Sunday, February 7, 2021

वसंतगड (कराड )

ज्वाजल्य संघर्षाचा इतिहास असणार्‍या महाराष्ट्रात अनेक गड शुर योध्यांनी केलेल्या बलिदानामुळे किंवा पराक्रमामुळे ओळखले जातात.उदा. सिंहगड हे नाव डोळ्यासमोर आले कि तानाजीची वीरगाथा आठवणारच, पुरंदर म्हणाले कि आपसुक मुरारबाजीचे नाव पुढे येणार्,अवघ्या साठ मावळ्यानिशी प्रचंड मोठा गड घेतलेला कोंडाजी फर्जंद आणि पन्हाळा हे अद्वैत्,विशाळगड आणि बाजीप्रभुंचे बलिदान हे न विसरण्याजोगे,नाशिक जिल्ह्यातील कण्हेरागड एरवी दुर्लक्षित राहिला असता,पण रामजी पांगेरामुळे तो इतिहासात सुवर्णाक्षराने नोंदला गेला.पण एक गड कदाचित पायथ्याच्या गावात जन्म घेतलेल्या वीरामुळे प्रकाशझोतात आला.ते शुर योध्दे म्हणजे सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि तो गड म्हणजे अर्थातच वसंतगड.

 

इतिहास

 या गडाला प्रत्येक कालखंडात इतिहासाचे संदर्भ आहेत.वसंतगडाचे मुळ नाव चंद्रगिरी पर्वत असून त्याचा संदर्भ थेट रामायणाशी जोडला जातो. यासंदर्भात एक कथा सांगितली जाते, ती अशी.शुर्पणखेचा मुलगा शांभरी.आई शुर्पणखेचे नाक लक्ष्मणाने कापले, म्हणून त्याचा सुड उगवण्यासाठी त्याने या पर्वतावर ईंद्राची उपासना सुरु केली.ईंद्र प्रसन्न झाला कि त्याचे वज्र हे अस्त्र मागून त्याने राम-लक्ष्मण यांच्यावर वापर करुन शुर्पणखेच्या अपमानाचा बदला घेण्याची त्याची इच्छा होती.त्याने एका जागी बसून तप आरंभल्यावर त्याच्या भोवती वेळूचे दाट बन तयार झाले.झाडीझुडुपात शांभरी लुप्त झाला.एके दिवशी ईंद्र प्रसन्न होउन त्याने आपले अस्त्र शांभरीसाठी या पर्वतावर सोडले.योगायोगाने त्याच वेळी लक्ष्मण फिरत फिरत या पर्वतावर आले.नेमके त्यांनी वज्र या वेळूच्या बनात पडताना बघीतले. त्यांनी वज्र उचलून सहज म्हणून वेळूच्या बनावर चालवले,त्यामुळे आत तपश्चर्या करणार्‍या शांभरीचे हातपाय कापले गेले.त्या अवस्थेत शांभरी बाहेर आल्यावर लक्ष्मणांना पश्चाताप झाला आणि त्यांनी शांभरीला वर दिला कि 'लोक तुला चंद्रसेन म्हणून ओळखतील इथे येणारे भाविक देव म्हणून तुझी पुजा करतील आणि हा पर्वत तुझ्या नाबाने म्हणजे चंद्रगिरी डोंगर म्हणून ओळखला जाईल.' आजही या डोंगरला चंद्रगिरी म्हणतात आणि गडावर आपण चंद्रसेनाचे मंदिर आपण बघु शकतो. 
      वसंतगडाची निर्मिती भोज शिलाहार राजाने केली.  शिवपूर्वकाळात अनेक शतके यवनसत्तेच्या अमलाखाली होता. मसूर परगण्याचे पूर्वांपार जहागीरदार महादजी जगदाळे हे विजापूरच्या आदिलशाहीच्या सेवेत होते. हा किल्ला आदिलशाहीत असलेल्या सरदार जगदाळे यांच्या ताब्यात होता. या भागाचा सर्व कारभार याच किल्ल्यावरून होत होता. अशावेळी ह्या भल्यामोठ्या वाड्याचे अवशेष बहुधा जगदाळे यांच्याच वाड्याचे असावेत मात्र सबळ असा कोणताही पुरावा मिळत नाही.
      हा किल्ला अफजलखान मोहिमेपर्यंत आदिलशाहीच्या सेवेत असलेल्या मसूरच्या सरदार जगदाळे यांच्या ताब्यात होता, कारण अफजलखानाच्या बाजूने जगदाळे हे छत्रपतींच्या विरोधातील लढाईत सामील झाले होते. १० नोव्हेंबर १६५९ ला अफजलखान मारला गेला आणि विजापूरच्या सैन्याची दाणादाण उडाली. अर्थात महाराजांना विरोध करणं त्यांना भागच पडलं. महादाजी जगदाळे हे तर शाही नोकर म्हणून अफझलखानाच्या सांगाती प्रतापगडच्या आखाड्यात उतरले. छत्रपतींनी प्रतापगडाच्या पायथ्याशी खानाचा कोथळा बाहेर काढून आदिलशाहीस मोठा दणका दिला होता. अनपेक्षित  पराभवाने गांगरलेल्या आदिलशाहीतील कोल्हापूरपर्यंतचा सर्व मुलूख व किल्ले घेण्यासाठी छत्रपतींनी लगेचच मोहिम आखली. खान संपला. शाही फौजेची दाणादाण उडाली. त्यात महादजी जगदाळे तळबीड गावाजवळ महाराजांचे हाती जिता गवसला. महाराजांनी त्याचे हात तोडले आणि वसंतगड स्वराज्यात घेतला.शत्रूच्या गोटात सामील होऊन स्वराज्य द्रोह करणाऱ्या जगदाळेला मृत्यूदंडाची शिक्षा मिळाली.याच महादाजीला आठदहा वर्षाचा पोरगा होता. जिजाऊसाहेबांनी अगदी आजीच्या मायेनं या पोराला आपल्यापाशी सांभाळला. त्याला शहाणा केला. तो स्वराज्याचाच झाला.
  पुढे शिवाजी महाराजांचा मिर्झाराजे जयसिंगांशी संघर्ष झाला आणि पुरंदरचा तह झाला,त्यामध्ये शिवाजी राजांना मोघलांना तेवीस किल्ले देणे भाग पडले,त्यात या वसंतगडाचा समावेश होता.वास्तविक सिद्दी जोहरच्या वेढयातून महाराजांची सुटका झाल्यावर त्यांनी जिंकलेला आदिलशाही मुलुख परत दिला, तरीही हा वसंतगड शिवाजी महाराजांकडे कसा राहिला हे समजत नाही. त्यानंतर इ. स. १६७० मधे स्वराज्याच्या मावळ्यांनी हा परत घेतला. छ. संभाजी महाराजांच्या दुर्दैवी अंतानंतर काहीशी अनागोंदी झाल्याने स्वराज्यातील बहुतेक किल्ले मोगलांच्या ताब्यात गेले त्यात वसंतगड देखील होता.  छ. राजाराम महाराज जिंजीला असताना मराठी सरदारांनी पुन्हा त्याला स्वराज्यात सामील केले असणार कारण जुलै १६९९ ला दातेगड जिंकून सेनापति धनाजी जाधव व शंकराजी नारायण सचिव हे राजाराम महाराज व ताराबाईसाहेब यांच्या भेटीसाठी वसंतगडला गेले होते.  पुढे जिंजीहून परत आल्यानंतर छत्रपती राजाराम महाराज काही दिवस वसंतगडावर मुक्कामास होते. इथच वर्हाडातील राजा बुलंदबख्त याच्या वकीलाशी त्यांची भेट होउन वर्‍हाड्,खानदेशातील संयुक्त मोहीमेचा बेत ठरला.त्याच वर्षी लुत्फुल्लाखानाने वसंतगडला वेढा घालण्याचा असफल प्रयत्न केला होता. मात्र मोगल बादशाह औरंगजेब कराड मुक्कामी राहून वसंतगडा वेढा घालून किल्ल्याची रसद तोडण्यासाठी परिसरातील वाड्या जाळून टाकल्या होत्या. अखेर रसद तुटलेल्या किल्लेदाराने किल्ला मोगलांच्या हवाली केले व मराठ्यांची होणारी कत्तल थांबवली. हा जिंकलेला किल्ला पाहण्यासाठी स्वतः औरंगजेब किल्ल्याच्या दरवाजात जेव्हा पोहोचला तेव्हा तेथील लोकांची गर्दी पाहून त्याने स्वतःच्या हातातील तरवारीने अनेकांना मारले. छ. राजाराम महाराज जिंजीहून परत येताना येथे काही दिवस वास्तव्यास असल्याची नोंद आढळून येते तर मोगल बादशाह औरंगजेबाच्या ताब्यात हा किल्ला गेला असताना वसंतगडाचे त्याने केले "किली - द - फतह" असे नामकरण केले होते. मात्र फार दिवस तो मोगलांच्या ताब्यात राहिला नाही.
इ. स. १७०७ मधे महाराणी ताराराणीच्या वतीने परशुराम त्र्यबंक प्रतिनिधींनी मोगलांच्या ताब्यातील हा किल्ला जिंकून घेतला. छ. शाहू महाराजांच्या सुटकेनंतर रामचंद्रपंत अमात्य यांनी शाहूला पत्र लिहून त्यांचे अभिनंदन केले व त्याच्या स्वराज्याचा कारभारास शुभेच्छा दिल्या होत्या आणि हीच गोष्ट ताराराणीस न आवडल्याने तिने अमात्यांच्या पायात रूप्याच्या बेड्या घालून वसंतगड येथे कैदेत ठेवले होते. इ.स. १८०७ मध्ये दुसरे बाजीराव पेशवे व प्रतिनिधी यांच्यात तंटा निर्माण झाला तेव्हा पेशव्यांचा सेनापती बापु गोखले ( ) यांनी वसंतगडाजवळ प्रतिनिधींचा पराभव करुन त्यांना कैद करुन पुण्याला पाठवून दिले. यावेळी प्रतिनिधींची आश्रीत ताई तेलीन हिने बापु गोखले यांना बरीच टक्कर दिली. इ.स. १८१५ मध्ये गंगाधरशास्त्रीच्या खून केल्याप्रकरणी त्रिंबकजी डेंगळे यांस पेशव्यांनी कैद करुन येथे ठेवले होते मात्र या कैदेतून पसार होण्यात डेंगळे यशस्वी झाला होता. १३ मे १८१८ मधे ब्रिटिश मन्रोच्या नेतृत्वाखाली हा किल्ला इंग्राजांनी जिंकून पहिल्यांदा मुख्यदरवाजा पाडून टाकला.

गडावर पोहोचण्याच्या वाटा

  या इतिहासप्रसिध्द गडावर जायला दोन वाटा आहेत.
१) तळबीड वरुन :-
    वसंतगडाचे पायथ्याचे गाव म्हणजे इतिहास गाजवणार्‍य़ा सरसेनापती हंबींरराव मोहीते आणि महाराणी ताराबाई यांचे ‘तळबीड’ गाव. तळबीड हे वसंतगड या किल्ल्याच्या(पूर्वेस) पायथ्याचे गाव.कराडवरुन अर्ध्या तासाच्या अंतरावर तळबीड गाव आहे. कराड - सातारा रस्त्यावर कराड पासून ८ किमीवर तळबीडला जाणारा फाटा आहे. एसटी स्थानकावरुन तळबीडला जाण्यास दर अर्ध्या तासाला एसटी आहे. गावातच हंबीररावांचे स्मारक आहे. गाव संपल्यावर वसंतगडला जाण्याची चढण सुरु होते. वाट मळलेली आहे. पुढे वाट गडाला उजव्या हाताला ठेवत एका झाडाजवळ येते. तेथून सहजपणे गडमाथा गाठता येतो. गावातून किल्ल्यावर जाण्यास ४५ मिनीटे लागतात.

 कराड-चिपळून रस्त्यावरुन दिसणारा वसंतगड
 
२) वसंतगड गावातून :-
    याशिवाय कराड - चिपळूण रस्त्यावर , कराड पासून ९ किमी अंतरावर वसंतगड गावात जाणारा रस्ता आहे. गाव संपल्यावर वसंतगडला जाण्यासाठी मळलेली वाट आहे. तेथून उत्तरेला साडेतीन किलोमीटर वर वसंतगड हा किल्ला आहे.
 
हा किल्ला पुणे - बंगळूर या राष्ट्रीय महामार्गावरील कराड शहराच्या अलिकडेच असलेल्या तळबीड गावाशेजारी आहे. अर्थात तळबीड गाव पुणे-बेंगळुरूअशियाई महामार्गापासून जवळ पडत असल्यामुळे तळबीडला जाणे तुलनेने सोयीचे आहे.सहाजिकच बहुतेक दुर्गभटके तळबीड गावातूनच वसंतगडाला जातात.शिवाय या मार्गे गेल्यावर तळबीड गावातील हंबीरराव मोहितेंच्या समाधीचे दर्शनही घेणे शक्य होते.  तळबीड गावात आल्यावर समोरच सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे स्मारक दिसते.राष्ट्रीय महामार्गावरून कराडकडे जाताना टोल नाक्यापासूनच उजव्या बाजूला सुमारे तीन किलोमीटर अंतरावर तळबीड हे गाव आहे. 
 
 
 

 
गावात प्रवेश करतानाच समोर अतिशय देखणे असे सरसेनापति हंबीरराव मोहितेंचे स्मारक आहे. एकेकाळी दुर्लक्षित असणारी हि समाधी आज नवा साज घेउन डौलाने उभारली आहे. आपल्या या पराक्रमी भुमीपुत्राचा गावाला वाटणारा अभिमान या स्मारकातून दिसून येतो. बाहेर एतिहासिक तोफा ठेवल्या आहेत.आतमध्ये स्मारकाची आणि हंबीरराव मोहितेंची माहिती लावली आहे. आपणही यानिमित्ताने हंबीररावांविषयी थोडल्यात जाणुन घेउया. 

बाजी मोहिते पाटील तळबीड :-
    तळबीडचे मोहिते तस मातब्बर घराण मुळात तळबीडची कुसहि समर्थ शिलेदार जन्माला घालणारी कुस फत्ते पावन हेच ध्येय सहाजिकच माराठा लश्करात तळबीडकरानी भरल होत, रतोजी मोहिते निजामशाहीतील असा बलदंड माणुस की ज्याच्यावर झेंडा फडकवायला सारया शाह्या तग धरुन होत्या मुर्तुजा निजामशाहिचा विरोधक त्याच्याच लोकांनी बंड केला रतोजी त्यांना आडवा आला आणि असा पराक्रम केला कि ते बंडखोर जीव वाचवुन पळाले..हा पराक्रम पाहुण निजाम खुश झाला आणि या मोहिते बहाद्दरास ''बाजी "हा किताब बहाल केला. रतोजीँचा मुलगा तुकोजी तेथील मुतालीक चव्हाण यांना अभय,देउन तळबीडकरांच्या इच्छेनुसार पाटिलकी मिळवली...त्यांना तीन आपत्य संभाजी धारोजी आणि तुकाबाई.
    निजामशाही सोडुण नावारुपास आलेले शहाजीराजे यांच्यावर सरदार संभाजी अनंत याला धाडले गेले ..त्याने सालगण्या घाटात राजेँना कोंडले .त्या वक्ताला तिथे मोहिते बंधु मदतीला आले त्यांनी पराक्रम केला ..नंतर संभाजी -धारोजीच्या प्रस्तावावरुन तुकाबाईंना भोसले घराण्यात देण्यात आले इथुनच भोसले- मोहिते सोयरिक जमली. यावेळेपावतो तळबीडची पाटिलकी असलेले मोहिते -पाटिल संभाजी- धारोजीच्या पराक्रमामुळे प्रत्यक्ष शहाजीराजेंच्या मेहेनजरेमुळे आणि मोहित्यांच रक्त शिलेदाराच म्हणूनतर अदिलशाहित धारोजीनी "शुर सेनानी " मानाच स्थान हासील केल.
चंद्र कलेकलेने वाढतो तसेच छत्रपतीँच्या समर्थान हिंदवी स्वराज्य उभे झाले प्रत्यक्ष शिवछत्रपतींच्या खांद्याला खांदा लावुन शिलेदारी करणारे "मोहिते "स्वराज्यात हिराप्रमाने चमकले .प्रत्यक्ष संभाजी मोहित्यांचे पुत्र हंसाजी मोहिते हे मराठी दौलतीचे जुमलेदार होते ते सरनोबत झाले व हंबीरराव हा किताब मिळवला आणि मग काय दौलतीत सामिल झालेल्या गावात तळबीडचा दबदबा वाढला ..
तळबीडचे बाजी- मोहिते
रतोजी बाजीमोहिते
संभाजी बाजीमोहिते
धारोजी बाजीमोहिते
हंबीरराव बाजीमोहिते
तसेच महाराणी ताराराणी
तळबीडच्या मातीत सगळ्यांना हेवा वाटेल असा सेनानी जन्मला
  सरसेनापती हंबीरराव मोहीते -
   शिवशाहीच्या उदयापुर्वी अनेक कर्तबगार घराणी उदयास आली होती त्यामध्ये मोहिते, घाटगे, महाडिक, सुर्वे, जाधव, सावंत या विविध घराण्यांनी पराक्रमी पुरुषांनी मुस्लिम शाह्यामध्ये लष्करी सेवा करून नावलौकिक मिळवला होता.त्यांच्या भोसले घराण्याशी संबंध आला त्यावेळी नावलौकीकात आणखीनच भर पडली.काही घराण्यांनी छत्रपती घराण्यांशी नातेसंबंध निर्माण केला.त्यापैकी मोहिते घराणे जवळचे घराणे होते.या घराण्यात अनेक कर्तबगार पुरुष निर्माण झाले.याच घराण्यातील हंबीरराव मोहिते यांना शिवरायांनी अष्ठ्प्रधान मंडळामध्ये सरसेनापती म्हणुन स्थान दिले.खर्या अर्थाने हंबीरराव हे स्वराज्याचे पहिले सरसेनापती होते.हंबीररावांच्या अगोदर शिवरायांचे पराक्रमी सेनापती प्रतापराव गुजर व नेताजी पालकर यांचे स्वराज्यस्थापनेत मोठे योगदान आहे.परंतू त्यांच्याबाबतीत शोकांतिका झाली आणि साहजिकच हंबीरराव सरसेनापती झाले.
   सरसेनापती हंबीररावांच्या घराण्याचा इतिहास पाहिला तर तो गौरवशाली आहे.हंबीररावांचे पणजोबा रतोजी मोहिते यांनी निजामशाहीत मोठा पराक्रम गाजविला होता.त्यांना निजामशाहीने “बाजी” हा किताब दिला होता.हे घराणे तळबीड या गावची पाटीलकी सांभाळत होते.तुकोजी मोहिते हे पराक्रमी पुरुष तळबीड येथे आला व तेथील पाटीलकी सांभाळत सेवा करू लागला या घराण्याने घाटगे आणि घोरपडे घराण्याशी सोयरीक जुळवून आणली.याच दरम्यान शहाजीराजे यांच्याशी या घराण्यातील संभाजी व धारोजी मोहिते यांचा संबंध येवून शहाजीराजांच्या लष्कारात सामील झाले व मोठे शौर्य गाजवले.संभाजी मोहिते व धारोजी मोहिते त्या काळातील प्रराक्रमी सेनानी होते.त्यांच्या शौर्याची गाथा अदिलशाही फ़र्मानामध्ये पहावयास मिळतात.यातील संभाजी मोहितेचा मुलगा म्हणजे हंबीरराव मोहिते हा मर्दमराठा शिवरायांच्या सानिध्यात आले. सरसेनापति हंबीरराव मोहितेंचे मुळ नाव हंसाजी संभाजी बाजी मोहिते.सरसेनापति हंबीररावांचा जन्म इ. स. १६४० साली झाला. आपल्या पूर्वजांप्रमाणे ते एक कुशल योद्धा असल्याने छत्रपतींनी निर्माण केलेल्या स्वराज्याच्या सेवेत राहून पराक्रम करीत होते. कर्नाटक प्रांतातील शाह्यांना हंबीररावांच्या तलवारीने अनेकदा पाणी पाजले होते.
        स्वराज्याच्या स्थापनेवेळी संभाजी मोहिते हे शहाजी राजेंच्या लष्करात सहहवालदार होते.संभाजी मोहिते पुढे कर्नाटकला गेले मात्र आपली मुलगी सोयराबाई हिचा विवाह शिवरायांसोबत लावून दिला व छत्रपती घराण्यांशी पुन्हा नाते निर्माण केले.पुढे संभाजी मोहिते यांचा मुलगा हंबीरराव मोहिते यांनी आपली मुलगी ताराबाई हिचा शिवपुत्र राजाराम महाराजांशी विवाह लावून देऊन सरसेनापति हंबीरराव यांनी भोसले मोहिते यांच्या नाते संबंधातील परंपरा पुढे चालू ठेवली होती.मोहिते घराणे हे छत्रपतीचे अगदी जवळचे घराणे आहे.याच घराण्यातील उदयास आलेला मर्द मराठा म्हणजेच हंबीरराव मोहिते. शिवरायांच्या राज्याभिषेकापुर्वी महापराक्रमी सेनापती प्रतापराव गुजर बहलोल खानाशी झालेल्या संघर्षात मारले गेले.त्यांच्या शोकांतिकेनंतर ते सेनापती पद रिकामे झाले व ते पद हंबीरराव मोहितेंना दिले आणि अष्टप्रधान मंडळातील सरसेनापती पद म्हणुन मान मिळाला.हंबीरराव हा प्रतापरावांच्या सैन्यात सेनानी होता.ज्यावेळी प्रतापराव पडल्याचे कळाले तेंव्हा हंबीररावांनी अदिलशाहीच्या सेनेवर जबरदस्त हल्ला केला.शत्रुला विजापुरपर्यंत पिटाळून लवण्यात हंबिररावांचे मोठे योगदान आहे.सरसेनापती हा केवळ पराक्रमीच असून चालत नाही.तर तो प्रसंगाचा जाणकार व ह्रुदयाठायी शहाणपण आणि सबुरी असावी लागते.हे सर्व गुण हंबीररावांकडे होते.छत्रपती शिवरायांनी त्याच्या पराक्रमाचा गौरव म्हणुनच अष्ठ्प्रधान मंडळात स्थान दिले.महाराजांनी हंसाजी चा “हंबीरराव” हा किताबाने सन्मान केला.सरनौबत दिली.राज्याभिषेकानंतर मोघली सुभेदार दिलेरखान व बहादूरखान यांच्या छावण्यावर हल्ला करण्याचा आदेश शिवरायांनी हंबीररावांना दिला.
     हंबीररावांनी आपल्या कर्तृत्वाने स्वराज्याच्या सीमा सुरक्षित ठेवून, स्वराज्य विस्तारात महत्त्वाची भूमिका बजावली. छत्रपति शिवाजी महाराजांच्या अकाली निधनानंतर स्वराज्याच्या गादीचा वारसदार ठरताना योग्य व निर्णायक बाजू घेऊन छ. संभाजी महाराजांना उचित साह्य केले. नात्यापेक्षा कर्तव्य व सत्य श्रेष्ठ असते हे सरसेनापति हंबीररावांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले. छ. संभाजी महाराजांच्या काळात म्हणजेच १६ डिसेंबर १६८७ रोजी मोगल सेनानी सर्जाखान याच्या सैन्याशी केंजळ ता. वाई येथे स्वराज्याच्या मावळी सेनेशी युद्ध झाले. या प्रसंगी  मावळी सेनेचे नेतृत्व सरसेनापति हंबीरराव यांच्याकडे होते. या युद्धात सर्जाखान सैन्याचा दारुण पराभव सरसेनापति हंबीरराव सैन्याने केला. मात्र पराजित सैन्यातील एका शत्रू सैनिकाच्या तोफेचा गोळा लागून स्वराज्याच्या सरसेनापति हंबीरराव मोहितेंनी आपला देह रणांगणावर ठेवला.
अशा या महान न्यायनितीचा आदर्श जीवनशैली जोपासणा-या पराक्रमी सरसेनापतींना वंदन करून किल्ले वसंतगडाकडे आपली पाऊले पडतात.

तळबीड गावात अलिकडेच नव्याने उभारलेले आकर्षण म्हणजे श्रीराम मंदिर.वसंतगड भेटीत या मंदिराला आवर्जून भेट द्या.
    तळबीड गावातून गडाकडे जाताना वाटेत अनेक समाध्या, वीरगळ आपल्या दृष्टीपथास पडतात. तळबीडच्या अनेकांनी देव, देश, धर्म यासाठी बलिदान दिलेल्या या पावन स्मृती आहेत. गावच्या मागील बाजूला असलेल्या महाराणी ताराराणी विद्यालयाच्या शेजारील पायऱ्यांचा रस्ता गडावर घेऊन जातो. सुमारे ९३० मीटर उंचीच्या गडावर पोहोचायला ४५ मिनिटांचा अवधी लागतो.
 
 
सुरवातीला पायर्‍या आहेत.नंतर मात्र अस्सल डोंगरवाटेने चढाई सुरु होते.तळबीड बाजूने साधारण दीडशे पायऱ्या लागतात. पुढं मळलेली चढण पायवाट लागते, गडाच्या पायथ्याशी मध्यम झाडी असुन डोगंरावर जसे जाऊ तशी झाडी विरळ होते. थोडे अंतरावर आल्यावर आपण खिंडीत पोहोचतो. या गडावर जाण्याच्या मार्गात केशरी रंगातील खुणांद्वारे मार्गिका आखणेत आल्या असल्याने गडाची चढाई सोइस्कर होते. या खिंडीमध्ये  वसंतगड गावाहुन येणारा रस्ता मिळतॊ .वाटेत डाव्या हाताला तळबीड गावाचे मनोहर दृष्य दिसते. तर उजव्या हाताला गडाची रचाई केलेली तटबंदी दिसते. या उतारावर मोठ्या प्रमाणात करवंदीची जाळी आहे.उन्हाळ्यात ईथे आलो तर हा रानमेवा नक्कीच चाखायला मिळतो.

 गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे

      मोठया मोठ्या नैसर्गिक दगडी पायऱ्या चढत आपण तळबीड प्रवेशद्वाराजवळ पोहोचतो. हे प्रवेशद्वार गोमुखी बांधणीचे ( शत्रूला लक्षात येऊ नये म्हणून प्रवेशद्वार आतल्या बाजूला करतात , त्याला गोमुखी प्रवेशद्वार म्हणतात ) 
 
 
 
दरवाजा म्हणजे दगडात कोरलेल्या पायऱ्या सोडून इतर कोणतेही अवशेष नाहीत, आणि याचे कारण आहे ब्रिटिशांची हिंदुस्थानावर असलेली सुमारे दिडशे वर्षांची सत्ता. आमच्या पूर्वजांच्या ऐतिहासिक वारसास्थळांची तोफा लावून नासधूस केली या गो-यां राक्षसांनी.

 
 
 
 




























दरवाजाच्या अलिकडे डाव्या बाजूला एका घुमटीत श्री गणेशाची चार साडेचार फूट उंच सुंदर मूर्ती पाहून आपले दोन्ही हात नकळतच जोडले जातात. गणेश दर्शनाने किल्ला चढणीचा आलेला शारीरिक थकवा एका क्षणात नाहिसा होतो. हिंदू धर्म संस्कृतीत देवदेवतांना अनन्यसाधारण महत्त्व का दिले जाते याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. नव्या दमाने किल्ला पाहण्याची उत्सुकता निर्माण होते.

 

 

 त्यानंतर खडकात खोदलेल्या पायऱ्या चढून आपण किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचतो. तटबंदीच्या आतील भागात शेजारीच श्री हनुमानाचे इवलेसे मंदिर व तिचे समोर असलेली भगवी पताका वा-यामुळे सतत फडकत असते.हनुमानाची मूर्ती उग्र स्वरूपातील दिसते. जवळ जवळ सर्व शिवकालीन गडावर, हनुमान उग्रस्वरूपात दर्शन देतात.(स्थानिक लोक याला' चपट्या / चापट्या मारुती' असं संबोधतात.या मूर्तीचा उजवा हात जणू काही, शत्रूला मारण्यासाठी उगारलेला असतो. डाव्या बाजूला गोलाकार पाण्याने भरलेली लहान विहीर आहे. एकंदरीत स्वरुप पहाता ईथे पहारेकर्‍यांच्या देवड्या असाव्यात हे निश्चित.


 गडावर प्रवेश करताच समोर एक झोपडीवजा हाॅटेल/दुकानआहे.( चहा नाश्त्याची सोय होवू शकते). इथून आपल्याला वसंतगडाचा विसृत पसरलेला माथा बघायला मिळतो. वसंतगडावरील जमीन सपाट आहे. गडाच्या माथ्यावर आपणास एक प्रचंड गोलाकार मैदान दिसते. अधून मधून झाडी दिसतात. मध्यभागी भरपूर झाडी व थोडासा उंचवटा आहे. तिथं चंद्रसेन महाराज यांचे जुन्या बांधणीचे मंदिर आहे. . वसंतगड किल्ला सर्वसाधारणपणे 120 एकर परिसरात पसरलेला आहे. येथून सरळ जाणाऱ्या पायवाटेने गेल्यानंतर आपण गडाच्या मध्यभागी असलेल्या श्री चंद्रसेन महाराजांच्या मंदिराशेजारी येऊन पोहोचतो. 

मंदिराच्या भोवती पुर्वी तटबंदी असणार.सध्या त्या भिंतीचे थोडे अवशेष आणि दरवाजा दिसतो. अर्थात हे ही आता मोडकळीस आले आहे. या मंदिराकडे जाणर्‍या पायर्‍यापैकी एका पायरीवर काही अक्षरे कोरलेली दिसतात.अर्थात अस्पष्ट असल्यामुळे वाचता येत नाहीत.
   चंद्रसेन महाराजांचे मंदिर दक्षिणाभिमुख  आहे. मंदिर सुरेख असून आत गाभार्यात चंद्रसेन महाराजांची मूर्ती आहे.चंद्रसेन महाराज हे अनेक मराठे घराण्यांचे कुलदैवत आहे. दगडी मंदिर असून प्रशस्त सभामंडप आहे. 



 

 

 

मंदिरासमोर एकाच दगडी चौथ-यावर दोन दीपमाळा असून दीपमाळेच्या पायथ्याशी अनेक भंग झालेल्या मूर्ती ओळीत मांडून ठेवलेल्या आहेत.पूर्वी एकच प्रचंड मोठी दीपमाळ होती. ती पडली, सध्या तिचे दोन भाग उभे आहेत. तसेच ईथे काही दगडी तोफगोळे ही आहेत.

 

 

Temple of Chandreshwar or Moon

 

चंद्रसेन मंदिरातील मूर्ती अतिशय सुंदर असून तिच्या उजव्या बाजूला जोगेश्वरी तर डाव्या बाजूला जानाईदेवीची सुंदर मूर्ती आहेत. ही जानाईदेवी चंद्रसेन देवाची बहीण आहे, असे काहींचे मत आहे.चंद्रसेन हा शूर्पणखेचा मुलगा. महादेवाची खूप तपश्चर्या करून खड्ग प्राप्त करून घेतले. शेवटी लक्ष्मणाने त्याचे दोन्ही हात तोडले. सध्याच्या मूर्तीचे दोन्ही हात अर्धेच आहेत. मात्र उत्सवमूर्ती पूर्ण हातांची आहे.इकडे याला चंद्रोबा / चांदोबा असेही म्हणतात.शुर्पणखेचे नाक कापून कोयनेच्या डोहात टाकले म्हणुन तिथे अजूनही नकटे मासे सापडतात.सुपने गावातील दैत्य मंडळी,जोमलिंग या गोष्टी या कथेला पुरावा म्हणुन स्थानिक लोक दाखवितात.
     या चंद्रसेन महाराजांना  अनेक घरंदाज मराठे घराणी चंद्रसेनाला आपले कुळदैवत मानतात. जोगेश्वरी माता आणि चंद्रसेन महाराज यांचा विवाह लावण्याची प्रथा आहे. भक्तांनी चंद्रसेन देवाची मंदिरे आपआपल्या गावी बांधली आहेत. त्यात निमसोडचे घाडगे यानी निमसोडला तीन मंदिरे बांधली आहेत , रायगाव, धोडवाडी, पलसगाव, कोळ, पुसेसावळी, विटा अशा अनेक गावात चंद्रसेन मंदिरे आहेत. या चंद्रसेनाचा वध लक्ष्मणाने चैत्र वद्य एकादशीला केला म्हणुन या चंदोबाची यात्रा त्याच दिवशी असते. 


 


     मंदिर प्रदक्षिणा करीत असताना उजवीकडे असलेल्या भिंतीवर एक शिलालेख असून इ. स. १७०० साली मंदिर जीर्णोद्धारासाठी मदत केलेल्या व्यक्तींच्या नावांची यादी कोरलेली आहे. चंद्रसेन महाराजांची यात्रा चैत्रातील दुसऱ्या पंधरावड्यात या किल्ल्यावर दरवर्षी भरते तर दस-याला पूर्वीचे बारा बलुतेदार चंद्रसेन महाराजांच्या पालखी घेऊन गड पठारावर प्रदक्षिणा करतात. चंद्रसेन महाराजांचा संबंध पुराणातील रामायणाशी असल्याच्या विविध आख्यायिका भक्तजनांच्या मनात रूजलेल्या आहेत.

याच चंद्रसेन मंदिराच्या बाहेर पडल्यावर मागेच गर्द झाडीत असलेल्या श्री.सूर्यदेवता आणि श्री. नरसिंह देवता यांच्या मूर्ती नुकत्याच टिम वसंतगडला सापडल्या. टिमच्या सदस्यांनी श्रमदान करुन श्री नरसिंह व श्री सुर्यदेवता मंदिर परिसरातील झाडी काढून मंदिराकडे जाणारा रस्ता घनदाट झाडीने बंद होता तो पुर्णपणे मोकळा करण्यात आला.या ठिकाणी खूप झाडी असल्यामुळे पुर्वी हे मंदिर दुर्लक्षित होते पण आता ते प्रकाशात आणण्याचे काम 'टीम_वसंतगड 'च्या सदस्यांनी केले.

मंदिराकडे जाताना उजव्या बाजूला एका भल्यामोठ्या वाड्याचे अवशेष दिसून येतात. हा वाडा या किल्ल्याच्या किल्लेदाराचा  असावा.

 

 

 

 

 

 

 इथून पुढे डाव्या बाजूला लक्ष्मी मंदिर आहे त्यामध्ये शिवलिंग व गजांतलक्ष्मी पहावयास मिळते. या मंदिराच्या डाव्या बाजूलाच वाड्याचे अवशेष आहेत. व उजवीकडे विठ्ठल मंदिर आहे . याची थोडी पडझड झालेली दिसते.

 

या मंदिराच्या अलिकडे श्रीराम व मारुती मंदिर आहे. ही दोन्ही मंदिरे पाहताना श्रीराम, माता सीता, लक्ष्मण यांच्या संगमरवरी सुंदर मूर्ती पाहून एक जाणीव होते की, मर्यादा पुरूषोत्तम श्रीरामाचा वनवास अजूनही संपलेला नाही.  या मूर्ती दोन वेळा बसवल्याचे लक्षात येते. जुन्या(भंगलेल्या ) खाली आणि नवीन चौथऱ्यावर आहेत.
याशिवाय याच परिसरात दगडी जाते हि दिसते.

 

   मंदिर परिसर पाहून डाव्या बाजून मंदिराच्या बाहेरील वाटेने पुढे उत्तर दिशेने गेल्यास वाटेत आपणास चुन्याच्या घाण्याचे अवशेष दिसतात.


  गडाच्या मध्यभागी असलेली मंदिरे आणि इतर अवशेष पाहून पुन्हा गडाच्या पुर्व दरवाज्याक्डे यावे.ईथून तटबंदीवर चढून गडाच्या माथ्याचा फेरफटका करुया.  गडाच्या चारी बाजूंनी चार डौलदार बुरूज असून त्यावर चढण्यासाठी दगडी जिनेही आहेत.गडाभोवती तटबंदी आहे व चार बुरुज आहेत. त्यातील दोन पूर्वेकडील व पश्चिमेकडील बुरुज चांगल्या स्थितीत आहेत.

Vasantgad Fort

 

 

बारकाईने बघीतले तर बुरुजांच्या बांधणीचे एक वेगळे वैशिष्ट्य ईथे दिसून येते.बहुतेकदा तटबंदीच्या बाहेर बुरुज आलेले असतात.ईथे मात्र तटबंदी पुढे आणि बुरुज मागे अशी वेगळीच रचना पहावयाला मिळते. दोन बुरुज तर तटबंदीपासून आत सुटे बांधले आहेत. याच प्रकारचे बुरुज संकेश्वरजबळील वल्लभगडावर बघायला मिळतात. बुरुज मागे असल्यामुळे पहारेकर्‍यांना वावरण्यासाठी असलेली शेरहाजी बुरुजाच्या तळाशी बाहेरुन बांधलेली आहे. वास्तविक शिलाहार भोज राजा ( दुसरा ) याने या परिसरातील बाकीचे गड उभारुन सुध्दा तटबंदी आणि बुरुजांचे हे वैशिष्ट्य इतर गडावर बघायला मिळत नाही.तेव्हा हि तटबंदी भोज राजाच्या कारकीर्दीत उभारली कि नंतर ? असा प्रश्न पडतो.

गडाच्या आग्नेय टोकाच्या बुरुजाची बांधणी आवर्जून पहावी अशीच आहे.ईथेच एक तटबंदीत लपविलेला शौचकुप आहे. 

गडाच्या या बाजुला खाली वसंतगड गाव दिसते.या बुरुजाखालील डोंगर सोंडेवर एक चौकोनी आकाराची गुहा आहे. हा बहुतेक गुप्त मार्ग गडावर निघाला असावा. कारण गुहेचा शेवट कुठपर्यंत आहे , हे शोधता आलेले नाही. या गुहेची उंची पावणे दोन फ़ुटांपर्यंत असुन रुंदी फ़ारच कमी आहे.एकावेळी गुहेत एकच व्यक्ती यागुहेची लांबी वीस फ़ुटांपर्यंत असुन शेवटच्या टॊकाला विहीरसादृश्य रचना बाहेरुन दिसली. इथे वटवाघुळांचा रहिवास असल्याने दुर्गधींमुळे शेवटच्या टोकापर्यंत जाऊ शकत नाही. कदाचित ही गडावर जाण्याची चोरवाट किंवा चकवा असण्याची शक्यता असावी. 


गडाच्या तटबंदीवरुन वाट्चाल सुरु ठेवायची. या दक्षिण बाजुला आडवा तिडवा पसरलेला बौध्द लेण्यांनी पोखरलेला आगाशिवाचा डोंगर दिसतो. फिरत फिरत आपण गडाच्या पश्चिम बाजुला आलो कि आपल्याला कोयना नदी आणि तिचे अफाट पसरलेले खोरे दिसते.या बाजुला सह्याद्रीच्या निळसर रांगाचे मनमोहक दर्शन होते. वातावरण स्वच्छ असल्यास गुणवंतगड उर्फ मोरगिरी आणि काळगाव परिसरातील गुढे पाचगणीच्या पठारावरील पवनचक्क्या दिसतात.  


 कोयना तळे

याच बाजुला कमळ फुलांनी लगडलेले कोयना तळे आहेत. गडाच्या विस्तृत पसरलेल्या माथ्यावर बरेच पावसाळी तलाव आहेत. यातील कोणत्याच तळ्याचे पाणी पिण्यायोग्य नाही.अर्थात त्यातील कोयनातळे व कृष्णातळे अशी दोन तळी आहेत.कोयना तळे गडाच्या पश्चिम बाजुला आहे .या तळ्यात असलेले पांढऱ्या रंगाची कमळपुष्प पाहताना मनाला आनंद होतो. आज जर हे वैभव दिसत आहे तर मराठ्यांचा सुवर्णकाळात काय असेल याची कल्पनाच केलेली बरी.  यांच्या काठावर जुन्या समाध्या व सतीशिळा आहेत.इतिहासात उल्लेख केल्याप्रमाणे, गडावर बारा बुरुज आणि तीन विहिरी होत्या.गडावर या तीन विहिरीतील गाळ काढूनही, त्या किती खोल आहेत याचा अंदाज येत नाही. इंग्रजांनी या विहिरीत गडावरील तोफा टाकून दिल्या, असं काही म्हणतात तर काहीजणांच्या मते इंग्रजांनी तोफा गडाखाली ढकलुन दिल्या.गडमाथ्याची भटकंती करताना हे सर्व तलाव आपल्याला दिसतात.

 

तसेच पुढे गेल्यास गडाच्या वायव्य बाजुला एक बुरुज दिसतो .या बुरुजावर जिना असून आपल्याला वर जाता येते. वर टेहळणी करण्यासाठी तीन फूट उंचीचा मोठा झरोका आहे,त्यातून आजूबाजूचा परिसर स्पष्ट दिसतो.तिथून खाली साकुर्डी गाव आणि ' भवानी मातेचे मंदिर' दिसते.

 

 


यानंतर आपण येतो गडाच्या उत्तर टोकाकडे. पश्चिम बुरुजाजवळ किल्ल्याचे दुसरे प्रवेशद्वार आहे.  किल्ल्यावरील पश्चिमेस असणारा एकमेव दरवाजा सुस्थितीत असून याचे बांधकाम गोमुखी पद्धतीचे आहेत. हा किल्ला जरी भोज राजाने बांधला असला तरी संरक्षणाच्यादृष्टीने त्या त्या काळानुसार त्याचे रचनेत बदल केले गेले त्यानुसार या दरवाजाच्या बाजुचे बुरुज बाहेरील बाजुस दरवाजा सहज दृष्टीक्षेपात येणार नाही असे बांधले आहे

 

 हे काम शिवकालिन असल्याचे त्याचे रचनेवरुन दिसते. या दरवाजाच्या डाव्या बाजूला तटबंदीच्या आतील भव्य गोलाकार बुरूज असून तो अखेरच्या घटका मोजत आहे, तर उत्तरेच्या बाजूचा बुरूज देखील त्याच अवस्थेत आहे. या दोन्ही बुरूजावर जाण्यासाठी वर्तुळाकार सुमारे २५ ते ३० पायऱ्या आहेत. पूर्वेला असलेला बुरूज, तटबंदी व दरवाजा जवळजवळ नष्ट होत आला आहे.   वसंतगडावरील तटबंदी, दरवाजा व वाड्यांचे अवशेष हे सर्व जांभ्या दगडातील असल्याने ऊन, वारा व पावसाने भग्न होण्याच्या स्थितीत आहेत.

 

या दरवाजाचे चौकटीचे बाहेरील बाजुस डोक्यावर शेपुट असणारी लढाऊ वीर हनुमानाची मुर्ती आहे. याही बुरुजाशेजारी देवडीचे अवशेष असुन त्याच्या समोर भिंतीचे अवशेष आहेत त्याच्या रचनेवरुन ती सदर असावी. याच पूर्वेकडील तटबंदीत एक सुस्थितीतील तत्कालीन शौचकूप आहे.गडाच्या उत्तरेकडील बुरूजाशेजारी श्री हनुमानाची भग्न मुर्ती सापडली आहे. या दरवाज्यातून बाहेर पडणारी वाट खाली बेलदरे गावाच्या हद्दीतील नाईकबा देवस्थानाकडे जात असल्याने याला 'नाईकबा दरवाजा' म्हणतात.समर्थ रामदासांच्या ११ घळींपैकी चंद्रगिरी घळ वसंतगडापासून दिड ते दोन तासांच्या अंतरावर आहे. वसंतगडावरील पश्चिमेच्या प्रवेशव्दारातून म्हणजेच नाईकबा दरवाज्यातून बाहेर पडून खिंडीत उतरावे.गडाच्या पश्चिमेला, गडावरून उतार सुरु होतो, आणि पुन्हा डोंगर सुरू होतो.तिथून चरेगाव बेलदरे गावातून चंद्रगिरी घळ गाठावी. परत येतांना वसंतगडा पर्यंत न येता चरेगावात उतरावे. तिथून कराडला येण्यासाठी वडाप व बसची चांगली सोय आहे.

गडाचे उत्तर टोक बघीतले कि आपला परतीचा प्रवास सुरु होउन पुन्हा तळबीडकडे असणार्‍या पुर्व बाजुच्या दरवाज्याकडे येण्यासाठी आपण निघतो. तेथुन पुढे आपण शेवटच्या बुरुजाकडे निघूया.वसंतगडाच्या डोंगराला नैसर्गिक कातळकडा पुरेसा उंच नसल्याने पुर्ण गडमाथा वेढणारी तटबंदी बांधलेली दिसते. तटबंदी वरुन जाताना ठिकठिकाणी मशाल ठेवण्याच्या खोबण्या आहेत.गडावर नजरेत मावणार नाही एव्हडं विस्तीर्ण पठार आहे.  तटबंदीला अतिरिक्त पाणी वाहून जाण्यासाठी छोटे छोटे आऊटलेटस आहेत.

 

 












या बाजुला आणखी एक बुरुज असून त्यावर चढण्यासाठी बाहेरुन गोलाकार पायर्‍या आहेत. त्यावर चढल्यास पुर्व बाजुचा पसरलेला नजारा दिसतो.  या बुरुजाच्या शेजारी एका कोठीचे अवशेष दिसतात. हि पहारेकर्‍यांसाठी असावी.

 

यामध्ये ईशान्येला मसुर भागातील डोंगर, गडाच्या खालच्या बाजुला तासवडे एम.आय.डी.सी. आणि तासवडे टोलनाका, जमीनीवर काळी रेघ ओढल्यासारखा दिसणारा पुणे-बेंगळूरु महामार्ग आणि त्यावरुन अखंडीत धावणारी वहाने, हिरव्यागार शेतींने झाकलेली सुपिक जमीन चिरत धावणारी कृष्णा नदी, आग्नेयेला सदाशिवगड आणि लांबवर कराड शहर. निवांत बसून अनुभवावा असा हा नजारा.
  कृष्णा तळे

 ईथून पाय निघत नाहीत्,मात्र कर्तव्याची जाणीव होउन नाईलाजाने आपण उठतो. थोडे अंतर गेले कि आणखी एक प्रशस्त तलाव दिसत्प. हे आहे कृष्णा तळे. याला गर्द झाडीचा वेढा पडलेला आहे.

 

या तळ्याच्या काठावर अनेक अज्ञात समाध्या व सतीशिळा आहेत. या अवशेषांवरुन एक निश्चित होते की वसंतगड रक्षणासाठी अनेक पराक्रमी योद्ध्यंनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे.वसंतगडावर सैनिक संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे अनेक वाड्यांच्या जोत्याचे पुरावे दिसून येतात. गडावर लहानमोठी सहा तळी असल्याने पाणीसाठा विपुल असावा.


  पुढे गेले कि जमीनीतच पडलेला वेडावाकडा रुंद चर बघायला मिळतो. हे नैसर्गिक टाके असावे. ईथे पावसाळ्यात पाणी भरते. त्यामुळे याचा उपयोग पाण्याच्या टाक्यासारखा होत असणार. टिम वसंतगडने याची नुकतीच स्वच्छता केली. गडावरचे  प्रचंड पठार आणि पावसाळ्यात त्यावर उगवणार्‍या गवतामुळे परिसरातील गावातील जनावरांची मोठ्या प्रमाणात वर्दळ ईथे असते. या तालावातील पाणी त्यांना उपयोगी पडते.
  यानंतर परतीची वाट पकडली कि आपण उन्हा दरवाज्या पाशी येतो आणि आपली गडाफेरी संपते.

गडमाथ्यावर काळी माती आहे, भर पावसाळ्यात बऱ्याच ठिकाणी भरपूर प्रमाणात गुडघाभर चिखल असतो. त्यामुळे फिरणे सोयीचे होत नाही.शक्यतो सरता पावसाळा ते अगदी मे महिन्यात सुध्द्दा वसंतगडाला भेट देता येईल.

वसंतगडाची आपण माहिती घेतली तरी आणखी एका गोष्टीचा उल्लेख ईथे केलाच पाहिजे.तो म्हणजे ' टीम वसंतगड'बद्दल.हल्लीच गड्,कोट आणि संवर्धन याविषयी महाराष्ट्रातील तरूण वर्गात जागृती येउ लागली. आपल्या परिसरातील एक गड घेउन त्याचे संवर्धन प्रसंगी पदरमोड करुन हा युवा वर्ग करु लागला.अगदी परवा पर्यंत दुर्लक्षित अस्णारा वसंतगडाच्या परिसरातील हि शिवशक्ती जागी झाली आणि स्थापना झाली 'टिम वसंतगड' ची. 

  या लोकांनी गडावर नियमित श्रमदान सुरु केले आणि गडाचे जीर्ण झालेले रुप पालटू लागले. वास्तुंवर्,तटबंदीवर वाढलेली झाडेझुडपे बाजुला होउन चिर्‍यांनी मोकळा श्वास घेतला. तलावातील गाळ काढला जाउन तिथे स्वच्छ पाणी दिसु लागले. गडाच्या वास्तुवर पाट्या लागल्या,अगदी टीम वसंतगडच्या सदस्यांचा वाढदिवसही किल्ले वसंतगडावर श्रमदान करून साजरा करण्यात येतो.गडावर कोयना तळ्याच्या बाजूला कंपाऊंड करून त्यामध्ये वृक्षारोपण टीम वसंतगड व स्थानिकांच्या सहकार्याने करण्यात आले आहे.तटबंदीच्यावर आणि पश्चिम प्रवेशद्वारावर, झाडं उगवली होती, ती काढून टाकली तरी मुळ्या आत खोल जात असल्याने तटबंदी ढासळत चाललीय.' टीम वसंतगड 'अंतर्गत गडावर मनापासून प्रेम करणारे आणि आपला ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी, बरेच युवक आठवड्यातून एकदा दोनदा वर जाऊन साफसफाई, गाळ काढणे, तटबंदी सुरक्षित राहावी यासाठी प्रतीबंधात्मक कार्य करत आहेत..

  

 आणखी एक स्तुत्य उपक्रम या गटातर्फे राबविला जातो. टीम वसंतगडच्या वतीने किल्ले वसंतगडवर वर्षातून एकदा म्हणजे 1 मे पुर्वसंध्येला महाराष्ट्र दिनानिमित्त शिवकाल अनुभवण्यासाठी गडाच्या तटबंदी व बुरुजावरून खडा पहारा देऊन मशाल मिरवणूक काढली जाते.

   टीम वसंतगडचं ब्रीदवाक्य आहे ' कार्य हीच ओळख 'हे पटतं आणि भावतं पण.अशा या शिवकार्याचा गोवर्धन उचलायचा तर आपलीही करंगळी रुपात मदत त्यांना झाली पाहिजे. शारीरैक श्रम शक्य नसतील तर शक्य असेल तर आर्थिक मदत जरुर करावी. 

     या किल्ल्यावर विशेष ऐतिहासिक घटना घडल्या नसल्या तरी स्वराज्याच्या राखणदार असलेल्या वसंतगडाला भेट दिल्यास एक वेगळीच अनुभूती नक्कीच येते. नवचैतन्य व जीवनातील संघर्षासाठी बळ हवे असेल तर एकदा सरसेनापति हंबीरराव समाधीस्थळ व वसंतगडाला भेट द्यावीच लागेल.

 संदर्भ :-

१) सातारा जिल्हा गॅझेटीयर

२) सांंगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स

३) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे

४) आडवाटेवरचा महाराष्ट्र- प्र.के. घाणेकर

५) महाराष्ट्र देशातील किल्ले- चिंतामण गोगटे

६) शोध शिवछत्रपतींच्या दुर्गांचा - सतिश अक्कलकोट

७) स्थलकाल- अरुण टिकेकर

८) डॉ. विजयसिंह पाटील यांचे लिखाण 


 

 

 

 




























 


 

 


 

https://mrudaghandha.blogspot.com/2019/01/blog-post_6.html

 



राहाण्याची सोय

चंद्रसेनच्या मंदिरात १० ते १२ जणांची राहण्याची सोय होते.

जेवणाची सोय

गडावर जेवणाची सोय नाही, कराडमध्ये आहे.

पाण्याची सोय

गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.

जाण्यासाठी लागणारा वेळ

१) तळबीड मार्गे १ तास लागतो.
२) वसंतगड गावामार्गे १ तास लागतो.










...डॉ. विजयसिंह पाटील... कराड.

 वसंतगड हा इतिहासप्रसिद्ध अशा तळबीड परिसराचे रक्षण करणारा किल्ला होता. मराठा साम्राज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि त्यांची कन्या रणरागिणी महाराणी ताराबाई या तळबीड गावचे होते.
...विनोद निंबाळकर... कराड.
अजून गडाच्या नाईकबा दरवाजा येथेही हनुमान मूर्ती आहे.
गडावर सध्या दोन मध्यम आकाराची तळी आहेत. उत्तर बाजूस (कृष्णा नदीच्या दिशेने) कृष्णा तळे.या तळ्यातील पाणी पिण्यायोग्य असून बारमाही पाणी असते.
आणि दक्षिणेस कोयना नदीच्या दिशेस ' कोयना तळे '..
कोयना तळ्यात उगवलेली लाल पांढरी कमळ फुलं आपल्या डोळ्याचं पारणं फेडतात.(या तळ्यातील भरपूर गाळ काढण्यात आला आहे.)
गडावर काही जिवंत स्वरूपात पाण्याचे टाके आहेत पण ते काळाच्या ओघात मातीने बुजलेले दिसतात. (त्यातीलच एका पाण्याच्या टाक्यातील मातीचा गाळ टीम वसंतगड ने काढलेला आहे.)
गडाला दोन दरवाजे आहेत. दोन्हीही तळबीड च्या बाजूला आहेत. पूर्व बाजूस तळबीड दरवाजा, तर पश्चिम बाजूला नाइकबा दरवाजा आहे.
नाईकबा दरवाज्याच्या दगडी बांधकामात, उग्रस्वरूपात मारुतीचे सुंदर शिल्प कोरलेलं आहे.
.


































































.

 


पश्चिमेकडील दरवाजाकडे जाताना मोठ्या आकाराची दोन पाण्याने भरलेली तळी आहेत. एकाचे नाव कोयना तळे व दुसऱ्याचे नाव कृष्णा तळे होय.

स्थळ भेटी संदर्भात माहिती 
पुणे - सातारा - उंब्रजच्या टोलनाक्या पासून उजवीकडे तीन कि. मी.वर तळबीड आहे. निवास व भोजनाची व्यवस्था कराड येथे होऊ शकते.
The base village of Vasantgad is “Talbeed”, (Karad) this is place remembered for Hambirrao Mohite, Shivaji Maharaj’s second Commander-in-chief. This is also the place of Queen Tarabai. We can also see the memorial of Hambirrao Mohite in Talbeed. The route to the fort starts from outskirts of the village. The fort entrance has been destroyed. We can see a Ganesh idol carved in the ramparts. If we turn right after ascending the steps, we reach a big temple. This is the temple of Chandrasen, the son of Shoorpanakha, Ravana’s sister. There are remnants of two more temples.
The mountain top is extensive, and is well fortified by strong bastions. We find a doorway in the bastion on the south side of the fort. This entrance is of “Gomukhi” type, and the carvings here are still intact. The ramparts are also intact. There is a big grinding wheel on the fort. It takes around one and half hour to see the fort. From the top we get a good glimpse of Koyna River.

The fort is easy to climb. I did not climb from Talbeed village. I took following route, Pune – Satara – Karad – Take left towards Karad Airport – Vasantgad. It takes less than 45mins to climb the fort and one hour to see the entire fort.

History of Vasantgad Fort
Vasantgad was built by Shilahar King Bhoj. Shivaji Maharaj conquered it on 1659. Later, Rajaram Maharaj stayed for some time on this fort when he returned from Jinji. Aurangzeb captured this fort in 1700 and named it “Kili-da-Fateh”. The Marathas got the fort back in 1706.

Approximate Distance from Pune
170Kms

Best time to Visit:
September to May

What to see?
Bastian, Fortification, Cannon, Water cisterns, Temple of Chandreshwar or Moon

Water and Food
No water & food on the Fort.  Need to carry food and water along with

Stay / Accommodation
No place to stay on the Fort. One can stay at the base village of Talbeed or in Karad.

Places around
Karad, Sadashivgad, The monument of Hambirrao Mohite in Talbid.  Chandragiri Ghal where Saint Samarth Ramadas Swami stayed some years

Route Available from Pune
Pune – Satara – Karad Road  – Before Karad Take Left towards Talbid
Pune – Satara – Karad – Take left towards Karad Airport - Vasantgad

For more photos see link below
https://www.facebook.com/Weekendtravels.in

Vasantgad Fort

Vasantgad Fort

Vasantgad Fort

Vasantgad Fort




Vasantgad Fort


Vasantgad Fort


Vasantgad Fort

Vasantgad Fort
For more photos see link below

Reaching Vasantgad Fort Fort from Pune :-





View Larger Map



















No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...