Saturday, December 10, 2022

भैरवगड(कोथळे)

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असणारा हरिश्चंद्रगड हा दुर्ग भटक्यांचा आवडता किल्ला. या हरिश्चंद्रगडाच्या प्रभावळीत या किल्ल्याकडे येणाऱ्या विविध मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी प्राचीन काळी कुंजरगड (कोंबडगड), भैरवगड (कोथळे), कलाडगड, भैरवगड (शिरपुंजे) हे किल्ले बांधले गेले. या चार गिरिदुर्गापैकी नगर जिल्ह्यातील कोथळे गावातून हरीश्चंद्रगडावर जाणाऱ्या टोलारखिंड या मुख्य मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी भैरोबागड उर्फ भैरवगड हा टेहळणीचा किल्ला बांधला गेला. गडाची एकुण रचना पहाता हा किल्ला हरिश्चंद्रगडाला समकालीन असावा. माळशेज घाटापासून सह्याद्रीची एक उपरांग पूर्वेकडे धावते. ही डोंगररांग बालाघाट म्हणून ओळखली जाते. हरिश्चंद्रगडापासूनसुरू होणारी ही रांग माळशेज घाट परिसरात पुणे व अहमदनगर जिल्ह्यांची सीमा विभागते. या रांगेमध्ये हरिश्चंद्रगडाच्या पूर्वेला भैरोबागड उर्फ भैरवगड किल्ला आहे. 
     पुणे जिल्ह्यातील खिरेश्वर आणि नगर जिल्ह्यातील कोथळे गावातून टोलारखिंडीत जाण्याचा मार्ग आहे. या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी भैरवगडाची निर्मिती करण्यात आली होती. गडाचा आकार आणि रचना पाहाता या किल्ल्याची निर्मिती हरिश्चंद्रगडाच्या काळातच झाली असावी. तसाही भैरवगड हा दुय्यम गड असल्यामुळे कुंजरगड आणि हरिश्चंद्रगडाबरोबर याचा ताबा सताधिश घेत असावेत.


   कोथळे गावाच्या पश्चिमेस असणाऱ्या डोंगररांगेत पाच डोंगर असुन यातील पहिला उंच पिंडीच्या आकाराचा डोंगर कोळथा, दुसरा व तिसरा डोंगर नाव नसलेले, चौथा डोंगर थोडी सपाटी असलेला भैरोबागड व पाचवा उंच डोंगर गाढवाचा डोंगर म्हणुन ओळखला जातो. भैरवगड म्हणजे देवाचा रथ आणि त्याच्या पुढचा डोंगर म्हणजे रथ ओढणार गाढव अशी स्थानिक लोकाची कल्पना आहे. भैरवगडावरील भैरोबा हे स्थानिक लोकांचे दैवत असुन येथे हा गड भैरोबागड म्हणूनच ओळखला जातो. अशी शिखरांची सुंदर माळ कोळथे गावातून दिसते.



 दरवर्षी चैत्रात भैरोबाची यात्रा भरते. भैरोबा दुर्ग कळसुबाई - हरिश्चंद्र अभयारण्याच्या कक्षेत येत असल्याने आणि हा भैरोबा पंचक्रोशीचं श्रद्धास्थान असल्याने वनखात्याने गडावर आवश्यक त्या सगळ्याच सोयी केल्या आहेत. 
मुंबईहुन दोन मार्गाने कोळथे या भैरवगडाच्या पायथ्याच्या गावी जाता येते.
१) मुंबई - कल्याण - मुरबाड - माळशेज घाट मार्गे ओतुर गाठावे (अंतर १५९ किमी). ओतुर एसटी स्टॅंडच्या बाजूने एक रस्ता बामणवाडा - कोतुळ (अंतर ३० किमी) - विहिर (कुंजरगडाच्या पायथ्याचे गाव) मार्गे कोळथे (अंतर २५ किमी) या भैरवगडाच्या पायथ्याच्या गावात पोहोचतो. ( एकुण अंतर २१४ किमी )
२) मुंबई - इगतपुरी - घोटी - भंडारदरा - मार्गे राजुर ( अंतर १५५ किमी ) गाठावे. राजुरहुन कोतुळला जाणार्‍या रस्त्यावर राजुरपासुन ४१ किमीवर कोथळे हे भैरवगडाच्या पायथ्याचे गाव आहे.एकुण अंतर १९६ किमी. अकोलेहून पाचनईला संध्याकाळी ६ वा. मुक्कामी बस आहे.कोथळेसाठी सकाळी १०.३० व संध्याकाळी ५,३० ला मुक्कामी बस आहे. अर्थात बसची खात्री नाही, तसेच या मार्गावर खाजगी जीपही तुरळक असतात.त्यामुळे या परिसरातील भटकंतीला स्वतःच्या वहानाशिवाय पर्याय नाही.  मुंबईहुन माळशेज घाटमार्गे ओतूर-बामणवाडा- कोतुळ- विहीर किंवा मुंबई-घोटी– भंडारदरामार्गे राजूर फाटा या मार्गाने कोथळे गावात जाता येते. 
३) पुण्यावरुन या परिसरात जायचे झाल्यास दोन पर्याय आहेत. एकतर पुणे-नाशिक मार्गावरील आळे फाटा गाठून तिथून ओतुर गाठावे (अंतर  किमी). ओतुर एसटी स्टॅंडच्या बाजूने एक रस्ता बामणवाडा - कोतुळ (अंतर ३० किमी) - विहिर (कुंजरगडाच्या पायथ्याचे गाव) मार्गे कोळथे (अंतर २५ किमी) या भैरवगडाच्या पायथ्याच्या गावात पोहोचता येईल. 
४) किंवा आळेफाट्यावरुन खिरेश्वर या हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याच्या गावी जाउन हरिश्चंद्रगडावर चढणार्या वाटेने टोलार खिंडीत जाउन तिथून पलिकडच्या उतरणार्या वाटेने कोथळे गाव गाठावे.कोथळे मुक्काम करायची वेळ आल्यास गावातील मंदिरात १० जणांची राहाण्याची सोय होते. किंवा १० किमी वरील पाचनई गावात राहाण्याची व्यवस्था आहे .जेवणाची सोय मात्र स्वत: करावी लागेल किंवा १० किमी वरील पाचनई गावात जेवणाची सोय होते.


 कोतुळ गावातून कोळथे गावाकडे जाताना गावाच्या अर्धा किमी अलिकडे (राजुरच्या बाजुने येताना कोळथे गावाच्या पुढे ) एक कच्चा रस्ता टोलार खिंडीकडे जातो. इथे हरिश्चंद्रगड कळसुबाई अभयारण्य असा मोठा फलक लावलेला आहे. तसच टोलारखिंडीकडे असा बाण दाखवलेला फलकही बसवलेला आहे. 

कोथळे गावातून भैरोबा दुर्गावर जाणारा रस्ता 

कोथळे गावातून भैरोबा दुर्गावर जाणारा रस्ता 
या रस्त्याने २ मिनिटे चालल्यावर डाव्या बाजुला एक पायवाट शेतांकडे जाते. या रस्त्याने थोडे पुढे गेल्यावर डाव्या बाजुला वनखात्याने बांधलेला सिमेंटचा निवारा आहे.या वाटेने आत वळल्यावर डाव्या बाजुला झुडुपाखाली "गवळ देवाची" मुर्ती आहे. ती पाहुन मळलेल्या वाटेने शेतां मधुन जात पुढे गेल्यावर वाट जंगलात शिरते. भैरोबा दुर्ग हा हरिश्चंद्रगड आणि कळसूबाई अभयारण्यात येत असल्याची साक्ष जागोजागी पटावी अशी गडद झाडी गडाच्या वाटेवर आहे.
   या वाटेने जंगलात शिरल्यावर उध्वस्त पायऱ्याचा चढ चालु होतो. पायवाटेच्या सुरुवातीपासून ते अगदी गडमाथ्यापर्यंत दाट जंगल आहे. साधारण अर्ध्या तासात आपण घळीत असलेल्या गडाच्या कातळकोरीव पायऱ्यापाशी पोहोचतो. 
 या पायर्‍यांच्या पुढे डाव्या बाजूला कातळकड्या खाली एक पाण्याच टाक आहे. ते पाहुन परत पायवाटेवर येऊन एक वळसा मारल्यावर वनखात्याने या पायऱ्यावर एक लहानशी साधारण दहा पायऱ्या असणारी शिडी बसविली आहे.

गडावर जाणाऱ्या खोदीव पायऱ्या 

वाटेतील पाण्याचे टाके  

इथून गडमाथा गाठण्यासाठी कातळभिंतीत खोदलेल्या पावट्या आणि जुनी शिडी दिसते. आपण नव्या डुगडुगत्या शिडीवरुन गडमाथ्यावर पोहोचतो. हि शिडी चढुन वर गेल्यावर पायवाटेच्या डाव्या बाजुला कातळकड्याखाली एक पाण्याच टाक आहे. यातील पाणी पिण्यायोग्य आहे.


ते पाहुन पायऱ्याच्या वाटेने ५ मिनिट चढुन गेल्यावर कातळात खोदलेल दुसरे टाके दिसते. त्याच्या बाजुला एक तुटलेले टाके असुन वनविभागाने त्याची रसिकता सिद्ध करत इथेच दोन लोखंडी बाकं बसवली आहेत.
 ही जागा म्हणजे भैरोबा दुर्गावरची सर्वात सुंदर जागा म्हणावी लागेल. त्याच्या कातळकड्याच्या थंडगार सावलीत बसून समोरच्या सह्यरांगांचं असीम दृश्य न्याहाळतानाचा आनंद काही औरच !!




शिडीचा मार्ग उजव्या बाजूला जुनी गंजकी शिडी पडलेली दिसतेय 

या टाक्याच्या पुढे काही बांधीव पायऱ्या असुन पुढे दुसरी मोठी शिडी आहे. साधारण चाळीस फुट उंच असणाऱ्या या शिडीखाली असणाऱ्या कड्यात खोदीव पायऱ्या पहायला मिळतात. हि शिडी चढून थोड वर गेल्यावर एक आडवी छोटी शिडी पार करून आपण गडमाथ्यावर पोहोचतो. भैरवगडावरील भैरोबा हे स्थानिक लोकांचे दैवत आहे. स्थानिक लोक गडावर जाणार्‍या दुसर्‍या शिडी खाली आपली पादत्राणे काढुन अनवाणी पायाने गडमाथ्यावर जातात. 


गडाचा माथा चिंचोळा असुन दक्षिणोत्तर साधारण ३ एकरवर पसरलेला आहे.गडमाथ्याचा विस्तार छोटा आहे.  गडमाथ्यावर प्रवेश केल्यावर उजव्या बाजुला उघड्यावरचं भैरोबाचं चौथरावजा ठाण आहे. त्याच्या बाजुला काही मुर्ती आणि वीरगळ ठेवलेल्या असुन समोर कातळात कोरलेली २ पाण्याची टाक आहेत. या टाक्यांच्या मागे दोन दगडी दिपमाळा आहेत. वनखात्याने कड्यावर धोकादायक ठिकाणी लोखंडी कठडे लावलेले आहेत. त्याव्यतिरिक्त गडावर पाहण्यासारखे असे काही नाही. तरीदेखील गडावर प्रसन्न वाटतं. पावसाळ्यात संपूर्ण गडमाथा टोपली-कारवीने आच्छादलेला असतो. किल्ल्याची ऊंची समुद्रसपाटीपासून ३२५५ फुट आहे.

टोपली-कारवीने आच्छादलेला गडमाथा 

गडाचा प्रवेश मार्ग 

टोपली-कारवीने आच्छादलेला गडमाथा 

भैरोबाचं ठाणं 

दीपमाळ आणि पाण्याची टाकी 






समोर पसरलेला हरिश्चंद्रगड, त्यावरील तारमाती शिखर आणि हरीश्चंद्रगडाची "वेताळधार" स्पष्टपणे दिसते. याशिवाय भैरवगडावरून कुंजरगड उर्फ कोंबडकिल्ला,बाळूबाई डोंगर,कारकाई पर्वत, 









हरिश्चंद्रगड व टोलारखिंड, शिरपुंज्याचा भैरवगड, घनचक्कर डोंगर आणि पाबरगड इतका दूरवरचा प्रदेश नजरेस पडतो. हि सगळी गिरीशिखर निवांत न्याहाळायची आणि जितकी शक्य तितकी ओळखायचा खेळ खेळायचा. 
भैरवाच दर्शन घेउन विरुध्द दिशेला ( दक्षिणेला) चालायला सुरुवात केल्यावर समोर भैरवगडापेक्षा उंच डोंगर दिसतो. त्याला "गाढवाचा डोंगर" म्हणतात. भैरवगड म्हणजे देवाचा रथ आणि त्याच्या पुढचा डोंगर म्हणजे रथ ओढणार गाढव अशी कल्पना करुन स्थानिक लोकानी या डोंगराला गाढव नाव दिलेल आहे.ह्या अचाट कल्पनाशक्तीला मात्र मानाचा मुजरा !! या डोंगराच्या दिशेने जाताना ५ टाक्यांचा एक समुह पाहायला मिळतो. पुढे गाढवाचा डोंगर आणि भैरवगड यांच्या मधिल गडाच्या टोकावर तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात. हे अवशेष पाहुन परत आल्यावर आपली गड प्रदक्षिणा पूर्ण होते. गड पाहायला अर्धा तास लागतो.  गडावर रहाण्याची सोय नाही त्यामुळे गावात मुक्कामाला पर्याय नाही. 
     अर्थात इतक्या आडवळणाच्या गडावर जायचे तर फक्त कोथळेच्या भैरवगडाला भेट देण्याएवजी त्याला जोडून या परिसरातील इतर गिरीदुर्गांना भेट दिली तर ते सोयीचे पडते. यासाठी दोन पर्याय आहेत. एक म्हणजे कोळथेचा भैरवगड पाहुन टोलारखिंड मार्गे ५ ते ६ तासात हरिश्चंद्रगडावर जाता येते.किंवा खाजगी वाहानाने कुंजरगड (कोंबडगड), भैरवगड(कोळथे), कलालगड, भैरवगड(शिरपुंजे) हे चार किल्ले दोन दिवसात पुढील प्रमाणे पाहाता येतात.सकाळी लवकर कुंजरगडाच्या पायथ्याला पोहोचुन कुंजरगड पाहुन घ्यावा. दुपारी कोथळे गावातील मंदिरात जेवण, आराम करुन भैरवगड पाहावा. कुंजरगड - भैरवगड (कोळथे) हे दोन किल्ले एका दिवसात पाहून पाचनईला मुक्कामाला जावे. पाचनईला जेवणाची आणि मुक्कामाची सोय होते. दुसर्‍या दिवशी सकाळी उन तापण्या अगोदर कलालगड करावा. (कलालगड हा कठीण श्रेणीचा किल्ला आहे. दुपारी शिरपुंज्याचा भैरवगड करुन परतीचा प्रवास करावा.
संदर्भ :-
१) अहमदनगर जिल्हा गॅझेटीयर
२) सांगाती सह्याद्रीचा -यंग झिंगारो ट्रेकर्स
३) डोंगरयात्रा -आनंद पाळंदे
४)  शोध शिवछत्रपतींच्या दुर्गांचा - सतिश अक्कलकोट
५) www.trekshitiz.com    हि वेबसाईट
६)  www.durgabharari.in   हि वेबसाईट
७)   https://samant fort.blogspot.com, http://www.onkaroak.com  हे ब्लॉग

 
 
 घालो.




















 
 
 


No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...