आपल्या महाराष्ट्राला अतिशय संपन्न असा इतिहास लाभला आहे. सातवाहनांपासून, वाकाटक, शिलाहार, यादव, यांपासून अगदी मराठा साम्राज्यापर्यंत या महाराष्ट्राने अनेक स्थित्यंतरे पाहिली. या दरम्यानच्या काळात अनेक परकीय आक्रमकांनी महाराष्ट्रावर आक्रमण केले आणि इथल्या मातीतील वीरांनी प्रसंगी आपल्या प्राणांचे बलिदान देऊन ही भूमी परकीय आक्रमकांपासून वेळोवेळी स्वतंत्र केली आणि पेशवाईच्या काळात तर पुढे साऱ्या भारताचे रक्षण करण्याचे उत्तरदायित्व या महाराष्ट्राकडे आले.
भग्न असे मंदिर हे
पडलेले जीर्ण चिरे
शोधसि का राशित त्या
ज्यास न अस्तित्व उरे !
ही शोधकथा हे श्रम रे
होतिल जर सनयन रे
पलिकडच्या माळावर
उठतील प्रासाद नवे !
- कुसुमाग्रज
श्रेष्ट कवीवर्य कुसुमाग्रजांच्या या काव्यपंक्ती म्हणजे आपल्या इतिहासाच्या अनास्थेवर वास्तवाचा पडलेला प्रकाशचा आहेत.गड्,किल्ले, लेणी,मंदिर्,शिलालेख आणि वीरगळ हे आपल्या इतिहासाचे मुक साक्षीदार आहेत.त्यातील वीरगळांची सर्वांगीण माहिती आपण घेणार आहोत. वीरगळ हा मराठी तर यांनाच हिंदीत वीरब्रह्म व कन्नडमध्ये ವೀರಗಲ್ಲು म्हणतात.

महाराष्ट्राचा हा सारा इतिहास हा इथे फिरस्ती करताना वारंवार वेगवेगळ्या स्वरूपात दिसून येतो!! कधी बुलंद किल्ले, कधी सह्याद्रीत कोरलेली विस्मयकारक लेणी तर कधी अजोड स्थापत्यशास्त्राचा नमुना असलेली विविध मंदिरे! या सर्वांमधून थोडीशी वेगळी असणारी पण इथल्या पराक्रमाचा इतिहास सांगणारी काही कोरीव शिल्पे आज आपले अस्तित्व दाखवत ऊन- पावसात वर्षानोवर्षे उभी आहेत! महाराष्ट्रात याच शिल्पांना 'वीरगळ' असे संबोधले जाते. तर इंग्रजी भाषेत यांना ‘Hero Stones’ असे म्हणतात.
वीरगळी या साधारण इ.स.पुर्व तिसर्या शतकापासून ते अठराव्या शतकापर्यंत कोरल्या गेल्या.पुर्ण भारतभर म्हणजे काश्मिर ते कन्याकुमारी या वीरगळी पहायला मिळतात.पण दक्षिण भारतात विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटकात गिरीदुर्गांच्या , मंदिराच्या परिसरात वीरगळी मोठ्या प्रमाणात पहायला मिळतात.
महाराष्ट्रात बर्याच ठिकाणी गावच्या वेशीजवळ, मंदिरांच्या प्रांगणात, किल्ल्यांच्या वाटांवर काही शिळाशिल्पे आढळतात. त्यावर युद्धातील प्रसंग तसेच धारातीर्थी पडलेले वीर आढळतात. तेच हे वीरगळ.
वीरगळ हा शब्द वीर(संस्कृत) आणि कल्लू (कन्नड) अशा दोन शब्दांचा मिळून झाला आहे. कल्लू म्हणजे दगड अथवा शिळा. वीरपुरुषाची शिळा म्हणजेच वीरगळ. हे वीरगळ महाराष्ट्रात आणि कर्नाटकात बहुसंख्येने दिसतात.वीरगळ विषयी जाणून घेण्यासाठी आधी आपल्याला या शब्दाची फोड आणि त्याचा उगम समजून घेणे आवश्यक आहे. विरगळाची मुख्य संकल्पना ही कर्नाटकातून आली! कर्नाटकात ‘कल्लू’ हा शब्द ‘दगड’ या अर्थाने वापरला जातो. त्यामुळे तिथल्या ‘वीर-कल्लू’ या शब्दाला महाराष्ट्रात नाव मिळाले ‘वीरगळ’. दगड हा शब्द पुल्लिंगी असल्याने, ‘ती’ वीरगळ पेक्षा ‘तो’ ‘वीरगळ’ असे म्हणणे जास्त योग्य आहे. युद्धभूमीवर अथवा कोणत्याही संग्रामात मरण पावलेल्या माणसाच्या स्मृतीप्रीत्यर्थ उभारलेला कोरीव दगड म्हणजे ‘वीरगळ’ होय. महाराष्ट्रात असे दगड ठिकठीकाणी आढळून येतात. मुख्यत्वे मराठवाडा, पश्चिम व दक्षिण महाराष्ट्र, कोकणातील बरासचा भाग यांमध्ये यांची संख्या मोठ्याप्रमाणावर आहे!
प्रत्यक्ष किल्ल्या बरोबर, किल्ल्या खालचे गाव, किल्ल्या पर्यंत जाणारे रस्ते यावर अनेक ऐतिहासिक खुणा, अवशेष विखुरलेले असतात . किल्ल्याच्या पायथ्याच्या गावात देवळात किंवा पारावर अनेकदा वीरगळ, समाध्या, सतीचे हात, तुळशी वृंदावन, छत्री इतिहासाचे साक्षिदार इत्यादी पाहायला मिळतात. युध्दात कामी आलेल्या वीरांसाठी, गोरक्षण करतांना धारातिर्थी पडलेल्या वीरांची स्मारके म्हणुन वीरगळ उभारले जात असत. या स्मारकांमुळे पुढील पिढीला प्रेरणा मिळत असे. त्या वीरांबरोबर सती गेलेल्या स्त्रीयांसाठी सतीचा हात उभारला जात असे. तर मातब्बर सरदार, राज घराण्यातील लोक यांच्या समाध्या व स्त्रीयांसाठी तुळशी वृंदावन उभारले जाई.
पूर्वीच्या प्रथेप्रमाणे एखाद्या वीरपुरुषाने गावावर आलेल्या परचक्राचा सामना केला, गाईगुरांना पळवून लावणार्यांपासून त्याचे संरक्षण केले, दरोडेखोरांकडून गावाचे संरक्षण केले आणि हे करता करता लढाईत त्याचे प्राणोत्क्रमण झाले तर त्याचे स्मारक ऊभारण्यात येई.
उभट, आयताकृती दगड, त्याच्या चारही बाजूंना चौकटी कोरलेल्या, वर घुमटी अशी याची रचना. चारी बाजूंच्या चौकटींमध्ये युद्धाचे प्रसंग कोरलेले, एका चौकटीवर आडवा पडलेला वीर आणि घुमटीवर चंद्र सूर्य कोरलेले अशी यांची सर्वसाधारण रचना. वीरगळांवर वीराचे नाव कोरण्याची प्रथा नाही किंवा युद्धाची माहिती लिहिलेले शिलालेखही त्यावर आढळत नाहीत.
काही वीरगळांवर सागरी युद्धेही कोरलेली आढळतात. मुंबईतल्या एका वीरगळावर जहाजांमधील युद्ध कोरलेले आहे. हा वीरगळ उत्तर कोकणातल्या शिलाहार राजवटीमध्ये खोदला गेला.
महाराष्ट्रातील बहुतांश वीरगळ हे शिलाहारकाळ आणि यादवकाळात मोठ्या प्रमाणावर उभारले गेले.
महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील गावात आढळ्णारे वीरगळ हा खरतर आपला ऐतिहासिक ठेवा आहे पण अती परिचयामुळे एकतर त्याचा शेंदुर फासून देव बनवलेला असतो किंवा दुसरे टोक म्हणजे पायरीचा, कपडे धुण्याचा दगड म्हणूनही वापर केलेला पाहायला मिळतो. पूरातत्व खात्याने केलेल्या औसा, परांडा इत्यादी किल्ल्याच्या डागडूजीमध्ये वीरगळीचे तुकडे तटबंदीत वापरलेले पाहायला मिळतात. शिलाहार काळापासून साधारणपणे सतराव्या शतकापर्यंत वीरगळ बनवण्याची प्रथा चालू होती. वीरगळ ही स्मृती शिळा आहे. युध्दात, गोधनाचे रक्षण करताना, एखाद्या पवित्र कार्यासाठी बलिदान करतांना जर एखाद्याला वीर मरण आले, तर त्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ वीरगळ उभारला जात असे. त्यापासून पुढच्या पिढीलाही आपल्या धर्मासाठी, राजासाठी लढण्याची, बलिदान करण्याची प्रेरणा मिळत असे.
कर्नाटकातल्या थोड्याबहुत वीरगळांवर मात्र बऱ्यापैकी लेख आहेत. मुख्यत: चालुक्य, होयसळांपैकी खाशा सेनानींचे ते वीरगळ आहेत. इथले वीरगळ बहुतांशी सामान्य जनतेने उभारलेले असावेत. लिहिता न येणे हेही एक कारण असावे.
वीरगळ तर थेट भगवदगीतेतील दुसर्या अध्यायातील सदतिसाव्या श्लोकासी नाते सांगणारा.
हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् ।
तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः ॥२-३७॥
लढता लढता मेलास तर स्वर्गाला जाशील; जिंकलास तर पृथ्वीचे राज्य उपभोगशील.
वीरगळावर कोरलेल्या पट्टयांपैकी सर्वात वरच्या पट्टयावर कोरलेले धारातिर्थी पडलेल्या वीराला स्वर्गात नेणार्या अप्सरांचे चित्र या श्लोकाची आठवण करून देते.
वीरगळ हा आयताकृती दगडावर कोरलेला असतो. या दगडावर १,२,३ किंवा ४ चित्र (शिल्प) चौकटी कोरलेल्या असतात. सर्वात खालच्या चौकटीत ज्या कारणामुळे योध्याला वीर मरण आले ते शिल्पांकीत केलेले असते. यात वीर युध्द करतांना, गोधनाचे रक्षण करतांना, हिंस्त्र प्राण्याशी लढतांना, शिकार करताना दाखवलेला असतो. दुसऱ्या चौकटीत तो अप्सरांबरोबर दाखवलेला असतो. याचा अर्थ अप्सरा त्याला स्वर्गात घेऊन जात आहेत तो स्वर्गसुख उपभोगत आहे असा होतो. त्यापुढील तिसर्या चौकटीत ब्राम्हण/ साधू पूजा सांगत आहे आणि वीर एकटा किंवा सपत्नी शंकराच्या पिंडीची पूजा करतांना पाहायला मिळतो. याचा अर्थ त्याने केलेल्या पूण्य कर्मामुळे तो देवाशी एकरुप झालेला आहे. त्याला मोक्ष मिळालेला आहे. या चौकटीच्यावर पिंड, मंगल कलश आणि त्याच्या एका बाजूला चंद्र आणि दुसर्या बाजूला सूर्य कोरलेला असतो. याचा अर्थ सूर्य आणि चंद्र असे पर्यंत या वीराची किर्ती आसमंतात राहील. पण सत्य परीस्थिती अशी आहे की, वीरगळावर फ़ार कमी प्रमाणात शिलालेख आहेत. त्यामुळे वीरगळ पाहून त्यातील वीर कोण आहे, कुठल्या युध्दात तो कामी आला आणि वीरगळाचा निर्माता कोण आहे हे सांगता येत नाही. अर्थात याला काही अपवाद आहेत. बोरीवलीतील एकसार भागात असलेल्या वीरगळीवर शिलाहार राजा सोमेश्वर आणि यादव राजा महादेव यांच्यात झालेले नौकायुध्द कोरलेले आहे. अशाप्रकारे नौका युध्द कोरलेली महाराष्ट्रातील ही एकमेव वीरगळ आहे. याशिवाय सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला-कुडाळ मार्गावर असलेल्या मठ गावात असलेल्या सावंतांच्या वीरगळी आहेत त्यावर शिलालेखही कोरलेले आहेत. या शिलालेखात वीरगळींचा उल्लेख भडखांब म्हणून केलेला आहे.
देवळाच्या आवारात दिसणारे वीरगळ
|
शेंदुर / रंग लावून विद्रुप केलेले वीरगळ |
बहुतांश वीरगळांमध्ये चौकटप्रसंगातील क्रम सारखा असतो . खालपासून वरपर्यंत ‘युद्धप्रसंग- वीराचे स्वर्गारोहण – स्वर्गवासी वीर – शिखर याच क्रमाने शिल्पे कोरतात. यामध्ये आढळणारी विविधता....
वीरगळीच्या शिल्पपटाचे स्तर व त्याची वैशिष्ट्ये :-
वीरगळीमध्ये शिल्पपट असला तरी काही वेळा फक्त एकच शिल्प दखविले असते.यामध्ये शस्त्रधारी योध्दा स्त्री किंवा पुरुष असतो.काही वेळा तो घोड्यावर स्वार झालेला दाखवतात.वीरगळीचे दोन किंवा तीन शिल्पपट हे त्या योध्द्याच्या मृत्युच्या प्रसंगावर अवलंबून कोरलेले असतात्,काही वेळा युध्द्दाची कथा मोठी असेल तर वीरगळीत तीनपेक्षा जास्त शिल्पपट असतात.
 |
| अवचितगडावरची हि एकच शिल्प असलेली वीरगळ |
वीरगळीच्या शिल्पपटातील सर्वात वरचे शिल्प :-
या शिल्पपटात योध्दा शिवलिंग्,नंदी हे दाखवलेले असतात.काहीवेळा या सर्वात वरच्या थरावर सुर्य आणि चंद्र कोरलेले असतात.याचा अर्थ धारातिर्थी पडलेल्या योध्द्याची किर्ती आचंद्रसुर्य असेपर्यंत श्वाश्वत राहील असा असतो.त्याच्याही वर असलेला कलश हा स्वर्गाचे प्रतिक मानला जातो,तसेच हा राजघराण्याचाही संबधित असल्याचे मानले जाते.काहीवेळा त्यावर कीर्तिमुख दिसते.असे कीर्तिमुख आपल्याला मंदिराच्या प्रवेशद्वारावर तसेच काही बौध्द लेण्यातही दिसते.या कीर्तिमुखाची कथा स्कंदपुराणात आलेली आहे,
वीरगळीच्या सर्वात वरच्या थरात असलेले शिल्प
मधला स्तर :-
वीरगळीच्या या स्तरामध्ये बहुतेकदा वीरयोध्दयाच्या मृत्युचे कारण दाखविलेले असते.या युध्दाचे कारण काहीही असु शकते.यामध्ये तलवार युध्द्,मल्लयुध्द,धनुष्यबाण युध्द,गजयुध्द इ.याशिवाय पाळीव प्राण्यांचे वन्यहिंस्त्रपशुपासून रक्षण करताना आलेले वीरमरण असे शिल्प कोरलेले असु शकते.
मधल्या स्तरातील शिल्प
सर्वात तळाच्या थरातील शिल्प :-
या शिल्पात धारातिर्थी पडलेला वीर किंवा मृत्युशय्येवर असलेला योध्दा दाखवितात.कदाचित त्या वीराच्या मृत्युचे इतर काही कारण असेल तर तेही दाखविलेले असते.बर्याचदा त्याच्याभोवती गावकरी,त्याची पत्नी,पाळीव गुरे देखील दाखविलेली असतात.
सर्वात खालच्या स्तरात असलेले शिल्प
१} युद्धप्रसंग :- वीरगळ मध्ये तळातील चौकटीत तो युद्धप्रसंग कोरतात, त्यात वीरास वीरमरण येते. काहींमध्ये तळातील दोन चौकटीत दोन युद्धप्रसंग दिसतात. हे दोन्ही युद्धप्रसंग एकाच वीराचे असून एकाच किंवा लागोपाठच्या युद्धातील असतात. काही ठिकाणी तळातील चौकटीत धारातीर्थी पडलेला वीर दिसतो.
युद्धप्रसंगात वीर व त्याच्याविरूद्ध लढणारे शत्रू यांची शिल्पे दिसतात. वीरांची वेशभूषा, शत्रूसंख्या, सर्वांच्या हातातील शस्त्रे यांचे निरीक्षण करावे.
येथे- पायदळ, घोडदळ, गजदळ, नौकायुद्ध, द्वंद्वयुद्ध यांसारखे विविध युद्धप्रकार आढळतात.
छायाचित्रे –
(१.१) यामध्ये एक वीर ढाल तलवार घेऊन दोन शत्रूंपासून लढताना दिसतो. हे पायदळातील युद्ध आहे.
१.२) या छायाचित्रात वीर एका शत्रूसोबत तलवारीने लढताना दिसेल. हे द्वंदयुद्ध आहे.
(१.३) येथे दोन युद्धप्रसंग आढळतात. प्रथम वीर चार पायदळ सैनिकांविरुद्ध लढत आहे. त्यावरच्या चौकटीत तो अश्वावर स्वार होऊन लढताना दिसेल.
हे दोन्ही युद्धप्रसंग एकाच किंवा लागोपाठच्या युद्धातील आहेत.
(१.४) यामध्येही दोन युद्धप्रसंग दाखवले आहेत. पहिल्या प्रसंगात वीर हत्तीवर स्वार होऊन लढत आहे. त्यावरच्या चौकटीत तो पायीच एका घोडेस्वार शत्रूविरुद्ध लढतोय.
(१.५) यामध्ये शेवटच्या चौकटीत धारातीर्थी पडलेला वीर दिसतो. त्यावरच्या चौकटीत तो दोन शत्रूंसोबत लढत आहे. असा प्रसंग कोरला आहे. त्याच्या हातात ‘फिरंगी’ तलवार आहे.
२} स्वर्गारोहण :-
युद्धप्रसंगाच्या वरच्या चौकटीत वीराचे स्वर्गारोहण दाखवतात. धारातीर्थी पडलेल्या विराला अप्सरा कैलासात नेत आहेत , या आशयाचे शिल्प असते. वीर नेहमी मध्यभागी असतो.
वीरासोबत जितक्या जास्त अप्सरा, तितका तो वीर मोठ्या पदावरचा समजावा. काही ठिकाणी विराला पालखीचा मान मिळतो.
छायाचित्रे :
(२.१)या वीरगळामध्ये वीरासोबत दोन अप्सरा दिसतात.
(२.२) यामध्ये वीरासोबत चार अप्सरा कोरलेल्या आहेत.
(२.३) वीर पालखीत बसून स्वर्गास गेलेला दिसतो.
(२.४)येथे वीर प्रथम पालखीतून व नंतर पायी चालत स्वर्गाकडे मार्गस्थ झालेला आहे.
३) स्वर्गवासी वीर: सर्वात वरच्या चौकटीत वीर स्वर्गास गेलेला दाखवतात. वीर शिवलिंग पुजताना दिसतो. वीरासोबत शिवगणही आढळतील. वीर डाव्या बाजूस तर शिवगण उजव्या बाजूस असतात.
काही वीरगळांमध्ये वीर – फक्त शिवलिंग , काहींमध्ये नंदीवरील शिवलिंग पूजताना दाखवतात. काहींमध्ये तर वीराला प्रत्यक्ष भगवान शिव पूजनाचा मान मिळतो. वीराच्या अधिकारपदानुसार ही विविधता आढळते.काही दुर्मिळ वीरगळांमध्ये स्वर्गवासी झालेला वीर त्याची आराध्य देवता अथवा त्याच्या पंथाची देवता पूजताना दिसतो. मग ती विष्णू, सरस्वती, गणपती अशी कोणतीही असू शकते...
छायाचित्रे :
(३.१) यामध्ये वीर शिवलिंग पूजताना दाखवला आहे. सोबत एक शिवगणही दिसतो.
(३.२) यामध्ये वीर नंदीवरील शिवलिंग पुजत आहे. सोबत सहा-सात शिवगण सनई व इतर वाद्ये वाजवताना दिसतात.
(३.३) यामध्ये वीराला प्रत्यक्ष भगवान शंकर पूजन्याचा मान मिळाला आहे.
४} शिखर : वीरगळांचा सर्वात वरचा भाग म्हणजे शिखर. काही वीरगळांमध्ये शिखर आढळत नाही.
शिखारामध्ये विविध शिल्पे – शुभलक्षणी चिन्हे कोरलेली असतात. येथे कलशासोबत पक्षी कोरले असतील तर त्यास कलशवाहक व प्राणी असतील तर त्यांना कलशसंरक्षक म्हणतात. याशिवाय येथे चंद्र-सूर्य, किर्तीमुख, कमळपुष्प यांसारखी शिल्पे आढळतात.
छायाचित्रे :
(४.१) या वीरगळामधील शिखरावर कलश कोरला आहे. कलश स्वर्गारोहनाचे प्रतिक आहे.
(४.२) यामध्ये कलशासोबत चंद्र सूर्यही कोरलेले आहेत. वीरांची कीर्ती आकाशात चंद्र सूर्य असेपर्यंत राहो, हा त्यामागचा उद्देश !
(४.३) या छायाचित्रात शिखरावर मयुरशिल्पे दिसतात. ते सुंदरतेचे प्रतिक आहेत.
(४.४) येथे शिखरावर रत्नशाखा व कमळपुष्प आढळते. ती समृद्धीची प्रतिके म्हणून कमळपुष्प कोरतात.
(४.५) या ठिकाणी काळाशासोबत सिंह दिसतो. येथे सिंह कलशसंरक्षक आहे.
(४.६) येथे कलश व त्याच्या बाजूला हत्ती, कीर्तिमुख आढळतात. ते कलशसंरक्षक म्हणून कोरले असावेत.
(४.७) या छायाचित्रात कलशासोबत मारुती दिसतो. हुतात्मा वीराचे इष्ट दैवत म्हणून मारुती कोरला असावा.
(४.८) या छायाचित्रात एक पादुका, ढाल व सतीचा हात कोरला आहे. या वीराची पत्नी सती गेली , त्यामुळे येथे सतीचा हात दिसतो.
(४.९) येथे शिखरावर कीर्तिमुख कोरलेले आढळते. कीर्तिमुख मनुष्याचे पाय खाते, अशी दंतकथा आहे.
आतापर्यंत या लेखात आपण युध्दात वीरगति प्राप्त झाल्या कारणाने उभारले गेलेल्या वीरगळांची माहिती घेतली.पण याच बरोबर प्राण्यांशी लढताना आलेल्या मृत्यूनंतर बांधलेले स्मारक आणि गाईंचे संरक्षण करताना आलेल्या मृत्त्युनंतर बांधलेल्या वीरगळांची माहिती घेऊ.
१. प्राण्यांशी युद्ध – हा जरा रंजक विषय ठरू शकतो. त्याकाळात माणूस नाही म्हणल तरी हिंस्त्र प्राण्यांना भीत असे. सह्याद्रीच्या जंगलांमध्ये वाघ, बिबटे यांचा वावर मोठ्या प्रमाणावर असे त्यामुळे अनेक वेळा समोरासमोर उभे ठाकण्याचे प्रसंग येत असत. अशा वेळेला एक तर पळून जाणे किंवा हातातील अवजाराने वीरता दाखवून दोन हात करणे हेच दोन उपाय शिल्लक असत. त्यामुळे ज्यानी शूरता दाखवून दोन हात केले आणि त्या हल्ल्यात मरण पावले त्यांचे स्मारक उभारण्याची प्रथा सुरु झाली. यात वीर हा वाघाबरोबर किंवा तत्सम प्राण्याबरोबर हातघाईचे युद्ध करताना दाखवले जातो.
२. गो-रक्षण वीरगळ – याच्या नावावरूनच लक्षात येते की गाईंचे रक्षण करताना एखादा वीर मरण पावला असेल तर त्याचे स्मरण म्हणून त्याचे स्मारक उभारले जाते अशा वीरगळांना गो-रक्षण वीरगळ असे सुद्धा काही जण म्हणतात. राष्ट्रकूट काळात महाराष्ट्रात जरा भरभराटीचे दिवस येण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे साहजिकच शेती आणि शेतीला पूरक असणारी सर्व इतर कामे सुद्धा वाढण्यास लागली होती. यातील बरीच गावे ही दुग्धव्यवसाय करीत असत आणि त्यांना मिळणारे उत्पन्न हे संपूर्णपणे त्या व्यवसायातून मिळत असे त्यामुळे त्या गावांची अर्थव्यवस्था ही दुग्धव्यवसायावर आधारीत होती असे म्हणले तर काही चूक नाही. त्याकाळी अनेक धनगर हे या व्यवसायामुळे श्रीमंत झाले होते त्यामुळे साहजिकच चोरांपासून आपल्या गो- धनाचे संरक्षण करणे हे क्रमप्राप्त होते आणि ते करण्यासाठी कदाचित त्यानी सैन्याची मदत सुद्धा घेतली असण्याची शक्यता आहे किंवा त्यावेळेच्या राजाने सुद्धा हे संरक्षण पुरवल्याची शक्यता नाकारता येत नाही. मग बऱ्याच वेळेला अशा गो-धनावर चोरांचा किंवा परराज्यातील लोकांचा हल्ला झाल्यावर ते वाचवण्यासाठी धारातीर्ती पडलेल्या वीरांचे स्मारक उभारण्यास सुरुवात झाली. यात वीरगळातील वरील दोन्हे भाग सारखेच असतात पण खालच्या भागात एका बाजूला गो-धन, मध्ये लढणारा वीर आणि पलीकडे शत्रूचे सैनिक असे चित्रण केले जाऊ लागले.
असे हे गो-रक्षण वीरगळ महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये आढळून येतात. अगदी उदाहरणे द्यायची झाली तर चोराची आळंदी, गुळुंचे, भदे, म्हसवड, पंढरपूर इत्यादी गावात गो-रक्षण वीरगळ मोठ्या प्रमाणावर आढळतात. यावरून हे दिसून येते की या सर्व गावांमध्ये गो-धनाचे प्रमाण अधिक होते आणि साहजिकच त्या गावाची सर्व अर्थव्यवस्था ही त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून चालत असे.

पंढरपूर आणि गो-रक्षण वीरगळ यांचा फारच जवळचा संबंध म्हणावा लागेल. आत्ता वारकरी संप्रदाय आणि उभा महाराष्ट्र विठ्ठलाला जरी ‘मायबाप’ म्हणून पूजत असला तरी पूर्वीच्या काळी त्याचे काम हे गाईंचे रक्षण करणे हे होते असे दिसते. याचा संदर्भ म्हणजे ‘Memorial Stones’ या गुंथर यांनी लिहिलेल्या पुस्तकातील हे वाक्य. “My lady, this hero died in the cause of (defending) cows. His name is Vithalu. In his name this hero stone was erected. “. याला संदर्भ म्हणून व्ही. बी. कोलते यांच्या लीलाचरित्र या पुस्तकाचा देण्यात आला आहे. याशिवाय गुंथर पुढे असेही म्हणतो की, “सध्या जिथे संत चोखामेळा यांची समाधी आहे तिथे यादवकाळातील वीरगळ सापडला, हा वीरगळ जेथे सापडला ती जागा शं. गो. तुळपुळे यांच्या मते श्री विठ्ठलाचे समाधी स्थान असावे. अनेक संशोधकांच्या मते विठ्ठल हा एक गवळी असून तो कर्नाटकातून महाराष्ट्रात आला आणि पंढरपुरात राहिला. काही संशोधक असे मानतात की हा विठ्ठल, दक्खन मध्ये धनगर समाजाकडून पूजल्या जाणाऱ्या ‘भैरोबा’ या देवेतेचा भाऊ असावा. अर्थात आपल्याला यात खोलात जाण्याची गरज नाही पण यावरून असे कळून येते की गो-रक्षण वीरगळाची परंपरा ही किती जुनी आहे आणि एखादी गोष्ट कोरून ठेवण्यामागे फार मोठा इतिहास असू शकतो हे यावरून लक्षात येते.
गोधनगळ : वीर जर त्याच्या गोधनाचे रक्षण करताना हुतात्मा झाला असेल तर त्याच्या स्मरणार्थ गोधनगळ उभारतात.

गोवर्धनगळाचा शिल्पपट
हरिश्चंद्रगडावर अनेक वाटा वर चढतात.यातील खुप क्वचित वापरली जाणारी वाट म्हणजे जुन्नर दरवाजा.या वाटेवरती एक वीरगळ बघायला मिळते.खरतर हि गोरक्षण प्रकारची वीरगळ आहे.या प्रकारच्या वीरगळीवर योध्दा पाळीव प्राण्यांचे दरोडेखोर तसेच वन्य प्राण्यांपासून रक्षण करताना दाखविला असतो.
व्याघ्रशिल्प असलेला वीरगळ:
वाघाला मारताना वीर मुत्युमुखी पडला असेल तर त्याच्या स्मरणार्थ व्याघ्रगळ उभारला जाई.
यात तळातल्या चौकटीत वीर वाघासोबत लढताना दाखवला जात असत. त्यावर स्वर्गारोहण , स्वर्गवासी वीर, शिखर कोरलेले असत.
कळसुबाई :-
कळसुबाईच्या पायथ्याकडून शिखराकडे निघालो कि पहिल्या पठारावरील मंदिरात एक अनोखा वीरगळ बघायला मिळतो.एक वीर स्त्री/ पुरुष योध्दा केवळ हातांनी वाघ किंवा सिंहासारख्या हिंस्त्र पशुशी मुकाबला करताना दाखविला आहे.वरील फोटोत उजव्या बाजुला असलेल्या भगव्या ध्वजाखाली हा वीरगळ आहे.
स्तंभ वीरगळ : काही ठिकाणी एकाच दगडाच्या चारही बाजूला चार वीरगळ कोरलेले आढळतात. ते चार वेगवेगळ्या वीरांच्या स्मारके असतात.
या चारही वीरगळमधील चार वीर एकाच कुटुंबातील/गावातील असतात. ते सर्व एकाच युद्धात मारले गेले असतील, तर त्यांचे स्मारक अशा स्वरूपाचे आढळते.
वीरांगनागळ : इतिहासातील काही वेळा पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांनाही रणांगणात उतरावे लागले. या युद्धात योद्धा स्त्रियांना वीरमरण आले. म्हणूनच त्यांच्या स्मरणार्थ वीरगळप्रमाणे वीरांगनागळ उभारली गेली.
आत्मबलिदान वीरगळ : ही दुर्मिळ प्रकारची वीरगळ . युद्धदेवतेस बळी लागतोच अशी आपल्याकडे समजूत आहे. त्यामुळे युद्ध सुरु होण्याआधी एखादा धैर्यवान वीर आपली मान कापून शीर समरभूमीस अर्पण करी. त्याच्या स्मरणार्थ आत्मबलिदानवीरगळ उभारीत. फलटण शहरातील स्मशानभूमीजवळ आत्मबलिदानगळ पहायला मिळते.
वीराच्या अधिकारपदानुसार वीरगळात आढळणारे बदल
युद्धात गावकरी ,सामान्य शेतकरी यांच्यापासून ते सेनापती, राज्यापर्यंत कोणीही मृत्युमुखी पडे.
या वीरांच्या अधिकारपदानुसार वीरगळात काही फरक असतात.
१} मोठ्या वीरांच्या वीरगळ आकाराने मोठ्या असतात.
२} स्वर्गारोहण प्रसंगात वीरासोबत जितक्या जास्त अप्सरा तितका तो वीर मोठा समजावा. मोठ्या पदावरचे वीर पालखीतून स्वर्गारोहन करताना दाखवतात.
३} सामान्य वीराला शिवलिंग पूजनाचा मान मिळतो. मात्र वीर मोठ्या पदावरचा असेल तर त्यास नंदीवरील शिवलिंग किंवा भगवान शिवपूजनाचाही मान मिळतो. तसेच स्वर्गात त्याच्यासोबत जास्त शिवगण दाखवतात. शिवगण वाद्ये वाजवताना दिसतील.
४} मोठ्या पदावरील वीरांच्या वीरगळात शिखर कोरतात. तिथे शुभलक्षणी चिन्हेही दाखवतात.
कर्नाटकातील वीरगळ :-
आता कर्नाटकात दिसणारे काही वीरगळ पाहुया.
मिरजान किल्ल्यातील वीरगळः-
सुप्रसिध्द धार्मिक स्थळ गोकर्ण महाबळेश्वरजवळ मिरजान किल्ला आहे,उत्तम स्थितीत असलेला हा भुईकोट फार कमी पर्यटक पहातात. इतर ठिकाणच्या वीरगळींची तुलना केली तर इथले वीरगळ बरेच सुस्थितीत आहेत.
या वीरगळींसाठी कोरीवकाम करायला सोपे जावे असा दगड वापरला आहे.सहाजिकच इथल्या वीरगळीवर नाजुक आणि उत्तम दर्जाचे कोरीवकाम बघायला मिळते.
इथल्या वीरगळीवर नागशिल्प कोरलेली दिसतात.
जसा शिवलिंगासमोर नंदी असतो तसेच इथे देवीसमोर घडवलेली सिंहाची मुर्ती पहायला मिळते,त्या काळातील समृध्द वारश्याची ओळख अश्या बारीक कोरीवकामातून पटते.
रामनाथ मंदीर समुह ,कारवार :-
पनवेल-एडापल्ली हायवेवरुन गोव्याची सीमा ओलांडली कि समुद्र किनार्याच्या दिशेने फाटा फुटतो,हा रस्ता रामनाथ मंदिर समुहाकडे जातो.
या वीरगळीवर दोन हत्ती कमळावर आरुढ झालेल्या लक्ष्मीमातेवर कुंभातून जलाभिषेक करताना दिसतात.हत्ती हे लक्ष्मीचे वाहन मानले जातात. असे गजांतलक्ष्मीचे शिल्प बहुतकेदा स्वतंत्र दिसते.याचबरोबर याच वीरगळीवर कीर्तिमुखही वरच्या बाजुला दिसते.
एकविसाव्या शतकातील वीरगळ :-
वीरगळी जरी जुन्या काळी कोरल्या जात असल्या तरी इथे आपल्याला एकविसाव्या शतकात निर्माण केलेली वीरगळ बघु शकतो.बदामीजवळ एका खेड्यात कारगिल युध्दात १९९९ साली वीरमरण प्राप्त झालेल्या शहीद जवान शिवाबासैह यांच्या स्मृतीप्रिथर्थ वीरगळ उभारलेली आहे.कन्नड युनिव्हर्सिटीच्या ललित कला शाखेच्या विध्यार्थ्यांनी याचे डिझाईन केलेले आहे.
एकसर, बोरीवली येथील वीरगळ
भारतात जे वीरगळ आढळले आहे त्यात सुद्धा अनेक ठिकाणी ही जमिनीवरचीच युद्धे दाखवण्यात आली आहेत. पण गोव्यामधील पुरातनशास्त्रविभागाच्या संग्रहालयात ठेवलेला वीरगळ किंवा बोरीवलीमधील एकसर येथील वीरगळ, यांवर नौका युद्धाचा प्रसंग कोरलेला आहे. गोवा येथील वीरगळ हा कदंबांच्या काळातील म्हणजे १०व्या शतकातील तर एकसर येथील वीरगळ हा ११व्या शतकातील मानला जातो. तसेच यानंतर गुजरात मध्ये साधारण अठराव्या शतकातला एक वीरगळ आढळला आहे ज्यावर याप्रकारचा प्रसंग कोरला आहे. असे आत्तापर्यंत ज्ञात तीन ते चार वीरगळ आपल्याला मिळाले आहेत. त्यातील एकसर येथील वीरगळासंबंधी माहिती आपण आज घेणार आहोत.
|
एकसर, बोरीवली येथील वीरगळ |

नौकायुध्द, एकसार , बोरीवली
भारतात आरमार किंवा होडी उभारणे ही संकल्पना काही नवीन नाही. प्राचीन काळात व्यापारासाठी या होड्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत होता. अगदी सातवाहन काळात सुद्धा उत्तर कोकण किनारपट्टीवर अनेक बंदरे उदयास आली होती. साहजिक शत्रूराष्ट्रे तसेच समुद्री चाचे यांच्या भितीमुळे का होईना परंतु संरक्षणासाठी आरमाराची उभारणी करण्यात येत होती. त्यातून पुढे मग दोन राजांच्या आरमारामध्ये युद्धप्रसंग उद्भवत असावेत. अर्थात अगदी प्राचीन काळाचे पुरावे आपल्याकडे उपलब्ध नाहीत किंवा असले तरी फारसे संशोधन त्या विषयात झाले नाही परंतु साधारण पाचव्या शतकानंतर आपल्याला लेखांच्या स्वरूपात नाविक युद्धाचे पुरावे आपल्याला मिळायला सुरुवात होते.
 |
एकसर येथील विरगळ |
 |
एकसर येथील विरगळ |
हा वीरगळ बोरीवली जवळील एकसर या गावात आहे. तिथे एकूण ६ वीरगळ आपल्याला दिसून येतात त्यापैकी दोन वीरगळांवर नेहमीप्रमाणे जमीनीवरील युद्ध कोरले आहे तर इतर चार वीरगळांवर नौकायुद्धाचा प्रसंग कोरला आहे. त्यातील एका वीरगळावर एक शिलालेख सुद्धा आहे परंतु तो अगदीच पुसट झाल्याने त्यावर नक्की काय लिहिलंय याचा अंदाज येत नाही. हे दोन्ही वीरगळ हे कोकणच्या आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीने फार महत्वाचे आहेत. या वीरगळांबाबत दोन प्रवाद इतिहास अभ्यासकांमध्ये आहेत. एक म्हणजे भोजदेव राजाने कोकणावर विजय मिळवला (इसवी सन १०२०) आणि जमीन एका ब्राह्मणाला दान दिली त्याकाळाचे आहेत तर काही अभ्यासक असे म्हणतात की हे वीरगळ शिलाहार काळात उभारले गेले असल्याची शक्यता आहे. कझेन्स नावाचा एक संशोधक होऊन गेला. त्याच्या म्हणण्यानुसार शेवटचा शिलाहार राजा (सोमेश्वर दुसरा ) व देवगिरीचा महादेव यादव यांच्यात इसवीसन १२६५ मध्ये यांच्या चतुरंग दलात जे युद्ध झाले त्याचे हे चित्रण आहे.सोमेश्वराचा जमिनीवरील युद्धात पराभव झाल्याने घारापुरी बेटाचा आश्रय घेण्यासाठी तो समुद्रात पळाला महादेवाने तेथेही त्याचा नावांद्वारे पाठलाग करुन ही राजवट बुडवली. ह्या नाविक संघर्षाचे चित्रण तेथील वीरगळांवर झाले आहे. याचा उल्लेख हा हेमाद्री पंडीत याने लिहिलेल्या ‘चतुर्वर्ग चिंतामणी’ या ग्रंथात येते. हेमाद्री म्हणतो की, ‘ शिलाहार राजा सोमेश्वर याला जलमरण आले. कदाचित महादेव राजाच्या क्रोधयुक्त अग्नीपेक्षा समुद्रात बुडून मरणे सोमेश्वरला जास्त योय वाटले असावे”.
एकसर येथील वीरगळ बघायला गेले तर दिसून येते की काही वीरगळांवर हातघाईची लढाई आहे. तर काही वीरगळांवर नौका आहेत. या नौका वल्ह वापरून पुढे नेल्या जात हे लगेच कळून येते. येथे नौकांवरूनच लढाई चालू असलेली दिसते. कदाचित भाले किंवा बाणांनी लढत असावेत. परंतु यावरून हे लक्षात यायला मदत होते की त्याकाळातील नौदल युद्धे कशा प्रकारची होत असत आणि यातून कळून येते की समुद्रावर वचक ठेवण्याची मानसिकता कोणत्या प्रकारची होती ते. गोवा येथे असलेला वीरगळ सुद्धा थोड्या फार फरकाने असाच आहे. त्यामुळे त्याची माहिती देणे विस्तारभयास्तव शक्य नाही.
आत्तापर्यंत सापडलेले नाविक युद्धाचे वीरगळ हे फक्त महाराष्ट्रात आणि गोव्यात सापडलेले आहेत. अर्थात अजून तितके संशोधन झाले नाही त्यामुळे आपल्याला कळून येत नाही की नाविक युद्ध हे फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित होते तेव्हाच्या काळात की इतर भारतात सुद्धा अशी युद्ध होत असावीत? शिवाय हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच राहतो की प्राचीन काळात नौदल किती पुढारलेले होते. अर्थात सातवाहन काळात बंदरे वगैरे होती परंतु सागरी लढाई वगैरे झाल्याचे उल्लेख कुठे लेखात मिळत नाहीत. त्यामुळे अनेक संभ्रम निर्माण होतात हे खरे. अर्थात जे आहे तेही थोडके नसे!!
 |
एकसार , बोरीवली |
 |
वीरगळी, मठ, सिंधुदुर्ग |
मठ येथील वीरगळीवर असलेला मजकुर
वीरगळींच्या चित्र चौकटींच्या वरच्या भागात कलशा व्यतिरीक्त इतर अनेक गोष्टी पाहायला मिळतात. वीर कोणत्या धर्माचा (हिंदू, जैन बौध्द), कोणत्या पंथाचा (शैव, वैष्णव इत्यादी) उपपंथाचा असेल त्याप्रमाणे शिल्पांकन बदलत जाते. वीर वैष्णव पंथी असल्यास विष्णू, गाणपत्य पंथीय असल्यास गणपती, बौध्द असल्यास स्तुप पाहायला मिळतो. वीरगळां सारख्याच काही ठिकाणी साधूशिळा पाहायला मिळतात. त्यात पहिल्या चौकटीत साधू ध्यान करत असलेला किंवा आडवा पडलेला दाखवलेला असतो. त्यावरील चौकटीत तो शिवलिंगाची पूजा करतांना दाखवलेला असतो. बहुतेक वीरगळी आयताकृती दगडाच्या एका बाजूला कोरलेल्या असतात. तशाच काही वीरगळी चारही बाजूला कोरलेल्या पाहायला मिळतात. चारी बाजूने कोरीवकाम करण्यासाठी नक्कीच जास्त खर्च येत असणार. त्यामुळे वीराच्या हुद्द्याप्रमाणे ऐपती प्रमाणे (वीर किती सधन आणि मातबर होता) त्याचे वंशज खर्च करुन वीरगळ तयार करत असणार. त्यामुळे काही वीरगळ एकाच बाजूला कोरलेल्या तर काही चारही बाजूंनी कोरलेल्या पाहायला मिळतात. वीरगळीसाठी वापरला जाणारा दगड, त्यावरील कलाकुसर या गोष्टीही खर्चिक असल्याने जवळपास उपलब्ध होणारा दगड वापरुन कमीत कमी कलाकुसर केलेल्या वीरगळी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. याउलट एकसारच्या वीरगळी राजाने त्याच्या विजया निमित्त उभारल्यामुळे त्यासाठी बाहेरुन आणलेला उत्कृष्ट दगड, त्यावरील सुंदर नक्षीकाम पाहायला मिळते.
भटकताना खूप किल्ल्यांवर, गावात वीरगळ, बघायला मिळतात.. आजोबा डोंगराच्या वाल्मिकी आश्रमासमोर तर वीरगळांची रांग मांडून ठेवले आहेत. तसेच सुधागड किल्ल्यावरच्या भोराई देवळासमोरील माळावर तर संख्येने अनेक विरगळ दिसतात..

अजिंक्यतारा:-
सातार्याच्या पाश्वर्भुमीवर उभा असलेल्या अजिंक्यतारा उर्फ सप्तर्षी गडावर मंगळाई देवी मंदिराजवळ दोन वीरगळ पहायला मिळतात.वरच्या बाजुला कळस कोरलेला आहे.डाव्या बाजुचा वीरगळ भग्न आहे.
रोह्याजवळचा अवचितगड :-
रोहा शहराजवळच्या अवचितगडाकडे जाताना वाटेवर आपल्याला काही वीरगळ पहायला मिळतात.अर्थात या वीरगळी भग्न आहेत.मात्र थोडीफार शिल्प स्पष्ट दिसु शकतात.एक शिल्पपटाच्या वीरगळी गडावर आहेत.
एक पाण्याच्या टाक्याजवळ आहे तर काही झुडुपात लपलेल्या आहेत.
बाणगंगा मंदिर ,वाळकेश्वर, मुंबई :-
आधुनिक मुंबईचे प्राचीनत्व सांगणार्या वाळकेश्वर मंदिर समुहात बालाजी,वाळकेश्वर, राधाकृष्ण्,परशुराम इत्यादी मंदिरे आहेत.बरेच वीरगळ झिजून गेले आहेत.मुलतः हा परिसर पाठारे प्रभु जमातीचा होता.मात्र सध्या इथे मारवाडी समाजाचा वरचष्मा आहे.इथे त्याचा इतिहास सांगणार्या अनेक वीरगळी आणि मुर्ती आहेत.
एका मुर्तीला भल्या मोठ्या मिश्या दाखविल्या आहेत.
मंदिराच्या एका कोपर्यात जवळ्पास पन्नास स्मृतीशिळा आहेत.घोड्याबर बसलेले वीर, तसेच कंबरेवर हात ठेवलेले वीरपुरुष अशशी काही शिल्प इथे दिसतात.
हरीश्चंद्रगडा वरील मंदिरात असलेला विरगळ
नालासोपार्याच्या वीरगळी :-
बर्याचदा एकाच प्रकारच्या वीरगळी दिसून येतात.कदाचित एकाच कुटुंबातील अनेकजण धारातिर्थी पडलेले असावेत.काहीवेळा वीरगळीवर स्त्री-पुरुष प्रतिमा दिसून येतात.कदाचित हे पति-पत्नी असावेत.सोपारा हे थेट अशोकाच्या काळातील आंतरराष्ट्रीय बंदर होते.याठिकाणी मोठ्या प्रमाणात बौध्द धर्मीय अवशेष दिसून येतात.दुर्दैवाने नेमके महत्व न समजल्याने इथे असणार्या वीरगळींचा वापर कपडे धुण्यासाठी दगड म्हणून केला गेला.
बौध्द (स्तुप कोरलेली) वीरगळ, नालासोपारा
आजचे नालासोपारा आणि विरार हे एकेकाळी तलावांची शहरे होती.नालासोपार्यातील चक्रेश्वर मंदिराशेजारी बरेच प्राचीन अवशेष दिसतात.इथे मोठ्या प्रमाणात शिल्प पडलेली पहायला मिळतात.ब्रम्ह,वराह्,यम यांची काहीशी दुर्मिळ शिल्पदेखील दिसतात.तज्ञांच्या मते हि शिल्प इ.स.पुर्व २०० वर्षापुर्वीची आहेत.परकीय आक्रमकांच्या भितीने हि शिल्प तलावात लपवली गेली आणि कदाचित संशोधन केल्यास आणखी शिल्प आणि पुरातन अवशेष सापडू शकतात.
 |
| Hero is a Sage |
साधूची वीरगळ, नालासोपारा
सेगवागडाच्या जवळील वीरगळ
रतनवाडीतील अमृतेश्वर मंदिराच्या बाजूला असणारा वीरगळ
माहुली किल्ल्यावरील भग्नावस्थेतील वीरगळ

बहिरीच्या देवळाजवळील वीरगळ
इगतपुरी जवळील त्रिंगलवाडी किल्य्याच्या घेऱ्यातील परिसरात आढळणारे वीरगळ

सागरगड :-
अलिबागजवळ असलेल्या सागरगडावर असलेल्या वीरगळींची दुरावस्था झालेली आहे.हे वीरगळ खुप झिजलेले आणि ओळखण्या पलीकडे गेले आहेत.

सज्जनगड :-
सातार्याजवळचा आणि समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्यामुळे प्रसिध्द असलेल्या सज्जनगडावर अनेक वास्तुविशेष दिसतात.महाद्वारावर अरेबिक शिलालेख आहे.शिवाय गडावर एक वीरगळ बघायला मिळते.त्यात एक घोडेस्वार दिसून येतो.

साल्हेर :-
नाशिक जिल्ह्याचा उत्तर भाग म्हणजे बागलाण.या बागलाणाचे संरक्षक दुर्ग म्हणजे साल्हेर्,सालोटा,मुल्हेर.साल्हेर ते मुल्हेर वाटेवर अनोखा एक शिल्प असलेला वीरगळ बघायला मिळतो.यात एका योध्द्याने हातात तलवार घेतलेली दिसते.

सरसगड :-
अष्टविनायकापैकी एक गणपती असलेल्या बल्लाळेश्वराच्या पाली गावाजवळ सरसगड किल्ला उभा आहे.या सरसगडाच्या माथ्यावर तळ्याच्या काठावर वीरगळ दिसून येतात.स्तंभ प्रकारची हि वीरगळ आहे.यावर फुल्,पान आणि इतर नक्षीकाम दिसून येते.
इथेच आणखी एक वीरगळ दिसून येतो.मात्र हा तुटलेल्या स्थितीत आहे.फक्त वरचा स्तर दिसून येतो.मधली आणि खालची चौकट बहुतेक तळ्यात बुडालेली असावी.
शिवथरघळ :-
समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्यामुळे आणि तप केल्यामुळे शिवथरघळ प्रकाशात आली.इथे दोन भग्न अवस्थेतील वीरगळी बघायला मिळतात.या वीरगळी जवळच्या शेताडीत पडल्यात.
तुंग :-
लोणावळयाजवळील तुंग उर्फ कठीणगडाकडे निघाले कि गडाकडे जाण्याच्या वाटे आधी एक वीरगळ दिसतो.यातील अर्धा भाग जमीनीत पुरला गेला आहे.यात दोन योध्दे दिसून येतात.त्यापैकी एकाने तलवार हातात घेतली आहे तर दुसरा वीर हात कंबरेवर ठेवून लढाईच्या पवित्र्यात आहे.कदाचित हे युगुलशिल्पही असु शकते.
विसापुर :-
लोणावळ्याजवळ प्राचीन भाजे लेण्याजवळ लोहगड्,विसापुर हि दुर्ग जोडगोळी आहे.इथेली वीरगळ भग्नावस्थेत असली तरी मोठी वैशिष्ट्यपुर्ण आहे.या एका थराच्या वीरगळीतील योध्द्याने हातात तलवार आणि ढाल घेतली आहे.मात्र या वीरगळीतील योध्द्याचा चेहरा भग्न झाल्याने नेमका अंदाज येत नाही.पण कदाचित या योध्द्याला मिश्या असाव्यात.यामुळे बर्याचदा हे मारुतीचे शिल्प असावे असा गैरसमज होतो.

विमलेश्वर मंदिर, देवगड :-
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील विमलेश्वर मंदिर हे लेणे देखील आहे.या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वीरगळ आहेत.मात्र हे वीरगळ बरेचसे एकमेकांसारखे ,जबळपास हुबेहुब आहेत.बहुतेक वीरगळीवर युध्द प्रसंग कोरला आहे.तसेच या वीरगळीवर भक्तही कोरलेला दिसतो.कदाचित एखाद्या आक्रमकाने सामुहीक हत्याकांड केले त्याच्या या वीरगळी असाव्यात.
बंदिपुर मध्ये असलेले वीरगळ
रतनवाडीचे वीरगळ
रतनवाडीच्या सुरुवातीलाच अमृतेश्वर मंदिर आहे. मंदिराच्या शेजारीच एक पुष्करणी आहे, त्याच्याजवळच एक भलामोठा वृक्ष. त्याच्या बुंध्यापाशी काही भल्यामोठ्या शिळा रचून ठेवलेल्या. जवळपास पुरुषभर उंचीच्या शिळा आणि त्यावर काही युद्धांचे प्रसंग कोरलेले आहेत.
रतनवाडीला मंदिराच्या पाठीमागच्या प्रवेशद्वारातून आत जाताच वर छताकडे पाहिले असता तिथे छताची भिंतउलटे वीरगळ रचलेले आहेत. मंडिराच्या बाहेरील वीरगळांची येथल्या धुव्वाधार पावसामुळे खूपच हानी झालेली दिसते पण येथले आतले वीरगळ अगदी उत्तम स्थितीत आहेत. अर्थत हे पाहण्याकरीता उताणे झोपून वर पाहावे लागतात शिवाय विजेरीचा झोतही मारावा लागतो नाहीतर अंधारामुळे ते दिसत नाहीत.

रतनवाडी अमृतेश्वर मंदिरातील छतांत असलेले वीरगळ
राजमाचीचा वीरगळ
राजमाची किल्ला बहुतेकांना माहितच असेल. लोणावळ्याहून उढेवाडीला निघालो कि भोवताली सगळं गच्चं रान, मोरांची केकावली तर सततच. बिबट्याच्याही डरकाळ्या काही वेळा ऐकू येतात. वाडीपासून श्रीवर्धनच्या जायच्या पायवाटेने एक हलकसं टेपाड चढून आपण श्रीवर्धन-मनरंजनच्या खिंडीत येतो. तिथेच मध्यभागी भैरवनाथाचं शिवकालीन राऊळ. भोवताली घनगर्द राई. तर राउळाला लागूनच एक वीरगळ आहे. त्याची एकंदर रचना पाहता तो अलीकडचा म्हणाजे शिवकालीन असावा हे तसं लक्षात येतं. शिल्पपट्टीका नाहीत. फक्त लढणारा आणि नंतर मृत झालेला वीर. इतकंच.

राजमाचीच्या भैरवनाथ मंदिराच्या बाजूस असणारा वीरगळ
बाणेर वीरगळ
पुण्याजवळच्या बाणेर गावात एक टेकडी आहे. त्या टेकडीत प्राचीन लेणं आहे . बाणेर गावातल्या हनुमान मंदिरापासूनच लहान बोळांतूनच लेणी मंदिरापर्यंत वर जायला पायर्या आहेत. एकाच अखंड कातळात खोदून काढलेलं हे शैव लेणं हे बहुधा ९/१० व्या शतकातलं असावं. त्या लेण्यात आणि लेण्यांबाहेर काही वीरगळ पडलेले आहेत. बहुधा इथे पूर्वी लहानशी लढाई झालेली असावी. ह्या लेणीच्या बाहेरच एक बलीवेदी पण मिळाली. बलीवेदी म्हणजे बळी ज्या शिळेवर देतात तो दगड. ही एक लहानशी चौकोनी सपाट शिळा असून चारही कोपर्यांवर बकर्याची मुंडकी कोरलेली आहेत.

बलीशिळा
अंजनेरी वीरगळ अंजनेरी नाशिकपासून साधारण १०/१२ मैलांवर. भल्यामोठ्या कातळकड्यावर निर्मिलेला अजस्त्र किल्ला आणि पायथ्याला गावात १६ प्राचीन मंदिरांचं संकुल. ह्या मंदिरांत असंख्य भग्नावशेष आहेत. आमलक, स्तंभांचे भाग, मूर्ती, वीरगळ इत्यादी. तिथेच आहे एक आगळावेगळा वीरगळ. आगळावेगळा असं म्हणण्याचं कारण वीरगळाच्या खालच्या पट्टीत एक वीर दुसर्या वीराचे केश धरुन त्याचं मस्तक धडावेगळं करताना दाखवलाय. पूर्वीच्या काळी युद्धांत मस्तकाचे केश धरुन सैनिक शत्रूंची मस्तके धडावेगळी करायचे हे टाळण्यासाठी म्हणून बहुतेकवेळा प्रतिस्पर्धी सैनिक मुंडण करुन युद्धात उतरायचे.
माळशिरस वीरगळ :-
माळशिरस हे लहानसं गाव यवतच्या भुलेश्वरापासून चारेक किमी अंतरावर, अगदी दुर्लक्षित पण पुरातन संपन्न गावची लक्षणे जागोजागी आढळतात, गावची वेस विस्तीर्ण वाड्यांचे भग्नावशेष, १२/१३ व्या शतकातले एक प्राचीन शिवमंदिर जे आता हनुमान मंदिरात परावर्तीत केलं गेलं आहे पण मूळची मंदिरातली आतली शिवपिंड भग्नावस्थेत मंदिराच्या बाहेर झाडोर्यांत पडलेली आहे. त्या मंदिराच्या आवारात काही वीरगळ आहेत तर काही थेट गावच्या वेशीवरच्या प्रवेशद्वाराच्या भिंतीत चिणलेले आहेत. तीन तीन शत्रूंशी एकहाती युद्ध करुन धारातीर्थी पडलेल्या वीराला चार चार अप्सरांनी स्वर्गास पोहोचवतात.
कोथळ्याचा गोवर्धन वीरगळ :-
सासवडच्या नाझरे गावानजीक कोथळे नावाचं एक लहानसं गाव आहे. गावाशेजारी एक अगदी लहानशी टेकडी आणि टेकडीवर लहानसं प्राचीन शिवमंदिर. ह्या मंदिराच्या आवारातही एक सतीशिळा आहे.
ह्या कोथळ्यातही बरेच वीरगळ आहेत. हया शिवाय वीरगळांसाठी सपाट केलेल्या कित्येक शिल्पविहिन शिळादेखील तिथे पडलेल्या आहेत.


तिथे आहेत गोवर्धन वीरगळ. गोवर्धन वीरगळ म्हणजे गाईगुरे पळवण्यास आलेल्या चोरट्यांविरुद्ध्/शत्रूंविरुद्ध युद्ध करुन आपले बलिदान केलेल्या वीरांचे स्मारक. ह्या वीरगळांमध्ये सर्वात खालच्या पट्टीकेवर मृत वीराच्या बाजूने गाईगुरे कोरलेली आढळतात. गोवर्धन वीरगळही बर्याच ठिकाणी आहेत.
जांभळीचे वीरगळः- रायरेश्वराच्य पायथ्याला जांभळी गाव आहे. या गावाच्या खालच्या वाडीत एका देवळासमोर रस्त्याच्या कडेला अनेक विरघळी व सतीशिळा पडलेल्या दिसतात. उत्सुकतेने तेथे जाऊन त्या पहिल्या, त्यातीळ एका सतिशीळेवरील माती काढून ती साफ केली, त्याचे फोटो काढले. मंदिर परिसरातील लोकांकडे विचारपूस केल्यावर कळले कि मंदिराचा जीर्णोद्धार करताना अश्या अनेक कोरीव शिळा गावकऱ्यांना जमीन उकरताना सापडल्या आणि अजाणते पणे लोकांनी त्या पुन्हा मंदिराच्या पायात गाडल्या.
मंदिराच्या आवारात अजून काही भग्नमूर्ती, दीपस्तंभाचे दगडी खांब झाडाखाली ठेवले होते. ज्या काही शिळा, समाध्या बाहेर होत्या त्यावरील नक्षीकाम, कोरीवकाम जबरदस्त होते. एका चौकोनी दगडावर अष्टपाद (आठ पायांचे) कासव कोरलेले होते. स्त्री लढवय्या असलेल्या विरघळी पाहण्यात आल्या होत्या. भाले व तालवारींनी लढणारे सैनिक, धनुर्धारी, घोडेस्वार, हत्ती, इत्यादी कोरीवकाम त्या शिळांवर होते. त्या कोरीव शिल्पांचे वैशिष्ट्य मी तेथे उपस्थित गावकऱ्यांना सांगून त्यांना त्यांच्या पूर्वजांच्या इतिहासाबद्दल, या अमूल्य ऐतिहासिक ठेव्याबद्दल, त्यांच्या संवर्धनाबद्दल जागरूक करण्याचा प्रयत्न केला.
पेडगाव वीरगळ :-
पेडगावला विस्तीर्ण भुईकोट आहे. सध्या पुर्ण भग्न झालेला. औंरंगजेबाचा सरदार बहादुरखानाने बांधलाय. किल्ल्याचा कोट शिल्लक आहे. आतमध्ये मात्र बांधकामे हुडकावी लागतात. किल्ल्यात फिरणे तसे धोक्याचे कारण सगळीकडे वेड्या बाभळीचे जंगल माजलंय. ह्याच पेडगावच्या बहादूरगडात संभाजी महाराजांना हात लाकडांना बांधून आणि विदुषकाची टोपी घालून औरंगजेबाने मिरवत आणलं होतं, नंतर येतेच राजांचे डोळे काढले होते. तर ह्या पेडगावातच पाच यादवकालीन मंदिरे आहेत. ती पण एकापेक्षा एक सरस आणि अतिशय शिल्पसमृद्ध अशी. ह्या मंदिरांवरुन येथे पूर्वी यादवांचं मोठं ठाणं असावं असं वाटतं. तसंही इथल्या आजूबाजूच्या परिसरात भीमेकाठी असंख्य मंदिरे आहेत.
तर पेडगावला अशी सरस पाच मंदिरे असूनही वीरगळ मात्र एकच दिसला, येथेच एक सतीशिळाही आहे.
लोणी भापकर वीरगळ :-
मोरगावनजीकचे लोणी भापकर तिथल्या एका प्राचीन मंदिरामुळे आणि तिथे असलेल्या यज्ञवराहाच्या देखण्या मूर्तीमुळे मूर्तीअभ्यासकांत प्रसिद्ध आहे. हा भाग कायमचाच दुष्काळी. ऐन पावसाळ्यातही येथे पावसाचे दुर्भिक्ष्य असते. मात्र येथेही तीन चार मंदिरे आहेत आणि असंख्य सुस्पष्ट वीरगळ. जवळपास २५ ते ३० वीरगळ ह्या गावात आहेत. खास येथील मंदिरे आणि हे वीरगळ बघण्यासाठी गावात यावं. गावात एक पूर्ण बेवसाऊ झालेला गढीवजा किल्लाही आहे.
पांडेश्वरचा वीरगळ :-
लोणीभापकरच्या जवळच पांडेश्वर हे गाव आहे. तिथून सुमारे १०/ १२ किमी अंतरावर. येथेही एक प्राचीन मंदिर शिवाय असंख्य वीरगळ आहे. मात्र येथे वेगळाच वीरगळ आहे तशा प्रकारचा इतरत्र दिसत नाही. तो आहे वाघाशी लढून मृत झालेल्या वीराचा. ह्या वीरगळाच्या मधल्या पट्टीत वीर वाघाशी झुंज घेताना दाखवलाय.
लाय.पांडेश्वरचा आगळा वेगळा वीरगळ
किकलीचे वीरगळ :-पुणे-बेंगळूरू महामार्गावरील भुईंजजवळचे किकली हे जणू वीरांचंच गाव- वीरगळांचंच गाव. सुमारे दोनशेच्या आसपास वीरगळ किकलीत आहेत ते अगदी कुठेही सापडतात. घराच्या भिंतीत चिणलेले, मंदिरांपाशी, विहिरीपाशी, पारावर, अगदी गटारावर देखील.
गोवे वीरगळ :-
ह्या किकलीपासून जवळच सातार्याजवळ गौरीशंकर महाविद्यालयाजवळ लिंब गोवेला जाण्यासाठी फाटा आहे, शेरी लिंब जवळ बारा मोटेची विहिर पाहण्यासारखी आहे. ही विहिर म्हणजे मराठेकालीन शैलीत बांधलेलं मोठं अद्भूत प्रकरण. शेरी लिंबला जाताना वाटेत गोवे नावाचं एक लहानसं गाव लागतं. ते गाव ओलांडून जाताच वाटेत एक भग्न वीरगळ दुर्लक्षित अवस्थेत दिसला.

भोगाव वीरगळ :- वाई जवळच मेणवली नावाचा गाव आहे जिथे नाना फडवणीसांचा वाडा आहे, तो पाहून धोम गाठता येत.. धोम गाव बहुत सुंदर. झाडांनी वेढलेलं आणि पेशवेकालीन स्थापत्याची अप्रतिम मंदिरे असलेलं. ह्या धोमच्या अलीकडेच भोगाव आहे. भोगाव प्रसिद्ध आहे ते वामनपंडिताच्या समाधीसाठी. अर्थात मूळ समाधी सातारा जिल्ह्यातच कोरेगाव येथे आहे आणि भोगाव येथील समाधी वामनपंडितांच्याच कुण्या एका शिष्याने गुरुस्मरणार्थ बांधली आहे. ह्या भोगावमधेच अर्धनिम्म यादवकाळातलं मंदिर शिल्लक आहे. छताचा भाग पेशवेकाळात जीर्णोद्धारीत केला गेलेला आहे. ह्या मंदिराच्या पुढ्यातच प्रचंड गचपण आहे. तिथल्या त्या झाडीतच जमिनित पुरला गेलेला एक भग्न वीरगळ दिसला. काट्याकुट्यांतून मार काढत तिथवर पोहोचलो. लढाई आणि धारातीर्थी पडलेला वीर हे भाग गाडलेले गेलेले आहेत तर वरचा अप्सरा वीराला नेतात हा भाग फक्त दृश्यमान आहे.
खिद्रापूरचा वीरगळ :-खिद्रापूरला महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि शिल्पकलेने समृद्ध असलेले कोपेश्वर पहाण्यासारखे आहे. तिथल्या सुदर मूर्तींसारखेच सुंदर तिथले वीरगळही. बहुधा लेख असलेला एकमात्र वीरगळ हा तिथल्या मंदिराच्या ओसरीत भिंतीत बसवलेला आहे. लेख असलेले इतरही वीरगळ आहेत पण ते मात्र कर्नाटकात. महाराष्ट्रातला हा एकमेव. हा लेखही महत्वाचा. भोजराजा दुसरा ह्याचा सेनपाती बम्मेश ह्याचा हा वीरगळ. हा बम्मेश महापराक्रमी यादवसम्राट सिंघण दुसरा ह्याचेबरोबर झालेल्या युद्धात वीरगतीस प्राप्त झाला. अतिशय देखणा असा हा वीरगळ. ह्याच मंदिराच्या आवारात अजून दोन तीन वीरगळ आहेत.

कोपेश्वराच्या ओसरीतील भिंतीत असलेला एक वीरगळ

भोज सेनापती बम्मेशाचा अत्यंत देखणा असलेला वीरगळ
खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातील वीरगळ हा शिलाहार राजा भोज दुसरा ह्याचा सेनापती बम्मेशाचा आहे. देवगिरीचा यादवसम्राट सिंघण दुसरा ह्याने कोल्हापूर शिलाहारांचा संपूर्ण पराभव करुन त्यांचे राज्य बुडवले. ही लढाई खिद्रापूरच्या आसपास झाली. ह्यात भोज दुसरा पन्हाळ्यावर पळाला तर बम्मेश लढाईत मृत्यु पावला.
हिंजवडी वीरगळ :- हिंजवडी परिसरात आणखी एक वीरगळ आहे हिंजवडीतल्या स्मशानाच्या समोरच्या दहाव्याच्या घाटावर. चारी बाजूंनी शिल्पे कोरलेली आहेत. बरेच दिवस तो इथल्याच लहानश्या मंदिराला टेकवून ठेवलेला होता. ४/५ दिवसांपूर्वीच तो नव्या जागेवर उभा केलेला आहे.
नेरे वीरगळ :- हिंजवडीजवळ नेरे गावात बरेच वीरगळ आहेत. नेरे गाव मारुंजीच्या पुढे. मारुंजी कासारसाई च्या मध्येच एक उजवीकडे जाणारा फाटा लागतो. तिथून अर्धाकच्च्या रस्त्याने नेरे गाव. गाव असं दिसत नाहीच अधून मधून घरं आणि बाजूला शेतं. तिथेच रस्त्यावर एक शिवकालीम शिवमंदिर आहे. जवळपास पन्नासेक वीरगळ तिथे हारीने मांडून ठेवलेले आहेत. तिथेही गोवर्धन वीरगळ आहेत. ढालाईताशी युद्ध, तीरयुद्ध, अश्वयुद्ध असे बरेच प्रस्ग तिथल्या वीरगळांवर कोरलेले आहेत. तिथेच काही वैशिष्ट्यपूर्ण वीरगळ देखील आहेत. वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे तिथल्या त्या वीरगळांवर नेहमीसारख्या पट्टीका नसून शिळेचा निम्माधिक भाग तलवार हाती घेतलेल्या एकाच वीराने व्यापलेला आहे. असे कित्येक पुरुषभर उंचीचे वीरगळ तिथे आहेत.

नेरे वीरगळ

नेरे गोवर्धन वीरगळ

नेरे एकाकी योद्धा


नेरे वीरगळ
मुंबई गोवा महामार्गावर कोलाड जवळ अगदी रस्त्याला लागून असलेला वीरगळ
शिरपुंज्याच्या भैरवगडावरील वीरगळ
गळ 
वरसगावचा वीरगळ
आजोबा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या वीरगळी: -
ठाणे जिल्ह्यातील म्हसा,देहरीजवळ असलेल्या अजोबा या डोंगराच्या पायथ्याला असलेल्या आश्रमाच्या आवारात वीरगळी दिसतात.वास्तविक अजोबा हा एखादा किल्ला किंवा गड नाही.तसेच त्याच्या परिसरात ज्या घाटवाटा आहेत्,म्हणजे पाथरा किंवा गुयरीचे दार या दुय्यम आहेत.त्यामुळे इथे कोणते युध्द झाले असावे असा प्रश्न पडतो.
कदाचित परिसरात असलेल्या रतनगडावर इथले स्थानिक नोकरीला असावेत आणि तिथल्या एखाद्या युध्दात धारातिर्थी पडलेल्या सैनिकांचे हे वीरगळ असावेत.
पुरातन वीरगळ, महागाव, चंद्रपूर :-
ताडोबाच्या घनदाट जंगलात महागाव येथे पुरातन वीरगळी अस्तित्वात आहेत. जंगलात असल्यामुळे हा ऐतिहासिक वारसा अजून दुर्लक्षित आहे. येथे २०० हून अधिक वीरगळ आहेत. १ फुटापासून ६ फुट उंचीच्या लहान मोठ्या वीरगळ आहेत. ह्या दगडी वीरगळीवर अतिशय सुंदर कोरीवकाम केलेले आहे. वीरगळीवर घोडा, हत्ती, सैन्य कोरलेले आहे. वीरगळ म्हणजे एखादा वीर योद्धा युध्दात मरण पावल्या नंतर त्याच्या आठवणीत हे शिल्प उभारण्यात येत असे.
(Photo - Chandrakant Bhute)
वीरगळ एक अभ्यासाचा विषय :-
आत्तापर्यंत आपण वीरगळ आणि त्याचे एकंदर स्वरूप कसे असते याबद्दल माहिती घेतली. त्यावेळेस विरगळाचे काही भाग असतात असा उल्लेख आपण पाहिला यात, सर्वात खाली युद्धाची घटना मग मध्ये सर्व अप्सरा स्वर्गात घेऊन जात आहेत असे दृश्य आणि सगळ्यात वरती त्या धारातीर्थी पडलेल्या वीराचे जे कोणते उपास्य दैवत असेल त्याची प्रतिमा. उदा. शंकर, गणपती इत्यादी. तर या लेखात आपण त्यातील पटाचा अर्थ समजून घेऊ!
वीरगळ हा ध्यास घेऊन पुण्यातील निखील भोसले ह्यांनी " वीरगळ अभ्यास आणि भ्रमंती" ही एक अत्यंत वेगळी मोहीम सुरु केली आहे. महाराष्ट्रातील वीरगलांचे शास्त्रशुद्ध documentation आणि संवर्धन ह्या एका ध्यासाने निखील भोसले हे कार्य करत आहेत! महाराष्ट्रात आढळणारे वीरगळ हे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. काही वीरगळ हे अगदी १५-२० फूट उंचीचे आहेत तर काही केवळ एक शिल्पपट असलेले आहेत. पण सर्वसाधारणपणे हे वीरगळ तीन किंवा चार शिल्पपटात विभागले जातात. यापैकी सर्वात खालच्या भागात जेथे तो वीर धारातीर्थी पडला, तेथील युध्दप्रसंग कोरलेला असतो. मग तो प्रसंग मोठ्या लढाईमधील असेल किंवा एखाद्या प्राण्याबरोबर झुंजताना असेल, ढाल-तलवारींनी समोरासमोर लढणारे सैनिक असतील किंवा घोडेस्वारांची लढाई असू शकते. जर का हा वीर गाईंचे रक्षण करताना धारातीर्थी पडला असेल तर त्यात काही गाईंचा समूह सुद्धा दाखवलेला असू शकतो. खालून दुसऱ्या चौकटीत बऱ्याच वेळा अप्सरा या धारातीर्थी पडलेल्या वीराला स्वर्गात नेत आहे असे दृश्य दाखवले जाते. या पटात बहुतांश वेळा वीर हा झोपलेल्या अवस्थेत दाखवलेला आहे. सगळ्यात वर असणाऱ्या पटात वीराच्या उपास्य देवेतेचे चित्रण केलेले आपल्याला दिसून येते मग कधीकधी यात शंकर दिसून येतो किंवा काही वेळा गणपती सुद्धा दिसून येतो!! पण बहुतांश वेळा शंकराची पिंड दाखवलेली असल्याने महाराष्ट्रात त्याकाळी जवळपास सर्वांचे उपास्य दैवत शंकर असावे असेच वाटते. काही वेळा या शिल्पाच्या वर चंद्र आणि सूर्य यांच्या आकृतीसुद्धा कोरलेल्या दिसून येतात. याचा अर्थ असा की या वीराचे स्मरण ‘यावच्चंद्र दिवाकरौ’ म्हणजे जोपर्यंत आकाशात चंद्र आणि सूर्य आहेत तोवर केले जावे!
एखादा वीर मरण पावला की त्याचे स्मारक उभारण्यामागे काय कारण असावे आणि त्यात नेहमी या वीराला अप्सरा स्वर्गात घेऊन का जात असाव्यात हा एक प्रश्न आपल्याला पडू शकतो. तर एक तर त्या वीराचे स्मरण म्हणून ते स्मारक उभारत असावेत आणि दुसरे म्हणजे हे स्मारक पाहून इतर वीरांना त्यातून स्फूर्ती मिळावी हा दुसरा भाग असावा! तर मग ही स्वर्गाची काय भानगड!!? तर याचे उत्तर आपल्याला प्राचीन महाकाव्यांमध्ये मिळून जाते. ‘महाभारतात’ जर रणांगणावर वीर मरण पावला तर त्याचे स्वर्गातले स्थान निश्चित होते असे दिले आहे पुढे भीष्म असे म्हणतात की जेव्हा वीराच्या शरीरातून रक्ताच्या धारा वाहू लागतील तेव्हा तो वीर साऱ्या पापातून मुक्त होऊन त्याला स्वर्गाचे स्थान मिळेल. भीष्म सामान्य माणूस आणि योध्यातला फरक सांगताना म्हणतात की क्षत्रियाचा मृत्त्यू हा कधीही घरात येऊ नये तर क्षत्रीयाचा मृत्यू हा केवळ बाणांनीच झाला पाहिजे. जर वीराने रणांगणावरून पळ काढला नाही तर त्याला पुढे मृत्युनंतर इंद्राच्या बरोबरीचे पद मिळते असा सुद्धा एक समज पूर्वीच्या काळी होता. प्राचीन भारतातीय याच समजाचे दृश्य आपल्याला भारतातील अनेक वीरगळांवर दिसून येते.
संस्कृतसाहित्यामधून आपल्याला मृत्यनंतरच्या जीवनात असलेल्या आनंदाची अनेक वर्णने मिळतात. हीच वर्णने आपण जर वीरगळांकडे नीट पाहिले तर त्यातून सहज लक्षात येतात. असे म्हणतात की वीराला सद्गती मिळाली की स्वर्गातील अनेक अप्सरा त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा मनात ठेवून त्याच्याजवळ धावून येतात. वीरगळावरील मधल्या शिल्पात जमिनीवर आडवा पडलेला किंवा उभा असलेला वीर आणि त्याच्या भोवती उभ्या असलेल्या साऱ्या अप्सरा हे याच समजाचे प्रतीक आहे. तसाच दुसरा प्रसंग म्हणजे विमानातून वीराला स्वर्गात नेण्याचा. त्याला पुराणातील गोष्टीचा संदर्भ देता येतो तो म्हणजे अंबरीश राजा आणि इंद्र यांच्यात जे युद्ध झाले त्यात अंबरीश राजा जेव्हा मरण पावला तेव्हा त्याने पहिले की त्याचा जो सेनापती होता ‘सुदेव’ तो एका सजवलेल्या विमानात बसून आपल्याहून श्रेष्ठ अशा जगात जात आहे. अर्थात त्यावेळेस विमान होते का नाही हा पुढचा प्रश्न कारण कोणतेही भौतिक पुरावे आपल्याला काही सापडत नाहीत, परंतु पुराणात विमानाचा उल्लेख मात्र जरूर येऊन जातो. माझ्या पाहणीत तरी विमानासदृष्य कोणतीही आकृती पाहण्यात आली नाही परंतु अनेक ठिकाणी आपल्याला पालखी दिसून येते. कदाचित या पालखीलाच ‘विमान’ म्हणून संबोधले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथे एक लक्षात घेतले पाहिजे की सर्वच ठिकाणी या अश्या पालख्या आढळून येत नाहीत, इतर ठिकाणी वीर हा उभा किंवा झोपलेल्या अवस्थेत असतो. मग काही विशिष्ट ठिकाणीच पालखी का? कदाचित पालखी दाखवणे म्हणजे त्या वीराला सैन्यात मानाचे स्थान होते असा अर्थ काढला जाऊ शकतो का? मात्र पुराव्यांशिवाय याचे उत्तरही मिळत नाही.
भारतात आढळणाऱ्या या सर्व प्राचीन स्मृतीशिल्पांचे जतन करून त्यांची एक सूची तयार केली पाहिजे जेणेकरून कोणती आकृती कोणत्या ठिकाणी असलेल्या वीरगळावर आहे हे पटकन समजू शकेल.
डॉ. मंजिरी भालेराव यांनी लिहिलेल्या ‘गाणपत्य सांप्रदाय आणि पुणे’ या लेखात कसबा परिसरात गणपती ही उपास्यदेवता असलेले वीरगळ आहेत हे नमूद केलेले आढळले. त्यांपैकी पहिला वीरगळ ‘सूर्या सह्याद्री हॉस्पिटल’च्या मागे असलेल्या ‘मुंजोबा बाळ मंदिरा’त आहे. त्या मंदिरात मुंजोबा बाळ ह्याच्या स्मरणार्थ वीरगळ कोरलेला आहे. वीरगळ चारी दिशांना कोरलेला आहे. दोन दिशांना गणपती असून उरलेल्या दोन दिशांना शिवलिंगाची पूजा आहे. वीरगळाला शेंदरी रंग दिलेला असल्यामुळे त्याच्यावर असलेले युद्ध शिल्पपट अस्पष्ट झाले आहेत आणि ओळखता येत नाहीत.
हजरत ख्वाजा शेख सलाउद्दीन दर्गा तेराव्या शतकात पुण्येश्वर मंदिर उद्धस्त करून त्याच्या जागी मंदिराचेच दगड वापरून बांधला गेला आहे. दर्ग्याच्याजवळ रस्त्याच्यालगत नवीन बांधलेल्या पुण्येश्वर मंदिराच्या बाहेर दोन वीरगळ आहेत. दोन्ही वीरगळ काळ्या रंगात रंगवले गेले आहेत. तरी एका वीरगळीवरील गणपती स्पष्ट दिसतो. गणपतीच्या मागील बाजूला स्त्री पूजा करताना दाखवली आहे. वीरगळीचा अर्धा भाग मंदिराच्या भिंतीत गेलेला असल्यामुळे गणपती अर्धाच दिसतो. इतर शिल्पपट अस्पष्ट झाल्यामुळे ओळखता येत नाहीत. दुसऱ्या वीरगळीवर शिवपूजा आणि इतर शिल्पे आहेत. त्यावर असलेली शिल्पे ही ओळखण्याच्या पलीकडे गेली आहेत.
सोमवार पेठेत नागेश्वर मंदिर आहे. मंदिर परिसरात असलेल्या अवशेषांवरून तेथे नागेश्वराचे जुने मंदिर असावे व पेशवेकाळात जुने मंदिर पाडून त्याच्या जागी नवीन मंदिर बांधले गेले असावे असे वाटते. त्याच मंदिराच्या आवारात गणपती असलेली स्मृतिशिळा आहे. तो वीरगळ नाही. कारण वीरगळावर असणारे शिल्पपट तेथे नाहीत. त्या स्मृतिशिळेचा खालील भाग गोलाकार असून वरील भागात चार खण आहेत. प्रत्येक खणात अनुक्रमे सूर्य, गणपती, चंद्र आणि मानवी आकृती कोरलेल्या आहेत. मंदिरपरिसरात उत्खनन चालू होते तेव्हा ती शिळा मिळाली. ती स्मृतिशिळा कोणाची आहे ते कळून येत नाही, पण गणपतीच्या मागील बाजूला कोरलेल्या माणसाची ती स्मृतिशिळा असावी.
पुण्येश्वर व बाळोबा मुंजा मंदिरातील वीरगळ बाराव्या-तेराव्या शतकातील व नागेश्वर मंदिरात असलेली स्मृतिशिळा नंतरच्या काळातील असावी. त्या काळात शिवाबरोबर गणपतीसुद्धा आराध्यदैवत म्हणून पूजला जाऊ लागला होता व गणपतीच्या लोकप्रियतेमध्ये भर पडत होती असे ध्यानी येते.
ही झाली वीरगळची ढोबळ मांडणी. याशिवाय काही वीरगळावर शिलालेख सुद्धा आढळून येतात परंतु महाराष्ट्रात असे वीरगळ फार थोडे आहेत. पण एक मात्र आहे की वीरगळ या विषयाचा अभ्यास करायचा असल्यास पायाला सतत भिंगरी हवी आणि नवीन नवीन ठिकाणांवरून वैशिष्ट्यपूर्ण विरगळांची टिपणे काढून जमेल तो इतिहास पुढे आणला पाहिजे. इतिहासाची ही स्मृतीशिल्पे जतन करण्यासाठी प्रयत्न केली पाहिजेत, गावातील लोकांना यांचे महत्त्व पटवून देऊन त्याला शेंदूर न फासण्याबद्दल समजावले पाहिजे, जेणेकरून अभ्यासकांना इतिहासाचा हा ठेवा जसाच्या तश्या स्वरूपात अभ्यासण्यासाठी उपलब्ध होईल आणि त्यातून काही नवीन इतिहास सापडण्याची शक्यता वाढेल!
वीरगळांचे होणार दस्तावेजीकरण
महाराष्ट्राच्या संपन्न शिल्पकलेचा वारसा सांगणाऱ्या देवतांच्या मूर्ती आणि उघड्या आकाशाखाली पडून असलेल्या वीरगळांच्या दस्तावेजीकरणासाठी (डॉक्युमेंटशन) उत्साही इतिहासप्रेमींनी पुढाकार घेतला आहे. वीरगळांसाठी ‘मी सह्याद्री बोलतोय’ या ग्रुपमधील तरुण कार्यकर्ते पुढील आठवड्यापासून बारामतीमधील लोणी भापकर गावापासून या माहिती संग्रहमोहिमेस सुरूवात करणार आहेत.
कधीकाळी शत्रूचे आक्रमण रोखणाऱ्या गडांवरच्या तोफा, वीरगळांवर सध्या तस्कर आणि भुरट्या चोरांची नजर पडली आहे. अलीकडील काही वर्षांत गडांवरच्या तोफा आणि मंदिरांबाहेरील भग्नावस्थेतील मूर्ती, वीरगळ गायब होण्याचे प्रकार वाढले आहेत. यातील अनेक मूर्ती आणि वीरगळांच्या पुरातत्त्व विभागाकडे नोंदी नसल्याने तस्करांचे फावते आहे. ऐतिहासिक वारशांच्या दिवसाढवळ्या होणाऱ्या चोरीबद्दल ‘मटा’ने नुकतीच वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती. याची दखल घेऊन इतिहासप्रेमी निखिल भोसले आणि त्याच्या टीमने इतिहासप्रेमींना एकत्र आणून या नोंदी नसलेल्या वीरगळ आणि मूर्तींचे डॉक्युमेंटशन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी सोशल मीडीयाच्या माध्यमातून नेटवर्क तयार केले आहे.
‘पहिल्या टप्प्यात आम्ही बारामती तालुक्यातील लोणी भापकर या गावाची निवड केली आहे. या गावात मध्ययुगीन काळातील मंदिरे आणि शंभरहून अधिक वीरगळ आहेत. एका मंदिराच्या बाहेर तर ३५ हून अधिक वीरगळ उघड्यावर पडून आहेत. यातील अनेक शिल्पांच्या शासन दरबारी नोंदी नाहीत. आम्ही पुढील आठवड्यापासून स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन या वीरगळांच्या माहिती संग्रहाचे काम सुरू करणार आहोत. यामध्ये स्थानिक मुलेदेखील सहभागी होणार आहेत,’ अशी माहिती भोसले यांनी दिली.
‘आमच्या टीमने राजगडावरील तोफांचा चुलीसाठी होत असलेला गैरवापर नुकताच थांबविला. येत्या २६ जानेवारीला आम्ही राजगडला प्रदक्षिणा मोहीम आयोजित केली आहे. यानिमित्त प्राथमिक तयारी करण्यासाठी दोन दिवसांपूर्वीच आम्ही राजगडावर गेलो होतो. काही उपद्रवी लोकांनी गडावरील तोफांचे तुकडे केले असून काही तुकड्यांची चूल बनवलेली दिसली. आम्ही भटकंतीचे नियोजन बाजूला ठेवून साधारणतः चारशे किलो वजनाच्या या तोफेचे तुकडे गोळा केले. काही तुकडे जोडून ते दगडावर रचून ठेवले आहेत,’ असे भोसले यांनी सांगितले. माहिती संकलन मोहिमेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी mesahyadriboltoy@gmail.com या वर संपर्क साधावा.
पलिया :-
किल्ले, डोंगर दर्या फ़िरतांना आदिवासी / वनवासी वस्ती, पाड्याजवळ एखाद्या उभ्या लाकडी फ़ळीवर कोरलेले चक्र/फ़ूल त्या खाली कोरलेल्या सुर्य - चंद्राच्या प्रतिमा आणि त्याखाली कोरलेली घोड्यावर बसलेल्या किंवा युध्द करणार्या वीराची प्रतिमा पाहायला मिळते. या असतात आदिवासी वीरांच्या वीरगळी. याशिवाय दगडात कोरलेल्या वीरगळीत घोड्यावर बसलेला योध्दा दाखवलेला असतो. वरच्या बाजूला सूर्य चंद्र कोरलेले असतात. ठाणे जिल्ह्यात महाराष्ट्र गुजरात सीमेवर असलेल्या सेगवा किल्ल्यावर अशी वीरगळ आपल्याला पाहायला मिळते. गंमतीचा भाग म्हणजे त्यावीराचा पोषाख काठेवाडी पध्दतीचा आहे. नगर जिल्ह्यातील भैरवगड (शिरपुंजे) किल्ल्यावर घोड्यावर बसलेल्या वीराची प्रतिमा कोरलेली आहे. नाशिक जिल्ह्याच्या गुजरात सीमेला लागून असलेल्या भागात आपल्याला ४ ते ५ फ़ूट उंच वीरगळी पाहायला मिळतात. गुजरातमध्ये अशा प्रकारच्या वीरगळी आहेत. त्यांना पलिया (paliya stone) नावाने ओळखतात. त्याच शैलीचा प्रभाव या नाशिक जिल्ह्याच्या गुजरात सीमेला लागून असलेल्या भागात असलेल्या वीरगळींवर दिसून येतो.

हातगड किल्ल्याजवळील पलिया

हातगडाच्या पायथ्याच्या गावातील पलिया दगड
सतीशीळा :-
पूर्वी पती मरण पावला की त्याच्या पत्नी सती जात. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सतीशिळा उभारत. सतीशिळेत सतीचा हात चुडेमंडीत कोरत असत तसेच ती स्वर्गात तिच्या पतीसोबत शिवलिंग उजळताना दाखवत. काही वेळा सती स्त्रीची गावातून घोड्यावरून मिरवणूक काढली जाई. त्यामुळे क्वचित सतीशिळांवर सती घोड्यावर बसलेली दाखवतात. बऱ्याचदा वीरांच्या एकापेक्षा अनेक सती जात. तेव्हा जितक्या पत्नी सती गेल्या तितके हात सतीशिळेवर कोरले जात.
नायगाव सतीशिळा :-
नायगावच्या सिद्धेश्वर मंदिरातील अर्धाअधिक पुरलेला वीरगळ आणि तिथलीच सतीशिळा
ह्या माळशिरसपासून जवळच नायगांव हे अगदीच लहानसं गाव. इथेही एक हल्लीच जीर्णोद्धार केलेलं प्राचीन मंदिर आहे. मंदिराच्या बाहेर पुष्करिणी. प्रथमदर्शनी मंदिर तसं अनाकर्षकच वाटतं. मंदिराच्या पुढ्यातच नंदीमंडप. ह्या मंदिराच्या आवारात एक वीरगळ अर्धाअधिक जमिनीत पुरलेला आढळेला. सर्वात वरचं 'यावच्चंद्रदिवाकरौ' हे नीटपणे दृश्यमान आहे. ह्याच मंदिराच्या आवारात दोन तीन सतीशिळाही आहेत. ह्यातली एक सतीशिळा तर थेट मंदिराच्या अंतर्भागातल्या भिंतीत चिणलेली आहे. सतीशिळा म्हणजे पतीनिधनानंतर सती गेलेल्या स्त्रीच्या स्मरणाअर्थ तिचे स्मारक म्हणून सतीचा आशीर्वादपर हात कोरलेली शिळा बनवणे. ह्या प्राचीन निष्ठुर परंपरांचा भाग असणार्या शिळा अवस्थ करतात.
पूरची सतीशिळा :-
पूर म्हणाजे आताचे सासवडनजीकचे पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याचे नारायणपूर. ह्या गावचा रामचंद्रदेव यादवाचा पूर शिलालेख प्रसिद्ध आहे. ह्या शिलालेखात रामदेवरायच्या दंडनायक बाईदेव व अजून कुण्या एका प्रधान सेनापतीचा उल्लेख आला असून हेमाद्री पंडिताला 'लोककर्माधिकारी' अर्थात लोकोपयोगी कामे करणारा म्हणून नियुक्त केले गेल्याचा उल्लेख आहे. प्रस्तुत लेख सध्या भारत इतिहास संशोधक मंडळात आहे. तर ह्या पुरात नारायणेश्वराचे यादवकालीन मंदिर असून त्याच्या पुढ्यातल्या रस्त्याच्या पलीकडे एका खोपटात व तिथेच एका शेतात अशा दोन सतीशिळा आहेत. ह्यातील एक सतीशिळा फारच वैशिष्ट्यपूर्ण आहे. एक.दोन नव्हे तर सतीचे तब्बल चार हात एकाच शिळेवर कोरलेले आहेत ह्यांखेरीज लढाईचे दृश्यही आहेच. कदाचित एकाच वेळी सती गेलेल्या अनेक स्त्रियांचे स्मारक म्हणून ही शिळा कोरलेली असावी.

तिथलीच एक दुर्लक्षित सतीशिळा
गुरववाडी, पावस सतीशिळा :-

पावसजवळ गुरववाडी म्हणून एक लहानशी वाडी आहे. तिथल्या मंदिरात काही शिळा पडलेल्या आहेत. त्या सर्वच सतीशिळा. जवळपास १०/१२ सतीशिळा तेथे इतरत्र विखुरलेल्या आहेत.
वैराटगडावरील सतीशिळा : -
वैराटगडावरील वीरगळ तसेच सतीच्या हाताचे शिल्प. वरील बाजूस सतीचा हात आणि खालील बाजूस वीरगळ दिसून येतात:
त्रिंगलवाडी किल्ल्याच्या परिसरातील सतीचा हात : -
ह्या शिल्पाबद्दल बरेच गैरसमजसुद्धा स्थानिक लोकांमध्ये दिसून येतात! वीराचा हात तुटला ती जागा असे सुद्धा स्थानिकाकडून आपणास ह्या शिल्पाबद्दल ऐकण्यात येऊ शकते!
वीरांबरोबर सती जाणार्या स्त्रियांच्या स्मरणार्थ सतीशिळा बनवल्या जात. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आढळणार्या सतीशिळांमध्ये स्त्रीचा खांद्यापासून हात चित्रीत केलेला असतो. हा हात कोपरात काटकोनात वळलेला असतो. हातात बांगड्या असतात. हाताखाली दोन प्रतिमा कोरलेल्या असतात. त्या स्त्रीच्या मुलांच्या प्रतिमा असाव्यात. या हाताची रचना आशिर्वाद देणार्या हाताप्रमाणे असते. तसेच सतीशिळा देवळाच्या परिसरात उभारल्या जात असत . त्यामुळे सतीशिळेची शेंदुर लाऊन पूजा केल्याचे बर्याच ठिकाणी पाहायला मिळते. वीरगळी प्रमाणे एक, दोन किंवा तीन शिल्प चौकटीत सतीशिळा कोरलेली असते. त्यात खालच्या चौकटीत चितेवर बसलेली स्त्री, चितेच्या बाजूला उभी असलेली स्त्री किंवा नवर्याच डोक मांडीवर ठेऊन चितेवर बसलेली स्त्री, वाघावर , घोड्यावर बसलेली स्त्री कोरलेली असते. दुसर्या चौकटीत नवरा बायको हातात हात घालून उभे राहीलेले दाखवलेले असतात. पहिल्या किंवा दुसर्या चौकटीत उजव्या बाजूला सतीचा कोपरापासूनचा हात दाखवलेला असतो. तिसर्या चौकटीत नवरा बायको पिंडीची पूजा करतांना दाखवलेले असतात. त्यावर सूर्य चंद्र कोरलेले असतात. वीराबरोबर त्याच्या दोन किंवा तीन पत्नी सती जात असत. त्यांचे प्रतिक म्हणून कोपरात वाकवलेले दोन किंवा तीन हात दाखवलेले असतात. काही वीरगळामध्ये वीराची पत्नी आणि सतीचा हातही दाखवलेला असतो. त्याला वीरसतीगळ असे म्हणतात. ही वीराची आणि सती या दोघांची एकच स्मृतीशिळा असते.
हरिश्चंद्रगडावरची सतीशिळा :-
 |
Left: Sati hand, Center: Kirtimukha (devil face), Right: broken pieces of hero-stones
|
खरतर हरिश्चंद्रगडावरील अवशेषाचा पध्दतशीर अभ्यास केला तर आपल्या इतिहासातील अनेक रहस्य उलगडतील.गडावरती अनेक मंदिर्,लेणी,शिलालेख आहेत.मंदिराच्या समोर आपल्याला कीर्तिमुख्,सतिशिळा पहायला मिळते.बहुतेकदा मंदिरात सतीशिळा दिसत नाही,पण इथे ती दिसते.
गोरखगड :-
गोरखगडाकडे जाताना गडाचा चढ होण्यापुर्वी एका झाडाच्या खाली वीरगळ दिसतात.हे वीरगळ वनराइत एका मंदिराजवळ ठेवलेले आहेत.याचबरोबर या ठिकाणी एक सतीशिळा पहायला मिळते.
हे शिल्प मोठे वैशिष्ट्यपुर्ण आहे.इथली सतीशिळा मोठी वैशिष्ट्यपुर्ण आहे.एकदम वरच्या शिल्पात पाच स्रीया, त्यांचा पती एक साधु शिवलिंगाची पुजा करत आहेत.त्याच्या खालच्या चौकटीत या स्त्रीयांचे हात दाखविले आहेत. त्याच्या खालच्या चौकटीत या स्रीया घोड्यावर आरुढ होउन स्वर्गाकडे निघाल्या आहेत.सगळ्यात खालच्या चौकटीत या पाचही स्त्रीयांचा पती चितेवर अग्नीज्वाळांनी वेढलेला दाखविला आहे. डाव्या बाजुला असलेल्या वीरगळीत वरच्या बाजुला कलश दाखविला आहे.वरच्या शिल्पपटात योध्दा ,त्याची बायको व पुजारी शिवलींगाची पुजा करताना दाखविले आहेत.तसेच शेजारी सतीचा हातही दाखविला आहे.
धेनूगळ :-
धेनूगळ म्हणजे गाय वासरु दगड हे एक दानपत्र आहे. दान दिलेल्या गावाची, जमिनीची सीमा दाखवण्यासाठी धेनूगळ वापरला जात असे. या आयताकृती उभ्या दगडावर गाय आणि वासरू कोरलेले असते. वरच्या बाजूला सूर्य आणि चंद्र कोरलेले असतात. गाय हे राजाचे प्रतिक असून वासरू हे प्रजेचे प्रतिक आहे. गाय ज्याप्रमाणे वासराचे पालन करते तसेच राजा प्रजेचे पालन करतो. या गाय वासरू दगडांवर काही ठिकाणी शिलालेखही कोरलेले पाहायला मिळतात.
|
धेनूगळ, दुंधा किल्ला, जि.नाशिक |
वाघदेव :-
डोंगरवाटा धुंडाळतांना काही लाकडी फ़ळ्यांवर सुर्य - चंद्राच्या प्रतिमा आणि त्याखाली कोरलेली वाघाची प्रतिमा पाहायला मिळते. याला आदिवासी लोक "वाघदेव" म्हणतात. लाल, पिवळा, केशरी या नैसर्गिक रंगात वाघदेवाची प्रतिमा रंगवलेली पाहायला मिळते. काही ठिकाणी वाघाच्या खाली सापाची प्रतिमाही कोरलेली आढळते. जंगलातील हिंस्त्र श्वापदांपासून आदिवासींचे त्यांच्या गाईगुरांचे रक्षण वाघदेव करतो अशी आदिवासींची श्रध्दा आहे. जंगलाशी नेहमीच संबंध येणार्या आदिवासींना वाघ, बिबटे इत्यादी मार्जारवंशीय प्राण्यांकडुन होणार्या प्राणघातक हल्ल्याची भिती मनात ठेउनच जंगलात जावे लागते. या भितीतूनच " वाघदेव " या कल्पनेचा जन्म झाला असावा.लाकडी फ़ळीवर कोरलेली वाघदेवाची प्रतिमा असलेले काष्ठशिल्प आदिवासी आदिम काळापासून बनवत असावेत. जंगलात सहजपणे उपलब्ध होण्यार्या लाकडावर कोरीवकाम करुन त्याला नैसर्गिक रंगात रंगवून "वाघदेव" तयार केला जातो. त्यानतंरच्या काळात दगडात कोरलेल वाघाच शिल्प (हरिशचंद्र गडावर जातांना टोलार खिंडीत वाघाच शिल्प पाहायला मिळत.) . याशिवाय नाशिक जिल्ह्यातील बागलाण भागात असलेल्या न्हावीगडावर चढताना, ठाणे जिल्ह्यातील अशेरीगडावर वाघदेव पाहायला मिळतात. ह्या शिल्पांचा एक विशेष भाग म्हणजे ही कातळशिल्पे किंवा दगडामध्ये कोरलेली शिल्पे नसून लाकडी खांबावर निर्माण केलेली आहेत. दरवर्षी त्या भागातील समाज समारंभपूर्वक नवीन लाकडी खांबाची स्थापना करतात. ह्या शिल्पावर वरती सूर्य-चंद्र आणि खालली भागात वाघसदृश्य प्राणी, मानवाकृती तसेच सर्पाकृतीदेखील कोरलेल्या आढळतात. प्राचीनकाळी जंगलाच्या दरीखोर्यांच्या जवळ राहणाऱ्या मानवी समाजाचा वन्यपशूंशी जास्त संपर्क येत असल्याने त्यास आदरयुक्त भीती तसेच रक्षणाच्या भावनेतून वाघदेव हे शिल्प निर्माण झाले असावे!
न्हावीगडावरचा हा वाघदेव
| लाकडाची जुनी मुर्ती आणि सिमेंटची नव्याने बनवलेली मुर्ती |
|
लाकडावर कोरले जाणारे हे वाघदेव उन पावसाच्या मार्याने खराब होत. त्यावर उपाय म्हणुन आताच्या आधुनिक काळात वाघदेवाची सिमेंटची बेढभ आणि भडक रंगात रंगवलेली मुर्ती पाहायला मिळते. काही ठिकाणी अशी वाघ देवांची मंदिरेही पाहायला मिळतात. काळाबरोबर होणार्या सिमेंटच्या या आक्रमणामुळे लाकडावर वाघदेव कोरण्याची ही कला आणि पध्दत लुप्त होईल. भारतभर पसरलेल्या जंगलात असलेल्या वाघदेवांची पूजा दरवर्षी "वाघबारसीला" म्हणजेच अश्विन वद्य व्दादशीला होते.

नाहवागडाच्या चढणीवर असणार्या पठारावरील वाघदेवाचे शिल्प
भिलाईगडाचा चढ चालू होताना असणाऱ्या आवळाईबारी खिंडीमधील वाघदेव
प्रेमगिरी किल्ल्यावरील वाघदेव:
गध्देगळ :-
 |
कर्णेश्वर मंदिर, संगमेश्वर येथील गध्देगाळ |
|
परींडा किल्ल्यातील गध्देगाळ |
प्रजेचा प्रतिपाळ करणारा राजा प्रजेने राजाज्ञा मोडली तर त्याची गय करणार नाही हे दर्शविण्यासाठी गध्देगळ कोरले जात असत. गध्देगळ हे दानपत्र होते. शिलाहार राजांच्या काळात चालू झालेली ही प्रथा इस्लामी राजवटी पर्यंत असावी. कारण विजापूर येथिल गध्देगळांवर फ़ारसी शिलालेख आहे. गध्देगळ हा दगड आयताकृती असून यावर गाढव स्त्रीशी संभोग करतांना दाखवलेले असते. दिलेल्या दानाचा दुरुपयोग केल्यास, नियम मोडल्यास काय शिक्षा होईल हे सांगणारी ही शिल्पांकीत केलेली धमकी / शिवी असते. वरच्या बाजूस सूर्य चंद्र आणि मध्ये कलश कोरलेले असतात. हे अर्थात दान देणार्या राजाची किर्ती आसमंतात कायम राहील हे दर्शवणारी असतात. काही गध्देगाळांवर संस्कृत, मराठी, फ़ारसी भाषेत शिलालेख कोरलेले पाहायला मिळतात. त्यात कोणी कोणाला दान दिले. त्याचा गैरवापर केल्यास काय शिक्षा होईल याचा उल्लेख केलेला असतो. डोंबिवलीतील गावदेवी मंदिराजवळ असा शिलालेख असलेला गध्देगाळ पाहायला मिळतो. कल्याण जवळ असलेल्या लोणाड गावात, मुंबईतही गध्देगाळ सापडलेले आहेत. परांडा किल्ल्यातील हमामखान्यातही एक गध्देगळ ठेवलेला आहे. याशिवाय मंदिर परिसरातही गध्देगाळ पाहायला मिळतात. संगमेश्वर जवळील कर्णेश्वर मंदिर, पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले पूरचे नारायणेश्वर मंदिर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परुळ्याचे वेतोबा मंदिर इत्यादी अनेक ठिकाणी गध्देगळ आहेत. गावात सापडलेले वीरगळ, मुर्ती देवळाच्या परीसरात आणून ठेवलेल्या असतात. तसेच हे शेतात, बांधावर सापडलेले वीरगळ मंदिरात आणून ठेवलेले आहेत. या दगडांचे ऐतिहासिक महत्व माहिती नसल्यामुळे आणि केवळ यावर अश्लील शिल्प आहे, या कारणास्तव गध्देगाळ नष्ट केला जातो. सध्या पूरचा गध्देगाळ जमिनीत पुरला आहे, तर परुळ्याचा विहिरीत फ़ेकलेला आहे.
विहिरीत फ़ेकलेला गध्देगळ |
| अज्ञानाने या गध्देगाळावर चक्क फुल वाहून त्याची पुजा केलेली दिसते. |
गधेगाळ किंवा हत्तीगाळ :-
सह्याद्रीत फिरताना एखाद्या किल्ल्यावर किंवा मंदिरांशेजारी अनेक घडवलेले दगड आपल्या नजरेस पडतात. या दगडांवर अनेक आकृत्या, चिन्हे किंवा लेख कोरलेले असतात. अशा वेळेला कुतूहलाने का होईना पण आपण त्यांचे निरीक्षण करतो. आणि मग काही वेळाने या शिल्पांना विरगळ किंवा गद्धेगळ असे म्हणतात असे कळून येते. विरगळ आणि गद्धेगळ या दोन वेगळ्या गोष्टी. तर लेखात आपण गद्धेगळ बाबत जाणून घेऊ.
गद्धेगळचा अर्थ काढायला गेलं तर आपल्याला सहज लक्षात येईल की, ‘गद्धे’ म्हणजे गाढव आणि ‘गळ’ म्हणजे दगड. इंग्रजी मध्ये सुद्धा याला ‘ass-curse stone’ असे म्हणतात. गद्धेगळ हा स्पष्ट शब्दात सांगायचं तर दिलेली एक शिवी आहे. आता तर ही शिवी कशासाठी? पूर्वीच्या काळी मोठ्या मोठ्या जमिनी दान देण्याची पद्धत होती. जसे त्याकाळचे राजे एखादा किल्ला किंवा मंदीर यांना काही जमीन किंवा त्या गावचे उत्पन्न दान म्हणून देत असत. या दानाचा कुणी अव्हेर केला किंवा गैरवापर केला तर त्यासाठी शापवाणी दिलेली असते. ती शापवाणी किंवा शिवी म्हणजे गद्धेगळ! हे दान कुणी नाकारील त्याच्या आईला गाढव किंवा घोडा लागेल अक्षरशः असे शब्द उच्चारलेले असतात. १२ व्या, १३ व्या शतकातील काही शिलालेखात “तया माये, गाठोऊ घोडौ झाविजे” असे सुद्धा उल्लेख. ज्यांना लिहिता-वाचता येत नव्हते त्यांच्यासाठी मग दगडी शिल्पे कोरली जाऊ लागली.
ली.
कर्वेनगर येथील गणेश मंदिरामधील गद्धेगळ
आता हे शिल्प ओळखायचे कसे तर साधारण पणे एका दगडावर तीन भागात कोरीव काम केलेले असते. वरच्या भागात चंद्र-सूर्य कोरलेले असतात, याचा अर्थ दिलेला शाप हा चिरकाल टिको. मधल्या भागात दिलेल्या दानाविषयीचा लेख कोरलेला असतो आणि तळाच्या भागात झोपलेल्या अवस्थेत एका स्त्रीची आकृती आणि तिच्याशी प्रणय करताना गाढव अशा प्रकारची आकृती कोरलेली असते. पण प्रत्येक गद्धेगळ हा तीन भागांचा असेलच असे नाही. काही गद्धेगळ हे आकृती असलेले असतात तर काही गद्धेगळ वर लेख असतो तर काही मात्र तिन्ही भाग असलेले असतात.
गद्धेगळचा काळ जर आपण काढायला गेलो तर हे साधारण ९ व्या ते १० व्या शतकातील आहेत म्हणजे हे दगड शिलाहारांच्या व यादवांच्या काळातील असले पाहिजेत असा निष्कर्ष काढू शकतो. कदाचित त्याच्या आधीच्या काळात सुद्धा गद्धेगळ असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आता गद्धेगळ सापडणं हे इतकं महत्वाचं का मानलं जाते? तर याच्या मागे मुख्य कारण म्हणजे यासाठी दिलेले दान. एखाद्या महत्वाच्या वास्तुसाठीच हे दान दिले जायचे त्यामुळे ज्याठिकाणी गद्धेगळ सापडतो ते ठिकाण पूर्वीच्या ठिकाणी महत्वाचे असले पाहिजे असा निष्कर्ष काढता येतो. बर्याच वेळेला दिलेल्या छोट्या दानाचा उल्लेख हा शिलालेखांच्यामधून होतो परंतु जर दिलेल्या मोठ्या दानाचा कुणी अव्हेर केला तर त्यासाठी गद्धेगळ उभारला जाते. महाराष्ट्रात अश्या गद्धेगळ फार कमी ठिकाणी पाहायला मिळतात. अक्षीचा प्रसिद्ध गद्धेगळ, संगमेश्वर तालुक्यातील कर्णेश्वर मंदिरामधला गद्धेगळ किंवा रतनवाडीमधील गद्धेगळ हे दर्शवून देतात की याठिकाणांना पूर्वी फार महत्व होते.
बऱ्याच वेळेला असे होते की एखाद्या ठिकाणची वास्तू ही उध्वस्त झालेली असते आणि जर समजा त्या ठिकाणच्या आसपास गद्धेगळ सापडला तर आपण कमीतकमी असा निष्कर्ष काढू शकतो की याठिकाणी एखादे भव्य मंदीर किंवा मोठी वास्तू होती. बरेच जण बोलताना ती गद्धेगळ किंवा ती विरगळ असा उल्लेख करतात तर असा उल्लेख चुकीचा आहे. विरगळ म्हणजे ‘विराचा दगड’ किंवा गद्धेगळ- ‘गाढवाचा दगड’ हे पुल्लिंगी शब्द आहेत. म्हणून तो विरगळ किंवा तो गद्धेगळ हे बोलणं जास्त योग्य. बऱ्याच गद्धेगळ वर शिल्पं कोरलेली आहेत पण काही गद्धेगळ हे शिल्पं आणि लेख यांचे मिश्रण आहे. भिवंडीजवळ चौथर पाडा येथे असलेला गद्धेगळ आणि आक्षीचा गद्धेगळ ही प्रमुख उदाहरणे. आक्षी येथील गद्धेगळावर तर साल सुद्धा कोरलेले आहे ते म्हणजे शके ९३४. म्हणजेच आत्ताच्या काळातील इसवी सन १०१२. या गद्धेगळ ला आत्ता १००४ वर्षे पूर्ण झाली आहेत. आणि हा गद्धेगळ जवळपास १००४ वर्ष उन, वारा पाऊस यांना तोंड देत सक्षमपणे उभा आहे आणि पुढे सुद्धा राहिल यात वाद नाही.
सध्याच्या काळात मात्र यांना कुणी वाली नाही. इतिहासाचा ठेवा हा नेहमीप्रमाणे काळाच्या ओघात नाहीसा होणारे. याची जपणूक व्हायला हवी. सरकारी पातळीवर किंवा तुम्हा-आम्हा प्रवाश्यांना तर तळमळ हवीच पण स्थानिकांमध्ये सुद्धा या ठेव्याची माहिती देणं महत्वाचे आहे. बरेच वेळा गावकरी भोळ्या मनाने या दगडांना शेंदूर फसतात किंवा त्यावरच्या आकृती खरवडून काढतात तर यागोष्टी आधी थांबवायला हव्यात. शेंदूर फसलेल्या अव्स्थेतेतील गद्धेगळचे एक उदाहरण म्हणजे सासवड येथील गद्धेगळ. असे अनेक गद्धेगळ महाराष्ट्रामध्ये आहेत, भले त्यांचे अस्तित्व हे मर्यादित संख्येमध्ये आहे परंतु ते सर्व हुडकून काढून त्यांच्या माहितीचे योग्य रीतीने संकलन करणे हे गरजेची गोष्ट झाली आहे. कदाचित एक लपलेला इतिहास यातून कळू शकेल.
|
सासवड येथे सापडलेली गद्धेगळ!!  रतनवाडी गधेगाळ |
रतनवाडीतील अमूतेश्चर मंदिराच्या आवारात एक गधेगाळसुद्धा आहे. गधेगाळावरील शिलालेख पूर्णपणे झिजल्याने वाचता येत नाही, शिवाय ह्याचे वाचन पूर्वीही कधी झाले नाही मात्र हा लेख अमृतेश्वर मंदिराला दिलेल्या दानाबद्दलचा असावा व ह्या दानाचा लोप करणार्यांविषयी शापवाणी कोरलेली असावी हे निश्चित.
अलिबागजवळ नागावच्या अलीकडेच अक्षी हे गाव. अतिशय सुंदर. गावाच्या सुरुवातीलाच काष्ठमंडप असलेलं सोमेश्वराचं एक सुरेखसं मंदिर आहे. मंदिराच्या बाजूलाच रस्त्याच्या पलीकडे गटारावर एक गधेगाळ आहे. हा शके १२१३ मधला लेख असून रामदेवरायाची राजवट चालू असता त्याचा पादपद्योपजीवि श्री जाईदेव पुत्र इश्वरदेव क्षत्रिय ह्याने अक्षी गावातील कालिकादेवीच्या ब्राह्मणास एक गद्याण दिल्याचा उल्लेख आहे आणि त्याखाली 'तेहाची माएसी गाढौ घोडु..' अशी शापवाणी कोरलेली आहे..
ह्याच गावात मंदिराच्या दुसर्या बाजूस सरकारी कचेरीनजीकच अजून एक गधेगाळ आहे. डॉ. तुळपुळे ह्यांच्या मते तो मराठीतील आद्य शिलालेख. अर्थात हे मत काही संशोधकांना मान्य नाही कारण काल्लोलेख अस्पष्ट आहे. हा शिलाहार केशीदेवाचा लेख असून त्यात पश्चिमसमुद्राधिपती, कोंकणचक्रवर्ती श्री केशिदेवराय राज्य करत असता त्याचा प्रधान भइर्जु सेणुई ह्याने देवीच्या बोडणासाठी नऊ कुवली धान्य मोजून दिले. त्याखाली शापवाणी कोरलेली आहे. हे दोन प्राचीन लेख आज पूर्ण दुर्लक्षित अवस्थेत आहेत.

यादव रामदेवरायाचा अक्षी गधेगाळ
शिलाहार केशिदेवाचा अक्षी गधेगाळ
महाराष्ट्रातील काही गधेगाळ पुढीलप्रमाणे
१. कदंब भरूडदेव याचा सावरगाव लेख (इ.स. ११६४)
२. शिलाहार अपरादित्य याचा लोनाड लेख (मराठी)
३. शिलाहार अपरादित्य(द्वि.) याचा परळ लेख.
४. शिलाहार सोमेश्वरदेव याचा चांजे लेख( या लेखात शब्दरूपात गधेगाळ नसून शिल्परूपात आहे)
५. यादव रामचंद्र देव याचा पूर शिलालेख (इ.स. १२८५ फक्त शिल्परूपात)
६. यादव रामचंद्र देव याचा वेळापूर शिलालेख (इ.स. १२८५)
७. वेळूस शिलालेख (इ.स. १४०२)
९. शिलाहार राजा अनंतदेवाचा दिवेआगर शिलालेख(इ .स. १२५४)
अशी हीन दर्जाची शापवाणी कोरीव लेखांमध्ये कशी काय वापरली गेली याचा काहीच अंदाज येत नाही. यादव-शिलाहारांच्या लेखांतच आणि मुख्यत्वे मराठी भाषेतच ती आढळली आहेत आणि त्यातही गधेगाळीबरोबर बरेच वेळा शिवलिंगही असल्याने शैवपंथियांमध्येच अशा प्रकारची शिल्पे जास्त प्रचलित असावीत.
५. रतनवाडीतील हत्तीगाळ
रतनवाडीतील अमृतेश्वर मंदिराच्या पुढ्यातील गधेगाळ.

दुर्दैवाने ह्यावरचा शिलालेख पूर्ण झिजून गेला आहे. पण शिवपिंडीवरचा अभिषेक पाहून निश्चितपणे मंदिराच्या काहीतरी व्यवस्थेसंबंधी असावा.
६. अक्षी येथील गधेगाळ(फोटो आंतरजालावरून)
७. पिंपळवंडी गधेगाळ(फोटो शैलेन भंडारे यांजकडून)
श्री.क्षेत्र काशिकेदारेश्वर येथील इतिहासाच्या खुणा :-
काहीवेळा वीरगळ,सतीशिळा आणि गध्देगाळ एकाच ठिकाणी पहायला मिळतात.अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात असलेल्या नागलवाडी या डोंगर पठारावर वसलेल्या गावच्या डोंगरातील एका दरीत श्री.काशिकेदारेश्वर हे भगवान शंकराचे प्राचीन मंदिर आहे. मराठवाड्याच्या सीमेवर असणाऱ्या या परिसराला अत्यंत सुंदर डोंगर दर्याचा परिसर लाभला आहे. येथे श्रावण महिन्यातील तिसर्या सोमवारी यात्रा भरत असते. पूर्वी हे मंदिर हेमाडपंथी स्वरूपाच्या दगडी बांधकामाचे होते असे तेथे पडलेल्या नक्षीकाम केलेल्या दगडी खांबामुळे लक्षात येते. विविध वनस्पतींनी समृद्ध असा हिरवागार निसर्ग, झुळझुळणारे निर्झर, रानफुलांना आलेला बहर अशा वातावरणात येथे येणाऱ्या माणसांचे मन रमते. जवळच दरीतून वाहणारी पाताळगंगा किंवा पितळगंगा नावाची नदी, चक्रधर स्वामींचे एका वडाजवळील स्मृतीस्थळ, महर्षी नागार्जुन यांची प्राचीन रसशाळा असल्याचे काही दाखलेही यापूर्वी संशोधकांनी नोंदवलेले आहेत. अशा ऐतिहासिक संदर्भांची संपन्न भूमी असलेला हा परीसर आहे.

मात्र सद्ध्या आधुनिकीकरणाच्या नावाखाली आणि नव्या बांधकामासाठी जुन्या मंदिराच्या सर्व खाणाखुणा पुसण्यात आल्या आहेत.
त्यामुळे या मंदिराच्या रूपाने आणि शिल्पांच्या रूपाने टिकून असलेल्या खाणाखुणा आता शेवटच्या घटका मोजत आहेत. जुने मंदीर पाडून नवे कॉक्रीटचे मंदीर बांधण्यात आले आणि मंदिरा भोवतीचा भूभाग सपाट करण्यात आल्यामुळे दगडांच्या रूपातील बोलका इतिहास पुसला गेला आहे.
जून्या मंदिराचे कोरीव नक्षीकाम केलेले दगडी स्तंभ मंदिराच्या एका बाजूला दरीच्या तोंडाशी पडलेले आहेत. मुख्य मंदिराच्या मागे एक पाण्याचा कुंड आहे. त्याच्या लगतच पूर्वी मंदिराच्या आसपास असलेल्या मुर्ती ठेवलेल्या आहेत.
मात्र त्या खुल्या जागेत आहेत. ऊन, वारा, पाऊस याने त्यांची आधीच झीज झालेली आहे. या शिल्पांमध्ये तीन सतीच्या शिळा आहेत, चार वीरगळ शिळा आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक गध्देगाळ देखील आहे.
अनेक वर्षांपासून योग्य प्रकारे जतन न केल्याने दान शिळेवरील मजकूर झिजून गेलेला असून फक्त चंद्र, सूर्य आणि त्याखालील मैथुन शिल्प एवढाच भाग उरला आहे. खरे तर इतिहाच्या या साधनांद्वारे संशोधन झाल्यास एक विस्मृतीत गेलेला इतिहास समोर येऊ शकतो. नदी, पाण्याचे कुंड आदीसंबंधी काही लोककथा, दंतकथा प्रचलित होत्या. संपूर्ण भागाचे कॉक्रीटच्या बांधकामात रूपांतर होत असतांना आपण प्राचीन इतिहासाच्या पायखुणा पुसुन तर टाकत नाहीत ना?
याचा विचार अज्ञानापोटी स्थानिक लोक करत नसल्याचे दिसते. प्राचीन मंदिरांचे नूतनीकरण करतांना पुरातत्व विभागाची परवानगी घेणे अनिवार्य केल्यास इतिहासाच्या खाणाखुणा पुण्यापासून वाचू शकतील.
मराठी शिलालेखांतील शापवचने :-सर्वसाधारणपणे दिलेल्या दानाला जो कोणी बाधा आणेल अथवा जो कोणी हे दान मोडीला अशा व्यक्तीस अनुलक्षून गधेगाळींतील शापवचने असतात.
तेहाची माय गाढव ... हे तर बहुतेकांना माहित आहेच.
इतर काही शापवचने पुढीलप्रमाणे
१.
स्वदत्तां परदत्तां वा यो हरेत वसुंधरां |
षष्टिं वर्षसहस्राणि विष्टायां जायते कृमि: ||
हे शापवचन बर्याच शिलालेखांत आढळते.
जो स्वकीय अथवा परकीय या पृथ्वीचे (दानाचे) हरण करेल तो ६००० वर्षे विष्ठेमधला कृमी होऊन राहील.
२. ससन करुनु ग्रामु दिधला हे सासन लोपि तेआसि गोहत्या ब्रम्ह-
हत्या बाळहत्या पडे तेयाचीऐ माऐसि गाडौ घोडु |
विजयनगरचा संगम हरिहर ह्याचा हा लेख गोव्यातील वेळूस गावातला. (इ.स. १४०२)
हे शासन जो मोडील त्यास गोहत्या, ब्रह्महत्या व बालहत्या ही पातके लागून त्याच्या आईस गाढव व घोडा.
३. शिलाहार अपरादित्य (द्वितीय) याचा लोनाड शिलालेख (इ.स. ११८४)
इये शासने लिखिता भाषा जो लोपि अथवा लोपावि यो गर्दभनाथु गर्दभु
तेहाचिए मांए सूर्यपर्वे गर्दभु झवे इति विचार्य तथा यस्य यस्य यदा भूमिस्तस्य
ह्या शासनाचा जो लोप करील तो गाढवांचा नाथ गाढव व त्याचे आईस सूर्यपर्वात गाढव लागेल याचा विचार करून त्याप्रमाणे करावे.
४. पंढरपूरचा विठ्ठलदेवाचा शिलालेख (शके ११११)
कवणु अतिसो देई तेआ-
सी वीठलाची आण
ए काज जो फेडि
तो धात्रुद्रोहि
शके ११११ रोजी सौम्य संवत्सरी (भिल्लम यादवाच्या) काळात महाजन, देवभक्त परिवार, मुद्रहस्त विठ्ठलदेवनायक या सर्वांनी हे लहान असे देऊळ बांधले.
(या देवळास) कोणी अतिसो (पीडा/ उपद्रव) करील त्यास विठ्ठलाची शपथ आहे. हे कार्य जो नष्ट करील तो धातृद्रोही होय.
५. .उदयादित्याचा आंबेजोगाई येथील शिलालेख. (शके १०६६)
जो फेडी लोपी तेआ योगिनींचा वज्रदंडू पडे
हे शासन जो कोणी नष्ट करेल अथवा लुप्त करेल त्यावर योगिनींचा वज्रदंड पडेल.
६. विजयनगरचा संगम देवराय याचा गोवे- वेळूस शिलालेख (शके १४०८)
स्र्हीरवळनाथा श्रीमाहादेवासी १० नैवेद्या चंद्रूसूर्यू तपे
सासन लोपी तेआअ गोहते ब्रम्हते बआळते पडे
तेआची माए गर्धभे...
श्रीरवळनाथ महादेवाच्या १० नैवेद्यांसाठी हे दान दिले आहे. हे शासन जो ल्पील त्यास गोहत्या, ब्रह्महत्या व बालह्त्या ही पातके लागतील व त्याच्या आईस...
७. जैत्र सामंत याचा जालगाव ताम्रपट (शके ११२४)
हे ठाकली भाषा चंद्रार्कपर्य गधभ चांडालु
ही भाषा (हे दानपत्र) चंद्र व सूर्य आहेत तो पर्यंत सिद्ध आहे. ती जो कोणी फेडील तो श्वान, गर्दभ व चांडाळ होय.
८. सिंघण यादवाचा फुलंब्री शिलालेख (शके ११६४)
जो मढाचे अयगत स्वोधाराए घेयवे ए
मढु फेडील यचा दोषु ब्रम्हणभोजना फेडील यचा दोषुकरि
ह्या मठाचे (देवळाचे) उत्पन्न स्वतःकडे घेणे हे ब्राह्मणभोजनाच विरोध करण्यासारखे असून असे करणारा तसा दोषकरी होईल.
९. .विजयनगरचा संगम देवराय याच्या वेळचा बांदोडे शिलालेख (शके १३३५)
पाळावा केला हा धर्मु जो मोडि
तेणे वाराण
सि श्री विस्वेस्वरा सनिधि सूर्यग्रहणिं आपुला मातापिता गाए वदिल्या
पापासि जाए |
हा धर्म जो मोडील त्याने काशी येथे श्री विश्वेश्वरासन्निध सूर्यग्रहणाच्या वेळेस आपले आईबाप व गाई वधिल्या असे समजावे. त्यास हे पाप लागेल.
१०. यादव रामचंद्रदेवाचा वेळापूर शिलालेख (शके १२२२)
पाली तो स्वर्गा
जाए न पाली तो नरका जाए
हे दान जो पालन करील तो स्वर्गात जाईल, न करील तो नरकात जाईल.
११. पंढरपूर येथील विठ्ठलदेवाचा शिलालेख ( शके १२३३)
हा धर्मु जो नाणि लोपि तो मळकु पाली ते-
आचा धर्मु | परिवंडे मराठे | सेवकु
विठलदेवा खेत्रपति सदैवु
धाधर्म जो नष्ट करील तो मळकु (पापी) व जो पाळील याचे मराठी सेवक विठ्ठलदेवाचे सदैव क्षेत्रपती होत.
१२. शिलाहार अपरादित्य याचा परळ शिलालेख ( शके ११०८)
अथ तु जो कोणु हुवि ए शासन लो-
पि तेया श्री वैद्यनाथ देवाची भाल सकुटुंबिआ पडे||
तेहाचीए माय गाढवें....
परंतु हे शासन जो कोणी नष्ट करील त्याच्यावर वैद्यनाथाच्या त्रिशुळाचा फाळ त्याच्या सर्व कुटुंबियांसुद्धा पडेल व त्याच्या आईस गाढव...
१३. दाभोळ येथील जामा मशिदीतला मराठी शिलालेख
यासि कोणी हिंदु वा मुसलमान इरे वा इस्ति करिल
त्यावरिश त्याचे मएअवरि गडदा असे जाणिजे
जो हिंदु अथवा मुसलमान ह्या स्थानाचा अवमान करील त्याचे मायेस गाढव.. असे समजा.
समाधी :-
किल्ल्यांवर आणि गावांमध्ये आपल्याला अनेक समाध्या पाहायला मिळतात. सुधागड किल्ल्यावर भोराई देवी मंदिराच्या बाजूला असलेल्या माळावर अनेक समाध्या विखुरलेल्या पाहायला मिळतात. समाध्या साधारणपणे आयताकृती किंवा चौरस असतात.
ज्याची समाधी आहे त्याच्या हुद्द्याप्रमाणे ऐपती प्रमाणे त्यावर नक्षीकाम केलेले असते किंवा स्थानिक दगडापेक्षा वेगळा दगड वापरलेला असतो. समाधीच्यावर पावले किंवा शिवलिंग कोरलेले असते .राजघराणातल्या व्यक्तींच्या समाध्या सहसा एकाच ठिकाणी कलात्मक पध्दतीने बांधलेल्या पाहायला मिळतात.

इस्लामी स्थापत्य शैलीत खाशांच्या कबरींवर घुमट बांधले जात. धुळे जिल्ह्यातील थाळनेर गावात फारुकी घराण्यातील राजांच्या व महत्त्वाच्या व्यक्तींच्या कबरी आहेत. त्या कबरीवर बांधलेले घुमट, कोरलेले शिलालेख पाहायला मिळतात. या घुमटावरुनच राजस्थानी शैलीतील छत्रीचा उगम झाला. महाराष्ट्रातही छत्री समाध्यांसाठी स्विकारली गेली. त्यामुळे पंधराव्या शतकानंतर बांधलेल्या समाध्यांवर याची छाप दिसते. फ़लटण येथील निंबाळकरांच्या समाध्या, शेगाव जवळच्या बाळापूर गावात जसवंतसिंहाने बांधलेली समाधी यावर राजस्थानी शैलीतील प्रभाव दिसून येतो
कबरीवर कोरलेले बाणासारखे शिल्प. अश्या कबरी साधारण निजामशाही कालखंडात असतात.
मौर्य सम्राट अशोकच्या काळात इसवीसन पूर्व तिसर्या शतकात शिलालेख कोरण्यास सुरुवात झाली. आजमितीला महाराष्ट्रात लेण्यामध्ये, किल्ल्यात, मंदिरात, तोफ़ांवर संस्कृत, मराठी, उर्दु, फारसी, पोर्तुगीज, इंग्रजी भाषेतील तसेच ब्राम्ही, देवनागरी इत्यादी लिपीतील शिलालेख पाहायला मिळतात.
वीरगळ , सतीशिळा , गध्देगाळ , गायवासरु दगड (धेनुगळ) हे काही अपवाद वगळले तर मुकं दगड आहेत. कारण त्यावर कुठलेही लिखाण नसल्यामुळे ते कुठल्या काळातले आहेत, कशा बद्दलचे आहेत हे कळत नाही . शिलालेखामुळे ही उणीव भरुन निघाली आणि दगड बोलके झाले.
थडी:-
वीरगळ, सतीगळ, गधेगाळ नक्कीच पूर्वीचे आहेत. ज्ञानेश्वरांच्या काळी मात्र ह्या तिघांचीही निर्मिती व्हायची. मुसलमानी अमदानीत गधेगाळ बंदच झाले,वीरगळांची जागा थड्यांनी घेतली. सतीशिळा मात्र पेशवेकाळातही घडवल्या जात होत्या. मुसलमान काळात वीरगळांवर शिल्पे कोरायची प्रथा बंद झाली. त्याऐवजी चौकोनी उभट शिळेवर वरच्या बाजूस मध्यभागी एखादा उंचवटा किंवा वरच्या चारही कोपर्यांवर उभट उंचवटे कोरण्यात येऊ लागले. आणि उरलेल्या शिळेवर काहीच कोरण्यात येत नसे.
शिवकाळात व त्यानंतर बरीच थडी कोरली गेली आहेत. सह्याद्रीतल्या बहुतेक किल्ल्यांवर एखादं तरी थडं दिसतंच दिसतं.
कुंजरगडाच्या पायथ्याला असलेल्या विहीर गावातील एका झाडाखाली झुडूपांमध्ये दडलेले या थडी. यावर प्राणी/पक्षी कोरलेल आहेत.
कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या बारी गावातील एक वीरगळ
माहुली गडावरच्या थडी

अजोबा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या थडी
संदर्भः
१. प्राचीन मराठी कोरीव लेख’ व ‘मराठी वाङ्मयाचा इतिहास’ संपादक : डॉ. शं. गो. तुळपुळे
२. महाराष्ट्राच्या इतिहासाचे साक्षीदार -प्रा. कल्पना रायरीकर, डॉ. मंजिरी भालेराव.
३) Memorial Stones of India by Mr. Gunther आणि महाराष्ट्रातील वीरगळ- श्री. सदाशिव टेटविलकर
४) Mokashi Rupali (2015) - Gaddhegal Stones: An Analysis of Imprecations and Engraved Illustrations: International Journal of Innovative Research and Development.
५) Mirashi, V. V. (1977) - Inscriptions of the Silaharas (Corpus Inscriptionum Indicarum Vol VI). New Delhi: Archaeological Survey of India.
६) http://www.shantanuparanjape.com/ हा ब्लॉग
७ ) श्री. सागर बोरकर यांचे आंतरजालावरचे लिखाण
८) https://samantfort.blogspot.com हा श्री. अमित सामंत यांचा ब्लॉग
९ ) क्षेत्र काशिकेदारेश्वर याची माहिती साभार कैलास दौंड, अहमदनगर, महाराष्ट्र.
कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगावच्या विठ्ठल मंदिरानजीक आढळलेला वीरगळ शिलालेख.
आगळगाव येथे विठ्ठल मंदिराजवळ दोन वीरगळ आढळले. त्यांची बारकाईने पाहणी केली असता, त्यापकी एकावर हळेकन्नड लिपीत लेख आढळून आला.| April 17, 2019 02:44 am
दिगंबर शिंदेसांगलीच्या चालुक्यकालीन इतिहासावर प्रकाशगेल्या आठवडय़ात विटय़ाजवळील भाळवणी येथे चालुक्य राजवटीत जैन मंदिराला दान दिल्याचा शिलालेख उजेडात आल्यानंतर कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगाव येथे याच कालखंडातील धारातीर्थी पडलेल्या वीर योद्धय़ाच्या स्मरणार्थ कोरण्यात आलेला वीरगळ लेख प्रकाशात आला आहे. मिरज इतिहास संशोधन मंडळाने हे ऐतिहासिक संदर्भ शोधल्यामुळे सांगली परिसर सुमारे साडेनऊशे वर्षांपूर्वी चालुक्य राजवटीत महत्त्वाचा भाग होता हे स्पष्ट होत आहे.चालुक्य राजा दुसरा सोमेश्वर उर्फ भ्वनेकमल्ल (इ.स. १०६८ ते १०७६) याच्या कारकिर्दीत झालेल्या एका लढाईत आगळगावातील एका योद्धय़ाला वीरमरण आले होते. त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ वीरगळ तयार करून त्याच्यावर हा लेख कोरून ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यतील हा पहिला लेखयुक्त वीरगळ असून, महाराष्ट्रामध्ये आढळलेल्या वीरगळ लेखात तो सर्वात जुना असल्याचेही समोर आले आहे.आगळगाव येथे विठ्ठल मंदिराजवळ दोन वीरगळ आढळले. त्यांची बारकाईने पाहणी केली असता, त्यापकी एकावर हळेकन्नड लिपीत लेख आढळून आला. हा लेखयुक्त वीरगळ सुमारे पाच फूट उंचीचा आहे. खालील भागात एक वीर ढाल आणि तलवार घेऊन एका समूहाशी लढाई करताना दाखविला आहे. वरील कलशाकृती भागावर आणि मधील टप्प्याच्या मोकळ्या जागेवर हळेकन्नड लिपीत लेख कोरला आहे. वीरगळ अभ्यासासाठी बाळासाहेब निपाणे-पाटील (मिरज), सरपंच व्यंकटराव पाटील, तुकाराम गुरव, सागर शेटे आणि नबीलाल तांबोळी यांचे सहकार्य लाभले. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक या वीरगळावर अधिक संशोधन करीत असून, लवकरच यासंदर्भातील संशोधन लेख संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. या लेखाच्या संशोधनाने सांगली जिल्ह्यच्या प्राचीन इतिहासात मोठी भर पडली आहे. हा वीरगळ लेख वैविध्यपूर्ण आकारात शिल्पांकित केला आहे. त्यावर खालच्या टप्प्यात संबंधित वीर पुरुषाने केलेल्या लढाईचे शिल्प असून त्यानंतरच्या टप्प्यात वीर पुरुषाला अप्सरा घेऊन जात आहेत, असे शिल्प आहे. अगदी वरील भागात हा वीर शिविलगाची पूजा करताना दाखविलेला आहे. मिरज इतिहास संशोधक मंडळाचे प्रा. गौतम काटकर व मानसिंगराव कुमठेकर यांनी या वीरगळ लेखाबाबतची माहिती दिली.खार्डी गावात शिलाहारकालीन मंदिराचे अस्तित्व उदयास
पालघर तालुक्यातील दातिवरे गावाजवळील खार्डी येथे शिलाहारकालीन गधेगळ शिलेचे अस्तित्व प्रकाशित झाले असून याच गावांमध्ये १५०० वर्षे जुने शिलाहारकालीन मंदिराचे अस्तित्व असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे खार्डी गावाच्या शिलाहारकालीन पुराव्यांनी इतिहासाला नव्याने साद घातली आहे.
‘किल्ले वसई मोहीम परिवारा’ अंतर्गत गुढीपाडव्याच्या प्रसंगी खार्डी गावातील वाघ देवाची डोंगरी मंदिराच्या मागे, मालेपाडा मानपाडा यांच्या हद्दीवर शिलाहारकालीन गद्धेगाळ शिळेचे ऐतिहासिक महत्त्व महाराष्ट्रभर प्रसिद्ध व प्रकाशित करण्यात आले. खर्डी येथील दुर्गप्रेमी योगेश विश्वनाथ भोईर यांनी या शिलालेखाची माहिती डॉ. श्रीदत्त राऊत यांना दिल्यानंतर २३ फेब्रुवारी रोजी या शिळेचा प्रथम वेध घेण्यात आला होता.
दक्षिण कोकणातील शिलाहार सत्ता उत्तरेस चौल साम्राज्यापर्यंत पसरलेली होती आणि सुमारे सन ७६५ ते १०२४ पर्यंत जवळजवळ अडीचशे वर्ष राज्य करीत होती. उत्तर कोकणात शिलाहारांचा कालावधी इ.स. ८०० ते १२६५ असा सुमारे ४०० वर्षांचा मानण्यात येतो. वसई किरवली व पालघर तालुक्यातील खार्डी येथे मिळालेल्या अवशेषावरून हे साम्राज्य १२७१ पर्यंत असल्याचे पुरावे प्राप्त झाले आहेत. खार्डी गावातील उपलब्ध झालेला शिलालेख ११ व १२ व्या शतकातील इतिहासाची मूक पाने बोलकी करणार आहे.
या गावातील तलावामध्ये काही वर्षांपूर्वी भग्नावस्थेमधील काही मूत्र्या सापडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर अधिक अभ्यास केल्यानंतर सुमारे पंधराशे वर्षे जुना असणाऱ्या दोन हजारहून अधिक विटा सापडले असून शिलाहार मंदिराचे अस्तित्व उदयास आले. या मंदिराची स्थाननिश्चिती झाली असल्याचे डॉ. श्रीदत्त राऊत यांनी लोकसत्तेला सांगितले.
११ व १२ व्या शतकातील इतिहास बोलका
ऐतिहासिक संदर्भाचा मागोवा घेताना दक्षिण कोकणातील शिलाहार सत्ता उत्तरेस चौल साम्राज्यापर्यंत पसरलेली होती आणि सुमारे सन ७६५ ते १०२४ पर्यंत जवळजवळ अडीचशे वर्ष राज्य करीत होती. ठाण्याच्या शिलाहारांच्या राज्यात उत्तर कोकण, सुरत जिल्ह््याचा दक्षिण भाग व ठाणे, अलिबाग, रत्नागिरी हे तीन जिल्हे यांचा समावेश होतो. केशीदेव, अपरादित्य, हरिपालदेव, मल्लीकाजुर्न, अपरादित्य द्वितीय, सोमेश्वर या ठाणे शिलाहार राजांच्या राजवटीचे उल्लेख कोकणातील आगाशी, भिवंडी इत्यादी ठिकाणी सापडलेल्या शिलालेखांतून मिळतो. उत्तर कोकणात शिलाहारांचे राज्य ४०० वर्षे होते. उत्तर कोकणातील शिलाहारांचा कालावधी इ.स ८०० ते १२६५ असा मानण्यात येतो. यात प्रथम कपर्दी, पुलशक्तीपासून ते तृतीय अनंतदेव, सोमेश्वर असा समावेश होतो. शिलाहारांची कोकणातील सत्ता महादेव यादवाने सोमेश्वर शिलाहारांचा पराभव करून संपुष्टात आणली. किरवली येथील शिलालेख लक्षात घेता नवीन संशोधनानुसार शिलाहार राजा तिसरा अनंतदेव शके ११७० असा कालखंड पुढे जातो. या सर्व घडामोडींचा साक्षीदार असणाऱ्या वास्तू व अवशेष पालघर प्रांतांत विखुरलेल्या आहेत.
* या शिलालेखाचा पुरातत्वीय पद्धतीने सलग २३ ते २७ फेब्रुवारी दरम्यान विविध ठसे घेण्यात आलेले असून त्याचे संशोधनपर वाचन पूर्ण करण्यात आलेले आहे. या शिलालेखाचा तपशील गॅझेटियर विभाग, विविध लेखमाला शासकीय व संशोधन त्रैमासिक माध्यमातून अभ्यासकांपर्यंत प्रसिद्ध होण्यासाठी सादर करण्यात आला आहे. गेल्या कित्येक वर्षात उन्ह, पाऊस, वारा या नैसर्गिक प्रभावात शेवाळ, माती, चिखल साचून हे शिलालेख पूर्णपणे दुर्लक्षित होऊन या शिळा नामशेष होण्याच्या मार्गावर होत्या.
शिलालेखाचा तपशील
८१ सेंमी उंची व ३७ सेंमी रुंदी, एकूण १० ओळी, पहिली ओळ अपूर्ण, पुढील ४ ओळी त्यातील काही मजकूर अक्षरे वाचनीय, गद्धेगाळ शिल्प स्पष्ट ३० सेंमी रुंदी २.५मीटर उंची चौकोनी, चंद्र सूर्य प्रतिमा स्पष्ट इत्यादी बाबींचा तपशील प्रथमच सविस्तर पद्धतीने संकलित करण्यात आला आहे.