छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या देहावसानानंतर धीर गोळा करुन आलमगीर औरंगजेब आपल्या सर्व शक्तिनिशी दख्खनेत उतरला. ५ लाखाचे बलाढ्य सैन्य घेऊन हा पातशाह दख्खनेवर आपला चांद-तारा फडकवायला बाहेर पडला होता. कदाचित इतक्या संख्याबळाने आक्रमण करणारा नेपोलियन नंतर औरंगजेब हाच सुलतान असावा ! त्याचं लक्ष्य होतं २०० वर्षांहून अधिक काळ टिकलेली आदिलशाही, कुतुबशाही आणि केवळ ३०-३५ वर्षाचं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल हिंदवी स्वराज्य!
२२ फेब्रुवारी १६८२ रोजी औरंगजेबाने बुऱ्हाणपूरचा मुक्काम हलविला आणि सर्व सामर्थ्यानिशी तो महाराष्ट्रात उतरला, आणि स्वराज्यावर पहिला घाला घातला तो किल्ले रामसेजवर. का बरे किल्ले रामसेजच ? दुसरा कोणता किल्ला का नाही? नाशिकमध्ये इतर अनेक मोठे मोठे किल्ले आहेत, मग त्यापैकी रामसेजवरच का? तर यामागचे कारण म्हणजे सुमारे ४५ वर्षांपूर्वी म्हणजे सुमारे इ.स. १६३४-३५ मध्ये शहाजहान बादशहा दक्षिणेत उतरला. त्या वेळी बादशहा शहाजहानने प्रथम किल्ले रामसेज सर केला आणि नंतर बाकी सर्व किल्ले भराभर आपल्या ताब्यात घेतले. १६३५ साली शहाजहान ने स्वारी केली तेव्हा मोघलांकडे होता हे धोडप , राजदेहेर ह्या किल्ल्यांवर असणाऱ्या शिलालेखांवरून कळते.तेव्हा रामसेज किल्ल्याबरोबरच त्या पट्ट्यातील चांदवड, धोडप , इंद्राई, राजदेहेर इत्यादी किल्ले अलावर्दीखान तुर्कमान ह्याने घेतले असे शिलालेखात कोरले आहे.
त्यामुळे रामसेजचा किल्ला हा मुघलांच्या दृष्टीने 'शकुनाचा किल्ला' होता. म्हणून दक्षिणेत आल्यावर त्याने रामसेज किल्ल्याला वेढा घातला. पण या वेळी नियतीच्या मनात वेगळेच काहीतरी होते, कारण या छोट्याशा रामसेज किल्ल्याने औरंगजेबाला एक नाही, दोन नाही, सुमारे पाच वर्षे दमविले. खरोखरच आज्ञापत्रात म्हटले आहे की, 'याकरिता पूर्वी जे राजे झाले त्यांनी आधी देशामध्ये दुर्ग बांधून तो देश शाश्वत करून घेतला. शिवाजी राजांनी दुर्गांचे नेमके हेच महत्त्व जाणून घेतले होते आणि अंगिकारले होते.'
तर यामागची कथा अशी आहे. रामसेज किल्ल्याचा पहिला उल्लेख आढळतो तो, सोळाव्या शतकात. त्या सुमारास रामसेज किल्ला निजामशाहीत होता. पुढे इ.स. १६३६च्या सुमारास मुघलांनी आणि विजापूरच्या आदिलशहाने निजामशाही जिंकली त्या वेळी निजामशाहीतील काही किल्ले मोगलांना मिळाले, तर काही विजापूरकरांना. त्या वेळी रामसेज किल्ला मोगलांकडे आला. नंतर हा किल्ला शिवाजीराजांनी कधी जिंकला त्याचा निश्चित उल्लेख मिळत नाही. पण इ.स. १६८७ पर्यंत तरी तो मराठ्यांकडे होता हे निश्चित आहे. शिवाजीराजांच्या निधनानंतर औरंगजेब बादशहा इक्षिणेत उतरला आणि नाशिकपासून १२ कि.मी.वर असणाऱ्या रामसेजला वेढा घालण्यासाठी औरंगजेबने शहाबुद्दीन गाजीउद्दीन फिरोजजंग याला ४० हजार सैन्य, तोफखाना यांच्यासह पाठविले. त्यासोबत कासिमखान, राव पलपत बुंदेला वगैरे सारखे अधिकारी देखील नेमून दिले. मोगलांनी गडाला वेढा घातला तेव्हा गडावर ६०० च्या आसपास मावळे होते. मोगलांनी रामशेजवर पहिला हल्ला चढवला आणि मोगल गडाला भिडले, त्याबरोबर गडावरील मावळ्यांनी दगडांचा प्रचंड मारा केला ,त्यामुळे मोगलांना माघार घ्यावी लागली. मोगलांच्या रीतिरिवाजाप्रमाणे शहाबुद्दीनखानाने रामसेजला प्रथम वेढा घातला आणि किल्ल्याभोवताली चौक्या उभारल्या आणि किल्ल्यावर जाणाऱ्या सर्व वाटा तरोखून धरल्या.
त्यानंतर शहाबुद्दीनने वेढा कडक करणे, सुरुंग लावणे, मोर्चे बांधणे, दमदमे तयार करुन त्यावर तोफा चढवून हल्ला करणे असे अनेक उपाय केले, पण रामशेजच्या अनुभवी किल्लेदाराने कौशल्याने आणि सावधगिरीने मोगलांचे सर्व मनसुबे उधळून लावले. मग हट्टाला पेटलेल्या शहाबुद्दीनने लाकडी बुरुज उभारून त्यावर तोफा चढवून किल्ल्यावर हल्ला करण्याची योजना आखली. त्यानुसार आजुबाजूची जंगल तोडून लाकडे जमावण्यात आली. त्या लाकडांचा एक प्रचंड बुरूज बनविण्यात आला. मोगलांनी त्यावरून गडावर मारा सुरू केला पण त्याचा फारसा परीणाम झाला नाही.
एका सरदाराशी झालेला संवाद शहाबुद्दीन खानाची अवस्था सांगून जाते.
“ खान मियाँ आपसे एक चीझ बोलनी थी, म्हणजे गुस्ताखी माफ करा पण राहावलं नाही म्हणून आपल्यासमोर बोलण्याचा गुन्हा करतोय”, एक सरदार आपले हात जोडून भीत भीत शहाबुद्दीनखाना समोर उभा राहिला.
“ क्या हुवा, आज इतनी हिम्मत की हमे सीख देने की जरूरत कर रहे हो तुम?”, खानाने आपले डोळे मोठे करून त्याच्या कडे नजर फेकली आणि आपल्या छावणीत हुक्क्यावर ताव मारायला सुरुवात केली.
“ हुजूर हा किला आपल्याकडून पडणार नाही ऐसा मुझे लगता हैं, हुजूर नाराज मत होना लेकिन, किलेकी दिवारे बुलंद हैं और उपर जाने मैं बहोत दिक्कत हो रहीं हैं हमारे फौज को. मैं पुरा किला बघून आलो खालून, वर चढायला जागाच नाही और सब जगाह हलकी मिट्टी हैं कहीं भी उपर तक झाडी नहीं जहाँ से जाना मुंकीन हैं, मुझे लगता हैं आप ये मसला छोड दो क्यूनकी किलेकी उंचाई बहोंत कम हैं, तोह ते मराठे आरामसे मारू शकतात आपल्याला वर जाऊ तसे.” सरदार ने मुह तो खोला मगर शहाबुद्दीन खान चवताळला आणि त्याने त्याला कैद करण्याचा हुकूम दिला.
बाहेर येऊन त्याने किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वेढ्याकडे आणि वर किल्ल्याकडे नजर केली तशी वरची माणसं आपल्याकडे पाहून खिदी खिदी हसतायत की काय असा भास त्याला झाला.
मे १६६२ मध्ये रामशेजचा वेढा फोडण्यासाठी संभाजी महाराजांनी रुपाजी भोसले व मानाजी मोरे यांना ५ ते ७ हजार सैन्यानिशी पाठविले. शहाबुद्दीनने गडाजवळील गणेश गावाजवळ मराठ्यांना रोखले. दोघांमध्ये तुंबळ युध्द झाले, त्यात मोगलांनी माघार घेतली. मराठ्यांनी मोगलांचे ५०० घोडे पकडून नेले. या विजयामुळे किल्ल्यावरील मावळ्यांमध्ये उत्साह संचारला.
पण या पराजयामुळे औरंगजेब संतापला. शहाबुद्दीन खानाकडून काही एकट्याने होत नाही म्हंटल्याबर औरंगजेबाने बहादुरखानास शहाबुद्दीन च्या मदतीस कुमक देऊन पाठवले. त्याने बहादूरखानाला रामशेजला जाण्याची आज्ञा दिली.
शहाबुद्दीनने वेढा कडक करून किल्ल्यावर परत हल्ला चढवला. त्याबरोबर गडावरील मावळ्यांनी दगडांचा प्रचंड मारा केला .त्यात राजा दलपतराय दगडांच्या मार्याने जखमी झाला ,त्यामुळे मोगलांना माघार घ्यावी लागली. सलग येणार्या अपयशामुळे शहाबुद्दीन वेढा सोडून जुन्नरला गेला.
इ.स. १६८२ च्या सुमारास हा वेढा फोडण्यासाठी रूपाजी भोसले आणि मानाजी मोरे यांनी प्रयत्न केला. पण तो फारसा सफल झालेला दिसत नाही. बादशहाने खानबहाद्दूर कोक्लताश याला ताबडतोब रामसेजला वेढा घालणाऱ्या मोगलांच्या मदतीला जाण्याचा हुकूम दिला. त्या वेळी खानजहान बहादूरखान याने आपला बहादूरगडाचा तळ गुलशनाबादेकडे हलविला. त्यावेळी भीमसेन सक्सेना हा बाजरबुणग्यांसोबत गुलशनाबादेस पोहोचला. या भीमसेन सक्सेनाने आपल्या 'तारीखे दिल्कुशा' या ग्रंथात देखील रामसेजच्या लढाईचे वर्णन केलेले आहे. त्यात तो म्हणतो, शहाबुद्दीनखानाने किल्ल्याला मोर्चे लावले. किल्ल्याच्या बुरुजासमोर त्याने लाकडाचा एक प्रचंड बुरूज उभा केला. त्यावर एकावेळी ५०० सैनिक वर चढून किल्ल्यातील लोकांवर बंदुकी आणि गोळ्यांचा मारा करू शकत.
रामसेजच्या लढाईचा उल्लेख खाफीखानाने आपल्या 'मुन्तखबुललुबाब ए मुहंमदशाही' या फारसी ग्रंथात केलेला आहे. त्यात तो म्हणतो, रामसेजचा किल्लेदार हा सर्व मराठ्यांमध्ये अत्यंत अनुभवी व कसलेला होता. त्याच्या प्रयत्नांमुळे आणि सावधगिरीमुळे मोगलफौजेचे काही एक चालेना. किल्ल्यात त्या वेळी तोफा नव्हत्या. पण भरपूर प्रमाणात कातडे (शिशाचे पत्रे) शिल्लक होते. किल्ल्यातील लाकडी तोफेने हे कातडे उडवीत असत. अशी एकेक तोफ दहा तोफांचे काम करी. खरोखर मराठ्यांच्या कडव्या प्रतिकारामुळे शहाबुद्दीनखानाची झोप उडाली होती. त्याने किल्ला जिंकून घेण्यासाठी त्यावर हल्ला चढविला, तर मराठे तो केवळ हाणूनच पाडत नसत तर, मोगलांचे अनेक सैनिक त्यात मारले जात. राव दलपत बुंदेला या अशाच एका हल्ल्यात दगडांच्या माऱ्यामुळे जखमी झाला.
कासिमखानाने औरंगजेबाला रामसेजवर केलेल्या हल्ल्याचा एक वृतान्त पाठविला तो असा : पूर्वी तोफांच्या माऱ्यामुळे रामसेज किल्ल्यातील बुरुजाजवळील तटबंदी ढासळली होती, म्हणून या वाटेने माझ्या सैनिकांनी वर बाण फेकत किल्ल्यात शिरावे असे मी ठरविले व शाबान महिन्याच्या २७ तारखेला (दि. २१ ऑगस्ट १६८२)
रात्रीच्या वेळी पाच-सहाशे मेवाती व माझे सैनिक यांना किल्ल्यात घुसण्यासाठी तयार करून हल्ला चढविला. शेवटी खंजरखानाच्या भाऊबंदांपैकी काही माझे सैनिक किल्ल्याच्या दरवाज्यापाशी जाऊन मोठ्याने ओरडले की, 'बेलदारांनी यावे. त्या आवाजाने गनिमांचे लोक जागे होऊन त्यांनी दगड व बंदकी यांचा असा काही खच्चून मारा केला की. बहतेक सर्व बादशाही सैनिक मारले गेले. कामात काही फारशी प्रगती झाली नाही. सध्या वेढ्याचे काम हातचे गेले असे बादशाही लोक बोलतात. परंतु हे मला मान्य नाही. माझ्याबद्दल जो हुकूम फर्मावला जाईल त्याप्रमाणे मी करीन.
कासिमखानाचा विनंती अर्ज ऐकून खासा औरंगजेबाने हुकूम दिला की, कासिमखानाला लिहिले की, तुमच्या बरोबरच्या लोकांना शहाबुद्दीनखानाच्या हवाली करा आणि तुम्ही स्वतः हुजुरात निघून या. यानंतर औरंगजेबाने आपला दूधभाऊ खान बहादूरखान याला रामसेजचा किल्ला जिंकून घेण्यासाठी नाशिकला बोलावून घेतले. मोगलांतर्फे शहाबुद्दीनखानाने रामसेजला वेढा घातला होता, पण त्यास न जुमानता खानजहान बहादूरखानाने स्वतः मोर्चेबांधणी सुरू केली. औरंगजेबाला पाठविलेल्या एका अर्जात तो म्हणतो, मी हुकुमाप्रमाणे रामसेजला वेढा दिला आहे. बादशहाच्या सुदैवाने तो लवकरच जिंकून घेऊन बादशाही अंमलाखाली आणण्याची आशा करतो.
आपली वेढ्याची कामगिरी बादशहासमोर आणण्यासाठी शहाबुद्दीन एक विनंती अर्ज बादशहास पाठवितो, त्यात तो म्हणतो, बादशाही सैनिकांनी रामसेज किल्ल्याला चारही बाजूंनी वेढा घातला आहे, तारीख २७ रमझान म्हणजेच दिनांक २० सप्टेंबर १६८२ रोजी किल्ल्याचा एक बुरूज बादशाही सैनिकांनी ताब्यात घेतला. बादशहा औरंगजेब अशा कारणांनी संतुष्ट होणारा थोडी होता. त्याने रहुल्लखानास सांगितले की, तू शहाबुद्दीनखानाला लिहावे की, किल्ला जिंकून घेण्यास तू खूप कष्ट घेतले आहेत, स्वतःचा जीव देखील गमवायला कमी केले नाहीस. सध्या तो किल्ला खानजहान बहादूरखानाच्या हवाली केलेला आहे. तोच किल्ला बादशहाच्या अमलाखाली आणेल. त्याप्रमाणे शहाबुद्दीनखानाने आपला तोफखाना बहादूरखानाच्या हवाली केला.
खानजहान बहादूरखानाने रामसेजचा आपला वेढा नेटाने पुढे चालविला. त्याने किल्ला जिंकण्यासाठी काय काय प्रयत्न केले याबद्दल खाफीखान म्हणतो,
खानजहान बहादुरखानाने किल्ल्याच्या वेढ्यात शिपाईगिरीची शर्थ केली. त्याचे तपशील वर्णन केले तर ती अतिशयोक्ती वाटेल, पण किल्ला जिंकून घेण्याचे काम मात्र काही केल्या पार पडले नाही. खरोखरच खानजहान बहादूरखानाने रामसेजचा किल्ला जिंकण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्याबद्दलचे काही मनोरंजक उतारे असे आहेत,
एके दिवशी खानजहान बहादूरखान कोकलताश म्हणाला "किल्ल्याच्या एका बाजूला आपण हल्ला करणार असा पुकारा करावा. त्या बाजूला तोफा आणि दारूगोळा आणावा, तोफखान्यातील सैनिक, लष्करातील लोक आणि बाजारबुणग्यांनी तिकडे खूप गडबड उडवून द्यावी. म्हणजे किल्ल्यातील लोक तिकडे जमा होऊन बंदोबस्त करू लागतील. त्याच वेळी किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूस योग्य जागा शोधून काढून शे-दोनशे शूर शिपायांनी जावे. किल्ले चढून जाण्यात ते पटाईत असावेत. त्यांनी कोणताही आवाज न करता गुपचूपपणे जावे. त्यांच्याबरोबर हल्ला करण्याचे सामान किंवा मशाली वगैरेसारख्या उजेड पाडणाऱ्या वस्तू असू नयेत. त्यांनी अगदी सापाप्रमाणे जावे आणि दोराच्या मदतीने हरप्रकारे प्रयत्न करून किल्ल्यावर पोहोचावे." किल्लेदारास खानजहान बहादूरखानाच्या या योजनेचा पत्ता लागला. त्याने युक्ती काढली. ज्या बाजूने मुघल बाजारबुणगे आणून हल्ला करणार त्या बाजूस आपण आपले काही शूर सैनिक पाठवून नौबती, कर्णे वगैरे वाद्यांचा गजर करावा आणि किल्ल्यावरून मुघल सैनिकांवर दगड लोटून द्यावेत. तेलाने माखलेले कपडे पेटवून वरून खाली टाकावेत. शक्यतो या कामात कुसूर करू नये आणि ज्या जागी खानजहानचे सैनिक गुपचूपपणे चढून येणार होते त्या ठिकाणी देखील काही शूर आणि निवडक शिपायांना ठेवावे. हे सैनिक सर्व प्रकारची शस्त्रास्त्रे घेऊन दबा धरून बसलेले असतील. त्यांनी कोणताही प्रकारचा आवाज न करता मुघलांची वाट पाहायची. ठरलेल्या वेळी मोगलांचे दोन सैनिक वर चढले. त्यांची डोकी तटबंदीवर दिसताचक्षणी किल्ल्यातील सैनिकांनी आपल्या प्राण हरण करणाऱ्या शस्त्रांनी त्यांच्या डोक्यावर इतक्या जोरात आघात केला की, त्यांचे डोळेच बाहेर आले. ते मोठ्या कष्टाने जिथून वर चढून आले तिकडे फेकले गेले. इतर माणसे त्यांच्या मागोमाग वर चढत होती, ती देखील वरून पडणाऱ्या माणसांसोबत खाली गडगडत गेली.
एके दिवशी खानजहान बहादूरखानाचा 'सईस ऊर्फ मोतदार' म्हणाला, 'भुते वश करण्याच्या कामात मी पटाईत आहे. शंभर तोळे वजनाचा सोन्याचा एक साप तयार करा. तो माझ्या हातात द्या आणि हल्ल्याच्या वेळी हा साप घेऊन मी आघाडीवर राहीन. मी भुतांच्या मदतीने किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत कोणतीही अडचण न येता जाऊ शकेन अशी मला आशा आहे.' खानजहान बहादूरखानाने त्याच्या म्हणण्याप्रमाणे केले. नंतर हा मोतदार हल्ल्याच्या वेळी सैन्याच्या पुढे राहिला. अर्ध्या वाटेवर तो जाऊन पोहोचला असेल नसेल तोच, किल्ल्यावरून गोफणीचा गोळा येऊन त्याच्या छातीवर आदळला. तो इतक्या जोरात लागला की, मोतदाराच्या हातून सोन्याचा नाग उडाला आणि मोतदार खाली कोसळून पडला. सांगायचे असे की बहादूरखानाने खूप परिश्रम केले तरी देखील किल्ला काही त्याला जिंकता आला नाही.
बादशहाने इ.स. १९ ऑक्टोबर १६८२ राजी रहुल्लाखानाच्या शिक्क्याने फर्मान काढले, आणि खानजहान बहदूरखानाकडे ते रवाना केले. त्यात तो म्हणतो, रामसेज किल्ल्याच्या वेढ्यात थोडे सैनिक ठेवून त्याने स्वतः तळकोकणाच्या खोयातील घाटावर थांबावे. हे फर्मान खानजहान बहादूरखानाला मुहियीन कुली याने आणून दिले. या मुहियीन कुलीस खानजहान बहादूरखानाने औरंगजेबाला कळविण्यास सांगितले, मी (खानजहान बहादूरखान) रामसेज किल्ल्याला वेढा घालून मोर्चे कायम केले आहेत. पण या बाबतीत बादशाही हुकूम येऊन पोहोचला की, थोडे सैन्य वेढ्यात ठेवून त्याने स्वतः तळकोकणातील खोऱ्यात जावे. मला (खानजहान बहादूरखानाला ) जर एक आठवड्याची मुदत मिळाली तर, किल्ला बादशाही अंमलाखाली आणीन. पण यावर औरंगजेब म्हणतो, हुकुमाविरुद्ध कोणतीही सबब चालणार नाही.
खानजहान बहादूरखान रामसेज सोडून पुढे कुठे गेला, याबद्दल भीमसेन सक्सेना आणि मुघल दरबारातील अखबारात बराच फरक आहे. यांपैकी भीमसेन सक्सेना आपल्या आत्मचरित्रामध्ये नमूद करतो की, खानजहान बहादूरखानाने रामसेजचा वेढा चालू ठेवला. त्याने किल्ल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी बादशहाच्या आज्ञेने त्याने किल्ल्याचा वेढा उठविला. शहाबुद्दीनखानाने अफाट खर्च करून लाकडी बुरूज तयार केला होता, त्यात पेंढा व दारू भरून तो पेटवून देण्यात आला. प्रचंड जाळ झाला. नाशिक प्रांतात मराठे पसरलेले आहेत, असे कळल्यावर खानजहान बहादूरखानान रामसेजहन नाशिककडे आला. याचशिवाय तो म्हणतो, शेवटी बादशहांच्या आज्ञेने खानजहान बहादूरखानही वेढा उठवून निघून गेला. मोर्चे आणि किल्ल्यावर चढण्याची साधने तयार करण्यासाठी म्हणून मोगलांनी खूप लाकडे जमविली होती. त्यात त्यांना बराच खर्च आला होता. कूच करण्याच्या दिवशी खानजहानच्या आज्ञेने मघलांनी त्या लाकडांना आग लावून दिली. त्या वेळी किल्ल्यातील लोक तटावर जमलेले होते. ते नगारे, चौघडे वगैरे वाद्य वीत होते आणि तोंडाने ते जे काही म्हणत होते ते लिहिण्यासारखे नाही.
तो रामसेजच्या वेढ्याबद्दल खाफीखान पुढे लिहितो, कासिमखान किरमाणी हा शूर आणि तडफदार सरदार म्हणून प्रसिद्ध होता. त्याची या वेढ्याच्या कामावर नेमणूक ग पानी. त्यानेही खूप परिश्रम केले. पण काम काही केल्या पार पडले नाही. शेवटी बादशहाने वेढ्याचे काम तहकूब करून कासिमखानाला दुसऱ्या कामगिरीवर रवाना केले. दरम्यानच्या काळात खानजहान बहादूरखान रामसेज किल्ल्यावर हल्ला करण्यासाठी निऔरंगजेबाने आपल्याला एक संधी द्यावी असे त्याला सुचवत होता. त्याने औरंगजेबाला सादर केलेला विनंती अर्ज असा आहे, हेरांनी बातमी आणली होती की, गनिमांचे लोक त्र्यंबकहून एक तोफ किल्ले रामसेज येथे नेत होते, म्हणून मी धावून गेलो. काही लोकांना ठार मारून व अनेकांना जिवंत पकडून तोफ ताब्यात घेतली.
औरंगजेबाने रहुल्लाखानास हुकुम दिला की, खानजहान बहादुरखानाने रामसेज किल्ला बादशाही अमलाखाली आणून देईन, असा मुचलका लिहून दिला होता. परंतु त्याप्रमाणे तो आणला नाही, त्यासाठी सरकारी रक्कम किती खर्च पडली आहे?
याबाबत अर्ज करावा.' त्याप्रमाणे रहुल्लाखानाने अर्ज केला की, 'रोख रक्कम व जिन्नस मिळून रु. ३७६३० रुपये इतके खर्च झाले.' त्यावर औरंगजेबाने हुकूम दिला की, ते खानाच्या मागण्यांमध्ये दाखल करावे.
यानंतर नाशिकचा ठाणेदार अक्रमखान याने शत्रूच्या वीस लोकांना कैद करून हुजुरात पाठविले आहे. त्यांपैकी एक जण रामसेजच्या किल्लेदाराचा औरस पुत्र व दुसरा शत्रूच्या तळकोकणातील देशमुखाचा मुलगा आहे. त्यानंतर या अक्रमखानाचा अर्जदास्त दि. २२ डिसेंबर १६८४ रोजी डाकचौकीचा अधिकारी फजाइलखानाच्या मध्यस्थीने औरंगजेबासमोर पेश करण्यात आला. त्यात त्याने लिहिले होते की,
संभाजीचे लोक रामसेज किल्ल्याच्या आसपास जमले आहेत. बादशाही प्रांतातील गावांना उपद्रव देण्याचा त्यांचा विचार आहे. ही बातमी ऐकून मी चालू महिन्याच्या १५ तारखेस म्हणजे १२ डिसेंबर १६८४ला चढ्या घोड्यानिशी स्वारी केली. त्यांच्याशी सामना दिला. बादशहाच्या सुदैवाने शत्रूचे २०० लोक मारले गेले, अनेक जणांना जखमी करून त्यांचा मोड केला. माझ्या बरोबरचे बहुतेक लोक मारले गेले किंवा जखमी झाले. बादशहांची फत्ते झाली.
मोगलांनी रामसेज कसा जिंकून घेतला याबद्दल मुहम्मद हाशिम खाफीखान आपल्या ग्रंथामध्ये म्हणतो की, संभाजीने रामसेजच्या किल्लेदाराकडे खिलतीची वस्त्रे,
रत्नजडित कडे आणि रोख रक्कम पाठवून त्याचा गौरव केला. इतर किल्लेदारांच्या मानाने तो श्रेष्ठ म्हणून त्याचा मानसन्मान करून त्याची आपल्या एका प्रमुख किल्ल्यावर बदली केली. रामसेजवर दुसरा किल्लेदार बदलून आला. रामसेज भागात अब्दुल करीम नावाचा एक जमीनदार होता. त्याच्या मदतीने मुल्हेर ऊर्फ औरंगगडाचा किल्लेदार नेकनामखान याने रामसेजच्या नव्या किल्लेदाराला वश करून घेतले आणि अशा रीतीने किल्ला मोगलांच्या हवाली गेला.
सोपा वाटणारा पण मुघलांच्या तोंडचे पाणी पळवणारा रामशेज!
यानंतर हा किल्ला मोगलांकडे सुमारे २० वर्षे होता. तर निजामाकडे ४३ वर्षे होता. पुढे बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशव्यांच्या कारकीर्दीमध्ये तो मराठ्यांकडे आला. पुढे इंग्रज-मराठे युद्धात इ.स. १८१८ मध्ये जेव्हा त्र्यंबक किल्ला ब्रिटिशांनी जिंकून घेतला, तेव्हा रामसेजचा किल्लादेखील त्यांच्या हवाली केला. कॅ. ब्रिग्ज याने इ.स. १८१८ मध्ये रामसेज किल्ल्याचे वर्णन केले ते असे
Ramsej is neither so large nor so high as most of the Nashik hills, but not so small as Hatgad. The scrap as neither very steep nor very height and undefended the ascent was not difficult. There were two gateways, one within the other, large but not so formidable as those of hatgad. There was less uncovered ground on the way up to the gates than in any other Nashik Fort. The works connected with the gates were able to give a good flanking fire at a short distance from them. There was a way down by a trap door kept covered with the dirt and rubbish called secret road affording passage for one at a time. All round the fort ran a wall tolerably in some places but mostly indifferent within the fort where two or three bombproof ammunition chambers built in stone. The water supply was ample.
कॅ. ब्रिग्जने रामसेज येथे ब्रिटिश सैन्याच्या दोन तुकड्या तैनात केलेल्या होत्या. त्यांपैकी एक किल्ल्यावर होती, तर दुसरी किल्ल्याच्या पायथ्यापाशी असलेल्या गावात होती. इतके मोठे सैन्य रामसेजसारख्या ठिकाणी तैनात करण्यामागचे महत्त्वाचे कारण असे होते की, जर भिल्ल आणि इतर बंडखोरांचा बंदोबस्त करण्याची वेळ आली तर, ९० ते १०० सैनिक त्यांच्या पाठलागावर जाऊ शकतील. त्या वेळी म्हणजेच १८१८ मध्ये किल्ल्यावर सुमारे टनभर गहू, थोडे मीठ, ८ बंदुका, ९ जंबुरे, ३० तांब्याची भांडी, ४१ पितळ्याची भांडी, बंदुकांना लागणारी दारू, ४० पाँड गारगोटी, ४५ पाँड शिसे आणि २४० पौंड सुतळी शिल्लक होते.
रामशेज किल्ला म्हणजे रामशय्या किंवा रामशयन कक्ष जिथे श्री राम भगवान झोपायला जात असत, अशी आख्यायिका आहे. श्रीरामाचे वास्तव्य असलेल्या पंचवटी भागातील सीतागुंफा ते रामशेज किल्ला हा भाग येतो. वनवासात असताना श्रीराम बाहेर सीतागुंफाचा वापर करत, सीतागुंफामध्ये पूर्वेच्या खोलीत महादेवाचे मंदिर आहे, त्यात तीन इंचाचे शिवलिंग आहे. गुंफातील सर्व खोली आणि मंदिरात सूर्यप्रकाश किंवा हवा येत नाही. महादेव मंदिरामागे सीतागुंफा ते रामशेज किल्ला असा भुयारी मार्ग असावा. या मार्गाचा वापर श्रीराम रामशेज किल्ल्यावर जाण्यासाठी करत.
आशेवाडी गावातून दिसणारा रामशेज किल्ला.
नाशिक मधून पेठकडे जाणाऱ्या मार्गावर नाशिकपासून १५कि.मी.वर आशेवाडी नावाचे गाव रामसेज किल्ल्याच्या पायथ्याला वसले आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी प्रथम नाशिक गाठावे. नाशिकच्या ठक्कर बाजार सीबीएस बस स्थानकावरून ‘पेठ’ कडे जाणारी एस टी पकडावी आणि आशेवाडी फाट्यावर उतरावे. येथून आशेवाडी गावात जावे. या गावात पोचल्यावर गावच्या डाव्या बाजूला अभेद्य किल्ल्याचे आपणास दर्शन होते, व इतिहासामध्ये पराक्रम गाजवलेला हा किल्ला जणू आजही तेवढ्याच हिम्मतीने, त्याच रगिने आजही आपणास स्फूर्ती, कठीण काळात योग्य लढा देऊन जगण्याची प्रेरणा देतो.
\
आशेवाडीतून कातळमाथा उंचावणारा रामसेजचा किल्ला दिसतो. या कातळमाथ्याच्या पूर्वेकडून गडाच्या माथ्यावर जाणारी पायवाट आहे. समुद्रसपाटी पासून या किल्ल्याची उंची साधारण ३२०० फूट इतकी आहे. किल्ल्याचे एकुण क्षेत्रफळ १६ एकर असुन लांबी २२०० फुट तर रुंदी ७०० फुट आहे. गड फारसा उंच नसल्याने तासाभरात आपण गडावर पोहोचतो. किल्ला डाव्या बाजूला ठेवून वळसा घालून जाणारी वाट गावाच्या मागच्या बाजूने किल्ल्यावर जाते. या वाटेने गड गाठण्यास १ तास लागतो.
पायथ्यापासून दिसणारी रामशेज किल्ल्याची कातळटोपी
खाजगी वहानाने किल्ल्याच्या पायथ्याशी बनवलेल्या वहानतळा पर्यंत थेट जाता येते. त्यासाठी आशेवाडी गावाच्या फ़ाट्यावरुन गावात न जाता थोडे पुढे गेल्यावर उजव्या बाजूस एक भव्य कमान आणि त्यातून जाणारा रस्ता दिसतो. हा रस्ता गावा बाहेरुन थेट गडा खालील वाहानतळावर जातो.
रामसेज गडाच्या शेजारची टेकडॉ
गावामध्ये गाडी पार्क करून गडाच्या उजव्या बाजूने पायवाटेने जावे, थोडे पुढे गेल्यावर आपल्याला गडाची माहिती देणारा फलक व सिमेंट मध्ये केलेला रस्ता लागेल, या वाटेने पुढे गेल्यावर ज्या ठिकाणी सिमेंट चा रास्ता संपतो व गडाची खडी चढाई सुरु होते, या ठिकाणी जांभ्या दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या लागतील गडावर जाताना उजवीकडची टेकडी साथ देत राहते. अगदी पावसाळ्यात काही टप्पे सोडता संपूर्ण वाट अतिशय सोपी आहे. येतून अर्धा तासाच्या रस्ता चढाई करून गेलो कि आपण गुहेतील शिवलिंगजवळ येऊन पोचतो.
रामसेजच्या कड्यातील गुहा
गुहेचा अंतर्गर भाग
गडाच्या काळ्या कपारीमध्ये हि गुहा कोरली असून आतमध्ये शिवलिंग व नंदी आहे, पावसाळ्यामध्ये यामध्ये पाणी असते. या गुहेचे वैशिट्य म्हणजे याला वरती 2 फुटाचे भोक पाडले आहे जे कि गडावरील पाण्याचे टाके भरले कि त्यातून बाहेर पडणारे पाणी या गुहेमध्ये पडते. वास्तविकता या गुहेची व वरील दरवाजाची पाहणी केली असता हे भोक पहाणी करणेसाठी किंवा गडावरील पाणी बाहेर काढणेसाठी असावे असे वाटते.
राम मंदिर व प्रशस्त गुहा.
गुहा पाहून पुन्हा पायवाटेवर येऊन पायर्यांच्या वाटेने वर चढल्यावर रामाचे मंदिर असलेली गुहा आहे. गुहेपासून वरती गेल्यावर आपण दुसऱ्या गुहेत येतो, इथे गुहेमध्ये राममंदिर वसवले आहे, पूर्ण कातळात कोरलेले हि गुहा फक्त ४ खांबावर अधांतरीत आहे, या मंदिरात रामासोबत मारुती, दत्तगुरू, दुर्गामाता यांच्या मूर्ती बसवलेल्या आहेत. मंदिराच्या मागच्या भिंतीवर (जी किल्ला चढताना समोर लागते) एक शिलालेख कोरलेला आहे
शिलालेख
ह्या शिलालेखावरचा मजकूर हा पुढील प्रमाणे आहे – १. ।। श्री गणेशाय नम:।। २. स्वस्तिश्री म नृपशालिवाहन शक १६८२ विक्रमनाम ३. संवत्छरे: श्रीराजा शाहूचरणि दृढभाव: पंत ४. प्रधान बाळाजि बाजिराव: सुभेदार आपा स ब (स) ५. (दा) शिव: सटवोजि मोहिते हंबिरराव ६ (फ)किर मुहहंमद कारिगर
शिलालेखाचा सारांश-शालिवाहन शकाच्या १६८२व्या वर्षी विक्रमनाम संवत्सरात छत्रपती शाहू महाराजांचे पेशवे बाळाजी बाजीराव (नानासाहेब पेशवे) यांनी सुभेदार (आपाजी सदाशिव?), शेवटची ओळ लागत नाही परंतु त्याचा साधारण अर्थ सटवोजी हंबीरराव मोहिते यांच्या सहकार्याने किल्ल्याचा तट, बुरूज, दरवाजा किंवा अन्य वास्तू यांचा जिर्णोद्धार केला. हे बांधकाम फकीर मुहम्मद याने केले असा होतो. ह्या शिलालेखावरून स्पष्ट होते कि इ.स १७६० (शके १६८२) साली किल्ला मराठ्यांकडे होता व किल्ल्याचा तट, बुरूज, दरवाजा किंवा अन्य वास्तू यांचा जिर्णोद्धार केला गेला. शिलालेखाची सुरक्षितता उनपावसावर सोपवल्याने त्याची अवस्था बिकट झाली आहे.
मंदीरात असलेले पाण्याचे टाके
गुहेच्या शेजारी एक बारमाही पाण्याचे भुयारी टाके असुन याच्या आतच वरील बाजुस कोठार आहे. या कोठारात व टाक्यात उतरण्यासाठी बाहेरून तसेच गुहेतुन देखील एक वाट आहे. आजमितीला गडावर पिण्याच्या पाण्याची हि एकमेव सोय आहे. लोकांची अशी श्रद्धा आहे की ते पाणी इतकं शुद्ध आहे की लोकं ते पाणी घरी आणून त्याने घरच्या देवांना अंघोळ घातली जाते. टाक्यामुळेकोरीव टाक्यामुळे गुहेत एकदम गारेगार वातावरण असते. वर्षातून एकदा पावसाळ्याच्या आधी गावातून वीज पंप येथे आणून या टाकीतील सगळे पाणी काढून साफ सफाई ते करतात. बारमाही जिवंत झरा असल्याने दोन दिवसात परत टाकी भरून जाते आणि अतिरिक्त पाणी खालूनच वाहून झाडांना जाते. या गुहा मंदिरात १५-२० जण आरामात राहू शकतात.
गडाची आग्नेय माची
टाक्यांची शृंखला!
श्रीरामाचे दर्शन घेऊन गुहे समोरच्या तुटलेल्या पायर्या आपल्याला
उध्वस्त प्रवेशव्दारातून थेट गडावर घेऊन जातात. दहा-बारा पायऱ्या चढल्या कि
भग्न दरवाजातून व तुटलेल्या तटबंदीतून आपला गडावर प्रवेश होतो.
रामसेज गडाचा नकाशा
गडावर
प्रवेश करतो तेथे गडमाथा चिंचोळा आहे. येथून उजव्या बाजूला लांबवर परसरलेला
डोंगर माथा आहे. तर डाव्या बाजूला पठार आहे.
गडाच्या एका बाजुला असलेला दरवाजा आणि पाण्याचे टाके
गडमाथ्याच्या डाव्या बाजूला असणारा दुसरा कमान असलेला दरवाजा
येथे उजव्या बाजुला तटबंदीला लागुनच दोनही बाजुला दुहेरी तटबंदीवजा बांधकाम पाहण्यास मिळते तर समोरच्या बाजूला एक दरवाजा आहे. या दरवाज्याची कमान आजही शिल्लक असून काही पायऱ्या उतरून खाली गेले असता कातळातील खांब टाके दिसते.
कातळकोरीव टाके , आतमध्ये दगडात तयार केलेले चिरे आहेत.
अभ्यासकांच्या दृष्टीने हे टाके महत्वाचे आहे कारण या टाक्यात पुर्वीच्या काळी खडकातून चिरा कसा काढला जात असे हे पहाता येते. या ठिकाणी चिरा काढण्याचे काम अर्धवट राहिलेले असुन दगडातील खाचा व अर्धवट व पुर्ण काढलेले चिरे पहाता येतात. बरेच जण या जागेचा गुप्त दरवाजा असा उल्लेख करतात पण हा चुकीचा आहे कारण या टाक्याच्या खालील बाजुस कोणतीही वाट नाही. या टाक्याच्या समोरील बाजुस भिंत बांधलेली आहे. टेहळाणीसाठी आणि मार करतांना आडोसा (लपण्यासाठी) या भिंतीचा उपयोग होत असावा. शिवकाळात या टाक्याचा उपयोग दारूकोठार अथवा धान्यकोठार म्हणून केला गेला असावा. इथून रामशेज खालील परिसर आणि नाशिक कडे जाणारा रास्ता पाहायला मिळतो
टाके पाहून वर आल्यावर डावीकडे जाणारी वाट गडाच्या माचीवर घेऊन जाते. हि माची म्हणजेच आशेवाडी गावातून दिसणारी कातळटोपी. या माचीवर साचपाण्याचे एक टाके व खडकात खोदलेले एक टाके अशी दोन पाण्याची टाकी, व खडकात खोदलेला वास्तुचा पाया व बुरुजाचे अवशेष नजरेस पडतात. येथून वर जाणारी वाट गडाच्या टोकापाशी घेऊन जाते.
येथून खालचे गाव, नाशिक - पेठ रस्ता आणि त्या रस्त्यावर नविनच उभारलेले भव्य प्रवेशव्दार दिसते. या पठारावर नवीन उभारलेला झेंड्याचा खांब आहे. या झेंड्याला वळसा घालून पुन्हा प्रवेशव्दारापाशी येऊन वर चढत जाणार्या वाटेने थोडे वर चढुन गेल्यावर आपण एका सपाटीवर येऊन पोहोचतो. येथे पाच पाण्यांच्या टाक्याचा समुह दिसतो. याच ठिकाणी उजव्या बाजूला डोंगर उतारावरील वाहात येणारे पाणी दगडी भिंत बांधून अडवून छोटासा तलाव बनवलेला पाहायला मिळतो.
माचीवरील अवशेष पाहून बालेकिल्ल्याकडे वळायचे. बालेकिल्ल्याकडे निघाले असता डाव्या बाजूस गडाच्या महादरवाज्याकडे जाणाऱ्या कातळातील पायऱ्या दिसतात. येथे दक्षिण दिशेला गडाचा मुख्य दरवाजा अखंड काळय़ा कातळात खोदलेला असून त्यावर शिल्प कोरलेली आहेत. किल्ल्याचा मुख्य दरवाजा हा उभ्या कातळात कोरलेल्या आहे, लागूनच कातळाचेच बुरुज उभे केले आहेत. दरवाज्यावर दोन लक्ष्मीकमळ कोरलेली आहेत दोन्ही बाजूंना, त्या काळातील वैभवाच प्रतिक. हा किल्ला साधारण १२०० वर्षे अगोदर राष्ट्रकुटांच्या कालावधीत बांधला गेला असावा पण अजूनही या कातळात चिनी हतोड्याचे घाव जिवंत दिसतात. या दोन दरवाजांच्या मधूनच एक पायऱ्यांची वाट खाली भूयाराकडे जाते. या वाटेने खाली उतरले असता सुरुवातीला लागलेल्या गुहेच्या वरच्या बाजुस आपण येतो. तिथे उतरल्यावर त्याला दुसरे टोक नसल्याचे कळून येते; म्हणजे दुसऱ्या टोकाशी खोदकाम अपूर्ण ठेवल्याचे कळते.
मात्र संपूर्ण खाली उतरल्यावर टोकाशी एक भगदाड दिसून येते, ज्यातून खाली पाहिल्यावर आधी उल्लेख केलेल्या गुहेतील शिवलिंग दिसून येते. म्हणजेच हा चोर दरवाजा जर संपूर्ण खोदला गेला असता तर त्याचे दुसरे टोक त्या गुहेत उघडले असते, अशी त्याची रचना आहे. मात्र या सगळ्या खटाटोपाचे प्रयोजन कळून येत नाही. येथील खाचेतुन खालील गुहा नजरेस पडते. या खाचेचा उपयोग गडाबाहेर असणाऱ्या सैनिकांना अन्नपाणी देण्यासाठी केला जात असावा. मुळात या दरवाजाचे काम अर्धवट राहिलेले असुन हि खाच म्हणजे दरवाजातून खाली उतरत जाणारी व गुहेत उतरणारी अर्धवट कोरलेली वाट आहे. दरवाज्याचे प्रयोजन बघून नक्कीच या ठिकाणी किल्ल्याला दुहेरी तटबंदी असावी असे वाटते. दरवाजा अत्यंत रेखीव आहे , दरवाजा पाहून पुन्हा मागे यायचे
तटबंदी आणि चुन्याचा घाना
दरवाजा पाहून गडाच्या माथ्याकडे निघाले असता सर्वप्रथम चुन्याचा गोलाकार घाणा दिसतो पण यातील चाक मात्र आज जागेवर नाही. येथुन थोडे वर आल्यावर सपाटीवर डोंगर उतारावरील वाहात येणारे पाणी दगडी भिंत बांधून अडवून छोटासा तलाव व समोरच एका शेजारी एक अशी चार पाण्याची टाकी दिसतात. थोडे आणखी वर गेल्यावर डाव्या बाजुला अलीकडेच बांधलेले देवीचे एक छोटे मंदिर लागते.
मंदिरासमोर सिमेंटची एक गोलाकार दिपमाळ आहे. मंदिरात नवरात्रात मोठा उत्सव असतो. मंदिराच्या समोर एका झाडाखाली गणपतीची पुरातन मुर्ती आहे. मुर्तीच्या समोरच्या भागात वास्तूचे अवशेष आहेत. गजाननाचे दर्शन घेऊन पायवाटेवर येउन गडमाथ्याकडे चढत जातांना डाव्या बाजूला घरांचे अवशेष आहेत. येथून वर चढून जाण्यापूर्वी डाव्या बाजूला असलेल्या अस्पष्ट पायवाटेने चालत गेल्यावर आपण तीन टाक्यांच्या समुहापाशी पोहोचतो.
ही टाकी पाहून पुन्हा मुख्य पायवाटेवर परत येऊन गडमाथ्यावर पोहोचल्यावर समोर ३ पाण्याची टाकी खोदलेली दिसतात. चौथे छोटे टाके या टाक्यांच्या काटकोनात कोरलेले आहे. या टाक्यांपर्यंत पाणी आणण्यासाठी आणि टाकी भरल्यावर खालच्या बाजूला असलेल्या टाक्यात पाणी जाण्यासाठी कातळात चर खोदलेले आहेत. टाक्यांच्या पुढे एका उध्वस्त वास्तूचे अवशेष आहेत. हा गडाचा सर्वोच्च माथा आहे. संपूर्ण गडाला कातळाचे आवरण असल्याने तटबंदी अशी बांधलेली नाहीच. गडाच्या या उंच भागातुन गडाची माची, सातमाळ रांग, त्र्यंबकरांग आणि समोर भोरगड, देहेरगड, चामर लेणी (चांभार लेणी) व आजूबाजूचे डोंगर दिसतात.
गडमाथ्यावरुन पुढे चालत गेल्यावर आपण किल्ल्याच्या टोकापाशी पोहोचतो. येथे उजव्या बाजूला खाली उतरुन गेल्यावर कड्यावर ५ मोठ्या टाक्यांचा समुह आहे. यातील शेवटच्या टाक्या पासुन पुढे चालत गेल्यावर खालच्या बाजूस कड्याच्या टोकाला एक चौरस टाके आहे .
हे टाके पाहून पायवाटेने थोडे वर चढून गेल्यावर ३ मोठ्या टाक्यांचा समुह पाहायला मिळतो. यातून पाणी बाहेर काढण्यासाठी रहाट सारखी व्यवस्था केलेली दिसते, यातील एका टाक्यात पाण्यासाठी तयार केलेले दगडी भांडे आहे ( अशी दगडी भांडे कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले महिपालगडावर आढळतात) या टाक्यांच्या जवळून एक वाट खाली उतरत कड्यापाशी जाते. या ठिकाणी किल्ल्याचा गुप्त दरवाजा आहे ह्या दरवाजाची रचना अप्रतिम आहे. हा दरवाजा कड्याला लागुन व जमिनीला समांतर असुन जवळ गेलो तरी त्याचे अस्तित्व चटकन लक्षात येत नाही. टेकडीचा बराचसा भाग उतरून खाली आल्यावर गडाच्या दक्षिण सोंडेच्या उंचीच्या पातळीला पश्चिम भागात अजीबात दिसून येणार नाही अश्या रीतीने हा दरवाजा तयार केला आहे.अगदी शिताफीने लपवलेले हे द्वार गडाच्या एका घळीच्या तोंडाशी उघडते. आणीबाणीच्या प्रसंगी या घळीतून पलायन करण्यासाठी ह्या दरवाज्याची रचना केल्याचे दिसून येते.
चोरदरवाजाच्या छतावरील कमलपुष्प
चोरदरवाजा
रामसेज किल्ल्याच्या भेटीत चुकवू नये असे हे स्थान आहे. या दरवाजातून येणारी वाट मोडलेली असुन याच्या कड्यात कोरलेल्या पाय-या तोडून टाकलेल्या आहेत. दरवाजाच्या दोनही कमानी व अंतर्भाग मात्र शिल्लक आहे. आत उतरण्यासाठी पायर्या आहेत. आत काट क्प्नात वळणार्या वाटेवर दोन कमान असलेले दरवाजे आहेत. मधल्या भागात छ्तावर सुंदर कमळ कोरलेले आहे. हा पूर्ण गुप्त दरवाजा मोक्याच्या जागी दगडात बांधून काढलेला आहे.काटकोनात उतरून हा चोर दरवाजा आपणास दिसतो फार फार तर २ माणसे उभे राहू शकतात एवढी जागा आहे.किल्ल्यावरील हा छोटेखानी गुप्तदरवाजा किल्ल्याचे मुख्य आकर्षणच म्हणायला हवे.दरवाच्याची रचना पाहून मन थक्क होते.
गुप्त दरवाजा पाहून पायवाटेने पुढे चालत गेल्यावर आपण देवीच्या मंदिराच्या मागच्या बाजूस पोहोचतो. येथून मुख्य पायवाटेने किल्ल्याच्या प्रवेशव्दाराजवळ यावे रामसेज किल्ल्याच्या संपूर्ण गडफेरीला पायथ्याच्या आशेवाडी गावातून साधारण ३ तासाचा कालावधी पुरेसा आहे.
किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा
सर्व नकाशे पहा
प्रस्तावना
नाशिक जवळील
रामशेज किल्ला जेवढा लहान तेवढाच त्याचा इतिहास महान आहे. संभाजी
महाराजांच्या कारकिर्दीत रामसेज हा असा एकमेव किल्ला होता ज्याने मोगलांशी
जवळजवळ ५।। (साडे पाच) वर्षे सतत झुंज दिली. या मराठ्यांच्या इतिहासात
सुवर्णाक्षराने नोंद करुन ठेवण्यासारख्या पराक्रमाचे वर्णन मात्र आपल्याला
मोगलांच्या कागदपत्रातून मिळते. तसेच ज्या पराक्रमी किल्लेदाराने सतत साडे
पाच वर्षे किल्ला लढवला त्याचे नाव इतिहासाला अज्ञात आहे. असा हा किल्ला
नाशिक पासून जवळ असल्याने एका दिवसात, किल्ला आणि जवळ असणारी चामर लेणी
(चांभार लेणी) आरामात पाहून होतात.
ऐतिहासिक पार्श्वभूमी
रामशेज म्हणजे रामाची शय्या. श्रीराम
वनवासात असतांना त्यांनी या डोंगरावर काही दिवस मुक्काम केला होता,
त्यामुळे या डोंगराला आणि किल्ल्याला "रामशेज" हे नाव मिळाले. संभाजी
महाराजांच्या कारकिर्दीत औरंगजेब हिंदवी स्वराज्य बुडविण्यासाठी पूर्ण
ताकदीनिशी महाराष्ट्रात आला. नाशिक प्रांत व शहर मुगलांच्या ताब्यात होते.
अशावेळी नाशिक जवळील छोटासा गड घेण्यासाठी औरंगजेबने शहाबुद्दीन गाजीउद्दीन
फिरोजजंग याला ४० हजार सैन्य, तोफखाना यांच्यासह पाठविले. मोगलांनी गडाला
वेढा घातला तेव्हा गडावर ६०० च्या आसपास मावळे होते. मोगलांनी रामशेजवर
पहिला हल्ला चढवला आणि मोगल गडाला भिडले, त्याबरोबर गडावरील मावळ्यांनी
दगडांचा प्रचंड मारा केला ,त्यामुळे मोगलांना माघार घ्यावी लागली.
त्यानंतर शहाबुद्दीनने वेढा कडक करणे, सुरुंग लावणे, मोर्चे बांधणे, दमदमे
तयार करुन त्यावर तोफा चढवून हल्ला करणे असे अनेक उपाय केले, पण रामशेजच्या
अनुभवी किल्लेदाराने कौशल्याने आणि सावधगिरीने मोगलांचे सर्व मनसुबे
उधळून लावले. मग हट्टाला पेटलेल्या शहाबुद्दीनने लाकडी बुरुज उभारून त्यावर
तोफा चढवून किल्ल्यावर हल्ला करण्याची योजना आखली. त्यानुसार आजुबाजूची
जंगल तोडून लाकडे जमावण्यात आली. त्या लाकडांचा एक प्रचंड बुरूज बनविण्यात
आला. मोगलांनी त्यावरून गडावर मारा सुरू केला पण त्याचा फारसा परीणाम झाला
नाही. मे १६६२ मध्ये रामशेजचा वेढा फोडण्यासाठी संभाजी महाराजांनी
रुपाजी भोसले व मानाजी मोरे यांना ५ ते ७ हजार सैन्यानिशी पाठविले.
शहाबुद्दीनने गडाजवळील गणेश गावाजवळ मराठ्यांना रोखले. दोघांमध्ये तुंबळ
युध्द झाले, त्यात मोगलांनी माघार घेतली. मराठ्यांनी मोगलांचे ५०० घोडे
पकडून नेले. या विजयामुळे किल्ल्यावरील मावळ्यांमध्ये उत्साह संचारला. पण
या पराजयामुळे औरंगजेब संतापला. त्याने बहादूरखानाला रामशेजला जाण्याची
आज्ञा दिली. शहाबुद्दीनने वेढा कडक करून किल्ल्यावर परत हल्ला चढवला.
त्याबरोबर गडावरील मावळ्यांनी दगडांचा प्रचंड मारा केला .त्यात राजा
दलपतराय दगडांच्या मार्याने जखमी झाला ,त्यामुळे मोगलांना माघार घ्यावी
लागली. सलग येणार्या अपयशामुळे शहाबुद्दीन वेढा सोडून जुन्नरला गेला. आता
वेढ्याची जबाबदारी बहादूरखानावर आली. त्याने किल्ल्यावर हल्ला करण्याची
दुसरी योजना आखली. या योजने नुसार मोगलांच्या सैन्यातील एका गटाने तोफा,
वाद्ये इत्यादी साहीत्य घेऊन गडाखाली एका जागी जमाव करावा.त्यामुळे या
बाजूने मोगलांचा हल्ला होईल या कल्पनेने गडावरील मावळे त्या जागी जमतील. ही
संधी साधून मोगलांच्या दुसर्या गटाने विरुध्द बाजूने किल्ल्यावर हल्ला
करावा. मराठ्यांना या योजनेची आधीच कुणकुण लागली होती. त्यामुळे मराठ्यांनी
दोनही बाजूंना सैन्य विभागून मोगलांना सडकवून काढले आणि मोगलांच्या या
योजनेवरही पाणी फिरवले. किल्ला जिंकण्यासाठी बहादूरखान काहीही करायला
तयार होता. सैन्यातील लोकांनी एक तांत्रिक पकडून आणला. त्याने खानाला
सांगितले मला १०० तोळे वजनाचा सोन्याचा साप बनवून द्या. तो मंतरून मी हातात
घेईन आणि मग कुठलीही अडचण न येता मी तुमच्या सैन्याला किल्ल्याच्या
प्रवेशव्दारा पर्यंत नेईन, मग विजय आपलाच. खानाने त्याच्या म्हणण्या
प्रमाणे केले. एके दिवशी तांत्रिकाला आघाडीवर ठेऊन मोगल सेना गडाच्या
रोखाने निघाली. ती माराच्या टप्प्यात येताच मराठ्यांनी गडावरून गोफणीतून
दगडफेक चालू केली.त्यातील एक दगड आघाडीवरच्या तांत्रिकाच्या छातीवर इतक्या
जोराने लागला की, त्याच्या हातातील सोन्याचा साप उडाला आणि तांत्रिक खाली
कोसळला. हे पाहून मोगल सैन्याचा धीर खचला व त्यांनी माघार घेतली. या
पराभवाने औरंगजेब संतापला. त्याने बहादूरखानाला वेढा सोडून जाण्याची आज्ञा
दिली. या अपमानाने भडकलेल्या खानाने जातांना शहाबुद्दीनने उभारलेला लाकडी
बुरुज जाळून टाकला. त्यानंतर औरंगजेबाने कासिमखान किरमाणी या सरदाराला
रामशेजवर पाठवले, पण त्यालाही गड घेता आला नाही. अशा प्रकारे एक छोटासा गड
पासष्ट महिने लढवून मराठे आणि त्यांचे किल्ले ही काय चीज आहे याची चुणूक
मोगलांना दाखवली.
महत्त्वाची ठिकाणे
किल्ल्यावर जाणारी वाट मळलेली आहे. किल्ला
डावीकडे ठेवत जाते. या वाटेने थोडे पुढे गेल्यावर पायर्या लागतात. गडावर
शिरतांना गुहा दिसते. या गुहे पर्यंत जाण्यासाठी छोटासा सोपा कातळ टप्पा
चढून जावे लावते. या गुहेत पाण्याचे कोरडे टाकं आहे. गुहेत पिंड ठेवलेली
आहे. या गुहेचा उपयोग पाण्याच्या साठ्या बरोबरच टेहळणी करता होत होता. गुहा
पाहून पुन्हा पायवाटेवर येऊन पायर्यांच्या वाटेने वर चढल्यावर रामाचे
मंदिर असलेली गुहा आहे. गुहेच्या एका बाजूला शिलालेख कोरलेला आहे. गुहेच्या
खालच्या बाजूला पाण्याचे एक टाके आहे. यामधील पाणी पिण्यायोग्य आहे.
श्रीरामाचे दर्शन घेऊन गुहे समोरच्या तुटलेल्या पायर्या आपल्याला उध्वस्त
प्रवेशव्दारातून थेट गडावर घेऊन जातात. गडावर प्रवेश करतो तेथे गडमाथा
चिंचोळा आहे. येथून उजव्या बाजूला लांबवर परसरलेला डोंगर माथा आहे. तर
डाव्या बाजूला पठार आहे.
गडावर प्रवेश केल्यावर गडमाथ्यावर समोरच एक
छोटा कमान असलेला दरवाजा आणि त्यातून उतरणारी बांधीव पायर्यांची वाट
दिसते. या पायर्या उतरुन खाली गेल्यावर एक मोठे कोरडे खांब टाके आहे.
टाक्याच्या समोरच्या बाजूला दगडी बिंत बांधून टाके संरक्षित केलेले आहे.
त्याच बरोबर टेहळाणीसाठी आणि मार करतांना आडोसा (लपण्यासाठी) या भिंतीचा
उपयोग होत होता. टाके पाहून गड माथ्यावर येऊन पठाराकडे जावे. वाटेत उध्वस्थ
वाड्याचे अवशेष आणि दोन कातळ कोरीव टाकी लागतात. येथून वर जाणारी वाट
गडाच्या टोकापाशी घेऊन जाते. येथून खालचे गाव, नाशिक - पेठ रस्ता आणि त्या
रस्त्यावर नविनच उभारलेले भव्य प्रवेशव्दार दिसते. या पठारावर नवीन
उभारलेला झेंड्याचा खांब आहे. या झेंड्याला वळसा घालून पुन्हा
प्रवेशव्दारापाशी येऊन वर चढत जाणार्या वाटेने थोडे वर चढुन गेल्यावर आपण
एका सपाटीवर येऊन पोहोचतो. येथे पाच पाण्यांच्या टाक्याचा समुह दिसतो. याच
ठिकाणी उजव्या बाजूला डोंगर उतारावरील वाहात येणारे पाणी दगडी भिंत बांधून
अडवून छोटासा तलाव बनवलेला पाहायला मिळतो.
येथे थोडे आणखी वर चढून
गेल्यावर आपण देवीच्या मंदिरापाशी येऊन पोहोचतो. मंदिरात नवरात्रात मोठा
उत्सव असतो. मंदिराच्या समोर एका झाडाखाली गणपतीची पुरातन मुर्ती आहे.
मुर्तीच्या समोरच्या भागात वास्तूचे अवशेष आहेत. गजाननाचे दर्शन घेऊन
पायवाटेवर येउन गडमाथ्याकडे चढत जातांना डाव्या बाजूला घरांचे अवशेष आहेत.
येथून वर चढून जाण्यापूर्वी डाव्या बाजूला असलेल्या अस्पष्ट पायवाटेने चालत
गेल्यावर आपण तीन टाक्यांच्या समुहापाशी पोहोचतो. ही टाकी पाहून पुन्हा
मुख्य पायवाटेवर परत येऊन गडमाथ्यावर पोहोचल्यावर समोर ३ पाण्याची टाकी
खोदलेली दिसतात. चौथे छोटे टाके या टाक्यांच्या काटकोनात कोरलेले आहे. या
टाक्यांपर्यंत पाणी आणण्यासाठी आणि टाकी भरल्यावर खालच्या बाजूला असलेल्या
टाक्यात पाणी जाण्यासाठी कातळात चर खोदलेले आहेत. टाक्यांच्या पुढे एका
उध्वस्त वास्तूचे अवशेष आहेत. हा गडाचा सर्वोच्च माथा आहे. येथून भोरगड
म्हणजेच देहेरचा किल्ला, चामर लेणी (चांभार लेणी) हा परिसर दिसतो.
गडमाथ्यावरुन
पुढे चालत गेल्यावर आपण किल्ल्याच्या टोकापाशी पोहोचतो. येथे उजव्या
बाजूला खाली उतरुन गेल्यावर कड्यावर ५ मोठ्या टाक्यांचा समुह आहे. यातील
शेवटच्या टाक्या पासुन पुढे चालत गेल्यावर खालच्या बाजूस कड्याच्या टोकाला
एक चौरस टाके आहे . हे टाके पाहून पायवाटेने थोडे वर चढून गेल्यावर ३
मोठ्या टाक्यांचा समुह पाहायला मिळतो. या टाक्यांच्या जवळून एक वाट खाली
उतरत कड्यापाशी जाते. या ठिकाणी किल्ल्याचा गुप्त दरवाजा आहे . आत
उतरण्यासाठी पायर्या आहेत. आत काट क्प्नात वळणार्या वाटेवर दोन कमान
असलेले दरवाजे आहेत. मधल्या भागात छ्तावर सुंदर कमळ कोरलेले आहे. हा पूर्ण
गुप्त दरवाजा मोक्याच्या जागी दगडात बांधून काढलेला आहे.
गुप्त
दरवाजा पाहून पायवाटेने पुढे चालत गेल्यावर आपण देवीच्या मंदिराच्या
मागच्या बाजूस पोहोचतो. येथून मुख्य पायवाटेने किल्ल्याच्या
प्रवेशव्दाराजवळ यावे . या प्रवेशव्दाराच्या बाजूला चुन्याच्या घाण्यासाठी
बांधलेला दगडी गोल चर पाहायला मिळतो. त्याच्या बाजूला कातळात कोरलेल्या
पायर्या आणि प्रवेशव्दार आहे . पायर्यांनी खाली उतरल्यावर प्रवेशव्दारा
समोर थोडी मोकळी जागा आहे. येथे पायर्या खोदलेल्या आहेत त्या किल्ला
चढतांना आपल्याला जी राम मंदिराच्या बाजूला गुहा लागलेली तीच्या छता पर्यंत
जातात. याठिकाणी गुहेच्या छतात छोटे भोक आहे. पण त्यातून माणूस किंवा
प्राणी आरपार जाऊ शकत नाही. या मार्गाचे कोरीवकाम अर्धवट ठेवलेले आहे.
हा
कातळात कोरुन काढलेला दरवाजा आणि पायर्यांचा मार्ग बघून पुन्हा उध्वस्त
प्रवेशव्दाराशी आल्यावर आपली गडफ़ेरी पूर्ण होते. गड फ़ेरीस एक तास लागतो
कसे पोहोचावे
पेठ मार्गे :- किल्ल्यावर जाण्यासाठी
प्रथम नाशिक गाठावे. नाशिकच्या ठक्कर बाजार सीबीएस बस स्थानकावरून ‘पेठ’
कडे जाणारी एस टी पकडावी आणि आशेवाडी फाट्यावर उतरावे. येथून आशेवाडी गावात
जावे. गावातून समोरच किल्ला दिसतो. किल्ला डाव्या बाजूला ठेवून वळसा घालून
जाणारी वाट गावाच्या मागच्या बाजूने किल्ल्यावर जाते. या वाटेने गड
गाठण्यास १ तास लागतो. खाजगी वहानाने किल्ल्याच्या पायथ्याशी
बनवलेल्या वहानतळा पर्यंत थेट जाता येते. त्यासाठी आशेवाडी गावाच्या
फ़ाट्यावरुन गावात न जाता थोडे पुढे गेल्यावर उजव्या बाजूस एक भव्य कमान आणि
त्यातून जाणारा रस्ता दिसतो. हा रस्ता गावा बाहेरुन थेट गडा खालील
वाहानतळावर जातो.
ट्रेकसाठी लागणारा वेळ
⏱️
आशेवाडी गावातून १ तास लागतो.
सुविधा व सोयी
🏠
निवास व्यवस्था
किल्ल्यावर राहण्यासाठी मंदिर आहे. यात १० लोकांची राहण्याची सोय होते.
नाशिक पेठ रस्त्यावरच्या जकात नाक्यापुढे आशेवाडी गाव आहे. आतिथ्यशील गावकऱ्यांच्या आशेवाडीत मारुतीचं प्रशस्त मंदिर आहे. या मंदिराच्या शेजारून छोटेखानी रामसेज किल्ल्यावर चढाई करता येते. आशेवाडीच्या दिशेला दिसणारा रामसेजचा बुधला डावीकडे ठेवत पुढे गेल्यावर रामसेज किल्ल्यावर चढणाऱ्या पायऱ्या लागतात. या पायऱ्यांनी वर चढून आल्यावर गडावर प्रवेश करण्यापूर्वी रामाचं मंदिर आणि थंडगार पाण्याची टाकी आहे. मारुती ते राम, हे अंतर आहे फक्त एका तासाचं! रामसेज गडमाथ्यावर कोरडी पाण्याची टाकी, पडक्या जोत्याचे अवशेष आहेत. माथ्यावर सुस्थितीत असलेलं मंदिर आहे. त्यात वा रामाच्या मंदिरात राहण्याची सोय होऊ शकते. आशेवाडीकडला बुधला व त्याजवळच ध्वजस्तंभ ही गडफेरीत करण्याची इतर ठिकाणं. रामसेजवरून समोर प्रशस्त भोरगड दिसतो. संरक्षण यंत्रणांची रडार सिस्टिम असल्याने भोरगडावर मात्र आपल्याला प्रवेश नाही. दिसायला छोटा असणाऱ्या रामसेजवर मोठा इतिहास घडलेला आहे. मुघलांविरुद्ध तब्बल पाच वर्षं या किल्ल्याने टिकाव धरला होता. एकेक किल्ला असा पाच वर्षं लढवण्याच्या क्षमतेतच स्वराज्याचं सामर्थ्य दडलं होतं. रामसेजवरून पुन्हा नासिककडे येताना म्हसरूळनजीक जैन चांभारलेणी आहेत. वेळ असल्यास ती जरूर पाहून घ्यावीत. म्हसरूळकडून एक रस्ता थेट वाघेऱ्यापर्यंत जातो. वाघेरा घाटमाथ्यावरचं गाव आहे. गावाच्या समोरच एक मोठा बंधारा व जलाशय आहे. जलाशयाच्या पाठी उभा आहे उंच वाघेरा. वाघेऱ्याचे कडे थेट घाटाखाली उतरलेले आहेत. धरणाच्या पाण्यावर व सुपीक जमिनीवर शेती करणाऱ्या गावकऱ्यांना वाघेरा किल्ल्याचा रस्ता विचारायचा. वाघेरा जलाशयाचा बांध उजवीकडे जिथे वाघेऱ्याच्या सोंडेला चिकटलेला वाटतो, त्या डोंगरधारेवरून गडावर चढाई करायची. घाटाखाली उतरलेल्या गडाच्या उंचच उंच कातळभिंती उजवीकडे ठेवत गडाची माची गाठायची. पाठीवर सामान नसल्यास माची गाठायला एक तास पुरे. माचीवरून वाघेऱ्याचा उंच सुळकेवजा उंचवटा, गडमाथा दिसतो. दहा-एक मिनिटांच्या सोंडेवरील सपाट चालीनंतर गडाच्या सुळकेवजा गडमाथ्याला भिडायचं. इथे पाण्याची कोरडी टाकी आहेत. इथून गडमाथा गाठायला दोन वाटा आहेत. गडमाथा डावीकडे ठेवत वळसा घालून चढणारी निसरडी वाट अथवा सोपं 10 फुटांचं प्रस्तरारोहण करून सरळ वर चढणारी कातळाची वाट. कोणत्याही वाटेने गडाचा सुळकेवजा माथा गाठायचा. तिथे उघड्यावर शिवलिंग आहे. फडकणाऱ्या भगव्या झेंड्याबरोबर गड सर झाल्याबद्दल ग्रुप फोटो काढायचा. अंजनेरी, ब्रह्मगिरी आणि आजुबाजूच्या परिसरावर नजर फिरवायची आणि परतीला लागायचं. वाघेरा गावातून गडमाथा गाठायला आणि स्थलदर्शनासाठी दोन तास पुरे. गडावर पाणी नसल्याने वा सावलीसाठी झाड नसल्याने सोबत आणलेलं पाणी प्यायचं आणि आल्या वाटेने गड उतरायचा. वाघेऱ्यातून घाट उतरून हरसूल गाठायचं. हरसूवरून ओझरखेडकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठाणापाडा आहे. ठाणापाड्याला आश्रमशाळेसमोरून खैराई किल्ल्यावर चढाई करायची. निघताना टॉर्च घ्यायला मात्र विसरायचं नाही. खैराई किल्ला फारसा प्रसिद्ध नसलेला, दुर्लक्षित. ट्रेकिंगसंबंधीच्या पुस्तकात त्याचा उल्लेख नाही. नासिकचे हेमंत पोखरणकर यांनी त्याबद्दल माहिती पुरवली म्हणून आम्ही हा किल्ला करू शकलो. आश्रमशाळेसमोरून खैराई माचीवरचा माचीपाडा गाठायला पाऊण तास पुरे. माचीपाड्यातल्या गावकऱ्यांचं आतिथ्य स्वीकारून गड चढायला लागायचं. माचीवर पोहोचल्यावर डौलदार, बहरलेलं शेत आपलं स्वागत करतं. संध्याकाळी ते पिवळं शेत सोनेरी दिसू लागतं. माचीच्या टोकाला गडाजवळ दुतर्फा घरं आहेत. लुसलुशीत कोकरांबरोबर फोटो काढून झाले की गड चढायचा. गडाला बऱ्यापैकी तटबंदी आहे. माचीपाड्याकडला बुरुज नाक्यासमोर ठेवून चढत राहायचा. अर्ध्या तासाने आपण एका टेपावर येऊन पोहोचतो. इथून बुरुजाकडे तुटलेल्या तटावरून गडावर प्रवेश करता येतो. अथवा बुरूज व गडमाथा उजव्या अंगाला ठेवून गडमाथ्याला वळसा घालून गडाच्या पश्चिमेकडून गडावर सोप्या वाटेने प्रवेश करायचा. खैराईचा गडमाथा छोटेखानीच आहे. पण मनाला प्रसन्न वाटतं. गडावर पाण्याची टाकी आहेत. त्यातलं पाणी पावसाळ्यात पिण्यास हरकत नाही. गडाच्या तटावरून गड-प्रदक्षिणा करता येते. गडावर उघड्या मंदिराकडे दोन लहान तोफा पडलेल्या आहेत. मावळतीच्या रंगात गड फारच सुंदर भासतो. मावळणाऱ्या सूर्याला दंडवत घालून अंधार पडण्यापूर्वी माचीपाडा गाठायचा. माचीपाड्यावरून सोप्या वाटेने आल्याप्रमाणे ठाणापाडा गाठायचं. स्वतःची गाडी सोबत असेल व चालणारे भिडू असतील तर एका दिवसात हे तिन्ही किल्ले पाहून मुक्कामाला त्र्यंबकेश्वर वा अंजनेरी गाठता येतं. वाघेरा घाटाच्या खालचा खैराई तांत्रिकदृष्ट्या नाशिक जिल्ह्यात असला तरी भौगोलिकदृष्ट्या तो ठाणे जिल्ह्यात वाटतो. नाशिक त्र्यंबकेश्वरच्या आसपासच्या या किल्ल्यांची सफर आपल्याला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाते.
शंभू राजे छत्रपती झाल्यावर त्यांच्या जीवनाचा आणि असाधारण मुत्युचाही आढावा घेतला असता, पदोपदी आपल्याला या वाक्याची प्रचिती येते. याचं शंभू राजांचा मुसद्दीपणा आणि आम्हा चिवट मराठयांचा इतिहास ठासून सांगणारा 'रामशेज', आमचा आजचा पहिला किल्ला. औरंगजेबाला सुमारे साडेपाच वर्ष झुंजवणारा आणि या लढ्यात हात हलवत माघार घ्यायला लावणारा...रामशेज. हा किल्ला जरी लहान असला तरी त्याचा इतिहास खूपच मोठा आहे.
शहाजहान हा जेव्हा शहाजीराज्यांच्या विरोधात दक्षिणेत उतरला तेव्हा त्याने त्याच्या दख्खन मोहिमेचा मुहूर्त 'रामशेज' हा निजामशाहीचा किल्ला घेऊन केला. आपल्या वडिलांचा तक्ता गिरवत औरंगजेब, महाराज्यांच्या मृत्यूनंतर, स्वराज बुडवायला आपली साडेपाच लाखांचं सैन्य घेऊन उत्तरेतुन निघाला. दख्खन मोहिमेची सुरवात रामशेज घेऊन करायचा त्याचा मानस होता. मुघलांच्या ताब्यातील गुलशनाबाद (नाशिक) पासून १० मैलावर असलेला 'रामशेज' हा घ्यावा म्हणून त्यानेशहाबुद्दीन गाजीउद्दीन फिरोजजंग याला ४० हजार सैन्य, तोफखाना यांच्यासह पाठविले आणि तो किल्ल्याभोवती वेढा टाकून बसला. या वेळी किल्ल्यावर फक्त ६०० मावळे होते, आणि त्यांचा झुंजार किल्लेदार. दुदैवाने त्या किल्लेदाराच नाव, पुरेश्या कागदपत्रांच्या आभावे अवगत नाही. मुघलानी गडावर पहिला हल्ला चढवला आणि मावळ्यांच्या दगडाच्या मऱ्यात परत फिरला. शहाबुद्दीन जवळ जवळ २ वर्ष किल्या घेण्याचा प्रयत्न करत राहिला पण त्याला यश आलं नाही. मग औरंगजेबाने, 'खान जहान बहादूरखान कोकलताश' याला मदतीसाठी पाठवले. यानेही बरेच प्रयत्न केले; तोफांसाठी डोंगरएव्हढे दमदमे उभारले ते पण तटबंदी भेदू शकले नाहीत. मग त्याने दूसरी योजना केली, दारुगोळा, तोफा, वाध्ये एका ठिकाणी गोळा केले जेणेकरून या बाजूने हल्ला होईल म्हणून मावळे बेसावध होतील आणि एक लहान तुकडी दुसरीकडून जाऊन किल्ला घेतील. पण या गनिमी काव्याचे जनक मराठेच होते, त्यांनी सैन्य विभागून मुघलांची पुन्हा फजिती केली. एवढे प्रयत्न करूनही अपयश पदरी पडलेल्या बहादूरखानाने मग दैवाची साथ घेतली, ऐका मंत्रिकाकरवी १०० तोळा वजनाचा सोन्याचा नाग अग्रभागी घेऊन किल्ल्यावर चाल केली आणि वरून आलेल्या दगडाने त्या मंत्रिकालाच टिपल्यावर पुन्हा मागे धूम ठोकली. आता साडे तीन वर्षे उलटूनही किल्ला येत नाही म्हणून वैतागून औरंगजेबाने तिसरा सेनापती बदलला; कासम खान. यालाही काही यश येत नव्हतं, याच गमक म्हणजे..शंभू राजांचा मुसद्दीपणा. या पूर्ण काळात किल्ल्याच्या वेढ्याला, बाहेरून त्रास देण्याचं आणि रसद तोडण्याचं काम राजांनी 'मानाजी मोरे आणि रुपाजी भोसले' या सरदारांना दिलं होतं आणि ते हे चोख बदवत होते. सुमारे साडेपाच वर्ष मराठ्यांनी अशी कडवी झुंज दिल्यावर औरंगजेबाने या किल्ल्याचा नाद सोडला. पुढे हा किल्ला बदलेल्या किल्लेदाराच्या फितुरीने मुघलांना मिळाला.
आजून एक आख्यायिका या किल्ल्याच्या नावाला जोडलेली आहे. प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासात पंचवटीत होते तेव्हा ते इथे आरामसाठी येत असत म्हणूनच 'रामशेज' म्हणजेच रामाची शय्या.
हा झाला इतिहास आता भूगोल पाहू...आमच्या नजरेतून
किल्ला तसा लहानसाच आहे. गडाची उंची साधारण ३२०० फुट एवढी आहे. नाशिक पासून पुढे पेठ मार्गावर आशेवडी या गावाजवळ हा किल्ला आहे. किल्ल्याची वाट डाव्या बाजूने जाते. काही चांगल्या तर काही ढासळलेल्या पायऱ्या चढून आम्ही मंदिराजवळ आलो. एका गुहेत बांधलेलं रामाचं मंदिर सुंदर आहे. मंदिराच्या भिंतीवर एक शिलालेख आहे. या मंदिराच्या उजव्या बाजूला एक लहानशी गुहा आहे तीत शंकराची लहानशी पिंड आणि नंदी ठेवला आहे. या गुहेच्या छताला एक दगडाचा झरोका आहे तो किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराला लागून असलेल्या चोर दरवाज्याचा आहे. मंदिराच्या मागेच एक पाण्याचं कुंड आहे, यातले पाणी पिण्यायोग्य आहे. या पाण्याची चव घेऊन डाव्या बाजूला असणाऱ्या काही पायऱ्या तुडवत आम्ही गडमाथ्यावर आलो. इथे समोरच जमिनीत खोदलेला चोरदरवाजा आहे. हा दरवाजा गडाच्या दुसऱ्या बाजूने उघडतो पण आता मातीत बुझुन गेलेला आहे. दरवाज्याच्या कमानी आजही लक्ष वेधून घेत होत्या. हा दरवाजा नंतर पाहू म्हणून आम्ही उजवीकडे वळालो. लगेचच उजव्या बाजूला काही प्रशास्र पायऱ्या घळीत किल्ल्याचा मुख्य दरवाजाला घेऊन गेल्या. या दरवाज्याच्या पुढे किल्ल्याची प्राचीन मुख्य वाट असावी. या किल्ल्याच एक वैशिष्ट म्हणजे मुख दरवाज्याला लागूनच एक लहानसा पायऱ्यांचा चोर दरवाजा खोदलेला आहे, याने एखादा लहानसा माणूस फक्त खाली जाऊ शकतोकारण याचं लहानसं कवडस्या सारखा एक्सिट पॉईंट. आधी सांगितल्या प्रमाणे हाच तो गुहेच्या छताचा कवडसा. इथे सचिन आणि माझी मतभिन्नता झाली, त्याच्या मते हा चोरदारवाजा नाही कारण त्याची साईझ सचिन पास होईल इतकीही नव्हती. पण मला तो चोरदारवाजा वाटला ते त्या एक्सिट पॉइंटच्या मागे, पायऱ्या संपतात तिथे कोरलेल्या लहानश्या देवडी मूळे. असो, दोघंही या विषयावर, घरी येईपर्यंत बोलत होतो. किल्ल्याचा मुख्य दरवाजा हा उभ्या कातळात कोरलेल्या आहे, लागूनच कातळाचेच बुरुज उभे केले आहेत. दरवाज्यावर दोन लक्ष्मीकमळ कोरलेली आहेत दोन्ही बाजूंना, त्या काळातील वैभवाच प्रतिक. हा किल्ला साधारण १२०० वर्षे अगोदर राष्ट्रकुटांच्या कालावधीत बांधला गेला असावा पण अजूनही या कातळात चिनी हतोड्याचे घाव जिवंत दिसतात. प्रवेशद्वार पाहून आम्ही पुन्हा बाहेर येऊन उनजीवकडे, किल्ल्याच्या मुख्य भागी वळलो. थोडं पुढे गेल्यावर काही दगडात कोरलेली पाण्याची टाकी आणि बांधलेलं एक तलाव दिसलं. टाक्यांच्या वर देवीचं मंदिर दिसत होतं. या टाक्यांना उनविकडे आणि त्या मंदिराला उजवीकडे ठेवून आम्ही किल्ल्याचा दुसरा चोरदरवाजा पाहायला निघालो. हा दरवाजाही, जमिनीत खोदलेला असून खाली उतरण्यासाठी काही पायऱ्या केलेल्या आहेत. त्या पार करून आम्ही एक दरवाज्यातून आम्ही एका सुंदर ठिकाणी पोहीचलो. समोर भोरगड आणि देहेरगडचा डोंगर आणि परिसर, ऊन-ढगांच्या लपंडावाट मन रामवून टाकत होता. इथे पाच-एक मिनिट बसून, काही प्रोफाईल फोटोजचा क्लिकक्लिकाट केला. या दरवाज्यातून वर गडमाथ्यावर जाताना काही आजून पाण्याची टाकी, उध्वस्त वास्तू लागल्या. फिरून देवीच्या मंदिरापासून आम्ही पुन्हा मुख्य दरवाज्या जवळ येऊन डावीकडे माची पाहण्यास निघालो. माचीवर एक पाण्याचं टाकं आणि एक अलीकडे लावलेला ध्वजस्तंभ आहे. इथे एका सापाचे दर्शन झाले आणि आम्ही पुन्हा दरवाज्यापाशी आलो. समोरचा राहून गेलेला चोर दरवाजा पहिला. हा दरवाजा गडाच्या दुसऱ्या बाजूला उघडतो पण आता बुझुन गेला आहे. दोन कमानी पार करून एका कातळात कोरलेल्या मोठ्या गुहेजवळ हा दरवाजा घेऊन गेला. पुढे जायची वाट बंद झाली आहे. हा चोर दरवाजा पाहून आम्ही आमची गडफेरी पूर्ण केली. किल्ला फिरायला आम्हाला दोन तास लागले, वर यायला जेवढा वेळ लागला होता त्यापेक्षाही जास्त. किल्ला आहेच तसा!
रामशेजवरून आम्ही निघालो पूर्वेला देहेरगडकडे. तो समोर दिसत होता म्हणून न विचारता आम्ही आशेवडी गाव गाठलं. देहेर आणि भोरगड हे दोन्ही किल्ले एकमेकांना लागून आहेत, पैकी भोरगडवर ऐरफोर्स ने रडार्स बसवलंइ आहेत म्हणून तिथे जाता येत नाही. एकाच खिंडीतून हे किल्ले वेगवेगळे केले आहेत. गाववल्याने सांगितलेले नो परमिशन ऐकून आम्ही मागे फिरलो आणि मुख्य रास्तानं, अशेवडीच्या पुढे ७-८किलोमीटर वर रासेवाडी गावाकडून लेफ्ट घेऊन 'देहेरवडी' गाठली. इथून किल्ला समोर दिसतो. डोंगराच्या सोंडेवरून किल्ला गाठायला दीड तास लागला. किल्ल्यावर पहाण्यासाख फारसं काही नाही आहे आता. पायऱ्या, एक उद्धस्त प्रवेशद्वार, आणि काही पाण्याची टाकी आहेत. याची गडफेरी आटपून आम्ही डोंबिवली गाठली.
जाता जाता एक विचार..…. नेहमीच मनात येतो तो आमच्या. आमचा पर्सनल...
इतिहास.... साडे पाच वर्षांचा ज्वलंत लढा आणि विजय हिंदुस्थान बादशहा औरंगजेबविरुद्ध; पण आमच्या शालेय जीवनात एक ओळ सुद्धा नाही. बहुतेक दोन्ही छत्रपती भोसले आडनाव लावत होते म्हणून...गांधी किंवा नेहरू असते तर...दिवसागणिक वर्णन भोकवून घेतलं असतं आमच्याकडून शाळेत!.....
आम्ही शिकलो तो इतिहास परतंत्राचा, लोर्ड्स आणि गव्हर्नरचा....पण आमचा खरा इतिहास अशाच रक्ताने मिळवलेल्या स्वातंत्र्याचा आहे...आणि तो सुरू होतो सिकंदरच्या काळापासून...
आम्हाला पुस्तकातून शिकवला जातो १५० वर्षांच्या गुलामीचा इतिहास पण आता मनात मात्र....स्वराज्य आणि स्वातंत्रलढा...
अलौकिक झुंजीचा साक्षीदार किल्ले रामशेज (Ramsej Fort An Eye witness of Exctraordinary Battle)
नाशिक पट्टा हा किल्ल्यांच्या साखळ्यांनी परिपूर्ण असा आहे हे आपणा सर्वांस माहित आहे.प्रभू श्री रामाचा पदस्पर्श ह्या भूमीला लाभलाय,आणि पौराणिक संदर्भाने जिथे प्रभू श्री रामचंद्र विश्रांती घ्यायचे त्या डोंगराला रामशेज म्हंटले जाते.हाच आपला सर्वांचा आवडता आणि सुपरिचित झुंजीचा साक्षीदार रामशेज किल्ला होय.सुमारे साडे पाच वर्ष मोगली फौजांना आणि मातब्बर सरदारांना सळो कि पळो करून सोडणारा अशी ह्या किल्ल्याची ओळख.रामशेज ला जाण्यासाठी नाशिक पासून साधारण १४ ते १५ किलोमीटर वर असणारे आशेवाडी गाव गाठायचे.गावातून समोरच कातळ टोपी दिसते तोच रामशेजचा किल्ला.किल्ल्यावर जाणारी वाट मळलेली आहे किल्ला डाव्या बाजूला ठेवून सुरुवातील बांधीव पायऱ्या चढून त्या नंतर मळलेल्या वाटेने सरळ किल्ला चढत जायचे.चढताना किल्ल्याच्या प्रवेशद्वाराअलीकडील राम मंदिर स्पष्ट दिसते त्यामुळे वाट चुकण्याचा संभव नाही.
पायथ्यापासून दिसणारी रामशेज किल्ल्याची कातळटोपी
साधारण ४५ मिनिटे ते १ तासाच्या चढाई नंतर आपण गुहेपाशी पोहोचतो.ह्या गुहेत शिवपिंड ठेवलेली आहे. हि गुहा पाहून सरळ गेल्यावर श्री रामाचे मंदिर लागते मंदिराच्या मागच्या भिंतीवर (जी किल्ला चढताना समोर लागते) एक शिलालेख कोरलेला आहे.ह्या शिलालेखावरचा मजकूर हा पुढील प्रमाणे आहे – १. ।। श्री गणेशाय नम:।। २. स्वस्तिश्री म नृपशालिवाहन शक १६८२ विक्रमनाम ३. संवत्छरे: श्रीराजा शाहूचरणि दृढभाव: पंत ४. प्रधान बाळाजि बाजिराव: सुभेदार आपा स ब (स) ५. (दा) शिव: सटवोजि मोहिते हंबिरराव ६ (फ)किर मुहहंमद कारिगर
Advertisements
REPORT THIS AD
शिलालेखाचा सारांश-शालिवाहन शकाच्या १६८२व्या वर्षी विक्रमनाम संवत्सरात छत्रपती शाहू महाराजांचे पेशवे बाळाजी बाजीराव (नानासाहेब पेशवे) यांनी सुभेदार (आपाजी सदाशिव?), शेवटची ओळ लागत नाही परंतु त्याचा साधारण अर्थ सटवोजी हंबीरराव मोहिते यांच्या सहकार्याने किल्ल्याचा तट, बुरूज, दरवाजा किंवा अन्य वास्तू यांचा जिर्णोद्धार केला. हे बांधकाम फकीर मुहम्मद याने केले असा होतो. ह्या शिलालेखावरून स्पष्ट होते कि इ.स १७६० (शके १६८२) साली किल्ला मराठ्यांकडे होता व किल्ल्याचा तट, बुरूज, दरवाजा किंवा अन्य वास्तू यांचा जिर्णोद्धार केला गेला.मंदिरात श्री राम ,लक्ष्मण आणि सीता मातेची मूर्ती आहे.मंदिर छोटेखानी आणि सुंदर आहे.मंदिराच्या डाव्या बाजूस पाण्याचे टाके आहे.हे पाहून सरळ पायरी मार्गाने चालत आपण उध्वस्त प्रवेशद्वाराने किल्ल्यात प्रवेश करतो.
शिलालेख
किल्ल्यात प्रवेश केल्यावर किल्ल्याचे दोन भाग पडतात डाव्या बाजूला आहे तो पठाराचा भाग आणि उजव्या बाजूला पाण्याची टाकी आणि उध्वस्त अवशेष असलेला किल्ल्याचा डोंगर माथा.प्रथम उजवीकडे जाण्याआधी प्रवेश द्वाराला समांतर उतरत गेल्यावर कमानी असलेला दरवाजा लागतो.मी समांतर ह्या साठी म्हणतोय कारण दरवाजा उतरल्यावर आपल्याला राम मंदिराजवळ असलेले गुहेचे छत दिसते आणि गम्मत म्हणजे ह्या छताला भोक आहे ते आपल्यला आतून स्पष्ट दिसते.दरवाज्याचे प्रयोजन बघून नक्कीच या ठिकाणी किल्ल्याला दुहेरी तटबंदी असावी असे वाटते. दरवाजा अत्यंत रेखीव आहे , दरवाजा पाहून पुन्हा मागे यायचे आणि उजव्याबाजूस सरळ चालत गेल्यावर दगडी पायऱ्या लागतात त्या उतरल्यावर आणखी एक छोटा दरवाजा लागतो आणि पुढे छोटेखानी तटबंदी लागते हि बहुदा टेहळणीची जागा असावी .इथून रामशेज खालील परिसर आणि नाशिक कडे जाणारा रास्ता पाहायला मिळतो.हे पाहून वर यायचे आणि सरळ चालत जाऊन डोंगर माथ्यावर जायचे.
किल्ल्याला च्या मुख्य दरवाज्याला आतून समांतर असणारा दुसरा दरवाजा
गडमाथ्याच्या डाव्या बाजूला असणारा दुसरा कमान असलेला दरवाजा
गडमाथ्यावर जाताना थोडा अलीकडे चुन्याच्या घाण्याची जागा लागते ती पाहून पुढे गेल्यावर आधी काही कोरडी टाकी आणि देवीचे मंदिर लागते.मंदिर पाहून सरळ चालत राहायचे आणि माथ्याच्या टोकापर्यंत जायचे , वाटेत काही उध्वस्त वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात.अवशेष पाहून आपण माथ्याच्या टोकाला पोहोचतो इथे खराब टाक्यांचा समूह पाहायला मिळतो. किल्ल्यांवरच्या टाक्यांची संख्या पाहता किल्ला छोटा असून किल्ल्यावर बराच राबता असावा असे वाटते.हे पाहून परत किल्ल्याच्या पठाराच्या मार्गावर निघायचे परंतु पठारावर जाण्याआधी वाटेत टाकी लागतात त्याला समांतर एक छोटी पायवाट खाली कड्या पर्यंत जाते.इथे किल्ल्यातील गुप्त दरवाजा लागतो. काटकोनात उतरून हा चोर दरवाजा आपणास दिसतो फार फार तर २ माणसे उभे राहू शकतात एवढी जागा आहे.दरवाज्याच्या छतावर कमळपुष्प कोरले आहे.किल्ल्यावरील हा छोटेखानी गुप्तदरवाजा किल्ल्याचे मुख्य आकर्षणच म्हणायला हवे.दरवाच्याची रचना पाहून मन थक्क होते.
तटबंदी आणि चुन्याचा घानाकोरडी पाण्याची टाकी
चोरदरवाजाच्या छतावरील कमलपुष्प
चोरदरवाजा
चोरदरवाजा पाहून सरळ किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूस यायचे इथे एक सुंदर मोठा भगवा ध्वज उभारलेला आहे. ध्वजालिकडे दोन मोठी खराब टाकी लागतात.इथे आपली गडफेरी संपते.पाऊस सुरु झाल्या झाल्या अथवा सुरु होताना जे मळभ असणारे वातावरण असते त्या वातावरणात ह्या किल्ल्यावर जरूर जावे.मराठ्यांच्या इतिहासातील एका अलौकिक झुंझीच्या साक्षीदार असणाऱ्या ह्या छोटेखानी किल्ल्याला जरूर भेट द्या.
गड माथ्यावर असणाऱ्या झेंड्यासोबत मी
गडाच्या इतिहासाबद्दल – रामशेज हा किल्ला १६३५ साली शहाजहान ने स्वारी केली तेव्हा मोघलांकडे होता हे धोडप , राजदेहेर ह्या किल्ल्यांवर असणाऱ्या शिलालेखांवरून कळते.तेव्हा रामसेज किल्ल्याबरोबरच त्या पट्ट्यातील चांदवड, धोडप , इंद्राई, राजदेहेर इत्यादी किल्ले अलावर्दीखान तुर्कमान ह्याने घेतले असे शिलालेखात कोरले आहे.रामशेजवर औरंगजेबाने शहाबुद्दीनखान ह्याची नियुक्ती केली , तसेच त्याच्याबरोबर राव दलपत आणि इतर बुंदेले सरदार सुद्धा होते.प्रारंभी बुंदेले व त्यांच्या सरदारांचा किल्ल्यावरील ५०० ते ६०० लोकांच्या शिबंदीसमोर काही टिकाव लागला नाही.त्यातच मे १६८२ साली संभाजी महाराजांनी रुपाजी भोसले व मानाजी मोरे ह्यांना वेढा फोडण्यासाठी पाठवले त्यावेळी शहाबुद्दीन खानाच्या सैन्याबरोबर तुंबळ युद्ध झाले आणि मोगलांना माघार घ्यावी लागली.ह्या विजयाने किल्ल्यावरील शिबंदीत जोर चढला.शहाबुद्दीन खानाकडून काही एकट्याने होत नाही म्हंटल्याबर औरंगजेबाने बहादुरखानास शहाबुद्दीन च्या मदतीस कुमक देऊन पाठवले.शहाबुद्दीन ने किल्ल्याला वेढा घालणे , सुरुंग लावणे , मोर्चे बांधणे , दमदमे तयार करून वर चढवणे हे सर्व प्रयत्न केले पण किल्लेदारासमोर त्याचे काही चालेना.शिवाय खानाने केलेल्या दुसऱ्या कडक हल्ल्यात राजा राव दलपतराय ह्याला दगड लागला त्यामुळे मोगलानी पुन्हा माघार घेतली. शेवटी बादशहाने शाबुद्दीनखानाला परत बोलावले व जुन्नर ला पाठवले आणि वेढ्याची जबाबदारी खानजहान बहादूर कोकलताश ह्या एकट्यावर आली.
कोकलताश ने तर आणखी नवीन योजना आखली त्याच्या योजने प्रमाणे किल्ल्याच्या एका बाजूला हल्ला करायचा म्हणून तोफा दारुगोळा त्या बाजूस आणून हशमांनी आणि सैन्याने जमवाजमव करून गर्दी करून आवई उठून द्यायची आणि दुसऱ्या बाजूस किल्ल्याच्या जिथे शिबंदी नाही किंवा कमी आहे तिथे काही निवडक सैनिकांनी जाऊन किल्ल्यावर हल्ला करायचा. परंतु किल्लेदार इतका हुशार होता कि त्याला हि योजना कळली व त्याने सुद्धा आपल्याला जस काय माहित नाही असे दाखवून मुद्दाम दुसऱ्या बाजूने येणाऱ्या मोगली गटावर हल्ला करण्यासाठी आलेल्या सैनिकांना सडकून काढून मोगलांच्या योजनेवर अक्षरशः पाणी फिरवले. अजून कहर म्हणजे सैन्याने कोण्या एका तांत्रिकाला पकडून आणले आणि तो म्हणाला कि मला १०० तोळे वजनाचा सोन्याचा साप द्या मी तो मंत्रून हातात घेईल मग कुठलीही अडचण न येता तुम्ही किल्ल्यात प्रवेश करू शकाल.एके दिवशी ह्या तांत्रिकाला आघाडीवर ठेवून मोगली सैन्य येताना मराठ्यांना दिसले आणि मराठ्यांनी दगडांचा मारा गोफणीने सुरु केला, ह्या माऱ्यात तांत्रिकाला दगड लागला त्यात तो साप उडाला आणि तांत्रिक जागच्या जागी कोसळला हे पाहून मोगली सैन्याने माघार घेतली.ह्या पराभवाने संतापून औरंगजेबाने कोकलताशला पण पुन्हा बोलवून घेतले आणि वेढा उठला.त्यानंतर संभाजी महाराजांनी किल्लेदाराचे कौतुक करून त्याची बदली एका प्रमुख किल्ल्यावर केली.पुन्हा बादशहाने कासीमखान किरमाणी नावाच्या सरदाराला किल्ला घेण्यासाठी पाठवले पण त्याच्याकडून सुद्धा काही झाले नाही.अशाप्रकारे सण १६८७ पर्यंत किल्ला भांडला आणि शेवटी फितुरीनेच तो मोगलांकडे आला.
मी हि झुंज स्थलाभावी फार थोडक्यात सांगितली ,ह्या लढाईवर सविस्तर लिहिण्यासारखे आहे.थोडक्यात काय माझा एक एक एक एक वर्ष लढू शकतो हे महाराजांचे वाक्य रामशेज आणि मराठ्यांनी सार्थ केले.
संदर्भ- ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा – डॉ. सदाशिव शिवदे ,तारीखे दिल्कुशा ह्या भीमसेन सक्सेना च्या ग्रंथाचा श्री. सेतुमाधवराव पगडी ह्यांनी केलेला मराठी अनुवाद – मोगल आणि मराठे , तसेच ऐतिहासिक फारसी साहित्य खंड ६ मधील अखबार
“ खान मियाँ आपसे एक चीझ बोलनी थी, म्हणजे गुस्ताखी माफ करा पण राहावलं नाही म्हणून आपल्यासमोर बोलण्याचा गुन्हा करतोय”, एक सरदार आपले हात जोडून भीत भीत शहाबुद्दीनखाना समोर उभा राहिला. “ क्या हुवा, आज इतनी हिम्मत की हमे सीख देने की जरूरत कर रहे हो तुम?”, खानाने आपले डोळे मोठे करून त्याच्या कडे नजर फेकली आणि आपल्या छावणीत हुक्क्यावर ताव मारायला सुरुवात केली. “ हुजूर हा किला आपल्याकडून पडणार नाही ऐसा मुझे लगता हैं, हुजूर नाराज मत होना लेकिन, किलेकी दिवारे बुलंद हैं और उपर जाने मैं बहोत दिक्कत हो रहीं हैं हमारे फौज को. मैं पुरा किला बघून आलो खालून, वर चढायला जागाच नाही और सब जगाह हलकी मिट्टी हैं कहीं भी उपर तक झाडी नहीं जहाँ से जाना मुंकीन हैं, मुझे लगता हैं आप ये मसला छोड दो क्यूनकी किलेकी उंचाई बहोंत कम हैं, तोह ते मराठे आरामसे मारू शकतात आपल्याला वर जाऊ तसे.” सरदार ने मुह तो खोला मगर शहाबुद्दीन खान चवताळला आणि त्याने त्याला कैद करण्याचा हुकूम दिला. बाहेर येऊन त्याने किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वेढ्याकडे आणि वर किल्ल्याकडे नजर केली तशी वरची माणसं आपल्याकडे पाहून खिदी खिदी हसतायत की काय असा भास त्याला झाला.
त्याने सरदाराचं बोलणं मनावर घेतले नाही आणि रामशेज चक्क 6 वर्ष(1682 ते 1689)लढला. हा सगळा प्रकार मी जेव्हा रामशेज च्या तटबंदीवरुन चालत होतो तेव्हा मला जाणवला की खरच असंच काहीसं झालं असेल या किल्ल्यावर. उंची इतकी कमी की कोण कुठून येतंय हे गरुड नजरेने टिपता येतंय तर मग कसली भीती मराठ्यांना. वेचून वेचून मारत असतील मुघलांना. बरं जंगल ही नाहीच केवळ पूर्ण उंचीच्या25% च गवत बाकी पूर्ण उघडा त्यामुळे चारही बाजूने स्पष्ट सगळं मला दिसत होतं. वर 600 मावळे होते असा उल्लेख इतिहासात आहे. कमाल वाटते मला त्या मावळ्यांनी6 वर्षे कसा लढवला असेल हा किल्ला? वर जागाही अमाप नाहीच की घरं बांधून राहता येईल, ती शक्यताच नाही, त्यामुळे तंबू ठोकून राहणे हा पर्याय असावा असं मला वाटतं. एकंदरच रामशेज हा किल्ला मूर्ती लहान पण कीर्ती महान या म्हणीत चपखल बसण्यासारखा आहे. वर बांधकाम खूपच थोडं आहे, पायऱ्या आता बांधल्या आहेत. रामाचं सुबक आणि मधुर जलाच्या म्हणजे टाक्याच्या वर छान मंदिर आहे. वर गेलं की उजव्या हाताला बांधीव दरवाजा आहे त्याच्या पुढेही पायऱ्या आहेत पण तो का बांधला असावा आणि त्यामागचा उद्देश हा इतिहास आपल्या पोटात घेऊन विसावलाय त्यामुळे त्याचा उलगडा होत नाही. त्याच पायऱ्या साधारण 10 फुटांवर संपतात तिथे परत खडक आहे म्हणजेच खाली उतरायला नो entry मग तिथे पायऱ्या का बांधला परत तोच प्रश्न? आणि त्यात त्या खडकाला एक छोटं छेद आहे त्याचा उलगडा तर होतच नाही त्यामुळे ते बघून किल्ल्याला चक्कर मारावी आणि परत उतरावं. गावाकडच्या टोकाला एक खोदीव खड्डा दिसतो आणि त्याच्या सर्व बाजूंनी बांबू रोवता येतील असे बारीक खड्डे दिसतात त्यावरून तंबू कसे ठोकले जायचे ह्याचा थोडा विचार करता येऊ शकतो. असेच खड्डे काही ठिकाणी अजून आहेत.
तर असा हा रामशेज पहावा आणि 10 मिनीटात पायऱ्यांनी खाली उतरावं. येताना रामाच्या मंदिरातील पाणी प्यावं तृप्त व्हावं आणि बाटलीत भरून घरी घेऊन यावं. लोकांची अशी श्रद्धा आहे की ते पाणी इतकं शुद्ध आहे की लोकं ते पाणी घरी आणून त्याने घरच्या देवांना अंघोळ घातली जाते. मी पाणी प्यायलं आहे खरच आजच्या काळात शुद्धता काय हे त्याने समजलं. तर असा हा अभेद्य रामशेज पाहायला नक्की सर्वांनी एकदा तरी जावंच. चढायला लागणारा वेळ – 20 मिनटं मुंबई-ठाणे येथून जाण्यासाठी नाशिक मार्गे त्रंबकेश्वर रस्त्यावर 12 किमी वर रामशेज गाव आहे. गावात श्री हनुमानाचे सुबक आणि मोठे मांदिर आहे. पुण्याहून सुद्धा नाशिक मार्गे रामशेज ला जात येते. खालच्या गावात जेवणाची सोय होते. अतिशय छोटा पण किर्तीने मोठा असलेला आणि इतिहासात आपली विशिष्ट ओळख असलेला हा रामशेज एकदा तरी पहावा.
पेठ पासून अर्ध्या तासाच्या अंतरावर आशेवाडी नावाचे गाव आहे. ते रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले गाव.आशेवाडी गावाच्या फाट्यावर उतरून ५ मिनिटात आशेवाडी गावात पोचले, की रामशेज किल्ल्यावर चढाई करता येते. गावातून दृष्टीक्षेपात असलेल्या गडावर पोचण्यासाठी एक तास पुरतो.
आशेवाडी गावातून दिसणारा रामशेज किल्ला.
गावात असलेल्या दुकानांमधून टाईम पास पोटोबा करून किल्ल्याच्या दिशेने वाटचाल चालू होते. गावाबाहेर पडताच आजूबाजूचा मोकळा निसर्ग मी-मी म्हणू लागतो. आजूबाजूला चालू असलेले खाणकाम दुर्लक्ष करण्यास भाग पाडतो. मोरांचा आवाज ऐकत त्यांना लोकेट करत करत आपण अर्धा किल्ला चढलेला असतो.
गावाबाहेर पडताना किल्ल्याच्या मुख्य कड्याचे दर्शन होते. किल्ला डावीकडे ठेवत वाटचाल करत सुमारे दहा मिनिटात किल्ल्यावरील मंदिर व गुहा दृष्टीपथात येते आणि वाटेचे कन्फर्मेशन देते. या वाटेने थोडे पुढे गेल्यावर पाय-या लागतात.
किल्ल्याची उंची पाहता खरेच हा किल्ला पासष्ठ महिने कसा काय लढवला असेल असे वाटून जाते. मुघलांनी किल्ल्याच्या उंचीचे लाकडी मचाण बांधून त्यावरून तोफमारा चालवला होता हे खरेच वाटायला लागते. कुठे मचाण बांधली असेल? किल्ल्यावरून त्या मचाणावर दगडफेक करून त्या कश्या उधवस्त केल्या जात असतील? या विचारातच आपण रामाच्या मंदिरापर्यंत पोहोचतो.
आता इतिहासातून बाहेर येऊन आजूबाजूला मान वळवली की, आपली चढाई आपोआप थांबते. आपल्या मनात ऐतिहासिक द्वंद्व चालू असताना इथे तर निसर्गाचा निसर्गासाठीचाच अद्वितीय सोहळाच चालू असतो. आकाशभर काळ्या ढगांनी ढकलाढकली चालू केलेली असते. एका उंच टेकाडाशी रिंगण करून फेर धरल्यासारखा भास होत असतो. सूर्यनारायणांचे लक्ष असतेच त्यामुळे या रिंगणाला सोनेरी किनार लाभते. टेकाडा-पलीकडून उंची घेतलेला वारा आता आपल्यापर्यंत येऊन ढगातील चोरून आणलेल्या दवाने आपले पापणीचे केसही भिजवतो.
Felicitation by Nature to Nature !
घड्याळाकडे लक्ष जाते आणी आपण कल्पनेतून वर्तमानात येतो. पायऱ्या चढून भल्यामोठ्या चाफ्याचा झाडापाशी आलो की चाफ्याच्या वासाने मंदिरात शिरताना आपले मनही शुचिर्भूत झाल्यासारखे वाटते.
गडावर शिरताना वाटेत एक गुहा दिसते. त्या गुहेत रामाचे मंदिर आहे. गुहेच्या एका बाजूला शिलालेख कोरलेला आहे. गुहेच्या खालच्या बाजूला पाण्याचे एक बारमाही टाके आहे. त्यामुळे गुहेत एकदम गारेगार वातावरण असते. पुजारी काकांशी थोड्या गप्पा टप्पा झाल्यावर त्यांनी गुहेखाली असलेल्या पाण्याच्या टाकीत उतरायची वाटही दाखवली. वर्षातून एकदा पावसाळ्याच्या आधी गावातून वीज पंप येथे आणून या टाकीतील सगळे पाणी काढून साफ सफाई ते करतात. बारमाही जिवंत झरा असल्याने दोन दिवसात परत टाकी भरून जाते आणि अतिरिक्त पाणी खालूनच वाहून झाडांना जाते.
राम मंदिर व प्रशस्त गुहा.
गुहे समोरच्या तुटलेल्या पाय-या थेट गडावर जातात. त्यावरून पुढे गेल्यानंतर आपण गडाच्या दोन्ही टोकांमधील भागात पोचतो. येथूनच थोडे खाली बुजलेल्या अवस्थेतील गुप्त दरवाजा आहे. या वाटेने आपण अर्ध्या तासात आशेवाडीत पोहोचतो. येथूनच समोरचा देहेरगड व भोरगड किल्ला दिसतो. सद्यस्थितीत तेथे मिलिटरी बेस असल्याने तेथे जाण्यास परवानगी घ्यावी लागते. गुप्त दरवाजापासून वर जाणारी वाट रामशेजच्या दुस-या टोकाकडे जाते तेथून देहेर व आजूबाजूच्या परिसराचे मस्त दर्शन होते. तेथून फिरून आल्यावर परत पायऱ्यांच्या सुरवातीला आल्यास तेथून एक वाट खाली जाते. तेथे किल्ल्याच्या अभेद्य दरवाज्याचे दर्शन होते. येथून खाली गुहे सदृश्य जाणारी वाट ही राम मंदिराच्या बाजूस असलेल्या गुहेत निघते.
येथून बाहेर येऊन थोडे डावीकडे पठार लागते. येथे छोटी तळी आणि असंख्य मासे. गार पाण्यात पाय सोडून तळव्यांना थंडक द्यायची आणि थोडा पोटोबा करून घायचा.
येथून पुढे मोकळ्याढाक पठारावर थोडी वामकुक्षी घेतानाच वर नजर जाताच समजते कि, किल्ल्यावर आपल्याखेरीज अजून कोण तरी आहे आणि आपल्यावर लक्ष ठेऊन आहे. ब्राम्हणी घार आपल्या जोडीला असतेच. दोन तीन पंख मारून मग खूप वेळ निवांत उडत असलेली घार आणि उतारावर गाडी बंद करून फुकट जाणारा मी या दोघात का कुणास ठाऊक साम्य वाटून जाते.
आता उन्हे सरली आणि पाय परतीच्या वाटेला लागले. जाताना वाटेतच चामरलेणी आहेत त्याही करायच्या होत्या. किल्ला उतरून आल्यावर रस्त्यावरच यष्टीची वाट बघत ठाण मांडली. सुमारे पंधरा मिनिटात यष्टी आली आणि दहा रुपयात चामरलेणी फाटा.
रामशेज किल्ल्यावरून सुमारे चार-पाच किलोमीटर अंतरावर असलेला चामर लेणींचा डोंगर दृष्टीस पडतो. त्याहीपलीकडे दूर पांडवलेणींचा डोंगर दिसतो. वातावरण स्वच्छ असेल, तर उजव्या बाजूला दूरवर अंजनेरी व ब्रह्मगिरीचे पर्वत न्याहाळता येतात.
रामसेज, वाघेरा, खैराई
रामसेज, वाघेरा, खैराई
नाशिक पेठ रस्त्यावरच्या जकात नाक्यापुढे आशेवाडी गाव आहे. आतिथ्यशील गावकऱ्यांच्या आशेवाडीत मारुतीचं प्रशस्त मंदिर आहे. या मंदिराच्या शेजारून छोटेखानी रामसेज किल्ल्यावर चढाई करता येते. आशेवाडीच्या दिशेला दिसणारा रामसेजचा बुधला डावीकडे ठेवत पुढे गेल्यावर रामसेज किल्ल्यावर चढणाऱ्या पायऱ्या लागतात. या पायऱ्यांनी वर चढून आल्यावर गडावर प्रवेश करण्यापूर्वी रामाचं मंदिर आणि थंडगार पाण्याची टाकी आहे. मारुती ते राम, हे अंतर आहे फक्त एका तासाचं! रामसेज गडमाथ्यावर कोरडी पाण्याची टाकी, पडक्या जोत्याचे अवशेष आहेत. माथ्यावर सुस्थितीत असलेलं मंदिर आहे. त्यात वा रामाच्या मंदिरात राहण्याची सोय होऊ शकते. आशेवाडीकडला बुधला व त्याजवळच ध्वजस्तंभ ही गडफेरीत करण्याची इतर ठिकाणं. रामसेजवरून समोर प्रशस्त भोरगड दिसतो. संरक्षण यंत्रणांची रडार सिस्टिम असल्याने भोरगडावर मात्र आपल्याला प्रवेश नाही. दिसायला छोटा असणाऱ्या रामसेजवर मोठा इतिहास घडलेला आहे. मुघलांविरुद्ध तब्बल पाच वर्षं या किल्ल्याने टिकाव धरला होता. एकेक किल्ला असा पाच वर्षं लढवण्याच्या क्षमतेतच स्वराज्याचं सामर्थ्य दडलं होतं. रामसेजवरून पुन्हा नासिककडे येताना म्हसरूळनजीक जैन चांभारलेणी आहेत. वेळ असल्यास ती जरूर पाहून घ्यावीत. म्हसरूळकडून एक रस्ता थेट वाघेऱ्यापर्यंत जातो. वाघेरा घाटमाथ्यावरचं गाव आहे. गावाच्या समोरच एक मोठा बंधारा व जलाशय आहे. जलाशयाच्या पाठी उभा आहे उंच वाघेरा. वाघेऱ्याचे कडे थेट घाटाखाली उतरलेले आहेत. धरणाच्या पाण्यावर व सुपीक जमिनीवर शेती करणाऱ्या गावकऱ्यांना वाघेरा किल्ल्याचा रस्ता विचारायचा. वाघेरा जलाशयाचा बांध उजवीकडे जिथे वाघेऱ्याच्या सोंडेला चिकटलेला वाटतो, त्या डोंगरधारेवरून गडावर चढाई करायची. घाटाखाली उतरलेल्या गडाच्या उंचच उंच कातळभिंती उजवीकडे ठेवत गडाची माची गाठायची. पाठीवर सामान नसल्यास माची गाठायला एक तास पुरे. माचीवरून वाघेऱ्याचा उंच सुळकेवजा उंचवटा, गडमाथा दिसतो. दहा-एक मिनिटांच्या सोंडेवरील सपाट चालीनंतर गडाच्या सुळकेवजा गडमाथ्याला भिडायचं. इथे पाण्याची कोरडी टाकी आहेत. इथून गडमाथा गाठायला दोन वाटा आहेत. गडमाथा डावीकडे ठेवत वळसा घालून चढणारी निसरडी वाट अथवा सोपं 10 फुटांचं प्रस्तरारोहण करून सरळ वर चढणारी कातळाची वाट. कोणत्याही वाटेने गडाचा सुळकेवजा माथा गाठायचा. तिथे उघड्यावर शिवलिंग आहे. फडकणाऱ्या भगव्या झेंड्याबरोबर गड सर झाल्याबद्दल ग्रुप फोटो काढायचा. अंजनेरी, ब्रह्मगिरी आणि आजुबाजूच्या परिसरावर नजर फिरवायची आणि परतीला लागायचं. वाघेरा गावातून गडमाथा गाठायला आणि स्थलदर्शनासाठी दोन तास पुरे. गडावर पाणी नसल्याने वा सावलीसाठी झाड नसल्याने सोबत आणलेलं पाणी प्यायचं आणि आल्या वाटेने गड उतरायचा. वाघेऱ्यातून घाट उतरून हरसूल गाठायचं. हरसूवरून ओझरखेडकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठाणापाडा आहे. ठाणापाड्याला आश्रमशाळेसमोरून खैराई किल्ल्यावर चढाई करायची. निघताना टॉर्च घ्यायला मात्र विसरायचं नाही. खैराई किल्ला फारसा प्रसिद्ध नसलेला, दुर्लक्षित. ट्रेकिंगसंबंधीच्या पुस्तकात त्याचा उल्लेख नाही. नासिकचे हेमंत पोखरणकर यांनी त्याबद्दल माहिती पुरवली म्हणून आम्ही हा किल्ला करू शकलो. आश्रमशाळेसमोरून खैराई माचीवरचा माचीपाडा गाठायला पाऊण तास पुरे. माचीपाड्यातल्या गावकऱ्यांचं आतिथ्य स्वीकारून गड चढायला लागायचं. माचीवर पोहोचल्यावर डौलदार, बहरलेलं शेत आपलं स्वागत करतं. संध्याकाळी ते पिवळं शेत सोनेरी दिसू लागतं. माचीच्या टोकाला गडाजवळ दुतर्फा घरं आहेत. लुसलुशीत कोकरांबरोबर फोटो काढून झाले की गड चढायचा. गडाला बऱ्यापैकी तटबंदी आहे. माचीपाड्याकडला बुरुज नाक्यासमोर ठेवून चढत राहायचा. अर्ध्या तासाने आपण एका टेपावर येऊन पोहोचतो. इथून बुरुजाकडे तुटलेल्या तटावरून गडावर प्रवेश करता येतो. अथवा बुरूज व गडमाथा उजव्या अंगाला ठेवून गडमाथ्याला वळसा घालून गडाच्या पश्चिमेकडून गडावर सोप्या वाटेने प्रवेश करायचा. खैराईचा गडमाथा छोटेखानीच आहे. पण मनाला प्रसन्न वाटतं. गडावर पाण्याची टाकी आहेत. त्यातलं पाणी पावसाळ्यात पिण्यास हरकत नाही. गडाच्या तटावरून गड-प्रदक्षिणा करता येते. गडावर उघड्या मंदिराकडे दोन लहान तोफा पडलेल्या आहेत. मावळतीच्या रंगात गड फारच सुंदर भासतो. मावळणाऱ्या सूर्याला दंडवत घालून अंधार पडण्यापूर्वी माचीपाडा गाठायचा. माचीपाड्यावरून सोप्या वाटेने आल्याप्रमाणे ठाणापाडा गाठायचं. स्वतःची गाडी सोबत असेल व चालणारे भिडू असतील तर एका दिवसात हे तिन्ही किल्ले पाहून मुक्कामाला त्र्यंबकेश्वर वा अंजनेरी गाठता येतं. वाघेरा घाटाच्या खालचा खैराई तांत्रिकदृष्ट्या नाशिक जिल्ह्यात असला तरी भौगोलिकदृष्ट्या तो ठाणे जिल्ह्यात वाटतो. नाशिक त्र्यंबकेश्वरच्या आसपासच्या या किल्ल्यांची सफर आपल्याला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाते. - मधुकर धुरी, युथ हॉस्टेल मालाड युनिट yhai_malad@rediffmail.com (साभार ः सकाळ)
स्वराज्यातील प्रत्येक किल्ल्याला इतिहासाच्या पराक्रमाची
झालर आहे, पैकी असे कित्येक किल्ले आहेत कि ज्यांची उंची कमी, उजाड मोकळ्या
डोंगर रांगांमध्ये एकच डोंगर रांग, ज्याला भौगोलिक क्षेत्र हि कमी पण
ज्यांची इतिहासात एक बलाढ्य किल्ला, ज्यांची इतिहासामध्ये सोनेरी पाने
लिहिली गेली अश्या किल्ल्यांपैकी नाशिक जवळील किल्ले रामसेज ची रक्तरंजित
कहाणीही तेवढीच रोमांचकारी आहे.
हा किल्ला जेवढा लहान तेवढाच त्याचा इतिहास महान आहे. संभाजी महाराजांच्या
कारकिर्दीत रामसेज हा असा एकमेव किल्ला होता ज्याने मोगलांशी जवळजवळ साडे
पाच वर्षे सतत झुंज दिली. मराठ्यांच्या या इतिहासाची नोंद आपल्याला
मोघलांच्या दप्तरी आपल्याला लिहलेली आढळते. तसेच ज्या पराक्रमी
किल्लेदाराने सतत साडे पाच वर्षे किल्ला लढवला त्याचे नाव इतिहासाला अज्ञात
आहे.
🛡🛡🛡🛡🛡🛡🛡🛡🛡🛡🛡
नाशिक पासून पेठ गावी जाणाऱ्या रोडवर आशेवाडी हे गाव 15 km
आहे, या गावात पोचल्यावर गावच्या डाव्या बाजूला अभेद्य किल्ल्याचे आपणास
दर्शन होते, व इतिहासामध्ये पराक्रम गाजवलेला हा किल्ला जणू आजही तेवढ्याच
हिम्मतीने, त्याच रगिने आजही आपणास स्फूर्ती, कठीण काळात योग्य लढा देऊन
जगण्याची प्रेरणा देतो.
गावामध्ये गाडी पार्क करून गडाच्या उजव्या बाजूने पायवाटेने जावे, थोडे
पुढे गेल्यावर आपल्याला गडाची माहिती देणारा फलक व सिमेंट मध्ये केलेला
रस्ता लागेल, या वाटेने पुढे गेल्यावर ज्या ठिकाणी सिमेंट चा रास्ता संपतो व
गडाची खडी चढाई सुरु होते, या ठिकाणी जांभ्या दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या
लागतील येतून अर्धा तासाच्या रस्ता चढाई करून गेलो कि आपण गुहेतील
शिवलिंगजवळ येऊन पोचतो. गडाच्या काळ्या कपारीमध्ये हि गुहा कोरली असून
आतमध्ये शिवलिंग व नंदी आहे, पावसाळ्यामध्ये यामध्ये पाणी असते. या गुहेचे
वैशिट्य म्हणजे याला वरती 2 फुटाचे भोक पाडले आहे जे कि गडावरील पाण्याचे
टाके भरले कि त्यातून बाहेर पडणारे पाणी या गुहेमध्ये पडते. वास्तविकता या
गुहेची व वरील दरवाजाची पाहणी केली असता हे भोक पहाणी करणेसाठी किंवा
गडावरील पाणी बाहेर काढणेसाठी असावे असे वाटते.
गुहेपासून वरती गेल्यावर आपण दुसऱ्या गुहेत येतो, इथे
गुहेमध्ये राममंदिर वसवले आहे, पूर्ण कातळात कोरलेले हि गुहा फक्त 4
खांबावर अधांतरीत आहे, या गुहेच्या खाली एक पाण्याचे टाके आहे ज्यातील पाणी
पिण्यायोग्य व थंडगार आहे.
येतून पुढे गेल्यावर आपण गडाच्या पहिल्या पठारावरती येतो, येतून डाव्या
बाजूला जाणार रस्ता मोकळ्या पाठरावरती जातो येथे पाण्याचे टाके पाहायला
मिळतील. परत आपण मुख्य ठिकाणी यायचं, याच्या समोर एक छोटेखानी दरवाजा आहे
जो खाली गुहेमध्ये जाण्यासाठी केला आहे. येतून गडाच्या मुख्य
बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी उजव्या रस्त्याने जावे, याच्या उजव्या बाजूला
तटबंदीमध्ये उत्कृष्ट असा दरवाजा कोरला आहे (हा गडाचा त्यावेळचा मुख्य
दरवाजा होता) , आजही याच्या बांधणीचे नेमकं कारण समजू शकत नाही, हे छोटे
खंदक नेमके कश्यासाठी बांधले कारण या खंदकातून खाली जाणार बोगदा गुहेमध्ये 2
फुटाचे भोक सर्व काही विचार करण्यासारखं बांधकाम आहे. येतून परत माघारी
येऊन आपण बालेकिल्ल्यावर जावे, जाताना उजव्या बाजूला एक तलाव, तर त्याचा
डाव्या बाजूला 5 पाण्याचे टाके आहेत, येतून वरती गेल्यावर आई भगवती चे
मंदिर आहे, आतमध्ये सुबक शास्त्र धारण भगवतीची मूर्ती आहे. या मंदिरापासून
वरती जात असताना उजव्या बाजूला पडक्या वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात.
येतून थोडे वर गेल्यावर डाव्या बाजूला 4 पाण्याचे टाके आहेत. आता आपण
गडाच्या मुख्य बालेकिल्ल्यावर जावे, या पठारावर मुख्य वाड्याचे पडलेले
अवशेष आढळतात. बांधकाम चुन्या मध्ये केलेले दिसून येते.
येतून गडाच्या पूर्वेकडील तटबंदीकडे जावे येते आपल्याला 5-6
पाण्याची टाके आढळतील व यातून पाणी बाहेर काढण्यासाठी रहाट सारखी व्यवस्था
केलेली दिसते, यातील एका टाक्यात पाण्यासाठी तयार केलेले दगडी भांडे आहे (
अशी दगडी भांडे कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले महिपालगडावर आढळतात)
बाकी गडावर या व्यतिरिक्त आता काही शिल्लक नाही. येतून आजुबाजूचा परिसर
न्याहाळायाचा व आपल्या बापजाद्यांनी मोघलांची कशी फजिती केली असेल याचा
विचार करत परतीच्या मार्गाला लागावे.
गडाच्या पूर्वेस किल्ले भोरगड चे दर्शन होते.
◆ इतिहास-
संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत औरंगजेब स्वराज्य बुडविण्यासाठी पूर्ण
ताकदीनिशी महाराष्ट्रात आला. नाशिक प्रांत व शहर मुगलांच्या ताब्यात होते.
अशावेळी नाशिक जवळील छोटासा गड घेण्यासाठी औरंगजेबने शहाबुद्दीन गाजीउद्दीन
फिरोजजंग याला ४० हजार सैन्य, तोफखाना यांच्यासह पाठविले. मोगलांनी गडाला
वेढा घातला तेव्हा गडावर ६०० च्या आसपास मावळे होते. मोगलांनी रामशेजवर
पहिला हल्ला चढवला आणि मोगल गडाला भिडले, त्याबरोबर गडावरील मावळ्यांनी
दगडांचा प्रचंड मारा केला ,त्यामुळे मोगलांना माघार घ्यावी लागली.
त्यानंतर शहाबुद्दीनने वेढा कडक करणे, सुरुंग लावणे, मोर्चे बांधणे, दमदमे
तयार करुन त्यावर तोफा चढवून हल्ला करणे असे अनेक उपाय केले, पण रामशेजच्या
अनुभवी किल्लेदाराने कौशल्याने आणि सावधगिरीने मोगलांचे सर्व मनसुबे उधळून
लावले. मग हट्टाला पेटलेल्या शहाबुद्दीनने लाकडी बुरुज उभारून त्यावर तोफा
चढवून किल्ल्यावर हल्ला करण्याची योजना आखली. त्यानुसार आजुबाजूची जंगल
तोडून लाकडे जमावण्यात आली. त्या लाकडांचा एक प्रचंड बुरूज बनविण्यात आला.
मोगलांनी त्यावरून गडावर मारा सुरू केला पण त्याचा फारसा परीणाम झाला नाही.
मे १६६२ मध्ये रामशेजचा वेढा फोडण्यासाठी संभाजी महाराजांनी रुपाजी भोसले व
मानाजी मोरे यांना ५ ते ७ हजार सैन्यानिशी पाठविले. शहाबुद्दीनने गडाजवळील
गणेश गावाजवळ मराठ्यांना रोखले. दोघांमध्ये तुंबळ युध्द झाले, त्यात
मोगलांनी माघार घेतली. मराठ्यांनी मोगलांचे ५०० घोडे पकडून नेले. या
विजयामुळे किल्ल्यावरील मावळ्यांमध्ये उत्साह संचारला. पण या पराजयामुळे
औरंगजेब संतापला. त्याने बहादूरखानाला रामशेजला जाण्याची आज्ञा दिली.
शहाबुद्दीनने वेढा कडक करून किल्ल्यावर परत हल्ला चढवला. त्याबरोबर गडावरील
मावळ्यांनी दगडांचा प्रचंड मारा केला .त्यात राजा दलपतराय दगडांच्या
मार्याने जखमी झाला ,त्यामुळे मोगलांना माघार घ्यावी लागली. सलग येणार्या
अपयशामुळे शहाबुद्दीन वेढा सोडून जुन्नरला गेला. आता वेढ्याची जबाबदारी
बहादूरखानावर आली. त्याने किल्ल्यावर हल्ला करण्याची दुसरी योजना आखली. या
योजने नुसार मोगलांच्या सैन्यातील एका गटाने तोफा, वाद्ये इत्यादी साहीत्य
घेऊन गडाखाली एका जागी जमाव करावा.त्यामुळे या बाजूने मोगलांचा हल्ला होईल
या कल्पनेने गडावरील मावळे त्या जागी जमतील. ही संधी साधून मोगलांच्या
दुसर्या गटाने विरुध्द बाजूने किल्ल्यावर हल्ला करावा. मराठ्यांना या
योजनेची आधीच कुणकुण लागली होती. त्यामुळे मराठ्यांनी दोनही बाजूंना सैन्य
विभागून मोगलांना सडकवून काढले आणि मोगलांच्या या योजनेवरही पाणी फिरवले.
किल्ला जिंकण्यासाठी बहादूरखान काहीही करायला तयार होता. सैन्यातील लोकांनी
एक तांत्रिक पकडून आणला. त्याने खानाला सांगितले मला १०० तोळे वजनाचा
सोन्याचा साप बनवून द्या. तो मंतरून मी हातात घेईन आणि मग कुठलीही अडचण न
येता मी तुमच्या सैन्याला किल्ल्याच्या प्रवेशव्दारा पर्यंत नेईन, मग विजय
आपलाच. खानाने त्याच्या म्हणण्या प्रमाणे केले. एके दिवशी तांत्रिकाला
आघाडीवर ठेऊन मोगल सेना गडाच्या रोखाने निघाली. ती माराच्या टप्प्यात येताच
मराठ्यांनी गडावरून गोफणीतून दगडफेक चालू केली.त्यातील एक दगड आघाडीवरच्या
तांत्रिकाच्या छातीवर इतक्या जोराने लागला की, त्याच्या हातातील सोन्याचा
साप उडाला आणि तांत्रिक खाली कोसळला. हे पाहून मोगल सैन्याचा धीर खचला व
त्यांनी माघार घेतली.
या पराभवाने औरंगजेब संतापला. त्याने बहादूरखानाला वेढा सोडून जाण्याची
आज्ञा दिली. या अपमानाने भडकलेल्या खानाने जातांना शहाबुद्दीनने उभारलेला
लाकडी बुरुज जाळून टाकला.
त्यानंतर औरंगजेबाने कासिमखान किरमाणी या सरदाराला रामशेजवर पाठवले, पण
त्यालाही गड घेता आला नाही. अशा प्रकारे एक छोटासा गड पासष्ट महिने लढवून
मराठे आणि त्यांचे किल्ले ही काय चीज आहे याची चुणूक मोगलांना दाखवली.
घनगडचा ‘लेटेस्ट’ ट्रेक करून वर्ष होत
आलं होतं पण ट्रेकला काही मुहूर्त सापडत नव्हता. त्यात टीममधला खंदा
मेंबर, प्रथमेश देशपांडे, नोकरीमुळे बंगलोरला शिफ्ट झाल्याने ट्रेक प्लान
होणंच थांबलं होतं. प्रथमेशचा व्हॉट्सअपवर मेसज आला की त्याला १३ - १९
ऑगस्ट (२०१९) तारखांना, मोठ्या सुट्टीमुळे सह्याद्रीतला ट्रेक करायला जमणार
आहे, पण त्या तारखांना मी आणि पंकज दोघेही वैयक्तिक कारणांमुळे अडकलो
असल्याने केवळ १४-१५ तारखेला ट्रेक करायचे ठरले आणि त्यानुसार तयारी सुरु
झाली. पण दोनच दिवस हातात असल्याने आणि त्याला पुन्हा बंगलोरला जायचे
असल्याने एका दिवसात होणारा किल्ला ‘शोधायला’ सुरुवात झाली. पंकजने रामसेज
किल्ला सुचवला. किल्ल्याची माहिती घेता, तो ‘बराच लहान’ असल्याचे जाणवले.
त्यामुळे त्याची थोडी टाळाटाळ झाली. पण आजूबाजूचे बरेचसे किल्ले आमच्या
तिकडीने आधीच ‘केले’ असल्यामुळे सरतेशेवटी ‘रामसेज’ फायनल झाला. पटकन
‘होणारा’ किल्ला असल्याने त्यासोबत आणखी एखादा किल्ला किंवा पर्यटनस्थळाला
भेट देऊया असे सर्वानुमते ठरले. किल्ला नाशिकमधला असल्याने नाशिकजवळची
‘पांडव लेणी’ पाहता येतील असं ठरलं. १४ ऑगस्ट (२०१९) रोजी रात्री निघून १५
तारखेला किल्ला ‘करायचं’ असा ‘नेहमीचा ठरलेला’ प्लान’ फायनल झाला.
त्यानुसार पंकजने पुढले सगळे प्लानिंग सांभाळले. ट्रेकसाठी पंकज, प्रथमेश,
मी, दिलीप तयार होतोच; त्यात प्रथमेशकडून प्रतिक सुर्वे आणि ओंकार तर
पंकजकडून पुनीत करमरकर आणि मयूर मुंडले ‘फिक्स’ झाले. प्रतिकने
‘झूमकार’वरून गाडी बुक केली.
ठरल्यानुसार १४ तारखेला रात्री ११
वाजता मला, व्हॉट्सअपवर ठरल्याप्रमाणे, तीन हातनाका येथे पोहोचायचे होते.
किल्ला बराच लहान असल्याचे कळल्यामुळे जरा जास्तच ‘कम्फर्टेबल’ होऊन मी
जास्त काही साहित्य माझ्या बॅगेत न भरता घरून वेळेत निघालो आणि वेळेत तीन
हात नाका येथे माझ्या (या रूटवरच्या ट्रेकसाठी दरवेळी) ‘फिक्स’ असलेल्या
जागी बरोबर ११ वाजता पोहोचून गाडीची वाट पाहू लागलो. प्रथमेश, प्रतिक,
पंकज, दिलीप आणि ओंकार हे बोरीवलीहून गाडी पकडणार होते तर मी, पुनीत आणि
मयूर ‘ठाण्या’ला भेटणार होतो. सहज ‘अपडेट’ म्हणून पंकजला कॉल केला आणि
‘स्टेट्स’ विचारलं. भाईलोकांनी ११ वाजता गाडी बोरीवलीहून सुरु केली होती.
‘नेहमीप्रमाणे’ तीन हात नाक्याला त्या बसस्टॉपवर मच्छरांचे चावे खात मी वाट
बघत बसलो; कारण हे दरवेळंच ठरलेलं होतं आणि मला त्याची सवयही झाली होती.
फक्त मला उशीर झाला तर ही मंडळी नेमकी लवकर पोहोचून वाट बघत बसलेली असतात
आणि मग शिव्या पडतात. अर्ध्या तासात पुनीतचा फोन आला. त्याने मला मी कुठे
बसलोय ते विचारलं. मी त्याला मी तीन हात नाका येथे असल्याचं सांगितलं;
“तू तिथे काय करतोयस??” त्याने प्रतीप्रश्न केला.
“तीन हात नाक्यालाच यायचंय ना?” मी विचारलं.
“नाही रे.. तीन हात नाक्याला कशाला
गेलास? आपण नाशिकला जातोय न?” त्याने विचारलं.. दोघांपैकी उत्तर कोणीही देत
नव्हतो.. फक्त प्रश्नांवर प्रतिप्रश्न सुरु होते..
“पंकजला विचारून थांबलोय इथे मी..
त्याला सांगितलं होतं ग्रुपवर..” पंकजच्या खांद्यावर ओझं टाकून मी हलकं
व्हायचा निष्फळ प्रयत्न केला.
“अरे हो.. असेल कदाचित.. पण नाशिकला
जायचंय तर तीन हात नाक्याच्या पुढे थांबायला हवंय ना आपण... माजिवडा
नाक्याला ये तू..” त्याने सांगितलं आणि फोन कट केला. माझं रोडच्या बाबतीत
हे नेहमीचं आहे. गुगुलला न सापडणाऱ्या गडांच्या आणि इतर ट्रेकच्या वाटा
एकवेळ शोधता येतील मला पण गुगल मॅपवर दिसूनसुद्धा मला रोडच्या बाबतीत खूप
गोंधळायला होतं. त्यांची गाडी लवकरच नाक्याला पोहोचणार होती त्यामुळे शेवटी
रिक्षा पकडून मी माजिवडा नाक्याला पोहोचलो. पुनीत आणि मयूर तिथे वाट बघत
होते. व्हॉट्सअप आणि मोबाईलमुळे अनोळखी व्यक्तींनाही अश्या ठिकाणी शोधून
भेटणं कठीण जात नाही. तिथे त्यांना भेटल्यावर ‘पंकज’चीच कशी मिस्टेक आहे
यावर थोडी चर्चा झाली; मग एकमेकांची चौकशी झाली, ओळख झाली. पंकजला ‘कुठे
पोहोचलात?’ साठी कॉल केला तेव्हा ‘जवळच आहोत, पोचतोय थोड्या वेळात..’ असा
पेटंट रिप्लाय मिळाला. त्यानुसार लकीली १० मिनिटांत गाडी नाक्याला हजर
झाली. गाडीत शिरून जागा करून स्थावर झाल्यावर आणि प्रथमेश, पंकज आणि
दिलीपसोबत ‘भरतभेटी’ सदृश्य एक प्रसंग घडवून आणल्यावर गाडीने पुढे प्रस्थान
केले.
गाडी आटगावमार्गे जाणार असल्याचे आधीच
माहित होते, त्यामुळे आटगाव स्टेशनबाहेर हायवेलगत असणाऱ्या ‘गुरु नानक’
धाब्यावर जेवण करण्याचा प्लान फिक्स होता. प्रथमेश आणि माझ्या आयुष्यात या
धाब्यावर अनेक आठवणी जोडल्या गेल्या असल्याने आणि इतर मित्रांना त्यांच्या
संमतीने किंवा जबरदस्तीने तिथे नेऊन जेवण करायला लावल्याने, हा धाबा म्हणजे
आमच्यासाठी एक ‘स्मृतीस्थान’ झाला आहे. या मार्गावर कोणताही ट्रेक किंवा
प्रवास असल्यावर ‘गुरु नानक’ धाब्यावरचे जेवण हा आमचा ‘नित्याचा कार्यक्रम’
असतो. (या धाब्याची माहिती घेण्यासाठी माझा २०१२ सालच्या ‘जीवधन नाणेघाट
ट्रेक’वरील लेख नक्की वाचा.) या धाब्यावर जाऊन, कधी नव्हे ते श्रावण
पाळल्याने, पहिल्यांदा शाकाहारी जेवणाची ऑर्डर देण्याचा प्रसंगही या
ट्रेकला अनुभवता आला. रोटी, पालक पनीर, पनीर मसाला, मटर मसाला, शेवभाजी हे
श्रावणी शाकाहारी पदार्थ मागवले. त्यावर ताव मारून झाल्यावर भात आणि
दालफ्रायची चवही घेतली. सगळं संपवल्यावर, या धाब्यावर कधीही मीस न केलेलं,
थंडगार छास पिऊन आम्ही धाब्याचा निरोप घेतला आणि पुढील प्रवासाला लागलो.
प्रतिक गाडी चालवत होता; त्याच्या
बाजूला सोबत द्यायला ओंकार, मागच्या रांगेत मयूर, पुनीत आणि दिलीप तर
शेवटच्या सीट्सवर पंकज, प्रथमेश आणि मी बसलो होतो. गाडी चालवणाऱ्यावर आणि
त्याच्या बाजूला बसलेल्या माणसावर, गाडी ‘इच्छितस्थळी सुरक्षित’ नेतील असा
विश्वास असेल तर ‘मागची’ मंडळी गाडीत छान झोपी जातात; हा अनुभव खोटा पडू
नये म्हणून आम्ही ‘मागची मंडळी’ मस्त झोपून गेलो होतो. साधारण सकाळी ५ च्या
सुमारास गाडी खडखडू लागली तेव्हा ‘काय कटकट आहे..’ अश्या स्वरुपात मी डोळे
किंचितसे उघडून आलबेल असल्याची खात्री करून कूस बदलून पुनःश्च झोपी गेलो.
त्यामुळे बाकीजण त्यावेळी काय करत होते ते कळून आलं नाही. सकाळी साधारणपणे ६
वाजता थोडी कुजबुज ऐकू आली तेव्हा तिसरी रांग सोडून बाकी सगळे गाडीबाहेर
पडून टाईमपास करत होते. १५ ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्यदिन; त्या निमित्ताने
जवळच्या गावातील अनेक मंडळी गडाकडे निघालेली दिसली. त्यामुळे ‘आपण सुद्धा
निघूया’ असं सर्वानुमते ठरलं. त्यानुसार सकाळचे सोपस्कार आवरून आम्ही
गडाकडे निघालो.
गडाच्या आग्नेयेला असलेल्या
वाहनतळापासून गडाच्या टेकडीच्या टोकावर कातळाचा ठोकळा ठेवावा असं वाटणारा
कडा समोर दिसतो. त्याला पाहून दुरून दिसणाऱ्या कोथळीगडाची आठवण होते.
त्याचबाजूने गडाला वळसा देत गडाची वाट सुरु होते. गडाच्या धारेवरची मूळ
पायवाट मोडून तिथे सिमेंटच्या पायऱ्या बनवल्याने लोकांना सोयीचे पडते असा
गैरसमज जनमानसात पसरलेला आहे; त्याला हा गडसुद्धा बळी पडलेला दिसतो.
अलीकडेच बांधलेल्या पण बरीच पडझड झालेल्या पायऱ्या गडाच्या सुरुवातीला आपलं
स्वागत करतात. त्यावरून किल्ला चढायला सुरुवात केली. ऐन पावसाळ्यात गेलो
असल्याने वातावरण खूप सुंदर होतं. नाशिक शहर तसं पाहता एक पठारच आहे.. काही
टेकड्या अधेमधे डोकावताना दिसतात. गडावर जाताना उजवीकडची टेकडी साथ देत
राहते. पावसाळ्यात काही टप्पे सोडता संपूर्ण वाट अतिशय सोपी आहे. अगदी
अर्ध्या तासात आपण गडाच्या पदरात असलेल्या राम मंदिरापर्यंत पोहोचतो.
मंदिराच्या अगदी अलीकडेच तटबंदीखाली एक गुहा दिसून येते. तिथे
पोहोचण्यासाठी मात्र थोडा कठीण टप्पा चढून जावं लागतं. १० बाय १० फुटांच्या
आसपास असणाऱ्या या गुहेत साधारणपणे मध्यभागी एक शिवलिंग आणि समोर नंदी
दिसून येतो. शिवलिंगाच्या बरोबर वर, छताला लहानसे भगदाड दिसून येते.
पावसाळ्यात तिथून पडणाऱ्या पाण्याने शिवलिंगावर वर्षाव होताना दिसत होता.
गुहा पाहून झाल्यावर, उतरताना
राममंदिर पाहू असे ठरवून आम्ही गडाच्या माथ्याशी आलो. इथे कमान ढासळलेले
प्रवेशद्वार दिसून येते. प्रवेश केल्यावर अगदी समोर एक द्वार दिसते. या
द्वाराने एक टप्पा उतरून डावीकडे गेल्यावर समोर गडाच्या दक्षिण कड्यात
खोदलेलं आणि अश्या ठिकाणी अजिबात अपेक्षित नसलेलं अत्यंत मोठे खांबटाकं
दिसून येतं. खांबटाक्याच्या डाव्याबाजूसदेखील आत असलेला एक कप्पा दिसून
येतो, त्यावरून ते बरंच मोठं असल्याची कल्पना येते. पंकजने ह्याला ‘कोरीव
टाके’ म्हणतात असं आम्हाला सांगितलं.
खांबटाकं पाहून आम्ही गडाच्या आग्नेय
दिशेला असलेल्या सोंडेकडे निघालो. सोंडेच्या टोकाकडे पाण्याची दोन तीन टाकी
दिसून येतात. सगळ्या टाक्यांच्या कडांवर चौकोनी खड्डे खणलेले दिसून येतात.
त्यांचे नक्की प्रयोजन कळून येत नाही पण त्यात बांबू किंवा वासे टाकून
टाक्यावर छत केले जात असावे.
या भागात गावकऱ्यांनी नव्याने एक
भलामोठा ध्वजस्तंभ उभारला आहे. आम्ही येथे पोहोचलो तेव्हा आसपासच्या
गावांतून आलेली अनेक तरुण मुले आणि मंडळी स्वातंत्र्यदिनानिमित्त
ध्वजारोहणासाठी जमले होते. त्यांचा तो उत्साह पाहून खूप बरं वाटलं. आम्ही
तिथे पोहोचलो आणि झेंड्याला वंदन करण्यासाठी थांबलो. अधूनमधून पावसाच्या
सरी येत-जात होत्या. तो ध्वजस्तंभच जवळपास ३५-४० फुट उंच होता. त्यावर
त्याच्याच तोडीचा झेंडा गुंडाळून ठेवला होता. राष्ट्रगीत झाल्यावर
ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला आणि तिरंगा हवेत फडकू लागला. जवळपास २५ बाय १५
फुटाचा वजनी भिजलेला झेंडा त्या स्तंभावर फडकत होता म्हणजे गडावर किती
वारा वाहत असेल याचा अंदाज तुम्ही लावू शकता.
ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडल्यावर
आम्ही गडाच्या उत्तर दिशेकडे निघालो; त्यासाठी पुन्हा खांबटाक्याच्या
ठिकाणी पोहोचलो. उत्तरेच्या टेकडीच्या उजवीकडे गडाच्या आतल्या बाजूस कातळात
कोरलेला एक उत्तम बांधणीचा दरवाजा दिसून येतो. तटबंदीच्या आत लपवलेल्या या
दरवाज्यात चोरवाटेसारखा एक भाग दिसतो, तिथे उतरल्यावर त्याला दुसरे टोक
नसल्याचे कळून येते; म्हणजे दुसऱ्या टोकाशी खोदकाम अपूर्ण ठेवल्याचे कळते.
मात्र संपूर्ण खाली उतरल्यावर टोकाशी
एक भगदाड दिसून येते, ज्यातून खाली पाहिल्यावर आधी उल्लेख केलेल्या गुहेतील
शिवलिंग दिसून येते. म्हणजेच हा चोर दरवाजा जर संपूर्ण खोदला गेला असता तर
त्याचे दुसरे टोक त्या गुहेत उघडले असते, अशी त्याची रचना आहे. मात्र या
सगळ्या खटाटोपाचे प्रयोजन कळून येत नाही.
दरवाजा पाहून झाल्यावर आम्ही पुन्हा
मागे येऊन टेकडीच्या डावीकडे निघालो. या बाजुने टेकडीवर जाता येते. टेकडीवर
जाताना बांध घालून अडवलेल्या पाण्याचा तलाव दिसून आला. पंकजने त्याला
‘बांधीव’ तलाव म्हणतात असं आम्हाला सांगितलं. त्यापुढे पाण्याच्या
टाक्यांच्या समूह दिसतो. गडाचा आकार पाहता गडावर पाण्याची मुबलकता खूप
राखली असल्याचे जाणवते. टेकडीच्या साधारणपणे मध्यावर भगवती मातेचे देऊळ
आहे. ज्याचे नव्याने झालेले बांधकामही मोडकळीस आलेले दिसले. मात्र आत मुख्य
देवळात स्थापन केलेली देवी भगवती म्हणजेच श्री महिषासुरमर्दिनीची चतुर्भुज
मूर्ती मात्र खूप सुरेख आहे.
यापुढे टेकडीच्या माथ्याला जात असताना
आणखी काही पाण्याची ‘खोदीव’ टाकी दिसून येतात. सर्वोच्च माथ्यावर
वाड्यांच्या बांधकामाचे भग्न अवशेष दिसतात. गडाच्या वायव्य दिशेला
‘देहेरगड’ दिसून येतो तर दक्षिणेला नाशिक शहराचा सुंदर नजारा दिसून येतो.
पावसाळ्यात गडावर खूप आल्हाददायक वातावरण असते. त्यामुळे गडाच्या वायव्य
कड्यावर बसून आम्ही बराचवेळ ‘टीपी’ केला. गडावर पश्चिम दिशेला आणखी एक
दरवाजा असल्याचे वाचले होते; ते ‘शोधण्यासाठी’ निघालो.
टेकडीचा बराचसा भाग उतरून खाली
आल्यावर गडाच्या दक्षिण सोंडेच्या उंचीच्या पातळीला पश्चिम भागात अजीबात
दिसून येणार नाही अश्या रीतीने हा दरवाजा तयार केला आहे. त्याचा आकार पाहता
हा चोर दरवाजा असल्याचे कळते. अगदी शिताफीने लपवलेले हे द्वार गडाच्या एका
घळीच्या तोंडाशी उघडते. आणीबाणीच्या प्रसंगी या घळीतून पलायन करण्यासाठी
ह्या दरवाज्याची रचना केल्याचे दिसून येते. रामसेज किल्ल्याच्या भेटीत
चुकवू नये असे हे स्थान आहे. कड्याला चिटकून असलेल्या ह्या दरवाज्याच्या
बोळातून कड्याला आपटून येणाऱ्या वाऱ्याचा झोत अंगावर घेण्याची मजा घेत इथे
बराच वेळ काढला. पंकजने इथे त्याच्या मोबाईलवर विडीयो काढून घेतला. आणि
थोडी मजा म्हणून या स्थानाबद्दल प्रत्येकाचे मत त्याने त्या विडीयोमध्ये
बंदिस्त केले. बराचवेळ गेल्याने आम्ही घड्याळ पाहिले तर केवळ पावणे दहा
वाजले होते. आम्ही सकाळी ७ वाजता ट्रेक सुरु करून फक्त तीन तासांत संपूर्ण
किल्ला चढून आणि आरामात बघून झाला होता. किल्ला लहानसा वाटला तरी
किल्ल्यावर पाहण्यासारखे खूप काही आहे, फक्त तुम्हाला ती ‘नजर’ पाहिजे.
किल्ला उतरताना, ठरल्याप्रमाणे, वाटेतल्या राम मंदिराला भेट दिली.
मंदिराखाली सुद्धा पाण्याची टाकी असल्याचे दिसले आणि या टाक्या कदाचित वर
दिसलेल्या खांब टाक्याचाच एक भाग असावा असे वाटले. मंदिरामध्ये चौथऱ्यावर
प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती आहेत. उजव्या भागात एक
कोनाडा आहे; जिथे आता एक साधू वास्तव्यास आहेत.
किल्ला उतरून खाली आलो तोच गाडीजवळ
दोन लहान मुले आणि एक मोठा मुलगा उभे होते. गाडीच्या पार्किंगसाठी ते पैसे
मागत होते. लहान मुले जरी मराठी वाटत असली तरी तो मुलगा मराठी दिसत नव्हता.
त्याला ‘प्रॉपर रिसीट’ मिळेल का विचारलं. तो एक चिटोरा घेऊन आला. दुसऱ्या
कोणत्या तरी पार्किग एरियाच्या रिसीटची ती झेरॉक्स कॉपी होती. थोडी डिबेट
केली त्याच्यासोबत झेरॉक्स कॉपीवरून.. पण पार्किंग एरिया चांगला ठेवला
असल्याने, पुढल्या वेळेला सगळ्यांना ‘पक्की रिसीट’ द्यायला सांगून आम्ही
त्याला तीस रुपये देऊन टाकले आणि तिथून निघालो.
निघे निघेपर्यंत दुपारचे ११ वाजत
आल्याने आता एखादे हॉटेल गाठून जेवण करून घ्यायचे ठरले. नाशिकमध्ये पुनीतने
‘चुलीवरची मिसळ’ खाल्ली होती; त्याने आपण सगळे तिथे जाऊया असे सांगितले.
‘चुलीवरची मिसळ’ आमच्यातील अनेक जणांनी खाल्ली नसल्याने तो प्लान फिक्स
झाला आणि गाडी तिथे वळली. रामसेज पासून २० किमी तर नाशिक शहरापासून १०
किमीवर सातपूर येथे ‘राजेशाही साधना रेस्टॉरंट’ आहे. एखादे लहानसे रिसॉर्ट
वाटावे अश्या थाटात बांधलेलं हे हॉटेल एक प्रेक्षणीय स्थळ नक्कीच आहे. १५
ऑगस्ट - स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सफेद ड्रेस घातलेले अनेक लोक इथे
दिसत होते. बहुतेक वेगवेगळ्या ठिकाणी झेंडावंदन करून ही मंडळी जेवणासाठी
इथे आली होती.
आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा बरीच गर्दी
दिसून येत होती. आठ जणांसाठी चांगली जागा पाहून आम्ही खुर्च्या अडवल्या.
खरंतर त्या खुर्च्या नव्हत्या; त्या सुंदर बांधलेल्या खाटा होत्या, ज्यावर
दोन तीन माणसांसाठी बसण्याची चांगली सोय होती. आम्ही आठही जण दोन-दोन
जणांच्या गटाने एकमेकांसमोर जाऊन बसलो. पुनीत, ओंकार, मयूर आणि प्रतिक एका
बाजूला आणि मी, प्रथमेश, पंकज आणि दिलीप एका बाजूला असे दोन गट तयार झाले.
‘कॅप्टन’ ऑर्डर घेण्यासाठी आला, तेव्हा कळलं की चुलीवरच्या मिसळीसोबत पाव
आणि ज्वारीची भाकरी असे दोन ऑप्शन आहेत. आमच्या गटाने ज्वारीची भाकरी तर
दुसऱ्या गटाने पाव मागवले. सोबत ताक आणि जिलेबी मागवली. . गर्दी असल्यामुळे
जेवण यायला थोडा उशीर झाला. तोवर आम्ही हॉटेलविषयी ‘मस्त बांधलंय..’,
‘अश्या ठिकाणी जेवायला मजा येते..’, ‘कसले पैसे छापत असेल हा..’ इत्यादी
आणि इतर विषयांवर चर्चा केली. भरपूर गरममसाला टाकलेली मिसळ उत्तम रित्या
समोर सादर झाली आणि आम्ही ताव मारायला सुरवात केली. मिसळ छान होती, पण
ज्वारीच्या भाकरीची साईज बरीच मोठी असल्याने ती काही संपेना. अधूनमधून ताक
पीत आणि जिलेबी खात, टेस्ट चेंज करून भाकरी ढकलत होतो. पॉज घेत घेत जेवत
होतो. शेवटचा चौथ उरला आणि जेवण चांगलं असलं तरीही असह्य झालं. दिलीपने
वरून पाव मागवले होते; त्याला ते जास्त झाले होते. मला पाव खूप आवडतात
म्हणून एक्स्चेंज म्हणून मी त्याला मिसळ दिली आणि पाव मी घेतले. वरून ताक
पिऊन सगळं जेवण पोटात मस्त बसवून टाकलं. जिलेबीचे शेवटचे तुकडे खाऊन आम्ही
उठलो. हॉटेलच्या प्रांगणात येऊन थोडे बसलो तर समोर ‘चुलीवरचं आईसक्रिम’चा
बोर्ड दिसला. आम्ही एकमेकांकडे पाहिलं. सगळे तुडुंब जेवले होते. पण ‘टेस्ट
तर करून बघूया..’ म्हणून आईसक्रिम ऑर्डर केल्या. दोन आईसक्रिम चौघांनी
वाटून खाल्ल्या. आईसक्रिम सुद्धा खूप छान होतं. त्यामुळे आणखी एक आणखी एक
करत प्रत्येकाने जवळपास अख्खं अख्खं आईसक्रिम रिचवलं. आता पोट शांत झालं
होतं. दीड वाजत आला होता म्हणून पुढे निघायचं ठरवलं आणि गाडी सुरु केली आणि
निघालो आमच्या पुढल्या पडावाकडे म्हणजेच ‘पांडवलेण्यां’कडे.
नाशिकपासून साधारणपणे १० किमीवर
पांडवलेणी आहेत. ह्या लेण्यांची निर्मिती अंदाजे इसवीसन दुसऱ्या शतकात
झाल्याचे कळते. नाशिकहून घोटीला जाणाऱ्या एका डोंगरामध्ये ही लेणी कोरलेली
आढळतात. या रस्त्यावरून जाताना अनेक जणांनी त्या पाहिल्या असतील पण बऱ्याच
जणांना ते ठिकाण नक्की काय आहे ते माहीत नसेल. लेण्यांच्या पायथ्याला
असलेल्या वाहनतळापाशी पोहोचून आम्ही गाडी पार्क केली; आणि पायी लेणी
पाहायला निघालो. दुपारचे २ वाजले असल्याने सूर्य डोक्यावर होता. लेण्याच्या
टेकडीचा कातळ तापल्यामुळे वातावरण गरम होते. त्यात पायथ्याशी उंच झाडे
असल्याने हवा कमी होती आणि त्यामुळे उकाडा जास्त जाणवत होता.
लेण्यांपर्यंत पोहोचायला साधारणपणे
२०-२५ मिनिटे लागतात. सुट्टी असल्यामुळे इथेही बरीच गर्दी होती. लेण्याच्या
पायऱ्यांच्या अरुंद भागात एक तृतीयपंथी वाट अडवून सगळ्यांकडून पैसे मागत
होता. सगळ्यांना अडवून अडवून त्याची दमदाटी सुरु होती. जोडप्यांना त्याचा
त्रास जास्त होत होता. आमच्या पुढेच असलेल्या एका जोडप्यातील पुरुषाने
त्याच्याशी भांडण सुरु केले आणि त्याने जबरदस्तीने पैसे मागू नयेत असे
बजावले. पण तो तृतीयपंथी त्याला शिवीगाळ करू लागला. आम्ही तेवढीच वेळ साधून
त्याला कटवून वर पोहोचलो. प्रवेशशुल्काचे पैसे भरून आम्ही आत शिरलो. लेणी
माणसांनी भरून गेली होती. जिथे पाहावं तिथे माणसंच माणसं होती. मी पैजेवर
सांगू शकतो की त्यातील ६०-७० टक्के लोकांना तर लेणी म्हणजे काय हे देखील
माहित नसेल; पण फक्त प्रेक्षणीय स्थळ आहे आणि ‘रिचेबल’ आहे म्हणून ते लोक
तिथे आले होते. लेण्यांच्या दरवाज्यांवर, स्तंभांवर, बुद्धांच्या
मूर्तीसोबत थोडक्यात सांगायचं तर शक्य होईल तिथे तिथे गॉगल लावून
‘स्टायलीत’ उभे राहून पोज देणाऱ्यांची आणि वाकडे तिकडे होऊन फोटो काढणाऱ्या
फोटोग्राफर लोकांची तोबा गर्दी तिथे होती. खरंतर एवढी गर्दी पाहूनच माझा
‘मूड’ निघून गेला. पण तरीही २४ पैकी बऱ्याच लेण्यांना भेट देऊन त्या
पाहण्यात मी यशस्वी झालो. आमच्या ग्रुपमधली बाकी मंडळी कुठे काय बघत होती
तेच माहित पडत नव्हतं. कोणी काय पाहिलं काहीच कळत नव्हतं. पंकज समेळच्या
संगतीत राहून लेण्यांची थोडीफार ओळख झाली असल्याने मला लेणी खूप आवडली. पण
ती ‘नीट’ पहायची असतील तर ‘पंकज समेळ’ सारखं कोणीतरी सोबत हवं असं खूप
वाटलं. तेवढ्यात पंकजचा कॉल आला आणि ‘आम्ही लेण्याच्या गेटवर तुझी वाट
पाहतोय.. लवकर ये’.. असा निरोप मिळाला. माझी लेणी पाहून झाली होती,
त्यामुळे मी गेटकडे निघालो. वाटेत ग्रुपमधले एक-दोन ‘बीछडे हुए साथी’
भेटले. पुन्हा पायथ्याशी येऊन परतीच्या मार्गाला लागलो.
संध्याकाळचे पाच वाजून गेले होते.
संपूर्ण ट्रेक आणि स्थलदर्शन अगदी आरामात झाल्याने सगळे थोडे सुस्तावले
होते. थोडं फ्रेश वाटावं म्हणून चहा-कॉफी घेण्यासाठी आम्ही एका हॉटेलपाशी
थांबलो. हॉटेलमध्ये शिरल्या शिरल्या फ्रेश पावभाजीच्या वासाने भूक चाळवली;
‘आत्ताच थोड्या वेळापूर्वी’ जेवलो असल्याने आता काही नको म्हणून बाकी
लोकांनी काही मागवलं नाही. पण मी ‘थोडसं काहीतरी खाऊ’ म्हणून चीज मसाला
डोसा मागवला. बराच वेळ गेला आणि मग तो डोसा आला. इतरांनी तो थोडा थोडा
चाखला. ‘चांगला आहे रे..’ असं म्हणत मग सगळ्यांसाठीच पेपर डोसा मागवला.
पेपरडोश्याची ती तोफ घेऊन आल्यावर आम्ही त्यावर थोडी मस्करी केली. ‘बहुतेक
अनाडी दिसतायत’ असं वाटून वेटरने ‘वो पेपर डोसा ऐसेही रेहता है..’ असं
सांगून एक्झिट घेतली. सगळ्यांनी कोचून कोचून त्या पेपर डोश्याचाही फडशा
पडला. त्यानंतर कॉफी पिऊन आम्ही देखील त्या हॉटेलमधून एक्झिट घेतली आणि
ट्रेकच्या सगळ्या सुखद आठवणी गाठीशी बांधून मुंबईच्या दिशेने कूच केले.
थोडक्यात:
रामसेज - पांडवलेणी (रामसेज, नाशिक)
उंची: रामसेज - ३२०० फुट । श्रेणी: सोपी - २ । भ्रमंती: उत्कृष्ठ । ऋतू: सर्व
नाशिक ते रामसेज (१७ किमी) - गाडी - ४५ मिनिटे
पायथा ते रामसेज किल्ला - ट्रेक - पाऊण तास
रामसेज ते पांडवलेणी (३० किमी) - गाडी - एक तास
पायथा ते पांडवलेणी - ट्रेक - अर्धा तास
(वरील वेळा ह्या, नियमित ट्रेकर्सचा आरामात उतरण्याचा वेग दर्शवितात. चढाईला वेळ जास्त लागू शकतो.)
रामशेज the miracle.
रामशेज किल्ला
“ खान मियाँ आपसे एक चीझ बोलनी थी, म्हणजे गुस्ताखी माफ करा पण राहावलं
नाही म्हणून आपल्यासमोर बोलण्याचा गुन्हा करतोय”, एक सरदार आपले हात जोडून
भीत भीत शहाबुद्दीनखाना समोर उभा राहिला.
“ क्या हुवा, आज इतनी हिम्मत की हमे सीख देने की जरूरत कर रहे हो तुम?”,
खानाने आपले डोळे मोठे करून त्याच्या कडे नजर फेकली आणि आपल्या छावणीत
हुक्क्यावर ताव मारायला सुरुवात केली.
“ हुजूर हा किला आपल्याकडून पडणार नाही ऐसा मुझे लगता हैं, हुजूर नाराज मत
होना लेकिन, किलेकी दिवारे बुलंद हैं और उपर जाने मैं बहोत दिक्कत हो रहीं
हैं हमारे फौज को. मैं पुरा किला बघून आलो खालून, वर चढायला जागाच नाही और
सब जगाह हलकी मिट्टी हैं कहीं भी उपर तक झाडी नहीं जहाँ से जाना मुंकीन
हैं, मुझे लगता हैं आप ये मसला छोड दो क्यूनकी किलेकी उंचाई बहोंत कम हैं,
तोह ते मराठे आरामसे मारू शकतात आपल्याला वर जाऊ तसे.” सरदार ने मुह तो
खोला मगर शहाबुद्दीन खान चवताळला आणि त्याने त्याला कैद करण्याचा हुकूम
दिला.
बाहेर येऊन त्याने किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वेढ्याकडे आणि वर
किल्ल्याकडे नजर केली तशी वरची माणसं आपल्याकडे पाहून खिदी खिदी हसतायत की
काय असा भास त्याला झाला.
त्याने सरदाराचं बोलणं मनावर घेतले नाही आणि रामशेज चक्क 6 वर्ष(1682 ते 1689)लढला.
हा सगळा प्रकार मी जेव्हा रामशेज च्या तटबंदीवरुन चालत होतो तेव्हा मला
जाणवला की खरच असंच काहीसं झालं असेल या किल्ल्यावर. उंची इतकी कमी की कोण
कुठून येतंय हे गरुड नजरेने टिपता येतंय तर मग कसली भीती मराठ्यांना. वेचून
वेचून मारत असतील मुघलांना. बरं जंगल ही नाहीच केवळ पूर्ण उंचीच्या25% च
गवत बाकी पूर्ण उघडा त्यामुळे चारही बाजूने स्पष्ट सगळं मला दिसत होतं.
वर 600 मावळे होते असा उल्लेख इतिहासात आहे. कमाल वाटते मला त्या
मावळ्यांनी6 वर्षे कसा लढवला असेल हा किल्ला? वर जागाही अमाप नाहीच की घरं
बांधून राहता येईल, ती शक्यताच नाही, त्यामुळे तंबू ठोकून राहणे हा पर्याय
असावा असं मला वाटतं.
एकंदरच रामशेज हा किल्ला मूर्ती लहान पण कीर्ती महान या म्हणीत चपखल
बसण्यासारखा आहे. वर बांधकाम खूपच थोडं आहे, पायऱ्या आता बांधल्या आहेत.
रामाचं सुबक आणि मधुर जलाच्या म्हणजे टाक्याच्या वर छान मंदिर आहे. वर गेलं
की उजव्या हाताला बांधीव दरवाजा आहे त्याच्या पुढेही पायऱ्या आहेत पण तो
का बांधला असावा आणि त्यामागचा उद्देश हा इतिहास आपल्या पोटात घेऊन
विसावलाय त्यामुळे त्याचा उलगडा होत नाही. त्याच पायऱ्या साधारण 10 फुटांवर
संपतात तिथे परत खडक आहे म्हणजेच खाली उतरायला नो entry मग तिथे पायऱ्या
का बांधला परत तोच प्रश्न? आणि त्यात त्या खडकाला एक छोटं छेद आहे त्याचा
उलगडा तर होतच नाही त्यामुळे ते बघून किल्ल्याला चक्कर मारावी आणि परत
उतरावं. गावाकडच्या टोकाला एक खोदीव खड्डा दिसतो आणि त्याच्या सर्व बाजूंनी
बांबू रोवता येतील असे बारीक खड्डे दिसतात त्यावरून तंबू कसे ठोकले जायचे
ह्याचा थोडा विचार करता येऊ शकतो. असेच खड्डे काही ठिकाणी अजून आहेत.
तर असा हा रामशेज पहावा आणि 10 मिनीटात पायऱ्यांनी खाली उतरावं. येताना
रामाच्या मंदिरातील पाणी प्यावं तृप्त व्हावं आणि बाटलीत भरून घरी घेऊन
यावं. लोकांची अशी श्रद्धा आहे की ते पाणी इतकं शुद्ध आहे की लोकं ते पाणी
घरी आणून त्याने घरच्या देवांना अंघोळ घातली जाते. मी पाणी प्यायलं आहे खरच
आजच्या काळात शुद्धता काय हे त्याने समजलं.
तर असा हा अभेद्य रामशेज पाहायला नक्की सर्वांनी एकदा तरी जावंच.
चढायला लागणारा वेळ – 20 मिनटं
मुंबई-ठाणे येथून जाण्यासाठी नाशिक मार्गे त्रंबकेश्वर रस्त्यावर 12 किमी
वर रामशेज गाव आहे. गावात श्री हनुमानाचे सुबक आणि मोठे मांदिर आहे.
पुण्याहून सुद्धा नाशिक मार्गे रामशेज ला जात येते.
खालच्या गावात जेवणाची सोय होते.
अतिशय छोटा पण किर्तीने मोठा असलेला आणि इतिहासात आपली विशिष्ट ओळख असलेला हा रामशेज एकदा तरी पहावा.
पेठ
पासून अर्ध्या तासाच्या अंतरावर आशेवाडी नावाचे गाव आहे. ते रामशेज
किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले गाव.आशेवाडी गावाच्या फाट्यावर उतरून ५
मिनिटात आशेवाडी गावात पोचले, की रामशेज किल्ल्यावर चढाई करता येते.
गावातून दृष्टीक्षेपात असलेल्या गडावर पोचण्यासाठी एक तास पुरतो.
आशेवाडी गावातून दिसणारा रामशेज किल्ला.
गावात असलेल्या दुकानांमधून टाईम पास पोटोबा करून किल्ल्याच्या दिशेने
वाटचाल चालू होते. गावाबाहेर पडताच आजूबाजूचा मोकळा निसर्ग मी-मी म्हणू
लागतो. आजूबाजूला चालू असलेले खाणकाम दुर्लक्ष करण्यास भाग पाडतो. मोरांचा
आवाज ऐकत त्यांना लोकेट करत करत आपण अर्धा किल्ला चढलेला असतो.
गावाबाहेर पडताना किल्ल्याच्या मुख्य कड्याचे दर्शन होते. किल्ला डावीकडे
ठेवत वाटचाल करत सुमारे दहा मिनिटात किल्ल्यावरील मंदिर व गुहा दृष्टीपथात
येते आणि वाटेचे कन्फर्मेशन देते. या वाटेने थोडे पुढे गेल्यावर पाय-या
लागतात.
किल्ल्याची उंची पाहता खरेच हा किल्ला पासष्ठ महिने कसा काय लढवला असेल
असे वाटून जाते. मुघलांनी किल्ल्याच्या उंचीचे लाकडी मचाण बांधून त्यावरून
तोफमारा चालवला होता हे खरेच वाटायला लागते. कुठे मचाण बांधली असेल?
किल्ल्यावरून त्या मचाणावर दगडफेक करून त्या कश्या उधवस्त केल्या जात
असतील? या विचारातच आपण रामाच्या मंदिरापर्यंत पोहोचतो.
आता इतिहासातून बाहेर येऊन आजूबाजूला मान वळवली की, आपली चढाई आपोआप
थांबते. आपल्या मनात ऐतिहासिक द्वंद्व चालू असताना इथे तर निसर्गाचा
निसर्गासाठीचाच अद्वितीय सोहळाच चालू असतो. आकाशभर काळ्या ढगांनी ढकलाढकली
चालू केलेली असते. एका उंच टेकाडाशी रिंगण करून फेर धरल्यासारखा भास होत
असतो. सूर्यनारायणांचे लक्ष असतेच त्यामुळे या रिंगणाला सोनेरी किनार
लाभते. टेकाडा-पलीकडून उंची घेतलेला वारा आता आपल्यापर्यंत येऊन ढगातील
चोरून आणलेल्या दवाने आपले पापणीचे केसही भिजवतो.
Felicitation by Nature to Nature !
घड्याळाकडे लक्ष जाते आणी आपण कल्पनेतून वर्तमानात येतो. पायऱ्या चढून
भल्यामोठ्या चाफ्याचा झाडापाशी आलो की चाफ्याच्या वासाने मंदिरात शिरताना
आपले मनही शुचिर्भूत झाल्यासारखे वाटते.
गडावर शिरताना वाटेत एक गुहा दिसते. त्या गुहेत रामाचे मंदिर आहे.
गुहेच्या एका बाजूला शिलालेख कोरलेला आहे. गुहेच्या खालच्या बाजूला
पाण्याचे एक बारमाही टाके आहे. त्यामुळे गुहेत एकदम गारेगार वातावरण असते.
पुजारी काकांशी थोड्या गप्पा टप्पा झाल्यावर त्यांनी गुहेखाली असलेल्या
पाण्याच्या टाकीत उतरायची वाटही दाखवली. वर्षातून एकदा पावसाळ्याच्या
आधी गावातून वीज पंप येथे आणून या टाकीतील सगळे पाणी काढून साफ सफाई ते
करतात. बारमाही जिवंत झरा असल्याने दोन दिवसात परत टाकी भरून जाते आणि
अतिरिक्त पाणी खालूनच वाहून झाडांना जाते.
राम मंदिर व प्रशस्त गुहा.
गुहे समोरच्या तुटलेल्या पाय-या थेट गडावर जातात. त्यावरून पुढे
गेल्यानंतर आपण गडाच्या दोन्ही टोकांमधील भागात पोचतो. येथूनच थोडे
खाली बुजलेल्या अवस्थेतील गुप्त दरवाजा आहे. या वाटेने आपण अर्ध्या तासात
आशेवाडीत पोहोचतो. येथूनच समोरचा देहेरगड व भोरगड किल्ला दिसतो.
सद्यस्थितीत तेथे मिलिटरी बेस असल्याने तेथे जाण्यास परवानगी घ्यावी लागते.
गुप्त दरवाजापासून वर जाणारी वाट रामशेजच्या दुस-या टोकाकडे जाते तेथून
देहेर व आजूबाजूच्या परिसराचे मस्त दर्शन होते. तेथून फिरून आल्यावर परत
पायऱ्यांच्या सुरवातीला आल्यास तेथून एक वाट खाली जाते. तेथे किल्ल्याच्या
अभेद्य दरवाज्याचे दर्शन होते. येथून खाली गुहे सदृश्य जाणारी वाट ही राम
मंदिराच्या बाजूस असलेल्या गुहेत निघते.
येथून बाहेर येऊन थोडे डावीकडे पठार लागते. येथे छोटी तळी आणि असंख्य मासे.
गार पाण्यात पाय सोडून तळव्यांना थंडक द्यायची आणि थोडा पोटोबा करून
घायचा.
येथून पुढे मोकळ्याढाक पठारावर थोडी वामकुक्षी घेतानाच वर नजर जाताच समजते
कि, किल्ल्यावर आपल्याखेरीज अजून कोण तरी आहे आणि आपल्यावर लक्ष ठेऊन आहे.
ब्राम्हणी घार आपल्या जोडीला असतेच. दोन तीन पंख मारून मग खूप वेळ निवांत
उडत असलेली घार आणि उतारावर गाडी बंद करून फुकट जाणारा मी या दोघात का
कुणास ठाऊक साम्य वाटून जाते.
आता उन्हे सरली आणि पाय परतीच्या वाटेला लागले. जाताना वाटेतच चामरलेणी
आहेत त्याही करायच्या होत्या. किल्ला उतरून आल्यावर रस्त्यावरच यष्टीची वाट
बघत ठाण मांडली. सुमारे पंधरा मिनिटात यष्टी आली आणि दहा रुपयात चामरलेणी
फाटा.
रामसेज, वाघेरा, खैराई
नाशिक पेठ रस्त्यावरच्या जकात नाक्यापुढे आशेवाडी गाव आहे.
आतिथ्यशील गावकऱ्यांच्या आशेवाडीत मारुतीचं प्रशस्त मंदिर आहे. या मंदिराच्या
शेजारून छोटेखानी रामसेज किल्ल्यावर चढाई करता येते. आशेवाडीच्या दिशेला दिसणारा
रामसेजचा बुधला डावीकडे ठेवत पुढे गेल्यावर रामसेज किल्ल्यावर चढणाऱ्या पायऱ्या
लागतात. या पायऱ्यांनी वर चढून आल्यावर गडावर प्रवेश करण्यापूर्वी रामाचं मंदिर
आणि थंडगार पाण्याची टाकी आहे. मारुती ते राम, हे अंतर आहे
फक्त एका तासाचं! रामसेज गडमाथ्यावर कोरडी पाण्याची टाकी, पडक्या
जोत्याचे अवशेष आहेत. माथ्यावर सुस्थितीत असलेलं मंदिर आहे. त्यात वा रामाच्या
मंदिरात राहण्याची सोय होऊ शकते. आशेवाडीकडला बुधला व त्याजवळच ध्वजस्तंभ ही
गडफेरीत करण्याची इतर ठिकाणं. रामसेजवरून समोर प्रशस्त भोरगड दिसतो. संरक्षण
यंत्रणांची रडार सिस्टिम असल्याने भोरगडावर मात्र आपल्याला प्रवेश नाही. दिसायला
छोटा असणाऱ्या रामसेजवर मोठा इतिहास घडलेला आहे. मुघलांविरुद्ध तब्बल पाच वर्षं या
किल्ल्याने टिकाव धरला होता. एकेक किल्ला असा पाच वर्षं लढवण्याच्या क्षमतेतच
स्वराज्याचं सामर्थ्य दडलं होतं. रामसेजवरून पुन्हा नासिककडे येताना म्हसरूळनजीक
जैन चांभारलेणी आहेत. वेळ असल्यास ती जरूर पाहून घ्यावीत. म्हसरूळकडून एक रस्ता
थेट वाघेऱ्यापर्यंत जातो. वाघेरा घाटमाथ्यावरचं गाव आहे. गावाच्या समोरच एक मोठा
बंधारा व जलाशय आहे. जलाशयाच्या पाठी उभा आहे उंच वाघेरा. वाघेऱ्याचे कडे थेट
घाटाखाली उतरलेले आहेत. धरणाच्या पाण्यावर व सुपीक जमिनीवर शेती करणाऱ्या
गावकऱ्यांना वाघेरा किल्ल्याचा रस्ता विचारायचा. वाघेरा जलाशयाचा बांध उजवीकडे
जिथे वाघेऱ्याच्या सोंडेला चिकटलेला वाटतो, त्या डोंगरधारेवरून
गडावर चढाई करायची. घाटाखाली उतरलेल्या गडाच्या उंचच उंच कातळभिंती उजवीकडे ठेवत
गडाची माची गाठायची. पाठीवर सामान नसल्यास माची गाठायला एक तास पुरे. माचीवरून
वाघेऱ्याचा उंच सुळकेवजा उंचवटा, गडमाथा दिसतो.
दहा-एक मिनिटांच्या सोंडेवरील सपाट चालीनंतर गडाच्या सुळकेवजा गडमाथ्याला भिडायचं.
इथे पाण्याची कोरडी टाकी आहेत. इथून गडमाथा गाठायला दोन वाटा आहेत. गडमाथा डावीकडे
ठेवत वळसा घालून चढणारी निसरडी वाट अथवा सोपं 10 फुटांचं
प्रस्तरारोहण करून सरळ वर चढणारी कातळाची वाट. कोणत्याही वाटेने गडाचा सुळकेवजा
माथा गाठायचा. तिथे उघड्यावर शिवलिंग आहे. फडकणाऱ्या भगव्या झेंड्याबरोबर गड सर
झाल्याबद्दल ग्रुप फोटो काढायचा. अंजनेरी, ब्रह्मगिरी आणि
आजुबाजूच्या परिसरावर नजर फिरवायची आणि परतीला लागायचं. वाघेरा गावातून गडमाथा
गाठायला आणि स्थलदर्शनासाठी दोन तास पुरे. गडावर पाणी नसल्याने वा सावलीसाठी झाड
नसल्याने सोबत आणलेलं पाणी प्यायचं आणि आल्या वाटेने गड उतरायचा. वाघेऱ्यातून घाट
उतरून हरसूल गाठायचं. हरसूवरून ओझरखेडकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठाणापाडा आहे.
ठाणापाड्याला आश्रमशाळेसमोरून खैराई किल्ल्यावर चढाई करायची. निघताना टॉर्च
घ्यायला मात्र विसरायचं नाही. खैराई किल्ला फारसा प्रसिद्ध नसलेला, दुर्लक्षित.
ट्रेकिंगसंबंधीच्या पुस्तकात त्याचा उल्लेख नाही. नासिकचे हेमंत पोखरणकर यांनी
त्याबद्दल माहिती पुरवली म्हणून आम्ही हा किल्ला करू शकलो. आश्रमशाळेसमोरून खैराई
माचीवरचा माचीपाडा गाठायला पाऊण तास पुरे. माचीपाड्यातल्या गावकऱ्यांचं आतिथ्य
स्वीकारून गड चढायला लागायचं. माचीवर पोहोचल्यावर डौलदार, बहरलेलं
शेत आपलं स्वागत करतं. संध्याकाळी ते पिवळं शेत सोनेरी दिसू लागतं. माचीच्या
टोकाला गडाजवळ दुतर्फा घरं आहेत. लुसलुशीत कोकरांबरोबर फोटो काढून झाले की गड
चढायचा. गडाला बऱ्यापैकी तटबंदी आहे. माचीपाड्याकडला बुरुज नाक्यासमोर ठेवून चढत
राहायचा. अर्ध्या तासाने आपण एका टेपावर येऊन पोहोचतो. इथून बुरुजाकडे तुटलेल्या
तटावरून गडावर प्रवेश करता येतो. अथवा बुरूज व गडमाथा उजव्या अंगाला ठेवून
गडमाथ्याला वळसा घालून गडाच्या पश्चिमेकडून गडावर सोप्या वाटेने प्रवेश करायचा.
खैराईचा गडमाथा छोटेखानीच आहे. पण मनाला प्रसन्न वाटतं. गडावर पाण्याची टाकी आहेत.
त्यातलं पाणी पावसाळ्यात पिण्यास हरकत नाही. गडाच्या तटावरून गड-प्रदक्षिणा करता
येते. गडावर उघड्या मंदिराकडे दोन लहान तोफा पडलेल्या आहेत. मावळतीच्या रंगात गड
फारच सुंदर भासतो. मावळणाऱ्या सूर्याला दंडवत घालून अंधार पडण्यापूर्वी माचीपाडा
गाठायचा. माचीपाड्यावरून सोप्या वाटेने आल्याप्रमाणे ठाणापाडा गाठायचं. स्वतःची
गाडी सोबत असेल व चालणारे भिडू असतील तर एका दिवसात हे तिन्ही किल्ले पाहून
मुक्कामाला त्र्यंबकेश्वर वा अंजनेरी गाठता येतं. वाघेरा घाटाच्या खालचा खैराई
तांत्रिकदृष्ट्या नाशिक जिल्ह्यात असला तरी भौगोलिकदृष्ट्या तो ठाणे जिल्ह्यात
वाटतो. नाशिक त्र्यंबकेश्वरच्या आसपासच्या या किल्ल्यांची सफर आपल्याला एका
वेगळ्याच दुनियेत घेऊन जाते.
शंभू राजे छत्रपती झाल्यावर त्यांच्या जीवनाचा आणि असाधारण मुत्युचाही आढावा घेतला असता, पदोपदी आपल्याला या वाक्याची प्रचिती येते. याचं शंभू राजांचा मुसद्दीपणा आणि आम्हा चिवट मराठयांचा इतिहास ठासून सांगणारा 'रामशेज', आमचा आजचा पहिला किल्ला. औरंगजेबाला
सुमारे साडेपाच वर्ष झुंजवणारा आणि या लढ्यात हात हलवत माघार घ्यायला
लावणारा...रामशेज. हा किल्ला जरी लहान असला तरी त्याचा इतिहास खूपच मोठा
आहे.
शहाजहान
हा जेव्हा शहाजीराज्यांच्या विरोधात दक्षिणेत उतरला तेव्हा त्याने
त्याच्या दख्खन मोहिमेचा मुहूर्त 'रामशेज' हा निजामशाहीचा किल्ला घेऊन
केला. आपल्या वडिलांचा तक्ता गिरवत औरंगजेब, महाराज्यांच्या मृत्यूनंतर,
स्वराज बुडवायला आपली साडेपाच लाखांचं सैन्य घेऊन उत्तरेतुन निघाला. दख्खन
मोहिमेची सुरवात रामशेज घेऊन करायचा त्याचा मानस होता. मुघलांच्या
ताब्यातील गुलशनाबाद (नाशिक) पासून १० मैलावर असलेला 'रामशेज' हा घ्यावा म्हणून त्यानेशहाबुद्दीन
गाजीउद्दीन फिरोजजंग याला ४० हजार सैन्य, तोफखाना यांच्यासह पाठविले आणि
तो किल्ल्याभोवती वेढा टाकून बसला. या वेळी किल्ल्यावर फक्त ६०० मावळे
होते, आणि त्यांचा झुंजार किल्लेदार. दुदैवाने त्या किल्लेदाराच नाव,
पुरेश्या कागदपत्रांच्या आभावे अवगत नाही. मुघलानी गडावर पहिला हल्ला चढवला
आणि मावळ्यांच्या दगडाच्या मऱ्यात परत फिरला. शहाबुद्दीन जवळ जवळ २ वर्ष
किल्या घेण्याचा प्रयत्न करत राहिला पण त्याला यश आलं नाही. मग औरंगजेबाने,
'खान जहान बहादूरखान कोकलताश' याला मदतीसाठी पाठवले. यानेही बरेच प्रयत्न
केले; तोफांसाठी डोंगरएव्हढे दमदमे उभारले ते पण तटबंदी भेदू शकले नाहीत.
मग त्याने दूसरी योजना केली, दारुगोळा, तोफा, वाध्ये एका ठिकाणी गोळा केले
जेणेकरून या बाजूने हल्ला होईल म्हणून मावळे बेसावध होतील आणि एक लहान
तुकडी दुसरीकडून जाऊन किल्ला घेतील. पण या गनिमी काव्याचे जनक मराठेच होते,
त्यांनी सैन्य विभागून मुघलांची पुन्हा फजिती केली. एवढे
प्रयत्न करूनही अपयश पदरी पडलेल्या बहादूरखानाने मग दैवाची साथ घेतली, ऐका
मंत्रिकाकरवी १०० तोळा वजनाचा सोन्याचा नाग अग्रभागी घेऊन किल्ल्यावर चाल
केली आणि वरून आलेल्या दगडाने त्या मंत्रिकालाच टिपल्यावर पुन्हा मागे धूम
ठोकली. आता साडे तीन वर्षे उलटूनही किल्ला येत नाही म्हणून वैतागून
औरंगजेबाने तिसरा सेनापती बदलला; कासम खान. यालाही काही यश येत नव्हतं, याच
गमक म्हणजे..शंभू राजांचा मुसद्दीपणा. या पूर्ण काळात किल्ल्याच्या
वेढ्याला, बाहेरून त्रास देण्याचं आणि रसद तोडण्याचं काम
राजांनी 'मानाजी मोरे आणि रुपाजी भोसले' या सरदारांना दिलं होतं आणि ते हे
चोख बदवत होते. सुमारे साडेपाच वर्ष मराठ्यांनी अशी कडवी झुंज दिल्यावर
औरंगजेबाने या किल्ल्याचा नाद सोडला. पुढे हा किल्ला बदलेल्या
किल्लेदाराच्या फितुरीने मुघलांना मिळाला.
आजून
एक आख्यायिका या किल्ल्याच्या नावाला जोडलेली आहे. प्रभू रामचंद्र जेव्हा
वनवासात पंचवटीत होते तेव्हा ते इथे आरामसाठी येत असत म्हणूनच 'रामशेज'
म्हणजेच रामाची शय्या.
हा झाला इतिहास आता भूगोल पाहू...आमच्या नजरेतून
किल्ला
तसा लहानसाच आहे. गडाची उंची साधारण ३२०० फुट एवढी आहे. नाशिक पासून पुढे
पेठ मार्गावर आशेवडी या गावाजवळ हा किल्ला आहे. किल्ल्याची वाट डाव्या
बाजूने जाते. काही चांगल्या तर काही ढासळलेल्या पायऱ्या चढून आम्ही
मंदिराजवळ आलो. एका गुहेत बांधलेलं रामाचं मंदिर सुंदर आहे. मंदिराच्या
भिंतीवर एक शिलालेख आहे. या मंदिराच्या उजव्या बाजूला एक लहानशी गुहा आहे
तीत शंकराची लहानशी पिंड आणि नंदी ठेवला आहे. या गुहेच्या छताला एक दगडाचा
झरोका आहे तो किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराला लागून असलेल्या चोर
दरवाज्याचा आहे. मंदिराच्या मागेच एक पाण्याचं कुंड आहे, यातले पाणी
पिण्यायोग्य आहे. या पाण्याची चव घेऊन डाव्या बाजूला असणाऱ्या काही पायऱ्या
तुडवत आम्ही गडमाथ्यावर आलो. इथे समोरच जमिनीत खोदलेला चोरदरवाजा आहे. हा
दरवाजा गडाच्या दुसऱ्या बाजूने उघडतो पण आता मातीत बुझुन गेलेला आहे.
दरवाज्याच्या कमानी आजही लक्ष वेधून घेत होत्या. हा दरवाजा नंतर पाहू
म्हणून आम्ही उजवीकडे वळालो. लगेचच
उजव्या बाजूला काही प्रशास्र पायऱ्या घळीत किल्ल्याचा मुख्य दरवाजाला
घेऊन गेल्या. या दरवाज्याच्या पुढे किल्ल्याची प्राचीन मुख्य वाट असावी. या
किल्ल्याच एक वैशिष्ट म्हणजे मुख दरवाज्याला लागूनच एक लहानसा पायऱ्यांचा
चोर दरवाजा खोदलेला आहे, याने एखादा लहानसा माणूस फक्त खाली जाऊ शकतोकारण
याचं लहानसं कवडस्या सारखा एक्सिट पॉईंट. आधी सांगितल्या प्रमाणे हाच तो
गुहेच्या छताचा कवडसा. इथे सचिन आणि माझी मतभिन्नता झाली, त्याच्या मते हा
चोरदारवाजा नाही कारण त्याची साईझ सचिन पास होईल इतकीही नव्हती. पण मला तो
चोरदारवाजा वाटला ते त्या एक्सिट पॉइंटच्या मागे, पायऱ्या संपतात तिथे
कोरलेल्या लहानश्या देवडी मूळे. असो, दोघंही या विषयावर, घरी येईपर्यंत
बोलत होतो. किल्ल्याचा मुख्य दरवाजा हा उभ्या कातळात कोरलेल्या आहे, लागूनच
कातळाचेच बुरुज उभे केले आहेत. दरवाज्यावर दोन लक्ष्मीकमळ कोरलेली आहेत
दोन्ही बाजूंना, त्या काळातील वैभवाच प्रतिक. हा किल्ला साधारण १२०० वर्षे
अगोदर राष्ट्रकुटांच्या कालावधीत बांधला गेला असावा पण अजूनही या कातळात
चिनी हतोड्याचे घाव जिवंत दिसतात. प्रवेशद्वार पाहून आम्ही पुन्हा बाहेर
येऊन उनजीवकडे, किल्ल्याच्या मुख्य भागी वळलो. थोडं पुढे गेल्यावर काही
दगडात कोरलेली पाण्याची टाकी आणि बांधलेलं एक तलाव दिसलं. टाक्यांच्या वर
देवीचं मंदिर दिसत होतं. या टाक्यांना उनविकडे आणि त्या मंदिराला उजवीकडे
ठेवून आम्ही किल्ल्याचा दुसरा चोरदरवाजा पाहायला निघालो. हा दरवाजाही,
जमिनीत खोदलेला असून खाली उतरण्यासाठी काही पायऱ्या केलेल्या आहेत. त्या
पार करून आम्ही एक दरवाज्यातून आम्ही एका सुंदर ठिकाणी पोहीचलो. समोर भोरगड
आणि देहेरगडचा डोंगर आणि परिसर, ऊन-ढगांच्या लपंडावाट मन रामवून टाकत
होता. इथे पाच-एक मिनिट बसून, काही प्रोफाईल फोटोजचा क्लिकक्लिकाट केला. या
दरवाज्यातून वर गडमाथ्यावर जाताना काही आजून पाण्याची टाकी, उध्वस्त
वास्तू लागल्या. फिरून देवीच्या मंदिरापासून आम्ही पुन्हा मुख्य दरवाज्या
जवळ येऊन डावीकडे माची पाहण्यास निघालो. माचीवर एक पाण्याचं टाकं आणि एक
अलीकडे लावलेला ध्वजस्तंभ आहे. इथे एका सापाचे दर्शन झाले आणि आम्ही पुन्हा
दरवाज्यापाशी आलो. समोरचा राहून गेलेला चोर दरवाजा पहिला. हा दरवाजा
गडाच्या दुसऱ्या बाजूला उघडतो पण आता बुझुन गेला आहे. दोन कमानी पार करून
एका कातळात कोरलेल्या मोठ्या गुहेजवळ हा दरवाजा घेऊन गेला. पुढे जायची वाट
बंद झाली आहे. हा चोर दरवाजा पाहून आम्ही आमची गडफेरी पूर्ण केली. किल्ला
फिरायला आम्हाला दोन तास लागले, वर यायला जेवढा वेळ लागला होता
त्यापेक्षाही जास्त. किल्ला आहेच तसा!
रणझुंजार रामशेज - The Rational Mind
Pranjal Wagh
4–5 minutes
तुम्ही नाशिक जवळील रामशेज किल्ला पाहिला आहे का?
समुद्रसपाटीपासून
३५०० फूट उंच असलेला, नाशिकच्या वायव्येस सुमारे २५ किमी असलेला हा
छोटेखानी दुर्ग चढायला अगदीच सोपा आहे. पायथ्याच्या गावातून चढाई करायला १
तास खूप झाला! पण हाच छोटेखानी किल्ला मराठ्यांनी बलाढ्य औरंगजेबाविरुद्ध
साडेसहा वर्ष झुंजत ठेवला होता! इतकेच नव्हे तर त्याच्या अनेक मातब्बर
सरदारांच्या तोंडचे पाणी इथल्या ४००-५०० मराठ्यांनी पळवले होते!
१६८२
मध्ये मोगलांचा आलमगीर औरंगजेब आपल्या सर्व शक्तिनिशी दख्खनेत उतरला. ५
लाखाचे बलाढ्य सैन्य घेऊन हा पातशाह दख्खनेवर आपला चांद-तारा फडकवायला
बाहेर पडला होता. कदाचित इतक्या संख्याबळाने आक्रमण करणारा नेपोलियन नंतर
औरंगजेब हाच सुलतान असावा! त्याचं लक्ष्य होतं २०० वर्षांहून अधिक काळ
टिकलेली आदिलशाही, कुतुबशाही आणि केवळ ३०-३५ वर्षाचं छत्रपती शिवाजी
महाराजांनी स्थापलेल हिंदवी स्वराज्य!
महाराष्ट्रात उतरताच
औरंगजेबाने या छोट्याशा दुर्गाचा बंदोबस्त करायला, निजाम-उल-मुल्काचा बाप
शहाबुद्दीन खान, याला मोठं सैन्य आणि विपुल दारुगोळा देऊन पाठवलं.
किल्ल्यावर ४००-५०० मराठे होते पण त्यांचा किल्लेदार हा अनुभवी, बेडर आणि
मुरलेला लढवय्या होता. दुर्दैवाने त्याचं नाव आपल्याला ज्ञात नाही!
रामशेज किल्ल्यावरून दिसणारा परिसर सोपा वाटणारा पण मुघलांच्या तोंडचे पाणी पळवणारा रामशेज!
शहाबुद्दीन
खानाने पराक्रमाची शर्थ केली. उंच लाकडी दमदमे बांधून किल्ल्यावर तोफांचा
मारा केला. पण काही उपयोग झाला नाही. एका काळ्या रात्री किल्ल्यावरील
मराठे भुतासारखे आले न लाकडी दमदमे पेटवून निघून गेले. पण शहाबुद्दीन खान
हटला नाही. त्याने तोफांचा तुफान मारा केला आणि किल्ल्याच्या दरवाजाजवळील
तटबंदी ढासळली. मोगलांनी मोठी मुसंडी मारली पण किल्ल्यातल्या मराठ्यांनी
दात-ओठ खात प्रतिकार केला. मोगलांच बरंच नुकसान होताच त्यांनी माघार घेतली.
पुढे
बहादूर खानास रामशेजवर पाठवले. त्याचा एक मोतद्दार आपल्याला जादूटोणा येत
असून तुम्ही मला १०० तोळे वजनाचा सोन्याचा नाग बनवून द्या असे म्हणाला. मी
पुढे चालत जातो तुम्ही सैन्य घेऊन माझ्या मागे या. किल्ला लगेच आपल्या
हातात येईल. हा मोतद्दार चालत येताना आतील मराठे पाहत होते. दरवाज्याजवळ तो
पोहोचताच आतून गोफणीचा एक गोळा आला आणि त्या मोताद्दराच्या डोक्यात बसला!
मोतद्दार आणि नाग दोन्ही तिथेच पाडले आणि सैन्य मागच्या मागे पळून गेले!
इतकी
तोकडी शिबंदी घेऊन रामशेज लढत असताना त्याला आसपासच्या किल्ल्यातून रसद
व्यवस्थित पुरवली जात होती. संभाजी महाराजांनी त्यांना कसलीच कमी पडू दिली
नाही. किल्ल्यात दारुगोळा आणि तोफा नव्हत्या. मग मराठ्यांनी लाकडी तोफा
बनवून कातड्याचे गोळे उडवले. मोगलांचा इतिहासकार खाफीखान रामशेजच्या
वेढ्यात प्रत्यक्ष हजार होता. तो म्हणतो,
“ ही लाकडी तोफ दहा तोफांचे काम करते!”
पुढील
अनेक वर्ष ही झुंज अशीच सुरु राहिली. खानजहान बहाद्दूर, कासिमखान किरमाणी
या सरदारांनी सुद्धा प्रयत्न केले पण रामशेजच्या मराठ्यांनी त्यांना भीक
घातली नाही! १६८७च्या सुमारे छत्रपती संभाजी महाराजांनी किल्लेदाराला
खिल्तीची वस्त्रे, रत्नजडीत कडे आणि नगद रक्कम देऊन त्याचा सन्मान करून
त्याची प्रमुख किल्ल्यावर नेमणूक केली. दुर्दैवाने नवीन किल्लेदार फितूर
झाला आणि सुमारे ६ वर्षांच्या कडव्या झुंजीनंतर रामशेज मोगलांच्या ताब्यात
अलगद गेला!
टाक्यांची शृंखला!
टाक्यांची शृंखला!
आज
किल्ल्यावर फार वास्तू दिसत नाहीत. वाड्यांचे अवशेष, पाण्याच्या टाक्या
इतकेच दिसते. पण इथलं मुख्य आकर्षण म्हणजे संपूर्णपणे कातळात खोदून काढलेला
महादरवाजा आणि सहज लक्षात न येणारा भुयारी चोर-दरवाजा!
रामशेजचा भुयारी दरवाजा!
आज
३४० वर्षांनंतर गडाच्या तटावर उभे राहिले की समोर दिसते मोगलांची
सागरासारखी पसरलेली छावणी, शहाबुद्दीन खानाचा डेरा, त्याने बांधलेले लकडी
दमदमे आणि आग ओकणाऱ्या त्याच्या तोफा! पण मागे वळून किल्ल्यात पाहताच
दिसतात ते शिवछत्रपतींच्या स्वराज्याचं स्वप्न उरात घेऊन लढणारे त्यांचे
मावळे आणि “आबासाहेबांचे संकल्पित तेच आम्हास करणे अगत्य” म्हणत
मावळ्यांच्या मागे खंबीरपणे उभे असलेले पोलादी छत्रपती संभाजी महाराज!
नीट कान देऊन ऐकलंत तर रामशेजचा प्रत्येक दगड मराठ्यांची शौर्यगाथा आपल्याला सांगतो!
२२ फेब्रुवारी १६८२ रोजी औरंगजेबाने बुऱ्हाणपूरचा मुक्काम हलविला आणि सर्व सामर्थ्यानिशी तो महाराष्ट्रात उतरला, आणि स्वराज्यावर पहिला घाला घातला तो किल्ले रामसेजवर. का बरे किल्ले रामसेजच ? दुसरा कोणता किल्ला का नाही? नाशिकमध्ये इतर अनेक मोठे मोठे किल्ले आहेत, मग त्यापैकी रामसेजवरच का? तर यामागचे कारण म्हणजे सुमारे ४५ वर्षांपूर्वी म्हणजे सुमारे इ.स. १६३४-३५ मध्ये शहाजहान बादशहा दक्षिणेत उतरला. त्या वेळी बादशहा शहाजहानने प्रथम किल्ले रामसेज सर केला आणि नंतर बाकी सर्व किल्ले भराभर आपल्या ताब्यात घेतले. त्यामुळे रामसेजचा किल्ला हा मुघलांच्या दृष्टीने 'शकुनाचा किल्ला' होता. म्हणून दक्षिणेत आल्यावर त्याने रामसेज किल्ल्याला वेढा घातला. पण या वेळी नियतीच्या मनात वेगळेच काहीतरी होते, कारण या छोट्याशा रामसेज किल्ल्याने औरंगजेबाला एक नाही, दोन नाही, सुमारे पाच वर्षे दमविले.
खरोखरच आज्ञापत्रात म्हटले आहे की, 'याकरिता पूर्वी जे राजे झाले त्यांनी आधी देशामध्ये दुर्ग बांधून तो देश शाश्वत करून घेतला. शिवाजी राजांनी दुर्गांचे नेमके हेच महत्त्व जाणून घेतले होते आणि अंगिकारले होते.'
तर यामागची कथा अशी आहे. रामसेज किल्ल्याचा पहिला उल्लेख आढळतो तो, सोळाव्या शतकात. त्या सुमारास रामसेज किल्ला निजामशाहीत होता. पुढे इ.स. १६३६च्या सुमारास मुघलांनी आणि विजापूरच्या आदिलशहाने निजामशाही जिंकली त्या वेळी निजामशाहीतील काही किल्ले मोगलांना मिळाले, तर काही विजापूरकरांना. त्या वेळी रामसेज किल्ला मोगलांकडे आला. नंतर हा किल्ला शिवाजीराजांनी कधी जिंकला त्याचा निश्चित उल्लेख मिळत नाही. पण इ.स. १६८७ पर्यंत तरी तो
साठ्यांकडे होता हे निश्चित आहे. शिवाजीराजांच्या निधनानंतर औरंगजेब बादशहा इक्षिणेत उतरला आणि नाशिकपासून १२ कि.मी.वर असणाऱ्या रामसेजला वेढा घालण्यासाठी त्याने शहाबुद्दीनखानाची नेमणूक केली. त्यासोबत कासिमखान, राव पलपत बुंदेला वगैरे सारखे अधिकारी देखील नेमून दिले.
मोगलांच्या रीतिरिवाजाप्रमाणे शहाबुद्दीनखानाने रामसेजला प्रथम वेढा घातला आणि किल्ल्याभोवताली चौक्या उभारल्या आणि किल्ल्यावर जाणाऱ्या सर्व वाटा तरोखून धरल्या. इ.स. १६८२ च्या सुमारास हा वेढा फोडण्यासाठी रूपाजी भोसले आणि मानाजी मोरे यांनी प्रयत्न केला. पण तो फारसा सफल झालेला दिसत नाही. बादशहाने खानबहाद्दूर कोक्लताश याला ताबडतोब रामसेजला वेढा घालणाऱ्या मोगलांच्या मदतीला जाण्याचा हुकूम दिला. त्या वेळी खानजहान बहादूरखान याने आपला बहादूरगडाचा तळ गुलशनाबादेकडे हलविला. त्यावेळी भीमसेन सक्सेना हा बाजरबुणग्यांसोबत गुलशनाबादेस पोहोचला. या भीमसेन सक्सेनाने आपल्या 'तारीखे दिल्कुशा' या ग्रंथात देखील रामसेजच्या लढाईचे वर्णन केलेले आहे. त्यात तो म्हणतो, शहाबुद्दीनखानाने किल्ल्याला मोर्चे लावले. किल्ल्याच्या बुरुजासमोर त्याने लाकडाचा एक प्रचंड बुरूज उभा केला. त्यावर एकावेळी ५०० सैनिक वर चढून किल्ल्यातील लोकांवर बंदुकी आणि गोळ्यांचा मारा करू शकत.
रामसेजच्या लढाईचा उल्लेख खाफीखानाने आपल्या 'मुन्तखबुललुबाब ए मुहंमदशाही' या फारसी ग्रंथात केलेला आहे. त्यात तो म्हणतो, रामसेजचा किल्लेदार हा सर्व मराठ्यांमध्ये अत्यंत अनुभवी व कसलेला होता. त्याच्या प्रयत्नांमुळे आणि सावधगिरीमुळे मोगलफौजेचे काही एक चालेना. किल्ल्यात त्या वेळी तोफा नव्हत्या. पण भरपूर प्रमाणात कातडे (शिशाचे पत्रे) शिल्लक होते. किल्ल्यातील लाकडी तोफेने हे कातडे उडवीत असत. अशी एकेक तोफ दहा तोफांचे काम करी. खरोखर मराठ्यांच्या कडव्या प्रतिकारामुळे शहाबुद्दीनखानाची झोप उडाली होती. त्याने किल्ला जिंकून
घेण्यासाठी त्यावर हल्ला चढविला, तर मराठे तो केवळ हाणूनच पाडत नसत तर, मोगलांचे अनेक सैनिक त्यात मारले जात. राव दलपत बुंदेला या अशाच एका हल्ल्यात दगडांच्या माऱ्यामुळे जखमी झाला.
कासिमखानाने औरंगजेबाला रामसेजवर केलेल्या हल्ल्याचा एक वृतान्त पाठविला तो असा : पूर्वी तोफांच्या माऱ्यामुळे रामसेज किल्ल्यातील बुरुजाजवळील तटबंदी ढासळली होती, म्हणून या वाटेने माझ्या सैनिकांनी वर बाण फेकत किल्ल्यात शिरावे असे मी ठरविले व शाबान महिन्याच्या २७ तारखेला (दि. २१ ऑगस्ट १६८२)
रात्रीच्या वेळी पाच-सहाशे मेवाती व माझे सैनिक यांना किल्ल्यात घुसण्यासाठी तयार करून हल्ला चढविला. शेवटी खंजरखानाच्या भाऊबंदांपैकी काही माझे सैनिक किल्ल्याच्या दरवाज्यापाशी जाऊन मोठ्याने ओरडले की, 'बेलदारांनी यावे. त्या आवाजाने गनिमांचे लोक जागे होऊन त्यांनी दगड व बंदकी यांचा असा काही खच्चून मारा केला की. बहतेक सर्व बादशाही सैनिक मारले गेले. कामात काही फारशी प्रगती झाली नाही. सध्या वेढ्याचे काम हातचे गेले असे बादशाही लोक बोलतात. परंतु हे मला मान्य नाही. माझ्याबद्दल जो हुकूम फर्मावला जाईल त्याप्रमाणे मी करीन.
कासिमखानाचा विनंती अर्ज ऐकून खासा औरंगजेबाने हुकूम दिला की, कासिमखानाला लिहिले की, तुमच्या बरोबरच्या लोकांना शहाबुद्दीनखानाच्या हवाली करा आणि तुम्ही स्वतः हुजुरात निघून या. यानंतर औरंगजेबाने आपला दूधभाऊ खान बहादूरखान याला रामसेजचा किल्ला जिंकून घेण्यासाठी नाशिकला बोलावून घेतले. मोगलांतर्फे शहाबुद्दीनखानाने रामसेजला वेढा घातला होता, पण त्यास न जुमानता खानजहान बहादूरखानाने स्वतः मोर्चेबांधणी सुरू केली. औरंगजेबाला पाठविलेल्या एका अर्जात तो म्हणतो, मी हुकुमाप्रमाणे रामसेजला वेढा दिला आहे. बादशहाच्या सुदैवाने तो लवकरच जिंकून घेऊन बादशाही अंमलाखाली आणण्याची आशा करतो.
आपली वेढ्याची कामगिरी बादशहासमोर आणण्यासाठी शहाबुद्दीन एक विनंती अर्ज बादशहास पाठवितो, त्यात तो म्हणतो, बादशाही सैनिकांनी रामसेज किल्ल्याला चारही बाजूंनी वेढा घातला आहे, तारीख २७ रमझान म्हणजेच दिनांक २० सप्टेंबर १६८२ रोजी किल्ल्याचा एक बुरूज बादशाही सैनिकांनी ताब्यात घेतला. बादशहा औरंगजेब अशा कारणांनी संतुष्ट होणारा थोडी होता. त्याने रहुल्लखानास सांगितले की, तू शहाबुद्दीनखानाला लिहावे की, किल्ला जिंकून घेण्यास तू खूप कष्ट घेतले आहेत, स्वतःचा जीव देखील गमवायला कमी केले नाहीस. सध्या तो किल्ला खानजहान बहादूरखानाच्या हवाली केलेला आहे. तोच किल्ला बादशहाच्या अमलाखाली आणेल. त्याप्रमाणे शहाबुद्दीनखानाने आपला तोफखाना बहादूरखानाच्या हवाली केला.
खानजहान बहादूरखानाने रामसेजचा आपला वेढा नेटाने पुढे चालविला. त्याने किल्ला जिंकण्यासाठी काय काय प्रयत्न केले याबद्दल खाफीखान म्हणतो,
खानजहान बहादुरखानाने किल्ल्याच्या वेढ्यात शिपाईगिरीची शर्थ केली. त्याचे तपशील वर्णन केले तर ती अतिशयोक्ती वाटेल, पण किल्ला जिंकून घेण्याचे काम मात्र काही केल्या पार पडले नाही.
खरोखरच खानजहान बहादूरखानाने रामसेजचा किल्ला जिंकण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्याबद्दलचे काही मनोरंजक उतारे असे आहेत,
एके दिवशी खानजहान बहादूरखान कोकलताश म्हणाला "किल्ल्याच्या एका बाजूला आपण हल्ला करणार असा पुकारा करावा. त्या बाजूला तोफा आणि दारूगोळा आणावा, तोफखान्यातील सैनिक, लष्करातील लोक आणि बाजारबुणग्यांनी तिकडे खूप गडबड उडवून द्यावी. म्हणजे किल्ल्यातील लोक तिकडे जमा होऊन बंदोबस्त करू लागतील. त्याच वेळी किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूस योग्य जागा शोधून काढून शे-दोनशे शूर शिपायांनी जावे. किल्ले चढून जाण्यात ते पटाईत असावेत. त्यांनी कोणताही आवाज न करता गुपचूपपणे जावे. त्यांच्याबरोबर हल्ला करण्याचे सामान किंवा मशाली वगैरेसारख्या उजेड पाडणाऱ्या वस्तू असू नयेत. त्यांनी अगदी सापाप्रमाणे जावे आणि दोराच्या मदतीने हरप्रकारे प्रयत्न करून किल्ल्यावर पोहोचावे."
किल्लेदारास खानजहान बहादूरखानाच्या या योजनेचा पत्ता लागला. त्याने युक्ती काढली. ज्या बाजूने मुघल बाजारबुणगे आणून हल्ला करणार त्या बाजूस आपण आपले काही शूर सैनिक पाठवून नौबती, कर्णे वगैरे वाद्यांचा गजर करावा आणि किल्ल्यावरून मुघल सैनिकांवर दगड लोटून द्यावेत. तेलाने माखलेले कपडे पेटवून वरून खाली टाकावेत. शक्यतो या कामात कुसूर करू नये आणि ज्या जागी खानजहानचे सैनिक गुपचूपपणे चढून येणार होते त्या ठिकाणी देखील काही शूर आणि निवडक शिपायांना ठेवावे. हे सैनिक सर्व प्रकारची शस्त्रास्त्रे घेऊन दबा धरून बसलेले असतील. त्यांनी कोणताही प्रकारचा आवाज न करता मुघलांची वाट पाहायची. ठरलेल्या वेळी मोगलांचे दोन सैनिक वर चढले. त्यांची डोकी तटबंदीवर दिसताचक्षणी किल्ल्यातील सैनिकांनी आपल्या प्राण हरण करणाऱ्या शस्त्रांनी त्यांच्या डोक्यावर इतक्या जोरात आघात केला की, त्यांचे डोळेच बाहेर आले. ते मोठ्या कष्टाने जिथून वर चढून आले तिकडे फेकले गेले. इतर माणसे त्यांच्या मागोमाग वर चढत होती, ती देखील वरून पडणाऱ्या माणसांसोबत खाली गडगडत गेली.
एके दिवशी खानजहान बहादूरखानाचा 'सईस ऊर्फ मोतदार' म्हणाला, 'भुते वश करण्याच्या कामात मी पटाईत आहे. शंभर तोळे वजनाचा सोन्याचा एक साप तयार करा. तो माझ्या हातात द्या आणि हल्ल्याच्या वेळी हा साप घेऊन मी आघाडीवर
राहीन. मी भुतांच्या मदतीने किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत कोणतीही अडचण न येता जाऊ शकेन अशी मला आशा आहे.' खानजहान बहादूरखानाने त्याच्या म्हणण्याप्रमाणे केले. नंतर हा मोतदार हल्ल्याच्या वेळी सैन्याच्या पुढे राहिला. अर्ध्या वाटेवर तो जाऊन पोहोचला असेल नसेल तोच, किल्ल्यावरून गोफणीचा गोळा येऊन त्याच्या छातीवर आदळला. तो इतक्या जोरात लागला की, मोतदाराच्या हातून सोन्याचा नाग उडाला आणि मोतदार खाली कोसळून पडला. सांगायचे असे की बहादूरखानाने खूप परिश्रम केले तरी देखील किल्ला काही त्याला जिंकता आला नाही.
बादशहाने इ.स. १९ ऑक्टोबर १६८२ राजी रहुल्लाखानाच्या शिक्क्याने फर्मान काढले, आणि खानजहान बहदूरखानाकडे ते रवाना केले. त्यात तो म्हणतो, रामसेज किल्ल्याच्या वेढ्यात थोडे सैनिक ठेवून त्याने स्वतः तळकोकणाच्या खोयातील घाटावर थांबावे. हे फर्मान खानजहान बहादूरखानाला मुहियीन कुली याने आणून दिले. या मुहियीन कुलीस खानजहान बहादूरखानाने औरंगजेबाला कळविण्यास सांगितले, मी (खानजहान बहादूरखान) रामसेज किल्ल्याला वेढा घालून मोर्चे कायम केले आहेत. पण या बाबतीत बादशाही हुकूम येऊन पोहोचला की, थोडे सैन्य वेढ्यात ठेवून त्याने स्वतः तळकोकणातील खोऱ्यात जावे. मला (खानजहान बहादूरखानाला ) जर एक आठवड्याची मुदत मिळाली तर, किल्ला बादशाही अंमलाखाली आणीन. पण यावर औरंगजेब म्हणतो, हुकुमाविरुद्ध कोणतीही सबब चालणार नाही.
खानजहान बहादूरखान रामसेज सोडून पुढे कुठे गेला, याबद्दल भीमसेन सक्सेना आणि मुघल दरबारातील अखबारात बराच फरक आहे. यांपैकी भीमसेन सक्सेना आपल्या आत्मचरित्रामध्ये नमूद करतो की, खानजहान बहादूरखानाने रामसेजचा वेढा चालू ठेवला. त्याने किल्ल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी बादशहाच्या आज्ञेने त्याने किल्ल्याचा वेढा उठविला. शहाबुद्दीनखानाने अफाट खर्च करून लाकडी बुरूज तयार केला होता, त्यात पेंढा व दारू भरून तो पेटवून देण्यात आला. प्रचंड जाळ झाला. नाशिक प्रांतात मराठे पसरलेले आहेत, असे कळल्यावर खानजहान बहादूरखानान रामसेजहन नाशिककडे आला. याचशिवाय तो म्हणतो, शेवटी बादशहांच्या आज्ञेने खानजहान बहादूरखानही वेढा उठवून निघून गेला. मोर्चे आणि किल्ल्यावर चढण्याची साधने तयार करण्यासाठी म्हणून मोगलांनी खूप लाकडे जमविली होती. त्यात त्यांना बराच खर्च आला होता. कूच करण्याच्या दिवशी खानजहानच्या आज्ञेने मघलांनी त्या लाकडांना आग लावून
दिली. त्या वेळी किल्ल्यातील लोक तटावर जमलेले होते. ते नगारे, चौघडे वगैरे वाद्य वीत होते आणि तोंडाने ते जे काही म्हणत होते ते लिहिण्यासारखे नाही.
तो रामसेजच्या वेढ्याबद्दल खाफीखान पुढे लिहितो, कासिमखान किरमाणी हा शूर आणि तडफदार सरदार म्हणून प्रसिद्ध होता. त्याची या वेढ्याच्या कामावर नेमणूक ग पानी. त्यानेही खूप परिश्रम केले. पण काम काही केल्या पार पडले नाही. शेवटी बादशहाने वेढ्याचे काम तहकूब करून कासिमखानाला दुसऱ्या कामगिरीवर रवाना केले. दरम्यानच्या काळात खानजहान बहादूरखान रामसेज किल्ल्यावर हल्ला करण्यासाठी निऔरंगजेबाने आपल्याला एक संधी द्यावी असे त्याला सुचवत होता. त्याने औरंगजेबाला सादर केलेला विनंती अर्ज असा आहे, हेरांनी बातमी आणली होती की, गनिमांचे लोक त्र्यंबकहून एक तोफ किल्ले रामसेज येथे नेत होते, म्हणून मी धावून गेलो. काही लोकांना ठार मारून व अनेकांना जिवंत पकडून तोफ ताब्यात घेतली.
स म ही व
औरंगजेबाने रहुल्लाखानास हुकुम दिला की, खानजहान बहादुरखानाने रामसेज किल्ला बादशाही अमलाखाली आणून देईन, असा मुचलका लिहून दिला होता. परंतु त्याप्रमाणे तो आणला नाही, त्यासाठी सरकारी रक्कम किती खर्च पडली आहे?
याबाबत अर्ज करावा.' त्याप्रमाणे रहुल्लाखानाने अर्ज केला की, 'रोख रक्कम व जिन्नस मिळून रु. ३७६३० रुपये इतके खर्च झाले.' त्यावर औरंगजेबाने हुकूम दिला की, ते खानाच्या मागण्यांमध्ये दाखल करावे.
यानंतर नाशिकचा ठाणेदार अक्रमखान याने शत्रूच्या वीस लोकांना कैद करून हुजुरात पाठविले आहे. त्यांपैकी एक जण रामसेजच्या किल्लेदाराचा औरस पुत्र व दुसरा शत्रूच्या तळकोकणातील देशमुखाचा मुलगा आहे. त्यानंतर या अक्रमखानाचा अर्जदास्त दि. २२ डिसेंबर १६८४ रोजी डाकचौकीचा अधिकारी फजाइलखानाच्या मध्यस्थीने औरंगजेबासमोर पेश करण्यात आला. त्यात त्याने लिहिले होते की,
संभाजीचे लोक रामसेज किल्ल्याच्या आसपास जमले आहेत. बादशाही प्रांतातील गावांना उपद्रव देण्याचा त्यांचा विचार आहे. ही बातमी ऐकून मी चालू महिन्याच्या १५ तारखेस म्हणजे १२ डिसेंबर १६८४ला चढ्या घोड्यानिशी स्वारी केली. त्यांच्याशी सामना दिला. बादशहाच्या सुदैवाने शत्रूचे २०० लोक मारले गेले, अनेक जणांना जखमी करून त्यांचा मोड केला. माझ्या बरोबरचे बहुतेक लोक मारले गेले किंवा जखमी झाले. बादशहांची फत्ते झाली.
मोगलांनी रामसेज कसा जिंकून घेतला याबद्दल मुहम्मद हाशिम खाफीखान आपल्या ग्रंथामध्ये म्हणतो की, संभाजीने रामसेजच्या किल्लेदाराकडे खिलतीची वस्त्रे,
रत्नजडित कडे आणि रोख रक्कम पाठवून त्याचा गौरव केला. इतर किल्लेदारांच्या मानाने तो श्रेष्ठ म्हणून त्याचा मानसन्मान करून त्याची आपल्या एका प्रमुख किल्ल्यावर बदली केली. रामसेजवर दुसरा किल्लेदार बदलून आला. रामसेज भागात अब्दुल करीम नावाचा एक जमीनदार होता. त्याच्या मदतीने मुल्हेर ऊर्फ औरंगगडाचा किल्लेदार नेकनामखान याने रामसेजच्या नव्या किल्लेदाराला वश करून घेतले आणि अशा रीतीने किल्ला मोगलांच्या हवाली गेला.
यानंतर हा किल्ला मोगलांकडे सुमारे २० वर्षे होता. तर निजामाकडे ४३ वर्षे होता. पुढे बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशव्यांच्या कारकीर्दीमध्ये तो मराठ्यांकडे आला. पुढे इंग्रज-मराठे युद्धात इ.स. १८१८ मध्ये जेव्हा त्र्यंबक किल्ला ब्रिटिशांनी जिंकून घेतला, तेव्हा रामसेजचा किल्लादेखील त्यांच्या हवाली केला. कॅ. ब्रिग्ज याने इ.स. १८१८ मध्ये रामसेज किल्ल्याचे वर्णन केले ते असे
Ramsej is neither so large nor so high as most of the Nashik hills, but not so small as Hatgad. The scrap as neither very steep nor very height and undefended the ascent was not difficult. There were two gateways, one within the other, large but not so formidable as those of hatgad. There was less uncovered ground on the way up to the gates than in any other Nashik Fort. The works connected with the gates were able to give a good flanking fire at a short distance from them. There was a way down by a trap door kept covered with the dirt and rubbish called secret road affording passage for one at a time. All round the fort ran a wall tolerably in some places but mostly indifferent within the fort where two or three bombproof ammunition chambers built in stone. The water supply was ample.
कॅ. ब्रिग्जने रामसेज येथे ब्रिटिश सैन्याच्या दोन तुकड्या तैनात केलेल्या होत्या. त्यांपैकी एक किल्ल्यावर होती, तर दुसरी किल्ल्याच्या पायथ्यापाशी असलेल्या गावात होती. इतके मोठे सैन्य रामसेजसारख्या ठिकाणी तैनात करण्यामागचे महत्त्वाचे कारण असे होते की, जर भिल्ल आणि इतर बंडखोरांचा बंदोबस्त करण्याची वेळ आली तर, ९० ते १०० सैनिक त्यांच्या पाठलागावर जाऊ शकतील. त्या वेळी म्हणजेच १८१८ मध्ये किल्ल्यावर सुमारे टनभर गहू, थोडे मीठ, ८ बंदुका, ९ जंबुरे, ३० तांब्याची भांडी, ४१ पितळ्याची भांडी, बंदुकांना लागणारी दारू, ४० पाँड गारगोटी, ४५ पाँड शिसे आणि २४० पौंड सुतळी शिल्लक होते.
रामसेज म्हणजे 'राम की सेज' म्हणजे 'रामाची शय्या' नाशिकपासून सुमारे २० कि.मी. अंतरावर दिंडोरी तालुक्यात रामसेजचा किल्ला आहे. नाशिकहून पेठला जाणारी कोणतीही एसटी पकडली की, वीस मिनिटांवरील 'आशेवाडी' थांब्यावर उतरायचे. 'आशेवाडी' हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. गावातून किल्ल्यावर आण्यासाठी सरळ वाट गेलेली आहे. या वाटेने पाऊण तासात आपण किल्ल्यावर पोहोचतो. वाट सरळ आणि सोपी आहे. गावात शिरल्याशिरल्याच किल्ल्याच्या नैसर्गिक तटबंदीचे दर्शन होत असल्याने किल्ल्याचा रांगडेपणा इथून चांगलाच जाणवतो.
गावातून किल्ल्यावर जाताना सर्वात शेवटच्या टप्प्यात पायऱ्या लागतात. या पावयांच्या अलीकडे कातळात खोदलेले एक पाण्याचे टाके लागते. पुढे पाच मिनिटांच्या अंतरावर रामाचे मंदिर आहे. मंदिर बरेच प्रशस्त आहे. त्याचे बांधकाम अलीकडच्या काळातील असावे असे वाटते. पण मंदिरामधील रामसीतेच्या मूर्ती पुरातन आहेत. आपण रामसीतेचे दर्शन घेऊन पुढची वाट धरायची. या मंदिराच्या एका बाजूच्या भिंतीवर देवनागरी भाषेतील शिलालेख कोरलेला आहे.
मंदिराच्या मागील बाजूस जमिनीत खोदलेले बारामाही पाण्याचे टाके आहे. या टाक्यातील पाणी पिण्यास योग्य असल्याने इथून पाणपिशव्या भरून घ्यायला काहीच हरकत नाही. थोड्या पायऱ्या चढून गेल्यावर आपण एका उद्ध्वस्त प्रवेशद्वारात येऊन पोहोचतो. या ठिकाणी प्रवेशद्वाराचे केवळ खांब शिल्लक आहेत. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर आपण थेट किल्ल्यावर येऊन पोहोचतो. विशेष म्हणजे या ठिकाणी किल्ल्याचा भाग थोडा चिंचोळा झालेला आहे.
चिंचोळ्या भागात पलीकडच्या बाजूस एक गुप्त दरवाजा काढलेला आहे. या गुप्त दरवाज्यातून खाली उतरणारी वाट कठीण तर आहेच, पण निसरडी देखील आहे. एकाच ठिकाणी मोठा दरवाजा आणि गुप्तदरवाजा या प्रकरणाचा उलगडा मात्र इथे होत नाही.
दरवाज्यापासून डाव्या बाजूस किल्ल्याची माची आहे, तर उजवीकडे किल्ल्याचा सर्वोच्च माथा आहे. किल्ल्याची माची म्हणजे प्रशस्त पसरलेले पठार होय. या माचीवर काही पडक्या घरांचे आणि वाड्यांचे अवशेष आहेत. शिवाय चार-दोन सुकलेली पाण्याची टाकी आहेत, आणि संगतीला निवडुंगाची अतिरूक्ष झाडे आहेत. हे सर्व पाहून पुन्हा माघारी फिरायचे आणि जिथून किल्ल्यावर प्रवेश केला, त्या ठिकाणी परतायचे. आता मोर्चा सर्वोच्च माथ्याकडे वळवायचा. एक वाट कड्याला
डावीकडे ठेवून आपण किल्ल्यावर आलो. त्या वाटेच्या वरच्या अंगाला समांतर गेलेली आहे. या वाटेवर कातळात खोदलेला किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे. सध्या तो अध्र्ध्याहून अधिक जमिनीत गाडला गेलेला आहे. दरवाजाच्या कमानीवर सुंदर कमळपुष्पे कोरलेली दिसतात.
त्याच्या एकंदर आकारमानावरून हा किल्ल्याचा मुख्य दरवाजा असावा, मात्र यातून खाली उतरणारी वाट पूर्णपणे मोडलेली आहे.
दरवाजा पाहून पुन्हा मुख्य वाटेला लागायचे आणि सर्वोच्च माथ्याकडे निघायचं वाटेत पाण्याचे एक छोटेसे टाके लागते. यातील पाणी पिण्यास योग्य आहे. टाक्यांच्या थोडेसे पुढे पाण्याचे एक तळे आहे. यात बारमाही पाणी असते. थोडेसे चढून गेल्यावर देवीचे छोटेसे मंदिर आहे. यात चार-पाच लोकांचा चांगला मुक्काम होऊ शकतो. मंदिराच्या मागील बाजूस डाव्या हाताला आणखी एक गुप्त दरवाजा आहे. हा दरवाजा खरोखरच एवढ्या गुप्त ठिकाणी लपविलेला आहे की, तो शत्रूलाच काय पण गडावर राहणाऱ्या लोकांना सुद्धा सापडणे कठीण आहे. या दरवाज्यातून खाली उतरणे म्हणजे येरागबाळ्याचे काम नाही. रामसेजला मुघलांनी वेढा घातला असताना कदाचित याच दरवाज्याने मराठ्यांना कुमक येऊन मिळाली असेल का? हा दरवाजा पाहून पुन्हा मंदिरापाशी परतायचे आणि किल्ल्याच्या पश्चिम टोकाकडे निघायचे. वाटेत वाड्यांचे अनेक अवशेष दिसतात.
रामसेजच्या पश्चिम टोकावरून देहेरचा किल्ला आणि भोरगड, म्हसरूळच्या जैन लेण्यांचा डोंगर, शिवाय इगतपुरी रांगेतील किल्ल्यांचे मोहक दृश्य दिसते.
किल्ल्याची उंची : समुद्रसपाटीपासून ९८५ मीटर (३२३० फूट)
तालुका : दिंडोरी
किल्ल्याची श्रेणी : सोपी
डोंगररांग : नाशिक उपरांग (वायव्य)
पायथ्याचे गाव : आशेवाडी
पायथ्याच्या गावापासूनचे अंतर : आशेवाडीपासून पाऊण तास
जवळचे एस.टी. स्थानक : नाशिक
राहण्याची सोय : किल्ल्यावर राहण्यासाठी मंदिर आहे, यात
चार ते पाच लोक आरामात राहू शकतात.
जेवणाची सोय : जेवणाची सोय नाही.
पिण्याचे पाणी : किल्ल्यावर बाराामाही पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत.
जाण्यासाठी उत्तम कालावधी : जून ते मार्च.
किल्ला फिरायला लागणारा वेळ : किल्ला फिरायला एक तास पुरतो.
जवळपासची गावे : आशेवाडी
सीतागुंफा, रामशेज किल्ला भुयाराची ‘पुरातत्त्व’ घेणार माहिती
सकाळवृत्तसेवा
2–3 minutes
Updated on:
पंतप्रधान कार्यालयाकडून देवांग जानी यांच्या पत्राची दखल; रामायणकालीन संदर्भ पुढे येण्यास मदत
नाशिक
- सामाजिक कार्यकर्ते देवांग जानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना
पत्र पाठवत सीतागुंफा ते रामशेज किल्ल्यादरम्यानच्या भुयार मार्गाचा शोध
घेत विकास करावा, अशी मागणी केली होती. त्यावरून पंतप्रधान कार्यालयाने
पुरातत्त्व विभागाला लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या आहेत.
गेझेटर
बाँबे प्रेसिडेन्सी-नाशिक १८८३ च्या कि टू नाशिक-त्र्यंबक १९४१-१९४२ या
दोन्ही पुस्तकांतील संदर्भानुसार श्री. जानी यांनी पाठविलेल्या पत्रात
म्हटले आहे, की रामायण सर्किट योजनेत श्रीरामाचे वास्तव्य असलेल्या पंचवटी
भागातील सीतागुंफा ते रामशेज किल्ला हा भाग येतो. वनवासात असताना श्रीराम
बाहेर सीतागुंफाचा वापर करत, सीतागुंफामध्ये पूर्वेच्या खोलीत महादेवाचे
मंदिर आहे, त्यात तीन इंचाचे शिवलिंग आहे. गुंफातील सर्व खोली आणि मंदिरात
सूर्यप्रकाश किंवा हवा येत नाही. महादेव मंदिरामागे सीतागुंफा ते रामशेज
किल्ला असा भुयारी मार्ग आहे. या मार्गाचा वापर श्रीराम रामशेज किल्ल्यावर
जाण्यासाठी करत.
मोगलांपासून संरक्षित राहिल्याने रामशेज अजय
रामशेज किल्ला म्हणजे रामशय्या किंवा रामशयन कक्ष जिथे श्री राम भगवान
झोपायला जात असत, अशी आख्यायिका आहे. रामशेज किल्ला संभाजी राजे आणि मराठा
सत्ताधिशांनी मोगलापासून संरक्षित ठेवला. त्यामुळे अखेरपर्यंत अजय
राहिलेल्या रामशेज किल्ला व त्यातील भुयारी मार्गाचा शोध घ्यावा व ते खुले
करण्यासाठी पुरातत्त्व विभागाला आदेश द्यावेत, अशी मागणी जानी यांनी केली.
त्यानुसार पुरातत्त्व विभागाला पुढील योग्य कारवाईसाठी आदेश दिले आहेत.
साधारण १४० वर्षांपेक्षा अधिक काळापासून भुयारी मार्ग बंद आहे. केंद्राने
यात लक्ष घातल्यास रामायणकालीन संदर्भ पुढे येण्यास मदत होणार आहे.
No comments:
Post a Comment