स्वराज्य निर्मिती मध्ये सह्याद्रीच्या पर्वतरागांमध्ये वसलेल्या गडकोटांचा महत्वाचा वाटा होता. या गडकोटांचे असणारे भौगोलिक स्थान हे सुरक्षितत्तेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे होते . याचा प्रत्यय इतिहासातून आपल्याला पदोपदी जाणवतो. शत्रूपासून बचाव करण्यासाठी निसर्गाचाच एक शस्त्र म्हणून कसा वापर होतो हे त्या गडकोटाचे भौगोलिक स्थान दर्शवते . याच मालिकेतील हा किल्ला सदाशिवगड.
कराड शहरा जवळ असलेला सदाशिवगड हा किल्ला कराडहून विटाकडे जाणार्या मार्गावर असलेल्या सुर्ली घाटावर लक्ष ठेवण्यासाठी बांधलेला होता. किल्ला साडे चौदा एकर परीसरावर पसरलेला आहे. किल्ल्याचा घेर बराच मोठा आहे. या किल्ल्यावरुन बराच मोठा प्रदेश दृष्टीक्षेपात येतो. पण संरक्षणाच्या दृष्टीने किल्ल्यावर कोणतेही बांधकाम केलेले दिसून येत नाही. त्यामुळे या किल्ल्याचा उपयोग केवळ टेहळणीसाठी केला जात असावा. याची समुद्र सपाटीपासूनची उंची सुमारे ३०५० फूट आहे.
अफजलखान स्वारीनंतर आदिलशाहीकडून स्वराज्यावर होणार्या पुढच्या स्वार्या नैऋत्येकडून होतील हे लक्षात घेउन शिवाजी महाराजांनी या परिसरात गडाची संरक्षक फळी उभारली, त्यातील सदाशिवगड हा एक शिलेदार. १० नोव्हेंबर १६५९ला अफझलखानाचा वध केल्यावर मराठयांनी केलेल्या घोडदौडीत १३ नोव्हेंबर १६५९ ते फेब्रुवारी १६६० च्या दरम्यान आदिलशाहीच्या ताब्यातील हा परीसर मराठयांच्या ताब्यात आला पण महाराज पन्हाळ्यात अडकल्यावर सिद्दी जोहरने हा भाग परत ताब्यात घेतला. पुढे १६७०-७१ च्या दरम्यान हा भाग परत मराठयांच्या ताब्यात आला. इ.स.१६७६च्या सुमारास शिवरायानी या डोंगररांगेत जे दुर्ग बांधले त्यात सदाशिवगडची उभारणी केली असावी. कराडहून विटा - विजापूरकडे जाणार्या मार्गावर असलेल्या सुर्ली घाटावर लक्ष ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सदाशिवगड किल्ला बांधला. शिवकाळात आणि त्यानंतरही हा किल्ला टेहळ्णीचा किल्ला होता.नंतरच्या काळात या गडाबाबत फारशा नोंदी दिसुन येत नाही. १७१७-१८ च्या किल्ल्यांच्या यादीत हा किल्ला पंतप्रतिनिधींच्या ताब्यात असल्याचा उल्लेख आढळतो.
सदाशिवगडला जाण्यासाठी प्रथम कराडमध्ये यावे लागते. कराडपासून सुमारे 7 किलोमीटर अंतरावर असणार्या या किल्लावर जाण्यासाठी ओगलेवाडी या गावापर्यंत जायला लागते. कराड ते ओगलेवाडीला जाण्यासाठी एसटी, रिक्षा आणि खाजगी प्रवासी वाहनं उपलब्ध आहेत. विटा, पुसेसावळीमधून ओगलेवाडी असा दुसरा मार्ग आहे. ओगलेवाडीत रेल्वे स्टेशन असल्यामुळे रेल्वेनंसुद्धा प्रवास करुन येवू शकतं .
जावे कसे : -
गडाला चार माच्या आहेत.माची हि संकल्पनाच शिवकालीन दुर्गबांधणीचे वैशिष्ट्य असल्याने सदाशिवगड हि नक्कीच शिवाजी महाराजांची दुर्गनिर्मिती असावी.
सदशिवगडाखाली घेर्या मध्ये जिथे जिथे वस्ती आहे ते भाग हजार माची, बाबर माची, राजमाची आणि वनवास माची (गडमाची) या नावांनी ओळखले जातात. या प्रत्येक वस्तीतून गडावर येण्यासाठी पायवाटा आहेत. यातील हजार माची पासून गडावर जाण्यासाठी पायर्या बांधलेल्या आहेत. पायर्यांपर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता आहे. खाजगी वहानाने थेट पायर्यांपर्यंत जाता येते. किल्लेभ्रमंती साठी पायपीट करायाची असेल तर सांगली जिल्ह्यातील खंबाळे, कराड - विटा मार्गावरील राजमाचीसह, बाबरमाची या तीन गावातूनही गडावर जायला पायवाट आहे. 
गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या ओगलेवाडी पासून पूर्व बाजूला अंदाजे दोन किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. ९८२ पायऱ्यांचं अंतर पार करूनचं आपल्याला गडावर पोहचता येत.
शासनाकडून हवी तशी गडकोटाची देखभाल होत नाही. गडकोटांच्या संवर्धन आणि सुशोभिकरणासाठी तसच सोयी - सुविधा उपलब्ध करण्यासाठी निधी मिळत नाही, अशी ओरड आपण गेली कित्येक वर्षं ऐकतो. या गडावर मात्र आपल्याला वेगळेच पण समाधानकारक चित्र पाहायला मिळते. गडावर जाण्यासाठी असणार्या पायर्यांचे काम 1990 साली हाती घेण्यात आलं. त्यासाठी गडकऱ्यांनी शासनाच्या मदतीची प्रतिक्षा न करता आर्थिक मदत उभी केली. हे सर्व सहकारी "सदाशिवगड मावळा प्रतिष्ठान"च्या माध्यमातून हे काम करत आहेत.
सदाशिवगड मावळा प्रतिष्ठान यांनी सामाजिक संदेश देण्याचा स्तुत्य असा उपक्रम राबवला आहे. गड चढायला सुरुवात केल्यापासून हे संदेश आपले लक्ष वेधून घेतात.
![]() |
| गडावरून दिसणारी कोयना नदीचे पात्र |
![]() |
| टुमदार गाव ते काय असते ते या फोटो वरून लक्षात येते. |
गडावर चढत असताना पश्चिम बाजूला पाटण बाजूकडून येणारी कोयना नदी आणि त्यालगत वसलेलं कराड, मलकापूरसह आगाशिव डोंगर, वसंतगड परिसराचं दृश्य पाहायला मिळत. उत्तर बाजूला संपूर्ण मसूर परिसर पहावयास मिळतो. तर दक्षिण बाजूला टेंभू प्रकल्प, कार्वे पूल आणि सांगली जिल्ह्यातील चौरंगीनाथांचा डोंगर तसेच ऐतिहासिक किल्ले मंच्छिंद्र गडापर्यतचा परिसर दृष्टीस पडतो.

पायऱ्या चढुन वर आल्यावर शेवटच्या टप्प्यात वरील बाजूस
एका बुरुजाचा व तटबंदीचा तळातील दगडांचा थर पहायला मिळतो. गडपणाचे
तटाबुरुजाचे इतकेच अवशेष आपल्याला सद्यस्थितीत पहायला मिळतात. गडाची उंची
समुद्रसपाटीपासुन २६६५ फूट असुन पुर्वपश्चिम पसरलेल्या या गडाचा परीसर २५
एकरपेक्षा जास्त आहे. पायऱ्या संपल्यावर सरळ जाणारी वाट मंदिराकडे जाते तर
डावीकडील वाट एका चौकोनी मोठया विहीरीकडे जाते. चिंचेच्या झाडाखाली असलेल्या या विहीरीला चिंच विहिर या नावाने ओळखतात. या विहिरीत पाणी असले तरी
पिण्यासाठी ते योग्य नाही.
![]() |
| याच काय त्या ऐतिहासिक खुणा ज्याच्यावरून इथे पण इतिहास घडला हे दिसून येते. |
विहीर पाहुन मुळ वाटेने मंदिराकडे जाताना वाटेत
एक दगडी ढोणी व उध्वस्त वास्तुचा चौथरा दिसतो.
या विहिरीत उतरण्यासाठी पायर्या आहेत. या विहिरीला बारमाही पाणी असते. अलीकडच्या काळात गडाच्या वायव्येकडील भागात विहीर खणन्यासाठी झालेल्या उत्खनन कार्यात एक शिवलिंग सापडले आहे,आणि ते त्या विहीरीच्या आतमध्ये भिंतीलगत पुनःस्थापित करण्यात आलेले आहे. विहीर पाहून गडावरील मंदिराच्या दिशेने निघाल्यावर एक कोरडा तलाव दिसतो. या तलावा जवळ नक्षत्र उद्यान बनवलेल आहे. तलावाच्या पुढे महादेवाचे (सदाशिवाचे) मंदिर आहे. मंदिर दगडी बांधकामातील असुन त्यावरील कळस मात्र नव्याने बांधला आहे. या मंदिरात १५ ते २० जणांची राहण्याची सोय होऊ शकते. मंदिराच्या समोर एक मोठी विहीर आहे. या विहिरीला बारमाही पाणी असते.या विहीरीतील पाणी पिण्यासाठी वापरले जाते. महाराष्ट्रातील बहुतांशी गडाची नावे हि त्या गडावरील देवता वा गडाच्या घेऱ्यात असलेले गाव यावरून पडलेली आहेत. गडावर असणाऱ्या महादेवाच्या मंदिरामुळे या गडाला सदाशिवगड नाव पडले आहे.विहिरीच्या बाजूला कड्या लगत हनुमानाचे मंदिर आहे.

महादेवाचे दर्शन घेउन विहीरीच्या पुढे थोडे अंतर चालत गेल्यावर एक उद्यान आहे. पाच वर्षापूर्वी गडावर सदाशिव गार्डन विकसित करण्यात आलय. आज या ठिकाणासह अंदाजे साडेसहा हेक्टर परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात येतीय. त्याचबरोबर "नक्षत्र" उद्यान विकसित करण्यात येणार असून यामध्ये औषधी तसच आयुर्वेदिक उपचारासाठी उपयुक्त ठरतील अशा वृक्षांची लागवड करण्यात येतीय. गडकरी, शिवभक्त यांनी एकत्र येवून गडावर आर्थिक मदतीतून इथं स्वच्छतागृह देखील उभारलीयत.
शासकीय मदतीची वाट न बघताआपले दायित्व म्हणून समाजातून निधी जमा करून असा प्रकारे गड संवर्धन केले तर स्वराज्याचे शिलेदार राज्याच्या पर्यटन आणि वैभवात आणखी भर घालतील, हे निश्चित.
हे उद्यान उजवीकडे आणि दरी डावीकडे ठेवत किल्ल्याच्या झेंडा लावलेल्या ईशान्य टोकाकडे चालत जावे.
उद्यानाच्या पुढे एक कोरडा पडलेला मोठा तलाव आहे. तो पाहून पुढे गेल्यावर किल्ल्याच्या ईशान्य टोकाच्या अलिकडे डाव्या बाजूला दोन पाण्याची टाकी आहेत. या ठिकाणी गडाचा
दरवाजा असल्याच्या खुणा दिसुन येतात. या ठिकाणी खडकात खोदलेले अजुन एक
पाण्याचे टाके पहायला मिळते. गडाच्या पूर्वेकडे थोड्या अंतरावर आपण लहान उंचीची,मध्यम आकाराचे दगड रचून बांधण्यात आलेली तटबंदीपण पाहू शकतो. 
थोडे पुढे गेल्यावर उजव्या बाजूला कड्याला लागून ३ टाकी आहेत. या ठिकाणी टाक्यांपर्यंत जाण्यासाठी कातळात पायर्या खोदलेल्या आहेत. या टाक्यांमधील पाणी पिण्यायोग्य नाही. 
गडाच्या पूर्व बाजूला सांगली जिल्ह्यातील कडेगाव एमआयडीसीचा परिसर स्पष्टपणे दिसून येतो. तसच सातारा आणि सांगली या जिल्ह्यांना जोडणारा सुर्ली घाट आपल्या दृष्टीस पडतो.या व्यतिरिक्त गडावर इतर अवशेष नाहीत.संपूर्ण गड फिरण्यास अर्धा तास लागतो.गडावर येणारी बहुतांशी मंडळी मंदिराकडूनच मागे
फिरत असल्याने या वास्तुपर्यंत फारसे कोणी पोहचत नाही. पण गड फिरायला
आल्यास या वास्तु आवर्जुन पहायला हव्यात. येथुन परत मंदिराकडे आल्यावर आपली
गडफेरी पूर्ण होते.
संदर्भ :-
१) सातारा जिल्हा गॅझेटीयर
२) www.trekshitiz.com हि वेबसाईट
३ ) एतिहासिक कर्हाड- विध्याधर गोखले
४) सुरेश किसन निंबाळकर, भगवान चिले यांचे लिखाण
















No comments:
Post a Comment