पुणे-बेंगळुरू महामार्गाने प्रवास सुरु केला आणि पुणे शहर सोडून आपण कोल्हापुरच्या दिशने निघालो कि महामार्गाच्या दुरर्फा अनेक गडकोट दर्शन देतात.पुणे सोडले कि पश्चिमेला टॉवरचा तुरा माथ्यावर असणारा सिंहगड उर्फ कोढाणा,पुढे कापुरहोळपाशी पुर्वेकडे पुरंदर, त्याचवेळी डावीकडे एका खिंडीतुन राजगड्,तोरणा दर्शन देतात.नीरा नदी ओलांडली कि सातारा जिल्ह्यातील गड दिसायला लागतात.यात भुईंज सोडून पाचवडजवळ आलो कि एन महामार्गाला चिकटून ताशीव कातळकड्याचा चौथरा असलेला डोंगर दिसतो.हा आहे थेट शिलाहारांशी नाते सांगणारा हा प्राचीन गड दुर्गप्रेमींनी किमान एकदा तरी पायाखाली घातला पाहीजे.वाई परिसरात पश्चिमेला तीन मोठी पठारे व त्यांना पुर्वेकडे जोडून गड अशी रचना दिसते.रायरेश्वर पठाराला जोडून केंजळगड आहे.कोल्हेश्वर पठाराला जोडून कमळगड आहे तर पाचगणी पठाराला जोडून वैराटगड आहे.
गडाची भटकंती करण्यापुर्वी याच्या इतिहासात डोकावुया. कोल्हापूरच्या शिलाहार घराण्यातील दुसरा राजा भोज यांनी ११७८ ते ११९३ दरम्यानच्या कालखंडात निर्माण केलेल्या पंधरा किल्ल्यापैकी हा एक आहे. मात्र परिसरात एक दंतकथा सांगितली जाते ती अशी की, महाभारतातील राजा विराट राजाची वैराटगड ही राजधानी होती. वैराट्गडाच्या नावाची आणखी एक दंतकथा सांगितली जाते कि या गडावर वैराट जमातीचे लोक रहात होते,त्यांना पांडवांनी जिंकले.
ऐतिहासिक कालखंडात या किल्ल्यावर फार मोठा सैनिकी संघर्ष झाल्याच्या नोंदी आढळून येत नाहीत. ११ नोव्हेंबर १६७३ रोजी सातारा जिंकल्यावर छत्रपति शिवाजी महाराजांनी वाईच्या परिसरातील पांडवगड, कमळगड, केंजळगड इत्यादी किल्ले जिंकून घेतले यात नक्कीच वैराटगड असावा कारण चिटणीस व चित्रगुप्त बखरी मधे विराटगड नावाचा उल्लेख येतो. छत्रपति संभाजी महाराजांच्या हयातीत हा किल्ला स्वराज्यात होता. त्यांच्या मृत्यूनंतर काही काळ मोगल वरचड झाल्याने हा किल्ला त्याने जिंकला होता, मात्र १६९० मधे रामचंद्रपंत अमात्य व सचिव शंकराजी नारायण गांडेकर यांनी वाई प्रांतातील किल्ले परत स्वराज्यात घेतले होते त्यात वैराटगडचा देखील समावेश असावा. सातारा किल्ल्यास औरंगजेब सैन्याने वेढा दिला होता तेव्हा स्वतः औरंगजेब करंजे ह्या गावी होता. मुघल दरबारातील ९ डिसेंबर १६९९ च्या नोंदीनुसार हमीदुद्दीन बहादूर यांच्या सैन्याने सलग दोन दिवस मराठ्याच्या ताब्यातील या किल्ल्यावर लढाई करून जिंकून घेतला व त्याच्या चाव्या औरंगजेबाकडे पाठवून दिल्या. त्याने वैराटगडचे सर्जागड असे नामकरण केले तर किल्ल्यावरील संपत्तीची मोजदाद करण्यास सांगून १३ डिसेंबर १६९९ रोजी किल्लेदार म्हणून मुहम्मद इब्राहिम यास नियुक्त केले. मुहम्मद इब्राहिम हा वाईचा ठाणेदार असलेल्या नाहरखानचा मुलगा होता. किल्लेदार म्हणून नेमणूक केल्यावर औरंगजेबाने त्याची मनसब वाढविली व त्याच्या सोबत १५० सैनिक, २ बाजदार, २ पानके व २ गोलंदाज दिले.
पुढे ९ जुलै १७०४ च्या नोंदीनुसार मराठ्यांनी वैराटगडच्या किल्लेदारास कैद करून किल्ला ताब्यात घेतला तेव्हा औरंगजेबाने कराडच्या ठाणेदारासोबत म्हसवडचा ठाणेदार नागोजी माने, बुधपाचगावचा ठाणेदार पदाजी घाटगे व खटावचा ठाणेदार कृष्णराव यांना किल्ला घेण्यास पाठविले मात्र तो त्यांनी जिंकला की नाही हे माहित होत नाही. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर वैराटगडचा सरनोबत दादजी फाटक हा नाईकजी फाटकचा दुसरा मुलगा होता. पेशवे माधवराव यांच्या काळात खंडोजी जाधवराव हा वैराटगडचा किल्लेदार होता. पेशवाईत कुडाळ प्रांताचा सर्व कारभार याच किल्ल्यावरून पाहिला जायचा. तत्कालीन पत्र व्यवहारात " अज दिवाण किले वैराटगड ...." अशी पत्राची सुरूवात केली जायची.खंडोजी जाधवराव हे सुमारे तीस वर्षापेक्षा जास्त काळ ह्या किल्ल्याचे किल्लेदार होते ही ऐतिहासिक काळातील एकमेव घटना असावी. १८१८ मधे हा किल्ला इतर किल्ल्याप्रमाणे इंग्रजांच्या ताब्यात गेला.

जावे कसे ? :-
महामार्गावरील पाचवड गावातून वैराटगडाचे सहज दर्शन होत असले तरी त्यावर जायची वाट मात्र पाचवड गावातून नाही.वैराटागडावर जाण्यासाठी उत्तरेकडून एक आणि दक्षिणेकडून एक अश्या दोन वाटा आहेत.शक्यतो एका वाटेने गड चढायचा आणि दुसर्या वाटेने उतरायचा म्हणजे संपुर्ण गड न्याहाळून होतो.
पुणे-सातारा हायवे वरुन पाचवड गाठायचे. पाचवडहून थोडे सातारा दिशेन गेलो कि उजव्या हाताला कुडाळमार्गे मेढागावाकडे जाणारा रस्ता फुटतो.या रस्त्याने 'सरताळे' गावाकडे जाण्यास एक फाटा फुटला आहे.पाचवड -सरता़ळे हे अंतर जेमतेम चार कि.मी. आहे.सरताळे गावातून उत्तरेला जाणारा रस्ता काळेवाडी, गणेशवाडी,कापसेवाडी या गावांना जातो. त्या रस्त्याने जावुन सरताळे गावातून उजवीकडचा रस्ता घेउन शेवटचा थांबा 'गणेशवाडी' किंवा कापसेवाडी गाठायचे.याशिवाय ईथेच जवळ‘म्हसव’ नावाचे गाव आहे. हे म्हसवे गाव अशिया खंडातील सर्वात मोठ्या वटवृक्षासाठी प्रसिध्द आहे. या गावातून सुद्धा एक वाट आहे. मात्र ही वाट खूप निसरडी आहे.

पाचवड गावातून एक वाईला जाणरा रस्ता फुटतो. तिथून चार एक किलोमीटरवर आसले हे गाव आहे. तिथून गडाच्या पायथ्याकडे एक पाय वाट जाते. ह्या आसले गावाच्या पुढे एक किलोमीटरवर शंकरनगर नावाचे गाव आहे. तिथूनही गडाच्या पायथ्यापर्यन्त मजबूत गाडी जाईल अशी वाट आहे. दुसरी वाट थेट गडाच्या पायथ्यापर्यंत नेत असल्याने शक्यतो तोच मार्ग अवलंबावा.वाई - सातारा मार्गावर ४ किमी वर कडेगाव पूल येथे उतरावे. येथून व्याजवाडी या गावात यावे. गावातून गडावर जाण्यास दोन वाटा आहेत. एक वाट चांगली मळलेली आहे, मात्र ही जरा फिरून जाते. तर दुसरी वाट डाव्या बाजूच्या नाकाडावरून जाते. साधारणत: या वाटेने १/२ तास गड गाठण्यास लागतो, तर पहिल्या वाटेने १ तास लागतो. पुढे दोन्ही वाटा एकत्र मिळतात आणि १० मिनिटे गडमाथा गाठण्यास लागतो. शेवटच्या टप्प्यावरची वाट प्रचंड निसरडी आहे. गड समोर दिसत असला आणि सहज वर चढू असे वाटत असेल तर या गडाच्या वाटा फसव्या आहेत, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

आपण सरताळेगावाक्डून गड चढाइ करु आणि व्याजवाडीत उतरुया.गणेशवाडीत येवून पोहचलो. गणेशवाडीत मंदिराच्या मागच्या बाजुनेच गडावर जाण्यास एक पायवाट आहे.
त्या पायवाटेने थोड अंतर चालून गेल्यावर एक भलमोठं वडाच झाड लागतं. वडाच झाड तसं खुप जुनं असाव. त्याच्या पारंब्याही जमिनीत शिरलेल्या दिसतात.
झाडाच्या पुढे थोड चालून गेल्यावर काळूबाई देवीच एक देउळ आहे.

त्याच्या शेजारूनच एक मळलेली पायवाट गडावर गेलेली आहे. त्या पायवाटेने गडावर चढण्यास सुरवात करायची. गडाची चढाई ही तीन टप्प्यात विभागलेली आहे. पहिलाच टप्पा थोडा कस काढतो. चढण तशी दमछाक करणारी आहे.
साधारण पाऊण तासात आपण पहिला टप्पा पार करून एका छोटयाश्या पठारावर येतो. पहिलाच टप्पा चढताना थकवा जाणवतो पण मधेच एखादी मंदगार हवेची झुळूक थकवा जातो आणि आपण पुढच्या चढाईसाठी सज्ज होतो. थोड पुढे गेल्यावर गडाच्या दुसर्या टप्प्याच्या चढाईस सुरवात होते. साधारण अर्ध्या तासाभरात हा टप्पा पार करायचा. वाटल्यास एखाद्या झाडाखाली बसून घोट घोट पाणी पिवुन जीव शांत करायचा.
दहा पंधरा मिनिट थोडी विश्रांती करून अन पुन्हा ताजेतवाने होवून शेवटच्या टप्प्याला भिडलो कि साधारण वीस मिनिटात आपण गडाच्या कातळमाथ्याच्या पायथ्याशी येऊन पोहचतो.
वाईच्या नैऋत्येस फक्त १० कि.मी.अंतरावरील ३३४० फूट उंचीच्या किल्ल्याच्या गडमाथ्यावर पोहोचण्यासाठी मानसिक व शारीरिक क्षमतेची कसोटी नक्कीच लागते. गड दुरुन बघताना सोपा वाटला तरी खडी चढण, तीही अतिशय निसरडी अशी आहे. सुमारे दोन तासांचा अवधी लागातो.
महामार्गावरुन पाचवड बाजुने बघताना गडाचा माथा जेमतेम असावा असे वाटते.,मात्र सरताळे बाजुने चढताना गडाच्या विस्तृत माथ्याचे दर्शन होत असते. एकदा खिंडीत येउन पोहचलो कि गडाच्या उत्तर अंगाने व्याजवाडीकडून येणारी वाट ईथे मिळते.या दोन्ही वाटा हातात हात घालून गडाकडे निघतात.
गडाला तशी नैसर्गिक कातळाची उभ्या कडयाची तटबंधी लाभलेली आहे. ह्या टप्प्यावरून गडाची तटबंदी बर्यापैकी नजिक भासत होती. असेच एक दोन दगडी टप्पे पार करून गेल्यावर तट्बंदीच्या अगदी जवळ पोहोचतो. गडाला तीस चाळीस फूट उंच नैसर्गिक तटबंदी आहे. त्यावर दहा एक फुटाची बांधीव तट्बंदी आहे. या कडया खालून उजव्या बाजुने एक पायवाट गडाकडे गेली आहे. त्या वाटेने कड्याला वळसा घालून वीस मिनिटात कातळाच्या पोटात खोदलेल्या पाण्यांच्या टक्यांपाशी येवून पोहचलो.
डावीकडे असलेल्या तटाच्या तळाशी काही पाण्याची टाकी आहेत. ती आतून एकमेकांना जोडलेली आहेत. ती गडावरील पुजार्यांच्या नियमीत वापराने बरीच स्वच्छ आहेत. त्यातील पाणी एकदमच थंडगार आणि तेव्हढेच नितळ आहे. ती पाच टाकी पाच पांडवांनी खोदल्याचे स्थानिक लोक मानतात. यातील तीन टाक्यातील पाणी स्वच्छ आहे. थोड पुढे गेल्यावर आणखी दोन टाक्या लागल्या. ह्या टक्यांमधील पाण्यावर मात्र पिवळ्या रंगाच्या शेवाळाचा थर आहे.तेथून थोड पुढे गेल्यावर गडाच्या पायर्या लागतात. तर डाव्या हातास थोड्या उतारावरील लक्ष्मीमाता मंदिराचे लोखंडी छत लक्ष वेधून घेतात. नकळत आपण तिचे दर्शनासाठी पोहोचतो तर जाताना उजव्या बुरूजाच्या बरोबर खाली खडकात असलेली पुरातन लहान गुहा दिसून येते.
हि गुहा नैसर्गिक कि मानवनिर्मित असा प्रश्न पडतो.साधारण १५ फुट लांब असे हे भुयार आहे.थेट दरवाज्याजवळ अशी गुहा बल्लालेश्वराच्या पालीजवळच्या सरसगडावर बघण्यास मिळते.
मग मुख्य व एकमेव असलेल्या दरवाजाच्या खडकात खोदलेल्या वळणावळणाच्या पायऱ्या चढून वर येतो.
दरवाजाची कमान व दोन्हीही दगडी स्तंभ काळाच्या ओघात नष्ट झाल्याचे पाहून मन दुखावते, मात्र दरवाजाचा दगडी उंबरठा पाहून थोडे हायसे वाटते. दोन छोटे बुरुंज अजून शाबूत आहेत. हेही नसे थोडके.
उंबरठ्याच्या डाव्याबाजूस अडगळ खोचण्याची दगडातील खाच पाहून तत्कालीन व्यवस्थेची जाणीव होते. शेजारीच दोन्हीबाजूस असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या देवड्या अर्धवट अवस्थेत आहेत.

गडमाथ्यावर सर्वात प्रथम दर्शन होते ते मारुतीरायाच्या लहान मंदिराचे. मंदिर लहान असून त्यात दगडी प्रभावळीत मारुतीची प्रसन्न मूर्ती आहे, तर शेजारीच अलीकडील काळातील छत्रपति शिवाजी महाराजांचा बैठा पुतळा आहे.
मंदिराच्या बाहेरील बाजूस देखील उघड्या जागेवर मारुती शिल्प असल्याचे पाहून मनात गोंधळ होतो. शक्तिदेवता मारूती दर्शनाने काहीशी उर्जा अंगात संचारते.
इथेच जवळ एका वास्तुचे अवशेष दिसतात.
गडाचा माथा उत्तर दक्षिण असा कमी पसरलेला असला तरी पूर्व - पश्चिम असा विस्तृत आहे.
गडावर एकंदर चार तळी आहेत्,त्यातील एक पावसाळी तळे आहे.मात्र सर्वच तळ्यातील पाणी खराब झालेले आहे.गडावर सध्या दुर्गसंवर्धनाचे कार्य सुरु आहे.या संस्थाच्या कार्याला यश येउन कदाचित नजीकच्या भविष्यात यातील गाळ साफ होउन हि तळी पुन्हा नितळ्,स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाण्याने भरुन जातील.
किल्लेदाराच्या वाड्याचे अवशेष
गडावर एकेकाळी दारु कोठार होते.ज्याच्या जीववर हे गड लढले,त्यांचे आज जेमतेम अस्तित्व उरले आहे.
मग पश्चिमेस असलेल्या बुरूजाकडे / माचीकडे आपण जातो. तटबंदीची पडझड झाली असली तरी तरी शत्रूच्या सैन्यावर मारा करता यावा यासाठी जागोजागी असलेल्या तटबंदीतील जंग्या पाहत आपण पश्चिम बुरूजाजवळ पोहोचतो.
बुरूजावरून समोरील डोंगर व परिसर पाहण्यात एक वेगळाच आनंद येतो. हा किल्ला प्रतापगडपासून आलेल्या शंभूमहादेव डोंगररांगेवर असल्याने ह्या डोंगररांगेतील उर्ववरित हिरवाईने सजलेल्या लांबच लांब डोंगर मनाला आनंद देतात. पश्चिम तटबंदीवर काही अक्षरे कोरलेली दिसतात्,मात्र ती अस्पष्ट असल्यामुळे वाचता येत नाहीत.
त्यानंतर पलिकडील बाजूची तटबंदी पाहत असताना बुरूजाजवळच्या तटबंदीत असलेला चोरवाट पाहाताना मनात धडकीच भरते. सह्याद्रीच्या विशालरूपातीला ही तटबंदीतील चोरवाट म्हणजे एक दिव्यच आहे. सुमारे दोनशे फूट तीव्र उतार व अरुंद बोळ असणारी चोरवाटेचा वापर करणारे मावळे म्हणजे चमत्कार आहे.
पुढे निघाले कि एके ठिकाणी वेताळ स्थापित केल्याचे आढळून येते, तर त्याच्या शेजारीच पुरातन बांधकामाचे त्यातल्या त्यात बरे अवशेष दिसून येतात. येथे मोठा वाडा असावा असे वाटते. पुढे पूर्वेस तटबंदी पाहत येताना तटबंदीतील दोन शौचकुप असल्याचे आढळून येते. सातारा जिल्हा हा मोठ्या प्रमाणात पाऊस पडणारा जिल्हा असल्याने तटबंदीच्या लादणीतील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी केलेली सोय अप्रतिम अशी आहे. गडमाथ्यावर अनेक इमारती असल्याचे तुरळक अवशेष आहेत.
पुढे गवतातुन वाट काढत काढत आम्ही वैराटेश्वर मंदिराकडे निघायचे.
वैराटेश्वर मंदिराच्या अगोदर एक छोटसं मंदिर लागत त्या मंदिराच्या गाभार्यात एका देवीची मुर्ती आणि सतीचा हात आहे. मंदिराच्या समोर दगडी नंदी आहे.
वैराटेश्वर महादेवाचे जुने मंदिर
पूर्वेकडील माचीवर पूर्वाभिमुखी वैराटेश्वर शंभूमहादेवाचे मंदिर आहे.जुने मंदिर छोटे असले तरी आता वैराटेश्वर मंदिराचे चांगल्या प्रकारे जिर्णोधार केला आहे.असून नंतरच्या काळात मंदिरासमोर भव्य लोखंडी पत्र्याचा आधुनिक सभामंडप उभारलेला आहे.
पितळी नागराजाने वेढा घातलेली एक शंकाराची सुंदर पिंड आपली नजर खिळवून ठेवते. याला वैराटेश्वर महादेव म्हणतात. मंदिरात प्रवेश करताना दगडी चौकटीवर असलेल्या गणपति शिल्पाला दिसते. समोरील बाजूस नंदी शिल्प तर बाजूला तुळशी वृंदावन आहे.नजीकच शंकर पुत्र गणपतीचीही शेंदरी मूर्ती आहे. मंदीराचे अंतरंग खूपच स्वच्छ अन प्रसन्न आहे. मंदीराबाहेर पडल्यावर त्याच्या जोत्यावर एक खूप छान घडलेली कासवाची मुर्ती दिसते. ह्या मंदीराजवळच त्या गगनगिरी महाराजांच्या शिष्याचा मठ आहे. गगनगिरी मठात महाराजांच्या प्रतीमांचे, एकमुखी दत्ताचे, भगवान शंकराच्या मुर्तिचे दर्शन घेता येते. बर्याच किल्ल्या वा डोंगरावरील देवळे वा गुहा ह्या कुठल्या ना कुठल्या महाराज वा फकीरांनी बळकावल्या असतात. इथे मात्र फारसे प्रस्थ न दिसता त्या लोकांनी जपलेले साधे पावित्र्यच मनास भावून जाते.
याच मंदिराच्या उजव्या बाजूस भिंतीला टेकवून ठेवलेली भव्य वीरगळ आहे. १९८३ साली ही वीरगळ, मारुतीच्या दोन मूर्त्या ह्या या किल्ल्यावर मिळाल्या आहेत.
ह्या मंदिराजवळच भैरवनाथाचे लहान मंदिर असून तेथे एक सतीशिळा देखील आहे. किल्ल्यावर विद्युत पुरवठा केला आहे. दर महाशिवरात्रीस परिसरातील भाविक मोठ्या संख्येने हजर असतात.
सध्या गडावर आबानंद महाराजांचे वास्तव्य आहे. हे गगनगिरी महाराजांचे शिष्य. गगनगिरी महाराज वैराटगडावर तीन वेळा येऊन गेल्याचं ते सांगतात.१९८२ पासून त्यांचं इथं वास्तव्य आहे.गडाच्या पायथ्याशी असलेल्या आसले इथं कृष्णेत स्नान करताना महाराजांना दृष्टांत घडला. गडावर महादेवाची पिंड आहे. शोध घेतल्यावर ती पिंड नजरेस पडली. महाराजांच्या भक्तांनी खालून डोक्यानं बांधकाम साहित्य आणलं.डोक्यानं वाळूची घमेली आणली.मग वैराटेश्वराचं मंदिर उभं राहिलं.
आरंभीला इथं काहीच नव्हतं. घाणेरीची भाजी शिजवून खाल्ली. साधना, तपश्चर्या केली. आता इथं लाईट आली आहे. मात्र खालून ये-जा करताना तसदी पडते. रस्त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मागं एका मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं. मात्र काम नाहीच झालं. आता जांभुळणीमार्गे रस्ता व्हावा, अशी महाराजांची अपेक्षा आहे.
महाराज या गडाच्या इतिहासाविषयी काही माहिती सांगतात.ते पांडवांचे संदर्भ देतात. किचक कथा, पोैराणिक कथा सांगतात. गडावर विराट राजाचा वाडा होता. निद्रेसाठी तो इथं यायचा, अशीही माहिती देतात. मध्येच बाबासाहेब पुरंदरेंचा दाखलाही देतात. वैराटगड हा सोळा डोंगरामध्ये आहे.
महाराज बोटानं भोवताल दाखवतात. मेरुलिंगपासूनच्या समोरच्या राजपुरीच्या दिशेनं डोंगर ते दाखवतात.

वैराटगडाची जागा अत्यंत मोक्याची असल्यामुळे ईथून विस्तृत प्रदेश नजरेत सामावतो. वायव्येला कमळगड, केंजळगड आणि रायरेश्वर पठार दृष्टीस पडतात. पुणे -बेंगळूरू महामार्ग गडाच्या पुर्व अंगाने वहाता दिसतो. याशिवाय उत्तरेला खंबाटकी घाटाचा डोंगर,ईशान्येला शनैश्वर, चवणेश्वर, थेट पुर्वेला चंदन- वंदनगड, तर आग्नेयेला जरंडेश्वर, नांदगिरी, तर दक्षिणेला अजिंक्यतारा गड आणि नैऋत्येला मेरुलिंग आदींचं दर्शन घडतं. समोर पाचगणी परिसरातले बंगल्यांचे पांढुरके ठिपके नजरेत उतरतात. संपूर्ण किल्ला पाहण्यास एक तासाचा अवधी पुरेसा आहे. वर्दळीच्या महामार्गावर असणार्या या गडावर प्रत्येक दुर्गप्रेमींनी आपली पावले उमटवली पाहीजेत.
संदर्भ :-
१) सातारा जिल्हा गॅझेटीयर
२) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
३) डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
४) साद चाकोरीबाहेरील किल्ल्यांची- पांडुरंग पाटणकर
५) श्री. तुषार कोठावदे, सुरेश शिंदे, भोर, सुनील शेडगे ,नागठाणे यांचे लिखाण
६) महाराष्ट्र देशातील किल्ले - चिंतामण गोगटे
सुरेश नारायण शिंदे, भोर
९७६७५९६९५४
घेवून आली. त्या जोडप्याशी चर्चा केल्यावर कळले की त्यांच्या कुडाळ ह्या गावातूनही गडावर यायला वाट आहे. त्या गडावर गगनगिरी महाराजांचे शिष्य राहतात. हे लोक त्यांचेच भक्त होते. अन पौष अमावस्येनिमीत्त, दर्शनाला आले होते.
No comments:
Post a Comment