दिसली.
“हे आइकमनचं घर असेल असं मला वाटत नाही,” तेल अवीवला परतल्यावर ताल्मोर हॅरेलला म्हणाला, “आइकमन नक्कीच भरपूर पैसे घेऊन अर्जेन्टिनामध्ये आला असणार. जवळपास सगळ्या नाझी आणि एस.एस. अधिकाऱ्यांनी १९४४ मध्येच आपल्या पलायनाची तयारी सुरु केली होती. असल्या झोपडपट्टीत आइकमन राहात असेल असं मला वाटत नाही. ती बाईसुद्धा व्हेरा आइकमनसारखी दिसत नव्हती.”
सुदैवाने ताल्मोरच्या आक्षेपांना धूप न घालता हॅरेलने तपास तसाच चालू ठेवायचं ठरवलं, पण त्याला आता बॉवरला ही माहिती ज्याने दिली, त्याला भेटायची इच्छा होती. बॉवरने ताबडतोब लोथार हरमानची माहिती दिली. हरमान आणि त्याचं कुटुंब आता ब्युनोस आयर्सपासून ३०० मैल दूर असलेल्या कोरोनेल सुआरेझ या शहरात राहात होते.
फेब्रुवारी १९५८ मध्ये एफ्राइम हॉफस्टेटर कोरोनेल सुआरेझमध्ये जाऊन लोथार हरमान आणि त्याची मुलगी सिल्व्हिया या दोघांना भेटला. हॉफस्टेटर मोसादचा एजंट नव्हता, तर तेल अवीवचा पोलिसप्रमुख होता. पोलिसांची आंतरराष्ट्रीय संघटना इंटरपोलची एक कॉन्फरन्स त्यावेळी ब्युनोस आयर्समध्ये होती. हॉफस्टेटर त्याच्यासाठी आला होता, आणि त्याने मोसादसाठी एवढं एक काम करायचं कबूल केलं होतं.
लोथार हरमान आंधळा होता. नाझी सत्तेवर आले, तेव्हा तो एक पोलिस अधिकारी होता, पण नाझींच्या ज्यूंना जर्मनीमधल्या सार्वजनिक जीवनातून हद्दपार करण्याच्या धोरणामुळे त्याची नोकरी गेली आणि त्याला डाखाऊ छळछावणीत टाकण्यात आलं. तिथे त्याची दृष्टी गेली. युद्धानंतर त्याची सुटका झाली आणि मग तो आपल्या पत्नी आणि मुलीबरोबर अर्जेन्टिनामध्ये आला.
त्याने हॉफस्टेटरची आपल्या मुलीशी ओळख करून दिली आणि तिने आता पुढची गोष्ट सांगायला सुरुवात केली.
जवळजवळ दीड वर्षांपूर्वी ती आणि तिचं कुटुंब ब्युनोस आयर्सच्या ओलीव्होस
भागात राहात होतं. तिथे तिची आणि निक आइकमनची भेट झाली होती. दोघेही एकत्र
फिरायला जात असत. तिने आपण ज्यू आहोत हे त्याला सांगितलं नव्हतं, पण
निकच्या मनात ज्यूंबद्दल असलेले विचार तिच्या लक्षात आले होते. एकदा असंच
बोलताना तो म्हणाला होता, की जर्मनांनी ज्यूंचा पूर्ण निकाल लावून मगच
शरणागती पत्करायला हवी होती. नंतर एकदा त्याने त्याच्या वडिलांनी दुसऱ्या
महायुद्धात जर्मन सैन्यातले अधिकारी म्हणून काम केल्याचं आणि जर्मनीप्रती
आपलं कर्तव्य पार पाडल्याचं सांगितलं होतं.
निक आणि सिल्व्हिया इतके वेळा भेटले होते, पण त्याने एकदाही तिला त्याच्या घरी बोलावलं नव्हतं. ती ब्युनोस आयर्स सोडून कोरोनेल सुआरेझला राहायला गेल्यावरही त्यांचा पत्रव्यवहार होता, पण तिची पत्रं तो स्वतःच्या घराच्या पत्त्यावर स्वीकारत नव्हता. तिला तिची पत्रं निकच्या एका मित्राच्या पत्त्यावर पाठवावी लागत.
निकच्या या विचित्र वागण्यामुळे लोथार हरमानला संशय आला आणि त्याने सिल्व्हियाबरोबर ब्युनोस आयर्सला जाऊन याचा छडा लावायचं ठरवलं. तिथे तिने काही मित्रांकडून निकचा पत्ता शोधून काढला आणि ती त्याच्या घरी गेली. निक घरी नव्हता, पण तिचं स्वागत एका चष्मा घातलेल्या, टक्कल पडलेल्या आणि बारीक मिशी असलेल्या माणसाने केलं. त्याने तिला निक त्याचा मुलगा असल्याचं सांगितलं.
हरमानची परत एकदा ब्युनोस आयर्सला जाऊन तो माणूस नक्की कोण आहे, ते शोधून काढायची तयारी होती. सिल्व्हियाही त्याच्याबरोबर असणार होती. हॉफस्टेटरने त्याला शोधून काढायच्या गोष्टींची यादी दिली – त्या माणसाचा फोटो, सध्याचं नाव, कुठे काम करतो तो पत्ता, एखादं अधिकृत कागदपत्र आणि त्याचे बोटांचे ठसे.
काही महिन्यानंतर हरमानचा रिपोर्ट मोसाद हेडक्वार्टर्समध्ये आला. त्याच्यात त्याने आपण आइकमनबद्दल सगळं शोधून काढल्याचं म्हटलं होतं. चकाब्युको स्ट्रीटवरचं ते घर फ्रान्सिस्को श्मिड नावाच्या एका ऑस्ट्रियन माणसाने दहा वर्षांपूर्वी बांधलं होतं आणि दोन कुटुंबांना भाड्याने दिलं होतं – दागुतो आणि क्लेमेंट. हरमानने श्मिड हाच आइकमन असल्याचं ठासून सांगितलं होतं. त्याच्या मते दागुतो आणि क्लेमेंट ही दोन्ही नावं म्हणजे आइकमनची खरी ओळख लपवण्याचा प्रयत्न होता.
हॅरेलने मोसादच्या ब्युनोस आयर्समधल्या प्रतिनिधीला या माहितीची शहानिशा करून घ्यायला सांगितलं. काही दिवसांनी या प्रतिनिधीने त्याला कळवलं – फ्रान्सिस्को श्मिड हा आइकमन असल्याचा कुठलाही पुरावा नाही. तो चकाब्युको स्ट्रीटवरच्या घरात याआधी कधीही राहिलेला नाही.
हॅरेलने यावरून लोथार हरमान विश्वासार्ह नसल्याचा निष्कर्ष काढला आणि हे शोधकार्य थांबवलं.
हॅरेलचा हा निर्णय म्हणजे एक मोठी चूक होती पण हे त्याला तेव्हा समजलं
नाही. दीड वर्षांनी, जानेवारी १९६० मध्ये जेव्हा डॉ.फ्रित्झ बॉवर इझराईलला
आला, तेव्हा तो प्रचंड संतापलेला होता. त्याला हॅरेलचं तोंड पाहण्याचीही
इच्छा नव्हती. त्याने आपली तक्रार सरळ पंतप्रधान बेन गुरियनकडे नेली आणि
इझराईलला जर एका नाझी युद्धगुन्हेगाराला पकडण्याच्या संधीचा फायदा घेण्याची
इच्छा नसेल, तर आपल्याला हे प्रकरण पश्चिम जर्मनीच्या सरकारकडे द्यावं
लागेल, अशी धमकी दिली. बेन गुरियननी इझराईलचा अॅटर्नी जनरल हाईम कोहेनला या
प्रकरणात लक्ष घालायची विनंती केली, आणि कोहेनच्या ऑफिसमध्ये बॉवर आणि
हॅरेल समोरासमोर आले. बॉवरने हॅरेलवर हे सगळं शोधकार्य अत्यंत बालिशपणे,
अव्यावसायिक रीत्या आणि पुरेशा गांभीर्याने न हाताळल्याचा आरोप केला. हॅरेल
निर्विकार चेहऱ्याने सगळं ऐकून घेत होता. बॉवरने बोलता बोलता सांगितलेल्या
एका माहितीवर तो चमकला आणि त्याने बॉवरला तो मुद्दा परत सांगायची विनंती
केली. तो मुद्दा होता आइकमनच्या अर्जेन्टिनामधल्या नावाचा. हे नाव होतं
रिकार्डो क्लेमेंट.
एका क्षणात हॅरेलला आपली चूक लक्षात आली. चकाब्युको स्ट्रीटवर असलेल्या
त्या घराचा मालक जरी फ्रान्सिस्को श्मिड असला, तरी तिथे दोन भाडेकरू होते,
असं हरमानने सांगितलं होतं. त्यातल्या एकाचं नाव क्लेमेंट होतं, हेही
त्याने शोधून काढलं होतं. याचा अर्थ आइकमन त्या घराचा मालक नव्हता, निदान
कागदोपत्री तरी. तो तिकडे भाडेकरू म्हणून राहात होता. हरमानला आइकमनने
रिकार्डो क्लेमेंट हे नाव घेतलेलं माहित नव्हतं आणि त्याने श्मिड हा आइकमन
असावा असा निष्कर्ष काढला होता, जो चुकीचा निघाल्यावर हॅरेलने सगळा तपास
थांबवला होता.
हॅरेलने आपली चूक मान्य केली आणि हा तपास पुन्हा चालू करण्याचं आश्वासन
दिलं. एवढंच करून तो थांबला नाही तर त्याने शाबाकचा एक अत्यंत हुशार एजंट
झ्वी आहारोनीला आइकमनबद्दलच्या माहितीची शहानिशा करून घेण्यासाठी ब्युनोस
आयर्सला पाठवलं.
फेब्रुवारी १९६० मध्ये आहारोनी ब्युनोस आयर्समध्ये उतरला आणि त्याने चकाब्युको स्ट्रीटवरच्या त्या घराबद्दल एका स्थानिक ज्यू इस्टेट एजंटकडून माहिती काढली. सध्या त्या घरात कोणीही राहात नव्हतं. घराचे दोन भाग होते. दोन्हीही सध्या रिकामे होते, आणि क्लेमेंट कुटुंब जिथे राहात होतं, त्या भागाची सध्या रंगरंगोटी आणि साफसफाई चालू होती आणि बरेच रंगारी, गवंडी आणि इतर कामगार तिकडे काम करत होते. क्लेमेंट कुटुंब दुसरीकडे कुठेतरी राहायला गेलं होतं, पण नक्की कुठे ते माहित नव्हतं.
मार्च १९६० च्या सुरुवातीला कुरियर कंपनीच्या गणवेशातला एक तरुण चकाब्युको स्ट्रीटवरच्या या घरी आला. त्याच्या हातात निकोलस क्लेमेंटसाठी एक एकदम भारी सिगरेट केस आणि लायटर या भेटवस्तू होत्या. दोन्हीही अगदी छान पॅक केलेल्या होत्या. निकोलस क्लेमेंटला ओळखणाऱ्या पण स्वतःची ओळख न देऊ इच्छिणाऱ्या एका मुलीने ही भेट त्याच्या वाढदिवसानिमित्त पाठवलेली होती.
या कुरियरवाल्या तरुणाने क्लेमेंट कुटुंब राहात असलेल्या भागात जाऊन चौकशी करायला सुरुवात केली. पण तिथे काम करणाऱ्या कामगारांना त्याबद्दल काहीही माहित नव्हतं. त्यांच्यापैकी एकाला निकोलस क्लेमेंटचा भाऊ जवळच कुठेतरी काम करतो आणि कधीतरी इथे देखरेख करण्यासाठी येतो एवढं माहित होतं. या माहितीवरून हा कुरियरवाला तरुण निकोलस क्लेमेंटच्या भावाच्या कामाच्या ठिकाणी गेला.
हे ठिकाण म्हणजे एक मध्यम आकाराचा कारखाना होता. या भावाचं नाव होतं डिटर. त्याच्याकडून या कुरियरवाल्याला निकोलस क्लेमेंटचा पत्ता मिळाला नाही, पण बोलण्याच्या ओघात त्याने आपले वडील थोडे दिवस तुकुमान नावाच्या एका शहरात काम करत आहेत, आणि लवकरच ते काम सोडून ब्युनोस आयर्सला परत येणार आहेत हे सांगितलं.
हा कुरियरवाला तरुण तिथून चकाब्युको स्ट्रीटवरच्या घरी गेला, आणि त्याने तिकडे त्या कामगारांसमोर सरळ रडायला सुरुवात केली. कशी त्याला या नोकरीची गरज आहे आणि ही भेटवस्तू जर पोहोचवली नाही तर कशी त्याची नोकरी जाईल आणि त्याच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी येईल याचं रसभरीत वर्णन त्याने केल्यावर त्याची दया येऊन एका कामगाराने जरा चौकशी केली आणि क्लेमेंट कुटुंबाचा नवीन पत्ता शोधून काढला, “ तू ट्रेनने सान फर्नान्डो स्टेशनला जा,” तो म्हणाला, “मग २०३ नंबरची बस पकड आणि अॅविहेन्डाच्या स्टॉपवर उतर. त्याच्या समोर एक छोटं दुकान आहे. त्या दुकानाच्या उजवीकडे, इतर घरांपासून थोडं दूर असं एक विटांचं छोटेखानी घर आहे. तिथे हे लोक सध्या राहात आहेत.”
आहारोनीला ही माहिती मिळाल्यावर त्याने आणि तिथल्या मोसाद एजंट्सनी डिटर क्लेमेंटच्या हालचालींवर नजर ठेवली. डिटरच्या मागावर असलेल्या एजंटने असं घर प्रत्यक्षात असल्याचं कळवताच आहारोनी स्वतः तिकडे जाऊन आला आणि त्याने ते घर पाहिलं. तिथे असलेल्या एका छोट्या दुकानात त्याने रस्त्याचं नाव विचारलं. “गॅरिबाल्डी स्ट्रीट.” दुकानदाराने उत्तर दिलं.
मार्चच्या मध्यावर आहारोनीने गॅरिबाल्डी स्ट्रीटला परत एकदा भेट दिली. पण यावेळी तो भपकेबाज सूट घालून फिरत होता. क्लेमेंट कुटुंबाच्या घरासमोर असलेल्या घराचा दरवाजा त्याने वाजवला. एका स्त्रीने दरवाजा उघडला. आपण एका शिवणयंत्रं बनवणाऱ्या अमेरिकन कंपनीचे प्रतिनिधी आहोत आणि या भागात आपल्याला एक फॅक्टरी चालू करायची आहे, आणि त्यासाठी म्हणून त्या भागातली काही घरं विकत घ्यायची आहेत, असं त्याने तिला सांगितलं.
तिच्याशी बोलता बोलता आहारोनी त्याच्या हातात असलेल्या छोट्या बॅगचं बटन सतत दाबत होता. पाहणाऱ्याला हा चाळा वाटला असता, पण प्रत्यक्षात तो एका छोट्या कॅमेऱ्याने क्लेमेंट कुटुंबाच्या घराचे फोटो घेत होता.
या भेटीच्या दुसऱ्या दिवशी आहारोनीने ब्युनोस आयर्स म्युनिसिपल रेकॉर्ड्समधून हे शोधून काढलं, की ज्या जमिनीवर क्लेमेंट कुटुंबाचं घर आहे, ती व्हेरा लीबल आइकमन नावाच्या स्त्रीच्या नावावर आहे. अर्जेन्टिनामधल्या पद्धतीनुसार व्हेरा आइकमनने आपलं लग्नापूर्वीचं आणि नंतरचं अशी दोन्हीही आडनावं दिली होती. याचा अर्थ तिच्या दुसऱ्या लग्नाची बातमी खोटी होती. तिने आइकमनशीच परत लग्न केलेलं होतं. या सगळ्या कागदपत्रांमध्ये रिकार्डो क्लेमेंट हे नाव मात्र कुठेही नव्हतं.
आहारोनी अनेक वेळा, वेगवेगळ्या वेशांत गॅरिबाल्डी स्ट्रीटवर गेला, पण त्याला तिथे आइकमन दिसला नाही. व्हेरा आइकमन आणि तिची मुलं होती, पण स्वतः अॅडॉल्फ आइकमन नव्हता. पण आहारोनीची थांबायची तयारी होती. त्याच्याकडे असलेल्या फाईलमध्ये २१ मार्च हा आइकमनच्या लग्नाचा वाढदिवस असल्याचं लिहिलेलं होतं. त्या दिवशी आइकमन ब्युनोस आयर्समध्ये नक्की येईल अशी आहारोनीची अटकळ होती.
२१ मार्चच्या दिवशी दुपारी आहारोनी तिथे गेला आणि इतके दिवसांची त्याची प्रतीक्षा संपली. एक मध्यम उंचीचा, बारीक चणीचा, टक्कल पडलेला माणूस घराच्या आवारात येरझाऱ्या घालत होता. त्याच्या डोळ्यांवर चष्मा होता. आहारोनीने त्याचे अनेक फोटो काढले, आणि नंतर आइकमनच्या फाईलमध्ये असलेल्या फोटोंशी ते पडताळून पाहिले आणि नंतर मोसादच्या हेडक्वार्टर्सला एक संदेश पाठवला.
२२ मार्चच्या दिवशी हॅरेल स्वतः पंतप्रधान बेन गुरियनच्या निवासस्थानी
गेला. “आइकमन अर्जेन्टिनामध्ये असल्याचा खात्रीलायकरीत्या समजलेलं आहे,” तो
म्हणाला, “माझ्या मते आपण त्याला तिथून उचलून इथे आणू शकतो.”
बेन गुरियननी ताबडतोब उत्तर दिलं, “त्याला जिवंत किंवा मृत – कसाही आण,”
आणि एक क्षणभर थांबून ते म्हणाले, “ जिवंत आणलंस तर बरं. आपल्या पुढच्या
पिढ्यांसाठी हे अत्यंत आवश्यक आहे.”
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
पंतप्रधानांकडून हिरवा कंदील मिळाल्यावर हॅरेलने कामाला सुरुवात केली. सर्वात महत्वाचं काम म्हणजे आइकमनला अर्जेन्टिनामध्ये उचलण्यासाठी आणि तिथून इझराईलमध्ये परत आणण्यासाठी टीम बनवणं. हॅरेलच्या या टीममध्ये १२ जणांचा समावेश होता:
रफी एतान – शाबाकच्या अत्यंत हुशार आणि घातकी एजंट्सपैकी एक असलेला एतान इझराईलच्या निर्मितीआधी शाईमध्ये होता. तेव्हा ब्रिटीशांच्या डोळ्यांत धूळ झोकून इतर देशांमधल्या ज्यूंना पॅलेस्टाईनमध्ये सुखरूप पोचवणं हे त्याचं काम होतं, आणि एकदाही तो पकडला गेला नव्हता. या संपूर्ण ऑपरेशनच्या प्रमुखपदी हॅरेलने त्याची निवड केली होती.
झ्वी उर्फ पीटर मॉल्किन – वेषांतर आणि अभिनय यांची आवड असलेला मॉल्किन शाबाकमधला उगवता तारा होता. तो दरवर्षी एक सोविएत एजंट पकडतो असा त्याचा लौकिक होता. त्याचं या मोहिमेवर येण्याचं वैयक्तिक कारणसुद्धा होतं. त्याचा जन्म पोलंडमधल्या ग्रास्निक लुबेल्स्की नावाच्या खेड्यात झाला होता. दुसरं महायुद्ध सुरु होताना नाझी जर्मनी आणि सोविएत रशिया यांनी पोलंडवर अनुक्रमे पश्चिमेकडून आणि पूर्वेकडून हल्ला चढवला होता. तेव्हा मॉल्किनचं गाव रशियनांच्या ताब्यात गेलं, पण त्याचे कुटुंबीय तिथून पॅलेस्टाईनला जाण्यात यशस्वी झाले. दुर्दैवाने त्याची मोठी बहिण फ्रुमा आणि तिचं संपूर्ण कुटुंब मागे राहिलं आणि नंतर १९४१ मध्ये नाझींनी जेव्हा सोविएत रशियावर आक्रमण केलं तेव्हा त्या सर्वांची रवानगी ऑशविट्झला करण्यात आली आणि तिकडेच फ्रुमाचा आणि तिच्या लहान मुलांचा मृत्यू झाला. त्यांना तिथे पाठवणं हे अर्थातच आइकमनचं काम होतं.
अॅव्हरम शालोम – मध्यम उंचीचा, दणदणीत शरीरयष्टी असलेला शालोम हा विध्वंसक पदार्थ आणि स्फोटकं यामधला तज्ञ होता. तो पुढे शाबाकचा संचालकही झाला.
याकोव्ह गाट – इझराईलच्या निर्मितीआधी फ्रान्समध्ये राहात असलेला गाट युद्धादरम्यान फ्रेंच प्रतिकारकांच्या नाझीविरोधी मोहिमांमध्ये सक्रीय सहभागी होता.
मोशे ताव्होर – इझराईलच्या निर्मितीआधी ताव्होर ब्रिटीश सैन्यात होता, आणि त्याने टोब्रुक आणि एल अलामेन या लढायांमध्ये भाग घेतलेला होता. तो ब्रिटीश सैन्यातल्या ‘ अॅव्हेंजर्स ‘ नावाच्या गुप्त तुकडीत होता, आणि या तुकडीने युद्धानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक नाझी अधिकाऱ्यांना पकडलं आणि ठारदेखील मारलं होतं.
शालोम डॅनी – खोटी कागदपत्रं बनवण्यात उस्ताद असलेला डॅनी एक उत्कृष्ट चित्रकारही होता. त्याने टॉयलेट पेपरवर एस.एस.ची ओळखपत्रं बनवून १० जणांसह नाझी छळछावणीमधून पलायन केलं असल्याची आख्यायिका होती. (जी खरी असल्याचं नंतर सिद्ध झालं.)
एफ्राईम इलानी – इलानीला ब्युनोस आयर्स शहर अगदी तिथल्या गल्लीबोळांसकट पूर्णपणे माहित होतं. त्याला स्पॅनिश भाषाही अस्खलित रीत्या बोलता येत होती आणि तो कुठलंही कुलूप मोजून १० सेकंदांमध्ये उघडू शकत असे. शिवाय त्याचा चेहरा हा कोणाच्याही मनात विश्वास निर्माण करू शकतो असं एतान आणि हॅरेल या दोघांचं मत होतं.
येहुदिथ निसियाहू – या टीममधली एकमेव स्त्री असलेली येहुदिथ मोसादच्या सर्वश्रेष्ठ एजंट्सपैकी एक होती. एखाद्या प्रेमळ मध्यमवयीन स्त्रीप्रमाणे दिसणाऱ्या येहुदिथचाही कोणाला संशय आला नसता.
डॉ. योना एलीयान – व्यवसायाने भूलतज्ञ (anaesthetist) असलेल्या डॉ.एलीयान याची निवड करण्यामागचं कारण उघड होतं. आइकमनला इझराईलला आणायचं तर उघडपणे आणता येणारच नव्हतं, आणि तज्ञ नसलेल्या दुसऱ्या कोणी भूल दिली, तर चूक होण्याचा संभव होता. त्यामुळे डॉ.एलीयानचा समावेश अपरिहार्य होता.
झ्वी आहारोनी – आइकमनबद्दल असलेली सगळी माहिती पडताळून पाहून रिकार्डो क्लेमेंट हाच आइकमन आहे, हे सिद्ध करणाऱ्या आहारोनीचा त्या कामगिरीचं बक्षीस म्हणून या मोहिमेत समावेश करण्यात आला होता.
याकोव्ह मिदाद – इझराईलच्या निर्मितीआधी मिदाद बिटीश सैन्यात होता. त्याचंही संपूर्ण कुटुंब मृत्यूछावणीमध्ये नष्ट झालेलं होतं.
स्वतः इसेर हॅरेल – बारावा सदस्य म्हणून जेव्हा हॅरेलने स्वतःचं नाव सांगितलं, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या, पण हॅरेलच्या सहभागाचं एक अत्यंत महत्वाचं कारण म्हणजे या संपूर्ण मोहिमेत अनेक वेळा असे प्रसंग येणार होते, जेव्हा अगदी उच्च पातळीवर निर्णय घेण्याची गरज भासणार होती. अशा वेळी मोसादचा संचालक तिथे असल्यामुळे वेळ वाचला असता आणि निर्णय ताबडतोब घेता आले असते.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
एप्रिल १९६० च्या शेवटी चार एजंट्सनी वेगवेगळ्या दिशांनी अर्जेन्टिनामध्ये प्रवेश केला. त्यांनी आपल्या सामानात अनेक आवश्यक गोष्टी लपवून आणल्या होत्या. शालोम डॅनीने तर आपली जवळपास सगळी प्रयोगशाळा अर्जेन्टिनामध्ये आणली होती.
ब्युनोस आयर्समध्ये आल्यावर या चौघांनी एक फ्लॅट भाड्याने घेतला. या ठिकाणाचं सांकेतिक नाव होतं द कॅसल. बाकीचे सदस्य आल्यावर त्यांच्या राहण्यासाठी म्हणून ही व्यवस्था होती. या फ्लॅटची व्यवस्था लावल्यावर हे सगळेजण एक गाडी भाड्याने घेऊन गॅरिबाल्डी स्ट्रीट आणि आइकमनचं घर पाहायला गेले. तिथे ते पोहोचले, तेव्हा संध्याकाळचे ७.४० झाले होते. त्यांची गाडी अगदी कमी वेगाने रस्त्यावरून चालली होती. तेव्हा त्यांना तिथल्या बसस्टॉपवर एक बस थांबलेली दिसली. त्या बसमधून एक माणूस उतरला. तो आइकमन उर्फ रिकार्डो क्लेमेंट आहे, हे समजल्यावर त्यांच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. आइकमनचं मात्र त्यांच्याकडे लक्ष नव्हतं. तो स्वतःच्याच तंद्रीत होता. त्याच्या घरापाशी तो वळला आणि घरात गेला.
याचा अर्थ आइकमन दररोज साधारण याच वेळी घरी येत होता, आणि बसस्टॉपपासून ते त्याच्या घरापर्यंत असलेल्या रस्त्यावर त्यावेळी चिटपाखरूही नव्हतं, म्हणजे या भागातून त्याला उचलणं शक्य होतं.
त्याच रात्री या एजंट्सनी इझराईलला संदेश पाठवला – काम होऊ शकतं.
आइकमनला कसं, कुठे आणि केव्हा उचलायचं हा प्रश्न निकालात निघाला होता. आता सर्वात महत्वाचा मुद्दा होता त्याला अर्जेन्टिनाच्या बाहेर कसं काढायचं. त्यावेळी नशिबाने हॅरेलची साथ दिली. त्याच वर्षी म्हणजे १९६० मध्ये अर्जेन्टिनाच्या स्वातंत्र्याला १५० वर्षे पूर्ण होत होती आणि दिवस होता २० मे. संपूर्ण जगातून अनेक परदेशी पाहुणे या समारंभात भाग घेण्यासाठी अर्जेन्टिनामध्ये येणार होते. शिक्षणमंत्री अब्बा एबानच्या नेतृत्वाखाली इझरेली शिष्टमंडळही जाणार होतं. हे शिष्टमंडळ ब्युनोस आयर्सपर्यंतचा प्रवास सरकारी विमान कंपनी एल अॅलच्या नवीन जम्बो जेटने करणार होतं. या विमानाचं नाव होतं the Whispering Giant..
११ मे १९६० या दिवशी या शिष्टमंडळाची फ्लाईट होती. हॅरेल स्वतः मोर्देचाई बेन अरी आणि एफ्राईम बेन अर्त्झी या एल अॅलच्या अगदी वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटला आणि त्याने त्यांना सगळी कल्पना दिली. मुख्य पायलट झ्वी तोहरला बाकी काहीही माहिती देण्यात आली नाही, फक्त एखादा अनुभवी मेकॅनिक बरोबर घेण्याची सूचना देण्यात आली. जर विमानाला अर्जेन्टिनामधून तिथल्या एअरपोर्ट स्टाफच्या मदतीशिवाय उड्डाण करावं लागलं, तर काही प्रश्न उद्भवू नयेत म्हणून ही खबरदारी घेण्यात आली होती.
१ मे १९६० या दिवशी वेगळ्याच पासपोर्टवर इसेर हॅरेल ब्युनोस आयर्सच्या विमानतळावर उतरला. अर्जेन्टिना दक्षिण गोलार्धात असल्यामुळे मे महिन्यात हिवाळा होता. त्याच्यानंतर जवळपास एक आठवड्यानंतर ९ मे या दिवशी ब्युनोस आयर्सच्या मध्यभागात असलेल्या एका उंच इमारतीमधल्या सर्वात वरच्या मजल्यावरच्या फ्लॅटमध्ये टीमच्या सर्व १२ सदस्यांची बैठक होती. सर्वजण वेगवेगळ्या मार्गांनी ब्युनोस आयर्समध्ये शिरले होते. या फ्लॅटचं सांकेतिक नाव होतं हाईट्स.
अर्जेन्टिनामध्ये येण्याआधी हॅरेलने ब्युनोस आयर्समधल्या जवळजवळ ३०० कॅफे आणि बार्स यांची एक यादी बनवली होती. त्यांचे पत्ते आणि ते चालू असण्याच्या वेळासुद्धा त्यात होत्या. दररोज सकाळी तो निघत असे आणि पायी वेगवेगळ्या कॅफेमध्ये जात असे. कुठल्या कॅफेमध्ये तो कधी असेल याचं एक वेळापत्रक त्याने बनवलं होतं आणि त्यामुळे तो दिवसाच्या कुठल्याही वेळी कुठे असेल हे त्याच्या टीमला अगदी व्यवस्थित माहित असायचं. या मोहिमेच्या शेवटी गोडमिट्ट अर्जेंटिनियन कॉफी पिऊन पिऊन आपलं डोकं दुखायला लागल्याचं हॅरेलने लिहून ठेवलेलं आहे.
हॅरेल आल्यावर त्याने स्वतः ब्युनोस आयर्स विमानतळापासून जवळ असलेला एक बंगला आइकमनला उचलल्यापासून ते त्याला इझराईलला जाणाऱ्या विमानात बसवेपर्यंत ठेवण्यासाठी म्हणून निवडला होता. या जागेचं सांकेतिक नाव होतं द बेस. इथे येहुदिथ निसियाहू आणि याकोव्ह मिदाद हे पर्यटक जोडपं म्हणून राहणार होते. या बंगल्यात इझरेली एजंट्सनी अनेक लपण्याच्या जागा बनवल्या होत्या. आइकमनला उचलल्यावर त्याच्या कुटुंबाने पोलिसांकडे तक्रार केली, आणि जर स्थानिक पोलिस तपासासाठी आले, तर त्यांना आइकमन सापडू नये हा त्यामागचा उद्देश होता. या बंगल्याजवळ असलेला दुसरा एक बंगला पर्यायी व्यवस्था म्हणून भाड्याने घेण्यात आला होता.
आता सगळी तयारी झाली होती. १० मेला आइकमनला उचलायचं, ११ मेचा एक दिवस ‘ द बेस ’ वर ठेवायचं, आणि १२ तारखेला जेव्हा ११ तारखेला आलेलं विमान परत जाईल तेव्हा त्याच्यातून इझराईलला पाठवायचं असं ठरलेलं होतं, पण ऐनवेळी माशी शिंकली.
अर्जेन्टिनाच्या १५०व्या स्वातंत्र्यदिनाच्या समारंभामुळे ब्युनोस आयर्स आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर पर्यटक जमले होते, की अर्जेंटिनियन पोलिस आणि सुरक्षा यंत्रणेला इतक्या लोकांना सांभाळणं जड जात होतं. त्यामुळे अर्जेन्टिनाच्या परराष्ट्र मंत्रालयाने इझरेली शिष्टमंडळाला ११ मेऐवजी १९ मे या दिवशी येण्याची विनंती केली. त्यानुसार आता इझरेली शिष्टमंडळाची फ्लाईट १८ मे या दिवशी इझरेली प्रमाणवेळेनुसार सकाळी ११ वाजता निघणार होती.
हॅरेलपुढे आता दोन पर्याय होते – आइकमनला ठरल्याप्रमाणे १० मेला उचलायचं
आणि मग २० मेपर्यंत वाट पहायची किंवा मग त्याला १९ मेला उचलायचं आणि २०
तारखेला इझराईलला पाठवायचं. दोन्हीमध्ये धोके होते. जर आइकमनला उचलल्यावर
त्याच्या कुटुंबाच्या विनंतीवरून पोलिसांनी शोधकार्य सुरु केलं, आणि
त्याच्यात जर इझरेली एजंट्स सापडले, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर इझराईलची आणि
मोसादची नाचक्की झाली असती. पण जर त्याला १९ मेला उचललं असतं, तर त्यावेळी
अत्यंत कडक झालेल्या सुरक्षाव्यवस्थेतून त्याला बाहेर काढणंही तितकंच कठीण
होतं.
शेवटी हॅरेलने पहिलीच योजना – आइकमनला १० मे या दिवशी उचलायची – नक्की
केली. फक्त एक बदल केला. १० मे ऐवजी आता तारीख ठरली ११ मे आणि वेळ
संध्याकाळी ७.४० वाजता.
आता आइकमनच्या अपहरणाची योजना अगदी तपशीलवार तयार झाली होती: आइकमन दररोज संध्याकाळी ७.४० वाजता येणाऱ्या बसने येतो आणि बसस्टॉपवर उतरतो. तिथून तो जवळजवळ ५०० मीटर्स एवढं अंतर गॅरिबाल्डी स्ट्रीटवरून चालत आपल्या घराकडे जातो. रस्त्यावर या वेळी अगदी अंधुक प्रकाश असतो. वाहतूक अगदी तुरळक असते. त्याचं अपहरण करण्यासाठी दोन गाड्या आणि आठ एजंट्स असणार होते. चार एजंट्सची एक टीम प्रत्यक्ष अपहरण करणार होती आणि दुसरी टीम टेहळणी आणि अपहरण करणाऱ्या टीमचं संरक्षण या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडणार होती. अपहरण करणारी टीम एकदा तो त्यांच्या ताब्यात आला, की त्याला त्यांच्या गाडीत घालून तिथून ताबडतोब निघणार होती आणि दुसरी टीम लगेचच त्यांच्या मागून येणार होती. भूलतज्ञ डॉक्टर एलीयान दुसऱ्या गाडीत असणार होता.
“जर तुम्हाला पोलिसांनी हटकलं तर कुठल्याही परिस्थितीत आइकमनला सोडू नका,” हॅरेलने सर्वांना बजावून सांगितलं, “जर पोलिसांनी तुम्हाला अटक केली, तर खरं काय ते सांगा.”
१० मेच्या दिवशी येहुदिथ आणि मिदाद ‘ द बेस ‘ मध्ये राहायला गेले. दिवसाच्या शेवटी बाकी एजंट्सही त्यांच्या हॉटेल्समधून बाहेर पडून कॅसल आणि हाईट्समध्ये राहायला गेले.
११ मेच्या सकाळपासून सगळे एजंट्स कामात होते. मुख्य काम होतं सगळ्या ‘
पाऊलखुणा ‘ पुसून टाकायचं. दोन गाड्या सोडून बाकी सगळ्या भाड्याने
घेतलेल्या गाड्या परत करण्यात आल्या. १२ जणांच्या टीमने आपलं नवीन वेषांतर
केलं आणि जुनी कागदपत्रं नष्ट केली. आता प्रत्येकाकडे त्यांच्या नवीन
वेषांतराला अनुरूप अशी कागदपत्रं होती.
हॅरेलनेही त्याच्या हॉटेलमधून चेक आऊट केलं आणि आपलं सामान ब्युनोस
आयर्सच्या मुख्य रेल्वे स्टेशनच्या क्लोकरूममध्ये नेऊन ठेवलं. आजही तो एका
कॅफेमधून दुसऱ्या कॅफेमध्ये जात होता. आज त्याचा दौरा ब्युनोस आयर्सच्या
बिझिनेस आणि थिएटर्स यांच्या भागात होता. त्यामुळे इथले सगळे कॅफे
एकमेकांपासून खूप जवळ होते.
दुपारचा १.०० – हॅरेल, रफी एतान आणि इतर काही एजंट्स शेवटच्या ब्रीफिंगसाठी
भेटले. हा कॅफे शहरातल्या मोठ्या आणि प्रसिद्ध कॅफेपैकी एक होता. २ वाजता
सगळे आपापल्या दिशेने गेले.
दुपारचे २.३० – शहराच्या मध्यभागी असलेल्या एका मोठ्या गॅरेजमधून एजंट्सनी अपहरण करण्यासाठी जी गाडी वापरण्यात येणार होती, ती ताब्यात घेतली. त्याच वेळी दुसऱ्या एका गटाने दुसरी गाडी ताब्यात घेतली. अपहरण करणाऱ्या गटाने आणि या दुसऱ्या गटाने नंतर गाड्यांची अदलाबदल केली.
दुपारचे ३.३० – दोन्हीही गाड्या द बेस या बंगल्यापाशी पोचल्या.
दुपारचे ४.३० – शेवटचं ब्रीफिंग. दोन्ही गटांनी कपडे बदलले आणि आपली कागदपत्रं घेऊन निघण्याची तयारी केली.
संध्याकाळी ६.३० – दोन्ही गाड्या द बेस वरून निघाल्या. अपहरण करणाऱ्या गाडीमध्ये – झ्वी आहारोनी (ड्रायव्हर), रफी एतान, मोशे ताव्होर आणि झ्वी मॉल्किन. दुसऱ्या गाडीत अॅव्हरम शालोम, याकोव्ह गाट, डॉ. एलीयान आणि एफ्राईम इलानी (ड्रायव्हर). दोन्ही गाड्या एकाच वेळी एकाच ठिकाणाहून निघाल्या, पण नंतर त्यांचे मार्ग बदलले आणि त्या परत एकमेकींना क्लेमेंटच्या घराच्या जवळच असलेल्या एका चौकात भेटल्या. येताना दोन्हीही गाड्यांनी पोलिस आणि गस्ती किंवा नाकाबंदी असलेले भाग आपल्या नकाशावर नोंद करून ठेवलेले होते.
संध्याकाळी ७.३० – दोन्ही गाड्या गॅरिबाल्डी स्ट्रीटवर, आपल्या नियोजित ठिकाणी आणि नियोजित वेळी पोहोचल्या. रस्त्यावर अजिबात कुठल्याही प्रकारचा प्रकाश नव्हता. अपहरणासाठी वापरली जाणारी गाडी काळ्या रंगाची शेवरलेट सेडान होती. आहारोनीने ती फुटपाथच्या अगदी जवळ, क्लेमेंटच्या घराकडे तोंड करून उभी केली. मॉल्किन आणि ताव्होर बाहेर पडले. आहारोनी ड्रायव्हरच्या जागेवरच बसून राहिला. रफी एतान गाडीच्या आत दबा धरून बसला. ताव्होरने गाडीचं हूड उघडलं आणि आतमध्ये बघायला सुरुवात केली. मॉल्किन त्याच्या उजव्या हाताला उभा होता. दोघांचीही नजर आळीपाळीने रस्त्यावर आणि थोड्या अंतरावर असलेल्या बसस्टॉपवर फिरत होती.
रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला, काही अंतरावर दुसरी गाडी उभी होती. ही काळ्या रंगाची ब्यूक गाडी होती. ती क्लेमेंटच्या घराकडे पाठ करून उभी होती. डॉ.एलीयान मागच्या सीटवर आणि इलानी ड्रायव्हरच्या जागेवर होते. शालोम आणि गाट यांनी उतरून गाडीचं हूड उघडलं. इशारा मिळताच इलानी गाडीचे प्रखर दिवे चालू करून आइकमनला गोंधळवणार होता.
सापळा आणि शिकारी तयार होते. आता फक्त सावज यायचं बाकी होतं.
संध्याकाळचे ७.४० – २०३ क्रमांकाची बस स्टॉपपाशी आली, थांबली पण त्यातून कोणीही उतरलं नाही.
संध्याकाळचे ७.५० – अजून दोन बसेस येऊन गेल्या पण कोणीही उतरलं नाही. आता एजंट्सच्या मनात नाही नाही त्या शंका यायला लागल्या. काय झालं असावं? आइकमनला संशय आलाय की काय? आज तो वेळेच्या आधीच तर नाही आला? किंवा काही कामानिमित्त आपल्या ऑफिसमध्येच तर थांबला नसेल?
संध्याकाळचे ८.०० – हॅरेलने दुपारच्या ब्रीफिंगमध्ये जर आइकमन ८ वाजेपर्यंत आला नाही, तर तिथून निघून जायला सांगितलं होतं. पण रफी एतानने मिशन कमांडर म्हणून आपला अधिकार वापरत सगळ्यांना अजून अर्धा तास थांबायला सांगितलं.
संध्याकाळचे ८.०५ – अजून एक बस स्टॉपवर थांबली. बहुतेक शेवटची बस. पहिल्यांदा तर एजंट्सना कोणीच दिसलं नाही, पण दुसऱ्या टीममध्ये असलेल्या शालोमला एक आकृती चालताना दिसली. आइकमनच्या चालीचा त्याने अभ्यास केलेला होता. त्याने इलानीला इशारा केला आणि इलानीने गाडीचे प्रखर दिवे चालू केले.
समोरचा माणूस रिकार्डो क्लेमेंट उर्फ अॅडॉल्फ आइकमनच होता. तो आपल्या घराकडे चालत येत होता. अचानक डोळ्यांवर पडलेल्या प्रखर प्रकाशामुळे त्याने चेहरा बाजूला केला. दुसरी गाडी ओलांडून तो पुढे गेल्यावर त्याला अजून एक गाडी दिसली. तिचं हूड उघडलेलं होतं, आणि लोक आत बघून काही दुरुस्तीचा प्रयत्न करत होते. तो गाडीच्या जवळ येताच तिथे उभ्या असलेल्या माणसाने त्याला थांबवलं आणि तो म्हणाला – Momentito, senor! तो झ्वी मॉल्किन होता, आणि त्याला स्पॅनिश भाषेचे फक्त एवढेच शब्द येत होते.
क्लेमेंटने खिशातून टॉर्च काढण्यासाठी खिशात हात घातला. पुढच्या घटना डोळ्याचं पातं लवतं ना लवतं तोच घडल्या. मॉल्किनला क्लेमेंट खिशातून पिस्तुल किंवा काही शस्त्र काढेल अशी भीती वाटली, म्हणून त्याने क्लेमेंटवर झेप घेतली आणि त्याला जमिनीवर पाडलं. क्लेमेंट जोरात ओरडला. तो परत ओरडायच्या आत गाडीतून एक आणि बाहेर उभा असलेला एक असे दोघेजण त्याच्या दिशेने आले आणि त्यांनी त्याला उचलला, गाडीत टाकला, आणि पाठोपाठ गाडीत उडी मारून गाडीचे दरवाजे बंद करून गाडी चालू केली. क्लेमेंट गाडीच्या बाजूने गेला आणि त्याला उचलून गाडी निघाली यांच्या दरम्यान जेमतेम अर्ध्या मिनिटाचा वेळ गेला असेल.
ही गाडी गेलेली बघताच दुसरी गाडीही तिच्या पाठोपाठ निघाली.
इकडे पहिल्या गाडीत एतान आणि मॉल्किनने क्लेमेंटचे हात आणि पाय बांधले आणि त्याच्या तोंडात एक बोळा कोंबला. त्याच्या डोळ्यांवरचा चष्मा काढून टाकला आणि एकदम जाड भिंगांचा काळा चष्मा त्याच्या डोळ्यांवर चढवला. हे सगळं झाल्यावर एतान त्याच्या कानांत जर्मनमध्ये कुजबुजला – जरा आवाज किंवा हालचाल केलीस, तर मरशील! त्याक्षणी तो शांत झाला. दरम्यान एतानने त्याच्या पोटावर उजव्या बाजूला आणि डाव्या काखेच्या थोडं खाली असलेल्या शस्त्रक्रियेच्या व्रणांना तपासून पाहिलं होतं. आइकमनच्या फाईलमध्ये हे व्रण ज्या ठिकाणी आहेत असा उल्लेख होता, त्याच ठिकाणी ते सापडले होते. सगळ्यांनी एकमेकांशी हात मिळवले. अखेरीस आइकमन त्यांच्या ताब्यात आला होता.
आपल्या भावना आपल्या पूर्ण नियंत्रणात आहेत असं मॉल्किन आणि एतानला वाटत होतं, पण जेव्हा आहारोनीने त्यांना गप्प बसायला सांगितलं तेव्हा आपण ज्यू क्रांतिकारकांचं नाझीविरोधी गाणं गुणगुणतो आहोत हे त्यांच्या लक्षात आलं.
गाडी वेगाने द बेस च्या दिशेने चालली होती आणि अचानक ती थांबली. समोर रेल्वे फाटक होतं आणि एक लांबच्या लांब मालगाडी चालली होती. झ्वी मॉल्किनच्या मते हा या संपूर्ण अपहरण नाट्यातला सर्वात महत्वाचा क्षण होता. त्यांची गाडी इतर अनेक गाड्यांच्या मध्ये उभी होती. आइकमनने अशा वेळी हालचाल केली असती आणि ते जर कुणाच्या लक्षात आलं असतं तर सगळ्या प्रयत्नांवर पाणी पडलं असतं पण सुदैवाने तसं काही घडलं नाही आणि मालगाडी निघून गेल्यावर बाकीच्या गाड्यांप्रमाणे ही गाडीही पुढे निघाली.
रात्रीचे ८.५५ – दोन्हीही गाड्या द बेस पाशी पोचल्या. एजंट्सनी आइकमनला भरभर चालवत आतमध्ये आणलं. तिथे आणल्यावर सर्वप्रथम त्यांनी त्याचे सगळे कपडे त्याच्या अंगावरून उतरवले आणि त्याने कुठे काही शस्त्र, बॉम्ब वगैरे लपवलेलं आहे का, याची तपासणी केली. नंतर त्यांनी त्याला तोंड उघडायला सांगितलं आणि त्याने आपल्या तोंडात किंवा दाढांमध्ये सायनाईड किंवा दुसऱ्या एखाद्या विषाची कुपी लपवलेली नाही याचीही तपासणी केली. त्याच्या डोळ्यांवर अजूनही तो काळा चष्मा होता.
अचानक त्याच्यावर जर्मन भाषेत एक आवाज कडाडला – तुझ्या बुटांची आणि डोक्याची साईझ? तुझी जन्मतारीख? आईचं नाव? वडिलांचं नाव?
यांत्रिकपणे त्याने या प्रश्नांची उत्तरं दिली. एजंट्स ही सगळी माहिती फाईलमधल्या माहितीबरोबर पडताळून पाहात होते.
तुझा नाझी पार्टी सदस्य क्रमांक? “४५३२६.” त्याने उत्तर दिलं.
आणि तुझा एस.एस.क्रमांक ६३७५०, बरोबर? इथे तो थोडा वेळ थांबला आणि मग म्हणाला:"नाही तो ६३७५२ असा आहे. "
ठीक आहे. आता नाव सांग तुझं. “रिकार्डो क्लेमेंट.” तो म्हणाला.
नाव? “ओट्टो हेनिन्गर” तो थरथरत म्हणाला.
खरं नाव? “Ich bin Adolf Eichmann.”
त्याच्या आजूबाजूला शांतता पसरली. त्यानेच त्या शांततेचा भंग केला, “माझं नाव अॅडॉल्फ आइकमन,” तो म्हणाला, “मी इझरेली लोकांच्या कैदेत आहे याची मला कल्पना आहे. मला थोडीफार हिब्रू भाषा येते. वॉर्सामध्ये एका राब्बायने मला ही भाषा शिकवली होती.”
तो हिब्रू प्रार्थना म्हणायला लागल्यावर सगळे एजंट्स निःस्तब्ध झाले.
इकडे इसेर हॅरेलचा एका कॅफेमधून दुसऱ्या कॅफेत असा दौरा चालू होता.
रात्री जवळजवळ साडेनऊ वाजता तो दिवसातल्या शेवटच्या कॅफेत जाऊन खुर्चीत
बसला आणि त्याला झ्वी आहारोनी आणि रफी एतान येताना दिसले.
“तो आता आपल्या ताब्यात आहे,” आहारोनी म्हणाला, “आपण त्याची ओळख पटवली आहे,
आणि त्याने स्वतःसुद्धा आपण अॅडॉल्फ आइकमन आहोत हे मान्य केलेलं आहे.”
हॅरेलने त्यांचं अभिनंदन केलं आणि ते निघून गेले.
हवेत थंडी होती, पण हॅरेलचा मूड इतका छान होता, की तिथून रेल्वे
स्टेशनपर्यंत तो चालत गेला, तिथून त्याने आपलं सामान काढलं आणि एका नव्या
हॉटेलमध्ये नव्या नावाने चेक इन केलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी ही बातमी पंतप्रधान बेन गुरियनपर्यंत पोचवण्यात आली.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
आपल्या संपूर्ण टीमचं अभिनंदन करण्यासाठी जेव्हा हॅरेल द बेस बंगल्यावर पोचला, तेव्हा सगळ्यांचे चेहरे बघून काय झालं असावं हे त्याच्या लक्षात आलं. आइकमनचं त्यांच्या एवढं जवळ असणं हे त्यांना घुसमटवत होतं. ज्याने आपल्या असंख्य धर्मबांधवांना थंडपणे गॅस चेंबरकडे पाठवलं, त्याची काळजी घेणं, त्याच्यासाठी स्वयंपाक करणं, त्याचे कपडे धुणं हे त्यांच्यासाठी अशक्य होतं. तो आत्महत्या करायचा प्रयत्न करेल म्हणून त्याच्या हातात रेझर किंवा कुठलंही धारदार हत्यार द्यायचं नव्हतं. म्हणजे त्याची दाढी करण्यापासून सगळ्या गोष्टी या एजंट्सना कराव्या लागत होत्या आणि ते संतापले होते.
शेवटी हॅरेलने त्यांना जबरदस्तीने शहरात फिरायला पाठवलं. आळीपाळीने एक एक गट जाऊन ब्युनोस आयर्स शहर बघून आला. ते १० दिवस प्रत्येकाच्याच आयुष्यातले संपता न संपणारे प्रदीर्घ दिवस होते.
आइकमनला प्रश्न विचारून सगळी माहिती जमा करण्याची जबाबदारी आहारोनीकडे होती आणि तो दिवसाचे किमान १० तास आइकमनबरोबर घालवत असे. आइकमनने आपलं भवितव्य ओळखलं होतं, त्यामुळे त्याने कुठल्याही प्रकारे एजंट्सशी वाद घालण्याचा, भांडण करण्याचा किंवा त्यांना उकसवण्याचा प्रयत्न केला नाही.
आहारोनीच्या प्रश्नांमुळे मोसादला आइकमनने युद्ध संपल्यापासून ते आतापर्यंत काय केलं त्या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती मिळाली.
मे १९४५ मध्ये जर्मनीने शरणागती पत्करल्यावर दोस्त राष्ट्रांनी जर्मन
सरकार बरखास्त केलं आणि नाझी अधिकाऱ्यांना युद्धगुन्हेगार म्हणून घोषित
केलं. मृत्युछावण्या आणि छळछावण्या या एस.एस.च्या अधिकारात येत होत्या,
त्यामुळे एस.एस.अधिकाऱ्यांना अटक करण्यावर जास्त भर दिला जात होता. हे
ओळखून आइकमनने लुफ्तवाफ प्रायव्हेट अॅडॉल्फ कार्ल बार्थ हे नाव घेतलं आणि
जर्मन वायुदलाचा गणवेश आणि कागदपत्रंदेखील मिळवली. पण त्याला वायुदलाविषयी
तांत्रिक माहिती नव्हती, त्यामुळे पकडलं जाण्याचा धोका होता. त्यामुळे
त्याने वाफेन-एस.एस. किंवा एस.एस.च्या लढाऊ युनिटमधल्या लेफ्टनंटची ओळख
घेतली आणि ओट्टो एकमन या नावाने स्वतःला अटक करवून घेतली. जवळजवळ तीन महिने
तो युद्धकैदी म्हणून तुरुंगात होता. जेव्हा त्याचा एकेकाळचा सहाय्यक डिटर
विस्लीसेनीने त्याच्या कृत्यांबद्दल साक्ष दिली, तेव्हा तो तुरुंगातून
पळाला आणि ओट्टो हेनिन्गर हे नाव घेऊन जर्मनीच्या सॅक्सनी प्रांतात लपला.
तिथे तो १९५० पर्यंत होता. १९५० मध्येच तो इटलीमार्गे अर्जेन्टिनाला पळून
गेला.
अर्जेन्टिनामध्ये सुरुवातीला तो जुरमान या ब्युनोस आयर्सच्या एका उपनगरात राहिला. त्यानंतर रिपलर नावाच्या एका जर्मन व्यापाऱ्याच्या घरात त्याने ४ महिने काढले. तोपर्यंत त्याचा शोध थंडावला होता. मग तो ब्युनोस आयर्सपासून जवळजवळ ६०० मैल दूर असलेल्या तुकुमान नावाच्या छोट्या शहरात गेला. इथे काप्री नावाच्या एका बांधकाम क्षेत्रातल्या कंपनीमध्ये त्याला नोकरी मिळाली. काप्रीचा मूळ उद्देश पलायन केलेल्या नाझींना आश्रय आणि नोकऱ्या मिळवून देणं हाच होता. दरम्यान त्याने अर्जेन्टिनाच्या नागरिकत्वासाठी अर्ज केला होता. तो मंजूर होऊन त्याला एप्रिल १९५२ मध्ये अर्जेन्टिनाचं नागरिकत्व मिळालं. त्यासाठी त्याने नाव घेतलं होतं रिकार्डो क्लेमेंट. अर्जेन्टिनामधल्या रेकॉर्ड्सनुसार क्लेमेंटचा जन्म इटलीमधल्या बोल्झानो शहरात झाला होता, तो व्यवसायाने मेकॅनिक होता आणि अविवाहित होता.
नागरिकत्व मिळाल्यावर आइकमनने त्याची पत्नी व्हेरा हिच्याशी पत्राद्वारे संपर्क साधला. त्यावेळी ती आपल्या मुलांसह जर्मनी सोडून ऑस्ट्रियामध्ये स्थायिक झाली होती. हे पत्र त्याने त्रयस्थ म्हणून लिहिलं होतं आणि त्यात असं म्हटलं होतं की तिच्या मुलांचा दूरचा काका रिकार्डो, जो मरण पावला आहे असं तिला वाटतंय, तो प्रत्यक्षात जिवंत आहे. व्हेरा आइकमनने त्याचं हस्ताक्षर ओळखलं आणि ऑस्ट्रियामधल्या भूमिगत नाझी कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. ऑस्ट्रियन सरकारमधल्या नाझी हस्तकांनी तिला आणि तिच्या मुलांना एक कायदेशीर पासपोर्ट मिळवून दिला आणि तिच्याविषयी रेकॉर्ड्समध्ये असलेली माहिती नष्ट केली. जून १९५२ मध्ये व्हेरा आणि तिची मुलं ऑस्ट्रियामधून गायब झाली. जुलै १९५२ मध्ये इटलीमधल्या जेनोआ बंदरातून ती आणि तिची मुलं अर्जेन्टिनासाठी रवाना झाली आणि ऑगस्टच्या मध्यावर तिची आणि आइकमनची तुकुमान येथे भेट झाली.
१९५३ मध्ये काप्री कंपनी दिवाळखोरीत निघाल्यावर आइकमनला नोकरी शोधावी लागली. पहिल्यांदा त्याने ब्युनोस आयर्समध्ये एक लाँड्री काढली, मग भागीदारीमध्ये शेती, पशुपालन, बागाईत असे अनेक व्यवसाय करून बघितले. पण यातलं काहीही या ना त्या कारणाने यशस्वी होऊ शकलं नाही. नंतर काही काळाने त्याला ब्युनोस आयर्सजवळ असलेल्या सुआरेझ या शहरात असलेल्या मर्सिडीज बेंझ कारखान्यात फोरमन म्हणून नोकरी मिळाली. आता आपलं आयुष्य सुरळीत जाईल आणि आपल्याला नैसर्गिकरीत्या शांतपणे मरण येईल असं त्याला वाटायला लागलं होतं, पण ११ मे १९६० या दिवशी सगळं बदलून गेलं.
दरम्यान आइकमनच्या मुलांनी त्याचा शोध चालू केला होता. हॉस्पिटल्स, मॉर्ग, पोलिस स्टेशन्स, रेल्वे स्टेशन्स – सगळीकडे त्यांचं शोधून झालं होतं. शेवटी त्यांनी अर्जेन्टिनाचा माजी अध्यक्ष हुआन पेरॉन याच्या समर्थकांनी काढलेल्या ताक्युआरा नावाच्या फॅसिस्ट संघटनेला मदतीची विनंती केली. सगळी पार्श्वभूमी ऐकल्यावर ताक्युआराच्या लोकांनी आपला निष्कर्ष आइकमनच्या मुलांना ऐकवला – तुमच्या वडिलांचं अपहरण ज्यू लोकांच्या संघटनांनी केलेलं असण्याची दाट शक्यता आहे. आइकमनच्या मुलांनी ताक्युआराच्या लोकांना इझरेली राजदूताचं अपहरण करून आइकमनच्या मोबदल्यात त्याचा सौदा करण्याचं आवाहन केलं, पण ताक्युआराच्या लोकांचे हेतू राजकीय असल्यामुळे त्यांना इतक्या उघडपणे आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा गुन्हा करायचा नव्हता, त्यामुळे हा प्रस्ताव त्यांनी धुडकावून लावला.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
१८ मे १९६०. लॉड एअरपोर्ट, तेल अवीव.
सकाळचे ११ वाजले होते आणि लॉड एअरपोर्ट माणसांनी भरून गेला होता. इझरेली शिष्टमंडळ आज अर्जेन्टिनाच्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अर्जेन्टिनाला जाणार होतं. या विमानात इझरेली शिष्टमंडळाच्या सदस्यांशिवाय इतर सामान्य प्रवाशांचाही समावेश होता. या विमानाला १९ तारखेला पोचायचं असल्यामुळे ते सरळ ब्युनोस आयर्सला जाणार नव्हतं. विमानाचा पहिला थांबा होता रोम. इथे तीन नवे प्रवासी विमानात आले आणि थोड्या वेळाने त्यांनी एल अॅलचे गणवेश चढवले. तिघेही मोसाद एजंट्स होते आणि आइकमनला अर्जेन्टिनामधून बाहेर काढण्यासाठी ते या विमानात चढले होते. त्यांच्यातला एक होता येहुदा कार्मेल. तो आपल्या निवडीबद्दल खुश नव्हता. त्याचं कारण म्हणजे त्याची निवड ही त्याच्या कुठल्याही कौशल्यामुळे नव्हे, तर चेहरेपट्टी आणि अंगकाठीने तो आइकमनशी बऱ्यापैकी मिळताजुळता असल्यामुळे झाली होती. त्याला अर्जेन्टिनामध्ये आणायचं, त्याचा एल अॅल गणवेश आइकमनला घालायचा आणि तसं त्याला अर्जेन्टिनाच्या बाहेर काढायचं अशी हॅरेलची योजना होती. विमानात कार्मेल झीव्ह झीकरोनी या नावाच्या पासपोर्टवर आला होता.
दरम्यान अर्जेन्टिनामध्ये १६ मे या दिवशी हॅरेलने अजून एक योजना कार्यान्वित केलेली होती. मायर बार-हॉन नावाचा एक तरुण इझरेली नागरिक त्याच वेळी ब्युनोस आयर्समध्ये त्याच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आला होता. त्याने १६ मे या दिवशी एका हॉस्पिटलमध्ये फोन केला आणि तिथल्या डॉक्टरांना आपण एका गाडीच्या अपघातातून बालंबाल बचावलो आहोत पण आपल्याला आता चक्कर येणं, मळमळणं आणि अशक्तपणा यांचा त्रास होतोय असं सांगितलं. ही सगळी लक्षणं त्याला डॉ. योना एलीयानने व्यवस्थित समजावून सांगितली होती. मायर बार-हॉन १६ मेच्याच दिवशी ब्युनोस आयर्समधल्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल झाला. १९ मे या दिवशी सकाळी त्याने आपल्याला आता पुष्कळच बरं वाटतंय असं सांगून हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळवला. तो हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यावर लगेचच हॅरेलला भेटला आणि त्याने आपले डिस्चार्ज पेपर्स हॅरेलला दिले. आता हॅरेलकडे ब्युनोस आयर्समधल्या एका प्रतिष्ठित हॉस्पिटलचे अस्सल डिस्चार्ज पेपर्स होते. जर आइकमनला विमानाकडे नेताना कुणी हटकलं तर हे पेपर्स कामाला येणार होते.
१९ मे १९६० या दिवशी अर्जेन्टिनियन प्रमाणवेळेनुसार दुपारी बारा वाजता एल अॅलचं विमान ब्युनोस आयर्स एअरपोर्टवर उतरलं. विमान उतरल्यानंतर दोन तासांनी हॅरेल आणि विमानाचा पायलट झ्वी तोहर भेटले. दोघांनी इझराईलकडे परत जाण्याची वेळ निश्चित केली – २० मेची मध्यरात्र.
हॅरेलची योजना अशी होती – आइकमनला एल अॅलचा आजारी पडलेला कर्मचारी म्हणून विमानामध्ये आणायचं. त्याचा ‘ डबल ’ येहुदा कार्मेल उर्फ झीव्ह झीकरोनी अर्जेन्टिनामध्ये पोचलेला होताच. त्याने आपला गणवेश आणि कागदपत्रं हॅरेलकडे दिली होती. शालोम डॅनीने अत्यंत कौशल्याने या कागदपत्रांमध्ये आइकमनच्या अनुषंगाने फेरफार केले होते आणि येहुदा कार्मेलसाठी नवीन कागदपत्रंही बनवली होती. ती वापरून तो काही दिवसांनी इझराईलला परत जाणार होता.
२० मेच्या मध्यरात्री निघायचं ही बातमी द बेस वर समजताच तिथल्या एजंट्सची सगळी मरगळ निघून गेली. डॉ.एलीयानने आइकमनला झोपेचं इंजेक्शन दिलं. त्यानंतर एजंट्सनी सगळा बंगला स्वच्छ केला. सगळ्या वस्तूंवरचे बोटांचे ठसे पुसून टाकले. तिथे आणलेल्या सगळ्या यंत्रांचे भाग सुटे करून ठेवले आणि आपापलं व्यक्तिगत सामान भरून ठेवलं. कॅसल आणि हाईट्समधल्या एजंट्सनीही आपापली घरं अशीच ‘ साफ ’ केली.
२० मे १९६०
हॅरेल सकाळपासूनच कामात व्यस्त होता. आज तो ज्या कॅफेमध्ये जाणार होता, ते सगळे एअरपोर्टजवळ होते. सकाळीच त्याने आपल्या हॉटेलमधून चेक आऊट केलं आणि आपलं सामान घेऊन तो पहिल्या कॅफेमध्ये गेला. त्याला सर्वात पहिल्यांदा भेटणाऱ्यांमध्ये एल अॅलच्या लोकांचा समावेश होता.
दुपारी या सगळ्या नाटकाचा शेवटचा अंक सुरु झाला. हॅरेलने शेवटच्या कॅफेमधून बाहेर पडल्यावर सरळ एक टॅक्सी घेतली आणि तो एअरपोर्टवर गेला. आता मध्यरात्री विमानाने उड्डाण करेपर्यंत तो इथूनच सगळ्याचं नियंत्रण करणार होता. एअरपोर्टवरचा कॅफेटेरिया लाउंज बऱ्यापैकी उबदार होता आणि बाहेर मरणाची थंडी होती. त्यामुळे लाउंजमध्ये सतत लोकांची वर्दळ होती. हॅरेलला त्याच्या लोकांना भेटून हलक्या आवाजात चर्चा करण्यासाठी अत्यंत सोयीची जागा होती.
रात्रीचे ९.०० – द बेस मध्ये सगळेजण तयार होते – आइकमनसकट. त्याला एल अॅलचा गणवेश आणि झीव्ह झीकरोनीची कागदपत्रं देण्यात आली होती. झ्वी मॉल्किनने आपला हौशी रंगभूमीवरचा सगळा अनुभव पणाला लावून आइकमनचा मेक अप केला होता. आइकमनप्रमाणे डॉ.एलीयान आणि अजून दोन एजंट्ससुद्धा एल अॅलच्या गणवेशात होते. निघण्यापूर्वी डॉ.एलीयानने आइकमनला थोडं कमी तीव्रतेचं गुंगीचं औषध दिलं. त्यामुळे आइकमनला गाढ झोप लागली नसती, पण तो ग्लानीच्या अवस्थेत राहिला असता.
एल अॅल गणवेशातल्या एजंट्सपैकी एक झ्वी आहारोनी होता. त्याने गाडी
चालवायची असं ठरलेलं होतं. त्याच्या शेजारी एक एजंट बसला आणि मागे आइकमन
दोघांच्या मध्ये बसला. या दोघांपैकी एक डॉ. एलीयान होता.
त्याच वेळी शहरातल्या दोन प्रसिद्ध हॉटेल्समधून खऱ्याखुऱ्या एल अॅलच्या
लोकांना घेऊन दोन गाड्या निघाल्या. सगळ्या लोकांचं सामान घेऊन अजून एक
वेगळी गाडी तिथे पोचली.
हॅरेलपासून दोन टेबल्स सोडून शालोम डॅनी बसला होता. तो काय करतोय हे कुणी जर लक्षपूर्वक पाहिलं असतं, तर त्यांना धक्काच बसला असता. तो प्रत्येक मोसाद एजंटसाठी बनवलेल्या नवीन पासपोर्टवर व्हिसा, अर्जेन्टिनामध्ये आल्याचे, परत जातानाचे वगैरे जे सहीशिक्के असतात, त्यांची नक्कल करत होता.
रात्रीचे ११ – रफी एतान हॅरेलला भेटला आणि त्याने सगळेजण पोचल्याचं सांगितलं. हॅरेलने पार्किंगमध्ये प्रत्येक गाडीपाशी जाऊन त्यांना त्यांचे पासपोर्ट आणि पुढच्या सूचना दिल्या. तिसऱ्या गाडीत त्याने डोकावून पाहिलं, तेव्हा त्याला एल अॅलच्या गणवेशातला आइकमन दोघांच्या शेजारी बसलेला दिसला. तो गाढ झोपेत होता. तिन्ही गाड्या विमानाच्या दिशेने निघाल्या आणि हॅरेल कॅफेटेरियामध्ये परतला.
एल अॅलचं विमान धावपट्टीजवळ येऊन थांबलं होतं. या तिन्ही गाड्या आता अर्जेंटिनियन पोलिस असलेल्या शेवटच्या अडथळ्यापाशी पोचल्या होत्या. “हाय, एल अॅल!” गाडीतला एक जण पोलिसांना म्हणाला. पोलिसांनी तिन्ही गाड्यांमधल्या लोकांकडे लक्षपूर्वक पाहिलं, पण त्यांना काहीही वावगं आढळलं नाही. पहिल्या आणि दुसऱ्या गाडीमधले लोक हसत खिदळत होते आणि तिसऱ्या गाडीमधले लोक शांत झोपलेले होते.
अडथळा पार करून या तिन्ही गाड्या विमानाच्या दिशेने गेल्या. आता आइकमनला विमानात चढवायचा प्रश्न होता. आहारोनी, इलानी आणि शालोम या तिघा धटिंगणांच्या आडून आइकमनला विमानात चढवण्यात आलं आणि एजंट्स त्याला सरळ फर्स्ट क्लासमध्ये घेऊन गेले. तिथे त्याला एका खिडकीपाशी बसवून डॉ. एलीयान त्याच्या शेजारी बसला. बाकीच्या एजंट्सनीही आपापल्या जागा घेतल्या.
रात्रीचे ११.३० – विमानाने धावपट्टीवर जाण्याआधी दिव्यांची उघडझाप केली. हा हॅरेलसाठी इशारा होता. तो स्वतःचं सामान उचलून निघाला. अजून चार-पाच एजंट्स आपापल्या सामानासह तिथे उभे होते. हॅरेलला बघताच न बोलता तेही निघाले. शालोम डॅनीच्या कौशल्यामुळे पासपोर्ट तपासणीच्या वेळी काहीही प्रश्न उद्भवला नाही.
रात्रीचे ११.४५ – कस्टम आणि इमिग्रेशन तपासणी पार पडल्यावर सगळे विमानाच्या दिशेने गेले. सर्वात शेवटी हॅरेल विमानात आला. लगेचच विमानाचा दरवाजा बंद झाला.
मध्यरात्र – विमान उड्डाण करणार तेवढ्यात कंट्रोल टॉवरकडून त्याला थांबण्याचा आदेश आला. सगळ्यांच्या मनात परत एकदा शंकांचं मोहोळ उठलं. शेवटच्या क्षणी दगाफटका झाला की काय? कुणाला संशय आलाय? पण सुदैवाने तांत्रिक मुद्दा होता. सुमारे २० मिनिटांनी विमानाला उड्डाणाचा इशारा देण्यात आला. विमानाने उड्डाण केलं आणि हॅरेलने सुटकेचा निःश्वास सोडला.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
२२ मे १९६०
इझरेली प्रमाणवेळेनुसार सकाळी ७.३० वाजता एल अॅलचं विमान लॉड एअरपोर्टवर
उतरलं. बरोबर सकाळी १० वाजता इसेर हॅरेल पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियनला
भेटला आणि त्याने आइकमन इझराईलमध्ये आल्याची बातमी सांगितली आणि आइकमनला
पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी परवानगी मागितली.
“तुझी खात्री आहे?” बेन गुरियननी विचारलं.
“कशाबद्दल?”
“हा माणूस आइकमनच आहे याबद्दल? तू कसं पडताळून पाहिलंस की हा माणूस आइकमनच आहे?”
हॅरेलला धक्काच बसला. त्याने आइकमनची फाईल, त्यामध्ये असलेलं वर्णन, झ्वी आहारोनीने आइकमन आणि रिकार्डो क्लेमेंट यांच्या फोटोंची केलेली तुलना या सगळ्या गोष्टी सांगितल्या.
“शिवाय त्याने स्वतः कबूल केलेलं आहे की तो आइकमन आहे,” हॅरेल म्हणाला.
पण बेन गुरियन ऐकायला तयार नव्हते. शेवटी हॅरेलने मोसादच्या लोकांना कामाला लावलं आणि आइकमनशी प्रत्यक्ष बोललेल्या दोन ज्यूंना शोधून काढलं. त्या दोघांनी तुरुंगात जाऊन आइकमनशी संभाषण केलं आणि तोच एस.एस. अधिकारी अॅडॉल्फ आइकमन आहे असं सांगितलं.
इकडे फ्रँकफर्टमध्ये जेव्हा डॉ.फ्रित्झ बॉवरला आइकमनच्या अपहरणाची आणि त्याला इझरेली पोलिसांनी रीतसर अटक केल्याची बातमी समजल्यावर त्याने ती बातमी सांगणाऱ्या मोसाद एजंटला मिठी मारली. डॉ.बॉवरने जर नेटाने प्रयत्न केले नसते, तर आइकमनला अटक होणं आणि त्याच्यावर इझराईलमध्ये खटला भरला जाणं या गोष्टी अशक्यच होत्या.
त्याच दिवशी नेसेटचं, इझराईलच्या संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं होतं. या अधिवेशनाला पत्रकारांना – इझराईलमधल्याच नव्हे तर उर्वरित जगातल्याही – बोलावण्यात आलं होतं. सर्व प्रतिनिधी हजर होते. अशी कोणती गोष्ट जाहीर होणार आहे, याची उत्सुकता सर्वांनाच होती.
बरोबर दुपारी ४ वाजता पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियन उभे राहिले आणि त्यांनी सभापतींना बोलण्याची परवानगी मागितली. परवानगी मिळाल्यावर त्यांनी आपलं वक्तव्य वाचून दाखवायला सुरुवात केली
“मला सभागृहाला ही माहिती द्यायची आहे की इझराईलच्या गुप्तचर संस्थांनी एका अत्यंत मोठ्या नाझी युद्धगुन्हेगाराला अटक केलेली आहे. हा गुन्हेगार इतर नाझींसमवेत ज्यूविषयक प्रश्नाचं अंतिम उत्तर म्हणजेच योजनाबद्ध रीतीने करण्यात आलेल्या जवळजवळ ६० लाख ज्यूंच्या संहारासाठी जबाबदार आहे. त्याचं नाव आहे अॅडॉल्फ आइकमन. आइकमन या क्षणी इझराईलमध्ये आहे. त्याला इझरेली पोलिसांनी अटक केलेली असून त्याच्यावर नाझी युद्धगुन्हेगारांसंदर्भात असलेल्या कायद्यानुसार खटला चालवण्यात येईल.”
एक क्षणभर लोकांचा स्वतःच्या कानांवर विश्वास बसेना आणि नंतर संपूर्ण सभागृह उस्फूर्तपणे उठून उभं राहिलं आणि टाळ्यांचा कडकडाट सुरु झाला. त्या एका क्षणाने मोसादची प्रतिमा बदलवून टाकली – इझरेली नागरिकांच्या नजरेत, इझराईलच्या मित्रांच्या नजरेत, संपूर्ण जगाच्या नजरेत!
क्रुश्चेव्हच्या भाषणाच्या प्रसंगामुळे जगात मोसादविषयी कौतुकाची आणि आदराची भावना होती. आइकमन प्रकरणानंतर त्या भावनेचं आदरयुक्त भीती आणि दरारा यांच्यात रूपांतर झालं.
उपसंहार:
आइकमनच्या अटकेनंतर त्याच्याविरुद्ध असलेले पुरावे गोळा करून त्याच्यावर रीतसर आरोपपत्र दाखल करण्यात आलं. यामध्ये ९ महिने गेले. इझरेली सरकारला केवळ कागदपत्रांच्या आधारे हा खटला चालवायचा नव्हता त्यामुळे दररोज आइकमनला पोलिस अधिकारी प्रश्न विचारत. अपेक्षेप्रमाणे त्याने आपल्यावरच्या आरोपांना नाकारलं. त्यामुळे त्याच्यावर खटला चालणार हे निश्चित होतं. पण आइकमनचा वकील म्हणून कोण उभं राहणार, हा प्रश्न होता, कारण इझराईलमधला एकही वकील त्यासाठी तयार नव्हता. शेवटी न्यूरेंबर्ग खटल्यांमध्ये काम करण्याचा अनुभव असलेल्या जर्मनीतल्या रॉबर्ट सर्वेशियसला इझरेली सरकारने विनंती केली आणि तो आइकमनचं वकीलपत्र घ्यायला तयार झाला.
हा सर्व काळ आइकमनला इझरेली सरकारने उत्तर इझराईलमधील यागुर या ठिकाणी कडेकोट बंदोबस्तात ठेवलं होतं.
अर्जेन्टिनामध्ये आइकमनचं अपहरण झाल्यानंतर बरोबर ११ महिन्यांनी – ११
एप्रिल १९६१ या दिवशी त्याच्यावरचा खटला जेरुसलेमच्या न्यायालयात सुरु
झाला. सरकारी वकील म्हणून काम पाहणाऱ्या गिडिऑन हॉसनरने १५ गुन्ह्यांचा
उल्लेख असलेलं आरोपपत्र न्यायालयासमोर सादर केलं. या गुन्ह्यांमध्ये ज्यू
वंशाविरुद्ध गुन्हेगारी कारस्थान आणि प्रत्यक्ष गुन्हे आणि मानवतेविरुद्ध
गुन्हे (Crimes against Humanity) या मुद्द्यांचाही समावेश होता.
१५ डिसेंबर १९६१ या दिवशी न्यायालयाने आइकमनला प्रत्येक गुन्ह्याबद्दल दोषी असल्याचा निर्णय देऊन मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. आइकमनने या निर्णयाविरुद्ध अपील केलं पण ते नाकारण्यात आलं. त्याने राष्ट्राध्यक्षांकडे केलेला दयेचा अर्जसुद्धा फेटाळण्यात आला.
३१ मे १९६२ च्या मध्यरात्री/ १ जून १९६२ च्या पहाटे रामला येथील तुरुंगात खास बनवण्यात आलेल्या वधस्तंभावर आइकमनला फासावर लटकवण्यात आलं. त्याचा मृतदेह ताबडतोब जाळण्यात आला. तेव्हा विद्युतदाहिनीमधून येणाऱ्या धुराकडे पाहून ऑशवित्झमधल्या शवदाहिन्यांची आठवण तिथे हजर असलेल्या पत्रकारांना आली.
साठ लाख ज्यूंच्या मृत्यूला जबाबदार असल्याच्या आनंदात हसत हसत मरू इच्छिणाऱ्या अॅडॉल्फ आइकमनची राख इझरेली तटरक्षक दलाच्या जहाजांनी भूमध्य समुद्रात विखरून टाकली.
जेव्हा रेडिओवर ही बातमी प्रसारित झाली, तेव्हा झ्वी मॉल्किन त्याच्या
मरणासन्न आईचा हात हातात घेऊन हॉस्पिटलमध्ये तिच्या बाजूला बसला होता.
“मी आइकमनला पकडलं आई. फ्रुमाच्या आणि तिच्या मुलांच्या मृत्यूचा बदला घेतला आपण!” तो तिला म्हणाला.
“तू तुझ्या बहिणीला विसरणार नाहीस याची मला खात्री होती बाळा!” त्याची आई म्हणाली.
सी.आय.ए.च्या प्रतिहेरखात्याचा प्रमुख जेम्स अँगलटनने आपल्या डायरीत लिहिलं – The way Israel ensured justice with Adolf Eichmann proves that everything is NOT fair in love and war!
क्रमशः
संदर्भ:
१.The House on Garibaldi Street – by Isser Harel
२.Eichmann in my hands – by Zvi Malkin
३.Hunting Eichmann: Chasing down the World’s most notorious Nazi – by Neal Bascomb
४.Eichmann Trial – United States Holocaust Memorial Museum (www.ushmm.org )
५.Mossad: the Greatest Operations of the Israeli Secret Service – by Michael Bar Zohar and Nissim Mishal
६. The History of Mossad – by Antonella Colonna Vilasi
७. Nazi War Trials – by Andrew Walker
काही प्रताधिकारमुक्त फोटो -
एस. एस. लेफ्टनंट कर्नल अॅडॉल्फ आइकमन
डॉ. फ्रित्झ बॉवर

खटल्यादरम्यान आइकमन
मोसाद - भाग ५
मे १९६०, ब्युनोस आयर्स, अर्जेन्टिना. मोसादने आइकमनचं ११ मे या दिवशी अपहरण केलं आणि त्याला ब्युनोस आयर्स एअरपोर्टच्या जवळ असलेल्या एका बंगल्यात ठेवलं. या बंगल्यात आइकमनकडून इतर फरारी नाझी युद्धगुन्हेगारांबद्दल जेवढी मिळवता येईल तेवढी माहिती मिळवण्याचा प्रयत्न चालू होता. झ्वी आहारोनी, ज्याने आइकमनचं ब्युनोस आयर्समधलं घर आणि स्वतः आइकमनलाही शोधून काढलं होतं, तो आइकमनला दररोज प्रश्न विचारत असे.
एका दिवशी या प्रश्नोत्तरांच्या दरम्यान आइकमनने ब्युनोस आयर्समधल्याच एका घराचा पत्ता आहारोनीला सांगितला आणि जेव्हा तिथे कोण राहतंय ते आहारोनीला कळलं तेव्हा त्याचा स्वतःच्या कानांवर विश्वास बसेना. डॉ. जोसेफ मेंगेले. ऑशविट्झ मृत्यूछावणीतला यमदूत. त्याला तिथले लोक डॉ.डेथ याच नावाने ओळखत असत.
ऑशविट्झ मृत्यूछावणीचे तीन मुख्य भाग होते. पहिल्या भागात प्रशासकीय कार्यालय आणि तिथे राहणाऱ्या लोकांची निवासस्थानं होती. दुसरा भाग, जो बिर्केनाऊ इथे होता, तिथे ही कुप्रसिद्ध मृत्यूछावणी होती आणि तिसरा भाग, जो मोनोवित्झ या ठिकाणी होता, तिथे श्रमछावणी होती. ‘ बिर्केनाऊला पाठवणी ’ असा वाक्प्रचार तिथे रूढ होता. त्याचा अर्थ उघड होता आणि तो तसा होण्यात ज्यांनी हातभार लावला होता, त्यांच्यात प्रमुख होता डॉ. मेंगेले.
संपूर्ण पूर्व आणि मध्य युरोपातून ऑशविट्झमध्ये ज्यू येत होते. १९४३ पासून, म्हणजे मेंगेले तिथे काम करायला लागल्यापासून तिथे ज्यूंच्या नरमेधाची व्याप्ती आणि तत्परता, या दोन्ही गोष्टी वाढल्या होत्या. जवळजवळ ३००० ज्यू तिथे दररोज मारले जात होते आणि नाझी उच्चवर्तुळात या गोष्टीचं प्रचंड कौतुक झालं होतं. ऑशविट्झला इतर कुठल्याही मृत्यूछावणीपेक्षा जास्त संसाधनं मिळत होती आणि तिथला कमांडंट रुडॉल्फ होएस आणि मुख्य डॉक्टर मेंगेले या दोघांनाही पदकं देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता.
कडक इस्त्रीचा सूट घातलेला मेंगेले ऑशविट्झ रेल्वे स्टेशनच्या बाहेर असलेल्या एका मोठ्या फलाटाच्या बाजूला त्याच्या सहकारी डॉक्टरांसमवेत उभा राहात असे. हे रेल्वे स्टेशन मृत्यूछावणीतच होतं. गाडीतून उतरल्यावर सर्व लोकांना या फलाटावर घेऊन येत. मेंगेले आणि त्याचे सहकारी त्यांच्यामधल्या शारीरिकदृष्ट्या धट्टयाकट्ट्या लोकांना डावीकडे जायला सांगत. स्त्रिया, लहान मुलं आणि वृद्ध लोकांना उजवीकडे जायला सांगत असत. उजवीकडचा रस्ता सरळ गॅस चेंबरकडे जात असे. अनेक वेळा छावणीत आल्यावर जेमतेम दीड ते दोन तासांमध्ये लोकांना गॅस चेंबरमध्ये पाठवलं जात असे.
लहान मुलांमध्ये जर मेंगेलेला जुळी मुलं किंवा सोनेरी केस आणि निळे डोळे अशी ‘ आर्यन ’ वैशिष्ट्यं असलेली मुलं दिसली, तर अशा मुलांना वेगळं काढलं जात असे. त्यांच्यातल्या काही जणांना जर्मनीमध्ये किंवा नाझींनी पोलंडचं जर्मनीकरण करण्यासाठी तिथे मुद्दामहून आणलेल्या जर्मन कुटुंबांमध्ये पाठवलं जात असे. जुळ्या मुलांची वैशिष्ट्यं हा मेंगेलेच्या अभ्यासाचा विषय होता. त्यामुळे या जुळ्या मुलांवर अनेक प्रयोग, कधी तर अघोरी म्हणावेत असे प्रयोग, केले जात. प्रयोगांनंतर त्यांना ठार मारलं जात असे. नाझी राजवटीमध्ये बुद्धिवंत लोकांना चढलेला ज्यू द्वेषाचा उन्माद आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांनी केलेले अत्याचार यांचं मेंगेले एक जितंजागतं प्रतीक होता.
जानेवारी १९४५ मध्ये सोविएत सैन्याने ऑशविट्झ मुक्त केलं. त्याच्या एक आठवडा आधी मेंगेले तिथून सटकला होता आणि १९४९ पर्यंत लपून छपून वावरत होता. त्याच्या कुटुंबाचा शेतकीविषयक यंत्रसामग्री विकण्याचा व्यवसाय होता आणि त्यांना युद्धाची झळ तेवढी लागलेली नव्हती. शिवाय युद्धोत्तर जर्मनीच्या पुनर्वसनामध्ये शेतीला महत्व होतंच. त्यामुळे मेंगेले कुटुंबावर हलाखीचे दिवस कधीही आलेले नव्हते आणि भूमिगत झालेल्या जोसेफ मेंगेलेला पैसे आणि इतर मदत करणं त्यांना सहज शक्य होतं. १९४९ मध्ये हेच पैसे वापरून मेंगेले इटलीमधल्या जेनोआ बंदरातून दक्षिण अमेरिकेच्या दिशेने निघून गेला. त्याच्या पत्नीने मात्र तिथे जायला नकार दिला आणि जर्मनीमध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला. या कागदपत्रांवर मेंगेलेची सही आवश्यक होती, त्यामुळे ती अर्जेन्टिनामध्ये पाठवण्यात आली, आणि हे मोसादने शोधून काढलं. पण अर्जेन्टिनामध्ये नक्की कुठे ते त्यांना माहित नव्हतं आणि आता आइकमनने एक धागादोरा पुरवला होता.
१९ मे १९६० या दिवशी इझरेली विमानसेवा एल अॅलचं विमान ब्युनोस आयर्सला उतरलं. २० मे या दिवशी जेव्हा हे विमान परत जाणार होतं, तेव्हा त्यात आइकमन असणार होता. हे विमानं ब्युनोस आयर्सला उतरायच्या दोन दिवस आधी, म्हणजे १७ मे या दिवशी मोसाद एजंट्सनी मेंगेलेचा ब्युनोस आयर्समधला पत्ता शोधून काढला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मेंगेले तिथे स्वतःच्याच नावाने राहात होता. आइकमनला शोधणाऱ्या झ्वी आहारोनीनेच हा पत्ता शोधून काढला होता, पण दुर्दैवाने मेंगेले तिथे नव्हता. तो आणि त्याचं कुटुंब सुट्टीवर गेलेलं होतं.
जेव्हा इसेर हॅरेलला हे समजलं, तेव्हा त्याने रफी एतानला बोलवून त्याच्यासमोर आपली योजना मांडली –
आइकमनबरोबर मेंगेलेलाही उचलायचं आणि इझराईलला घेऊन जायचं. पण एतानने त्याला
नकार दिला. त्याच्या मते आइकमनच्या अपहरणामध्ये प्रचंड धोके होते आणि
निव्वळ सुदैवाने आत्तापर्यंत कुठलाही प्रश्न उद्भवला नव्हता. शिवाय आइकमनला
एकट्याला इझराईलला घेऊन जाणं तुलनेने सोपं होतं. त्याच्याबरोबर
मेंगेलेसुद्धा असेल, तर हा सगळा प्रकार पोलिसांच्या लक्षात येऊन इझराईलची
आंतरराष्ट्रीय बदनामी होण्याचा धोका जास्त होता. आइकमन अर्जेन्टिनामध्ये
कुणाच्या अध्यात न मध्यात असा राहात होता, पण मेंगेले तोपर्यंत एक यशस्वी
उद्योजक बनला होता. आइकमनच्या तुलनेत त्याला ओळखणारे लोकही जास्त होते.
शेवटी हॅरेललाही या योजनेमधले धोके जाणवले आणि त्याने माघार घेतली. तेव्हा एतानने त्याला एक ऑफर दिली – जर आइकमनला इझराईलमध्ये नेल्यावर ही बातमी एक आठवडा गुप्त राहू शकली, तर तो मेंगेलेला उचलणार होता. आइकमनच्या अपहरणासाठी मोसादने ब्युनोस आयर्समध्ये अनेक घरं आणि बंगले भाड्याने घेतले होते. एतान आणि अजून चार एजंट्स वेगळ्याच मार्गाने ब्युनोस आयर्समध्ये परत शिरणार होते आणि जर आइकमनच्या अपहरणाची आणि इझराईलमध्ये आगमनाची बातमी एक आठवडा गुप्त राहिली, तर तशाच प्रकारे मेंगेलेला उचलून एतान आणि इतर एजंट्स इझराईलला घेऊन आले असते आणि मग दोघांच्याही अपहरणाची बातमी जाहीर झाली असती. हॅरेलने हे मान्य केलं.
२० मेच्या रात्री आइकमनला घेऊन विमान उडालं. इंधन भरण्यासाठी विमानाचा पहिला थांबा ब्राझीलमध्ये रिओ डी जानिरोला होता. तेव्हा एतान, शालोम आणि मॉल्किन त्यातून उतरले आणि वेगळ्याच कागदपत्रांवर तिथून चिले देशातील सँतियागो इथे गेले. तिथून मग त्यांनी अर्जेन्टिनामध्ये परत प्रवेश केला. ब्युनोस आयर्समध्ये जाऊन मेंगेलेवर पाळत ठेवण्याची त्यांची योजना होती.
पण २२ मेच्या दिवशी पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियन यांनी आइकमन इझराईलच्या ताब्यात असल्याची घोषणा केली आणि ही बातमी जगभर पसरली. एतान आणि इतर एजंट्ससाठी आता ब्युनोस आयर्समध्ये जाऊन मेंगेलेला उचलणं ही अशक्य गोष्ट होती. ते ताबडतोब चिलेला परत गेले आणि तिथून इझराईलमध्ये गेले.
पंतप्रधानांनी आइकमनच्या अपहरणाची बातमी एक आठवडा गुप्त ठेवायला नकार दिला असं हॅरेलने रफी एतानला सांगितलं. पोलिस, कस्टम अधिकारी, एल अॅल अशा अनेकांना आइकमन इझराईलमध्ये आल्याचं माहित असल्यामुळे ही बातमी जर जाहीर होण्याच्या आधी पसरली तर देशाची बदनामी होईल. त्यापेक्षा आपण ते जाहीर करू असा बेन गुरियन यांचा युक्तिवाद होता.
आइकमनच्या अपहरणाबद्दल जेव्हा मेंगेलेला समजलं तेव्हा तो ब्युनोस आयर्सच्या मार्गावर होता. आपल्याला असलेला धोका त्याला जाणवला आणि तो तिथूनच पराग्वे देशात पळून गेला. तिथे १९ वर्षांनी, फेब्रुवारी १९७९ मध्ये, समुद्रात पोहत असताना आलेल्या पक्षाघाताच्या झटक्यामुळे तो बुडून मृत्यू पावला. त्याचं दफन वेगळ्या नावाने करण्यात आलं. पुढे डी.एन.ए. तंत्रज्ञानाचा वापर करून शास्त्रज्ञांनी त्याच्या अवशेषांवरून तो मेंगेलेच असल्याचं सिद्ध केलं.
--------------------------------------------------------------------------------
मार्च १९६२ मध्ये पंतप्रधान बेन गुरियननी इसेर हॅरेलला भेटायला बोलावलं. आता त्यांच्या भेटी नियमितपणे होत असत. पण ही भेट विशेष होती. हॅरेल आल्या आल्या त्याला बसायलाही न देता पंतप्रधानांनी प्रश्न विचारला – “मला सांग, या मुलाला तू शोधू शकशील का?”
त्यांनी कोणता मुलगा, काय मुलगा, त्याचं नाव काय वगैरे काहीही सांगितलं नाही, पण सांगायची गरज नव्हती. पंतप्रधान कोणाबद्दल बोलताहेत ते हॅरेलला अगदी व्यवस्थित माहित होतं. गेली दोन वर्षे हा इझराईलमधला एक ज्वलंत प्रश्न झाला होता. वर्तमानपत्रं, रेडिओ, टीव्ही, नेसेट – सगळीकडे हीच चर्चा चालू होती. देशातले पुरोगामी आणि नव्या विचारांचे ज्यू पुराणमतवादी आणि कट्टर ज्यूंच्या तोंडावर हाच प्रश्न पुन्हापुन्हा फेकत होते – योसेल कुठे आहे?
या प्रश्नातला योसेल म्हणजे योसेल शूशमाकर. फक्त आठ वर्षांचा असलेला एक छोटा मुलगा. इझराईलच्या होलोन शहरात राहणाऱ्या योसेलचं अपहरण झालं होतं, आणि या अपहरणात त्याच्या आजोबांचा, त्याच्या आईच्या वडिलांचा सक्रीय सहभाग होता. या आजोबांचं नाव होतं नाह्मान श्तार्क्स आणि तो अत्यंत कट्टर, पुराणमतवादी हासिदिक ज्यू होता. योसेलला अत्यंत कडक अशा परंपरागत ज्यू पद्धतीने वाढवण्याची श्तार्क्सची इच्छा होती आणि त्याचसाठी त्याने त्याच्या आईवडिलांकडून योसेलला स्वतःच्या ताब्यात घेतलं होतं. आणि आता हा मुलगा गायब झाला होता. त्याचा कुठल्याही प्रकारे माग लागत नव्हता.
जसजसे दिवस जात होते तसा इझराईलमधला असंतोष अधिकाधिक उग्र व्हायला लागला होता. एका घरातल्या प्रकरणाने आता देशव्यापी वादळाचं रूप घेतलं होतं आणि चिंतेची बाब ही होती की त्यामुळे देशातल्या नागरिकांचे सरळसरळ दोन गट झाले होते – पुराणमतवादी, कट्टर, कडवे ज्यू विरुद्ध नवमतवादी, पुरोगामी ज्यू. या प्रश्नाचं उत्तर जर लवकरात लवकर सापडलं नाही, तर हा संघर्ष यादवी युद्धाचं स्वरूप धारण करेल आणि इझराईलच्या शत्रूंसाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती निर्माण होईल अशी सार्थ भीती पंतप्रधानांना वाटत होती. शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी हॅरेलकडे ही कामगिरी सोपवायचा निर्णय घेतला होता.
“तुमची जर तशी इच्छा असेल, तर मी प्रयत्न करतो,” हॅरेल म्हणाला. आपल्या ऑफिसमध्ये परत येऊन त्याने या कामगिरीसाठी एक नवीन फाईल उघडली. या कामगिरीचं सांकेतिक नाव असणार होतं ऑपरेशन टायगर कब. वाघाचा छावा!
योसेल हा एक गोड, खेळकर आणि मस्तीखोर मुलगा होता. त्याच्या वयाच्या इतर मुलांप्रमाणेच. फक्त त्याचे आईवडील म्हणून त्याने चुकीच्या लोकांची निवड केलेली होती. हे योसेलचं नव्हे तर त्याच्या आजोबांचं, नाह्मान श्तार्क्सचं मत होतं. श्तार्क्स उंच आणि हाडांचा सापळा वाटावा एवढा बारीक होता. हासिदिक ज्यूंच्या पद्धतीप्रमाणे त्याने दाढी वाढवलेली होती. त्याचा चेहरा त्यामुळे जास्तच खंगलेला दिसे. डोळ्यांवर जाड भिंगांचा चष्मा असल्यामुळे त्याचे भेदक डोळे कुणाच्या लक्षात येत नसत. त्याचा जन्म रशियामध्ये झाला होता. १९१७ च्या कम्युनिस्ट क्रांतीनंतर रशियामधली चर्चेस, सिनेगॉग्ज आणि मशिदी या सगळ्यांवर कम्युनिस्टांचा निधर्मी वरवंटा फिरला आणि ख्रिश्चन धर्मगुरुंप्रमाणेच ज्यू राब्बायसुद्धा कम्युनिस्ट दडपशाहीला बळी पडले. दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीला रशिया आणि जर्मनी यांच्यात अनाक्रमणाचा करार झालेला होता आणि जर्मनीशी मैत्री दृढ करण्यासाठी रशियामध्येही ज्यूंना तुरुंगात आणि गुलागसारख्या छळछावण्यांमध्ये पाठवायला सुरुवात झाली होती. श्तार्क्सला असंच सैबेरियामधल्या तुरुंगात जावं लागलं. युद्धाचा संपूर्ण काळ त्याने गुलागमध्येच काढला. तिथे आत्यंतिक थंडीमुळे त्याला हिमदंश झाला आणि पायाची तीन बोटं गमवायला लागली, आणि वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे एका डोळ्याची दृष्टी गेली. एवढं होऊनही श्तार्क्सची स्वतःच्या धर्मावरची निष्ठा कायम होती. त्यात आता सोविएत रशियाबद्दलच्या आत्यंतिक तिरस्काराची भर पडली होती. १९५१ मध्ये त्याच्या सर्वात मोठ्या मुलाला के.जी.बी.च्या सैनिकांनी एका क्षुल्लक भांडणावरून भर रस्त्यात भोसकून ठार मारल्यावर हा तिरस्कार शिगेला पोचला होता. या मुलाव्यतिरिक्त श्तार्क्सला अजून तीन मुलं होती – शालोम आणि ओव्हादिया हे मुलगे आणि आयडा ही मुलगी. तिने आल्टर शूशमाकर नावाच्या एका शिंप्याशी लग्न केलं होतं. आयडा आणि आल्टर श्तार्क्सबरोबरच राहात होते. त्यांना झिना नावाची मुलगी होती.
१९५१ मध्ये आपल्या मोठ्या मुलाच्या मृत्यूनंतर श्तार्क्स आणि त्याचं कुटुंब सोविएत रशिया सोडून पोलंडमध्ये गेलं. तिकडे ल्वोव्ह शहरात ते स्थायिक झाले. तिथेच १९५३ मध्ये आयडाने योसेलला जन्म दिला. तो ४ वर्षांचा असताना, म्हणजे १९५७ मध्ये शूशमाकर कुटुंब पोलंड सोडून इझराईलला निघून गेलं. त्याच्या एक वर्ष आधी श्तार्क्स, त्याची पत्नी आणि त्याचा शालोम श्तार्क्स हा मुलगा हे तिघे इझराईलमध्ये स्थायिक झाले होते. दुसरा मुलगा ओव्हादिया हा इंग्लंडमध्ये स्थायिक झाला होता.
नाह्मान श्तार्क्सचं घर जेरुसलेमच्या मिआ शेरीम नावाच्या भागात होतं. हा जेरुसलेमचा अत्यंत कर्मठ ज्यूंनी भरलेला भाग होता, किंबहुना वेगळंच जग होतं असं म्हटलं तरी चालेल. बाहेरच्या, कुठल्याही पाश्चिमात्य शहराप्रमाणे असलेल्या इझराईलपेक्षा वेगळाच प्रकार होता हा. लांब, पायघोळ, काळे कोट किंवा कफ्तान घातलेले, डोक्यावर काळ्या टोप्या किंवा हॅट्स असलेले आणि दाढी वाढवलेले पुरुष; तशाच प्रकारचे कपडे घालणाऱ्या स्त्रिया, त्यांचे स्कार्फने झाकलेले काळे किंवा सोनेरी केस; येशिवा या ज्यू धार्मिक शिक्षण देणाऱ्या शाळा; सिनेगॉग्ज; राब्बाय आणि त्यांचे दरबार, तिथे होणारे न्यायनिवाडे – असं वेगळंच वातावरण होतं तिथे. तिथल्या एका येशिवामध्ये शालोम श्तार्क्स शिक्षक म्हणून काम करत होता.
आयडा आणि आल्टर मिआ शेरीमपासून जवळ असलेल्या होलोन या शहरात राहायला गेले. नंतर काही महिन्यांनी आल्टरला तेल अवीवपासून जवळ असलेल्या एका तयार कपड्यांच्या फॅक्टरीमध्ये नोकरी मिळाली. आयडा एका फोटोग्राफरची सहाय्यक म्हणून काम करायला लागली. परवडत नसतानाही त्यांनी एक घर विकत घेतलं पण त्यासाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते देता देता दोघेही मेटाकुटीला आले. त्यामुळे त्यांनी झिनाला एका धार्मिक संस्थेत पाठवलं, जिथे तिच्या राहण्याची आणि शिक्षणाची सोय झाली. छोट्या योसेलला त्यांनी आयडाच्या आईवडिलांकडे ठेवलं.
आयडा आणि आल्टरसाठी इझराईलमधले हे सुरुवातीचे दिवस खूप कठीण होते. दोघांनाही त्यांचे रशियामधले, तुलनेने आरामाचे दिवस आठवत होते. दोघेही आपल्या रशियामधल्या मित्रमंडळींशी संपर्क ठेवून होते आणि त्यांची पत्रं ते कधीकधी श्तार्क्सच्या पत्त्यावर मागवत असत. अशीच त्यांची काही पत्रं आणि त्यांच्या रशियामधल्या मित्रांची पत्रं श्तार्क्सच्या हातात पडली. त्याने असा समज करून घेतला की आपली मुलगी आणि जावई कदाचित रशियाला परत जाऊ शकतात आणि जाताना योसेललाही परत नेऊ शकतात. झालं. त्याने कुठल्याही परिस्थितीमध्ये योसेलला त्याच्या आईवडिलांकडे सोपवायचं नाही असा मनोमन निश्चय केला.
१९५९ च्या शेवटी आयडा आणि आल्टर यांचे चांगले दिवस सुरु झाले. आल्टरच्या फॅक्टरीला काही नवीन कंत्राटं मिळाली. आयडाही स्वतंत्रपणे फोटोग्राफर म्हणून काम करायला लागली. आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर त्यांनी मुलांना आपल्याबरोबर आणायचं ठरवलं. जेव्हा आयडा त्याप्रमाणे जेरुसलेमला योसेलला आणायला गेली, तेव्हा नाह्मान श्तार्क्स आणि योसेल हे दोघेही तिथे नव्हते. “उद्या तुझा भाऊ शालोम तुझ्या मुलाला तुझ्याकडे पोचवेल,” आयडाच्या आईने तिला सांगितलं, “आत्ता ते दोघेही प्रार्थना करत असतील. तू त्यांच्या प्रार्थनेत व्यत्यय आणू नकोस.”
दुसऱ्या दिवशी शालोम एकटाच आयडाच्या होलोनमधल्या घरी आला, आणि त्याने आपल्या बहिणीला त्यांच्या वडिलांचा निरोप दिला – कुठल्याही परिस्थितीत योसेलला ते त्याच्या आईवडिलांकडे द्यायला तयार नव्हते. हादरलेली आयडा आल्टर आणि शालोमबरोबर त्याच दिवशी जेरुसलेमला गेली. तो दिवस शुक्रवार होता. पुढचा दिवस शनिवार. इझराईलमधला सार्वजनिक सुट्टीचा दिवस. त्याच दिवशी संध्याकाळी आयडा आणि आल्टर होलोनला परत जायला निघाले, तेव्हा आयडाच्या आईने योसेलला घेऊन जायला विरोध केला, “बाहेर खूप थंडी आहे,” ती म्हणाली, “ आज त्याला इथेच झोपू दे. उद्या आम्ही त्याला तुमच्या घरी पोचवू.” आयडा आणि आल्टर तयार झाले. तोपर्यंत छोटा योसेल झोपून गेला होता. त्याच्या अंगावर पांघरूण घालून आयडा तिथून निघून गेली. तो आपल्याला पुढची काही वर्षे दिसणार नाहीये हे जर तिला त्यावेळी समजलं असतं तर कदाचित ती योसेलला घेतल्याशिवाय घरी गेली नसती.
दुसऱ्या दिवशी आयडाने दिवसभर वाट पाहिली, पण योसेल घरी आला नाही. संध्याकाळी तिचा धीर खचला आणि तिने आणि आल्टरने जेरुसलेमचा रस्ता पकडला. म्हाताऱ्या श्तार्क्सने त्यांना घरात पाऊलसुद्धा टाकू दिलं नाही. आयडा आणि आल्टर यांच्या अश्रुपूर्ण विनंत्यांचा काहीही परिणाम झाला नाही.
त्यानंतर दोन-तीन वेळा आयडा आणि आल्टर श्तार्क्सच्या घरी गेले पण तो ना योसेलला परत करायला तयार होता, ना त्याचा ठावठिकाणा सांगत होता. शेवटी जानेवारी १९६० मध्ये त्यांनी कायद्याची मदत घ्यायचं ठरवलं. तेल अवीवच्या राब्बिनिकल कोर्टातून त्यांनी नाह्मान श्तार्क्ससाठी समन्स पाठवलं. त्याला श्तार्क्सने कचऱ्याची टोपली दाखवली. आयडा आणि आल्टर शूशमाकर यांच्या प्रदीर्घ आणि एखाद्या दुःस्वप्नासारख्या संघर्षाला आता कुठे सुरुवात होत होती.
राब्बिनिकल कोर्टाच्या समन्सचा उपयोग होत नाही, हे पाहिल्यावर १५ जानेवारी १९६० या दिवशी इझराईलच्या सर्वोच्च न्यायालयाने नाह्मान श्तार्क्सला कोर्टात हजर होण्याचा आणि योसेलला एका महिन्याच्या आत त्याच्या आईवडिलांकडे सुपूर्द करण्याचा आदेश दिला. आपण प्रकृतीअस्वास्थ्यामुळे येऊ शकत नसल्याचा निरोप श्तार्क्सने त्याच्या वकिलामार्फत पाठवला.
१७ फेब्रुवारी १९६० या दिवशी शूशमाकर कुटुंबाने सर्वोच्च न्यायालयाच्या सल्ल्यावरून पोलिसांकडे योसेलच्या अपहरणासंदर्भात तक्रार दाखल केली. त्यात नाह्मान श्तार्क्सच्या अटकेची आणि योसेल जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत त्याला तुरुंगात ठेवण्याची मागणी केलेली होती. न्यायालयाने पोलिसांना योसेलचा शोध घेण्याचा आदेश दिला. पोलिसांनी त्याप्रमाणे शोधाला सुरुवात केली.
७ एप्रिल १९६० या दिवशी पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र
दाखल केलं, ज्यात योसेल शूशमाकर सापडत नसल्याची आणि त्यामुळे पोलिसांना या
जबाबदारीतून मुक्त करावं अशी विनंती करण्यात आली होती.
१२ मे १९६० या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी धुडकावून लावली आणि
नाह्मान श्तार्क्सच्या अटकेचे आदेश दिले. त्याप्रमाणे त्याला अटक करण्यात
आली.
श्तार्क्सने सोविएत रशियामधल्या गुलागमध्ये तुरुंगवास सहन केलेला असल्यामुळे इझरेली तुरुंगवास हा त्याच्यासाठी काहीच नव्हता. त्याला के.जी.बी. च्या मारहाणीने भरलेल्या प्रश्नोत्तरांचीसुद्धा सवय होती, त्यामुळे इझरेली पोलिसांना त्याने अजिबात दाद दिली नाही.
पोलिसांना एक गोष्ट समजून चुकली होती की श्तार्क्सने स्वतः योसेलला कुठेही लपवून ठेवलेलं नव्हतं, पण त्याला कर्मठ ज्यूंच्या नेटवर्कमध्ये अशा प्रकारे फिरवत ठेवलं होतं, की पोलिस चक्रावून गेले होते. त्यांना श्तार्क्सने असं सांगितलं होतं – जो पोलिसांचा तर्क होता – की योसेलचे आईवडील त्याला रशियामध्ये नेऊन ख्रिश्चन किंवा त्याहून वाईट म्हणजे कम्युनिस्ट बनवणार आहेत आणि त्यापासून त्याचं रक्षण करणं हे आपलं ईश्वरदत्त कार्य आहे. जेरुसलेमचा प्रमुख राब्बाय गिडिऑन फ्रँक – इझराईलमधला सर्वोच्च धार्मिक नेता – यानेही श्तार्क्सला आपला पाठिंबा जाहीर केला आणि सर्व कर्मठ ज्यूंना त्याची मदत करायचं आवाहन केलं.
२२ मे १९६० या दिवशी पंतप्रधान बेन गुरियन यांनी आइकमनला इझराईलमध्ये आणल्याची बातमी नेसेटच्या विशेष अधिवेशनात जाहीर केली. त्यानंतर मेच्या शेवटी जे नेसेटचं नियमित अधिवेशन होतं, त्यात योसेलचा विषय पहिल्यांदा मांडला गेला आणि संपूर्ण देशातल्या प्रसारमाध्यमांना एक मोठं खाद्य मिळालं. या प्रकरणाचे दूरगामी परिणाम काय होतील हे सर्वात प्रथम उजव्या पक्षांच्या लक्षात आलं. विरोधी पक्षांमधला एक प्रभावी नेता श्लोमो लोरेंझने शूशमाकर आणि श्तार्क्स या दोन्ही कुटुंबात मध्यस्थ म्हणून काम करायची तयारी दाखवली. श्तार्क्स त्यावेळी तुरुंगात होता. लोरेंझने त्याच्याकडे एक करारनामा आणला, ज्यात असं म्हटलं होतं, की योसेलचे आईवडील त्याचं शिक्षण आणि पालनपोषण ज्या प्रकारे श्तार्क्स सांगेल, त्याच प्रकारे करतील, पण त्याने योसेल कुठे आहे हे सांगावं. श्तार्क्सने या करारावर सही करायचं एका अटीवर कबूल केलं – जर राब्बाय मेझीशने त्याला तसा आदेश दिला, तर आणि तरच तो या करारनाम्यावर सही करेल.
लोरेंझने राब्बाय मेझीशची जेरुसलेममध्ये भेट घेतली आणि त्याला हा प्रकार सांगितला. मेझीशनेही अट घातली – जर अपहरणकर्त्यांना कुठल्याही प्रकारची शिक्षा होणार नाही असं सरकारने मान्य केलं, तरच तो असा आदेश देईल. लोरेंझने पोलिस प्रमुख जोसेफ नाहमियासची भेट घेऊन त्याला ही परिस्थिती सांगितली. नाहमियासने हे मान्य केलं आणि लोरेंझ मेझीशला हे सांगण्यासाठी परत जेरुसलेमला गेला, पण मेझीशने विचार बदलला होता. लोरेंझची सगळी मेहनत वाया गेली होती.
१२ एप्रिल १९६१ ला नाह्मान श्तार्क्सची तुरुंगातून प्रकृतीच्या कारणावरून सुटका करण्यात आली. सुटकेच्या वेळी त्याने योसेलच्या शोधासाठी पोलिसांना सहकार्य करायचं वचन दिलं होतं, पण ते त्याने पाळलं नाही. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने परत त्याच्या अटकेचे आदेश दिले.
ऑगस्ट १९६१ मध्ये पोलिसांनी जेरुसलेमजवळ असलेल्या कोमेमिउत नावाच्या एका गावात धाड टाकली. हे गाव कर्मठ ज्यूंचं होतं आणि योसेलला तिथे लपवून ठेवलं असल्याचा पोलिसांना संशय होता. तपासानंतर हा संशय खरा असल्याचं लक्षात आलं, पण धाड टाकण्याआधीच योसेलला त्या गावातून बाहेर काढण्यात आलं होतं. डिसेंबर १९५९ मध्ये, म्हणजे आयडा आणि आल्टर यांनी योसेलला परत न्यायचं ठरवलं, तेव्हाच योसेलचा मामा शालोम श्तार्क्स त्याला या गावात घेऊन आला होता.
दरम्यानच्या काळात योसेलला गावातून बाहेर काढून दुसऱ्या कोणत्यातरी ठिकाणी ठेवण्यात आलं होतं आणि शालोम श्तार्क्सही आपल्या भावाप्रमाणेच इंग्लंडला निघून गेला होता. तिकडे तो लंडनमधल्या गोल्डर्स ग्रीन या भागात असलेल्या हासिदिक ज्यूंच्या एका वसाहतीत राहात होता. इझरेली पोलिसांच्या सांगण्यावरून स्कॉटलंड यार्डने शालोमला अटक केली, पण त्याने योसेलबद्दल आपल्याला काहीही माहित नाही, हेच सांगितलं.
आता इझराईलमध्ये हे प्रकरण चांगलंच तापलं होतं. कर्मठ आणि पुरोगामी ज्यूंमध्ये चालू असलेली बोलाचाली आता हिंसक वळणावर पोचली होती. अनेक येशिवांवर हल्ले होऊन तिथल्या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना सगळ्या गावासमोर मारहाण करणं, त्याचा बदला म्हणून कर्मठ ज्यूंनी बाकीच्यांना गावांमध्ये प्रवेशबंदी करणं असले प्रकार सुरु झाले होते. काही लोकांच्या म्हणण्यानुसार योसेल न मिळण्याचं कारण म्हणजे त्याचा मृत्यू झाला होता. पण त्या अनुषंगानेही कुठलेच पुरावे मिळत नव्हते. सगळीकडे संतापाचं, वैतागाचं आणि निराशेचं वातावरण होतं.
त्याच वेळी पंतप्रधान बेन गुरियन आणि मोसाद संचालक इसेर हॅरेल यांची भेट झाली होती.
------------------------------------------------------------------------------------
“मी जेव्हा ही कामगिरी स्वीकारली, तेव्हा आपण किती कठीण आणि किचकट गोष्ट स्वीकारत आहोत, याचा मला त्या वेळी अंदाज आला नाही.” – इसेर हॅरेल (त्याच्या चरित्रकाराला दिलेल्या मुलाखतीमध्ये).
हॅरेलच्या मते ही कामगिरी स्वीकारण्यामागचं एकमेव कारण म्हणजे देशावर येऊ घातलेलं यादवी युद्धाचं संकट दूर करणं. जेव्हा त्याने ही कामगिरी स्वीकारली आहे, ही बातमी बाहेर पसरली, तेव्हा पोलिस तर अतिशय खुश झाले. नसती ब्याद गेली अशीच त्यांची भावना होती. शाबाक संचालक अमोस मॅनॉरचा मोसादने या सगळ्या फंदात पडण्यालाच विरोध होता आणि बरेच शाबाक आणि मोसाद ऑफिसर्स आणि एजंट्स त्याच मताचे होते कारण ही कामगिरी आपल्या कार्यक्षेत्राच्या बाहेर आहे असंच प्रत्येकाला वाटत होतं. जेव्हा मॅनॉर आणि हॅरेल यांची भेट झाली, तेव्हा मॅनॉरने हाच मुद्दा हॅरेलला सांगायचा प्रयत्न केला, की मोसादची निर्मिती इझराईलच्या सुरक्षेसाठी झालेली आहे, कौटुंबिक भांडणं सोडवण्यासाठी नाही. त्यावर हॅरेलचं हेच उत्तर होतं – जर एखादं कौटुंबिक भांडण देशाच्या सुरक्षिततेला आणि अखंडतेला धोकादायक ठरत असेल, तर त्यात पडून ते सोडवणं हे मोसादचं कर्तव्य आहे. यावर मॅनॉरकडे उत्तर नव्हतं. शिवाय त्या वेळी इझराईलच्या संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेत इसेर हॅरेल हा शेवटचा शब्द होता, त्यामुळे हे अधिकारी कुरकुरतच या कामगिरीत सामील झाले.
हॅरेलने यासाठी ४० जणांची एक टीम तयार केली. या टीममध्ये शाबाक आणि मोसादच्या हुशार एजंट्सशिवाय अनेक सामान्य नागरिकांचाही समावेश होता. काही कर्मठ ज्यूदेखील यात सामील झाले होते, कारण त्यांना या संपूर्ण प्रकरणाचा दूरगामी धोका जाणवला होता.
या टीमचं पहिलं उद्दिष्ट होतं धार्मिक वर्तुळांमध्ये शिरकाव करून घेऊन काही माहिती मिळते का ते पाहणं. पण त्यात ते साफ अयशस्वी झाले. त्यांनी जेव्हा जेव्हा येशिवांमध्ये विद्यार्थी म्हणून जायचा प्रयत्न केला, तेव्हा तिथल्या लोकांनी त्यांना लगेच पकडलं आणि हाकलून दिलं.
इकडे हॅरेलने आत्तापर्यंतच्या तपासाची पूर्ण माहिती घेतली, सर्व कागदपत्रांचा अगदी सखोल अभ्यास केला आणि शेवटी हा निष्कर्ष काढला की योसेलला देशाबाहेर नेण्यात आलेलं आहे. पण कुठे?
त्याच सुमारास त्याला समजलेल्या एका बातमीने त्याचं लक्ष वेधून घेतलं. मार्च १९६२ मध्ये हासिदिक ज्यूंचा एक मोठा गट स्वित्झर्लंडहून इझराईलला आला होता. या गटात अनेक पुरुष, स्त्रिया आणि मुलांचा समावेश होता. हा गट त्यांच्या राब्बायच्या अंत्यसंस्कारांसाठी त्याची शवपेटिका घेऊन आला होता. हॅरेलने जेव्हा स्वित्झर्लंडमध्ये चौकशी केली, तेव्हा त्याला असं कळलं की या राब्बायने पॅलेस्टाईनच्या पवित्र भूमीत आपलं दफन व्हावं अशी इच्छा व्यक्त केलेली नव्हती. मग हे एवढे लोक इथे कशासाठी आले होते? हॅरेलच्या मनात असा संशय आला, की हे कदाचित योसेलला सहजपणे देशाबाहेर काढता यावं म्हणून इझराईलमध्ये आलेले असावेत. इझराईलमध्ये आलेल्या सर्वांची माहिती त्याच्याकडे आल्यावर त्याने आपल्या एजंट्सना त्यांच्या मागावर पाठवलं. या एजंट्सनी स्वित्झर्लंडमधल्या येशिवांमध्ये जाऊन इझराईलमध्ये आलेल्या आणि तिथून स्वित्झर्लंडला परत गेलेल्या प्रत्येक मुलाची पाहणी केली. हे उघडपणे करणं शक्यच नव्हतं. त्यामुळे या एजंट्सनी चक्क त्या येशिवांमध्ये दीड-दोन महिने स्वैपाकी, पोर्टर, इस्त्रीवाला अशी कामं केली. पण योसेलचा काहीही माग तिथे लागला नाही.
आता हॅरेल संपूर्णपणे या प्रकरणात उतरला. बाकीची सगळी कामं त्याने बाजूला ठेवली आणि याच एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं. पॅरिसमध्ये आपलं हेडक्वार्टर्स बनवून त्याने आपले लोक इतरत्र पाठवायला सुरुवात केली. फ्रान्स, जर्मनी, इटली, बेल्जियम, ब्रिटन, हॉलंड, स्वित्झर्लंड, स्पेन या सगळ्या देशांत, अगदी मोरोक्को, अल्जेरिया आणि कॅनडा इथेही त्याचे लोक जाऊन आले. त्यांचं एकच काम होतं. कर्मठ ज्यूंच्या वस्त्या शोधून काढून तिथे कुठल्या ना कुठल्या प्रकारे शिरकाव करायचा आणि योसेलबद्दल चाचपणी करायची. कितीही छोटा धागादोरा मिळाला तरी तो सोडायचा नाही. तो पॅरिसमध्ये हॅरेलकडे पाठवायचा. तिथे स्वतः हॅरेल आणि त्याचे सहाय्यक हे सगळे धागेदोरे एकत्र जुळवून एखाद्या जिग-सॉ कोड्यासारखं त्यातून काही चित्र बनतंय का ते पाहात होते. मोसादच्या सर्वश्रेष्ठ एजंट्सपैकी एक असलेल्या येहुदिथ निसियाहूने तर शालोम श्तार्क्सच्या सासूच्या घरात काम करून, तिथून प्रशस्तीपत्र घेऊन त्याच्या लंडनमधल्या घरात नोकरी मिळवली होती. इझराईलच्या बाहेर कर्मठ ज्यूंची सर्वात मोठी वसाहत लंडनमध्येच होती. या वसाहतीचं नाव होतं सात्मार. इथे प्रामुख्याने पूर्व युरोपातल्या रोमानिया, हंगेरी, बल्गेरिया आणि अर्थातच रशिया इथून आलेले ज्यू होते. इथेच हॅरेलला एका अत्यंत धार्मिक जोडप्याविषयी समजलं. या जोडप्याने अचानक उत्तर आयर्लंडच्या बेलफास्ट शहरात एक घर भाड्याने घेतलं होतं. त्याने ताबडतोब एक टीम या जोडप्याच्या मागावर पाठवली.
आणि त्याच्याकडे एकामागोमाग एक नकारात्मक बातम्या यायला लागल्या.
बेलफास्टला गेलेल्या टीमने त्या जोडप्यावर एक महिनाभर नजर ठेवली पण त्यांना काहीही सापडलं नाही. हे जोडपं खरोखरच धार्मिक जोडपं होतं आणि ते उत्तर आयर्लंडमध्ये फक्त सुट्टीसाठी गेले होते. येहुदिथलाही शालोम श्तार्क्स किंवा त्याचा लंडनमध्येच असलेला भाऊ ओव्हादिया श्तार्क्स यांच्याकडून काहीही समजू शकलं नव्हतं. येशिवांमध्ये गेलेल्या एजंट्सचं धार्मिक ज्ञान चांगलंच सुधारलं होतं, पण योसेल कुठे आहे याचा काहीही पत्ता लागला नव्हता. सर्वात वाईट अवस्था झाली होती ती सात्मार वसाहतीत शिरकाव करू पाहणाऱ्या एजंट्सची. तिथल्या लोकांनी ताबडतोब ते कोण आहेत ते ओळखलं आणि त्यांना सरळ पोलिसांच्या ताब्यात दिलं. इझरेली राजदूताला स्वतःचं वजन खर्च करून त्यांना तुरुंगातून बाहेर काढावं लागलं.
पॅरिसमध्ये आत्तापर्यंत केलेल्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी हॅरेलने घेतलेल्या बैठकीत या सगळ्या एजंट्सनी सरळ हात वर केले. हा मुलगा शोधून काढणं अशक्य आहे असंच सर्वांचं मत होतं.
पण हॅरेल हार मानायला तयार नव्हता. त्याचा चिवट आणि जिद्दी स्वभाव त्याला हार मानू देत नव्हता. सगळ्या एजंट्सनी नकारात्मक प्रतिक्रिया दिल्यावर तो उलट नव्या जोमाने या कामगिरीमागे लागला. आणि लवकरच त्याला एक अंधुकसा प्रकाशाचा किरण दिसला.
पॅरिसमधला मोसाद प्रतिनिधी होता याकोव्ह कारोझ. एखाद्या कॉलेज
प्रोफेसरसारखा दिसणारा कारोझ हॅरेलबरोबरच रात्रंदिवस या प्रकरणासाठी काम
करत होता. एप्रिलच्या शेवटी त्याने हॅरेलसाठी एक बातमी आणली होती.
ही बातमी आली होती बेल्जियममधल्या अँटवर्प शहरातून. हिऱ्यांच्या
व्यापारासाठी अँटवर्प जगद्विख्यात आहेच. हा व्यापार काही ज्यू
कुटुंबांमध्ये अनेक शतकं वंशपरंपरागत चालू आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या
काळात या ज्यूंनी नाझींना खंडणी देऊन बेल्जियममधल्या अनेक गरीब आणि
मध्यमवर्गीय ज्यूंचा जीव वाचवला होता आणि नाझीविरोधी भूमिगत चळवळींना
गुप्तपणे आर्थिक मदतही केली होती. मायर या नावाने वावरणाऱ्या एका मोसाद
एजंटने या ज्यू कुटुंबांच्या वर्तुळात प्रवेश मिळवला होता. त्याला तिथे असं
समजलं होतं की हे सगळे हिरे व्यापारी त्यांच्या व्यापारातल्या कुठल्याही
अडचणीच्या वेळी राब्बाय इत्झीकेल या धर्मगुरूचा सल्ला घेतात आणि त्याने
दिलेला निर्णय हा त्यांच्यासाठी एखाद्या कायद्याप्रमाणेच असतो. राब्बाय
इत्झीकेलच्या निकटवर्तीयांकडून मायरला या व्यापाऱ्यांनी दुसऱ्या महायुद्धात
केलेल्या कामगिरीविषयी समजलं होतं.
तेव्हा त्यांनी मायरला एका स्त्रीविषयी सांगितलं होतं. सोनेरी केस आणि निळे डोळे असणारी ही स्त्री अतिशय सुंदर होती. ती मुळात फ्रेंच कॅथॉलिक होती पण गेस्टापोच्या तावडीतून फ्रान्समधल्या ज्यूंना वाचवण्यासाठी तिने अनेक धोकादायक कामगिऱ्या पार पाडल्या होत्या. या कामात राब्बाय इत्झीकेलसुद्धा सहभागी होता. ही स्त्री त्याच्या व्यक्तिमत्वाने इतकी प्रभावित झाली की तिने आपला धर्म सोडून ज्यू धर्म स्वीकारला. आता सध्या ती या हिरे व्यापाऱ्यांच्या सिंडिकेटसाठी काम करत होती. त्यांच्या कामासाठी ती जगभर फिरत असे. त्यात इझराईलचाही समावेश होता. तिच्या पहिल्या लग्नापासून तिला क्लॉड नावाचा मुलगा होता आणि त्यानेही ज्यू धर्म स्वीकारला होता आणि स्वित्झर्लंडमधल्या येशिवामध्ये काही वर्षे शिकल्यानंतर तो आता जेरुसलेममधल्या एका नामांकित धार्मिक शाळेत शिकत होता. पण सध्या ती कुठे आहे, हे या व्यापाऱ्यांपैकी कुणालाच माहित नव्हतं.
मायरकडून हे ऐकताना त्याने सांगितलेल्या एका वाक्याने हॅरेलने कान टवकारले – “या व्यापाऱ्यांच्या मते ही स्त्री एकमेवाद्वितीय आहे. ती कर्मठ ज्यूंचं नियमबद्ध जग आणि हिऱ्यांचं झगमगीत जग या दोन्हीही ठिकाणी सारख्याच सहजतेने वावरू शकते.”
हॅरेलसाठी इतकं पुरेसं होतं. जर या कर्मठ ज्यूंनी योसेलचं अपहरण करून त्याला इझराईलबाहेर काढलं असेल आणि त्याला परत अशा प्रकारे गायब केलं असेल, की मोसादच्या अत्यंत हुशार एजंट्सनाही त्याचा सुगावा लागू शकत नसेल, तर त्यांना नक्कीच कोणत्यातरी अनुभवी व्यक्तीने मदत केलेली आहे. आणि ही फ्रेंच स्त्री, जी या दोन परस्परविरोधी जगांमध्ये सारख्याच सहजतेने वावरतेय, ती याच्या पाठीमागे असण्याची दाट शक्यता आहे. जसजसा हॅरेल यावर विचार करत गेला, तसतसा आपला हा विचार बरोबर असल्याचं त्याला आतून जाणवायला लागलं आणि त्याने बाकीचे सगळे धागेदोरे सोडून देऊन या स्त्रीवर लक्ष केंद्रित करायचा निर्णय घेतला. तिचा मुलगा इझराईलमध्ये असल्याचं त्याला समजलं होतंच. आपल्याला समजलेली सगळी माहिती त्याने इझराईलमध्ये कळवली आणि या स्त्रीच्या मुलाला शोधून काढायला सांगितलं. त्याच्या अपेक्षेप्रमाणे हे काम एका दिवसात झालं. या मुलाचं नाव त्याने धर्म बदलल्यावर एरिअल असं ठेवलं गेलं होतं. त्याच्या आईचं मूळ फ्रेंच नाव होतं मॅडेलिन फेरेल आणि ज्यू धर्म स्वीकारल्यावर तिचं नाव होतं रूथ बेन डेव्हिड.
तिच्याविषयी माहिती गोळा करायला हॅरेलने सुरुवात केली. जे समजलं ते खूपच रोचक होतं. तिचा जन्म फ्रान्समध्ये एका धार्मिक कॅथॉलिक कुटुंबात झाला होता. पॅरिसच्या सोर्बोन विद्यापीठातून तिने उच्च शिक्षण घेतलं होतं आणि शिक्षण पूर्ण केल्यावर तिच्या कॉलेजमधल्या हेन्री नावाच्या प्रियकराशी लग्न केलं होतं. तिच्या मुलाचा जन्म दुसरं महायुद्ध सुरु झाल्यानंतर झाला होता आणि फ्रान्सचा जून १९४० मध्ये पाडाव झाल्यानंतर ती कॉर्सिकन क्रांतिकारकांच्या मॅक्विस या नाझीविरोधी भूमिगत चळवळीत सहभागी झाली होती. त्याच वेळी ती बेल्जियममधल्या हिरे व्यापारी असलेल्या ज्यूंच्या संपर्कात आली होती आणि राब्बाय इत्झीकेलच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन तिने ज्यू धर्म स्वीकारला होता.
कदाचित त्यामुळेच १९५१ मध्ये हेन्री आणि तिचा घटस्फोट झाला होता. घटस्फोटानंतर तिने जर्मनीच्या आल्सेस प्रांतातल्या एका ज्यू राब्बायबरोबर दुसरं लग्न केलं होतं आणि तिच्या मुलासह तिघेही इझराईलमध्ये स्थायिक झाले होते. पण इझराईलमध्ये ती आणि तिचा पती यांच्यात काही मुद्द्यांवरून कडाक्याची भांडणं झाली होती आणि तिचा लगेचच दुसरा घटस्फोट झाला होता.
कदाचित त्यामुळेच ती जास्तीतजास्त कर्मठतेकडे झुकली होती आणि जेरुसलेममध्ये राब्बाय मेझीशच्या संपर्कात आली होती. मेझीशचं नाव योसेलच्या अपहरणाच्या संदर्भात आधी आलं होतं. त्याने सुरुवातीला नाह्मान श्तार्क्सला योसेलला सोडून द्यायचा आदेश द्यायचं कबूल केलं होतं पण आयत्या वेळी आपला शब्द फिरवला होता. त्याचं कारण काय असावं याचा अंदाज हॅरेलला आला होता, पण अजूनही त्याला काही निश्चित समजत नव्हतं.
मॅडेलिन उर्फ रूथचा पत्ता म्हणजे फ्रान्समधलं एक्स ले बेन्स या पॅरिसच्या जवळ असलेल्या एका छोट्या शहरातलं एक ज्यू स्त्रियांसाठी असलेलं वसतिगृह होतं. तिच्याबद्दल चौकशी करताना हॅरेलच्या हातात तिने इझराईलला दिलेल्या भेटींविषयी माहिती पडली. तिने गेल्या काही वर्षांत इझराईलला दोनदा भेट दिली होती. दुसऱ्या वेळी तिने इझराईल २१ जून १९६० या दिवशी सोडला होता आणि त्यावेळी तिच्याबरोबर तिची क्लॉडिन नावाची ७-८ वर्षांची छोटी मुलगी होती. दोघीही अलइटालियाच्या फ्लाईटने तेल अवीवहून झुरिकला गेल्या होत्या. पण त्याच वेळी तिचा मुलगा एरिअल इझराईलमध्येच होता. मग ही मुलगी कोण होती?
आपण योग्य मार्गावर आहोत याची आता हॅरेलला खात्री पटली होती. तिला शोधून काढायचा आदेश त्याने आपल्या एजंट्सना दिला.
याकोव्ह कारोझ आणि इतर एजंट्स त्याप्रमाणे एक्स ले बेन्स इथे गेले आणि त्यांना ती तिथे दिसली. ती तिथे एखादी गाडी थांबवून पॅरिसला जाणार का असं विचारत होती. तिला लिफ्ट देण्यासाठी एजंट्सनी गाडी वळवण्याआधीच ती दुसऱ्या एका गाडीतून निघून गेली.
एजंट्सनी आता एक्स ले बेन्समध्ये चौकशी करायला सुरुवात केली पण
त्यांच्या हातात काही लागलं नाही. शेवटी त्यांनी तिच्या वसतिगृहातल्या
खोलीत गुपचूप शिरून काही मिळतं का ते बघायचं ठरवलं. आणि इथे त्यांच्या
प्रयत्नांना फळ आलं. रुथ बेन डेव्हिडच्या वडिलांचं एक जुनं, मोठं घर
फ्रान्सच्या ऑर्लिन्स शहरात होतं. हा भाग फ्रान्समधला अत्यंत सुंदर भाग
समजला जातो. रूथ हे घर विकू इच्छित होती. तिने वर्तमानपत्रांत
त्याच्याबद्दल जाहिरातीसुद्धा दिल्या होत्या. एजंट्सनी तिने जाहिरातीत
दिलेल्या पोस्ट बॉक्स नंबरवर एक पत्र पाठवलं. त्याआधी त्यांनी एका ज्यू
रिअल इस्टेट एजंटकडून तिच्या घराची किंमत जाणून घेतली आणि तिला या पत्रात
तिला हव्या असलेल्या किंमतीपेक्षा जास्त किंमत द्यायला तयार असल्याचं
सांगितलं. तिनेही या पत्राला उत्तर पाठवलं. ती या व्यवहाराला तयार होती. २१
जून १९६२ या दिवशी पॅरिसमधल्या एका मोठ्या हॉटेलच्या लॉबीमध्ये भेटून हा
सगळा व्यवहार पूर्ण करायचं ठरलं.
हॅरेलने त्याच वेळी तिच्या मुलाला, एरिअलला इझराईलमध्ये अटक करायची आणि
तिच्यावर दबाव आणायचा असं ठरवलं होतं. एरिअलला योसेलबद्दल बऱ्याच गोष्टी
माहित असण्याची शक्यता होती. त्यामुळे फ्रान्समध्ये रूथ आणि इझराईलमध्ये
तिचा मुलगा अशा दोघांकडून माहिती मिळवून आपल्याला योसेलबद्दल नक्की काय ते
कळू शकेल अशी अटकळ हॅरेलने बांधली होती.
२१ जून १९६२ या दिवशी सकाळी १० वाजता पॅरिसच्या हॉटेल लॉबीमध्ये एका अत्यंत देखण्या आणि आपलं सौंदर्य उठून दिसेल असे कपडे घातलेल्या एका स्त्रीने प्रवेश केला. दोन एजंट्स तिथे तिची वाट पाहात होते. त्यांनी पत्रात आपण ऑस्ट्रियन व्यापारी आहोत आणि कंपनी गेस्टहाऊस म्हणून आपल्याला हे घर घ्यायचं आहे असं सांगितलं होतं. दोघेही अस्खलित जर्मन बोलत होते आणि मॅडेलिन उर्फ रूथलाही जर्मन बोलता येत होती. त्यामुळे त्यांनी लगेचच आपला व्यवहार संपवला.
या दोन व्यापाऱ्यांसाठी एकच अडचण होती. त्यांच्या वकिलाला काहीतरी दुसरं काम निघाल्यामुळे तो तिथे येऊ शकला नव्हता. आपण त्याच्या घरी जाऊन सगळ्या कायदेशीर बाबी निपटून टाकू असं दोघा ऑस्ट्रियनांपैकी एकाने सुचवलं. त्याचं घर पॅरिसच्या जवळच शान्तिली इथे होतं.
तिघेही त्यांच्या गाडीने शान्तिलीला पोचले. याकोव्ह कारोझ वकील म्हणून उभा होता. ती त्याच्या ऑफिसमध्ये आल्यावर एजंट्सनी दरवाजा लावून घेतला आणि तिला ती इझरेली एजंट्सच्या कैदेत असल्याचं सांगितलं. ती मटकन खुर्चीवर बसली.
त्याच वेळी जेरुसलेममध्ये तिच्या मुलाला, एरिअलला अटक करण्यात आली.
शान्तिलीमध्ये रुथ आणि जेरुसलेममध्ये एरिअल यांना एजंट्सनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. रुथ उर्फ मॅडेलिन सुरुवातीच्या धक्क्यातून पुष्कळच सावरली होती. याकोव्ह कारोझ आणि व्हिक्टर कोहेन या दोघा एजंट्सनी तिला प्रश्न विचारायला सुरुवात केली. पण ती काहीही सांगायला तयार नव्हती. तिला गोंधळवून टाकण्यासाठी कोहेन आणि कारोझ तिला वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रश्न विचारत होते पण तीही या खेळात मुरलेली होती. जर्मन गेस्टापोच्या डोळ्यांदेखत ज्यूंना फ्रान्समधून बाहेर काढायचा तिला अनुभव होता त्यामुळे इझरेली एजंट्सच्या प्रश्नांना ती शांतपणे तोंड देत होती. तासामागून तास गेले पण एजंट्स तिच्याकडून योसेलबद्दल काहीही वदवून घेऊ शकले नाहीत. शेवटी तिला गोंधळात पडण्यासाठी कोहेनने तिच्याशी इतर विषयांवर गप्पा मारायला सुरुवात केली. त्यामुळे तिचा विरोध थोडाफार कमी होईल असं त्याला वाटत होतं. कारोझने त्याच वेळी तिच्यावर वाट्टेल ते आरोप करायला सुरुवात केली, जेणेकरून ती विचलित होईल. पण तसं काहीही झालं नाही. तिच्या तोंडून बाहेर पडणारी कुठलीही माहिती एजंट्स नोंद करून ठेवत होते आणि इझराईलला पाठवत होते – तिथे एरिअलला प्रश्न विचारणाऱ्या एजंट्सच्या मदतीसाठी.
एरिअलच्या प्रश्नोत्तरांमधून मात्र एजंट्सना बरीच माहिती मिळाली. तिथे त्यांनी त्याला त्याच्या आईने फ्रान्समध्ये एजंट्सना सगळी माहिती पुरवलेली आहे, असं खोटं सांगितलं. त्याचाही त्यावर विश्वास बसला आणि त्याने योसेलबद्दल त्याला असलेली सगळी माहिती द्यायचं कबूल केलं, पण त्याआधी त्याने स्वतःसाठी आणि त्याच्या आईसाठी त्यांच्यावर कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही अशी हमी मागितली.
अमोस मॅनॉरने स्वतः अॅटर्नी जनरलशी बोलून ही हमी दिल्यावर एरिअलने
बोलायला सुरुवात केली. योसेलला त्याच्या आईनेच स्वतःची मुलगी म्हणून
इझराईलच्या बाहेर काढलं होतं. त्यासाठी त्याचा क्लॉडिन फेरेल या नावाने
पासपोर्ट बनवण्यात आला होता. इझराईलच्या बाहेर पडल्यावर रूथने योसेलला
स्वित्झर्लंडला नेऊन एका येशिवामध्ये ठेवलं होतं. त्याच्यापुढे काय झालंय
आणि आत्ता सध्या योसेल कुठे आहे, त्याबद्दल एरिअलला काहीही माहित नव्हतं.
एरिअलने सांगितलेली ही माहिती शान्तिलीला पाठवण्यात आली. इकडे रुथला तिच्या
मुलाला जेरुसलेममध्ये अटक झाली आहे, हे माहितच नव्हतं. जेव्हा ते तिला
सांगण्यात आलं तेव्हा ती निःस्तब्ध झाली. त्याने सगळं मान्य केलेलं आहे आणि
त्यामुळे त्याला कदाचित जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते हेही तिला सांगण्यात
आलं. एरिअलला असं काहीही होणार नाही, याची हमी मिळालेली होती, पण ते जर
रुथला सांगितलं, तर त्याचा उलटा परिणाम होईल असं एजंट्सना वाटलं, म्हणून
त्यांनी तिला खोटंच सांगितलं.
तिने एक क्षणभर एजंट्सकडे पाहिलं आणि ती थंडपणे म्हणाली, “तुम्ही त्याला फासावर लटकवलं तरी हरकत नाही. तो माझा मुलगा नाही. माझा मुलगा मला मेला.”
हे उत्तर ऐकून एजंट्स हादरले. ही स्त्री असामान्य आहे आणि कुठल्याही धमक्यांचा तिच्यावर परिणाम होणार नाही हे त्यांच्या लक्षात आलं.
शान्तिलीमधली प्रश्नोत्तरं स्वतः इसेर हॅरेल पाहात आणि ऐकत होता. आता आपण सगळी सूत्रं हातात घ्यायची वेळ आलेली आहे हे त्याच्या लक्षात आलं.
इतका वेळ तिचं आणि तिच्या वागणुकीचं निरीक्षण केल्यावर एक गोष्ट हॅरेलच्या लक्षात आली होती की या स्त्रीवर भीती, धमक्या, दबाव यांचा काहीही परिणाम होणार नाही. ती मानसिकदृष्ट्या अत्यंत कणखर होती. तिच्या मुलाला काही झालं तरी तिला फरक पडत नव्हता. त्यामुळे तोही मुद्दा निकालात निघाला होता. आता फक्त एकच गोष्ट तिचं मन बदलवू शकत होती. नैतिकता आणि सदसदविवेकबुद्धी. त्याच मुद्द्यावरून तिच्याशी बोलायचं हॅरेलने ठरवलं. ती जरी कट्टर ज्यू असली, तरी तिचा जन्म अशा कर्मठ ज्यू घरात झाला नव्हता. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत धर्म महत्वाचा असा विचार ती करणार नाही असा हॅरेलचा अंदाज होता.
“मी इसेर हॅरेल. मी इझराईलच्या सरकारकडून आलोय,” हॅरेलने अत्यंत काळजीपूर्वक बोलायला सुरुवात केली, “तुझ्या मुलाने आम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि आम्हाला तुझ्याविषयी बरीच माहिती आहे. तुला अशा परिस्थितीत आम्हाला आणावं लागलं त्याबद्दल सर्वप्रथम मी तुझी इझराईलच्या सरकारच्या वतीने माफी मागतो. तू आमच्या धर्मात प्रवेश केलेला आहेस. ज्यू धर्म आणि इझराईल या दोन गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या असू शकत नाहीत. योसेलच्या अपहरणाने इझराईलच्या पायालाच धक्का लागलेला आहे. संपूर्ण देशभर धार्मिक, पुराणमतवादी ज्यूंबद्दल असंतोष आणि संतापाची भावना आहे. यादवी युद्धही भडकू शकतं. आणि या सगळ्याला एक प्रकारे तू जबाबदार असशील. जर उद्या त्या मुलाला काही झालं, तो आजारी पडला, त्याचा मृत्यू झाला, तर त्याच्या आईवडिलांना तोंड देऊ शकशील तू आणि तुझे सहकारी? तू स्वतः एक आई आहेस. उद्या तुझ्या मुलाला असं उचलून नेलं आणि तुझ्यापासून दूर नेलं – का, तर तू ज्या प्रकारे तुझ्या मुलाला वाढवलं आहेस ते त्यांना पसंत नाही – तर कसं वाटेल तुला? आमचा धर्माशी आणि धार्मिक लोकांशी कुठल्याही प्रकारे वाद नाही. आम्हाला फक्त तो मुलगा हवाय. एकदा तो आमच्या हातात आला, की तू आणि तुझा मुलगा स्वतंत्र असाल.”
रुथ बेन डेव्हिडच्या मनातलं द्वंद्व तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं. एक आई आणि स्त्री एका बाजूला आणि एक कट्टर, कर्मठ ज्यूधर्मीय एका बाजूला. सगळे एजंट्स श्वास रोखून बसले होते. ही योसेलला शोधून काढण्याची शेवटची संधी आहे, हे सर्वांनाच जाणवलं होतं.
शेवटी तिने हॅरेलच्या नजरेला नजर मिळवली, “याची काय खात्री आहे, की तुम्ही इझराईलचे प्रतिनिधी आहात? मी तुमच्यावर विश्वास कसा ठेवू?”
तिच्यावरची नजर अजिबात न हटवता हॅरेलने आपल्या जॅकेटच्या खिशातून आपला पासपोर्ट काढून तिच्या हातात दिला. तिने तो लक्षपूर्वक पाहिला, परत दिला आणि मान खाली घातली.
“तो मुलगा गार्टनर नावाच्या कुटुंबाकडे आहे. १२६, पेन स्ट्रीट, ब्रुकलीन, न्यूयॉर्क. ते त्याला यांकेल या नावाने हाक मारतात.”
हॅरेल उठून उभा राहिला, “धन्यवाद. ज्या क्षणी तो आम्हाला मिळेल, त्या क्षणी तू आणि तुझा मुलगा यांची सुटका होईल.”
जेव्हा ही माहिती इझराईलच्या न्यूयॉर्कमधल्या वकिलातीमध्ये कळवण्यात आली, तेव्हा एक नवाच प्रश्न उभा राहिला. गार्टनर कुटुंब राहात असलेला भाग ब्रुकलीनमधला कर्मठ ज्यूंचा भाग होता. त्याच वर्षी कॉंग्रेसच्या, म्हणजे अमेरिकेच्या संसदेच्या निवडणुका होत्या आणि हा भाग म्हणजे जवळजवळ एक लाख मतदार होते. त्यामुळे जेव्हा स्थानिक पोलिसांची मदत घ्यायचा प्रयत्न इझरेली अधिकाऱ्यांनी केला, तेव्हा त्यांनी सरळ हात वर केले. निरुपायाने एफ.बी.आय.ची मदत घ्यायचं इझरेली अधिकाऱ्यांनी ठरवलं. एफ.बी.आय.ने १०० टक्के खात्री असल्याशिवाय कुठलीही कारवाई करायला नकार दिला. जेव्हा इझरेली अधिकाऱ्यांनी स्वतः खात्री करून घेण्याची तयारी दाखवली, तेव्हा एफ.बी.आय. त्यालाही तयार होईना.
शेवटी वैतागून हॅरेलने अमेरिकेतला इझराईलचा राजदूत अॅव्हरम हार्मनला फोन केला आणि आपल्याला अमेरिकेचा अॅटर्नी जनरल आणि राष्ट्राध्यक्ष जॉन एफ.केनेडींचा भाऊ रॉबर्ट केनेडीशी बोलू द्यावं अशी मागणी केली. त्याची अर्थातच रॉबर्ट केनेडीशी बोलायची इच्छा नव्हती, पण या धमकीचा परिणाम होईल असं त्याला वाटलं होतं, कारण जेव्हा आइकमनच्या अपहरणाची बातमी जगजाहीर झाली, तेव्हा इझराईलचं कौतुक करणाऱ्यांमध्ये रॉबर्ट केनेडी पहिला होता.
शेवटी एफ.बी.आय.ने खात्री करून घेतली आणि योसेलला तिथून बाहेर काढून इझरेली अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिलं.
४ जुलै हा अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन. १९६२ मध्ये तो इझराईलनेपण साजरा केला.
त्या दिवशी योसेलला घेऊन इझरेली अधिकारी तेल अवीवमध्ये परत आले. जवळजवळ
अडीच वर्षांनी आयडा आणि योसेल भेटले.
आइकमनच्या यशस्वी अपहरणानंतर इसेर हॅरेलच्या शिरपेचात अजून एक तुरा खोवला गेला. त्याच्या सहकाऱ्यांनी तो त्याच्या पॅरिसमधल्या ऑफिसमध्ये काम करत असताना ज्या पलंगावर झोपायचा, त्या पलंगाला योसेल्स बेड असं नाव दिलं होतं. त्याला त्यांनी तोच पलंग भेट म्हणून दिला. त्याचबरोबर ऑपरेशन टायगर कबची आठवण म्हणून एक वाघाच्या पिल्लाचं खेळणंही दिलं, जे हॅरेल शेवटपर्यंत पेपरवेट म्हणून वापरत असे.
कर्मठ, कडव्या ज्यूंच्या संघटना एखाद्या गुप्तचर संघटनेपेक्षा कमी नाहीत हे हॅरेलला समजलं होतंच. त्यामुळे अशा लोकांनाही मोसादमध्ये एजंट्स म्हणून भरती करायचा त्याने निर्णय घेतला. त्याची सुरुवात तो रुथ बेन डेव्हिड उर्फ मॅडेलिन फेरेलपासून करणार होता. केवळ तिच्या एका चुकीमुळे – ती योसेलला मुलीच्या वेशात इझराईलबाहेर घेऊन जात असताना तिचा मुलगा इझराईलमध्येच असणं – ती पकडली गेली. पण तिच्या व्यक्तिमत्वामुळे आणि निष्ठेमुळे हॅरेल एवढा प्रभावित झाला, की त्याने तिला मोसादमध्ये यायची ऑफर द्यायचं ठरवलं होतं, पण त्याआधीच ती गायब झाली. या घटनेनंतर ३ वर्षांनी मोसाद एजंट्सना ती जेरुसलेममध्ये सापडली. त्यावेळी तिने नेतुराई कार्ता या कडव्यांमध्येही कडव्या असलेल्या ज्यू पंथाच्या प्रमुखाशी, राब्बाय अॅमराम ब्लाऊशी लग्न केलेलं होतं.
योसेलने शिक्षण पूर्ण झाल्यावर इझरेली सैन्यात प्रवेश केला. नंतर त्याने आयबीएम साठी काम केलं आणि सध्या तो इझराईलमध्ये निवृत्त जीवन जगतो आहे आणि आपल्या फावल्या वेळात तो कर्मठ ज्यू आणि पुरोगामी ज्यू यांच्यातले संबंध सुधारण्यासाठी व्याख्यानं आणि इतर कार्यक्रम आयोजित करतो.
क्रमशः
माद्रिद, स्पेन. १९६३ च्या ऑगस्ट महिन्यात एका कंपनीच्या ऑफिसमध्ये तिच्या मालकाला भेटायला दोघेजण आले होते. हा मालक ऑस्ट्रियन होता. त्यांनी स्वतःची ओळख नाटो (North Atlantic Treaty Organization) देशांच्या गुप्तचर संस्थांचे अधिकारी अशी करून दिली. ते त्याच्या माजी पत्नीच्या शिफारशीवरून त्याला भेटायला आले होते. त्यांच्याकडे त्याच्यासाठी एक ऑफर होती. अशी ऑफर, जी तो नाकारू शकतच नव्हता....
थोड्याच वेळात या पाहुण्यांना आपल्याविषयी बरंच काही माहित आहे, हे त्याला समजून चुकलं. त्याचं नाव तसं प्रसिद्ध होतंच. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मनीमध्ये आणि जर्मनीच्या शत्रूंमध्येसुद्धा त्याचा दबदबा होता. तो सैन्यात जाण्याआधी एक नावाजलेला अॅथलीट होता आणि एस.एस.च्या कमांडो सर्व्हिसमधल्या अत्यंत धाडसी कमांडोजपैकी एक म्हणून त्याचा नावलौकिक होता. या लौकिकाला साजेशी अफलातून कामगिरी त्याने करून दाखवली होती.
१९४३ मध्ये इटलीमध्ये दुसरं महायुद्ध, हिटलर आणि नाझी जर्मनी यांच्याविरुद्ध प्रचंड असंतोष उफाळला होता. त्याचं एक कारण इटालियन सैन्याची युद्धातली अत्यंत खराब कामगिरी हे होतंच, पण लोक २१ वर्षांच्या फॅसिस्ट राजवटीला आणि दडपशाहीला कंटाळले होते, हेही तितकंच खरं होतं. इटलीचे राजे व्हिक्टर इमॅन्युअल यांनी या सगळ्या असंतोषाचं लक्ष्य असलेल्या हुकूमशहा बेनितो मुसोलिनीकडून राजीनामा मागितला होता. मुसोलिनीने फॅसिस्ट पक्षाच्या ग्रँड कौन्सिलमध्ये स्वतःची बाजू मांडण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण बाकीचे कोणीही त्याचं ऐकायला तयार नव्हते. त्याचा राजीनामा तिथल्या तिथे घेण्यात आला, आणि त्याला अटक करण्यात आली.
इटलीच्या उत्तर भागात त्यावेळी जर्मन सैन्य होतं आणि या सैन्याची तिथल्या जनतेमध्ये दहशत होती. त्यामुळे मुसोलिनीला इटलीच्या नवीन सरकारने एका वेगळ्याच ठिकाणी कैदेत ठेवलं - इटलीमधल्या अॅपेनाईन पर्वतराजीमधलं सर्वात उंच शिखर असलेल्या ग्रॅन सॅसो या पर्वतावर असलेल्या काम्पो इंपरेटर हॉटेलमध्ये. मुसोलिनीला सोडवण्याचा प्रयत्न जर्मन सैन्य करणार, हे उघड होतं, पण इथपर्यंत पोचणं आणि कडेकोट पहाऱ्यातून मुसोलिनीला बाहेर काढणं अवघड नव्हे, तर अशक्य कोटीतली गोष्ट होती. पण १२ सप्टेंबर १९४३ या दिवशी ग्लायडर्सच्या सहाय्याने या पर्वतशिखरावर आपल्या काही मोजक्या सहकाऱ्यांबरोबर उतरून या जर्मन कमांडोने मुसोलिनीची सुटका केली आणि तो त्याला हिटलरकडे घेऊन आला. या अचाट आणि अतर्क्य धाडसाच्या बातम्या जर्मनीतच नव्हे, तर जगभर सर्वत्र पसरल्या. आणि त्याचं नावही. एस.एस.कॅप्टन ओट्टो स्कोर्झेनी.
पुढे जून १९४४ मध्ये ब्रिटीश आणि अमेरिकन सैन्याने इंग्लिश खाडी ओलांडून
नॉर्मंडी इथे जर्मनीविरुद्ध पश्चिम आघाडी उघडली. फ्रान्सच्या
स्वातंत्र्याबरोबरच बेल्जियम आणि हॉलंड हे देश मुक्त करणं आणि तिथून
जर्मनीमध्ये शिरण्याचा प्रयत्न करणं आणि जर्मनीचा औद्योगिक दृष्ट्या
महत्वाचा –हुर हा भाग ताब्यात घेणं ही या सैन्यदलांची महत्वाच उद्दिष्टं
होती. त्यासाठी त्यांनी डिसेंबर १९४४ मध्ये आर्देन्स या घनदाट अरण्यांनी
भरलेल्या फ्रान्स-बेल्जियम सीमारेषेवरच्या प्रदेशातून बेल्जियममध्ये
शिरायचा प्रयत्न केला. तेव्हा स्कोर्झेनी आणि त्याच्या ४० जणांच्या वाफेन
एस.एस. पथकाने अमेरिकन सैनिकांसारखे गणवेश घालून अमेरिकन सैन्यावर हल्ला
चढवला आणि गोंधळ माजवला. त्यामुळे ‘युरोपमधला सर्वात धोकादायक माणूस’ हा
किताबही त्याला मिळाला होता आणि तोही त्याच्या शत्रूंकडून.
युद्धानंतर डाखाऊ छळछावणीमधल्या अधिकाऱ्यांवर भरलेल्या खटल्यामध्ये
स्कोर्झेनीचाही समावेश होता, पण तो त्यातून निर्दोष सुटला. त्यानंतर तो
स्पेनमध्ये स्थायिक झाला.
१९६३ मध्ये त्याला भेटायला आलेल्या या दोघाजणांना हा इतिहास पूर्णपणे माहित होता. त्यांनी फार वेळ न घालवता मुद्द्याच्या गोष्टी बोलायला सुरुवात केली.
“आम्ही नाटोकडून आलेलो नाही,” त्यांच्यातला एकजण म्हणाला, “इझराईलमधून आलोय.”
स्कोर्झेनीने त्यांच्याकडे रोखून पाहिलं. “मी रफी एतान,” तो माणूस म्हणाला, “आणि हा अॅव्हनर अहितुव, मोसाद स्टेशन चीफ, पश्चिम जर्मनी.”
स्कोर्झेनी बुचकळ्यात पडला. मोसादचं त्याच्यासारख्या पूर्वाश्रमीच्या नाझी सैनिकाकडे काय काम असू शकतं?
“काळजी करू नकोस. आमच्याकडून तुला सध्यातरी काहीही धोका नाहीये,” एतान म्हणाला, “आम्हाला तुझी मदत हवी आहे. तुझ्या इजिप्तमध्ये बऱ्याच ओळखी आहेत असं ऐकलंय आम्ही.”
२१ जुलै १९६२ या दिवशी, म्हणजे योसेल शूशमाकर इझराईलमध्ये आल्यानंतर अवघ्या दोन आठवड्यांत इजिप्तचा राष्ट्राध्यक्ष गमाल अब्दुल नासरने दोन क्षेपणास्त्रांचं अनावरण करून संपूर्ण जगाला धक्का दिला. यातल्या एका क्षेपणास्त्राचा पल्ला होता १७५ मैल तर दुसऱ्याचा ३५० मैल. पहिल्याचं नाव होतं अल झाफिर आणि दुसऱ्याचं अल काहिर. २३ जुलै हा इजिप्तमध्ये झालेल्या राज्यक्रांतीचा वर्धापनदिन. त्या दिवशी कैरोच्या रस्त्यांवरून या दोन्ही क्षेपणास्त्रांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. कैरोमधल्या प्रसिद्ध तेहरीर चौकात भाषण करताना नासरने ही दोन्ही क्षेपणास्त्रं बैरूतच्या दक्षिणेला असलेलं कुठलंही लक्ष्य भेदू शकतात, हे जाहीर केलं आणि इझरेली नेत्यांचं धाबं दणाणलं. नासरच्या दाव्यामुळे नव्हे, तर या क्षेपणास्त्रांविषयी काहीही माहित नसल्यामुळे.
लोकांनी आणि राजकीय नेत्यांनी ताबडतोब मोसाद आणि खासकरून इसेर हॅरेलवर आगपाखड करायला सुरुवात केली. जेव्हा नासर आपली क्षेपणास्त्रं बनवत होता, तेव्हा हॅरेल काय करत होता? तर एका लहान मुलाला शोधण्यात गर्क होता. नासरने जरी स्पष्ट शब्दांत उल्लेख केला नसला, तरी बैरुतच्या दक्षिणेला याचा अर्थ उघड होता. जेव्हा नासर इझराईलच्या अस्तित्वालाच आव्हान देत होता, तेव्हा हॅरेलचे लोक त्याचा पाठपुरावा करण्याऐवजी एका येशिवामधून दुसऱ्या येशिवामध्ये योसेलच्या शोधात आपला वेळ आणि शक्ती वाया घालवत होते.
जेव्हा या टीकेचा सूर टिपेला पोचला, तेव्हा पंतप्रधान बेन गुरियननी हॅरेलला भेटायला बोलावलं आणि त्याने एका आठवड्याच्या आत याचा छडा लावायचं कबूल केलं आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे ऑगस्टमध्ये पंतप्रधानांसमोर त्याला मिळालेली माहिती ठेवली – इजिप्तमधली क्षेपणास्त्रं बनवण्यात जर्मन शास्त्रज्ञांचा सहभाग होता.
१९६० मध्ये नासरने इजिप्तचं शस्त्रागार नव्या, अपारंपरिक शस्त्रांनी सुसज्ज करायचा निर्णय घेतला. त्यात प्रामुख्याने जेट विमानं, रॉकेट्स आणि क्षेपणास्त्रांचा समावेश असणार होता. त्याचबरोबर नासरला गुप्तपणे किरणोत्सारी आणि रासायनिक अस्त्रांचाही पर्याय वापरून पहायचा होता. या प्रकल्पाचा प्रमुख म्हणून त्याने जनरल महमूद खलील या माजी वायुदल प्रमुखाची नेमणूक केली. जेव्हा खलीलने पैशांबद्दल विचारलं, तेव्हा नासरचं उत्तर होतं – त्याची काळजी तू करू नकोस.
खलीलपुढे आता या प्रकल्पासाठी काम करायला तयार असणाऱ्यांना शोधायचं आव्हान होतं आणि त्याला हे लोक कुठे मिळतील ते माहित होतं. त्याच्या हस्तकांनी संपूर्ण युरोपात फिरून जर्मन शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांना इजिप्तमध्ये यायची आणि काम करायची ऑफर द्यायला सुरुवात केली. यातल्या बहुसंख्य लोकांनी महायुद्धापूर्वी आणि युद्धादरम्यान जर्मनीमध्ये असलेल्या अणुविज्ञान, अवकाशविज्ञान आणि तंत्रज्ञानविषयक संशोधन केंद्रांमध्ये आणि प्रयोगशाळांमध्ये काम केलं होतं. बरेच जण नाझी पक्षाचे किंवा एस.एस. चे सदस्यही होते आणि ज्यू द्वेष्टेदेखील. त्यामुळे इजिप्तमध्ये येऊन काम करायला ते लगेचच तयार झाले. पैसा हा मुद्दा अडचणीचा नसल्यामुळे या लोकांना गलेलठ्ठ पगार आणि इतर सुखसुविधा पुरवण्यात येणार होत्या. त्याची भुरळ पडून अनेक शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ जर्मनीमधून इजिप्तमध्ये दाखल झाले आणि त्यांनी इजिप्तमध्ये गुप्तपणे ३ कारखाने उभारले. नासरच्या मंत्र्यांनाही याची कल्पना देण्यात आली नव्हती.
या ३ कारखान्यांपैकी पहिल्याचं नाव होतं फॅक्टरी ३६. विमानांच्या उभारणीसाठी जगद्विख्यात असलेला विली मेसरश्मिट इथे इजिप्तसाठी एक लढाऊ जेट विमान विकसित करत होता. त्याची रचना असलेली आणि त्याच्या नावाने ओळखली जाणारी मेसरश्मिट विमानं ही जर्मन वायुदल लुफ्तवाफची सर्वात धोकादायक विमानं होती.
दुसरा कारखाना १३५ या क्रमांकानेच ओळखला जात असे. तिथे फर्डिनांड ब्रॅडनर नावाचा तंत्रज्ञ मेसरश्मिटच्या विमानांसाठी जेट इंजिन्स बनवत होता. ब्रॅडनरने अनेक वर्षे रशियामध्ये काम केलं होतं, आणि तो जर्मनीत परत आल्यावर खलीलच्या हस्तकांशी त्याची भेट झाली होती आणि त्यांनी त्याला कैरोला येऊन खलीलला भेटण्याची विनंती केली होती. या दोघांच्या भेटीसाठी मध्यस्थी करणारा माणूस होता डॉ.एकार्ट, जो त्यावेळी डेम्लर-बेंझचा एक संचालक होता.
पण सर्वात गुप्त कारखाना होता फॅक्टरी ३३३. इजिप्तच्या वाळवंटात कुठेतरी दडवलेल्या या कारखान्यात एकेकाळी नाझी जर्मनीसाठी काम करणारे तंत्रज्ञ आता इजिप्तसाठी मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्रं बनवत होते.
हॅरेलच्या माहितीनुसार इजिप्तमध्ये या प्रकल्पांवर डिसेंबर १९६० पासून
युद्धपातळीवर काम सुरु झालं होतं आणि त्याचं कारण होतं इझराईल
अण्वस्त्रसज्ज होत असल्याची बातमी. त्याच महिन्यात एका अमेरिकन यू-२
विमानाने
इझराईलमधील दिमोना इथे असलेल्या एका मोठ्या इमारतीचा गुपचूप फोटो काढला
होता. या इमारतीची रचना पाहूनच ती अणुभट्टी आहे हे समजलं असतं. अमेरिका आणि
इतर अण्वस्त्रधारी देशांमध्ये असलेल्या अणुभट्ट्या आणि या इमारतीमध्ये
आश्चर्यकारक साम्य होतं.
जेव्हा ही बातमी जाहीर झाली, तेव्हा अरब राष्ट्रांनी अर्थातच आपला निषेध नोंदवला. अमेरिका आणि सोविएत रशिया यांनीही चिंता व्यक्त केली. पण इझराईलकडून काहीही प्रतिक्रिया आली नाही आणि हा प्रकल्प बंद करण्याचा तर प्रश्नच उद्भवत नव्हता.
नासरने याचमुळे ही क्षेपणास्त्रं विकसित करून इझराईलला चोख प्रत्युत्तर द्यायचं ठरवलं होतं.
इजिप्तमध्ये काम करणाऱ्या जर्मन शास्त्रज्ञांचा प्रमुख होता प्रोफेसर युजीन सँगर. युद्धानंतर त्याने फ्रान्समध्ये व्हेरोनिक नावाच्या एका रॉकेट प्रकल्पावर काम केलं होतं. ही रॉकेट्स जर्मनीने महायुद्धाच्या अगदी शेवटी वापरलेल्या व्ही-१ आणि व्ही-२ या रॉकेट्सवर आधारित होती. तो इजिप्तला येताना आपल्या दोन सहाय्यकांना घेऊन आला होता – पॉल गोर्के आणि वुल्फगांग पिल्झ. गोर्के इलेक्ट्रॉनिक्स आणि क्षेपणास्त्रांमध्ये वापरण्यात येणारी दिशादर्शक प्रणाली (guiding system) या विषयांचा तज्ञ होता. पिल्झने तर विख्यात जर्मन शास्त्रज्ञ वेर्नर फॉन ब्राऊन याच्या हाताखाली व्ही-२ रॉकेटवर काम केलं होतं. इजिप्तमध्ये हान्स क्लाईनवाख्टर हा अजून एक शास्त्रज्ञ त्यांच्याबरोबर काम करत होता. त्याची स्वतःची सुसज्ज प्रयोगशाळा जर्मनीमध्ये लोराच या ठिकाणी स्वित्झर्लंडच्या सीमेजवळ होती. तिथे क्षेपणास्त्रांसाठी अत्याधुनिक दिशादर्शक प्रणाली बनवण्यावर संशोधन चालू होतं. रासायनिक विभागाचा प्रमुख होता डॉ. एर्मीन दादिऊ. तो युद्ध चालू असताना एस.एस. मध्ये होता.
या शास्त्रज्ञांनी इजिप्तच्या गुप्तचर संघटनांच्या मदतीने चार शेल कंपन्या स्थापन केल्या होत्या – इंट्रा, इंट्राहँडेल, पतवाग आणि लिंडा. या कंपन्या क्षेपणास्त्रांसाठी लागणारी सामग्री वेगवेगळ्या स्वरुपात खरेदी करत होत्या. इंट्राहँडेलचा प्रमुख होता डॉ. हाईन्झ क्रुग. या सर्व कंपन्यांमध्ये एक गोष्ट समान होती. प्रत्येकीच्या संचालकांमध्ये हसन कामिल हे नाव होतं. हा माणूस स्वित्झर्लंडमध्ये स्थायिक झालेला इजिप्शियन उद्योगपती होता. त्याचा अजून दोन शेल कंपन्यांमध्ये सहभाग होता – मेको आणि एमटीपी. या दोन कंपन्या सामग्री आणि मनुष्यबळाचा पुरवठा करत होत्या. कामिलव्यतिरिक्त ब्रॅडनर आणि मेसरश्मिट हे दोघे या कंपन्यांचे संचालक होते.
प्रत्यक्ष क्षेपणास्त्रांच्या उभारणीवर काम सुरु झालं होतं १९६१ मध्ये. पण त्या वर्षाच्या शेवटी पश्चिम जर्मन सरकारला युजीन सँगर आणि त्याच्या इजिप्तशी असलेल्या संबंधांबद्दल समजलं होतं आणि त्यांनी त्याला त्याचा पासपोर्ट रद्द करायची धमकी देऊन जर्मनीमध्ये परत बोलावून घेतलं होतं. आता वुल्फगांग पिल्झ हा या संपूर्ण प्रकल्पाचा प्रमुख होता.
जुलै १९६२ पर्यंत या प्रकल्पामधून ३० क्षेपणास्त्रं तयार झाली होती आणि त्यातली दोन कैरोमध्ये २३ जुलैच्या दिवशी दाखवण्यात आली होती.
ऑगस्टमध्ये जेव्हा हॅरेल पंतप्रधान बेन गुरियनना भेटला, तेव्हा त्याने आपल्याबरोबर एक पत्र आणलं होतं. हे पत्र पिल्झने कामिल अझ्झाब या इजिप्शियन सरकारच्या प्रतिनिधीला पाठवलेलं होतं आणि त्यात ९०० क्षेपणास्त्रांसाठी सुमारे सदतीस लाख स्विस फ्रँक्स एवढ्या प्रचंड रकमेची मागणी करण्यात आली होती. रफी एतानच्या लोकांनी हे पत्र मध्येच हस्तगत करून त्याची नक्कल केली होती.
९०० क्षेपणास्त्रांमध्ये इजिप्त डायनामाईट किंवा तत्सम पारंपारिक स्फोटक
पदार्थ ठेवणार नाही यावर इझराईलच्या संरक्षण वर्तुळातल्या सर्वांचं एकमत
होतं. नक्कीच त्यात रासायनिक अस्त्रं, जीवशास्त्रीय अस्त्रं, अणुबॉम्ब
किंवा मग किरणोत्सर्गी कचरा अशा घातक गोष्टी असणार होत्या. जी गुप्तता
पाळण्यात येत होती, त्यावरून तर हे उघड होतं.
त्यावेळी इझराईलच्या सैन्यदलांबरोबर काम करणारे तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञही
नवोदित होते. या माहितीत खरी माहिती किती आणि अतिरंजित किती, याचा त्यांना
अंदाज आला नाही. त्यामुळे मोसादनेही इजिप्त ९०० क्षेपणास्त्रं विकसित करतोय
आणि त्यावरून इझराईलला कायमचं उध्वस्त आणि नष्ट करू शकेल अशा पदार्थांचा
मारा होऊ शकतो, हे गृहीत धरून काम करायला सुरुवात केली.
लवकरच त्यांना या प्रकल्पातला एक कच्चा दुवा लक्षात आला. जर्मन शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ अजूनही दिशादर्शक प्रणालीवर अडकले होते. त्यांना पूर्णपणे निर्दोष आणि वातावरणातल्या बदलांशी जुळवून घेणारी आणि रडारला चकवू शकणारी अशी प्रणाली अजूनही विकसित करता आली नव्हती, आणि जोपर्यंत हे होणार नव्हतं, तोपर्यंत क्षेपणास्त्रं नुसती बनवून काहीही फायदा नव्हता, कारण ती त्यांच्या इच्छित ल्क्ष्यांपर्यंत पोहोचूच शकली नसती.
हे लक्षात आल्यावर हॅरेलने इजिप्तचा हा प्रकल्प उध्वस्त करायचं ठरवलं. पण इजिप्शियन गुप्तचर संस्थांनी प्रकल्पाचे वेगवेगळे भाग अशा प्रकारे विखरून ठेवले होते, की एकाच वेळी संपूर्ण प्रकल्प नष्ट करणं अशक्य होतं. आता हा प्रकल्प थांबवण्याचा एकच मार्ग होता. त्याच्यावर काम करणारे लोक जर सोडून गेले तर तो पुढे नेणं इजिप्शियनांसाठी अशक्य होतं.
आइकमनच्या अपहरणाच्या वेळी डॉ.फ्रित्झ बॉवरने सांगितलेली एक गोष्ट हॅरेलच्या मनात अजूनही होती. पश्चिम जर्मनीमध्ये एकेकाळी नाझी पक्ष आणि एस.एस. यांचे सभासद असलेल्या लोकांनी सरकारमध्ये शिरकाव केलेला असल्यामुळे डॉ.बॉवरने आइकमनबद्दल त्याला समजलेली माहिती इझराईलला पुरवली होती, कारण जर्मन सरकारने आइकमनच्या प्रत्यार्पणासाठी अर्जेन्टिनाकडे पाठपुरावा करणं हे खूप कठीण होतं. सरकारमध्ये असलेल्या नाझी पक्षाच्या हस्तकांनी ते कधीच यशस्वी होऊ दिलं नसतं.
नेमक्या याच मुद्द्यावर हॅरेलच्या मनात जर्मनीविषयी अढी निर्माण झाली होती. त्याचा हळूहळू या गोष्टीवर विशास बसायला लागला होता, की ज्या अर्थी जर्मन सरकार इजिप्तमध्ये काम करणाऱ्या जर्मन शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांना कुठल्याही प्रकारे अडवत नाहीये, याचा एकच अर्थ होऊ शकतो. जर्मन सरकारचीही इझराईलचा नाश व्हावा अशीच इच्छा आहे. त्याने पंतप्रधान बेन गुरियनना जर्मन राष्ट्राध्यक्ष कॉनराड अॅडेनॉवर यांच्याशी बोलून या मुद्द्यावर काहीतरी ठाम निर्णय घेण्याची विनंती केली. बेन गुरियननी नकार दिला. साधारणपणे त्याच वेळी जर्मनीकडून इझराईलला नेगेव्ह वाळवंटाच्या विकासासाठी ५०० कोटी अमेरिकन डॉलर्स एवढं प्रचंड कर्ज मिळालं होतं. त्याचबरोबर इझराईलला जर्मनीकडून विमानं, रणगाडे, तोफा, हेलिकॉप्टर्स अशी प्रचंड लष्करी मदतसुद्धा मिळत होती. इजिप्तमध्ये काम करणाऱ्या जर्मन शास्त्रज्ञांचा मुद्दा उकरून काढून जर्मनीशी वाकडं घेण्याची बेन गुरियनची तयारी नव्हती. तरी हॅरेलला शांत करण्यासाठी त्यांनी त्यावेळी संरक्षण उपमंत्री असलेल्या शिमॉन पेरेस यांना जर्मन संरक्षणमंत्री फ्रान्झ जोसेफ स्ट्राउस यांच्याशी बोलणी करायला सांगितलं.
पण एवढ्यावर हॅरेलचं समाधान होण्यासारखं नव्हतं. ज्यूद्वेष्टे जर्मन शास्त्रज्ञ जर्मन सरकारच्या छुप्या पाठींब्याने इजिप्तशी हातमिळवणी करून इझराईलला नष्ट करण्याचा प्रयत्न करताहेत यावर आता त्याचा पूर्ण विश्वास बसला होता, जरी असं दाखवून देणारा कुठलाही पुरावा नव्हता, तरीही. त्याने स्वतःहून कारवाई करायचा निर्णय घेतला.
११ सप्टेंबर १९६२ या दिवशी सकाळी साडेदहाच्या सुमारास जर्मनीतल्या म्युनिक शहरातल्या शिलरस्ट्रास या रस्त्यावर असलेल्या इंट्रा नावाच्या कंपनीच्या ऑफिसमध्ये एक अरब चेहरेपट्टी असलेला माणूस आला. त्याला कंपनीच्या संचालकांपैकी असलेल्या डॉ.हाईन्झ क्रुग यांना भेटायचं होतं. कंपनीमधला जो सहाय्यक या माणसाला डॉ. क्रुगकडे घेऊन गेला, त्याने क्रुगच्या ऑफिसचा दरवाजा बंद होता होता या माणसाचं जे बोलणं ऐकलं, त्यावरून त्याला जनरल खलीलचा सहाय्यक अधिकारी असलेल्या कर्नल नादिमने पाठवलं होतं. थोड्या वेळाने क्रुग आणि हा माणूस बाहेर पडले. नंतर क्रुग गायब झाला.
पोलिसांनी तपास केल्यावर त्यांना डॉ.क्रुग आणि तो माणूस यांना इजिप्तच्या सरकारी विमानसेवेच्या म्युनिक ऑफिसमध्ये जाताना पाहिलेली एक स्त्री भेटली. तिनेच त्यांना शेवटचं पाहिलं होतं हे लवकरच पोलिसांना समजलं.
दोन दिवसांनी क्रुगची पांढरी मर्सिडिस पोलिसांना सापडली. गाडीवर बराच चिखल आणि माती यांचे थर होते आणि तिच्या पेट्रोलच्या टाकीत पेट्रोलचा एक थेंबही नव्हता. त्याच दिवशी दुपारी म्युनिकमधल्या मध्यवर्ती पोलिस स्टेशनच्या बाहेरून पोलिसांना डॉ.क्रुग मरण पावलाय हे सांगणारा फोन आला. त्याचा मृतदेह किंवा इतर कुठलाही पुरावा मिळाला नाही.
२७ नोव्हेंबर १९६२ या दिवशी फॅक्टरी ३३३ मधल्या ऑफिसमध्ये वुल्फगांग पिल्झची सेक्रेटरी हॅनेलोर वेंडी त्याचा पत्रव्यवहार बघत असताना पिल्झसाठी आलेलं एक पार्सल तिला मिळालं. त्यावर पाठवणारा म्हणून हँबुर्ग शहरातल्या एका प्रसिद्ध वकिलाचं नाव होतं. तिने ते पार्सल उघडल्यावर आतमधल्या बॉम्बचा कानठळ्या बसवणारा स्फोट झाला. वेंडीचा चेहरा आणि हातपाय भाजले आणि ती आंधळी आणि बहिरी झाली.
दुसऱ्याच दिवशी BOOKS असं लिहिलेलं अजून एक पार्सल तिथे आलं. त्यावर जर्मनीमधल्या स्टुटगार्ट शहरातल्या एका नामांकित प्रकाशकाचं नाव आणि पत्ता होता. तिथल्या एका सहाय्यकाने ते उघडल्यावर आतमधल्या बॉम्बचा स्फोट होऊन पाच लोक ठार झाले.
फॅक्टरी ३३३ आणि इतर कारखान्यांमध्ये पार्सल्स येणं ही सामान्य गोष्ट होती. त्यामुळे दोन प्रसंग होऊनही तिथे काम करणारे लोक सावध झाले नाहीत. ही पार्सल्स वेगवेगळ्या ठिकाणांहून पाठवण्यात येत होती – जर्मनी, फ्रान्स, स्वित्झर्लंड. काही तर इजिप्तमधूनही पाठवण्यात आली होती. सगळीच पार्सल्सचा स्फोट झाला नाही. काही वाटेतच फुटली, काही स्फोटाआधीच सुरक्षा यंत्रणेच्या हातात पडली. जरी ही पार्सल्स कोण पाठवतंय ते कधीच उघड झालं नाही, तरी याच्यामागे मोसादचा हात आहे असा संशय इजिप्शियन गुप्तचर संघटनांना आणि पाश्चात्य पत्रकारांना आला होताच.
बऱ्याच वर्षांनी जेव्हा इजिप्शियन गुप्तचर संघटनांनी यातल्या काही स्फोटांमागे असलेल्या एका माणसाला कैरोमध्ये अटक केली. त्याचं नाव होतं वुल्फगांग लुट्झ. त्याचा रेसच्या घोड्यांची पैदास करण्याचा व्यवसाय होता आणि कैरोच्या जवळ त्याचा स्टडफार्म होता. महायुद्धादरम्यान तो एस.एस. मध्ये होता, आणि ज्यू या शब्दाचाही त्याला तिरस्कार वाटत असे. कैरोमधल्या उच्चभ्रू वर्तुळात त्याचा अत्यंत सहज वावर होता. त्याला पकडल्यावर इजिप्तला हे समजलं की तो झीव्ह गुर अॅरी नावाचा मोसाद एजंट होता.
पण हे सगळं नंतर घडलं. इकडे या स्फोटांमुळे जर्मन शास्त्रज्ञ हादरले होते. त्यांना आपल्या जीवाची भीती वाटायला लागली होती. अनेक जणांना त्यांच्या घरी निनावी धमकीचे फोन यायला सुरुवात झाली होती. धमकी अत्यंत निःसंदिग्ध भाषेत होती. नासरच्या प्रकल्पावर काम केलंत तर तुमची आणि तुमच्या कुटुंबाची खैर नाही. तिन्ही कारखान्यांची सुरक्षा वाढवण्यात आली. हे शास्त्रज्ञ जेव्हा कधी युरोपमध्ये जात, तेव्हा ते एकत्र आणि सुरक्षारक्षकांच्या सोबत जायला लागले.
मोसादच्या दृष्टीने ही परिस्थिती अजून चिंताजनक होती. या शास्त्रज्ञांचा एखादा कच्चा दुवा शोधून काढण्यासाठी मोसादने त्यांच्या पत्रव्यवहारावर नजर ठेवायला आणि ते ज्या हॉटेल्समध्ये उतरतील, तिथल्या खोल्यांमध्ये गुप्त मायक्रोफोन्स ठेवायला सुरुवात केली.
हे मायक्रोफोन्स मोसादच्या हातात कसे आले, तो एक किस्साच आहे. रफी
एतानने अमेरिकेला भेट दिलेली असताना सी.आय.ए.ला हे मायक्रोफोन्स वापरताना
पाहिलं होतं. पण इझराईलच्या हातात ते पडणं कठीण होतं. एकदा वर्तमानपत्र
वाचत असताना एतानला एक बातमी दिसली. ती मियामीच्या गुन्हेगार जगाचा बादशहा
मेयर लान्स्कीबद्दल होती. लान्स्की ज्यू आहे, हे एतानला समजल्यावर त्याने
मोसादच्या अमेरिकेतल्या प्रतिनिधीला लान्स्कीशी संपर्क करून द्यायला
सांगितलं. जेव्हा लान्स्की स्वतः फोनवर आला, तेव्हा एतानने त्याला तो ज्यू
असल्याची आठवण करून दिली आणि इझराईलप्रती त्याच्या असलेल्या कर्तव्याबद्दल
त्याला फोनवर एक भलं मोठं प्रवचन दिलं आणि शेवटी या मायक्रोफोन्सची मागणी
केली. लान्स्कीनेही त्याचे काँटॅक्ट्स वापरून एतानपर्यंत हे मायक्रोफोन्स
पोचवले.
इझराईलमधल्या तंत्रज्ञांनी ताबडतोब त्या मायक्रोफोन्सच्या तंत्रज्ञानावर
आधारित मायक्रोफोन्स बनवले, जे मोसादने वापरायला सुरुवात केली.
या टेहळणीतून मोसादच्या हाताला एक नाव लागलं - डॉ.ओट्टो योक्लिक. त्याच्याबद्दल जी माहिती मिळालेली होती, त्यानुसार योक्लिक ऑस्ट्रियन होता, किरणोत्सर्गी पदार्थ या विषयातला तज्ञ होता आणि इजिप्तचा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी त्याची नेमणूक झालेली होती. इजिप्शियन गुप्तचरांनी त्याच्यासाठी ऑस्ट्रा नावाची एक कंपनी स्थापन केली होती. ही कंपनी संशोधनाच्या नावाखाली किरणोत्सर्गी पदार्थ विकत घेत होती आणि इजिप्तच्या राजनैतिक कागदपत्रांसोबत हे पदार्थ इजिप्तमध्ये पाठवण्यात येत होते. योक्लिकवर इजिप्तसाठी दोन अण्वस्त्रचाचण्या करण्याची आणि क्षेपणास्त्रांवर बसवता येतील असे छोटे अणुबॉम्ब बनवण्याची जबाबदारी होती.
याचा अर्थ इझराईलसाठी योक्लिक हा अत्यंत धोकादायक माणूस होता. कदाचित सर्व जर्मन शास्त्रज्ञांमध्ये सर्वात धोकादायक. त्यामुळे त्याला ताबडतोब शोधून काढण्याचे आदेश हॅरेलने दिले.
पण सत्य हे कादंबरीपेक्षाही अकल्पनीय असतं असं म्हणतात, ते काही खोटं नाही. २३ ऑक्टोबर १९६२ या दिवशी इझराईलच्या ब्रुसेल्स, बेल्जियम इथल्या दूतावासात एक माणूस आला. त्याच्याकडे इझराईलसाठी अत्यंत महत्वाची माहिती होती – इजिप्शियन क्षेपणास्त्र प्रकल्पाचा पूर्ण लेखाजोखा. जेव्हा तिथल्या अधिकाऱ्याने त्याला त्याचं नाव विचारलं, तेव्हा त्याने सांगितलं – ओट्टो योक्लिक.
या घटनेनंतर दोन आठवड्यांनी वेषांतर करून, अत्यंत गुप्तपणे योक्लिक इझराईलमध्ये आला. इतिहासकार आणि पत्रकारांचा असा अंदाज आहे, की योक्लिक आणि डॉ.क्रुग हे एकत्र काम करत होते. डॉ.क्रुगनेच योक्लिकला या प्रकल्पात आणलं होतं. जेव्हा डॉ.क्रुग गायब झाला, तेव्हा आपले दिवस भरल्याची योक्लिकला जाणीव झाली. मोसाद एजंट्सपुढे कुठलाही युक्तिवाद चालणार नाही हे त्याला समजून चुकलं, त्यामुळे त्यांच्या हातून पळवलं किंवा मारलं जाण्यापेक्षा आपणच इझराईलला जाऊन भेटावं असा विचार त्याने केला असण्याची शक्यता आहे.
योक्लिकने मोसादला जी माहिती दिली, त्यानुसार तो दोन प्रकल्पांवर काम करत होता – ऑपरेशन आयबीस आणि ऑपरेशन क्लिओपात्रा. आयबीस हा प्रकल्प स्फोटानंतर किरणोत्सर्ग पसरवणारं एक अस्त्र विकसित करण्यासाठी होता, तर क्लिओपात्रा प्रकल्पात दोन अणुबॉम्ब बनवायचे होते. पहिल्या प्रकल्पासाठी योक्लिक त्याच्या ऑस्ट्रा नावाच्या कंपनीद्वारे कोबाल्ट ६० हे किरणोत्सर्गी समस्थानिक (radioactive isotope) खरेदी करत होता, दुसऱ्या प्रकल्पासाठी तो एक वेगळीच पद्धत वापरणार होता. युरोप किंवा अमेरिकेतून २०% समृद्ध युरेनियम (enriched Uranium) विकत घेऊन ते काही खास यंत्रसामग्री वापरून ९०% पर्यंत समृद्ध करण्याची ही योजना होती. त्यासाठी लागणारी उपकरणं जर्मनी आणि हॉलंडमध्ये डॉ.विल्हेल्म ग्रॉथ, डॉ.जेकब किस्टमाकर आणि डॉ. गरनॉट झिप यांनी बनवलेली होती. खरेदी केलेलं कोबाल्ट ६० कैरोमध्ये डॉ.लैला खलील नावाच्या एका स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरच्या हॉस्पिटलच्या पत्त्यावर पाठवलं जात असे. ती या प्रकल्पाचा प्रमुख असलेल्या जनरल खलीलची बहीण होती.
योक्लिकने मोसादच्या लोकांना जे सांगितलं, ती माहिती अनेक तज्ञ लोकांकडे पडताळणीसाठी पाठवण्यात आली, पण या लोकांनी त्याच्यावर जे मत व्यक्त केलं त्यावर मात्र फार लक्ष दिलं गेलं नाही. या तज्ञांच्या म्हणण्यानुसार क्लिओपात्रा हा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण होणं अशक्य होतं. योक्लिकला २०% समृद्ध युरेनियम मिळणं ही अत्यंत कठीण, जवळपास अशक्य गोष्ट होती. समजा मिळालं, तरी ते ९०% समृद्ध करण्यासाठी कमीतकमी १०० सेंट्रीफ्यूजेस हवे होते, जे इजिप्तकडे नव्हते. असे १०० सेंट्रीफ्यूजेस वापरूनसुद्धा इजिप्तला बॉम्ब बनवायला कमीतकमी २-३ वर्षे लागली असती. आणि सर्वात कहर म्हणजे एवढं सगळं करूनसुद्धा बॉम्ब बनला असता, तरी योक्लिकची काही गणितं आणि गृहितकं चुकीची असल्यामुळे त्याचा स्फोट झालाच नसता. आयबीसवर तर या तज्ञांनी फुली मारली होती. त्यांच्यामते आयबीस हा एखाद्या सामान्य बॉम्बपेक्षा जास्त प्रभावी असणं शक्यच नव्हतं.
पण इझराईलचे नेते हे ऐकल्यावर शांत झाले नाहीत. त्यांची अस्वस्थता अजून वाढली, कारण आता इजिप्तकडे रासायनिक अस्त्रं असल्याची बातमी आली होती. ती मात्र खरी होती कारण त्याच वर्षी येमेनमधल्या युद्धात इजिप्तने विषारी वायूंचा वापर केला होता. इझराईलच्या तत्कालीन परराष्ट्रमंत्री (आणि नंतर पंतप्रधान) गोल्डा मायर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ.केनेडी यांची भेट घेऊन त्यांच्याशी इजिप्तच्या या शस्त्रांबद्दल चर्चा केली, पण त्यातून फार काही निष्पन्न होऊ शकलं नाही.
अमेरिकेला इजिप्तच्या क्षेपणास्त्र प्रकल्पात रस नाही, हे बघितल्यावर मोसादने बॉम्बच्या दिशादर्शक प्रणालीवर काम करणारे जे लोक होते, त्यांच्यावर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं.
१९६३ च्या हिवाळ्यात डॉ.हान्स क्लाईनवाख्टर जर्मनीमध्ये होता. तो लोराचमधल्या प्रयोगशाळेतून घरी येत असताना त्याच्यावर गोळीबार झाला. क्लाईनवाख्टर बचावला आणि पोलिसांनी हल्लेखोरांची गाडी शोधून काढली. त्यात त्यांना इजिप्शियन गुप्तचर संघटनेचा प्रमुख जनरल अली सामीरचा पासपोर्ट मिळाला. मजा म्हणजे सामीर त्या दिवशी कैरोमध्ये होता, आणि त्याने संबोधित केलेल्या पत्रकार परिषदेला बरेचसे पत्रकार हजर होते. हे हल्लेखोर जरी मिळाले नसले, तरी वृत्तपत्रांमध्ये हे मोसादचंच काम आहे, असं मत व्यक्त करण्यात आलं होतं.
क्लाईनवाख्टर बचावला म्हटल्यावर मोसादने इतरांकडे मोर्चा वळवला. पॉल गोर्के सुद्धा दिशादर्शक प्रणालीवरच काम करत होता. मोसादच्या मते डॉ.क्रुग आणि डॉ.योक्लिक यांच्यानंतर तोच एक महत्वाचा शास्त्रज्ञ होता. त्याची मुलगी हायडी ही जर्मनी आणि स्वित्झर्लंड यांच्या सीमेजवळ असलेल्या फ्रायबुर्ग या ठिकाणी राहात होती.
क्लाईनवाख्टरवरच्या हल्ल्यानंतर काही दिवसांनी योक्लिकने हायडीला फोन केला आणि आपण त्याला ओळखत असल्याचं सांगितलं. बोलता बोलता सहजपणे योक्लिकने विषय इझराईलवर आणला आणि हायडीला तिच्या वडिलांना इजिप्त सोडून परत यायची विनंती करायला सांगितलं. तो हेही म्हणाला, की असं जर तिच्या वडिलांनी केलं नाही, आणि त्यांचं काही बरंवाईट झालं, तर त्याची जबाबदारी त्यांच्यावरच असेल.
“जर तुझं तुझ्या वडिलांवर खरोखर प्रेम असेल,” योक्लिक संभाषण संपवता संपवता तिला म्हणाला, “तर या शनिवारी संध्याकाळी ४ वाजता बासलमधल्या थ्री किंग्ज हॉटेलमध्ये ये. मी माझ्या एका मित्राशी तुझी ओळख करून देईन.”
हायडी हे ऐकून प्रचंड बेचैन झाली आणि तिने हान्स मान नावाच्या माणसाशी संपर्क साधला. मान पूर्वाश्रमीचा एस.एस. अधिकारी होता, आणि शास्त्रज्ञांच्या सुरक्षिततेची जबाबदारी त्याच्यावर होती. मानच्या फ्रायबुर्ग पोलिसांमध्ये ओळखी होत्या. त्याने त्यांच्याशी बोलणं केलं आणि फ्रायबुर्ग पोलिसांनी स्विस अधिकाऱ्यांना याची कल्पना दिली. त्या शनिवारी, २ मार्च या दिवशी जेव्हा योक्लिक आणि त्याचा ‘ मित्र ’ जोसेफ बेन गाल थ्री किंग्ज हॉटेलमध्ये आले, तेव्हा संपूर्ण परिसराला साध्या वेशातल्या पोलिसांनी वेढा घातला होता. हायडी ज्या टेबलापाशी बसली होती, त्याच्याजवळ संभाषण रेकॉर्ड करायला टेपरेकॉर्डर्स ठेवले होते.
बेन गाल आणि योक्लिक यांना कशाचाही संशय आला नाही. ते हायडी घाबरली असेल, असं गृहीत धरून तिला धमकी द्यायला आले होते. तिच्याशी बोलता बोलता बेन गालने आइकमनचा उल्लेख करून कशा प्रकारे त्याला मोसादने अर्जेन्टिनामधून उचलला याचं वर्णन केलं.
हायडीबरोबरची भेट संपवून बेन गाल आणि योक्लिक आपल्या वाटेने गेले आणि
त्याच संध्याकाळी दोघांनाही अटक करण्यात आली. त्याचवेळी जर्मन पोलिसांनी
स्विस सरकारला या दोघांनाही जर्मनीच्या सुपूर्द करण्याची मागणी केली.
हॅरेलने त्याचे स्वित्झर्लंडमधले काँटॅक्ट्स वापरून स्विस सरकारवर दबाव
आणण्याचा प्रयत्न केला, पण जर्मन पोलिसांनी बेन गाल आणि योक्लिक यांच्या
प्रत्यार्पणाची मागणी केलेली असल्यामुळे स्विस अधिकारी त्यांना इझराईलच्या
ताब्यात द्यायला तयार होईनात.
हॅरेल पंतप्रधान बेन गुरियनना भेटला आणि त्याने त्यांच्याकडे बेन गाल आणि योक्लिक यांच्या सुटकेसाठी ीजर्मन सरकारकडे रदबदली करायची विनंती केली. बेन गुरियनना या संपूर्ण प्रकरणातल्या काही गोष्टी पहिल्यांदाच समजत होत्या. हॅरेलचा युक्तिवाद असा होता, की जर बेन गाल आणि योक्लिक यांची अटक आणि त्यांनी जे काय केलंय ते जाहीर झालं, तर इजिप्त जर्मन तंत्रज्ञांच्या मदतीने रॉकेट्स बनवतोय, हेही जाहीर होईल आणि मोसादने या शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांना धमकावण्यासाठी जे प्रकार केले तेही जगजाहीर होईल. इजिप्तमधून ही माहिती इझराईलपर्यंत कशी पोचली त्याची चौकशी होईल. थोडक्यात, सगळ्या ऑपरेशनची वाट लागेल.
पण बेन गुरियननी यात हस्तक्षेप करायला नकार दिला. त्यांच्या
म्हणण्यानुसार, मोसादने स्वतःबद्दल फाजिल आत्मविश्वास बाळगून हे संपूर्ण
प्रकरण हाताळलेलं होतं, आणि त्यामुळे ते निस्तरण्याची जबाबदारीही मोसादचीच
होती.
१५ मार्च १९६३ या दिवशी संध्याकाळी योक्लिक आणि बेन गाल यांच्या अटकेची बातमी जाहीर करण्यात आली.
पंतप्रधानांनी हस्तक्षेप करण्यास नकार दिल्यामुळे हॅरेल खवळला होता. त्याने इझराईलमधल्या सर्व प्रमुख वर्तमानपत्रांच्या संपादकांची एक बैठक बोलावली आणि त्यांना बेन गाल आणि योक्लिक यांच्या अटकेची पूर्ण पार्श्वभूमी सांगितली. त्याचबरोबर इजिप्तने कशा प्रकारे आपला क्षेपणास्त्रांचा आणि अण्वस्त्रांचा प्रकल्प जर्मन शास्त्रज्ञांच्या मदतीने चालवलेला आहे, याच्याबद्दलही त्यांना सांगण्यात आलं.
हॅरेलने अजून एक चाल खेळली. त्याने ज्या संपादकांना ही माहिती सांगितली होती, त्यांना युरोपमध्ये जाऊन त्याची शहानिशा करून घ्यायला सांगितलं आणि मोसादच्या एजंट्सना संपूर्ण युरोपभरच्या वर्तमानपत्रांमध्ये इझराईलबद्दल सहानुभूती असलेल्या पत्रकारांना भेटून त्यांना ही माहिती द्यायला पाठवलं.
१७ मार्चपासून संपूर्ण युरोप आणि इझराईल इथे वर्तमानपत्रांच्या पानांवर माध्यमांचा आक्रोश सुरु झाला. जर्मन शास्त्रज्ञ; त्यांच्यातले अनेकजण पूर्वाश्रमीचे ज्यूद्वेष्टे आणि नाझी; त्यांनी इजिप्तला केलेली मदत; त्यांचं इझराईलला कायमचं उध्वस्त करण्यासाठी रचलेलं कारस्थान; इजिप्तचा जीवशास्त्रीय, रासायनिक आणि किरणोत्सर्गी अस्त्रं मिळवण्यासाठी चाललेला आटापिटा वगैरे सगळे विषय माध्यमांनी चघळायला सुरुवात केली, आणि पाहतापाहता या बातम्या अतिरंजित आणि सनसनाटी पातळीवर गेल्या. इजिप्तचा मृत्यूकिरण बनवण्याचा, इझराईलला पुढच्या हजारो वर्षांसाठी बेचिराख करण्याचा डाव; किरणोत्सर्गी कचऱ्याने भरलेले अणुबॉम्ब; प्लेगचे विषाणू बॉम्बद्वारे पसरण्याचं इजिप्शियन कारस्थान आणि सर्वात कहर म्हणजे नाझी जर्मनीच्या ज्यूविरोधी कारवाया आणि कसं सध्याचं पश्चिम जर्मन सरकार त्यापेक्षा वेगळं वागत नाहीये; १९३३ चा जर्मनी आणि १९६३ चा जर्मनी हे कसे एकाच माळेचे मणी आहेत वगैरे बातम्यांनी आगीत तेल टाकण्याचं काम अगदी चोख बजावलं.
इकडे बेन गाल आणि योक्लिक याच्यावर स्विस सरकारने भरलेला खटला दोघांना दोन महिन्यांच्या साध्या कैदेच्या शिक्षेने संपुष्टात आला. त्यामधून त्यांनी अगोदरच तुरुंगात घालवलेले दिवस वगळण्यात आले होते. हा खटला चालू असताना एक विलक्षण गोष्ट घडली.
ऐन खटल्यात न्यायाधीशांच्या लक्षात आलं की न्यायालयात एक माणूस बरोबर गन घेऊन आलेला आहे. संतापलेल्या न्यायाधीशांनी जेव्हा त्याला खडसावून विचारलं तेव्हा त्याने आपण इजिप्तमध्ये काम करणाऱ्या जर्मन शास्त्रज्ञांच्या सुरक्षेसाठी जबाबदार असल्याचं आणि आपल्याकडे गनसाठी लागणारा परवाना असल्याचं सांगितलं. या माणसाचं नाव होतं हान्स मान. तोच हान्स मान ज्याच्याशी हायडी गोर्केने तिला योक्लिकचा फोन आल्यावर लगेचच संपर्क साधला होता.
खटला चालू असताना मोसाद एजंट्स प्रेक्षकांमध्ये बसलेले होतेच. त्यांच्यातल्या एकाने गुप्तपणे हान्स मानचा फोटो काढला आणि सरळ ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना इथे जाऊन सुप्रसिद्ध नाझी शिकारी सायमन विझेन्थालची भेट घेतली. विझेन्थालने मानला लगेचच ओळखलं, आणि त्याने महायुद्धात ओट्टो स्कोर्झेनीच्या युनिटमध्ये काम केल्याचं सांगितलं. या एजंटने ही माहिती रफी एतान आणि अॅव्हनर अहितुव यांना सांगितली.
स्कोर्झेनीची मदत घ्यायची कल्पना अहितुवची होती. स्कोर्झेनीच्या माजी पत्नीशी संपर्क साधून त्यांनी स्कोर्झेनीचा पत्ता मिळवला आणि ते त्याला भेटायला माद्रिदमध्ये आले.
हान्स मान आणि त्याच्याबरोबर काम करणारे इतर सुरक्षा कर्मचारी हे पूर्वाश्रमीचे एस.एस. अधिकारी आणि सैनिक होते. त्यांच्यातल्या बहुतेकांनी स्कोर्झेनीच्या हाताखाली काम केलेलं होतं. नेमक्या याच गोष्टीचा फायदा घेण्याची एतानची इच्छा होती. पुढच्या काही महिन्यांतच स्कोर्झेनीद्वारे इजिप्तच्या प्रकल्पामध्ये काम करणारे लोक, त्यांची व्यावसायिक आणि कौटुंबिक पार्श्वभूमी, त्यांना मिळणारा पगार वगैरे संपूर्ण माहिती मोसादकडे आली. त्याचबरोबर त्यांनी बनवलेले रिपोर्ट्स आणि त्यावरून इजिप्तच्या प्रकल्पाची नेमकी परिस्थितीही मोसादच्या लक्षात आली.
पण हे सगळं होण्याआधी इझरेली प्रसारमाध्यमांनी घातलेला धुमाकूळ आणि उडवलेला धुरळा खाली बसायचं नाव घेत नव्हता. अरब आणि जर्मन असे ज्यूंचे दोन शत्रू एकत्र आलेले असून ते एका नवीन हॉलोकॉस्टची तयारी करत आहेत असं चित्र रंगवलं जात होतं. नेसेटमध्ये विरोधी पक्षनेता मेनॅचम बेगिन यांनी पंतप्रधानांवर “ एकीकडे तुम्ही जर्मनांना आपण बनवलेली उझी मशीन पिस्तुलं विकताय आणि ते इजिप्तला आपल्याला समूळ नष्ट करण्यासाठी घातक रोगांचे जंतू विकताहेत “ असा सनसनाटी आरोप केला होता.
हा सगळा वाद अनावश्यक होता आणि वस्तुस्थिती त्याच्यापेक्षा पूर्णपणे वेगळी होती. पण जर्मनीबद्दलचा राग आणि तिरस्कार इसेर हॅरेलच्या मनात इतका खोलवर रुजला होता, की त्याच्याशी या मुद्द्यावर शांतपणे बोलणं हे कुणालाही शक्य नव्हतं. काहीही करून जर्मनीची बदनामी करणं आणि जर्मन नेत्यांवर आंतरराष्ट्रीय दबाव आणणं हा हॅरेलचा एककलमी कार्यक्रम बनला होता.
संरक्षण उपमंत्री असलेल्या शिमॉन पेरेस यांनी सर्वात प्रथम सत्य काय आहे, ते शोधून काढायचं ठरवलं. त्यांनी मोसाद किंवा शाबाक यांच्याऐवजी इझरेली सैन्याच्या अमान या गुप्तचर संघटनेला हे काम सोपवलं. अमानचा तत्कालीन प्रमुख जनरल मायर अमित आणि त्याच्या लोकांनी दोन आठवड्यांच्या काळात अनेक शास्त्रज्ञ आणि अण्वस्त्रांच्या निर्मितीशी संबंधित असलेल्या लोकांशी संपर्क साधला आणि मोसादने मिळवलेली माहिती त्यांच्यासमोर मांडली. या सर्वांचं मत पूर्णपणे वेगळं होतं.
इजिप्तकडे रासायनिक आणि जीवशास्त्रीय अस्त्रं विकसित करायची कुठलीही क्षमता नव्हती. येमेनमध्ये त्यांनी वापरलेला विषारी वायू म्हणजे मस्टर्ड गॅस होता. त्यापेक्षा घातकी विषारी वायूंवर इझरेली सैन्याच्या संशोधन विभागाने उपाय शोधून काढले होते. डॉ.ओट्टो योक्लिकने कोबाल्ट ६० चा उल्लेख केला होता, पण जेवढं कोबाल्ट ६० इजिप्तला पाठवण्यात आलं होतं, तेवढ्यात बॉम्ब किंवा किरणोत्सर्गी अस्त्र बनणं अशक्य होतं. स्वतः योक्लिकच्या विधानांमध्येही अनेक विसंगती होत्या. याचा अर्थ सरळ होता. मोसादने, किंबहुना इसेर हॅरेलने जर्मनीबद्दल असलेल्या आपल्या संतापाला पोषक अशी माहिती तिची खात्री न करून घेता वापरली होती. स्वतःच्या व्यक्तिगत भावनांना देशहितापेक्षा जास्त महत्व दिलं होतं.
पंतप्रधान बेन गुरियनकडे जेव्हा ही माहिती गेली, तेव्हा त्यांनी हॅरेलला भेटायला बोलावलं आणि स्पष्टीकरण मागितलं. आपण पत्रकारांना आणि संपादकांना त्यांच्या वर्तमानपत्रांमध्ये जर्मनीविरोधी माहिती छापायला सांगितलं आणि आपल्याकडे त्याच्या सत्यासत्यतेबद्दल काहीही माहिती नाहीये हे हॅरेलने कबूल केलं.
दुसरीकडे अमानचा अहवाल अत्यंत तपशीलवार होता. मायर अमितचे लोक अमेरिकेत जाऊन नासासाठी काम करणाऱ्या वेर्नर फॉन ब्राऊनलाही भेटले होते. इजिप्तमध्ये काम करणाऱ्या जवळपास सर्व शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांनी त्याच्या हाताखाली नाझी जर्मनीच्या व्ही-१ आणि व्ही-२ या रॉकेट्सच्या निर्मितीसाठी काम केलं होतं. त्याने इजिप्तमध्ये काम करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या यादीवर एक दृष्टीक्षेप टाकला होता, आणि त्यातले बहुसंख्य लोक अण्वस्त्र तर सोडाच, एक साधं क्षेपणास्त्र पण बनवू शकणार नाहीत असं स्पष्टपणे म्हटलं होतं.
एका माणसाच्या अनाठायी संतापापायी दोन देशांमधले संबंध कायमचे
तुटण्याच्या स्थितीला आले होते आणि हे पंतप्रधान बेन गुरियनना सहन होणार
नव्हतंच, कारण जर्मनीबरोबर इझराईलचे आर्थिक, व्यापारी आणि लष्करी संबंध
प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी मेहनत केलेली होती. त्यांनी हॅरेलवर
देशहिताशी तडजोड केल्याचा आरोप केला.
हॅरेल काहीही न बोलता तिथून निघून गेला आणि त्याने आपल्या ऑफिसमध्ये जाऊन
आपला राजीनामा लिहिला आणि ऑफिसच्या किल्ल्यांबरोबर तो पंतप्रधानांच्या
ऑफिसमध्ये पाठवून दिला.
बेन गुरियननी त्याच्याशी बोलून त्याला समजवायचा खूप प्रयत्न केला. त्याच्या जागी दुसऱ्या कोणाची नियुक्ती होईपर्यंत त्याला त्याचा राजीनामा रोखून धरायलाही सांगितलं, पण हॅरेल आपल्या निर्णयावर ठाम होता.
बेन गुरियनपुढे त्याच्या जागी नियुक्त करण्यासाठी दोन पर्याय होते – शाबाकचा प्रमुख अमोस मॅनॉर आणि अमानचा प्रमुख मायर अमित. दोघांशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला. मॅनॉर नेमका त्याचवेळी नातेवाईकांना भेटण्यासाठी तेल अवीवच्या बाहेर गेल्यामुळे उपलब्ध होऊ शकला नाही, म्हणून जनरल मायर अमितची मोसादच्या संचालकपदी तात्पुरती नेमणूक करण्यात आली.
इसेर हॅरेल नामक युगाचा अंत झाला.
क्रमशः
मोसाद - भाग ७
२ जानेवारी १९६५, लाताकिया बंदर, सीरिया. सोविएत रशियामधून आलेलं एक जहाज किनाऱ्याला लागलं. या जहाजात के.जी.बी. ने विकसित केलेली नवीन यंत्रसामग्री होती. प्रामुख्याने रेडिओ संदेश ऐकणे आणि ते कुठून पाठवले जात आहेत, ते ट्रान्समीटर्स शोधून काढणे यासाठी या यंत्रणेचा उपयोग होणार होता. सीरियामध्ये सध्या वापरली जात असणारी यंत्रणा जुनाट आणि कुचकामी होती. तिच्या जागी ही नवीन यंत्रणा बसवायची सीरियन सैन्याची योजना होती.
७ जानेवारीला ही नवीन यंत्रणा कार्यान्वित होणार होती आणि तिच्या कामात अडथळा येऊ नये म्हणून त्या दिवशी सीरियन सैन्याने आपलं संपूर्ण संदेश प्रसारण चोवीस तासांसाठी बंद ठेवलं होतं. पण त्याच वेळी एका अधिकाऱ्याला एक अगदी क्षीण पण जाणवण्याएवढा असा रेडिओ संदेश मिळाला. अगदी अशाच स्वरूपाचे आणि याच फ्रीक्वेन्सीवरचे संदेश याआधीही नोंदवले गेले होते पण त्यावेळी इतर रेडिओ संदेशांच्या गोंधळात ते पकडणं आणि त्यावरून ते पाठवले जात असल्याचं ठिकाण शोधून काढणं हे अशक्य होतं. पण आता अजिबात एकही संदेश पाठवला जात नसल्यामुळे हा संदेश पकडला गेला होता. त्याने ताबडतोब फोन करून ही बातमी सीरियाच्या गुप्तचर संघटनेला दिली. त्यांना हा संदेश कुठून आला, हे जेव्हा समजलं तेव्हा ते हादरले. सीरियन सैन्याच्या राजधानी दमास्कसमधल्या एका तळाच्या अगदी जवळ असलेल्या एका इमारतीमधून हा संदेश पाठवण्यात आला होता आणि सीरियन तंत्रज्ञांनी त्या इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावरून हा संदेश पाठवण्यात आला आहे, असा निष्कर्ष काढला होता. तिथे राहणाऱ्या माणसाचं नाव होतं कमाल अमीन साबेत.
साबेत दमास्कसमधल्या अतिश्रीमंत आणि अतिमहत्वाच्या लोकांपैकी एक होता. साक्षात राष्ट्राध्यक्ष हाफेझचा जवळचा मित्र. तो राष्ट्राध्यक्षांच्या पुढच्या मंत्रिमंडळात असणार आहे अशीही कुणकुण होती. दर महिन्यात किमान एकदा तरी त्याने दिलेल्या मेजवान्यांच्या बातम्या सीरियन वृत्तपत्रांमध्ये येत असत. बाकी त्याचे या न त्या महत्वाच्या नेत्यांबरोबर फोटो जवळजवळ दररोज असायचेच. त्याने दिलेल्या मेजवान्यांना दमास्कस आणि उर्वरित सीरियामधले सर्व उच्चभ्रू आणि प्रतिष्ठित लोक अगदी आवर्जून हजेरी लावत असत. दारू, खाद्यपदार्थ, बायका यांची अगदी रेलचेल असे. त्या साबेतच्या घरातून हा संदेश आलाय?
“काहीतरी चूक आहे,” सीरियन मुखबारत(गुप्तचर संघटना)च्या वरिष्ठ
अधिकाऱ्यांनी निष्कर्ष काढला. साबेत, ज्याचे सरकारी आणि लष्करी
अधिकाऱ्यांशी एवढे जवळचे संबंध आहेत, त्याच्याशी वैर ओढवून घेण्याची
कोणाचीही तयारी नव्हती. पण त्या दिवशी संध्याकाळी तसाच संदेश पाठवला गेला.
आता मात्र काहीतरी गडबड असल्याची मुखबारतच्या अधिकाऱ्यांची खात्री पटली
होती. त्यांनी हे प्रकरण सरळ मुखबारतच्या प्रमुखाकडे – जनरल नदीम अल
तायाराकडे नेलं.
अल तायाराने त्यांना साबेतच्या पत्त्यावर धाड टाकण्याचे आदेश दिले.
दुसऱ्या दिवशी – १० जानेवारी १९६५ रोजी सकाळी ८ वाजता दमास्कसच्या अबू रामेन भागातल्या या फ्लॅटमध्ये मुखबारतचे चार अधिकारी घुसले. दरवाज्याची कडी किंवा बेल न वाजवता त्यांनी दरवाजा उखडला आणि ते आत शिरले आणि सरळ बेडरूमच्या दिशेने गेले. साबेत झोपला असेल अशी त्यांची कल्पना होती, पण तो जागा होता, एवढंच नव्हे, तर संदेश पाठवत होता. त्याला त्यांनी रंगेहाथ पकडला होता. त्यांना पाहिल्यावर तो उभा राहिला आणि त्याने हात वर केले. त्यांनी त्याला बेड्या घातल्या आणि ते त्याला मुखबारत हेडक्वार्टर्समध्ये घेऊन गेले.
साऱ्या दमास्कसमध्ये ही बातमी एखाद्या वणव्यासारखी पसरली. कमाल अमीन
साबेत आणि शत्रूचा हेर? राष्ट्राध्यक्षांचा खास मित्र आणि पुढच्या
मंत्रीमंडळात ज्याचा समावेश होणार होता, असा माणूस? पण साबेतच्या घराची
झडती घेतल्यावर सापडलेले गुप्त ट्रान्समीटर्स, घरातच लपवलेल्या
मायक्रोफिल्म्स आणि शत्रूच्या हातात जिवंतपणे न सापडता आयुष्य संपवण्यासाठी
असलेल्या सायनाईडच्या गोळ्या यांनी साबेतच्या हेर असण्यावर शिक्कामोर्तब
केलं.
सीरियन नागरिकांमध्ये तो कोण आहे आणि सीरियाच्या नक्की कुठल्या शत्रूकडून
आलेला आहे याबद्दल चर्चा आणि पैजांना एकच उधाण आलं होतं. काही जणांचा संशय
इराकवर होता, काहींचा इराण किंवा मग इजिप्तवर. पण २४ जानेवारी १९६५ या
दिवशी, दोन आठवडे कमाल अमीन साबेतची कसून ‘ चौकशी ’ केल्यावर आणि त्याचे
अनन्वित हाल केल्यावर सीरियन सरकारने त्याची खरी ओळख जाहीर केली आणि पुन्हा
एकदा सीरियन जनतेला आणि साबेतचं आदरातिथ्य उपभोगलेल्या लोकांना जबरदस्त
हादरा बसला. कमाल अमीन साबेत हा अरब नसून ज्यू होता आणि चक्क इझराईलचा हेर
होता. त्याचं खरं नाव होतं एली कोहेन.
१६ डिसेंबर १९२४ या दिवशी अलेक्झांड्रिया, इजिप्त येथे जन्म झालेल्या एलियाहू उर्फ एली कोहेनबद्दल जगभरातल्या इतिहासकारांचं आणि हेरगिरी तज्ञांचं एकच मत आहे – मोसादच्या, किंबहुना जगातल्या सर्वश्रेष्ठ हेरांपैकी एक.
----------------------------------------------------------------------------------------
लहानपणापासूनच एली हुशार आणि धाडसी म्हणून प्रसिद्ध होता. त्याची स्मरणशक्ती अफाट होती. ज्यूंचा धर्मग्रंथ असलेल्या ताल्मूदमधली सर्व वचने तो वयाच्या दहाव्या वर्षीच घडाघडा म्हणून दाखवू शकत असे. इजिप्तमध्ये ज्यूंचा छळ होणं ही अगदी नैमित्तिक बाब होती. त्यामुळे ज्यू क्रांतिकारक संघटनासुद्धा उदयाला आल्या होत्या. या संघटनांना पॅलेस्टाईनमध्ये कार्यरत असलेल्या झिओनिस्ट चळवळीचा पाठिंबाही होता. एली अशाच एका क्रांतिकारक संघटनेसाठी काम करत होता. पण त्याचं काम वेगळ्या स्वरूपाचं होतं. १९४८ मध्ये इझराईलची निर्मिती झाल्यावर ज्यूंना स्वतःची मातृभूमी मिळाली होती. पण त्याचबरोबर इजिप्त इझराईलचा प्रच्छन्न शत्रू असल्यामुळे आणि इझराईलच्या निर्मितीच्या वेळी झालेल्या युद्धात इजिप्तला पराभव स्वीकारावा लागला असल्यामुळे तिथे ज्यूंचा छळ अजूनच वाढला होता. या अत्याचारांपासून स्वतःला वाचवण्याचा एकच मार्ग इजिप्तमधल्या ज्यूंसाठी होता – इझराईलला निघून जाणं. अशा ज्यूंना गुप्तपणे इजिप्तच्या बाहेर काढून इझराईलपर्यंत पोचवणं हे काम एली करायचा. त्याच अनुषंगाने १९५४ मध्ये एका धाडसी कटामध्ये त्याने भाग घेतला.
१९५४ मध्ये इझरेली नेत्यांना ब्रिटीश सरकारने ब्रिटीश सैन्य इजिप्तमधून पूर्णपणे काढून घेण्याचा निर्णय घेतल्याचं समजलं होतं. त्याआधीच इजिप्तमध्ये राज्यक्रांती होऊन राजेशाही उलथली गेली होती आणि गमाल अब्दुल नासरच्या नेतृत्वाखाली लष्करी हुकूमशाही सुरु झालेली होती. सर्व अरब देशांमध्ये लष्करीदृष्ट्या इजिप्तच बलाढ्य होता आणि नासर इझराईलचा कट्टर शत्रू होता. त्याच्या मनात आलं असतं तर त्याने कधीच इझराईलवर हल्ला केला असता, पण ब्रिटीश सैन्य देशात असल्यामुळे आणि या सैन्याचे अनेक तळ सुएझ कालव्याच्या बाजूने असल्यामुळे नासरला असं काही करता येत नव्हतं. पण जर ब्रिटनने सैन्य काढून घेतलं, तर नासरला इझराईलवर हल्ला करण्यापासून थांबवणारं कोणीही नव्हतं. शिवाय ब्रिटीश सैन्य निघून गेल्यावर त्यांची आधुनिक युद्धसामग्री आणि शस्त्रास्त्रं यांचा बऱ्यापैकी मोठा साठा इजिप्तकडे आला असता आणि १९४८ च्या पराभवाचा बदला घेण्यासाठी इजिप्तचं सैन्य इझराईलच्या दिशेने झेपावलं असतं यात शंका नव्हती.
त्यामुळे इझराईलच्या नेत्यांच्या मनात एकच विचार होता – काहीही करून ब्रिटिशांना त्यांचा निर्णय बदलायला, निदान काही वर्षे पुढे ढकलायला भाग पाडायचं. नेमकं त्यावेळी डेव्हिड बेन गुरियन इझराईलचे पंतप्रधान नव्हते. त्यांनी राजकारणातून काही काळ निवृत्ती घेतली होती. त्यांच्या जागी त्यांच्याच पक्षाचे पण त्यांच्याएवढे प्रभावी नसलेले मोशे शॅरेट हे पंतप्रधान होते. त्यांचा त्यांच्या मंत्र्यांवरचा प्रभाव हा असून नसल्यासारखा होता. संरक्षण मंत्री पिन्हास लाव्होन उघडपणे पंतप्रधानांच्या अधिकारांना आव्हान देत असे. ब्रिटिशांना इजिप्तमधून सैन्य काढून घ्यायचा निर्णय बदलायला भाग पाडायचं हा विचार लाव्होनचाच होता. त्याने आणि त्यावेळी लष्करी गुप्तचर संघटना अमानचा प्रमुख असलेल्या कर्नल बेन्जामिन गिबलीने एक धाडसी पण तितकीच आततायी आणि धोकादायक योजना बनवली. या योजनेबद्दल ना पंतप्रधानांना माहित होतं ना मोसादला.
गिबली आणि लाव्होन या दोघांनाही ब्रिटन आणि इजिप्त यांच्यामधल्या करारामध्ये एक मुद्दा सापडला होता. त्याच्यानुसार जर इजिप्तमध्ये अत्यंत आणीबाणीची परिस्थिती उद्भवली तर ब्रिटीश सरकार सैन्य काढून घेणार नव्हतं. गिबली आणि लिव्होन यांनी कोणालाही विश्वासात न घेता असं ठरवलं की जर इजिप्तमध्ये अनेक बॉम्बस्फोट झाले तर ब्रिटीश सरकार असा निष्कर्ष काढेल की इजिप्तच्या नेत्यांचं परिस्थितीवर नियंत्रण नाहीये आणि त्यामुळे ते आपला विचार बदलतील. हे बॉम्बस्फोट इजिप्तच्या मोठ्या आणि महत्वाच्या शहरांमध्ये करायचे हेही ठरलं. कैरो आणि अलेक्झांड्रिया ही दोन शहरं त्यासाठी निवडली गेली आणि हे स्फोट ब्रिटीश आणि अमेरिकन सांस्कृतिक केंद्रं, चित्रपटगृहं, पोस्ट ऑफिसेस आणि इतर सरकारी इमारतींच्या जवळ करावेत असंही ठरलं. इजिप्तमध्ये असलेल्या अमानच्या गुप्तचरांनी त्यासाठी अनेक स्थानिक ज्यूंची मदत घेतली. हे ज्यू कट्टर झिओनिस्ट होते आणि इझराईलसाठी आपले प्राणही देण्याची त्यांची तयारी होती. पण असं करून अमानने इझरेली गुप्तचर संघटनांचा एक अत्यंत महत्वाचा नियम मोडला होता, तो म्हणजे कधीही स्थानिक ज्यूंना घातपाताच्या कामात सहभागी करून घ्यायचं नाही. जर तिथल्या सरकारला अशा कटाचा सुगावा लागला तर संपूर्ण ज्यू समाजाचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं. शिवाय या कामासाठी निवडलेल्या लोकांनी असल्या गोष्टींचं कुठलंही प्रशिक्षण घेतलेलं नव्हतं. त्यांनी बनवलेले बॉम्बही अत्यंत साधे आणि जास्त जीवितहानी किंवा मालमत्तेची हानी करणारे नव्हते.
सुरुवातीपासूनच ही योजना अत्यंत कमकुवत होती. २३ जुलै १९५४ या दिवशी फिलीप नॅथन्सन नावाच्या एका झिओनिस्ट कार्यकर्त्याच्या खिशात असलेल्या बॉम्बचा अलेक्झांड्रियाच्या एका चित्रपटगृहाच्या दरवाज्यात स्फोट झाला. फिलीपला पोलिसांनी अटक केली आणि त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे त्याच्या नेटवर्कमधल्या सर्व कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. त्यात एली कोहेनचाही समावेश होता. त्याच्या घराची झडती घेतली असता पोलिसांना काहीही सापडलं नाही. त्याला पुराव्याअभावी सोडून देण्यात आलं, पण इजिप्शियन पोलिसांनी त्याच्या नावाने एक फाईल उघडली आणि त्यात एलीबद्दल त्यांना असलेल्या माहितीची नोंद केली – एलियाहू शॉल कोहेन; जन्म १९२४ अलेक्झांड्रिया, इजिप्त; वडील शॉल कोहेन, आई सोफी कोहेन; २ भाऊ आणि ५ बहिणी. हे बाकीचे नातेवाईक १९४९ मध्ये इजिप्तमधून बेपत्ता झाले आहेत. एली कोहेन हा कैरोमधल्या फ्रेंच कॉलेजचा पदवीधर असून किंग फारूक विद्यापीठ, कैरो, इथे विद्यार्थी आहे. त्याचं संपूर्ण कुटुंब १९४९ मध्ये इझराईलला निघून गेलं होतं आणि तेल अवीवच्या बात याम या उपनगरात स्थायिक झालं होतं पण याबद्दल पोलिसांना काहीही माहित नव्हतं.
एकदा अटक होऊनसुद्धा एली इजिप्तमध्येच राहिला. त्याने इझराईलला निघून जायचा प्रयत्न केला नाही. त्या वर्षी ऑक्टोबरमध्ये इजिप्तच्या सरकारने इझरेली हेरांच्या अटकेबद्दल जाहीर केलं आणि ७ डिसेंबर या दिवशी त्यांच्यावर खटला सुरु झाला. या हेरांपैकी मॅक्स बेनेट हा अमानचा अधिकारी होता. त्याने आत्महत्या केली आणि सरकारी पक्षाने बाकीच्या सर्वांना मृत्यूदंड देण्यात यावा अशी मागणी केली. संपूर्ण जगभरातून इजिप्तच्या सरकारवर या लोकांना मृत्यूदंड न देण्याबाबत दबाव आणला गेला, पण कुठल्याही अर्जविनंत्यांचा काहीही परिणाम झाला नाही. १७ जानेवारी १९५५ या दिवशी न्यायालयाने आपला निर्णय ऐकवला – दोघांना निर्दोष सोडण्यात आलं, दोघांना ७ वर्षांची सक्तमजुरी, दोघांना १५ वर्षांची शिक्षा, दोघांना जन्मठेप आणि कटाचे सूत्रधार असलेल्या डॉ.मोशे मार्झुक आणि श्मुएल अझार यांना फाशी. ४ दिवसांनी त्यांना कैरो तुरुंगाच्या आवारात सार्वजनिकरीत्या फाशी देण्यात आली.
या सगळ्या प्रकरणाचे राजकीय पडसाद इझराईलमध्ये अत्यंत तीव्रपणे उमटले. गिबली आणि लाव्होन या दोघांचीही कारकीर्द संपुष्टात आली. पंतप्रधान शॅरेटनी लाव्होनच्या जागी निवृत्तीतून परत आलेल्या बेन गुरियनची संरक्षणमंत्री म्हणून नेमणूक केली. नंतर काही काळाने बेन गुरियन पुन्हा पंतप्रधान झाले.
श्मुएल अझार एलीचा मित्र होता. त्याचा एलीवर खूप प्रभाव होता. त्याचा असा मृत्यू झाल्यामुळे एलीच्या मनातही इजिप्त सोडून इझराईलला जायचे विचार यायला लागले पण तो लगेचच इझराईलला गेला नाही.
१९५६ च्या ऑक्टोबर – नोव्हेंबरमध्ये इजिप्तच्या विरोधात झडलेल्या सुएझ संघर्षात ब्रिटन आणि फ्रान्स यांच्याबरोबर इझराईलचाही सहभाग होता. त्यामुळे नासरने १९५७ मध्ये अनेक ज्यूंना इजिप्तमधून हाकलून दिलं. त्यात एलीचाही समावेश होता. आता इझराईलला जाण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.
इझराईलमध्ये आल्यावर एलीसाठी सर्वात पहिला प्रश्न होता कामाचा. पण त्याच्या भाषाप्रभुत्वामुळे तो लगेचच निकालात निघाला. त्याला अरेबिक, हिब्रू, इंग्लिश आणि फ्रेंच अशा चार भाषा अस्खलित रीत्या लिहिता, वाचता आणि बोलता येत होत्या त्यामुळे अमानसाठी काही मासिकं आणि नियतकालिकांचे अनुवाद करण्याचं काम त्याला लगेचच मिळालं. पण काही महिन्यांनंतर त्याची ही नोकरी सुटली. अमानसाठी काम केल्यामुळे आणि इजिप्तमध्ये क्रांतिकारक संघटनेत काम केल्यामुळे मोसादमध्ये जाण्याचे विचार एलीच्या मनात यायला लागले होते. त्याने मोसादमध्ये अर्ज केला, त्याला मुलाखतीसाठी बोलावणंसुद्धा आलं, पण मुलाखतीनंतर त्याला नाकारण्यात आलं.
मोसादच्या मानसशास्त्रतज्ञांनी एलीचं जे प्रोफाईल बनवलं होतं, त्यात ‘ या माणसाला साहस या गोष्टीची अत्यंत आवड आहे आणि निव्वळ त्याच्यासाठी तो वेळप्रसंगी जिवावरचा धोका पत्करू शकतो ’ असं म्हटलं होतं. असा माणूस मोसादला नको होता, त्यामुळे त्यांनी एलीला परत पाठवलं.
एलीला हा स्वतःचा मोठा अपमान वाटला. त्याच वेळी त्याला हमाशबीर नावाच्या एका डिपार्टमेंटल स्टोअर्स चेनमध्ये काम मिळालं. ही नोकरी हिशेब तपासनीसाची होती. अत्यंत कंटाळवाणं काम होतं, पण पगार चांगला होता, म्हणून एली तिथे काम करायला लागला. त्याच सुमारास त्याच्या मोठ्या भावाने त्याच्या एका मित्राच्या बहिणीशी एलीची ओळख करून दिली. ती एका हॉस्पिटलमध्ये नर्स होती आणि तिचं नाव होतं नादिया मायकेल. तिचा भाऊ सामी मायकेल इझराईलमधल्या नामवंत कवी आणि लेखकांपैकी एक होता. नादिया आणि एली एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी यथावकाश लग्न केलं.
इकडे मोसादने जरी एलीला परत पाठवलं असलं, तरी त्यांचं त्याच्यावर बारीक लक्ष होतं. त्याच्या आयुष्यातल्या घडामोडींची ते अगदी तपशीलवार नोंद करत होते. त्यावेळी अमानचा प्रमुख असलेला मायर अमित एका खास प्रकारच्या एजंटच्या शोधात होता. मोसादच्या फाईलमध्ये असा एजंट न मिळाल्यामुळे अमितने मोसादने नाकारलेल्या लोकांची फाईल बघायला सुरुवात केली आणि एलीचं नाव आणि त्याची पार्श्वभूमी कळल्यावर असा माणूस आपल्या कामाला येऊ शकेल याबद्दल त्याची खात्री पटली.
एलीला त्याच्या ऑफिसमध्ये झाल्मान नावाचा एक माणूस भेटायला आला. त्याने त्याला मोसादसाठी काम करायची ऑफर दिली. आपलं नुकतंच लग्न झालं असल्याचं सांगून एलीने त्याला परत पाठवलं. पण अमितला एली कुठल्याही प्रकारे हवा होता आणि लवकरच तशी संधी आली.
गरोदरपणामुळे नादियाला तिची नोकरी सोडावी लागली. हमाशबीरची मालकी एका फ्रेंच कंपनीकडे गेली. त्यांनी पुनर्रचनेच्या नावाखाली अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं. त्यात एलीचा समावेश होता.
झाल्मान एलीला परत भेटला आणि त्याने एलीला परत तीच ऑफर दिली. या वेळी एलीने नकार दिला नाही. प्रत्यक्ष काम करण्याआधी त्याला ६ महिन्यांचं खडतर प्रशिक्षण पूर्ण करावं लागणार होतं.
१९६० चं दशक सुरु होताना अनेक गोष्टी बदलल्या होत्या. इझराईलच्या
स्वातंत्र्ययुद्धाच्या वेळी इराक आणि इजिप्त हे दोन्हीही देश ज्यूविरोधात
अग्रेसर होते. पण दोन्ही देशांमध्ये झालेल्या राज्यक्रांतीने परिस्थिती
बदललेली होती. दोन्ही देशांमध्ये लष्करी राजवट होती आणि तिथल्या
राष्ट्रप्रमुखांना आपल्या सैन्याच्या मर्यादांची जाणीव होती. त्यामुळे ६०
चं दशक सुरु होताना त्यांचा इझराईलविरोध थोडा कमी झाला होता. पण त्यांची
जागा घ्यायला सीरिया पुढे आला होता. इझराईल आणि सीरिया यांच्या सरहद्दीवर
असलेल्या गोलान टेकड्या हा इझराईलसाठी डोकेदुखीचा विषय होता. तिथे सीरियन
तोफखान्याची अनेक ठाणी होती. त्यांच्यामधून खाली दरीत असलेल्या इझरेली
शेतकऱ्यांवर तोफगोळ्यांचा भडीमार ही नित्याची गोष्ट होती. अनेक वेळा
सीरियामध्ये प्रशिक्षण घेतलेल्या दहशतवाद्यांनी इझराईलमध्ये प्रवेश करायचा
प्रयत्न केला होता. आणि आता सीरिया आणि इतर अरब देश इझराईलचं पाणी
तोडण्याचा विचार करत होते.
इझराईलच्या मध्य आणि दक्षिण भागात नेगेव्हचं वाळवंट पसरलेलं आहे. या भागात
पाऊस अतिशय कमी पडतो. १९५० च्या दशकाच्या शेवटी इझरेली इंजिनीअर्सनी जॉर्डन
नदी, तिच्या उपनद्या आणि टायबेरिअस सरोवर (ज्याला गॅलिलीचा समुद्र असंही
नाव आहे आणि समुद्र म्हटलं तरी ते प्रत्यक्षात गोड्या पाण्याचं सरोवर आहे)
यांचं पाणी अनेक कालवे आणि पाईपलाईन्स यांच्यामार्फत नेगेव्हमध्ये खेळवलं
आणि तिकडे शेतीची सुरुवात केली. यासाठी इझराईलने वापरलेलं पाणी हे जॉर्डन
नदीच्या इझराईलमधून वाहणाऱ्या प्रवाहामधून आणि तिच्या इझराईलमधल्या
उपनद्यांमधून वळवलं होतं. पण अरब राष्ट्रांनी त्याविरुद्ध आरडाओरडा करायला
सुरुवात केली. त्यांच्यात झालेल्या बैठकींमध्ये इझराईल वापरत असलेलं पाणी
इझराईलला मिळू द्यायचं नाही असं ठरवण्यात आलं आणि ही कामगिरी सीरियाने
स्वतःकडे घेतली. हा सीरियन प्रकल्प अर्थातच अत्यंत गुप्तपणे चालणार होता
आणि त्याचसाठी मोसादला सीरियामध्ये कोणीतरी ‘ आपला माणूस ’ हवा होता.
पहिल्यांदा सीरियन सरकारमधल्या कुणालातरी फोडण्याची योजना आखण्यात आली. पण
तिची अव्यव्हार्यता लक्षात आल्यावर मोसादकडे एकच पर्याय उरला होता – आपला
कोणीतरी माणूस तिकडे पाठवायचा. तो ज्यू आहे असा संशयही कुणाला येता कामा
नये. आणि एली कोहेन असा माणूस आहे, असं मोसादमधल्या लोकांचं मत पडलं. ज्या
कारणांमुळे त्याला त्यांनी आधी नाकारलं होतं, त्याच कारणांमुळे एलीला आता
मोसादमध्ये प्रवेश मिळाला होता.
एलीला तो काय करतोय आणि पुढे काय होणार आहे, याबद्दल कोणालाही, अगदी त्याच्या पत्नीलाही सांगायची मनाई करण्यात आली होती. त्यामुळे दररोज सकाळी एली काहीतरी थाप मारून किंवा बहाणा करून घरातून निघत असे आणि सरळ अमान – मोसाद यांच्या संयुक्त प्रशिक्षण केंद्रात येत असे. सुरुवातीचे काही दिवस त्याला फक्त एकच काम होतं – स्मरणशक्ती वाढवणं. त्याची स्मरणशक्ती उपजतच जबरदस्त होती, पण ती आता वेगळ्या कामासाठी वापरली जाणार होती.
त्याचा प्रशिक्षक दररोज त्याच्यासमोर वेगवेगळ्या वस्तू टाकत असे आणि अगदी अर्ध्या मिनिटाच्या किंवा काही सेकंदांच्या निरीक्षणानंतर त्याला त्या वस्तू लक्षात ठेवून लिहायला सांगत असे. कधीकधी एक-दोन आठवड्यांपूर्वी दाखवलेल्या वस्तूंबद्दलही हा प्रशिक्षक, ज्याचं नाव यित्झाक होतं, तो एलीला विचारत असे.
कधीकधी यित्झाक एलीला बाहेर रस्त्यावर घेऊन जाई आणि आपला पाठलाग होतोय
का हे कसं ओळखायचं, त्यांना झुकांडी कशी द्यायची, अजिबात लक्षात न येऊ देता
एखाद्याचा पाठलाग कसा करायचा याचंही प्रशिक्षण होत असे.
अजून एका प्रशिक्षकाने एलीला ट्रान्समीटर कसा वापरायचा त्याचं प्रशिक्षण
दिलं. त्यानंतर एक महिना त्याचं शारीरिक आणि मानसिक परीक्षण झालं. एली
सगळ्या चाचण्या चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झाला होता. नंतर त्याला एक
वेगळाच पासपोर्ट देऊन जेरुसलेमला जायला सांगण्यात आलं. तिथे त्याला १० दिवस
राहायचं होतं आणि फक्त फ्रेंच आणि अरेबिक या दोनच भाषांमध्ये संभाषण
करायचं होतं.
एली जेरुसलेमला असतानाच त्याच्या मुलीचा, सोफीचा जन्म झाला. तो त्याच्या भूमिकेत इतका खोलवर शिरला होता, की जेव्हा त्याला मोसादच्या लोकांनी त्याच्या मुलीच्या जन्माची बातमी सांगितली, तेव्हा त्याने प्रतिक्रिया अरेबिकमध्ये दिली.
तिथून परत आल्यावर एका ब्रिटनमध्ये स्थायिक झालेल्या अरब धर्मगुरूने एलीला कुराण, प्रार्थना आणि अरब रीतिरिवाज शिकवले. हे करताना एलीच्या चुका होत होत्या. पण त्याच्या प्रशिक्षकांनी त्याला काळजी न करण्याचा सल्ला दिला, कारण त्यांच्या मते एलीची जी कव्हर स्टोरी होती, त्यानुसार तो पाश्चात्य देशांमध्ये राहिलेला अरब होता, त्यामुळे त्याच्या हातून चुका होणं स्वाभाविक होतं.
आता खऱ्या कामगिरीची ओळख करून घेण्याची वेळ आली होती. एलीला एका तटस्थ
देशात पाठवून मग तिथून या अरब देशात जायचं होतं. जेव्हा एलीने त्याबद्दल
विचारलं, तेव्हा त्याला सांगण्यात आलं – सीरिया किंवा इराक.
त्याचबरोबर त्यांनी त्याला एक नवीन नाव आणि एक नवीन कव्हर स्टोरी, ज्याला हेरगिरीच्या परिभाषेत ‘legend’ असं म्हणतात, ती दिली.
“तुझं नाव कमाल बिन अमीन साबेत. तुझ्या वडिलांचं नाव अमीन बिन खुर्रम साबेत. आईचं नाव सईदा इब्राहीम. तुला एक बहीणसुद्धा होती. तुझा जन्म बैरुट, लेबेनॉन इथे झालेला आहे. तू ३ वर्षांचा असताना तुझ्या आईवडिलांनी लेबेनॉन देश सोडला आणि ते इजिप्तमध्ये अलेक्झांड्रिया इथे स्थायिक झाले. पण हे विसरू नकोस, की तुझं कुटुंब मूळचं सीरियामधलं आहे. इजिप्तमध्ये गेल्यानंतर एका वर्षाच्या आत तुझ्या बहिणीचा मृत्यू झाला. तुझ्या वडिलांचा कापडाचा व्यापार होता. १९४६ मध्ये तुझ्या काकांनी अर्जेन्टिनामध्ये स्थलांतर केलं आणि त्यानंतर काही काळातच त्यांनी तुझ्या वडिलांना तिथे बोलावलं. १९४७ मध्ये तुम्ही सगळे अर्जेन्टिनाला गेलात. तुझे वडील आणि काका यांनी तिसऱ्या एका माणसाला भागीदार म्हणून घेऊन एक दुकान चालू केलं, पण त्याचं दिवाळं काढावं लागलं. १९५६ मध्ये तुझ्या वडिलांचा आणि त्यानंतर ६ महिन्यांच्या आत तुझ्या आईचा मृत्यू झाला. तू तुझ्या काकांच्या ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काही काळ काम केलंस आणि नंतर स्वतःचा व्यवसाय चालू केलास आणि तो भरभराटीला आला.”
त्याचप्रमाणे त्यांनी एलीला त्याच्या घरच्यांना सांगण्यासाठीही एक दुसरी कव्हर स्टोरी दिली. एलीने नादियाला त्याला इझराईलच्या संरक्षण आणि परराष्ट्र मंत्रालयांसाठी काम करणाऱ्या एका कंपनीमध्ये सेल्स एक्झिक्युटिव्हची नोकरी मिळाल्याचं सांगितलं. या नोकरीसाठी त्याला भरपूर फिरावं लागणार होतं. इझरेली संरक्षण उत्पादनांसाठी सामग्री खरेदी करणे आणि या उत्पादनांसाठी बाजारपेठ शोधणे अशी दोन्ही कामं आपल्याला करायची आहेत, असंही त्याने तिला सांगितलं.
फेब्रुवारी १९६१ मध्ये एलीची कामगिरी सुरु झाली. तो सर्वात पहिल्यांदा तेल अवीवहून झुरिकला गेला. तिथे त्याला भेटलेल्या एका माणसाने त्याला पुढच्या कामगिरीबद्दल सूचना दिल्या आणि त्याच्या हातात ब्युनोस आयर्सचं तिकिट ठेवलं. तिथे एली वेगळ्या पासपोर्टवर गेला.
ब्युनोस आयर्समध्ये एलीचं काम लगेच सुरु झालं नाही. एका भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये एका शिक्षकाकडून स्पॅनिश भाषा शिकणं आणि दुसऱ्या शिक्षकाकडून सीरियन धाटणीने अरेबिक भाषा बोलायला शिकणं हीच कामं त्याला आता पुढचे दोन महिने करायची होती.
दोन महिन्यांनी पुढचा टप्पा सुरु झाला. त्या फ्लॅटमधून बाहेर पडताना एलीने ब्युनोस आयर्समध्ये राहणाऱ्या अरब माणसासारखा पेहराव केला होता आणि त्याच्याकडे आता सीरियन पासपोर्ट होता. त्याच्यावर नाव होतं - कमाल अमीन साबेत.
त्या फ्लॅटमधून बाहेर पडल्यावर एलीने सर्वप्रथम एक नवीन फ्लॅट भाड्याने
घेतला, एक बँक अकाऊंट उघडला, आणि अरब, विशेषतः सीरियन अरब जिथे
प्रामुख्याने असतील अशा रेस्तराँ आणि क्लब्जमध्ये जायला सुरुवात केली.
हळूहळू त्याचा मित्रपरिवार वाढायला लागला आणि काही काळातच या
आयात-निर्यातीच्या व्यवसायात असणाऱ्या देखण्या अरब माणसाला ब्युनोस
आयर्समधले बहुतांश अरब ओळखायला लागले. त्यांच्या अनेक संस्थांना साबेतने
अगदी सढळ हाताने देणग्या दिल्या. त्याचं व्यक्तिमत्व अत्यंत आकर्षक होतं.
तो अनेक देश फिरलेला होता आणि गोष्टीवेल्हाळ होता.
त्यामुळे त्याला अनेक क्लब्जमधून मेजवान्यांची आणि कार्यक्रमांची आमंत्रणं यायला लागली.
एली उर्फ साबेतने याच्यापुढचा टप्पा सहजपणे पार केला. एका क्लबमध्ये त्याची ओळख अब्देल लतीफ हसन नावाच्या माणसाशी झाली. हसन अर्जेन्टिनामधल्या अरब लोकांसाठी प्रकाशित होणाऱ्या ‘ अरब वर्ल्ड ’ नावाच्या नियतकालिकाचा संपादक होता. तो या हसतमुख आणि प्रभावी व्यक्तिमत्वाच्या सीरियन ‘ व्यापाऱ्यामुळे ‘ खूपच प्रभावित झाला आणि दोघेही लवकरच घनिष्ठ मित्र बनले.
हसनच्या ओळखीने साबेतला सीरियन राजदूतावासातही प्रवेश मिळाला. अशाच एका राजनैतिक स्वरूपाच्या मेजवानीमध्ये हसनने साबेतची ओळख एका लष्करी अधिकाऱ्याशी करून दिली. या अधिकाऱ्याचं नाव होतं जनरल अमीन अल हाफेझ आणि तो सीरियन राजदूतावासातला लष्करी प्रतिनिधी (military attache) होता.
आता एलीच्या खऱ्याखुऱ्या कामगिरीला सुरुवात झाली. जुलै १९६१ मध्ये कमाल अमीन साबेत हसनला त्याच्या ऑफिसमध्ये भेटला आणि त्याने आपण अर्जेन्टिनामध्ये राहायला कंटाळलेलो असून आपली लवकरात लवकर सीरियाला परत जायची इच्छा आहे असं त्याने सांगितलं. हसन त्याबद्दल काही करू शकेल का आणि त्याच्यासाठी शिफारसपत्र देऊ शकेल का? असंही त्याने पुढे विचारलं. हसनला यात काहीही वावगं वाटलं नाही. कमाल अमीन साबेत हा एक अत्यंत देशभक्त सीरियन असून तो केवळ नाईलाज म्हणून ब्युनोस आयर्समध्ये राहतो आहे या कथेवर त्याचा पूर्ण विश्वास बसलेला होता. त्याने लगोलग एलीला चार शिफारसपत्रं दिली. त्यातलं एक त्याच्या दमास्कसमध्ये राहणाऱ्या मुलासाठी होतं. हसनप्रमाणेच इतर अरब मित्रांना भेटून एलीने त्यांच्याकडूनही अशीच शिफारसपत्रं मिळवली.
ऑगस्ट १९६१ च्या शेवटी कमाल अमीन साबेतने त्याच्या ब्युनोस आयर्समधल्या मित्रांचा निरोप घेतला आणि तो तिथून स्वित्झर्लंडला आणि तिथून म्युनिकला गेला. म्युनिकमध्ये त्याने वेषांतर केलं आणि एका वेगळ्याच इझरेली पासपोर्टवर तो इझराईलमध्ये आला. आता काही महिने तो घरच्यांबरोबर घालवणार होता.
पण मोसादने त्याच्या सुट्टीमध्येही त्याला कामाला लावलं होतं. आता यापुढचा टप्पा अत्यंत धोक्याचा होता. कुणाला जराजरी संशय आला असता, तरी केलेल्या सगळ्या मेहनतीवर पाणी पडलं असतं. त्यामुळे या सुट्टीमध्ये मोसादच्या प्रशिक्षकांनी एलीला सीरिया, तिथलं राजकारण, अंतर्गत परिस्थिती, जनमत याबद्दल अगदी सखोल माहिती दिली. त्याचबरोबर त्याचा अरेबिक भाषेचा आणि रेडिओ संदेश पाठवण्याचा अभ्यासही चालूच होता. तासाला १२ ते १६ शब्दांचा संदेश प्रसारित करण्याइतपत एलीची प्रगती झाली होती.
डिसेंबर १९६१ मध्ये एली तेल अवीवहून परत झुरिकला आणि तिथून म्युनिकला गेला. आता यापुढे तो प्रत्यक्ष सिंहाच्या गुहेत जाणार होता – सीरियाची राजधानी दमास्कस.
----------------------------------------------------------------------------------------
सीरियन सरकार दिवसेंदिवस कमजोर व्हायला लागलं होतं. लष्कराचा हस्तक्षेप वाढायला लागला होता. त्यामुळे इझराईल आणि सीरिया यांच्या सरहद्दीवर तणाव निर्माण व्हायला सुरुवात झाली होती. पहिल्या महायुद्धापर्यंत इझराईलप्रमाणे सीरियासुद्धा तुर्कस्तानमधल्या ऑटोमन साम्राज्याचा भाग होता आणि युद्धानंतर फ्रेंचांनी त्यावर आपलं नियंत्रण प्रस्थापित केलेलं होतं. १९४८ मध्ये ब्रिटीश पॅलेस्टाईनमधून आणि फ्रेंच सीरियामधून साधारणपणे एकाच वेळी निघून गेले. त्यानंतर सीरियामध्ये राजकीय स्थैर्य नावाचा प्रकार अस्तित्वातच नव्हता. राज्यक्रांत्या होऊन एका हुकुमशहाच्या जागी दुसरा येणं ही नियमाने होणारी गोष्ट झाली होती. सीरियाचा कुठलाही शासक हा नैसर्गिकरीत्या मरत नाही – एकतर त्याच्याजागी सत्तेवर आलेला दुसरा शासक त्याची हत्या करवतो किंवा मग त्याच्या हत्येनेच नवीन राज्यक्रांती होते अशी साधारण परिस्थिती होती. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड असंतोष होता. त्यापासून त्यांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी सीरियन राज्यकर्ते कधी लेबेनॉनबरोबर आणि बरेच वेळा इझराईलबरोबर काहीनाकाही भांडण उकरून काढत असत. राजवट बदलली की आधीच्या राजवटीच्या पाठीराख्यांना देशद्रोहाच्या आरोपावरून दमास्कसच्या मध्यवर्ती मार्जेह चौकात जाहीररीत्या फाशी दिली जात असे.
एली दमास्कसमध्ये येण्याच्या काही काळ आधी – सप्टेंबर १९६१ मध्ये सीरियामध्ये राज्यक्रांती होऊन इजिप्त आणि सीरिया यांचं एकीकरण रद्द करण्यात आलं होतं. असं एकीकरण हे इजिप्तचा राष्ट्राध्यक्ष नासरचं डोकं होतं. १९५६-५७ मधल्या सुएझ कालव्याच्या संघर्षानंतर त्याची प्रतिष्ठा अरब जगामध्ये प्रचंड प्रमाणात वाढलेली होती. इकडे सीरियामध्ये कम्युनिस्ट पक्ष हळूहळू बलिष्ठ होत होता, आणि तत्कालीन सीरियन लष्करप्रमुख अफीफ अल बिझरी हा सोविएत रशियाच्या पूर्णपणे कह्यात गेलेला होता. त्यामुळे सीरियाला कम्युनिस्टांच्या हातात पडण्यापासून वाचवण्यासाठी नासरने सीरियन सरकारपुढे हा प्रस्ताव मांडला होता आणि सीरियामधला दुसरा प्रबळ राजकीय पक्ष असलेल्या बाथ (Ba’ath) पक्षाने त्याला पाठिंबा दिला होता आणि १ फेब्रुवारी १९५८ या दिवशी हे एकीकरण झालं होतं.
पण नासरचा अंतस्थ हेतू संपूर्ण अरब जगाचा मसीहा बनणं हा असल्यामुळे तो बाथ पक्षाच्या हातात सीरियाची सूत्रं जाऊ द्यायला तयार नव्हता. त्यामुळे हे एकीकरण तीन वर्षांनी फिसकटलं आणि सप्टेंबर १९६१ मध्ये झालेल्या राज्यक्रांतीनंतर सीरिया या एकीकरणातून बाहेर पडला.
एलीला मोसादमध्ये आणणारा झाल्मान हाच एलीचा केस ऑफिसर किंवा मोसादच्या परिभाषेत ‘ कात्सा ‘ होता. त्याने एलीला म्युनिकमध्ये हेरगिरीसाठी लागणारी सर्व सामग्री – खास बनवलेले कागद, अदृश्य शाई, एक छोटा टाईपरायटर, छोटा ट्रान्समीटर गुप्तपणे बसवलेला एक ट्रान्झिस्टर रेडिओ सेट आणि इतरही बऱ्याच वस्तू – दिली.
म्युनिकवरून एली इटलीमधल्या जेनोआ इथे गेला आणि तिथून बोटीने तो बैरुटला गेला. बोटीवर त्याला मजीद एल अर्द नावाचा एक अरब भेटला. तो संपूर्ण अरब जगात मसाले आणि उंची कपडे यांचा व्यापारी म्हणून प्रसिद्ध होता. पण त्याची खरी प्रसिद्धी वेगळ्या कारणासाठी होती, ती म्हणजे अरब जगातल्या कुठल्या बंदरामध्ये कुठला कस्टम आणि इमिग्रेशन ऑफिसर किती लाच घेऊन सामान जाऊ देतो याबद्दल त्याला खडानखडा माहिती होती. त्याच्या याच ‘ कौशल्याचा ‘ उपयोग करून घ्यायचं मोसादने ठरवलं होतं, आणि त्यांना हे समजलं होतं एल अर्दच्या पत्नीकडून. ती इजिप्शियन ज्यू होती आणि तिचं आणि एल अर्दचं लग्न ऐन दुसऱ्या महायुद्धाच्या काळात चक्क नाझी जर्मनीमध्ये झालं होतं. तिने अर्थातच आपण ज्यू आहोत ही माहिती लपवलेली होती आणि आता युद्धानंतर ते सीरियामध्ये स्थायिक झाले होते. आपल्या व्यवसायानिमित्त एल अर्द जगभर फिरत असे. सीरियामधल्या सध्याच्या राजवटीबद्दल त्याच्या मनात राग होता, पण आपण मोसादची मदत करतोय याची त्याला कल्पनाही नव्हती. आपण सीरियन राजवटीविरुद्ध असलेल्या उजव्या विचारसरणीच्या बंडखोरांची मदत करतोय असं त्याला वाटत होतं. एलीला झाल्मानने दिलेली सामग्री सीरियामध्ये व्यवस्थित पोचवणं हे काम तो करणार होता.
बैरूटहून एल अर्द आणि एली गाडीने सीरियामध्ये शिरले. तिथे सरहद्दीवर तिथल्या कस्टम अधिकाऱ्याला ५०० अमेरिकन डॉलर्स देऊन एल अर्दने आपल्या गाडीची झडती होऊ दिली नव्हती. त्याच्या गाडीच्या डिकीमध्येच एलीला झाल्मानने दिलेली सगळी सामग्री होती.
सर्वसाधारणपणे एखादा हेर जेव्हा शत्रूराष्ट्रात जातो, तेव्हा तिथल्या
गर्दीत मिसळून जाणं हे त्याचं पहिलं उद्दिष्ट असतं, पण एलीच्या बाबतीत ते
पूर्णपणे उलटं होतं. त्याला सर्वांचं लक्ष वेधून घ्यायचं होतं, आणि तेही
लवकरात लवकर.
दमास्कसमधल्या एकदम श्रीमंत आणि उच्चभ्रू अशा अबू रामेन या भागात एलीने एक
मोठा फ्लॅट भाड्याने घेतला. हा फ्लॅट सीरियन सैन्याच्या एका मोठ्या तळाच्या
अगदी समोर होता. आपल्या या घराच्या बाल्कनीमधून एलीला सीरियन सरकारचं मोठं
अतिथीगृह दिसू शकत होतं. इतर देशांच्या वकिलाती, श्रीमंत व्यापारी आणि
सीरियन सरकारमधले उच्चपदस्थ अधिकारी असले तालेवार लोक त्याचे शेजारी होते.
या फ्लॅटच्या विविध भागांमध्ये त्याने आपले ट्रान्समीटर्स लपवले होते आणि
नोकरांकडून दगाफटका होण्याचा धोका होता, त्यामुळे कोणीही पूर्णवेळ नोकर
त्याने कामावर ठेवला नव्हता.
तो ज्यावेळी दमास्कसमध्ये आला, तेव्हा त्याचं दैव जोरावर होतं. इजिप्तबरोबर झालेलं सीरियाचं एकीकरण संपुष्टात येणं हा नासरला स्वतःचा व्यक्तिगत अपमान वाटला होता, त्यामुळे तो कदाचित सीरियामध्ये एखादी राज्यक्रांती घडवून आणू शकेल ही भीती सीरियन राज्यकर्त्यांना वाटत होती. त्यामुळे इझराईलकडे त्यांचं थोडंफार दुर्लक्षच झालं होतं. सततच्या संघर्षांमुळे देशाच्या तिजोरीमध्ये खडखडाट होता. राज्यकर्त्यांना मित्र, पाठीराखे आणि पैसे यांची नितांत आवश्यकता होती आणि अशावेळी कमाल अमीन साबेतसारखा प्रखर राष्ट्रभक्त, राष्ट्रवादी, आणि श्रीमंत व्यापारी देशामध्ये परत येणं ही त्यांच्यासाठी पर्वणी होती.
एली उर्फ साबेतने सीरियामध्ये स्वतःचं वलय निर्माण करायला सुरुवात केली. त्याला ज्या लोकांनी शिफारसपत्रं दिली होती, त्यांना सीरियामध्ये चांगलाच मान होता, त्यामुळे त्याच्यासाठी सीरियामधल्या उच्चवर्गाने स्वखुशीने दरवाजे उघडले. हळूहळू मोठे व्यापारी आणि सरकारी अधिकारी त्याच्या बैठकीमध्ये सामील झाले. तो अजून अविवाहित आहे हे समजल्यावर लोकांमध्ये त्याला आपला जावई किंवा मेहुणा करून घेण्यासाठी अहमहमिका लागली.
दमास्कसमधल्या गरीब लोकांसाठी तिथल्या नगरपालिकेने चालवलेल्या अन्नछत्राला भलीमोठी देणगी देऊन साबेतने आपली सामाजिक बाजूही लोकांना दाखवून दिली. पण अजूनही तो राजकारणात पडायचं टाळत होता, कारण सीरियामध्ये अजून एखादी मोठी उलथापालथ होऊ घातलेली आहे असं त्याच्या मोसादमधल्या वरिष्ठांचं मत होतं, आणि आता एलीही त्याच निष्कर्षाला पोचला होता.
ब्युनोस आयर्समध्ये हसनच्या संपादकपदामुळे एलीला तिथल्या राजकीय वर्तुळात शिरकाव करता आला होता. इथे सीरियामध्ये तेच काम करणारा माणूस होता जॉर्ज सलीम सैफ. तो जगभरात पसरलेल्या सीरियन नागरिकांसाठी रेडिओ दमास्कसवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांचा निर्माता होता, आणि हसनप्रमाणेच त्यालाही एलीच्या खऱ्या स्वरुपाची काहीही माहिती नव्हती. त्याच्याशी गप्पा मारता मारता एलीला सीरियामधल्या राजकीय परिस्थितीबद्दल माहिती समजत होती. हसनप्रमाणेच सैफनेही एलीची अनेक राजकीय नेत्यांशी आणि सरकारी अधिकाऱ्यांशी ओळख करून दिली.
हे सगळं चालू असताना एली वैयक्तिकरीत्या मात्र एकाकी पडला होता. त्याच्या मनावरचा ताण तो कोणाशीही बोलून हलका करू शकत नव्हता. मोसादचं एखादं अजून नेटवर्क दमास्कसमध्ये असण्याची शक्यता होती, पण त्यांनी एलीशी किंवा त्याने त्यांच्याशी संपर्क साधणं म्हणजे आत्मघात ठरला असता. दिवसाचे २४ तास एक वेगळा माणूस बनून शत्रूराष्ट्रात राहणं हे वाटतं तितकं सोपं नाही याची जाणीव आता त्याला व्हायला लागली होती.
मिळालेली सगळी माहिती तो नित्यनियमाने सकाळी ८ वाजता आणि कधी कधी संध्याकाळीही प्रसारित करत असे. त्याचं घर सैन्याच्या तळाच्या खूपच जवळ होतं. तिथून सतत संदेश प्रसारित होत असत. त्या संदेशांमध्ये त्याने पाठवलेले संदेश लपून जात असत.
दमास्कसमध्ये आल्यानंतर ६ महिन्यांच्या कालावधीत कमाल अमीन साबेतने बरीच मजल मारली होती. कामासाठी बाहेर जावं लागणं हे त्याच्यासाठी अगदी नैमित्तिक होतं. त्यामुळे तो अर्जेन्टिनामधल्या मित्रांना भेटण्यासाठी गेला, तेव्हा दमास्कसमध्ये कुणालाही आश्चर्य वाटलं नाही. ब्युनोस आयर्सवरून तो म्युनिकला गेला आणि तिथे वेषांतर करून आणि वेगळ्या पासपोर्टवर तो तेल अवीवला गेला. तिथे आपल्या कुटुंबाबरोबर काही काळ घालवून मग तो दमास्कसला परत गेला.
यावेळी त्याला एल अर्दची गरज नव्हती. त्याचं स्वतःचं नाव पुरेसं होतं. त्याने सीरियामधल्या मित्रांसाठी भरपूर भेटवस्तू आणल्या होत्या. या भेटवस्तूंमध्ये मायक्रोफिल्म्स आणि एक छोटा कॅमेरा दडवलेले होते. जी माहिती प्रसारित करता येणार नव्हती, ती माहिती एली मायक्रोफिल्म्सद्वारे पाठवत असे. सीरियामध्ये बनलेल्या बुद्धिबळ आणि बॅकगॅमन यांच्या पटांना अर्जेन्टिनामध्ये चांगली मागणी होती. त्यामुळे तो अर्जेन्टिनामध्ये या वस्तू निर्यात करत असे आणि त्यांच्यामध्ये मायक्रोफिल्म्स दडवलेल्या असायच्या. तो अर्जेन्टिनामधल्या लोकांना हे पट पाठवायचा आणि ते त्यातून मायक्रोफिल्म्स काढून घेऊन इझराईलला त्या राजनैतिक मार्गाने (diplomatic channel) पाठवायचे.
त्यावेळी सीरियामध्ये बाथ पक्षाच्या स्वतंत्र सीरियावादी गटाचा जोर वाढायला लागला होता. सैफकडून एलीला याची बित्तंबातमी मिळत होतीच. वारे ज्या दिशेने वाहत होते त्याचा फायदा घ्यायचं त्याने ठरवलं आणि बाथ पक्षाच्या या नेत्यांबरोबर ओळख वाढवायला सुरुवात केली आणि आपल्या पैशांच्या थैल्या मोकळ्या सोडल्या.
त्याचा हा होरा अचूक होता हे मार्च १९६३ मध्ये सिद्ध झालं. ८ मार्च १९६३ या दिवशी सीरियामध्ये परत राज्यक्रांती झाली आणि बाथ पक्षाच्या स्वतंत्र सीरियावादी गटाने सत्ता काबीज केली. त्यांना सैन्याचाही पाठिंबा होता. एलीला ब्युनोस आयर्समध्ये भेटलेला जनरल अमीन अल हाफेझ या नवीन सरकारमध्ये संरक्षणमंत्री होता. त्याच वर्षी जुलैमध्ये राष्ट्राध्यक्ष सलाह अल बित्रविरुद्ध त्याच्या मंत्रिमंडळाने बंड केलं आणि हाफेझ राष्ट्राध्यक्ष झाला. त्याच्या मंत्रिमंडळामध्ये आणि महत्वाच्या अधिकाऱ्यांमध्ये जवळपास सगळे कमाल अमीन साबेतचे घनिष्ठ मित्र होते. काहीजणांना तर साबेतच्या सांगण्यावरून हाफेझने नियुक्त केलेलं होतं. साबेत आता सीरियन सरकारच्या अंतर्गत वर्तुळात सामील झाला होता.
दमास्कसमधली एक झगमगणारी मेजवानी. एकापाठोपाठ एक गाड्या येत आहेत. सगळ्या उच्चपदस्थांच्या मर्सीडिज किंवा रोल्स रॉईस. सरकारमधले मंत्री आणि सैन्यदलांचे अधिकारी त्यामधून उतरत आहेत. त्यांचा यजमान प्रत्येकाचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि त्यांना काय हवं-नको त्याकडे जातीने लक्ष पुरवत आहे. या मेजवानीला येणाऱ्या पाहुण्यांची यादी आणि दमास्कसमधल्या सर्वात बलाढ्य लोकांची यादी यात फारसा फरक नाहीये. बरेच लोक कर्नल सलीम हातुमभोवती घोळका करून उभे आहेत. जनरल हाफेझच्या राष्ट्राध्यक्ष बनण्यामध्ये हातुमचा मोठा हातभार होता. त्यानेच जुलै १९६१ मध्ये दमास्कसमध्ये रणगाडे घुसवून अल बित्रला राजीनामा द्यायला भाग पाडलं होतं. थोड्या वेळाने स्वतः राष्ट्राध्यक्ष हाफेझचं आगमन होतं. तो सर्वप्रथम जाऊन आपल्या मित्राला – कमाल अमीन साबेतला भेटतो. राष्ट्राध्यक्षाबरोबर त्याची पत्नीही आहे. तिच्या अंगावर हिऱ्यांची कलाकुसर केलेला मिंक कोट आहे, जो साबेतने तिला भेट दिलेला आहे. अर्थात अशी भेट मिळालेली ती एकटी नाहीये. तिथे असलेल्या स्त्रियांपैकी किमान ५० टक्के स्त्रियांचे कपडे आणि दागिने हे साबेतने भेट दिलेले आहेत.
एकीकडे सैन्याधिकारी आणि सरकारी अधिकाऱ्यांचा एक गट सरहद्दीवरच्या परिस्थितीबद्दल चर्चा करतोय. त्यांच्यामध्ये असलेले काही लोक जॉर्डन नदी आणि तिच्या उपनद्यांचं पाणी इझराईलपासून वळवण्याच्या योजनेवर काम करत आहेत. ते उत्साहाने आपण आजवर केलेल्या कामाबद्दल बोलताहेत.
दुसरीकडे साबेत स्वतः काही लष्करी अधिकाऱ्यांबरोबर त्याच्या रेडिओ कार्यक्रमाबद्दल बोलतोय. हो, त्याला आता स्वतःचा रेडिओ कार्यक्रम मिळालाय. या कार्यक्रमात तो सीरियामधली राजकीय आणि आर्थिक परिस्थिती आणि इझराईल या विषयांवर भाष्य करतो. त्याशिवाय जगभर पसरलेल्या सीरियन नागरिकांसाठीही त्याचा एक वेगळा कार्यक्रम रेडिओ दमास्कसवर चालू आहे.
एली उर्फ साबेत अशा मेजवान्या महिन्यातून किमान एकदा देत असे. त्यांना सीरियन प्रसारमाध्यमांतून भरपूर प्रसिद्धी मिळत होती.
या आदरातिथ्याचा परिणाम म्हणून एलीला सैन्याच्या तळांवर आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांसाठी आमंत्रणं यायला लागली. तो बरेच वेळा तिकडे प्रमुख पाहुणा म्हणून जात असे. सीरियन सैन्याची गोलान टेकड्यांवरील तटबंदी, सीरियन लष्कराच्या पुढच्या योजना, त्यांचे नकाशे, नवी शस्त्रास्त्रं याबद्दल त्याला मिळणारी सगळी माहिती त्याच्या प्रसारणातून किंवा मग मायक्रोफिल्म्सच्या द्वारे मोसाद आणि अमानपर्यंत पोचत होती. त्याने त्याच्याव्यतिरिक्त संदेश पाठवण्याची एक अजून नवीन पद्धत शोधून काढली – रेडिओ दमास्कसवरचे त्याचे कार्यक्रम. त्याच्या एका इझराईल भेटीमध्ये त्याने आणि मोसादच्या अधिकाऱ्यांनी एक विशिष्ट शब्द आणि वाक्प्रचार यांचं कोड विकसित केलं. एली त्याच्या कार्यक्रमांमध्ये हे शब्द वापरत असे. त्यावरून मोसादला माहिती मिळत असे.
आता त्याने आपला प्रभाव अजून वाढवायला सुरुवात केली. त्याचं घर प्रचंड मोठं होतं आणि तो एकटाच राहात असे. त्याच्या ओळखीच्या एका सरकारी अधिकाऱ्याला आपल्या ‘ मैत्रिणीला ‘ भेटण्यासाठी एका जागेची आवश्यकता होती. त्याने साबेतला विचारलं. साबेतने काहीही न बोलता आपल्या घरातली एक खोली उघडून दिली. आणि त्यानंतर हे प्रकार अगदी नियमितपणे सुरु झाले. अनेक उच्चपदस्थ लष्करी आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या मैत्रिणींना साबेत भेटवस्तू देत असे. त्याच्या मोबदल्यात त्या त्याला माहिती देत असत. कर्नल सलीम हातुमच्या अनेक मैत्रिणी होत्या आणि त्या सगळ्या साबेतला त्याच्याकडून मिळणारी प्रत्येक माहिती देत असत.
इझराईलबद्दल बोलताना साबेतच्या वाणीला भलतीच धार चढत असे. अरब राष्ट्रांचा प्रच्छन्न शत्रू आणि मध्यपूर्व आशियामधल्या शांततेला आणि इस्लामला असलेला सर्वात मोठा धोका याच शब्दांत तो इझराईलचं वर्णन करत असे. सीरियन लष्करातल्या आपल्या मित्रांना तो सतत इझराईलविरुद्ध ते फार काही करत नसल्याचे टोमणे मारत असे. त्याचा परिणाम म्हणून या अधिकाऱ्यांनी त्याला दोन-तीन वेळा गोलान टेकड्यांच्या भागात नेऊन सीरियन सैन्याची तयारी दाखवली. तिथल्या सैनिकांनाही साबेतच्या सरकारमधल्या प्रस्थाची कल्पना होती त्यामुळे त्यांनीही त्याला सर्व माहिती दिली. तिथले बंकर्स, शस्त्रांचा साठा, विमानविरोधी तोफा वगैरे बघून साबेत प्रचंड प्रभावित झाला. त्याने एकच सूचना तिथल्या अधिकाऱ्यांना दिली – इथले सैनिक कडक उन्हात उभं राहून आपल्या देशाच्या सरहद्दीचं संरक्षण करताहेत. निदान त्यांच्यासाठी थोडी झाडं इथे लावा. त्यांना सावली मिळेल. साबेतच्या सूचनेची ताबडतोब अंमलबजावणी झाली. (१९६७ च्या ६ दिवसांच्या युद्धात इझरेली विमानांना सीरियन सैन्याचे शस्त्रसाठे आणि बंकर्स सहज उध्वस्त करता आले कारण त्यांच्या जागांबद्दल या झाडांमुळे इझरेली वायुदलाला अगदी अचूक माहिती मिळालेली होती.)
जनरल हाफेझच्या आधी राष्ट्राध्यक्ष असलेला सलाह अल बित्र हाफेझने सत्ता काबीज केल्यावर पॅलेस्टाईनमधल्या जेरिको शहरात निर्वासित म्हणून राहात होता. बाथ पक्षाच्या नेत्यांनी अल बित्र आणि हाफेझ यांच्यात समेट घडवून आणण्याची जबाबदारी साबेतवर सोपवली. तीही त्याने यशस्वीरीत्या पार पाडली. त्याच्या या प्रगतीमुळे मोसादमधले लोकसुद्धा अचंबित झाले. इतक्या यशाची त्यांनी अपेक्षासुद्धा केली नव्हती.
१९६३ मध्ये इझराईलचे पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियन आणि मोसाद संचालक इसेर हॅरेल यांच्यात झालेल्या वादानंतर हॅरेलने राजीनामा दिला आणि अमानचा संचालक असलेल्या मायर अमितची त्या जागी नेमणूक करण्यात आली. साधारण त्याच सुमारास एलीच्या दुसऱ्या मुलीचा – आयरिसचा जन्म झाला, आणि १९६४ च्या नोव्हेंबरमध्ये त्याच्या मुलाचा – शॉलचा जन्म झाला.
आपल्या मुलाला पाहायला एली इझराईलमध्ये आला आणि त्याच्यात बदल झालेला त्याच्या घरच्यांच्या लक्षात आलं. तो अबोल आणि चिडचिडा झाला होता. कुठेही बाहेर यायला तो तयार नसायचा आणि वारंवार नोकरी सोडून देण्याबद्दल बोलत असायचा. “ आता यापुढे मी जेव्हा परत येईन, तेव्हा मी माझी नोकरी सोडलेली असेल आणि इथे इझराईलमध्येच काहीतरी काम शोधेन. मला आता माझ्या कुटुंबापासून अजून दूर राहण्याची इच्छा नाही,” असं त्याने नादियाला नोव्हेंबर १९६४ च्या शेवटी इझराईलमधून निघताना सांगितलं होतं. खरंतर त्याची जायची इच्छाही नव्हती, पण मोसाद अधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीमुळे तो सीरियाला गेला.
नंतर अनेक वर्षांनी नादिया कोहेनने दिलेल्या मुलाखतीत या क्षणाबद्दल सांगितलं, की का कुणास ठाऊक, पण जे घडतंय ते बरोबर नाही अशी एक जाणीव तिला वारंवार होत होती आणि आपण एलीला परत पाहू शकू याची तिला खात्री वाटत नव्हती. तिची भीती दुर्दैवाने खरी ठरली.
----------------------------------------------------------------------------------------
१३ नोव्हेंबर १९६४ या दिवशी सीरियन लष्कराने तेल दान या इझराईल- सीरिया सीमेवरच्या ठिकाणाहून इझरेली हद्दीत काम करणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला. इझराईलने लगेचच आणि अत्यंत तिखट प्रतिक्रिया दिली. जमिनीवरून रणगाडे आणि तोफांनी प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आणि काही वेळातच इझरेली वायुदलाची मिराज आणि व्हाऊतूर विमानं हवेत झेपावली आणि त्यांनी सीरियन लष्कराच्या गोलान टेकड्यांवर असलेल्या चौक्यांवर बॉम्बफेक केली.
इथपर्यंत ठीक होतं, पण नंतर अचानक ही विमानं सीरियन हद्दीत घुसली आणि त्यांनी जॉर्डन नदी आणि तिच्या उपनद्यांचं पाणी वळवण्याचा प्रकल्प जिथे चालू होता, तिथे मोर्चा वळवला. तिथे खणलेले कालवे, बुलडोझर्स आणि इतर सामग्री आणि आत्तापर्यंत झालेलं सगळं बांधकाम या विमानांनी बॉम्बफेक करून नष्ट केलं. सीरियाकडे त्यावेळी रशियन बनावटीची मिग विमानं होती, पण सीरियन वैमानिकांना ती उडवण्याचा अजून काहीही अनुभव नव्हता. त्यांचं प्रशिक्षण चालू होतं, त्यामुळे सीरियन वायुदलाने या इझरेली विमानांना अजिबात प्रतिकार केला नाही.
या इझरेली हवाई हल्ल्याच्या अचूकतेचं श्रेय निःसंशय एली कोहेनचंच होतं. त्याने या प्रकल्पाची संपूर्ण जबाबदारी घेणाऱ्या माणसाशी मैत्री केली होती. हा माणूस सौदी अरेबियामधला होता, आणि त्याची स्वतःची बांधकाम कंपनी होती. या मैत्रीमुळेच एलीला या प्रकल्पाचं ठिकाण, व्याप्ती, आजवर झालेलं काम, या बांधकामाची बॉम्ब किंवा इतर स्फोटकांसमोर टिकून राहण्याची क्षमता, तिथे असणारी सुरक्षितता वगैरे महत्वाच्या गोष्टी अगदी तपशीलवार समजल्या होत्या आणि त्याने त्याची माहिती इझराईलला लगेचच कळवली होती. या सौदी अरेबियन माणसाचं नाव होतं मोहम्मद बिन लादेन – ओसामा बिन लादेनचा बाप. त्याने एलीला आपल्या कंपनीच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबद्दल दिलेल्या माहितीमुळेच इझरेली विमानांनी यानंतरही अनेकवेळा तिथे हल्ला केला आणि शेवटी सीरिया आणि इतर अरब राष्ट्रांनी हा प्रकल्प १९६५ च्या शेवटी सोडून दिला.
सीरियामध्ये या हल्ल्याचे पडसाद उमटलेच. सर्वात महत्वाचा प्रश्न होता – इझरेली वायुदलाला ही माहिती मिळाली कशी? सीरियन मुखबारतच्या प्रमुखाला – नदीम अल तायाराला वेगळाच संशय येत होता. संपूर्ण १९६४ या वर्षांत जे काही निर्णय सीरियन लष्कराने किंवा सरकारने घेतले, त्याबद्दल इझरेली रेडिओ सेवा कोल इझराईलवर अगदी लगेचच ऐकायला मिळालं होतं. अनेक अतिगोपनीय निर्णयही इझराईलला लगेच समजले होते आणि आता नोव्हेंबरमध्ये इझराईलने अगदी अचूक प्रतिहल्ला चढवला होता. तायाराचा तर्क होता की ज्याअर्थी इझराईलमधून ही माहिती प्रसारित होते आहे, त्याअर्थी इथे सीरियामध्ये घेतले गेलेले निर्णय इझराईलपर्यंत ताबडतोब पोचताहेत. म्हणजे सीरियन सरकारच्या अगदी अंतर्गत वर्तुळामध्ये, सत्ताकेंद्राच्या अगदी जवळ कुणीतरी इझराईलचा हेर आहे आणि तो त्याला मिळणाऱ्या बातम्या इझराईलला प्रसारित करतोय. पण मग त्याचा ट्रान्समीटर कुठे आहे? संपूर्ण डिसेंबर महिना तायारा आणि त्याच्या लोकांनी हा ट्रान्समीटर शोधण्यासाठी जंग जंग पछाडलं पण त्यांना तो मिळू शकला नाही. शेवटी त्यांच्या सुदैवाने त्यांना जानेवारी १९६५ मध्ये ट्रान्समीटर आणि तो वापरणारा हेर असे दोघेही मिळाले.
साबेतच्या अटकेने सीरियन सरकारचं धाबं दणाणलं होतं. सर्वात मोठा प्रश्न होता – हा माणूस जर बोलला, तर तो कोणाकोणाची नावं घेईल? कारण साबेतकडून भेटवस्तू आणि इतर ‘ गोष्टी ‘ स्वीकारणाऱ्या लोकांमध्ये सीरियामधल्या बहुतेक सर्व लब्धप्रतिष्ठितांचा समावेश होता. स्वतः राष्ट्राध्यक्ष हाफेझने साबेतच्या चौकशीमध्ये भाग घेतला. आपण कोण आहोत हे एलीने त्याच्यासमोरच कबूल केलं.
सीरियन मुखबारतसमोर आता पुढचा प्रश्न होता – साबेत उर्फ एली कोहेन हा एकांडा शिलेदार आहे, का हे एक हेरगिरी नेटवर्क आहे? त्यामुळे साबेतशी घनिष्ठ संबंध असणाऱ्या सगळ्यांना अटक झाली – एल अर्द, जॉर्ज सैफ, काही सैन्याधिकारी, काही स्त्रिया. यामध्ये साबेतकडून भेटवस्तू स्वीकारणाऱ्या हाफेझच्या पत्नीचा किंवा तिच्यासारख्या उच्च वर्तुळातल्या स्त्रियांचा अर्थातच समावेश नव्हता.
एलीला मुखबारतने संदेश पाठवताना रंगेहात पकडलं होतं. मोसादची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी एलीला अजून काही संदेश पाठवायला लावले. पण एलीने त्या संदेशात वापरलेल्या काही शब्दांमुळे त्याला अटक झालेली आहे आणि तो त्याच्या डोक्याला पिस्तुल लावलेल्या परिस्थितीत संदेश पाठवतोय हे मोसाद अधिकाऱ्यांना समजलं. ही बातमी प्रसारमाध्यमांमध्ये जाहीर करण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता, पण एलीच्या कुटुंबियांना याबद्दल सांगणं गरजेचं होतं.
एलीच्या भावाने एलीला सीरियामध्ये अटक झाल्याची बातमी जेव्हा त्याच्या आईला सांगितली, तेव्हा तिला एली चुकून सीमा पार करून सीरियामध्ये गेला असेल असं वाटलं. तो सीरियामध्ये नक्की काय करत होता, हे कळल्यावर ती कोसळलीच.
नादियाची अवस्थाही फार वेगळी नव्हती. तिला एलीच्या वागणुकीमुळे संशय जरूर आला होता, पण एली असं काही काम करत असेल, याचा तिने विचारही केलेला नव्हता.
मोसाद संचालक मायर अमितने हे सगळं प्रकरण स्वतःची वैयक्तिक जबाबदारी म्हणून हातात घेतलं. ३१ जानेवारी १९६५ या दिवशी फ्रान्समधल्या सर्वश्रेष्ठ वकिलांपैकी एक असलेला जॅक्स मेर्सियर दमास्कसमध्ये उतरला. त्याने एलीचं वकीलपत्र घेण्याची इच्छा सीरियन सरकारला सांगितली आणि आपल्या अशिलाला भेटू देण्याची मागणी केली पण त्याची मागणी फेटाळण्यात आली.
सीरियन सरकारमध्ये त्यावेळी दोन गट होते. एक गट राष्ट्राध्यक्ष हाफेझच्या विरोधातल्या लोकांचा. या गटाला एली कोहेनवर रीतसर खटला चालवायला हवा अशी इच्छा होती, कारण त्याचा वापर करून हाफेझच्या राजवटीमधला भ्रष्टाचार बाहेर काढण्याची आणि त्याला बदनाम करायची त्यांची इच्छा होती. दुसऱ्या गटाला, जे हाफेझचे निकटवर्तीय लोक होते, त्यांना याच कारणासाठी रीतसर खटला चालू नये अशी इच्छा होती, कारण साबेत उर्फ एली कोहेनने त्यांची नावं घेतली असती, तर त्यांनाही पुढे फासावर लटकवण्यात आलं असतं.
शेवटी एका विशेष सैनिकी न्यायालयासमोर हा खटला सुरु झाला. खटल्याचं निवडक कामकाज सीरियन सरकारच्या अधिकृत वाहिनीवर प्रसारित होत असे. इझराईलमध्येही हे कामकाज प्रसारित केलं जात असे.
हा खटला म्हणजे एक मोठा फार्स होता. न्यायाधीश म्हणून असलेले तिघेही अधिकारी जनरल सलाह दाली, ब्रिगेडियर अली आमीर आणि कर्नल सलीम हातुम हे कमाल अमीन साबेतचे एकेकाळचे चांगले मित्र होते आणि त्याच्याकडून त्यांनी अनेक भेटवस्तूही स्वीकारल्या होत्या.
एलीला संपूर्ण खटल्यात बोलायची परवानगी नव्हती. त्याचा चेहरा संपूर्ण खटला चालू असताना निर्विकार होता. आपल्याबाबतीत काय होणार आहे याची त्याला पूर्ण कल्पना होती. जवळपास १० वर्षांपूर्वी इजिप्तमध्ये साधारण अशाच परिस्थितीमध्ये असताना काय झालं हे त्याला आठवत होतंच.
३१ मार्च १९६५ या दिवशी न्यायालयाने आपला निर्णय ऐकवला – एली कोहेन, माजिद एल अर्द आणि जॉर्ज सैफ या तिघांनाही मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली.
इझरेली सरकारच्या वतीने मेर्सियरने एलीला वाचवण्याचे प्रयत्न चालू केले. इझराईल सीरियाला एली कोहेनच्या बदल्यात औषधं आणि शेतकी अवजारं फुकट देईल अशी पहिली ऑफर होती. या सर्व गोष्टींची किंमत जवळजवळ दहा लाख डॉलर्स होती. सीरियन सरकारने हे धुडकावून लावलं. इझराईलने लगेचच दुसरी ऑफर दिली – एलीच्या मोबदल्यात इझराईलने पकडलेले ११ सीरियन हेर. सीरियन सरकारने हीसुद्धा ऑफर धुडकावली.
१ मे १९६५ या दिवशी राष्ट्राध्यक्ष हाफेझने मजीद एल अर्द आणि जॉर्ज सैफ या दोघांच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेला जन्मठेपेच्या शिक्षेत बदललं पण एलीवर मात्र कोणतीही दया दाखवण्यात आली नाही. ८ मे १९६५ या दिवशी त्याला फाशी होणार हे सीरियन सरकारने अधिकृतरीत्या जाहीर केलं.
शेवटचा प्रयत्न म्हणून नादियाने पॅरिसमधल्या सीरियन वकिलातीमध्ये दयेचा अर्ज नेऊन दिला. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. संपूर्ण जगातून सीरियन सरकारला एली कोहेनला फासावर न चढवण्यासाठी विनंती करणारी अनेक पत्रं आली. एलीला त्यांच्याबद्दल जर समजलं असतं, तर त्याचा मित्र श्मुएल अझारची त्याला आठवण झाली असती. तेव्हाही अशा विनंत्यांचा काहीही उपयोग झाला नव्हता. आत्ताही झाला नाही. त्याला फक्त त्याच्या नातेवाईकांना एक शेवटचं पत्र लिहायची परवानगी देण्यात आली आणि मृत्यूसमयी दमास्कसचा राब्बाय निसीम अन्दाबो त्याच्याबरोबर असावा ही विनंतीही मान्य करण्यात आली.
१८ मेच्या पहाटे अडीच वाजता एलीला झोपेतून उठवण्यात आलं. त्याच्या कपड्यांवर एक मोठा पांढरा गाऊन घालण्यात आला. त्याच्या छातीवर एक भलं मोठं पोस्टर चिकटवण्यात आलं. या पोस्टरवर त्याचे गुन्हे अरेबिक भाषेत अगदी स्पष्टपणे लिहिण्यात आले होते. उघड्या ट्रकमधून त्याला दमास्कसच्या मुख्य बाजारपेठेत – मार्जेह चौकात नेण्यात आलं. या सगळ्या क्षणांचं थेट प्रक्षेपण होत होतं. चौकाच्या मध्यभागी उभारण्यात आलेल्या वधस्तंभावर एली शांतपणे चढला. तिथे उभ्या असलेल्या जल्लादाने त्याच्या गळ्याभोवती फास अडकवला. एलीला त्याने एका छोट्या स्टूलवर उभं केलं.
एली शांतपणे तिथे उभा होता. तिथे त्यावेळी हजर असणाऱ्या पत्रकारांच्या मते त्याने आपलं भवितव्य स्वीकारलेलं होतं. प्रेक्षक श्वास रोखून उभे होते. इशारा मिळताच जल्लादाने एलीच्या पायांखाली असलेल्या स्टुलाला जोरात लाथ मारली आणि एली कोहेन नामक सर्वश्रेष्ठ हेर सगळ्याच्या पलीकडे निघून गेला. हजर असलेल्या लोकांनी एकच जल्लोष केला.
पुढचे सहा-सात तास एलीचा देह तिथेच फासावर लटकत ठेवलेला होता. येणारे-जाणारे जवळ जाऊन त्याच्या चेहऱ्याचं निरीक्षण करत होते. काही जणांनी त्याच्याबरोबर फोटो काढून घेतले. काहीजण त्याच्या चेहऱ्यावर थुंकले सुद्धा.
तिथून काही मैल पश्चिमेला इझराईलमध्ये कोहेनचं कुटुंब हेच दृश्य त्यांच्या टेलिव्हिजनवर पाहात होतं. मोसाद संचालक मायर अमितही त्यांच्याबरोबर तिथे हजर होता.
१८ मेच्यादिवशी सकाळी साधारण ११ च्या सुमारास एलीचा मृतदेह वधस्तम्भावरून उतरवण्यात आला आणि त्याचं एका गुप्त ठिकाणी दफन करण्यात आलं. नादियाने यानंतर अनेकवेळा सीरियन सरकारकडे एलीचा मृतदेह त्याच्या कुटुंबाच्या ताब्यात देण्याची मागणी केली, पण आजतागायत सीरियामधल्या एकाही सरकारने ही मागणी पूर्ण केलेली नाही.
एलीच्या मृत्यूनंतर तो इझरेली जनतेचा हीरो झाला. पण अनेक जणांनी,
ज्यांच्यात एलीच्या कुटुंबियांचाही समावेश आहे, मोसादवर टीका केली.
त्यांच्या मते मोसादने एलीवर प्रचंड जबाबदाऱ्या टाकल्या आणि त्याचा ताण
त्याला सहन झाला नाही. त्याला दररोज संदेश प्रसारित करायला सांगितलं होतं
आणि त्याची खरोखर गरज नव्हती.
एलीच्या कामगिरीचं खरं मोल इझराईलला २ वर्षांनी कळलं, जेव्हा ६ दिवसांच्या
युद्धात त्याने दिलेल्या माहितीच्या आधारेच इझरेली विमानांनी गोलान
टेकड्यांवरची सीरियन सैन्याची ठाणी उध्वस्त केली आणि तिथल्या २/३ भागावर
कब्जा केला आणि इझरेली शेतकऱ्यांना वाटणारी सीरियन हल्ल्याची भीती कायमची
मिटवून टाकली.
क्रमशः
मोसाद - भाग ८
१७ ऑगस्ट १९६६. इझराईलच्या उत्तरेला असलेल्या हात्झोर एअरफोर्स बेसवर असलेल्या रडार यंत्रणेच्या पडद्यावर एक छोटा ठिपका अवतीर्ण झाला. कुठलंतरी विमान इझराईलच्या हवाई हद्दीच्या जवळ येत होतं. आश्चर्याची गोष्ट ही होती, की बहुतेक वेळा असं झाल्यावर इझराईलची मिराज विमानं या आगंतुक विमानाला घेरण्यासाठी हवेत झेपावली असती. पण यावेळी मात्र तसं काहीही झालं नाही. हे विमान इझराईलच्या हद्दीत येईपर्यंत इझरेली वायुदलाने काहीही हालचाल केली नाही.
त्या विमानाकडे पाहून हात्झोर बेसवरच्या प्रत्येकाला धक्का मात्र बसला, कारण ते विमान होतं रशियन बनावटीचं मिग २१. त्यावेळचं अत्याधुनिक आणि घातकी लढाऊ विमान. बलाढ्य अमेरिकेकडेसुद्धा असं विमान नव्हतं. कशासाठी आलं होतं हे विमान इझराईलमध्ये?
याची सुरुवात झाली होती ३ वर्षांपूर्वी. १९६३ मध्ये पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियन आणि तत्कालीन मोसाद संचालक इसेर हॅरेल यांच्यात झालेल्या वादानंतर हॅरेलने राजीनामा दिला आणि पंतप्रधानांना त्याच्या जागी नवीन मोसाद संचालकाची निवड करावी लागली. त्यांच्यासमोर त्यावेळी दोन पर्याय होते – शाबाकचा म्हणजे इझरेली प्रतिहेरखात्याचा संचालक अमोस मॅनॉर आणि अमानचा म्हणजे सैनिकी गुप्तचर संघटनेचा संचालक मायर अमित. मॅनॉर नेमका त्याच वेळी नातेवाईकांना भेटण्यासाठी गेला असल्यामुळे त्याच्याशी संपर्क साधता आला नाही, त्यामुळे अमान संचालक मायर अमितची मोसादच्या संचालकपदी नेमणूक करण्यात आली.
अमितच्या नेमणुकीमुळे मोसादमध्ये आमूलाग्र बदल घडून आला. त्याच्याआधी संचालक असलेल्या रूव्हेन शिलोह आणि इसेर हॅरेल यांच्यात आणि अमितमध्ये काही मूलभूत फरक होते. शिलोह आणि हॅरेल या दोघांचाही जन्म ज्यूविरोधी वातावरण असलेल्या भागात झाला होता. शिलोहचा जुन्या जेरुसलेममध्ये तर हॅरेलचा रशियामध्ये. त्यांच्या जन्माच्या वेळी इझराईल ही फक्त एक संकल्पना होती, किंबहुना दोघेही इझराईलला वास्तव बनवण्यासाठी ज्या पिढीने कष्ट घेतले, त्या पिढीचे होते. त्याउलट मायर अमित हा साब्रा म्हणजे पॅलेस्टाईनमधल्या ज्यूबहुल भागात जन्माला आलेला होता. शिलोह आणि हॅरेल यांची पार्श्वभूमी हेरगिरीची होती. दोघेही गुप्त कामगिऱ्यांमध्ये अत्यंत मुरलेले होते. अमितला अशी काहीही पार्श्वभूमी नव्हती. तो त्याच्या वयाच्या सोळाव्या वर्षी हॅगन्हामध्ये भरती झाला आणि जेव्हा हॅगन्हाचं इझरेली सैन्यात रूपांतर करण्यात आलं तेव्हा तो बटालियन कमांडर होता. इझराईलच्या स्वातंत्र्ययुद्धात काही काळ ब्रिटीश सैन्याविरुद्ध आणि नंतर अरब सैन्याविरुद्ध लढण्याचा त्याला अनुभव होता. त्याचं एकंदरीत कर्तृत्व बघता तो इझरेली सैन्याचा प्रमुखसुद्धा होऊ शकला असता, पण नेगेव्हच्या वाळवंटात सराव करत असताना त्याला एक मोठा अपघात झाला आणि दोन वर्षे सक्तीची विश्रांती घ्यायला लागली. या विश्रांतीच्या काळातच त्याने अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठातून एम.बी.ए. पूर्ण केलं आणि तिथून परत आल्यावर त्याची अमानचा प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली आणि १९६३ मध्ये तो मोसाद संचालक बनला.
इसेर हॅरेलच्या राजीनाम्यामागे जरी अमितचा काहीही हात नसला, तरी इजिप्तमध्ये काम करणाऱ्या जर्मन शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ यांच्याबद्दल अमानने बनवलेल्या रिपोर्टमुळे हॅरेलला राजीनामा द्यावा लागला हे मोसादमध्ये षट्कर्णी झालं होतंच. परिणामी मोसाद संचालक झाल्यावर अमितला प्रचंड अंतर्गत विरोधाला तोंड द्यावं लागलं. मोसादमधले काही जण हॅरेलशी एकनिष्ठ होते. त्यांनी अमितच्या हाताखाली काम करायला नकार दिला. या लोकांपैकी काहींनी तर अमितची नियुक्ती झाल्यावर लगेचच राजीनामे दिले.
इकडे पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियनसाठीही इजिप्तमध्ये काम करणाऱ्या जर्मन शास्त्रज्ञांचं प्रकरण अंगाशी येणारं ठरलं. त्यांनाही जून १९६३ मध्ये राजीनामा द्यावा लागला आणि त्यांच्याजागी त्यांचे जवळचे सहकारी लेवी एश्कोल पंतप्रधानपदी आले. त्यांनी इसेर हॅरेलची आपला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नेमणूक केली. हॅरेल त्याला मोसादमधून ज्या परिस्थितीत जावं लागलं त्यामुळे संतापलेला होताच. अमितची बदनामी होईल अशा संधीच्या तो शोधात होता, आणि लवकरच त्याला तशी संधी मिळाली.
आपण ज्याला अरब जग म्हणतो, त्यातले बरेचसे देश हे मध्यपूर्व किंवा पश्चिम आशियामध्ये आहेत, पण अरब जगाचा एक महत्वाचा भाग हा उत्तर आफ्रिकेतही पसरलेला आहे. या भागाला माघरेब किंवा मघरीब असं म्हणतात आणि त्यात मॉरिटानिया, मोरोक्को, ट्युनिशिया, अल्जीरिया आणि लिबिया या पाच देशांचा समावेश होतो. एक लिबिया सोडला तर बाकीचे चार देश हे दुसऱ्या महायुद्धापर्यंत आणि त्याच्यानंतर काही काळ फ्रेंच साम्राज्याचा भाग होते. या देशांमध्ये आर्थिक दृष्ट्या सर्वात संपन्न देश म्हणजे मोरोक्को. फ्रेंच प्रभाव आणि त्याशिवाय भूमध्य समुद्राचा किनारा असल्यामुळे युरोपशी व्यापार आणि पर्यटन यामुळे मोरोक्को सर्व अरब देशांमध्ये आधुनिक असा देश होता, आणि तिथला राजा हसन याने फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही जाणीवपूर्वक आपल्या देशाचं हे स्वरूप टिकवून ठेवलं होतं. नेमकं तेच इजिप्तचा राष्ट्राध्यक्ष नासरला खटकत होतं. १९५६ च्या सुएझ संघर्षानंतर नासर ब्रिटन आणि फ्रान्स यांचा कट्टर विरोधक बनला होता. त्यात त्याला सोविएत रशियाचं लष्करी आणि आर्थिक पाठबळसुद्धा होतं. हसनला त्यामुळे नासर आपल्याला मार्गातून बाजूला काढून मोरोक्कोमध्ये स्वतःचा कोणीतरी हस्तक आणून बसवेल अशी सार्थ भीती वाटत होती. त्यात १९६० च्या दशकाच्या सुरुवातीला मोरोक्कोच्या शेजारचा अल्जीरिया स्वतंत्र झाला आणि तिकडे पुराणमतवादी सरकार स्थापन झालं. त्यामुळे मोरोक्कोला अजूनच धोका निर्माण झाला.
राजा हसनने यावर उपाय म्हणून एक अतर्क्य गोष्ट केली. त्याने १९६३ च्या उत्तरार्धात गुप्तपणे मोसादशी संपर्क साधला.
मोसादमध्ये याच्यामुळे एकच खळबळ उडाली. एक अरब देश आणि इझराईलकडून मदत मागतोय? काही लोकांच्या मनात तर हा इजिप्त किंवा सीरिया यांचा इझरेली हेरांना सापळ्यात अडकवण्याचा डाव असावा असाही विचार आला. पण मायर अमितला तसं वाटलं नाही. त्याने रफी एतान आणि डेव्हिड शोमरॉन या दोघांना स्विस पासपोर्टवर मोरोक्कोची राजधानी राबात इथे पाठवलं. तिथे गेल्यावर हसनची ही मागणी खरी असल्याचं या दोघांना समजलं. राबातमध्ये त्यांचा सामना झाला तो पोलादी पुरुष म्हणून प्रसिद्ध असलेल्या मोरोक्कन गृहमंत्री जनरल मोहम्मद ओफ्कीरशी. ओफ्कीरचा मोरोक्कोमध्ये प्रचंड दरारा होता. त्याचबरोबर त्याची राजघराण्यावरची निष्ठाही जबरदस्त होती. राजाचे अनेक शत्रू आणि विरोधक मोरोक्कोमधून अचानक गायब होण्यात ओफ्कीरचा खूप मोठा हात होता, पण तसं उघडपणे बोलून दाखवण्याची कोणाचीही हिम्मत नव्हती.
ओफ्कीर आणि एतान यांच्यात झालेल्या करारानुसार मोसाद मोरोक्कोच्या गुप्तचर संघटनेला प्रशिक्षण देईल आणि त्याच्या मोबदल्यात मोरोक्को मोसाद एजंट्सना पूर्ण संरक्षण – वेळप्रसंगी राजनैतिक संरक्षण देईल असं ठरलं. राजा हसनने या कराराला मंजुरी दिली आणि अरब जगात मोसादला पहिला मित्र मिळाला.
या भेटीनंतर काही महिन्यांनी ओफ्कीर स्वतः इझराईलमध्ये आला. त्याला इझराईलकडून एक अत्यंत खास कामगिरी करून घ्यायची होती.
मोरोक्कोच्या स्वातंत्र्यसंघर्षात फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळवणं आणि राजेशाही संपुष्टात आणणं हे दोन मुद्दे होते. त्यातला पहिला प्रत्यक्षात आला होता पण दुसरा अजून शिल्लक होता. मोरोक्कन स्वातंत्र्यसैनिकांच्या मते अजूनही त्यांचा स्वातंत्र्यलढा चालू होता. या स्वातंत्र्यसैनिकांचा प्रमुख होता मेहदी बेन बार्का. त्याला १९६२ मध्ये राजाविरुद्ध कट करण्याच्या आरोपावरून मोरोक्कोमधून हद्दपार करण्यात आलं होतं. पण त्यामुळे त्याच्या कारवाया थांबल्या नव्हत्या. त्यामुळे १९६३ मध्ये त्याला त्याच्या अनुपस्थितीत मृत्यूदंडही ठोठावण्यात आला होता.
बेन बार्का पॅरिसमध्ये आहे एवढं ओफ्कीरला समजलं होतं. पण तो नक्की कुठे आहे हे माहित नव्हतं. बेन बार्कालाही आपल्या जिवाला असलेल्या धोक्याची कल्पना होतीच त्यामुळे तोही त्याच्या कारवाया लपूनछपूनच करत असे. मोसादने त्याला शोधून मोरोक्कन गुप्तचरांच्या ताब्यात द्यावं अशी ओफ्कीरची मागणी होती.
मोसादने ताबडतोब मदत केली. आपल्या sayan network च्या माध्यमातून त्यांनी बेन बार्का फ्रान्समधून आता स्वित्झर्लंडमध्ये गेल्याचं शोधून काढलं. पॅरिसमध्ये बेन बार्काची एक मैत्रीण होती. तिने लिहिलेलं एक पत्र मोसाद एजंट्सना मिळालं आणि त्यांनी त्यावरून तिच्या हस्ताक्षराची नक्कल केली आणि बेन बार्काला पॅरिसला बोलावलं. या पत्रात असं लिहिलेलं होतं, की एका धनाढ्य मोरोक्कन माणसाला मोरोक्कोमधली राजा हसनची राजवट पसंत नाही आणि तिथे राज्यक्रांती होऊन समाजवादी सरकार प्रस्थापित व्हावं अशी त्याची इच्छा आहे. त्या संदर्भात त्याला बेन बार्काला प्रत्यक्ष भेटायचं आहे. हे बेन बार्काला कळल्यावर तो लगेचच स्वित्झर्लंडमधून पॅरिसमध्ये आला. त्याला या पत्रात सीन नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या ब्रासेरी लिप या प्रसिद्ध रेस्तराँमध्ये भेटायला बोलावण्यात आलं होतं. याच रेस्तराँच्या दरवाज्यात त्याला अटक करण्यात आली. अटक करणाऱ्या फ्रेंच पोलिस अधिकाऱ्यांना ओफ्कीरने पैसे दिलेले होते. त्याला जागून त्यांनी बेन बार्काला ओफ्कीरच्या माणसांच्या हवाली केलं. त्यानंतर बेन बार्का बेपत्ता झाला. नंतर जेव्हा त्याच्या अपहरणात सहभागी असलेल्या फ्रेंच अधिकाऱ्यांना अटक झाली तेव्हा साक्षीदार म्हणून आलेल्या जॉर्जेस फिगोन नावाच्या एका माणसाने आपण ओफ्कीरने बेन बार्काला चाकूने ठार मारल्याचं प्रत्यक्ष पाहिल्याचं कोर्टात सांगितलं. इझराईलमध्ये तर ही बातमी बेन बार्काच्या अपहरणाच्या दुसऱ्या दिवशीच मायर अमितला मिळाली आणि त्याने तातडीने ती पंतप्रधान एश्कोलना दिली.
फ्रान्समध्ये ही बातमी पसरल्यावर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष जनरल चार्ल्स डी गॉल प्रचंड संतापले. जेव्हा त्यांना मोसादच्या या प्रकरणातल्या सहभागाबद्दल समजलं, तेव्हा त्यांनी फ्रान्स इझराईलला देत असलेली लष्करी आणि आर्थिक मदत एकतर्फी बंद केली. इझराईलमध्येही याचे पडसाद उमटले. इसेर हॅरेलसाठी ही सुवर्णसंधी होती. त्याने प्रसारमाध्यमांतून मोसादवर आणि अमितवर राळ उडवायला सुरुवात केली. असल्या गुन्ह्यामध्ये मोसादसारखी संस्था सहभागी होऊच कशी शकते? फ्रान्ससारख्या इझराईलच्या जुन्या मित्राला असा दगा देणं मोसादला शोभत नाही, अमितने या सर्व प्रकरणाची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला पाहिजे, वगैरे वगैरे.
पंतप्रधान एश्कोलनी सर्व लोकशाही देशांची सरकारं अशावेळी जे करतात तेच केलं. एक चौकशी समिती नेमली. या समितीने अमितला निर्दोष घोषित केलं. त्यांच्या मते मोसादची जबाबदारी बेन बार्काला ओफ्कीरच्या लोकांच्या हवाली करण्यापर्यंत मर्यादित होती. पुढे ओफ्कीरने जे केलं, त्याच्याशी मोसादचा काहीही संबंध नव्हता.
पण यामुळे अमितची बदनामी झालीच. त्यातच मे १९६५ मध्ये सीरियामध्ये इझरेली हेर एली कोहेनला फासावर चढवण्यात आलं. या दोन्हीही घटनांमुळे मोसादमधलं वातावरण अत्यंत नकारात्मक बनलं होतं. ते परत रूळावर आणण्यासाठी एखाद्या नेत्रदीपक यशस्वी कामगिरीची गरज होती.
अमितच्या सुदैवाने त्याला हे करण्याची दुहेरी संधी मिळाली.
१९६५ च्या शेवटी मोसादने अरब जगात अजून एक मित्र शोधला - इराकमधले कुर्द जमातीचे लोक. इराकमध्ये लोकसंख्येचे तीन प्रमुख गट होते (अजूनही आहेत पण आता परिस्थिती वेगळी आहे) – राज्यकर्ते असलेले सुन्नी मुस्लीम, धार्मिकदृष्ट्या इराणला जवळ असलेले शिया मुस्लीम आणि अनेक शतकांपासून इराकी राज्यकर्त्यांशी आपल्या स्वातंत्र्यासाठी झगडत असलेले कुर्द. या कुर्द बंडखोरांचा नेता होता मुल्ला मुस्तफा बर्झानी. त्याच्याशी मोसादने संपर्क साधला होता. इराक त्यावेळी आपल्या प्रचंड तेलसाठ्यातून मिळणारे पैसे सीरिया आणि इजिप्तला रशियन शस्त्रास्त्रं विकत घेण्यासाठी कर्जाऊ देत होता आणि ही शस्त्रास्त्रं इझराईलविरुद्ध वापरली जाणार होती, याबद्दल मोसादची खात्री होती. मोसादने या कुर्द बंडखोरांना शस्त्रं आणि प्रशिक्षण देऊ केलं होतं. ते वापरून ते इराकी सरकारविरुद्ध त्यांचा लढा तीव्र करतील आणि त्यामुळे इराकी सरकारचं लक्ष त्याकडे राहील, त्यांना या युद्धामुळे आर्थिक भार होईल आणि परिणामी इराककडून सीरिया आणि इजिप्तला मिळणारी आर्थिक मदत कमी होईल किंवा बंद होईल असा मोसादचा अंदाज होता. त्याचबरोबर जागतिक स्तरावर कुर्द लोकांची बाजू मांडायचं आणि इराकी सरकारकडून त्यांच्यावर होत असणारे अत्याचार आणि दडपशाही प्रसारमाध्यमांतून जगभर पोचवण्याचं आश्वासनही इझराईलच्या सरकारने मोसादच्या माध्यमातून कुर्द बंडखोरांना दिलं.
एकीकडे हे चालू असतानाच मायर अमितपुढे दुसरी संधी चालून आली.
अमित जरी आता मोसादचा संचालक असला, तरी त्याचे गुप्तचर संघटनांमध्ये कुणीही मित्र नव्हते. जे होते ते सगळे सैन्यात होते. त्यातला एक होता नंतर इझराईलचा राष्ट्रपती झालेला आणि त्यावेळी इझरेली वायुदलाचा प्रमुख असलेला एझेर वाईझमन. तो आणि अमित आपापल्या कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे बरेच दिवस भेटू शकले नव्हते.
वाइझमनने अमितला एके दिवशी न्याहारीसाठी बोलावलं आणि तिथे बॉम्ब टाकला – मोसाद इझरेली वायुदलाला एक मिग २१ विमान मिळवून देऊ शकेल का?
अमितने त्याच्या आत्मचरित्रात हा प्रसंग लिहिलेला आहे –
मी एझेरकडे रोखून पाहिलं आणि त्याला स्पष्टपणे विचारलं, “डोकं ठिकाणावर आहे ना तुझं? कुठल्याही नाटो देशाकडे हे विमान नाहीये.”
एझेरचा तोच मुद्दा होता, “ पण ते आजच्या घडीला उपलब्ध असलेलं सर्वात
आधुनिक, सर्वात वेगवान आणि सर्वात घातकी लढाऊ विमान आहे, आणि सोविएत
रशियाने ते अनेक अरब राष्ट्रांना दिलेलं आहे, ज्यांच्यात इजिप्त आणि सीरिया
यांचाही समावेश आहे. आम्हाला त्यामुळेच हे विमान हवं आहे. तू करता येतील
तेवढे प्रयत्न कर.”
अमितने मोसादमध्ये याआधी कोणी मिग विमान मिळवण्याचा प्रयत्न केला आहे का, ते बघितलं. रेहाविया वार्दी नावाच्या एका एजंटने इजिप्त आणि सीरियामधून मिग २१ मिळवण्याचे अयशस्वी प्रयत्न केले होते. त्या संदर्भात त्याची अरब जगात वावरणाऱ्या अनेक शस्त्रास्त्र दलालांशी आणि याच क्षेत्रातल्या कंपन्यांच्या प्रतिनिधींशी ओळख झाली होती. अमितला भेटल्यावर वार्दीने परत एकदा मिग २१ मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले. आणि त्याला एक धागा मिळाला.
१९६३ मध्ये, अमितची मोसादच्या संचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर दोन महिन्यांनी, सलमान नावाच्या एका माणसाने इझराईलच्या पॅरिसमधल्या वकिलातीत जाऊन तिथे एक टेलिफोन नंबर दिला होता आणि त्याच्याबरोबर एक अत्यंत विचित्र संदेशही होता – कोणाला तरी बगदादला पाठवा, या नंबरवर फोन करा, योसेफशी बोला आणि दहा लाख डॉलर्स तयार ठेवा. तुमचं मिग तुम्हाला मिळेल.
हा संदेश सलमानने ज्याला दिला, त्याला सुदैवाने तो विचित्र वाटला नव्हता म्हणून त्याने तो वकिलातीतल्या मोसाद प्रतिनिधीला दिला होता. पण पुढे त्यासंदर्भात काहीही झालं नव्हतं.
आता अमितपुढे प्रश्न होता – हा संदेश आता – दोन वर्षांनंतर कितपत विश्वासार्ह आहे? हा नंबर ज्याचा होता, त्याचं आता काय झालंय? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शंका – यात कितपत तथ्य आहे? कशावरून हा इराकी गुप्तचर खात्याचा इझरेली हेरांना पकडण्याचा डाव नाहीये? अमितच्या डोक्यात त्याच वेळी एक विचार आला – हा योसेफ जर इराकमध्ये असेल, आणि त्याने सलमानकडून इझराईलच्या पॅरिसमधल्या वकिलातीत संदेश ठेवला असेल, तर असंच त्याने इझराईलच्या बाकीच्या वकिलातींमध्येही केलं असेल.
त्याचा अंदाज बरोबर होता. इराणमधल्या इझरेली वकिलातीत असलेल्या याकोव्ह निमरोदी नावाच्या एका मोसाद अधिकाऱ्याला असाच संदेश मिळाला होता. त्याने कुतूहल म्हणून योसेफचा पाठपुरावा केला होता आणि त्याला शोधून काढलं होतं. पण पुढे काही न समजल्यामुळे हे प्रकरण याच्यावरच थांबलं होतं. अमितला हे समजल्यावर त्याने योसेफला कामाला लावायचा आदेश निमरोदीला दिला.
योसेफचं पूर्ण नाव होतं योसेफ शेमेश. तो इराकी ज्यू होता. तो आणि सलमान यांचं दूरचं नातं होतं. निमरोदीने अर्थातच त्याच्यावर पूर्ण विश्वास टाकला नाही. त्याने योसेफला इराकमध्येच काही कामं करायला लावली आणि खात्री पटल्यावरच मिग विमानाचा विषय काढला.
बगदादमध्येच योसेफची कॅमिल नावाची एक मैत्रीण होती. ती ख्रिश्चन होती आणि तिच्या बहिणीचं लग्न मुनीर रेदफा नावाच्या एका माणसाशी झालं होतं. तोही ख्रिश्चन होता, इराकी वायुदलामध्ये पायलट होता, मिग २१ विमान जवळजवळ दररोज चालवत होता आणि त्या कामाला वैतागलेला होता. त्याच्या वैताग आणि संतापामागे दोन कारणं होती – तो ख्रिश्चन असल्यामुळे कितीही चांगला पायलट असला, तरी त्याला पुढे जायची संधी मिळणार नव्हती. तो फ्लाईट लेफ्टनंटच राहिला असता. स्क्वाड्रन लीडर बनण्याची संधी त्याला कधीच मिळू शकली नसती. महत्वाकांक्षी रेदफाला हे खटकत होतंच.
दुसरं कारण म्हणजे त्याला कुर्द लोकांच्या खेड्यांवर बॉम्बहल्ले करायला पाठवलं जात होतं. या खेड्यांमधले सगळे कर्ते पुरुष युद्धावर किंवा शेती करायला जात. त्यामुळे गावांमध्ये फक्त म्हातारे लोक, स्त्रिया आणि मुलं एवढेच असायचे. त्यांच्यावर बॉम्बहल्ला करणं त्याच्या मनाला पटत नव्हतं. त्यामुळे इराकमध्ये राहण्यात काहीही अर्थ नाही अशी त्याची धारणा बनत चालली होती.
कॅमिलचा मित्र म्हणून रेदफा योसेफला ओळखत होता. योसेफने हळूहळू त्याच्याशी मैत्री वाढवायला सुरुवात केली आणि एक दिवस सुट्टीसाठी म्हणून ग्रीसला जायचा प्रस्ताव मांडला. रेदफाला रजा मिळणं शक्यच नव्हतं. तेव्हा योसेफने त्याला आपण आपल्या आजारी पत्नीला घेऊन ग्रीक डॉक्टरांना भेटायला चाललो आहोत असं सांगण्याचा सल्ला दिला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या कारणास्तव रेदफाला रजा मिळाली आणि तो आपल्या पत्नी आणि मुलांसह ग्रीसची राजधानी अथेन्स येथे गेला. योसेफ आणि कॅमिलही त्यांच्याबरोबर होते.
अथेन्समध्ये कर्नल झीव्ह लीरॉन त्यांना भेटला. लीरॉन इझरेली वायुदलाच्या गुप्तचर विभागाचा प्रमुख होता. मुनीर रेदफाच्या तांत्रिक ज्ञानाविषयी खात्री करून घेणं हे त्याचं काम होतं. त्याने रेदफाला आपण पोलिश पायलट असल्याचं आणि एका कम्युनिस्टविरोधी संघटनेसाठी काम करत असल्याचं सांगितलं. रेदफाला बऱ्याच वर्षांनी एखाद्या पायलटशी इतक्या मोकळेपणाने बोलता येत होतं. त्याने त्याच्या मनातले सगळे विचार लीरॉनला सांगितले.
रेदफाच्या सुट्टीमधला शेवटचा टप्पा होता ग्रीसच्या जवळ असलेल्या क्रीट
बेटावरचा एक कँप. लीरॉन तिथेही रेदफाला भेटला, आणि आता त्याने या संपूर्ण
प्रकरणातल्या सर्वात महत्वाच्या आणि नाजूक भागाला सुरुवात केली.
क्रीटवरून रेदफा आणि त्याच्या कुटुंबाला इराकला परत जायला एक आठवडा होता.
तिथे आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी लीरॉनने रेदफाकडे हा विषय काढला.
“जर तू तुझं विमान घेऊन इराकबाहेर पळून गेलास तर काय होईल?” लीरॉनने आपण पोलंडमधून तसंच पळून आल्याचं रेदफाला सांगितलं होतं.
“ते मला ठार मारतील.” रेदफा शांतपणे म्हणाला.
“का? तू दुसऱ्या एखाद्या देशामध्ये आश्रय घेऊ शकतोस.”
“मला कोण आश्रय देईल?” रेदफा खिन्न सुरात म्हणाला.
“एक देश आहे,” लीरॉन म्हणाला, “इझराईल. ते तुझं अगदी मनापासून स्वागत करतील.”
मुनीर रेदफाने आपल्या या नवीन मित्राकडे रोखून पाहिलं, “आणि हे तुला कसं माहित?”
“कारण मी पोलिश नाही, इझरेली आहे.” असं म्हणून रेदफाला काही बोलायची संधी न देता लीरॉन तिथून उठला, “ आपण उद्या सकाळी बोलू.” आणि तो निघून गेला.
दुसऱ्या दिवशी सकाळी रेदफानेच लीरॉनशी संपर्क साधला, “ मी तयार आहे.” तो म्हणाला. दोघांनी भेटायची वेळ ठरवली. लीरॉनला अजूनही रेदफाची खात्री वाटत नव्हती, त्यामुळे त्यांच्या भेटायच्या वेळेच्या एक तास आधी येऊन त्याने कोणी इराकी अधिकारी येत नाही ना याची खात्री करून घेतली आणि मग तो रेदफाला भेटला.
या भेटीमध्ये लीरॉनने त्याच्याशी या सगळ्या कामगिरीबद्दल अगदी सखोल चर्चा केली. त्याला मायर अमितने रेदफाला एका ठराविक रकमेची ऑफर द्यायला आणि जर रेदफा कबूल झाला नाही, तर ती रक्कम दुप्पट करायला सांगितलं होतं पण रेदफाने पहिली रक्कम मान्य केली. खरं सांगायचं तर त्याला पैशांची अपेक्षा नव्हती. त्याला फक्त एका गोष्टीची खात्री हवी होती – त्याचं कुटुंब सुरक्षित राहिलं पाहिजे. लीरॉनने त्याला तशी खात्री दिली.
क्रीटवरून लीरॉन आणि रेदफा गुप्तपणे रोमला गेले. तिथे त्यांना येहुदा पोरात हा मोसाद अधिकारी भेटला. तो, लीरॉन आणि रेदफा या तिघांनी एकमेकांच्या सम्पर्कात राहण्यासाठी एक कोड ठरवलं. त्यानुसार ज्या दिवशी संध्याकाळी कोल इझराईल या रेडिओ स्टेशनवर “ मरहब्बते मरहब्बते “ हे लोकप्रिय अरेबिक गाणं लागेल, त्याच्या दुसऱ्या दिवशी रेदफाने मिग २१ विमान घेऊन तिथून निघावं असंही ठरलं.
हे सगळं चालू असताना मोसाद एजंट्सचं आपल्यावर बारीक लक्ष आहे याची रेदफाला अजिबात जाणीव नव्हती. स्वतः अमित रेदफाला पाहण्यासाठी रोमला आला होता. रेदफा, लीरॉन आणि पोरात जिथे बसले होते, त्याच्या बाजूच्या टेबलवर अमित त्याच्या काही सहकाऱ्यांबरोबर बसला होता. ते जरी अत्यंत हलक्या आवाजात बोलत होते, तरी अमितच्या कानांना सगळ्या गोष्टी व्यवस्थित ऐकू जात होत्या. जेव्हा रेदफा विश्वासार्ह आहे अशी त्याची खात्री पटली, तेव्हा तो आणि त्याचे सहकारी तिथून निघून गेले. रेदफाला अर्थातच हे काहीही समजलं नाही.
पण त्याची परीक्षा अजूनही संपली नव्हती. त्याच रात्री लीरॉन रेदफाबरोबर
अथेन्सला परतला. आता दोन दिवसांनी रेदफाची सर्वात कठीण परीक्षा होणार होती –
त्याला अचानक, कल्पनाही न देता तेल अवीवला पाठवण्यात येणार होतं.
या वेळी झालेल्या एका गडबडीने हे संपूर्ण ऑपरेशन संपुष्टात येण्याचा धोका
निर्माण झाला. होता. लीरॉन आणि रेदफा अथेन्स विमानतळावर एकमेकांच्या बरोबर
नव्हते, त्यामुळे रेदफा चुकून कैरोला जाणाऱ्या विमानात गेला. इकडे लीरॉन
जेव्हा तेल अवीवला जाणाऱ्या विमानात चढला, तेव्हा त्याला रेदफा तिथे दिसला
नाही. विमान उड्डाणाची वेळ झाली तरीही तो आला नाही म्हटल्यावर लीरॉनचं धाबं
दणाणलं. पण तो प्रयत्नपूर्वक शांत राहिला. १०-१५ मिनिटांनी, विमानाचा
दरवाजा बंद व्हायच्या वेळी रेदफा धावत धावत विमानात शिरला. कैरोच्या
फ्लाईटवरच्या लोकांनी सगळ्या प्रवाशांना मोजलं होतं आणि जेव्हा त्यांना एक
जास्तीचा प्रवासी मिळाला होता, तेव्हा त्यांनी तिकिटं तपासून पहिली होती
आणि मग रेदफाला तेल अवीवला जाणाऱ्या विमानाकडे पाठवलं होतं.
रोमप्रमाणेच तेल अवीवमध्येही रेदफा फक्त २४ तास होता. त्याला त्याचा बगदादपासून इझराईलपर्यंतचा मार्ग समजावून सांगण्यात आला आणि रोममध्ये लीरॉन आणि पोरात यांनी त्याच्याबरोबर ठरवलेल्या कोडचीही उजळणी त्याच्याकडून करून घेण्यात आली.
तेल अवीवमधून दुसऱ्या दिवशी रेदफा अथेन्सला आणि तिथून क्रीटला गेला आणि तिथून आपल्या कुटुंबाबरोबर बगदादला परत गेला.
बगदादला परत गेल्यावर साधारण दोन महिन्यांनंतर तो इझराईलला येणार होता. या मधल्या काळात मोसादने ब्रिटनच्या एम.आय.५ आणि अमेरिकेच्या सी.आय.ए.बरोबर संपर्क साधून त्याच्या नातेवाइकांना ब्रिटन, अमेरिका आणि कॅनडा इथे आश्रय मिळवून देण्यासाठी हालचाली सुरु केल्या. आपल्या एकही नातेवाईकाला इराकी राजवटीकडून त्रास होऊ नये अशी रेदफाची इच्छा आणि ही कामगिरी स्वीकारण्याआधीची अट होती. त्याचं स्वतःचं कुटुंब – त्याची पत्नी आणि दोन मुलं – इझराईलला येणार होते. त्याच्या पत्नीला याबद्दल काहीही माहित नव्हतं. तिला त्याने आपल्याला युरोपमध्ये नवीन नोकरी मिळाल्याचं सांगितलं होतं. त्याच्या नातेवाइकांना इराकी गुप्तचर संघटनेला संशय न येऊ देता बाहेर काढणं हे मोसादपुढचं मोठं आव्हान होतं. त्यात रेदफाने मध्येच एक विचित्र गोष्ट केली, ज्याच्यामुळे ही सगळी योजना कोसळण्याच्या बेतात होती.
तो बगदादला परत गेल्यानंतर एक महिना झाला असेल. त्याने अचानक आपल्या घरातलं फर्निचर विकायला काढलं. त्याच्यावर लक्ष ठेवून असलेल्या योसेफकडून जेव्हा हे अमितला समजलं, तेव्हा त्याला धक्काच बसला. जर इराकी गुप्तचर संघटनांना हे समजलं आणि त्यांनी रेदफाला त्याचं कारण विचारलं तर? जवळजवळ एक वर्षापासून चालू असलेलं काम क्षणार्धात मातीमोल होईल, रेदफाला अटक होईल, देशद्रोहाच्या आरोपावरून मृत्यूदंड दिला जाईल, मोसादची मोठी बदनामी होईल – हे सगळे विचार अमितच्या मनात येऊन गेले. पण रेदफाच्या आणि मोसादच्या सुदैवाने इराकी गुप्तचर संघटनेच्या लोकांचं रेदफाकडे लक्ष गेलं नाही.
मोसादच्या योजनेनुसार रेदफाची पत्नी कॅथरीन आणि त्याची मुलं इझराईलमध्ये पोचल्यानंतर काही काळाने तो आपलं काम करणार होता. रेदफाच्या सगळ्या प्रमुख नातेवाइकांना इराकबाहेर काढल्यावर साधारण जुलै १९६६ च्या शेवटी रेदफाने आपल्या पत्नी आणि मुलांना निरोप दिला. ते बगदादहून अॅमस्टरडॅमला गेले आणि तिथून मोसाद एजंट्स त्यांना पॅरिसला घेऊन गेले. तिथे लीरॉन त्यांना भेटला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांची तेल अवीवला जाणारी फ्लाईट होती. त्यामुळे त्या रात्री लीरॉनने कॅथरीनला ती आणि तिची मुलं खरोखर कुठे जाणार आहेत ते सांगितलं. तिची प्रतिक्रिया एकदम वेगळी होती. संपूर्ण रात्र ती फक्त रडत आणि मुनीर रेदफाच्या नावाने ओरडत होती त्याने देशद्रोह केलाय असं तिचं म्हणणं होतं. लीरॉनने मोसादच्या काही महिला एजंट्सना बोलावून घेतलं आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. आपण इराकी राजदूताला आत्ताच्या आत्ता भेटून हे सगळं सांगू अशी धमकीही तिने दिली. तिच्या भावांना जर मुनीरने केलेला हा देशद्रोह समजला, तर ते त्याला तो असेल तिथे येऊन ठार मारतील असंही ती रडत रडत म्हणत होती.
पहाटे ती काहीशी शांत झाल्यावर लीरॉनने तिच्यासमोर वस्तुस्थिती मांडली आणि तिला नम्रपणे पण ठामपणे सांगितलं की जर तिला तिच्या पतीला परत भेटायची इच्छा असेल, तर तिला इझराईलला यायलाच पाहिजे. तिचाही निरुपाय झाला आणि ती सकाळच्या तेल अवीवच्या फ्लाईटमध्ये आपल्या मुलांबरोबर बसली.
आपली पत्नी आणि मुलं इझराईलमध्ये सुखरूप पोचल्याचं समजल्यावर रेदफाने आता त्याच्या स्वतःच्या पलायनाची तयारी सुरु केली आणि १४ ऑगस्ट १९६६ या दिवशी तो मिग २१ विमान घेऊन बगदादजवळच्या रशीद एअरफोर्स बेसवरून निघाला. पण इंजिनात झालेल्या बिघाडामुळे त्याला परतावं लागलं. इकडे त्याची वाट पाहणाऱ्या मोसादच्या लोकांची झोप उडाली.
दोनच दिवसांनी – १६ ऑगस्ट १९६६ या दिवशी सकाळी ७ वाजता मुनीर रेदफाने परत रशीद एअरफोर्स बेसवरून उड्डाण केलं. इझरेली वायुदलातल्या अगदी थोड्या अधिकाऱ्यांना याची कल्पना देण्यात आली होती. इझराईलच्या हात्झोर एअरफोर्स बेसचा कमांडर मोर्देचाई हॉड हा त्यापैकी एक होता. त्याने फक्त दोन पायलट्सना या इराकी विमानाला घेऊन यायची जबाबदारी दिली होती. बाकी सर्वांना त्याच्याकडून आदेश आल्याशिवाय काहीही करायची मनाई करण्यात आली होती. या विमानाला एखाद्या उत्साही पायलटने इझराईलच्या हवाई हद्दीचा भंग करणारं शत्रूराष्ट्राचं विमान समजून पाडू नये हा यामागचा हेतू होता.
इझरेली प्रमाणवेळेनुसार सकाळी ८ वाजून ५ मिनिटांनी, उड्डाण केल्यानंतर बरोबर ६५ मिनिटांनंतर मुनीर रेदफाचं मिग २१ विमान इझराईलच्या भूमीवर उतरलं. या ऑपरेशनच्या सुरुवातीनंतर जवळजवळ १ वर्ष आणि १९६७ च्या ६ दिवसांच्या अरब-इझराईल युद्धाच्या १० महिने आधी इझरेली वायुदलाला मिग २१ मिळालं. त्यावेळी हे विमानं सर्व सोविएत बनावटीच्या विमानांमध्ये अत्युत्कृष्ट समजलं जात होतं. अनेक अरब राष्ट्रांना रशियाने ही विमानं दिली होती. त्याच्या तोडीचं एकही विमान नाटो राष्ट्रांकडे नव्हतं – पण आता इझराईलने ती कमतरता भरून काढली होती.
मुनीर रेदफा शांत होता. तो कोणाशीही बोलत नव्हता. आपण आपल्या देशात जायचे परतीचे दोर कायमचे कापून टाकले आहेत याची जाणीव त्याला हळूहळू व्हायला लागली होती.
त्याच दिवशी संध्याकाळी झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये इझरेली सैन्याने ही बातमी जाहीर केली. मुनीर रेदफासुद्धा या प्रेस कॉन्फरन्सचा एक महत्वाचा भाग होता. त्याने आपल्या भाषणात इराकमध्ये ख्रिश्चन आणि ज्यू या अन्य धर्मीय लोकांचा होत असलेला छळ आणि इराकी सरकारने कुर्द लोकांवर केलेले अत्याचार आणि बॉम्बफेक या विषयांवर विस्तृत माहिती दिली.
डॅनी शापिरा हा त्यावेळी इझरेली वायुदलाचा सर्वोत्कृष्ट टेस्ट पायलट होता. तो हे मिग चालवणारा पहिला इझरेली पायलट. रेदफाला जेव्हा तो हे विमानं चालवणार आहे हे समजलं तेव्हा तो काळजीत पडला, कारण त्याला इराकमध्ये हे विमान चालवण्याआधी रशियन पायलट्सकडून दीड महिन्यांचं प्रशिक्षण घ्यावं लागलं होतं. त्याने शापिराला सगळी उपकरणं आणि यंत्रणेची माहिती दिली. ही माहिती रशियन आणि अरेबिक अशा दोन भाषांमध्ये होती. सुदैवाने शापिराला दोन्ही भाषा येत होत्या त्यामुळे तसा प्रश्न आला नाही. रेदफाने शापिराच्या पहिल्या उड्डाणाच्या वेळी त्याच्या शेजारी बसायची इच्छा व्यक्त केली. शापिराची काहीही हरकत नव्हती.
पहिल्या उड्डाणानंतर जेव्हा दोघेही कॉकपिटच्या बाहेर पडले, तेव्हा रेदफाने स्वतःहून त्याच्याशी हात मिळवले, “तुझ्यासारखे पायलट असतील, तर अरब राष्ट्रांची वायुदलं तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाहीत,” तो मनापासून म्हणाला.
जेव्हा इझराईलकडे असलेल्या मिग २१ बद्दल अमेरिकनांना समजलं तेव्हा
त्यांनी इझरेली वायुदलाकडे त्याचा अभ्यास करायची परवानगी मागितली. रशियन
बनावटीच्या सॅम २ क्षेपणास्त्रांबद्दल अमेरिकनांना असलेल्या सगळ्या
माहितीच्या मोबदल्यात इझराईलने अमेरिकन वायुदलाच्या पायलट्सना मिग २१
विमानाच्या अभ्यासाची परवानगी दिली.
इझरेली वायुदलाला या मिग विमानामुळे अरब राष्ट्रांच्या वायुदलांच्या
क्षमतेविषयी अचूक अंदाज बांधणं शक्य झालं. त्याचा फायदा त्यांना जून १९६७
मध्ये झालेल्या ६ दिवसांच्या युद्धात झाला. युद्धाच्या पहिल्याच दिवशी
इझरेली विमानांनी इजिप्तचं जवळपास संपूर्ण आणि सीरियाचं अर्ध्याहून जास्त
वायुदल उध्वस्त केलं, त्यात या मिगच्या सहाय्याने केलेल्या सरावाचा मोठा
वाटा होता.
मात्र इझराईलच्या या यशाची मोठी किंमत मुनीर रेदफा आणि त्याच्या कुटुंबाला
द्यायला लागली. त्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या मनातली आपण मातृभूमीशी
प्रतारणा केल्याची भावना कधीच कमी होऊ शकली नाही. मुनीरला इझरेली वायुदलात
सन्माननीय कमिशन द्यायचा एझेर वाईझमनचा विचार होता, पण त्यानेच नकार दिला.
त्याऐवजी त्याने इझराईलच्या पर्यटन आणि खाजगी विमान वाहतूक क्षेत्रात नशीब
आजमावायचं ठरवलं. तेल अवीव ते सिनाई हवाई वाहतूक करणाऱ्या एका एअर टॅक्सी
कंपनीमध्ये तो भागीदार म्हणून काम करायला लागला. त्याने स्वतःला
इझराईलमधल्या आयुष्यात पूर्णपणे झोकून द्यायचा प्रयत्न केला, पण त्याच्या
पत्नीला ते जमू शकलं नाही. ती कट्टर कॅथॉलिक असल्यामुळे ज्यू देशात राहणं
तिला मानवलं नाही. ती साधी गृहिणी होती. इथे पूर्णपणे वेगळ्या वातावरणात
तिला एकाकी आयुष्य जगावं लागलं आणि तिला त्यामुळे नैराश्याचे झटके यायला
लागले. शेवटी आपल्याला ग्रीसमध्ये स्थायिक होण्याची परवानगी मिळावी अशी
विनंती मुनीर रेदफाने इझरेली सरकारला केली. त्याच्या विनंतीला मान देऊन
मोसादने त्याची ग्रीसमध्ये व्यवस्था केली. त्याच्या संरक्षणाची व्यवस्थाही
मोसादने केली होती कारण इराकी गुप्तचर संघटना रेदफाच्या मागावर असतीलच याची
मोसादला खात्री होती.
इझराईलमध्ये मिग २१ घेऊन आल्यानंतर २२ वर्षांनी – १९८८ मध्ये – मुनीर
रेदफाचा त्याच्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मायर अमित
मोसादमधून निवृत्त झाल्यानंतरही रेदफा कुटुंबाच्या संपर्कात होता. त्याला
कॅथरीन रेदफाने ही बातमी कळवली.
मोसाद आणि इझरेली वायुदलाने मुनीर रेदफाच्या स्मरणार्थ शोकसभा आयोजित केली.
सभेत झीव्ह लीरॉन आणि डॅनी शापिरा यांच्यासारखे रेदफाबरोबर काम केलेले
लोकही उपस्थित होते. त्यांना अश्रू आवरत नव्हते. एका इराकी पायलटसाठी
मोसादने शोकसभा आयोजित करणं आणि अश्रू ढाळणं ही खरोखर अभूतपूर्व गोष्ट
होती.
क्रमशः
मोसाद - भाग ९
२७ फेब्रुवारी १९६५. पश्चिम जर्मनीमधल्या der Spiegel या नामवंत नियतकालिकाच्या ऑफिसमध्ये एक निनावी फोन आला. फोन करणाऱ्याने दिलेली बातमी विचित्र होती – एका नाझी युद्धगुन्हेगाराचा ‘ जे कधीही विसरणार नाहीत ’ अशा लोकांनी दक्षिण अमेरिकेतील उरुग्वे देशाची राजधानी माँटेव्हिडिओ येथे काटा काढला होता.
der Spiegel च्या वार्ताहरांनी या फोनकडे कुणाचा तरी खोडसाळपणा म्हणून दुर्लक्ष केलं. काही दिवसांनी der Spiegel सह पश्चिम जर्मनीमधल्या इतर अनेक वृत्तपत्रांच्या आणि नियतकालिकांच्या ऑफिसेसमध्ये एकाच वेळी काही पार्सल्स पाठवण्यात आली. या पार्सल्समध्ये हा नाझी युद्धगुन्हेगार, त्याची पार्श्वभूमी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फोटो होते. अशीच पार्सल्स माँटेव्हिडिओमध्येही पाठवण्यात आली होती.
८ मार्च १९६५ या दिवशी सकाळी उरुग्वेमधल्या पोलिसांनी माँटेव्हिडिओच्या कारास्को भागातल्या कार्टाजेना स्ट्रीटवर असलेल्या कासा क्युबेर्तिनी या बंद आणि रिकाम्या घरात एका शवपेटीत ठेवलेला एक मृतदेह मिळाला. मृत माणसाच्या कुटुंबीयांना तिथे आणण्यात आलं आणि त्यांनी ताबडतोब त्याची ओळख पटवली. हर्बर्ट्स झुकर्स. द बुचर ऑफ रिगा या नावाने कुप्रसिद्ध असलेला, जर्मनी आणि सोविएत रशिया या दोन्ही देशांमध्ये ज्यूंच्या हत्याकांडासाठी हवा असलेला आणि गेली २० वर्षे फरार असलेला क्रूरकर्मा.
लिथुआनिया, लाटव्हिया आणि एस्टोनिया या तीन देशांना बाल्टिक देश म्हणून ओळखलं जातं. झुकर्स त्यातल्या लाटव्हियाचा नागरिक होता. १९३० च्या दशकात तो एक अत्यंत धाडसी वैमानिक म्हणून प्रसिद्ध होता. लाटव्हियाची राजधानी रिगा ते पश्चिम आफ्रिकेतल्या गँबिया देशाची राजधानी बंजुलपर्यंत आणि रिगापासून टोकियोपर्यंत अशा दोन लांब पल्ल्याच्या विमानोड्डाणांच्या पराक्रमामुळे तो सर्वांच्या नजरेत आला. सर्वात उल्लेखनीय गोष्ट ही की हे दोन्हीही पराक्रम त्याने ज्या विमानांनी केले, त्या विमानांची संरचना ही त्याची स्वतःची होती. त्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय ख्यातीचा हार्मन पुरस्कारही मिळाला आणि त्याची तुलना विमानातून अटलांटिक महासागर सर्वप्रथम पार करणाऱ्या चार्ल्स लिंडबर्गबरोबर करण्यात आली. रिगाच्या म्युझियममध्ये त्याच्या विमानाची प्रतिकृती बघायला प्रचंड गर्दी होत असे.
राजकीयदृष्ट्या झुकर्स उजव्या विचारसरणीचा होता. पण त्याचे अनेक ज्यू मित्र होते. महायुद्धापूर्वी त्याने आपल्या विमानाने पॅलेस्टाईनलाही भेट दिली होती आणि तिथल्या झिओनिस्ट ज्यूंसमोर भाषण केलं होतं. त्यामुळे लाटव्हियामधले ज्यू त्याला आपला मित्र मानत होते.
युद्ध सुरु झाल्यावर मात्र सगळं बदलून गेलं. नाझी जर्मनी आणि सोविएत रशिया यांनी १९३९ मध्ये पोलंडची फाळणी केली. त्याच्यानंतर १९४० मध्ये संभाव्य जर्मन आक्रमणापासून बचाव म्हणून रशियाने जबरदस्तीने आपलं सैन्य बाल्टिक देशांमध्ये घुसवलं. झुकर्ससारखे उजवे राष्ट्रवादी रशियनांच्या रडारवर होतेच. त्याला तुरुंगात टाकण्यात आलं. पुढच्याच वर्षी, १९४१ च्या जूनमध्ये जर्मनीने सोविएत रशियावर आक्रमण केलं. त्यात बाल्टिक देश आणि बेलारूस (त्याला त्यावेळी श्वेत रशिया हे नाव होतं) हे भाग जर्मनांच्या टाचांखाली सर्वात पहिल्यांदा आले. झुकर्स आणि त्याच्यासारख्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना तुरुंगातून मुक्त करण्यात आलं.
लाटव्हियावर जर्मन नियंत्रण प्रस्थापित होताच झुकर्सच्या व्यक्तिमत्वात आमूलाग्र बदल घडून आला. तो थंडर क्रॉस नावाच्या एका फॅसिस्ट संघटनेचा सदस्य होता. या संघटनेचा मुख्य विरोध हा कम्युनिस्टांना होता. त्यांनी लाटव्हियामध्ये आलेल्या नाझींना कम्युनिस्टांची पाळंमुळं खणून काढण्यासाठी मदत करायचं ठरवलं. नाझींनी त्यांना अजून एक जबाबदारी दिली – लाटव्हिया ज्यू-मुक्त करणे. झुकर्स आता कट्टर ज्यू-विरोधी झाला होता. नाझींना खुश करण्यासाठी त्याने सर्वात पहिली कामगिरी जी केली ती पाहून निर्ढावलेले नाझीही हादरले. त्याने ३०० ज्यूंना एका स्थानिक सिनेगॉगमध्ये डांबलं आणि त्या सिनेगॉगला सरळ आग लावून दिली. सर्वच्यासर्व ३०० ज्यू – ज्यांच्यामध्ये स्त्रिया आणि लहान मुलांचाही समावेश होता – होरपळून मरण पावले.
या पहिल्याच कृत्याने रिगामध्ये झुकर्स आणि त्याच्या थंडर क्रॉस संघटनेची दहशत निर्माण झाली. युद्धापूर्वी अनेक ज्यू मित्र असल्यामुळे झुकर्सला ज्युबहूल लोकसंख्या असणारे भाग माहित होते. तिथे जाऊन जो कोणी सिनेगॉगमध्ये जात असेल किंवा तिथून बाहेर पडत असेल त्यांना गोळ्या घालून ठार मारणं, ज्यू वस्तीच्या मध्यभागी शेकोटी पेटवून त्यात लहान मुलांना फेकणं, ज्यू तरुणींवर सर्वांसमक्ष बलात्कार करणं असले प्रकार थंडर क्रॉसच्या गुंडांनी सुरु केले. झुकर्स त्यात अग्रभागी होता.
त्याच वर्षी ऑगस्टमध्ये त्याच्या आदेशावरून लाटव्हियाच्या पश्चिमेला असणाऱ्या कुल्दिगा सरोवरात १२०० ज्यूंना बुडवून मारण्यात आलं. त्याची सर्वात भयानक कामगिरी त्याने त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये पार पाडली. रिगा शहरातल्या आणि बाल्टिक देशांमधल्या ज्यूंना रिगामधल्या घेट्टोमध्ये कोंबण्यात आलं होतं. त्या वर्षी ऑक्टोबरच्या शेवटी एस.एस. प्रमुख हेनरिक हिमलरने रिगा घेट्टो विसर्जित करायचा आदेश सोडला. या घेट्टोमधल्या २५,००० ज्यूंना रिगाच्या जवळ असणाऱ्या रम्बुला नावाच्या जंगलामध्ये नेऊन, विवस्त्र करून, गोळ्या घालून ठार मारण्यात आलं.
२२ जून १९४१ या दिवशी जर्मनीने सोविएत रशियावर आक्रमण केलं होतं. बरोबर तीन वर्षांनंतर त्याच दिवशी रशियाने जर्मन सैन्याला पश्चिमेकडे रेटण्यासाठी आणि रशियन भूमी मुक्त करण्यासाठी ऑपरेशन बाग्रातियान या नावाने प्रतिआक्रमण सुरु केलं. बेलारूस आणि बाल्टिक राष्ट्रांमधून जर्मन सैन्याला हाकलून लावून हे भाग मुक्त करणे हा या आक्रमणाचा प्राथमिक उद्देश होता. रशियन सैन्याने लाटव्हिया मुक्त केल्यावर आपलं काही खरं नाही, हे झुकर्सला समजलं होतंच. त्याने आपल्या कुटुंबियांना आधीच लाटव्हियाच्या बाहेर काढून दक्षिण अमेरिकेत पोहोचवलं होतं. १९४४ च्या उत्तरार्धात रशियन सैन्याने रिगा ताब्यात घेतल्यावर झुकर्स बनावट कागदपत्रांच्या मदतीने स्वीडनला आणि तिथून फ्रान्सला गेला आणि तिथून त्याने ब्राझीलमधल्या रिओ डी जानेरोला जाणारी बोट पकडली.
झुकर्सने एक गोष्ट अजून केली जी इतर नाझी युद्धगुन्हेगारांनी केली नाही. त्याने मिरियम कित्झनर नावाच्या एका ज्यू मुलीला नाझींपासून वाचवलं होतं आणि रिओला जाताना तो तिला बरोबर घेऊन गेला होता. एक अस्सल ज्यू मुलगी बरोबर असल्यामुळे रिओला पोहोचेपर्यंत आणि पोहोचल्यावरही झुकर्सचा कोणालाही संशय आला नाही. रिओमध्ये पोचल्यावर त्याने आपल्या कुटुंबाला तिकडे बोलावून घेतलं. मिरियमला रिओमधल्या स्थानिक ज्यू संस्थांमधून भाषणांची आणि तिचे युद्धातले अनुभव सांगण्याची अनेक आमंत्रणं यायला लागली होती. या कार्यक्रमांसाठी झुकर्स तिच्याबरोबर जात असे. या कार्यक्रमांमध्ये मिरियम कसा झुकर्सने नाझींपासून आपला जीव वाचवला, याचं वर्णन करत असे. त्यामुळे झुकर्सबद्दल रिओमधल्या ज्यू लोकांमध्ये आदराची भावना निर्माण झाली. त्याचा फायदा घेऊन त्याने रिओमध्ये एक ट्रॅव्हल एजन्सी आणि एअर टॅक्सी कंपनी चालू केली. त्याला त्यासाठी रिओमधल्या श्रीमंत ज्यूंनी भांडवल पुरवलं होतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे सगळं करत असताना त्याने स्वतःचं नाव बदललं नव्हतं. त्याचं असं सगळं व्यवस्थित चालू असताना एक अनपेक्षित घटना घडली.
मिरियमला एका व्याख्यानाचं आणि त्याच्याच जोडीने तिथे असलेल्या पार्टीचं आमंत्रण आलं होतं. पार्टीच्या आयोजकांची झुकर्सनेही बोलावं अशी इच्छा होती. मिरियमच्या भाषणानंतर झुकर्स बोलणार होता. तिचं भाषण अपेक्षेपेक्षा जास्त लांबलं आणि झुकर्सच्या भाषणाची वेळ येईपर्यंत त्याने भरपूर दारू ढोसली होती. त्यामुळे तो जेव्हा बोलायला उभा राहिला, तेव्हा तो नशेतच होता आणि मिरियमने एवढा वेळ घेतल्यामुळे वैतागलेला होता. बोलता बोलता त्याने मिरियमला आणि तिच्यावरून ज्यूंना शिव्या द्यायला सुरुवात केली आणि धुंदीत असतानाच आपण आणि आपल्या नाझी मित्रांनी कसं ज्यूंना मारलं आणि रम्बुला जंगलात आपण २५,००० ज्यूंच्या हत्येत कसे सहभागी होतो त्याचं अगदी रसभरीत वर्णन केलं.
झुकर्सच्या ज्यू मित्रांना जबरदस्त धक्का बसला. साधारण त्याच वेळी सर्व दोस्त राष्ट्रांमध्ये आणि सोविएत रशियाच्या अंमलाखाली असलेल्या पूर्व युरोपियन कम्युनिस्ट देशांमध्ये नाझी युद्धगुन्हेगार आणि त्यांना सहकार्य करणारे स्थानिक लोक यांच्यावर खटले चालू होते. आपल्यामुळे नाझीवाद नष्ट झाला हे दाखवायची खुमखुमी असल्यामुळे स्टॅलिनने या सगळ्या खटल्यांचं कामकाज कव्हर करण्यासाठी पाश्चात्य पत्रकारांना परवानगी दिली होती. लाटव्हिया सोविएत रशियाचा भाग असल्यामुळे राजधानी रिगामध्ये चालू असलेल्या खटल्यांचा वृत्तांत सगळ्या जगभर प्रसारित होत होता. रिगा घेट्टो आणि रम्बुला हत्याकांड यासंदर्भात फ्रेडरिक जेकेल्न नावाच्या एस.एस. अधिकाऱ्यावर चालू असलेल्या खटल्यात त्याला स्थानिक लोकांपैकी कोणी मदत केली, असा प्रश्न विचारला असता त्याने हर्बर्ट्स झुकर्स हे नाव घेतलं होतं. त्यामुळे पाश्चात्य देशांमध्येही झुकर्सचं नाव आणि त्याची कृत्यं सर्वांना समजली. तो युद्धापूर्वी त्याच्या विमानविषयक पराक्रमांसाठी प्रसिद्ध होता. त्याचे फोटो ठिकठिकाणी प्रसिद्ध झाले होते. एका सुप्रसिद्ध वैमानिकाचा नाझींचा सहकारी आणि फरारी युद्धगुन्हेगार होईपर्यंत झालेला अधःपात ही सनसनाटी स्टोरी होती. त्यामुळे पाश्चात्य वृत्तपत्रांनीही झुकर्सच्या फोटोसकट लेख छापले.
रिओमध्ये ही बातमी पोहोचल्यावर झुकर्सला रिओमध्ये राहणं अशक्य होतं. मिरियमनेही त्याच्याबरोबर कुठलाही कार्यक्रम करायला किंवा इतर कुठलाही संबंध ठेवायला नकार दिला. झुकर्स रिओ शहर सोडून त्याच्या एका उपनगरात राहायला गेला. इथे ज्यू वस्ती जवळजवळ नव्हतीच. पण रिओमधल्या ज्यूंना त्याच्याबद्दल समजल्यावर त्यांनी त्याच्या ऑफिसवर मोर्चा काढला. या मोर्च्यात असलेल्या काही गरम रक्ताच्या ज्यू तरुणांनी ऑफिसमधल्या फाईल्स आणि बाकी सामान रस्त्यावर आणून जाळलं आणि ऑफिसची प्रचंड नासधूस केली. झुकर्सला पोलिसांच्या संरक्षणात रिओ सोडून जवळपास साडेचारशे किलोमीटर्स दूर असलेल्या साओ पावलोला जावं लागलं.
झुकर्सकडे थोडेफार पैसे होते. त्यांचा भांडवल म्हणून वापर करून त्याने परत एकदा स्वतःचा एअर टॅक्सी व्यवसाय सुरु केला. पण आता त्याचा पूर्वीचा आत्मविश्वास लयाला गेला होता. आपला मृत्यू एखाद्या ज्यू माणसाच्या हातून होणार आहे याची त्याला सतत भीती वाटायला लागली होती. साओ पावलोच्या सर्व पोलिस स्टेशन्समध्ये त्याने आपला संशयास्पद रीत्या मृत्यू झाला तर जे लोक जबाबदार असू शकतील अशा लोकांची एक यादी दिली होती. या यादीवरचे सर्व लोक रिओमधले प्रतिष्ठित ज्यू आणि झुकर्सचे एकेकाळचे मित्र आणि भांडवलदार होते. त्याने त्याचं साओ पावलोमधलं घर एखाद्या किल्ल्यासारखं कडेकोट बनवलं होतं. १९६० मध्ये मोसादने अॅडॉल्फ आइकमनला अर्जेन्टिनामधून उचललं आणि इझराईलला नेऊन त्याच्यावर खटला भरून त्याला फाशी दिलं. त्यानंतर झुकर्सची भीती अजूनच वाढली. त्याने आपल्या आणि आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षेवर जास्तीतजास्त लक्ष द्यायला सुरुवात केली. अर्जेन्टिनापासून ब्राझील काही लांब नव्हता.
या सगळ्या नादात त्याचं त्याच्या व्यवसायाकडे दुर्लक्ष होत होतं, आणि
शेवटी त्याचा परिणाम दिसायला लागलाच. त्याने चालू केलेले जवळपास सर्व
व्यवसाय तोट्यात गेले आणि त्याची आर्थिक स्थिती बरीच खालावली.
इकडे युरोपमध्ये वेगळंच नाट्य आकाराला येत होतं. १ सप्टेंबर १९६४ या दिवशी
पॅरिसमध्ये दोन मोसाद एजंट्स भेटले. एक होता यित्झाक सारीद. दुसऱ्याचं नाव
होतं योस्की यारीव्ह. सारीद मोसादच्या सीझरिआ नावाच्या ऑपरेशन्स टीमचा
सदस्य होता, तर यारीव्हची नुकतीच सीझरिआचा प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात
आली होती. मोसादचा ऑपरेशन्स प्रमुख रफी एतान आता मोसादच्या युरोप विभागाचा
प्रमुख झाला होता. त्याच्या जागी यारीव्ह आला होता.
यारीव्हने सारीदला त्यांच्या भेटीची पार्श्वभूमी सांगितली. काही महिन्यांच्या कालावधीमध्ये पश्चिम जर्मनी आणि ऑस्ट्रिया या दोन्ही देशांच्या संसदगृहांमध्ये एक विधेयक मांडलं जाणार होतं. या विधेयकाद्वारे दुसऱ्या महायुद्धादरम्यान घडलेल्या सर्व गुन्ह्यांबद्दल जी कारवाई होणार होती, त्यावर कालमर्यादा आणण्यात येणार होती. दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर एक ठराविक कालावधी उलटून गेल्यावर महायुद्धादम्यान केलेला गुन्हा, मग तो कितीही नृशंस असला तरीही, गुन्हा राहणार नव्हता. अनेक लपूनछपून राहणाऱ्या नाझींना त्यामुळे समाजासमोर येऊन उजळ माथ्याने, जणू काही घडलंच नव्हतं, अशा प्रकारे राहणं शक्य होणार होतं. या विधेयकामागचं अत्यंत महत्वाचं कारण म्हणजे पश्चिम जर्मनी आणि ऑस्ट्रिया या दोन्ही देशांच्या सरकारांना आपला भूतकाळ विसरायचा होता. जर्मन अत्याचारांमुळे भरडल्या गेलेल्या बेल्जियम, हॉलंड, फ्रान्स यासारख्या देशांमध्येही नाझी युद्धगुन्हेगारांचा पाठपुरावा करून त्यांना न्यायालयासमोर आणून शिक्षा देण्यासंबंधी उदासीन वातावरण होतं. आइकमनचं अपहरण आणि त्याच्या खटल्यामुळे नाझीविरोधी मोहिमांना थोडीफार गती मिळाली होती, पण राजकीय इच्छाशक्तीचा अभाव सगळीकडे दिसत होता. इझराईलच्या राजकीय वर्तुळामध्येही त्यामुळे अस्वस्थता होती. आइकमनसारखी एखादी जबरदस्त घटना घडल्याशिवाय नाझींच्या कृत्यांची भयानकता जगासमोर येणार नाही असं इझरेली नेत्यांना आणि सुरक्षाव्यवस्थेला वाटत होतं. मोसादला जरी पश्चिम जर्मनी आणि ऑस्ट्रिया या दोन्हीही देशांमध्ये हे विधेयक मांडण्यापासून कोणाला रोखता येणार नव्हतं, तरीही त्याला मंजुरी मिळून त्याचं कायद्यात रूपांतर होऊ नये यासाठी जे होऊ शकतील ते सगळे प्रयत्न करायचं मोसादने ठरवलं होतं, आणि त्याचसाठी एखाद्या मोठ्या आणि फरार नाझी युद्धगुन्हेगाराला लक्ष्य बनवण्याचा निर्णय संचालक मायर अमितने घेतला होता. त्याला आइकमनप्रमाणे इझराईलमध्ये आणून खटला भरून शिक्षा देणं आता शक्य नव्हतं. त्यामुळे त्याला ठार मारणं आणि त्याची बातमी आणि त्या अनुषंगाने त्या गुन्हेगाराच्या गुन्ह्यांची माहिती जगभरात पसरवणं हा मोसादचा हेतू होता. मोसादच्या दक्षिण अमेरिकेमधल्या एका प्रतिनिधीने नाव सुचवलं होतं – हर्बर्ट्स झुकर्स. द बुचर ऑफ रिगा. रिगाचा कसाई.
यारीव्हने या कामासाठी सारीदची नियुक्ती केली होती. सारीद अत्यंत हुशार होता आणि आइकमनच्या अपहरणाच्या मोहिमेतल्या शेवटच्या टप्प्यात सहभागी होता. पण त्याच्याकडे ही कामगिरी सोपवण्याचं केवळ हेच कारण नव्हतं. सारीदचा जन्म जर्मनीमध्ये झाला होता आणि त्याचं संपूर्ण कुटुंब चेल्मनो मृत्यूछावणीतल्या गॅस चेंबरमध्ये मारलं गेलं होतं. तो कसाबसा जीव वाचवून पॅलेस्टाईनपर्यंत पोचला होता. महायुद्धादरम्यान ब्रिटिशांनी इजिप्तचं जर्मन सैन्यापासून संरक्षण करण्यासाठी जी पॅलेस्टाईन रेजिमेंट उभारली होती, त्यात त्याचा समावेश होता. एल अलामेनच्या निर्णायक लढाईमध्ये तो जर्मन सैन्याविरुद्ध लढलादेखील होता. त्याला आता वीसपेक्षा जास्त वर्षे होऊन गेलेली असली, तरीही सारीदच्या मनातला नाझींविषयी असलेला संताप कमी झालेला नव्हता.
ही भेट झाल्यावर साधारण एक आठवड्यानंतर सारीद पॅरिसहून रेल्वेने अॅमस्टरडॅमला आला. अँटन कुन्झल या नावाने त्याने तिथल्या एका आलिशान हॉटेलमध्ये चेक-इन केलं. नंतर त्याने तिथल्या स्थानिक पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन त्याच नावाने एक पोस्ट बॉक्स भाड्याने घेतली. तिथून तो अॅमरो बँकेच्या शाखेत गेला आणि तिथे एक अकाउंट उघडून त्याने त्यात ३००० डॉलर्स एवढी रक्कम जमा केली. मग एका स्क्रीन प्रिंटरच्या दुकानात जाऊन त्याने अँटन कुन्झल या नावाने काही बिझनेस कार्ड्स आणि इतर स्टेशनरी छापून घेतली. यामध्ये तो रॉटरडॅममधल्या एका गुंतवणूकविषयक सल्ला देणाऱ्या कंपनीचा संचालक असल्याचा उल्लेख होता. तिथून तो ब्राझीलच्या वकिलातीत गेला आणि तिथे त्याने ब्राझीलचा पर्यटक व्हिसा मिळवण्यासाठी अर्ज केला. तिथून तो एका डॉक्टरच्या दवाखान्यात गेला, स्वतःची वैद्यकीय तपासणी करून घेतली आणि एकदम निरोगी असल्याचं प्रमाणपत्र घेऊन तो तिथून एका चष्म्याच्या दुकानात गेला. त्याची नजर अत्यंत तीक्ष्ण होती, पण तरीही त्याने डोळ्यांचा नंबर जाणून घेण्यासाठी जी टेस्ट असते, त्यात खोटी उत्तरं दिली. परिणामी त्याला एकदम जाड भिंगांचा चष्मा घ्यायला लागला.
दुसऱ्या दिवशी स्वित्झर्लंडमधल्या झुरिकमध्ये त्याने क्रेडिट स्विस बँकेत एक अकाउंट उघडला आणि त्यात ६००० डॉलर्स जमा केले. तिथून तो पॅरिसला गेला. तिथे त्याने एका मेक-अपचं सामान विकणाऱ्या दुकानातून एकदम जाड मिशा आणि भुवयांची जोडी विकत घेतली आणि एका सार्वजनिक स्वच्छतागृहात जाऊन पूर्णपणे नवा माणूस – अगदी जाड भिंगांच्या चष्म्यासकट – बनून तो बाहेर आला. एका फोटो स्टुडीओमध्ये जाऊन त्याने या नवीन चेहऱ्याचे फोटो काढून घेतले. त्याच दिवशी तो अॅमस्टरडॅमला परत गेला.
दुसऱ्या दिवशी ब्राझीलच्या वकिलातीत जाऊन त्याने ब्राझीलचा पर्यटक व्हिसा मिळवण्यासाठी केलेला अर्ज तिथे नेऊन दिला. अर्जासोबत असलेल्या ऑस्ट्रियन पासपोर्टवर त्याचा चष्मा लावलेला फोटो होता आणि नाव तेच होतं – अँटन कुन्झल.
अॅमस्टरडॅम ते साओ पावलो अशी फ्लाईट नसल्यामुळे कुन्झलने रिओचं तिकिट काढलं. तो या संपूर्ण काळात ज्या कोणाला भेटला होता, त्या प्रत्येक माणसाला त्याने आपलं व्हिजिटिंग कार्ड दिलं होतं. तो एक अत्यंत यशस्वी बिझनेसमन असल्याचं वातावरण त्याने जाणूनबुजून निर्माण केलं होतं. त्याच्या रुबाबदार व्यक्तिमत्वामुळे त्याच्या या दाव्यावर कोणाचाही सहज विश्वास बसला असता.
१० सप्टेंबर १९६४ या दिवशी कुन्झल रिओला जाणाऱ्या विमानात बसला. तो त्याच्यावर सोपवलेल्या कामगिरीमुळे उत्तेजित झाला होतंच, पण त्याचबरोबर त्याच्या मनावर प्रचंड दडपण आलेलं होतं. त्याला परदेशात जाऊन स्वतःच्या जिवाची २४ तास भीती असणाऱ्या आणि त्यामुळे अत्यंत सावध असणाऱ्या एका क्रूरकर्म्याबरोबर मैत्री करायची होती, आणि मग त्याच माणसाला ठार मारायचं होतं. झुकर्सला कमी लेखून चालणार नव्हतं. एखादी छोटीशी चूकही प्राणघातक ठरली असती.
संपूर्ण विमानप्रवासात आपलं लक्ष कामगिरीवर केंद्रित करण्यासाठी कुन्झल झुकर्सच्या तावडीतून जीव वाचवून निसटलेल्या ज्यूंचे अनुभव वाचत होता. एस.एस. अधिकारी फ्रेडरिक जेकेल्न, ज्याने आपल्या साक्षीत झुकर्सचं नाव घेतलं होतं, त्याने ज्यूंना मारण्यासाठी ‘सार्डिन पॅकिंग ’ नावाची एक अमानुष पद्धत शोधून काढली होती. यात एक मोठा खड्डा खणला जात असे. बहुतेक वेळा ज्या ज्यूंना मारण्यासाठी आणलं जात असे, त्यांच्याचकडून हा खड्डा खोदून घेतला जाई. खड्डा पुरेसा खोल झाला, की ज्यूंच्या एका रांगेला त्याच्या काठावर उभं करण्यात येई आणि त्यांच्या मानेत गोळी घालून त्यांची प्रेतं या खड्ड्यात पाडली जात. ही रांग संपली की पुढच्या रांगेतल्या ज्यूंना उभं केलं जाई. त्यांचे मृतदेह या आधी मारलेल्या ज्यूंच्या अंगावर पडत. त्यामुळे कोणी समजा येनकेनप्रकारेण गोळीपासून बचावला, तरी खड्ड्यात घुसमटून मरत असे. खड्ड्यात प्रेतांची रास होऊन खड्डा भरला, की मग त्यावर डिझेल किंवा पेट्रोल ओतून सगळी प्रेतं जाळली जात आणि त्यांची राख नव्याने तिथे मरण्यासाठी आलेल्या ज्यूंना साफ करावी लागत असे. पुरुष, स्त्रिया, मुलं – कोणाच्याही बाबतीत नाझी भेदभाव करत नसत. जेकेल्नचा लाटव्हियामधील रम्बुला आणि युक्रेनमधील बाबी यार अशा दोन मोठ्या हत्याकांडांमध्ये सहभाग होता. रम्बुलामध्ये जेकेल्न हजर होता, पण प्रत्यक्ष हत्या झुकर्स आणि त्याच्या थंडर क्रॉस संघटनेतल्या लोकांनी केल्या होत्या. रम्बुलामधून वाचलेल्या एका ज्यू स्त्रीने लाटव्हियामध्ये जाऊन जेकेल्नविरुद्ध साक्ष दिली होती. तिनेही झुकर्सचं वर्णन केलं होतं. जेकेल्नला ३ फेब्रुवारी १९४६ या दिवशी रशियनांनी फासावर लटकवलं होतं, पण झुकर्स अजूनही जिवंत होता.
कुन्झल उर्फ सारीदने एक खूणगाठ मनाशी पक्की बांधली होती, की जर तो झुकर्सला सरळ जाऊन भेटला, तर त्याला नक्कीच संशय येईल. त्यामुळे रिओला पोचल्यावर त्याने लगेच साओ पावलोला न जाता काही दिवस रिओमध्येच घालवले. त्याचा पर्यटक व्हिसा होताच. त्यामुळे रिओमधली अनेक प्रेक्षणीय स्थळं त्याने पाहिली. ब्राझीलमध्ये त्यावेळी वसंतऋतू असल्यामुळे पर्यटकांची गर्दी होतीच. पर्यटक म्हणून रिओमध्ये वावरत असतानाच त्याची पर्यटन व्यवसायातल्या अनेक लोकांशी – सरकारी आणि खाजगी क्षेत्रातल्या – ओळख झाली. रिओच्या स्थानिक पर्यटन मंत्र्यालाही तो भेटला आणि त्याने आपण ब्राझीलच्या पर्यटन व्यवसायात गुंतवणूक करायला उत्सुक आहोत असं सांगितलं आणि रिओ आणि साओ पावलो या दोन शहरांवर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत हेही सांगितलं. ज्या लोकांना तो भेटला होता, त्या प्रत्येकाकडून शिफारसपत्र घ्यायला तो विसरला नाही.
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात कुन्झल साओ पावलोला गेला. तिथल्या एका मरीनामध्ये झुकर्सच्या कंपनीच्या मालकीची एक जेट्टी आहे, असं त्याला मोसादच्या ब्रीफिंगमध्ये सांगण्यात आलं होतं. ती जेट्टी शोधून काढायला त्याला अजिबात वेळ लागला नाही. जेट्टीच्या जवळ काही छोट्या बोटी आणि लाँचेस होत्या. त्याच्याचजवळ एक सी प्लेन होतं आणि त्याच्याबाजूला एक उंच, सडपातळ पण दणकट असा एक माणूस पायलटच्या पोशाखात उभा होता. कुन्झलने त्याला फोटोवरून ताबडतोब ओळखलं – हर्बर्ट्स झुकर्स.
त्याच्याकडे न जाता कुन्झल जेट्टीपासून थोड्या दूर असलेल्या तिकिट खिडकीपाशी गेला. तिथे एक सुंदर तरुणी तिकिटं विकत होती. ती झुकर्सच्या मोठ्या मुलाची पत्नी आहे, हे कुन्झलला त्यावेळी माहित नव्हतं. त्याने साओ पावलोमधल्या पर्यटन व्यवसायाबद्दल तिला विचारलं. तिला त्याबद्दल काही खास माहिती नव्हती. तिने झुकर्सकडे निर्देश करून कुन्झलला त्याला भेटायला सांगितलं.
कुन्झल झुकर्सच्या दिशेने गेला, आणि त्याने स्वतःची ब्राझीलमधल्या पर्यटन व्यवसायात गुंतवणूक करू इच्छिणारा एक ऑस्ट्रियन गुंतवणूकदार अशी ओळख करून दिली. झुकर्स कुन्झलच्या प्रश्नांना तुटकपणे उत्तरं देत होता. कुन्झलने त्याच्या विमानातून साओ पावलो शहरावरून एक फेरफटका मारायची इच्छा प्रदर्शित केली. त्या दिवशी कोणी इतर लोक नसल्यामुळे झुकर्स आणि कुन्झल यांना विमानामध्ये आणि नंतर जेट्टीवर भरपूर गप्पा मारता आल्या. कुन्झल गोष्टीवेल्हाळ होताच. बोलता बोलता त्याने झुकर्सला आपण युद्धात रशियन आघाडीवर लढलो असल्याचं सांगितलं. झुकर्सकडे युद्धातले अनेक किस्से आणि गोष्टी होत्या. तो बोलत असताना कुन्झल त्याचं निरीक्षण करत होता. झुकर्सचा पायलटचा गणवेश बऱ्यापैकी जुना वाटत होता. विमानातल्या सीट्स फाटलेल्या होत्या. काहींमधून स्पंज बाहेर आला होता. एकंदरीत त्याचं काही बरं चाललेलं नाही हे समजून येत होतं.
कुन्झलने ताबडतोब बोलण्याची दिशा बदलली. त्याने आपल्या कंपनीने युरोप आणि मध्यपूर्व आशियामध्ये विकसित केलेल्या पर्यटन प्रकल्पांचं वर्णन केलं आणि तसंच काही आपल्याला दक्षिण अमेरिकेमध्ये करायचं आहे असं सांगितलं, आणि या प्रकल्पांची देखरेख करण्यासाठी आपल्याला जो विश्वासू माणूस लागेल, तो कुठे मिळेल असं झुकर्सला विचारलं. झुकर्सनेही स्वतःचं नाव लगेचच सांगितलं नाही.
त्याक्षणी कुन्झल उठला, “ मी निघतो. तुम्ही खूप कामात असणार. तुम्हाला त्रास देण्यासाठी माफ करा.”
झुकर्सही उठला आणि त्याने कुन्झलला थांबवलं, “अजिबात नाही. मला तुमच्या या प्रकल्पामध्ये रस आहे. तुम्ही पुढच्या वेळी याल तेव्हा माझ्या घरी या!” कुन्झलला तेच हवं होतं. झुकर्स त्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी एखाद्या संधीच्या शोधात होता. ती संधी म्हणजे आपण आहोत हे त्याच्या मनावर ठसवण्यात आपण यशस्वी झालो आहोत अशी कुन्झलची खात्री पटली होती. मासा गळाला लागला होता, किंवा निदान गळाभोवती घिरट्या घालत होता. आता दोर हळूहळू खेचणं हे अत्यंत कौशल्याचं काम होतं.
त्याच रात्री आपल्या खोलीतून कुन्झलने इझराईलला एक गुप्त संदेश पाठवला – झुकर्सचे दिवस मोजायला सुरुवात झालेली आहे.
झुकर्सनेही त्या रात्री आपल्या डायरीमध्ये त्याला ज्यांच्यापासून धोका आहे, त्यांच्या यादीत एक नाव लिहिलं – अँटन कुन्झल.
एका आठवड्यानंतर कुन्झल झुकर्सला भेटायला त्याच्या घरी आला. झुकर्सचं घर साओ पावलोच्या मध्यमवर्गीय भागात होतं. घर जरी साधं असलं तरी त्याच्याबाजूचा आणि खुद्द घरामधला बंदोबस्त अत्यंत कडेकोट आहे, हे कुन्झलला समजून चुकलं. त्याला झुकर्सला तसंही त्याच्या घरात आणि त्याच्या कुटुंबीयांसमोर मारायचं नव्हतंच. झुकर्सने कुन्झलला संपूर्ण घर दाखवलं आणि आपला शस्त्रांचा खाजगी संग्रहदेखील. “स्वतःचं संरक्षण कसं करायचं ते मला माहित आहे,” तो कुन्झलला हसतहसत म्हणाला. त्याच्यामागची गर्भित धमकी कुन्झलला जाणवली. पण त्याने आपला चेहरा निर्विकार ठेवला.
यानंतर एका आठवड्याने झुकर्सचा कुन्झलला अचानक फोन आला. झुकर्सने त्याला ब्राझीलमधल्या एका ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या अभयारण्यात दोन दिवसांच्या सहलीवर यायचं आमंत्रण दिलं होतं. हे एवढं अचानक घडलं की कुन्झलला इझरेली वकिलातीत किंवा इतर कोणाशीही संपर्क साधून स्वतःच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही उपाययोजना करायला वेळ मिळाला नाही.
दोघेही या सहलीवर गेले. झुकर्स प्रचंड खुशीत होता. कुन्झल तितकाच हादरला होता. आपण या सहलीवरून जिवंत परत येत नाही, झुकर्स बहुतेक आपल्याला या सहलीत संपवणार असं त्याला वाटायला लागलं होतं. पण झुकर्ससमोर त्याला तसं वागताही येत नव्हतं.
या सहलीदरम्यान अचानक झुकर्सला कुन्झलची नेमबाजी किती चांगली आहे ते बघायची लहर आली. त्याने कुन्झलला तसं आव्हान दिलं. त्याला बहुतेक कुन्झलचा रशियन आघाडीवर लढल्याचा दावा तपासून पाहायचा होता. सुदैवाने कुन्झल एक उत्कृष्ट नेमबाज होता, त्यामुळे तो झुकर्सची खात्री पटवू शकला. त्याला त्याच वेळी ठार मारावं असा विचार कुन्झलच्या मनात आला होता, पण तो ब्राझीलच्या ज्या भागात होता, त्याची त्याला काहीच माहिती नव्हती. शिवाय झुकर्सच्या कुटुंबियांना तो कुठे आणि कोणाबरोबर गेलाय हे माहित असणारच होतं. त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली असती आणि कुन्झल पकडला गेला असता, तर सगळंच मुसळ केरात गेलं असतं.
याच सहलीदरम्यान अजून एक प्रसंग घडला. संध्याकाळची वेळ होती. कुन्झल आणि झुकर्स एका भल्या मोठ्या शेतजमिनीला लागून असलेल्या घनदाट जंगलात होते. झुकर्स पूर्वी कधीतरी इथे शिकारीसाठी आला होता, असं त्याने कुन्झलला सांगितल्यावर कुन्झलचं विचारचक्र चालू झालं. कोणाची शिकार? ब्राझीलमध्ये नदीतल्या मगरींच्या कातडीला प्रचंड मागणी असल्यामुळे तशा मगरींची शिकार करायचा झुकर्सचा विचार होता. कुन्झलने हे ऐकल्यावर त्याच्या मनात भीती दाटून आली. बहुतेक आपल्याला मारून आणि मगरींना खायला घालून पुरावा नष्ट करायचा झुकर्सचा डाव असावा. पण तो महत्प्रयासाने शांत राहिला. शक्यतो झुकर्सच्या बाजूने किंवा पाठी चालायचा तो प्रयत्न करत होता. अचानक त्याच्या बुटात एक अणकुचीदार दगड घुसला. त्या दगडाने कुन्झलच्या बुटाचा एक खिळा निघाला आणि त्याने कुन्झलला दुखापत झाली.
पुढे चालणाऱ्या झुकर्सच्या जेव्हा हे लक्षात आलं, तेव्हा त्याने आपल्या खिशातून पिस्तुल काढलं. झालं, संपलं आता - कुन्झलच्या डोक्यात विचार आला. तो पूर्णपणे निःशस्त्र होता. त्याच्याबरोबर असलेल्या माणसाने पूर्वी अनेकांना मारलं होतं. अजून एकाला मारायला त्याला विचार करावा लागला नसता. त्याच्या पायाला दुखापत झाल्यामुळे त्याला पळून जाणंसुद्धा शक्य नव्हतं.
पण झुकर्सने ते पिस्तुल कुन्झलच्या हातात दिलं, “ याच्या दस्त्याने तो खिळा बुटामध्ये नीट ठोक,” तो म्हणाला.
त्या रात्री ते दोघेही तंबूमध्ये झोपले. झुकर्सने त्याच्या उशीखाली पिस्तुल
ठेवल्याचं कुन्झलने पाहिलं. ऐन मध्यरात्री झुकर्स आपल्या उशीखालचं पिस्तुल
काढतोय हे त्याला दिसलं. त्याचा श्वास रोखला गेला, पण कुन्झल पिस्तुल घेऊन
बाहेर लघुशंकेला गेलेला पाहिल्यावर त्याचा जीव भांड्यात पडला.
दुसऱ्या दिवशी जेव्हा ते परत साओ पावलोला परत गेले, तेव्हा कुन्झलने सुटकेचा निःश्वास सोडला.
पुढचा आठवडा कुन्झलने झुकर्सला जवळजवळ दररोज भेटून साओ पावलोमधल्या वेगवेगळ्या रेस्तराँ, बार्स आणि नाईटक्लब्जमध्ये जायचा सपाटा लावला. झुकर्सची या सगळ्या ठिकाणी जाताना होणारी अधाशी नजर त्याने बरोब्बर हेरली होती. एकेकाळी, जेव्हा झुकर्सचा व्यवसाय चांगला चालत होता, तेव्हा अशा ठिकाणी जाणं हे त्याच्यासाठी काही विशेष नव्हतं. पण आता त्याची आर्थिक स्थिती ढासळलेली होती. त्यामुळे आता या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी अप्राप्य झाल्या होत्या.
त्याच्या पुढच्या आठवड्यात कुन्झलने झुकर्सला उरुग्वेची राजधानी माँटेव्हिडिओला बोलावलं. त्याच्या कंपनीला साओ पावलोमधली ऑफिसेस खूप महाग वाटली होती आणि त्यामुळे तुलनेने स्वस्त असलेल्या माँटेव्हिडिओमध्ये आपलं ऑफिस असावं असा त्यांचा विचार आहे असं कारण कुन्झलने दिलं होतं.
झुकर्सला संशय येऊ नये म्हणून कुन्झल स्वतः आधी तिथे गेला. आता या मोहिमेमधली सर्वात महत्वाची वेळ आली होती. जर झुकर्स माँटेव्हिडिओला आला नसता, तर या सगळ्या योजनेवर आणि मेहनतीवर पाणी पडलं असतं. झुकर्ससुद्धा द्विधा मनःस्थितीत होता. त्याच्या कुटुंबियांचं आणि पोलिसांचंही त्याने जाऊ नये असंच म्हणणं होतं. शेवटी आपल्या जुन्या संपन्न आयुष्याकडे जाण्याची संधी सोडता कामा नये असा विचार करून झुकर्स माँटेव्हिडिओला आला. कुन्झलच्या आणि इतर इझरेली एजंट्सच्या डोक्यावरचं मोठं दडपण दूर झालं होतं. ऑफिससाठी जागा पाहण्याच्या नावाखाली कुन्झलने झुकर्सचं चांगलंच आदरातिथ्य केलं. आठवडा संपल्यावर आपल्याला युरोपमध्ये परत जावं लागेल असं सांगून कुन्झल माँटेव्हिडिओहून व्हिएन्ना आणि तिथून पॅरिसला गेला आणि झुकर्स ब्राझीलला परत गेला.
पॅरिसमध्ये कुन्झल आणि यारीव्ह यांनी झुकर्सच्या मृत्यूची योजना आखायला सुरुवात केली. झुकर्सला माँटेव्हिडिओमध्येच उडवावं या मुद्द्यावर दोघांचं एकमत होतं. त्याचं मुख्य कारण म्हणजे उरुग्वेमध्ये मृत्युदंड नव्हता आणि ब्राझीलमध्ये होता. झालंच तर ब्राझीलमध्ये स्थानिक पोलिस झुकर्सच्या बाजूचे होते. उरुग्वेमध्ये तसं काही नव्हतं. शिवाय, उरुग्वेमध्ये ज्यूंची संख्या अगदीच कमी होती, आणि फॅसिस्ट संघटनादेखील नव्हत्या. त्यामुळे झुकर्सच्या मृत्यूनंतर ज्यूंना त्रास झाला नसता. ब्राझीलमध्ये ज्यू भरपूर होते आणि फॅसिस्ट आणि नवनाझी संघटनादेखील होत्या.
झुकर्सला मारण्यासाठी जी टीम यारीव्हने बनवली होती, त्यात पाच एजंट्सचा समावेश होता. यारीव्ह स्वतः या टीमचा प्रमुख होता. बाकीचे सदस्य होते – झीव्ह अमित (मोसाद संचालक मायर अमितचा पुतण्या), अॅरी कोहेन, एलीझेर शॅरॉन आणि अँटन कुन्झल उर्फ यित्झाक सारीद. कुन्झलप्रमाणे शॅरॉनकडेही ऑस्ट्रियन पासपोर्ट होता आणि त्याच्यावर त्याचं नाव होतं ओस्वाल्ड टॉसिग.
या टीमचे सगळे सदस्य उरुग्वेमध्ये वेगवेगळ्या मार्गाने आले. सर्वात
पहिल्यांदा टॉसिग आला. त्याने एक हिरवी फोक्सवॅगन गाडी भाड्याने घेतली आणि
कासा क्युबेर्तिनी हे घरही भाड्याने घेतलं. हे घर कारास्को या गजबजलेल्या
भागात होतं. यारीव्हने त्याच्यावर अजून एक जबाबदारी सोपवली होती –
झुकर्सच्या मापाची शवपेटी बनवून घ्यायची.
सगळे येऊन पोहोचल्यावर कुन्झलने झुकर्सला परत एकदा माँटेव्हिडिओला यायचं
आमंत्रण दिलं. झुकर्सने परत एकदा पोलिसांचा आणि त्याच्या कुटुंबियांचा
सल्ला घेतला. सर्वांचं मत यावेळीही तेच होतं – त्याने जाऊ नये. त्याच्या
जीवाला धोका असू शकतो. गेल्या वेळी तो नशिबाने वाचला. या वेळी कदाचित असं
होणार नाही.
शेवटी झुकर्सने जाण्याचा निर्णय घेतला. आपण स्वतःची काळजी घेऊ शकतो याबद्दल त्याला विश्वास होताच. शिवाय कुन्झल हा आपले जुने आणि चांगले दिवस परत येण्याच्या मार्गावरची एक शिडी आहे याबद्दल त्याची आता खात्री पटली होती आणि आपल्या भीतीपायी एवढी चांगली संधी हातची जाऊ द्यायला झुकर्स तयार नव्हता.
२३ फेब्रुवारी १९६५ या दिवशी झुकर्स माँटेव्हिडिओच्या विमानतळावर विमानातून उतरला. कुन्झल त्याच्या स्वागतासाठी गाडी घेऊन तिथे गेला होता. झुकर्सला संशय येऊ नये म्हणून कासा क्युबेर्तिनीकडे येण्याआधी कुन्झलने झुकर्सला ऑफिससाठी पाहून ठेवलेल्या दोन-तीन जागांवर नेलं आणि तिथल्या लोकांशी झुकर्सची ओळख कंपनीच्या दक्षिण अमेरिका ऑपरेशन्सचे प्रमुख अशी करून दिली. झुकर्सही त्यामुळे खुश झाला आणि थोडा सैलावला.
शेवटी साधारण संध्याकाळी ५.३० च्या सुमारास दोघेही कासा क्युबेर्तिनीपाशी आले. टॉसिगची हिरवी फोक्सवॅगन तिथे उभी होती आणि तिचे सगळे दरवाजे आणि काचा बंद होत्या. याचा अर्थ टीमचे सगळे सदस्य आत घरात होते आणि कुन्झलची आणि त्यांच्या शिकारीची वाट पाहात होते. बाजूच्या घरामध्ये दुरूस्तीचं काम चालू होतं. तिथल्या कामगारांच्या ठोकाठोकीचा एकसुरी आवाज येत होता.
दरवाजा उघडून कुन्झल आत गेला आणि तोपर्यंत प्रवासाने आणि नंतरच्या फेरफटक्याने थोडा दमलेला झुकर्स आत आला. तो आत येण्याचीच वाट पाहात असलेल्या कुन्झलने ताबडतोब दरवाजा बंद केला.
आतमधलं दृश्य मोठं विलक्षण होतं. यारीव्ह, कोहेन, अमित आणि शॅरॉन हे चौघेही तिथे अंधारात उभे होते. प्रत्येकाच्या अंगावर फक्त एक अर्धी चड्डी होती. झुकर्स सहजासहजी स्वतःला मारू देणार नाही, थोडीतरी झटापट होणारच आणि त्यात कपडे रक्ताने खराब होऊ नयेत हा यामागचा हेतू होता.
झुकर्सला काही कळून त्याने दरवाज्याकडे वळायच्या आत चौघांनी त्याच्यावर
झडप घातली. अमितने त्याचा गळा धरला, यारीव्हने तोंडावर हात दाबून धरले आणि
बाकीच्या दोघांनी त्याचे दोन्हीही हात धरायचा प्रयत्न केला.
झुकर्स त्यावेळी ६५ वर्षांचा होता, पण तो फिट होता आणि स्वतःच्या जीवासाठी
लढत होता. त्याने प्रतिकार केला. एका बाजूला तो दरवाज्याकडे झेपावत होता
आणि दुसऱ्या बाजूला त्याचे हात धरणाऱ्या माणसांना ढकलत होता. यारीव्हने
त्याच्या तोंडावर दाबून धरलेल्या हाताला तो जोरात चावला. यारीव्ह वेदनेने
कळवळत मागे झाला आणि त्याने झुकर्सच्या तोंडावरचा हात काढून घेतला. याच
दरम्यान कुन्झलने त्याच्या सुटाच्या खिशातून एक उझी मशीनपिस्तुल काढलं आणि
त्याला सायलेन्सर लावून झुकर्सच्या डोक्यात दोन गोळ्या झाडल्या.
झुकर्सचं शरीर एकदम ढिलं पडलं. त्याच्या डोक्यातून आणि शरीरावर झालेल्या इतर जखमांतून वाहणारं रक्त, त्याच्याशी झुंजणाऱ्या टीमच्या सदस्यांच्या अंगाला लागलेलं रक्त असा एकच चिखल तिथे झाला होता. त्यातल्या त्यात कुन्झलच्या अंगावर स्वच्छ कपडे होते. त्याने बाहेर जाऊन बागेत असलेल्या मोठ्या नळाला एक होजपाईप जोडला आणि जिथे जिथे रक्ताचे डाग पडले होते ते भाग धुवून काढले.
यारीव्हच्या मूळ योजनेनुसार ते झुकर्सला बंदी बनवणार होते आणि त्याला त्याच्यावरचे आरोप ऐकवणार होते. तो कशासाठी आणि कुणाच्या हातून मरतोय हे त्याला समजायला पाहिजे अशी त्यांची इच्छा होती. पण त्यांनी झुकर्सच्या शारीरिक ताकदीचा बांधलेला अंदाज सपशेल चुकल्यामुळे हे होऊ शकलं नाही. पण झुकर्स मरण पावल्यामुळे ही मोहीम यशस्वी झाली असं म्हणता येत होतं.
झुकर्सचा मृतदेह एजंट्सनी शवपेटीत ठेवला. त्याला उरुग्वेच्या बाहेर घेऊन जायची त्यांची योजना असावी असा पोलिसांचा समज व्हावा यासाठी हे केलं गेलं.
त्यानंतर त्यांनी तिथे एक टंकलिखित पत्र ठेवलं. त्याचा मजकूर साधारण असा होता – या माणसाने, ज्याचं नाव हर्बर्ट्स झुकर्स आहे, त्याने २५,००० पेक्षा जास्त ज्यूंची सामुहिक हत्या केलेली आहे. त्यामुळे त्याला ‘जे कधीही विसरणार नाहीत’ अशा लोकांनी ही मृत्यूदंडाची शिक्षा दिलेली आहे. पत्रावर त्याच दिवशीची – २३ फेब्रुवारी १९६५ ही तारीख होती.
बाजूच्या घरात चालू असलेल्या ठोकाठोकीमुळे आणि रस्त्यावरच्या वाहतुकीच्या आवाजामुळे कोणाचंही त्यांच्याकडे लक्ष गेलेलं नव्हतं.
सगळ्या एजंट्सनी त्याच दिवशी उरुग्वेहून चिले आणि तिथून अमेरिकेत आणि तिथून युरोपच्या दिशेने प्रस्थान केलं. ते सुरक्षित असल्याची खात्री पटल्यावर एका मोसाद एजंटने २७ फेब्रुवारी १९६५ या दिवशी der Spiegel या जर्मन नियतकालिकाच्या ऑफिसमध्ये निनावी फोन करून ही बातमी दिली.
झुकर्सच्या मृत्यूनंतर उरुग्वे आणि ब्राझील या दोन्ही देशांमधल्या पोलिसांनी अँटन कुन्झलचं झुकर्सच्या कॅमेऱ्यातल्या फिल्मवर असलेलं छायाचित्र सगळीकडे जारी केलं. झुकर्सच्या कुटुंबाची कुन्झलच खुनी आहे याबद्दल इतकी खात्री होती, की त्यांनी ब्राझीलमधल्या कोर्टात कुन्झलला इझराईलमधून प्रत्यार्पित करावं याबद्दल याचिका दाखल केली, जी यथावकाश पुराव्याअभावी फेटाळण्यात आली.
झुकर्सला मारण्याचा मूळ उद्देश अपेक्षेपेक्षा जास्त सफल झाला. पश्चिम जर्मनी, ऑस्ट्रिया, फ्रान्स आणि इटली या देशांनी दुसऱ्या महायुद्धापूर्वी आणि युद्धादरम्यान झालेल्या नाझी अत्याचारांबद्दल जे खटले चालवले जातील, त्यांच्यावर कोणतीही कालमर्यादा असणार नाही, हे स्पष्ट केलं आणि ही कालमर्यादा निश्चित करणारी विधेयकं मागे घेण्यात आली. त्यामुळेच क्लाउस बार्बीसारख्या क्रूरकर्म्यांवर १९८० च्या दशकातही खटला दाखल होऊ शकला.
क्रमशः
संदर्भ –
१. Gideon’s Spies - by Gordon Thomas
२. Mossad – the Greatest Missions of the Israeli Secret Service – by Michael Bar-
Zohar and Nissim Mishal
३. History of Mossad – by Antonella Colonna Vilaci
४. The Israeli Secret Services – by Frank Clements
काही प्रताधिकारमुक्त फोटो -

हर्बर्ट्स झुकर्स
फ्रेडरिक जेकेल्न
अँटन कुन्झल उर्फ यित्झाक सारीद
मोसाद - भाग १०
एप्रिल १९७५. बैरुट, लेबेनॉन. जगातल्या सर्वात सुंदर स्त्रीचं तिथल्या एका पार्टीमध्ये आगमन झालं होतं. पहिली लेबनीज मिस युनिव्हर्स जॉर्जिना रिझ्क. १९७१ मध्ये अमेरिकेमध्ये मायामी येथे झालेल्या स्पर्धेत तिने हा किताब जिंकला होता. आता चार वर्षांनी लेबेनॉनमध्ये ती अत्यंत यशस्वी मॉडेल बनली होती. मॉडेलिंगबरोबरच तिने सौंदर्यप्रसाधनांचा व्यवसायही सुरु केला होता आणि तोही अत्यंत यशस्वी झाला होता. याच पार्टीमध्ये तिची ओळख एका देखण्या अरब तरुणाबरोबर झाली. ही पार्टी एका मोठ्या बंगल्याच्या विस्तीर्ण प्रांगणात होती. पार्टीमध्ये हास्यविनोदात गुंग असलेल्या जॉर्जिनाला या बंगल्याच्या समोर असलेल्या एका उंच इमारतीच्या खिडकीमधून थोडीशी बाहेर आलेली दुर्बीण दिसू शकत नव्हती.
दुर्बिणीमागच्या माणसाला तसाही तिच्यात रस नव्हताच. त्याचं लक्ष तिच्याशी गप्पा मारणाऱ्या त्या अरब तरुणाकडे होतं. गेली तीन वर्षे हा दुर्बिणीमागचा माणूस आणि त्याचे सहकारी या तरुणाच्या शोधात होते, आणि तो आता असा अनपेक्षितपणे समोर आला होता.
त्या माणसाने त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या दुसऱ्या माणसाला त्या तरुणाचे मिळतील तेवढे फोटो काढून ठेवायला सांगितलं आणि एक फोन केला. पलीकडून फोन उचलला गेल्यावर त्याने त्या तरुणाबद्दल सांगितलं.
“तुझी खात्री आहे?”
“शंभर टक्के,” तो माणूस म्हणाला.
“ठीक आहे,” पलीकडचा आवाज म्हणाला, “त्याच्यावर लक्ष ठेवा आणि आम्हाला कळवत राहा!”
या दुर्बिणीमागच्या माणसाने परत दुर्बिणीतून बघायला सुरुवात केली. जॉर्जिनाने त्या तरुणाला चांगलीच भुरळ घातलेली दिसत होतं. तो तिला अगदी एक क्षणसुद्धा सोडायला तयार नव्हता. तीही त्याच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित झाल्यासारखी वाटत होती.
पार्टी संपण्याच्या सुमारास ती आणि तो तिच्या कारच्या दिशेने जाताना या दुर्बिणीमागच्या माणसाने पाहिलं, आणि आपल्या एका सहकाऱ्याला इशारा केला. हा सहकारी इमारतीच्या गॅरेजमध्ये जाऊन तिथल्या एका गाडीमध्ये तयारीत बसला. जॉर्जिना आणि तो तरुण यांना घेऊन जाणारी जॉर्जिनाची गाडी रस्त्यावरून पुढे जाताच ही गाडी तिच्या पाठोपाठ जाऊ लागली. पण जॉर्जिना आणि तो तरुण कुठेतरी गायब झाले.
या घटनेनंतर साधारण २ वर्षांनी – जून १९७७ मध्ये मोसादच्या लंडन स्टेशनमध्ये एक पत्र आलं. पत्र पाठवणाऱ्याने स्वतःचं नाव, पत्ता वगैरे काहीही लिहिलं नव्हतं. पत्राच्या पाकिटात एक फोटो आणि एक लग्नाची निमंत्रणपत्रिका होती. फोटो आणि ही निमंत्रणपत्रिका पाहून मोसादचे लंडनमधले ऑफिसर्स स्तंभित झाले. फोटोमध्ये वधुवेशातल्या जॉर्जिनाबरोबर तोच देखणा तरुण वर म्हणून उभा होता आणि निमंत्रणपत्रिकेत त्याचं नावही लिहिलेलं होतं – अली हसन सलामेह.
गेली पाच वर्षे मोसाद सलामेहच्या मागावर होते. स्पष्टपणे सांगायचं तर ५ सप्टेंबर १९७२ पासून.
५ सप्टेंबर १९७२ च्या पहाटे, साधारण साडेचार वाजता ८ पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी पश्चिम जर्मनीमधल्या म्युनिक शहरातील ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंची राहायची व्यवस्था असणाऱ्या ऑलिंपिक व्हिलेजमध्ये प्रवेश केला आणि इझरेली खेळाडूंच्या निवासस्थानावर हल्ला केला. कुस्ती संघाचा प्रशिक्षक मोशे वाईनबर्गने त्यांचा रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला. त्याला आणि जो रोमानो नावाच्या वेटलिफ्टरला त्यांनी ठार केलं. काही इझरेली खेळाडू खिडक्यांमधून पळून जाण्यात यशस्वी झाले. पण एकूण ९ खेळाडूंना या दहशतवाद्यांनी ओलिस ठेवलं.
जर्मनीच्या दृष्टीने ही फार मोठी आपत्ती होती. इझराईलमधल्या बहुसंख्य ज्यूंना जर्मनी म्हटलं की एकच गोष्ट आठवत असे – नाझी. नाझींनी युरोपमधल्या ज्यूंवर केलेल्या अत्याचारांना जेमतेम २५ वर्षे होऊन गेली होती. अजूनही जखमा भरून आलेल्या नव्हत्या. १९३६ च्या बर्लिन ऑलिंपिकनंतर ३६ वर्षांनी जर्मनीने ऑलिंपिकचं आयोजन केलेलं होतं आणि इझराईलने या ऑलिंपिकमध्ये सहभागी व्हावं असा जर्मनीचा पहिल्यापासून प्रयत्न होता. इझराईल आणि जर्मनी यांचे आंतरराष्ट्रीय संबंध जरी असले तर ज्यू खेळाडूंनी जर्मनीच्या भूमीवर, तेही एकेकाळी नाझीवादाचं माहेरघर असणाऱ्या म्युनिकमध्ये होत असलेल्या ऑलिंपिकमध्ये सहभागी होणं या गोष्टीला फार सखोल अर्थ होता. खुद्द इझराईलमध्ये खेळाडूंनी ऑलिंपिकमध्ये सहभागी होऊ नये असा मतप्रवाह होता. पण शेवटी सगळ्या वाटाघाटींना यश येऊन इझरेली खेळाडू जर्मनीत दाखल झाले होते. आणि आता ही घटना घडली होती.
जर्मन पोलिस, पत्रकार, छायाचित्रकार आणि टेलिव्हिजन कॅमेरे यांचं घटनास्थळी आगमन झालं आणि संपूर्ण जगाने, इतिहासात पहिल्यांदा एका दहशतवादी हल्ल्याचं थेट प्रक्षेपण बघायला सुरुवात केली. हे प्रक्षेपण बघणाऱ्या लोकांमध्ये एक होत्या इझराईलच्या पंतप्रधान गोल्डा मायर. त्यांच्यासमोर बिकट परिस्थिती होती. हा हल्ला इझराईलच्या मित्र देशात झाला होता आणि खेळाडूंना दहशतवाद्यांच्या तावडीतून सोडवण्याची जबाबदारी जर्मनीची होती. इझरेली सरकारने जर्मनीच्या बव्हेरिया राज्याच्या सरकारला केलेली मदतीची विनंती – ज्यात इझरेली कमांडो दल सायारेत मत्कालला म्युनिकमध्ये पाठवण्याची योजना होती – बव्हेरियन सरकारने नम्रपणे पण ठामपणे फेटाळली होती आणि या खेळाडूंना सोडवण्याची खात्रीही दिली होती. पण जर्मनीकडे अशा स्वरूपाच्या हल्ल्याला तोंड देणारी यंत्रणा नव्हती. त्यांच्या GSG या कमांडो युनिटला पुरेसा अनुभवही नव्हता.
अतिरेक्यांबरोबर चालू असलेल्या वाटाघाटी संपूर्ण दिवसभर लांबल्या आणि दहशतवादी आणि ओलिस खेळाडू म्युनिक शहराच्या बाहेर असलेल्या फुर्स्टनफेल्डब्रूक विमानतळावर गेले. दहशतवाद्यांना जर्मनीच्या बाहेर पडण्यासाठी विमान देण्यात येईल अशी हमी जर्मन सरकारने दिली होती. प्रत्यक्षात विमानतळावर त्यांनी या दहशतवाद्यांना उडवण्यासाठी सापळा लावला होता आणि दुर्दैवाची गोष्ट ही की तो अजिबात विचारपूर्वक लावलेला नव्हता. दहशतवाद्यांची खात्री पटावी म्हणून एक जुनं लुफ्तान्सा विमान रनवेच्या मध्यभागी आणून ठेवण्यात आलं होतं आणि विमानतळाच्या इमारतीच्या छतावर स्नायपर्स ठेवण्यात आले होते पण त्यांना स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या नव्हत्या.
दहशतवाद्यांपैकी एकजण जेव्हा विमानाची पाहणी करायला आला, तेव्हा रिकामं विमान पाहून त्याला संशय आला आणि या फसवणुकीचं प्रत्युत्तर म्हणून त्यांनी ग्रेनेड फेकले आणि गोळीबाराला सुरुवात केली. त्यात जो गोंधळ उडाला, त्यात सर्वच्या सर्व ओलिस खेळाडू, एक जर्मन पोलिस ऑफिसर आणि ५ दहशतवादी मारले गेले. त्यात त्यांचा प्रमुख ‘ इसा ‘ चाही समावेश होता. बाकीच्या ३ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली पण नंतर लुफ्तान्साच्या एका विमानाचं अपहरण झालं, तेव्हा प्रवाशांच्या मोबदल्यात या तिघा दहशतवाद्यांना सोडून द्यावं लागलं.
हा सगळा रक्तपात मोसाद संचालक झ्वी झमीर विमानतळाच्या कंट्रोल टॉवरमधून असहाय्यपणे पाहात होता. त्याला तिथे जर्मन सरकारला सल्ला देण्यासाठी म्हणून पंतप्रधान गोल्डा मायर यांनी पाठवलं होतं. प्रत्यक्षात जर्मन सरकारने झमीरची एकही सूचना ऐकली नाही. पण मोसादचे एजंट्स गप्प बसले नव्हते. या हल्ल्याला कोण जबाबदार आहे हे त्यांनी त्या दिवसभरात शोधून काढलं होतं. हे नाव होतं ब्लॅक सप्टेंबर.
१९७० च्या सप्टेंबरमध्ये जॉर्डनचा राजा हुसेनने आपल्या सैनिकांना पूर्णपणे मोकळीक देऊन हजारो पॅलेस्टिनी दहशतवाद्यांचा संहार केला. या दहशतवाद्यांनी त्यावरून आपल्या एका अत्यंत गुप्त आणि कडव्या संघटनेला हे नाव दिलं होतं. १९६७ च्या सहा दिवसांच्या युद्धानंतर इझराईलने सिनाई द्वीपकल्प, गाझा, वेस्ट बँक आणि गोलान टेकड्या एवढा विस्तीर्ण प्रदेश आपल्या नियंत्रणाखाली आणला आणि तिथे राहणाऱ्या पॅलेस्टिनी लोकांनी, ज्यात अनेक दहशतवाद्यांचाही समावेश होता – जॉर्डनमध्ये आश्रय घेतला. त्यांच्याकडे असलेल्या शस्त्रांमुळे लवकरच ते राहात असलेल्या भूभागावर त्यांची अप्रत्यक्ष सत्ता प्रस्थापित झाली. हळूहळू त्यांनी जॉर्डनच्या राजवटीला आव्हान द्यायला सुरुवात केली. शेवटी राजा हुसेनने आपल्या लष्कराला या दहशतवाद्यांविरुद्ध कारवाईचे आदेश दिले. ही तारीख होती १७ सप्टेंबर १९७०. जॉर्डेनियन लष्कराला हेच हवं होतं. त्यांनी सर्व विधिनिषेध गुंडाळून या पॅलेस्टिनींवर हल्ला चढवला. त्यांच्या वस्तीमधल्या प्रत्येक रस्त्यावर, घरात घुसून – जिथे मिळेल तिथे सैनिकांनी पॅलेस्टिनींना ठार केलं. त्यांच्यातल्या काही जणांनी इझराईल – जॉर्डन सीमारेषेवर असलेल्या विस्थापित शिबिरांमध्ये आश्रय घेतला. जॉर्डेनियन लष्कराच्या तोफखान्याने या शिबिरांना चारी बाजूंनी वेढा घालून त्यांच्यावर तोफगोळ्यांचा मारा केला आणि ही विस्थापित शिबिरं पूर्णपणे उध्वस्त केली. हजारो पॅलेस्टिनी ठार झाले. जे सुदैवी होते, ते सीरिया आणि लेबेनॉनमध्ये पळून जाण्यात यशस्वी झाले.
त्यावेळी पॅलेस्टिनी अरबांच्या दोन प्रमुख दहशतवादी संघटना कार्यरत होत्या – यासर अराफतची अल फताह आणि जॉर्ज हबाशची Popular Front for Liberation of Palestine किंवा पीएफएलपी. मारले गेलेले बहुसंख्य पॅलेस्टिनी हे फताहचे सहानुभूतीदार होते. त्यांच्या हत्येमुळे फताहला मोठा धक्का बसला होता. त्यामुळे सूड घेण्यासाठी अराफतने एक नवीन आणि अत्यंत गुप्त संघटना निर्माण केली. या संघटनेबद्दल फताहमध्येही खूप कमी लोकांना माहित होतं. अराफतने मुद्दामच तसं केलं होतं, जेणेकरून या नवीन संघटनेच्या कारवायांशी फताहचा संबंध कोणीही जोडू शकणार नाही. या संघटनेचं नाव ठेवण्यात आलं ब्लॅक सप्टेंबर. अराफतने या संघटनेचा प्रमुख म्हणून आपल्या विश्वासू साथीदाराची – अबू युसुफची निवड केली आणि तिच्या गुप्त कारवाया पार पाडणारा ऑपरेशन्स चीफ म्हणून एका अत्यंत कडव्या आणि लढाऊ वृत्तीच्या तरुणाची निवड केली. त्याचं नाव होतं अली हसन सलामेह. १९४८ च्या इझराईल – पॅलेस्टाईन युद्धात पॅलेस्टिनी सैन्याचा सुप्रीम कमांडर असलेल्या आणि त्या युद्धात मारल्या गेलेल्या हसन सलामेहचा मोठा मुलगा.
ब्लॅक सप्टेंबरच्या सुरुवातीच्या कारवायांकडे मोसादने दुर्लक्ष केलं कारण या कारवाया प्रामुख्याने जॉर्डनविरुद्ध होत्या. त्यांनी जॉर्डनच्या राष्ट्रीय विमानसेवेच्या रोम ऑफिसवर बॉम्बहल्ला करून ते उध्वस्त केलं, जॉर्डनच्या पॅरिसमधल्या दूतावासावर हल्ला केला, एका जॉर्डेनियन विमानाचं अपहरण केलं आणि पाच जॉर्डेनियन एजंट्सना जॉर्डनची राजधानी अम्मानमध्ये ठार मारलं. त्यांनी जॉर्डनविरुद्ध केलेलं सर्वात भयानक कृत्य म्हणजे जॉर्डनचा माजी पंतप्रधान वस्फी अल-ताल याची कैरो शेरेटनच्या लॉबीमध्ये दिवसाढवळ्या केलेली हत्या.
एवढं झाल्यावर सलामेहने थांबायचा निर्णय घेतला. शेवटी काहीही झालं तरी जॉर्डन हा त्यांचा शत्रू नव्हता. त्यांचा शत्रू होता इझराईल. आणि ५ सप्टेंबर १९७२ या दिवशी घडलेलं अपहरण नाट्य आणि हत्याकांड हा सलामेहने आपल्या प्रच्छन्न शत्रूविरुद्ध केलेला एक जबरदस्त प्रहार होता. या हत्याकांडानंतर सलामेहला त्याचं टोपणनाव मिळालं – रेड प्रिन्स. त्याच्या रक्तपिपासूपणामुळे हे नाव अगदी समर्पक होतं.
----------------------------------------------------------------------------------------------------------
ऑक्टोबर १९७२ च्या पहिल्या आठवड्यात मोसाद संचालक झ्वी झमीर आणि
पंतप्रधानांचा सुरक्षा सल्लागार अॅहरॉन यारीव्ह हे दोघेही पंतप्रधान गोल्डा
मायरना भेटले. इझराईल अशा प्रसंगात हातावर हात धरून गप्प बसू शकत नाही
यावर तिघांचंही एकमत होतं. हे कृत्य घडवून आणणाऱ्या ८ दहशतवाद्यांपैकी ५ जण
जर्मनीतच ठार झाले होते. उरलेले तिघं जर्मनांच्या अटकेत होते. पण त्यांना
मारून किंवा आइकमनप्रमाणे इझराईलमध्ये आणून, खटला भरून शिक्षा देणं यात
मोसादला अर्थ वाटत नव्हता. जर या दहशतवाद्यांना धडा शिकवायचा असेल, तर
त्यांच्या भाषेतच त्यांना उत्तर दिलं पाहिजे याची जाणीव पंतप्रधानांना
होती. त्याचबरोबर त्यांना इझराईल हा एक लोकशाही देश आहे आणि सरकार आपल्या
कृतीसाठी नेसेटला आणि लोकांना जबाबदार आहे याचीही त्यांना कल्पना होती.
त्यामुळे त्यांनी मोसादच्या कारवाईवर लक्ष ठेवण्यासाठी तीन सदस्यांची एक
समिती बनवली. त्यात स्वतः पंतप्रधानांशिवाय संरक्षणमंत्री मोशे दायान आणि
उपपंतप्रधान यिगाल आलोन यांचा समावेश होता. निरपराध माणसांच्या केसालाही
धक्का लागता कामा नये यावर या समितीचं लक्ष असणार होतं. त्यानुसार झमीर आणि
यारीव्ह यांनी बनवलेली कुठलीही योजना या समितीपुढे सादर होणार होती आणि जर
या समितीने त्याला मंजुरी दिली, तरच त्यावर अंमलबजावणी होणार होती.
झमीर आणि यारीव्ह यांच्या योजनेनुसार म्युनिकमध्ये प्रत्यक्ष उत्पात
करणाऱ्या दहशतवाद्यांऐवजी त्यांच्या मागे असणाऱ्या आणि त्यांना सूचना
देणाऱ्या नेत्यांना संपवायचं होतं. कुठल्याही दहशतवादी हल्ल्याचं प्रमुख
उद्दिष्ट असतं लोकांच्या मनात भीती निर्माण करणं. मोसादला तीच भीती
दहशतवाद्यांच्या मनात निर्माण करायची होती. या ऑपरेशनचं नाव होतं राथ ऑफ
गॉड.
सीझरिआ या मोसादमधल्या ऑपरेशन्स विभागाकडे या मोहिमेची जबाबदारी सोपवण्यात आली. संपूर्ण मोहिमेचा सूत्रधार होता माईक हरारी. रफी एतानचा पट्टशिष्य असणारा हरारी युरोपमधल्या कुठल्याही शहरात सहज वावरू शकत असे. ब्लॅक सप्टेंबरचे बहुतेक सगळे वरिष्ठ नेते म्युनिक हत्याकांडानंतर युरोपमध्ये विखुरले होते आणि त्यांना तिथेच संपवायची मोसादची योजना होती. हरारीची नेमणूक त्या दृष्टीने महत्वाची होती.
हरारीने सहा एजंट्सची एक टीम तयार केली होती. या टीम ची जबाबदारी होती संशयितांना हेरणं, त्यांच्याबद्दल सर्व माहिती गोळा करणं आणि ते खरोखरच दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होते याची खात्री करून घेणं. त्यामुळे संशयित माणूस ज्या शहरात असेल तिथे येणं; त्या माणसाला शोधणं; त्याच्या मागावर राहून त्याचे फोटो काढणं; त्याच्या सवयी जाणून घेणं; त्याचे मित्र, तो कुठल्या हॉटेल्स आणि बार्समध्ये नियमाने जातो हे शोधणं – ही त्यांची जबाबदारी होती.
अजून एक टीम घरं आणि गाड्या भाड्याने घेण्याचं काम करत असे. एक टीम त्या संशयित माणसाच्या शहरात असलेलं मोसादचं तात्पुरतं हेडक्वार्टर्स आणि इझराईल यांच्यात संपर्क ठेवण्याचं काम करत होती.
त्या संशयित माणसाची प्रत्यक्ष हत्या करणारी टीम सर्वात शेवटी त्या शहरात येणार होती. प्रत्येक माणसाला कसं मारायचं यावरून या टीममधले लोक ठरत असत. यातले सर्वजण हे सीझरिआच्या एका खास विभागातले होते. या विभागाचं नाव होतं किडॉन. हिब्रू भाषेत या शब्दाचा अर्थ होतो बंदुकीची संगीन. त्यांना त्यांचं ‘ काम ‘ झाल्यावर कुठलाही पुरावा न सोडता निसटता यावं म्हणून एक बॅकअप टीम गाड्या आणि शस्त्रं घेऊन तयार राहणार होती. हत्येचं वेळापत्रक अशा प्रकारे आखलं गेलं होतं, की किडॉन टीमने आपलं काम करण्याआधी संशयित माणसाचा माग काढणारी टीम देश सोडून गेलेली असली पाहिजे, आणि संपर्क सांभाळणारी टीम काम झाल्यावर देश सोडून जाणार होती – जेणेकरून ज्या देशात हे काम होणार होतं, तिथल्या सुरक्षा यंत्रणेला संशय येऊ नये.
मोसादने निवडलेलं पहिलं शहर होतं रोम.
मोसादच्या टेहळणी करणाऱ्या टीमने राथ ऑफ गॉड ची सुरुवात करण्यासाठी निवडलेला पहिला माणूस होता वाएल झ्वेतर. तो रोममधल्या लीबियन दूतावासात भाषांतरकार म्हणून महिन्याला १०० लीबियन दिनार एवढ्या तुटपुंज्या पगारावर काम करत होता. पण रोममधल्या साहित्यिक वर्तुळात त्याची उठबस होती. तिथे त्याला सगळेजण इटालियन आणि ग्रीक साहित्य अरेबिकमध्ये भाषांतरित करणारा अव्वल दर्जाचा अनुवादक म्हणून ओळखत असत. त्याची खरी ओळख – ब्लॅक सप्टेंबरच्या रोम ऑफिसचा प्रमुख – कोणालाच माहित नव्हती. मोसादला त्याचा पत्ता त्याने इझराईलविरुद्ध केलेल्या एका अयशस्वी ऑपरेशनमुळे लागला होता. त्याने रोममध्ये सुट्टी घालवण्यासाठी आलेल्या दोन इंग्लिश तरुणींना हेरलं. त्या रोममधून पुढे इझराईल आणि तिथून जेरुसलेमला जाणार होत्या. झ्वेतरने दोन देखण्या पॅलेस्टिनी तरुणांना त्यांच्याबरोबर ‘ मैत्री ‘ करण्यासाठी पाठवलं. त्यांची चांगली मैत्री झाली. त्या दोघी जेव्हा इझराईलला जायला निघाल्या, तेव्हा एका तरुणाने त्यांना एक छोटा टेपरेकॉर्डर दिला आणि तो वेस्ट बँक भागात राहणाऱ्या त्याच्या कुटुंबाकडे भेट म्हणून पोचवायला सांगितलं. या मुलींनीही होकार दिला. झ्वेतरने या टेपरेकॉर्डरमध्ये स्फोटकं भरली होती. एल अॅल च्या ज्या विमानातून या दोघी तेल अवीवला जाणार होत्या, त्याचा स्फोट घडवून आणायची झ्वेतरची योजना होती. सुदैवाने असं काही घडू शकेल असा विचार एल अॅलच्या सुरक्षाव्यवस्थेने केला होता आणि विमानात सामान ठेवण्याचा जो भाग होता, त्याच्याभोवती एखाद्या चिलखताप्रमाणे अभेद्य आवरण घालण्यात आलं होतं. या टेपरेकॉर्डरचा ठरल्या वेळी स्फोट झालादेखील पण चिलखतामुळे त्याचा परिणाम विमानाच्या बाकीच्या भागांवर झाला नाही. जेव्हा या मुलींना तेल अवीव विमानतळावर अटक करण्यात आली, तेव्हा त्यांनी त्याचा खुलासा केला. त्यावरून मोसादला झ्वेतरचा आणि म्युनिक हत्याकांडामधल्या त्याच्या सहभागाचासुद्धा पत्ता लागला.
टेहळणी करणाऱ्या टीमने झ्वेतरचा अनेक दिवस पाठलाग केला. दोन इझरेली
एजंट्स – एक तरुण आणि एक तरुणी – दररोज वेषांतर करून लीबियन दूतावासावर
लक्ष ठेवत असत आणि झ्वेतरच्या येण्या-जाण्याच्या वेळा, त्याचे सहकारी, तो
जेवायला जात असलेली ठिकाणं – या सगळ्यांची नोंद ठेवत असत. त्यांनी हिरवा
कंदील दाखवल्यावर सायप्रस आणि माल्टा इथून अनेक मोसाद एजंट्स रोममध्ये दाखल
झाले. त्यांच्यातल्या काहींनी गाड्या भाड्याने घेतल्या होत्या आणि
कंपनीच्या काऊंटरवर रोममधल्या वेगवेगळ्या आणि भपकेबाज हॉटेल्सची नावं
सांगितली होती.
१० ऑक्टोबरच्या रात्री झ्वेतर त्याच्या इमारतीमध्ये आला आणि त्याने लिफ्टचा
दरवाजा उघडायला सुरुवात केली. अचानक अंधारातून दोन जण पुढे आले आणि
त्यांनी काहीही न बोलता जवळपास १०-११ गोळ्या त्याच्यावर झाडल्या. एवढं
करायची खरंतर गरज नव्हती, कारण मारेकऱ्यांपैकी एकाने मारलेली पहिलीच गोळी
झ्वेतरच्या डोक्यात लागली होती. पण मोसादला ब्लॅक सप्टेंबरला संदेश द्यायचा
होता, त्यामुळे मारल्या गेलेल्या ११ इझरेली खेळाडूंपैकी प्रत्येकासाठी एक
अशा एकूण ११ गोळ्या झ्वेतरवर झाडण्यात आल्या. सायलेन्सर लावलेला असल्यामुळे
कोणालाही आवाज ऐकू आला नाही.
शांतपणे चालत हे मारेकरी थोड्या दूरवर त्यांनी पार्क केलेल्या गाडीपाशी गेले आणि तिथून सरळ विमानतळावर गेले. झ्वेतरच्या मृत्यूची बातमी दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या शेजाऱ्यांनी पोलिसांना देईपर्यंत ते इझराईलमध्ये परत पोचलेदेखील होते.
फताहला आता झ्वेतरची ओळख लपवून ठेवायची काही गरज नव्हती, त्यामुळे जगभरातल्या वर्तमानपत्रांमध्ये त्याच्यावर अनेक लेख छापून आले. सगळीकडे त्याचा उल्लेख महान क्रांतिकारक आणि पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्यासाठी लढणारा सच्चा सैनिक असा केला होता.
झ्वेतरला पहिली गोळी मारणारा एजंट होता डेव्हिड मोलाद. तो ट्युनिशियन ज्यू होता. त्याच्या लहानपणी त्याचे आईवडील इझराईलमध्ये स्थायिक झाले होते. ट्युनिशिया फ्रेंच साम्राज्याचा भाग असल्यामुळे तिथली प्रमुख भाषा फ्रेंच होती आणि डेव्हिडचे वडील फ्रेंच भाषेचे शिक्षक होते. या पार्श्वभूमीमुळे डेव्हिडला हिब्रूबरोबरच फ्रेंच, इंग्लिश आणि अरेबिक या भाषा अस्खलितपणे बोलता आणि लिहिता येत असत. त्यामुळे या संपूर्ण मोहिमेत त्याच्यावर मोठी जबाबदारी होती. तो फ्रेंच, बेल्जियन, स्विस, कॅनेडियन, अरब, अमेरिकन अशा अनेक प्रकारच्या व्यक्तिमत्वांमध्ये अगदी सहज वावरू शकत असे. रोममधून तेल अवीवला गेल्यानंतर काही दिवसांनीच डेव्हिडला पुढच्या कामगिरीचं बोलावणं आलं. यावेळी शहर होतं पॅरिस.
झ्वेतरच्या मृत्यूनंतर उडालेला धुरळा शांत व्हायच्या आत मोसादने पुढच्या शिकारीकडे नजर वळवली होती. पण आता कामगिरी कठीण होती. रोमची गोष्ट वेगळी होती. इटालियन गुप्तचर संघटना आणि मोसाद यांच्यात सुरुवातीपासून सहकार्य होतं. शिवाय जोपर्यंत मोसाद कुणा इटालियन नागरिकाला हात लावत नाही, तोपर्यंत इटालियन गुप्तचर संघटनेला फरक पडत नव्हता. फ्रान्समध्ये याआधीच बेन बार्का प्रकरणावरून मोसादबद्दल प्रतिकूल मत होतं आणि फ्रान्सच्या SDECE या गुप्तचर संघटनेच्या कार्यक्षमतेबद्दल मोसादला शंका नव्हती. त्यामुळे त्यांनी थोडी वेगळी पद्धत वापरायचं ठरवलं.
एके दिवशी सकाळी पॅरिसच्या १७५, रू अलेशिया या पत्त्यावर असलेल्या घरातला फोन खणखणला. घराच्या मालकाने फोन उचलला. पलीकडून आवाज आला – “ मला पी.एल.ओ. (Palestine Liberation Organization) चे पॅरिसमधले प्रतिनिधी डॉ. मेहमूद हमशारी यांच्याशी बोलायचं आहे.” फोन स्वतः हमशारीनेच उचलला होता. फोन करणारा माणूस इटालियन पत्रकार होता आणि त्याचा पॅलेस्टाईनच्या संपूर्ण स्वातंत्र्याला पाठिंबा होता. त्याच अनुषंगाने त्याला हमशारीची मुलाखत घ्यायची होती. दोघांनी एका कॅफेमध्ये भेटायचं ठरवलं. हा कॅफे हमशारीच्या घरापासून लांब होता.
झ्वेतरप्रमाणेच हमशारीचा एखाद्या दहशतवादी संघटनेशी संबंध असेल अशी कोणालाही शंका आली नसती. तो इतिहासकार आणि लेखक म्हणून प्रसिद्ध होता आणि आपल्या फ्रेंच पत्नी आणि मुलीसमवेत पॅरिसच्या उच्च मध्यमवर्गीय भागात राहत होता. पण मोसादला काही गोष्टी समजलेल्या होत्या. इझराईलचे माजी पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियन यांच्यावर १९६९ मध्ये डेन्मार्कमध्ये झालेल्या प्राणघातक हल्ल्यामागे हमशारीचा हात होता. १९७० मध्ये इझराईलचं हवाई हद्दीत झालेल्या स्विसएअरच्या विमानाच्या स्फोटातही त्याचा हात होता. आणि सर्वात महत्वाचं – हमशारीची नुकतीच यासर अराफतने पी.एल.ओ.च्या संपूर्ण युरोप विभागाच्या उपप्रमुखपदावर नेमणूक केलेली होती.
त्या दिवशी जेव्हा तो त्या इटालियन पत्रकाराला भेटायला बाहेर पडला, तेव्हा त्याची पत्नीही बाजारहाट करायला बाहेर पडली. त्याची मुलगी शाळेत गेलेली होती. घरात कोणीही नव्हतं. दोघाजणांनी त्याच्या घरात प्रवेश केला आणि जवळपास १५-२० मिनिटांनी ते बाहेर पडले.
दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याची पत्नी मुलीला शाळेत सोडायला म्हणून बाहेर पडली, तेव्हा त्याला फोन आला. त्या इटालियन पत्रकाराचाच होता.
“डॉ. हमशारी?”
“बोलतोय.” आणि पुढे त्याने काही शब्द उच्चारायच्या आत प्रचंड मोठा स्फोट झाला. त्याच्या घरात ज्या टेबलवर फोन ठेवला होता, त्याच्या खाली स्फोटकं दडवलेली होती. स्फोटात हमशारी प्राणांतिक जखमी झाला आणि काही दिवसांनी हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्युपूर्व जबानीत त्याने मोसादच आपल्या मृत्यूला जबाबदार असल्याचं अगदी ठामपणे सांगितलं होतं.
हमशारीच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी माईक हरारी आणि जोनाथन इंगेल्बी
नावाचा अजून एक एजंट सायप्रसमध्ये आले. भूमध्य समुद्रात अगदी मोक्याच्या
ठिकाणी असल्यामुळे आणि इझराईल, सीरिया, लेबेनॉन आणि इजिप्त यांना बऱ्यापैकी
जवळ असल्यामुळे अनेक वेळा इझरेली एजंट आणि अरब दहशतवादी सायप्रसमध्ये
समोरासमोर आलेले होते. हरारी आणि इंगेल्बी यांचं लक्ष्य होता हुसेन अब्द अल
हीर. तो फताहचा सायप्रसमधला प्रतिनिधी होता, आणि अराफतने त्याची नेमणूक
एका खास कामासाठी केलेली होती. पश्चिम युरोपात त्यावेळी काही गुन्हेगारी
संघटना आणि काही फुटीरतावादी संघटना कार्यरत होत्या. यांच्यात प्रमुख
होत्या आयर्लंडमधली आयरिश रिपब्लिकन आर्मी उर्फ आय.आर.ए., जर्मनीमधली
बाडर-माईनहॉफ गँग, इटलीमधली रेड ब्रिगेड ही कम्युनिस्ट दहशतवादी संघटना आणि
स्पेनमधली बास्क प्रांताच्या स्वातंत्र्यासाठी लढणारी सी.सी.सी. ही
क्रांतिकारक संघटना. या संघटनांना सोविएत रशियाची सक्रीय मदत, अगदी
शस्त्रास्त्रं आणि प्रशिक्षणासकट मिळत असे. गेली काही वर्षांमध्ये या
संघटनांमध्ये यासर अराफतची अल फताह आणि जॉर्ज ह्बाशची पी.एफ.एल.पी यांचाही
समावेश झाला होता. पण रशियाच्या के.जी.बी.चे लोक कधीही उघडपणे असली कामं
करत नसत. ते झेकोस्लोव्हाकिया, पूर्व जर्मनी, हंगेरी वगैरे रशियाच्या अंकित
देशांच्या गुप्तचर संघटनांचा वापर करायचे. त्यात आता अजून एक नाव समाविष्ट
झालं होतं, ते म्हणजे कर्नल गद्दाफीचा लीबिया. रशियन शस्त्रांचा मोठा
खरेदीदार असलेल्या लीबियामधून फताहला मदत मिळत होती आणि त्यावर देखरेख
करणारा माणूस होता अल हीर. कुणाला संशय येऊ नये म्हणून तो सायप्रसमधून आपलं
काम करत असे.
म्युनिक हत्याकांडात वापरलेली शस्त्रं ही अल हीरच्याच मध्यस्थीने ब्लॅक
सप्टेंबर दहशतवाद्यांना मिळालेली होती अशी मोसादला पक्की खबर होती आणि
त्यामुळेच त्यांनी अल हीरचा काटा काढायचा ठरवलं होतं.
त्या दिवशी रात्री जेवण झाल्यानंतर अल हीर हॉटेलच्या बागेत फेरफटका मारत होता, आणि इंगेल्बी आणि हरारी त्याच्यावर लक्ष ठेवून होते. तो त्याच्या खोलीत गेला आणि कपडे बदलून पलंगावर लवंडला आणि एक-दोन क्षणांतच घोरायला लागला. एका तासाने, तो गाढ झोपलेला आहे याची खात्री पटल्यावर इंगेल्बीने आपल्या जवळच्या रिमोट कंट्रोलचं बटन दाबलं. एक कानठळ्या बसवणारा स्फोट झाला आणि अल हीरचं शरीर छिन्नविछिन्न झालं.
हे सगळं चालू असताना ब्लॅक सप्टेंबर आणि सलामेह गप्प बसलेले नव्हतेच.
२६ जानेवारी १९७३ या दिवशी स्पेनची राजधानी माद्रिदमधल्या होजे अँटोनियो स्ट्रीटवर असलेल्या मॉरिसन पब नावाच्या एका पबमध्ये मोशे इशाई नावाचा एक इझरेली ज्यू एका पॅलेस्टिनी माणसाला भेटला. जेवण संपवून दोघेही निघत असताना दोघेजण अचानक त्यांच्या समोर आले आणि त्यांनी इशाईचा रस्ता अडवला. तो पॅलेस्टिनी माणूस पळून गेला आणि त्या मारेकऱ्यांनी इशाईला गोळ्या घातल्या आणि ते अदृश्य झाले.
नंतर हे उघड झालं की इशाईचं खरं नाव होतं बरुच कोहेन. तो मोसादचा एजंट होता आणि फ्रान्स, स्पेन आणि पोर्तुगालमध्ये शिक्षण घेणाऱ्या पॅलेस्टिनी विद्यार्थ्यांचं नेटवर्क उभारण्याची कामगिरी त्याच्यावर सोपवण्यात आली होती. त्या पॅलेस्टिनी माणसाला तो याच संदर्भात भेटला होता. हा माणूस ब्लॅक सप्टेंबरचा हेर होता आणि त्याला कोहेनला फसवून त्या पबमध्ये आणण्याच्या कामासाठीच वापरण्यात आलं होतं.
कोहेनच्या पाठोपाठ ब्लॅक सप्टेंबरने मोसादचा बेल्जियममधला एजंट झादोक ओफिर आणि लंडनमधल्या इझरेली राजदूतावासातला वरिष्ठ अधिकारी डॉ. अमी शेचोरी यांना आपलं लक्ष्य बनवलं.
मोसादने प्रत्युत्तर म्हणून अल हीरच्या जागी आलेल्या फताह प्रतिनिधीला तो सायप्रसमध्ये आल्यानंतर २४ तासांत उडवलं. यावेळी फक्त हॉटेल वेगळं होतं, पण पद्धत तीच होती.
अराफत आणि सलामेह, दोघेही सूडाच्या इच्छेने वेडेपिसे झाले होते. त्यांनी आता एकदम मोठ्या प्रमाणावर याचा बदला घ्यायचं ठरवलं. या योजनेनुसार ब्लॅक सप्टेंबरचे आत्मघातकी दहशतवादी एका विमानाचं अपहरण करून, त्याच्यात स्फोटकं भरून ते विमान इझराईलची राजधानी तेल अवीवमध्ये मध्यवर्ती भागात नेऊन उडवून देणार होते. (२८ वर्षांनी ओसामा बिन लादेनच्या अल कायदाने असंच करून वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ट्विन टॉवर्सना उध्वस्त केलं. अजून एक योगायोग म्हणजे ही घटना सप्टेंबरमध्ये – ११ सप्टेंबरला घडली.)
मोसादचे अंडरकव्हर एजंट्स फताहमध्ये होते. त्यांना या कटाचा वास
लागल्यावर त्यांनी मोसादला याची खबर दिली. या कटाची मुख्य सूत्रं पॅरिसमधून
हलवली जात असल्याचं मोसादला समजलं होतं. कदाचित सलामेह तिथे असेल या
कल्पनेने अनेक मोसाद एजंट्स वेगवेगळ्या पासपोर्टवर आणि वेगवेगळी नावं आणि
वेश घेऊन पॅरिसमध्ये आले.
एका रात्री या एजंट्सपैकी एका गटाला एक मध्यमवयीन माणूस या संशयित
दहशतवाद्यांसमवेत दिसला. त्या गटातल्या एकाकडे बऱ्यापैकी आधुनिक कॅमेरा
होता. तो वापरून त्याने या मध्यमवयीन माणसाचा फोटो काढला आणि तेल अवीवला
पाठवला. चोवीस तासांच्या आत या गटाला त्या माणसावर लक्ष ठेवण्याच्या सूचना
मिळाल्या. त्याचं नाव होतं बेसिल अल कुबैसी. झ्वेतर आणि हमशारीप्रमाणे अजून
एक बुद्धिवंत आणि दहशतवाद समर्थक. तो चक्क कायद्याचा प्राध्यापक होता,
तेही बैरुटमधल्या अमेरिकन विद्यापीठात. पण हा त्याचा संभावित चेहरा होता.
१९५६ मध्ये त्याने इराकचा राजा फैजलची हत्या करायचा प्रयत्न केला होता.
फैजलच्या शाही काफिल्याच्या मार्गात त्याने बॉम्ब आणि भूसुरुंग पेरून ठेवले
होते. यातल्या एका बॉम्बचा वेळेआधी स्फोट झाला आणि कुबैसीचं नाव उघडकीस
आलं. तो इराकमधून पळून लेबेनॉन आणि तिथून अमेरिकेत गेला.
काही वर्षांनी कुबैसीने त्यावेळी इझराईलच्या परराष्ट्रमंत्री असलेल्या गोल्डा मायरच्या हत्येचा प्रयत्न केला होता. त्या त्यावेळी अमेरिकेच्या दौऱ्यावर होत्या. त्यात अयशस्वी झाल्यावर त्याने परत एकदा पॅरिसमध्ये भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेच्या अधिवेशनात गोल्डा मायरच्या हत्येचा प्रयत्न केला. तोही अयशस्वी झाला. कुबैसीने त्यानंतर बैरुटमध्ये अमेरिकन विद्यापीठात शिकवायला सुरुवात केली, आणि जॉर्ज हबाशच्या पी.एफ.एल.पी मध्ये तो भरती झाला. हबाश आणि त्याचे सहकारी कट्टर मार्क्सिस्ट होते आणि चे ग्वेव्हाराचे समर्थक होते. त्यांना पॅलेस्टाईनमध्ये कम्युनिस्ट राजवटीची स्थापना करायची होती. त्यामुळे कुबैसी आणि त्यांचे मतभेद झाले आणि कुबैसी तिथून बाहेर पडून फताहसाठी काम करायला लागला. म्युनिक हल्ल्याच्या कटात तो सहभागी असल्याचा पुरावा मोसादला मिळाल्यावर त्यांनी त्याचीही त्याच्या इतर सहकाऱ्यांप्रमाणेच हत्या करायचं ठरवलं. म्युनिक हत्याकांडातल्या दहशतवाद्यांना पासपोर्ट, जर्मन व्हिसा आणि इतर कागदपत्रं कुबैसीने पुरवली होती.
६ एप्रिल १९७३ या दिवशी रात्रीचं जेवण करून कुबैसी त्याच्या हॉटेलकडे चालला होता. वाटेत प्लेस दे ला मेडेलिन या ठिकाणी मोसादचे लोक त्याची वाट पाहात थांबले होते. टेहळणी करणाऱ्या टीम्सपैकी एक टीम गाडीमध्ये बसून रस्त्याकडे लक्ष ठेवून होती तर दुसरी टीम स्त्रियांच्या वेशात रस्त्यावर उभी होती. कुबैसीने टॅक्सीचे पैसे दिले आणि तो चालत मोसाद एजंट्सच्या दिशेने यायला लागला. तेही तयारीत होतेच, एवढ्यात एक अनपेक्षित घटना घडली. एक एकदम झगमगीत गाडी कुबैसीच्या दिशेने आली आणि त्याच्यापाशी येऊन थांबली. एका सुंदर स्त्रीने दरवाजा उघडला. कुबैसी तिच्याशी काहीतरी बोलला आणि गाडीत बसून निघून गेला.
काय झालं ते मोसाद एजंट्सच्या लगेचच लक्षात आलं. ती स्त्री एक कॉलगर्ल होती आणि कुबैसीने तिच्याबरोबर ‘ भेट ‘ ठरवलेली होती. सगळेजण वैतागले. पण तिथे हजर असलेल्या डेव्हिड मोलादने प्रत्येकाला शांत केलं. ती त्याला इथे परत घेऊन येईल असं तो म्हणाला. हे त्याला कसं माहित असा प्रश्न एका एजंटने विचारला. त्यावर मोलादचं उत्तर होतं – अर्धा तास थांब.
खरोखरच अर्ध्या तासाने तीच गाडी तिथे परत आली आणि कुबैसी त्यातून उतरल्यावर निघून गेली. तो त्याच्या हॉटेलच्या दिशेने तीन-चार पावलं चालला असेल-नसेल, तेवढ्यात अंधारातून दोघेजण त्याच्या समोर आले. हादरलेल्या कुबैसीने मागे पाहिलं. त्याचा रस्ता अजून दोघांनी अडवला होता. समोरून आलेल्या दोघांमधला एक डेव्हिड मोलाद होता. कुबैसीने काहीही बोलायच्या आत ११ गोळ्यांनी त्याच्या शरीराची चाळणी केली.
दुसऱ्या दिवशी, कुबैसीच्या मृत्यूची बातमी सर्वांना समजल्यावर पी.एफ.एल.पी आणि फताह या दोन्हीही संघटनांच्या प्रवक्त्यांनी त्याला श्रद्धांजली वाहिली आणि त्याच्या ‘ कामांबद्दल ’ गौरवोद्गार काढले.
पुढच्या काही महिन्यांमध्ये मोलाद आणि त्याच्या सहकाऱ्यांनी ब्लॅक सप्टेंबरच्या दहशतवाद्यांना सळो की पळो करून सोडलं. ग्रीसमध्ये जहाजं विकत घेऊन त्यांच्यात सायप्रसमध्ये स्फोटकं भरून ती इझराईलच्या एलात आणि अश्दोद या बंदरांमध्ये नेऊन तिथे स्फोट करून ही दोन्हीही बंदरं निकामी करायची आणि इझराईलची आर्थिक कोंडी करायची एक धाडसी योजना सलामेहने आखली होती, पण मोसादने फताहमध्ये घुसवलेल्या अंडरकव्हर एजंट्समुळे मोसादला या कटाबद्दलही समजलं आणि किडॉन टीमने ग्रीसमध्येच जहाज विकत घ्यायला आलेल्या लोकांना उडवलं. त्यामुळे ही योजनाही फसली.
एवढं सगळं झालं तरीही ब्लॅक सप्टेंबरला पूर्णपणे नेस्तनाबूत करणं मोसादला अजून जमलं नव्हतं, आणि त्याचं कारण म्हणजे आली हसन सलामेह अजून जिवंत होता. त्याला मारल्याशिवाय ब्लॅक सप्टेंबरचं कंबरडं मोडणं आपल्याला शक्य होणार नाही, हे मोसादला कळून चुकलं. पण सलामेह कुठे होता, ते कुणालाच माहित नव्हतं. आपल्या जीवाला धोका आहे आणि आपण जिथे कुठे असू, तिथे मोसाद आपल्याला मारण्याचा प्रयत्न करणार हे सलामेहलाही माहित होतं. त्यामुळे तो भूमिगत झाला होता, आणि आपल्या योजना आखत होता. कुबैसीच्या मृत्यूच्या वेळी तो बैरुटमध्ये होता. त्यानंतर त्याने अजून दोन कारवाया केल्या.
पहिली म्हणजे ब्लॅक सप्टेंबरच्या दहशतवाद्यांनी थायलंडमधल्या इझरेली राजदूतावासाचा ताबा घ्यायचा प्रयत्न केला. पण ही कारवाई अयशस्वी झाली. थाई सेनाधिकाऱ्यांनी दहशतवाद्यांच्या कुठल्याही मागण्या मान्य करण्यास नकार दिला. शिवाय इजिप्तच्या थायलंडमधल्या राजदूताने दहशतवाद्यांवर आणलेल्या दबावामुळे त्यांना सर्व ओलिसांना सोडून देऊन थायलंडमधून पलायन करावं लागलं.
दुसरी कारवाई झाली सुदानची राजधानी खार्टूममध्ये. सलामेहच्या माणसांनी खार्टूममधल्या सौदी अरेबियन दूतावासावर हल्ला चढवला. त्यावेळी तिथे एका युरोपियन प्रतिनिधीच्या निरोप समारंभाच्या निमित्ताने मेजवानी चालू होती. अनेक राजनैतिक अधिकाऱ्यांना ओलिस ठेवण्यात आलं. सलामेहच्या आदेशावरून त्यातल्या सर्वांना सोडून देण्यात आलं – तिघे सोडून. अमेरिकन राजदूत क्लिओ नोएल, खार्टूममधल्या अमेरिकन मिशनचा उपप्रमुख जॉर्ज मूर आणि बेल्जियमचा राजदूत गाय इद. आपल्या रेड प्रिन्स या नावाला जागत सलामेहने या तिघांना अत्यंत भीषण आणि नृशंस पद्धतीने हाल हाल करून मारलं. तिघांचा अपराध एकच होता, तो म्हणजे तिघेही ज्यू होते.
इझराईलसाठी हे आता सहन करण्यापलीकडे गेलं होतं. तेल अवीवमध्ये पंतप्रधान गोल्डा मायर यांनी मोसादला ब्लॅक सप्टेंबरच्या नेतृत्वावर लक्ष केंद्रित करायला सांगितलं. हा मोसादचा ब्लॅक सप्टेंबरवर केलेला निर्णायक हल्ला असणार होता. ऑपरेशन राथ ऑफ गॉड मधला एक महत्वाचा टप्पा. या ऑपरेशनचं नाव ठेवण्यात आलं स्प्रिंग ऑफ युथ आणि याचं प्रमुख लक्ष्य होता अली हसन सलामेह, द रेड प्रिन्स!
क्रमशः
मोसाद - भाग ११
१ एप्रिल १९७३, बैरुट, लेबेनॉन. सँड्स हे बैरुटमधल्या प्रसिद्ध हॉटेल्सपैकी एक. त्या दिवशी सकाळी तिथे नेहमीची लगबग चालू होती, त्यामुळे बेल्जियन पासपोर्ट घेऊन आलेल्या गिल्बर्ट रीम्बो नावाच्या पर्यटकाकडे कुणाचंही जरुरीपेक्षा जास्त लक्ष गेलं नाही. त्याच दिवशी दुपारी डीटर ऑल्टन्यूडर नावाचा जर्मन पर्यटक तिथे आला. तो आणि रीम्बो एकमेकांना बहुतेक ओळखत नव्हते. दोघांनीही खिडकीमधून समुद्र दिसेल अशा खोल्या मागितल्या होत्या, आणि त्या त्यांना मिळाल्याही होत्या.
६ एप्रिल या दिवशी अजून तीन पर्यटक तिथे आले. त्यातला अँड्र्यू विशेलॉ हा पक्का ब्रिटीश होता, अगदी नखशिखांत. त्याच्यानंतर दोन तासांनीच आलेल्या बेल्जियन चार्ल्स ब्युसार्दला इझराईलमध्ये डेव्हिड मोलाद म्हणून लोक ओळखत होते. संध्याकाळी जॉर्ज एल्डर नावाचा अजून एक ब्रिटीश पर्यटक तिथे आला. चार्ल्स मेसी नावाचा अजून एक ब्रिटीश पर्यटकही तिथे आला, पण विचार बदलल्याचं सांगून तो तिथून काही अंतरावर असलेल्या प्रसिद्ध एल बाईदा समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या अॅटलांटिक हॉटेलमध्ये गेला. एखाद्या अस्सल ब्रिटीश माणसाप्रमाणे तो दिवसातून किमान दोन वेळा हवामानाची चौकशी करत असे.
हे सहाजण एकमेकांना अजिबात ओळख न दाखवता बैरूट शहर भटकत होते आणि महत्वाचे रस्ते आणि वाहतुकीची जंक्शन्स लक्षात ठेवत होते. त्यांनी शहर फिरण्यासाठी सहा वेगवेगळ्या गाड्या भाड्याने घेतल्या होत्या.
९ एप्रिल या दिवशी नऊ मिसाइल बोटी आणि गस्ती नौका असा एक मोठा काफिला इझराईलच्या एलात बंदरातून निघाला आणि भूमध्य समुद्रातल्या वर्दळीच्या वाहतुकीतून लेबेनॉनच्या दिशेने सरकू लागला. त्यातल्या एका बोटीवर कर्नल अॅमनॉन लिप्कीनच्या नेतृत्वाखाली जे युनिट होतं, त्यांच्यावर पी.एफ.एल.पी. (Popular Front for Liberation of Palestine) च्या बैरूटमधल्या हेडक्वार्टर्सवर हल्ला करून ते नेस्तनाबूत करायची जबाबदारी होती. दुसऱ्या बोटीवर अजून एक युनिट होतं. या युनिटबरोबर इझरेली स्पेशल फोर्स युनिट सायारेत मत्कालचं एक युनिट होतं. त्याचा प्रमुख होता कर्नल एहूद बराक (जो नंतर इझराईलचा पंतप्रधानही झाला). बराकच्या युनिटकडे वेगळी जबाबदारी होती. युनिटमधल्या प्रत्येकाकडे चार फोटो होते. पहिला होता अबू युसुफ, ब्लॅक सप्टेंबरचा सरसेनापती. दुसरा कमाल अदवान, फताहचा ऑपरेशन्स कमांडर. फताह आणि ब्लॅक सप्टेंबरने इझराईलच्या शहरांत केलेल्या दहशतवादी कारवायांमागे त्याचा हात होता. तिसरा कमाल नासर, फताहचा प्रवक्ता. तिघेही रु वेर्डून नावाच्या रस्त्यावर असलेल्या एका इमारतीत राहात होते. चौथा अली हसन सलामेह. तो कुठे आहे हे मात्र कोणालाही माहित नव्हतं.
लेबेनॉनचा समुद्रकिनारा जसजसा जवळ यायला लागला, तसं या कमांडोनी कपडे बदलले. प्रत्येकाच्या अंगावर हिप्पी वाटावेत असे कपडे होते. एहूद बराकसारखे काहीजण तर चक्क स्त्रियांच्या वेशात होते. त्यांच्या कपड्यांत त्यांनी स्फोटकं लपवली होती.
जेव्हा ते लेबेनॉनच्या किनाऱ्यापासून सुरक्षित अंतरावर पोचले तेव्हा बोटीवरचे रबरी मचवे खाली उतरवले गेले. हे कमांडो त्यात बसले आणि लेबेनॉनच्या किनाऱ्याकडे निघाले. ते तिथे पोचले तेव्हा पूर्ण अंधार पडला होता आणि किनाऱ्यावर ६ गाड्या उभ्या होत्या आणि ड्रायव्हर म्हणून आधी आलेले ६ एजंट्स होते. कमांडो किनाऱ्यावर उतरल्यापासून जेमतेम ५ मिनिटांत या गाड्या आपल्या मार्गाला लागल्या होत्या. त्यातल्या तिन्ही गाड्या पी.एफ.एल.पी. हेडक्वार्टर्सकडे वळल्या आणि उरलेल्या ३ रु व्हेर्डूनच्या दिशेने. यातली एक गाडी डेव्हिड मोलाद चालवत होता.
पी.एफ.एल.पी. हेडक्वार्टर्सकडे जाणाऱ्या कमांडोनी या हल्ल्याची रंगीत तालीम तेल अवीवमधल्या एका अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीमध्ये केली होती. एका रात्री सायारेत मत्काल कमांडर डेव्हिड एलाझार ही तालीम बघायला आला. त्यावेळी या कमांडोपैकी एक लेफ्टनंट अविदा शोर त्याला भेटला आणि त्याने एक सुधारणा सुचवली. आधीच्या योजनेनुसार ही इमारत उध्वस्त करायला १२० किलोग्रॅम्स एवढी स्फोटकं लागणार होती पण शोरच्या योजनेनुसार फक्त ८० किलोग्रॅम्स एवढी स्फोटकं वापरूनही काम झालं असतं. शिवाय बाजूच्या इमारती, जिथे सामान्य लोक राहात होते, त्यांना या हल्ल्याची झळ पोचली नसती. थोडा विचार केल्यावर एलाझारने शोरची योजना मान्य केली.
आता हे कमांडो पी.एफ.एल.पी. च्या इमारतीजवळ पोचले होते. पी.एफ.एल.पी.ने अर्थातच इमारतीभोवती पहारेकरी बसवले होते. त्यांचा अडथळा भेदून आत जाताना दोन इझरेली कमांडोना आपले प्राण गमवावे लागले. त्यातला एक अविदा शोर होता. पण त्याचे सहकारी इमारतीत घुसले आणि त्यांनी तळमजला आणि पहिला मजला इथे स्फोटकं पेरली, ते इमारतीतून बाहेर पडले आणि सुरक्षित अंतरावर जाऊन त्यांनी या सगळ्या स्फोटकांचा एकाच वेळी स्फोट घडवला. ८० किलोग्रॅम्स एवढ्या प्रचंड प्रमाणात स्फोटकं असल्यामुळे ही इमारत पूर्णपणे उध्वस्त झाली आणि आतमध्ये असलेले पी.एफ.एल.पी.चे जवळपास सर्व दहशतवादी मारले गेले. पण बाजूच्या एकाही इमारतीवर ओरखडाही उठला नाही.
त्याच वेळी एहूद बराकचं युनिट रु व्हेर्डूनच्या दिशेने चाललं होतं. फताह किंवा लेबनीज सैन्य या कोणालाही या कारवाईबद्दल संशय येऊ नये म्हणून त्यांची दिशाभूल करण्यासाठी इझरेली कमांडोच्या एका युनिटने बैरूटच्या दक्षिण भागात असलेल्या अनेक दहशतवादी तळांवर हल्ले चढवले. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ना फताहने काही कारवाई केली ना लेबनीज सैन्याने काही प्रतिक्रिया दिली.
इकडे सायारेत मत्काल कमांडो रु व्हेर्डूनपाशी पोचले. ते इमारतीत शिरणार तेवढ्यात दोन लेबनीज पोलिस ऑफिसर्स तिथून गेले. पण त्यांना इझरेली कमांडोऐवजी एकमेकांच्या कमरेत हात घालून चालणारं एक जोडपं दिसलं. त्यातला पुरुष होता मुकी बेत्झर आणि स्त्री होता खुद्द एहूद बराक. ते पोलिस ऑफिसर्स दिसेनासे झाल्यावर कमांडो इमारतीत घुसले. अदवान राहात असलेला फ्लॅट दुसऱ्या मजल्यावर होता, नासरचा फ्लॅट तिसऱ्या आणि अबू युसुफचा फ्लॅट सहाव्या. कमांडोनी एकाच वेळी तिन्ही फ्लॅट्सवर आक्रमण केलं.
अदवान, नासर आणि युसुफ – तिघांनाही कमांडोनी प्रतिकाराची संधीही दिली नाही. स्फोटकं वापरून त्यांच्या फ्लॅट्सचे दरवाजे उखडून टाकून कमांडो आत घुसले आणि त्यांनी सरळ या तिघांवर गोळ्या झाडल्या. तिघेही त्यांच्या शस्त्रांपर्यंत पोचायच्या आत कमांडोच्या गोळ्यांनी त्यांच्या शरीरांची चाळण केली. अबू युसुफच्या पत्नीने त्याच्यावर झाडल्या गेलेल्या गोळ्यांपैकी काही स्वतःवर घेतल्या. अदवानच्या फ्लॅटच्या समोर जो जिना होता त्याच्या बाजूला असलेल्या फ्लॅटमध्ये एक म्हातारी इटालियन स्त्री राहात होती. दुर्दैवाने तिने आपल्या घराचा दरवाजा उघडला आणि गोळीबारात तिचाही मृत्यू झाला.
पुढची १५ मिनिटं कमांडोनी प्रत्येक फ्लॅटची अगदी कसून झडती घेतली आणि
जेवढी मिळतील तेवढी कागदपत्रं गोळा केली आणि ते तिथून निघाले. परत
गाड्यांमध्ये बसून ते किनाऱ्याच्या दिशेने गेले. तिथे त्यांनी बरोबर आणलेले
रबरी मचवे तयारच होते. त्यावर बसून हे कमांडो समुद्रात दूरवर असलेल्या
इझरेली युद्धनौकांच्या दिशेने निघून गेले. हे ६ पर्यटकही त्यांच्याबरोबरच
गेले. जाण्याआधी त्यांनी भाड्याने घेतलेल्या गाड्या नीट ओळीत
समुद्रकिनाऱ्यावर पार्क करून ठेवल्या होत्या. गाड्यांच्या चाव्या
इग्निशनमध्ये होत्या. साधारण एका आठवड्याने ज्या एजन्सीजमधून या गाड्या
भाड्याने घेतल्या गेल्या होत्या त्यांना बैरूटमधल्या अमेरिकन एक्सप्रेस
बँकेच्या नावाने काढलेले चेक्स मिळाले.
ऑपरेशन स्प्रिंग ऑफ युथ यशस्वी झालं. पी.एफ.एल.पी. साठी हा फार मोठा धक्का
होता. त्यांचे १०० हून जास्त दहशतवादी मारले गेले आणि शिवाय हेडक्वार्टर्स
कायमचं उध्वस्त झालं. ब्लॅक सप्टेंबरसाठीसुद्धा हा निर्णायक तडाखा होता.
त्यांचा सर्वोच्च कमांडरच मोसादने टिपला होता, आणि त्याच्या इतर सैनिकांना
संदेश दिला होता – जर तुमचा कमांडर स्वतःला सुरक्षित ठेवू शकत नाही, तर तो
तुम्हाला काय सुरक्षित ठेवेल?
पण त्यांना एक गोष्ट माहित नव्हती. या इमारतीपासून जेमतेम ५० यार्डांवर असलेल्या दुसऱ्या एका इमारतीत पहिल्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटमध्ये अली हसन सलामेह शांतपणे झोपला होता. स्प्रिंग ऑफ युथने जरी ब्लॅक सप्टेंबरवर निर्णायक प्रहार केला असला, तरी ऑपरेशनचं मुख्य लक्ष्य अजूनही साध्य झालेलंच नव्हतं.
ब्लॅक सप्टेंबरच्या तिघा नेत्यांच्या फ्लॅट्समधून जी कागदपत्रं मोसादला मिळाली होती, त्यावरून दोन मोठ्या रहस्यांचा उलगडा झाला. एक म्हणजे ३० मे १९७२ या दिवशी तेल अवीवच्या लॉड एअरपोर्टवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा सूत्रधार कोण आहे. या हल्ल्यात अरब आणि जपानी दहशतवाद्यांनी एअरपोर्टवर आलेल्या प्रवाशांवर अंदाधुंद गोळीबार केला होता आणि पोर्टो रिकोहून आलेल्या आणि जेरुसलेमला जाणाऱ्या एका मोठ्या प्रवासी गटातले जवळपास सर्वजण त्यात ठार झाले होते. हा सूत्रधार होता बेसिल अल कुबैसी. त्याला मोसादने आधीच उडवला होता. दुसरं रहस्य म्हणजे त्याच्या एक वर्ष आधी झालेलं पासओव्हर प्रकरण.
एप्रिल १९७१ मध्ये दोन सुंदर फ्रेंच तरुणी लॉड एअरपोर्टवर उतरल्या. त्या इमिग्रेशनसाठी गेल्या असताना त्यांचे फ्रेंच पासपोर्ट खोटे आहेत हे उघडकीस आलं. दोघींना ताबडतोब अटक करण्यात आली आणि शाबाकच्या स्त्री अधिकाऱ्यांकडून कसून झडती घेण्यात आली. तेव्हा एक चक्रावून टाकणारी गोष्ट आढळली. या तरुणींच्या कपड्यांचं वजन खूपच जास्त होतं. जेव्हा पोलिसांनी आणि शाबाक अधिकाऱ्यांनी या कपड्यांची शिवण उसवली, तेव्हा त्यांना आत एक पांढरी पावडर सापडली. त्यांच्या सँडल्समध्येही ही पावडर होती. दोघींच्या कपड्यांतून आणि इतर वस्तूंमधून तब्बल १२ पाउंड्स एवढ्या वजनाची पावडर सापडली. ही पावडर म्हणजे सेमटेक्स या नावाने प्रसिद्ध असलेलं प्लास्टिक स्फोटक होतं. त्यांच्या अंतर्वस्त्रांमध्ये डेटोनेटर्स लपवलेले होते.
शाबाक अधिकाऱ्यांनी कसून ‘ विचारपूस ’ केल्यावर दोघींनीही कबुली दिली. दोघी बहिणी होत्या आणि एका श्रीमंत मोरोक्कन व्यापाऱ्याच्या मुली होत्या. त्यांची नावं होती नादिया आणि मेडेलिन बार्देली. त्यांना पॅरिसमध्ये एक माणूस भेटला होता, आणि त्याने त्यांना हे काम – इझराईलमध्ये सेमटेक्स पोचवण्याचं – दिलं होतं. दोघीही धाडसी स्वभावाच्या असल्यामुळे त्यांनी ही कामगिरी स्वीकारली होती. त्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी तेल अवीवमधील हॉटेल कमोडोरमध्ये उतरलेल्या पिअर आणि एडिथ बर्गहाल्टर या फ्रेंच जोडप्याला अटक केली.
दुसऱ्या दिवशी या कटामध्ये सहभागी असलेली अजून एक तरुणी लॉड एअरपोर्टवर उतरली. तीही फ्रेंच पासपोर्टवर आली होती. तिच्या पासपोर्टवर जरी फ्रान्सीन अॅडेलिन मारिया असं नाव असलं, तरी मोसादला तिचं खरं नाव – एव्हेलीन बार्जेस – हे माहित होतं. ती पी.एफ.एल.पी. ची सदस्य होती आणि के.जी.बी. ने तिला प्रशिक्षण दिलेलं होतं. इझराईलमध्ये येण्याआधी तिने पश्चिम जर्मनी, स्पेन आणि इटली इथे अनेक घातपाती कृत्यं केली होती.
तिच्याकडून पी.एफ.एल.पी.चा नक्की काय डाव आहे ते मोसादला समजलं. त्यांची तेल अवीवमधल्या नऊ महत्वाच्या हॉटेल्समध्ये स्फोट घडवून पर्यटकांमध्ये दहशत पसरवून इझराईलच्या अर्थव्यवस्थेचं न भरून येणारं नुकसान करायची योजना होती. पण तेव्हा या योजनेचा सूत्रधार कोण आहे हे समजलं नव्हतं. आता या कागदपत्रांनी ते नाव उघड केलं होतं – मोहम्मद बौदिया. अत्यंत रुबाबदार आणि देखणं व्यक्तिमत्व असलेला बौदिया अल्जेरियन होता आणि पॅरिसमध्ये राहात होता. तिथल्या रंगभूमीवर त्याचं अभिनेता आणि निर्माता म्हणून चांगलंच नाव होतं. पण पुन्हा एकदा झ्वेतर आणि हमशारीप्रमाणे हा डॉ.जेकील आणि मि. हाईड असा प्रकार होता. अभिनेता आणि नाट्यनिर्माता हा मुखवटा होता आणि वास्तवात तो अत्यंत घातक असा दहशतवादी होता. एव्हेलीन बार्जेस त्याची प्रेयसी आहे हे मोसादला माहित होतं, पण तो संपूर्ण पासओव्हर प्रकरणाचा सूत्रधार होता हे त्यांना आता समजलं होतं.
एव्हेलीनप्रमाणे बौदियाही कट्टर मार्क्सिस्ट होता, पण पासओव्हर प्रकरणात एव्हेलीनला अटक झाल्यावर त्याने पी.एफ.एल.पी.शी संबंध तोडले आणि तो यासर अराफतच्या फताहसाठी काम करायला लागला. अराफतने त्याच्यावर ब्लॅक सप्टेंबरच्या फ्रान्स आणि स्पेनमधल्या कारवायांची जबाबदारी सोपवली. मोसादचा खबरी असलेल्या खादेर कोनू या सीरियन पत्रकाराच्या हत्येत त्याचा सहभाग होता. व्हिएन्नामध्ये रशियाहून आलेल्या ज्यूंसाठी उभारण्यात आलेल्या एका निवासी शिबिरावर हल्ला झाला होता. त्यातही त्याचा सहभाग होता.
ह्मशारीच्या मृत्यूनंतर बौदिया कमालीचा सावध झाला होता. त्याला शोधणं कठीण होऊन बसलं होतं. मे १९७३ मध्ये मोसादची एक किडॉन टीम पॅरिसमध्ये आली. त्यांनी बौदियाच्या नव्या प्रेयसीचं नाव आणि पत्ता शोधून काढला आणि तिच्या इमारतीच्या जवळ ते दबा धरून बसले. त्यांना बौदिया आत जाताना दिसला. पण तो नक्की कुठल्या फ्लॅटमध्ये गेला, हे त्यांना समजलं नाही. त्यामुळे ते इमारतीत शिरले नाहीत. दुसऱ्या दिवशी सकाळी बौदिया बाहेर आल्यावर त्याचा पाठलाग करायचं त्यांनी ठरवलं. दुसऱ्या दिवशी इमारतीतून अनेक लोक त्यांच्या कामांसाठी बाहेर पडले. बौदिया त्यांच्यामध्ये नव्हताच.
एक महिनाभर एजंट्सनी त्या इमारतीवर पाळत ठेवली आणि बौदिया ज्या फ्लॅटमध्ये गेला होता तो शोधून काढला. वेगवेगळ्या टीम्स हे पाळत ठेवायचं काम करत होत्या. जेव्हा ते आपापले अनुभव सांगण्यासाठी एकत्र भेटले तेव्हा त्यांना एक विलक्षण गोष्ट जाणवली. बौदियाच्या फ्लॅटमधून एक उंच, बांधेसूद स्त्री दररोज बाहेर पडत असे आणि संध्याकाळी परत येत असे. एका गटाने या स्त्रीचं वर्णन करताना तिचे केस सोनेरी आहेत असं म्हटलं. दुसरा गट तिचे केस काळे आहेत यावर ठाम होता. अखेरीस त्यांनी शोधून काढलं की बौदियाच त्याचं वेशभूषेचं कौशल्य वापरून स्त्रीवेशात ये-जा करत होता.
हे समजल्यावर एजंट्सनी त्या फ्लॅटवर हल्ला करायचं ठरवलं पण त्याच दिवशी बौदिया गायब झाला. बहुतेक त्याला संशय आला होता. मोसादकडे आता फक्त एकच धागा होता. बौदिया दररोज आर्क डी त्रायम्फच्या खाली असलेल्या Etoile या मेट्रो स्टेशनवरून पॅरिसच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जात असे. हे स्टेशन पॅरिसमधलं एक महत्वाचं जंक्शन होतं. अनेक ट्रेन्स आणि हजारो लोक तिथून दररोज जात असत. बौदियाला त्या जनसागरात शोधणं कठीण होतं. पण दुसरा पर्याय नव्हता.
गायब झाल्यापासून चार दिवसांनी बौदिया मोसाद एजंट्सना सापडला. त्याने वेषांतर केलं होतं, पण त्याची चालण्याची ढब तशीच होती. त्यावरून त्यांनी त्याला हेरलं आणि आता मात्र एजंट्स त्याच्यापाठी सावलीसारखे लागले. तो ज्या गाडीतून प्रवास करत होता, तिच्यावरही त्यांनी पाळत ठेवली. हा दिवस होता २७ जून १९७३. दुसऱ्या दिवशी बौदिया एका वेगळ्याच पत्त्यावर गेला आणि रात्रभर तो तिथेच राहिला. त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे २९ जून १९७३ या दिवशी सकाळी तो त्या घरातून बाहेर पडला आणि आपल्या गाडीकडे गेला. गाडीत बसण्याआधी त्याने गाडीची तपासणी केली आणि जेव्हा सगळं ठीक आहे याबद्दल त्याचं समाधान झालं तेव्हा तो गाडीचा दरवाजा उघडून ड्रायव्हरच्या जागेवर बसला. त्याच क्षणी एक कानठळ्या बसवणारा स्फोट झाला, बौदियाची गाडी हवेत जवळजवळ ६ फूट उंच फेकली गेली, आणि त्याच्या शरीराचे तुकडेतुकडे झाले. हा स्फोट मोसाद संचालक झ्वी झमीरने समोरच्या फूटपाथवरून पाहिला.
पण हे यश साजरं करायला मोसादला वेळ मिळाला नाही. फताहमधल्या एका अंडरकव्हर मोसाद एजंट्सने एक संदेश पाठवला होता. बेन अमाना नावाचा एक अल्जेरियन ब्लॅक सप्टेंबर सदस्य अली हसन सलामेहला भेटायला युरोपमध्ये येणार होता. तो आणि सलामेह एका वेगळ्याच ठिकाणी भेटणार होते - नॉर्वेमधलं निसर्गरम्य शहर लिलहॅमर.
माईक हरारीच्या नेतृत्वाखाली असलेली किडॉन टीम लिलहॅमरमध्ये येऊन पोचली. सलामेह इथे काय करतोय हा प्रश्न प्रत्येकालाच पडला होता. त्यामुळे त्यांनी बेन अमानाच्या मागावर राहून त्याच्या हालचालींचा छडा लावायचा प्रयत्न करायचं ठरवलं, आणि तीन दिवसांत त्यांना अमाना एका अरबी चेहरेपट्टी असलेल्या एका माणसाबरोबर बोलताना दिसला. तो बरेचवेळा या माणसाबरोबर बोलत होता. मोसाद टीमने त्या माणसाचे अनेक फोटो काढले आणि त्यांच्या टीममधल्या वरिष्ठ लोकांनी तो माणूस अली हसन सलामेहच आहे यावर शिक्कामोर्तब केलं. त्यांच्या एका सहकाऱ्याने या निष्कर्षाला विरोध केला होता. त्याने त्या माणसाला कुणाशी तरी बोलताना ऐकलं होतं आणि त्याच्या मते सलामेह अस्खलित नॉर्वेजियन भाषा बोलणं हे निव्वळ अशक्य होतं. पण या वरिष्ठ नेत्यांनी या सहकाऱ्याच्या विरोधाकडे लक्ष दिलं नाही.
एकदा तो माणूस सलामेह आहे हे निश्चित झाल्यावर मोसाद टीमने त्या माणसाचा पाठलाग करायला सुरुवात केली. त्याला त्याच्या मागावर किती लोक आहेत हे समजणार नाही अशा बेताने त्यांनी त्याच्या प्रत्येक हालचालीची खबर ठेवली. तो दिवसातला बहुतेक वेळ एका गरोदर नॉर्वेजियन स्त्रीबरोबर असायचा.
हे ऑपरेशन जेव्हा शेवटच्या टप्प्यावर आलं, तेव्हा इझराईलहून अनेक एजंट्स तिथे आले. मोसाद संचालक झ्वी झमीरही त्यांच्यात होता. सलामेहच्या मृत्यूने ब्लॅक सप्टेंबरची पाळंमुळं खणली गेली असती यात शंका नव्हती. आणि झमीरला त्या वेळी तिथे असण्याची इच्छा होती. जोनाथन इंगेल्बी, रोल्फ बेहर आणि गेरार्ड एमिल या तिघांवर सलामेहला संपवण्याची जबाबदारी होती. डेव्हिड मोलाद या ऑपरेशन मध्ये सहभागी झाला नव्हता.
आपल्या नेहमीच्या पद्धतीने मोसाद एजंट्सनी गाड्या भाड्याने घेतल्या आणि आजूबाजूच्या प्रदेशाची टेहळणी करायला सुरुवात केली. पुढे जेव्हा या प्रकरणाची चौकशी झाली, तेव्हा अनेकांनी ही मोसादची पहिली चूक झाल्याचं प्रतिपादन केलं. त्यांच्यामते लिलहॅमर हे इतकं छोटं आणि टुमदार शहर होतं, की तिथे प्रत्येकजण एकमेकांना ओळखत होता. अशावेळी अचानक एवढे पर्यटक तिथे येणं आणि गाड्यांमधून इकडे-तिकडे फिरणं या नक्कीच स्थानिक लोकांच्या मनात संशय निर्माण करणाऱ्या गोष्टी होत्या.
२१ जुलै १९७३ या दिवशी सलामेह आणि त्याची गरोदर मैत्रीण एका चित्रपटगृहातून क्लिंट ईस्टवूड आणि रिचर्ड बर्टन यांचा Where Eagles Dare हा चित्रपट बघून बाहेर पडले, बसस्टॉपवर गेले, बस घेतली आणि एका शांत, सुनसान रस्त्यावर उतरले. तिथे ते हातांत हात घालून फिरत असताना अचानक एक पांढरी गाडी त्यांच्यापाशी येऊन थांबली, तिच्यातून तिघेजण उतरले, त्यांनी आपल्या हातातल्या बरेटा आणि उझी पिस्तुलांनी जवळपास १५-२० गोळ्या सलामेहवर झाडल्या. तो जागच्या जागी कोसळला.
ऑपरेशन संपल्यावर माईक हरारी आणि त्याच्या टीममधले इतर लोक त्याच दिवशी लिलहॅमरहून नॉर्वेची राजधानी ऑस्लोला गेले आणि तिथून युरोपमध्ये आणि तिथून इझराईलला निघून गेले. इंगेल्बी आणि इतर दोघे मारेकरीही दुसऱ्या दिवशी निघून गेले. आता फक्त टीमने भाड्याने घेतलेली घरं रिकामी करणारे आणि भाड्याने घेतलेल्या गाड्या परत करणारे लोक उरले होते. तेही तिसऱ्या दिवशी गेले असते, पण एक अनपेक्षित गोष्ट घडली.
मोसाद एजंट्सनी सलामेहवर गोळ्या झाडताना सायलेन्सर वापरला होता, पण त्याला त्यांनी जिथे मारलं, तो भाग इतका शांत होता, की सायलेन्सरमुळे दबलेला गोळ्यांचा आवाजही तिथे जवळच राहणाऱ्या एका स्त्रीला ऐकू आला होता. ती धावत आपल्या घराच्या खिडकीपाशी येईपर्यंत मारेकरी निघून गेले होते, त्यामुळे तिला कोणाचाही चेहरा दिसला नाही, पण तिने मारेकऱ्यांची पांढरी प्युगो गाडी अगदी नीट पाहिली होती, आणि लगेचच पोलिसांनाही कळवलं होतं. पोलिसांनी ताबडतोब नाकाबंदी जारी करून हल्लेखोरांना पकडायचा प्रयत्न केला होता. मारेकऱ्यांची पांढरी प्युगो त्यातून निसटली होती, पण एका तत्पर पोलिस अधिकाऱ्याने तिचा नंबर लिहून घेतला होता.
पुढच्या दिवशी जेव्हा डॅन इर्बेल आणि मारियन ग्लाडनिकोफ हे दोन एजंट्स ही गाडी परत करायला गेले, तेव्हा त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांना अजून दोन एजंट्सचा – सिल्व्हिया राफाएल आणि अॅव्हरम गेमर यांचा पत्ता लागला आणि या दोघांनाही अटक झाली. इर्बेल आणि ग्लाडनिकोफ हे तुलनेने नवखे एजंट्स होते. त्यांनी पोलिसांसमोर तोंड उघडलं आणि या संपूर्ण ऑपरेशनची सारी माहिती पोलिसांना दिली. त्यावरून पोलिसांनी ऑस्लोमधल्या एका घरावर धाड टाकली आणि तिथून अनेक कागदपत्रं हस्तगत केली. तेव्हा इझराईलच्या नॉर्वेमधल्या दूतावासाचा मुख्य सुरक्षा अधिकारी इगाल एयाल हा मोसादचा एजंट आहे आणि ते इझराईलने नॉर्वेच्या सरकारसमोर जाहीर केलेलं नाही, हे उघडकीस आलं, आणि संपूर्ण जगभरात इझराईलची अभूतपूर्व नाचक्की झाली.
दुसऱ्या दिवशी जेव्हा नॉर्वेमधल्या प्रसारमाध्यमांनी या एजंट्सच्या अटकेबद्दल जाहीर केलं, तेव्हा मोसादला कुठेही तोंड दाखवायला जागा राहिली नाही. आत्तापर्यंत मिळवलेला सगळा लौकिक धुळीला मिळाला. आणि त्यात या सगळ्यावर कळस करणारी बातमी जाहीर झाली – ज्याला मोसादने मारलं, तो अली हसन सलामेह नव्हताच. तो अहमद बुशिकी नावाचा मोरोक्कन होता. तो एका रेस्टॉरंटमध्ये वेटर होता. त्याची पत्नी नॉर्वेजियन होती आणि ७ महिन्यांची गरोदर होती आणि तिच्या डोळ्यांदेखत मोसादने तिच्या पतीची हत्या केली होती, तीही केवळ गैरसमजाने. बुशिकीचा सलामेहशी किंवा फताहशी दूरवरचाही काही संबंध नव्हता.
सगळ्या जगभरात या बातम्यांनी प्रचंड खळबळ माजवली. अटक झालेल्या एजंट्सवर नॉर्वेच्या न्यायालयात खटले भरण्यात आले. बऱ्याच एजंट्सना मोठ्या कालावधीच्या शिक्षा झाल्या.
मोसादमध्ये या अपयशाचे परिणाम होणार होतेच. आपल्या संपूर्ण कार्यपद्धतीमध्ये मोसादला आमूलाग्र बदल घडवून आणावा लागला. अहमद बुशिकीच्या पत्नीला ४ लाख डॉलर्स एवढी नुकसानभरपाईही द्यावी लागली. पण सर्वात मोठा परिणाम म्हणजे मोसादची अजिंक्य प्रतिमा आता मलीन झाली. .
पंतप्रधान गोल्डा मायरनी झ्वी झमीरला ऑपरेशन राथ ऑफ गॉड बंद करायचे आदेश दिले. पण मोसादला या अपयशावर विचार करायलाही वेळ मिळाला नाही. ६ ऑक्टोबर १९७३ या दिवशी इजिप्त आणि सीरिया यांनी इझराईलवर अनपेक्षितरीत्या हल्ला चढवला आणि योम किप्पुर युद्धाची सुरुवात झाली.
यानंतर दोन वर्षांनी मोसाद एजंट्सना सलामेह विश्वसुंदरी जॉर्जिना रिझ्कबरोबर दिसला पण तो परत गायब झाला. त्यानंतर परत दोन वर्षांनी मोसादला त्याच्या आणि जॉर्जिनाच्या लग्नाची बातमी समजली.
जॉर्जिनाप्रमाणेच सलामेहच्या व्यावसायिक आयुष्यातही यशश्रीचा प्रवेश झाला होता. १९७३ च्या शेवटी ब्लॅक सप्टेंबर संघटना अराफतने बरखास्त केली, पण सलामेह आता अराफतचा उजवा हात बनला होता. तो आपला दत्तक मुलगा आहे असं अराफतने स्वतः जाहीर केलं होतं. अराफत पी.एल.ओ. आणि फताहमधून निवृत्त झाला, किंवा त्याला काही झालं तर सलामेह त्याची जागा घेणार हे आता सगळ्यांना ठाऊक झालं होतं. सलामेहने फोर्स १७ नावाचं एक दल निर्माण केलं होतं. फताहच्या प्रमुख नेत्यांची सुरक्षा हा या दलाचा एककलमी कार्यक्रम होता. एका अफवेनुसार त्यांना अमेरिकेच्या सीक्रेट सर्व्हिसमधल्या एका निवृत्त एजंटने प्रशिक्षण दिलं होतं. अराफत जेव्हा संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत भाषण देण्यासाठी न्यूयॉर्कला गेला, तेव्हा सलामेह त्याच्याबरोबर होता. तिथून अराफत मॉस्कोला आणि हवानाला गेला, तेव्हा सगळीकडे सलामेह त्याच्याबरोबर होता. एका दहशतवाद्याचा हळूहळू राजनेता बनण्याकडे प्रवास चालू होता आणि मोसादमधले लोक हे सगळं अस्वस्थपणे बघत होते. त्यांना सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला, जेव्हा त्यांना सी.आय.ए.ने सलामेहपुढे मैत्रीचा हात केल्याचं समजलं.
सी.आय.ए. आणि त्यांनी शीतयुद्धाच्या काळात सोविएत रशियाची आणि नंतर अल कायदा, इराण आणि सद्दाम हुसेन यांची नाकेबंदी करण्यासाठी दहशतवादी आणि इतर गुन्हेगारांशी वेळोवेळी बांधलेलं संधान हा मोसादसाठी नेहमीच एक डोकेदुखीचा विषय राहिलेला आहे. ‘ अमेरिकन्स नेहमीच चुकीच्या लोकांबरोबर मैत्री करतात ’ हे इझराईलचे पहिले पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियन यांचं मत होतं. त्यावर अजूनही इझरेली सैन्य आणि मोसाद यांचा दृढ विश्वास आहे. (इराण आणि अमेरिका यांच्यातल्या कराराने इराणवरचे निर्बंध उठवणं ही अमेरिकेची चूक आहे असं जे विद्यमान इझरेली पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांचं म्हणणं आहे त्याला एवढा जुना संदर्भ आहे.) १९७० च्या दशकाच्या शेवटीही त्यात काही फरक पडलेला नव्हता. यावेळी मोसादच्या काळजीचं कारण होतं सी.आय.ए. आणि सलामेह यांच्यातली वाढती जवळीक. तो कम्युनिस्टविरोधी आहे एवढं सी.आय.ए.साठी पुरेसं होतं. त्याने खार्टुममध्ये अमेरिकन राजदूत आणि इतर अधिकाऱ्यांना घातलेल्या कंठस्नानाकडे सी.आय.ए.मुद्दाम दुर्लक्ष करत होते, आणि सलामेहला रशियाविरुद्ध कसा वापरता येईल याचा विचार करत होते. सलामेह आणि जॉर्जिना हवाई बेटांवर सुट्टी घालवत असताना त्याला उडवायची मोसादची योजना होती, पण अमेरिकन भूमीवर असं काही केल्यास परिणाम वाईट होतील अशी सी.आय.ए.कडून तंबी मिळाल्यावर मोसादचा नाईलाज झाला.
सलामेहच्या आयुष्याला आता काहीही धोका नाही असं त्याच्या मित्रांचं म्हणणं होतं, पण स्वतः सलामेहला तसं वाटत नव्हतं. “माझी वेळ आली की मला जावंच लागेल,” त्याने एका मुलाखतीत म्हटलं होतं, “तेव्हा कुणीही मला वाचवू शकणार नाही.”
लिलहॅमरनंतर पाच वर्षांनी परत एकदा सलामेहची फाईल उघडायची वेळ आलेली आहे असं मोसादने ठरवलं. खुद्द इझराईलमध्येही अनेक बदल घडून आलेले होते. गोल्डा मायर निवृत्त झाल्या होत्या. त्यांच्यानंतर आलेल्या यित्झाक राबिन यांनी राजीनामा दिलेला होता, आणि इझराईलच्या इतिहासात पहिल्यांदाच लिकुड या उजव्या विचारसरणी असलेल्या पक्षाचं सरकार इझराईलमध्ये सत्तेवर आलं होतं आणि पंतप्रधान होते मेनॅचम बेगिन. मोसादमध्ये आता झ्वी झमीरच्या जागी नवीन संचालक आलेला होता – यित्झाक होफी. पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनांचा इझराईलविरोधी दहशतवाद अधूनमधून डोकं वर काढत होता. १९७६ मध्ये पी.एफ.एल.पी.च्या दहशतवाद्यांनी एअर फ्रान्सचं विमान त्याचं अपहरण करून युगांडामधील एन्टेबी या ठिकाणी नेलं आणि सायारेत मत्कालच्या कमांडोजनी एका अभूतपूर्व ऑपरेशनमध्ये या विमानाची आणि त्यातल्या प्रवाश्यांची सुटका केली. त्यामुळे मोसादची गेलेली अब्रू परत यायची थोडी शक्यता निर्माण झालेली असतानाच १९७८ ची घटना घडली. फताहचे दहशतवादी इझराईलमध्ये आले, त्यांनी एक प्रवासी वाहतूक करणारी बस ताब्यात घेतली आणि तेल अवीवच्या दिशेने निघाले. ही बातमी तेल अवीवमध्ये पोलिसांना समजल्यावर त्यांनी या बसचा मार्ग रोखला. या अतिरेक्यांची गठडी वळून बसवर परत ताबा मिळवण्यात कमांडोना यश आलं, पण ३५ निरपराध प्रवाश्यांचे प्राण गेले.
पंतप्रधान बेगिन विरोधी पक्षनेते असताना आपल्या कट्टर दहशतवादविरोधी भूमिकेसाठी प्रसिद्ध होते. आता पंतप्रधान झाल्यावर त्यात काहीही बदल झालेला नाही हे दाखवायची वेळ आता त्यांच्यासमोर आली होती. त्यांनी इझराईलच्या जुन्या शत्रूपासून सुरुवात करायचं ठरवलं – अली हसन सलामेह.
लग्न झाल्यानंतर सलामेहच्या आयुष्याला जरा स्थिरता लाभली होती. तो एकेकाळी जगभर फिरत असे, पण सध्या तो जॉर्जिनाच्या शहरात – बैरूटमध्ये होता. पंतप्रधानांकडून सलामेहचा कायमचा काटा काढायच्या मोहिमेला हिरवा कंदील मिळाल्यावर मोसादने एका अंडरकव्हर एजंटला सलामेहच्या मागावर पाठवलं. बैरूटच्या श्रीमंत वस्तीत असलेल्या एका प्रतिष्ठित हेल्थ क्लबमध्ये सलामेह नियमित जात असे. या एजंटने सर्वप्रथम तिथे नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला, पण ते जमलं नाही. तेव्हा त्याने नाव बदलून क्लबचं सदस्यत्व घेतलं. एके दिवशी हा एजंट सौना बाथ घेण्यासाठी क्लबमध्ये गेला असताना तो आणि सलामेह अचानक एकमेकांसमोर आले. हा एजंट आणि सलामेह जवळपास १५ मिनिटं एकमेकांपासून फक्त ४-५ फूट अंतरावर होते. सलामेह संपूर्ण नग्न होता, आणि त्याच्याकडे कोणतंही शस्त्र नव्हतं.
या एजंटने जेव्हा ही बातमी मोसाद हेडक्वार्टर्समध्ये कळवली, तेव्हा तिथे एकच खळबळ माजली. सौना बाथमध्ये नग्नावस्थेत असताना सलामेहला मारणं सहज शक्य आहे असं काहींचं म्हणणं पडलं. पण सलामेहला जराजरी संशय आला असता, तरी त्याने तिथल्या एखाद्या निरपराध माणसाला ढाल बनवून तिथून निसटण्याचा प्रयत्न केला असता, यात शंका नव्हती, आणि अहमद बुशिकीनंतर मोसादला परत तसलं कुठलंही प्रकरण नको होतं. त्यामुळे सलामेहला त्याच्या हेल्थ क्लबमध्ये संपवायची योजना बासनात गुंडाळली गेली.
आणि त्याच वेळी या नाटकात एरिका मारी चेम्बर्स नावाच्या स्त्रीचा प्रवेश झाला.
एरिका इंग्लंडमधली होती आणि एखाद्या टिपिकल इंग्लिश माणसाने पण हात वर केले असते एवढी विक्षिप्त होती. तिच्या पासपोर्टवरील नोंदीनुसार ती गेली चार वर्षे जर्मनीमध्ये राहिली होती. बैरूटमध्ये आल्यावर तिने एक फ्लॅट भाड्याने घेतला. हा फ्लॅट रु व्हेर्डून आणि रु मादाम क्युरी या दोन रस्त्यांच्या छेदबिन्दुजवळ असलेल्या एका इमारतीत होता. तिच्या शेजाऱ्यांना तिने आपलं नाव पेनेलोपे आहे आणि ती एका गरीब आणि अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेसाठी काम करते असं सांगितलं होतं. तिचा दिवस हा वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये, अनाथालयांमध्ये आणि लहान मुलांच्या व्यायामशाळांमध्ये जात असे. व्यक्तिगत दृष्ट्या बोलायचं तर ती एक अत्यंत एकाकी स्त्री होती. तिचे कपडे काही खास नसत. त्यांना धड इस्त्रीसुद्धा केलेली नसे. तिची अजून एक आवड म्हणजे मांजरी. ती बघावं तेव्हा दोन्ही हातांत कॅट फूडने भरलेल्या बशा घेऊन गल्लीतल्या मांजरांना खायला घालताना दिसे. तिच्या फ्लॅटमध्येही मांजरांचा वावर होता. त्यामुळे संपूर्ण घराला एक विचित्र वास येत असे. पण ती तिचं घरभाडं वेळेवर देत असे, त्यामुळे तिच्या घरमालकाला तक्रार करायला काही जागा नव्हती. तिला चित्रकलेचीही आवड होती. पण तिची चित्रं कुणा जाणकाराने लक्षपूर्वक पाहिली असती, तर तिच्या चित्रकलेतल्या कौशल्याबद्दल त्याला नक्कीच शंका आली असती.
जर एखाद्याने तिची दिनचर्या अगदी काळजीपूर्वक न्याहाळली असती, तर त्याला एक गोष्ट जाणवली असती. ती बराच वेळ तिच्या फ्लॅटच्या गॅलरीतून दिसणारी गाड्यांची ये-जा बघण्यात घालवत असे. दररोज सकाळी साडेनऊ वाजता एक तपकिरी रंगाची शेवर्लेट स्टेशन वॅगन आणि तिच्यामागे एक लँड रोव्हर या दोन गाड्या तिच्या घराखालून जात असत. नेमक्या त्याच वेळी ती आपलं चित्र काढणं थांबवून जवळ ठेवलेल्या बायनॉक्युलर्स हातात घेत असे आणि त्या गाड्यांकडे लक्षपूर्वक बघत असे. दररोज सकाळी साडेनऊच्या थोडं आधी या गाड्या बैरूटच्या अतिश्रीमंत स्नौब्रा भागातून निघत आणि जवळच असलेल्या रु व्हेर्डूनवरून रु मादाम क्युरी रस्त्याच्या दुसऱ्या टोकाकडे जात असत. तिथून जवळच फताहचं एक ऑफिस होतं. दुपारी जेवणाच्या वेळी या दोन्हीही गाड्या परत येत आणि साधारण दुपारी ३ च्या सुमारास परत जात असत. एरिका दिवसभर कुठेही गेली तरी या गाड्यांच्या जायच्या आणि यायच्या वेळी ती घरात, किंबहुना गॅलरीत असायचीच.
त्या पहिल्या स्टेशन वॅगनच्या मागच्या सीटवर दोन अंगरक्षकांच्या मध्ये अली हसन सलामेह बसलेला असतो, हे एरिकाने पाहिलेलं होतं. त्याच्या ड्रायव्हरच्या शेजारी अजून एक अंगरक्षक असतो, आणि मागून येणाऱ्या गाडीत अजून अनेक हत्यारबंद तरुण असतात, हे सगळं तिने नोंदवून ठेवलं होतं.
एवढ्या अंगरक्षकांमुळे सलामेह कदाचित जिवावरच्या हल्ल्यातून बचावला असता, पण त्याचं एका जबरदस्त शत्रूपासून हे अंगरक्षक संरक्षण करूच शकत नव्हते. तो शत्रू म्हणजे नियमितपणा. दररोज सकाळी ठराविक वेळी ऑफिस, ठराविक वेळी घरी जेवायला जाणं, ठराविक वेळी परत ऑफिस आणि ठराविक वेळी परत घर हा आता सलामेहचा नियमित दिनक्रम झाला होता. तो गुप्त कारवायांचा पहिला आणि महत्वाचा नियम विसरला होता – जर तुम्हाला स्वतःवर शत्रूचा हल्ला होऊ नये असं वाटत असेल, तर सर्वप्रथम नियमितपणा टाळा. कधीही त्याच रस्त्याने, त्याच वेळी, त्याच वाहनाने येऊ-जाऊ नका.
१८ जानेवारी १९७९ या दिवशी पीटर स्क्रीव्हर नावाचा एक ब्रिटीश पर्यटक बैरूटमध्ये उतरला, हॉटेल मेडिटरेनियनमध्ये त्याने एक खोली घेतली आणि शहर फिरण्यासाठी एक फोक्सवॅगन गोल्फ गाडी घेतली. त्याच दिवशी तो रोनाल्ड कोलबर्ग नावाच्या एका कॅनेडियन पर्यटकाला भेटला. कोलबर्ग रॉयल गार्डन नावाच्या दुसऱ्या हॉटेलमध्ये राहात होता. त्याने त्याच एजन्सीमधून एक क्रायस्लर सिमका गाडी घेतली. कोलबर्ग म्हणजे दुसरातिसरा कोणी नसून डेव्हिड मोलाद होता. त्याच संध्याकाळी एरिका चेम्बर्सने त्याच एजन्सीमधून एक डॅटसन गाडी भाड्याने घेतली आणि आपल्या घराच्या खाली रस्त्यावर पार्क केली.
त्या रात्री बैरूटपासून जवळ असलेल्या एका निर्मनुष्य समुद्रकिनाऱ्यावर इझरेली नौदलाच्या तीन मिसाईल बोट्स आल्या आणि त्यांनी भरपूर स्फोटकं किनाऱ्यावर उतरवली. स्क्रीव्हर आणि कोलबर्ग उर्फ मोलाद हे दोघेही तिथे त्यावेळी हजर होते. त्यांनी ही स्फोटकं फोक्सवॅगन गाडीमध्ये भरली.
२१ जानेवारी १९७९ या दिवशी पीटर स्क्रीव्हरने हॉटेलमधून चेक आउट केलं आणि त्याची फोक्सवॅगन गाडी रु व्हेर्डूनवर, एरिकाच्या घरातून अगदी सहज दिसेल अशी पार्क केली. नंतर तिथून एक टॅक्सी घेऊन तो एअरपोर्टवर गेला आणि तिथून सायप्रसला गेला. रोनाल्ड कोलबर्गनेही चेक आउट केलं आणि तो मोन्त्मार्त नावाच्या हॉटेलमध्ये गेला. हे हॉटेल एरिकाच्या घरापासून अगदी हाकेच्या अंतरावर पण मागच्या बाजूला होतं.
त्या दिवशी दुपारी ३.४५ वाजता सलामेह त्याच्या घरातून निघाला, शेव्हर्लेटमध्ये बसला, त्याचे अंगरक्षकही आपापल्या जागी बसले आणि सगळे निघाले. ते रु व्हेर्डूनपाशी आले आणि एरिकाच्या घराखाली पार्क केलेल्या फोक्सवॅगनच्या बाजूने गेले, आणि नेमक्या त्याच क्षणी गॅलरीत एरिकाच्या मागे उभ्या असलेल्या कोलबर्ग उर्फ मोलादने रिमोट कंट्रोलचं बटन दाबलं. फोक्सवॅगनमध्ये ठासून भरलेल्या स्फोटकांचा जबरदस्त स्फोट झाला. स्फोटाचा दणका एवढा जबरदस्त होता, की आजूबाजूच्या घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि त्यांचा सडा रस्त्यावर पडला. फोक्सवॅगनतर वितळूनच गेली, पण तिच्या बाजूने गेलेल्या शेव्हर्लेट आणि लँड रोव्हर गाड्यांचाही स्फोट झाला. शेव्हर्लेटचे दरवाजे उखडले आणि आतमधले मृतदेह बाहेर फेकले गेले.
पोलिस आल्यावर त्यांनी शेव्हर्लेटमध्ये असलेला एकमेव मृतदेह बाहेर काढला. बाकीचे मृतदेह बाहेर फेकले गेले होते. हा मृतदेह होता अली हसन सलामेहचा. आपल्या सगळ्या अंगरक्षकांसमवेत सलामेह मारला गेला.
दमास्कसमध्ये यासर अराफतला ही बातमी समजल्यावर त्याला अश्रू आवरले नाहीत.
त्याच रात्री मोलाद आणि एरिका त्याच निर्मनुष्य समुद्रकिनाऱ्यावर इझरेली बोटीची वाट पाहात थांबले होते. २२ जानेवारीच्या पहाटे ४ वाजता त्यांना हवा असलेला संदेश मिळाला, आणि इझरेली युद्धनौकेतून आलेल्या रबरी मचव्यावर बसून दोघेही त्या युद्धनौकेकडे आणि तिथून इझराईलला निघून गेले.
५ सप्टेंबर १९७२ या दिवशी सुरु झालेला सूडाचा प्रवास मोसादने ७ वर्षांनी संपवला आणि Mossad never forgets हे सिद्ध केलं.
क्रमशः
मोसाद - भाग १२
१५ नोव्हेंबर १९७१. वेळ – रात्री साधारण १० वाजता. भूमध्य समुद्रात वादळ चालू होतं. मुसळधार पाउस पडत होता आणि एक इझरेली मिसाईल बोट अगदी धीम्या गतीने सीरियन किनाऱ्याच्या दिशेने चालली होती. आंतरराष्ट्रीय सीमारेषा ओलांडून बोट सीरियन हद्दीत शिरली. त्याच्याआधी बोटीवरचे सगळे दिवे मालवले गेले. सीरियाच्या लाताकिया बंदराला वळसा घालून बोट पुढे गेली आणि उत्तरेकडे वळली. तुर्कस्तानच्या हद्दीपासून जवळच असलेल्या एका निर्मनुष्य समुद्रकिनाऱ्याजवळ ती थांबवण्यात आली आणि त्यातून काही रबरी मचवे समुद्रात टाकण्यात आले आणि त्या बोटीवरच्या कमांडोनी त्यांत उड्या मारल्या आणि त्यांची तपासणी केली. हवा वादळी असल्यामुळे ही तपासणी अत्यावश्यक होती. ती पूर्ण झाल्यावर बोटीवरच्या एका केबिनचा दरवाजा उघडला आणि तीन माणसं बाहेर आली. तिघांच्याही अंगावर सामान्य माणसांप्रमाणे कपडे होते. संध्याकाळी जेव्हा ही बोट इझराईलच्या हैफा बंदरातून निघाली होती, तेव्हापासून हे तिघेही या खोलीत बसले होते आणि आत्ताच बाहेर निघाले होते. आत्ताही त्यांनी आपले चेहरे अरब माणसांप्रमाणे एका मोठ्या आणि चौकडीच्या रुमालाने झाकले होते. आपली ओळख कुणालाही कळू नये हा त्यांचा प्रयत्न होता हे तर उघड होतं.
तिघांच्याही जवळ अत्यंत खास प्रकारे बनवलेल्या पिशव्या होत्या. त्यात छोटे ट्रान्समीटर्स, नकली पासपोर्ट, पैसे आणि रिव्हॉल्व्हर्स होती. मचवे त्यांना समुद्रकिनाऱ्याजवळ सोडून निघून गेले. शेवटचा टप्पा या तिघाही जणांनी पोहून पार केला. ते जेव्हा सीरियन भूमीवर पोचले, तेव्हा सूर्योदय व्हायला जेमतेम एक तास बाकी होता. किनाऱ्यावर एक माणूस त्यांची वाट पाहात उभा होता. या माणसाचं खरं नाव होतं योनाथन आणि या ऑपरेशनसाठीचं त्याचं नाव होतं प्रॉस्पर. त्याने त्यांच्यासाठी कपडे आणले होते. ते बदलून या लोकांनी आपले जुने, ओले कपडे वाळूत पुरले आणि ते त्याच्या गाडीकडे गेले. ही गाडीही किनाऱ्याजवळच्या झाडीत लपवलेली होती. गाडीमध्ये अजून एक मोसाद एजंट त्यांची वाट पाहात थांबला होता. चौघेही गाडीत बसले आणि एक शब्दही न बोलता ड्रायव्हरने गाडी चालू केली आणि काही तासांनी ते सीरियाची राजधानी दमास्कसला पोचले.
चौघांनीही चार वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये चेक-इन केलं. थोडा वेळ विश्रांती घेतल्यावर चौघेही दमास्कसमध्ये फेरफटका मारायला बाहेर पडले. चौघेही मोसाद एजंट्स आणि त्याच्याआधी इझराईलच्या नौदलाचे कमांडो होते. त्यांच्यावर जी कामगिरी सोपवण्यात आली होती, ती अत्यंत जोखमीची होती. त्यांच्या हेर आणि कमांडो अशा दोन्हीही कौशल्यांची परीक्षा घेणारी. या एजंट्समध्ये एक होता डेव्हिड मोलाद. इझराईलच्या अत्यंत घातकी एजंट्सपैकी एक.
या कामगिरीबद्दल त्यांना प्रत्यक्ष मोसाद संचालक झ्वी झमीरकडून विचारणा झाली होती. काही आठवड्यांपूर्वी मोसादच्या मिद्राशा या प्रशिक्षण केंद्रात झमीर, सीझरिआ या मोसादच्या ऑपरेशन्स विभागाचा प्रमुख माईक हरारी आणि हे चार एजंट्स भेटले होते. चौघेही प्रशिक्षित कमांडो होतेच पण त्याव्यतिरिक्त त्यांच्यात अजून एक साधर्म्य होतं. चौघांचाही जन्म उत्तर आफ्रिकेत झाला होता. उत्तर आफ्रिकेतल्या मोरोक्को, अल्जीरिया आणि ट्युनिशिया या देशांमध्ये अरेबिक भाषेबरोबरच फ्रेंच ही सर्वमान्य भाषा होती आणि हे चौघेही अरेबिक आणि फ्रेंचमध्ये निष्णात होते. सीरियासुद्धा पहिल्या महायुद्धानंतर फ्रेंच अंमलाखालीच होता. झमीरने त्यांना या कामगिरीबद्दल माहिती द्यायला सुरुवात केली.
दोन वर्षांपूर्वी सीरियाहून इझराईलला एक संदेश आला होता. तो दमास्कसमधल्या ज्यू समाजाच्या प्रमुखाने पाठवला होता. १९६५ मध्ये इझरेली हेर एली कोहेनला फासावर लटकवल्यानंतर सीरियामधल्या ज्यूंचा छळ वाढला होता. १९६७ च्या ६ दिवसांच्या अरब-इझराईल युद्धानंतर त्यात अजून वाढ झाली होती. १९७० मध्ये सीरियामध्ये राज्यक्रांती होऊन हाफेझ अल असद सत्तेवर आला होता (सध्याचा सीरियन राष्ट्रप्रमुख बाशर अल असदचा पिता). १९६७ मध्ये इझराईलच्या ताब्यात गेलेला गोलान टेकड्यांचा प्रदेश असदला काही केल्या परत मिळवायचा होता आणि त्याच्या काही सल्लागारांच्या मतानुसार सीरियामधल्या ज्यू लोकांचा छळ करून इझराईलला भडकवणं हा एक प्रभावी उपाय होता. त्यामुळे ज्यूंना मारहाण करणं, त्यांच्याविरुद्ध घडलेले गुन्हे न नोंदवणं, त्यांच्या शिक्षणसंस्था आणि इतर संस्था बंद करणं, त्यांच्या वसाहतींमधला वीज आणि पाणीपुरवठा बंद करणं, ज्यू प्रवाशांना भर रात्री बसमधून किंवा ट्रेनमधून धक्काबुक्की करून उतरवणं आणि सर्वात वाईट म्हणजे लहान ज्यू मुलामुलींना पळवून नेऊन जबरदस्तीने धर्मांतर करणं आणि स्त्रियांवर आणि मुलींवर बलात्कार करणं असे प्रकार राजरोसपणे, सरकारी आशीर्वादाने सुरु झाले होते. त्या संदेशात हेच म्हटलं होतं – ज्यांनी दुसऱ्या महायुद्धापूर्वी आणि युद्धादरम्यान झालेल्या नाझी अत्याचारांबद्दल फक्त वाचलंय त्यांना ते अत्याचार कसे झाले, हे दाखवून द्यायचा सीरियन सरकारने चंग बांधलेला आहे.
सीरियामधल्या ज्यूंनी या अत्याचारांचा प्रतिकार करण्याऐवजी इझराईलमध्ये पळून जायचा मार्ग अवलंबायला सुरुवात केली. जेवढ्या जास्त ज्यूंवर आपण सीरियामध्ये अत्याचार करू, तेवढा दबाव आपल्याला इझराईलवर टाकता येईल हे सीरियन सरकारला चांगलंच माहित होतं. त्यामुळे त्यांनी या पळून जाणाऱ्या ज्यूंवर बारीक लक्ष ठेवायला सुरुवात केली. ज्यूंना पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या ज्या संघटना होत्या, त्यांत सीरियन गुप्तचर संघटना मुखबारतचे अंडरकव्हर एजंट्स होते. त्यांनी दिलेल्या खबरींमुळे सीरियन पोलिसांना अनेक ज्यूंना पळून जाण्याआधीच पकडता आलं.
या ज्यूंनी या सगळ्या प्रकारामध्ये एक मोठी चूक केली होती. पळून गेलेले जवळपास सगळे ज्यू हे तरुण पुरुष होते. मागे राहिलेल्या लोकांमध्ये वृद्ध आणि स्त्रियांचा, विशेषतः मुलींचा समावेश होता.
झमीर या इझरेली कमांडोंना हे सांगत असताना त्यांचे चेहरे निर्विकार होते. पण त्यांच्या मनात खळबळ माजली होती, हे उघड होतं. या मुलींपैकी काहींनी लेबेनॉनमार्गे इझराईलपर्यंत येण्याचा प्रयत्न केला होता. काहींनी त्यासाठी आपली मालमत्ता विकून पैसे उभे केले होते. त्यांना लेबेनॉनपर्यंत घेऊन येणाऱ्या अरब स्मगलर्सपैकी सगळेच पैशाला जागणारे नव्हते. काहींनी पैसे घेऊन दगाबाजी केली होती, आणि या जवळपास १५ मुलींना सीरियन लष्कराच्या ताब्यात दिलं होतं. नंतर त्यांचं काय झालं ते कुणालाही माहित नव्हतं. उरलेल्या जवळपास २० मुली कशाबश्या जीव वाचवून लेबेनॉनमध्ये आल्या होत्या. लेबेनॉनची राजधानी बैरूटमध्ये असलेल्या मोसाद हस्तकांनी या अरब स्मगलर्सची नजर चुकवून लेबेनॉनमध्ये आलेल्या या ज्यू मुलींशी संपर्क साधला होता, त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली होती आणि नंतर त्यांना सुखरूप इझराईलमध्ये पोचवलं होतं.
१९७० च्या हिवाळ्यातल्या एका रात्री बैरूटच्या उत्तरेला असलेल्या ज्युनिएह नावाच्या बंदरात एक इझरेली युद्धनौका शिरली. तिथे कोळ्यांच्या वेशात असलेल्या मोसाद एजंट्सनी १२ सीरियन ज्यू मुलींना या युद्धनौकेच्या कप्तानाच्या हवाली केलं आणि नौका परत इझराईलकडे फिरली.
जेव्हा ही युद्धनौका इझराईलमध्ये पोचली तेव्हा कप्तान आणि बोटीवरच्या इतर नौसैनिकांना आश्चर्याचा धक्का बसला. या मुलींच्या स्वागतासाठी स्वतः पंतप्रधान गोल्डा मायर तिथे हजर होत्या. पंतप्रधानांना या मुलींनी आपली कर्मकहाणी ऐकवली आणि ते ऐकून त्यांनी ताबडतोब मोसाद संचालक झ्वी झमीरला आदेश दिला – उरलेल्या सीरियन ज्यू मुलींना इझराईलमध्ये आणा.
“ही कामगिरी तुम्ही करावी अशी माझी इच्छा आहे,” झमीरने मुद्द्याची गोष्ट सांगितली. हे ऐकल्यावर तिथे एकच गदारोळ माजला. या चारही एजंट्सना ही कामगिरी म्हणजे वेळ वाया घालवणं वाटत होतं. एका एजंटने तर आम्ही आमचा जीव धोक्यात घालावा एवढं हे काम महत्वाचं नाही असंही म्हटलं. माईक हरारी सुद्धा या एजंट्सना सीरियामध्ये पाठवायला तयार नव्हता. एकतर एली कोहेनला सीरियामध्ये फासावर लटकून फार वर्षे झाली नव्हती. दुसरं म्हणजे या कामगिरीला किती वेळ लागेल त्याची काहीही शाश्वती नव्हती.
झमीर शांत होता. त्याच्याकडे अधिकार असल्यामुळे या सगळ्यांना जावं लागलं असतं हे तर निश्चित होतं, पण या लोकांनी आपल्या मनाविरुद्ध आणि आपल्या कामगिरीबद्दल नकारात्मक विचार मनात ठेवून जावं अशी झमीरची इच्छा नव्हती. त्याने त्यांना फक्त एका गोष्टीची आठवण करून दिली. जिथे कुठे ज्यू धर्मीयांवर अन्याय आणि अत्याचार होत असतील, तिथे त्यांचं त्यापासून संरक्षण करणं हे मोसादच्या मूलभूत उद्दिष्टांपैकी एक आहे.
या ऑपरेशनचं सांकेतिक नाव होतं – स्मिचा. या हिब्रू शब्दाचा अर्थ होतो पांघरूण किंवा शाल. आणि या गटाला मोसादमध्ये दिलेलं सांकेतिक नाव होतं कोसा नोस्ट्रा.
हे चौघेही मोसादच्या सर्वोत्कृष्ट एजंट्सपैकी होते, तरीही शत्रूच्या प्रदेशात, कुठल्याही राजनैतिक संरक्षणाशिवाय जाताना मनात जी धाकधूक असते ती त्यांच्याही मनात होती. चौघेही दमास्कसमध्ये फिरत असताना हिब्रूचा एक शब्दही उच्चारत नव्हते. फ्रेंच किंवा मग अरेबिकमध्ये त्यांचं संभाषण चाललं होतं. त्यांना सर्वात पहिल्यांदा सीरियन गुप्तचर संघटना मुखबारतचे लोक त्यांच्या मागावर नाहीत याची खात्री करून घ्यायची होती. ते दमास्कसमध्ये आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एक घटना घडली. या चौघांपैकी दोघे दमास्कसच्या बाजारपेठेत फिरत होते आणि फिरता फिरता ते एका सराफी दुकानात शिरले. दोघेही फ्रेंचमध्ये बोलत होते. तेव्हा तिथला एक सेल्समन त्यांच्याजवळ आला आणि हलक्या आवाजात त्यांना म्हणाला, “तुम्ही बनाई अमेनु (हिब्रू भाषेत याचा अर्थ होतो आपले लोक) पैकी आहात, बरोबर ना?”
दोघेही एजंट्स नखशिखांत हादरले. जर एका दुकानातला सेल्समन त्यांना इतक्या सहजपणे ओळखू शकत असेल, तर सीरियन गुप्तचर संघटना नक्कीच ओळखू शकेल. त्या सेल्समनच्या प्रश्नाचं काहीही उत्तर न देता दोघेही तिथून सटकले आणि गर्दीत मिसळले.
पण यामुळे एक गोष्ट घडली. दमास्कसमधल्या ज्यू समाजाच्या लोकांमध्ये, विशेषतः मुलींमध्ये, आपल्याला सीरियामधून बाहेर पडून इझराईलला जायची संधी आहे ही बातमी वाऱ्यासारखी पसरली.
या दुकानातल्या घटनेनंतर साधारण ४-५ दिवसांनी प्रॉस्परला एक गुप्त संदेश मिळाला. हा संदेश दमास्कसमधूनच आला होता : उद्या संध्याकाळी, काही ज्यू मुली एका छोट्या ट्रकमध्ये तुझ्या हॉटेलपासून जवळच असलेल्या एका ठिकाणी थांबलेल्या असतील.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी या एजंट्सना खरोखरच एक ट्रक एका अंधाऱ्या गल्लीत पार्क केलेला दिसला. त्याची मागची बाजू कॅनव्हासने पूर्णपणे झाकलेली होती. सर्व ४ एजंट्सनी त्यांच्या हॉटेलमधून चेक-आउट केलं होतं आणि बाहेर पडल्यावर वेषांतरही केलं होतं. आता चौघांनीही अरब माणसांप्रमाणे पेहराव केला होता. त्यांच्यामधल्या दोघांनी ट्रकपाशी जाऊन हलकेच कॅनव्हास कापड उचललं आणि आत पाहिलं. सांगितल्याप्रमाणे तिथे वय वर्षे १५ ते २० या वयोगटातल्या अनेक मुली आणि एक मुलगा होता. या एजंट्सना असंही समजलं होतं की सीरियन सरकारला अशा प्रकारे ज्यू मुलींना बाहेर काढलं जातंय याची कुणकुण लागलेली आहे आणि त्यामुळे हमरस्त्यांवर आणि इतर छोट्या रस्त्यांवरही नाकाबंदी लागू करून वाहनांची तपासणी होते आहे. जर पोलिसांनी अडवलं तर कौटुंबिक सहल किंवा मग गावाकडच्या शाळेतल्या मुली शहर पाहायला आलेल्या आहेत असं सांगायचं त्यांनी ठरवलं. सुदैवाने या मुलींपैकी बऱ्याच जणींना अरेबिक बोलता येत होती.
मोसादच्या सीरियन नेटवर्कपैकी एक जण खरोखरचा ट्रक ड्रायव्हर होता आणि आत्ता तोच ट्रक चालवत होता. त्यांनी दमास्कसपासून उत्तरेकडचा रस्ता पकडला. या रस्त्यावर पुढे तार्तास हे बंदर होतं. तार्तासच्या जवळ असलेल्या एका निर्मनुष्य समुद्रकिनाऱ्याजवळ ट्रक थांबला. या किनाऱ्यावर एक छोटी झोपडी होती. या झोपडीमध्ये सगळे थांबले. सीरियन सागरी हद्दीच्या पलीकडे एक इझरेली युद्धनौका येऊन थांबली होती. प्रॉस्परने या नौकेवर रेडिओने संदेश पाठवला. हा संदेश मिळाल्यावर या नौकेतून काही रबरी मचवे पाण्यात उतरवले गेले आणि त्यांनी अंधारात सीरियन किनाऱ्याच्या दिशेने जायला सुरुवात केली. या मचव्यांमध्ये इझरेली नौदलाचे कमांडो होते.
हे मचवे सीरियन हद्दीत जेमतेम शिरले असतील-नसतील, अचानक गोळीबार सुरु झाला. प्रॉस्पर आणि इतर एजंट्सना आधी हा गोळीबार त्यांच्यावर होतोय असं वाटलं आणि त्यांनी त्या झोपडीचा आश्रय घेतला. पण लवकरच या गोळ्या त्यांच्या दिशेने येत नसल्याचं त्यांना समजलं. नक्की काय झालं होतं ते कळायला मार्ग नव्हता. पण युद्धनौकेच्या कमांडरने सगळ्या मचव्यांना परत बोलावलं आणि प्रॉस्परला अजून उत्तरेकडे असलेल्या एका दुसऱ्या किनाऱ्याजवळ यायला सांगितलं. त्याने ट्रकमधून उतरलेल्या सगळ्यांना परत ट्रकमध्ये बसायला सांगितलं आणि ट्रक त्या दुसऱ्या किनाऱ्याच्या दिशेने नेला.
सुदैवाने या वेळी असा कोणताही प्रश्न आला नाही. पण नेमका निसर्ग समोर उभा ठाकला. हे लोक जेव्हा त्या दुसऱ्या किनाऱ्याजवळ पोचले, तेव्हा भरती सुरु झाली होती. युद्धनौकेपासून निघालेले मचवे किनाऱ्याच्या अगदी जवळ येऊ शकत नव्हते. त्यात धोका होता. त्यामुळे एजंट्स आणि या मुलींना त्या मचव्यांकडे जावं लागणार होतं. त्यांनी तार्तासजवळच्या किनाऱ्यावर ओहोटीची वेळ बघून प्रयत्न करायचं ठरवलं होतं, पण आता भरती सुरु झाली होती, आणि ती संपून परत ओहोटीसाठी एजंट्स थांबले असते, तर कदाचित पहाटेच्या संधिप्रकाशात सीरियन गस्तीदलांच्या दृष्टीस पडण्याचा धोका होता. त्यामुळे पाण्यातून तसंच जावं लागणार होतं. त्यांच्याकडे लाईफ जॅकेट्स नव्हती आणि या मुलींपैकी काहींनाच पोहता येत होतं.
पण आता दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळे भरतीच्या लाटा अंगावर आणि समुद्राचं खारट पाणी नाकातोंडात घेत या एजंट्सनी आणि मुलींनी त्या मचव्यांकडे जायला सुरुवात केली आणि कसेबसे ते गारठलेल्या अवस्थेत मचव्यांपाशी पोचले. या मचव्यांनी त्यांना युद्धनौकेपाशी पोचवलं आणि मग मचव्यांमधले कमांडो, एजंट्स आणि या मुली अशा सगळ्यांना घेऊन ही युद्धनौका इझराईलला पोचली.
इकडे मोसादने सीरियन मुखबारतमधल्या आपल्या अंडरकव्हर एजंट्सकडून या
अचानक झालेल्या गोळीबाराबद्दल माहिती काढायचा प्रयत्न केला, पण काहीच समजलं
नाही. शेवटी, काही सीरियन सैनिकांनी समुद्रामध्ये संशयास्पद हालचाली
दिसल्यावर खात्री करून घेण्यासाठी गोळीबार केला असावा असा निष्कर्ष काढून
मोसादने त्याचा नाद सोडून दिला.
______________________________________________________________________________
पुढच्या वेळी कोसा नॉस्ट्राने वेगळी पद्धत वापरायचं ठरवलं. ते जॉर्डनची राजधानी अम्मानहून दमास्कसमध्ये विमानाने आले. चौघाही एजंट्सच्या पासपोर्टवर ते फ्रेंच नागरिक असल्याचा आणि त्यांच्या इतर कागदपत्रांमध्ये ते पुरातत्वशास्त्राचे विद्यार्थी असून सीरियामध्ये अभ्यास आणि उत्खनन यासाठी आलेले आहेत असा उल्लेख होता. त्यांच्या सामानात पॅरिस, रोम, व्हिएन्ना आणि जॉर्डन इथल्या स्थानिक रेल्वे आणि बस तिकिटांचा आणि तिथल्या रेस्टॉरंट बिलांचा समावेश होता. त्यांच्या मनावरचं दडपण यावेळी गेल्या वेळेपेक्षा दुपटीने वाढलेलं होतं. जर मुखबारतला आपल्याबद्दल आणि आपण याआधी सीरिया मध्ये वेगळ्याच नावाने आणि पासपोर्टवर आलो होतो अशी शंका आली तर? पण तसं काही घडलं नाही आणि चौघांनीही गेल्या वेळेप्रमाणे याही वेळी वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये चेक इन केलं.
चौघेही दुसऱ्या दिवशी फेरफटका मारायला निघाले असताना त्यांच्या ड्रायव्हरने गाडी नेमकी मार्जेह चौकातून नेली. इथेच १९६५ मध्ये मोसादच्या सर्वश्रेष्ठ हेराला, एली कोहेनला सीरियन सरकारने जाहीररीत्या फाशी दिलं होतं. चौघांसाठीही त्या स्थळाला भेट देण्याचा अनुभव हा प्रचंड क्लेशदायक होता.
त्याच रात्री या एजंट्सपैकी इमॅन्युअल अलॉन उर्फ क्लॉडीला रात्री अचानक जाग आली. एक विचित्र आवाज येत होता. एका क्षणात तो आवाज काय होता, हे त्याला समजलं. कोणीतरी चावीने त्याच्या खोलीचं दार उघडून आत यायचा प्रयत्न करत होतं. संपलं, त्याच्या मनात विचार येऊन गेला. आता एली कोहेननंतर माझी पाळी. पण कसंबसं स्वतःला सावरत त्याने दरवाज्यापाशी जाऊन पीपहोलमधून बाहेर पाहिलं, तर त्याच्याच हॉटेलमध्ये राहात असलेली एक वृद्ध अमेरिकन स्त्री त्याच्या खोलीचा दरवाजा उघडायचा प्रयत्न करत होती. तिने बराच वेळ प्रयत्न करूनसुद्धा तिला दरवाजा उघडणं जमलं नाही, आणि ती शेवटी तिथून निघून गेली. बहुतेक ती चुकीच्या मजल्यावर उतरली असावी किंवा तिचा गोंधळ उडाला असावा.
या अनुभवानंतर एजंट्सनी स्वतःला सावरलं. आपली घबराट उडालेली दिसणं हे जास्त धोकादायक आहे, याची त्यांना जाणीव झाली.
या दुसऱ्या मोहिमेच्या वेळी प्रॉस्पर आणि इतर एजंट्स मुली असलेला ट्रक समुद्रकिनाऱ्याजवळ नेत असताना त्यांना अचानक वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. प्रॉस्परने ट्रकमधून उतरून कोंडी का झालीय हे इतर लोकांना विचारलं, तेव्हा त्याला कळलं की अनेक लष्करी वाहनं आणि सैनिक काही कामानिमित्त तिथे आलेले आहेत. त्यांनी त्या क्षणी आपली समुद्रमार्गे जायची योजना गुंडाळली आणि प्रॉस्परने तडकाफडकी लेबेनॉनची राजधानी बैरूटला जायचा निर्णय घेतला. तिथून बैरुट जवळपास १०० किलोमीटर्स तरी दूर होतं. सुदैवाने त्याला सीरिया – लेबेनॉन यांच्या सरहद्दीवर कुणीही हटकलं नाही. बैरुटला पोचल्यावर प्रॉस्परने या ट्रकला जुएनिह या बंदराकडे पिटाळलं आणि बैरुटमधल्या एका एजन्सीकडून एक मध्यम आकाराची बोट भाड्याने घेतली. आपण १५-१६ पाहुण्यांना आपल्या एका मैत्रिणीच्या वाढदिवसानिमित्त समुद्रात फेरफटका मारण्यासाठी घेऊन जात आहोत असं त्याने या एजन्सीच्या मालकाला सांगितलं. हे सगळं झाल्यावर मग त्याने आपल्या वरिष्ठांना या बदललेल्या योजनेबद्दल कळवलं. तो ठरलेल्या समुद्रकिनाऱ्यापाशी मुलींना घेऊन पोचला नाही म्हटल्यावर त्यांच्या मनात नाही नाही त्या शंका यायला लागल्या होत्या. सुदैवाने त्यांच्यापर्यंत हा संदेश पोचला आणि त्यांनी त्याला मान्यता दिली.
बैरुटला येताना कोणालाही संशय यायला नको म्हणून प्रॉस्परने या मुलींना सीरियामध्येच ठेवलं होतं आणि तो एकटाच लेबेनॉनमध्ये आला होता. मुलींना घेऊन यायची जबाबदारी क्लॉडीची होती आणि तो दुसऱ्या ट्रकने त्यांना घेऊन येत होता. लेबेनॉन – सीरिया यांच्या सरहद्दीवर एक चेकपोस्ट होतं आणि या चेकपोस्टच्या जवळजवळ १० किलोमीटर्स आधी या मुली दुसऱ्या एका मोसाद एजंटबरोबर उतरल्या. क्लॉडी आणि अजून एक मोसाद एजंट ट्रक घेऊन सरहद्दीवरच्या चेकपोस्टपाशी गेले आणि त्यांनी तिथले सगळे औपचारिक सोपस्कार पूर्ण करून लेबेनॉनमध्ये प्रवेश केला आणि लेबेनॉनमध्ये थोड्या अंतरावर जाऊन त्याने ट्रक झाडीत लपवला.
इकडे या आपापलं सामान घेऊन उतरलेल्या मुलींनी चेकपोस्टपर्यंतचं अंतर तिथल्या शेताडीतून हळूहळू चालत पार केलं. त्यांच्याकडे सामान होतं, त्यांना सवय नव्हती आणि कोणाच्या नजरेत येऊ नये म्हणून त्यांना धीम्या गतीने जाणं भाग होतं. जवळपास ४ तास चालून त्यांनी हे अंतर पार केलं आणि अंधाराच्या आवरणाखाली सीरियाची हद्द पार करून लेबेनॉनमध्ये प्रवेश केला आणि तिथून या सगळ्या मुली क्लॉडीच्या ट्रकपाशी पोचल्या. तिथून प्रॉस्पर त्यांना जुएनिहला घेऊन गेला आणि त्यांना तिथे नवे कपडे देण्यात आले आणि प्रॉस्परच्या मैत्रिणीच्या पाहुण्या म्हणून त्या सगळ्या बोटीवर चढल्या आणि त्यांनी लेबनीज सागरी हद्द पार करून इझराईलच्या हद्दीत प्रवेश केल्यावर एका इझरेली युद्धनौकेने या मुलींना उतरवून घेतलं. प्रॉस्पर ही बोट परत घेऊन लेबेनॉनमध्ये आला आणि त्याने ती परत केली.
दुसऱ्या दिवशी हे एजंट्स ज्या मार्गाने आले होते, त्याच मार्गाने परत सीरियामध्ये गेले – अजून काही मुलींना परत आणण्यासाठी.
एप्रिल १९७३ मध्ये तत्कालीन पंतप्रधान गोल्डा मायर यांनी या ऑपरेशनची सांगता झाल्याचं जाहीर केलं. सप्टेंबर १९७० ते एप्रिल १९७३ या काळात मोसादने अशा २० मोहिमा काढून अनेक ज्यू तरुण आणि तरुणींना सुरक्षितरीत्या सीरियाच्या बाहेर काढलं. खुद्द मोसादमध्ये हे ऑपरेशन अत्यंत गुप्त ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे नक्की किती ज्यूंना मोसादने सीरियाच्या बाहेर काढलं, ती संख्या कधीच जाहीर झाली नाही. पण अनौपचारिकरीत्या ही संख्या २०० च्या जवळपास असल्याचं मोसाद अधिकारी सांगत असत.
क्लॉडी उर्फ इमॅन्युअल अलॉनने आपल्या आत्मचरित्रात एक प्रसंग लिहिलेला आहे – तो त्याच्या एका नातेवाईकाच्या लग्नसमारंभाला गेला होता. जेव्हा वधूशी त्याची ओळख करून देण्यात आली, तेव्हा त्याने तिला लगेच ओळखलं. त्याने स्वतः तिला काही वर्षांपूर्वी सीरियामधून बाहेर काढलं होतं.
“कुठून आली आहेस तू? तुझं गाव कुठलं?” त्याने तिला विचारलं.
बिचारी वधू भीतीने पांढरीफटक पडली. आपला भूतकाळ अजून आपला पाठलाग करतोय असं तिला वाटलं असावं.
अलॉनने तिच्याकडे पाहून स्मित केलं, “सीरियामधून आली आहेस ना तू? बोटीतून?”
वधूने त्याच्याकडे अविश्वासाने पाहिलं, आणि त्याला कडकडून मिठी मारली आणि अश्रूपूर्ण डोळ्यांनी आपल्या पतीशी त्याची ओळख करून दिली – “या माणसाने मला सीरियामधून बाहेर काढलं, म्हणून आपलं लग्न होतंय!”
अलॉनच्या मते या कामगिरीसाठी त्याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी पत्करलेल्या सगळ्या धोक्यांचं त्या क्षणी सार्थक झालं होतं!
क्रमशः
मोसाद - भाग १३
५ ऑक्टोबर १९७३, लंडन. ‘ डुबी ’ हे टोपणनाव असणाऱ्या एका मोसाद एजंटला इजिप्तची राजधानी कैरोमधून रात्री दीड वाजता एक कॉल आला. इझराईलच्या लंडनमधल्या वकिलातीशिवाय मोसादच्या मालकीची लंडनमध्ये अनेक घरं होती. त्यातल्या एका ‘ सुरक्षित घर ’ किंवा सेफ हाऊसमधून डुबी आपलं काम करत असे. इथे असलेल्या फोनचा नंबर फारच कमी जणांना माहित होता आणि तिथे नेहमी सकाळी किंवा दुपारीच फोन येत असत. त्यामुळे रात्री दीड वाजता फोन येणं हीच अनपेक्षित गोष्ट होती.
डुबीने फोन उचलला. पलीकडून कोण बोलतंय हे कळल्यावर त्याची उरलेली झोप उडाली. कैरोमधून बोलणारा माणूस मोसादच्या अत्यंत महत्वाच्या आणि तितक्याच गुप्त हेरांपैकी एक होता. त्याच्या अस्तित्वाबद्दल मोसादमध्येच जेमतेम हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या लोकांना माहित होतं. मोसादच्या कागदपत्रांमध्ये त्याचा उल्लेख एंजल असा केला जात असे. एंजलने काही शब्द उच्चारले. ऐकणाऱ्या एखाद्या तिऱ्हाईत माणसाला ते अर्थहीन शब्द वाटले असते, पण ते सांकेतिक शब्द होते. त्यातल्या एका शब्दाने डुबी हादरला. हा शब्द होता – केमिकल्स. एंजलने फोन खाली ठेवताच डुबीने मोसादच्या इझराईलमधल्या हेडक्वार्टर्सला फोन लावला आणि तिथे ड्युटीवर असणाऱ्या अधिकाऱ्याला मोसाद संचालक झ्वी झमीरशी बोलू देण्याची विनंती केली. झमीर फोनवर आल्यावर डुबीने एंजलशी झालेलं सगळं बोलणं त्याला ऐकवलं आणि जेव्हा केमिकल्स हा शब्द झमीरने ऐकला, तेव्हा त्याने ताबडतोब लंडनला जाण्याचा निर्णय घेतला.
त्याला एवढी घाई करणं भागच होतं, कारण केमिकल्स या शब्दाचा अर्थ होता – इझराईलवर लगेचच हल्ला होऊ शकतो!
आपल्या शेजारील अरब राष्ट्रांकडून असा हल्ला होण्याची अपेक्षा इझराईलला
१९६७ पासून होती. त्या वर्षी झालेल्या ६ दिवसांच्या युद्धात इझराईलने
आपल्या अरब शत्रूंकडून भरपूर मोठा भूभाग हस्तगत केला होता – इजिप्तकडून
सिनाई द्वीपकल्प आणि गाझा, सीरिया कडून गोलान टेकड्या आणि जॉर्डनकडून वेस्ट
बँक आणि जेरुसलेम. आता गोलान टेकड्यांवर, सुएझ कालव्याच्या पूर्व
किनाऱ्यावर आणि जॉर्डन नदीच्या जवळपास संपूर्ण पश्चिम किनाऱ्यावर इझरेली
सैन्याची गस्त चालू होती. अरब देश, विशेषतः इजिप्त आणि सीरिया अधूनमधून
इझराईलचा सूड उगवण्याच्या घोषणा करत असत, पण मोठं युद्ध करण्याचा त्यांनी
प्रयत्न केला नव्हता. त्याच दरम्यान काही महत्वाच्या घटना घडल्या.
१९७० मध्ये इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षाचा – गमाल अब्दुल नासरचा मृत्यू झाला
आणि त्याच्या जागी त्याचा निष्ठावंत सहकारी अन्वर सादात सत्तेवर आला.
दुसरीकडे सीरियामध्ये राज्यक्रांती झाली आणि हाफेझ अल असदने सत्ता काबीज
केली. इझराईलमध्ये पंतप्रधान लेवी एश्कोल यांच्या निधनानंतर त्यांच्या
मंत्रिमंडळात परराष्ट्रमंत्री असलेल्या गोल्डा मायर यांची पंतप्रधानपदी
निवड झाली. त्यांनी इझराईलच्या संरक्षणमंत्रीपदी निवड केली ती धुरंधर
सेनानी मोशे दायान यांची.
सादात आणि असद हे दोघेही दोन टोकांवरचे नेते होते. असद सीरियन वायुदलाचा प्रमुख होता. सीरियन बाथ पक्षाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक होता. १९६० ते १९७० या काळात सीरियामध्ये झालेल्या प्रत्येक राज्यक्रांतीमध्ये त्याचा सहभाग होता आणि शेवटी १९७० मध्ये जेव्हा त्याने सीरियामध्ये सत्ता हस्तगत केली, तेव्हा तो सीरियामध्ये स्थैर्य आणि शांतता प्रस्थापित करेल अशी सगळ्यांची, अगदी इझराईलसारख्या त्याच्या शत्रूंचीही खात्री होती, आणि झालंही तसंच. २००० मध्ये निधन होईपर्यंत असदची सीरियावरची पकड वादातीत आणि पोलादी होती. सत्तेवर आल्यानंतर असदने अंतर्गत बंडाळी मोडून काढणे आणि देशाची आर्थिक परिस्थिती सुधारणे या गोष्टींना प्राधान्य देण्याचं जाहीर केलं होतं. इझराईलसाठी ही दिलासा देणारीच गोष्ट होती.
इजिप्तचा सादात असदच्या बरोबर उलटं व्यक्तिमत्व होतं. तो नासरच्या करिष्म्यापुढे झाकोळून गेलेला नेता होता. त्याला नासरचा उजवा हात म्हणून जरी इजिप्तबाहेर ओळखत असले, तरी तो सत्तेवर येईपर्यंत त्याच्याबद्दल कोणालाही फारशी माहिती नव्हती. मोसादमधल्या इजिप्त डेस्कवर असलेल्या तज्ञांच्या मते सादातकडे देशाला युद्धात एक कणखर आणि सक्षम नेतृत्व देण्याची क्षमता नव्हती. या घटनांच्या थोडं आधी इझराईलमध्येही पंतप्रधान लेवी एश्कोल यांचं निधन झालं आणि त्यांच्या मंत्रिमंडळात परराष्ट्रमंत्री असलेल्या गोल्डा मायर इझराईलच्या पंतप्रधान झाल्या. त्यांच्यासारखं कणखर नेतृत्व लाभल्यामुळे संपूर्ण देशाने आनंद व्यक्त केला. मायर यांच्या मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री असलेले मोशे दायान हेही त्यांच्या १९६७ च्या युद्धातील कामगिरीमुळे प्रसिद्ध होतेच. “ इझराईलची सुरक्षा अत्यंत योग्य हातांमध्ये आहे ” असं मत जवळपास सर्वच वृत्तपत्रं व्यक्त करत होती.
५ ऑक्टोबरच्या या फोन कॉलच्या आधी काही आठवडे जॉर्डनचा राजा हुसेन स्वतः
गुप्तपणे इझराईलला आला आणि त्याने मायर आणि दायान यांची भेट घेतली.
नासरच्या मृत्यूनंतर जॉर्डनने इझराईलबरोबर शांतता प्रस्थापित केलेली होती.
त्याचं एक कारण म्हणजे पॅलेस्टिनी दहशतवाद्यांचा दोघाही देशांना होत असणारा
त्रास. सर्व अरब राष्ट्रांमध्ये जॉर्डनची गुप्तचर संस्था सर्वात अद्ययावत
आणि वास्तवाची जाणीव असणारी आहे असं मोसादचं मत होतं. त्यामुळे जेव्हा राजा
हुसेनने या भेटीत इजिप्त आणि सीरिया इझराईलवर आक्रमण करण्याची तयारी करत
आहेत अशी धोक्याची सूचना मायर आणि दायान यांना दिली, तेव्हा मोसादने
त्याकडे गंभीरपणे लक्ष द्यायचं ठरवलं, पण त्यांच्यासमोर एक अनपेक्षित अडथळा
उभा राहिला. जगातल्या प्रत्येक लोकशाही देशामधली अपरिहार्य गोष्ट –
निवडणूक. गोल्डा मायर यांच्या नेतृत्वाखाली लेबर पक्ष पहिल्यांदाच निवडणूक
लढवत होता, त्यामुळे त्यांचं संपूर्ण लक्ष त्याच्याकडे लागलं होतं. प्रमुख
विरोधी पक्ष असलेल्या लिकुड पक्षाने यावेळी लेबर पक्षापुढे आव्हान उभं केलं
होतं, आणि सुएझ कालव्याच्या आसपास असणारी शांतता हा या निवडणुकीत प्रमुख
मुद्दा होता. मायर आणि दायान यांचं लक्ष निवडणुकीकडे असल्यामुळे त्यांनी
राजा हुसेनने दिलेल्या इशाऱ्याकडे जेवढं द्यायला पाहिजे तेवढं लक्ष दिलं
नाही.
आणि आता ५ ऑक्टोबरच्या दिवशी सुएझ कालव्याच्या आसपास असणारी शांतता भंग होण्याची पूर्ण चिन्हं दिसत होती.
मोसाद संचालक झमीरने एंजलने केलेला फोन प्रचंड गांभीर्याने घेतला होता. मोसादने अशा प्रसंगी जो प्रतिसाद द्यायचा असतो, तो कार्यान्वित केला आणि त्यानुसार झमीर ताबडतोब तेल अवीवहून लंडनला रवाना झाला. लंडनच्या गजबजलेल्या बॉंड स्ट्रीटवर एका सहा मजली इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर असलेल्या एका फ्लॅटमध्ये झमीर आणि एंजल भेटत असत. हा फ्लॅट तिथल्या एका ज्यू इस्टेट एजंटने मोसादला कमी दरामध्ये मिळवून दिला होता. एंजल आणि इतर परकीय मोसाद हस्तकांना सुरक्षित वातावरणात भेटणं हा त्यामागचा उद्देश होता. त्याने या घरात प्रवेश करताच १० मोसाद एजंट्सनी आजूबाजूच्या रस्त्यांवर आणि इमारतींवर नजर ठेवायला सुरुवात केली. एंजलबरोबर एवढ्या भेटी होऊनसुद्धा जराही गाफील राहायला झमीर तयार नव्हता. समजा एंजल हा इजिप्शीयन गुप्तचर संघटनेचा दुहेरी हेर असला तर? समजा तसं नसलं, पण त्याची खरी ओळख इजिप्शीयन गुप्तचर यंत्रणेला समजली आणि त्यांनी त्याला अटक करून मुद्दामहून इझराईलच्या एका हेराला पकडण्यासाठी पाठवलं असलं तर? हा धोका पत्करण्याची मोसादची तयारी नव्हती.
झमीर लंडनला अर्थातच त्याच्या खऱ्या पासपोर्टवर आलेला नव्हता. ब्रिटिशांना काही कळावं अशी त्याची इच्छा नव्हती. त्याच्या मनावरचं दडपण वाढत होतं, कारण एंजलचाही पत्ता नव्हता. पण साधारण दुपारच्या सुमारास त्याला रोममधल्या मोसाद स्टेशनकडून एंजल रोममध्ये काही वेळ थांबला असल्याची आणि आता तिथून निघाला असल्याची बातमी समजली.
एंजल लंडनला रात्री साडेनऊ वाजता पोचला. तोही दुसऱ्या पासपोर्टवर प्रवास करत होता. त्याला झमीरपर्यंत पोचायला रात्रीचे ११ वाजले.
दरम्यानच्या काळात इझराईलमध्ये योम किप्पूर सणाची सुरुवात झाली होती.
सर्व काम थांबलं होतं. अगदी रेडिओ आणि टीव्ही यांचं प्रसारणसुद्धा.
रस्त्यांवर सामसूम होती. सरकारी आणि खाजगी कार्यालयांना सुट्ट्या जाहीर
झाल्या होत्या. इझराईलच्या सरहद्दींचं संरक्षण करणारे सैनिक पहारा देत
होते, पण त्यांचीही संख्या कमी होती.
एंजल आणि झमीर यांच्यात झालेली भेट जवळपास २ तास चालली. डुबीने दोघांमध्ये झालेल्या संभाषणाचा शब्दन् शब्द नोंदवून घेतला होता.
१ वाजता त्यांच्यातलं संभाषण संपल्यावर झमीरने एंजलला त्याची ठरलेली फी – एक लाख अमेरिकन डॉलर्स – चुकती केली आणि इझराईलला एक तातडीचा गुप्त संदेश पाठवण्याची तयारी केली. पण इझराईलच्या वकिलातीलाही योम किप्पूरची सुट्टी लागल्यामुळे हा संदेश इझराईलला पाठवणार कसा हा मोठा प्रश्न होता.
शेवटी झमीरचा पारा चढला. फ्रेडी ऐनी हा त्याचा प्रमुख सहाय्यक होता. त्याला आपला बॉस कुठेतरी गेलेला आहे, एवढं माहित होतं. झमीरने इझरेली वकिलातीत असलेल्या नाईट ड्युटी ऑपरेटरला सांगून त्याला उठवायला सांगितलं. जवळपास दीड तास प्रयत्न केल्यावर ऐनी फोनवर आला.
“एक काम कर. आधी तुझ्या चेहऱ्यावर थंड पाणी मार, आणि मग कागद आणि पेन्सिल घेऊन ये,” झमीर म्हणाला. ऐनीने तसं केल्यावर झमीरने त्याला संदेश लंडनहून सांगितला – आजच्या दिवसाच्या शेवटी कंपनी करारावर सह्या करेल.
फ्रेडी ऐनीला या संदेशाचा अर्थ जरी माहित नसला, तरी असा संदेश आल्यावर काय करायचं ते माहित होतं. त्याने ताबडतोब इझराईलच्या लष्करी आणि राजकीय नेत्यांना फोन करून हा संदेश द्यायला सुरुवात केली. या संदेशाचा अर्थ होता – आज युद्धाला सुरुवात होणार आहे.
नंतर सकाळ झाल्यावर झमीरने एक विस्तृत संदेश पाठवला. त्यात असं म्हटलं होतं – आज संध्याकाळी सूर्यास्ताच्या आधी इजिप्त आणि सीरिया यांचं सैन्य आपल्यावर आक्रमण करेल. आज आपल्या देशात सार्वजनिक सुट्टी आहे हे त्यांना माहित आहे आणि त्यांचा असा विश्वास आहे की ते आज रात्र व्हायच्या आत सुएझ कालव्याच्या आपल्या बाजूला पोचलेले असतील. ते ज्या पद्धतीने हा हल्ला करतील, त्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे. एंजलच्या मते सादात अजून उशीर करू शकत नाही, कारण त्याने इतर अरब देशांच्या प्रमुखांना वैयक्तिकरित्या शब्द दिलेला आहे, आणि तो आपलं वचन पाळणार आहे. त्यामुळे आज हल्ला होईल याची ९९.९ टक्के शक्यता आहे. त्यांना त्यांचा विजय होईल याची पूर्ण खात्री आहे. त्यामुळेच जर या योजनेबद्दल कुणाला समजलं, तर युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न होतील अशी त्यांना भीती वाटते आहे. रशिया या युद्धात तटस्थ राहणार आहे.
झमीरच्या या संदेशाने इझराईलच्या सुरक्षायंत्रणेत एकच खळबळ माजली. जरी झमीरच्या माहितीच्या सत्यतेबद्दल कुणी उघडपणे शंका घेतली नाही, तरी त्याचा हा संदेश बऱ्याच जणांना अतिरंजित वाटला. या लोकांमध्येच एक होता अमान (लष्करी गुप्तचर संस्था) चा प्रमुख जनरल एली झाईरा. झाईराच्या मते युद्धाची कोणतीही शक्यता नव्हती. जेव्हा मोसादने त्याला सुएझ कालव्याच्या इजिप्शीयन किनाऱ्यावर इजिप्तचे सैनिक आणि रणगाडे यांची वाढलेली संख्या दाखवून दिली, तेव्हा झाईराने ते उडवून लावलं. त्याच्या मते ही इजिप्तची एक चाल होती आणि इझराईलमध्ये घबराट पसरवणं हा त्यामागचा हेतू होता. त्याने हा आक्षेप नोंदवल्यावर मोसादने त्याला इझरेली सैन्याच्या ट्रान्समिटर्सनी टिपलेली आणि मोसादच्या के.जी.बी. मधल्या हस्तकांनी खात्री करून घेतलेली एक माहिती सांगितली. सोव्हिएत रशियाने इजिप्त आणि सीरियामध्ये जे लष्करी सल्लागार पाठवले होते, ते आणि त्यांचे कुटुंबीय यांना देश सोडून परत रशियाला जायला सांगण्यात आलं होतं, आणि हा आदेश मॉस्कोहून आला होता. असं का यावर झाईराकडे काहीही उत्तर नव्हतं.
झाईरा आणि त्याच्याप्रमाणे युद्ध होणार नाही असं मानणारे जे लोक होते, त्यांना असं वाटण्यामागे दोन कारणं होती. त्यांच्या मते इजिप्तने इझराईलवर हल्ला फक्त दोन गोष्टींची पूर्ण खात्री झाल्यावरच केला असता – सोव्हिएत रशियाकडून इजिप्तच्या वायुदलाला लढाऊ जेट विमानं, बॉम्बर्स आणि क्षेपणास्त्रं मिळाली पाहिजेत ही पहिली गोष्ट आणि इतर अरब राष्ट्रांनी इजिप्तला या युद्धासाठी सहकार्य करावं ही दुसरी गोष्ट. जोपर्यंत या दोन्हीही गोष्टी होत नाहीत, तोपर्यंत इजिप्त इझराईलवर हल्ला करणार नाही असं या लोकांचं म्हणणं होतं. त्यांच्या मते इजिप्त धमक्या देईल, गोळीबार करेल, पण प्रत्यक्ष युद्ध करायची हिम्मत करणार नाही.
या तर्काला तसा काही अर्थ नव्हता, कारण १९६७ च्या युद्धाच्या वेळीही या लोकांना इजिप्तबद्दल असंच वाटलं होतं, पण ते चुकीचं ठरलं होतं. त्यावेळी इजिप्तच्या सैन्यापैकी जवळपास ६०% सैन्य येमेनमध्ये तिथल्या सैन्याशी लढत होतं, आणि इझरेली सैन्याला ही खात्री होती, की येमेनमध्ये सैन्य अडकलेलं असताना नासर इझराईलवर आक्रमण करणार नाही. पण १५ मे १९६७ या दिवशी अचानक इजिप्तच्या फौजा सिनाई द्वीपकल्प पार करून इझरेली सीमारेषेच्या दिशेने झेपावल्या होत्या. त्याच वेळी नासरने सुएझ कालव्याच्या निरीक्षणासाठी असलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या निरीक्षकांना इजिप्तमधून हद्दपार केलं होतं आणि तांबडा समुद्र इझरेली जहाजांसाठी बंद केला होता. इझरेली सैन्याच्या हे त्याचवेळी लक्षात यायला पाहिजे होतं, की अपुरं सैन्य किंवा न झालेली तयारी वगैरे गोष्टींनी इजिप्तला काहीही फरक पडत नाही. इझराईल नष्ट करण्याची इच्छा ही एकमेव गोष्ट पुरेशी आहे. पण अवघ्या ६ दिवसांत इझराईलने ३ अरब राष्ट्रांच्या सैन्याला तीन वेगवेगळ्या ठिकाणी पाणी पाजलं आणि मध्यपूर्वेत आपणच बलाढ्य आहोत हे सिद्ध केलं. त्याच्या आनंदात हा मुद्दा सगळेजण विसरून गेले.
६ ऑक्टोबर १९७३ या दिवशी सकाळी पंतप्रधान गोल्डा मायर यांनी जी मंत्रिमंडळ आणि सैन्याधिकारी यांची एकत्रित बैठक बोलावली, त्यात इजिप्त आणि तिथल्या राज्यकर्त्यांचा बेभरवशी स्वभाव हा मुद्दा होताच. या बैठकीत झाईराला अनपेक्षितपणे काही मंत्र्यांचा पाठिंबाही मिळाला. याआधी दोनदा – नोव्हेंबर १९७२ मध्ये आणि मे १९७३ मध्ये एंजलने हल्ला होणार आहे, अशी शक्यता वर्तवली होती. दोन्हीही वेळेला हल्ला झाला नव्हता, पण त्याच्यामुळे इझराईलला मोठ्या प्रमाणात राखीव सैन्य मैदानात उतरवावं लागलं होतं. त्याचा खर्च जवळपास ३५ लाख अमेरिकन डॉलर्स एवढा झाला होता. शिवाय दोन्हीही वेळेला एंजलला पैसे द्यावे लागले होते ते वेगळंच.
शेवटी पंतप्रधान मायर यांनी तडजोड केली. इझराईल आपलं राखीव सैन्य पूर्णपणे उतरवणार किंवा कार्यरत करणार नाही, आणि सुएझ कालव्याच्या इजिप्शीयन बाजूवर प्रतिबंधात्मक हल्लेही चढवणार नाही. थोडक्यात, युद्ध सुरु करण्याची जबाबदार इजिप्तवर सोडून देणार, पण प्रतिकारासाठी तयार राहणार.
झमीर या बैठकीला हजर राहू शकला नाही, कारण तो लंडनहून निघाला होता, पण
इझराईलमध्ये उतरल्यावर त्याने पंतप्रधान आणि संरक्षणमंत्री यांची भेट घेतली
आणि युद्ध होणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला.
दुपारी २ वाजता तेल अवीवमधल्या जनरल झाईराच्या ऑफिसमध्ये त्याला त्याच्या
सहाय्यकाने एक टेलेक्स संदेश आणून दिला. तो वाचून झाईरा घाईघाईने ऑफिसच्या
बाहेर पडला.
जेमतेम पंधरा मिनिटांत इझराईलमधल्या महत्वाच्या शहरांमध्ये हवाई हल्ल्याच्या सूचना देणाऱ्या सायरन्सनी योम किप्पूरची शांतता भंग केली. युद्धाला सुरुवात झाली.
६ ऑक्टोबरला सुरु झालेल्या या युद्धाची २३ ऑक्टोबर या दिवशी अखेर झाली. युद्ध संपल्यावर अमानच्या अधिकाऱ्यांनी एंजलवर त्यांना जाणूनबुजून चुकीची माहिती दिल्याचा आरोप केला. त्यांच्या मते एंजलने संध्याकाळी हल्ला होणार असं सांगितलं होतं, पण प्रत्यक्षात हल्ला दुपारी २ च्या सुमारास सुरु झाला. या आरोपांमुळे वैतागलेल्या एंजलने युद्ध संपल्यावर हे शोधून काढलं, की हल्ल्याची वेळ संध्याकाळचीच होती, पण सादात आणि असद यांच्यात झालेल्या एका संभाषणानंतर ही वेळ आयत्या वेळी बदलण्यात आली. त्यावेळी एंजल लंडनहून कैरोला परत यायला निघाला असल्यामुळे त्याला याबद्दल काहीही माहित नव्हतं आणि त्यामुळे इझराईलपर्यंत ही बातमी पोचवण्याची कुठलीही व्यवस्था त्याच्याकडे नव्हती आणि तो त्याच्या राष्ट्राध्यक्षांना जाबही विचारू शकत नव्हता.
मोसादनेही याबद्दल आपला निषेध नोंदवला. मोसाद संचालक झ्वी झमीरने अत्यंत कडक शब्दांमध्ये अमान अधिकाऱ्यांना, विशेषतः अमानचा प्रमुख एली झाईराला सांगितलं की मोसादसाठी एंजल हा इजिप्तच्या सरकार मध्ये असलेला हेर आहे, पण अमानचे अधिकारी त्याला इजिप्तमध्ये असलेला इझराईलचा प्रतिनिधी समजताहेत, ज्याने प्रत्येक बातमी, अगदी खडानखडा आणि तपशीलवार द्यायलाच पाहिजे. त्याने त्यांना ही आठवण करून दिली की एंजल हा एक हेर असल्यामुळे जी माहिती त्याला मिळते आणि जी माहिती तो स्वतःला लपवून देऊ शकतो, ती माहिती तो देतोय. काही माहिती ही एवढी गुप्त असते, की ती अत्यंत थोड्या लोकांना माहित असते. जर ती इझराईलला समजली हे इजिप्तच्या गुप्तचर यंत्रणेला समजलं, तर ती माहिती ज्या थोड्या लोकांना आहे, त्यांच्यावर पाळत ठेवून ते त्या हेराला अटक करू शकतात. त्यामुळे माहिती असली, तरी कधीकधी सांगता येत नाही किंवा सांगितली, तरी आपल्या हेराच्या सुरक्षिततेसाठी ते जाहीर करता येत नाही.
युद्धाच्या दरम्यान एंजलने इजिप्त आणि इझराईल यांच्यात मोठा संघर्ष टाळण्याचे अनेक प्रयत्न केले. उदाहरणार्थ जेव्हा इजिप्तने सिनाईवर स्कड क्षेपणास्त्रांचा मारा केला, तेव्हा इझराईलने आपली एक संपूर्ण डिव्हिजन सिनाईच्या रोखाने पाठवली होती, पण इजिप्त अजून क्षेपणास्त्रांचा मारा करणार नाही, या एंजलने दिलेल्या माहितीमुळे इझरेली सैन्य सिनाई ओलांडून इजिप्तमध्ये घुसलं नाही.
योम किप्पूर युद्धाच्या दोन आघाड्या होत्या. नैऋत्य – इजिप्तविरुद्ध आणि ईशान्य – सीरियाविरुद्ध. नैऋत्य आघाडीवर इझरेली सैन्य संरक्षक पवित्र्यात होतं, पण ईशान्येला त्यांनी सगळी कसर भरून काढत पूर्ण आक्रमक भूमिका स्वीकारली होती. १९६७ मध्ये गोलान टेकड्यांचा जो भाग इझराईलच्या ताब्यात आला होता, त्याव्यतिरिक्त अजून काही टेकड्या त्यांनी यावेळी ताब्यात घेतल्या आणि तिथून सीरियन सैन्याला उखडून टाकलं. युद्ध थांबलं, त्यावेळी इझरेली तोफखान्याच्या दोन डिव्हिजन्स सीरियाची राजधानी दमास्कसपासून अवघ्या २० मैलांवर पोचल्या होत्या. नैऋत्येला इजिप्शीयन सैन्य सुएझ कालव्याच्या इझरेली बाजूला ५ मैल आत घुसलं पण त्यांना या यशाचं रुपांतर अंतिम विजयात करता आलं नाही. त्यांना चकवून इझरेली सैन्याच्या दोन डिव्हिजन्सनी त्यांना कोंडीत पकडलं आणि माघार घ्यायला लावली.
कागदोपत्री जरी इझराईलने युद्ध गमावलं नव्हतं, तरीही मानसशास्त्रीय दृष्ट्या या युद्धाचा इझरेली राजकीय आणि लष्करी नेतृत्वावर खोलवर परिणाम झाला. अवघ्या ६ वर्षांपूर्वी मिळवलेला निर्णायक विजय यावेळी इझराईलला मिळवता आला नव्हता. सिनाईसारख्या अवाढव्य प्रदेशात इझरेली सैन्य ठेवण्याचा वेडेपणाही लष्कराच्या लक्षात आला होता. या युद्धातली इझरेली मनुष्यहानीसुद्धा भरपूर होती – २६५६ मृत्यू आणि ७२५१ जखमी.
इजिप्तमध्येही राष्ट्राध्यक्ष सादातला इजिप्तच्या अपुऱ्या ताकदीचा अंदाज आला होता. त्यामुळे या युद्धानंतर इजिप्त आणि इझराईल यांच्यात प्रथम युद्धबंदी, नंतर परस्परांच्या सरहद्दींचा आदर करण्याचे करार आणि नंतर मैत्री या प्रक्रियेला सुरुवात झाली. तत्कालीन अमेरिकन अध्यक्ष जिमी कार्टर यांच्या पुढाकाराने अमेरिकेतील कँप डेव्हिड या ठिकाणी सादात आणि इझराईलचे तत्कालीन पंतप्रधान मेनॅचम बेगिन यांच्यात करार झाला आणि इजिप्तने इझराईलला मान्यता दिली आणि हातमिळवणी केली. मोरोक्को आणि जॉर्डन यानंतर अजून एक अरब देश इझराईलचा मित्र झाला. बेगिन आणि सादात एकमेकांचे व्यक्तिगत मित्र बनले. इझराईलबरोबर केलेल्या कराराची सादातला मात्र दुर्दैवाने किंमत चुकवायला लागली. इजिप्तमध्ये झालेल्या राज्यक्रांतीच्या वर्धापनदिनाच्या दिवशी संचलनात मानवंदना स्वीकारत असताना सादातचा इजिप्शीयन सैन्यातील असंतुष्ट आणि पुराणमतवादी अधिकाऱ्यांनी खून केला. त्याच्या अंत्ययात्रेत बेगिन स्वतः सहभागी झाले होते.
पण या सगळ्या नंतर घडलेल्या गोष्टी. युद्ध झाल्यामुळे झमीरचं एंजलने सांगितलेल्या माहितीचं विश्लेषण बरोबर होतं, हे सिद्ध झालं. युद्ध संपल्यावर मोसादने म्युनिक ऑलिंपिक खेळांमध्ये मारल्या गेलेल्या इझरेली खेळाडूंच्या हत्येचा सूड घेण्यासाठी चालू केलेलं ऑपरेशन राथ ऑफ गॉड परत हातांत घेतलं. झमीर मोसादमधून निवृत्त झाला आणि त्याची जागा जनरल यित्झाक होफीने घेतली.
निवृत्तीनंतर झमीरबद्दल इझरेली सुरक्षायंत्रणेचं आणि लोकांचंही मत चांगलं होतं. जेव्हा त्याने योम किप्पूर युद्धाबद्दल आधी सूचना दिली होती, हे बाहेर आलं, तेव्हा त्याचं अजूनच कौतुक व्हायला लागलं. जर त्यावेळच्या नेतृत्वाने झमीरचं म्हणणं ऐकलं असतं तर इझराईलचं एवढं नुकसान झालं नसतं. अनेक मंत्र्यांनी यावर असं म्हटलं, की इझराईलने त्यावेळी इजिप्तवर हल्ला केला नाही, कारण युद्ध सुरु केल्याचा ठपका इझराईलला नको होता. यावर लोकांचं असं मत पडलं, की १९६७ मध्ये इझराईलनेच इजिप्तवर हल्ला करून इजिप्तचं वायुदल उध्वस्त केलं होतं. तेव्हा असा विचार इझरेली नेतृत्वाने का केला नाही? शिवाय महत्वाचं काय आहे – देशाचं रक्षण की आंतरराष्ट्रीय जनमत?
काही वर्षांनी तेल अवीव विद्यापीठातले इतिहासकार डॉ. उरी बार-योसेफ यांचं या युद्धावर लिहिलेलं पुस्तक प्रसिद्ध झाले. या पुस्तकात झमीर आणि एंजल यांची मुक्तकंठाने स्तुती केली होती. योसेफ यांच्या मते एंजलच्या सूचनेमुळेच गोलान टेकड्यांच्या प्रदेशात इझरेली तोफखाना वेळेवर पोचू शकला आणि नाफाहून इझराईलची सीमारेषा ओलांडू पाहणाऱ्या सीरियन सैन्याला थोपवू शकला.
हे पुस्तक प्रकाशित झाल्यावर गदारोळ झाला. जनमताच्या रेट्यामुळे इझरेली
सरकारने एक चौकशी आयोग नेमला. योम किप्पूर युद्धाच्या आधी आणि दरम्यान कशा
प्रकारे निर्णय घेतले गेले, त्याची छाननी करणं हे या आयोगाचं काम होतं.
सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश शिमॉन अग्रानॅट हे या आयोगाचे अध्यक्ष
होते. या आयोगाने जनरल एली झाईरा आणि इतर अनेक अमान अधिकाऱ्यांच्या
बडतर्फीची शिफारस केली, आणि सरकारने ती अंमलातही आणली.
पण एक प्रश्न अजूनही अनुत्तरीत होता. एंजल हा नक्की कोण आहे? इझराईलमध्ये
या प्रश्नावरून बराच उहापोह झाला. काही कादंबऱ्या आणि चित्रपटसुद्धा या
विषयाबाबत निर्माण झाले. अर्थातच त्यांच्यात मांडलेले तर्क चुकीचे होते. एक
गोष्ट नक्की होती – एंजल हा इजिप्तच्या सरकारमधला माणूस होता आणि तो
सत्ताकेंद्राच्या अत्यंत जवळ होता. पण तो नक्की कोण होता, याबद्दल काही
मोजके अधिकारी सोडले तर कोणालाही माहित नव्हतं.
इकडे जनरल झाईरा आपल्या बडतर्फीमुळे संतापला होता. त्याने आपण निर्दोष
आहोत हे सिद्ध करण्यासाठी एक पुस्तक लिहायचं ठरवलं. या पुस्तकात तो योम
किप्पूर युद्धाबद्दल त्याची बाजू मांडणार होता, जी त्याच्या मते इझरेली
सरकारने त्याला मांडू दिली नव्हती. त्याला आपण एंजलच्या म्हणण्यावर का
विश्वास ठेवला नाही, याचं स्पष्टीकरण द्यायचं होतं, कारण त्याने एंजलने
दिलेली सूचना न स्वीकारणं हे त्याच्या बडतर्फीमागचं एक प्रमुख कारण होतं.
त्याने आपल्या पुस्तकात एंजलचं नाव जाहीर केलं नाही, पण असं प्रतिपादन
केलं, की एंजल हा मोसादची दिशाभूल करण्यासाठी इजिप्शीयन गुप्तचर यंत्रणेने
पाठवलेला एक दुहेरी हेर होता. इझराईलमधल्या काही पत्रकारांनी झाईराला
पाठिंबा दिला. त्यांच्या मते एंजल हा दुहेरी हेर होता आणि त्याचं काम
म्हणजे मोसादला काही खरी आणि बरीचशी खोटी माहिती पुरवणं हे होतं. ही खोटी
माहिती इतकी बेमालूमपणे खऱ्या माहितीत दडवलेली होती, की मोसादच्या
विश्लेषकांना ती वेगळी काढणं जवळपास अशक्य होतं. आणि मग एंजलवर जेव्हा
मोसादचा पूर्ण विश्वास बसला, तेव्हा तो एक अशी खोटी माहिती मोसादला देणार
होता, की त्यामुळे मोसादची यंत्रणा उध्वस्त झाली असती.
वर्तमानपत्रातली स्टोरी म्हणून हा जबरदस्त धमाका होता. त्यामुळे झाईराची भूमिकाही स्पष्ट होत होती, पण एकच प्रश्न होता. झाईरा आणि त्याच्या पाठीराख्यांचं एका गोष्टीकडे दुर्लक्ष झालं होतं. एंजलच्या पहिल्या अहवालापासून ते आत्तापर्यंत सगळी माहिती १०० % खरी होती. मोसादने ती पडताळूनही पाहिली होती. मग एंजलने नक्की कुठे मोसादचा विश्वासघात केला होता?
शिवाय जेव्हा इजिप्तचं सैन्य सुएझ कालव्याच्या इजिप्शीयन किनाऱ्यावर जमा झालं होतं, तेव्हा एंजल हे मोसादला सांगू शकला असता, की इजिप्तचा युद्ध करण्याचा काहीही हेतू नाही. सैन्याची जमवाजमव ही फक्त एक हूल आहे. पण त्याने तसं केलं नव्हतं. त्याने डुबीशी संपर्क साधला – केमिकल्स हा सांकेतिक शब्द वापरला, मग तो स्वतः लंडनमध्ये आला आणि झमीरला भेटला, त्याने ठासून सांगितलं की हल्ला होणार आहे आणि त्याप्रमाणे हल्ला झालासुद्धा. उलट ज्या वेळेला होणार असं एंजलने सांगितलं होतं, त्याच्याआधी झाला. एंजलची ही वागणूक एका दुहेरी हेरापेक्षा पूर्णपणे वेगळी होती.
पण झाईरा ऐकायला किंवा थांबायला तयार नव्हता. २००४ मध्ये त्याच्या
पुस्तकाची नवीन आवृत्ती प्रकाशित होणार होती. त्यावेळी त्याने
वर्तमानपत्रांमध्ये आणि टेलिव्हिजनवर मुलाखती द्यायचा सपाटा लावला. या
कार्यक्रमांमधला एक कार्यक्रम प्रसिद्ध इझरेली पत्रकार डॅन मार्गालीतचा टॉक
शो होता. त्यात झाईराने एंजलचं खरं नाव जाहीर केलं.
अश्रफ मारवान.
अश्रफ मारवान हे नाव जाहीर होताच इजिप्तमध्येच नव्हे, तर संपूर्ण अरब
जगात प्रचंड खळबळ उडाली. मारवान इझरेली हेर असू शकेल याची कोणालाच कल्पना
नव्हती. सीरियन प्रसारमाध्यमांनी तर एली कोहेननंतरचा सर्वात मोठा
विश्वासघात या शब्दांत याचं वर्णन केलं. खुद्द इजिप्तमध्ये सरकारला तोंड
दाखवायला जागा राहिली नाही.
कोण होता अश्रफ मारवान?
त्याचं नाव जनरल झाईराने जाहीर करण्याच्या ३९ वर्षे आधी – १९६५ मध्ये एका सुंदर आणि लाजाळू इजिप्शीयन तरुणीची एका देखण्या तरुणाशी कैरोमधल्या हेलिओपोलिस टेनिस कोर्टवर ओळख झाली. या तरुणीचं नाव होतं मूना. ती तिच्या वडिलांची तिसरी मुलगी होती. अभ्यासात ती हुशार होती, असं कोणीही म्हटलं नसतं. तो मान तिच्या मोठ्या बहिणीचा होता. पण तिच्या सौंदर्याबद्दल लोक बोलायचे. मूना तिच्या वडिलांची प्रचंड लाडकी होती. त्यामुळे तिने जेव्हा या तरुणाबद्दल आपल्या वडिलांना सांगितलं, तेव्हा त्यांनी त्याची माहिती काढली. हा तरुण एका चांगल्या घराण्यातला होता. त्याचे वडील सैन्यात अधिकारी होते. तो स्वतः रसायनशास्त्रात पदवी मिळवून सैन्यात दाखल झाला होता आणि मूना त्याच्या प्रेमात पडली होती – अगदी सपशेल पाय घसरून पडली होती.
या तरुणाला मूनाचे वडील कोण आहेत, हे सुरुवातीला माहित नव्हतं. पण तिने
लवकरच त्याची आपल्या घरच्या लोकांशी भेट घडवून आणली आणि तेव्हा त्याला ते
समजलं. ते इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष होते. गमाल अब्दुल नासर.
मूनाने योग्य निवड केलेली नाही, असं नासरचं म्हणणं होतं, पण मूना त्याचीच
मुलगी होती. तेवढीच हट्टी. ती काहीही ऐकायला तयार नव्हती. शेवटी नासरने
तिच्यापुढे आपला अहंकार आवरता घेतला आणि त्या तरुणाच्या वडिलांना भेटून
लग्नाची तारीख पक्की केली. जुलै १९६६ मध्ये मूना आणि तो तरुण विवाहबद्ध
झाले. राष्ट्राध्यक्षांचा जावई असल्यामुळे या तरुणाची नेमणूक प्रथम
सैन्याच्या रासायनिक संशोधन विभागात आणि नंतर राष्ट्राध्यक्षांच्या विज्ञान
आणि तंत्रज्ञान मंत्रालयात करण्यात आली.
या तरुणाचं नाव होतं अश्रफ मारवान. त्याला आपल्या नोकरीत काही आव्हानात्मक वाटत नव्हतं. त्याने नासरला लंडनमध्ये रसायनशास्त्राचं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्याची परवानगी मागितली. नासरनेही दिली, पण मारवान लंडनला एकटाच गेला. इजिप्तच्या वकिलातीतल्या अधिकाऱ्यांची त्याच्यावर करडी नजर असायची.
पण मारवान जरी प्रशिक्षित नसला, तरी त्याची वृत्ती जातिवंत हेराची होती. या अधिकाऱ्यांना चकवून लंडनमधल्या पार्टीजमध्ये रात्रभर धमाल करण्यात तो निष्णात होता. तिथे त्याच्या अनेक मैत्रिणी झाल्या आणि त्यांच्यावर पैसे उधळल्यामुळे त्याला पैशांची चणचण भासू लागली. आता त्याला त्याचे शौक पूर्ण करेल असं कुणीतरी हवं होतं, आणि शोधा म्हणजे सापडेल या न्यायाने त्याने त्या व्यक्तीला शोधून काढलं.
तिचं नाव होतं सुआद अल सबाह आणि ती एका कुवेती शेखची पत्नी होती. तिचं आणि अश्रफचं प्रकरण सुरु झालं, पण नासरने अश्रफच्या मागे सोडलेल्या हेरांमुळे ते नासरला समजलं. त्याने अश्रफला परत बोलावलं आणि आपल्या मुलीपुढे त्याच्या सर्व लफड्यांचा पाढा वाचून तिने त्याला ताबडतोब घटस्फोट द्यावा अशी मागणी केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मूनाने तिच्या वडिलांची ही मागणी सरळ फेटाळून लावली, आणि उलट त्यांनाच त्याला लंडनमध्ये एकटं पाठवल्याबद्दल दोष दिला. पण नासर आता परत अश्रफला लंडनला पाठवायला तयार नव्हता. त्याने मारवानला फक्त त्याचा प्रबंध त्याच्या शिक्षकांना देण्यापुरतं लंडनला जायला परवानगी दिली. बाकी वेळात त्याला नासरच्या ऑफिसमध्ये एका सेक्रेटरीचं काम करायचं होतं. त्याचा पगारही त्याच्या हातात दिला जात नसे. नासरचे लोक त्या पगारातून त्याने सुआद अल सबाहकडून घेतलेले पैसे परत करत असत.
कदाचित यामुळेच असेल पण १९६९ मध्ये लंडनला आपला शेवटचा प्रबंध सादर करायला आलेल्या अश्रफ मारवानने नासरच्या विरोधात जायचं ठरवलं. नासरने त्याच्या घरच्यांसमोर केलेला त्याचा अपमान तो विसरला नव्हता. त्याने इझराईलच्या वकिलातीत फोन केला आणि तिथल्या एका अधिकाऱ्याशी तो बोलला. त्याने आपण कोण आहोत, हे त्या अधिकाऱ्याला स्पष्टपणे सांगितलं आणि आपलं नाव मोसादकडे पाठवण्याची विनंती केली. त्या अधिकाऱ्याला हा कुठलातरी खोडसाळपणा वाटल्यामुळे त्याने त्याकडे लक्ष दिलं नाही. चिडलेल्या मारवानने दुसरा कॉल केला. हा कॉल ज्या अधिकाऱ्याने घेतला, त्याने त्याला परत एकदा कॉल करायला सांगितलं.
या वेळी मारवानचा कॉल श्मुएल गोरेन या मोसाद केस ऑफिसरने घेतला.
इजिप्तच्या सरकारी वर्तुळातल्या घटनांवर नजर ठेवणं हे गोरेनचं काम
असल्यामुळे त्याला अश्रफ मारवानच्या मूना नासरशी झालेल्या लग्नाबद्दल माहित
होतं. त्याने मारवानचं बोलणं ऐकून घेतलं, आणि त्याला यापुढे इझराईलच्या
वकिलातीत फोन न करण्याची विनंती केली आणि एक दुसरा नंबर दिला. त्याचबरोबर
त्याने ही माहिती मोसाद संचालक झ्वी झमीर आणि त्झोमेत या मोसादमधील परकीय
हस्तकांच्या नेमणुकीसाठी जबाबदार असलेल्या विभागाचा प्रमुख रेहाविया वार्दी
यांना दिली.
वार्दीला हा फोनकॉल आणि मारवानने दिलेली ऑफर हे संशयास्पद वाटत होतं. हा
कदाचित इझराईलच्या हेरांना अडकवण्याचा डाव असेल, असं त्याचं म्हणणं होतं.
झमीरला तसं असू शकेल हे मान्य होतं, पण त्याचबरोबर इजिप्तच्या
राष्ट्राध्यक्षांचा जावई – आणि तोही आपल्या सासऱ्यावर चिडलेला – ही संधी
सोडायला तो तयार नव्हता. त्याने वार्दीला मारवानबद्दल सगळी माहिती
काढण्याचा आदेश दिला. वार्दीची माणसं लगेच कामाला लागली. मारवानची मदिरा
आणि मदिराक्षी यांची आवड, त्याला असलेली पैशांची चणचण, त्याचे आणि त्याच्या
सासरच्या लोकांचे बिघडलेले संबंध वगैरे सगळ्या गोष्टी जेव्हा मोसादला
समजल्या, तेव्हा त्यांनी एक संधी घेऊन बघायचं ठरवलं.
गोरेनने मारवानशी संपर्क साधला. तो कैरोमध्ये होता, पण प्रबंधातल्या काही
चुका सुधारण्याच्या निमित्ताने तो परत लंडनला आला, आणि गोरेनला भेटला.
त्याने गोरेनला सरळ सांगितलं, की इजिप्तच्या ६ दिवसांच्या युद्धात पराभव
झाल्यामुळे तो निराश झाला होता, आणि हा पराभव नासरच्या धोरणांमुळे झाला
त्यामुळे त्याला नासरच्या विरोधातली माहिती इझराईलला द्यायची होती. गोरेनने
हे सगळं ऐकून घेतलं. पण मारवान हे काम फुकटात करणार नव्हता. त्याला
प्रत्येक माहितीबद्दल १ लाख अमेरिकन डॉलर्स एवढी प्रचंड रक्कम हवी होती.
गोरेनने हे ऐकल्यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही. तो मनातून हबकला होता. आजवर मोसादने एवढी मोठी रक्कम कुणालाही दिलेली नव्हती. त्याने मारवानला आधी काही गुप्त कागदपत्रं आणून दाखवायला सांगितली. यामागे मोसादचा तिहेरी हेतू होता. मारवान जसा दावा करतोय, त्याप्रमाणे तो खरोखरच गुप्त कागदपत्रं आणू शकतो का हे पडताळून पाहणं हा एक; तो इजिप्शीयन गुप्तचर यंत्रणेचा दुहेरी हेर नाही, हे पाहणं हा दुसरा आणि त्याला त्या कागदपत्रांबरोबर अडकवणं, जेणेकरून तो नंतर पलटला, तर त्याचा त्याच्याचविरुद्ध वापर करता येईल हा तिसरा.
मारवानने जास्त वेळ लावला नाही. २२ जानेवारी १९७० या दिवशी त्याने नासरची सोव्हिएत रशियाच्या लष्करी नेत्यांबरोबर मॉस्कोमध्ये झालेली जी बातचीत होती, त्याचा पूर्ण अहवाल मोसादकडे दिला. या बैठकीत नासरने रशियाकडे लांब पल्ल्याच्या बॉम्बर विमानांची मागणी केलेली होती.
मोसाद विश्लेषकांचे डोळे ही माहिती पाहून नुसते चमकले नाहीत, तर पांढरे झाले. असं काही यापूर्वी त्यांच्याकडे आलेलं नव्हतं. मारवान हा दुहेरी हेर नाही हे आता स्पष्ट झालं होतं. झमीरने डुबीची मारवानबरोबर भेटणारा एजंट म्हणून नेमणूक केली, आणि लंडनमध्ये त्यांच्या भेटीसाठी एक घर विकत घेण्यात आलं. या घरात जी बातचीत होणार होती, ती रेकॉर्ड करण्यासाठी अद्ययावत उपकरणं बसवण्यात आली.
कधी भेटायचं, हे मारवान ठरवत असे. तो नियमितपणे डुबीला भेटत नसे. जेव्हा
त्याच्याकडे सांगण्यासारखं काही असेल, तेव्हाच तो भेटायचा. हे मोसादला
पसंत नव्हतं, पण ही मारवानची मागणी असल्यामुळे त्यांचा नाईलाज होता.
मारवानला स्त्रियांची आवड होती हे माहित असल्यामुळे डुबीने लंडनमधल्या
कॉलगर्ल्सचं एक नेटवर्क तयार केलं होतं. या सगळ्या कॉलगर्ल्स ज्यू होत्या.
जेव्हा मारवानला भेटायचं असे, तो या कॉलगर्ल्सपैकी एखादीला फोन करत असे. ती
मग डुबीला ते कळवत असे. साधारण आपल्या प्रत्यक्ष भेटीच्या एक आठवडा नंतरची
तारीख मारवान सांगत असे.
एक हेर म्हणून मारवान जी माहिती मोसादला पुरवत होता, ती पहिल्या दर्ज्याची
होती. इजिप्त, इजिप्शीयन सैन्य, इतर अरब राष्ट्रांशी इजिप्तचे असलेले
संबंध, इजिप्त-रशिया संबंध, या आणि इतर असंख्य विषयांवर मारवानने मोसादला
माहिती दिली.
मारवान जरी डुबीशी संपर्क साधायचा, तरी त्याचं प्रत्यक्ष बोलणं कर्नल मायर मायर हे जरा विचित्र नाव असलेल्या अमान अधिकाऱ्याबरोबर व्हायचं. कर्नल मायर हा अमानच्या इजिप्शीयन सैन्य आणि त्यांच्या रणनीतीचा अभ्यास करणाऱ्या विभागाचा प्रमुख होता.
२८ सप्टेंबर १९७० या दिवशी नासरचा मृत्यू झाला आणि त्याची जागा अन्वर सादातने घेतली. सादात हा नासरएवढ्या धडाडीचा माणूस नाही, असं मोसादमधल्या इजिप्त तज्ञांचं म्हणणं होतं. त्यांच्यामते तो युद्धाचा धोका पत्करण्याची संधी फार कमी होती. खुद्द इजिप्तमध्येही लोकांचं हेच मत होतं.
मारवानला मात्र वेगळा संशय येत होता. नासरच्या छायेतून बाहेर येण्यासाठी आणि आपली वेगळी ओळख आणि जरब सैन्यावर प्रस्थापित करण्यासाठी सादात इझराईलवर हल्ला करू शकतो, असं त्याचं मत होतं. त्यामुळे त्याने सादातच्या बरोबर राहायचं ठरवलं. सादातने त्याला आपल्या अगदी जवळच्या विश्वासू सहकाऱ्यांमध्ये जागा दिली.
मे १९७१ मध्ये सादातविरुद्ध इजिप्शीयन लष्कराच्या काही सोव्हिएतवादी अधिकाऱ्यांनी उठाव केला. मोसादला याची कुणकुण आधी लागली होती. त्यांनी मारवानला ही माहिती दिल्यावर मारवानने सादातला सावध केलं. या कटात इजिप्शीयन सरकारमधले अनेक महत्वाचे लोकही सहभागी झाले होते – माजी उपराष्ट्राध्यक्ष अली साबरी, माजी युद्धमंत्री महमूद फावझी, गृहमंत्री शारावी गुमा, आणि इतर बरेच लोक होते. सादात अलेक्झांड्रिया विद्यापीठाला भेट देत असताना त्याला ठार मारून सत्ता हस्तगत करायची त्यांची योजना होती. पण सादातला मिळालेल्या इशाऱ्यामुळे हे कट करणारे लोक पकडले गेले. त्यावेळी सादातच्या बाजूला अश्रफ मारवान ठामपणे उभा होता.
त्याची फळं त्याला मिळालीच. तो आता राष्ट्राध्यक्षांचा विशेष सल्लागार बनला होता. प्रसारमाध्यमांशी कशा प्रकारे वागायचं. यावर तो सादातला सल्ला देत असे. सादातच्या सर्व परदेश दौऱ्यांमध्ये आणि बैठकींमध्ये तो सहभागी होत होता.
जसजशी मारवानची सादातशी जवळीक वाढत गेली, तसतशी मोसादला त्याच्याकडून मिळणारी माहितीसुद्धा सुधारत गेली. १९७१ मध्ये सादातने मॉस्कोला अनेक फेऱ्या मारल्या आणि सोव्हिएत युनियनचे प्रमुख असलेल्या लिओनिद ब्रेझनेव्ह यांना एक भलीमोठी यादी दिली. या यादीवर असलेली शस्त्रास्त्रं त्याला इझराईलवर हल्ला करण्यासाठी हवी होती. या यादीत असलेलं एक नाव होतं मिग २५ विमानाचं. ही संपूर्ण यादी मारवानमुळे मोसादच्या हातात पडली. नुसती ही यादीच नव्हे, तर ब्रेझनेव्ह आणि सादात यांच्यात झालेल्या संभाषणाचा प्रत्येक शब्द मारवानने मोसादपर्यंत पोचवला.
मोसाद संचालक झमीर मारवानमुळे प्रचंड प्रभावित झाला होता. त्याने नियम मोडून मारवानची स्वतः भेट घेतली. तेव्हाच त्याला एक विलक्षण गोष्ट समजली. मोसाद ही फक्त एक गुप्तचर संघटना होती, जिला मारवान इजिप्तमधली माहिती पुरवत होता. त्याशिवाय अमेरिकेची सी.आय.ए., ब्रिटनची एम.आय.६ आणि इटालियन सिस्मी (SISMI) या सर्व गुप्तचर संस्थांकडून त्याला पैसे मिळत होते. हे सगळं निर्वेधपणे चालू होतं, कारण त्याने कधीही त्याला पैसे देणाऱ्या संघटनांच्या बातम्या एकमेकांना सांगितल्या नाहीत. योम किप्पूर युद्ध सुरु होण्याच्या वेळेस झमीरला लंडनला भेटण्याआधी मारवानने रोममध्ये जाऊन सिस्मीला तीच बातमी दिली होती.
त्याच्या या विलक्षण प्रकारांमुळे मोसादला एकदा फायदाही झाला होता. योम किप्पूर युद्धाच्या एक महिना आधी लीबियन सरकारने इजिप्तची मदत मागितली होती. लीबियाचा हुकूमशहा गद्दाफीची इझरेली विमानसेवा एल अॅलचं एक विमान पाडायची इच्छा होती. त्यासाठी तो पॅलेस्टिनी अतिरेक्यांची मदत घेणार होते. या अतिरेक्यांची या विमानाने रोमच्या विमानतळावरून उड्डाण केल्यावर ते उडवून द्यायची इच्छा होती.
हे करून गद्दाफीला इझराईलवर सूड उगवायचा होता. १९७३ च्या फेब्रुवारी महिन्यात सिनाईवरून उडणारं एक लीबियन नागरी विमान इझराईलच्या वायुदलाने गैरसमजातून पाडलं होतं. पॅलेस्टिनी दहशतवादी एका विमानाचं अपहरण करून, त्यात भरपूर स्फोटकं भरून ते इझराईलच्या एखाद्या मोठ्या शहरात भर वस्तीत कोसळवणार आहेत, अशी मोसादकडे माहिती होती. जेव्हा हे लीबियन झेंडा असलेलं विमान सिनाईवरून उडताना इझरेली वायुदलाच्या रडारवर दिसलं, तेव्हा वायुदलाने सर्वात आधी या विमानाला स्वतःची ओळख पटवून द्यायला सांगितलं. जेव्हा या विमानाच्या पायलटने तसं केलं नाही, तेव्हा वायुदलाच्या दोन लढाऊ विमानांनी या विमानाला घेरलं आणि ते जमिनीवर पाडण्यात आलं. इझरेली वायुदलाला असं वाटलं की हे तेच दहशतवाद्यांनी पाठवलेलं विमान आहे. प्रत्यक्षात ते नागरी विमान आहे, हे नंतर उघडकीस आलं. एका धुळीच्या वादळात सापडल्यामुळे हे विमान मार्ग भरकटून इकडे तिकडे फिरत होतं. जेव्हा इझरेली वायुदलाने या विमानाकडे संदेश पाठवला, तेव्हा त्याच्या पायलटला तो नीट समजलाच नाही. परिणामी १०८ निरपराध लोकांना आपले प्राण गमवावे लागले.
जेव्हा ही सगळी माहिती समोर आली, तेव्हा इझराईलने बिनशर्त माफी मागितली
आणि आपली चूक मान्य केली. पण गद्दाफीचं त्याने समाधान होण्यासारखं नव्हतं.
अमीन अल हिंदी या फताहच्या कुख्यात दहशतवाद्याकडे एल अॅलचं विमान उडवण्याची
कामगिरी सोपवण्यात आली. त्याच्या गटात ५ लोक होते. सादातने गद्दाफीला मदत
करायचं ठरवलं आणि रशियन बनावटीची दोन स्त्रेला क्षेपणास्त्रं
त्यांच्यापर्यंत पोचवायची जबाबदारी अश्रफ मारवानवर सोपवली.
मारवानने या क्षेपणास्त्रांचे सुटे भाग राजनैतिक पत्रव्यवहाराचा भाग
(diplomatic courier) म्हणून रोमला पाठवले. ते असे पाठवले, त्यामुळे
त्यांची तपासणी झाली नाही. रोममध्ये त्याने हे सुटे भाग अमीन अल
हिंदीपर्यंत पोचवण्यासाठी एक विचित्र पद्धत वापरली. तो आणि अल हिंदी एका
गालिचे विकणाऱ्या प्रसिद्ध दुकानात गेले आणि दोन गालिचे विकत घेऊन त्यांनी
ते सुटे भाग अतिरेक्यांच्या अड्ड्यापर्यंत पोचवले.
मारवानने या सगळ्या घडामोडी मोसादपर्यंत पोचवल्या होत्या, आणि त्यांनी सिस्मीच्या लोकांना सावध केलं होतं. त्यामुळे ६ सप्टेंबर या दिवशी इटालियन पोलिसांच्या स्पेशल युनिटने या अतिरेक्यांच्या अड्ड्यावर धाड टाकली आणि क्षेपणास्त्रांचे सुटे भाग जप्त केले. सगळ्या दहशतवाद्यांनाही अटक झाली.
या घटनेनंतर एका महिन्याने योम किप्पूर युद्धाला सुरुवात झाली.
युद्ध संपल्यावरही मारवान सादातचा निकटवर्तीय होता. त्याने सादातची अनेक कामं केली. पण हळूहळू सादातवरचा त्याचा प्रभाव कमी व्हायला लागला. इझराईल आणि इजिप्त यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाल्यावर तर इजिप्तमधून गुप्त माहिती मिळवण्याची मोसादला एवढी गरज राहिली नाही.
या सगळ्या गोष्टींमुळे मारवानने त्याची दुसरी कारकीर्द सुरु केली. इतकी
वर्षे तो मोसादसह बाकीच्या गुप्तचर संघटनांकडून पैसे मिळवत होता. ते पैसे न
उधळता त्याने अत्यंत काळजीपूर्वक गुंतवले होते. इजिप्त, सौदी अरेबिया आणि
संयुक्त अरब अमिराती यांनी एकत्र चालू केलेल्या अरब इंडस्ट्रीयल युनियनचा
मारवान पहिला अध्यक्ष होता. या संस्थेच्या अनेक उद्दिष्टांपैकी एक म्हणज
शस्त्रास्त्रांचं उत्पादन. पुढे हा प्रकल्प बारगळला पण त्यामुळे मारवानच्या
शस्त्रांच्या बाजारात अनेक ओळखी झाल्या. १९७९ मध्ये तो इजिप्शीयन
सरकारमधून निवृत्त झाला आणि पॅरिसमध्ये स्थायिक झाला. पुढे १९८१ मध्ये
सादातची हत्या झाल्यावर तो लंडनमध्ये गेला. तिथे त्याची दुसरी कारकीर्द –
गुंतवणूकदाराची – अजूनच बहरली. त्याने चेल्सी फुटबॉल क्लबचा बराच मोठा
हिस्सा विकत घेतला, आणि तोही इजिप्शीयन धनाढ्य मोहम्मद अल फायेदच्या नाकावर
टिच्चून. त्याची आणि अल फायेदची स्पर्धा पुढेही चालू राहिली. जेव्हा अल
फायेदने लंडनमधील प्रसिद्ध डिपार्टमेंटल स्टोअर हॅरड्स विकत घेतलं, तेव्हा
त्याच्या विरोधात बोली लावणाऱ्यांपैकी एक अश्रफ मारवानदेखील होता. अल
फायेदचा मुलगा डोडी हा प्रिन्सेस डायनाचा प्रियकर होता. जेव्हा डोडी आणि
डायना पॅरिसमध्ये एका अपघातात मारले गेले, तेव्हा मोसादला ही बातमी
मारवानकडूनच कळली होती.
१९८० च्या दशकात मारवान दहशतवादी संघटनांना आर्थिक मदत करतो, असाही आरोप
त्याच्यावर झाला होता, पण त्यात काही तथ्य नव्हतं. एकतर जगातल्या जवळपास
सर्व दहशतवादी संघटनांना यासर अराफतच्या पी.एल.ओ. कडून मदत मिळत असे, आणि
मोसाद आणि अराफत यांच्यामधून तेव्हा विस्तवही जात नव्हता. अराफतचा
मानसपुत्र आणि इझरेली खेळाडूंचं १९७२ च्या म्युनिक ऑलिंपिकमध्ये जे
हत्याकांड झालं, त्याचा सूत्रधार असलेल्या अली हसन सलामेहला मोसादने ज्या
पद्धतीने मारलं, त्यावरून जगभरातल्या अनेक दहशतवादाच्या सहानुभूतीदारांनी
आणि समर्थकांनी योग्य तो धडा घेतला होता. मारवान जरी राजकारणातून निवृत्त
झाला होता, तरी मोसादचं त्याच्यावर लक्ष होतं, आणि त्याने दहशतवाद्यांना
मदत केली असती, तर मोसादने त्यालाही दयामाया दाखवली नसती, हेही तितकंच खरं
होतं.
२१वं शतक सुरु झालं आणि मारवानचे ग्रह फिरले. २००२ मध्ये इझरेली इतिहासकार अहरॉन ब्रेगमान याने लिहिलेलं एक पुस्तक प्रकाशित झालं. त्यात त्याने ज्या हेराने इझराईलला योम किप्पूर युद्धाबद्दल सावधगिरीची सूचना दिली, त्या हेराचा उल्लेख जावई असा केलेला होता. ब्रेगमानने पुढे असंही म्हटलं होतं, की हा दुहेरी हेर होता, आणि त्याने इझराईलला चुकीची माहिती दिली होती.
ब्रेगमानच्या पुस्तकात मारवानचं नाव घेतलेलं नव्हतं. पण जावई या उल्लेखावरून त्याला काय म्हणायचंय हे पुरेसं स्पष्ट होत होतं. मारवान साहजिकच भडकला आणि त्याने इजिप्तमधल्या अल अहराम या प्रसिद्ध वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत ब्रेगमानवर तो मूर्ख आणि पोरकट असल्याचे आरोप केले.
ब्रेगमानही संतापला आणि त्याने अल अहरामला दिलेल्या मुलाखतीत हे जाहीरपणे सांगितलं, की त्याने जावई म्हणून उल्लेख केलेला माणूस अश्रफ मारवानच आहे. हे बोलणं २००४ पर्यंत कोणीही गंभीरपणे घेतलं नव्हतं, पण जेव्हा जनरल एली झाईराने अश्रफ मारवानचं नाव घेतलं, तेव्हा सत्य काय आहे, ते सगळ्यांसमोर आलं.
मोसादमध्ये आणि इझराईलमध्ये हलकल्लोळ माजला. एक तर असं यापूर्वी कधीही झालं नव्हतं. कितीही मतभेद झाले असले, तरी कोणीही इझराईलच्या हेरांची ओळख अशी जाहीर केली नव्हती. शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे मारवान अजूनही सार्वजनिक जीवनात वावरत होता. इजिप्त आणि इझराईल हे जरी आत्ता मित्र असले, तरी या गद्दारीबद्दल मारवानला इजिप्शीयन सरकार आणि इजिप्तची गुप्तचर संस्था माफ करतील असं समजणं हा वेडेपणा होता.
झमीरने या सगळ्या प्रकारानंतर मोसाद एजंट्सच्याद्वारे मारवानशी संपर्क साधायचा प्रयत्न केला, पण मारवान दुखावला गेला होता. त्याने मोसादच्या एजंट्सना भेटायला नकार दिला.
त्याच वर्षी (२००४ मध्ये ) अजून एक घटना घडली. इजिप्तचा राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक आणि अश्रफ मारवान एका व्यासपीठावर होते. गमाल अब्दुल नासरला श्रद्धांजली वाहण्यासाठी. मुबारकला जेव्हा पत्रकारांनी मारवान आणि त्याच्यावर ठेवलेल्या आरोपांविषयी विचारलं, तेव्हा त्याने मारवानने इझराईलसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाचा पूर्ण इन्कार केला.
हे ऐकल्यावर मोसाद संचालक मायर डागानची प्रतिक्रिया बोलकी होती - इजिप्त का आज मान्य करेल, की त्यांच्या सरकारमधल्या कुणी आमच्यासाठी हेरगिरी केली होती?
झाईरा आणि त्याच्या पाठीराख्यांना मुबारकची प्रतिक्रिया म्हणजे आपला विजय झाल्यासारखं वाटलं. ते हे विसरले की इजिप्तचे नेते उघडपणे हे कधीच मान्य करणार नाहीत, की मारवानने इझराईलसाठी हेरगिरी केली होती. ते एकीकडे मारवान इजिप्तचा दुहेरी हेर होता, असंच म्हणणार पण दुसरीकडे त्यांनी मारवानला संपवायचा निर्णय घेतला असणार.
इझरेली सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने २००७ च्या जून महिन्यात आपला अहवाल दिला. १२ जून २००७ या दिवशी इझराईलच्या सर्वोच्च न्यायालयाने मोसाद संचालक झ्वी झमीरची बाजू खरी आहे हा निर्णय दिला. त्यानंतर दोनच आठवड्यांनी – २७ जून २००७ या दिवशी मारवानचा मृतदेह त्याच्या घराच्या खाली असलेल्या रस्त्यावर मिळाला. त्याला कुणीतरी मारहाण करून सहाव्या मजल्यावरून खाली फेकून दिलं होतं.
मोसादने इजिप्शीयन गुप्तचर संघटना मुखबारतवर मारवानची हत्या केल्याचा आरोप केला. त्यांचा रोख एली झाईरावरही होता. झाईरावर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. २०१२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने पुरेसा पुरावा नसल्याच्या कारणावरून हा खटला रद्दबातल केला.
अश्रफ मारवानची पत्नी मूना मारवानने मोसादवर त्याला मारल्याचा आरोप केला, ज्यावर मोसादने काहीही प्रतिक्रिया दिली नाही. स्कॉटलंड यार्डने अश्रफ मारवानच्या हत्येच्या कारणांचा तपास करण्यासाठी एक विशेष युनिट तयार केलं होतं, पण कालांतराने हाही तपास थांबवण्यात आला.
एंजलचे खरे खुनी आजही इजिप्तमध्ये असावेत असा अंदाज आहे.
क्रमशः
मोसाद भाग १४
१९८० चं दशक हे जागतिक राजकारणात आणि अर्थकारणात मोठी उलथापालथ घडवणारं होतं. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सत्तरीच्या दशकातले राजकीय नेते या दशकाच्या सुरुवातीला अंतर्धान पावले. १९७९ मध्ये इराणमध्ये घडून आलेल्या इस्लामिक क्रांतीमुळे आणि ज्या पद्धतीने अमेरिकन सरकारने ते संपूर्ण प्रकरण हाताळलं त्यामुळे जिमी कार्टर यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाबद्दल अमेरिकेत असंतोष होता. तो जनतेने रोनाल्ड रीगन यांना निवडून देऊन दाखवून दिला. ब्रिटनमध्येही सततचे संप आणि हरताळ यांच्यामुळे लोकांमध्ये असंतोष खदखदत होता. त्या लाटेवर स्वार होऊन काँझर्व्हेटिव्ह पक्षाच्या मार्गारेट थॅचर पंतप्रधान म्हणून निवडून आल्या. सोव्हिएत रशियामध्येही जनरल सेक्रेटरी लिओनिद ब्रेझनेव्ह यांचं निधन झालं आणि के.जी.बी.चे माजी प्रमुख युरी आंद्रोपोव्ह नवीन जनरल सेक्रेटरी बनले.
इझराईल आणि मोसाद यांच्यातही यावेळी बदल घडून येत होते. इसेर हॅरेलनंतर
पहिल्यांदाच गुप्तचर सेवेत असलेला माणूस मोसादचा प्रमुख संचालक बनला होता.
हॅरेलने तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान बेन गुरियन यांना
सैनिकी पार्श्वभूमी असलेल्या मायर अमितची संचालकपदी निवड करावी लागली
होती. अमितनंतर संचालक झालेला झ्वी झमीर आणि त्याच्यानंतर त्या पदावर आलेला
यित्झाक होफी हे दोघेही इझराईलच्या सैन्यदलातले अधिकारी होते आणि त्यांना
हेरगिरीची काहीही पार्श्वभूमी नव्हती. तशी पार्श्वभूमी असलेला माणूस आता
मोसादचं संचालकपद भूषवत होता. त्याचं नाव होतं नाहूम आदमोनी.
खरंतर यावेळीही इझरेली सैन्यदलातून आलेलाच माणूस मोसादचा संचालक बनला असता.
त्याचं नाव होतं जनरल येकुतीएल आदाम. १९७६ च्या जगप्रसिद्ध एंटेबी विमान
अपहरण प्रकरणात आदामने उत्कृष्ट कामगिरी बजावली होती. पण १९८२ मध्ये
लेबेनॉनची राजधानी बैरूटमध्ये उफाळलेल्या संघर्षात आदाम अनपेक्षितरीत्या
मारला गेला आणि आदमोनीची मोसाद संचालकपदी निवड झाली.
जवळपास २० वर्षानंतर आदमोनीसारखा प्रत्यक्ष अनुभव असलेला संचालक लाभल्यामुळे मोसादमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. त्याच्या कारकीर्दीत मोसाद नक्कीच नवीन शिखर गाठेल अशी सगळ्यांचीच रास्त अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र जे घडलं ते या अपेक्षेपेक्षा वेगळं होतं. १९८२ ते १९८९ या आदमोनीच्या काळात मोसादला तीन अशा प्रकरणांना सामोरं जावं लागलं, ज्यामुळे मोसादची कार्यपद्धती आणि मूल्यव्यवस्था यांच्यावरच प्रश्नचिन्हं उभी राहिली. आजही मोसादमध्ये त्याबद्दल फारसं बोललं जात नाही.
पहिलं प्रकरण जोनाथन पोलार्डचं. टेक्सासमधल्या एका ज्यू कुटुंबात
जन्माला आलेल्या पोलार्डची लहानपणापासूनच प्राचीन इझराईल, ज्यूंचा
नाझीप्रणित वंशसंहार आणि अरब-इझराईल संघर्ष याबद्दल टोकाची मतं होती.
कॉलेजमध्ये शिकत असताना तो जो भेटेल त्याला आपण अमेरिका आणि इझराईल यांचे
दुहेरी नागरिक आहोत असं ऐकवत असे – असं काहीही नसताना. कसंबसं शिक्षण पूर्ण
केल्यावर पोलार्डने सी.आय.ए. आणि अमेरिकन नौदलाच्या गुप्तचर शाखेमध्ये
नोकरीसाठी अर्ज केला. सी.आय.ए. मध्ये त्याला पॉलीग्राफ टेस्ट घ्यावी लागली
आणि त्यात त्याने आपण १९७४ ते १९७८ या काळात ड्रग्ज घेत होतो असं मान्य
केल्यामुळे त्याची निवड होऊ शकली नाही. पण नौदलाने मात्र त्याचा अर्ज
स्वीकारला आणि १९ सप्टेंबर १९७९ या दिवशी अमेरिकन नौदलाची गुप्तचर संस्था
NIC मध्ये त्याची निवड करण्यात आली. निवड झाल्यानंतर दोन महिन्यांच्या आतच
त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने त्याला नोकरीवरून काढून टाकण्याची मागणी केली.
त्याने बरीच खोटी माहिती पुरवल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता.
पण बरखास्तीऐवजी पोलार्डची बदली करण्यात आली. ही बदली झाल्यावर काही काळाने
त्याची अॅव्हिएम सेला नावाच्या इझरेली विमानदलाच्या अधिकाऱ्याशी ओळख झाली.
सेला त्यावेळी सुट्टीवर होता आणि न्यू यॉर्क विद्यापीठातून कॉम्प्युटर
सायन्समध्ये मास्टर्स पदवीसाठी अभ्यास करत होता.
सेला आणि पोलार्ड यांची चांगलीच घनिष्ठ मैत्री झाली. इझराईल हा दोघांना
जोडणारा दुवा होताच. याच सुमारास पोलार्डने सेलाला आपण नक्की कोण आहोत आणि
काय करतो हे सांगितलं. त्याचबरोबर त्याने हेही सांगितलं की अमेरिकन
नौदलाकडे अरब राष्ट्रांच्या नौदलाची बरीच माहिती आहे, कारण बहुसंख्य अरब
नौदलांच्या युद्धनौका, पाणबुड्या, क्षेपणास्त्रं आणि विमानं ही रशियन
बनावटीची होती. पण ही माहिती नौदलाने मुद्दामहून इझराईलपासून दडवलेली आहे.
सेलाने ही माहिती इझरेली विमानदलाच्या गुप्तचर संस्थेला दिल्यावर तिथले
तज्ञ विचारात पडले. त्यावेळी ब्रिटनमध्ये मार्गारेट थॅचर पंतप्रधान होत्या
आणि अमेरिकेत रोनाल्ड रीगन राष्ट्राध्यक्ष होते. त्यांची आणि पर्यायाने
त्यांच्या देशांच्या गुप्तचर संस्थांची मैत्री प्रसिद्ध होती आणि
ब्रिटनच्या एम.आय. ६ आणि मोसादचे संबंध तितकेसे चांगले नव्हते. मोसादमुळे
ब्रिटन आणि अरब राष्ट्रांमधले संबंध बिघडण्याची शक्यता आहे यावर थॅचरबाईंचा
ठाम विश्वास होता आणि त्यामुळे अमेरिकेचंही इझराईलबद्दल तसंच नकारात्मक मत
झालं असणार असं मोसादला वाटत होतं आणि सेलाने दिलेल्या माहितीमुळे त्यावर
शिक्कामोर्तब झाल्यात जमा होतं.
अजून एक शक्यता होती. सी.आय.ए.ने अमेरिकेतून इझरेली हेरांना बाहेर
काढण्यासाठी एखादी योजना कार्यान्वित केली असावी आणि त्यामुळे पोलार्डने
सेलाशी मैत्री केली असावी. मोसाद आणि इझरेली विमानदलाच्या गुप्तचरांनी ही
शक्यता आजमावून पाहायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे सेलाला सूचना दिल्या. पण
त्यांचा पोलार्डवरचा संशय अनाठायी असल्याचं थोड्याच काळात सिद्ध झालं. जून
१९८४ मध्ये पोलार्डने सेलाला अमेरिकन नौदलाची गुप्त माहिती पुरवायला
सुरुवात केली. पण त्या वर्षाच्या शेवटी तो पकडला गेला. तो दर शुक्रवारी
ऑफिसमध्ये सामसूम असताना गुप्त माहिती बाहेर घेऊन जायचा. जेव्हा त्याच्या
वरिष्ठांच्या हे लक्षात आलं तेव्हा त्यांनी एफ.बी.आय.ला सूचित केलं आणि
त्याप्रमाणे एफ.बी.आय.ने पोलार्डला अटक केली. त्याला अटक झाल्यावर त्याने
एक परवलीचा शब्द वापरून आपल्याला अटक झाल्याचं आपल्या पत्नीला कळवलं.
तिच्याकडून ते पोलार्डकडून माहिती घेणाऱ्या इझरेली अधिकाऱ्यांना समजलं आणि
ताबडतोब ते अमेरिका सोडून निघून गेले. पोलार्डच्या पत्नीला मात्र अटक झाली.
पण अजूनही पोलार्ड कुणासाठी हेरगिरी करतो आहे ते एफ.बी.आय.ला समजलं नव्हतं.
त्यांच्या सतत चाललेल्या प्रश्नोत्तरांपुढे अखेरीस त्याने शरणागती
पत्करली आणि आपण इझराईलसाठी हेरगिरी करत असल्याचं मान्य केलं. सी.आय.ए. आणि
मोसाद यांचे आधीच ताणलेले संबंध पोलार्ड प्रकरणामुळे अजून बिघडले. पोलार्ड
इझराईलकडे गुप्त माहिती घेऊन आला होता आणि इझराईलने त्याला कुठल्याही
प्रकारे अमेरिकेविरुद्ध हेरगिरी करायला प्रेरित केलं नव्हतं हे मोसादने
पुनःपुन्हा सांगितलं पण सी.आय.ए.ने त्यावर विश्वास ठेवायचं नाकारलं. पुढे
पोलार्डने त्याच्यावर चाललेल्या खटल्यात साक्ष म्हणून हेच सांगितल्यावर
सी.आय.ए.चा राग थोडाफार कमी झाला.
पोलार्ड प्रकरणामुळे मोसादची ढासळलेली पत सावरण्याची संधी मोसादला लगेचच
मिळाली, पण त्यामुळे आदमोनीच्या कारकीर्दीतल्या दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात
झाली. हे प्रकरण म्हणजे इराणगेट किंवा इराण- काँट्रा प्रकरण. १९८० मध्ये
निवडून आलेले रिपब्लिकन राष्ट्राध्यक्ष रीगन १९८४ मध्ये परत निवडून आलेले
होते. त्यांच्या कारकीर्दीत अमेरिकेचं परराष्ट्रीय धोरण आक्रमक झालेलं
होतं. रीगन यांच्या निवडणूक जाहीरनाम्यातही त्याचा उल्लेख होता. या
जाहीरनाम्यानुसार अमेरिकेला जगात दोन शत्रू होते – कम्युनिझम आणि इस्लामी
मूलतत्ववाद. कम्युनिझमचं प्रतीक म्हणजे अर्थातच सोव्हिएत रशिया आणि इस्लामी
मूलतत्ववादाचं तेव्हा असलेलं प्रतीक म्हणजे इराण. (त्यावेळी ओसामा बिन
लादेन अमेरिकन शस्त्रांच्या मदतीने अफगाणिस्तानात रशियन सैनिकांशी लढत होता
आणि अल कायदाचा जन्म व्हायचा होता.) इराणमध्ये १९७९ मध्ये आयातुल्ला
खोमेनीच्या नेतृत्वाखाली झालेल्या इस्लामिक क्रांतीमध्ये इराणची राजेशाही
उलथली गेली होती. इराणचा शहा हा अमेरिकन शस्त्रांचा मोठा ग्राहक होता. तो
आणि इराकचा सद्दाम हुसेन यांच्यात आखाती राष्ट्रांमधली अमेरिकन शस्त्रं
समसमान वाटली गेलेली होती. आता ही शस्त्रं खोमेनीच्या सैनिकांच्या हातात
होती. अमेरिकन वकिलातीला ४४४ दिवस वेढा घालून इराणच्या नवीन सरकारने
अमेरिकेबद्दल आपल्याला काय वाटतं ते दाखवून दिलेलं होतंच. त्याशिवाय
लेबेनॉनमध्ये हेझबोल्लाह हा दहशतवादी गट प्रबळ होता. हा शियापंथीयांचा गट
होता आणि त्याला शियापंथीय इराणचा पूर्ण पाठिंबा होता. अमेरिकन
अधिकाऱ्यांचं अपहरण करणं आणि त्यांना हालहाल करून ठार मारणं यात
हेझबोल्लाहचा हातखंडा होता. १९८४ मध्ये त्यांनी सी.आय.ए.च्या बैरुट
स्टेशनचा प्रमुख विल्यम बकलीचं अपहरण करून त्याला ठार मारलं होतं. त्यामुळे
अमेरिकेने इराणवर आणि इराणला शस्त्रास्त्रं विकण्यावर कडक निर्बंध घातलेले
होते.
त्याच सुमारास अमेरिकेच्या अगदी जवळ – उत्तर आणि दक्षिण अमेरिका खंडांना
जोडणाऱ्या संयोगभूमीमधल्या एका छोट्या देशात एक वेगळंच नाट्य आकाराला येत
होतं. या देशाचं नाव होतं निकाराग्वा. १९७९ मध्ये निकाराग्वामध्येही
क्रांती घडून आलेली होती आणि तिथे अमेरिकन मदतीवर अनिर्बंध राज्य करणाऱ्या
हुकुमशहा अनास्तासिओ सामोझाची राजवट डाव्या मार्क्सिस्ट क्रांतिकारकांनी
उलथून टाकलेली होती. या क्रांतिकारकांच्या दलाचं नाव होतं सँडिनिस्ता आणि
त्यांचा प्रमुख होता होजे डॅनियल ओर्तेगा. ओर्तेगाला अर्थातच क्युबा आणि
सोव्हिएत रशिया यांचा पाठिंबा होता. अमेरिकेच्या एवढ्या जवळ कम्युनिस्ट
राजवट स्थापन होणं हे अर्थातच रीगन सरकारला सहन होण्यासारखं नव्हतंच. १९५९
मध्ये क्युबामध्ये क्रांती होऊन अमेरिकेच्या अगदी जवळ – जेमतेम १०० मैल –
कम्युनिस्ट सरकार स्थापन झालं होतं. निकाराग्वा तर क्युबापेक्षाही जवळ
होता. तिथली कम्युनिस्ट क्रांती जवळच्या ग्वाटेमाला, बेलीझ, एल साल्वाडोर
इत्यादी देशांमध्ये पसरण्याचा धोका होता. या देशांमध्ये अमेरिकन कंपन्यांचे
हितसंबंध होते. त्यामुळे रीगन सरकारने निकाराग्वावरही अनेक निर्बंध लादले
आणि गुप्तपणे निकाराग्वामधली सँडिनिस्ता राजवट खिळखिळी करून टाकायचे
प्रयत्न सुरु केले. निकाराग्वामध्ये सर्व लोकांचा अर्थातच ओर्तेगाला
पाठिंबा नव्हता. त्यामुळे सी.आय.ए. ने ओर्तेगा आणि सँडिनिस्ता-विरोधी
लोकांना एकत्र आणून त्यांना गनिमी युद्धाचं प्रशिक्षण देण्याची आणि त्यांना
ओर्तेगाविरोधी उठाव करण्यासाठी मदत करायची योजना आखली. १९८४ मध्ये रीगन
पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. निकाराग्वामध्येही निवडणुका
झाल्या. एखाद्या कम्युनिस्ट देशात स्वतंत्र वातावरणात निवडणुका होण्याची
ही पहिलीच वेळ होती. या निवडणुकांमध्ये सँडिनिस्तांना बहुमत मिळालं आणि
ओर्तेगा निकाराग्वाचा राष्ट्राध्यक्ष झाला. तो लोकशाही पद्धतीने निवडून
आलेला असल्यामुळे आणि या निवडणुका पूर्णपणे स्वतंत्र वातावरणात झालेल्या
असल्याचं प्रमाणपत्र संयुक्त राष्ट्रसंघाने दिलेलं असल्यामुळे अमेरिकेला
उघडपणे काही करता येण्यासारखं नव्हतं. त्यामुळे अमेरिकन काँग्रेसने (संसद)
निकाराग्वामधल्या सरकारविरुद्ध कारवाई करण्यासाठी पैसे उपलब्ध करून द्यायला
नकार दिला. इकडे सी.आय.ए. ने गनिमी सैनिकांना – यांना काँट्रा असं नाव
होतं – प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली होती. पण पैसे नसल्यामुळे हे
प्रशिक्षण संपुष्टात येण्याची शक्यता होती. तेव्हा रीगन सरकारमधल्या काही
हिकमती लोकांनी एक शक्कल लढवली. त्यावेळी इराण आणि इराक यांच्यातलं युद्ध
ऐन भरात होतं आणि इराक शस्त्रांस्त्रांमध्ये वरचढ असल्यामुळे इराणला भारी
पडत होता. रशिया अफगाणिस्तानमध्ये अडकलेला असल्यामुळे इराणला रशियाकडून
शस्त्रं मिळण्याची शक्यता खूपच कमी होती आणि रशियाचीही इराणला शस्त्रं
विकण्याची इच्छा नव्हती. इराणजवळ असलेल्या कझाकस्तान, अझरबैजान इत्यादी
मुस्लीमबहुल संघराज्यांमध्ये इराण आपली इस्लामिक क्रांती पसरवेल अशी सार्थ
भीती रशियाला वाटत होती. एकूण काय, तर इराणला शस्त्रांची गरज होती. या
लोकांनी इराणला शस्त्रं विकून ते पैसे काँट्रा गनिमांच्या प्रशिक्षणासाठी
वापरण्याचा तिरपागडा मार्ग शोधून काढला. त्यांना उघडपणे तर हे करता येणं
शक्यच नव्हतं त्यामुळे त्यांनी त्याकामी इझराईलची मदत घ्यायचं ठरवलं.
इझराईलला पोलार्ड प्रकरणामुळे सी.आय.ए. आणि मोसाद यांच्यात निर्माण झालेलं
संशयाचं वातावरण लवकरात लवकर पूर्वपदाला आणायचं होतं, त्यामुळे त्यांनीही
त्याला होकार दिला. शिवाय अमेरिकेचा अजून एक हेतू होता. हेझबोल्लाह
दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या अमेरिकन नागरिकांची सुटका. इझराईलला
हेझबोल्लाह लेबेनॉनमध्ये शिरजोर व्हायला नको होते, त्यामुळे तेही या हेतूशी
सहमत झाले.
नोव्हेंबर १९८६ मध्ये अश शीरा नावाच्या लेबनीज मासिकाने हे प्रकरण उघडकीस
आणलं. इराणच्या सैन्यातल्या मेहदी हशेमी नावाच्या अधिकाऱ्याचा त्यांनी
संदर्भ दिला होता. जेव्हा हे घडलं तेव्हा अशी प्रकरणं उघडकीला आल्यावर जे
होतं तेच झालं. त्यात भाग घेणाऱ्यांची प्रचंड बदनामी झाली. राष्ट्राध्यक्ष
रीगनना देशाला उद्देशून भाषण करावं लागलं आणि या प्रकरणाची कबुली द्यावी
लागली. पुढे रीगन यांच्या राजवटीत उपराष्ट्राध्यक्ष असलेल्या जॉर्ज बुश
सीनियर यांनी आपल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कारकीर्दीत या प्रकरणातल्या
बऱ्याच लोकांना आपले खास अधिकार वापरून माफी दिली.
पण ही दोन्ही प्रकरणं काहीच नाहीत असं तिसरं आणि अजून सनसनाटी प्रकरण म्हणजे मोर्देचाई वानुनू. “ मी हेर आहे “ असं एखाद्या मोठ्या फलकावर लिहून जाहीर करणं ही एकच गोष्ट कदाचित वानुनूने केली नसेल. बाकी सगळे चाळे त्याने स्वतःला प्रसिद्ध करण्यासाठी केले.
वानुनू इझराईलच्या दिमोना येथे असलेल्या अणुभट्टी प्रकल्पात तंत्रज्ञ म्हणून काम करत होता. दिमोना हा इझराईलचा अत्यंत गुप्त, महत्वाचा आणि तितकीच कडक सुरक्षा असलेला प्रकल्प होता. विशेष म्हणजे तिथे नक्की काय चालतं याबद्दल इझरेली सरकार आणि प्रसारमाध्यमं या दोघांनीही मौन बाळगलं होतं. परदेशी वर्तमानपत्रांची, विशेषतः अरब आणि रशियन वर्तमानपत्रांची मात्र इझराईल अण्वस्त्रं विकसित करत असल्याची पूर्ण खात्री होती.
दिमोनामध्ये नोकरी मिळणं सोपं नव्हतं. तिथे नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या कोणत्याही माणसाला असंख्य अर्ज भरावे लागत आणि तितक्याच असंख्य प्रश्नोत्तरांना तोंड द्यावं लागत असे. त्यांनी या अर्जांमध्ये लिहिलेल्या पार्श्वभूमीची इझरेली प्रतीहेरगिरी संस्था शाबाककडून कसून तपासणी होत असे, आणि या सगळ्या चाचण्या समाधानकारकरीत्या पूर्ण करणारे लोकच दिमोनामध्ये पाय ठेवू शकायचे आणि या चाचण्या आणि सुरक्षा तपासणी हे त्यांना दिमोनामध्ये नोकरी मिळायला लागल्यानंतरही चालू राहात असे.
वानुनूने दिमोनाबद्दल वर्तमानपत्रांत आलेली जाहिरात वाचून अर्ज केला, त्याची कसून तपासणीही करण्यात आली आणि त्यानंतर त्याला तिथे नोकरी मिळाली. नंतर जेव्हा त्याची कृत्यं उघडकीला आली तेव्हा मोसादने याच गोष्टीवर नाराजी व्यक्त केली. त्यांच्या मते वानुनूला दिमोनामध्ये नोकरी मिळायलाच नको होती.
वानुनू कट्टर डाव्या विचारसरणीचा पाईक होता. त्याचे अनेक अरब मित्र होते
आणि ते चक्क कम्युनिस्ट होते. त्यांच्यातले बरेच जण राका नावाच्या राजकीय
पक्षाचे सभासद होते. हा पक्ष मार्क्सिस्ट विचारांचा होता आणि त्याचा
झिओनिस्ट विचारसरणीला कडवा विरोध आणि पॅलेस्टिनी अरबांच्या मागणीला पाठिंबा
होता. त्यांनी आयोजित केलेल्या सरकारविरोधी निदर्शनांमध्ये आणि
प्रचारफेऱ्यांमध्ये वानुनू नेहमी सहभागी होत असे. त्यांच्या
प्रचारफेऱ्यांमध्ये घोषणा देत असताना त्याचे अनेक फोटो प्रसिद्ध झाले होते.
त्यांच्या सरळसरळ इझराईलविरोधी सभांमध्ये वानुनू भाषणही करत असे. त्याने
त्या अनुषंगाने अनेक वर्तमानपत्रांना मुलाखतीही दिल्या होत्या.
एवढंच असतं तरी एकवेळ ठीक होतं, पण वानुनूच्या छोटेखानी फ्लॅटमध्ये
राकाच्या जहालवादी नेत्यांना मुक्तद्वार होतं. ते नियमितपणे तिथे राहात
असत. वानुनू बेन गुरियन विद्यापीठात विद्यार्थी म्हणून शिकत असताना त्याची
त्याच्या टोकाच्या विचारांबद्दल ख्याती होती.
तो हुशार नक्कीच होता, पण त्याची वृत्ती धरसोडपणाची होती. डावी विचारसरणी अंगीकारण्याआधी तो कट्टर उजव्या विचारसरणीचं पालन करत होता आणि अरबविरोधी भाषणं करणाऱ्या राब्बाय कहानचा समर्थक होता. नंतर त्याने अतिउजव्या हातेचीया पक्षाला पाठिंबा दिला, पण निवडणुकीत लिकुड पक्षाला मत दिलं आणि शेवटी तो डाव्या पक्षांमध्ये सामील झाला. त्याच्या म्हणण्यानुसार १९८२च्या लेबेनॉन युद्धामुळे त्याचं राजकीय मतपरिवर्तन झालं होतं. तो जरी इतर लोकांबरोबर असला तरी त्याचे मित्र फारच कमी होते आणि आपण मूळचे मोरोक्कन ज्यू असल्यामुळे आपल्याविरुद्ध नेहमी भेदभाव केला जातो अशी त्याची ठाम धारणा होती. जेव्हा त्याला इझरेली विमानदलाची चाचणी पार करता आली नाही तेव्हा त्याची ही धारणा अजून पक्की झाली. विमानदलाऐवजी त्याची निवड अभियांत्रिकी दलामध्ये करण्यात आली. तिथून राजीनामा देऊन तो बाहेर पडला आणि मग त्याने तेल अवीवमध्ये अभियांत्रिकीचा अभ्यास करायला सुरुवात केली. ते मध्येच सोडून तो बीरशेबा शहरात राहायला गेला आणि तिथल्या विद्यापीठात त्याने अर्थशास्त्राचा अभ्यास करायला सुरुवात केली. नंतर त्याने तेही सोडून दिलं आणि तो तत्वज्ञानाचा विद्यार्थी बनला. मग त्याने मांसाहार सोडून दिला आणि तो कट्टर शाकाहारी बनला.
काही गोष्टी मात्र त्याने सोडल्या नाहीत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पैशांची लालसा. त्याच्या वर्गमित्रांना त्याबद्दल त्याचं कौतुक वाटत असे. तो त्यांना नेहमी सांगत असे की त्याची काहीही काम न करता केवळ स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करून पैसे कमवायची इच्छा आहे. आपल्या डायरीमध्ये त्याने स्टॉक मार्केट, तत्वज्ञान आणि इंग्लिश भाषा तीन गोष्टी प्राधान्याने आणि या क्रमाने शिकायच्या आहेत असं लिहिलं होतं. पैसे कमावण्याच्या आपल्या हौसेपायी त्याने अनेक ‘ वेगळी ’ कामं केली होती, उदाहरणार्थ नग्न मॉडेल, टेस्टिंग ड्रायव्हर वगैरे.
या सगळ्या गोष्टींचा सरकारशी, किंवा दिमोना अणुभट्टी प्रकल्पाशी काहीही संबंध नव्हता पण राकाशी संबंध ठेवणं किंवा पॅलेस्टिनी अरबांशी घसट असणं या नक्कीच विचार करण्यासारख्या गोष्टी होत्या. पण काही करण्याऐवजी शाबाक अधिकाऱ्यांनी त्याला भेटायला बोलावलं आणि या ‘ उचापती ’ थांबवायला सांगितलं आणि त्याला सूचना दिली गेली आहे असं लिहिलेल्या एका कागदावर सही करायला सांगितलं. वानुनूने सही वगैरे काहीही केली नाही आणि आपल्या उचापतीही थांबवल्या नाहीत.
दिमोना प्रकल्प इझराईलच्या संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी होती. त्यामुळे शाबाकने तिथल्या अधिकाऱ्यांकडे वानुनूच्या पार्श्वभूमीबद्दल एक अहवाल पाठवला. त्यांनी तो अहवाल आपल्या दप्तरांमध्ये बंद करून ठेवला. विषय संपला. त्यावर नंतर काहीही कारवाई झाली नाही. वानुनूवर निदान पाळत ठेवायला हवी होती. पण तेही झालं नाही. हे फार गंभीर दुर्लक्ष होतं आणि अनेक लोकांनी आपलं कर्तव्य न बजावल्यामुळे पुढच्या घटना घडल्या असं आज म्हणावं लागेल.
इकडे वानुनू आपल्या राजकीय ‘उचापती ’ अगदी सुखेनैव करत होता. त्याला कुणीही कुठल्याही प्रकारे हटकत नव्हतं. दिमोनामध्ये अनेक विभाग होते. त्यातल्या इन्स्टिट्यूट २ या अत्यंत गुप्त विभागात वानुनू तंत्रज्ञ म्हणून काम करत होता. दिमोनामध्ये काम करणाऱ्या २७०० लोकांपैकी फक्त १५० जणांना या विभागात प्रवेश होता. वानुनूकडे दोन बॅजेस होते – एक दिमोना प्रकल्पात प्रवेश करण्यासाठी आणि दुसरा या इन्स्टिट्यूट २ मध्ये येण्यासाठी.
बाहेरून जर कुणीही पाहिलं असतं तर दिमोना म्हणजे एक दुमजली इमारत दिसली असती आणि तिथे कुठलीतरी गोदामं आहेत असाच पाहणाऱ्याचा समज झाला असता. पण चौकस लोकांच्या लक्षात आलं असतं की या इमारतीमध्ये लिफ्ट आहे आणि दुमजली इमारतीला लिफ्ट कशासाठी हवी असा प्रश्नही त्यांना पडला असता. ही लिफ्ट वर नाही तर खाली जाण्यासाठी होती. इझरेली सरकारने दिमोनाची उभारणी करताना ७ मजले जमिनीच्या खाली बनवले होते आणि बाहेरून हे कुणाच्याही लक्षात आलं नसतं, अगदी संपूर्ण पृथ्वीची दिवसातून अनेक वेळा प्रदक्षिणा करणाऱ्या अमेरिकन आणि रशियन उपग्रहांच्याही नाही.
वानुनू बरेच वेळा रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करत असे. त्याला दिमोनाच्या संपूर्ण ढाच्याची माहिती होती. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर अनेक ऑफिसेस आणि एक मोठा कॅफेटेरिया होता. तळमजल्यावरच्या काही गेट्समधून युरेनियमच्या मोठाल्या कांबी खाली असलेल्या अणुभट्टीकडे पाठवल्या जात असत. हा भाग आतल्या बाजूला होता. इथेही काही ऑफिसेस होती आणि प्रयोगशाळा होत्या. त्याच्याखाली असलेल्या (जमिनीखालच्या पहिल्या) मजल्यावर असंख्य पाईप आणि व्हॉल्व्हज होते. त्याच्या खालच्या मजल्यावर संपूर्ण प्रकल्पाचा मध्यवर्ती नियंत्रण कक्ष होता आणि तिथे एक मोठी, खुली गच्ची होती. या गच्चीला गोल्डाची बाल्कनी (Golda’s Balcony) असं नाव होतं. दिमोना आणि तिथलं काम बघायला येणाऱ्या पाहुण्यांना जास्तीत जास्त इथपर्यंत प्रवेश होता. याच्या पुढे फक्त काही तंत्रज्ञ आणि इझराईलमधले अतिमहत्वाचे लोक एवढेच येऊ शकायचे. या मजल्याच्या खालच्या मजल्यावर युरेनियमवर काम होत असे. त्याच्या खाली या प्रकल्पातली सर्वात मोठी जागा होती. ती एकटीच तीन मजल्यांएवढी होती. इथे युरेनियमपासून अणुभट्टीत निर्माण होणारं प्ल्युटोनिअम वेगळं केलं जात असे. त्याच्या खालच्या मजल्यावर धातुशास्त्र विभाग आणि प्रयोगशाळा होती. इथे अण्वस्त्रांच्या विविध भागांवर काम होत असे. त्याच्या खाली असलेल्या शेवटच्या मजल्यावर आण्विक कचरा वेगळा करून त्याची विल्हेवाट लावणारा विभाग होता.
जेव्हा एखादी अणुभट्टी कार्यरत असते तेव्हा जी रासायनिक प्रक्रिया होते,
त्यात प्ल्युटोनिअम निर्माण होतं आणि ते युरेनियम रॉडस् किंवा कांबींवर
जमा होतं. ते युरेनियमपासून वेगळं करावं लागतं आणि मग त्याचा वापर
अण्वस्त्रनिर्मितीसाठी होतो. या सगळ्याची वानुनूला दिमोनामध्ये काम करत
असताना माहिती झाली.
एके दिवशी, काहीही कारण नसताना वानुनू इन्स्टिट्यूट २ मध्ये आपला कॅमेरा
घेऊन आला. त्याच्या बॅगमध्ये इतर अभ्यासाच्या पुस्तकांबरोबर हा कॅमेराही
होता. जर त्याला सुरक्षारक्षकांनी त्याबद्दल विचारलं असतं तर आपण हा कॅमेरा
समुद्रकिनाऱ्यावर घेऊन गेलो होतो आणि तो बॅगमधून काढायचा राहून गेला असं
सांगायचं त्याने ठरवलं होतं, पण त्याला कुणीही हटकलं नाही आणि त्याने हा
कॅमेरा आपल्या लॉकरमध्ये ठेवून दिला. जेवणाच्या सुट्टीमध्ये तो हा कॅमेरा
घेऊन जमिनीखालच्या मजल्यांवर गेला आणि त्याने तिथल्या प्रयोगशाळा,
साधनसामग्री आणि मिळतील त्या गोष्टींचे फोटो काढायला सुरुवात केली. जिथे
फोटो काढता आले नाहीत, तिथे त्याने चित्रं काढली. त्याचं नशीब एवढं जोरावर
होतं की त्याला कोणत्याही पहारेकऱ्याने, तंत्रज्ञाने किंवा अधिकाऱ्याने हे
करताना पाहिलं नाही. तो तिथल्या ऑफिसेसमध्ये जाऊन बिनदिक्कत अत्यंत
महत्वाची आणि गोपनीय कागदपत्रं बघत असे, पण हे करताना कधीही तो पकडला गेला
नाही. त्याच्या वरिष्ठांना अर्थातच हे काहीही माहित नव्हतं. त्यांच्या मते
तो शांत, गंभीर आणि कष्टाळू कर्मचारी होता.
१९८५ च्या शेवटी वानुनूची दिमोनामधली नोकरी संपुष्टात आली. मजा म्हणजे त्याचा वानुनूच्या राजकीय मतांशी किंवा कृत्यांशी काहीही संबंध नव्हता. इझरेली सरकारने दिमोनाला अर्थसहाय्य करण्यात हात थोडा आखडता घेतल्यामुळे हे झालं होतं. त्याला जायला सांगण्यात आलं पण त्याचबरोबर त्याला त्याच्या वार्षिक पगाराच्या दीडपट रक्कम देण्यात आली आणि आठ महिन्याचा पगारही विशेष बाब म्हणून देण्यात आला. पण, पुन्हा एकदा त्याचा राग आणि वैताग हे उफाळून आले होते. त्याने आता कुठेतरी लांब, देशाबाहेर जायचं ठरवलं. बहुतेक कायमचं. तसेही जवळपास १ कोटीहून जास्त ज्यू इझराईलच्या बाहेरच राहात होते. एकाने काहीही फरक पडला नसता. त्याने त्याचा फ्लॅट आणि गाडी विकली, बँकेतून सगळे पैसेही काढून घेतले आणि तो देशाबाहेर निघून गेला.
यावेळी तो ३१ वर्षांचा होता. याआधी त्याने युरोप आणि अमेरिका पाहिली होती. आता त्याला पूर्वेकडच्या देशांबद्दल कुतूहल होतं. त्याच्या बॅकपॅकमध्ये त्याने दिमोनामध्ये जे फोटो काढले होते, त्यांच्या दोन फिल्म्स होत्या. तो सर्वप्रथम ग्रीसला गेला, तिथून रशियाला, तिथून नेपाळ आणि मग थायलंड. नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये त्याला एक इझरेली मुलगी भेटली आणि तो तिला ‘ पटवायच्या ’ मागे लागला. त्याने स्वतःचं नाव ‘ मोर्डी ’ असं सांगितलं आणि हेही सांगितलं की तो डाव्या विचारांचा, जगात शांतता नांदावी म्हणून प्रयत्न करणारा प्रामाणिक माणूस आहे आणि कदाचित तो कधीही परत इझराईलला जाणार नाही. थायलंडमध्ये एका बुद्धमंदिरात जाऊन भारावलेल्या वानुनूने बौद्ध धर्म स्वीकारायचाही विचार केला होता.
काठमांडूनंतर वानुनू व्हिएतनाम, लाओस, इंडोनेशिया,मलेशिया वगैरे देशांमध्ये गेला आणि शेवटी ऑस्ट्रेलियामध्ये आला. आता त्याच्याजवळचे पैसे संपत आले होते, त्यामुळे त्याने सिडनी शहरात थोडंफार काम केलं. पण त्याचा एकाकीपणा अजूनच वाढला होता. इथे त्याला कुणीही ओळखत नव्हतं. एके रात्री तो सिडनीच्या अत्यंत गलिच्छ भागात फेरफटका मारत होता. हा भाग चोऱ्या, लूटमार, वेश्या आणि ड्रग्ज यांच्यासाठी प्रसिद्ध होता. पण त्याची प्रसिद्धी अजून एका चांगल्या कारणासाठीही होती. सेंट जॉर्ज चर्च. निरुद्देश भटकताना वानुनू चर्चमध्ये जाऊन पोचला आणि तिथे त्याची ओळख अँग्लिकन धर्मगुरू जॉन मॅकनाईटशी झाली. वानुनूला घराची आणि आपलेपणाची गरज आहे हे मॅकनाईटच्या लगेचच लक्षात आलं आणि त्याने वानुनूला चर्चमध्ये आश्रय दिला. काही दिवसांनी – १७ ऑगस्ट १९८६ या दिवशी मोर्देचाई वानुनूने ख्रिश्चन धर्म स्वीकारला. त्याला नवीन नावही मिळालं - जॉन क्रॉसमन. माराकेशमध्ये जन्मलेल्या आणि तोपर्यंत ज्यू धर्माचं पालन करत असणाऱ्या वानुनूसाठी हा एक मोठाच बदल होता. जरी मधल्या काळात तो धर्मापासून दूर गेला होता, तरी सर्वसाधारण ज्यू मुलांप्रमाणे त्याचं बालपण हे ज्यू संस्कारांमध्येच गेलं होतं. ते सगळं सोडून एक वेगळा धर्म स्वीकारणं ही वानुनूसाठी फार मोठी गोष्ट होती. पण हा निर्णय विचारपूर्वक घेतलेला नव्हता, तर भावनेच्या भरात, आजूबाजूला काहीही निश्चित नसताना गोंधळलेल्या परिस्थितीत घेतलेला होता. चर्चऐवजी जर तो एखाद्या मशिदीत गेला असता किंवा बौद्ध मंदिरात गेला असता तर तो कदाचित मुस्लीम किंवा बौद्ध बनून बाहेर आला असता. पण एक गोष्ट नक्की होती. ज्यू धर्माकडे पाठ फिरवून त्याने आता इझराईलकडेही पाठ फिरवली होती. इझराईलबद्दलच्या या रागामुळे त्याच्या हातून त्याने पुढे जे काही केलं ते घडलं.
नवीन धर्म स्वीकारल्यानंतर वानुनूला चर्चमध्ये अनेक मेळाव्यांमध्ये भाग घ्यायची संधी मिळाली. अशाच एका भेटीत त्याने आपण इझराईलमध्ये काय करत होतो हे सांगितलं, दिमोना अणुप्रकल्पाचं वर्णन केलं आणि आपल्या फोटोंचा एक स्लाईड शो दाखवण्याची इच्छा प्रदर्शित केली. त्याच्या श्रोत्यांना तो काय बोलतोय आणि कशाबद्दल बोलतोय ते काहीही समजलं नाही. ते त्याच्याकडे शून्य नजरेने बघत बसले. पण या श्रोत्यांमध्ये एक माणूस होता, ज्याचं लक्ष या बातमीने वेधून घेतलं होतं. त्याचं नाव होतं ऑस्कर ग्वेरेरो . ग्वेरेरो मूळचा कोलंबियाचा होता. वानुनूप्रमाणे तोही भटक्या होता, पण तो स्वतःला मुक्त पत्रकार म्हणवत असे. दोघांची ओळख झाली. तेव्हा दोघांनाही पैशांची गरज होती. त्यामुळे ते चर्चच्या भिंती आणि कुंपण रंगवायचं काम करत होते आणि चर्चमध्ये एकाच खोलीत राहात होते. वानुनूच्या फोटोंचं महत्व समजलेला ग्वेरेरो हा पहिला माणूस होता. त्याने वानुनूच्या मनात पैसे आणि प्रसिद्धी यांचं बीज पेरलं.
तोपर्यंत वानुनूजवळचे पैसे संपुष्टात आले होते. त्यामुळे त्याला पैशांची गरज तर होतीच. पण आपण आपल्या प्रसिद्धीचा वापर ज्यू आणि अरब यांच्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी करू शकतो हा विचार त्याच्या मनात आता बळावू लागला. त्याची मूळ योजना अशी नव्हती. खरं सांगायचं तर त्याच्याजवळ आपल्या फोटोंचं नक्की काय करायचं याची काहीही योजना नव्हती. निदान इझराईल सोडून जाताना तरी. पण आता त्याच्यासमोर एक निश्चित उद्दिष्ट होतं – शांतता प्रस्थापित करणं आणि जगाला इझराईलच्या अण्वस्त्रांबद्दल सावध करणं. जसजसे दिवस जात होते, तसा तो स्वतःला इझराईलच्या अणुकार्यक्रमाविरुद्ध लढणारा एकाकी योद्धा या रूपात बघायला लागला होता. पण त्याला हीसुद्धा जाणीव होती की ज्याक्षणी तो हे फोटो प्रकाशित करेल, त्याक्षणी त्याच्यासाठी इझराईलला परत जाण्याचे सगळे दोर कायमचे कापले जातील. तिथे त्याची देशद्रोही म्हणून निर्भर्त्सना होईल.
पण पैसे आणि प्रसिद्धी यांची ओढही तितकीच जबरदस्त होती. वानुनू आणि ग्वेरेरो सिडनीच्या आडरस्त्यावर असलेल्या एका फोटो स्टुडिओमध्ये गेले आणि त्यांनी तिकडे हे फोटो ब्लो अप स्वरुपात डेव्हलप केले आणि मग ऑस्ट्रेलियन नियतकालिकं, वर्तमानपत्रं आणि अमेरिकन नियतकालिकांच्या ऑस्ट्रेलियन ऑफिसेसमध्ये जाऊन हे फोटो विकायचा प्रयत्न केला. पण कोणीही त्यांना दाद दिली नाही. हा लाजाळू दिसणारा, मुश्किलीने एक – एक वाक्य अडखळत बोलणारा माणूस आपल्या हातात इझराईलचं सर्वात मोठं रहस्य घेऊन उभा आहे यावर कोणाचाही विश्वास बसतच नव्हता.
ऑस्ट्रेलियामध्ये काही होत नाही हे पाहिल्यावर ग्वेरेरोने युरोपमध्ये प्रयत्न करायचं ठरवलं. थोडेफार पैसे उसने घेऊन तो स्पेन आणि इंग्लंडमधल्या वर्तमानपत्रांकडे गेला आणि इथे त्याला आशेचा किरण दिसला. लंडनमधल्या संडे टाईम्स या वृत्तपत्राने त्याच्या माहितीमध्ये रस दाखवला. पण ते एकदम पुढे जायला तयार नव्हते. नुकताच त्यांना एक मोठा फटका बसला होता. त्यांनी वाजतगाजत छापलेली हिटलरची दैनंदिनी म्हणजे एक मोठा बनाव असल्याचं नुकतंच उघडकीला आलं होतं. त्यामुळे वानुनूचे फोटो आणि इतर माहिती छापण्याआधी त्यांना त्याच्या अस्सलतेची पूर्ण खात्री करून घ्यायची होती.
दरम्यान वानुनूचे आपले फोटो ऑस्ट्रेलियामध्ये छापायचे प्रयत्न चालूच होते. त्याच्याबद्दल संशय आल्याने ऑस्ट्रेलियन टेलिव्हिजनमधल्या एका निर्मात्याने ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरामधल्या इझरेली वकिलातीमध्ये संपर्क साधला आणि त्यांना वानुनूबद्दल विचारलं. त्यांच्याकडून ही बातमी हारेत्झ या प्रसिद्ध इझरेली वृत्तपत्रासाठी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये काम करणाऱ्या एका पत्रकाराला मिळाली. त्याने ती बातमी हारेत्झच्या तेल अवीव ऑफिसला कळवली. त्यांनी जेव्हा ती इझराईलमध्ये छापली, तेव्हा भूकंप झाला. पोलार्ड आणि इराणगेट प्रकरणं इझराईलच्या बाहेर घडली होती आणि इझरेली नागरिकांचा त्यात काही संबंध नव्हता. पण इथे इझराईलचा एक नागरिक, ज्याने इतक्या गुप्त अणुप्रकल्पावर काम केलं होतं, तो आता त्या प्रकल्पाची गुप्तता संपुष्टात आणू पाहात होता. वानुनूबद्दलच्या इतर आक्षेपार्ह गोष्टीही मोसादला आत्ताच समजल्या. प्रचंड मोठी चूक झालेली आहे आणि अक्षम्य असा निष्काळजीपणा झालेला आहे यावर सर्वांचंच एकमत झालं होतं, पण आता वेळ घालवून चालणार नव्हतं. कुठल्याही परिस्थितीत वानुनूला थांबवणं गरजेचं होतं. मोसाद संचालक आदमोनीने स्वतः यात लक्ष घालायचं ठरवलं आणि वानुनूला अटक करण्याच्या ऑपरेशनची सुरुवात केली. या ऑपरेशनचं सांकेतिक नाव होतं ऑपरेशन कानिउक.
आदमोनीने ताबडतोब सीझरिआ कमांडोंचं एक युनिट ऑस्ट्रेलियाला रवाना केलं, पण ते तिकडे पोचल्यावर त्यांना समजलं की वानुनू त्याआधीच पळालाय. जेव्हा त्यांनी चौकशी केली, तेव्हा त्यांना समजलं की तो इंग्लंडला गेलाय.
ग्वेरेरोने लंडनमध्ये संडे टाईम्सला दिलेल्या फोटोंनी संडे टाईम्सच्या लोकांचं कुतूहल नक्कीच चाळवलं गेलं होतं. त्यांनी थिओडोर टेलर आणि फ्रँक बार्नाबी या दोघा अणुशास्त्रज्ञांकडून ग्वेरेरोकडे असलेल्या फोटोंची सत्यता पडताळून पाहिली होती. टेलर आणि बार्नाबी या दोघांनीही हे फोटो अस्सल असल्याचा निर्वाळा दिला होता. त्यामुळे आपल्या हातात घबाड आलेलं आहे याची त्यांना खात्री पटली होती. आता त्यांना वानुनूला भेटायचं होतं. त्यामुळे त्यांनी आपला एक स्टार पत्रकार पीटर हाऊनम याला ऑस्ट्रेलियाला पाठवलं. वानुनूला भेटल्यावर हाऊनमचीही त्याच्या फोटोंच्या सत्यतेबद्दल खात्री पटली. मुख्य म्हणजे तो वानुनूला भेटून त्याच्या प्रांजळपणामुळे खूपच प्रभावित झाला. ग्वेरेरोने लंडनमध्ये वानुनू इझरेली शास्त्रज्ञ असल्याची लोणकढी थाप मारली होती, पण आपण फक्त तंत्रज्ञ होतो हे वानुनूने स्वतःहून हाऊनमसमोर कबूल केलं.
ग्वेरेरोला बाजूला सारून वानुनू आणि हाऊनम सिडनीहून लंडनला गेले. लंडनला पोचल्यावर संडे टाईम्सच्या लोकांनी वानुनूची कसून उलटतपासणी केली. त्याने आपल्याला होती ती सगळी माहिती सांगितलीच, आणि शिवाय काही महत्वाच्या गोष्टीही सांगितल्या, ज्या तोपर्यंत जगात कुणालाही माहित नव्हत्या – इझरेली सरकारशिवाय. त्यातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इझराईल न्यूट्रॉन बॉम्ब विकसित करत आहे – ज्यामुळे लोक मरण पावतील, पण इमारती आणि वाहनांना कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही. त्याने इन्स्टिट्यूट २ मध्ये कशा प्रकारे बॉम्बची जुळणी केली जाते तेही अगदी सविस्तर सांगितलं.
हे सगळं सांगत असताना एकीकडे वानुनू प्रचंड दडपणाखाली होता. इझराईल, विशेषतः मोसाद एजंट्स त्याचं अपहरण करतील आणि त्याला ठार मारतील अशी त्याला सारखी भीती वाटत होती. संडे टाईम्सच्या लोकांची आतापर्यंत त्याच्या आणि त्याच्या फोटोंच्या खरेपणाबद्दल पूर्णपणे खात्री पटली होती, त्यामुळे त्यांनी त्याला शांत करण्याचे आणि त्याचं मन रिझवण्याचे अनेक प्रयत्न केले. त्याला जे पैसे त्यांनी देऊ केले होते, तेही अफाट होते. निव्वळ त्याची कथा आणि फोटो यांच्यासाठी एक लाख डॉलर्स; त्याची कथा आणि फोटो प्रकाशित झाल्यावर संडे टाईम्सचा जो वाढलेला खप असेल, त्यातले ४० टक्के आणि जर त्याच्या कथेवर पुढे पुस्तक छापलं गेलं, तर त्या पुस्तकाच्या विक्रीच्या २५ टक्के. त्यांनी त्याला हेही सांगितलं की संडे टाईम्सचा मालक रुपर्ट मरडॉकच्या मालकीची ट्वेंटीएथ सेंच्युरी फॉक्स ही चित्रपट कंपनी या कथेवर चित्रपटही बनवण्याचा विचार करत आहे आणि कदाचित सुप्रसिद्ध अभिनेता रॉबर्ट डी नीरो त्यात वानुनूची भूमिका करेल.
हे सगळं ठीक होतं, पण त्याला सगळे ऐषोआराम देत असताना संडे टाईम्सच्या लोकांना त्याची एक गरज समजू शकली नाही – सेक्स. वानुनूच्या आयुष्यात तोपर्यंत कोणतीही स्त्री आलेली नव्हती आणि तो स्त्रीसहवासाचा भुकेला होता. पण ती एक गोष्ट सोडून बाकी सगळं त्यांनी त्याला देऊ केलं. तो इतका घायकुतीला आलेला होता की दिसेल त्या मुलीकडे तो सेक्सची मागणी करत होता. संडे टाईम्सची पत्रकार रोवेना वेब्स्टरला वानुनूची मुलाखत घ्यायची होती. त्या एका तासात त्याने तिला त्याच्याबरोबर झोपण्याची अक्षरशः विनवणी केली. तिने अर्थातच ती झिडकारली. संडे टाईम्सच्या लोकांनी त्याची मागणी किमान अंशतः जरी पूर्ण केली असती, तरी पुढे ज्या घटना घडल्या, त्या घडल्या नसत्या.
मोसाद आपल्या मागावर आहे ही वानुनूची भीतीही अनाठायी नव्हती. संडे टाईम्सच्या लोकांनी वानुनूची पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी एका पत्रकाराला इझराईलमध्ये पाठवलं. त्याने इझराईलमध्ये वानुनूची चौकशी करायला सुरुवात केल्यावर शाबाकच्या लोकांना समजलं. ताबडतोब शाबाक आणि मोसाद यांच्या दोन टीम्स लंडनमध्ये उतरल्या. त्यातल्या एका टीमचं नेतृत्व मोसादचा उपसंचालक शब्ताई शावितकडे होतं, तर दुसऱ्या टीमची धुरा सीझरिआचा प्रमुख बेनी झीवी सांभाळत होता.
मोसादच्या दोघा एजंट्सनी प्रेस फोटोग्राफर बनून संडे टाईम्सच्या इमारतीवर पाळत ठेवली. काही दिवसांनी त्यांना वानुनू दिसला. त्यांनी त्याचा पाठलाग करायला सुरुवात केली. तो जिथे जात होता, तिथे मोसादचे एजंट्स त्याच्या मागावर होते. त्याच्यासाठी त्यांनी एक खास तंत्र वापरलं होतं. हे तंत्र आईकमनला अर्जेन्टिनामधून इझराईलमध्ये आणणाऱ्या टीमचा सदस्य असलेल्या झ्वी माल्किनने विकसित केलं होतं. त्यानुसार ज्याचा पाठलाग करायचा आहे, तो माणूस कुठे जाऊ शकेल याचा अंदाज मोसाद एजंट्स बांधायचे आणि त्या ठिकाणी आधीच पाळत ठेवायचे. वानुनूच्या बाबतीत हे तंत्र १०० टक्के अचूक ठरलं.
२४ सप्टेंबर १९८६ या दिवशी वानुनू फेरफटका मारायला लंडनच्या प्रसिद्ध लिस्टर स्क्वेअर भागात आला होता. तो त्याच्या हॉटेलमध्ये असताना टीव्हीवर चार्लीज एंजल्स ही मालिका खूप आवडीने पाहात असे. त्यातली फराह फॉसेट ही अभिनेत्री त्याला आवडत असे. आणि आता लिस्टर स्क्वेअरमध्ये फिरत असताना त्याला बऱ्यापैकी तिच्यासारखी दिसणारी एक मुलगी एका वर्तमानपत्रांच्या स्टॉलजवळ उभी असलेली दिसली. तो तिच्याकडे टक लावून बघत असताना तिने त्याच्याकडे पाहिलं – अर्थपूर्णरीत्या बराच वेळ पाहिलं आणि मग ती वर्तमानपत्र विकत घेऊन निघून गेली. वानुनूने विरुद्ध दिशेला जायचा प्रयत्न केला, पण त्याचे पाय त्याला तिच्याकडे घेऊन गेले. सगळं धैर्य एकवटून त्याने तिच्याशी बोलायची पर्वानिगी मागितली. ती गोड हसली, आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली. तिचं नाव सिंडी हानिन होतं. ती ज्यू होती, आणि अमेरिकेतल्या फिलाडेल्फिया शहरात तिचं एक ब्युटी पार्लर होतं. लंडनमध्ये ती सुट्टीवर आली होती.
वानुनू सावध झाला. गेले काही दिवस तो प्रचंड तणावाखाली होता. संडे
टाईम्सचे लोक त्याचे फोटो छापत नव्हते. त्याऐवजी ते त्याला सारखे प्रश्न
विचारत होते. शिवाय त्यांनी त्याला हेही सांगितलं होतं, की त्याचे फोटो
प्रकाशित करण्याआधी ते इझरेली वकिलातीमध्ये जाऊन इझरेली सरकारची या सगळ्या
प्रकरणावर काय प्रतिक्रिया आहे, ते विचारणार आहेत. तसं करायची काय गरज आहे,
हा प्रश्न त्याला पडला होता. जेव्हा त्यांनी त्याला सांगितलं, की
पत्रकारितेच्या जगात नेहमीच दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेऊन मग ते छापलं
जातं, तेव्हा त्याचा त्याच्यावर विश्वास बसला नाही. ते आपल्याला मोसादच्या
हवाली करणार अशी भीती त्याच्या मनात सतत होती.
आणि आता ही सिंडी अचानकपणे त्याच्या समोर आली होती.
“ तू मोसादकडून आली आहेस का?” त्याने तिला हसतहसत विचारलं.
“नाही,” ती म्हणाली, “ मोसाद म्हणजे काय?”
तो जरा शांत झाला. तिने त्याला त्याचं नाव विचारलं.
“ जॉर्ज.” तो म्हणाला. त्याला संडे टाईम्सच्या लोकांनी हॉटेलमध्ये याच नावाने ठेवलं होतं.
ती परत गोड हसली, “ काहीतरीच काय! तू जॉर्ज नाहीस.”
त्याचा हात पकडून ती त्याला जवळच्या एका कॅफेमध्ये घेऊन गेली. तिकडे त्याने तिला आपलं खरं नाव सांगितलं आणि आपण लंडनला का आलोय तेही सांगितलं. अगदी संडे टाईम्सच्या नावासकट. तिने ताबडतोब त्याला अमेरिकेला येऊन तिथे न्यूयॉर्क टाईम्स किंवा वॉशिंग्टन पोस्ट सारख्या ख्यातनाम वृत्तपत्रांमध्ये त्याचे फोटो द्यायचं सुचवलं. पण ते त्याला ऐकू येत नव्हतं. तो फक्त एकटक तिच्याकडे बघत होता. त्याच्या लक्षात यायच्याआधीच तो तिच्या प्रेमात पडला होता. अगदी सपशेल, केळीच्या सालीवरून घसरून पडल्यासारखा!
त्यानंतर तो तिला आणि ती त्याला सोडायला तयार नव्हते. दोघेही लंडन शहरात भटकले, त्यांनी नाटकं आणि चित्रपट पाहिले आणि हे सगळं चालू असताना तिने त्याला आपली असंख्य चुंबनं घेऊ दिली. पण त्याला जे हवं होतं, त्यासाठी मात्र ती तयार नव्हती. तिने त्याला स्पष्टपणे सांगितलं होतं, की तिच्या हॉटेलमध्ये ती तिच्या रूममध्ये आपल्या मैत्रिणीबरोबर राहाते आहे, त्यामुळे त्यांना तिच्या रूममध्ये भेटणं शक्य नाही. ती त्याच्या हॉटेल रूमवर यायलाही तयार नव्हती. तू तयार नाहीयेस, तू इतक्या तणावाखाली आहेस की तुला ते जमणार नाही असं तिने त्याला अनेक वेळा ऐकवलं होतं.
नंतर अचानक तिने त्याला सुचवलं, “ तू माझ्याबरोबर रोमला का येत नाहीस? माझी बहीण तिथे राहते. तिचं तिथे स्वतःचं घर आहे. आपण तिथे मस्त मजा करू. तुला तिथे तुझ्या सगळ्या तणावपूर्ण गोष्टींचा विसर पडेल.”
वानुनूसाठी रोम म्हणजे पूर्णपणे अनोळखी भाग होता. त्यामुळे त्याने नकार दिला. पण ती रोमला जाणारच होती. तिने स्वतःसाठी बिझनेस क्लास तिकीटसुद्धा काढलं होतं. तिला न भेटण्याच्या विचाराने वानुनू कासावीस झाला आणि शेवटी त्याने तिच्याबरोबर यायला होकार दिला. तिने लगोलग त्याच्यासाठीसुद्धा बिझनेस क्लासचं तिकीट विकत घेतलं. “ मला नंतर पैसे दे,” असं तिच्याकडून ऐकल्यावर वानुनूच्या मनात कुठलीही शंका राहिली नव्हती.
जर त्याचं डोकं ठिकाणावर असतं तर त्याला यामध्ये नक्कीच काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय आला असता. एक मुलगी त्याला रस्त्यात भेटते काय, त्याच्याबरोबर मैत्री करते काय आणि त्याला रोमला आपल्याबरोबर यायचं आमंत्रण देते काय. एवढंच नाही, तर त्याचं तिकीटही ती काढते – तेही बिझनेस क्लासचं महागडं तिकीट. शिवाय ती त्याच्याबरोबर लंडनमध्ये सेक्सचा अनुभव घ्यायला तयार नव्हती, पण रोममध्ये मात्र तिची त्याला हरकत नव्हती. हा नक्कीच विचित्र प्रकार होता. पण हे लक्षात येण्याएवढं भान आणि संयम वानुनूकडे नव्हता. मोसादमधल्या मानसशास्त्रज्ञांनी त्याच्या व्यक्तिमत्वाचा इतका बारीक अभ्यास केला होता, आणि त्याला नक्की कशाने गळाला लावता येईल याबद्दलचे त्यांचे आडाखे इतके अचूक होते, की एखाद्या कळसूत्री बाहुल्यासारखा वानुनू त्यांना हवं तसं वागत गेला.
वानुनूने सिंडीबद्दल पीटर हाऊनमला सांगितलं होतं. त्याच्यासारख्या मुरब्बी पत्रकाराला लगेचच संशय आला. त्याने वानुनूला थांबवायचा प्रयत्न केला पण वानुनूच्या डोक्यावर सिंडीचा अंमल आता पूर्णपणे चढला होता. आणि खरं सांगायचं तर केवळ सिंडीबरोबर झोपण्यासाठी म्हणून वानुनू लंडन सोडून रोमला जाईल असं हाऊनमला वाटलं नाही.
सिंडीने रोमला जायचा विषय काढण्यामागचं कारण साधं होतं. मोसादला लंडनमध्ये काहीही करायचं नव्हतं. इझराईलचे पंतप्रधान शिमॉन पेरेस यांना मार्गारेट थॅचर आणि एम.आय. ५ यांच्याशी कुठल्याही परिस्थितीत पंगा घ्यायचा नव्हता. जोनाथन पोलार्ड प्रकरण होतंच. शिवाय काही महिन्यांपूर्वी पश्चिम जर्मनीमध्ये तिथली प्रतीहेरगिरी संस्था बीएफव्हीला एका टेलिफोन बूथमध्ये आठ ब्रिटिश पासपोर्ट असलेली एक बॅग सापडली होती. त्याचबरोबर त्या बॅगच्या मालकाचा पत्ताही मिळाला होता. हा माणूस बॉनमधल्या इझरेली वकिलातीत काम करत होता. जेव्हा हे उघड झालं तेव्हा ब्रिटन आणि पश्चिम जर्मनी या दोन्ही देशांच्या सरकारांचा राग अनावर झाला. आपण ब्रिटन आणि जर्मनी यांच्या भूमीवर काहीही करणार नाही असं वचन मोसादला द्यायला लागलं. पण इटलीची परिस्थिती वेगळी होती. इटालियन गुप्तचर संस्था सिस्मीबरोबर मोसादचे चांगले संबंध होते. सिस्मीचा प्रमुख अॅडमिरल फुल्व्हियो मार्टिनी आणि मोसाद संचालक नाहूम आदमोनी हेही एकमेकांचे वैयक्तिक मित्र होते. जोपर्यंत मोसाद इटालियन नागरिकांना हात लावत नाही तोपर्यंत सिस्मीला त्यांनी इटालियन भूमीवर काहीही केलं तरी फरक पडत नव्हता.
३० सप्टेंबर १९८६ या दिवशी ब्रिटिश एअरवेजच्या फ्लाईट ५०४ ने सिंडी आणि मोर्डी एकमेकांच्या हातात हात गुंफून रोमच्या दिशेने रवाना झाले. तिथे ती इटालियन प्रमाणवेळेनुसार रात्री ९ वाजता उतरले. विमानतळावर एक भलामोठा हसतमुख इटालियन माणूस त्यांच्या स्वागतासाठी एक तितकाच भलामोठा पुष्पगुच्छ घेऊन हजर होता. तो त्यांना सिंडीच्या बहिणीच्या फ्लॅटवर न्यायला आला होता. वानुनूचं सिंडीबरोबर झोपायचं स्वप्न पूर्ण व्हायच्या अगदी जवळ होतं. सिंडीलाही बहुतेक त्याची जाणीव झाली होती. ती वानुनूची असंख्य चुंबनं घेऊन त्याला उत्तेजित करत होती.
त्यांची गाडी एका छोट्या बंगल्यासमोर थांबली. एका तरुण मुलीने बंगल्याचं दार उघडलं. वानुनू इतका उतावीळ झाला होता की तो काहीही विचार न करता बंगल्यात शिरला. तो आत शिरल्यावर त्या मुलीने बंगल्याचं दार लावून घेतलं आणि दोन धटिंगणांनी बेसावध वानुनूवर झडप घातली आणि त्याच्या डोक्यावर प्रहार करून त्याला जमिनीवर पाडलं. ते त्याचे हातपाय बांधत असताना त्या मुलीने त्याला एक इंजेक्शन दिलं आणि वानुनू बेशुद्ध झाला.
त्याला ताबडतोब एका फळांची वाहतूक करणाऱ्या ट्रकमध्ये घालून इटलीच्या उत्तरेकडे नेण्यात आलं. हा प्रवास अनेक तास चालला. वानुनू बेशुद्धच होता. तो जरा शुद्धीवर यायची चिन्हं दिसायला लागली, की ती मुलगी त्याला परत एक इंजेक्शन देऊन बेशुद्ध करत होती. ला स्पेझिया बंदरात हा ट्रक पोचल्यावर वानुनूला पहाटेच्या अंधारात एका स्ट्रेचरवर घट्ट बांधून एका स्पीडबोटवर बसवण्यात आलं. ही स्पीडबोट भूमध्य समुद्रात वेगाने प्रवास करत आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीमध्ये तापुझ नावाच्या इझरेली मालवाहू जहाजाकडे आली. वानुनूला स्पीडबोटीवरून तापुझवर चढवण्यात आलं आणि एका केबिनमध्ये डांबण्यात आलं. तापुझने लगेचच इझराईलचा मार्ग पकडला.
इझराईलच्या अश्केलॉन बंदराच्या जवळ आल्यावर तापुझने नांगर टाकला आणि किनाऱ्यावर संदेश पाठवला. वानुनूला इझरेली तटरक्षक दलाच्या युद्धनौकेवर हलवण्यात आलं आणि ही नौका त्याला इझराईलच्या किनाऱ्यावर घेऊन आली. किनाऱ्यावर आणल्यावर शाबाक अधिकाऱ्यांनी त्याला रीतसर अटक केली आणि लॉकअपमध्ये हलवलं.
वानुनूला अटक झाली असली, तरी इझराईलच्या आण्विक रहस्यांचा भेद मोसादला थांबवता आला नाही. वानुनूला अश्केलॉनच्या तुरुंगात पोलीस प्रश्न विचारत असताना संडे टाईम्सने त्याने काढलेले दिमोना अणुप्रकल्पाचे फोटो आणि त्याने त्यांना दिलेली माहिती प्रकाशित करायला सुरुवात केली. ती संडे टाईम्सबरोबरच जगभरातल्या इतर वृत्तपत्रांमध्ये आणि नियतकालिकांमध्येही प्रकाशित झाली.
या सर्व प्रकाशित माहितीमधून काढण्यात आलेले निष्कर्ष धक्कादायक होते. तोपर्यंत इझराईलकडे १० ते २० प्राथमिक स्वरूपाचे अणुबॉम्ब असतील असं सगळ्यांना वाटत होतं. पण वानुनूच्या माहितीमुळे हे उघड झालं की इझराईलकडे तब्बल १५० ते २०० अत्याधुनिक अणुबॉम्ब बनवण्याची क्षमता होती. त्याचबरोबर इझराईल हायड्रोजन बॉम्ब आणि न्यूट्रॉन बॉम्बसुद्धा बनवू शकतो हेही उघडकीस आलं.
ही माहिती उघड झाल्याचं पोलिसांनी वानुनूला तुरुंगात सांगितल्यावर त्याला स्वतःच्या जीवाची भीती वाटायला लागली. त्याला सिंडीचीही काळजी वाटत होती. त्याला त्या बंगल्यात पाठवल्यानंतर ती गायब झाली होती आणि त्याला नंतर आयुष्यात कधीही भेटणार नव्हती, हे त्याला त्यावेळी माहित नव्हतं.
ब्रिटनमध्ये ब्रिटिश वृत्तपत्रांनी मोसादवर वानुनूला लंडनमधून उचलल्याचा आरोप केला. ब्रिटनच्या संसदेमध्ये ब्रिटिश खासदारांनी इझराईलवर कारवाई करायची सरकारकडे मागणी केली. शेवटी इझराईलने वानुनू आपल्या ताब्यात असल्याचं आणि त्याच्यावर खटला चालणार असल्याचं जाहीर केलं. तोपर्यंत नोव्हेंबर महिना उजाडला होता. वानुनूनेही अजून एक मोठा स्टंट केला. त्याला तुरुंगातून कोर्टात नेणाऱ्या पोलिसांच्या गाडीत तो मागे बसला होता. समोर पत्रकार आणि फोटोग्राफर्स यांचा मोठा जमाव होता. अचानक वानुनूने आपल्या हाताचा तळवा गाडीच्या काचेवर आपटला. त्यावर vanunu m was hijacked in rome, itl, 30.0.86. 21.00. come to rome by fla ba 504 हे शब्द लिहिलेले होते. पोलिसांच्या काही लक्षात यायच्या आत अनेकजणांनी त्याचा आणि त्याच्या हाताच्या तळव्याचा फोटो काढला होता. हे फोटो जगभर छापून आले.
वानुनूचं मोसादने रोममध्ये अपहरण केलं आणि लंडनपासून रोमपर्यंत तो स्वतःच्या इच्छेने गेला होता हे जेव्हा जाहीर झालं तेव्हा ब्रिटिश सरकार आणि ब्रिटिश जनमत जरा शांत झालं. इटालियन सरकारनेही तोंडदेखला निषेध व्यक्त केला.
वानुनूवर खटला चालवण्यात आला आणि न्यायालयाने हेरगिरी आणि देशद्रोह हे त्याच्यावर ठेवलेले आरोप मान्य केले आणि त्याला दोषी ठरवून १८ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली. खटला चालू असताना त्याच्या वकिलांनी तो हेर किंवा देशद्रोही नसून अण्वस्त्रविरोधी कार्यकर्ता असल्याचा बचाव मांडला होता. संपूर्ण जगभर असलेल्या वानुनूच्या चाहत्यांना आणि आपापल्या देशांत अण्वस्त्रविरोधी भूमिका घेणाऱ्या इतर कार्यकर्त्यांनाही वानुनू हा आपला नायक आणि आदर्श वाटत होता. संपूर्ण जगभर या कार्यकर्त्यांनी इझराईलच्या वकिलातींच्या बाहेर इझराईलविरुद्ध निदर्शनं केली होती आणि वानुनूला सोडून देण्याची मागणी केली होती.
न्यायालयाने मात्र हा सगळं बचाव फेटाळून लावला. न्यायाधीशांच्या म्हणण्यानुसार वानुनू चिडलेला आणि गोंधळलेला होता. जर त्याची दिमोनामधली नोकरी गेली नसती, तर कदाचित त्याने काढलेले फोटो जगासमोर आले नसते. दिमोनामध्ये काम करत असताना त्याने इझरेली अणुप्रकल्पाविरुद्ध कोणतीही भूमिका घेतलेली नव्हती. त्याने देश सोडून बाहेर गेल्यावर लगेचच आपला लढा चालू केला नाही. त्याला जेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्कर ग्वेरेरो भेटला आणि या फोटोंचा वापर करून कसे पैसे कमावता येतील हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं तेव्हा त्याने त्यांचा वापर करायचा निर्णय घेतला.
पण अर्थात जगभरातल्या भोळ्याभाबड्या लोकांसाठी वानुनू त्यांचा नायक होता आणि इझरेली सरकार आणि मोसाद हे खलनायक. एका अमेरिकन कुटुंबाने त्याला दत्तकसुद्धा घेतलं होतं – त्याचं स्वतःचं कुटुंब हयात असताना. अनेकांनी त्याला शांततेसाठी दिलं जाणारं नोबेल पारितोषिक देण्याची शिफारस केलेली आहे.
१८ वर्षांनी – २००४ मध्ये वानुनूची सुटका झाली. तुरुंगात असताना त्याला एकांतवासातही ठेवण्यात आलं होतं असं त्याने कैदेतून मुक्त झाल्यावर दिलेल्या मुलाखतींमध्ये सांगितलं. इझराईलमध्ये ज्यू गुन्हेगारांना मृत्यूदंड देण्याची पद्धत नसल्यामुळे आपल्याला इझरेली सरकारने जिवंत ठेवलेलं असल्याचंही त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं. त्यावर मोसाद किंवा इझरेली सरकार यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही.
आज वानुनू स्वतःला जॉन क्रॉसमन याच नावाने संबोधित करतो. त्याने २०१५ मध्ये क्रिस्टीन योकिमसेन या स्त्रीशी लग्न केलं आणि आज तो जेरुसलेममधल्या एका चर्चमध्ये राहतो. त्याने नॉर्वे, स्वीडन आणि आयर्लंड या देशांना त्याला आश्रय देण्याची विनंती केली होती, पण ती मान्य झाली नाही.
मोसादच्या लोकांना त्याच्या कमकुवत दुव्याचा सुगावा कसा लागला त्याची कथा एकदम मनोरंजक आहे. इराणगेट प्रकरणात सहभागी असलेल्या अरी बेन मेनाशे नावाच्या एका माजी मोसाद एजंटने १९९१ मध्ये हे जाहीर केलं होतं. त्याच्या म्हणण्यानुसार मोसादने आपल्या हस्तकांना वानुनू राहात असलेल्या हॉटेलमध्ये वेटर्स आणि हाउसकीपिंगच्या लोकांमध्ये घुसवलं होतं. त्यांच्याचकडून त्याला चार्लीज एंजल्स मधली फराह फॉसेट आवडत असल्याचं मोसादला समजलं आणि तिच्याशी दिसण्यात साधर्म्य असणाऱ्या सिंडीला त्यांनी त्याच्या मागावर सोडलं. शिवाय त्याला गोंधळात पाडण्यासाठी आणि संडे टाईम्सच्या लोकांच्या मनात त्याच्याविषयी संशय निर्माण करण्यासाठी मोसादने अजून एक युक्ती केली होती. त्यांनी संडे टाईम्सचं प्रतिस्पर्धी वृत्तपत्र असलेल्या संडे मिरर या वृत्तपत्राच्या पत्रकारांना वानुनूशी संपर्क साधून त्याला संडे टाईम्सच्या वरचढ ऑफर द्यायला सांगितलं. हे जेव्हा संडे टाईम्सच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी वानुनूला अजून कडेकोट बंदोबस्तात ठेवायला सुरुवात केली. स्त्रीसहवास नसल्यामुळे आधीच कावलेल्या वानुनूसाठी ही शेवटची काडी होती. आणि मग त्यांनी सिंडी आणि त्याची भेट घडवून आणली. संडे मिररचा मालक आणि संचालक रॉबर्ट मॅक्सवेल हा मोसादचा हस्तक होता.
वानुनूला रोममध्ये आणणारी सिंडी ही कोण होती? तिचं खरं नाव होतं शेरील बेन तोव्ह. सिंडी हानिन हे जे आपलं नाव तिने वानुनूला सांगितलं होतं, ते तिच्या बहिणीचं नाव होतं. शेरील मूळची अमेरिकन होती आणि अमेरिका आणि इझराईल यांची दुहेरी नागरिक होती. वयाच्या सतराव्या वर्षी ती अमेरिकेतून इझराईलला आली आणि प्रथम इझरेली सैन्यात आणि नंतर मोसादमध्ये दाखल झाली. वानुनूच्या अपहरणानंतर तिला मोसादमधून राजीनामा द्यावा लागला कारण पीटर हाऊनमने तिचे काही फोटो काढले आणि प्रकाशित केले होते. आज ती तिच्या पतीबरोबर ओरलँडो, फ्लोरिडा इथे निवृत्त आयुष्य जगते आहे.
क्रमशः
संदर्भ –
१. Gideon’s Spies - by Gordon Thomas
२. Mossad – the Greatest Missions of the Israeli Secret Service – by Michael Bar-Zohar and Nissim Mishal
३. History of Mossad – by Antonella Colonna Vilaci
४. The Israeli Secret Services – by Frank Clements