Sunday, February 7, 2021

पांडवगड

 "समरभूमिचे सनदी मालक शत युद्धांचे मानकरी, 

रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी "

          कविवर्य कुसुमाग्रज यांच्या " निर्धार " या कवितेत मराठी माणसाच्या क्षात्रतेजाचे आशयपूर्ण शब्दांनी वास्तव मांडले आहे. ही कविता मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य करते. ह्या कवितेच्या मनातील ओळी नकळत ओठांवर येतात, ते एकमेव ठिकाण म्हणजे सह्याद्रीच्या डोंगररांगातील किल्ले पाहताना. होय किल्लेच! सातारा जिल्ह्यातील बहुतेक किल्ल्यांची निर्मिती पन्हाळ्याचा शिलाहार भोज (दुसरा) राजाच्या कालखंडात झालेली आहे. याच जिल्ह्यातील वाई तालुक्यात "पांडवगड" नावाचा ४१८५ फूट उंचीचा गिरिदुर्ग इतिहासप्रेमी व भटक्यांच्या आवडीचे ठिकाण आहे. आडवाटेवरचे किल्ले करायचे झाले तर अनेकांच्या मनात सहजा सहजी न डोकावणारा परंतु अवशेषांनी संपन्न असलेला प्राचीन किल्ला म्हणजे वाई जवळचा पांडवगड. वाई शहरातूनही या पांडवगडाचे दर्शन होते, माथ्यावर आगपेटीची डबी ठेवल्यासारखा हा गड दिसतो.  प्राचीनकाळात वैराज नावाचे निबीड अरण्य असलेले ठिकाण म्हणजे आजचे ऐतिहासिक व सांस्कृतिक वाई नगरी. भोर तालुक्यातील मु-हा रायरेश्वर पासून निघालेल्या सह्याद्रीच्या महादेव डोंगररांगेतील एका डोंगरावर हा किल्ला आहे. या किल्ल्याच्या एका बाजूला भक्तांना पावणारी मांढरदेवची माता काळश्री देवीचे मंदिर आहे. दुसऱ्या बाजूला केंजळगड, धोम धरण, कमळगड, वैराटगड, वाई, मेणवली ही प्रसिध्द ठिकाणे आहेत. संपूर्ण वाई तालुक्याच्या जनजीवनावर कृष्णानदीच्या पवित्रेतेचा निर्मळ संस्कार झालेला आहे, किंबहुना ही कृष्णा नदी म्हणजे या तालुक्याची जीवनवाहिनीच आहे.

 इतिहास :- 

या किल्ल्यावर इतिहासकाळात विशेष घटना घडल्याची नोंद आढळून येत नाही. वाई ही महाभारतातील राजा विराट याची नगरी होती, तर राजा विराट हा वैराटगडावर रहात होता.अज्ञातवासात पांडवांचे वास्तव्य या किल्ल्यावर होते म्हणून या किल्ल्याचे नाव पांडवगड पडले असे स्थानिकांच्या बोलण्यातून येत असले तरी त्याला कोणताही सबळ पुरवा मात्र उपलब्ध नाही. चालुक्र्‍यांच्या राज्यानंतर शिलाहारांनी पन्हाळा - कोल्हापूर दख्खन या भागावर राज्य चालविले. १९९१ - १९९२ मध्ये सापडलेल्या ताम्रलेखानुसार सातारा परिसरातील ईतर गडाप्रमाणेच हा गडही पन्हाळ्याचा शिलाहार राजा दुसरा भोज ( इ.स. ११७८- ११९३) याने बांधला.इ.स. १६४८ च्या उल्लेखाप्रमाणे आदिलशहाचा वाई ईथला मोकासेदाराच्या ताब्यात हा गड होता. प्रतागडच्या रणसंग्रामाच्या अगोदर पासून आदिलशाही सत्तेच्या अमलाखाली होता, तो पुढे ही त्यांच्याच ताब्यात होता. ७ आक्टोबर १६७३ रोजी मावळ्यांनी स्वराज्यात तो दाखल केला असल्याची नोंद आढळून येते. मात्र ती चुकीची असावी ,कारण मोरोपंत पिंगळे व निळो सोनदेव यांनी २६ ऑक्टोबर १६७१ रोजी त्रिंबक व्यंकटेश यांना लिहीलेल्या पत्रात उल्लेख आहे "शिवछत्रपती रोहिड्याहून पांडवगड पाहून येणार होते".म्हणजे गड या पत्रापुर्वीच म्हणजे सन १६७० ते ऑक्टोबर १६७१ पुर्वीच ताब्यात घेतला होता.संभाजी राजांच्या कारकिर्दीत गड मराठ्यांच्या ताब्यात होता.पुढे छ. संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या सरदार शेख निजामाने संगमेश्वरला कैद केल्यानंतर छ. राजाराम महाराज दक्षिणेतील जिंजीच्या किल्ल्याच्या आश्रयास जाताना याच पांडवगड मार्गे गेले होते. म्हणजेच इ. स. १६७३ पासून हा किल्ला स्वराज्यात होता हे अधोरेखीत होते.ताराबाईकालीन कागदपत्रात उल्लेख आहे कि झुल्फीकारखानाने रायगडाला वेढा घातला असताना गिरजोजी यादव लिहीतात "वेढीयातून निघोन कांगोरीस आलो. तेथून युक्तीने निघोन रोहिडा,पांडवगड्,वैराट्गड्,सातारा,परळी या किल्ल्यावरुन पनालेस राजश्री स्वामी ( छत्रपती राजाराम महाराज ) जवळी आलो".  इ. स. १७०१ मधे मोगल बादशहा औरंगजेबाने पांडवगडास मराठ्यांकडून आपल्या ताब्यात घेतले. औरंगजेबाच्या निधनानंतर शंभू पुत्र छ. शाहू महाराजांनी त्याला स्वराज्यात दाखल केले. छ. शाहू महाराजांच्या काळात मराठी सैन्याच्या छावण्या उंब्रज गावाजवळ असताना हरणाच्या शिकारीवरून धनाजी जाधव पुत्र सेनापति चंद्रसेन जाधव व बाळाजी विश्वनाथ यांच्यात तंटा निर्माण झाला होता. त्यानंतर मराठा दौलतीच्या या दोन्ही मात्तबरांमधे निरा या गावाजवळ एकमेकांशी संघर्ष झाला. यात बाळाजी विश्वनाथ यांचा पाडाव झाल्याने भोर संस्थानच्या अधिपतीकडे मदत मिळावी म्हणून ते पुरंदर किल्लामार्गे, भोर येथे आले पण त्यांना मदत मिळाली नाही. चंद्रसेन जाधवांच्या सैन्याची तुकडी त्यांच्या मागेच आली होती, तेव्हा बाळाजी पांडवगडच्या आश्रयास गेले. मागोमाग आपल्या सैन्यानिशी आलेले सेनापति चंद्रसेन जाधवांनी पांडवगडाच्या पायथ्याशी तळ ठोकला. अशावेळी बाळाजी विश्वनाथांनी आपले विश्वासू सहकारी अबाजी पुरंदरे यांस छ. शाहू महाराजांकडे सातारा येथे पाठविले. तेव्हा शाहु महाराजांनी बाळाजींना अभय देउन चंद्रसेन जाधवांना वेढा उठविण्यास सांगितले.मात्र चंद्रसेन यांनी उलट निरोप पाठविला कि "बाळाजीस आमच्या स्वाधीन करावे नाहीतर स्वामींचे पाय आम्हास अंतरतील".शाहु महाराजांना या उध्दट निरोपाचा राग आला आणि त्यांनी अहमदनगर येथे असलेल्या हैबतराव निंबाळकरांना तातडीने पांडवगडला येण्याची आज्ञा केली. ही सर्व माहिती चंद्रसेन जाधवांस मिळताच, त्यांनी पांडवगड पायथ्याशी असलेला तळ हलविला परंतु हैबतरावांनी त्यांचा पाठलाग करून निरा गावाशेजारीच असलेल्या जेऊर येथे जाधवांचा पराभव केला. त्यानंतर इ. स.१८१७ साली पेशव्यांनी पांडवगड येथे त्र्यंबकजी डेंगळे यांच्याकडे तोफेचे १०० गोळे देऊन इंग्रजांशी झगडा सुरू ठेवला मात्र इंग्रजांच्या वतीने मेजर थॅचर याने २४ मार्च १८१८ रोजी मराठ्यांचा पराभव करून पांडगडला ताब्यात घेतले. पांडवगडावर फार मोठे लष्करी सैन्य व मानवी वस्ती नसावी. मात्र आजूबाजूच्या गावांचा राखणदार म्हणून याने नक्कीच योगदान दिले असणार यात तिळमात्र शंका नाही. निसर्गाच्या संपन्नतेने नटलेल्या व आपल्या इतिहासाचा वारसा असलेल्या सह्याद्रीच्या गिरिदुर्गास एकदा भेटायला गेले पाहिजे. त्याच्या मुखातून मराठ्यांच्या पराक्रमाची कथा ऐकून भविष्याची वाटचाल करण्याची नक्कीच प्रेरणा मिळेल असा ठाम विश्वास आहे.

पोहोचण्याच्या वाटा :

१) मेणवली गावातून :-
वाई ते मेणवली सतत गाड्यांची ये जा चालू असते. मेणवली गावा जवळून धोम धरणाचा जो कालवा गेला आहे, तो पार केल्यावर समोरच पांडवगड दिसू लागतो. समोर असणा‍‍र्‍या पठारावर गेल्यावर दोन वाटा फुटतात. येथपर्यंत येण्यासाठी गावातून अर्धातास लागतो. दोन वाटांपैकी एक वाट लांबची आणि वळसा घालून जाणारी आहे. जवळपास अडीच तासात गडावर पोहोचवणारी, उभ्या चढणीची वाट.पहिल्या वाटेने पायथ्यावरुन गडावर जाण्यास १ तास लागतो. या पठारावर कोळी लोकांची वस्ती आहे.वाईवरुन मेणवलीला जाण्यासाठी दर अर्ध्या तासाला बससेवा उपलब्ध आहे.

२) गुंडेवाडी गावातून :-
दुसरी वाट गुंडेवाडी गावातून वर जाते. वाई - धावडी मार्गे गुंडेवाडी गावातून वर पोहचावे. गुंडेवाडी गावातून चांगली मळलेली आणि काही ठिकाणी अलिकडेच बांधलेल्या पायर्‍यांची सोपी वाट आहे. गुंडेवाडी येथून श्री. बाळू कोंडके यांच्या घराशेजारून जाणारी, तासाभरात गडावर पोहोचवणारी सोपी वाट. ही दुसरी वाट उभ्या चढाईची असली तरी वळणदार रस्ता व दाट जंगल यामुळे चढण्यास सोयीची पडते. सकाळी लवकर उन्हे चढायच्या आत आपण चढाई ला प्रारंभ केला तर उत्तम. ह्या मळलेल्या व वळणा वळणाच्या वाटेने आपण लगेचच उंची गाठतो व जवळपास तीस ते चाळीस मिनिटात आपण गडाच्या पहिल्या टप्प्यावर पोहोचतो. येथून आपल्याला मांढरदेवीचा डोंगर व भोवतालचा मुलुख दिसतो. पुढे अजून अर्धा तासाच्या चढाई नंतर आपण गडमाथ्यावर येतो. वाटेत काही पायऱ्यांचे अवशेष दिसतात. यावाटेने गडमाथा गाठण्यास २ तास पुरतात.पुणे ते वाई व सातारा ते वाई अशी महामंडळाच्या बस आहेत.वाई येथून मांढरदेवला जाणाऱ्या बसने गुंडेवाडी येथे उतरवावे. गुंडेवाडीतून वाईला जाण्यासाठी दर दीड तासाला महाराष्ट्र शासनाच्या एस टी बसेस उपलब्ध असतात. निवास व भोजनाची व्यवस्था वाई येथे होऊ शकते.

  हा किल्ला पुणे व सातारा जिल्ह्याच्या सीमेवर असल्याने पुणे जिल्ह्यातील भोर या तालुक्याच्या गावाहून देखील येथे जाता येते. भोर मधील संस्थानकालीन ऐतिहासिक राजवाडा पाहून मांढरदेव घाटाने जाता येते. घाट चढून गेल्यावर खिंडीमधे असलेले संस्थानकाळातील विश्रामधाम व अन्नछत्र पाहता येईल. येथील डोंगरावर पूर्वीच्या काळात तांबे या धातूच्या खाणी होत्या, तर सोमेश्वरांचे प्राचीन सुरेख मंदिर पाहता येईल. भोरच्या ताईसाहेब सचिवांच्या मनात मांढरदेव व येरुली हा परिसर महाबळेश्वरसारखा विकसित करायचे मनात होते.जवळच्या डोंगरावर भाविकांच्या मनोकामना पूर्ण करणारी मांढरदेवची काळश्री किंवा काळूबाईचे मंदिर आहे. याच रस्त्याने वाईकडे जाताना घाट उतरल्यावर गुंडेवाडी हे गाव रस्त्याच्या डाव्या बाजूस असून त्याच गावाची लहान वस्ती उजव्या बाजूला रस्त्यालगत आहे.

याशिवाय धावडी गावातूनही गडावर जाता येते. पायथ्याचे धावडी गाव बऱ्यापैकी सधन असून ह्या गावात मुक्काम करायचा झालाच तर शाळेच्या आवारात सोय होऊ शकते. परंतू गावकऱ्यांकडून मदतीची कसलीही अपेक्षा न ठेवता आपले सर्व सामान सोबत ठेवावे.वाई मांढरदेव मार्गावर धावडी हे गाव. वाईहून याचे अंतर सात किलोमीटरचे. खरेतर या गावात जायचेच नाही. या धावडी गावचा फाटा जिथे लागतो त्याला मागे टाकत तसेच पुढे मांढरदेवच्या दिशेने अर्धा एक किलोमीटर गेलो की, पांडवगडाला खेटून एक-दोन घरांची वस्ती लागते. कोंडके आडनाव बंधूंची ही घरे. या घराशेजारूनच एक वाट पांडवगडाकडे निघते.पांडवगडाच्या अगदी पायाशी ही घरे. इथून हा गड आणि त्याचा कातळ एकदम अंगावर येतो. पायातले बूट, पाठीवरची सॅक घट्ट करायची आणि खंबीर पावलांनी गड चढू लागायचे. 

 या धावडी गावाविषयी थोडे अधिक लिहायला हवे.धावडी गावाहून पांडवगडाला जाताना काहीशी अपरिचित लेणीसमुह देखील पाहता येईल. त्यातील एका लेण्याची लांबी ७ मीटर, रूंदी २ मीटर व उंची ३ मीटर असून त्यात दीड मीटर परिघाचा दागोबा आहे. या गुहेशेजारीच दोन मीटर औरसचौरस खोदीव गुहेतील शिवलिंग अतिशय सुबक आहे. हिच्या शेजारीच आठ खोल्यांचा भव्य विहार आहे. वाई तालुक्यातील पांडवगडाच्या पूर्व पायथ्याशी असलेल्या वाघमाळ (रेणुसेवस्ती) येथे डोंगर उतारावर दोन प्राचीन बौध्दकालीन लेण्यांचा शोध लागलेला आहे. या लण्याचा शोध घेण्यासाठी भटकंती सह्याद्रीची परिवरच्या मावळ्यांनी मेहनत घेतली. त्यांनी पुरातत्व विभागाशी संपर्क साधला आहे.

   वाईतील भटकंती सह्याद्रीची परिवाराच्या दोन मावळ्यांनी ऐतिहासिक शोध घेण्यासाठी सकाळी बाहेर पडले. पांडवगडाच्या डोंगर चढायला सुरुवात केली. पावसात भिजलेली वाट आणि काटय़ाकुठे तुडवत दुपारी दीड वाजता त्यांना यश आले.दुपारी दीड वाजता डोंगराच्या कपारीत कोरीव लेणी दृष्टीस पडली.मग आणखी उत्सुकता लागून राहिली.पुढे आणखी लेण्या सापडल्या.त्यांनी लेण्यांची मोजमापे घेतली.त्यांनी या लेण्याबद्दल पुरातत्व विभागाला माहिती दिली आहे.मात्र, या लेण्या सापडल्याने आणखी उत्सुकता लागून राहिली आहे.

या लेण्यांचा सातारा गॅझेटमध्ये उल्लेख

वाई येथील पांडवगडाच्या पूर्व पायथ्याशी असलेल्या वाघमाळ (रेणुसेवस्ती) येथे डोंगर उतारावर दोन प्राचीन बौध्दकालीन लेण्यांचा शोध लागलेला आहे. हे लेणीसमूह दुस्रया किंवा तिस्रया शतकात कोरले गेले असण्याची शक्यता आहे. वाघमाळाच्या नैऋत्य आणि वायव्य दिशेला हे दोन लेणीसमूह असून, त्यातील नैऋत्य दिशेच्या लेणीसमूहात एकूण चार लेण्या आहेत. त्यातील तीन लेण्या डोंगरावरून येणाया पावसाच्या पाण्यामुळे गाळात पूर्णपणे मुजलेल्या आहेत. चौथ्या क्रमांकाची विहार लेणी असून यामध्ये चार भिक्खू निवासगृहे व त्यामध्ये बसण्यासाठी बाक कोरलेले आहे. तसेच लेणीच्या मधोमध चौकोनात एक बाक कोरलेला आहे. वायव्य दिशेच्या लेण्यांमध्ये एक पाण्याची पोढी (टाकं), आठ भिक्खू निवासगृह असणारे विहार असून सद्यस्थितीत या विहारात आठ फूटाचा गाळ साचलेला आहे. याच्या उजव्या बाजूला चैत्यगृह कोरलेले असून त्यात स्तूप कोरलेला आहे. याला लागूनच अजून एक चौकोनी खोली कोरलेली आहे. या लेण्यांचा सातारा गॅझेटमध्ये उल्लेख असून भारतीय पुरातत्त्व विभागाकडे नोंद याची नाही. पांडवगड परिसरात अजून काही लेण्या बुजल्या असण्याची शक्यता आहे. त्याविषयी भटकंती सह्याद्रीची परिवाराच्या शोधमोहिमा चालू आहेत.

   आपण दोन्ही वाटांची माहिती घेउ. आधी गुंडेवाडीकडून चढणार्‍या वाटेची माहिती घेउया. किल्ल्यावर जाणाऱ्या इतर पायवाटांच्या तुलनेने ही कमी श्रमाची आहे.हि वाट घनदाट झाडीतुन वर चढते,पक्ष्यांचे गुंजन आपले सोबती असते. किल्ल्याची चढण चढत असताना आजूबाजूला असलेल्या लहान मोठे वृक्ष, वेली, जाळ्या आपल्याला शितल छाया व हवेतील गारवा देत असतात. वाटेत एक झोपडी दिसते.डोंगरावरील जंगलात रानडुक्कर, बिबट्यांचा वावर आहे. गड व्यवस्थित पहायचा असेल तर दिवाळी नंतर जाणे उत्तम जेणेकरून गडावरील झाडोरा बऱ्यापैकी सुकलेला असतो व पायवाट ठळक दिसते. मुळात इकडे फारसे कुणी येत नाही. स्थानिक चार गावकरी-गुराख्यांनी वर्दळीखाली ठेवलेली ही वाट, पण पावसाळा उलटला की या गडावर बेसुमार गवत माजते आणि मग त्याखाली आहे ती वाट देखील झाकून जाते. हे गवतही अगदी राक्षसी! आकाशाकडे धावणारे, चांगले पुरुषभर उंचीचे. गवताच्या या दाटीतूनच मार्ग काढत, शोधत गडाकडे सरकावे लागते. साऱ्या अंगाला कुसळ, काटे टोचू लागतात. सरपटणाऱ्या जिवांचे भय ते निराळेच. खरेतर पावसाळय़ानंतरचा हंगाम भटकंतीसाठी सुगीचा पण पांडवगडाबाबतीत या गवतामुळे तो साफ चुकीचा म्हणावा लागेल. यामुळे इकडे आलात तरी सावधपणे फिरा, पायात बूट तर आवश्यकच!

पांडवगडावरच्या या गवत झाडीत कारवीची दाटीही मोठी आहे. २००८,२०१५ साली ही कारवी फुलली होती. ती फुलली त्यावेळी या गडावर उमटलेल्या निळाईच्या लाटांची आपण केवळ मनोमन कल्पनाच करायची. सात वर्षांची तिची ही बहरवारी आता २०२२ साली पुन्हा फुलणार आहे.सात वर्षांच्या या निसर्ग वेळापत्रकात वाट चुकलेली, शर्यतीत मागे-पुढे झालेली ही झुडपे. कारवीच्या जोडीनेच तेरडा, सोनकी, हळुंदा, लाजाळू कवळा, कोंबडतुरा, तालीमखाना अशा काही अन्य रानफुलांचेही चेहरे उमललेले दिसतात.    

20180408_114618

 तासाभराची चढण झाली कि आपल्याला झाडांवर पाट्या दिसायला सुरु होतात.यानंतर आपण एका सपाटीवर येतो. 
20180408_105151

या वस्तीच्या पाठीमागून जाणारी मळलेली पायवाट धरली की, आपण सुमारे एक तासात किल्ल्यावर पोहोचतो. त्यानंतर आपण शेवटच्या टप्प्यातील काही पायऱ्या चढून एका माचीवर पोहोचतो.

    अचानक कुत्र्याच्या मोठ्याने भुंकण्याचा आवाजाने आपली सावध होतो.कुत्र्यापासून सावध रहा, अश्या पाट्याही वाटेत लावल्या आहेत. समोरच्या माची भागात ब्रिटिश काळात घेऊन जाणारा लहान बंगला दृष्टीपथात येतो. कधीकाळी शेर वाडिया या पारसी इसमाने येथील २२ एकर क्षेत्र खरेदी करून हा बंगला बांधला होता. ते जवळपास २० ते २२ वर्षे एकटेच त्या ठिकाणी वास्तव्यास होते.हे शेर वाडीया गडावर एकटेच रहात असताना त्याना अनेक अनुभव आले, जे ते आलेल्या लोकांना सांगायचे.ईथे बिबट्याचा असलेला वावर व त्याने त्यांची अनेक कुत्री खाल्ली हा अनुभव थरारक म्हणावा लागेल. साधे पत्र आणायचे म्हणले तरी त्यांना गुंडेवाडी गाव गाठावे लागायचे. २०१२ मध्ये त्यांचे निधन झाले.एखाद्या ऐतिहासिक गडावरची जागा कुणी विकत घेतल्याची सल मनात बाळगायची का कुणी या अनगड ठिकाणी इतकी वर्षे सन्याशाचे जीवन कसे जगतो याचे कौतुक करायचे हेच कळत नाही. आजमितीस ही बंगल्यासहित सर्व क्षेत्र मॅप्रो व्यवस्थापनाने शेर वाडिया या इसमाकडून खरेदी केलेले आहे. मॅप्रो व्यवस्थापनाने इथे तीन कर्मचारी नियुक्त केलेले असून त्यांच्याकडे असलेल्या कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आपल्याला आलेला असतो. खाजगी मालमत्ता असल्याने रात्री गडावर मुक्काम करता येत नाही. मॅप्रो फूडसच्या खाजगी मालकीची पाटी वाचून आश्चर्याचा धक्का बसतो.गडाच्या पायथ्याला फार्म हाऊसचे प्लॉट नेहमीच दिसतात. पण ईथे तर गडच खाजगी मालकीचा विकत घेतलेला.आपल्या लोकशाहीत धनाच्या जोरावर ऐतिहासिक वास्तूच विकत घेतल्य़ाचे हे ऊदाहरण क्लेषदायक आहे.पुरातत्व विभाग, महाराष्ट्र शासन यांनी याला परवानगी दिली कशी? हा सहाजिक प्रश्न कुठल्याही दुर्गप्रेमीला पडावा असाच आहे.या मागची घटना अशी की पांडवगड कोण्या एका सरदाराची मालमत्ता होती. यानंतर मॅफको कंपनीने तो विकत घेतला. सध्या श्री सर्वोदय वाडीया नावाचे गृहस्थ केअरटेकर म्हणून राहतात. त्र्‍यांनी गडावर मोठया प्रमाणात वृक्षारोपण केले आहे. पिण्याच्या पाण्याच्या टाक्र्‍यांना कुंपण घातले आहे. या गृहस्थाने गडावर एक फलक देखील लावला आहे, त्याद्वारे गडावर मद्यप्राशन ,धुम्रपान मादक पदार्थ सेवनास बंदी घातली आहे.

कंपनीने वर एका बंगलीवजा घरात तीन रखवालदार नेमलेत त्यातला एक पायथ्याच्या कोंडके परिवारातील आहे, पायथ्याच्या गुंडेवाडी गावातील एक मनुष्य - श्री बाळू कोंडके रोज गडावर एक फेरी मारतात. हे ऐकून महाराजांनी स्वराज्य स्थापनेला केलेल्या खटाटोपीचा विसर पोटापाण्याच्या प्रश्नापायी मावळ्यांना पडला काय असा विचार मनात चमकून गेला.असो. याच ठिकाणी मेणवलीकडून चढणारी वाट गुंडेवाडीकडून चढणार्‍या वाटेला येउन मिळते.त्या बंगल्यापासून तटबंदीच्या अलिकडे काहीशा कमी उताराचे सपाट मैदान लागते.

    आता मेणवलीकडून चढणार्‍या वाटेची माहीती घेउया, पांडवगड मेणवलीच्या उत्तरेला वसलेला आहे, गडाच्या मध्यावरून दोन सोंडा गावाच्या उजव्या डाव्या बाजूला उतरल्या आहेत. दोन्हीकडुन वाट आहे.  डाव्या सोंडेवर चढाई सुरू केली कि अर्ध्या तासात धारेवर पोहोचतो आणि पलिकडचे विहंगम दृष्य दिसू लागते. पाचगणीचे टेबललँड, वैराटगड, धोम धरणाचा जलाशय, कृष्णा आणि वाळकी चा संगम, त्यातून खरच कमळासारखा उगवलेला कमळगड असे सर्व दूरपर्यंत स्पष्ट दिसणारे दृष्य डोळ्यात साठवून  घ्यावे आणि पुढे निघावे. 


भैरवनाथ मंदीर, पांडवगड 

एक चार घरांची छोटी वस्ती ओलांडून तासभराची वाटचाल झाल्यानंतर गावकऱ्यांनी सांगितलेल्या खुणेपाशी म्हणजे कौलारू मंदीर असलेल्या माचीवर पोहचतो.भैरवनाथाचे हे मंदीर राहण्यायोग्य असले तरीही नावे लिहून भिंती इतक्या भरवून ठेवल्या आहेत की बाळांसाठी नावे शोधण्यासाठी पांडवगडला येणे वाया जाऊ नये.त्याच्या बाहेरच काही प्राचीन मूर्तीचे अवशेष आहेत. या माचीवरून गडाचे विंचू काट्या सारखे पुढे आलेले टोक दिसते. इथून किल्ल्यावर जाण्यास एक मोठ्ठी चढण पार करावी लागते.  प्रवेशद्वार गाठण्यासाठी गडाला मोठाच वळसा घालावा लागतो. या वळणावर पाण्याची टाकी दिसतात. त्यातील एक बऱ्यापैकी  बुजलेले असून दुसऱ्यात स्वच्छ पाणी आहे. वाऱ्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण क्षरण होऊन बनलेले खांबही दृष्टीस पडतात.

 

 बालेकिल्ल्याचा कातळ समोर दीडेकशे फुट खडा दिसतो. त्याच्या डाव्या बाजूने  कातळाच्या गार सावलीतून गडाच्या उत्तर टोकाकडे चालत राहिले कि वाटेत एक पाण्याचे टाके आहे, तसेच उजवीकडे भक्कम तटबंदी दिसते.  

 
20180408_131342

 वाटेत कड्याला लटकलेली मधमाशांची पोळी दिसतात. 

तेथे कातळात कोरलेल्या काही पायर्‍या आहेत. येथून साधारण १५ ते २० मिनिटांवर गडाचे प्रवेशद्वार लागते. कातळात कोरलेल्या पायर्‍र्‍यांच्या साह्याने थोडे वर गेल्यावर आपण माची सारख्या भागात प्रवेश करतो.

एक अरुंद तोंडाची गुहाही दिसते. त्यात शेंदूर लावलेले दगड देव दिसतात.

 

गुहे शेजारीच कड्यात खोदलेले पाण्याचे टाके तर उजवीकडे खाली दोन पाण्याची सुकलेली टाकी आहेत. यात उतरण्यासाठी खडकात पायऱ्या खोदलेल्या आहेत. मग आपण गडाच्या बंगला असलेल्या सपाटीवर येउन पोहचतो.

 आता आपण प्रवेश करणार आहोत गडाच्या एन माथ्यावर.

येथून आपण बालेकिल्ल्याच्या दिशेने चालत गेल्यावर वाटेत काही अवशेष दिसतात, तर एका ठिकाणी सलग सहा पाण्याची टाकी आढळतात, त्यापैकी एक पाण्याचं टाकं मोठे असून त्याच्या आतील बाजूस खांब देखील आहेत. 

 

 

 
20180408_140251

गडावर एकूण दहा ते पंधरा खोदीव टाक्या, एक-दोन मोठाली तळी देखील. पण या साऱ्यांतले पाणी आणि त्यांचे रंग मात्र पहिल्याहून निराळे.सर्वप्रथम आपण गडाच्या बालेकिल्ल्याला डावीकडे ठेवून पुढे निघालो कि डावीकडे काही पाण्याची टाकी दिसतात. पहिल्या टाक्यातील पाणी थोडे खराब असून पहारेकरी त्यांचा वापर अंघोळीसाठी करतात. 


20180408_124417

पुढच्या दुसऱ्या टाक्यातील पाणी स्वच्छ व पिण्यालायक असून त्यात जंगली जनावरे पडू नयेत म्हणून त्यास जाळीचे कुंपण केले आहे. हे खांब टाके असून ते हा गड शिलाहारकालीन असल्याचा पुरावा देतो. येथील पाणी वर्षभर उपलब्ध असते.बंदिस्त टाक्यातील पाणी लोखंडी वाहिकेतून बंगला परिसरात आणले असून तेच पाणी तेथील कर्मचारी दैनंदिन वापरासाठी व पिण्यासाठी वापरतात. येथे आपल्या बाटल्या भरून पुढे निघालो कि डावीकडे अजून ३ पाण्याची टाकी दृष्टीस पडतात परंतु त्यापैकी कुठल्याच टाक्यातील पाणी पिण्यास योग्य नाहीये. वाटेने पुढे जाताना उजवीकडे कड्या लगत छोट्या तटबंदीचे अवशेष दिसत राहतात. येथूनच आपल्याला धोम धरण व त्यामागील जलाशयाचे मनोहारी दर्शन होते. 

धोम धरणाचा जलाशय

   पुढे निघताच बालेकिल्ल्यातील प्रवेशमार्ग येतो. बालेकिल्ल्याला काहीश्या पायर्‍या व तटबंदी शिल्लक आहे.किल्ल्यात प्रवेश करण्याचा एकमेव मार्ग उत्तरेस असलेल्या दरवाजातून होतो. अनेक वर्षांचा ऊन, वारा, पाऊस यांचा प्रतिकार व डागडुजी न केल्याने दरवाजाची पडझड झाली आहे.
20180408_132527.jpg


 तरीही उजव्या हाताला एक खणखणीत बुरुज, त्याला लागून कडय़ाला समांतर प्रवेशद्वाराची कमान आणि त्यालगत काही अंतरापर्यंत चिरेबंदी तट! किल्ल्यास उत्तरेकडील बाजूस काही प्रमाणात तटबंदी अस्तित्वात आहे, मात्र उर्वरीत बाजूस काळ्या कातळाची नैसर्गिक तटबंदी लाभली आहे. यातील दरवाजाची कमान तेवढी पडलेली, अन्य बांधकाम आजही ताजे. त्याच्याकडे पाहताच पांडवगडाचे दुर्गपण जागे होते. पांडवगडाला चहुबाजूंनी ताशीव खोल कडे यामुळे तटबंदीची आवश्यकता जिथे आहे तिथेच ती घातलेली. 


 

एका मागोमाग असे दोन दरवाज्यांचे अवशेष असून त्यांची कमान शाबूत नाहीये. चिंचोळ्या वाटेने पुढे जाताना डावीकडे  जवळपास १८ फुट उंचीची भक्कम तटबंदी उभी असते. साधारण ४० फुटांवर पुढे उजवीकडे अजून एक बुरुज आपला मार्ग अडवतो. पुन्हा चिंचोळ्या वाटेने मार्गक्रमणा करत व एकूण तीन दरवाज्यातून आपला प्रवेश बालेकिल्ल्यावर होतो. 




20180408_132931

तटबंदीच्या या माऱ्यातून एक वळण घेत आपण बालेकिल्ल्यावर येतो. वर येताच भोवतीचे गवत पुन्हा घट्ट होते. मग यातूनच एकेका अवशेषांची शोधाशोध सुरू करायची. गवताच्या दाटीतच सुरुवातीला मारुतीचे मंदिर येते. आत गेल्यावर दरवाजाच्या बुरूजाच्या बरोबर मागील बाजूला बलशाली श्री हनुमानाचे छोटेखाणी लोखंडी पत्र्याचे आच्छादन असलेले मंदिर आहे. 


हनुमान दर्शनाने आलेला काहीसा शारीरिक व मानसिक थकवा क्षणार्धात नाहीसा होऊन ऐतिहासिक किल्ला पाहण्यास उत्सुक होतो.आतील वीरासानातील मूर्ती पाहण्यासारखी, निराळी. वीर भावातील या बजरंगाच्या हातात चक्क कटय़ारीसारखे एक हत्यार दाखवले आहे.

 

20180408_133054

मारुती मंदिराच्याच पुढे गडावरील चुन्याचा घाणी दिसतो. बांधकामासाठी वापरण्यात येणारे चुन्याचे मिश्रण बनवण्यासाठी याचा वापर होत असावा. किल्ल्यावरील प्रत्येक बांधकामात या चुन्याच्या घाण्याचे योगदान फार मोठे आहे. आजची झालेली पडझड पाहून तो चुन्याचा घाणा, कुणीतरी येईल व त्याच्याकडून पुन्हा चुन्याचे मिश्रण करून पुन्हा या किल्ल्यास गतवैभव देईल या वेड्या आशावादावर ठाम दिसला.याच्या चरातील ते दगडी चाक आता गेल्या काही वर्षांपर्यंत व्यवस्थित होते. पण पांडवगडाच्या या आश्रयाला कुणी ‘कौरव’ आले आणि त्यांनी हे शिल्प तोडून टाकले. ऐतिहासिक वास्तूंची मोडतोड करण्यात आमच्या लोकांचा हात कुणी धरणार नाही. गल्लोगल्लीची रंगीबेरंगी बेढभ मंदिरे आणि चौका-चौकात धूळखात पडलेले पुतळे यांच्याबाबतीत नको इतकी ‘हळवी’ असलेली आमची मने या अशा राष्ट्रीय वारशांच्या मोडतोडीवेळीच कुठे जातात, कळत नाही.

पांडजाई देवीचे मंदीर, पांडवगड 

 

 

येथून पुढे जाणारी एक वाट पांडजाई देवीच्या मंदिरापाशी घेऊन जाते. कधीकाळी जीर्णोद्धार केलेले हे मंदिर सध्या बरीच पडझड झालेल्या अवस्थेत असून छप्पर गळके आहे. मूळ मंदिर पडून गेलेले, पण त्याचे जोते अद्याप शिल्लक. यावरच मागे कधी नव्याने बांधलेले मंदिरही आता पडू लागलेले. अगदीच भग्न अवस्थेत असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा प्रयत्न झाला असल्याचे तेथील लाल विटांवरून लक्षात येत होते. देवीच्या मूर्तीचीही झीज झालेली. 

 

मंदिरासमोर शिवलिंग, नंदी, पादुका, वीर पुरुषाची एक मूर्ती,एक समाधी, दगडी स्तंभ, दगडी दिवा आदी शिल्प दिसतात.गडांवर दिसणारे पाण्यासाठीचे दगडी भांडेही इथे आहे. मंदिराच्या आत पांडजाई देवीची सुबक मूर्ती आहे.हे मंदिर १० मी. लांबीचे व १० मीटर रुंद आकाराचे आहे. पांडवजाई मंदिर परिसर नीटनेटका असल्याने इथे देवीच्या भक्तांचा राबता असावा.  हे सारे पाहात असतानाच झाडीतल्या या मंदिरात जागोजागी मोठाल्या जाडजूड पाली नजरेस पडतात. त्यांचे रानटी रूप पाहून एकक्षण अंगावर काटा उमटतो.

 
20180408_133929

या मंदिराशेजारीच गडावरील एका मोठय़ा घराचे जोते आहे.या इमारतीचा पाया ३० फुट रुंद असा आहे.
20180408_135406

गडाच्या मध्यभागी अनेक ठिकाणी शिबंदीची घरे दिसतात. दारुगोळय़ाची कोठारे, दक्षिणेकडील तलाव, तटबंदी आदी पाहात आपण पुन्हा दरवाज्यापाशी येऊन पोहोचतो. 

20180408_134404

गडाच्या टोकाशी डौलाने फडकणारा भगवा ध्वज

पुढे परतीच्या मार्गावर एका झाडाखाली पिंड!
20180408_124229

  गडावर कोरडी पडलेली पाण्याची अनेक टाकी व तळी आहेत. किल्ल्याच्या अंतर्गत भागात झाडीझुडपे व गवताचे साम्राज्य आहे, भरपूर पाण्याचा साठा व घरांचे अवशेष पाहून असे जाणवते की कधीकाळी ह्या किल्ल्यावर बराच राबता असला पाहिजे. संपूर्ण गडफेरी करायला दीड तास पुरतो.

 

 मांढरदेवीचा डोंगर

 

रौद्रसुंदर दरी, पांडवगड 

 पांडवगडाचा हा सारा प्रवास गवत-झाडीचे ते जंगल बाजूला सारत, वाट काढत सुरू असतो. तसे पाहिले तर बालेकिल्ला फारच छोटा आहे. गडाच्या उत्तरेकडे थोडेसे पठार आहे. लोहगडाच्या विंचुकाट्या सारखा थोडा भाग पुढे आला आहे. यातून एका टोकाला यायचे आणि मग पुन्हा सारा मागचा गड आणि भोवतीच्या दऱ्याखोऱ्यांवर नजर फिरवायची. अगदी सुरुवातीला उत्तरेकडची मांढरदेवीची डोंगररांग आणि तिच्यावरचे चमचमते देवस्थान दिसते. पूर्व दिशेला खंबाटकी घाटाचा डोंगर, त्यापलीकडे नांदगिरी, चंदन-वंदन, वैराटगड रामराम करतात. दक्षिण अंगाला पाचगणी, महाबळेश्वरचे पठार कृष्णेची गाथा घेऊन पुढय़ात येते. त्याला जोडूनच पश्चिम अंगाचा कमळगड आणि त्याअलीकडचा केंजळगड येतो. या साऱ्यांच्या मधोमध चमचमते पात्र होऊन संथ वाहणारी ती कृष्णा येते. तिच्या काठावरची ती धोम, मेणवली आणि प्राचीन वाईनगरी..आणि जणू या साऱ्या देखाव्यावर लक्ष ठेवून असलेला हा पांडवगड! ..जोडला जाऊनही एका तटस्थ नजरेने या साऱ्यांकडे पाहणारा.एका नांदत्या गडाची सर्व लक्षणे असलेला असा हा गड आहे.सर्व गड फिरण्यास दोन तास पुरतात.

पारशी वाड्यात मुक्कामाची परवानगी नाही व गडावर कुठेच मुक्कामाला सोय नाहीये त्यामुळे आपली पावले परतीच्या प्रवासाला वळवायची. आल्या वाटेने गुंडेवाडीला पोहोचायला पाउण ते एक तास लागतो. किंवा दिडतासात मेणवलीला उतरुन जातो.अश्या प्रकारे एकूण साडेचार ते पाच तासात आपला पांडवगड पाहून होतो. अर्थात फक्त पांडवगड बघण्यासाठी ईथे येण्यापेक्षा पांडवगड्,वैराट्गड्,केंजळगड्,वाई शहर्,मेणवली,धोम,पसरणी,जांभळी,कमळगड्,रायरेश्वर, किकलीचे मंदिर, भुईंजचा वाडा,म्हसवे गावातील विस्तृत पसरलेला वटवृक्ष अशी सर्व ठिकाणे दोन-तीन दिवसाची सवड काढून पाहून होतील.

संदर्भ :-
१) सातारा जिल्हा गॅझेटीयर
२) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
३) डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
४) साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !! -प्र.के.घाणेकर
५) श्री. तुषार कोठावदे, सुरेश शिंदे, भोर, सुनील शेडगे ,नागठाणे यांचे लिखाण
६) महाराष्ट्र देशातील किल्ले - चिंतामण गोगटे
७ ) शोध शिवछत्रपतींच्या दुर्गांचा - सतिश अक्कलकोट
 ८) धावडी लेण्यांची माहिती दै. तरुण भारतमधुन
९ ) दै. लोकसत्ता, लोकमत, मराठीमाती.कॉम यातील माहिती
   











गडमाथ्याला जाणारा पायरी मार्ग...
 
उध्वस्त वाड्याचे अवशेष...
 
गडावरील भव्य पाण्याचं टाकं...
 
हे प्रकरण थोडं अचंबित करणार आहे...
गडावरील जागा घेऊन त्या ठिकाणी एका फारसी माणसाचे अस्तित्व होते. घरात तळघर असून जुन्या होका यंत्रणा आहेत.

 
धोम जलाशय...
उत्तर माची...
गड तटबंदी...
 
 
 गडावर बरीच पिण्याच्या पाण्याची टाके दिसून येतात
 
पिण्याच्या पाण्याचे खांब प्रकारातील टाकं
 
कटाळातील गुहा...
 
पश्चिमेकडील कातळ कोरीव टाकं 
 
 खांब टाकं....
 
 आकाशाला भिडणारा बालेकिल्ला...
 
पश्चिमकडील महाद्वार अवशेष...
 
दगडी शिळा...
 
दक्षिण टाके..

गडावरील ग्रामदेवता...
 
कातळात कोरलेले ग्राम देवतेचे मंदिर  
 
समाधी अवशेष... 
 
सहयाद्री मधील डोंगरकडा आणि मधमाशीचे वास्तव्य काही नवीन नाही... पण आपण कुठे आहोत कोणाच्या दारात आहोत हे विसरता कामा नये.
नाही तर मधमाशी चावलण्याने बरेच जण गत प्राण झाल्याचे ऐकून आहोतच. कृपया सहयाद्री मध्ये वावर ताना बऱ्याच गोष्टींचे तार्तम्य बाळगायला पाहिजे.

 
 अर्धवट अवस्थेतील गुहा...
 
सैनिक टेहळणी जागा...
 
हेच ते मिश्रण ज्याच्या ताकदीने किल्ले आपलं अस्तित्व टिकून उभे राहतात... चुना शिशे डिंक यांचे मिश्रण 
बालेकिल्ला तटबंदी...

अरुंद चौकी मार्ग...
 
 बालेकिल्ला प्रवेशद्वार क्रमांक 2
 बजरंगबली...

गडबांधणी करता सर्वात महत्वाचा हातभार लावणारा चुण्याचा घाना...

त्याकाळचे सिमेंट अर्थात चुनखडी व शिशे यांचे मिश्रण एकजीव करण्यासाठी याचा वापर होत असे.

 
 
पाण्याचे उत्तम नियोजन असणारे गडावरील....6 टाके 

 
 मंदिर अवशेष...
 
पांडजाई मंदिर...
 
  गाभाऱ्यातील पांडजाई देवी
 महादेवस्थान...

मंदिरा बाहेरील पादुका, स्तंभ आणि पूजेसाठी लागणारे पाणी साठवण्याचे दगडी भांडे यांचे अवशेष

गडावरील शेवटचा घटका मोजणारे अवशेष
 
 पश्चिम माची..
 
 बालेकिल्ल्यावर प्रवेश करताना या अरुंद चौकीतून आत बाहेर करावे लागते
 
 
पाण्याचे टाके
 





 
 
 
 
 
 
 
 

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...