आपण रत्नागिरी जिल्ह्यातील खेडजवळच्या रसाळ्,सुमार आणि महिपत या दुर्गत्रिकुटाची माहिती घेतो आहोत.यातील आजची चढाई सह्याद्रीतील एका अवघड गडावर असणार आहे,तो म्हणजे सुमारगड ! रसाळ आणि महिपत हे दोन्ही गड एकाच रांगेवर असले तरी दोन्ही गडांवर जाणे सोपे आहे.त्यामानाने सुमारगडाची चढाई धोकादायक श्रेणीची असल्यामुळे फारच हौशी दुर्गप्रेमी सोडले तर सहसा इथे कोणी फिरकत नाही.याच सुमारगडाची आपण सविस्तर माहिती घेउया.
अलंग –मदन- कुलंग या दुर्गत्रयीप्रमाणे भटकंतीसाठी प्रसिद्ध असलेली अजुन एक दुर्गत्रयी म्हणजे महिपतगड-सुमारगड-रसाळगड. एकाच डोंगररांगेवर उभे राहुन एकमेकांशी जवळीक साधणारे हे दुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील खेड या तालुक्याच्या ठिकाणापासून साधारण २५ कि.मी. अंतरावर आहेत. यातील सुमारगड हा महिपतगड आणि रसाळगड ह्या दोन गडाच्या मध्ये डोंगर सोंडेवर वसलेला असुन किल्ल्यावर जाण्यासाठी असणारी अवघड वाट यामुळे किल्ला फारच दुर्लक्षित झाला आहे. केवळ नावात सुमार असलेला सुमारगड प्रत्यक्षात मात्र थरारक व कठीण असुन इतर दोन दुर्गांची भटकंती सहजतेने करता येते मात्र सुमारगडची भटकंती करताना दमछाक होते.
वडगाव,मालदे, रसाळवाडी जैतापुर हि सुमारगडच्या घेऱ्यातील गावे असुन मालदे व वाडी जैतापुर येथुन गडावर जाण्यासाठी वाट आहे. मालदे गावातून गुरखिंड मार्गे पायवाटेने गडावर जाण्यासाठी ४ तास लागतात तर रसाळगडवाडी मार्गे म्हारखिंड-गुरखिंड असा प्रवास करत सुमारगडवर पोहोचण्यास सहा तास लागतात. त्यामानाने वाडीबेलदार मार्गे सुमारगडावर जाणे जास्त सोयीचे असुन येथुन गडावर जाण्यास अडीच तास लागतात पण त्यासाठी जीपसारखे वाहन सोबत असायला हवे. सुमारगड ज्या डोंगरावर वसलेला आहे त्या डोंगराची एक सोंड वाडी बेलदारच्या दिशेने उतरलेली आहे. वाडी जैतापुर ते वाडी-बेलदारपर्यंत कच्चा रस्ता झाल्यामुळे जीपसारख्या वाहनाने सुमारगड असलेल्या डोंगराची सोंड जेथे रस्त्याला भिडली आहे तिथपर्यंत सहजतेने जाता येते अन्यथा ५ कि.मी. चढ असलेला हा रस्ता पायगाडीने पार करण्यास दीड तास लागतात. या वाटेने जास्त चढाई करावी लागत नसल्याने हि वाट कमी श्रमाची व जास्त सोयीस्कर आहे पण त्यासाठी वाहन मात्र सोबत असायला हवे अन्यथा मालदे वाडीतुन जाणे योग्य आहे. या खिंडीत सुमारगड दिशा दर्शविणारा फलक लावलेला असुन बेलदार वाडी येथुन अर्ध्या तासावर आहे. बेलदार वाडी हि दहा-बारा घरांची लहानशी वस्ती असुन येथे चहापाण्याची तसेच जेवणाची चांगली सोय होते. वाडीत मुक्काम करावयाचा असल्यास मारुतीचे मंदिर आहे. अनुभवी दुर्गमित्राना येथुन जाण्यासाठी वाटाड्याची गरज नाही मात्र नवखे असल्यास वाडी बेलदार येथुन वाटाड्या सोबत घेणे सर्वोत्तम.
१) रसाळगड ते सुमारगड :-
सुरवातीला रसाळ ते सुमारगडाच्या वाटेची माहिती घेउया.
अवशेषांनी संपन्न असा रसाळगड बघून बरेच जण सुमारमार्गे महिपत असा जंबो ट्रेक करतात.त्यांच्यासाठी रसाळ ते सुमार हि वाटचाल अशी असेल.
रसाळगड पाहून रसाळवाडीतून शेताडीतून उत्तरेला निघाल्यावर, धारेवरून वरचं पठार गाठण्याच्या ऐवजी, डावीकडून (बाण बघा) आडवं जायचे.
२०-२५ मिनिटं आडवं गेल्यावर उजवीकडे उभं चढून धारेवर पोहोचावे.
गवताळलेल्या धारेवरून मागं बघताना रसाळगड मागे दूर जात असतो.
जर सकाळी लवकर रसाळगड सोडला तर उन्ह चढायच्या आत हि वैराण, उजाड परिसरातील वाटचाल लवकर संपवता येते.अन्यथा चढत उन आणि कोकणातील दमट हवेत निघणारा घामटा यामुळे चांगलाच दम निघतो.
अशीच वाटचाल करत आपण माथ्यापर्यंत न चढता अखेरीस वाट उजवीकडे पदरातल्या झाडीत लपलेल्या धनगरवाड्यापाशी येतो. रसाळवाडीपासून इथं पोहोचायला १.५ तास लागतात. हा आहे 'राया धनगराचा झाप'. अश्या दुर्गम जागी धनगर त्यांच्या गायी-म्हसरांबरोबर कसे टिकून राहत असतील, ही खरंच कमाल आहे... धनगरवाड्यापासून पहिल्यांदा ‘सुमारगडा’चा कातळमाथा दिसतो.
राया धनगराचा झाप
गोनीदांच्या कथेतुन झळकणारा राजगडचा बाबुदा, राजमाचीचा बुधा त्याचप्रमाणे सुमारगडचा हा राया धनगर. वय वर्ष ७५ असलेला हा जंगलचा तरुण राजा गेली कित्येक वर्ष या जंगलात त्याच्या गुरांसोबत एकटाच येथील झोपडीत रहातो.अनेक दुर्गमित्रांच्या लेखणीतुन डोकावणाऱ्या रायाला या जंगलभागाची खडानखडा माहिती आहे. वेळ असल्यास राया आपल्या सोबत गडावर देखील येतात अन्यथा चार पाउले सोबत चालुन पथदर्शकाचे काम करतात. कोणतीही अपेक्षा न ठेवता रायाने दिलेल्या ताकाचा आवर्जुन स्वाद घ्यावा व आपली पुढील वाटचाल सुरु करावी. येथुन पुढे जाणारी वाट दाट जंगलातील असुन या वाटेने जाताना वाटेचा निट मागोवा घेत ढोरवाटा टाळाव्या कारण राया धनगराची जनावरे येथे चरायला येत असल्याने अनेक वाटा पडलेल्या आहेत.
धनगरवाड्यापासून झाडीतून आडवं जात सुमारगडाच्या जवळ जावू लागलो. सुमारगडाची वाट दुर्गम, गचपणीची अन् सहज सापडत नाही. त्यातंच शेवटच्या टप्प्यांत दृष्टीभय असलेलं कातळारोहण करावं लागतं, म्हणून बरेचसे ट्रेकर्स सुमारगड चढायचा प्रयत्न करत नाहीत. अर्थात, सुमारगड चढण्याचा प्रयत्न न करणं किंवा चढायला न जमणं, यात फार वाईट वाटून घ्यायचं कारण नाही.धनगरवाड्यापासून सुमारगडाकडे जाण्यासाठी दोन वाटा आहेत.एक वाट सुमारगडाचा माथा डावीकडे ठेवून त्याच्या पुर्व अंगाने वर चढते.मात्र हि वाट फारशी रुळलेली नाही.त्यामुळे या वाटेने सुमारगड चढण्याचा प्रयत्न करु नये.
दुसरी वाट आहे,सुमारगडाच्या पश्चीम अंगाने वाट पलिकडे उत्तरेकडे जाते आणि भट्टी खिंडीत एक वाट सरळ वाडी बेलदारकडे तर द्क्षिणेकडे चढणारी वाट सुमारगडाकडे जाते.या वाटेने डाव्या बाजूने तब्बल तीन डोंगरांना वळसा मारत व शेवटच्या डोंगरावर तिरके चढत तासाभरात आपण गुरखिंडीत पोहोचतो. गुरखिंड हि पाण्याच्या प्रवाहाने व जनावरांच्या पायसरीने तयार झालेली लहानशी खिंड असुन खिंडीतून खाली उतरत जाणारी वाट मालदेवाडी व रसाळगडकडे जाते तर डावीकडील चढणीवर कारवीच्या झाडीत असलेली पायवाट आपल्याला सुमारगडकडे नेते.
रसाळगडावरून सुमारगडाकडे यायचे झाल्यास वाटेत एक राया धनगराचा झाप लागतो. मात्र रसाळगड ते सुमारगड हे अंतर साडेचार तासांचे आहे.
वाडी जैतापुरमार्गे:-
वाडी जैतापुर हे सुमारगडाच्या घेर्यातील एक गाव.तसे थेट पायथ्याचे गाव म्हणा ना. पुर्वी वाडी जैतापुरातून पायी चढण चढून सुमारगडावर जाता येई.आता मात्र वाडी जैतापुर ते वाडी बेलदार असा कच्चा रस्ता झालेला आहे.मोटारसायकलसारखे वाहन किंवा जीपसारखे कच्च्या रस्त्यावरुन जाणारे वाहन असेल तर वाडी बेलदारला आपण थेट वाहनाने पोहचू शकतो.
खेड ते वाडी जैतापुर
९.३०,११.४५,५.४५ ( मुक्कामी )
वाडी जैतापुर ते खेड
६.४५,९.४५,१.००
९.३०,११.४५,५.४५ ( मुक्कामी )
वाडी जैतापुर ते खेड
६.४५,९.४५,१.००
अर्थात स्वताचे वाहन घेउन जायचे तर थोडा धोका स्विकारावा लागेल.किंवा गाडी जैतापुरात लावून देखील चालत वाडी बेलदारला जाता येईल.
१) श्री. सीताराम जाधव- +91 7038923580
वाडी बेलदार ते सुमारगड :-
वाडी-बेलदार गावातल्या लोकांना काहीही आणायचे असेल तर ह्या जैतापुरात चालत जावे लागते, अगदी बस मिळवण्यासाठी सुद्धा. त्या पठारावरून चालत गेल्यावर जंगलात घुसायचे. वाटेत काही थोडक्या खुणा लक्षात ठेवत पुढे निघायचे, वाटेत एका धनगराचे झाप लागले. पुढे परत जंगलच. पुढे एक वळण लागते जिथे रसाळगडकडून येणारी वाट मिळते. गुरांना जाण्यास प्रतिबंध म्हणून वाटेत काठ्या टाकून ठेवलेल्या आहेत. ही वाट उजवीकडे रसाळगडाकडे जाते, तर डावीकडे सुमारगडाकडे. आपण डावीकडची वरच्या बाजूला सुमारगडाकडे चढणारी वाट पकडायची. वाडी बेलदार मधून इथे यायला साधारण तासभर पुरतो. आता खडा चढ चालू झालेला असतो. वळसा घेत गेलेल्या वाटेवरून सुमारगडाचे सुंदर दर्शन झाले. या जंगलात बरेचसे वन्यप्राणी आहेत त्यात बिबट्याही आहे. एक छोटासा रॉक पॅच लागला. मागच्या बाजूला दृश्य फारच छान दिसते.
अनेकांनी सुमारगड किल्ला नावाप्रमाणेच सुमार असल्याचे लिहिले आहे पण ते योग्य नाही. वर असलेले दाट गवत व कारवीच्या झाडीमुळे नीटपणे करता न आलेली भटकंती हे त्याचे कारण असावे पण आकाराने लहान असूनही या गडावर पाण्याची टाकी,गुहा,बुरुज, कोठार,चौथरे यासारख्या अवशेषांची लयलूट आहे. खिंडीतुन सुमारगडच्या दिशेने चालण्यास सुरवात केल्यावर दोन चढाव पार करून साधारण पाऊण तासात आपण राया धनगराच्या झापाजवळ पोहोचतो.उभ्या चढावर असलेली हि लहानशी पायवाट चढत आपण सुमारगडासमोर असलेल्या डोंगर धारेवर पोहोचतो.
सुमारगड आणि त्याच्या अलीकडचा डोंगर एका निमुळत्या डोंगरधारेने एकमेकांशी जोडले गेले आहेत. येथुन सुमारगडाचे पुर्व टोक व त्यावरील बुरुजाचे सुंदर दर्शन होते. पुढील वाटचाल अतिशय सावधगिरीने करत आपण या टोकाच्या कड्याला भिडतो. येथे कड्याच्या डाव्या बाजूने कातळ कोरून गडाच्या दरवाजाकडे जाण्यासाठी वाट बनविलेली आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने आपल्याकडील अवजड सामान येथे उतरून ठेवावे व पुढील वाटचाल करावी. जवळ रोप असल्यास कड्याचा हा भाग व्यवस्थित पार करता येईल. जेमतेम एक फुट रुंद असलेली हि पायवाट कातळाला बिलगुनच पुढे जाते. एका ठिकाणी हि वाट वितभर असुन कातळाला पाठ-पोट घासतच पुढे सरकावे लागते. याठिकाणी आधारासाठी एक खिळा ठोकलेला आहे.
वाट खूपंच बारीक अन् गचपणाची-अडचणीची होती. थेट दृष्टीभय नसलं, तरी ती जाणवत होतीच ना... अश्या ठिकाणी, पुरेशी विश्रांती घेणं अन् मग शांतपणे एक-एक पाऊल टाकणं महत्त्वाचं.
वाटेच्या सुरवातीस जमीनीत उतरत जाणारे एक भुयार असुन त्याच्या तोंडाशी माती साठल्याने आत शिरता येत नाही.
या भुयारापुढे काही अंतरावर ४ x ४ फुट आकाराचे तोंड असलेली दुसरी गुहा असुन या गुहेत पाणी जमा झाल्याने आत शिरता येत नाही.घाणही बरीच आहे. ती आत मध्ये राहणाऱ्या वटवाघळांनी केलेली होती. आत वटवाघळं उलटी लटकलेली दिसतात.
पुढे काही अंतरावर या गुहेप्रमाणे तिसरी गुहा असुन या गुहेच्या आतील भागात पायऱ्याप्रमाणे उतार कोरलेला असुन आत शिरल्यावर हि उजवीकडे वळते. या ठिकाणी कातळात कोरलेले कोठार आहे. आधी पाहीलेल्या पण पाण्यामुळे आत शिरू न शकलेल्या गुहेची रचना देखील अशीच असावी.
रॉक पॅच आणि त्याला बांधलेला काळा रोप
हि गुहा पाहुन आपण गडावर जाण्यासाठी नव्याने लावलेल्या शिडीजवळ पोहोचतो. या शिडीखाली गडावर जाण्याचा मुळ बांधीव पायरीमार्ग असुन आज त्यातील केवळ ५-६ पायऱ्या शिल्लक आहेत. येथुन गडावर जाणारी वाट नष्ट झाल्याने बा रायगड परिवार व क्षेत्र सुमारगड संवर्धन समिती यांच्या संयुक्त प्रयत्नाने २०१६ साली हि शिडी लावण्यात आली आहे. उगवतीच्या कड्यावरील वारसाच्या झाडाच्या मुळीस धरून येंगावं लागतं" असं दुर्गमहर्षी गो.नि.दांडेकर यांनी सुमारगडावरील चढाईचं केलेलं वर्णन याच ठिकाणाचे आहे. आता मुळीऐवजी शिडीला धरून जाव लागत इतकाच बदल झालाय. शिडीने वर न चढता कड्याला बिलगुन सरळ पुढे गेल्यावर आधी पाहीलेल्या गुहेप्रमाणे चौथी गुहा पहायला मिळते.याशिवाय इथे दोरीही बांधली आहे.त्याला धरुन देखील चढता येते.
कातळटप्पा अलीकडे २० पावलांवर कातळकोरीव थंड पाण्याचं टाकं आहे. सुमारगडाची दक्षिणेकडून चढणारी घसा-याची वाट याच टाक्यापाशी पोहोचते. हे पाणी पिण्यायोग्य आहे.
वास्तविक कातळ अवघड कुठेच नाहीत.अगदी दोर न वापरता चढाई करता येईल.पण त्यासाठी पुरेसा सराव आणि आत्मविश्वास हवा.अन्यथा पुरेशी काळजी घेउनच हा टप्पा पार केलेला चांगला.
पण ट्रेकर्सना सुमारगड आव्हानात्मक वाटत असावं, याची कारणं म्हणजे एकतर आपण खूपंच अडचणीच्या वाटेनं इथे पोहोचतो. दुसरं म्हणजे दमलेल्या अवस्थेत दृष्टीभय असलेल्या द-या बाजूला असताना हा कातळ चढणं मानसिकदृष्ट्या अवघड होत असावं.चढाईचा पहिला आणि तिसरा टप्पा तुलनेने सोपा आहे.मात्र दुसर्या टप्प्यात ढिसाळ खडक असल्यामुळे हा टप्पा नक्कीच जपून पार करायला हवा. ह्या शिडीवरून वर आल्यावर पुढे वाट चिंचोळी असली तरी रेलिंग बांधलेले आहे. आता वरती डावीकडे कडा आणि उजवीकडे दरी अशी वाट आहे.
सुमारगडाचा माथा
शिडी चढुन वर आल्यावर डाव्या बाजुस पहारेकऱ्यासाठी कातळात कोरलेली गुहा पहायला मिळते. या गुहेत एक सतीशिळा ठेवलेली आहे. या गुहेपुढे काही अंतरावर लेणीवजा दुसरी गुहा असुन या गुहेत शिवलिंग कोरलेले आहे. गुहेच्या वरील भागात घडीव दगडात बांधलेली गडाची तटबंदी असुन कोपऱ्यावर बुरुज पहायला मिळतो. वाटेचा हा टप्पा दरीकाठावर असुन मुरमाड असल्याने सांभाळूनच पार करावा. थोडे पुढे आल्यावर वाट डावीकडे वळते तर उजव्या बाजुस दाट कारवीची झाडी आहे. या कारवीच्या झाडीत जमिनीच्या पोटात कातळात कोरलेले पाण्याचे भुमिगत टाके असुन या टाक्यात उतरण्यासाठी पायऱ्या कोरलेल्या आहेत.
गडावर पोचल्यावर वाट डावीकडे जाते तिथून सुरुवात करावी. या टाक्याच्या वरील बाजुस बालेकिल्ल्याच्या टेकाडाच्या पोटात खोदलेली मोठी गुहा असुन या गुहेत दोन बांधीव कोठार आहेत. सध्या या गुहेत मोठ्या प्रमाणात माती जमा झालेली आहे. गुहा पाहुन वाटेवर यावे व आपली पुढील गडफेरी सुरु करावी. सुरुवातीलाच समोरच दोन मोठ्या टाक्या दिसतात.
टाक्यांच्या आधीच एक मंदिरासारखी रचना आहेत त्यात काही काही देव एकत्र करून ठेवलेले आहेत. तिथे शंकराची पिंड आहे, त्यातल्या साळुंका गायब आहेत. ह्या टाक्यांच्या डावीकडे गुहेत शंकराचे मंदिर आहे, त्यात अजूनही मूर्ती आहेत, बहुतेक भोलाईदेवीची मुर्तीही असावी.
पिंडीच्या मागे काही आकृत्या रेखाटलेल्या आहेत. समया, घंटा, अभिषेकपात्रही आहे. पूजेचं सर्व साहीत्य आहे, तसंच कळशी, हंडा, ताट-वाट्या असे बरेच साहित्य आहे. डावीकडून पुढे गेल्यावर एक मंडपाचा सांगाडा उभारलेला आहे. हा उत्सवासाठी उभारलेला असावा. गडाच्या अवशेषांवरच हे बांधकाम आहे. अजून एक चौथरा इथे दिसतो. समोरच एक कोठार असावे, तेथेही भुयारात एक पाण्याचे टाके आहे. उजवीकडे वरच्या बाजूला एक चौथरा आणि त्यावर ध्वज दिसतो. आधी तिथे न जाता जवळचे अवशेष बघून घ्यावेत.
लगेचच पुढे टाक्यांच्या पलीकडे भुयारात दोन खांबी टाके आहे. हे पाणी पिण्यायोग्य अतिशय सुंदर आहे. वाटेच्या पुढील भागात उजवीकडे कातळात कोरलेली तीन मोठी टाकी आहेत. यातील दोन टाक्यात पाणी असुन एक टाके कोरडे ठणठणीत आहे. या टाक्याचा दगड गडाच्या बांधकामासाठी वापरण्यात आला असावा.
टाक्याच्या पुढील भागात म्हणजे बालेकिल्ल्याच्या दिशेने कातळात कोरलेले खांबटाके असुन यातील पाणी पिण्यायोग्य आहे. टाक्याच्या डावीकडे एक गुहा असुन या गुहेत शिवलिंग,नंदी तसेच दगडी चौरंग असुन त्यावर देवीचे चार मुखवटे कोरलेले आहेत. या गुहेत जेवण करण्यासाठी भांडी ठेवलेली असुन गडसंवर्धन करण्याची हत्यारे आहेत.
याच परिसरात आणखी एक टाके आहे त्यातही पाणी पिणे योग्य दिसले. पालापाचोळा बऱ्यापैकी त्यात असला तरी पाणी स्वच्छ दिसत होते. डावीकडून आपली गडफेरी चालू ठेवावी. पुढे अजून एक चौथरा आहे त्याला वळसा मारल्यावर उजवीकडे पाण्याचे एक खांबी टाके आहे. पाणी पिण्यायोग्य वाटले नाही. वळसा मारून वर गेल्यावर गडाचे सर्वोच्च टोक लागते. अवशेष अजून काहीही नाहीत. इथून आपल्याला खालच्या बाजूला पाण्याची टाकी मंदिर वगैरे नजारा दिसतो.
टाक्याच्या काठावर गवतात हरवलेला चौथरा असुन या चौथऱ्यावर गुहेतील चौरंगाप्रमाणे दगडी चौरंग असुन भैरवाची मूर्ती आहे. येथुन पुढे निघाल्यावर वाटेवर काही वास्तु अवशेष असुन एक लहान चौकोनी तोंड असलेले पाण्याचे भुमिगत टाके आहे. हे घरातील बळद असुन आता त्यात पाणी जमा झाले आहे. वाटेच्या उजवीकडे खुप मोठा चुन्याचा ढीग असुन त्याशेजारी एका भुयाराचे तोंड आहे पण त्यात सध्या पाणी जमा झालेले आहे. येथुन पायवाटेने गडाच्या टेकडीवर जाताना एका मोठ्या वाड्याचे अवशेष तसेच कातळात कोरलेली चौकोनी खांब असलेली गुहा पहायला मिळते. या गुहेत उतरण्यासाठी पायऱ्या कोरल्या आहेत. गडमाथ्यावर घडीव दगडात बांधलेला भलामोठा चौथरा असुन त्यावर भगवा झेंडा रोवलेला आहे.
आल्या वाटेने परत निघायचे आणि जीथं वर चढलो त्याच ठिकाणी अजून एक पाण्याचे टाके आहे तेही बघायचे. हे एक खांबी टाके आहे. त्याच्याच वरच्या बाजूला दोन तीन खोल्या आहेत, पण त्यात आज जाण्यासाठी मार्ग व्यवस्थित राहिलेला नाही.
![]() |
| सुमारगडावरची पाण्याची टाकी |
गडाचा माथा जेमतेम असला तरी त्यावरुन मोठा विस्तृत प्रदेश दिसतो.

दक्षिणेला छोट्या उंचीचा रसाळगड साद घालत असतो.दक्षिणेला बघितल्यावर समोरचं दृश्य वेडावणारं असते, कारण याच बंबाळ्या रानातून अन् डोंगररांगांमधून आपण रसाळगडापासून चालत आलोय, यावर विश्वासंच बसेना.

दक्षिणेला छोट्या उंचीचा रसाळगड साद घालत असतो.दक्षिणेला बघितल्यावर समोरचं दृश्य वेडावणारं असते, कारण याच बंबाळ्या रानातून अन् डोंगररांगांमधून आपण रसाळगडापासून चालत आलोय, यावर विश्वासंच बसेना.

उत्तरेला महिपतगड आपला विस्तार दाखवत आडवा पसरलेला दिसतो.

पुर्वेला सह्याद्रीची रांग आपले रांगडे सौंदर्य दाखवत खडी असते.त्यात दोन शिखराचा मधुमकरंदगड लक्षवेधी दिसतो.सुमारगडाची उंची समुद्रसपाटीपासून ३०१० फुट आहे.गडावर ना रहाण्याची सोय ना जेवणाची .उत्तम म्हणजे सकाळी शक्य तितक्या लवकर गड चढाई उरकून वाडी बेलदार किंवा महिपतगडावर मुक्कामाला जाणे किंवा अर्थातच वाडी जैतापुरमार्गे परत जाता येईल.शिडीपासून गड फिरण्यास साधारण एक तास लागतो.गडावरील टाक्या व इतर अवशेष पहाता हा किल्ला प्राचीन काळापासूनच अस्तित्वात असल्याचे दिसुन येते. इ.स.१६६१-६१ दरम्यान महिपतगड-रसाळगड सोबत हा किल्ला देखील स्वराज्यात सामील झाला असावा. सातारच्या शाहु महाराजांच्या दफ्तरातील गडकिल्ल्यांच्या यादीत सुमारगडचा उल्लेख सुमेरुगड असा आढळतो. इ.स.१७७० नंतर पेशव्यांनी कैदखाना म्हणुन या किल्ल्याचा वापर केला. इ.स. १८६२ साली ब्रिटीशांनी केलेल्या पहाणीत गडावर १६ तोफा असल्याची नोंद मिळते आता मात्र एकही तोफ दिसुन येत नाही.
सुमारगडाचे कडे सगळ्या बाजुने उभे असल्यामुळे सगळ्या बाजुना अंगाला कापरे आणणारे दरी दिसत असते.गड बघून झाला तरी आता आल्या वाटेने उतरणे भाग असते.
खरे तर पहाण्यासाठी विशेष काही नाही.जायचे तर जीव धोक्यात घालावा लागेल अशी स्थिती, असे असताना या सुमारगडासारख्या किल्ल्यावर जावेच का ? हा प्रश्न अनेकांना पडतो.पण याच दुर्गम जागी ठाम उभे राहून सह्याद्रीच्या लेकरांनी शत्रुंना या शिखरावर पाय ठेवु दिला नाही.त्या झुंजार रणभुमीचे दर्शन घ्यायचे तर निदान ज्यांच्या उरात शिवभक्ती आणि पाठिशी शिवशक्ती आहे त्यांनी तरी या दुर्गम गडांवर चढाई करुन आपल्या पराक्रमी आणि अनाम पुरुषांचे स्मरण केले पाहिजे.
संदर्भग्रंथ :-
१) रत्नागिरी जिल्हा गॅझेटीयर
२) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
३) डोंगरयात्रा-आनंद पाळंदे
४) शोध शिवछत्रपतींच्या दुर्गांचा-सतिश अक्कलकोट
५) https://www.discoversahyadri.in/ हे ब्लॉग
६) www.durgbharari.in हि वेबसाईट
७) www.trekshitiz.com हि वेबसाईट
८) महाराष्ट्र देशातील किल्ले- चिंतामण गोगटे
१) रत्नागिरी जिल्हा गॅझेटीयर
२) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
३) डोंगरयात्रा-आनंद पाळंदे
४) शोध शिवछत्रपतींच्या दुर्गांचा-सतिश अक्कलकोट
५) https://www.discoversahyadri.in/ हे ब्लॉग
६) www.durgbharari.in हि वेबसाईट
७) www.trekshitiz.com हि वेबसाईट
८) महाराष्ट्र देशातील किल्ले- चिंतामण गोगटे


































No comments:
Post a Comment