पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत असलेले कराड हे शहर कृष्णा व कोयना या पवित्र नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. महाभारतातील उल्लेखानुसार कराड अर्थात करहाटक नगरी हे युधिष्ठीराच्या राजसुय यज्ञाच्यावेळी जिंकलेले सहदेवाने जिंकलेले नगर. कराड परिसरात प्रागएतिहासीक मानवी वसाहतीचे पुरावे मिळाले आहेत. या कालखंडातील, मध्ययुगीन, उत्तर अश्मयुगीन हत्यारे व अवजारांबरोबर ताम्रपाषाणयुगीन अवशेषही पुरातत्वखात्याला मिळाले आहेत.
पंताच्या कोटाच्या परिसरात १९४९ मध्ये पुण्याच्या भारत ईतिहास संशोधक मंडळाने केलेल्या उत्खणननात सातवाहनपुर्व आणि सातवाहनकालीन मानवी वसाहतीचे अवशेष मिळाले आहेत. ई.स. पुर्व २०० ते ई.स. २०० या काळातीलआहेत. उत्खणनात घरातील दैनंदिन वापराच्या वस्तु, मृदा भांडी, घराच्या छताची कौले, तात्कालिन आलंकारासाठी उपयोगात येणारे विवीध अंबर व ईतर प्रकारचे मणी, तसेच गोमेद, रेड जॅस्पर, स्फटिक, शंख, हाडे,हस्तीदंतापासून बनविलेल्या वस्तु मिळाल्या आहेत. सातवाहनकालीन नाणीही सापडली आहेत. रोमन बनावटीच्या पदकावरुन शहराचा रोमन व्यापाराशी संबध होता हे स्पष्ट आहे. अर्थात हे उत्खणन मर्यादित स्वरुपाचे होते.
कराडचा उल्लेख सातवाहन काळापासून विविध राजसत्तांच्या कालखंडात आलेला आहे. राष्ट्रकुट, चालुक्य आणि शिलाहार या राजसत्तांच्या अमलाखाली कराड राहिले होते. अशा या कराडमधे कृष्णा व कोयना नद्यांच्या संगमाशेजारी असलेल्या पंतांचा कोट (किल्ला ) बाराव्या शतकातील शिलाहार राजवटीत निर्मिती झाली असावी. अनेक राजसत्तेच्या कालखंडात येथील रयतेच्या सुरक्षिततेची काळजी या कोटाने लिलया निभावली असणार. आक्रमक आदिलशाहीच्या कालखंडात काहीकाळ कराडचे नाव ' कलहराबाद ' असे असल्याचे उल्लेख मिळतात. शिवपूर्वकाळात 'पुणे प्रांत' व 'क-हाड प्रांत' हे दोन्ही विभाग शाहजीराजें यांच्या जहागीरीचा प्रदेश होता.
त्याआधी इ.स. १५९६ मध्ये शहाजीराजांचे वडील मालोजीराजे भोसले व त्यांचे मेहुणे वणगोजी नाईक फलटणकर यांनी विजापुरकरांच्या मुलुखावर आक्रमण करुन बराचसा भाग आपल्या अशिपत्याखाली आणला.त्यात त्यांनी हा कर्हाडचा कोट घेतल्याचा उल्लेख आहे.आदिलशाही राजवटीत एखलासखानाकडे कराडचा मोकासा पाच वर्ष होता. इ. स. १६३८ - ३९ मधे शाहजी महाराजांनी आदिलशाहीतील सरदार रणदुल्लाखानासोबत केलेल्या पराक्रमासाठी कराड प्रांतातील २२ गावांची जहागीरी आदिलशाहने दिली होती. या प्रांतामधील मसूरचे जगदाळे व यादव यांच्या मधे अधिकाराचा संघर्ष इतिहासाने पाहिला आहे. पुढे हि कर्हाडची जहागिरी मुधोळकर बाजी घोरपडे यांना १६५३ मध्ये देण्यात आली. विजापूरचा अली अदिलशहा-दुसरा जानेवारी १६६१ मध्ये सैन्यासह क-हाडमध्ये थांबला होता.छ. शिवाजी महाराजांनी इ. स. १६५९ च्या प्रतापगड रणसंग्रामानंतर पन्हाळ्यापर्यंतचे किल्ले व मुलूख स्वराज्यात दाखल केला. कराड परिसरातील वसंतगड, सदाशिवगड इत्यादी किल्ले देखील परकीय अमलातून मुक्त होऊन स्वराज्याचा भाग झाल्याने रयतेने आणि सह्याद्रीच्या डोंगरद-यांनी मोकळा श्वास घेतला.औरंगजेबाने क-हाडजवळील ‘वसंतगड’ हा किल्ला १६९९ मध्ये जिंकला. त्या वेळी क-हाड हे स्थान परगण्याचे मुख्यालय म्हणून होते. मोगलांचा सरदार पडदुल्ला खान हा १७७१ मध्ये कोटात राहत असे. त्याला शाहू छत्रपतींनी बाळाजी विश्वनाथ यांच्या साहाय्याने घालवून दिले. त्यानंतर शाहू महाराजांच्या कारकिर्दीत, क-हाड प्रांत मराठ्यांच्याकडे आला. त्या वेळी पंतप्रतिनिधी यांनी त्यांचा कारभार उपरोक्त कोटातून चालू केला.या काळात हा कोट पंतप्रतिनिधींच्या ताब्यात होता, म्हणूनच यास "पंतांचा कोट" हे नाव मिळाले असावे. त्यानंतर प्रतिनिधींनी त्या कोटात दरबार हॉल बांधला असावा. दुस-या बाजीरावाने श्रीनिवास प्रतिनिधी यांच्याकडून क-हाड घेण्याचा कट १८०५ मध्ये केला होता. दुसरा बाजीराव पेशवा व दौलतराव शिंदे यांनी १८०५ च्या सुमारास परशुरामपंत श्रीनिवास प्रतिनिधी यांना पकडण्याचा बेत केला होता. तेव्हा त्यांना चुकवून पुण्याहून प्रतिनिधी क-हाडला पळून आले. ब्रिटिशांनी क-हाडचा मोबदला देऊन कोट त्यांच्या ताब्यात ठेवला तो १८५२ साली. प्रतिनिधींची कचेरी कोटात १८८९ पर्यंत होती. कृष्णा नदीला १८४४ मध्ये आलेल्या पुरात किल्ल्याच्या भिंतींच्या वर वीस फूट उंच पाणी होते. त्या वेळी कोटाची वायव्येकडील तटबंदी वाहून गेली. कचेरी १८८९ नंतर कुंडलला हलवण्यात आली. या कोटाचे उल्लेख सातवाहनकालीन असले तरी तज्ञांच्या नते सर्वात खालचा थर महाभारतलीन आहे. कोयना नदीला जेव्हा जेव्हा मोठा पुर येउन ओसरे तेव्हा सातवाहनकालीन अवशेष सापडत.यात भाजलेल्या विटांवरची चित्रे, मातीपासून बनविलेले कर्णभुषण्,मणी ईत्यादी सापडलेले आहेत.
शहराच्या वायव्य दिशेकडे सुमारे चौ-याऐंशी चौरस मीटर क्षेत्रावर उंच जागी त्या किल्ल्याचे काही अवशेष (नाममात्र) आहेत. आजमात्र काळाच्या ओघात पंताचा कोट हा फक्त ऐतिहासिक कागदपत्रात नावापुरता राहिला आहे. येथे नागरी वस्ती झाल्याने तुरळक तटबंदींचे अवशेष खूप प्रयत्न करून शोधावे लागतात. हा भुईकोट सुमारे वीस एकर क्षेत्रफळाचा असावा असा एक मतप्रवाह आहे. या कोटाला एकूण बारा बुरूज, भेंड्याच्या मातीच्या वीटा व दगड बांधकामातील तटबंदी होती. मुख्य प्रवेशद्वार हे दोन बुरूजाच्या मध्यभागी होते. दरवाजावर आयताकृती बांधकामातील भव्य नगारखानादेखील होता. या कोटातील भवानीदेवीचे मंदिर आपले प्राचीनत्व सांभाळून आहे. श्रीनिवास प्रतिनिधीच्या पत्नि सौ. काशीबाई यांनी इ. स. १८०० मधे ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा इतिहास आहे. या कोटात प्रतिनिधी यांचा भव्य दुमजली राहता वाडा देखील होता.
किल्ला थोरल्या शाहू महाराजांच्या राजवटीत प्रतिनिधींच्या (राजाच्या गैरहजेरीत कारभार पाहणारा.) ताब्यात गेला. किल्ल्याचे दोन बुरूज त्यांचे अस्तित्व कसे तरी टिकवून उभे आहेत. तटबंदीचे अवशेष चारही बाजूंस भग्नावस्थेत आहेत. किल्ल्यातील प्रतिनिधींचा वाडा पूर्णपणे उद्धस्त झालेला आहे. सातारा जिल्हा गॅझेटियरमध्ये (१९९९) त्याचे वर्णन लिहिलेले दिसते. त्या वेळी मुख्य प्रवेशद्वार आणि त्यास घट्ट पकडून ठेवणा-या दोन बुरुजांचे अवशेष ब-यापैकी शिल्लक होते. तो किल्ला चौरस आकाराचा व ईशान्येकडे थोडा पुढे आलेला होता. किल्ल्याला अठरा बुरूज होते. दगडमातीच्या तटबंदीला जंग्या (कोटाच्या किंवा किल्ल्याच्या तटबंदीत ठिकठिकाणी ठेवलेली छिद्रे. त्यातून पूर्वी दगडांचा आणि तयानंतरच्या काळात बंदूकीचा मारा केला जात असे.) होत्या. भोवताली सुमारे दोन मीटर खोलीचा खंदक होता. कोयना नदीच्या पात्रातून, चौदा ते तीस मीटर उंचीवर किल्ला एके काळी भुईकोटांचा जणू राजा दिसे. त्या क-हाडच्या भूमीवर राज्य करणा-या चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार यांनी राज्य केले. त्या मंडळींनी तो वापरला असावा.
किल्ल्यातील प्रतिनिधींचा वाडा म्हणजे मराठाकालीन वास्तुशैलीचे अप्रतिम उदाहरण आहे. वाड्याच्या दक्षिणेस २५९|| मीटर लांब-रूंद व 4 मीटर उंच असा दरबार हॉल होता. त्याच्या दोन्ही बाजूंस दोन स्वतंत्र दालने होती व पूर्वेस भवानीदेवीची छत्री. ते मंदिर पाहण्यास मिळू शकते. मंदिरातील मूर्तीचे मूळ अधिष्ठान हे तेराव्या शतकातील असावे. दरबाराच्या तक्तपोशीवर जाळीदार नक्षीकाम होते. परशुराम निवास प्रतिनिधींच्या मातोश्री काशीबाई यांनी या वास्तूच्या बांधकामास 1800 च्या सुमारास सुरुवात केली व वडिलांनी ते काम पूर्ण केले. किल्ल्याच्या परिसरात स्लॅबची घरे आहेत. कालांतराने किल्ला तेथे होता का, हा प्रश्न उभा राहील! कोयना पात्रालगतची तटबंदी १८७५ च्या महापुरात नष्ट झाली असावी
किल्ल्याची तटबंदी कोयनेच्या पात्रापासून १४ ते २० मीटर उंचीवर आहे. सध्या मात्र या कोटाचे एतिहासिक अवशेष, तट, बुरुज बरेचसे नष्ट झालेले आहेत.
तटबंदी ढासळलेली आहे तर खंदक बुजला आहे.
बुरुजावरच्या जंग्या थोड्याफार दिसतात. १८७५ च्या महापुरात तटबंदीचा बराचसा भाग वाहून गेला. सध्या मात्र तटबंदीच्या खालच्या बाजुला दगडी भिंत उभारल्याने पुराचा धोका उरलेला नाही.
सध्या या कोटाच्या खालच्या मोकळ्या जागी पुर्वी ज्याला "स्वामीची बाग" म्हणले जायचे तिथे भारताचे उपपंतप्रधान ,संरक्षणमंत्री आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांची समाधी आणि प्रितीसंगम उद्यान उभारलेले आहे.
कृष्णा आणि कोयनेचा एकमेव प्रितीसंगम असलेल्या ह्या परिसरात काही प्राचीन मंदिरे आणि मुर्त्या पहाण्यास मिळतात.




No comments:
Post a Comment