सातारा शहराच्या पूर्वेला नजर टाकली कि सह्याद्रीची शंभु महादेव डोंगररांगेचे दृष्य दिसते. अगदी डावीकडे उत्तरेला चंदन-वंदन हि दुर्गजोडी,भुताची टेकडी,जरंडेश्वराचा उत्तुंग पहाड, दुर क्षितीजावर वर्धनगड, पाटेश्वराचा डोंगर परिसर्,जानाई-मळाई डोंगर अशी प्रचंड मोठी पसरलेली रांग दिसते. याच रांगेत सपाट माथ्याचा,कातळकडे असलेला आणि माथ्यावर एका प्रचंड वृक्षाचा तुरा असलेला डोंगर लक्ष वेधून घेतो.हल्ली या परिसरात मोठ्या प्रमाणात पवनचक्क्यांची उभारणी झाली आहे. पवनचक्क्यांचा गराडा या गडाला पडलेला आहे.शिलाहारकालीन प्राचीन खुणा वागवणारा हा गड आहे कल्याणगड उर्फ नांदगिरी.
या किल्ल्याच्या इतिहासात डोकावल्यास ,कल्याणगडाचेच दुसरे नाव म्हणजे ‘नांदगिरीचा किल्ला’ सातारा येथे सापडलेल्या ताम्रलेखानुसार शिलाहार राजा दुसरा भोज याने या किल्ल्याची निर्मिती केली. हा किल्ला इ.स. ११७८ ते इ.स. १२०९ या कालावधीत बांधला गेला असावा. शिलाहाराच्या सापडलेल्या अनेक ताम्रपटावरून असे दिसते की शिलाहार राजांनी जैन लोकांना अनेक दानधर्मे केली, आणि कल्याणगडावरील गुहेत असणाऱ्या पार्श्वनाथाच्या मूर्तीवरून ह गडा शिलाहारांनी बांधला असावा हे सिद्ध होते. इ.स. १६७३ मध्ये शिवरायांनी सातारा व आजुबाजूचा प्रदेश जिंकून घेतला. त्यातच कल्याणगडाचा देखील समावेश होता. पुढे शिवकालानंतर याचा सर्व कारभार प्रतिनिधींकडे सोपवला गेला. इ.स. १७७३ मध्ये पहिले बाजीराव पेशवे व श्रीपतराव प्रतिनिधी यांच्यामध्ये शाहु महाराजांच्या दरबारी तंटा सुरु झाला.त्यानंतर त्याची व्यवस्था प्रतिनिधींकडून काढून पेशव्यांकडे दिली गेली.
इ.स. १७११ मध्ये मेजर प्राईस याने किल्ल्याचे वर्णन असे केले आहे,'दुरुन हा किल्ला एखाद्या मोठ्या गलबताप्रमाणे दिसतो.याच्यासमोर एक टेकडी आहे व माथ्यावर बरीच देवस्थाने आहेत'. इ.स. १८१८ मध्ये एप्रिल महिन्यात लढाई न करता हा गड जनरल प्रिझलरच्या हातात आला.पुढे १८६२ मध्ये इंग्रज सरकारने किल्ल्यांची यादी केली त्यात या किल्ल्यासंदर्भात असे लिहीले आहे कि या किल्ल्याची पडझड झाली आहे,परंतु किल्ल्यात पाणी व दुसरी काही सामग्री नाही'.पण आर.कुक असे लिहीतो कि 'या किल्ल्यासंदर्भात मुख्य चांगली गोष्ट अशी कि येथे पाण्याची सुबत्त्ता आहे.' मराठी राज्यांत हा किल्ला एका तालुक्याचें ठिकाण होतें व येथें खजीना आणि मामलतदार, फडणवीस, सबनीस, हवालदार, दफ्तरदार, २ कारकून, ३ नाईक आणि १६० शिपाई रहात असत. येथील दोन तोफा १८५७ सालच्या बंडांत हलविण्यांत आल्या.

गडावर जावे कसे ?
कल्याणगड हा सातारा विभागात मोडणारा किल्ला आहे. साताऱ्यापासून अर्ध्या दिवसात हा किल्ला पाहून येऊ शकतो. या परिसरातील किल्ले हे मुख्य डोंगररांगेपासून अलग झालेल्या डोंगरावर विराजमान झालेले आहे. या किल्ल्याचे वैशिष्टय म्हणजे चढण्यास सर्वात सोपा. संपूर्ण प्रदेश ऊसामुळे सधन झालेल्या शेतकऱ्यांचा प्रदेश. त्यामुळे एस.टी.ची सोय देखील उत्तम प्रकारची आहे.सातारा शहरापासून सातारा रोड रेल्वे स्टेशनकडे जाणारा मार्ग, महामार्ग ओलांडून जातो. या मार्गावर एस.टी. बसेसची सोय आहे. किंवा पुणे-मुंबईहून रेल्वेनेही येऊन सातारा रोड रेल्वेस्थानकावर उतरता येते. येथून चालत नांदगिरी ऊर्फ कल्याणगडाचा पायथा गाठता येतो. सातारा रोड रेल्वे स्थानकापासून हे अंतर तीन किलोमीटर आहे. किल्ल्यावर जाण्यास एकच वाट आहे. ही वाट पायथ्याच्या नांदगिरी (धुमाळवाडी) गावातून वर येते. सातारा एस.टी स्थानकावरून सातारा रोडला जाणारी गाडी पकडावी. सातारारोड ते नांदगिरी हे ३ कि.मी.चे अंतर आहे. येथून किन्हईकडे जाणारी बस पकडावी किंवा एकदम सातारा ते किन्हई बसने नांदगिरीला उतरावे. गावातून गडावर जाण्यास ४५ मिनिटे लागतात.
गडाशेजारच्या डोंगरावर आता पवनचक्क्या झाल्याने त्याची सामग्री नेण्यासाठी कच्चा गाडीरस्ता जवळपास माथ्यापर्यंत गेला आहे.नांदगिरी गावाच्या अलिकडे हा रस्ता गडाकडे जातो.

या रस्त्याने मोटारसायकल सारखे दुचाकी वाहन किंवा जीपसारखे चारचाकी वहान जाउ शकते.मात्र कारसारखे वहान रस्त्याची अवस्था बघता थेट वरपर्यंत न नेणेच योग्य. तसाही कोणत्याही गड पायी चढला तरच त्यात मजा.
गडावर बघण्यासारखी ठिकाणे :-
समुद्रसपाटीपासून ३५३७ फुट उंचीवर असणारा हा किल्ल्यावर नांदगिरी गावातून जाणार्या पायवाटेने निघालो कि सुरवातीला काही नव्याने बांधलेल्या पायऱ्या आहेत. गावात असलेल्या शाळेपासून अर्धा किमी सपाट अंतर चालून गेल्यावर किल्ल्याची चढाई सुरु होते.
सुरवातीच्या पायऱ्या संपल्यानंतर वाट मुरवाड अशी आहे. या वाटेने आपण चढून उजवीकडील डोंगरदांडावर येतो. या मार्गावर दिशा दाखवण्यासाठी पिवळ्या रंगाचे बाण जागोजाग रंगवलेले असल्यामुळे रस्त्यात भरकटण्याची शक्यता नाही.
या दांडावर आल्यानंतर अर्ध्याडोंगरात एक कोरलेली गुहा आहे. आत पाच सहा दगडी खांब आहेत. यात सध्या पाणी भरलेले आहे. डावीकडे हनुमानाची प्रतिमा कोरलेली. आतील खांबावर मनुष्यसदृश्य प्रतिमा कोरलेली.
येथून
पुढे गडावर जाणारे विजेचे खांब लागतात. या खांबांना धरुनच वाट गडावर
पोहोचते.
महाराष्ट्र माउंटनिअर्स रेस्क्यू कोऑर्डीनेशन सेंटर (MMRCC) चा गिरीप्रेमी संस्थेने लावलेला फलक दिसतो.
गडाचा खडा चढून माथ्याजवळ आलो कि किल्ल्याची तटबंदी जवळ आलेली दिसते.
डाव्या बाजूला किल्ल्यावर जायला रेलिंग ची जोड असलेल्या दगडी पायऱ्या.
गडमाथ्यावर जाण्याआधी उजवीकडे गेलो तर समोर कातळात खोदलेल्या एक विस्तीर्ण गुहा दिसते.कोणीतरी तिथे शंकराची मूर्ती ठेवलेली.
कल्याणगडाचा नकाशाधुमाळवाडीतून येणारा कच्चा गाडी रस्ता इथपर्यंत येतो. दुचाकीच नाही तर जीप इथपर्यंत येते. परिसरातील ग्रामस्थ असे सांगितात की कल्याणगडावर पवनचक्की उभारायची होती. ग्रामस्थांनी विरोध केला. समोरच्या डोंगरावर पवनचक्की उभारायला संमती दिली. धुमाळवाडी पासून कल्याणगडावर येणारा रस्ता करून घेतला.

इथून जैन मंदिराकडे जाण्याचा मार्ग दाखवणारी खुण आहे.

किल्ल्यावर जाण्यासाठी उजवीकडच्या दगडी पायऱ्या चढायला सुरुवात करावी. पूर्व बाजूला असला तरी उत्तराभिमुख असा कल्याणगडाचा पहिला दरवाजा आहे. या दरवाजाच्या खालच्या पायऱ्यांचा दुरुस्तीचे काम सध्या चालू आहे. दरवाज्याला लोखंडी दार! एका बाजूला फिरता दरवाजा (Revolving door). नक्षीदार दरवाजा आणि फिरते गेट छान दिसते. नांदगिरी उर्फ कल्याणगड तसा आडवाटेवरचा किल्ला! पण या किल्ल्याला भेट देणार्या किल्ले प्रेमी मंडळीपेक्षा भक्त मंडळीच मोठ्या संख्येने असतात.सहाजिकच या सोयी केलेल्या आहेत.
दरवाज्यातून आत गेल्यावर बाहेरील सुंदर हरित निसर्ग

मार्गावर उजवीकडे नंदीशिल्प आणि छोट शिवमंदिर!
श्री. १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन गुफा मंदिर अर्थात लेणीत खाली जायला खाली काही पायऱ्या दिसतात.
ईथे खरा थरार सुरु होतो. पादत्राणे आणि सॅॅक बाहेरच ठेवावीत.हातात टॉर्च घ्यावा आणि एक अविस्मरणीय अनुभव घ्यायला सज्ज व्हावे.या गुहेत शिरण्या अगोदर काही काळजी घेणे क्रमप्राप्त आहे. या कड्यातील गुहेचे जे तोंड आहे. याच्यावर आठ दहा फूट ते वीस फूट उंची वर मधमाशांची एक दोन पासून पाच सात अशी पोळी लटकलेली असतात. कांदा – लसूण अथवा धुम्रपान याने मोहोळ उठण्याची शक्यता असते. गुहेमधे पूर्णपणे अंधार आहे. त्यामुळे टॉर्चच्या उजेडातच आत शिरावे लागते. गुहेमधे पाणी आहे. हे पाणी पिण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे चप्पल बूट बाहेर काढूनच आपल्याला आत जावे लागते.
पावसाळ्याच्या काळात गेले तर या लेण्यात पाणी भरलेले असते.कदाचित ते छाती किंवा त्याच्याही वर मानेपर्यंत असते.त्यामुळे जाण्याचे धाडस होईल असे नव्हे.तेव्हा या गडावर उन्हाळ्यात आल्यास पाणी पातळी कमी असल्यामुळे सहजगत्या आतपर्यंत जाउ शकतो. गुहेच्या मुखापाशी पोहचून समोर नजर टाकली तर फक्त अंधार, काहीच दिसत नाही.मात्र थोडे धैर्य एकवटून पुढे निघालो आणि टॉर्चा उजेड पुरेसा असेल तर पुढची मार्गक्रमणा अवघड नाही.मात्र ईथे पुरेसा प्रकाश देणारा टॉर्च सोबत बाळगावा.मोबाईलचा उजेड पुरेसा होत नाही.तेव्हा पुर्ण तयारीने ईथे गेलेले बरे.














संदर्भ :-
१) सातारा जिल्हा गॅझेटीयर
२) साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !! - प्र.के.घाणेकर
३) शोध शिवछत्रपतींच्या दुर्गांचा -सतिश अक्कलकोट
४) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
५) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
६) www.trekshitiz.com हि वेबसाईट
७) महाराष्ट्र देशातील किल्ले - चिंतामण गोगटे
८ ) http://www.savitakanade.com/ हा ब्लॉग























No comments:
Post a Comment