Monday, March 20, 2023

सप्तमातृका

 आशुतोष बापट

आपल्या पुराणांमध्ये  कथांच्या माध्यमातून वेगवेगळे तत्त्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न झालेला आहे. वराहपुराणदेखील सप्तमातृकांच्या माध्यमातून असेच मोठे तत्त्वज्ञान मांडते.

एखादे तत्त्वज्ञान सर्वसामान्यांना सहजगत्या समजावे म्हणून विविध पुराणांमधून कथा रचल्या गेल्या. त्या कथा एखाद्या देवतेच्या जन्माच्या किंवा एखाद्या देवतेने एखाद्या राक्षसावर मिळवलेल्या विजयाच्या असतात. बरीचशी पुराणे ही त्या त्या देवतेच्या सामर्थ्यांची वर्णने करतात. पुराणांतून काही सुंदर कथा सांगितलेल्या आहेत. सप्तमातृका ही संकल्पना मातृका, मातृदेवता इथपासून ते महादेवाला अंधकासुरवधाच्या वेळी मदत करण्यासाठी विविध देवांनी आपल्यापासून निर्माण केलेल्या शक्ती इथपर्यंत विस्तृतपणे वर्णिलेल्या दिसतात. वेगवेगळी पुराणे सप्तमातृकांबद्दल कथा सांगतात. त्यात बरीचशी सुसंगती असली तरी काही ठिकाणी विपर्यास किंवा काहीशी वेगळी कथा सांगितलेली दिसते. या सर्व पुराणांत वराहपुराण सप्तमातृकांची कथा सविस्तर सांगते. ती पुढीलप्रमाणे-

कश्यपाला दितीपासून दोन पुत्र झाले, हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपु. त्या दोन्ही असुरांना विष्णूने अनुक्रमे वराह अवतार घेऊन आणि नरसिंह अवतार घेऊन ठार मारले. हिरण्यकशिपुचा मुलगा प्रल्हाद हा तर महान विष्णुभक्त होताच. प्रल्हादाने हिरण्यकशिपु नंतर उत्तम राज्यकारभार केला आणि नंतर सर्व ऐहिक सुखांचा त्याग करून संन्यास घेतला. त्यानंतर असुरांचा राजा झालेला अंधकासुर यानेही कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून विविध वर प्राप्त करून घेतले आणि त्यामुळे तो शक्तिशाली बनला. अर्थातच तो उन्मत्त झाला आणि सर्व देवांना त्रास देऊ लागला. देवांनी मदतीसाठी कैलासावर महादेवाकडे धाव घेतली. शंकर भगवान या सर्व देवांची तक्रार ऐकत असतानाच प्रत्यक्ष स्वत: अंधकासुर, पार्वतीचे अपहरण करण्याच्या हेतूने कैलासावर दाखल झाला. शिव तत्काळ अंधकासुराशी लढण्यासाठी सज्ज झाले. त्यांनी लगोलग वासुकी, तक्षक, आणि धनंजय या तीन नागांचा बंध आपल्या कमरेभोवती बांधला. त्याच वेळी नील नावाचा अजून एक राक्षस महादेवाला मारण्यासाठी हत्तीच्या रूपात तिथे येऊन ठेपला. शिवाचे वाहन असलेल्या नंदीला हे समजले आणि त्याने शिवाचाच अंश असलेल्या वीरभद्राला याची कल्पना दिली. वीरभद्राने सिंहाचे रूप घेतले आणि त्याने हत्तीच्या रूपातील नील राक्षसाचा वध केला. त्यानंतर त्याने हत्तीचे कातडे शिवाला भेट दिले. शिवाने ते कातडे अंगावर पांघरले आणि तो अंधकासुराशी युद्ध करण्यास सज्ज झाला. अंगावर हत्तीचे कातडे पांघरलेले, सर्पाची आभूषणे अंगावर ल्यालेली, हातात त्रिशूळ धारण करून शिव आपल्या गणांसमवेत अंधकासुराशी युद्ध करू लागला. विष्णू आणि इतर देवगण शिवाच्या साहाय्याला धावून आले. परंतु घनघोर युद्ध सुरू झाले आणि इतर देवांना तिथून पळून जावे लागले. शेवटी शिवाने आपला त्रिशूळ अंधकासुराच्या पोटात खुपसला आणि त्याला उंच उचलून घेतले.

परंतु अंधकासुराच्या अंगातून रक्ताचे थेंब गळू लागले. ते थेंब जमिनीवर पडताच त्यातून एकेक अंधकासुराच्या रूपातील राक्षस निर्माण होऊ लागला. अशा रीतीने हजारो अंधकासुर तिथे निर्माण झाले. विष्णूने आपल्या सुदर्शनचक्राने हे इतर मायावी अंधकासुरांना ठार मारले. अंधकासुराच्या अंगातून रक्ताचे आणखी थेंब जमिनीवर पडू नयेत म्हणून शिवाने आपल्या तोंडातून ज्वाळा निर्माण केल्या आणि त्या ज्वाळेतून योगेश्वरी नावाची एक शक्ती निर्माण केली. त्याबरोबर इंद्र आणि इतर देवतांनीही आपापली शक्ती निर्माण करून ती शिवाच्या मदतीला तिथे पाठवली. ब्रह्मदेवाची शक्ती ब्रह्माणी, इंद्राची शक्ती इंद्राणी/ऐन्द्री, महेशाची माहेश्वरी, कार्तिकेयाची कौमारी, विष्णूची वैष्णवी, वराहाची वाराही, आणि यमाची शक्ती चामुंडा अशा या सात शक्ती देवता तिथे उत्पन्न झाल्या. त्यांना सप्तमातृका असे संबोधले जाऊ लागले. त्या शिव आणि अंधकासुर यांच्या युद्धात मध्ये आल्या आणि त्यांनी अंधकासुराच्या अंगातून होणारा रक्तस्राव आपल्या शक्तीने थांबवला. या लढाईत शेवटी अंधकासुराची शक्ती संपत आली आणि शिवाने त्याचा पराभव केला. अशा रीतीने या सप्तमातृकांचा उदय झाला. या मातृकांच्या हातात त्या त्या देवाची आयुधे होती. तसेच त्या मातृका त्या त्या देवतांच्या वाहनांवर बसून आलेल्या होत्या.

वराहपुराणात विस्तृतपणे मांडलेली ही आहे सप्तमातृकांची कथा. विविध पुराणांमधून मातृका, त्यांचा उगम, त्यांचे कार्य याबद्दल कथा वाचायला मिळतात. त्यात वराह, विष्णू, मत्स्य, कूर्म आणि देवीपुराणाचा समावेश होतो. तसेच शिल्पशास्त्रावर आधारित असलेल्या ‘सुप्रभेदागम’ या ग्रंथातही मातृकांचा उल्लेख केलेला आहे. परंतु वराहपुराणात वर उल्लेख केलेली अगदी विस्तृत कथा पाहायला मिळते. शिवाय इतर सर्व पुराणांत या मातृकांची संख्या सात सांगितलेली असताना वराहपुराण मात्र ही संख्या आठ असल्याचे सांगते. सर्वात आधी उल्लेखिलेली योगेश्वरी ही देखील एक मातृका आहे असे वराहपुराणात म्हटलेले आहे.

अंधकासुराशी साम्य दाखवणारी अशीच एक कथा मरकडेयपुराणात येते. त्यानुसार शुंभ नावाच्या राक्षसाशी अंबिकेचे युद्ध झाले. त्या युद्धात अंबिकेला या मातृकांनी मदत केली. कारण शुंभ दैत्याला वर मिळालेला होता की त्याच्या रक्ताचा थेंब जमिनीवर पडला की त्यातून अजून एक असुर निर्माण होईल. त्याच्या रक्ताचे थेंब या मातृकांनी वरच्यावर धरून ठेवले आणि शुंभाचा निपात केला. असुराचा मोठय़ा प्रमाणावर रक्तपात झाला आणि त्यामुळे तो हतबल होऊन पराभूत झाला. अगदी शिव-अंधकासुर युद्धासारखीच ही कथा आहे. अंधकासुराची कथा पुढे वाढवली आहे ती कूर्मपुराणाने. अंधकासुराच्या वधानंतर शिवाने भरव आणि या मातृकांना पाताळलोकात जाऊन वास्तव्य करायला सांगितले. त्यानुसार त्यांनी पाताळलोकात प्रयाण केले. परंतु भरव जो शिवाचाच अंश होता तो शिवामध्ये विलीन झाला. मातृकांना आता कोणताही आधार राहिला नाही आणि त्या विध्वंसक बनल्या. त्यांनी सर्वत्र विध्वंस करायला सुरुवात केली. शेवटी भरवाने नरसिंहाला पाचारण केले आणि त्या मातृकांना शांत करण्यास सांगितले. नरसिंहाने त्या मातृकांना शांत केले आणि तेव्हापासून त्यांचे स्वरूप हे उपकारक बनले. अशा विविध पुराणांतून या सप्तमातृकांचे आगळेवेगळे पलू आपल्याला पाहायला मिळतात. परंतु सर्वत्र एक मुख्य धागा समान दिसतो की कोणा दैत्याच्या निर्मूलनासाठी विविध सात देवतांनी आपल्या शक्ती महादेवाच्या मदतीसाठी निर्माण केल्या, आणि त्या पुढे सप्तमातृका म्हणून प्रसिद्ध झाल्या. अनेक अभ्यासकांनी मातृकांचा अभ्यास करताना त्यांचे उल्लेख अगदी ऋग्वेदापासून मिळतात असेही प्रतिपादन केलेले आहे. त्यावर मतमतांतरेदेखील आहेत. पण या सप्तमातृका पुढे मूर्तीरूपात आल्या आणि त्या प्रसिद्ध झाल्या. बदामीचे चालुक्य आणि त्यांच्या नंतरचे कल्याणी चालुक्य या सप्तमातृकांचे उपासक होते. त्यांच्या मंदिरस्थापत्यात सप्तमातृका पट्ट प्रकर्षांने पाहायला मिळतात. या मातृकांची संख्या सात असली तरी काही ठिकाणी ती आठ, १६, ३२ झालेली दिसते. या सातमातृकांच्या शिवाय माहेन्द्री, नारसिंही, वैनायकी, नारायणी, अंबिका, भद्रकाली, काली, योगेश्वरी यांचे शिल्पांकनदेखील पाहायला मिळते.

शक्ती हा शब्द लिहिताना ‘ती शक्ती’ या उद्देशाने वापरला असल्यामुळे, हा शब्द स्त्रीिलगी आहे हे वाचल्यावर लगेच समजते. परंतु मूर्ती घडवताना मात्र त्यांचे नेमके स्वरूप समजण्यासाठी त्या मूर्ती स्त्रीरूपात घडवल्या जातात. आकर्षक आणि नेमक्या सप्तमातृकांच्या मूर्ती विविध मंदिरांमधून दिसतात. त्या मूर्ती कशा तयार कराव्यात याचे काही एक शास्त्र आहे. शिल्पशास्त्राची माहिती देणाऱ्या विविध आगम ग्रंथांमधून या सप्तमातृकांच्या मूर्ती, त्यांची ठेवण, त्यांची वाहने यांची विस्तृत माहिती दिलेली आहे. त्यानुसार ब्रह्माणी ही ब्रह्मदेवासारखी, वैष्णवी ही विष्णूसारखी अशा रीतीने त्या त्या देवाच्या शक्ती या त्या त्या देवतेनुसार शिल्पांकित केल्या गेल्या पाहिजेत. ब्रह्माणी म्हटले की तिचे वाहन आणि तिची आयुधे हे ब्रह्मदेवासारखी असायला हवीत. मग ब्रह्माणी शिल्पांकित करताना स्त्रीप्रतिमा जी बसलेल्या स्थितीत आहे. जिने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. जिच्या वरच्या पाठीमागील हातात सुळा आणि अक्षमाला असून, तिचा उजवा हात अभय मुद्रेत तर दावा हात वरद मुद्रेत असावा. तिचे वाहन हंस दाखवलेले असावे आणि तिच्या मस्तकी जटामुकुट दाखवावा. हे असे पाहिले म्हणजे ही प्रतिमा ब्रह्माच्या शक्तीची आहे असे समजते. या सर्व मातृकांचा उजवा हात हे अभय मुद्रेत तर डावा हात वरद मुद्रेत दाखवलेला असतो. पाठेमागे असलेल्या दोन हातात आयुधे असतात. आणि पायाशी त्या त्या देवतेची वाहने असतात. वैष्णवी असेल तर पाठीमागच्या हातात शंख आणि चक्र तर पायाशी गरुड, डोक्यावर किरीट मुकुट. इंद्राणीच्या वरच्या हातात वज्र आणि शक्ती तर पायाशी वाहन हत्ती. तिचा रंग लाल तर डोक्यावर किरीट. विष्णूधर्मोत्तरपुराणानुसार तिला सहस्त्र नेत्र आणि तिचा रंग सोनेरी असावा.

चामुंडा शिल्पित करताना अत्यंत भयावह अशी दाखवलेली असते. केस अस्ताव्यस्त पिंजारलेले, शरीरावर मांस नाही. सगळ्या बरगडय़ा दिसताहेत, पायाचे स्नायू दिसतात. तिने मुंडक्यांचा मुकुट परिधान केलेला आहे. एका हातात मुंडके आणि दुसऱ्या हातात कपाल धरलेले. तिचे सुळे बाहेर आलेले दिसतात. कधी कधी तिच्या पोटावर विंचू शिल्पित केलेला असतो. मानवी शव हे तिचे वाहन असून ती त्यावर उभी दाखवतात. पूर्वकरणागम या ग्रंथानुसार तिचे तोंड उघडे दाखवतात आणि तिच्या डोक्यावर चंद्राची कोर दाखवतात. तिचे वाहन घुबड असते तर तिच्या ध्वजावर गरुड असतो. माहेश्वरी शिल्पांकित करताना तिच्या वरच्या दोन हातांत शूल आणि अक्षमाला असते, तिचा मुकुट हा जटामुकुट असतो तर तिचे वाहन नंदी असतो. विष्णुधर्मोत्तरपुराणानुसार तिला पाच तोंडे दाखवलेली असतात, त्या प्रत्येकाला तीन डोळे दाखवलेले असतात. तिचा रंग पांढरा असून तिच्या सहा हातात सूत्र, डमरू, शूल आणि घंटा तर पुढचे दोन हात वरद आणि अभय मुद्रेत दाखवलेले असतात. कुमार म्हणजेच कार्तिकेयाची शक्ती कौमारी शिल्पांकित करताना तिच्या दोन हातांत शक्ती आणि कोंबडा दाखवतात. उर्वरित हात अर्थातच अभय आणि वरद मुद्रेत असतात. वाराही दाखवताना तिचे तोंड वराहाचे असते. तिच्या दोन हातांत हल आणि शक्ती असते तर तिच्या मस्तकी करंडमुकुट असतो. विष्णुधर्मोत्तरपुराण या तपशिलात काही गोष्टींची भर घालते. त्यानुसार तिला सहा हात असून त्यात दंड, खड्ग, खेटक आणि पाश असतात. उर्वरित दोन हात अभय आणि वरद मुद्रेत असतात. पूर्वकरणागमानुसार तिच्या हातात शारंग धनुष्य दाखवलेले असते. तसेच अनेक ठिकाणी या सप्तमातृकांच्या शेजारी असलेला वीरभद्र हा वीणावादन करताना दाखवलेला असतो.

सप्तमातृकांची वाहने, आयुधे त्याचे मुकुट यांची माहिती असल्यावर आपल्याला विविध मंदिरांमधून शिल्पांकित केलेले सप्तमातृकापट्ट पाहताना त्यांची तपशीलवार माहिती होते. कर्नाटकात विविध मंदिरांमधून हे पट्ट पाहायला मिळतात. सागर या गावाजवळ असलेल्या केळदी या गावी असलेल्या मंदिरात सुंदर असा सप्तमातृका पट्ट दिसतो. महाराष्ट्रातसुद्धा मुख्यत्वे मराठवाडय़ात हे असे सुंदर आणि देखणे सप्तमातृकापट्ट मंदिरांतून पाहायला मिळतात. लातूर इथल्या मंदिरात असाच सुंदर सप्तमातृका पट्ट आहे. तसेच धर्मापुरी इथे असलेल्या किल्ल्यात पूर्वी एखादे मंदिर असावे. त्या मंदिरांचे अवशेष त्या किल्ल्यात तटबंदीमध्ये वापरलेले दिसतात. त्या अवशेषातच एक सुंदर सप्तमातृकापट्ट पाहायला मिळतो. सप्तमातृकांच्या शेजारी एका बाजूला वीरभद्र तर दुसऱ्या बाजूला गणपती कोरलेला असतो. गणपती हा गणांचा अधिपती असल्यामुळे या सप्तमातृकांच्या बाजूला त्याचे शिल्पांकन केलेले असते. सप्तमातृकांची सर्वात भव्य आणि मोठी शिल्पे आपल्याला वेरूळच्या लेणीमध्ये पाहायला मिळतात. वेरूळच्या कैलास लेणीत यज्ञशाळा म्हणून ठिकाण आहे. तिथे भव्य आकाराच्या सप्तमातृका कोरलेल्या पाहायला मिळतात. पण त्या खूपच भग्न झालेल्या आहेत. इथे त्या सप्तमातृकांसोबत राणी माणकावतीचे शिल्पसुद्धा आहे. इथल्या रामेश्वर लेणीत (लेणी क्रमांक २१) सप्तमातृकांचे भव्य शिल्प पाहायला मिळते. अतिशय देखण्या, डौलदार सप्तमातृका या लेणीमध्ये कोरलेल्या पाहायला मिळतात. मराठवाडय़ाचे वैभव असलेल्या औंढय़ा नागनाथ मंदिरावर असलेल्या सप्तमातृकांचा पट्ट अत्यंत देखणा आहे. काही शिल्पे भग्न झालेली दिसतात तरीसुद्धा त्यांचे सौंदर्य काही कमी होत नाही. इथे सप्तमातृकांच्या मधोमध गणपती शिल्पित केलेला आहे. खूप सुंदर अशा या मातृकांच्या पायाशी त्यांची वाहने आणि हातात विविध आयुधे दाखवलेली आहेत.

शेजारी बसलेल्या सप्तमातृका  हे सगळीकडे दिसतेच, परंतु महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्य़ात मुखेड गावी दाशरथेश्वर मंदिराच्या बाह्य़िभतींवर नृत्य करणाऱ्या सप्तमातृकांच्या मूर्ती आहेत. हे मंदिर कल्याणी चालुक्यांच्या राजवटीमधले आहे. अतिशय सुंदर अशा या मातृका काहीशा भग्न झालेल्या आहेत. मात्र त्यांचा आवेश, नृत्य करताना शरीराला आलेला बाक आणि त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव निव्वळ देखणे आहेत. सप्तमातृकांचे अगदी निराळे  या ठिकाणी पाहायला मिळते.

प्राचीन भारतीय संस्कृतीचा अभ्यास करताना काही गोष्टी प्रकर्षांने जाणवतात त्या म्हणजे एखादे गहन तत्त्वज्ञान सर्वसामान्य माणसांना सांगायचे असेल तर ते विविध कथांद्वारे सांगितले जाते. पुराणेसुद्धा आपल्याला अनेक देवदेवता, राक्षस यांच्या कथा सांगतात मात्र त्या पाठीमागे काही ना काही तत्त्वज्ञान सांगायचे असते. सप्तमातृकांच्याद्वारे वराहपुराण असेच एक मोठे तत्त्वज्ञान आपल्यासमोर मांडू पाहते आहे. त्यानुसार शिव, अंधकासुर किंवा या मातृका ही सगळी रूपके आहेत. ती आपल्या मनाच्या विविध अवस्थांची प्रतीके म्हणून पाहायला हवीत. शिव आणि अंधकासुराचे युद्ध म्हणजे आत्मविद्या किंवा आत्मज्ञान आणि अज्ञानरूपी अंधकार यांचे युद्ध समजले गेलेले आहे. तसेच हे पुराण पुढे असेही सांगते की या सात मातृका म्हणजे मानवी स्वभावाचे दोष सांगितलेले आहेत. योगेश्वरी हे काम अथवा इच्छा, महेश्वरी हे राग-क्रोध, वैष्णवी हे लोभ, ब्रह्माणी मद, कौमारी मोह, इंद्राणी मत्सर, वाराही असूया आणि चामुंडा हे पशुत्व याचे प्रतीक आहेत. ज्ञानरूपी शिवाने हे सगळे दोष आपल्या काबूत ठेवले आणि त्यामुळे त्याला अज्ञानरूपी अंधकासुरावर विजय मिळवता आला. मनाचे हे सगळे कंगोरे जरी असले तरी ते काबूत ठेवून योग्य दिशेने त्यांचा वापर केला तर अज्ञानरूपी अंधकाररूपी अंधकासुराचा नायनाट करणे सर्वसामान्य व्यक्तीलादेखी सहज शक्य असते. गहन तत्त्वज्ञान सरळ सोप्या गोष्टींमधून लोकांसमोर मांडायचे पुराणांचे हे कसब म्हणूनच वाखाणण्याजोगे आहे.

(संदर्भ : एलिमेंट ऑफ हिंदू आयकॉनोग्राफी- टी. ए. गोपीनाथ राव)

देवी विशेष
जय पाटील – response.lokprabha@expressindia.com

देवदेवतांच्या आपल्या मनातील कल्पना कशा तयार झाल्या, याचा मागोवा घेताना आपण विविध चित्रे, मूर्ती, शिल्पांपर्यंत पोहोचतो. देशाच्या निरनिराळ्या भागांत आढळणाऱ्या पारंपरिक कलाप्रकारांत शक्तीची अर्थात देवीची विविध रूपे प्रतिविंबित झालेली दिसतात. स्थल-कालानुसार त्यात बदलही होत गेल्याचे दिसते.

देवी कधी एखाद्या गुंफेत रेखाटलेल्या प्राचीन चित्रांतून दर्शन देते, कधी एखाद्या पुरातन मंदिराच्या गाभाऱ्यात विराजमान झालेली दिसते, कधी एखादे पट्टचित्र व्यापून उरते, कधी लघुचित्रांमधील नजाकतदार आकृतींतून लक्ष वेधून घेते, कधी ती धातूच्या डौलदार मूर्तीतून प्रकट होते, कधी सांकेतिक यंत्राच्या रूपात तर कधी एखाद्या नवचित्रकाराच्या कुंचल्यातून उमटते. शक्तिरूपाविषयीच्या मानवी संकल्पना कशा विकसित होत गेल्या असाव्यात, याचा अजमास बांधण्यासाठी ही चित्र-शिल्पे आपल्याला साहाय्य करतात.

देवीविषयीच्या श्रद्धा-परंपरांवर ‘मरकडेय पुराणा’तील ‘देवीमाहात्म्या’चा प्रभाव सर्वाधिक दिसतो. देवीच्या सध्या उपलब्ध असलेल्या अनेक चित्र-शिल्पांतून याच माहात्म्यातील कथा कथन केलेल्या दिसतात. सृष्टीच्या तीन अवस्थांचे वर्णन करणाऱ्या देवीमाहात्म्याच्या पहिल्या भागात सृष्टीचा रचनाकार ब्रह्माचा वध करण्यासाठी मधु आणि कैतभ हे दोन दैत्य निघालेले असतात. ब्रह्मा विष्णूला रक्षणाची विनंती करतो. मात्र महामायेच्या प्रभावामुळे विष्णू निद्रिस्त असतो. महामायेने आपला प्रभाव दूर करावा, यासाठी ब्रह्मा तिची आराधना करतो. विष्णू निद्रेतून जागा होतो आणि दैत्यांना पराभूत करतो. दुसऱ्या भागात पाशवी शक्तींच्या रूपात महिषासुर दाखवण्यात आला आहे. त्याचा अडथळा दूर करण्यासाठी देवी महिषासुरमर्दिनीच्या रूपात अवतीर्ण होते. तिच्या विकट हास्याने धरणी हादरते. त्यामुळे चिडलेला महिषासुर वाघ, हत्ती आणि म्हशीचे रूप घेऊन देवीवर आक्रमण करतो. तरीही देवी त्याचा वध करते. तिसरा भाग आहे शुंभ निशुंभाच्या पराभवाचा. यात असुरांनी सर्व रत्नांवर ताबा मिळवलेला असतो, मात्र सर्वात मौल्यवान रत्न म्हणजे देवी, हे त्यांच्या लक्षात येते. असुरांना देवी मिळावी, म्हणून ते प्रयत्न सुरू करतात. युद्धात जो माझा पराभव करील, त्याला मी प्राप्त होईन, असे आवाहन देवी करते. तिला आणण्यासाठी चंड आणि मुंड या दैत्यांना पाठवण्यात येते. मात्र देवी कालीचे उग्र रूप धारण करते. तिच्या हाती छाटलेले मुंडके आणि तलवार असते. गळ्यात मानवी मुंडक्यांची माळ असते. तिची त्वचा काळसर झालेली असते. देवी त्यांना पराभूत करून अजिंक्य राहते. चंड-मुंडाला पराभूत केल्यामुळे ती चामुंडा म्हणूनही ओळखली जाते.

या कथा कधी लघुचित्रांच्या तर कधी शिल्पांच्या रूपात समोर येतात. यातील महिषासुरमर्दिनीचे रूप अनेक चित्र-शिल्पांत दिसते. सहाव्या शतकातील महिषासुरमर्दिनीचे शिल्प महाराष्ट्रातील घारापुरी येथे आढळले आहे. बेसाल्ट खडकातील हे शिल्प भग्नावस्थेत आहे. मध्य प्रदेशात आढळलेले नवव्या शतकातील शिल्प मात्र उत्तम स्थितीत आहे. वालुकाश्मात कोरलेल्या या शिल्पातील देवीला चार भुजा आहेत, त्यापैकी एका हातात ढाल तर दुसऱ्या हातात तलवार आहे. ती महिषासुरावर आरूढ झाली असून आकाशातून देव हे दृश्य पाहात आहेत. अठराव्या शतकाच्या पूर्वार्धातील गुलेर शैलीतील एका चित्रात देवी महिषासुराचा वध करताना दिसते. यात अष्टभुजा देवी वाघावर आरूढ होऊन महिषासुरावर त्रिशूळ उगारलेल्या स्थितीत दिसते. तिचा वाघ बैलाच्या पाठीवर उभा आहे आणि त्या बैलाचे तिने छाटलेले मुंडके बाजूलाच पडलेले आहे. तिच्या हातांत आसुड, तलवार, ढाल, त्रिशूळ, गदा, घंटा, धनुष्य अशी विविध अस्त्रे आहेत. ही सर्व अस्त्रे तिने महिषासुरावर रोखलेली आहेत. सर्व देव आकाशातून हे दृश्य पाहताना दिसतात. १७७० ते १७८० दरम्यानच्या एका चित्रातही हे दृश्य आहे. बंगालमध्ये आढळलेल्या एका शिल्पात महिषासुराचा वध अतिशय कलात्मकतेने साकारण्यात आला आहे.

कर्नाटकात आढळलेल्या १०व्या शतकातील शिल्पात दुर्गा आसनस्थ दिसते. तिला चार भुजा असून त्यांपैकी एका हातात तलवार आहे. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यातील एका चित्रात दुर्गेने शुंभ, निशुंभाशी केलेल्या युद्धाचे दृश्य चितारण्यात आले आहे. यातही दुर्गा अष्टभुजा रूपात असून वाघावर स्वार झाली आहे. युद्धातील तीन प्रसंग एकाच चित्रात दर्शवण्यात आले आहेत. महिषासुरवधाच्या चित्रात आणि या चित्रात देवीच्या हाती असलेली अस्त्रे जवळपास सारखीच आहेत. फक्त यात एका चित्रात देवी शंख फुंकताना दिसते. हे चित्र पंजाब हिल्स शैलीतील आहे.

याच ‘र्मकडेय पुराणा’त असलेल्या ‘भद्रकाली माहात्म्य’ किंवा ‘दारिका वधम्’ या भागात दारिकासुराचा वध करण्यासाठी देवीने भद्रकालीचे रूप घेतल्याची कथा आहे. त्यावर आधारित चित्रात देवी दारिकासुराचा वध करून त्याच्या पाठीवर उभी राहिलेली दिसते आणि ब्रह्मा, विष्णू आणि शिव तिचे गुणगान करताना दिसतात. १६६०-७०च्या दरम्यानचे हे चित्र बासोहली शैलीतील आहे.

अष्टलक्ष्मींपैकी एक असलेली गजलक्ष्मी देशात विविध शिल्पांत आणि चित्रांत पाहायला मिळते. तंजावर शैलीतील चित्रांत ती कमळावर पद्मासनात बसलेली दिसते. चार भुजा असलेल्या या देवीच्या वरच्या दोन हातांत कमळाची फुले आहेत. दोन्ही बाजूंना हत्ती आहेत. औरंगाबादमधील पितळखोरा येथे आढळलेल्या दुसऱ्या शतकातील शिल्पात गजलक्ष्मी कमळावर आसनस्थ दिसते. तिच्या दोन्ही बाजूंना हत्ती उभे असून ते जलाभिषेक करताना दिसतात. गुजरातमध्ये आढळलेल्या बाराव्या शतकातील शिल्पात मात्र तिने वरील दोन हातांमध्येच हत्ती पेललेले दिसतात. तिसऱ्या शतकातील नाण्यावर आढळलेली गजलक्ष्मीची प्रतिमा सध्या उपलब्ध असलेल्या प्रतिमांपैकी सर्वात जुनी प्रतिमा आहे. कोकण आणि गोव्यात ही देवी गजान्तलक्ष्मी, भाऊका, केळबाई या नावांनी ओळखली जाते. ही समृद्धीची देवता आहे. तिच्या दोन्ही बाजूंना असलेल्या हत्तींच्या सोंडेतून जलाभिषेक होताना दिसतो. त्यामुळे काही भागांत तिची पर्जन्यदेवता म्हणूनही आराधना केली जाते.

काळाच्या विविध टप्प्यांत मौखिक परंपरा, लिखित साहित्यातून देवीची विविध रूपे भक्तांसमोर येत राहिली. संपत्ती, समृद्धी, विद्या, वंशवृद्धी, पर्जन्य, दुष्ट शक्तींपासून रक्षण अशा विविध उद्देशांनी कित्येक शतके शक्तीच्या या रूपांची पूजा केली गेली. त्याचे प्रतिबिंब विविध कलांतून उमटत राहिले. देवीची रूपे कलात्मक स्वरूपात मांडून अनेक अनामिक कलाकारांनी कलेचा इतिहास समृद्ध केला आहे.

गावोगावची देवीस्थाने

अर्जुन नलवडे – response.lokprabha@expressindia.com

तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची अंबाबाई, नाशिकची सप्तशृंगी, माहूरची रेणुकामाता या शक्तिपीठांच्या पलीकडे राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये भक्तांमध्ये लोकप्रिय असलेली देवी मंदिरं आहेत. त्यांच्यामागे असलेल्या आख्यायिका, प्रथा-परंपरा, स्थानमाहात्म्य यातही प्रचंड सांस्कृतिक वैविध्य आहे.

कोल्हापूरची भुजाईदेवी

कोल्हापूर नैसर्गिक आणि धार्मिकदृष्टय़ा संपन्न आहे. अनेक ऐतिहासिक मंदिरे, त्यांच्या प्रथा-परंपरा, यात्रा-उत्सव यांची एक वेगळी खासियत इथे पाहायला मिळते. येथील देवीच्या वैशिष्टय़पूर्ण मंदिरांच्या यादीमध्ये ‘टिक्केवाडीची भुजाईदेवी’ या मंदिराचा समावेश होतो. कोल्हापूरपासून सुमारे ४५ किलोमीटर अंतरावर हे मंदिर वसलेले आहे. घनदाट झाडी, वळणावळणाचे रस्ते, डोंगरदऱ्या आणि सभोवताली पसरलेली हिरवाई प्रवास आनंददायी करते. चारही बाजूंनी असलेल्या डोंगरांमध्ये भुजाईदेवीचे मंदिर आहे. भुजाईदेवीची आख्यायिका, प्रथा-परंपरा, यात्रा, नैवेद्य आणि कौल देण्याची विशिष्ट पद्धत महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.  मंदिराच्या विस्तीर्ण पटांगणात दोन दीपमाळा आणि दोन तुळशी वृंदावनं आहेत. मंदिराच्या आवारात काही मूर्तींचे भग्नावशेष ठेवलेले दिसतात.

मंदिराबद्दल पुजारी अनिल गुरव सांगतात,  असे सांगितले जाते की पूर्वी देवी डोंगरावर रहात होती. एक धनगर डोंगरावर जाऊन दररोज देवीची पूजाअर्चा करत असे. मात्र, वृद्ध झाल्यानंतर डोंगरावर जाऊन देवीची सेवा करणे त्याला जमेना. तेव्हा त्याने देवीला विनंती केली की, मला डोंगरावर येऊन पूजा करणे अवघड जात आहे. तेव्हा तूच पायथ्याशी येऊन राहा. देवीने त्याची विनंती मान्य केली आणि सांगितले की, तू पुढे चालत राहा, मी तुझ्या मागून येते; पण मागे वळून पाहू नको. देवीने शेळीचे रूप धारण केले आणि पुजाऱ्याच्या मागे चालू लागली. मात्र, काही अंतरावर गेल्यानंतर पुजाऱ्याने मागे वळून पाहिले. तेव्हा देवीने त्याच ठिकाणी ठाण मांडले. तेव्हापासून देवीचे मंदिर डोंगराच्या मध्ये आहे. या भुजाईदेवीची मूर्ती किंवा त्या मूर्तीचे छायाचित्र संपूर्ण गावात कुठेच दिसत नाही. कोणाच्याही घरात देवीची मूर्तीही नाही. कारण देवीचे छायाचित्र काढले तर ते काढणाऱ्याला त्रास होतो असे मानले जाते.

पूर्वीचे मंदिर कायम ठेवून त्याच्याच भोवती १९९५ साली मोठे मंदिर उभारण्यात आले. देवीची त्यापूर्वीची मूूर्ती कायम आहे. दसरा तसंच माघ पौर्णिमेला देवीचा उत्सव साजरा केला जातो. यात्रेत देवीला दागिन्यांनी सजविले जाते. सनई-चौघडय़ांच्या गजरात, चांदीच्या रथातून देवीची मिरवणूक काढली जाते. यात्रेमध्ये सासणकाठय़ा नाचविल्या जातात. त्यामध्ये वेळूच्या काठीला देवीचा झेंडा लावतात. हलगीच्या तालावर तो झेंडा नाचविला जातो. लेझीम, दांडपट्टा अशा मैदानी खेळांमधून गावातील युवक शक्तीप्रदर्शन करतात.

नवरात्रीमध्ये गावात प्रत्येक घरात किमान एक किंवा दोघे जण नऊ दिवस उपवास करतात. हे उपवासकर्ते नऊ  दिवस मंदिरातच राहतात. या उपवासात फक्त फलाहार घेतला जातो. अशा कडक उपवासातून देवीची शक्ती आपल्याला मिळते, असा लोकांचा समज आहे. मंदिराच्या बाजूलाच भोंगिराचा डोंगर प्रसिद्ध आहे. तेथील गुहांमध्ये महादेवाची पिंडी आहे.  नवरात्रीमध्ये उपवास करणारे भक्त या पिंडीच्या दर्शनासाठी सातव्या दिवशी हा डोंगर चढतात. मंदिराच्या बाजूला जमिनीवर अंगठय़ाच्या आकाराचा मोठा ठसा उमटलेला आहे. त्याला ‘भीमाचा अंगठा’ असे म्हटले जाते. त्या संदर्भात अशी आख्यायिका सांगितली जाते की, पांडव येथील डोंगरदऱ्यांमधून जात होते तेव्हा भीमाने त्याचा अंगठा कापून इथे टाकला. खरे तर डोंगराची एक उंच बाजू अंगठय़ासारखी वरच्या दिशेला उचलली गेली आहे. या मंदिरातील मूर्तीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला तांदळाचे दाणे चिकटवून कौल लावला जातो. मूर्तीच्या डाव्या बाजूचे दाणे खाली पडले तर कौल नकारात्मक आणि उजव्या बाजूचे दाणे पडले तर सकारात्मक असे समजले जाते. गावातील मुलगी लग्न करून सासरी गेली की, मुलीच्या नवऱ्याला तीन वर्षांतून एकदा भुजाई देवीला बकऱ्याचा नैवेद्य द्यावा लागतो, अशी परंपरा आहे.  गावातील कोणतेही लग्न देवीला कौल लावल्याशिवाय होत नाही. गावचे पोलीस पाटील आणि मंदिराचे पुजारी नेताजी गुरव सांगतात, भुजाईदेवी इथले ग्रामदैवत आहे. टिक्केवाडीचे ग्रामस्थ दर तीन वर्षांनी ‘गुळं’ काढतात. त्या काळात कुणीही घरामध्ये नाही, तर निसर्गाच्या सान्निध्यात राहायचे. धनगरांप्रमाणे भटकंती करायची. पशुपक्ष्यांची लहान मुलांना ओळख करून द्यायची. वनौषधींचा शोध घ्यायचा, असे हेतू या प्रथेमागे आहेत. माघवारीनंतर येणाऱ्या पौर्णिमेपासून ही गुळं काढली जातात. या प्रथेच्या निमित्ताने सर्वाचे एकत्र राहणे होते. आपापसातील वाद निवळतात.  लोककलांच्या माध्यमातून मनोरंजन होते.

या प्रथेमध्ये देवीच्या नावाचा जयघोष करत गावकऱ्यांची पहाट उजाडते. राहण्यासाठी शेतशिवारात जी पालं उभारली आहेत त्यालाही मंडळी ‘गुळं’ म्हणतात. सारवलेली जमीन.. दगडाच्या चुलीतील विस्तवावर रटरट फुगणारी भाकरी.. कढईमध्ये शिजणाऱ्या भाजीचा खमंग गंध आणि शिंकाळ्यावर झुलत असलेली दह्य़ाची हंडी हे चित्र प्रत्येक पालामध्ये पाहायला मिळते. दिवसभर शिणलेले जीव रात्री शाहिरी, ओव्या, गीते, भजन आदी कलांमध्ये रमून जातात. विशेष म्हणजे बाहेरचे पाहुणे-नातेवाईक एक-दोन दिवस गुळात राहण्यासाठी आवर्जून येतात. देवीला कौल लावून गावकरी ‘गुळं’ काढतात आणि पुन्हा कौल दिला की, आपापल्या घरी लोक परतात. पूर्वी या प्रथेदरम्यान लोक गावापासून दूर जंगलात असलेल्या बोकाचा वाडा, बसुदेवाचा वाडा, हंडय़ाचा वाडा या धनगर वस्तीवर राहायला जात होते; पण अलीकडे शेतशिवारात राहण्याची प्रथा अवलंबली जात आहे. या प्रथेदम्यान घरात झाडलोट करणे, चूल पेटवणे-जेवण करणे, दिवा पेटवणे आणि घराला कुलूप लावणे अशा गोष्टी वज्र्य मानल्या जातात. तरीही या काळात चोरी अजिबात होत नाही. शिवारात २५-३० कुटुंबांसाठी एकच पाल उभारले जाते. पालातील सगळे लोक रात्री एकाच पंक्तीला बसून वनभोजनाचा आनंद घेतात. अशा या भुजाईदेवीच्या दर्शनासाठी गावाला एकदा तरी नक्कीच भेट द्यायला हवी.

खान्देशी कानबाई

कानबाई चालनी गंगेवरी व माय

साखर पेरत चालनी..

कानबाई चालनी गंगेवरी

कानबाई बैसली चौरंगवरी व माय

हिरवी पैठणी नेसली..

हिरव्या बांगडय़ा हाती व माय

गई सोन्याची बचट.. कानबाई चालनी गंगेवरी

हे अहिराणी भाषेतील गाणं सध्या यू-टय़ूबवर खूप गाजत आहे. अशा गाण्यांच्या माध्यमातून खान्देशातील ‘कानबाई’ देवीची महती महाराष्ट्रभर पसरली आहे. ही ‘कानुबाई किंवा कानबाई’ संपूर्ण खान्देशाचे आराध्यदैवत मानले जाते. श्रावण महिन्यातील नागपंचमीच्या सणाला या देवीचा उत्सव मोठय़ा थाटामाटात साजरा केला जातो.

स्थानिक नागरिक असे सांगतात की, कानबाई येण्यापूर्वी घराची रंगरंगोटी केली जाते. घरातील भांडी, पडदे, अंथरूण-पांघरूण धुतले जाते. कामानिमित्त बाहेर असेलेले लोक आवर्जून गावी येतात. एखाद्या घरात भांडण होऊन दुरावलेले नातेवाईकदेखील एकत्र येतात. कानबाईचा देश म्हणजेच खानदेश अशी व्युत्पत्ती सांगून कानबाईच्या नावावरूनच खान्देश हे नाव पडले, असेही सांगितले जाते. खान्देशी लोक श्रीकृष्णाला मानतात. त्याच्या कान्हा या नावावरून कानबाई हे नाव घेतले असावे, अशीही शक्यता वर्तवली जाते. खरे तर ही देवी निसर्गदेवता म्हणून प्रचलित आहे. या देवीचे वैशिष्टय़ म्हणजे इतर देवींप्रमाणे कानबाई देवी कोणत्या पाषाणात किंवा मूर्तीमध्ये दिसत नाही, तर नारळाच्या म्हणजेच श्रीफळाच्या रूपात प्रत्येक घरात विराजमान होते. एका कलशामध्ये नारळ ठेवून त्याला पिवळा, लाल आणि गुलाबी पितांबर नेसवला जातो. मोत्याची नथ, मंगळसूत्र, हार, हिरवा चुडा अशा दागिन्यांनी सजवून आंब्याची पानांनी, रानफुलांच्या माळांनी तयार केलेल्या देव्हाऱ्यात कानबाईची स्थापना केली जाते, तर कुठे केळीचे खांब बांधलेल्या चौरंगावर स्थापना केली जाते. रात्रभर देवीपुढील समई तेवत ठेवली जाते. आणि देवीसमोर अहिरणी भाषेतील कानबाईच्या प्रेमाची गीते गायली जातात. महिला देवीची गाणी गात, नृत्य करत, फुगडय़ा खेळत जागरण करतात. कानबाईच्या नावाने उपवास केला जातो. या काळात वातावरणात उत्साह भरून राहतो.

कानबाईला ‘रोट’चा प्रसाद केला जातो. हे रोट गव्हाचे किंवा तांदळाचे असतात. त्याबरोबर गोड खिरीचा नैवेद्य असतो. रोटांसाठी दळलेले जाडेभरडे पीठ संपेपर्यंत घरामध्ये दुसरा पदार्थ केला जात नाही. साधारणपणे दोन-तीन दिवस हा रोटचा नैवेद्य घरातील लोक खात असतात. एकत्र कुटुंब असेल, तर रोट तयार करण्यासाठी घरातील लहानमोठय़ा सर्व सदस्यांची संख्या मोजून प्रत्येकाची सव्वा मूठ असे धान्य म्हणजेच गहू आणि चण्याची डाळ घेऊन जाडीभरडे दळून आणले जाते. त्यापासून रोट तयार केले जातात. या रोटांसोबत ‘आलन-कालन’ नावाची वेगवेगळ्या पालेभाज्यांची भाजी केली जाते. पुरणपोळीचा नैवेद्य देवीला दाखविला जातो. सकाळी आणि संध्याकाळी केल्या जाणाऱ्या रोटांना वेगवेगळी नावे आहेत. सकाळच्या रोटांना ‘उगतभानूचे रोट’ म्हणतात. हे रोट तयार करण्यासाठी घरातील स्त्रीला भल्या पहाटे उठावे लागते. कारण, सूर्य उगविण्यापूर्वी रोट तयार करावे, असा संकेत आहे. हे रोट कुणीही खाऊ शकतो. या रोटांवर पुरणाचे दिवे पेटवून देवीची पूजा केली जाते. मात्र, सकाळचे रोट हे दिवसभरात संपवायचे, अशी प्रथा आहे. संध्याकाळी केलेले रोट फक्त कुटुंबातील सदस्यांनी आणि नातेवाईकांनीच खावे, असाही संकेत आहे. ‘रोट’ ही प्रथा सुरू राहण्यासाठी घरात पुत्रप्राप्ती होणं आवश्यक मानलं जातं.

पूर्वी गावचे पाटील आमंत्रणं पाठवत. ज्यांना कापलेले नाही, भाजलेले नाही, अंगावर एकही डाग नाही, अशाच स्त्रियांची त्यातून निवड केली जात असे. स्त्रियांना विविध दागिन्यांनी सजवून त्यांची पूजा केली जात असे. पुरणपोळ्यांचा नैवेद्य दाखविला जात असे. बैलगाडी भरून भात केला जात असे. हा सर्व स्वयंपाक नदीवरून पाणी आणून केला जात असे. पुजेसाठी निवडलेल्या सुवासिनींनी स्पर्श केलेला नारळ पूजेत वापरला जात असे. कानबाई नव्याने बसवायची आहे, असे लोक चाळीसगावला कानबाईच्या मंदिरात नारळ घेऊन जातात आणि तो तेथील मूर्तीला वाहून परत आणतात. ‘कानबाई’ देवी खरे तर एकच दिवस घरामध्ये असते. दुसऱ्या दिवशी तिचे विसर्जन केले जाते. या विसर्जन मिरवणुकीत स्त्रिया आपल्या डोक्यावर कानबाईचा चौरंग घेतात. कानबाईची अहिराणी भाषेतील गाणी गात नृत्य करतात. त्यामध्ये पुरुषदेखील आवर्जून सहभागी होतात. रस्त्यावरून ही मिरवणूक निघत असताना घरातील स्त्रिया कानबाईला ओवाळतात. कानबाईच्या विसर्जनानंतर घरामध्ये उरलेले रोट, खीर, पुरणपोळी हा नैवेद्य किंवा प्रसाद पौर्णिमेपर्यंत संपवावा, असा संकेत आहे.

सात वाहनांवरील माढेश्वरी देवी

सोलापूरमध्ये माढय़ाचा किल्ला प्रसिद्ध आहे. किल्ल्याचे बुरूज आजही दणकट आहेत. मात्र, किल्ल्यामध्ये पाहण्यासारखे काहीही शिल्लक राहिलेले नाही. मात्र, सुमारे ३०० मीटर अंतरावर माढेश्वरीचे मंदिर आहे. माढेश्वरी गावचे ग्रामदैवत असल्याने तालुक्याला माढा असे नाव मिळाले, असे येथील ज्येष्ठ नागरिक सांगतात. मंदिराला चारही बाजूंनी मोठी तटबंदी आहे. मोठमोठय़ा दगडी शिळांचे मंदिर उभे केलेले आहे. मंदिराच्या तटबंदीच्या आतील बाजूस छोटय़ा-छोटय़ा कमानी असलेल्या दगडी खोल्या आहेत. त्याही भक्कम बांधलेल्या आहेत. मंदिराच्या आसपास मारुती, गणेश, राम आदी देवांची मंदिरे उभारलेली आहे. कोरीव दगडात ही मंदिरे उंच उभी आहेत. मंदिराच्या उत्तर दिशेच्या दरवाजासमोर रावराजे निंबाळकरांची समाधी आहे. तसेच दक्षिण दिशेला दोन पुजाऱ्यांची समाधी आहे. मात्र, या समाधी अलीकडील काळात बांधलेल्या आहेत, अशी माहिती मंदिराच्या पुजाऱ्यांनी दिली.

मंदिराला तीन शिखरे आहेत. उजव्या सोंडेचा चिंतामणी नावाचा गणपतीदेखील या परिसरात पाहायला मिळतो. तसेच काही दुर्मीळ वीरगळही येथे आढळतात. माढेश्वरी देवीची पूजाअर्चा करणारे बाळू पुजारी सांगतात की, माढेश्वरीचे मंदिर १६६७ साली रावराजे निंबाळकर यांनी बांधले. हेमाडपंथी स्थापत्यशैलीतील हे मंदिर आहे. महाराष्ट्रावर चाल करून आलेला अफजल खान रावराजे निंबाळकरांचा पाठलाग करत होता. रावराजे एका छोटय़ाशा मंदिरात लपून बसलेले होते. त्या मंदिरातील देवीला त्यांनी साकडे घातले की, मला या संकटातून वाचव. मी तुझे मंदिर बांधेन. पुढे रावराजे अफजल खानाच्या संकटातून सुखरूप बाहेर पडले. मग त्यांनी माढेश्वरी देवीचे मंदिर उभारले. पूर्वीचे मंदिर छोटे होते. मंदिराच्या बाजूला कल्लोळ (विहीर) आहे. त्यातून देवी प्रकटली आहे. माढय़ाच्या किल्ल्यातून मंदिराकडे जाण्यासाठी एक भुयारी मार्ग होता. तो फक्त स्त्रियांसाठी उपयोगात असे. आता ते भुयार बंद करण्यात आले आहे.

या देवीची अशी आख्यायिका सांगितली जाते की, फार वर्षांपूर्वी माढा गावातील शेतकरी रोज नियमितपणे तुळजापूरच्या भवानी देवीला नैवेद्य घेऊन जात असे. अनेक वर्षे त्याने असे केले. मग तो देवीला म्हणाला की, आता खूप थकलो. इथपर्यंत येऊन तुझी सेवा करणे मला जमणार नाही. देवी प्रकट झाली अन् म्हणाली, आता मीच तुझ्याबरोबर येते. तू चालायला सुरुवात कर; पण मागे वळून पाहू नकोस. शेतकरी ज्या रस्त्याने प्रवास करत होता त्या मार्गात मनकर्णिका नावाची नदी होती. तो शेतकरी चालून-चालून थकल्यामुळे नदीत उतरला. त्याने थंड पाण्याने तोंड, हात-पाय धुतले आणि मग त्याने मागे वळून पाहिले. देवीने घातलेली अट शेतकऱ्याकडून मोडली गेली. तेव्हा देवी अदृश्य झाली. त्यानंतर त्याच ठिकाणी पुजाऱ्याने देवीचे मंदिर बांधले. तेव्हापासून देवी या ठिकाणी वास्तव्य करून गावाचे संरक्षण करत आहे, असे गावकरी सांगतात.

यात्रेची माहिती देताना परमेश्वर पुजारी सांगतात की, कोजागरी पौर्णिमेला माढेश्वरी देवीची यात्रा भरते. या वेळी संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक देवीच्या दर्शनाला येत असतात. माढेश्वरीची घोडा, हत्ती, सिंह, नंदी, हरीण, मोर, काळवीट अशी सात वाहने आहेत. ही सगळी वाहनं फायबर, भुसा आणि लाकडांपासून तयार केलेली आहेत. रात्री १२ वाजता या वाहनांवरून देवीचा छबिना (मिरवणूक) काढला जातो. प्रत्येक वाहनाचा मान हा विशिष्ट समाजाला दिलेला आहे. त्यामध्ये हत्तीचा मान माळी समाजाला, घोडा, मोर, काळवीटाचा मान मराठा समाजाला, सिंह, नंदी आणि हरिण याचा मान धनगर समाजाला देण्यात आला आहे. हे सर्व जण आपापल्या वाहनात देवीचे प्रतिरूप घेऊन वाजतगाजत, नाचत मातंगाई मंदिरात जातात. माढेश्वरी देवीच्या मंदिराच्या समोरच उत्तरेला शेतामध्ये मातंगाई देवीचे छोटेखानी मंदिर आहे. तेथे असलेल्या मातंगाई देवीच्या मूर्तीला देवीला हिरवी साडी नेसवलेली असते. मातंगाई देवी महार-मांग समाजाची देवी आहे. पूर्वी या समाजातील लोकांना मंदिरात प्रवेश नव्हता. या संदर्भात असे सांगितले जाते की, तरीही मातंगाई देवी ही माढेश्वरी देवीला भेटायला जात असे. म्हणून मुख्य मंदिरासमोरच मातंगाई देवीचे मंदिर उभे केलेले आहे. त्यामुळे देवीचा छबिना मातंगाईच्या मंदिरात जाऊन परत येतो. नवरात्रामध्ये देवीची पूजाअर्चा केली जाते. भोगी (देवीची विशिष्ट पूजा) झाल्याशिवाय कोणतेही शुभकार्य किंवा लग्न केले जात नाही. देवीसमोर होमहवन करण्यासाठी कुंड आहे.  देवीचे कपडे धुणे, मंदिराची साफसफाई आणि इतर कामे रत्ना लिंगाप्पा पवार आणि शंकर पंढरीनाथ रणपिसे करतात. त्यांना देवीची सेवा केल्याबद्दल महिन्याला १०० पगार दिला जातो. देवीच्या सेवेबद्दल त्यांना मंदिरात आलेले भक्त बाजरी, ज्वारीचे पीठ, तांदूळ आणि फळे त्यांच्यासमोर असलेल्या परडीत टाकतात. हे त्यांचे वंशपरंपरागत काम आहे.

रत्नाबाईंना सांगतात की, मंगळवारी आणि शुक्रवारी इथे भरपूर भक्त येतात. त्यांच्याकडून जे मिळते, तेच आम्ही खातो. देवीची सेवा करायला मिळते, हे आमचे भाग्य आहे. माझ्यानंतर माझा थोरला मुलगा देवीची सेवा करणार आहे. हे काम वंशपरंपरेनुसार पुढे चालत राहणार आहे.

मंदिराच्या मागील बाजूला दगडावर देवीची पाऊलखूण आहे. यापूर्वी अनेक संशोधकांनी मंदिर, परिसरातील वीरगळ आणि किल्ला पाहण्यासाठी भेटी दिलेल्या आहेत. वेळ काढून माढेश्वरी देवीचे पुरातन मंदिर आणि आसपासची मंदिरे, विशेष म्हणजे माढय़ाचा किल्ला पाहण्यासाठी भेट जरूर द्यावी.

तांबव्याची वज्रेश्वरी देवी

दूरवर पसरलेले माळरान, काटेरी झुडपे, मध्येच कुठेतरी उसाची शेती आणि बाजूलाच वाहणारी निरा नदी पाहत पाहत आपण तांबवे गावात प्रवेश करतो. माळशिरस तालुक्यातील अकलूजपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेले हे गाव साधारणपणे अडीच-तीन हजार लोकसंख्येचे आहे. गावात प्रवेश करताना लक्षात येते की, वाटेत जी छोटी वस्ती लागते, त्या वस्तीमध्ये प्रत्येक घरासमोर देवीचे छोटेसे मंदिर आहे. लाल, पिवळा, हिरवा, केशरी अशा रंगांनी रंगविलेली मंदिरे चटकन प्रवाशांच्या नजरेत भरतात. साधारणपणे सहा फूट उंच आणि सहा फूट लांब असणाऱ्या या मंदिरांमध्ये रेणुकामाता, लक्ष्मीआई, मरीआई आदी देवींच्या मूर्ती पाहायला मिळतात. या मूर्ती दगडाच्या आहेत. यल्लमा, लक्ष्मी, पद्मावती आदी देवींची छायाचित्रे इथे लावलेली दिसून येतात. मूर्तीला हिरवी साडी नेसवलेली असते. तिचा मळवट (कपाळ) कुंकवाने लेपलेला दिसतो. त्रिशूळ, डमरू आदी गोष्टीही त्या मंदिरात दिसून येतात. या वस्तीतून उजवीकडे वळण घेतले की, ५०० मीटर अंतरावर आपल्याला निरा नदीचे मोठे पात्र आणि नदीला लागूनच हेमाडपंथी शैलीतील वज्रेश्वरी देवीचे दगडी मंदिर दिसू लागते.

मंदिराचे ठळक वैशिष्टय़ म्हणजे आपल्या देशात वज्रेश्वरी देवीचे मंदिर केवळ दोनच ठिकाणी आढळते. त्यातील एक मुंबईजवळ असणाऱ्या वसईमध्ये तर, दुसरे सोलापूरमधील तांबवे गावात. तांबव्यातील वज्रेश्वरी देवीचे मुख पूर्व दिशेला आहे. मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर अखंड मोठय़ा दगडात कोरलेले खांब आहेत. त्या खांबांच्या बाजूने देवीच्या गाभाऱ्यात प्रवेश करता येतो. गाभाऱ्यात गाईच्या चेहऱ्यासारखी देवीची केशरी रंगाची मूर्ती निदर्शनास येते. मंदिराचे पुजारी बबन कोंडिबा नारायण-निंबाळकर देवीची आख्यायिका सांगतात की, देवीची एक गाय होती. ती दररोज एका शेतकऱ्याच्या शेतात चरायला जात असे. त्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होत होते. एकदा तो शेतकरी गाईच्या मागून कुंडापर्यंत आला. तिच्यामागोमाग त्या कुंडामध्ये उतरला, तेव्हा देवी प्रकट झाली. देवीने शेतकऱ्याला इथे येण्याचे कारण विचारले असता शेतकऱ्याने सांगितले की, गाईमुळे माझ्या शेतीचे नुकसान होत आहे. तेव्हा देवीने गाईचे शेण घेऊन जाण्यास सांगितले. कुंडाच्या बाहेर येताना त्याच्या हातून थोडे शेण खाली पडले. जेवढे शेण त्याच्या हातात शिल्लक होते तेवढय़ा शेणाचे सोने झाले. तो कुंड आजही निरा नदीच्या मध्यभागी आहे.

गावकरी असे मानतात की, या कुंडात अंघोळ करून भिजलेले केस देवीने झाडले की जे पाणी दगडावर पडायचे, त्याच्यामुळे दगडावर काळे डाग पडलेले आहेत. कडक उन्हाळ्यात निरा नदीतील पाणी आटले तरी कुंडातील पाणी अजिबात आटत नाही. नदीतील दगडांवर बैल, गाय, घोडा, मासा, उंट आणि हत्ती आदी प्राण्यांच्या पाऊलखुणा आढळतात. मंदिराच्या मागील बाजूस भिंतीवर दगडामध्येच माशाची आकृती कोरलेली आहे. याबद्दल गावकरी सांगतात की, देवीच्या कुंडात हत्ती आणि उंटाएवढे मासे  होते. त्यांच्या नाकामध्ये बैलगाडीच्या चाकाएवढी नथ होती. ही देवी बैलाच्या रूपात गावात आली आहे.

मंदिराच्या गाभाऱ्यासमोर एक दगडी ताट आहे. या ताटाची आख्यायिका अशी सांगितली जाते की, पूर्वी हे ताट सोन्याचे होते. त्यामध्ये स्त्रिया एकत्र जेवत. आजही मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी सात, अकरा, एकवीस अशा स्त्रिया देवीच्या ताटात एकत्र जेवतात. तर, पूर्वी या सोन्याच्या ताटात जेवताना एका स्त्रीने त्या ताटाचा एक तुकडा चोरला, तेव्हापासून ते ताट कायमचेच दगडाचे झाले.

खरेतर एका मोठय़ा चौथऱ्यावर हे वज्रेश्वरी देवीचे मंदिर बांधलेले आहे. त्याला एक कमान आणि दगडी पायऱ्या आहेत. चौथऱ्यावरून खाली उतरले की, मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ अनेक छोटे छोटे शेंदूर फासलेले दगड पाहायला मिळतात. संतोष कुदळे या दगडांची आख्यायिका सांगतात की, वज्रेश्वरी देवी आणि दैत्य (राक्षक) यांचे कडाक्याचे भांडण झाले. त्यामध्ये देवीने राक्षसांचा पराभव केला. राक्षस देवीला शरण आले. त्यांनी एका रात्रीत तांबवे गावात हे देवीचे मंदिर बांधले तेव्हा देवी या गावात वसली. मंदिरासमोरचे शेंदूर फासलेले दगड या दैत्यांचे प्रतीक आहेत. या दगडांच्या गर्दीत चार मोठे दगडी खांब उभे करून त्यावर दगडाचेच छत असलेला आणखी एक छोटा चौथरा तयार केला आहे. त्यात दगडी पादुका आहेत. त्या पादुका वज्रेश्वरी देवीच्या आहेत. मंदिराच्या बाजूलाच फिरते शिवलिंग आहे. देवीचे भक्त शिवलिंगावर कौल लावतात. शिवलिंगाच्या वरच्या बाजूला एक नाणे ठेवून शिवलिंग फिरविले जाते. नाणे उजव्या दिशेला पडले की, तुम्ही ज्या कामासाठी प्रयत्न करत आहात ते यशस्वी होणार आणि नाणे डाव्या बाजूला पडले तर तुमचे काम अयशस्वी होणार नाही, असे मानले जाते.

वज्रेश्वरी देवीची यात्रा माघ पौर्णिमेला भरते. मुंबई, पुणे, कोल्हापूर, मराठवाडा, विदर्भ आदी ठिकाणांहून भक्त दर्शनाला येतात. इथे एक वेगळी प्रथा आहे. त्यानुसार निपुत्रिक भक्त ‘मला पहिला मुलगा झाला तर त्याला सज्जावरून खाली टाकेन,’ असा देवीला नवस बोलतात. त्यानुसार मंदिराच्या दगडी छतावरून मुलाला खाली टाकले जाते. आणि खाली चादरीमध्ये झेलले जाते.  यालाच सज्जावरून टाकणे म्हणतात. मध्यंतरी या प्रथेवरून वाद निर्माण झाला होता.

यात्रेमध्ये भूषण राजकुमार इनामदार यांना देवीच्या नैवेद्याचा मान मिळाला आहे. तर, शेजारीच असणाऱ्या सपाटणे गावाला देवीची पालखी बनविण्याचा मान मिळालेला आहे. यात्रेमध्ये देवीच्या समोर असलेल्या पाषाणरूपी दैत्यांना बोकडाचा नैवेद्य दिला जातो. मात्र, तो मांसाहारी नैवेद्य देवीसमोर आणला जात नाही. तिच्यासाठी पुरणपोळीचा नैवेद्य असतो. त्याचबरोबर शेतात पिके चांगली आली, तर देवीच्या कुंडात भात, भाकरी, भाजी, पुरणपोळी टाकतात.

पाटणची लक्ष्मीदेवी

‘कोयनेची सहल’ काढली तर, आपल्याला वाटेत धरणं, धबधबे, हिरवीगार शेती, अखंडपणे वाहणारे पाणी, मोठमोठे डोंगर, गडकिल्ले, वळणावळणाचे रस्ते लागतील. पाटण शहरात वसलेला कोयना हा तालुका आणि पाटण हे शहर ऐतिहासिक वास्तूंनी समृद्ध आहे. समर्थ रामदासांचा अधिवास असलेले चाफळचे राम मंदिर, सरदार पाटणकरांच्या वाडय़ातील राम मंदिर, नागोजीराव पाटणकर ग्रंथालय, निनाईदेवीचे मंदिर, धारेश्वर दिवशी, समर्थाचा मठ, दक्षिणमुखी मारुतीचे मंदिर, अशा किती तरी धार्मिक स्थळांनी पाटण समृद्ध आहे. अशाच धार्मिक स्थळांमध्ये पाटणची ग्रामदेवता लक्ष्मीआईचा समावेश होतो.

पाटणच्या उत्तरेला निसर्गरम्य परिसरात पाटणची ग्रामदेवता लक्ष्मीदेवीचे मंदिर आहे. मंदिराच्या पाठीमागील बाजूस डोंगररांगांतून वेडीवाकडी वळणे घेत केरा नदी वाहते, तर दक्षिणेला कोयना नदी आहे. नेमक्या याच ठिकाणी एका छोटय़ाशा टेकडीवर लक्ष्मीचे मंदिर आहे. मंदिराच्या परिसरात मोठी कोरीव दीपमाळ आहे. शेजारीच छोटेसे शिवलिंग आणि नंदी आहे. नागाचे छोटेसे दगडी मंदिरदेखील उभे करण्यात आलेले आहे. लक्ष्मीदेवी या पार्वतीच्या रूपाची पाटण शहरावर कृपादृष्टी आहे, ती गावाचे रक्षण करते. सगळ्यांचे मंगल करते. तिच्या कृपेने पाऊस पडतो. शेती पिकते, अशा येथील नागरिकांची श्रद्धा आहेत.

मंदिरातील मूळ मूर्ती पाषाणाची असून त्यात राक्षसाला पायदळी तुडविल्याचे दिसून येते. कराड, सातारा, कोल्हापूर, सांगली, कर्नाटक, पुणे, मुंबईतून लोक लक्ष्मीदेवीच्या दर्शनासाठी येतात. आपल्या कुटुंबातील सदस्यांना सुखी ठेव, अशी प्रार्थना करतात आणि मंदिराच्या उंबरठय़ावर माथा टेकवतात. लक्ष्मीदेवी पाटणची ग्रामदेवता असली तरी पहिली पूजा तिची बहीण निनाईदेवीची केली जाते. या निनाईदेवीचे मंदिर लक्ष्मीआईच्या दर्शनाला जाताना पहिल्यांदा लागते. भक्त पहिल्यांदा तिचे दर्शन घेतात आणि नंतर लक्ष्मीदेवीच्या दर्शनाला जातात. निनाईदेवीला भैरवनाथ नावाचा भाऊ आहे. त्याची अशी कथा सांगितली जाते की, पूर्वी हा भैरवनाथ पाटणच्या मुख्य पेठेत होता. मात्र, लोक त्या ठिकाणी कचरा टाकीत होते. त्यामुळे रागाने पाटण शहराच्या पूर्वेकडे असणाऱ्या दातेगडाच्या पायथ्याशी म्हणजेच टोळेवाडी या गावात त्याने आपले बस्तान बसविले. तरीही त्याच्या मूळ ठिकाणी भैरवनाथाचे छोटेसे मंदिर आहे. लक्ष्मीच्या दर्शनाला जाताना भक्त क्षणभर उभे राहून भैरवनाथाचे दर्शन घेतात आणि टोळेवाडीकडे चेहरा करून त्याला नमस्कार करतात.

लक्ष्मीदेवीची यात्रा पाटण तालुक्यातील त्या वर्षांतील शेवटची यात्रा असते. यात्रेनिमित्त कुस्त्यांचे आखाडे रंगतात. विविध वस्तूंची दुकाने सजतात. लोकनाटय़ तमाशा भरविला जातो. असे मानले जाते की, देवीची यात्रा झाल्यानंतर पावसाळ्याला सुरुवात होते. त्यामुळे पाऊस चांगला व्हावा आणि पिकेही भरभरून यावी, अशी प्रार्थना पाटण शहरातील लोक करतात. यात्रेत देवीचा छबिना शहरात निघतो. त्या वेळी टोळेवाडीहून भैरवनाथाची पालखी देवीच्या भेटीला येते. परंपरेनुसार शेटे (देशमुख) टोळेवाडीकरांना निमंत्रणाचा नारळ दिला जातो. भैरवनाथाची पालखी पाटणच्या वेशीवर आल्यावर देवस्थानचे प्रमुख आणि गावकरी तिचे स्वागत करतात. भैरवनाथाची पालखी मंदिरात आल्यानंतर लक्ष्मीदेवीची पालखी आणि भैरवनाथाची पालखी या दोन पालख्यांची वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. ही पालखी मुख्य मंदिरापासून निनाई मंदिर, ब्राह्मणपुरी, लायब्ररी चौक, भैरवनाथ मंदिर, राजवाडा अशी जाते.

या पालखी मिरवणुकीत बारा बलुतेदारांचा समावेश असतो. पुजारी म्हणून गुरव, पालखीचे वाहक म्हणून भोई, पालखीवर छायाछत्र देण्यासाठी माळी, भंडारा-धूर-अगरबत्तीसाठी आत्तार, आंबीलघुगऱ्यासाठी शेटे, अबदागीरसाठी नाभिक, पाणीपुरवठय़ासाठी कोळी, चवरीसाठी चौधरी, गोंधळासाठी कुंभार, सामाधकाठीसाठी मुजुमले, धूप-आरतीसाठी ठाकर, दिवटीसाठी चर्मकार आणि संरक्षणासाठी मातंग यांचा देवीच्या जत्रेत पालखी सोहळ्यात सहभाग असतो. गावाबाहेर स्थलांतरित झालेला वर्ग देवीवरच्या श्रद्धेपोटी जत्रेला आवर्जून जातो.


राधिका कुंटे – response.lokprabha@expressindia.com

नवरात्र म्हणजे शक्तीची उपासना. देवीने महाशक्तीचे रूप धारण करून प्रबळ झालेल्या पापी प्रवृत्तींचा विनाश केला आणि लोकांना अभय दिले अशा अनेक कथा ऐकायला मिळतात. त्यातून निर्माण झालेल्या स्थानमाहात्म्यातून ठिकठिकाणच्या देवीमंदिरांना महत्त्व आलं आहे. देशभरातली विविध देवी मंदिरे, त्यांचे स्थानमाहात्म्य यांसह वेगवेगळ्या प्रकारच्या कथा, दंतकथा, आख्यायिका यांचा आढावा-

वैष्णोदेवी (जम्मू-काश्मीर)

वैष्णोदेवीचे उत्तरेकडील प्रचलित नाव मातारानी असे आहे. वैष्णोदेवी हा दुर्गादेवीचाच एक अवतार समजला जातो. हिमालयाच्या पर्वतरांगेमध्ये स्थित असलेले वैष्णोदेवी मंदिर लोकप्रिय आहे. जम्मू आणि काश्मीरमधील त्रिकुट पर्वतरांगेमधील या मंदिराला दरवर्षी जवळपास एक कोटी भाविक भेट देतात. वैष्णोदेवीचे दर्शन घेण्यासाठी कटरा गावापासून घाट पायी चढावा लागतो. वर चढण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. यात्रेकरू कटरा गावाजवळच्या बालगंगा नावाच्या झऱ्यात स्नान करतात आणि मग डोंगर चढू लागतात. वाटेत अदकनवारी हे स्थान लागते. अदकनवारी म्हणजे आदिकुमारी देवी होय. तिथून पुढे भरवघाटी लागते. तिथे भरवाचे लहानसे मंदिर आहे. त्यापुढील घनदाट जंगलाला ‘माता का बाग’ असे म्हणतात. वैष्णोदेवी ही एका गुहेत आहे. गुहेबाहेरच्या एका चबुतऱ्याला विष्णू दरबार म्हणतात. यात्रेकरू त्यावर होम करतात. हा सगळा घाट चढून जाणे शक्य नसते त्यांच्यासाठी घोडी भाडय़ाने मिळतात. वैष्णोदेवी एवढय़ा दुर्गम भागात जाऊन का राहिली, याविषयी एक आख्यायिका आहे. ती अशी की, भरव नावाच्या दैत्याच्या मनात वैष्णोदेवीशी लग्न करण्याची इच्छा उत्पन्न झाली. पण देवीला त्याच्याशी लग्न करायचे नव्हते. भरव बलप्रयोगाने आपला हेतू साध्य करील अशी देवीला भीती वाटली. त्याला चुकवण्यासाठी म्हणून ती डोंगरात पळून गेली आणि अदकनवारी या ठिकाणी लपून बसली. भरव तिचा शोध घेत तिथे पोहोचला. ते पाहून ती डोंगरावर उंच उंच चढत राहिली. अखेरीस एका गुहेजवळ भरवाने तिला गाठलेच. मग मात्र वैष्णोदेवीने आपले उग्र रूप प्रकट केले. भरवाशी झुंज देऊन त्याला ठार मारले. त्यानंतर ती गुहेत शिरून कायमची तिथेच राहिली. वैष्णोदेवीची यात्रा केल्यावर यात्रेकरूला खाली उतरून कटरा गावातील भुवनेश्वरीची पूजा करावी लागते. ती केल्यानंतरच यात्रा सुफल होते, असे मानतात. आणखी एका दंतकथेनुसार आदिशक्तीने आपल्या त्रिशुळाच्या प्रहाराने ही गुंफा तयार केली. या गुहेत महासरस्वती, महाकाली व महालक्ष्मीच्या मूर्ती आहेत. या तिन्ही मूर्तीच्या पायापासून पाणी वाहत असते. त्यास बाणगंगा म्हणतात. वैष्णोदेवीबरोबरच या तीन देवतांनाही या ठिकाणी महत्त्व आहे.

बासरदेवी (तेलंगणा)

नांदेड-निजामाबाद रेल्वे मार्गावर धर्माबादनंतर बासर हे रेल्वे स्टेशन आहे. स्वातंत्र्यापूर्वी मराठवाडय़ात नांदेड जिल्ह्य़ात हे गाव होते. पुढे ते आंध्र प्रांतात गेले. सध्या ते तेलंगणा राज्यात आहे. या परिसराचे प्राचीनत्व महाभारतपूर्व काळापर्यंत मानले जाते. महर्षी व्यासांनी याच क्षेत्री गोदावरीच्या काठी घोर तपश्चर्या केली होती. त्यांना महासरस्वती प्रसन्न झाली, त्यामुळे ते ‘महाभारता’सारखा अजोड ग्रंथ लिहू शकले, असे मानतात. व्यासांचे येथे वास्तव्य झाले, त्यावरून गावाचे नाव वासर पडले, त्याचेच पुढे बासर झाले असे सांगितले जाते. नांदेडजवळ असणाऱ्या या मंदिरात महाराष्ट्रातील अनेक भाविक दरवर्षी जातात. तर काही मतांनुसार मुळात या भागात असणाऱ्या मराठी भाषेच्या प्रभावामुळेच या गावाचे नामकरण वासरवरून बासर असे झाले आहे.

व्यासांना श्री महासरस्वती प्रसन्न झाली त्याच परिसरात त्यांनी वाळूपासून श्री सरस्वतीची मूर्ती तयार करून तिची प्राणप्रतिष्ठा केली. देशभरातून लक्षावधी भाविक नित्यनेमाने इथे दर्शनासाठी येतात, अनुष्ठाने करतात. महासरस्वतीचे मंदिर हेमाडपंती असून देवीची मूर्ती तीन फूट उंचीची आहे. मंदिर उत्तराभिमुख आहे. मंदिराचा सभामंडप फार मोठा नाही. अध्र्या भागात देवघर, गाभारा तर अध्र्या भागावर सभामंडप आहे. देवीच्या पादुका देवीपासून थोडय़ा अंतरावर असून याच पादुकांवर मंदिराचे शिखर आहे. दिवसातून दोन वेळा मंत्रघोषात देवीची महापूजा होते. देवीला दही-दुधाचे स्नान घातल्यानंतर जे तीर्थ बाहेर येते त्याला सोमसूत्र असे म्हणतात. भक्त मोठय़ा श्रद्धेने ते प्राशन करतात. मंदिरासमोरच्या टेकडीवर जवळच महर्षी व्यासांनी महालक्ष्मी आणि महाकालीची प्रतिष्ठापना केली आहे.

याच मंदिराशी निगडित एका कथेनुसार कुरुक्षेत्रावरील युद्ध संपल्यानंतर व्यासमुनी, त्यांचे काही अनुयायी निवांतपणे काही दिवस घालवावे म्हणून दंडकारण्यात गेले. तिथे व्यासमुनींनी देवपूजा आणि सरस्वती देवीची आराधना केली. नंतर नंदागिरीचा राजा बिजिअलुदु याने हे सरस्वती मंदिर बांधले. ‘दुग्रे दुर्गट भारी’ या आरतीचा कर्ता नरहरी मालू, श्री शंकराचार्य आणि अनेक योगीजनांनी इथे अनुष्ठान केले होते. तसेच वाल्मीकी ऋषींनी येथेच ‘रामायण’ लिहायला सुरुवात केली, अशीही आख्यायिका आहे. इथे थोडय़ा दूर अंतरावर दत्त मंदिर आहे. असे सांगतात की, ही दोन्ही मंदिरे भुयाराने जोडली गेली होती. राजे-महाराजे या भुयारी मार्गाने येऊन देवांची पूजा करत असत. येथे व्यास महर्षीचे मंदिर आहे, तसेच वाल्मीकींची संगमरवरी समाधीही आहे. सरस्वती मंदिरात एक दगडी स्तंभ असून त्यावर हाताने प्रहार केला तर संगीताचे सप्तसूर ऐकू येतात. त्याला म्युझिक पिलर असे म्हटले जाते.

नवरात्रात हा परिसर भाविकांनी फुललेला असतो. देवीची महापूजा, मंत्रघोष, सप्तशतीचे पाठ, भजन, आरती आणि जयघोषांनी वातावरण निनादत असते. दसऱ्याच्या दिवशी श्री महासरस्वतीची पालखीतून मिरवणूक निघते. रस्ते झाडून, सडा िशपडून गावात सुंदर रांगोळ्या रेखाटलेल्या असतात. तर अनेक जणी आपापल्या दारासमोर पंचारती घेऊन उभ्या असतात. औक्षण अन् फुले उधळल्यानंतर पालखी हळूहळू पुढे सरकते. आपल्याकडे शिक्षणाची सुरुवात सरस्वतीपूजनाने करण्याची प्रथा आहे. या सरस्वती मंदिरात अनेक पालक मुलांना शिक्षण सुरू करण्यापूर्वी घेऊन येतात, त्याला अक्षराभिषेक असे म्हणतात. येथे प्रसादात मुलांना हळद खायला दिली जाते आणि पाटीवर अक्षरे लिहिण्याची संथा दिली जाते. दसरा, वसंत पंचमी, राखी पौर्णिमा, व्यास पौर्णिमा म्हणजेच गुरू पौर्णिमा हे दिवस त्यासाठी अत्यंत शुभ मानले जातात. त्यामुळेच असेल कदाचित, पण मंदिराजवळ हार-प्रसादाऐवजी स्टेशनरीची दुकाने अधिक आहेत.

ज्वालादेवी (हिमाचल प्रदेश)

हिमाचल प्रदेशातील कांगडा गावापासून काही किलोमीटर अंतरावर प्रसिद्ध माँ ज्वालामुखी मंदिर आहे. ज्वालादेवी मंदिर पांडवांनी शोधून काढले अशी कथा प्रचलित आहे. या मंदिरात कोणतीही मूर्ती नाही. देवळाच्या मध्यभागीं एक खड्डा आहे. खड्डय़ाच्या आतून एकसारखी ज्वाला वर येत असते. आणखी दोन ठिकाणी डाव्या आणि मधल्या खडकांतून अशाच तऱ्हेच्या ज्वाला बाहेर पडताना दिसतात. मुख्य मंदिर आणि आणि परिसरातील या ज्वाळा माँ महाकाली, अन्नपूर्णा, चंडी, िहगलाज, िवध्यवासिनी, महालक्ष्मी, सरस्वती, अंबिका आणि अंजीदेवीचे प्रतीक मानल्या जातात. हिमाचल प्रदेशातील नादौन गावातील ध्यानू भगत नावाचा भक्त ज्वालादेवीच्या दर्शनाला चालला होता. त्या वेळी मुघल बादशहा अकबरचा अंमल त्या भागावर होता. हजारो लोकांसमवेत जात असलेल्या ध्यानू भगतचा अकबराच्या सनिकांना ्नराग आला. त्याला अटक करून अकबरासमोर आणण्यात आले. अकबराने त्याला इतक्या लोकांना घेऊन कुठे चाललास, असे विचारले. त्याने सांगितले की, माता ज्वालादेवीच्या दर्शनाला जात आहे. अकबराने विचारले की, कोण आहे ही ज्वालादेवी? ध्यानूने सांगितले ज्वालामाई सर्व जगाचे पालन करते. देवळातील ज्योती तेल, बत्तीशिवाय सदैव जळत असते. अकबराला आश्चर्य वाटले. ती ज्योत बघण्यासाठी तो स्वत: देवळात गेला. त्याचा विश्वास बसेना. त्याने आपल्या सनिकांना मंदिराचा परिसर पाण्याने भरण्याची आज्ञा दिली. आश्चर्य म्हणजे ज्वालांवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. त्यानंतर त्यावर लोखंडाची मोठी ढाल ठेवून ज्वाळा विझवायचा प्रयत्न केला. परंतु या प्रयत्नात ते लोखंड वितळून ढालीला भोक पडलं. त्यानंतर मात्र हतबल झालेल्या अकबर राजाने आपले प्रयत्न थांबवले. प्रायश्चित्त म्हणून अकबराने ५० किलो सोन्याचा मुकुट देवीस अर्पण केला. परंतु प्रत्येक वेळी तो मुकुट खाली पडत असे. देवीने तो सोन्याचा मुकुट स्वीकारला नाही, असे आख्यायिका सांगते.

राजा प्रजापती दक्ष यांच्याकडून यज्ञ आयोजित करण्यात आला होता. या यज्ञासाठी भगवान शंकर सोडून इतर सर्वाना आमंत्रित करण्यात आले होते. वडिलांच्या वागण्यामुळे अपमानित झालेल्या सतीने स्वत:ला हवनकुंडात झोकून दिले. हे कळल्यावर अतीव दु:ख आणि रागामुळे वेडेपिसे झालेले भगवान शंकर सतीचे जळलेले शरीर घेऊन त्रलोक्यात धावू लागले. त्यांना शांत करण्यासाठी भगवान विष्णूंनी सुदर्शनचक्राने सतीच्या शरीराचे अनेक तुकडे केले. पृथ्वीवर जिथे जिथे हे तुकडे पडले ती जागा शक्तिपीठ समजली जाते. ज्वालामुखी मंदिराच्या जागी सतीची जीभ पडली अशी आख्यायिका आहे. मंदिर परिसरात इतर अनेक देवतांची मंदिरेही आहेत. सर्वात वर शंकराचे मंदिर आहे. या मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या चढाव्या लागतात. इथले गोरख डिब्बी कुंड हा निसर्गाचा एक चमत्कार आहे. या कुंडात पाणी उकळत असल्यासारखे वाटते, पण प्रत्यक्षात हाताला थंडगार पाण्याचा स्पर्श होतो. गोरखनाथांच्या तपश्चय्रेने देवी त्यांच्यावर प्रसन्न झाली होती. एकदा गोरखनाथांना भूक लागली म्हणून त्यांनी मातेला पाणी गरम करायला सांगितले आणि स्वत: भिक्षा मागण्यासाठी निघून गेले. त्यानंतर ते परत कधी आलेच नाहीत आणि देवीमाता आजही त्यांची वाट पाहते आहे, अशी आख्यायिका आहे.

कन्याकुमारी देवी (तमिळनाडू)

पूर्वेला बंगालची खाडी, पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिणेला िहदी महासागर अशा स्थानी वसलेले कन्याकुमारी. इथे समुद्रतटावर सूर्योदय दिसतो तसाच सूर्यास्तही. किनारपट्टीवर असा योग अन्यत्र कुठेही दिसत नाही. किनारा खडकाळ असून मोठमोठे खडक आहेत. तिन्ही समुद्रपाण्याचे वेगवेगळे रंग सहज दिसून येतात. त्यामुळे समुद्रावरची रेतीही तीन रंगांत आढळते. या संगमाजवळच कन्याकुमारीचे सुंदर मंदिर आहे. मंदिर पूर्वाभिमुख असले तरी भाविकांना प्रवेश उत्तरदारातूनच करावा लागतो. गोपुरातून आत प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूंनी असलेल्या दगडी कोरीव खांबांच्या लांबच लांब रांगा दिसतात. हे मंदिर पांडय़ राजाच्या काळात बांधले गेले असे सांगतात. ही त्यांची कुलदेवता. तर पुराणातील कथेनुसार, वाणासुर हा राक्षस उपासना करून बलाढय़ झाला होता. त्याने देवांकडून अनेक वर मिळविले. तो सर्वानाच छळू लागला; तेव्हा सर्व जण विष्णूला शरण गेले. मात्र विष्णूने वाणासुराचा अंत देवीच करू शकेल असे सांगितले. वाणासुराला अमरत्वासाठी अनेक वर प्राप्त असले तरी त्याचे मरण कुमरिकेच्या हाती होते. तेव्हा पार्वतीदेवी कुमारीच्या रूपात इथे अवतरली आणि तिने वाणासुराचा अंत केला. आपल्या नियोजित वराची वाट पाहात ती इथेच उभी राहिली. मात्र तिचा वर आलाच नाही. असेही सांगतात की, वाणासुरानेच तिला मागणी घातली. त्यामुळे चिडून युद्धासाठी आव्हान देत हातातील चक्राने तिने वाणासुराला ठार केले. विविध अलंकारांनी युक्त आणि अतिशय सौष्ठवपूर्ण अशी ही मूर्ती आहे. तिच्या नाकातील हिरा इतका तेजस्वी आहे की, समईच्या प्रकाशातही त्याची आभा मोहून टाकते. पूर्वेतील दारातून येणाऱ्या सूर्यकिरणांमुळे हा हिरा इतका चकाकतो की मूर्ती दिसणे अशक्य होते; म्हणून हे दार बंद ठेवण्यात येते.

मनसादेवी (उत्तराखंड)

देवीचे हे मंदिर हरिद्वारजवळील बिल्व पर्वतावर आहे. हे ठिकाण शिवालिक पर्वतरांगांमध्ये आहे. ही हिमालयाची दक्षिणेकडील सर्वात शेवटची रांग आहे. बिल्व पर्वताच्या समोर असलेल्या नील पर्वतावर चंडीदेवीचे मंदिर आहे. असे मानले गेले आहे की, देवी मनसा आणि चंडी ही पार्वतीचीच दोन रूपे आहेत अन् ती नेहमी एकमेकांजवळच राहतात; म्हणून त्यांची स्थाने जवळ जवळ आहेत. त्या दोन्ही ठिकाणी रोपवेने जायची सोय आहे. मनसादेवी शिवाच्या मनातून उत्पन्न झालेली शक्ती आहे. मनसा म्हणजे इच्छा. ती मनोकामना पूर्ण करते. ती वासुकी नागाची बहीण आहे. महिषासुराचा वध केल्यानंतर दमलेल्या देवीने इथे विश्रांती घेतली, अशी गोष्ट सांगितली जाते. गाभाऱ्यात एकूण तीन मूर्ती आहेत. सर्वात मोठी असलेली मूर्ती गायत्रीदेवीची आहे. तिच्या चरणांजवळ आपल्या डाव्या हाताला काळी मूर्ती महिषासुराची आहे आणि उजव्या बाजूला केशरी रंगाचा जो तांदळा आहे, ती म्हणजे मनसादेवी.

नयनादेवी मंदिर (हिमाचल प्रदेश)

हे मंदिर हिमाचल प्रदेशात बिलासपूर जिल्ह्यत आहे. मंदिरात प्रवेश करताच हनुमानाची उंच मूर्ती आहे. या भागात मंगळवार हनुमानाचा वार म्हणून पाळला जातो. डावीकडे माता नयनादेवीचे मंदिर आहे. तिथे कालिमाता, नयनादेवी आणि गणेशाची मूर्ती आहे. मंदिराचा परिसर आटोपशीर आहे. नयनादेवीसोबत भगवान शंकर, नवग्रह आणि शनिदेवाचे मंदिर परिसरात पाहायला मिळते. १८८० च्या भूस्खलनात हे मंदिर उद्ध्वस्त झाले होते, त्यानंतर त्याचे पुनर्निर्माण करण्यात आले. ननी तळ्याकाठी शक्तिपीठांच्या गोष्टीनुसार देवी सतीचे डोळे पडले होते. त्यामुळे डोळे म्हणजे नयन आणि त्यावरून नयनादेवी असे नामकरण होऊन देवीचे वास्तव्य आणि तलाव यावरून ननिताल नाव तयार होऊन हे मंदिर स्थापन करण्यात आले. इथे अनेक र्वष जुना िपपळ वृक्ष पाहायला मिळतो. इथे दोन्ही नवरात्र (चत्र व अश्विन महिना) मोठय़ा प्रमाणात साजरे केले जातात.

जीणमाता (राजस्थान)

जीणमाता मंदिर राजस्थानातील सिकर गावात आहे. जयंती या नावानेही जीणमातेला ओळखले जाते. जीणमाता दुर्गादेवीचा अवतार आहे. सिकर जिल्हा राजस्थानातील घनघोर जंगल म्हणून ओळखला जातो. तीन पहाडांमध्ये जीणमातेचे मंदिर आहे. तिच्या मंदिरासंदर्भात एक कथा सांगितली जाते. त्यानुसार मुघल बादशहा औरंगजेबाला जीणमातेसमोर नतमस्तक व्हावे लागले होते. जीणमातेचे मंदिर तोडण्याचा आदेश औरंगजेबाने आपल्या सनिकांना दिला. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. भक्तांनी देवीला साकडे घातले आणि आपली असमर्थता व्यक्त केली. भक्तांचा पुकारा ऐकून देवीने एक चमत्कार केला. लाखो मधमाश्यांचा थवा देवळाच्या दिशेने आला आणि त्यांनी मुघल सनिकांचा कडाडून चावा घेतला. त्यात औरंगजेबही होता. त्याच्या वैद्यांनी त्याला मातेची माफी मागण्याचा सल्ला दिला. त्या बदल्यात देवीला अखंड नंदादीपासाठी तेलाची व्यवस्था करण्याचा संकल्प करण्यात आला. त्यानंतर औरंगजेबाची प्रकृती सुधारली, असे सांगितले जाते. खूप काळ दिल्लीहून दर महिन्याला सव्वा मण तेल औरंगजेबाच्या मृत्यूनंतरही येत असे. जीणमातेच्या सुंदर प्रतिमेबरोबर शिविलग आणि नंदी विराजमान आहेत. नवरात्रात जीणमातेच्या मंदिरात दरवर्षी लाखो भाविक दर्शनाला येतात.

मणीबंध शक्तिपीठ, पुष्कर (राजस्थान)

राजस्थानातील ब्रह्मदेवाच्या मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या पुष्करपासून काही किलोमीटर अंतरावर मणीबंध नावाचे गाव आहे. या गावातील गायत्री टेकडीवर गायत्रीदेवीचे प्राचीन मंदिर आहे. पुराणातील कथेनुसार, राजा प्रजापती दक्षाच्या घरात पार्वतीने (सती) जन्म घेतला. तिचे लग्न शिवाशी झाले. राजा दक्षाने एका यज्ञाचे आयोजन केले होते. त्यासाठी त्याने सर्व देवतांना आमंत्रण दिले, पण आपल्या जावयाला आणि मुलीला बोलावले नाही. त्यामुळे रागावलेली सती आपल्या पित्याकडे जाब विचारायला गेली. तेव्हा त्याने शिवाची यथेच्छ िनदा  केली. या अपमानाने क्रोधित झालेल्या सतीने यज्ञकुंडात उडी मारून प्राणत्याग केला. ही गोष्ट शिवाला कळल्यावर त्याने तिसरे नेत्र उघडले आणि प्रचंड संहार सुरू केला. सतीचे पाíथव उचलून त्याने भारत भ्रमणाला सुरुवात केली. शिवाचे हे रूप पाहून सर्वजण विष्णूला शरण गेले. विष्णूने आपल्या चक्राने सतीच्या शरीराचे तुकडे केले. ते भारतात ज्या ज्या ठिकाणी पडले तिथे शक्तिपीठे तयार झाली. वेगवेगळ्या पुराणांत शक्तिपीठांची संख्या वेगवेगळी आहे. ज्या ठिकाणी मनगट पडले होते, त्या ठिकाणी मणीबंध हे शक्तिपीठ तयार झाले. दुर्गादेवीच्या इथल्या रूपाला गायत्री या नावाने ओळखले जाते. गायत्री मंत्राचा जप करून या शक्तीची उपासना केली जाते. मंदिर साधेच असून गाभाऱ्यात सती, गायत्री आणि कुंडलिनीमाता अशा तीन मूर्ती आहेत.

दक्षिणेश्वर काली मंदिर (कोलकाता)

दक्षिणेश्वर काली मंदिर हे कोलकात्याच्या दक्षिणेश्वर भागात असलेले एक मोठे मंदिर आहे. हुगळी नदीच्या पूर्व काठावर असलेल्या या मंदिरामध्ये काली देवीचे प्रमुख मंदिर तसेच शंकर व इतर देवतांचीही मंदिरे आहेत. इ.स. १८५५ मध्ये बांधलेल्या या मंदिरामध्ये प्रसिद्ध भारतीय योगी रामकृष्ण परमहंस यांनी अनेक काळ पौरोहित्य आणि कालीपूजन केले होते. इथे त्यांना आध्यात्मिक ज्ञान प्राप्त झाले, असे म्हटले जाते. मंदिराच्या आवारात परमहंस यांच्या स्मृतींचे जतन करण्यात आले आहे. या मंदिराची स्थापना राणी रासमणी यांनी केली. लहान वयात पतीचे निधन झालेल्या राणी रासमणी यांनी त्यांच्या यजमानांमागे जमीनदारीची जबाबदारी चांगल्या रीतीने निभावली. िहदू पुराणकथांतील उल्लेखानुसार काली म्हणजे शिवपत्नी, आदिशक्ती, पार्वतीचा एक उग्र अवतार. काली या नावाबाबत तसेच तिने शुंभ-निशुंभ, शंखचूड, दारूकासुर, महिषासुर इत्यादी दैत्यांना मारल्याबाबतच्या विविध कथा पुराणांतून आहेत. काल म्हणजे शंकर, त्याची पत्नी म्हणून काली. जन्मत: तिचा वर्ण काळा होता म्हणून काली. शंकराच्या कंठातील विषातून तिची उत्पत्ती झाली म्हणून काली. पार्वतीने स्वत:च्या शरीरापासून कोश टाकला, तो कोश म्हणजेच काली; तिलाच कौशिकी असेही म्हणतात. अशा तिच्या नावाबाबतच्या कथा आहेत. कालीतंत्रात शवारूढ, चतुर्भुज, नरमुंडमालाधारी, स्मशानवासिनी अशी तिची रूपे वर्णिली गेली आहेत.

चामुंडादेवी (कर्नाटक)

पुराणातील महिषासुराची महिषावती नगरी आज म्हैसूर शहर वसलेले आहे, त्याच जागी होती असे म्हटले जाते. इतर दैत्यांप्रमाणेच महिषासुरसुद्धा दिवसेंदिवस प्रबळ होत गेला तसा त्याला त्याच्या सामर्थ्यांचा उन्माद चढला. त्याच्या जुलमाने संत्रस्त झालेले प्रजाजन आणि देवही जगन्मातेला शरण गेले. आपले संरक्षण करण्यासाठी त्यांनी तिची प्रार्थना केली. मग देवीने चामुंडेश्वरीचा अवतार धारण करून महिषासुराचा वध केला. त्यानंतर भक्तांच्या कल्याणासाठी तिने त्याच जागी वास्तव्य केले, अशी आख्यायिका आहे. म्हैसूर शहराच्या जवळच एका उंच टेकडीवर चामुंडादेवीचा निवास आहे. त्या टेकडीला चामुंडा हिल असे नाव आहे. अत्यंत सुंदर असे पुरातनकालीन मंदिर, रम्य निसर्गसौंदर्य आणि धार्मिक महत्त्वाचे स्थान अशा त्रिवेणी संगमामुळे इथे भाविक आणि पर्यटकांची गर्दी असते. मंदिराचे आवारात जवळपास २०-२५ फूट उंच महिषासुराचा महाकाय पुतळा उभा आहे. महाद्वारावर सुरेख आणि भव्य गोपुर आहे. तिथे खूपच उंच आणि सुंदर असे गोपुर आहे. अनेक देवदेवता, त्यांची वाहने, द्वारपाल, यक्ष, किन्नर, अप्सरा आदींच्या सुबक मूर्ती त्यावर आहेत.

विदर्भातील देवीची मंदिरे

प्रवीण योगी

महाराष्ट्रात असलेली देवीची साडेतीन पीठे सगळ्यांना परिचित आहेत. पण त्यापलीकडेही देवीची विविध स्थाने असून लोकमानसात त्यांना महत्त्व आहे. विदर्भातील अशा काही स्थानांची माहिती-

आताच्या अमरावती शहराच्या नावाचा उच्चार एकेकाळी ‘उमरावती’ असा होता. अमरावती येथील भाजीबाजार विभागात श्री सोमेश्वर मंदिराशेजारी रुखबदेव (ऋषभदेव) संस्थानातील म्हणजेच आजच्या आदिनाथ दिगंबर मंदिरातील तळघरात श्री आदिनाथ रुखबदेव यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत. त्या मूर्तीच्या बठकीवर लेख कोरलेला आहे. त्यावरून त्यांची स्थापना संवत ११५३ साली म्हणजेच इ. सनाच्या ११व्या शतकाच्या अखेरच्या दशकात सुमारे इ.स. १०९७ साली झाली. यावरून त्यांचे प्राचीनत्व लक्षात येते. या मूर्ती स्थापन होण्यापूर्वी २५ ते ३० वर्षे अमरावतीजवळील एलिचपूरला (अचलपूर) ‘ईल’ नावाचा जैन धर्मीय राजा राज्य करीत होता. त्याने इ.स. १०५८ मध्ये एलिचपूर येथे आपले राज्य स्थापन केले. या पुराव्यावरून हे लक्षात येते की, ११ व्या शतकापासून अमरावती शहर अस्तित्वात होते. श्री गोिवदप्रभूंच्या (महानुभाव पंथाचे प्रवर्तक) चरित्रात १३ व्या शतकात ते उंबरावतीस आले होते असा उल्लेख आढळतो.

अमरावतीपासून ४० किलोमीटर अंतरावर असलेले आजचे कौंडिण्यपूर म्हणजे पुरातन कुंडीनपूर ही भीष्मक राजाची राजधानी होती. वर्धा नदीच्या काठावर असलेले विदर्भा नगरी ऊर्फ कुंडिनपूर येथे ‘विदर्भ’ राजाने आपले राज्य स्थापन केले. भोज शाखेतील यदुवंशातील विदर्भ नावाच्या राजाने कुंडिनपूर येथे आपली राजधानी व राज्य स्थापन केले. कुंडिनपूर या पुरातन राजधानीचा घेर २६ कोसांचा (सुमारे ६५ मल) होता. याच कुंडिनपूरच्या वेशीवर नगराच्या बाहेर श्री अंबादेवीचे मंदिर असून येथूनच राजा भीष्मकाची मुलगी राजकन्या रुक्मिणीचे हरण श्रीकृष्णाने केले अशी आख्यायिका आहे. त्यावेळी झालेल्या युद्धात रुक्मिणीचा भाऊ रुक्मि याचा श्रीकृष्णाने पराजय केला. त्यानंतर तो म्हणजेच रुक्मि कुंडिनपूरला परत गेला नाही. तर त्याने अमरावतीच्या पश्चिमेला १५-१६ मलावर भोजकट नावाचे नवीन नगर बसवून तेथे आपली राजधानी उभी केली. त्यामुळे त्यानंतर तो भाग भोजकट राष्ट्रक म्हणून ओळखला जाऊ लागला. हेच आजचे भातकुली गाव होय.

श्री अंबादेवी संस्थान

अमरावती शहराच्या मध्यभागी, अंबागेटपासून एक किलोमीटर अंतरावर श्री अंबादेवीचे मंदिर आहे. या मंदिराच्या जवळ अंबानाला असून नाल्याच्या पलीकडच्या तीरावर श्री एकवीरा देवीचे मंदिर आहे. एकवीरा देवीच्या मंदिरास लागूनच जगप्रसिद्ध अशा ‘हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ’ या संस्थेचा बराच मोठा शैक्षणिक परिसर आहे. श्री अंबादेवीचे मंदिर अती प्राचीन असून स्वयंभू मानले जाते. ही मूर्ती वालुकामय पाषाणाची असून पद्मासनात स्थित आहे. एक हजार ते १५०० वर्षांपूर्वी या मंदिराची स्थापना झाली असावी असे संदर्भ आढळतात. रुक्मिणी हरणाशीही याचा संबंध जोडण्यात येतो. त्यावरून याचे प्राचीनत्व लक्षात येते. छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची पत्रिका श्री अंबादेवीला आली होती याचे ऐतिहासिक पुरावे आहेत. इ.स. १८७० चे ‘गॅझेटियर फॉर दी हैद्राबाद असाईन्ड डिस्टिक्क्ट’ तसेच इ.स. १९११ व १९६८ च्या अमरावती जिल्हा गॅझिटियरमध्ये याच्या पुरातनत्वाचा उल्लेख आहे. ‘सेटलमेंट रेकॉर्ड’मध्येही हे मंदिर एक हजार ते १५०० वर्षांपूर्वीचे पुरातन असल्याचा पुरावा आढळतो. इ.स. १८६३-१८६४ सालापर्यंत श्री अंबादेवीची मूर्ती केवळ एका चबुतऱ्यावर होती. मंदिर नव्हते. मात्र कालांतराने तेथे छोटे हेमाडपंती मंदिर बांधण्यात आले. त्या काळी वस्ती अमरावतीच्या परकोटाच्या आतच होती. त्यामुळे हे मंदिर जुन्या अमरावतीच्या वेशीवर जंगलात होते. मंदिराच्या शिखराचे बांधकाम इ.स. १८९६ मध्ये करण्यात आले.

श्री अंबादेवीची मूर्ती आसनावर विराजमान असून पद्मासनात आहे. तिचे दोन्ही हात दोन्ही पायांवर ठेवलेले आहेत. दोन्ही नेत्र अर्धोन्मिलित असून शांत आणि गंभीर अशी ध्यानस्थ मुद्रा धारण केलेली आहे. नानाविध षोड्शोपचार पूजा झाल्यावर सुवर्णादि अलंकार, सोन्याचा मुलामा चढविलेला मुखवटा आणि सर्व प्रकारचे अलंकार चढवून विविध पुष्पांची आरास करून देवीला सजविल्यानंतर तिचे देखणे व प्रसन्न रूप भक्तांना आनंदित करते. सोन्याचा मुलामा चढविलेला चांदीचा मुखवटा ९० तोळ्यांचा असून तो १९०५  मध्ये बनविला आहे. महापूजेनंतर आरती व दुपारी १२ वाजता महानवेद्य होतो. पुरणपोळी व खीर यांचा नवेद्य रोज असतो तसेच तांबूलाचा महानवेद्यही होतो. भक्तांना प्रसाद वाटण्यात येतो.

श्री अंबादेवी मंदिरात जाण्यासाठी पूर्वेकडून मुख्य द्वार असून सुमारे दहा दगडी पायऱ्या चढून वर जावे लागते. आत गेल्यावर पुन्हा सहा-सात पायऱ्या उतरून खाली गेल्यावर गर्भगृहाच्या समोरील सभामंडपात जाता येते. मंदिराला दोन घुमट असून ते दुरून दिसतात. त्यांच्यावर सोन्याचा मुलामा चढविलेले चांदीचे दोन कलश दिसतात, त्यांचे नूतनीकरण इ.स. १९०६ साली करण्यात आले. मंदिराच्या भोवती प्रदक्षिणा करण्यासाठी प्रशस्त जागा आहे. मंदिर परिसराच्या उत्तरेकडे श्री हनुमानाचे छोटे मंदिर आहे. मागे महादेवाचे छोटे मंदिर आहे.

श्री अंबादेवीच्या गर्भगृहाला लागूनच डाव्या बाजूला भरवनाथाची मूर्ती आहे. उजव्या बाजूला िभतीवरच्या कोनाडय़ात संगमरवरी श्री गणेशाची मूर्ती आहे. तिच्या उजवीकडे आणखी एक गर्भगृह असून त्यात श्री महादेवाची मोठी िपड आहे. मंदिरात शिरल्यावर उजव्या बाजूला मंदिराचे कार्यालय व देणगी इत्यादी देण्यासाठी काऊंटर आहेत. पलीकडे भोजनगृह वगैरे आहे. कार्यालयाला लागून हनुमानाचे मंदिर असून तेथे प्रवचनासाठी हॉल आहे.  मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा या दिवसांना भक्तांची गर्दी असते. मंगळवारी लहानशी यात्राच भरते. नवरात्र महोत्सव मोठय़ा प्रमाणावर साजरा होतो. अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना होते आणि सप्तशतीच्या पाठाने अष्टमीला यज्ञ होतो, हवन करतात. हा उत्सव नऊ दिवस चालतो. या काळात श्री एकवीरा देवी प्रतिनिधिक स्वरूपात या मंदिरात उपस्थित असते असे मानतात. त्यामुळे हवनासाठी दोन स्थंडिले तयार करतात. दोन स्थंडिलांपैकी एके ठिकाणी श्री अंबादेवी संस्थानाचे मानकरी व दुसरे ठिकाणी एकवीरा देवीचे मानकरी हवन करतात. दशमीला म्हणजे विजयादशमीचे दिवशी श्री अंबादेवीची पालखी सीमोल्लंघनासाठी दसरा आसनाजवळ जाते. ही पालखी संपूर्ण चांदीची असून आठही बाजूला चांदीचे खांब आहेत. वर सुवर्णाचा कळस असतो. पालखीसोबत दोन्ही मंदिराचे मानकरी व विश्वस्त असतात. समोर वाद्यवृंद असतो. फार मोठय़ा संख्येने लोक असतात. ही पालखी दुपारी चार वाजता सीमोल्लंघनाला निघते. मंगलवाद्य्ो आणि चौघडा आणि तुतारीही असते. रस्त्यात अनेक भक्त पालखीचे स्वागत सुवासिनींच्या हस्ते ओवाळून करतात. सीमोल्लंघनाच्या रात्री आरती होऊन पालखी परत निघते. मंदिरात आल्यावर दोन्ही देवींची पूजा व आरती होते. अश्विन वद्य दोन ते कार्तिक वद्य दोन या काळात मंदिरात काकड आरती होते. दरवर्षी चत्र महिन्यात शतचंडीचे पाठ रामनवमी महोत्सवात करतात. अष्टमीला हवन होऊन पूर्णाहुती देण्यात येते.

श्री एकवीरा देवी, अमरावती

श्री अंबादेवी मंदिराचे दक्षिण बाजूला, अंबा नाल्यावरील पूल ओलांडल्यावर श्री एकवीरा देवीचे मंदिर आहे. एकवीरा देवीला मोठी देवी (मोठी बहीण) आणि अंबादेवीला लहान देवी (लहान बहीण) म्हणण्याचा प्रघात आहे. या मंदिराचा संबंध श्री जानर्दनस्वामी नावाच्या सत्पुरुषाशी लावण्यात येतो. १७ व्या शतकात इ.स. १६४० च्या सुमारास देवीचे भक्त श्री जनार्दनस्वामी अमरावतील आले. अंबा नाल्याचे जागी त्यावेळी एक ओढा होता. त्याचे काठी निसर्गरम्य वातावरणात त्यांचा मुक्काम होता. तीरावर त्यांची पर्णकुटी होती. ते रोज जगदंबेचे दर्शन घेतल्याशिवाय अन्न ग्रहण करीत नसत. एकदा पावसाळ्यात अंबा नाल्याला पूर आला, त्यामुळे त्यांना जगदंबेचे दर्शन घेणे अशक्य झाले. स्वामींनी तीन दिवस अन्न-पाणीही घेतले नाही. तेव्हा श्री जगदंबेने त्यांना दृष्टांत दिला व अशी आकाशवाणी झाली की, ‘ज्या विहिरीचे पाणी तुम्ही स्नानसंध्येसाठी घेता तिच्या काठावर जो बाण आहे-तो बाण म्हणजे मीच होय. त्याची प्राणप्रतिष्ठा करून दर्शन घ्यावे,’ असे सांगतात. स्वामींनी त्याप्रमाणेच केले. तीच आजची एकवीरा देवी होय. या आख्यायिकेनुसार एकवीरा देवीची ही स्थापना इ.स. १६६० मध्ये झाली. पुढे मोठे मंदिर बांधण्यात आले. या एकवीरा देवीच्या मंदिरात एक भुयार आहे. मंदिराच्या दक्षिण बाजूस असलेल्या मंदिराच्या वाटेवरच्या विहिरीपर्यंत ते आहे. एक व्यक्ती सहज बसू शकेल असा एक मोठा कोनाडाही विहिरीत आहे. याच मार्गाने जनार्दनस्वामी स्नानसंध्येसाठी तेथे जात असावेत असे लोक सांगतात. जनार्दन स्वामी हे मूळचे अमरावतीजवळील नांदगावपेठ गावाचे राहाणारे होते. पेठकर या कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता.

मंदिरात वर्षभर धार्मिक कार्यक्रम चालतात. अश्विन नवरात्र, मंगळवार, शुक्रवार या काळात भक्तांची गर्दी असते. एकवीरा देवीच्या नावाचा यज्ञ अंबादेवीच्या देवळातच होतो. दसऱ्याच्या सीमोल्लंघनाला एकवीरा देवीची मूर्तीही अंबादेवीच्या पालखीतच सीमोल्लंघनास निघते. मंगळवार, शुक्रवार व सणांच्या दिवशी देवीस साजशृंगार केला जातो. या दोन्ही मंदिराच्या परिसरात दुकानांची मोठी बाजारपेठ आहे. पूजा साहित्याबरोबरच धार्मिक पुस्तके, लाकडी वस्तू, संसारोपयोगी वस्तू, बांगडय़ा इत्यादींची दुकाने आहेत. याच बाजारपेठेत श्री बालाजीचेही मंदिर आहे.

श्री महालक्ष्मी जगदंबा, कोराडी 

नागपूर जिल्ह्य़ातील कामठी तहसीलीत नागपूर-जबलपूर महामार्गावर नागपूरपासून सुमारे १५ कि.मी. अंतरावर कोराडी हे गाव आहे. कोराडीजवळ असलेले औष्णिक विद्युत केंद्र प्रसिद्ध आहे. महामार्गापासून सुमारे एक कि.मी. आत गेल्यावर श्री महालक्ष्मी जगदंबेचे मंदिर आहे. एकेकाळी येथे घनदाट जंगल होते. जुने मंदिर लहानसे असून हेमाडपंती धाटणीचे बांधले होते. परंतु आता त्याचे नूतनीकरण झाले आहे व होत आहे. मंदिर परिसरात शिविपड असून नंदी आहे. शिवपार्वती, गणेश आणि दक्षिणामुखी हनुमान यांच्याही मूर्ती आहेत, मंदिर प्रांगणात औदुंबराचा वृक्ष असून एक जलाशय पण आहे. त्यात कमळाची फुले फुलतात. श्री महालक्ष्मी जगदंबेची मूर्ती दगडी असून सुमारे तीन फूट उंचीची असावी. ती अतिप्राचीन असून स्वयंभू असावी असे मानण्यात येते. मूर्ती चतुर्भुज असून तिच्या उजवीकडील दोन हातांमधे त्रिशूळ आणि खड्ग आहेत, व डावीकडील हातांमधे डमरू आणि धनुष्य आहे. या मूर्तीचे वैशिष्टय़ म्हणजे तिच्या मूळ रूपाकडे पाहता सकाळी कन्या (बालरूप), दुपारी तरुण (युवारूप), सायंकाळी प्रौढ (वृद्धरूप) असे दर्शन होते असे भक्त मानतात. परंतु सामान्यत: मूर्तीला सोन्याचा मुलामा दिलेला चांदीचा मुखवटा स्नानादि उपचारानंतर चढविलेला असतो. सोन्याच्या अलंकारांनी आणि पुष्पांची आरास करून मूर्ती सजवितात तेव्हा मूर्तीचे स्वरूप विलोभनीय दिसते. प्राचीन काळी ही देवी भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्य़ांतील झाडीपट्टीच्या भागातून आली अशी लोकभावना आहे. सध्याच्या मंदिरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर टेकडी असून तिच्यावर जगदंबेचा भाऊ दत्तासून याचे मंदिर आहे. या मंदिरात चत्र नवरात्रात झाडीपट्टीतून हजारोंच्या संख्येने भक्त येत असत. त्यात पाटोडे आणि गायधने हे लोक मोठय़ा प्रमाणावर बलगाडीने येत असत. जवळच असलेल्या सुरादेवी नावाच्या तलावावर स्नान करीत. जवळच्या गावांमधील घरांमध्ये जोगवा मागीत आणि रोडगा बनवून देवीला अर्पण करून दर्शन घेत. त्या काळी कोंबडा व बकरा यांचा बळी देण्यात येत असे. दारू प्राशन करीत असत. आता मात्र ही प्रथा बंद झाली असून बळीऐवजी काशी कोहळे किंवा खिचडीचा प्रतीकात्मक बळीरूपाने नवेद्य अर्पण करतात. हल्ली या मंदिरात रोजचा प्रसाद म्हणून हलवा (शिरा), रव्याची खीर देतात. चिरंजीचे साखर दाणे व शेंगदाणे यांचाही प्रसाद देण्यात येतो.  अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून देवीची नवरात्र असते. सुमारे १५ ते २० लाख लोक या नवरात्रीच्या काळात दर्शनाला येतात. घटावर नारळ ठेवून अखंड दीपज्योती नवरात्र काळात लावण्यात येतात. यांची संख्या साडेसहा हजारांच्या जवळपास असते. चत्र शुद्ध प्रतिपदेपासून चत्रातील नवरात्रही असते. पूर्वीच्या काळी याच नवरात्रात झाडीपट्टीतून हजारोंच्या संख्येने भक्त येत आणि सव्वा महिन्यांपर्यंत हा उत्सव चालत असे. परंतु हल्लीच्या काळी भक्तांची संख्या कमी झाली असून आश्विन नवरात्रीलाच जास्त लोक येतात. या नवरात्रांत केवळ महाराष्ट्रच नव्हे तर छत्तीसगढ, मध्य प्रदेशपासून भक्त येतात. वर्षांतून आठ वेळा महापूजा होते. ही देवी नवसाला पावते अशी भक्तांची श्रद्धा आहे.

मंदिर परिसर फार मोठा व प्रशस्त असून जलाशयाजवळ हरिसिंग बाबांचा आश्रम आहे. एक धर्मशाळाही आहे. मंदिरात शिरण्यापूर्वी पूजा साहित्य, फुले, प्रसाद, बांगडय़ा इत्यादींची दुकाने आहेत. तसेच रांगोळी आणि नित्योपयोगी वस्तूंची तसेच तांब्यापितळेच्या वस्तू, देवदेवतांच्या मूर्ती यांचीही दुकाने आहेत. मंदिरात पूजा-अर्चा करण्यासाठी गुरव असून ते कार्य गेल्या सात पिढय़ांपासून परंपरेने श्री फुलझेले कुटुंबाकडेच आहे. त्यांच्यातीलच एक विश्वस्त मंडळावरही आहेत. हे मंदिर नागपूरकर भोसल्यांच्या मालगुजारीत येत असल्याने त्याची व्यवस्था भोसल्यांकडे होती. मात्र आता पंजीकृत विश्वस्त मंडळाकडे व्यवस्था सोपविलेली आहे.

श्री महाकाली देवी, चंद्रपूर

कृतयुगात, हल्लीच्या चंद्रपूर शहराच्या जागी ‘लोकपूर’ या नावाचे मोठे शहर होते व तेथे कृतध्वज नावाचा राजा राज्य करीत होते. त्याच्यानंतर त्याचा पुत्र सुनंद हा राज्य करू लागला. त्याच काळात तेथे महाकाली देवी प्रगट झाली अशी आख्यायिका आहे. पुढे परशुरामाने पृथ्वी नि:क्षत्रीय करण्यासाठी अनेक राज्ये नष्ट केली. त्यातच लोकपूरचे राज्यही नष्ट झाले. त्याच युगात श्रीरामचंद्र हे दक्षिणेस वनवासास निघाले असता लोकपुरातून पुढे गेले व त्याच वेळी त्यांनी हल्लीच्या चंद्रपूरच्या ईशान्येस ५० मलांवर असलेल्या चिमूर जवळच्या ‘चिमूर’ टेकडय़ातील एका टेकडीवर निवास केला असे मानतात, ती जागा आज रामदेगी (रामदिघी) म्हणून प्रसिद्ध आहे. तिथेच ‘सीताकुंड’ आहे. या टेकडीच्या पायथ्याशी राममंदिरही आहे. कलीयुगाच्या सुरुवातीस चंद्रहास्य नावाच्या राजाने महाकाली आणि अंचलेश्वर (महादेव) ही ठिकाणे पाहून तेथे राजधानी वसविली व त्याच्या नावावरून त्या नगरीस इंदूपूर किंवा चंद्रपूर असे नाव पाडले अशीही आख्यायिका आहे. (चांदा सेटलमेंट रिपोर्ट १८६९ मध्ये देण्यात आलेल्या व नंतर चांदा गॅझिटिअर १९०७ मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका आख्यायिकेनुसार.) पुढे त्याचे राज्य नष्ट झाले व त्यानंतर भद्रावती ही नवीन राजधानी निर्माण झाली.

या भद्रावतीचा विस्तार उत्तरेस भटाळ्यापासून तो दक्षिणेस चंद्रपूपर्यंत होता. म्हणजे सुमारे ३५ मल लांब व १६ मल रुंद पसरलेली ही भद्रावती किंवा भांदक ही राजधानी होती. ‘भटाळा’ हे गाव वरोरा ते चिमूर या रस्त्यावर सध्या एक लहानसे गाव आहे. परंतु त्या गावात अनेक ठिकाणी खणले असता पुराणकालीन नाणी सापडतात असे तेथील लोक सांगतात. प्राचीन संदर्भाचे विश्लेषण केल्यास तत्कालीन शहर हे भद्रावती नसून भांदक आहे व पुराणातले भद्रावती हे हस्तिनापूरपासून जवळ होते. एका विस्तृत पठारावर पसरलेल्या भांदक या गावाच्या पश्चिमेला विजासन टेकडय़ा आहेत. त्यांच्यात गुहा असून त्या इसवी सन दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकातल्या असाव्यात. त्यांच्यातल्या काही शिलालेखांचा काळ हा गुप्तांचा किंवा सातव्या किंवा आठव्या शतकातला असावा असे किनगहॅम यांनी म्हटले आहे. म्हणजेच भांदक ही प्राचीनकाळी विस्तृत पसरलेली नगरी होती, असे दिसते. मात्र आज त्याच नगराचा उल्लेख भांदक तसेच भद्रावती या दोन्ही नावांनी होतो. गणेशपुराणात त्याचा उल्लेख पुष्पकपूर या नावाने आला आहे. पुढे त्रेतायुगात मणिपूर, द्वापारयुगात भांदक आणि कलीयुगातही भांदक म्हणूनच ओळखले जाते. गुत्समद ऋषीने ज्या पुष्पक वनात तपश्चर्या करून श्रीगणेशाची आराधना केली व वरप्राप्तीनंतर तिथेच श्री वरदविनायक गणेशाची स्थापना केली त्या स्थानाचा उल्लेख भृगु ऋषीने लिहिलेल्या गणेशपुरात खालीलप्रमाणे आढळतो.

इदं नगरं देवयुगे पुष्पक संजितम्।

त्रेतायां मणिपुरंच, भानकं द्वापारेपिच

कलौ तु भद्रकं नामख्यातं भविष्यति॥

भानक, भद्रक या नामांचा अपभ्रंश भांदक असा होतो. भांदक हे मोठे शहर होते आणि त्यात विजासन, गवराळा, सुमठाणा इत्यादी भाग येत होते. भांदकपासून सोळा मलांवर चांदा/चंद्रपूर नावाचे खेडे आहे असे उल्लेख जुन्या साहित्यात आढळतात. भांदकच्या पश्चिमेला दोन मलांवर गौराळा हे गाव असून तिथे एक तलाव आहे. त्याला लागून असलेल्या टेकडीवर श्री वरदविनायकाचे मंदिर आहे. याच जागी गृत्समद ऋषीने तपश्चर्या केल्यानंतर श्री वरदविनायकाची स्थापना केल्याचे वरील आख्यायिकेत म्हटले आहे. याच ठिकाणी पूर्वी योवनोशाचा महाल होता असे सांगितले जाते. पुढे तो पडला व जुने देऊळ राहिले. म्हणूनच काही लोक यालाच यौवनोशाचे देऊळ किंवा महाल असे संबोधतात. याच मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूच्या (मंदिरात प्रवेश करताना डाव्या हाताच्या िभतीत) एक शिलालेख होता. त्यात संवत ११६० असा उल्लेख आहे.

त्यावरून इ.स. ११०४ मध्ये चालुक्य राजा विक्रमादित्य (सहावा) याच्या काळात हे मंदिर बांधले गेले असावे. या राजाच्या दंडनायक नावाच्या अधिकाऱ्याने इ.स. १०८७  मध्ये विजारण टेकडीजवळची काही जमीन चराईसाठी दान दिली होती.

चंद्रपूर येथील महाकाली मंदिर विदर्भ तसेच मराठवाडय़ातील लोकांचे श्रद्धास्थान आहे. तसेच ते गोंड जमातीच्या लोकांचेही श्रद्धास्थान आहे. या देवीच्या संबंधातील उल्लेख स्कंध पुराणातील सह्य़ाद्री खंडात आढळतो. त्यानुसार असे सांगतात की, त्रेतायुगातील राजा कृतध्वज यास सुनंद नावाचा मुलगा होता. त्याला देवीने दृष्टांत दिला आणि एका विशिष्ट जागी उत्खनन करण्यास सांगितले. तेव्हा त्याला भुयारातील शिळेवर एक भव्य अशी मूर्ती दृष्टीस पडली. ती त्याने पाषाणात एक गुहा करून त्याच जागी स्थापित केली. तीच ही महाकाली देवी होय. आणखी एक आख्यायिका अशी की, खांडक्या बल्लाळ या गोंड राजाच्या राज्याची राजधानी बल्लारपूर येथे होती. ती पुढे त्याने चंद्रपूर येथे हलविली. झरपट नदीच्या कोरडय़ा पात्रात त्याला एक कुंड दिसले. त्यातील पाण्याने त्याने तोंड धुतले आणि तो ते पाणी प्यायला. त्याबरोबर त्याच्या चेहऱ्यावरील खांडके नष्ट झाली. दुसऱ्या दिवशी त्याने तेथे जाऊन कुंडातील पाण्याने स्नान केले तेव्हा त्याच्या सर्व अंगावरील खांडके नाहीशी झाली व त्याचे शरीर तेजस्वी दिसू लागले. राजाला स्वप्नात महादेवाने दर्शन दिले. त्यामुळे राजाने ते प्राचीन कुंड महादेवाच्या पिंडीच्या आकाराचे बनविले आणि तेथे अंचलेशर महादेवाचे मंदिर बांधले. याच मंदिराच्या दक्षिण बाजूला थोडय़ा अंतरावर राजाला एक भुयार दिसले आणि त्या भुयारात खडकात कोरलेली भव्य अशी देवीची मूर्ती आढळली. तीच ही महाकाली होय. राजाने ते भुयार स्वच्छ करून तेथे देवीचे मंदिर बांधले. या तपशीलांकडे पाहता इ.स. १४९५ ते १४९७ या काळात ही मंदिरे बांधण्यात आली असावीत. नंतरच्या काळात गोंड हिराई हिने मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि महाकालीच्या जवळ एकवीरा देवीचेही मंदिर बांधले. त्यामुळे हल्लीचे मंदिर इ.स. १७०४ ते १७१९ ते या काळात बांधले गेले असावे. हल्लीच्या देवीच्या मूर्तीच्या मागच्या बाजूला छोटय़ा भुयारात देवीचा पलंग असून निद्रा घेत असलेल्या स्वरूपात महाकाली देवीच्या मूर्तीचे दर्शन होते. याच ठिकाणी ही मूर्ती सापडली असावी. या दोन्ही कथा लक्षात घेता कृतध्वजाचा पुत्र सुनंद याने भुयारात आढळलेली देवीची जी मूर्ती गुहेत स्थापन केली तीच खांडक्या बल्लाळ राजाला सापडली असावी.

श्री महाकाली देवीची मूर्ती पाच फूट उंचीची असून उंच पाषाणात कोरलेली आहे. मूर्तीला शेंदूर अर्चन करण्यात आलेले आहे. मुखवटासुद्धा बसविण्यात आला आहे. तिच्या एका हातात खड्ग व दुसऱ्या हातात ढाल आहे. मंदिरात गेल्यावर सुमारे आठ-दहा पायऱ्या उतरून गेल्यानंतर गुहेसारखे दगडी गर्भगृह आहे. त्याच्या मध्यभागी श्री महाकालीची मूर्ती विराजमान आहे. गर्भगृहाचा दरवाजा आणि मूर्ती याच्यामध्ये फार थोडे म्हणजे दोन-तीन फुटांचेच अंतर आहे. गर्भगृह हे एखाद्या गुहेसारखेच वाटते. देवीचे मंदिर चौरस बांधणीचे व दगडी आहे. मंदिर ६० बाय ६० फुटांचे असून उंची ५० फूट आहे. त्यावर मुगल स्थापत्य शैलीची छाप आहे असे तज्ज्ञांचे मत आहे. देवीचे गर्भगृह हे दहा फूट खोल असून १८ बाय १८ फुटांचे आहे. महाकालीची मूर्ती ही एका ३.१५ मीटर बाय १.६० मीटर बाय १.८५ मीटर आकाराच्या गुहेत स्थापित आहे. मूर्तीसमोरच्या गर्भगृहाच्या मोकळ्या जागेत महादेवाची मोठी पिंड/शिविलग स्थापित केले आहे. मंदिराच्या वर चार कोपऱ्यांवर चार घुमट आणि मध्यभागी एक मोठय़ा आकाराचा घुमट आहे. या महाकाली मंदिराभोवती मोठा परकोट असून तो इंग्रजांच्या राजवटीत सुपरिटेंडेंट कॅप्टन पिट यांनी बांधल्याचे उल्लेख आढळतात.

गोंड राजा वीरशहा (इ.स. १६९६-१७०४ ) याची पत्नी राणी हिराई हिने हे भव्य मंदिर बांधले असून वीरशहाच्या पराक्रमी विजयाचे प्रतीक म्हणून चत्र पौर्णिमेला महाकाली देवीच्या उत्सवाची प्रथाही सुरूकेली. तेव्हापासून चत्र शुद्ध प्रतिपदेला नवरात्राची सुरुवात होते व उत्सव आणि यात्रा सुरू होते. या यात्रा काळात महाकाली मंदिरात भक्त लाखोंच्या संख्येने येतात. अश्विन महिन्यातील नऊ दिवस नवरात्र उत्सव साजरा करतात. विजयादशमीलाही भक्तांची गर्दी असते. या यात्रेला विदर्भातून लोक येतातच परंतु मराठवाडय़ातूनही हजारोंच्या संख्येने लोक येतात. याची सुरुवात नांदेड जिल्ह्य़ातल्या तळेगाव उमरी या गाव्या राजाबाई देवकरीण हिच्यापासून झाली. असे सांगतात की, तिला देवीने दृष्टांत दिला आणि सांगितले की, ‘‘मी चंद्रपूर परगण्यात आले, तू माझ्या भक्तीचा प्रचार कर.’’ राजाबाई तिच्यासोबत मोठय़ा संख्येने देवी भक्तांना घेऊन देवीच्या दर्शनास आली. तेव्हापासून नांदेड, परभणी, बेदर इत्यादी भागांतून फार मोठय़ा संख्येने लोक येतात. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, छत्तिसगड इ. भागातील गोंड आदिवासी तसेच इतरही जाती-जमातींचे लोक मोठय़ा प्रमाणावर येतात. आंध्र प्रदेश, तेलंगणा इथून पोतराज या यात्रेला येतात. पोतराज म्हणजे देवीचे गावोगाव हिंडणारे भक्त. ते इथे दर्शनाला मोठय़ा प्रमाणात येतात. देवीच्या पुरुष भक्तांना पोतराज आणि स्त्री भक्तांना देवकरीण असे म्हणतात. पुरुष पोतराज स्त्रियांप्रमाणे केस वाढवून अंबाडा बांधतात आणि कपाळावर कुंकवाचा मळवट भरतात. कमरेभोवती हिरव्या रंगाचा घागरा व त्यावर घुंगराची माळ व पायात मोठे पितळी वाळे असतात. कमरेवरचे अंग उघडे असते. त्यांच्या हातात शेवटी निमुळता होत गेलेला चार ते पाच फूट लांबीचा व तीन ते चार इंच व्यासाचा ‘साठ’ (आसूड) असतो. कौल मिळाल्यावर तो सोट ते गरगर फिरवून स्वत:च्या अंगावर मारतात. त्याच्यासोबत एक स्त्री असून तिच्या डोक्यावर एका परातीत किंवा टोपलीत देवीचा मुखवटा ठेवलेला असतो. त्याची मळवट भरून पूजा केलेली असते. तिच्या हातात एक डफ असून ती दोन काडय़ांनी त्यातून आवाज काढत असते. यात्रेला दूरदूरून आलेले लोक रात्री मंदिर परिसरात पडाव टाकून विसावतात व रात्रभर डफरे वाजवून स्तवनगीते म्हणतात. देवीच्या मंदिर परिसरात आणि बाहेरील बाजूलाही प्रसाद, पूजा साहित्य, इतर संसारोपयोगी लहान वस्तू, प्लास्टिकची भांडी इत्यादींची पक्की दुकाने आहेत. चत्र महिन्यात फिरते दुकानदारही दुकाने लावतात.

श्री क्षेत्र महाकाली देवस्थान, काचनूर.

हे देवस्थान वर्धा शहरापासून ३६ कि.मी. अंतरावर आहे. तर वर्धा-कोंढाळी मार्गाने फक्त एक कि.मी. दूर आहे. हे पुरातन स्थान आहे असे सांगण्यात येते. या महाकाली देवस्थानात श्री महाकाली, श्री महालक्ष्मी आणि महासरस्वती तीन शिलारूपी बाणांच्या स्वरूपात आहेत. त्रेतायुगात धौम्य ऋषींनी आपला आश्रम इथे स्थापन केला, असा लोकांचा समज आहे. हे स्थान चारही बाजूंनी पर्वतरांगांनी वेढलेले असून जवळच ढगा हे महादेवाचे प्रसिद्ध स्थान, घोडदेव आणि वानरकुंड आहे. श्रीरामाच्या राज्यभिषेकानंतर परत जाताना वानरराज सुग्रीव तहान लागली म्हणून या आश्रमाजवळ आले तेव्हा ऋषी पत्नीने पाण्याने जे कुंड निर्माण केले, असे मानतात. ते आजही वानरकुंड म्हणून प्रसिद्ध असून त्यांचे पाणी कधीही कमी होत नाही अशी लोकभावना आहे. इ.स. १९९२ साली या कुंडाजवळ शिवमंदिर निर्माण करण्यात येऊन तेथे धौम्य ऋषींची प्रतिमा बसविण्यात आली. सुमारे १०० ते १२५ वर्षांपूर्वी वर्धा नदीच्या तीरावर जमिनीत गावकऱ्यांना दृष्टांत होऊन या तीन देवतांच्या मूर्ती सापडल्या, असे सांगितले जाते. त्यानंतर त्या जागी खणून गावकऱ्यांनी त्या मूर्ती बाहेर काढल्या व त्यांची विधिवत प्रतिष्ठापना केली. येथील श्री महाकाली, श्री महालक्ष्मी व श्री महासरस्वती या देवींच्या श्रद्धाळू भक्तांना इच्छापूर्तीचे समाधान मिळू लागले व भक्तांची संख्या वाढू लागली. सध्या हे देवस्थान दक्षिणचे वैष्णदेवी संस्थान या नावाने प्रसिद्ध झाले आहे. या मंदिराच्या समोर  १४० बाय ३० अशी सर्व सोयींनी संपन्न अशी धर्मशाळा निर्माण केली आहे. एक विशाल सभागृहदेखील आहे. धर्मशाळेला लागूनच स्वयंपाकघर असून भक्तांना भोजन तयार करण्याची व्यवस्था आहे. प्रांगणात एक दीपस्तंभ स्थापिला आहे.

या मंदिरात नववर्ष दिन म्हणजे गुढीपाडवा, गुरुपोर्णिमा, रक्षाबंधन, पोळा, नवरात्री-उत्सव मोठय़ा प्रमाणावर साजरे केले जातात. नवरात्रात पहिल्या दिवशी भगवतीला स्नानांतर सिंदूर अर्पण, नवे वस्त्र, आभूषण तसेच पूजन केले जाते. नंतर कलशांची स्थापना करतात. नवमीला मोठय़ा प्रमाणावर कलश विसर्जन करतात. या वेळेला दहा ते १५ हजार लोक असतात. सायंकाळी होम हवन होऊन महोत्सवाचा समापन विधी होतो. कोजागिरी पोर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी अखंड ज्योती उत्सवाचा प्रारंभ होतो. हा ४० दिवस चालतो. या काळात फक्त ओल्या वस्त्रानेच मंदिरात प्रवेश करता येतो. बाकी कार्यक्रम नवरात्रासारखेच असतात. ४१व्या दिवशी याचे समापन होते. या स्थानाला ‘पंचतीर्थ’ असेही म्हणतात. कारण या परिसरात पाच पावन क्षेत्रं आहेत ते म्हणजे श्री महाकाली देवस्थान, घोडदेव, वानरकुंड, ढगा आणि घानाड.

गोरजाई मंदिर, वैरागड 

गडचिरोली जिल्ह्य़ातील आरमोरी तहसिलीत वैरागड हे ऐतिहासिक महत्त्वाचे स्थान असून त्याला पर्यटनस्थळ म्हणूनही महाराष्ट्र शासनाने दर्जा दिलेला आहे. हे ठिकाण गडचिरोलीपासून ४३ किलोमीटर अंतरावर आहे. या गावाजवळ खोब्रागडी आणि वैलोचना या दोन नद्यांचा संगम आहे. येथे पुरातन किल्ला आणि अनेक हेमाडपंती पद्धतीने बांधलेली मंदिरे आहेत. या भागात खोदकाम करताना दगडी मूर्ती आणि पुरून ठेवलेले धन अनेकांना सापडले आहे. वैरागडचा किल्ला ऐतिहासिक महत्त्वाचा व पुरातन आहे. या किल्ल्याचे क्षेत्रफळ साडेतेरा हेक्टर आहे. याची तटबंदी २५ ते ३० फूट असून पक्की दगडांची आहे. किल्ल्याला पूर्वाभिमुख असे भव्य प्रवेशद्वार आहे. आत गेल्यास दोन्ही बाजूला पडकी घरे आढळतात. विहिरींची संख्या पूर्वी १०० च्या वर होती. या किल्ल्याभोवती खंदक आहेत. वैरागडचे पुरातन नाव ‘वजरागर’ असे आहे. (वज्र-हिरा) येथे एकेकाळी हिऱ्यांची बाजारपेठ होती. इसवी सनाच्या नवव्या शतकात नागवंशीय माना लोकांचे राज्य होते. करुमप्रदोह हा त्यांचा पहिला राजा होता. १२ व्या शतकापावेतो त्यांचे राज्य होते. पुढे हैहयवंशीय राजांचे मांडलिकत्व मानांनी स्वीकारले. पुढे हा किल्ला इ.स. १४५० नंतर बल्लापूरच्या गोंड राजाच्या ताब्यात गेला. आज मात्र परकोटाच्या आत आणि बाहेरही पडझड झालेली असून झाडे वाढलेली आहेत.

गोंड राजाचा सेनापती आणि किल्ल्याचा किल्लेदार हरिश्चंद्र याने जेव्हा किल्ल्याची सुधारणा केली तेव्हा त्याने आपल्या राज्यामध्ये सप्त धामांची निर्मिती केली. त्यातील एक धाम म्हणजे गोरजाईचे मंदिर आहे. सुमारे एक किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. माना समाजाचे लोक या देवीला आपली कुलदेवता मानतात. मोठमोठय़ा दगडांनी हेमाडपंती पद्धतीने हे मंदिर बांधले आहे. याच्या जवळूनच नदी वाहते. देवळाच्या गर्भगृहाला एक सभामंडप लागूनच आहे. या पुरातन मंदिराची किरकोळ पडझड झाली असून ते अजूनही चांगल्या स्थितीत आहे. आजही माना लोक गोरजाई मंदिराला भेट देतात.

श्री रेणुकामाता मंदिर, चिखली

चिखली हे गाव बुलढाणा जिल्ह्य़ाचे तालुक्याचे ठिकाण असून ते थंड हवेचे ठिकाण आहे. या गावात असलेले प्राचीन रेणुकामाता मंदिर  प्रसिद्ध आहे. या मंदिराची अशी आख्यायिका सांगण्यात येते की, बच्चानंद महाराज बलगाडीने पेरकुंड घेऊन जात असता त्यांच्या गाडीवर रेणुकामाता आली. त्यांनीच तिची स्थापना केली. तर दुसऱ्या आख्यायिकेनुसार जवळजवळ १५० वर्षांपूर्वी चिखलीपासून दोन कि.मी. अंतरावर घनदाट जंगलात योगी शिवानंद आणि योगी बच्चानंद यांना रेणुकामातेचे दर्शन झाले. त्यांनी तेथेच तिची पूजा-अर्चना केली. एक छोटे मंदिर बांधले. पुढे हीच रेणुकामाता चिखली गावाची ग्राम देवता म्हणून प्रसिद्ध पावली. रेणुकामाता मंदिराच्या गाभाऱ्यात जाताच समोर शेंदूरचर्चित, उत्तराभिमुख असलेली, प्रसन्न वदना रेणुकामाता मन मोहून टाकते. तिचे तेजस्वी रूप बघून भक्तगण आनंदित होतो; भक्तिभावाने तिच्यासमोर विनम्र होतात. देवीच्या कपाळावर मोठे कुंकू असून तिच्या भांगात खडय़ामोत्याची िबदी आहे, गळ्यात मंगळसूत्र आणि इतर दागिने आहेत. कानात मासोळीच्या आकाराचे कुंडल आहेत. हिरवे वस्त्र परिधान केलेली देवी अत्यंत सुंदर दिसते. देवीच्या गाभाऱ्यातील घुमटावर अनेक देवीदेवतांच्या मूर्ती चित्रित केल्या आहेत. मंदिराबाहेरच बच्चानंद महाराजांची समाधी आहे. अश्विन महिन्यात देवीचा नवरात्रोत्सव मोठय़ा भक्तिभावाने साजरा केला जातो. नवरात्रीच्या नऊ दिवसांत शहरातील आणि आसपासच्या गावांतील भक्तगण मोठय़ा संख्येने दर्शनाला येतात. स्त्रिया खणा-नारळाने तिची ओटी भरतात. देवीला तांबूल आवडत असल्याने तिला विडय़ाच्या पानांचा तांबूल अर्पण केला जातो; तोच प्रसाद म्हणून वाटला जातो. नवरात्रीच्या काळात या परिसरात नवचतन्य बघावयास मिळते. सनई, चौघडय़ांच्या गजरात, भाविकांच्या उपस्थितीत देवीची पूजा होते; अंबेचा जयजयकार होतो. नवरात्रात येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अंबेचा जोगवा, कीर्तन, प्रवचन, नवमीला होम- हवननंतर गावातील लहान-थोर सर्वच मंडळी देवीला सोने द्यायला जातात आणि दर्शन घेतात. चत्र महिन्यातील पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते. देवीची पूजा-अर्चना झाल्यावर येथे ‘वगदी’ खेळण्याची परंपरा आहे. ‘वगदी’ म्हणजे बलगाडीवर सपाट पाटामध्ये लाकडी बल्लीच्या दांडय़ावर दुसऱ्या बल्लीचा दांडा आडवा ठेवून त्या आडव्या दांडय़ाच्या मधोमध वर एक किंवा दोन माणसं मावतील एवढी राहटीसारखी बसण्याची जागा असते. त्याला दोन्ही बाजूला लोंबकळणारे दोन झुले असतात. या झुल्यावर  बसवून फेऱ्या मारायला लावले जाते. असे सांगतात की हा ‘बगाड’सारखाच एक प्रकार असतो. चत्री पौर्णिमेला देवीची मिरवणूक गावातून ढोल-ताशांच्या गजरात काढली जाते. यावेळी भक्तगण विविध खेळ खेळतात. पहाटेपर्यंत ही शोभायात्रा चालते. देवीची प्रतिकृती प्रतिमा सजविलेल्या बलगाडीत विराजमान असते.

पारशिवनीची महालक्ष्मी

येथील मूर्ती केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील मूर्तीमध्ये विशेष गणली जाईल अशी आहे. नागपूरपासून ४४ कि.मी. वर रामटेक-मनसर रस्त्यावर पारशिवनी फाटा लागतो. त्या गावात साधारण ४० वर्षांपूर्वी इलेक्ट्रिक पोलसाठी खड्डा खणताना व्यंकटराव सावरकर यांच्या घराच्या परसात महालक्ष्मीची दगडी प्रतिमा आढळली. दीर्घकाळ जमिनीत गाडलेली असूनही ग्रेनाइट दगडाची झळाळी कायम होती. शिरोभागी त्रिकोणी होणारी तिची पाठशिळा सुमारे ९० सेंमी. उंच आहे. त्रिकोणी शिरोभागात लहान लहान सव्यललितासनात बसलेल्या चार चार देवी प्रतिमा आहेत. तसेच दोन्ही हातांच्या पाठीमागे आणि मुकुटामागे पाठशिळेवर तीन छोटी छोटी कोष्टके आहेत. त्यातही देवी प्रतिमा आहेत. पाठशिळेवर पीठापासून वपर्यंत दोन्ही बाजूला सर्वात खाली हत्ती आणि नंतर क्रमाने घोडा, नर्तकी आणि व्याल अशा सममितिय प्रतिमा आहेत. चतुर्भुज मूर्ती समभंगात उभी असून प्रदक्षिणा क्रमाने पाहता मातुिलग, भंगलेली गदा, खेटक(ढाल) आणि पानपात्र ही आयुधे तिच्या हातात आहेत. पायापाशी डाव्या बाजूला तिचे वाहन सिंह आहे. देवीच्या आजूबाजूला चामर धारिणी, कुंभ-वाहिनी सेविका असून खाली दोन स्त्रिया हात जोडून बसलेल्या आहेत. महालक्ष्मी नखशिखान्त नटलेली आहे. मुकुट रत्नजडित असून त्याच्या दर्शनी भागावर नागयुगुल चित्रित आहे. विशेष म्हणजे मुगुटावर सयोनि लिंग आहे. शिवाय कुचबंध, उदरबंध, रत्नजडीत मेखला, कर्णकुंडले, बाजुबंद, मुद्रिका, कंकणे आणि सल नूपुर आहेत. देवी भागवतात एक वर्णन आहे-

‘‘मातुिलग गदाखेटं पानपात्रंच बिभ्रती

नागं लिंगं च योिनच बिभ्रती नृपमूद्र्धीने॥’’

हे वर्णन या मूर्तीला तंतोतंत लागू पडते. कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे रूपही बहुंशी असेच आहे. पानपात्राच्या ऐवजी तिच्या हातात कमंडलू आहे एवढाच फरक. ही त्रिमितीय प्रतिमा घडविण्यासाठी कलाकाराने अक्षरश: प्राण ओतले आहेत. ही सुंदर दगडी प्रतिमा बघण्यासाठी, अभ्यासासाठी, जगभरातून चिकित्सक मूर्तीशास्त्रीय मंडळी येथे येतात. देवी नवरात्राच्या काळात हजारो भक्त येतात. अभ्यासावरून ही प्रतिमा साधारण १० व्या ११ व्या शतकातील ठरते.

नेरिपगळाई देवी (अमरावती)

सतीच्या ५२ शक्तिपीठांपकी नेरिपगळाई हे एक पीठ आहे. अमरावती-मोर्शी रस्त्यावर ३० कि.मी. अंतरावर एक गोराळा नावाची वस्ती आहे. तेथून दीड कि.मी. अंतरावर उंच टेकडीवर जगन्माता नेरिपगळाई देवीचे ठाणे आहे. मंदिर यादवकालीन म्हणजे १२ वे १३ व्या शतकातले असावे. मंदिराच्या प्राचीन बांधकामापकी गर्भगृह शिल्लक असून सभामंडप, तटबंदी महाद्वार हे नंतरचे आहे. स्वयंभू मानल्या गेलेल्या या स्थानावर असलेली तांदळा स्वरूपातील प्रतिमा विदर्भातील अनेकांची कुलदेवता आहे. सभामंडपाची व तटबंदीची बांधणी भक्कम काळ्या दगडांची आहे. मंदिर साधे असून गर्भगृह व सभामंडप हीच देवालयाची वैशिष्टय़े. पण तटबंदी मजबूत बांधणीची आहे. मंदिराचा सभामंडप व तटबंदीच्या बांधणीसाठी एलीचपूरच्या (सध्याचे अचलपूर) मुसलमान सरदाराने व भागानगरच्या नवाबाने आíथक मदत दिली अशी लोकश्रुती आहे. देवालयाच्या समोर नागपूरकर भोसल्यांनी बांधलेला जलाशय असून त्यास कर्पूर जलाशय असे म्हणतात. जलाशयाच्या पाण्यात औषधी गुणधर्म आहेत असे मानले जाते. चर्मरोगांच्या विविध तक्रारींवर हे पाणी वापरले जाते. जलाशयात बाराही महिने पाणी असते. पिंगळमातेचे दर्शन अत्यंत विलोभनीय असून माता दिवसातून तीन वेळा रूप बदलते अशी भक्तांची श्रद्धा आहे. नवरात्रात येथे प्रचंड गर्दी असते. दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागतात. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमीपर्यंत यात्रा असते. याच दरम्यान येथे जनावरांचा बाजारही भरतो. पंचक्रोशीतून हजारो भक्तगण दर्शनासाठी पायी येतात. नऊ दिवस सतत कीर्तन, प्रवचन, करमणुकीचे कार्यक्रम सुरू असतात. शिवाय प्रत्येक मंगळवारी देवीची खणा-नारळाने ओटी भरणाऱ्यांची गर्दी असते. विश्वस्त मंडळाने भक्तांच्या देणगीतून विविध पायाभूत सोयी उभारल्या आहेत. पेयजल, वीज, रस्ते, भोजन, निवास याची उत्तम व्यवस्था आहे

शोध महिषासुरमर्दनीचा!

भारतातील अनेक भागांत शक्तीची उपासना करण्यासाठी देवीच्या दुर्गा या रूपाची पूजा केली जाते. महिषासुरमर्दनिी, भवानी, कात्यायनी इत्यादी नावांनी लोकप्रिय असलेल्या या देवतेच्या मूर्तीच्या उगमाचा आणि विकासाचा पुरातत्त्वीय पुरावे, प्राचीन साहित्य, नाणी, शिलालेख आणि मूर्तीशास्त्र यांच्या आधारे घेतलेला हा वेध.

प्रागतिहासिक काळापासून मानव विविध रूपातील देवतांची आराधना करत आला आहे. स्त्रीच्या सृजनशक्तीचा आदर करण्यासाठी म्हणूनच त्याने शक्तीची, स्त्रीरूपातील देवतांची पूजा करायला सुरुवात केली असावी. जगभर मिळणाऱ्या प्रागतिहासिक काळातील मातृदेवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मातीच्या मूर्ती याची साक्ष देतात. ऑस्ट्रिया आणि चेक रिपब्लिक येथे सापडलेल्या मातीच्या व दगडी प्रतिमा तीस ते अठ्ठावीस हजार वर्षांपूर्वीच्या आहेत. या प्रतिमांना आता व्हीनस म्हणून ओळखले जाते. शताल हुउक (तुर्कस्थान), टेपे सरब (इराण), टेपे गवरा (इराक), मुंडिगाक (अफगाणिस्तान) इत्यादी ठिकाणांबरोबरच भारत व विद्यमान पाकिस्तानातील सिंधू संस्कृतीच्या स्थळांमध्ये मातृदेवतांच्या मातीच्या भाजलेल्या मूर्ती उत्खननात सापडल्या आहेत. या मूर्ती साधारणपणे आठ ते चार हजार वर्षांपूर्वीच्या आहेत. अर्थातच या मूर्ती वरील प्रत्येक संस्कृतीमध्ये कोणत्या नावाने ओळखल्या जात होत्या हे सांगणे शक्य नाही. पण संशोधक त्यांना मातृदेवता असे संबोधतात. दक्षिण भारतात आदिचन्नलूर येथे लोहयुग संस्कृतीतील मातृदेवतेची तांब्याची मूर्ती सापडली आहे. पुणे जिल्ह्यतील इनामगाव येथे झालेल्या उत्खननात एका मातीच्या छोटय़ा पेटीसारख्या आवरणात ठेवलेली स्त्रीदेवतेची मूर्ती सापडली होती. सुरुवातीला अत्यंत साध्या असणाऱ्या मातृदेवतांच्या या भाजक्या मातीच्या मूर्ती मौर्य, शुंग, कुशाण राजांच्या काळात इसवी सनापूर्वी तिसरे शतक ते इसवी सनाचे तिसरे शतक विविध अलंकारांनी सजलेल्या अशा देखण्या बनवल्या जाऊ लागल्या. याच काळातील स्थानिक स्त्रीदेवता म्हणून पुजल्या जाणाऱ्या यक्षींच्या दगडी मूर्ती विदिशा, बारहूत, मथुरा, सांची येथे आढळल्या आहेत.

02-devi-lp

भारतात कुशाण राजांच्या काळात मोठय़ा प्रमाणावर देवतांच्या पाषाणाच्या प्रतिमा निर्माण होऊ लागल्या होत्या. सरस्वती, लक्ष्मी, पार्वती या ब्रह्मा, विष्णू, आणि महेशाशी संबंधित देवतांच्या प्राचीन प्रतिमा उत्तरभारतात सर्वत्र आढळतात. विशेषत शैव आणि शाक्त पंथाशी संबंधित दुर्गा या देवीच्या अनेकविध प्रतिमा सापडतात. आगमग्रंथांनुसार तिची नऊ रूपे आहेत. त्याव्यतिरिक्त देवीचे महिषासुरमर्दनिी हे रूप भारतात अत्यंत लोकप्रिय आहे. या दुर्गा महिषासुरमर्दिनीच्या मूर्तीचा उदय आणि आतापर्यंत झालेला प्रवास जाणून घेण्याचा हा एक प्रयत्न.

प्राचीन संस्कृत साहित्यातील संदर्भ

या दुर्गादेवीचे लिखित पुराव्यातील प्राचीनत्व शोधण्यासाठी भारतातील सर्वात प्राचीन वैदिक साहित्याचा संदर्भ तपासावा लागतो. ऋग्वेद व अथर्ववेद संहितांतील देवतांमध्ये इंद्र, मित्र, वरुण, अग्नि इत्यादी पुरुषदेवतांचे प्राबल्य आहे. याशिवाय अदिती, पृथ्वी, वाक्, श्री, यमी, उषा इत्यादी स्त्रीदेवता वेदांमध्ये आढळतात. परंतु कात्यायनी, पार्वती, उमा याची नावे या वेदांमध्ये येत नाहीत. कृष्ण यजुर्वेदाच्या तत्तिरीय आरण्यकात रुद्राच्या पत्नी म्हणून अंबिका आणि उमा यांचा उल्लेख येतो. याच तत्तिरीय आरण्यकात कात्यायनी, कन्याकुमारी, दुर्गी यांना एकाच देवीची नावे म्हणून संबोधले आहे. तसेच वरदा, वेदमाता इत्यादी स्त्रीदेवतांचाही उल्लेख केला आहे. परंतु या स्त्रीदेवतांचे महत्त्व काय होते हे सांगता येत नाही.

केनोपनिषदात रुद्रपत्नी उमेचा उल्लेख हैमवती म्हणजे हिमवत पर्वतातील मुलगी असा आढळतो. रुद्र या पर्वताशी संबंधित देव असल्यामुळे त्याची पत्नी हिमवत पर्वताशी संबंधित असणे साहजिकच आहे. उत्तर वैद्री काळातील हिरण्यकेशी गृह्य़सूत्र या ग्रंथामध्ये भवानी, दुर्गा, भद्रकाली या देवींची नावे येतात. तर बौधायन गृह्य़सुत्रात दुर्गाकल्पच आढळते. पारस्कर गृह्य़सूत्रातील ‘शूलगव’ यज्ञाच्या विधीत आहुती देताना शर्वाणी, भवानी इत्यादी देवशक्तींना आहुती द्यावी, असे वर्णन आढळते.

इसवीसनापूर्वी पाचव्या शतकात संस्कृत व्याकरणकार पाणिनी याने रचलेल्या अष्टाध्यायी या ग्रंथात भवानी, शर्वाणी, रुद्राणी आणि मृडाणी यांचा उल्लेख आहे. शिवाच्या भव, शर्व, रुद्र आणि मृड या चार रूपांच्या शक्ती म्हणून आपण त्यांना ओळखू शकतो. अर्थात या काळात त्यांचे किती महत्त्व होते ते मात्र कळत नाही.

03-devi-lp

इसवीसनापूर्वी तिसऱ्या शतकात कौटिल्याने लिहिलेल्या ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथात नगराच्या मध्यभागी इतर देवतांबरोबरच मदिरा नावाच्या देवीचे मंदिर उभारावे असे सांगितले आहे. काही संशोधकांच्या मते मदिरा ही कृषीदेवता होती, तर काहींच्या मते ही दुर्गा असावी. या अर्थशास्त्र ग्रंथातच एके ठिकाणी तळघरांच्या दाराच्या चौकटीवर देवी प्रतिमा काढावी असे सांगितले आहे.

रामायणामध्ये लक्ष्मीच्या प्रतिमेच्या काही उल्लेखांव्यतिरिक्त शक्तीपूजनाचे संदर्भ आढळत नाहीत. महाभारताच्या विराट आणि भीष्म पर्वात देवीचे स्तवन सापडते. महाभारतात ती विन्ध्यवासिनीच्या स्वरूपात येते.

भास या प्रसिद्ध संस्कृत नाटककाराच्या नाटकांत कात्यायनी, दुर्गा इत्यादी देवींचे उल्लेख येतात. ‘स्वप्नवासवदत्त’ या भासाच्या प्रसिद्ध संस्कृत नाटकात पाटलीपुत्र येथे कात्यायनीचे मंदिर असल्याचा उल्लेख आहे. तसेच कात्यायनीने शुंभ, निशुंभ, महिष यांचा वध केल्याचे वर्णन येते. शुद्रकाने लिहिलेल्या ‘मृच्छकटिक’ या संस्कृत नाटकातील नायक चारुदत्त याला मारणाऱ्या चांडाळाची कुलदेवता म्हणून दुग्रेचा उल्लेख आहे. दन्डीने लिहिलेल्या ‘दशकुमारचरित’ या संस्कृत ग्रंथात दुग्रेचा उल्लेख ‘विन्ध्यवासिनी दुर्गा’  म्हणून अनेकदा येतो. तिच्या आशीर्वादाने एका राजाला अपत्यप्राप्ती झाल्याचा उल्लेख आहे तसेच तिचे मंदिर असल्याचाही उल्लेख या ग्रंथात येतो.

‘हर्षचरित’ या बाणाभट्ट लिखित गद्यपद्यमिश्रित संस्कृत काव्यात हर्षांच्या दरबारात जाताना वाटेतील एका मल्लकूट गावाच्या बाहेर ‘चंडी कानन’ म्हणजे चंडीचे अरण्य असल्याचा उल्लेख येतो. या अरण्यातील झाडांवर कात्यायनी देवीच्या प्रतिमा कोरलेल्या होत्या व वाटसरू या प्रतिमांना वंदन करत असे वर्णन बाणाभट्ट याने केले आहे. बाण याने लिहिलेल्या ‘कादंबरी’ या संस्कृत ग्रंथात एक चंडीचे देऊळ असल्याचा व तेथे एक द्रविड पुजारी असल्याचा उल्लेख आहे. याच ग्रंथात राणी अपत्यप्राप्तीसाठी चंडिकेची उपासतापास करून आराधना करते असे दर्शविले आहे.

याशिवाय विविध पुराणातून दुग्रेची तसेच महिषासुरमर्दनिीची महती वर्णिलेली आहे. वामन पुराणात महिषासुराची वधाची कथा येते. या कथेनुसार महिषासुराने देवीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला तेव्हा देवीने त्याला अट घातली की जर महिषासुराने तिला युद्धात हरवले तरच ती त्याच्याशी लग्न करेल. यानंतर झालेल्या युद्धात देवीने त्याचा पराजय करून त्याचा वध केला. अर्थात नंतरच्या काही पुराणातून ही कथा बरीच बदललेली दिसते. पण या कथेचे शुंभनिशुंभ वधकथेशी खूप साम्य आहे. त्यावरून पुराणनिर्मितीच्या काळात शुंभनिशुंभांचा वध करणारी विंध्यवासिनी कौशिकी देवी आणि महिषासुर मर्दनिी यांचे एकीकरण करण्यात आले असावे कारण त्यानंतर महिषासुरमर्दिनीला देखील विन्ध्यवासिनी म्हणून ओळखले जाऊ लागले. या प्राचीन साहित्यिक उल्लेखांवरून दुर्गा महिषासुरमर्दिनीचा नुसता उल्लेख ते तिच्या पराक्रम कथा यांचा आलेख मिळतो.

प्राचीन कोरीव लेखांमधील दुर्गा

भारतात सापडणाऱ्या कोरीव लेखांतून विविध प्रकारची तत्कालीन माहिती आपल्याला मिळते. अर्थातच त्यातून भारताच्या वेगवेगळ्या भागातील धार्मिक माहितीदेखील मिळते. देवीपुजेच्या इतिहासावर प्रकाश टाकणाऱ्या काही शिलालेखांचा उल्लेख इथे केला पाहिजे राजस्थानातील ‘होटी सादडी’ या गावातील भवरमाता मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर इसवीसनाच्या सहाव्या शतकातील एक शिलालेख आहे. त्यात आरंभी तीक्ष्ण शूल हातात घेऊन असुराचा वध करणाऱ्या देवीला नमन केले आहे. ही देवी उग्र सिंहांच्या रथात बसलेली असून ती भक्तांचे कल्याण करते, अशा आशयाचा हा शिलालेख आहे. येथे देवीचे वर्णन करताना ती शिवाची अर्धागी असल्याचा उल्लेख केला आहे. या सर्व वर्णनावरून येथे सिंहवाहिनी दुर्गा अपेक्षित असावी यात शंकाच नाही. या शिलालेखाचा उद्देश राजाने देवीचा उत्तम प्रासाद (मंदिर) बांधला होता हे नोंदवण्याचा होता.

04-devi-lp

याशिवाय बिहारमधील नागार्जुनी टेकडय़ांमधील सहाव्या शतकातील अनंतवर्मन राजाच्या दोन लेखांमध्ये देवीचा उल्लेख आहे. यातील एका लेखात भूतपती आणि देवीच्या प्रतिमांची प्रतिष्ठापना केली होती असा उल्लेख आहे. भूतपती हे शिवाचेच एक नाव आहे, त्यामुळे ही देवी शिवशक्ती दुर्गा असावी. तर दुसऱ्या शिलालेखात महिषासुराच्या शिरावर देवीने ठेवलेल्या पायाला भक्तीभावाने नमन करून राजाने ‘अद्भुत विन्ध्य भूधर गुहे’मध्ये कात्यायनी देवीची प्राणप्रतिष्ठा केली असे नमूद केले आहे. याच शिलालेखात भवानी देवीसाठी राजाने एक गाव दान दिल्याचा उल्लेख आहे. गुहेत स्थापन केलेल्या कात्यायनी देवीच्या पूजेअच्रेसाठी या गावातील उत्पन्नाचा वापर व्हावा हे उद्दिष्ट होते. महिषासुरमर्दनिी, कात्यायनी व भवानी या देवीच्या तीनही रूपांचा उल्लेख हे या शिलालेखाचे वैशिष्टय़ आहे.

बसंतगढ (राजस्थान) येथील खिमेलमाता मंदिरापाशी सापडलेला इसवीसनाच्या सातव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील एक शिलालेख या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या शिलालेखाच्या आरंभी दुर्गा आणि क्षेमकरी क्षेमार्या यांना आवाहन केले आहे. तसेच या लेखात स्थानिक लोकांनी एकत्र येऊन मंदिर बांधल्याचा उल्लेख आहे. त्यात श्रीमातेच्या एका गणिकेचे नावही नमूद केले आहे. विविध आगमग्रंथानुसार नवदुर्गामध्ये गणले जाणारे क्षेमंकरी हे दुग्रेचेच कल्याणकारी रूप आहे. येथील देवीचे सध्याचे खिमेलमाता हे नाव क्षेमार्या या संस्कृत नावाचा स्थानिक भाषेतील अपभ्रंश आहे.

भरमोर (हिमाचल प्रदेश) येथील इसवीसनाच्या सातव्या शतकातील लक्षणा देवीच्या पितळी मूर्तीच्या पीठावर एक कोरीव लेख आहे. या लेखात राजाने पुण्यप्राप्तीकरिता लक्षणा देवीची स्थापना केली तसेच गुग्ग याने देवीची ही प्रतिमा घडवली असा उल्लेख केला आहे. प्रस्तुत लक्षणादेवीची मूर्ती महिषासुरमर्दनिीचीच आहे.

प्रतापगढ (राजस्थान) येथे सापडलेल्या दहाव्या शतकातील दानलेखाच्या आरंभी महिषासुराला मारणाऱ्या दुग्रेचे स्तवन केले आहे. याच लेखात कात्यायनी देवीचाही उल्लेख येतो.

या सर्व पुराव्यान्संदर्भात अमरकोश या संस्कृत कोशात येणारी दुग्रेची नावे बघणे आवश्यक ठरते. अमरकोशात तिची खालील नावे दिलेली आहेत.

उमा कात्यायनी गौरी काली हैमवतीश्वरी॥

शिवा भवानी रुद्राणी शर्वाणी सर्वमंगला।

अपर्णा पार्वती दुर्गा मृडाणी चंडिकांबिका॥

आर्या दाक्षायणी चव गिरिजा मेनकात्मजा।

आत्तापर्यंत आपण बघितलेली विविध ग्रंथातील व कोरीव लेखांतील नावे म्हणजे शैव अगर शाक्त पंथातील दुग्रेची विविध रूपे मानली जात होती हे अमरकोशातील या नोंदीवरून स्पष्ट होते.

प्राचीन नाण्यांवरील सिंहवाहिनी देवी

प्राचीन अफगाणिस्तानात नना या नावाची इराणी देवता प्रसिद्ध होती. कुशाण राजांच्या नाण्यावर ती आपल्याला दिसते. ही नना सिंहावर बसलेली दाखवली जाते. कुशाण राजांच्या कंदाहार ते पटनापर्यंत पसरलेल्या साम्राज्यात त्यांनी अनेक स्थानिक देवदेवतांना नाण्यावर स्थान दिले होते. अफगाणिस्तानातील रोबाटक या ठिकाणी सापडलेल्या इसवीसनाच्या दुसऱ्या शतकातील कुशाण राजांच्या अधिकाऱ्याच्या शिलालेखात इतर देवतांबरोबर याच नना आणि उमा यांचा अत्यंत आदरपूर्वक उल्लेख केला आहे. इसवीसनाच्या दुसऱ्या शतकात कुशाण राजा हुविष्क याच्या नाण्यांवर सिंहवाहिनी नना व सिंहवाहिनी उमादेखील दिसते. हेच ननाचे व उमेचे सिंहवाहिनी रूप नंतर दुग्रेला प्राप्त होते.

या कुशाण राजांच्या नंतर उत्तर भारतात आलेल्या गुप्त राजांनी देखील अत्यंत सुंदर नाणी पाडली होती. चंद्रगुप्त या गुप्त घराण्यातील राजाच्या नाण्यावर एक सिंहवाहिनी देवी आहे. तिच्या एका हातात पाश आहे तर दुसऱ्या हातात निधीश्रुंग घेतलेले आहे. काही संशोधक या देवीला सिंहवाहिनी दुर्गा मानतात. अशा प्रकारे सिंह हे वाहन दुग्रेच्या प्रतिमेत येते.

प्राचीन शिल्पातील दुर्गा महिषासुरमर्दनी

तामलुक (पश्चिम बंगाल) येथे सापडलेली शुंग काळातील एक छोटय़ा उठावातील मृण्मूर्ती उल्लेखनीय आहे. ही स्त्री मूर्ती सालंकृत असून तिचा केशसंभारही फार मोठा दाखवलेला आहे. तिच्या केशसंभारात पाच छोटी आयुधे दागिन्यांसारखी दाखवण्यात आलेली आहेत. ही आयुधे म्हणजे अंकुश, त्रिशूळ, परशु, वज्र आणि ध्वज ही आयुधे नंतरच्या काळात देवीच्या मूर्तीमध्ये बघायला मिळतात. त्यामुळे काही संशोधक या मृण्मूर्तीला दुग्रेची आद्य प्रतिमा मानतात अर्थातच ही आयुधे शौर्य आणि राजवैभव दर्शवत असल्यामुळे ही स्त्रीदेवता महत्त्वाची असणार हे नक्की.

कुशाण काळात (इसवीसनाचे पहिले ते तिसरे शतक) या काळातील काही महिषासुरमर्दिनीच्या मूर्ती मिळाल्या आहेत. ही चतुर्भुज देवीची मूर्ती दोन हातांनी एका महिषाला पकडून मारते आहे. अशा आविर्भावातील आहे. देवीचे मागचे दोन्ही हात आता दिसत नाहीत. तिने कानात जड कुंडले घातली आहेत. कुशाण काळातील अशा काही मूर्ती उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये सापडल्या आहेत.

गुप्तकालात (इसवीसनाचे चौथे ते पाचवे शतक) ज्याप्रमाणे अनेक देवीदेवतांच्या मूर्तीची मानके बनली तशीच ती दुर्गा महिषासुरमर्दनिीच्या मूर्तीचीही बनली. उदयगिरी मध्य प्रदेश येथील लेण्यामध्ये गुप्त काळातील एक सुंदर द्वादशभुजांची महिषासुरमर्दनिी कोरलेली आहे. तिने हातामध्ये वज्र, खड्ग, त्रिशूळ, भाला, घंटा इत्यादी घेतले आहे. तिचा डावा पाय महिषासुराच्या डोक्यावर ठेवलेला आहे तर हातातील त्रिशुळाने त्याचा वध करते आहे.

बदामीच्या चालुक्यांच्या काळात (सहावे ते आठवे शतक) निर्माण झालेल्या ऐहोळे येथील दुग्रेच्या प्रतिमेचा उल्लेख करणे आवश्यक आहे. ऐहोळे येथील दुर्गामंदिर म्हणून ओळखले जाणाऱ्या मंदिराच्या बाहय़भागावर एक महिषासुरमर्दनिीची अत्यंत मनमोहक मूर्ती आहे.

वर उल्लेख केलेल्या भारमोर हिमाचल प्रदेश येथील शिलालेखात उल्लेखलेली लक्षणादेवी ही देखील महिषासुरमर्दिनीची मूर्ती आहे. जवजवळ चार फूट उंचीची ही पितळी मूर्ती सातव्या शतकातील आहे. या चतुर्भुजी देवीच्या हातात त्रिशूळ खड्ग आणि घंटा आहे. एका हाताने तिने जमिनीवर पडलेल्या महिषाची शेपटी पकडली आहे आणि हातातील त्रिशुळाने ती महिषाचा वध करीत आहे.

महाराष्ट्रात वेरुळ येथील लेण्यामधेही महिषासुरमर्दनिीच्या प्रतिमा कोरल्या आहेत. वेरुळ येथील कैलास मंदिरात सिंहावर आरूढ झालेली देवी महिषासुराचा वध करते आहे असे चित्रण केले आहे. पल्लवराजांच्या काळात निर्माण झालेल्या महाबलीपुरम येथील एका रथमंदिरात सिंहावर आरूढ झालेल्या देवीचे अंकन आहे. येथे देवी तिच्या सेनेसह महिषासुराशी युद्ध करताना दाखवली आहे. इथे महिषासुर मानवी रूपात दाखवलेला असून त्याचे मुख मात्र महिषाचे आहे.

पाल राजांच्या काळात बंगाल, ओरिसा या प्रदेशात दुग्रेच्या उपासनेचा मोठय़ा प्रमाणावर प्रसार झालेला होता. या भागात अनेक भुजांच्या महिषासुरमर्दिनीच्या प्रतिमांचा विकास झालेला आपल्याला दिसतो. या प्रतिमांचा अभ्यास करताना असे दिसून येते की सुरुवातीला सिंह हा फक्त देवीचे लांच्छन म्हणून मूर्तीमध्ये येतो, पण नंतर तो देवीला महिषासुराला मारण्यात मदत करताना दाखवला जातो. तसेच इसवीसनाच्या सातव्या शतकांनंतरच्या मूर्तीत महिषाच्या कापलेल्या मानेतून असुर बाहेर येतांना दाखवण्यात येऊ लागला.

भारताबाहेरील दुर्गा महिषासुरमर्दनिीच्या प्रतिमा

भारताबाहेरही अफगाणिस्तान, नेपाळ, बांग्लादेश, कंबोडिया, जावा, इंडोनेशिया इत्यादी देशामध्ये महिषासुरमर्दिनीच्या मूर्ती सापडतात. अफगाणिस्तानातील गझनी येथील टेपे सरदार या ठिकाणी एक महिषासुरमर्दिनीची भंगलेली भव्य मूर्ती मिळाली आहे ती काबूल येथील राष्ट्रीय संग्रहालयात आणण्यात आली होती.

कंबोडिया येथील महिषासुरमर्दिनीच्या मूर्तीमध्ये चोल मंदिरातील मूर्तीचा प्रभाव पडलेला आहे. या महिषासुरमर्दनिीच्या मूर्तीच्या पीठावर महिषमुखाचे रेखाचित्र कोरलेले असते त्यावरून या प्रतिमेची ओळख आपल्याला पटते.

अवघ्या भारतभर आणि अफगाणिस्तानपासून ते इंडोनेशियापर्यंत आढळणाऱ्या या दुर्गा महिषासुरमर्दनिीचे आपल्या महाराष्ट्राशी विशेष नाते आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपकी एक असलेल्या जगदंबा तुळजाभवानीची प्रतिमा महिषासुरमर्दनिी या स्वरूपातीलच आहे. पंधराव्या शतकात लिहिल्या गेलेल्या ‘महिकावतीची बखर’ या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या गद्यपद्यमिश्रित बखरीत श्रीदेवी आद्यशक्ती जगदंबिका महाराष्ट्राधर्मरक्षिका असा तिचा उल्लेख येतो. तर सोळाव्या शतकातील सुलतानशाहीने गांजलेल्या अवस्थेत संत एकनाथांनी

नमो निर्गुण निराकार, मूळ आदिमाया तूं साकार

घेऊनि दहा अवतार, करिसी दुष्टांचा संहार

दार उघड, बया दार उघड

अशा आळवणीनंतर म्लेंच्छांचा संहार करण्यासाठी तिची प्रार्थना केली होती.

सतराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानी देवीच्या आशीर्वादानेच महाराष्ट्रात स्वराज्य स्थापन करून अलौकिक असा इतिहास रचला. तसेच तिची नित्य पूजा व्हावी म्हणून प्रतापगडावर भवानी देवीची प्रतिष्ठापना करून तिचे मंदिरही बांधले होते.

एकोणिसाव्या शतकात बंगालमधील दुर्गापूजनाचा प्रभाव बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या ‘आनंदमठ’ या कादंबरीतील ‘वंदे मातरम्’ या गीतावर पडलेला दिसून येतो. इंग्रजांच्या पारतंत्र्यात अडकलेल्या भारतमातेला आदिशक्तीच्या रूपात कल्पून तिचा महिमा त्यांनी पुढील ओळींत वर्णन केला आहे.

त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी

कमला कमलदलविहारिणी

वाणी विद्यादायिनी

नमानि त्वां

नमामि कमलां अमलां अतुलां

सुजलाम् सुफलाम् मातरम्॥

अशा रीतीने आदिशक्तीच्या दशभुजा दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती या तिन्ही रूपांत मातृभूमीचे वर्णन करून बंकिमचन्द्रांनी प्राचीन भारतीय परंपरेशी आपली नाळ जोडली.

अशा या दुर्गा महिषासुरमर्दिनीच्या विविध प्रतिमांचा, तिच्या संदर्भातील पुरातत्वीय पुराव्यांचा, शिलालेखांचा व तिच्या उपासनेच्या मध्ययुगीन, अर्वाचीन इतिहासाचा अभ्यास करताना लक्षात येणारी महत्त्वाची बाब म्हणजे संकटांवर मात करण्यासाठी व शत्रूवर विजय मिळवण्यासाठी तिची वीरांकडून केली जाणारी आराधना. प्राचीन काळापासून देवीच्या इतर रूपांपेक्षा दुर्गा महिषासुरमर्दनिी रूपात देवीची आराधना विशेषत वीरपुरुषांनी का केली असावी याचा बोध दुर्गा सप्तशतीमध्ये दिलेल्या ‘महिषान्तकरी येन पूजिता स जगत्प्रभु’ (ज्याने महिषासुरमर्दनिीला पूजिले तो जगाचा स्वामी होतो) या वाक्यावरून होतो.
आनंद कानिटकर – response.lokprabha@expressindia.com


लोकदेवता खोकलादेवी

आशीष वेदक

खोकलादेवी हे नावच थोडे विचित्र वाटते. खोकल्यासारखा एखाद्या सामान्य रोगाच्या नावावरून देवीचे नाव कसे असू शकते, हे अतक्र्य आहे. त्याहीपेक्षा अतक्र्य तर मुंबईसारख्या महानगरात आधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध असताना विविध जातींमधील, विविध आर्थिक, सामाजिक, वैचारिक स्तरांतील लोकांचा डॉक्टरी उपायांनीही बरा न झालेला खोकला बरा करणारी देवी म्हणून खोकलादेवीवर श्रद्धा असते. ही गोष्टच खोकलादेवीबद्दलची उत्सुकता अधिक वाढवते. त्यातही खोकलादेवी इतर देवतांपेक्षा वेगळी वाटते. कारण तिची कोणत्याच प्रकारची विशिष्ट पूजापद्धती नाही, कर्मकांड नाहीत, तिला कोणत्याही प्रकारचे पशुबळी (कोंबडे, बकरे इत्यादी) दिले जात नाहीत. इतर देवतांसारखे तिचे जत्रोत्सव, सण साजरे होत नाहीत. तिचा कोणत्याही प्रकारचा भक्तसंप्रदाय नाही. फक्त पीठ आणि मीठ यावरच देवी संतुष्ट होऊन ती खोकला बरा करते ही लोकांची श्रद्धा आजही कायम आहे. एकूणच खोकलादेवीचे अस्तित्व हे लोकांची धार्मिक वृत्ती, धर्मावरील श्रद्धा या भक्कम पायावर उभे आहे, मग प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे, धर्म म्हणजे तरी काय?

धर्म एक संकल्पना

धर्म हा भारतीय समाजरचनेचा अविभाज्य घटक आहे. आदिम अवस्थेतून आजच्या विकसनशील अवस्थेत धर्म या संकल्पनेचा विकास होत आला आहे, ती एक निरंतर विकास प्रक्रिया आहे. धर्माला विविध आर्थिक, सांस्कृतिक, भौगोलिक, राजकीय पलूदेखील आहेत. मुळातच ती एक क्लिष्ट, व्यक्तिसापेक्ष, परिस्थितीजन्य, समाजाच्या सोयीसाठी, विकासासाठी श्रद्धेच्या पायावर उभी असलेली एक उत्तम व्यवस्था आहे.

भारतीय समाजात चातुर्वण्र्य व्यवस्थेनंतर निर्माण झालेल्या जातिव्यवस्थेमध्ये समाजाच्या भौतिक, दैविक, आध्यात्मिक आणि मोक्षप्राप्तीच्या गरजा, संकल्पना बदलल्या, वैदिक काळातील यज्ञहवन यांचे महत्त्व थोडे कमी झाले. ईश्वरप्राप्ती, रोगनिवृत्ती, सर्वागीण प्रगतीसाठी तसेच चतुर्विध पुरुषार्थप्राप्तीसाठी १) परापूजा २) मानसपूजा ३) मूर्तिपूजा अशा तीन पूजनपद्धती निर्माण झाल्या असाव्यात. यातील परापूजा आध्यत्मिकदृष्टय़ा प्रगत व्यक्तीला उपयुक्त तर मूर्तिपूजा सर्वसामान्य लोकांना उपयुक्त आहे, असे आपण म्हणू शकतो. परंतु वैदिक काळापासून ते आजही विविध देवतांचे महत्त्व कमी झाले नाही.

कालखंडानुसार वर्गीकरण

ढोबळ मानाने वैदिक काळापासून आजच्या काळातील देवतांचे वर्गीकरण

१)     वैदिक देवता (वेदात उल्लेख असलेल्या देवता किंवा वैदिक काळातील देवता)

२)     पौराणिक देवता (विविध पुराणांतील देवता)

३)     लोकदेवता (वेद, पुराण यात नसलेल्या परंतु विविध जाती, जमाती, आदिवासी द्वारे पूजनीय देवता)

यात वैजनाथ, सूर्य, धन्वंतरी, आश्विनीकुमार, खोकलादेवी, शीतलादेवी, मरीआई, प्लेगम्मा इत्यादीसारख्या लोकदेवता या रोगनिवारण करणाऱ्या देवता म्हणून ओळखल्या जातात. या सर्व देवतांच्या विविध चमत्कारिक शक्ती, सामर्थ्य, रोगनिवारण क्षमता, धान्य, धन, संतती इत्यादी तसेच इतर आधिभौतिक आधिदैविक, आध्यात्मिक गोष्टी देण्याची क्षमता ही लोकांचा आणि समाजाचा त्यांच्याप्रति असलेला विश्वास आणि श्रद्धा यांवर अवलंबून आहे, असे माझे मत आहे.

मध्ययुगीन मुंबईचा इतिहास, साधारणपणे ११व्या-१२व्या शतकाच्या आसपास सुरू होतो. गेल्याच वर्षी मुंबईत तुभ्रे येथे भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटर परिसरात सापडलेला शिलालेख याची पुष्टीही करतो. महिकावतीच्या बखरीतूनही काही प्रमाणात मध्ययुगीन मुंबईची माहिती कळते, त्याचबरोबर ‘मुंबईचे दर्शन’, ‘मुंबई वृत्तांत’ यांसारख्या काही पुस्तकांतून जुन्या मुंबईचे दर्शन घडते. पूर्वी मुंबईचे वातावरण दमट, काहीसे कोंदट होते, सात बेटांच्या मुंबईत तर ओहोटीच्या वेळी खूप चिखल, दलदल होत असे. त्यामुळे डासांची पदास, त्यामुळे होणारे विविध प्रकारचे साथीचे रोग तसेच दमट हवामानामुळे नेहमी सर्दी, खोकला, कफ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच मुंबईचे मूळ रहिवासी असलेल्या कोळी आणि सोमवंशी क्षत्रिय पाठारे (चौकळशी/ पाचकळशी) समाजातील लोकांना, तसेच इतर जाती, धर्मातील लोकांना याचा आरोग्यविषयक त्रास नक्कीच झाला असेल.

पोर्तुगीजांकडून आंदण म्हणून मिळालेल्या सात बेटांच्या मुंबईचे ब्रिटिशांनी जेव्हा विस्तार, विकासकार्य सुरू केले, तेव्हा ब्रिटिश अधिकारी आणि भारतीय कामगारांनी तर मुंबईच्या हवामानास, भौगोलिक परिस्थितीस विविध दूषणे दिली आहेत. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी तर मुंबईला नरकाची उपमा दिली आहे. एकदा मुंबईत आलेला मनुष्य जिवंत आपल्या मायदेशी जाऊ शकत नाही अशी मते त्यांनी नोंदवली आहेत. या तसेच अशाच विविध विधानांवरून मुंबई कशी राहण्यास अयोग्य, रोगट हवामानाची होती हे समजते.

त्या काळात तर प्लेग, मलेरिया, देवी, पटकी इत्यादी विविध साथीचे रोग मुंबईच्या पाचवीलाच पुजले होते. दमट हवामानात सर्दी, खोकला, कफ हे सामान्य विकार मुंबईकरांना नेहमीच होत असावेत, त्यासोबतच आपल्या संस्कृतीतील जातिव्यवस्था, (अंध) श्रद्धा, बिकट आर्थिक परिस्थिती, अस्वच्छता, आरोग्यविषयक सुविधांचा अभाव, अनास्था या सर्व गोष्टी खोकलादेवी, शीतलादेवी, मरीआई आणि तत्सम रोगनिवारक देवतांच्या उगम आणि विकासास कारणीभूत झाल्या असाव्यात. (याबाबत इतर तज्ज्ञ, संशोधकांचे वेगळे मत असू शकते). मुंबईसारख्या महानगरात आजही काही समुदायांमध्ये पूजनीय असलेल्या खोकल्यासारख्या सामान्य वाटणाऱ्या रोगास बरे करणाऱ्या ‘खोकलादेवी’ या देवतेविषयी अनेक गोष्टी जाणून घेणार आहोत.

खोकलादेवी नेमकी कोण?

कोणत्याही प्रकारचा खोकला बरे करणारी देवी म्हणजे खोकलादेवी होय. साधा खोकला, ओला खोकला, डांग्या खोकला, दम्याचा खोकला हे सर्व खोकलादेवी बरी करते अशी लोकांची श्रद्धा आजही दृढ आहे. डॉक्टरी इलाजांनी बरा न झालेला खोकला, खोकलादेवी बरा करू शकते असा लोकांना आजही विश्वास वाटतो. महाराष्ट्रात तिला खोकलादेवी, दक्षिण भारतात खोकलम्मा तर गुजरात राज्यात तिला रुकडादेवी असे म्हणतात.

याचबरोबर वसई येथेदेखील खोकलादेवीचे मंदिर आहे, तर बाबुलनाथजवळ एक रुकडादेवीचे मंदिर आहे.आपण इथे मुंबईतील खोकलादेवीबद्दल जाणून घेणार आहोत.

केदारेश्वर मंदिर (वरळी ) सन १८३२ साली सोमवंशी क्षत्रिय पाठारे समाजातील श्री त्रिंबक भिवजी म्हात्रे यांनी बांधले. मंदिर परिसरात खोकलादेवीचे लहान पण स्वतंत्र मंदिर आहे. तसेच केदारेश्वर, गणपती, हनुमान, शीतलादेवी यांचीदेखील मंदिरे आहेत. येथील खोकलादेवीस चार हात असून देवीच्या हातात कमळ, गदा, पुस्तक असून एक हात वरद मुद्रेत आहे. येथील नित्य पूजा करणाऱ्या केळकर गुरुजींच्या मतानुसार हे देवीचे सात्त्विक रूप असून, सरस्वतीच्या रूपाशी मिळतेजुळते आहे, आणि खोकलादेवीची मूर्ती ही पुरातन आहे

नीलकंठेश्वर मंदिरातील खोकलादेवी एक देवकोष्ठात असून देवी द्विभुज आहे, तिच्या एका हातात डमरू तर दुसऱ्या हातात अक्षमाळ (किंवा पात्र) आहे. मंदिर आवारात एक जीर्ण गधेगळ आहे. त्यावरील मजकूर संपूर्ण नष्ट झाला आहे, परंतु मंदिर पुरातन काळापासून असावे असे सिद्ध करते. मंदिराचे ट्रस्टी, उदय मंत्री यांच्यानुसार सध्याच्या मंदिराचा जीर्णोद्धार सन १९११ ला केला गेला. खोकलादेवीसोबत येथे, नीलकंठेश्वर, दत्त, हनुमान, ब्रह्मा, सूर्य, राधा कृष्ण, विठ्ठल रुख्मिणी यांचीदेखील मंदिरे, मूर्ती आहेत.

प्रभादेवी मंदिर मध्ययुगीन काळातील असावे असे विविध तज्ज्ञांचं मत आहे, तसा एक शिलालेख तेथे उपलब्ध आहे, सध्याचे मंदिर कीर्तिकर फॅमिली ट्रस्टचे असून येथे प्रभादेवी, चंडिका, कालिका, लक्ष्मीनारायण, शीतलादेवी, हनुमान आणि खोकलादेवी यांची मंदिरे आहेत. येथील खोकलादेवीला चार हात असून दोन हातात कमळे, तर दोन हात अभयमुद्रेत आहेत, आणि खोकलादेवीच्या गळ्यात साधा परंतु मोठा हार आहे. येथील पुजारी जयवंत जोशी यांनी सांगितले की पूर्वी श्रावण महिन्यात शुक्ल आणि कृष्ण चतुर्दशीला दोन वेगळ्या समाजातील तेलगु भाषिक लोक (कदाचित साळी /पदमशाली समाजातील) शीतलादेवी आणि खोकलादेवीच्या दर्शनास येत, आणि देवीस जेवणाचा नवेद्य दाखवत, परंतु सध्या काही कारणास्तव ते लोक श्रावणातील कोणत्याही रविवारी, त्यांच्या सोईनुसार देवीच्या दर्शनासाठी येतात.

माटुंगा येथील सातीआसरा मनमाला देवी मंदिरात असलेलं खोकलादेवी मंदिर माधुरी साळवी यांचे पणजोबा सावंत यांनी बांधले आहे.

माहीम येथील गौड सारस्वत ब्राह्मण समाजाच्या शीतलादेवी मंदिर परिसरात खोकलादेवीचे लहानसेच संगमरवरी पण घरासारखे दिसणारे मंदिर आहे, येथे शीतलादेवीच्या नित्य पूजा करणाऱ्या भमिनी म्हात्रे यांनी सांगितल्याप्रमाणे आजही लोकांची खोकलादेवीवर श्रद्धा आहे. येथील खोकलादेवीची मूर्ती ध्यानधारणा करण्यात मग्न असल्यासारखी दिसते. (कदाचित सध्याची मूर्ती ही अलीकडच्या काळातील असावी असे वाटते) मुंबई दर्शन (१८६३) आणि मुंबई वृत्तांत (१८८९) यांसारख्या १९ व्या शतकात प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात मुंबईतील फक्त याच खोकलादेवीचा उल्लेख आढळतो तो असा ‘माहिमास खोकलादेवी आहे. तिची खोकला बंद करण्यावर प्रसिद्धी आहे’ यावरून येथील खोकलादेवी कदाचित मुंबईतील प्राचीन असावी.

मालाड, सोमवारी बाजार परिसरात असलेल्या पाटलादेवी मंदिरात, पाटलादेवी, खोकलादेवी आणि शीतलादेवीच्या मूर्ती आहेत, हे मंदिर पाचकळशी समाजाचे असून, सन १९११ मध्ये गणपत महंत यांनी त्याचा जीर्णोद्धार केला. मंदिरातील देवीचे भोपे अशोक नलावडे यांनी सांगितल्याप्रमाणे मालाड परिसरातील कोळी, कुंभार तसेच गुजराती भाषक काठियावाडी लोक, तसेच सफाई काम करणाऱ्या समुदायाचे लोक खोकलादेवीच्या दर्शनास येतात. कोळी, कुंभार लोक सुंठोडा देवीच्या नावाने प्रसाद म्हणून वाटतात. तर काठियावाडी लोक देवीस फरसाण अर्पण करतात.

एरंगळ गावातील खोकलादेवी मंदिर गावाच्या वेशीवर आहे. मुख्य म्हणजे देवीस चार हात आहेत आणि देवीच्या मागील हातात शूल आणि त्रिशूळ आहे आणि दोन हात मांडीवर आहेत. या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट अशी की प्रत्येक मंदिरातील खोकलादेवीच्या मूर्ती एकमेकींपेक्षा पूर्णत वेगळ्या आहेत. तसेच खोकलादेवीस कोणताच प्राणी वाहन म्हणून दिसत नाही.

मूर्तीलक्षणशास्त्रानुसार (Iconography) कोणत्याही देवतेची बाह्य़लक्षणे, शस्त्र, वाहन, इत्यादी ही वैदिक किंवा पौराणिक काळातील ठोकताळ्यानुसार निश्चित असतात, कालपरत्वे, स्थानपरत्वे बाह्य़ सजावटीत थोडा बदल केला जाऊ शकतो, परंतु कोणत्याही देवतेच्या सर्व मूर्तीमध्ये त्यांच्या मुख्य लक्षणात समानता राखण्यात येते. (याला काही मोजके अपवाद असूही शकतात)

परंतु खोकलादेवीच्या बाबतीत मात्र मूर्तीलक्षणशास्त्रानुसार कोणत्याच प्रकारचा विशिष्ट नियम किंवा साम्य दिसून येत नाही. तर खोकलादेवी ही कोणताही वैदिक, पौराणिक उल्लेख नसलेली परंतु विविध जाती-समुदायांत आजही (अल्पप्रमाणात) पूजनीय अशी लोकदेवता आहे. काही ठिकाणी तिला चार हात आहेत, काही ठिकाणी दोन, कधी तिच्या हातात कमळ आहे. अक्षमाळा पुस्तक, पानपात्र, गदा तर काही ठिकाणी कोणा पुरुषसमान दिसणाऱ्या मूर्तीस, किंवा मंदिराच्या स्तंभास देवत्व प्राप्त करून दिले आहे.

तरीदेखील वरील सात मंदिरांपैकी दोन मंदिरांतील खोकलादेवीच्या हातात कमळ पुष्प आहे, भारतीय संस्कृतीत कमळास उत्पत्तीचे प्रतीक मानले जाते, त्याच बरोबर आयुर्वेदातील पुष्पौषधी या शाखेनुसार विविध प्रकारच्या फुलांचा औषध म्हणून किंवा औषधांबरोबर वापर करतात त्यात कमळपुष्पात औषध घालून रोग्यास दिले जाते. त्यामुळे खोकलादेवी आणि कमळपुष्प यांचा रोगनिवारण पद्धतीत संबंध असू शकतो का ते शोधणे महत्त्वाचे आहे.

खोकलादेवीच्या संबंधित कथा :

खोकलादवी लोकदेवता असल्यामुळे कोणत्याही महत्त्वपूर्ण वेद, पुराण, उपनिषद यात तिच्या कथा नाहीत, परंतु तरीही खोकलादेवीच्या काही मनोरंजक, तिची महती सांगणाऱ्या गोष्टी खोकलादेवीच्या काही मंदिरात मौखिक परंपरेने पिढय़ान्पिढय़ा ऐकायला मिळाल्यात त्यांपैकी काही पुढीलप्रमाणे-

एरंगळ गावात कशी आली?

एरंगळ गावातील खोकलादेवीच्या नित्य पूजा करणाऱ्या रतन पाटील यांनी खोकलादेवी एरंगळ गावात कशी आली त्याची एक कथा सांगितली. या कथेनुसार खोकलादेवी देवी आणि तिच्या सहा बहिणी आणि भाऊ (हरबादेवी, हिरडादेवी, हिरादेवी, हिंगलादेवी, शीतलादेवी, मोतमाऊली आणि भाऊ वेताळ) बोटीने समुद्रप्रवास करत असताना त्याची बोट एरंगळजवळच्या किनाऱ्याजवळ फुटली आणि ही भावंडे एकमेकांपासून दूर झाली आणि वेगवेगळ्या गावांत पोहोचली. त्यांचा भाऊ वेताळ खांदेरी बेटावर पोहोचला आणि एक बहीण वांद्रे येथे मोतमाऊली (माऊंट मेरी) झाली, बाकी सगळ्या बहिणी एरंगळ आणि आजूबाजूच्या गावांत पोहोचल्या आणि लोकांनी त्यांची तिथेच स्थापना केली. तसेच एरंगळ गावातील रहिवासी विल्सन कोळी, दर्शन निळा यांनी यावर असे सांगितले की, आजही आश्विन नवरात्रात खोकलादेवीची बहीण हरबादेवीकडून खोकलादेवीला मानाची ओटी येते.

लोकांचे प्रश्न कसे सोडवते?

माहीम येथील शीतलादेवी मंदिरातील शीतलादेवीची नित्य पूजा करणाऱ्या भामिनी म्हात्रे यांनी, एरंगळ येथील खोकलादेवीची एक लहान गोष्ट सांगितली.

आश्विन नवरात्रमध्ये एखादी व्यक्ती कुठूनही गर्दीतून वाट काढत, परंतु जोरजोरात खोकत धावत खोकलादेवीच्या मूर्तीजवळ येते आणि उपस्थित लोकांच्या समस्या सोडवते, असे मानले जाते.

सातीआसरा मनमालादेवी मंदिराच्या देखरेख करणाऱ्या माधुरी साळवी यांनी त्याच्या आजीने त्यांना खोकलादेवीची सांगितलेली कथा सांगितली. या कथेनुसार, मनमालादेवी आणि खोकलादेवीसहित एकूण सात बहिणी आहेत (मनमालादेवी, खोकलादेवी, जरीमरी, केवडादेवी, चम्पावतीदेवी, शीतलादेवी, गावदेवी) या सर्व देवी पूर्वी मध्यरात्री मंदिर परिसरात असलेल्या विहिरीत स्नान करत. त्याचबरोबर माधुरी स्वत नऊ-दहा वर्षांच्या असताना त्यांना खोकला झाला. तो बरा झाल्यावर त्यांच्या आईने खोकलादेवीला मीठ आणि पीठ वाहिले होते असे त्यांनी सांगितले. साळवी यांच्याशी बोलत असताना माटुंगा परिसरात राहणाऱ्या विभा आपटे यांनीदेखील खोकलादेवीच्या कृपेने खोकला बरा होऊ शकतो अशी श्रद्धा असल्याचे सांगितले.

मुंबईचे मूळ रहिवासी असलेले कोळी, सोमवंशी क्षत्रिय पाठारे (चौकळशी/ पाचकळशी) ज्ञातीतील लोक खोकलादेवीची विशेषत पूजा करताना आढळतात. वरीलपैकी चार मंदिरांची मालकी सोमवंशी क्षत्रिय पाठारे, (चौकळशी/ पाचकळशी) पाठारे प्रभू समाजातील कुटुंब किंवा ट्रस्टची आहे, तर उरलेली तीन मंदिरे प्रत्येकी  गौड सारस्वत ब्राह्मण, ९६ कुळी मराठा, तसेच शेषवंशी भंडारी समाजाच्या खासगी किंवा ज्ञातीच्या ट्रस्टच्या मालकीची आहेत. परंतु असे असूनही विविध जातीतील आणि विविध भाषा बोलणाऱ्या लोकांची खोकलादेवीवर श्रद्धा आहे, असे दिसून येते. या भाविकांमध्ये ब्राह्मण, मराठा, चौकळशी, पाचकळशी, कोळी, भंडारी, कुंभार, इत्यादी मराठी भाषक लोक, तेलगू भाषक पद्मशाली (साळी) समाजातील लोक, त्याचबरोबर गुजराती भाषक कुंभार, कठियावाडी सफाई काम करणारे अशा वेगवेगळ्या जातींतील लोकांचा समावेश आहे. हे लोक खोकलादेवीची पूजा करतात.

(वरील सर्व निरीक्षणे काही लोकांच्या प्रत्यक्ष भेटी आणि मुलाखती दरम्यानची आहेत)

खोकलादेवीला पीठ-मीठ!

लोक खोकलादेवीला पीठ आणि मीठ वाहतात. त्यापैकी पीठ हे तांदूळ, गहू, ज्वारी, किंवा बाजरी यापैकी कशाचेही असू शकते, त्यासोबत साधं मीठ अर्पण करतात. त्याशिवाय लोक श्रद्धेने देवीची खणानारळाने ओटी भरतात. इतर वस्तू अर्पणही करतात, देवीमुळे खोकला बरा झाला अशी श्रद्धा असते, तेव्हा मात्र फक्त पीठ आणि मीठच वाहतात. त्याशिवाय काही ठिकाणी (कोळी, कुंभार समाजातील लोक) सुंठोडा (सुंठ + साखर/गूळ) देवीचा प्रसाद म्हणून दिला जातो.

परंतु इतर गुजराती भाषक लोक, खोकलादेवीला फरसाण, शेव, गाठिया, चणे, गुळ वाहतात. तसेच ज्यामुळे खोकला होऊ शकतो असे विविध प्रकारचे तेलकट पदार्थ देवीला वाहतात. त्यामागे त्यांची अशी श्रद्धा आहे की खोकला होणारे पदार्थ अर्पण केल्याने देवी खोकला दूर करते, तर तेलगू भाषक लोक तिला जेवणाचा नवेद्य दाखवतात. परंतु पीठ आणि मीठ देवीला अर्पण करण्याचा सर्वत्र प्रघात आहे. यातील सुंठवडा हा तर खोकला बरा व्हावा म्हणून केला जाणारा सामान्य, सर्वज्ञात आयुर्वेदिक उपचार आहे तर पीठ आणि मीठ यातील मीठ तर घसा खवखवत असेल तर गुळण्या करण्यासाठी वापरले जाते.

लोकांच्या श्रद्धेनुसार अर्पण करण्यात आलेले पीठ आणि मीठ रुग्णाचा खोकला सोबतच घेऊन जाते, त्यामुळे काही मंदिरातील पुजारी ते पीठ आणि मीठ समुद्रात किंवा खाडीत विसर्जति करत असत, परंतु आजकाल काही मंदिरातील पुजारी लोक ते पीठ आणि मीठ गरजू गरीब लोकांना देतात.

व्यवसाय आणि खोकलादेवी

आज समाजात वैद्यकीय प्रगती झाली आहे. त्याचबरोबर खोकला हा तसा सामान्य रोगप्रकार वाटत असल्यामुळेच कदाचित खोकलादेवीच्या भक्तांची संख्या घटली असेल, त्यामुळेच लोक खोकलादेवीला अल्प प्रमाणात पुजत असतील. तरीसुद्धा खोकलादेवीचा आणि काही जातींच्या परंपरागत व्यवसाय किंवा उदरनिर्वाहाचे साधन, कामाची ठिकाणे यात नक्कीच विशेष संबंध आहे. कोळी बांधव नेहमीच मासेमारीसाठी समुद्राच्या, खाडीच्या जवळपास वस्ती करून राहतात. त्यामुळे समुद्राच्या खारट, दमट हवामानामुळे त्यांना सर्दी-खोकला होण्याची शक्यता जास्त. त्याचबरोबर कुंभार समाजातील लोक तसेच साळी (विणकर) लोकांचा माती आणि सुताच्या सूक्ष्म कण किंवा धाग्यांशी नेहमीच संबंध येतो. त्याचबरोबर सफाई कामगारांचा नेहमी कचरा आणि धूळ यांच्याशी संपर्क येतोच. त्यामुळे खोकला, दमा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आधुनिक वैद्यकशास्त्र त्याची पुष्टीही करते.

खोकल्याद्वारे पसरणारे इतर रोग कोणते ते पाहू या. यात देवी, (मोठय़ा बाया) गालगुंड, गोवर, इन्फ्लुएन्झा- बी, डांग्या खोकला हे काही रोग साध्या खोकल्यामुळे पसरू शकतात असे आजचे वैद्यकीयशास्त्र म्हणते. त्यामुळेदेखील लोकांच्या दृष्टीने खोकलादेवी महत्वाची ठरते.

खोकलादेवीचे भविष्य

एकूणच मुंबईतील सध्या अस्तित्वात असलेल्या हिंदू मंदिरांना फार तर ३००-३५० वर्षांचा इतिहास असेल. खोकलादेवीच्या मूर्ती या मूर्तिविज्ञानशास्त्राप्रमाणे प्राचीन नसतीलही, तसेच आजच्या वैद्यकीयदृष्टय़ा विकसित समाजात खोकलादेवीसारखी देवी केवळ लोकांची श्रद्धा आणि मौखिक इतिहासाद्वारेच येणाऱ्या पिढय़ांना ज्ञात आहे. उद्या कदाचित तिचा धार्मिक, सामाजिक संदर्भदेखील बदलू शकतो, तसेच इतर काही देवतांसारखी ती विस्मृतीतदेखील जाईल. तरीदेखील मुंबईसारख्या महानगरात, मुंबईच्या जडणघडणीत खोकलादेवीचे स्थान आणि अजूनही अल्प प्रमाणात का असेना, तिचे लोकांच्या स्मृतीत असलेले अस्तित्व हे मुंबईच्या भूतकाळाचे आणि इतिहासाचे, धार्मिक जीवनाचे, सामाजिक रचनेचे यथार्थ दर्शन घडवते. त्यामुळेच खोकलादेवी मुंबईसाठी महत्त्वाची ठरते. अजून एक महत्त्वाची लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की, सात बेटांच्या मुंबईत (पूर्वीच्या) फक्त माहीम आणि वरळी बेटांवर खोकलादेवीची पाच मंदिरे आहेत. आणि हे दोनही विभाग पूर्वीच्या गिरणगावालगतचेच आहेत. त्यामुळे पूर्वीच्या कापड गिरण्या, मिल कामगार, त्यांच्या श्रद्धा, समजुती आणि खोकलादेवी यांचा काही संबंध आहे का, यावर संशोधन सुरू आहे.  दरम्यान, खोकलादेवीच्या या शोधादरम्यान असे लक्षात आले की काही ठिकाणी मंदिराचा स्तंभ तर काही ठिकाणी बुद्धप्रतिमेची पूजादेखील खोकलादेवी म्हणून केली जाते.



No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...