Sunday, March 19, 2023

मौनीबाबा पाटगाव

 

प्रकार : मध्ययुगीन मंदीर

जिल्हा : कोल्हापुर

कोल्हापुर जिल्ह्यामधील भुदरगड तालुक्यातील शेवटचे गाव म्हणजे पाटगाव. संत मौनी महाराजांच्या समाधीचे ठिकाण. समर्थ रामदासस्वामीं प्रमाणे मौनी बाबा यांना देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी गुरुस्थानी मानले होते. समर्थ रामदास स्वामींनी समर्थ प्रतापामध्ये " सात शत वर्षाचा पाटगावी मौनी " असे मौनीबाबांचे वर्णन केलेले आहे. शिवदिग्विजय या बखरीत मौनी महाराजांचा उल्लेख आढळतो. इतिहाससंशोधक कै. सरदेसाई, शेजवलकर इ. तज्ञांनी मौनी महाराज व शिवाजी यांच्या गुरुशिष्यसंबंधाला दुजोरा दिला आहे. उत्तूर (ता.आजरा,जि.कोल्हापूर) या गावाहून रांगणा किल्ल्याजवळील पाटगाव या गावात वास्तव्यास आल्यावर त्यांनी मौन धारण केले त्यामुळे त्यांना मौनीबाबा वा मौनीबुवा हे नाव मिळाले. त्यांच्या पूर्वायुष्याबद्दल माहिती मिळत नाही. त्यांचा जीवनक्रम नाथपंथांतील अवधूत या उपपंथाशी मिळता-जुळता असुन गोसाव्यांच्या ‘गिरी’ पंथाशी त्यांचा संबंध असण्याचाही शक्यता आहे. ते कथाकीर्तनाच्या माध्यमांतून सर्वसामान्य लोकांना उपदेश करीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेवर जाण्याआधी १६७६ मध्ये त्यांची पहिल्यांदा भेट घेतली होती. सध्या पाटगाव मठामध्ये असणाऱ्या समाधीमंदीराचा गाभारा मौनीबाबांच्या जिवित काळात स्वतः छत्रपती महाराजांनी बांधुन दिला व मठास दरसाल एक हजार माणसांना पुरेल एवढा शिधा देण्याची व्यवस्था केली. पुढे संभाजी महाराजांच्या काळात तुरुतगिरी हे (१७२८ पर्यंत) पीठपती झाले. तुरुतगिरींनी मौनींच्या समाधीपुढील सभामंडप, नगारखाना या इमारती बांधल्या. तसेच मठातील पुराणिक, हरदास इत्यादींसाठी दरसाल अठरा होनांची तरतूदही केली होती यासंबंधीच्या सनदा उपलब्ध आहेत. छत्रपती राजाराम आणि ताराबाई यांनीही मौनी बाबांच्या मठाचा यथायोग्य परामर्श घेतला. करवीर गादीवरील सर्वच छत्रपती या पीठाला फार मान देत. कोल्हापुरहुन रांगणा किल्ल्यावर जाताना पाटतगावचा मठ वाटेवरच असल्याने बहुतांशी दुर्गप्रेमी या स्थानास भेट देऊन नंतरच पुढे जातात.
© Suresh Nimbalkar

मागे जा




मौनी महाराज मंदिर
    Posted: 30 Nov 2013 at 8:47pm
गावाचे नाव :- पाटगाव 
जिल्हा :- कोल्हापूर
जवळचे मोठे गाव :- गारगोटी, भूदरगड.

Mauni Maharaj Mandir, Patgaon, Dist. KOlhapurMauni Maharaj Mandir, Patgaon, Dist. KOlhapur

इ.स. १६७६ च्या विजयादशमीला छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेवर निघाले. त्यावेळी महाराजांनी मौनी महाराजांचे पाटगाव येथे जाऊन आशिर्वाद घेतले होते. ही नोंद ९१ कलमी बखरीत ७६ व्या कलमात वाचायला मिळते .दक्षिण दिग्विजय मोहिमेवरून परत येई पर्यंत मौनी महाराजांनी जिवंत समाधी घेतली होती. दिनांक ३ जून १६७८ रोजी महाराजांनी सहस्त्र भोजनासाठी सनद दिली होती. मौनी महाराजांच्या समाधीवर मंदिर बांधण्यास महाराजांच्या काळात सुरुवात झाली होती.


Mauni Maharaj Mandir, Patgaon, Dist. KOlhapurSamadhi of Mauni Maharaj Mandir, Patgaon, Dist. KOlhapur
 
भुदरगड तालुक्यात पाटगाव आहे. पाटगाव मध्ये मौनी महाराजांची समाधी आहे. समाधीकडे जाणार्‍या वाटेवर ताराराणीनीं बांधून घेतलेले भव्य प्रवेशव्दार आहे. समाधी मंदिरावर शरभ कोरलेला आहे. त्याने पाच हत्तीना पकडलेले दाखवण्यात आले आहे. मंदिराच्या लाकडी बांधकामातील कलाकुसर पाहाण्यासारखी आहे. मौनी महाराजांची समाधी एकसंध दगडात असून खालील दगड मोठा व वरील दगड उतरत्या बांधणीने छोटे होत गेलेले आहेत.


Sharabh at Mauni Maharaj Mandir, Patgaon, Dist. KOlhapurMauni Maharaj Mandir, Patgaon, Dist. KOlhapur

जाण्यासाठी :- पाटगावाला जाण्यासाठी कोल्हापूर गाठावे. कोल्हापूर (५३ किमी) - गारगोटी (३५ किमी) - पाटगाव. पाटगावात रस्त्याला लागून  मौनी महाराजांचे समाधी मंदिर आहे. 


Mauni Maharaj Mandir, Patgaon, Dist. KOlhapur

आजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :- रांगणा किल्ला.

Temples in Maharashtra, Ancient Temples in Maharashtra
Mauni Maharaj Samadhi Mandir , Village :- Patgaon, Dist :- Kolhapur,  Nearest city :-  Gargoti, Kolhapur.

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...