Monday, January 3, 2022

धाराशिव लेणी (Dharashiv Rock Cut Caves)

   लेणी आणि संपन्न व्यापारीमार्ग यांच एकदम घट्ट नात आहे. प्राचीनकाळी पैठण, तेर या शहरांमधून विविध प्रकारचा माल पश्चिम किनार्‍या वरील भडोच, शुर्पारक(सोपारा), कल्याण, चौल इत्यादी बंदरात  व्यापारी मार्गाने जात असे. पश्चिम किनार्‍यावरील बंदरा मार्फत परदेशाशी होणार्‍या या व्यापारामुळे व्यापार्‍यांची भरभराट होत होती. त्यांनी दिलेल्या देणग्यांमधून व राजाश्रयामुळे महाराष्ट्रात अनेक लेणी खोदली गेली. त्यामुळे संपन्न बंदरे, व्यापारी मार्ग, बाजारपेठा, राजधान्या यांच्या आसमंतात ही लेणी मुख्यत्वे करुन आढळतात. या लेण्यांचा धार्मिक कार्यासाठी आणि व्यापारी मार्गावरील विश्रांती स्थाने म्हणुन उपयोग होऊ लागला. व्यापार्‍यांनी दिलेल्या दानातून या लेण्यंचा दैनिक खर्च चालत असे, अशी परस्पर पूरक व्यवस्था समाजातल्या या दोन्ही घटकांच्या सोयीची होती.
     पैठण , तेर (तगर) नगरांपासून जाणार व्यापारी मार्ग धाराशिव (म्हणजे आजचे उस्मानाबाद) या प्राचीन शहरातून जात असे. या व्यापारी मार्गावर धाराशिव शहरा नजिक सहाव्या शतकात बालाघाट डोंगररांगेत लेणी खोदण्यात आली. ती लेणी धाराशिव लेणी म्हणुन आजही प्रसिध्द आहेत. बौध्द, हिंदू, जैन अशी एकूण ११ लेणी या परिसरात आहेत. याशिवाय येथे एक समाधी मंदिर आहे. त्याच्या बांधकाम शैली वरुन ते सतराव्या शतकात बांधले असावे.

धाराशिव लेणी, उस्मानाबाद.

     उस्मानाबाद शहराच्या वायव्येला ५ कि.मी. अंतरावर सात लेण्यांचा समुह आहे. हा समुह धाराशिव लेणी म्हणून ओळखला जातो.या लेण्यांकडे हातला देवी मंदिराकडून पायवाटेने, तसेच शहरालगतच्या बोंबल्या मारुती मंदिराकडून पक्क्या मार्गाने पोहोचता येते. लेण्यांसमोर मराठा कालखंडातील एक शिव मंदिर आहे.
जेथे रस्ता संपतो तेथून लेण्यांपर्यंत खाली उतरण्यासाठी पायर्‍या बांधलेल्या आहेत. पायर्‍या उतरायला सुरुवात केल्यावर डाव्या बजूला एक ठळक पायवाट दिसते. या पायवाटेने पुढे गेल्यावर ठराविक अंतरावर ३ हिंदू लेणी पाहायला मिळतात. त्यातील दुसर्‍या लेण्यात रामायण महाभारत आणि हिंदू पुराणातल्या कथांवर आधारीत शिल्पपट कोरलेले पाहायला मिळतात. 

हिंदू लेणी पाहून परत पायर्‍यांपाशी येऊन खाली उतरल्यावर आपण बौध्द लेण्यांपाषी पोहोचतो. यातील दुसरे लेणे भव्य असून त्याला दगडात कोरलेले कमानदार प्रवेशव्दार आहे. प्रवेशव्दाराच्या दोन्ही बाजूस व्दारपाल कोरलेले आहेत. आत गेल्यावर उजव्या बाजूला दगडात कोरलेल्या स्तूपाचे अवशेष पाहायला मिळतात. या ठिकाणी सुरुवातीची काळात बौध्द लेणे होते. त्या लेण्यात मुचलिंड बुध्दाची मुर्ती होती. या मुर्तीत आणि पार्श्वनाथांच्या मुर्तीत असलेल्या साम्यामुळे नंतरच्या काळात ही लेणी जैन लेणी म्हणुन ओळखली जाऊ लागली. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लेण्यातल्या मुळ मुर्तींना आज वेगळ्याच देवतेचे नावाने पुजलेल्या पाहायला मिळतात.
धाराशिव लेणी
   त्यातील सहा लेणी जैन लेणी म्हणून मानली जातात आणि त्यांच्या शैलीवरुन ती लेणी अजिंठा येथील महायान लेण्याच्या समकालीन म्हणजेच इ.स. पाचव्या शतकाच्या उत्तरार्धातील आहेत असे दिसते. हि सात लेणी टेकडीच्या दोन बाजुवर आहेत. चार लेणी टेकडीच्या उत्तरेकडील भागात तर तीन लेणी ईशान्येकडील भागात आहेत. त्यातील शेवटचे म्हणजे क्रमांक ७ चे लेणे अपुर्ण अवस्थेत असून सध्या त्यात दहा स्तंभ आणि दोन कोपर्‍यात दोन असे अर्धस्तंभ असून १८.२८ मीटरचा मुखमंडप आहे. दगडाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून स्तंभाचे घटक नीट ओळखून येत नाहीत. मात्र मागच्या भागात असलेला कृष्णलीलेचा पट अजूनही व्यवस्थित ओळखता येतो. हा शिल्पपट एकसलग कोरला असला तरी मध्येच दगडाच्या दर्जात फरक झाल्याने काही दृष्य अस्पष्ट झाली आहेत. या शिल्पपटात दाखवलेल्या कृष्णाच्या कथेला उजव्या कोपर्‍यातून सुरवात होते. पहिल्या दृष्यात वासुदेव नवजात कृष्णाला घेउन जातो आहे असे दाखवले आहे. कथावर्णन करायची पध्दत आणि अधेमधे कोरलेल्या व्यालावरुन हे लेणे अजिंठा येथील उत्तर वाकाटककालीन लेण्याच्या समकालीन असून त्याचा काळ इ.स. ४५० ते इ.स. ५०० आहे असे म्हणता येईल. 
आजपर्यंत अनेक विद्वानांनी या लेण्यांवर प्रकाश टाकलेला आहे. जेम्स बर्जेस यांनी १८७६ साली सर्वप्रथम या लेण्यांचे वर्णन केले. त्यांनी लेण्यांचे तलविन्यास, तसेच काही स्तंभ, दरवाजे व शिल्पांची रेखाचित्रे बनविली. त्यानंतर हिरालाल जैन (१९३६), म. के. ढवळीकर (१९६५, १९६८ व १९७३), वा. वि. मिराशी (१९७२), विराज शाह (२००८) यांनी मोलाचे संशोधनकार्य केले.
         उस्मानाबादच्या वायव्येला ५ किमीवर असलेल्या लेण्यांकडे शहर सोडून पुढे पठारावरून उतार होत जाणारा रस्ता बऱ्यापैकी आहे. रस्ता संपतो तिथेच डावीकडं चेकपोस्ट आहे. तिथून खाली उतरणाऱ्या सिमेंटच्या पायऱ्या सुरू होतात. इथली लेणी एकूण दोन ठिकाणी विभागली आहेत. 
 
 लेण्यांकडे जाणाऱ्या पायऱ्या 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
पायऱ्या उतरून सरळ डावीकडं झाडीतून जाणाऱ्या डोंगरऊतारावर सरासरी पाऊण किमीवर तीन लेणी आणि या पायऱ्या उतरतानाच उजवीकडं वळून जाणाऱ्या पायऱ्यांवरून गेल्यास जवळच चार लेणी आहेत. 
 
 
ही चार आणि सरळ समोरच्या डोंगरातील तीन अशी एकूण सात लेणी या बालाघाट डोंगररांगेत दिसतात. दोन्ही लेण्यांच्या मध्ये सखल जमिनीवर गवत आणि तुरळक झुडपं आहेत. त्यामुळं समोरासमोर आसणारी ही लेणी एकमेकांपासून दिसतात.   
मंदिरासमोरील समाध्या (Dharashiv Caves -Usmanabad)
 
या उजवीकडच्या चार लेण्यांच्या समोरच एक जुनं महादेव मंदिर दिसतं. याला समाधी मंदिरही म्हणतात. लेण्यांसमोर उतारावर मंदिर आहे. मंदिराच्या समोरच एक चिंचेच प्रचंड झाड आहे. झाडाखालीच मोठ्या चौथऱ्यावर तीन जुन्या समाध्या आहेत. समाध्यांच्या  अलीकडे शेंदूर लावलेली हनुमान मूर्ती आणि दुसऱ्या एका देवतेची भग्न मूर्ती दिसते. समाधीच्या चौथाऱ्यावरच एक प्रचंड झाड कोसळलेलं दिसते.  

 
समाधी मंदिर 
 
समाधी मंदिर 
 
 
समाधी मंदिर (Dharashiv)     
 
 


 
समोर समाधी मंदिर आणि उजवीकडे पहिली लेणी 
 
 
 
 
 
 
 
 
   
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
     
वाड्याच्या मधील मंदिर (Dharashiv) 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
सभामंडपातील शिवपिंडी 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
हे मराठा सरदाराची समाधी मंदिर आहे . त्याची रचना मराठेशाहीतील वाड्याप्रमाणे आहे .आत समाधी मंदिरात मूळ मंदिर मधोमध असून, सभोवती दगडी ओवऱ्यांची रचना असलेल्या जुन्या वाड्यासारखं बांधकाम दिसतं. मधोमध असूनही मंदिर वाड्यापासून अलिप्त दिसतं. कळसाचं दर्शन घेण्यासाठी या वाड्याच्या छतावर जावं लागतं. वर जाण्यासाठी जेमतेम, अरुंद चिंचोळ्या दगडी पायऱ्या आहेत.
               मंदिराची दगडी ठेंगणी चौकट ओलांडून आत मंडपात आल्यास उजवीकडं शिवपिंड दिसते. पिंडीची रचना एकावर एक गोल दगडी चकत्या ठेवल्याप्रमानं वर  निमुळती होत जाताना दिसते, तर गाभाऱ्यात असलेली शिवपिंड ही वर निमुळत्या होत जाणाऱ्या चार चौरस दगडी चकत्या दिसतात. क्वचित ठिकाणीच आशा रचनेच्या पिंड्या असाव्यात. सभामंडपात आणि गाभाऱ्यात काळोख असून बॅटरीची गरज आहे. शिवपिंडिंना अर्पण केलेल्या हार - फुलांवरून या निर्जन ठीकाणी मंदिरात नित्य पूजा होत असावी.  गाभाऱ्या समोर असलेल्या दारातून आणि कळसातून फक्त पिंडीवर प्रकाश पडेल अशी योजना केलेली आहे . मंदिरासमोर वीरगळ आणि ३ समाध्या आहेत.
पहिली लेणी (Dharashiv Caves)
dharashiv_caves-min
लेणे क्र. १.
    हे उत्तरेकडील चार लेण्यांच्या ओळीतील पश्चिम टोकाला खोदलेले एक अर्धवट लेणे असून, त्यात दोन स्तंभ व अर्धस्तंभयुक्त व्हरांडा (७.८ x २.१ मी.) व अर्धवट खोदलेला मंडप आहे. या लेण्यात सु. ११-१२व्या शतकातले एक सुटे जैन चौमुख शिल्प आहे. या लेण्याच्या पूर्वेला लेणे क्र.२ आहे. हे लेणे सर्वांत विशाल असून, तलविन्यासानुसार छतविरहित प्राकारयुक्त प्रांगण, व्हरांडा (ओवरी), स्तंभयुक्त मंडप व गर्भगृह अशी सर्वसाधारण रचना आहे. प्राकारयुक्त प्रांगणाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना द्वारपाल कोरलेले आहेत. द्वारावर गोलाकृती भागाच्या आतील बाजूस पार्श्वनाथाची मूर्ती आहे. लेण्याच्या ओवरीत प्रवेश करताना लागणाऱ्या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूस गण कोरलेले आहेत, तसेच प्रांगणात डाव्या बाजूला चौरस पाया असलेली एक गोलाकृती रचना आहे. व्हरांडा, सहा स्तंभ व दोन अर्धस्तंभांवर आधारलेला आहे. अर्धस्तंभाचा मध्यवर्ती भाग चौकोनाकृती असून शीर्षभाग तरंग पोटिकेसह अलंकृत आहे. व्हरांड्याच्या उजव्या बाजूला एक खोली व पोढी असून त्यात चौरसाकृती स्तंभ तसेच जिनाचे एक शिल्प व दोन चौमुख आहेत. खोलीच्या भिंतीवर जिनांच्या दोन प्रतिमा कोरण्यात आलेल्या आहेत. व्हरांड्याच्या डाव्या बाजूलाही एक रिकामी खोली आहे. मंडपाच्या दर्शनी भागाची बरीच पडझड झाली असून, बर्जेस यांनी नमूद करून ठेवलेली जैनशिल्पे, चैत्य गवाक्षे व इतर अलंकृत भाग सध्या अस्तित्वात नाहीत.
 
पहिल्या लेण्यातील बुद्ध मूर्ती (Dharashiv Caves) 
 
 
 पार्श्वनाथ मूर्ती, लेणे क्र. १, धाराशिव.
 
    या लेण्याचा मंडप सु. २४ x २४ मी. असून आत जाण्यास तीन दरवाजे होते. मंडपात ३२ स्तंभ असून त्यांपैकी २० स्तंभांनी बाहेरचा, तर १२ स्तंभांनी आतील चौक झाला आहे. मंडपाच्या तिन्ही बाजूंना एकूण २२ खोल्या (निवासस्थाने) आहेत. गर्भगृहाच्या उजवीकडील दोन खोल्या वगळता इतर सर्व रिकाम्या आहेत. 
 
दुसरी लेणी (Dharashiv Caves)  
 
 
 
 
 
 
 
 

 
 
 
 
 
 
दुसरी लेणी 
 
 
लेणे क्र. २ चे दृश्य, धाराशिव.
 लेणे क्र. २:-
यातील दुसरे लेणे भव्य असून त्याला दगडात कोरलेले कमानदार प्रवेशव्दार आहे. प्रवेशव्दाराच्या दोन्ही बाजूस व्दारपाल कोरलेले आहेत. आत गेल्यावर उजव्या बाजूला दगडात कोरलेल्या स्तूपाचे अवशेष पाहायला मिळतात. या ठिकाणी सुरुवातीची काळात बौध्द लेणे होते. त्या लेण्यात मुचलिंड बुध्दाची मुर्ती होती. या मुर्तीत आणि पार्श्वनाथांच्या मुर्तीत असलेल्या साम्यामुळे नंतरच्या काळात ही लेणी जैन लेणी म्हणुन ओळखली जाऊ लागली. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लेण्यातल्या मुळ मुर्तींना आज वेगळ्याच देवतेचे नावाने पुजलेल्या पाहायला मिळतात.
   स्तुपाचे अवशेष पाहून पायऱ्या चढून लेण्यात प्रवेश करतांना ओवरीच्या खालच्या बाजूस भार्गव कोरलेले पाहायला मिळतात. लेण्याची रचना ओवरी , सभामंडप त्याच्या दोन्ही बाजूला असलेले विहार आणि गर्भगृह अशी आहे. आजच्या तारखेला ओवरी नष्ट झालेली आहे. सभामंडप २० खांबांवर तोललेला आहे. या खांबावर खूप सुंदर नक्षीकाम होते . लेण्याची दुरुस्ती करतांना ते नष्ट झाले . आता फक्त उजव्या बाहेरच्या कोपऱ्यातल्या खांबावर नक्षीकाम पाहायला मिळते . सभामंडपाच्या दोन्ही बाजूला ७ खोल्या आहेत. गर्भगृहात पार्श्वनाथाची मुर्ती आहे .
  गर्भगृहाच्या उजव्या बाजूकडील खोलीत कायोत्सर्ग मुद्रेतील जिन कोरण्यात आलेला आहे. त्याच्या डोक्यावर तीन दलयुक्त छत्र आहेत. जवळच एक चौमुख ठेवलेला आहे. गर्भगृहातील द्वारावर तीन सपाट शाखा आहेत. या चौकोनाकृती गर्भगृहात मध्यभागी प्रदक्षिणापथयुक्त पार्श्वनाथाची अर्धपद्मासन व ध्यान मुद्रेतील सिंहासनाधिष्ठित भव्य मूर्ती कोरलेली आहे. पार्श्वनाथांच्या डोक्यावर सप्तफणाधारी नाग आहे. सिंहासनाच्या पुढील भागावर भग्न चक्र व त्याच्या दोन्ही बाजूस समोरासमोर एक-एक सिंह व दोन-दोन हरिण कोरले आहेत. मूर्तीच्या दोन्ही बाजूस चामरधारी सेवक व मालाधारी विद्याधर आहेत. या व्यतिरिक्त या लेणीत काही सुटी शिल्पे असून, त्यामध्ये पाच चौमुख व एक पंचतीर्थिका दिसून येते. मंडपातील काही स्तंभांच्या शीर्षभागावर एका जिनासह काही भित्तिचित्रांचे अवशेष दिसून येतात.
 
 जिन मूर्ती , लेणे क्र. २, धाराशिव.
 
लेणे क्र. ३:-
लेणे क्र. २ च्या पूर्वेला लेणे क्र. ३ आहे. हे संपूर्ण लेणे बहुतांशी, लेणे क्र. २ सारखेच असून आकाराने थोडेसे लहान आहे. व्हरांड्यच्या स्तंभांना जोडणाऱ्या शीर्षपट्टीत चैत्यगवाक्षासह उत्कृष्ट कोरीव शिल्पे होती. ती सध्या अस्तित्वात नाहीत. व्हरांडा १८ मी. रुंद असून समोर ६ स्तंभ आणि २ अर्धस्तंभ आहेत. मंडपाचे प्रवेशद्वार पंचशाखायुक्त असून यात २० स्तंभ आहेत. मंडपात १४ खोल्या असून गर्भगृहाच्या उजव्या बाजूकडील खोलीत, मागील भिंतीत जिन कोरलेला आहे. गर्भगृह ५.७ x ५.४ मी. असून त्यात लेणे क्र. २ प्रमाणेच किंचित बदलासह पार्श्वनाथाची मूर्ती आहे.
 
तिसऱ्या लेण्याची प्रवेश कमान 
 
 
 
 
तिसरी लेणी (Dharashiv Caves)
 
 
 
 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
पायऱ्या चढून तिसऱ्या लेण्याच्या ओसरीवर जाण्यापूर्वी सुरवातीला दगडात कोरलेली सुंदर कमान  दिसते. कमानीच्या डावी उजवीकडं द्वारपाल कोरले आहेत. उजवीकडील द्वारपालाची कोरीव मूर्ती नष्ट झाली असून, डावीकडील बऱ्यापैकी शाबूत दिसते. या लेण्याचंही दुरुस्ती काम चालू असून, त्याच्याही छताला आधार देणारे समोर सिमेंटचा गिलावा  केलेले नक्षीदार गोल खांब दिसतात. तर आत चौरस दगडी खांब छताला आधार देतात. ही लेणी आत सर्वात मोठी दिसते. आत काळोख असून वटवाघूळांच राज्य दिसतं. आत प्रवेश करतानाच वटवाघूळांमुळं निर्माण झालेली उष्णता जाणवते. 
तिसऱ्या लेण्यातील दुरुस्ती 
 
 

लेणे क्र.  ४:-
   याच्या बाजूला लेणे क्र. ४ आहे. यात एक खुले प्रांगण, मंडप व गर्भगृह आहे. मंडपात चार स्तंभ असून दोन्ही बाजूला दोन खोल्या आहेत. गर्भगृहाच्या दोन्ही बाजूंना दोन रिकाम्या खोल्या दिसतात. गर्भगृहात मागील भिंतीत पार्श्वनाथाची मूर्ती कोरलेली आहे. विशेष म्हणजे या मूर्तीच्या मागे प्रदक्षिणापथ नाही. या लेण्यात सुपार्श्वनाथाची अंबिका व क्षेत्रपालायुक्त एक सुटी मूर्ती आहे. या लेण्यातही भित्तिचित्रांचे अवशेष आढळतात. यानंतर घळ पार करून लेणे क्र. ५ येथे पोहोचता येते. हे एक अर्धवट शिल्पविरहित लेणे असून दोन खोल्या अव्यवस्थितपणे खोदलेल्या आहेत.

 
चौथी लेणी (Dharashiv Caves)

   लेणे क्र. ५ च्या उजवीकडे वरच्या बाजूला लेणे क्र. ६ स्थित आहे. हे एक अर्धवट खोदलेले लेणे असून यात व्हरांडा, मंडप आणि गर्भगृह अशी रचना दिसते. व्हरांडा पूर्णपणे खोदलेला असून तो १३.३५ मी.रुंद व २.६ मी. खोल आहे. याला समोर चार स्तंभ व दोन अर्धस्तंभ आहेत. यानंतर मंडप असून तो काही प्रमाणात खोदलेला आहे. मंडपाचा आकार १३.०५ x ११.४ मी. असून आत १० स्तंभ कोरलेले आहेत. परंतु त्यांपैकी समोरील दोनच पूर्ण झालेले दिसतात. या स्तंभांची रचना लेणे क्र. ३ मधील स्तंभांसारखीच दिसते. भिंतीच्या मागील बाजूस अर्धपद्मासनात पार्श्वनाथाची सप्तफणाधारी नाग असलेली एक मूर्ती कोरलेली आहे. सिंहासन साधारण असून आकृतीविरहित आहे. सेवकांपैकी फक्त एका चामरधारीणीचे रेखांकन पार्श्वनाथांच्या उजव्या बाजूला केलेले दिसते.
क्र. ७ चे वैष्णव पंथीय लेणे ६ व्या लेण्याच्या नैर्ऋत्येला आहे. यात केवळ १० स्तंभ व दोन अर्धस्तंभयुक्त एक व्हरांडा असून तो १८ मी. रुंद आहे. व्हरांड्याचा मागील भाग अर्धवट खोदून सोडलेला दिसतो. स्तंभांच्या वरच्या बाजूला प्रामुख्याने कृष्णलीलांचे शिल्पपट कोरण्यात आलेले आहेत.
   धाराशिव लेण्यांचा कालखंड बर्जेस यांनी इ. स. सु ६५०, नाईक यांनी. इ. स. सु ६०० ते ६५०, तर वॉल्टर स्पिंक यांनी इ. स. सु. ४८०-५०० ठरविला आहे. परंतु म. के. ढवळीकर व विराज शाह यांच्या मते तलविन्यास, स्तंभ व अलंकरण तसेच गर्भगृहातील मूर्तिशिल्प ठेवण्याची पद्धत पाहता लेणी क्र. २ व ३ चे अजिंठा येथील पाचव्या-सहाव्या शतकातील वाकाटककालीन लेणे क्र. सोळाशी साम्य वाटते.

   धाराशिव लेण्यांचा इतिहास आणि वर्णन अपभ्रंश भाषेतील करकण्डचरिउ (११ वे शतक) व इ. स. ९३१-३२ मध्ये रचित बृहत्कथाकोश या संस्कृत ग्रंथात आलेले आहे.
बर्जेस यांच्या मते, धाराशिव येथील मुख्य लेणी जैन आहेत. ढवळीकरांच्या मते, लेणी क्र. १ ते ४ ही प्रथम खोदली गेली, तेव्हा ती बौद्धधर्मीय होती. नंतर नवव्या-दहाव्या शतकांत त्यांचे जैनधर्मीय लेण्यांत रूपांतर करण्यात आले असावे. वा.वि. मिराशी व विराज शाह यांनी अनेक दाखले देऊन लेणी क्र. २, ३, ४ व ६ ही जैन असल्याचे सिद्ध केले. मिराशी यांच्या मते, सिंहासनावरील चक्र व सप्तफणाधारी नाग ही वैशिष्ट्ये जैनांतही प्रचलित आहेत.
लेणे क्र. २ मधील जिनाचे भित्तिचित्र, अजिंठा लेण्यांतील गर्भगृहांत मुचलिंदबुद्ध मूर्तींचा अभाव, अजिंठ्यातील सर्व बुद्ध मूर्ती पद्मासनात, तर धाराशिव येथील शिल्पे अर्धपद्मासनात असणे, तसेच स्तूपसदृश्य रचनेचे धाराशिव येथील लेणे क्र. २ मधील स्थान (या काळात स्तूप लेण्यांबाहेर असण्याची उदाहरणे दिसत नाहीत. जे आहेत ते सुटे व आकाराने भिन्न आहेत) इत्यादी मुद्दे मांडून विराज शाह यांनी या लेणी बौद्ध नसून जैन ठरविल्या आहेत.
या नेहमीच्या गडबडीपासून लांब असलेल्या शांत आणि निसर्गरम्य वातावरणात लेणी आणि मंदिर पाहाता पाहातांना आपला काही शतकांचा कालप्रवास होतो.तुळजापूर , धाराशिव लेणी आणि तेर ही तीनही ठिकाण खाजगी वहानाने एका दिवसात पाहून होतात.याशिवाय धाराशिव लेण्यांच्या नैर्ऋत्य भागात भोगावती नदीकिनारी चांभार (हिंदू लेणी) व लाचंदर लेणी आहेत.

संदर्भ :

१)  Fergusson, James & Burgess, James, The Cave Temples of India, London, 1880.
 २)   Jain, Hiralal, ‘Some Fresh Light on the Dharashiva Caves and the Origin of the Shilahara Dynasty’, ABORI, XVI, p. 1-11, Pune, 1936.
 ३)   Shah, Viraj, Jaina Rock-Cut Caves in Western India, Delhi, 2008.
  ४) ढवळीकर, म. के. ‘करकण्डचरिउतील जैन लेणी’, विदर्भ संशोधन मंडळ वार्षिक, पृ. १३८-४४, नागपूर, १९६५.
 ५)  ढवळीकर, म. के. ‘धाराशिव लेण्यांवर नवा प्रकाश’, विदर्भ संशोधन मंडळ वार्षिक, पृ. ११९-२७, नागपूर, १९६८.
 ६) ढवळीकर, म. के. ‘धाराशिव लेणी बौद्धधर्मीय होती काय?’, भारतीय इतिहास आणि संस्कृति, पृ. ५-९, मुंबई, १९७३.
 ७)  मिराशी, वा. वि. ‘धाराशिव लेणी बौद्ध की जैन?’, विदर्भ संशोधन मंडळ वार्षिक, पृ. ३७-५२, नागपूर, १९७२.
८) श्री. अमित सामंत यांचे लिखाण
९) https://sahyadri300.blogspot.com/2021/05/dharashiv-caves.html#comment-form










 

 

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...