Thursday, February 4, 2021

चंदन वंदन

सातारा शहर चोहोबाजूने सह्याद्रीच्या रांगानी वेढलेले आहे. एखाद्या हिर्‍याला कोंदण असावे तसे सातारा शहराच्या चोहोबाजुला डोंगर पसरलेले आहेत. यात ताशीव चौथरे असणार्‍या शिखरांवर दुर्ग उभारणी झाली आहे. अश्याच कठीण नैसर्गिक रचनेचा फायदा घेउन सातार्‍याच्या ईशान्य दिशेला एका जोड डोंगरांवर दोन जुळ्या किल्ल्यांची उभारणी केली गेली आहे.हि दुर्गजोडी म्हणजे चंद्न-वंदन. चंदनपेक्षा वंदन उंच आहे. साधारण वंदनगड पाच टप्प्यात तर चंदनगड तीन टप्प्यात आहे. या किल्ल्यांमुळे कृष्णा आणि वासना नदीचे खोरे दुभागले जाते. चंदनगड कोरेगाव तालुक्यातील बनवडी तर वंदनगड वाई तालुक्यातील किकली गावामध्ये मोडतो तसे इनामपत्रांमध्ये नमूद आहे.




 अलिकडे या दोन्ही गडाच्या परिसरातील डोंगरावर पवनचक्क्यांचे जाळे तयार झाले आहे.

कसे जाल ?

चंदन-वंदन गडावर जाण्यासाठी दोन तीन मार्ग असले तरी बहुतेक दुर्गप्रेमींना सोयीचा मार्ग म्हणजे बेलमाचीमार्गे आहे.पुणे-सातारा रोडवर भुईंज गावापासून पुर्वेकडे वळाले की हुतात्मा किसनवीर साखर कारखाना-किकली-बेलमाची गाव गाठता येते.भुइंज ते किकली हे अंतर २० कि.मी आहे. जाताजाताच चंदन वंदन किल्ल्याचे दृश्य दिसते. वाइ आणि सातारा या दोन्ही ठिकाणाहून किकलीला येण्यासाठी बस आहेत. किकलीच्या पुढेच बेलमाची नावाचे गाव आहे. या बेलमाची गावाचे दोन भाग आहेत. एक आहे ती खालची बेलमाची तर दुसरी वरची बेलमाची, येथूनच एक वाट चंदन आणि वंदन यांच्या खिंडीत पोहोचते. डावीकडे राहतो तो चंदन तर उजवीकडे वंदन किल्ला आहे.तसेच सातारा फलटण रोडवर अंबवडे गाव आहे. गावावरून डावीकडे वळले की ७ ते ८ किलोमीटरवर बनवडी नावाचे गाव आहे. त्या गावाशेजारीच चंदन वंदन हा जोडकिल्ला मोठ्या दिमाखात उभा आहे.





किकली येथील शिवमंदीराचे फोटो

हुतात्मा किसनवीर सहकारी साखर कारखान्यावरील २६/११ च्या हल्ल्यातील वीरगती प्राप्त झालेल्या  योध्यांचे स्मारक

भुंईजमार्गे जाताना भुंईजचा राणुअक्कांचा वाडा, जाधवराव यांचे स्मारक, किकली येथील शिवमंदीर आणि मोठ्या संख्येने असलेल्या वीरगळी बघता येतात.बनवडी-ईब्राहिममार्गे आल्यास ईब्राहिमपुरचे प्राचीन शिवमंदीर आणि अरबवाडीचे धरण बघता येते.

इतिहास

कथा-कादंबऱ्यांमध्ये जुळ्या भावांविषयी आपण नेहमीच ऐकत असतो. मात्र दुर्गविश्र्वातही अशी जुळी भावंडे आढळतात, त्यांच्यापैकीच एक चंदन-वंदन. सातारच्या अलीकडे २४ कि.मी. अंतरावर ही दुर्गजोडी उभी आहे. उसाच्या पिकामुळे सधन झालेला हा सर्व परिसर असल्याने रस्ते, वीज, एस्.टी. या सर्व प्राथमिक सुविधा गावागावापर्यंत पोहोचल्या आहेत. सपाट माथा असल्यामुळे पुणे-सातारा मार्गावरून हे किल्ले सहजच ओळखता येतात. यांच्या पूर्वेस जरंडेश्र्वर, कल्याणगड, भवानीचा डोंगर, पश्चिमेस वैराटगड, पांडवगड. एकीकडे महाबळेश्र्वर प्रांत तर दुसरीकडे सातारा शहर यांच्या सीमेवर हे किल्ले उभे आहेत.
     इ.स. ११९१-११९२ सालच्या ताम्रलेखानुसार हे किल्ले शिलाहार राजा दुसरा भोज याने बांधले. अफझलखान वधानंतर महाराजांनी साताराचा किल्ला जिंकून या गडांवर आक्रमण केले. शिवाजी महाराजांनी पन्हाळा घेतल्यानंतर हे दोन्ही गड स्वराज्यात सामील झाले. व गडाची पूर्वीची नावे शूरगड आणि संग्रामगड बदलून चंदन वंदन अशी ठेवली. १७ डिसेंबर १६६२ रोजी अफझलखानाचा मुलगा फाझलखानाने चंदनगडाचा हवालदार यास पाठविलेले हुकुमपत्र आहे.सन १६६७-६८ च्या पत्रातील माहिती अशी 'दिवाण किले चंदन किले मजकुरीचे व विलायती सिवाजी भोसलेचे तसवीसीकरता कुल खराब पडीले.देसाई,देसकुलकर्णी,रयत परागंदा होउन दिवेलागण नाही.किल नाजुक सरहदेचा' १६७३ च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांनी सातारा प्रांत जिंकला आणि त्याचवेळी सज्जनगड, कल्याणगड, अजिंक्यतारा या किल्ल्यांसोबत चंदन-वंदन यांनादेखील स्वराज्यात सामील करून घेतले. पुढे संभाजी राजांच्या कारकिर्दीत सन १६८५ मध्ये फेब्रुवारी महिन्यात अमानुल्लाखानाने चंदन-वंदन येथे असणाऱ्या मराठ्यांच्या तुकडीवर हल्ला केला. या चकमकीत मोगलांच्या हातात २५ घोडी, २० बंदुका, २ निशाणे, १ नगारा सापडला. पुढे १६८९ पर्यंत हा सर्व परिसर मराठ्यांच्या ताब्यात होता. नंतर मात्र तो मोगलांच्या हातात पडला. औरंगजेबाने २७ ते २९ ऑगस्ट १७०१ मध्ये चंदन व ६ ऑक्टोबर १७०१ मध्ये वंदन गड ताब्यात घेतला. छत्रपती शाहूमहाराजांनी सन १७०७ मध्ये पावसाळ्यात हा प्रदेश जिंकून घेतला. पुढे सन १७५२ मध्ये ताराबाईवर लक्ष ठेवण्यास पुरेसा फौजफाटा देऊन बाळाजी विश्र्वनाथांनी या किल्ल्यावर दादोपंत वाघ यांची नेमणूक केली. विजयदुर्गावर ईंग्रज-मराठे यांच्या संयुक्त मोहीमेत पराभुत झालेला तुळाजी आंग्रे ईथे काही काळ कैदेत होता. सन १७९० च्या सुमारास तयार केलेल्या जमाखर्चाच्या खर्ड्यावरुन चंदन-वंदन हा विजापुर राज्यातील एक परगणा होता व त्याचे वार्षीक उत्पन्न २१,६४४ होते.अशी नोंद ईंग्रज अधिकारी बेअरींग याने केलेली आहे.सन १८१८ मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या हातात पडला.

 

 

 आपण बेलमाचीमार्गे या दोन्ही गडांवर कशी स्वारी करायची ते पाहु. बेलमाची गावातून निघालो कि थोड्याच वेळात गडाची चढण सुरु होते.

हि वाट चंदन वंदन यांच्यामधील तीन पायर्‍यांची रचना असलेल्या खिंडीच्या दिशेने चढते.दहा मिनीटाची चढण झाली कि एक शिवमंदीर दिसते.ईथेच विसावा घ्यायचा. 

महादेवाचे दर्शन घेउन हर हर महादेव असा जयघोष करीत निघायचे. साधारण पाउण तासात आपण खिंडीत पोहचतो. ईथे आपल्यासमोर दोन पर्याय असतात.चंदनाचा वास घ्यायचा कि वंदन करायचे.आपल्या सोयीनुसार आपण कोणताही एक पर्याय निवडू शकतो. आपण आधी चंदनगडाची दुर्गफेरी करुया. खिंडीतून थोडे पुढे दक्षिणेकडे गेले की डावी वाट चंदनगडाच्या दक्षीण अंगाने वळसा घालून पुर्वेकडे असलेल्या दरवाज्याकडे जाते.तर खिंडीतून उजवी वाट वंदनकडे जाते. खरतर खिंडीत असलेल्या नाकाडावरुन प्रस्तरारोहन करुन थेट गडावर जाउ शकतो.पण त्यासाठी पुरेशी तयारी पाहीजे ,शिवाय इथले दगड ठिसुळ असल्यामुळे हे धोकादायक होउ शकते.

आपल्या उजवीकडे पंचेचाळीस अंशाचा उतार असतो.अरुंद अश्या या वाटेने अर्ध्या तासाने चंदनगडाला वळसा घालून पुर्व टोकाकडे येतो.

ईथे आपल्याला दगडी पायर्‍या दिसतात. 

ईथे आपल्याला गडाचे महाद्वार लागते.दरवाजा भग्न तर झालेला आहेच.पण जमीनीत ईतका धसला आहे कि पहारेकर्‍यांची देवडी निम्म्यापेक्षा जास्त बुजली आहे.दुर्गसंवर्धन करणार्‍या संस्थानी ईथे कार्य केले तर हा दरवाजा किमान सुस्थितीत येईल.

या दरवाज्याच्या आत पीराचे स्थान दिसते.चंदनच्या प्रवेशद्वाराजवळील रस्ता पूर्वी बराच कठीण होता. मात्र सध्या तेथे असलेल्या मशिदीमुळे हा रस्ता बराच रुंद झाला आहे. दोन अर्धवट पडलेले बुरूज आपणास प्रवेशद्वाराची जाणीव करून देतात. येथून साधारण १५ पायर्‍या चढून गेले असता, डाव्या बाजूस एक पडकी वास्तू दिसते.

 तिच्या वरच्या अंगास एक वडाचे झाड आहे. पाच वडांचा मिळून बनलेला असल्यामुळे त्यास ‘पाचवड‘ म्हणतात. 

बाजूलाच एक शंकराचे मंदिर आहे. यातील दोन्ही महादेवाच्या पिंडी या पाच लिंगांच्या आहेत. ग्रामस्थांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. श्रावणात येथे यात्रा असते 

येथून दहा एक पायर्‍या चढून गेल्यावर समोरच मोठ्या शिळा रचलेल्या दिसतात.ग्रँट डफच्या मते हे गड पन्हाळ्याच्या शिलाहार भोज राजाने उभारले असल्याने हे पाषाणस्तंभ त्यानेच उभारले असले पाहीजे. हे पाषाणस्तंभ हे या गडाचे वैशिष्ट्य मानायला हवे. या दोन्ही स्तंभात प्रत्येकी चार दगड आहेत. याच्याविषयी आणखी एक कथा सांगितली जाते कि विजापुरचा दुसरा ईब्राहिम आदिलशहा ( इ.स. १५८०- १६२६) याने इ.स. १६०० मध्ये हा किल्ला बांधला,त्यावेळी त्याने हे दोन खांब उभे केले,आधी एक दगड जागेवर आणला.तेथील जमीनीत भर घालून तिची उंची दगडाईतकी केली.त्यावर दुसरा दगड ढकलत आणून बसवला.मग तिसरा आणि चौथा अश्या पध्दतीने दोन्ही खांबाची उभारणी केली.मग भर घातलेली माती काढून टाकली,त्यामुळे एकमेकावर रचलेले चार दगड अशी रचना येथे तयार झाली.मात्र हे असे पाषाणस्तंभ उभारण्यामागचे प्रयोजन काय, हे लक्षात येत नाही. ईतके मोठे दगड आणले कोठून, याचाही पत्ता लागत नाही. मुख्य म्हणजे ईथून कोयना परिसर जवळ असल्यामुळे या परिसरात झालेल्या भुकंपामुळे हे दगड हललेले दिसत नाहीत.

 हे पाषाणस्तंभ पाहून पुढे निघालो कि आपला प्रवेश गडमाथ्यावर होतो. चंदन एक दर्गा आहे. दर्ग्याच्या बाजूस एखाद्या वाड्याच्या भिंतीसारखे बांधकाम आढळते. एका अर्धवट दरवाज्यासारखे काहीतरी दिसते. 

चंदनगडावर एक मोठी विहीर दिसते.मात्र तुलनेने या गडावर पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. गडावरील पाण्याचे हे दुर्भिक्ष्य आणि चहा-न्याहारीचीही नसलेली सोय लक्षात घेऊन येताना पुरेशी काळजी घेत इकडे यावे.
तासा-दीड तासात चंदनही फिरून होतो. मग सुरू होते त्याचा भवताल शोधणे. पूर्वेकडून सुळकेश्वराचा डोंगर्,भुताची टेकडी, दक्षिणेला जरंडेश्वर, नैऋत्येला अजिंक्यतारा, मागे सज्जनगड करत पश्चिमेच्या वैराटगड व हवा स्वच्छ असेल तर पांडव, कमळ, केंजळगडावर नजर स्थिरावते. तळाच्या हिरव्या शेतीवाडीतून किसन वीर साखर कारखाना आणि बनवाडीचे छोटेसे धरण उठून दिसते. पश्चिम किनार स्वच्छ असेल तर धोम-बलकवडी धरणाचे चमचमणेही अनुभवता येते. उंचीचे हे माहात्म्य मग गडाच्या भूतकाळात घेऊन जाते.

साधारण सदरेसारखे येथील बांधकामाचे अवशेष दिसतात. याच्या मागील भागात सुद्धा अनेक उद्‌ध्वस्त अवशेष आपणास दिसतात. हीच गडावरील मुख्य वस्ती असावी. गडाच्या उत्तर टोकावर मजबूत बांधणीचा अगदी सुस्थितीत असलेला एक बुरूज आढळतो. याच वाटेवर एक समाधी आढळते, याच्या वरील बाजूस अस्पष्ट असे शिवलिंग आहे आणि एका बाजूस मारुतीची मूर्ती आहे. 

गडाच्या दक्षिणेकडे तीन कोठ्या असलेली पण वरचे छप्पर उडालेली वास्तू आढळते. गावकर्‍यांच्या मते हे कोठार म्हणजे दारूगोळा साठवण्याची जागा होती. गडाच्या मध्यभागी प्रशस्त चौथरा आहे. यावर काय वास्तू होती याचा मात्र अंदाज लागत नाही.

चंदनगडावरुन दिसणारा वंदनगड

चंदनगडावरच्या वास्तु बघत आपण चंदनगडाच्या पश्चिम टोकाशी येतो.ईथून समोर वंदनगड आणि त्याच्यावरच्या वास्तु स्पष्ट दिसतात.अर्थात वंदनगड हा चंदनगडापेक्षा उंचावर आहे.चंद्नगडाची उंची ३८३६ फुट आहे तर वंदनगडाची उंची ३८४१ फुट आहे.

चंदनगड बघुन वंदनगडावर जायचे तर पुन्हा वळसा घालून चंदन-वंदनच्या खिंडीत जावे लागते.ते टाळायचे असेल तर चंदनच्या पश्चिम टोकावरुन रॅपलींग करत खाली उतरुन थेट खिंडीत दाखल व्हायचे हा आणखी एक मार्ग.मात्र ढिसाळ दगडामुळे शक्यतो ते न केलेले चांगले.

 


वनखात्याने देखील चंदनवर काही काम सुरु केली आहेत.बेलमाचीकडून चंदनगडावर न चढता जर ईब्राहिमपुरमार्गे गेलो तर गडाकडे चढणार्‍या रस्त्यावर लाकडाच्या लक्षवेधक कमान उभी केली आहे. तसेच पुढे जांभ्या दगडात केलेल्या पायऱ्यांनी आपले स्वागत होते. अध्येमध्ये लाकडी बाकडी, आकर्षक पॅगोडा आहेत. त्यामुळं चढण सुकर बनते. ही कामं अलीकडच्या काळात उभी राहिली आहेत. जांभा दगड संपला, की मूळचा मार्ग. कणखर, बळकट दगड. वाटेत सावली अभावानेच. 

  पुन्हा चंदनगड उतरुन आणि गडाला वळसा घालून आपण मधल्या खिंडीत पोहचतो.ईथे समोर पश्चिमेला वंदनचे टोक दिसत असते.वंदनगडावर जाणारा रस्ता वंदनच्या दक्षिण अंगावरुन म्हणजे डावीकडून आहे.

वंदनचा बुरूज


 वंदनचा दरवाजा
 
 खिंडीतुन वंदनच्या दिशेने चढाई सुरु केली कि एकापाठोपाठ दोन दरवाजे दिसतात. एकेकाळचे भक्कम, पण आता थकलेले! या थकलेल्या शरीरांचे बाजूकडील दोन्ही बुरूज मात्र आजही खणखणीत! त्यावर श्री गणेश आणि षोडशदल कमळाचे शिल्प कोरलेले. 

 


 

दरवाज्याजवळच्या बुरूजावरील गणेश मुर्ती आणि कमळ

 गडाखालच्या गावातील लोकांनी त्याला शेंदूर लावून देव केलेले. हा दरवाजा बहुधा शिलाहारकालीन असावा किंवा यादवकालीन असावा.पहिल्या प्रवेशद्वारातून आत चढून वर गेल्यावर दुसरे प्रवेशद्वार लागते. सध्या ते मातीत बुजले आहे.मात्र अलिकडेच या गडावर सुरु असलेल्या दुर्गसंवर्धन कार्यात ते मोकळे करण्यात आले. 
 
 

दुसरा दरवाजा ढासळलेल्या अवस्थेत
या दोन दरवाजांतील हा दुसरा दरवाजा पहिल्याहून ज्येष्ठ! त्याचा सोपान चढून आत शिरलो, की डाव्या हातालाच एका इमारतीवर फार्सी लिपीतील शिलालेख दिसतो. त्याच्या तळाशी मोडी लिपीतीलही एक ओळ आहे. यात यादव राजा सिंघणदेवाचा उल्लेख आढळतो.बहुधा हा दरवाजा, त्याच्या बांधकामाविषयीच तो काहीबाही सांगू पाहतो. 
 
पण फार्सी येत नाही आणि तो कुणा तज्ज्ञाने वाचलेला नाही, त्यामुळे आजतरी ‘काला अक्षर भैस बराबर’! कोणीतरी तज्ज्ञ माणसाने यावर नजर टाकावी आणि या मुक्या ओळींना बोलते करावे. इसवी सन १६०० मध्ये इब्राहिम आदिलशाह याने गडावर बरीच बांधकामे केली. बहुधा त्याच वेळी हा दरवाजा आणि त्यावरचा हा शिलालेख बसवला गेला असावा. या दरवाजाच्या आत पहारेकऱ्यांसाठी खोल्या किंवा अस्सल ऐतिहासिक भाषेत ‘अलंगा’ बांधलेल्या दिसतात. 
पुढे आणखी काही पायऱ्या चढून माथ्यावर आलो, की ओळीने अनेक पडलेल्या इमारतींचे चौथरे दिसतात. स्थानिक लोक याकडे ‘ब्राह्मणवस्ती’ म्हणून बोट दाखवतात. एवढी बांधकामे पाहिल्यावर गडावर कधीकाळी बराच राबता असल्याचे वाटते. पण आज इथे माणूस दर्शनाला दुर्मिळ झाला आहे. नाही म्हणायला एखादे गुराख्याचे पोर दिसते आणि मग त्यालाच साथीला घेत गडदर्शन सुरू होते.

 गडाच्या मध्यावर एक छोटी टेकडी  असून तिला बालेकिल्ला म्हणतात. यावर एका बुरुजाचे तसेच इमारतीचे अवशेष आहेत.तिथे जाण्यासाठी पूर्वी पायऱ्या होत्या.या टेकडीलगतच गडकऱ्याचा पडलेला वाडा आहे. जुन्या दफ्तरामध्ये त्याचा उल्लेख ‘सरकारवाडा’ असा आला आहे. या वाडय़ाभोवतीही काही जुनी बांधकामे आहेत.

कोठारं

 यातच एक तीन खोल्यांची इमारत अद्याप ताठ मानेने उभी आहे.  हे बहुधा दारूगोळा कोठार असावे.या वास्तूच्या उत्तरेला पुरातन तुरुंग आहे. तुळाजी आंग्रेला येथेच कैद करून ठेवले असावे. गडाच्या पूर्व आणि पश्चिम दिशेला तटबंदीलगत खंदक आहे. महाराणी ताराबाईंनी हा बनवून घेऊन तब्बल दोन वर्ष शाहूशी लढाई केली होती.

 

गडाच्या पूर्वेस बालेकिल्ल्याच्या पायथ्याला छप्परी महादेव मंदिर आहे.गडावर तीन अज्ञात वीरांच्या समाध्या आहेत.तसेच गडाच्या वायव्येस काळूबाई मंदिर आहे.

याशिवाय वाटेतच जागोजागी पाण्याची मोठी तळीही दिसतात. 

 

पण यातील अनेकांनी पाण्याची साथ कधीच सोडली आहे. उरलेली गाळाच्या व्यथेत रुतली आहेत. हे सारे पाहात पश्चिमेला आलो, की एका विस्तीर्ण तळय़ाकाठी मशीद दिसते. 

 

 

मुस्लीम राजवटीतच ती उभी राहिली असावी. पाण्याने इथल्या तळय़ाला आणि मुस्लीम बांधवांनी मूळ स्वरूपातील या मशिदीला अद्याप जिवंत ठेवले आहे. आजचे तिचे ऐतिहासिक रूपच कायम राहावे, एवढीच मनोमन इच्छा! या मशिदीच्याच मागे एक स्नानगृह आणि काही थडगी दिसतात.

 या मशिदीच्या मागे दोन दगड दिसतात, ज्यावर पावले कोरलेली आहेत.

 याशिवाय गडावर आणखी काही वास्तुंचे अवशेष दिसतात.

अजून एक दर्गा

 वंदनगडावर पूर्वेस एक आणि दक्षिणेस एक या प्रमाणे चाके नसलेल्या चुन्याची घाणी आहेत.गडाला चहूबाजूने ताशीव कडे असल्याने जिथे आवश्यक आहे त्याच ठिकाणी तट-बुरुजांची चिलखते चढवली आहेत. गडाच्या दक्षिणेस एक चोरवाट आहे. गडावर मारगिरीच्या जागा फारशा दिसत नसल्या तरी याच वंदनवर असलेल्या एका प्रसिद्ध तोफेचा नाश करण्यासाठी सन १८५७ मध्ये कॅप्टन रॉसची नजर वंदनकडे वळल्याची नोंद एका ठिकाणी आहे. तासा-दीड तासात वंदन पाहून होतो.

 तर अशी हि ईतिहासप्रसिध्द दुर्गजोडी प्रत्येक दुर्गभटक्याने बघीतलीच पाहिजे.ईथे जाताना काही काळजी घेणे आवश्यक आहे.
१) दोन्ही गडावर पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे, त्यामुळे सोबत पुरेसे पिण्याचे पाणी आवश्यक आहे.
२) मुक्कामी ट्रेक करायचा असेल तर चंदनगडावरच्या दर्ग्याशिवाय पर्याय नाही, वंदनगडावर मानवी वावर नाही.दाट झाडीमुळे रानडुकरासारखे वन्य जीव आहेत्,त्यामुळे वंदनगडावर मुक्काम करु नये.
३) चंदन्,वंदन गडाची चढाई शक्य तितक्या लवकर सुरु करावी.वाटेवर झाडाची वानवा असल्यामुळे उन्हाचा त्रास होतो.
४) गडावर जाण्याच्या वाटा नीट समजून घ्या.चुकण्याची शक्यता फार आहे.
 
संदर्भ :-
१) सातारा जिल्हा गॅझेटीयर
२) साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !!- प्र,के,घाणेकर
३) सांगाती सह्याद्रीचा -यंग झिंगारो ट्रेकर्स
४) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
५) महाराष्ट्र देशातील किल्ले- चिंतामण गोगटे
६ ) श्री. अभिजीत बेल्हेकर, तुषार कोठावदे यांचे लिखाण

     
 



No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...