सांगलीपासून पन्नास-पंचावन्न किलोमीटर्स अंतरावर कर्नाटक राज्यात बेडकीहाळ गाव वसलेले आहे. जवळून दूधगंगा-वेदगंगा वाहतात. इथेच पुरातन श्री सिद्धनाथ मंदिर आहे. म्हैसूरच्या शाही दसऱ्याच्या धर्तीवर साजरा करण्यात येणारा इथला दसऱ्याचा उत्सव प्रसिद्ध आहे.
बेडकीहाळ गावाच्या मधोमध येईल असे पुरातन श्री सिद्धनाथ मंदिर वसलेले आहे. मंदिराची पुरातन बांधकाम शैली पाहता, ते एकाचवेळी बांधले गेले असावे, असे वाटत नाही. या मंदिराच्या संदर्भात, बांधकामाच्या संदर्भात वेगवेगळी मते मांडली गेलेली दिसतात. कदाचित प्रथम गर्भगृह आणि अंतराळ पूर्ण झाल्यावर, पुढे काही दिवसांनी सभामंडप बांधला गेला असावा, असा तर्क मांडता येतो.
मंदिराचे प्रवेशद्वार भव्य आणि उंच असून, आकर्षक आहे. आत गेल्यावर मूळ मंदिराच्या आजूबाजूस भरपूर मोकळी जागा आहे. ओवऱ्या आहेत. साधूसंन्याशी अथवा पांथस्थांना तेथे राहता येत होते, असे दिसते. मंदिराला प्रदक्षिणा घालत असताना याची पूर्ण कल्पना येते. कदाचित वीरगळ प्रथम ठेवला गेलेला असावा आणि नंतर सभामंडपाचे बांधकाम झाले असल्याची शक्यता वाटते. मंदिराचे शिखर आकर्षक दिसते.
या मंदिरासंदर्भात वेगवेगळ्या आख्यायिका, कथा ऐकायला मिळतात. या मंदिराच्या ठिकाणी पूर्वी तलाव असावा. या काठावर कोणी सत्पुरुष राहत होता, त्याचा देहांत इथे झाला असेही सांगितले जाते.
दुसरी आख्यायिका ऐकायला मिळाली ती अशी, पूर्वी इथे रान असल्याने एक गुराखी आपली गुरे घेऊन इथे येत असे. एकदा त्याला या जागी कसला तरी आवाज ऐकू आला. तो आवाज त्या गुराख्याला विचारत होता, येऊ का? येऊ का? त्या गुराख्याने, ये म्हटल्यावर एक मोठी उभी शिळा आली. ती शिळा आजही, मंदिरातील मूर्तीच्या मागील बाजूस जवळच ठेवलेली आहे. अर्थात ती पाहण्यासाठी मला जाता आले नाही. देवाचा आविष्कारच म्हणून त्याची आराधना, पूजा-अर्चा केली जाते.
या मंदिरासंदर्भात संशोधकांची वेगवेगळी मते आहेत; मात्र एक खरे, की हे मंदिर पुरातन असल्याचे सारेच मान्य करतात. बाराव्या शतकातील हे मंदिर हेमाडपंथी पद्धतीने बांधलेले नाही. संशोधकांच्या मते, पूर्वी या भागात म्हणजे कोल्हापूर परिसरात चालुक्य आणि शिलाहार प्रभावित राज्यकर्ते होते. त्याकाळात बांधलेले हे मंदिर असल्याने त्या काळातील बांधकाम शैलीचा प्रभाव यावर जाणवतो.
काहीही असले तरी वर्तमानात इथे एक पुरातन मंदिर उभे असून त्याच्या आसपासचा परिसर प्रशस्त आहे. मंदिरात स्वच्छता राखली जाते. येणाऱ्या भाविकाला इथे मन:शांती लाभते.
या मंदिराचे आणि गावचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे इथे दसरा अतिशय सुंदर पद्धतीने साजरा केला जातो. म्हैसूरमध्ये भव्य प्रमाणात दसरा महोत्सव साजरा केला जातो. त्याच पद्धतीने हा महोत्सव बेडकीहाळमध्ये साजरा केला जातो. दूरदूरचे लोक इथे महोत्सव पाहण्यासाठी येतात. सारा आनंदाचा माहोल असतो.
अशा वेगवेगळ्या पुरातन मंदिरातून इतिहास दडलेला असावा असे वाटते. हा इतिहास बाहेर यावा, आपल्या गतवैभवाची माहिती व्हावी यासाठी प्रयत्न होणे गरजेचे वाटते. दुर्दैवाने आपण इतिहासाबद्दल फार उदासीन आहोत असे दिसते. अशी अनेक पुरातन मंदिरे आपापला इतिहास उरात दडवून उभी आहेत. त्यांना बोलते करून इतिहास समजून घेऊ शकू. यासाठी अशा वास्तूंना भेट देऊन, त्यांचा अभ्यास करणे, तिथले समाधान, शांतता अनुभवणे या गोष्टी आवश्यक आहेत. निदान एक आनंदयात्रा म्हणून तरी अशा ठिकाणी अवश्य भेट द्यावी, असे वाटते.
- डॉ. प्रल्हाद अ. कुलकर्णी

No comments:
Post a Comment