Sunday, January 31, 2021

अजिंक्यतारा किल्ला

 मराठा साम्राज्याची पहिली राजधानी म्हणजे राजगड. नन्तर शिवाजी महाराजांनी रायगडला आपली राजधानी हलवली. राजाराम महाराजांच्या काळात मराठ्यांची राजधानी होती दक्षिणेतील जिंजी किल्ला. नन्तर शाहू महाराजांच्या काळात मराठा साम्राज्याच्या राजधानीचा मान मिळाला अजिंक्यतारा किल्ल्याला.अजिंक्यतारा किल्ल्याचे मूळचे नाव सातारचा किल्ला. समुद्रसपाटीपासून या किल्याची उंची ३२२० फूट आहे. शहरापासून हा किल्ला ९०० फूट उंचीवर आहे. या किल्याची पूर्व-पश्चिम लांबी ३३०० फूट व दक्षिण-उत्तर रुंदी १८०० फूट आहे. हा किल्ला त्रिकोणी असून, याचा पाया दक्षिण-उत्तर पूर्वेस आहे.

अजिंक्यतारा या नावाने ओळखला जाणारा हा किल्ला वेगवेगळ्या राजवटीत वेगवेगळ्या नावाने ओळखला गेला आहे. सातारचा किल्ला,  आझमतारा, हुकेबहन, सप्तर्षीचा किल्ला, मंगळाईचा किल्ला, इस्मतआरा, शाहूगड, सतारे तसेच अजिमतारा अशा विविध नावाने ओळखला गेला. 


भल्या-भल्या राजधुरंधर व्यक्तिंना आपल्या पोलादी कैदेत ठेवणारा अशा एक ना अनेक रूपांनी ‘अजिंक्यतारा’ किल्ल्याचे मराठ्यांच्या इतिहासात मोलाचे योगदान दिले आहे.छत्रपती शिवरायांना गंभीर आजारात मायेनं सावरणारा, छत्रपती राजाराम महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून घोषित केलेला, औरंगजेबाशी तब्बल साडेचार महिने प्रखर झुंज देणारा, मोगली आक्रमणातून स्वराज्य वाचविणाऱ्या रणरागिणी ताराराणींना साथ देणारा, छत्रपती शाहूंच्या काळात अटकेपार पसरलेल्या मराठी राज्याची राजधानी म्हणून मिरविणारा, शतकानुशतके सातारा शहराची प्रेमाने पाठराखण करणारा इतिहास प्रसिद्ध किल्ला म्हणजे ‌‘अजिंक्यतारा’...

 कोल्हापूरच्या शिलहार वंशीय दुसºया भोजराजाने इ. स. ११९० मध्ये हा किल्ला बांधला. भोजराजाची राजधानी पन्हाळगड येथे होती. या गडाचे ईशान्येस पूर्वीचे सातर हे गाव होते. सातर म्हणजे भरपूर  देणारे. या सातरचे सातारा झाले. सातारच्या किल्ल्यावर सप्तर्षीचे देऊळ होते. सप्तर्षीपासून सप्तर्षीपूर हे सातारचे जुने नाव रुढ झाले. जुन्या संस्कृत ग्रंथात सप्तर्षीपूर असा या गावाचा उल्लेख आढळतो. ऐतिहासिक व राजकीय पत्रव्यवहारात सातारे असा उल्लेख आढळतो. सातारच्या किल्ल्याला तट, बुरुज आणि वेशी यांची संख्या सतरा आहे. सतरावरून सातारा, सातदरेपासून सातारा, सप्ततारापासून सातारा अशा साताराच्या इतिहासाशी छत्रपती शिवाजीमहाराजांचा ऋणानुबंध आहे.शिलाहार भोज राजाने किल्ला बांधला तेव्हा एका महाराचा मुलगा व मुलगी यांना ईथे बळी दिले असे सांगतात. मात्र फेरिस्ता हा इतिहासकार लिहीतो कि चौथा बहामनी राजा महंमदशहा( इ.स. १३५८-१३७५) याच्या कारकीर्दीत सातारचा किल्ला बांधला गेला.साताऱ्याचा प्रथम लिखित उल्लेख या पत्रव्यवहारात आढळतो. त्याने ह्या किल्ल्याची पुनर्बांधणी केली असावी.

शिलहाराकडून देवगिरीच्या यादववंशीय सिंधन राजाने हा किल्ला जिंकून घेतला. त्यांच्या ताब्यात इ. स. १२०० ते १३०० पर्यंत हा किल्ला होता. त्यानंतर दिल्लीच्या खिलजी सुलतानाने हा किल्ला जिंकला. त्याच्याकडून तुघलक घराण्याने हा किल्ला जिंकून घेतला. त्यानंतर इ.स. १३४७ पासून १४९८ पर्यंत हा किल्ला बहामनी राजाकडे होता. विजापूरच्या अदिलशहाने हा किल्ला जिंकून घेतला. किश्वरखान ह्या सरदाराने पहिल्या आदिलशाहची (कार. १५५७–८०) विधवा बेगम चांदबीबी ही निजामशाहशी संगनमत करीत असल्याच्या संशयावरून तिला सातारा किल्ल्यात कैदेत ठेवले (१५८२); परंतु त्याच वर्षी किश्वरखानाचा पाडाव झाल्याने तिची सुटका झाली. पुढे आदिलशाहीत दिलावरखान याने कटकारस्थाने केली, म्हणून त्यास या किल्ल्यात ठेवण्यात आले होते (१५९२). या किल्ल्यातच तो मरण पावला..विजापूरकराने फलटणचे मुधोजी नाईक-निंबाळकर यांना १६४० पर्यंत याच किल्यावर सात वर्षे कैद करून ठेवले होते. शहाजी राजांकडे त्यावेळी कराडची देशमुखी होती.त्यांनी हातमिळवणी केली आणि निंबाळकर तुरुंगातून पळाले.त्या मदतीला जागून बजाजी निंबाळकरांची बहीण सईबाई शहाजी राजांची सुन झाली.तीच शिवाजी महाराजांची पहिली पत्नी.या किल्याचा उपयोग पूर्वी तुरुंगासारखाच केला जाई. १६५९ मध्ये छत्रपती शिवाजीमहाराजांनी हा किल्ला जिंकला. त्यानंतर मोगली अक्रमणांमुळे छत्रपती शिवाजीमहाराजांनी तह करून हा किल्ला मोगलांना दिला. १६६६ नंतर हा किल्ला विजापूरांकडे गेला. छत्रपती शिवाजीमहाराजांनी हा किल्ला जिंकून ताब्यात घेतला. शहाजीमहाराजांची विजाूपरांच्या कैदेतून सुटका झाल्यावर जेजुरी येथे व त्यानंतर या किल्लयावर शहाजी व शिवाजी राजे या दोघांची भेट घडली. पुन्हा किल्ला आदिलशहाकडे गेला. त्यांच्याकडून हा किल्ला इ. स. ११ नोव्हेंबर १६७५ रोजी जिंकला. या घटनेसंदर्भात ईंग्रजांनी पत्र पाठविले आहे,त्यात ते म्हणतात, "नुकताच त्याने ( शिवाजी महाराजांनी ) आदिलशाहीतील महत्वाचा आणि  मध्यवर्ती किल्ला घेउन तेथील अमर्यादित लुट बैलावरुन रायगडाला नेली आहे".

छत्रपती शिवाजीमहाराज १ डिसेंबर १६७६ पासून २५ जानेवारी १६७७ पर्यंत वास्तव्य करून होते.शिवरायांना अंगी ज्वर आल्याने दोन महिने विश्रांती घ्यावी लागली. कर्नाटक मोहिमेच्या आधी १६७५ मध्ये ते आजारी पडले असताना त्यांचा दोन महिने या किल्ल्यात मुक्काम होता. याच काळात रघुनाथ हणमंते त्यांना भेटले आणि कर्नाटक मोहिमेची योजना निश्चित झाली.

छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब बादशाहने स्वराज्यावर स्वारी केली. औरंगजेबाचा एक सेनानी सर्जाखान हा सातार्याचा किल्ला जिंकून घेण्यासाठी सातारा विभागात दाखल झाला. त्याच्या छावणीसोबत त्याचा जनानखाना ही होता. संताजी_घोरपडे, धनाजी_जाधव, रामचंद्रपंत_अमात्य, शंकराजी_नारायण या चार मराठा सरदारांच्या संयुक्त फौजांनी सर्जाखान वर हल्ला चढवण्यासाठी निघाले होते.

खानाची किल्ल्याच्या वेढ्याची तयारी चालू होती, एवढ्यात त्याच्यावर मराठ्यांशी लढण्याचा प्रसंग ओढावला. मराठा सैन्याचे नेतृत्व संताजी घोरपडे यांच्याकडे होते.

मराठे खानाच्या छावणी जवळ येताच त्याने आपल्या मुलाला गालिबखानाला ५००० सैन्य व ५ हत्ती देऊन आघाडीवर पाठवले. गालिबखान चालून येताच लढाईस तोंड फुटले. मराठ्यांच्याकडे अनुभवी बंदुकची होते. त्यांनी मोगलांवर बंदुकीच्या गोळ्यांचा वर्षाव केला. मोगलांच्या आघाडीवर असलेले हत्ती या गोळ्यांच्या माराने बिथरले आणि आपल्याच सैन्याला पायाखाली तुडवीत त्यांनी माघारी पळ काढायला सुरुवात केली. मराठ्यांचा हा हल्ला अचानक व अनपेक्षित होता तरीही खान डगमगला नाही. त्याने आपल्या भोवती असलेल्या सैनिकांनिशी मराठ्यांशी तोंड दिले. खान यावेळी हत्तीवर स्वार झाला होता. पण मराठ्यांच्या बाणांनी व बंदुकीच्या गोळ्यांनी तो जखमी झाला. त्याच्या अंगावरील कपडे पेटले आणि सर्जाखान जखमी होऊन हत्ती वरुन खाली पडला. मराठ्यांनी त्याला व त्याच्या जनानखान्याला कैद करून सातार्याच्या किल्ल्यावर नेले.या लढाईत पंधराशे मोगल सैनिक ठार झाले. चार हजार घोडे, आठ हत्ती आणि खानाच्या छावणीतील सर्व सामान मराठ्यांनी ताब्यात घेतले. सर्जाखान याने एक लाख रूपये दंड कबूल करून स्वतः ची सुटका करून घेतली.लढाईच्या धामधुमीत सर्जाखानाचे दोन मुलगे व दोन बायका मराठ्यांच्या तावडीतून निसटल्या.मराठ्यांची रूस्तमखान बरोबर ही लढाई झाली ती तारीख होती - २५ मे १६९०. पुढे छत्रपती राजाराम महाराजांनी २३ मे १६९८ रोजी सातारा ही राजधानी घोषित केली. २ मार्च १७०० रोजी त्यांचे निधन झाले.

यानंतरची लढाई म्हणजे अजिंक्याताराच्या इतिहासातीले एक ठळक घटना म्हणता येईल.हा इतिहास मुळ चित्रासहीत श्री. मनोज दानी यांनी लिहीला आहे.त्यांच्याच शब्दात तो वाचुया.

१९ फेब्रुवारी या शासकीय शिवजयंतीच्या निमित्ताने आजच्या महाराष्ट्र टाइम्स मध्ये माझ्या संशोधनावर आधारित ही बातमी प्रसिद्ध होत आहे. पॅरिसच्या राष्ट्रीय संग्रहालयात मला मराठयांच्या इतिहासातील एक सुवर्णपान ज्याला म्हणता येईल अश्या साताऱ्याच्या वेढ्याचे चित्र सापडले. त्यावर पुढील संशोधन करताना आणि चित्राची सत्यता तपासताना यासंबंधीत जुनी माहिती सापडली. ही माहिती आणि ते चित्र एकत्रित स्वरूपात इथे इतिहासाच्या अभ्यासकांसाठी आणि इतिहासप्रेमी वाचकांसाठी इथे देत आहे. हा लेख मूळ स्वरूपात सोशल मीडियावर अथवा इतर कुठे शेअर करण्यास माझी काही हरकत नाही.

सर्व चित्रे (अनुल्लेखित) साभार Bibliothèque nationale de France यांच्याकडून. त्यांची परवानगी वापरासाठी आवश्यक आहे. 

 हे चित्र कर्नल जेंतील याच्या संग्रहात मिळाले. हा फ्रेंच सैनिक अवधचा नबाब शुजाउद्दोला याच्या पदरी मिलिटरी सल्लागार म्हणून होता. १७७८ साली त्याने फ्रान्सला परत जाताना सगळा संग्रह आपल्याबरोबर नेला. तो आता फ्रान्सच्या राष्ट्रीय संग्रहालयात आहे.

चित्रातला प्रसंग १४ एप्रिल १७०० या दिवशी घडला. त्यामुळे हे चित्र १७०० ते १७७८ या कालावधीत कधीतरी काढलेले आहे. औरंगझेबाने चित्रकला इस्लामला निषिद्ध मानली होती, त्यामुळे त्याच्या पदरी असलेले बादशाही चित्रकार दुसरीकडे आश्रयाला गेले. मोगल चित्रकलेला पुन्हा राजाश्रय लाभला तो मुहम्मद शाह रंगीला याच्या कारकिर्दीत १७१९ ते १७४८ ला वर्षात. त्यामुळे हे चित्र बहुदा त्या काळातले असायची जास्त शक्यता आहे. वेढ्याची जी हकीगत आहे त्यातले प्रसंग एकत्र जोडून हे चित्र काढलेले दिसते. हे चित्र त्यामुळे अनेक प्रसंग जोडून एकदम दाखवते. हे काही एखाद्या फोटोग्राफसारखे अस्सल प्रातिनिधिक सत्यचित्रण नाही.


या मोठ्या केलेल्या भागात आपल्याला बादशाह औरंगझेब हा 'तख्त-ए-रवा' (फारसी - म्हणजे चालते-फिरते सिंहासन) या पालखीसारख्याच पण वरून उघड्या वाहनात दिसतो. बादशाह हा नेहमी सार्वजनिक जागी आजूबाजूच्या गोंधळाकडे लक्ष न देता हातात कुराणाची एक प्रत घेऊन ती वाचत असे. त्याचे खास शाही भोई लाल रंगाचे कपडे घातलेले आहेत. बादशाही मानमरातब चिन्हे छत्र-चामर इत्यादी जवळपास आहेत. बादशाहच्या डोक्याभोवती नेहेमीप्रमाणे सोनेरी वलय (अरोरा) आहे. त्यावर फारसीत त्याचे नाव 'आलमगीर' آلمگیر असे लिहिलेले आहे. बादशाह हा पूर्ण वृद्ध झाला असून त्याची मानही म्हातारपणामुळे वाकलेली आहे.


शाहजादा आझम (विकिपीडियावरून साभार)
बादशाहच्या काळ्या ढालीवर असलेली खास व्यक्ती म्हणजे त्याचा मुलगा शाहजादा आझम. त्याचा या लढाईतील आणि किल्ल्याच्या नामकरणातील सहभाग आपण खाली नंतर बघणार आहोत. आझमचे वयही भरपूर दिसते आहे, त्याची दाढी जवळजवळ पांढरी झालेली आहे.


बाद्शाहसमोर हात पुढे घडी घालून उभी असलेली व्यक्ती म्हणजे बहुदा तर्बीयतखान. हा मोगलांचा 'मीर-अतिश' म्हणजे तोफखान्याचा मुख्य होता. याच्याच प्रयत्नाने किल्ल्याला सुरुंग लावला गेला. तोफा, त्यांचे दमदमे हे सगळे याने आपल्या तुकडीकरवी रचले. त्याने पूर्ण लोखंडी चिलखत घातले आहे आणि त्याची दोन मुले (अथवा दोन अनुयायी/सरदार) त्याच्या मागे उभी आहेत.

(त्या काळी तोफांची मारा करण्याची रेंज फार नसे. म्हणून तोफा डोंगरावर भिंतीच्या जितके जवळ जात येईल तितक्या नेत. पण तोफा जवळ आल्या की किल्ल्यावरून बंदुका आणि वरच्या तोफांच्या माऱ्यात येत. म्हणूनआक्रमण करणाऱ्या सैन्यास आणि तोफांच्या गोलंदाजास संरक्षण म्हणून लाकडी भिंत / मनोरा टाईप तात्पुरता लाकडी आडोसा बांधत. त्याला दमदमा असं म्हणतात.)

 

हीच व्यक्ती (बहुदा तर्बीयतखान) आपल्याला हल्ला करायला तयार असलेल्या घोडेस्वारात एका घोड्यावर स्वार दिसते. घोडेस्वारांच्या रांगा सुरुंगातून पडलेल्या खिंडारावर हल्ला करायला तयार आहेत. मोगली सैन्यातले वेगवेगळे मनसबदार, त्यांचे झेंडे, सजवलेले घोडे असा सगळं आपल्याला तपशिलात काढलेले दिसते. प्रत्यक्षात (आपण खाली पाहू) हा हल्ला पहाटेस अंधारात घडला आणि साताऱ्याच्या किल्ल्यात घोडेस्वारावरून हल्ला करणे शक्य नाही. त्यामुळे आपण हा भाग एक कल्पनाचित्र म्हणूनच पहायचा.  

इथे आपल्याला किल्ल्यावर हल्ला करण्याऱ्या तोफा एकत्र आग ओकताना दिसतात. एका वर्षानंतर १७०१ मध्ये पन्हाळ्याच्या वेढ्यात हजार असलेल्या इंग्लिश राजदूत विल्यम नॉरीस (हा एक एक वेगळ्या लेखाचा विषय आहे) याने म्हणाले आहे की मोगल लोखंडी गोळ्याऐवजी बऱ्याचदा दगडाचे तुकडे तोफातून उडवीत. त्यामुळे तोफा लवकर खराब होत.

इथे आपल्याला किल्ल्यावरच्या बुरुजाला एक गोल छप्पर घातलेले दिसते. डेक्कन कॉलेजचे श्री. सचिन जोशी याना इतर चित्रातही ते सापडले आहे. त्यावरून सारे सांगता येते की त्या काळात पहारेकर्यांच्या सोयीसाठी (उन्हापावसात, रात्री अपरात्री गस्त घालताना) बुरुजावर आडोसा केलेला होता. सचिन जोशी यांचे अनुमान असे की तो लाकडाचा असल्यामुळे कधीच नष्ट झाला. त्याच्या खोबणी आपल्याला आजही कुठेकुठे किल्ल्यांवर सापडतात.


या भागात आपल्याला किल्याला सुरुंग उंडवल्यामुळे पडलेले खिंडार दिसते.
औरंगझेबाच्या दरबारात रोज घडलेली हकीगत फारसीत लिहून ठेवली जात असे . जयपूर इथे त्या हकीगतीतले काही सारांश मिळाले आहेत. ते लंडन आणि बिकानेर इथे सध्या आहेत. भारत इतिहास संशोधक मंडळात त्याची कॉपी आहे. त्यांना 'अखबारात-ए-दरबार-ए-मुअल्ला' म्हणजे 'श्रेष्ठ दरबारची बातमीपत्रे' असे म्हणतात. दिनांक १४ एप्रिल १७०० या दिवसाखाली आपल्याला खालील नोंद अखबारात सापडते.
(मी श्री. सेतुमाधवराव पगडी यांनी 'मोगल दरबारची बातमीपत्रे खंड १' यात दिलेले मराठी भाषांतर वापरलेले आहे)
काल बादशहा शेख हिदायतकेश याला म्हणाले, "तुम्ही तरबियतखानाला आज रात्री सुरुंग उडविण्यासाठी हुकुम लिहा." त्याप्रमाणे तरबियतखानाला हुकुम पाठविण्यात आला. बादशहांनी मुखलिसखान, हमीदुद्दीनखानबहादुर, सियादतखान वगैरेंना पुढीलप्रमाणे आज्ञा केली - रात्रीचा एक प्रहर राहिला असता तुम्ही स्वतःची पथके घेऊन हल्ला करण्यासाठी म्हणून तरबियतखानाच्या मोर्च्यात जा.
दिवसाच्या चार घटिका झाल्या असता बादशहांना कळविण्यात आले ते असे : आज्ञेप्रमाणे तरबियतखान याने दोन्ही सुरुंग उडविले. किल्ल्याची भिंत किल्ल्याच्या आत पडली. पण बुरुजाचा वरील भाग, वीस दरआ (?) लांबी रुंदीचा उडून दमदुम्यावर पडला. पुढील माणसे ठार झाली :-- खास चौकीची माणसे, मरहूम दिलावरखानाची मुले सखीखान, बुदीखान, असदुद्दीन, मरहूम लोधीखान याचा मुलगा अहमद, मुहंमद जमान वगैरे काकड जमातीचे लोक, सटवाजी डफळे याचा मुलगा बुदीखान, हजारी पथकातील माणसे, बंदुकची, दक्षिण सुभ्यातील तैनात सैनिक. अशी एकंदरीत जवळजवळ एक हजार माणसे दगडांच्या उडण्यामुळे त्या माराने मारली गेली आहेत. गनीम (मराठे) हे बुरुजाच्या पलीकडच्या बाजूला ठाण मांडून उभे असून बाण आणि बंदुकी यांचा मारा करीत आहेत. मुखलिसखान, तरबियतखान, हमीदुद्दीनखानबहादुर, मतलबखान वगैरे सरदार हे लढत आहेत (हमला मी नुमायद, हल्ला करीत आहेत). पण वरून बाण व बंदुकी यांचा इतका वर्षाव होत आहे की त्यांना पुढे सरकण्यास वाट सापडत नाही.
अर्थातच औरंगझेबाच्या स्वतःच्या अखबारात त्याला कमीपणा येईल अशी गोष्ट सापडत नाही, किंवा ती अगदी सौम्य पद्धतीने लिहिली जाई, कारण बादशाह अखबार स्वतः पाहून त्याला मंजुरी देत असे. हे अखबार बऱ्याच महत्वपूर्ण आणि तपशीलवार माहितीने भरलेले आहेत. आपल्याला साताऱ्याच्या प्रसंगाचे साग्रसंगीत विवरण साकी मुस्तेदखान या समकालीन इतिहासकाराने आपल्या 'मासिर-ए-अलामगिरी' या ग्रंथात लिहून ठेवलेले सापडते.
(हा उताराही सेतुमाधवराव पगडी यांच्या खंड १ मधून)
"काही वेळाने किल्ल्यातील मराठे त्या जागी आले. आणि बंदुकी झाडून गोळ्यांचा वर्षाव करू लागले. मोगलांचा दमदुमा मोडून पडला होता. त्यांच्या तोफा ठिकठिकाणी पडल्या होत्या. मोगल सैनिकांनी लढण्याचे सोडून दिले होते. मराठ्यांशी लढू शकेल असा तेथे कोण होता? मोर्चे येथून तेथपर्यंत लाकडाचे होते. बहेलियांनी रात्रीच्या वेळी कुणाला न कळत मोर्च्यांना आगी लावल्या. ही आग सात रात्री सात दिवस सारखी जळत होती. त्या भयंकर आगीला विझवू शकेल इतके पाणी तेथे कोठून मिळणार? ढिगाऱ्यात सापडलेले सगळे हिंदू आणि ज्यांना काढण्यास अवधी मिळाला नाही असे काही मुसलमान हे सगळे जळून खाक झाले. धन्य आहे या विश्वरूप अग्निकुंडाची."

सातारा जिल्हा गॅझेटीअरमध्ये आपल्याला सैन्याची रचना आणि सुरुंग लावलेली अंदाजे जागा सापडते. ही माहिती मी वरील नकाशात दाखवली आहे. आजही सातारा जिल्ह्यात अजिंक्यताऱ्याच्या दक्षिणेस आपल्याला नदीकाठी शहापूर हे खेडे सापडते. १७०० साली शाहजादा आझम याचा मुक्काम इथे होता. स्वतः औरंगझेब उत्तरेस 'कारंजा' इथे छावणी करून होता.
यानंतरची हकीगत आपल्याला अखबार आणि मराठी पत्रे (परशुरामपंत प्रतिनिधी यांनी चांदजी पाटणकर याना पाठवलेले पत्र - रेकॉर्डस् ऑफ शिवाजी पिरियड) यातून समजते. शाहजादा आझम याने साताऱ्याचा किल्लेदार सुभानजी याच्याबरोबर वाटाघाटी केल्या. मराठ्यांना बादशाहच्या नकळत एक मोठी रक्कम देणे कबुल केले आणि किल्ल्यातील सर्वाना सुरक्षित बाहेर जाऊ देण्याची हमी दिली. त्यानुसार मराठ्यांनी किल्ला रिकामा केला. बादशाहने मात्र शाहजादा आझम याने किल्ला 'घेतला' याचा आनंद मानून सातारा किल्ल्याचे नाव 'आझम तारा' असे ठेवले. आझम या फारसी शब्दाचा अर्थ अत्यंत श्रेष्ठ (Greater; greatest. Grand.). किल्ला मोगलांना फार काळ लाभला नाही. मराठ्यांनी तो लगेच पुन्हा ताब्यात घेतला. आझमताऱ्याचा आज अजिंक्यतारा असा (अपभ्रंश?) आपल्याला झालेला दिसतो.
सातारा वेढ्याच्या चार महिन्यांच्या काळात सेनापती धनाजी जाधव यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला. बादशहाला झुल्फिकारखानाची नेमणूक धनाजीच्या पाठलागावर करावी लागली. त्यांच्या या पाच महिन्यात सहा लढायांची अखबारात नोंद आहे. पंधरा हजार सैन्यानिशी कऱ्हाड इथे, मग हमिद्दुदीनखान याच्याशी लढाई, मग रहिमतपूरजवळ झुल्फिकारखानाबरोबर झुंज, खानापूर ठाण्यावर हल्ला, मग परांडा तालुक्यात उंदरगाव इथे खजिन्यावर हल्ला आणि गुलबर्गा जिल्ह्यात फिरोझाबाद इथे पुन्हा झुल्फिकारखानाबरोबर अशी चौफेर धनाजी जाधवांनी दिलेल्या लढायांची यादी फक्त सातारा वेढ्याच्या जेमतेम ४ महिन्यांच्या काळात आपल्याला सापडते.

नेमके झाले काय? मोगल सैन्याने नियोजन वाईट होते, त्यांनी फार सारासार विचार न करता सावधगिरी ना बाळगता, सैन्यतळ सुरक्षित ठिकाणी न पाठवता सुरुंग लावल्याने स्वतःचेच मोठे नुकसान करून घेतले. मराठ्यांनीहि किल्ल्याचा पडलेला भाग लावून धरला आणि मोगलांना काही आत शिरताच आले नाही. पण किल्ला कोणत्याची प्रकारे घ्यायचाच असल्याने आझमने पैसे देऊन किल्ला रिकामा करून घेतला.  मुघल बादशहाने या विजयाचे स्मारक म्हणून गोलाकार विजय स्तंभ करंजे, ता. सातारा येथे उभारला.

 सन १७०० ते १७०६ अजिंक्यतारा औरंगजेबाचे ताब्यात होता. पुढे ताराराणींनी तो परत मिळवला.अनाजीपंत यांनी अजिंक्यतारा मिळवून परशुराम त्रिंबक प्रतिनिधी यांना कसा दिला हि  हकीकत मोठी रंजक आहे.हे अनाजीपंत राजाराम महाराजांच्या पदरी कारकून होते.ज्यावेळी राजाराम महाराज जिंजीवरुन निघून सातार्‍याला आले त्यावेळी हे अनाजीपंत मोंघलांच्या ताब्यात सापडले.तिथून मोठ्या युक्तीने सुटून इ.स. १७०६ सातार्‍याक्डे येण्यास निघाले.त्याचवेळी त्यांची अजिंक्यतार्‍यावर येणार्‍या मोघलांच्या तुकडीशी गाठ पडली.अनाजीपंतांनी त्या मोघल सैनिकांना काही चटकदार गोष्टी सांगून व गाणी गाउन खुष केले.तेव्हा मोघल सैनिक त्यांना अजिंक्यतारा किल्ल्याच्या आत घेउन गेले.तेव्हा किल्ला ताब्यात घेण्याचा बेत त्यांनी परशुराम त्रिंबक प्रतिनिधींना कळविला.व काही मराठी सैनिकांना किल्ल्यात घेउन गेले.त्यांनी सर्व मोघल सैनिकांना कापून किल्ल्यावर पुन्हा भगवा फडकविला.

पुढे २० फेब्रुवारी १७०७ रोजी औरंगजेब पैंगबरवासी झाल्यावर त्याचा मुलगा अजिमशहा याने शाहू राजाची कैदेतून सुटका केली. शाहु महाराज चंदन वंदन येथे पोहचल्यावर त्यांनी परशुराम त्रिंबक यांना 'सातारचा किल्ला आमच्या हवाली करुन तुम्ही भेटीस यावे' अशी आज्ञा केली.परंतु प्रतिनिधि पडले ताराराणीच्या पक्षाचे ,त्यामुळे त्यांनी शाहु महाराजांची आज्ञा पाळली नाही.शेख मिरा व प्रयागजी प्रभु यांनी परशुराम त्रिंबक यांना किल्ला शाहु महाराजांच्या स्वाधीन करण्यास सांगितले.मात्र तरीही प्रतिनिशी एकेनात असे बघीतल्यावर दोघांनीही प्रतिनिधींना कैद करुन अजिंक्यतारा शाहु महाराजांच्या अखत्यारीत आणला. त्यांनी अजिंक्यताराला राजधानी केली.त्यानंतर १२ जानेवारी १७०८ रोजी त्यांचा याच किल्यावर राज्याभिषेक झाला. त्यांनी अजिंक्यताराला राजधानी केली.त्यांच्या कालखंडांनंतर छ. रामराजे, छ. आबासाहेब ऊर्फ दुसरे शाहूमहाराज आणि छ. प्रतापसिंहराजे यांचे राज्याभिषेक याच किल्यावर झाले. 

पुढे इ.स. १७३० मध्ये श्रीपतराव प्रतिनिधींनी वारणेच्या काठी कोल्हापुरच्या संभाजी महाराजांचा पराभव केला,तेव्हा प्रतिनिधींनी ताराराणी व त्यांची सुन राजसबाई यांना कैद करुन शाहु महाराजांच्या हवाली केले.त्यांनी त्या दोघींना सातार्‍याच्या किल्ल्यावर कैदेत ठेवले. पुढे इ.स. १६४६ मध्ये मराठ्यांनी कर्नाटकावर स्वारी केली तेव्हा अर्काटचा नवाब चंदासाहेब याला कैद करुन अजिंक्यतार्‍यावर कैदेत ठेवले.इ.स. १७४९ मध्ये शाहु महाराजांचे निधन झाल्यावर ताराबाईंचा नातु रामराजा गादीवर आला.तेव्हा बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब यांच्याकडे पेशवाईची वस्त्रे होती. ताराबाईंना मराठी राज्याची सर्व सुत्र आपल्या हाती हवी होती.त्याना  हे पेशवे मनातून सलत असत.नानासाहेब औरंगाबादला गेले असताना ताराबांईनी संधी साधून दमाजी गायकवाड्ना निरोप दिला, 'सातारच्या राजांचे व संपुर्ण मराठी राज्याचे पेशव्यांच्या कावेबाजपणापासून रक्षण करायचे असेल तर आपण ताबडतोब निघून यावे'. मात्र रामराजे या कटात सामिल होईनात.

दमाजी गायकवाड जवळ आले असे सजताच,ताराराणीने रामराजांना मेजवानीकरता म्हणून किल्ल्यात बोलावून नेले व एकदम कैद केले.ताराराणीने रामराजांना वाईट वागणूक दिली.नानासाहेबांना हे समजताच त्यांनी लढाई वैगरे न करता ताराराणीशी सला केला.पुढे छत्रपती नामधारी व पेशवे सर्वसत्ताधारी बनले.मात्र पेशव्यांचा हा वरचष्मा सहन न होउन इ.स. १७९८ मध्ये दुसर्‍या शाहु महाराजांनी स्वताचे महत्व प्रस्थापित करण्यासाठी अजिंक्यतार्‍याची डागडूजी सुरु केली.मात्र पेशव्यांनी सावध होउन परशुरामपंत पटवर्धन यांना पाठविले.त्यांनी अजिंक्यतार्‍याला वेढा दिला.त्यामुळे गडावरच्या शिबंदीला अन्नसामुग्रीचा तुटवडा भासून उपासमार घडू लागली.अखेर निरुपाय होउन शाहु महाराज यांनी गड परशुरामपंत पटवर्धनांना दिला.मराठेशाहीच्या अखेरच्या कालखंडात म्हणजे इ.स. १८१८ च्या तिसर्‍या लढाईच्या वेळी जनरल स्मिथ व जनरल प्रिझलर ८ मार्च रोजी सातार्‍याला आले व १० मार्च १८१८ ला मराठ्यांच्या अजिंक्यतार्‍यावर इंग्रजांचे युनियन जॅक फडकू लागले.या किल्लयावर दुधबावी, सागरी सुलतान पीर, मंगळाई, शिवसागर सप्तऋषी, कोठी व भवानी ही सात तळी होती. तसेच मंगळाई, नृसिंह, हनुमंत, महालक्ष्मी, रामेश्वर, सप्तश्री व विठोबा ही सात देवालये होती. शेख सल्ला व साकडा सुलतान हे दोन पीर येथे होते. याच किल्लयावर महाराणी येसूबाई, महाराणी ताराबाई व महाराणी आनंदीबाई ऊर्फ माईसाहेब यांचे वास्तव्य घडले. 





अजिंक्यतारा किल्ला सातारा शहरातच असल्याने शहरातून अनेक वाटांनी गडावर जाता. येते सातारा एस टी स्थानकावरून अदालत वाड्या मार्गे जाणारी कोणतीही गाडी पकडावी आणि अदालत वाड्यापाशी उतरावे. सातारा ते राजवाडा अशी बससेवा दर १० ते १५ मिनिटाला उपलब्ध आहे. राजवाडा बस स्थानकापासून अदालत वाड्यापर्यंत येण्यास १० मिनिटे लागतात. अदालत वाड्याच्या बाजूने जाणार्‍या थेट वाटेने आपण गडावर जाणार्‍या गाडी रस्त्याला लागतो. येथून गाडी रस्त्याने १ किमी चालत गेल्यावर आपण थेट गडाच्या प्रवेशव्दारापाशी पोहोचतो.अजिंक्यतारा किल्ल्यावर जाण्यासाठी थेट गाडी रस्ता सुद्धा आहे. या रस्त्याने आपण किल्ल्याच्या दरवाजापाशी पोहोचतो. कोणत्याही मार्गे गड गाठण्यास साधारण १ तास लागतो.किल्ल्यावर जायला सातारा शहरातून अगदी उत्तम गाडीमार्ग असल्यामुळे वाहनाने प्रवेशद्वार सहज गाठता येते. 

पहाण्याची ठिकाणे :
सातार्‍यातून ज्या मार्गाने आपण गडावर प्रवेश करतो त्यामार्गावर दोन दरवाजे आहेत. आजही या दोन दरवाजांपैकी पहिला दरवाजा सुस्थितीत आ.हे दरवाजाचे दोन्ही बुरूज अस्तित्वात आहेत.

प्रवेशद्वारावर अनेक देव देवतांची शिल्पे दिसतात. मुख्य दरवाजास पाच पदर आहेत आणि प्रत्येकावर काही देवता तर कमळ कोरलेले आहेत. 

त्यातील सगळ्यात आतील कमानीवर गणपतीची मूर्ती बसवलेली आहे. 

तसेच शरभाचे उत्तम शिल्पही दरवाजावर आपल्याला पाहायला मिळते. 

त्याच्या रेखीव रचना आणि कोरलेल्या शिल्पांमुळे दरवाजा खूप सुंदर दिसतो. 

किल्ले अजिंक्यतारा वरील द्वारशिल्पांचा आढावा

   गडकिल्यावर प्रवेश करायचे असेल तर मुख्य प्रवेशद्वाराशिवाय पर्याय नसतो.कारण चहूबाजूने गडाला भक्कम आशा तटबंदीने बंदीस्त केलेलं आढळते.गडाचे प्रवेशद्वार आणि तटबंदी त्याच्या भक्कमतेची साक्ष देतात. द्वार जितके भक्कम तितकाच गड ही भक्कम!!! म्हणूनच गडाची तटबंदी आणि द्वारे विशेष पद्धतीने बनवलेली दिसतात. ती बनविताना जो नाजूक भाग असतो त्यावर सहसा प्रहार होणार नाही किंवा तो लक्षात येणार नाही याची पुरेपुर दक्षता घेतलेली असते. त्याचबरोबर बाहेरून येणाऱ्या नवख्या व्यक्तीवर, शत्रूच्या वकीलावर किंवा इतरांवर विशेष छाप पडावी यासाठी द्वारावर काही शिल्पे कोरलेली आढळतात. यातून आपल्याला अनेक गोष्टी कळू शकतात. द्वारशिल्पं म्हणजे प्रवेशद्वारावर असणारे किल्ला बांधणाऱ्या, जिंकणाऱ्या राजसत्तेचे राजचिन्हे!!!

द्वारावर द्वारशिल्प म्हणून काही देवताही आढळून येतात. त्या प्रकोप दूर करणे किंवा भक्तीभावची निशाणी म्हणून आढळतात. कोणती राजवट गडावर राज्य करत होती हे ती द्वारशिल्प सांगून टाकतात. शरभ, गंडभेरुड, कमळ, चक्रे आणि देवदेवता अशी अनेक प्रकारची द्वारशिल्पे मंदिर आणि गडांच्या प्रवेशद्वारावर आढळतात.

    परकीय आक्रमणे झेललेल्या या गडाचे प्रवेशद्वार आणि तटबंदी सुस्तीतीत असून त्याच्या भक्कमतेचा पुरावा देतात. गडावर प्रवेश करताना लागणारे मुख्य प्रवेशद्वारावर अनेक शिल्प कोरलेली आहेत त्याविषयी थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात.

शरभ:-

       गडाच्या प्रवेशद्वारच्या पुढे आल्यावर समोरच आपणास दरवाजच्या थेट वरती दोन शिल्प दिसतात. सिंहरूपी देहाला व्यालचे तोंड, लांब अशी शेपटी आणि कधी पंख असतात त्यांला शरभ असे बोलले जाते. अजिंक्यतारा गडावरील शरभ हा जेता(विजेता) या प्रकारचा आहे. त्याच्या पायाखाली हत्ती दाबलेले दिसतात. याचा अर्थ हत्तीरूपी पातशाह्यांना गाडण्यात यशस्वी झालेले राजे!!!

    भारतीय पौराणिक शास्त्रात ही शरभविषयी माहिती मिळते. ती पुढील प्रमाणे "हिरण्यकशप हा भक्त प्रल्हादाचा खूप छळ करत होता. त्यासाठी भगवान विष्णूनी नृसिह हे आक्राळ विक्राळ रूप धारण करून हिरण्यकशप चा वध केला. परंतु नृसिंह रुपात असलेला विष्णुचा राग शांत झाला नाही. त्यानी लोकांना उपद्रव द्यायला सुरवात केली. शेवटी देव भगवान शंकरानां शरण गेले आणि प्रार्थना सुरु केली. ती ऐकून शंकरांनी नृसिंहाला शिक्षा करण्यासाठी म्हणून पशू, पक्षी व नर यांची एकत्रित शक्ती घेतली आणि नृशिंहला शेपटीत पकडून हरवले. ज्यावेळी नृसिंहाचा क्रोध शांत झाला त्यावेळी त्यांना शरभ हे भगवान शंकर असलेले समजले. आणि ते परत मूळ रुपात दाखल झाले. भगवान शंकराचे हे रूप म्हणजेच शरभ."

गंडभेरुड:-

        प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला की उजव्या हाताला सैनिकांच्या बैठकीच्या खाली दोन डोकी, पंख आणि चार पाय असणारे शिल्प आढळते त्याला गंडभेरुड असे म्हणतात.दोन डोकी आणि एक धड असलेल्या गरुड म्हणजे गंडभेरुंड. गंडभेरुडाच्या चोच आणि पायात शरभ किंवा हत्ती आढळतात. हिंदू संस्कृतीव्यतिरिक्त इतर अनेक पुरातन संस्कृतींत दोन डोकी आणि एक धड असलेल्या पक्ष्याचा उल्लेख आढळतो. बहामनी सत्तेबरोबरच विजयनगरचे साम्राज्याचे ही गंडभेरुड हे प्रतीक हिते.

कामळफुल, कलश आणि चक्रे:-

ही शिल्पे आपणास प्रवेशद्वारच्या कमानीवर आणि आतील बाजूस आढळून येतात. ही सजावट किंवा काही संदेशात्मक चिन्हे असू शकतात.

गणपती:-

     विघ्नहर्ता गणराय ही देवता छ शाहूमहाराजांच्या काळात लोकप्रिय झाली होती. पेशव्यांची आणि मराठ्यांची ती आराध्य देवता आहे. त्यामुळे गणपतीला प्रवेशद्वारावर प्रामुख्याने स्थान देण्यात आले. अजिंक्यतारा किल्ल्याच्या दरवाजाच्या चौकटीवर आपणास गणपती पहावयास मिळतो.

मारुती:-

मारुती ही देवता आपणास दरवाजयच्या बाजूला दिसून येते. मारुतीला बल आणि रक्षणाची देवता म्हणले जाते.

शिवाय महादरवाजाच्या देवड्यांच्या जोत्यावर कोरलेली वाली-सुग्रीव युद्घाची कथा आणि बुरुजावर तळवटी खोदलेले नागांचे शिल्पांकन पाहावयास मिळते.

   द्वारशिल्पावरून आपण पुरातन इतिहासाची उकल करू शकतो त्यासाठी त्यावर संशोधन होणे अत्यंत गरजेचे आहे. द्वारशिल्पांची अधिक माहिती महेश तेंडूलकर यांच्या "गड मंदिरावरील द्वारर्शिल्प" तसेच . डॉ ग. ह. खरे यांच्या ‘मूर्तिविज्ञान’ या ग्रंथातुन मिळू शकते.

दरवाजाच्या आतील बाजू पहाऱ्यासाठी असलेल्या देवड्या पाहायला मिळाल्या.किल्यावर प्रवेशकरताना दरवाज्याच्या थोडे पुढे महाराष्ट्र शासनाने किल्याची छान माहिती लिहून ठेवली आहे. असा उपक्रम प्रत्येक पर्यटन स्थळावर करावयास हवा. 

थोडे वर चालून गेल्यावर  दुसरा दरवाजाने गडावरती दाखल होतो. 

दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे हनुमानाचे मंदिर आहे. हे मंदिर राहण्यास उत्तम आहे, गडावर अनेक पाण्याच्या टाक्या आहेत मात्र पाणि पिण्यायोग्य नाही. मारुती मन्दिरापासून सुरु होणाऱ्या डावीकडील पायवाटेने गडफेरी सुरु करावी.

मारुतीच्या मंदिराबाहेर आल्याबरोबरच  महाराणी ताराबाई यांचे निधन ९ डिसेंबर १७६१ रोजी साताऱ्यातील अजिंक्यतारयावर झाले आणि त्यांची एक छोटीशी ओळख म्ह्णून एक फलक लावला आहे. परंतु त्यांची समाधी मात्र माहुली. ता. सातारा येथे कृष्णेच्या काठावर आहे.



महाराणी ताराबाई (१६७५-१७६१) ह्या छत्रपती राजाराम महाराजांच्या पहिल्या पत्‍नी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव बाजीमोहिते यांची ताराबाई ही कन्या. मराठ्यांच्या इतिहासातील ही एक कर्तबगार राजस्त्री ! शिवाजीराजे आणि संभाजीराजेंच्या मागे कणखरपणे तिने राज्याची धुरा सांभाळली. संताजी, धनाजी यांना बरोबर घेऊन मोगलांना सळो की पळो करून सोडणारी ही रणरागिणी म्हणजे महाराष्ट्रातल्या कर्तृत्ववान स्त्रियांमधील एक मानाचं पान.
त्यांच्या कर्तृत्वाचे आणि पराक्रमाचे कवी गोविंद यांनी पुढीप्रमाणे वर्णन केले आहे.
दिल्ली झाली दीनवाणी। दिल्लीशाचे गेले पाणी।
ताराबाई रामराणी। भद्रकाली कोपली।।
रामराणी भद्रकाली। रणरंगी क्रुद्ध झाली।
प्रलयाची वेळ आली। मुगल हो सांभाळ।।

दरवाजातून आत शिरल्यावर डावीकडील सरळ रस्त्याने पुढे गेल्यावर वाटेत महादेवाचे मंदिर लागते. समोर प्रसारभारती केंद्राचे कार्यालय व मागे दोन प्रसार भारती केंद्राचे टॉवर्स आहेत. हे टॉवर्स म्हणजे दूरदर्शन (१९८६) आणि आकाशवाणी (१९९२) यांची प्रक्षेपण केंद्रे असून त्यांची परिसीमा सातारा जिल्ह्यापुरती मर्यादित आहे.पुढे गेल्यावर एक डावीकडे जाणारी वाट दिसते व " मंगळादेवी मंदिराकडे " असे तिथे लिहिलेले आढळते.

राजवाड्याचे अवशेष
 

राजवाड्याचा पाया

 राजवाड्याच्या पाया आणि भिंतींचा काही भाग शिल्लक आहे. मात्र सद्य स्थितीवरूनही राजवाड्याच्या भव्यतेचा अंदाज लावता येऊ शकतो. ह्याच ठिकाणी मोघल बादशहा औरंगजेबलाही पुरून उरलेल्या महाराणी ताराबाई आणि त्या नन्तर महाराज शाहूंचे वास्तव्य होते.सन १८४४ साली तो छत्रपती प्रतापसिंह महाराजांचे ताब्यात आला. या गडावर पुरातनकालचे मंगळाई देवीचे व हनुमान मंदिर आहे. अजिंक्यताºयातील जो पडीक राजवाडा आहे तो कै. छत्रपती शाहू महाराज यांनी बांधलेला आहे. दिल्ली सुटकेनंतर त्यांनीच सातारला महत्व प्राप्त करून दिले.  येथे एक कोठारही आहे. 

मेंगळाईदेवी मंदिर 

वाटेच्या शेवटी मंगळादेवीचे मंदिर लागते. मंदिराच्या समोरच मंगळाईचा बुरूज आहे. मंदिराच्या आवारात अनेक शिल्प आढळतात.

 या वाटेने थेट तटबंदीच्या साह्याने पुढे जाणे म्हणजे गडाला प्रदक्षिणा घालण्यासारखेच आहे. उर्वरित गडफेरी पूर्ण करताना अनेक टाक्या आणि तटबंदीचा भाग दिसतो. तसेच एक कोठार सदृश्य बांधकामहि दिसते.वाटेमध्ये , रत्नेश्वराचे मन्दिर दिसते.


दक्षिण दरवाजातून उतरणारी वाट

गडाच्या दक्षिणेला देखील दोन दरवाजे आहेत. तटबंदीवरून प्रदक्षिणा मारतांना ते नजरेस पडतात. या दरवाजात येणारी वाट सातारा-कराड हमरस्त्यावरून येते.  मात्र नजरेत भरतो तो गडाचा पश्चिम दरवाजा. गोमुखी बांधणीचे एकामागे एक असे दोन मजबूत प्रवेशद्वार आणि बुलंद बुरुज अजूनही सुस्थितीत आहेत. 

याबाजुला समोर टेकडी दिसते तीला उंटाची टेकडी म्हणतात.कराडच्या शिवराय ट्रेकींग ग्रुपने त्या  टेकडीला भेट दिली असता तिथे काही पाण्याची टाकी आढळली.कदाचित अजिंक्यतार्‍याचा तो उपदुर्ग असावा का ?

पश्चिम दरवाजा पाहून आजून काही अंतर चालल्यावर गडफेरी पूर्ण होते.

दरवाजापाशी पाण्याचे तीन तलाव आहेत. उन्हाळ्यात मात्र तलावांत पाणी नसते. गडाला प्रदक्षिणा घालून आल्या मार्गाने खाली उतरावे लागते.

याशिवाय गडावर तेलातुपाचे रांजण, माचीवर डफळ्यांच्या घोड्यांची पागा, अक्कलकोटकरांचा वाडा, पिंगळ्यांचा वाडा व शेख मिराची घोड्यांची पागा हे शाहूकालीन अवशेष आहेत. गडावरुन पश्चिमेला यवतेश्वराचा डोंगर, बंड्या पठार्,उत्तरेला मेरुलिंगाचा डोंगर आणि मागे पुसट वैराटगड दिसतो.ईशान्येला चंदन-वंदन हे जोड किल्ले,भुताची टेकडी,नांदगिरी उर्फ कल्याणगड्,जरंडेश्वर्,पुर्वेला जानाई-मळाई डोंगर्,पाटेश्वराचा डोंगर आग्नेयेला तर नैऋत्येला सज्जनगड दिसतो. गडाच्या उत्तर अंगाला पायथ्याशी सातारा शहराचे विहंगम दृष्य दिसते.

संदर्भ - 

१) सातारा जिल्हा गॅझेटीयर

२) महाराष्ट्र देशातील किल्ले- चिंतामणी गंगाधर गोगटे

३) श्री.मनोज दाणी यांचे लिखाण

४) मराठ्यांचा इतिहास - ( खंड पहिला )- अ.रा,कुलकर्णी, ग,ह,खरे

५) साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !! -प्र.के.घाणेकर

६) शोध शिवछत्रपतींच्या दुर्गांचा - सतिश अक्कलकोट

७) सांगाती सह्याद्रीचा -यंग झिंगारो ट्रेकर्स














































दक्षिण दरवाजा 


गड प्रदक्षिणा करतानाच्या मार्गातून दिसणारा बुरुज





















मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...