Sunday, February 14, 2021

दातेगड उर्फ सुंदरगड

   पाटण या सातारा जिल्ह्यातील गावाच्या नावाबरोबरच आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ते कोयना नदीचे विस्तीर्ण व हिरव्यागार विविध निसर्गसंपत्तीचा खजिना असलेले खोरे. याच तालुक्याची जीवनवर्धिनी असलेल्या कोयना नदीवरचे "कोयना धरण" आपल्या डोळ्यासमोर येते. महाराष्ट्राच्या कानाकोप-यात असलेल्या उद्योगधंद्यांना, शहरांना, गाव, वाडी, वस्ती या सर्वांना ऊर्जा व प्रकाश पुरविण्याची जबाबदारी समर्थपणे सांभाळणारे कोयना धरण. कोयना खोरे हे सह्याद्रीच्या बामणोली डोंगररांगात वसले आहे.या बामणोली रांगेला एक समांतर डोंगर रांग दक्षिण-उत्तर धावते,तीला 'घेरा दातेगड' रांग म्हणतात. या कोयनेच्या खो-यातील सरदार पाटणकर घराण्याचे शिवकाळातील योगदान, कर्तृत्व, पराक्रम, एकनिष्ठता किती महत्त्वाची होती हे इतिहासाने पाहिले आहे.याच पाटण तालुक्याच्या रक्षणासाठी टेहळणी करणारा टोळेवाडीचा 'घेरा दातेगड' किंवा 'सुंदरगड' आहे. पाटण महालात असलेल्या वसंतगड, गुणवंतगड, भैरवगड, वासोटा, जंगली जयगड व प्रचितगड यांच्या मध्यवर्ती ठिकाणी हा गड उभा आहे.
 दातेगडाचा इतिहास हा सत्ता पालटाचा आहे. स्थानिक लोकांच्या मते हा गड शिवाजी महाराजांनी उभारला असे असले तरी हा गड बहुधा शिलाहारांच्या राजवटीत उभारला गेला असावा.शिवपूर्वकाळात बहामनी राजवटीत कराड चिपळूण या व्यापारी मार्गावर टेहळणी करण्याची जबाबदारी दातेगड सांभाळीत होता. पंधराव्या शतकात दातेगड किल्ला शिर्केंच्या ताब्यात होता. मलिक उत्तुजारने शिर्केंचा पराभव करुन हा गड बहामनी सत्तेत सामील करून घेतला. इ. स. १५२७ मधे बहामणी राज्य नष्ट होऊन अनेक राजसत्तेची निर्मिती झाली व दातेगड आदिलशाहीच्या अमलात आला. दरम्यानच्या काळात पाटणकर ( साळुंखे) घराणे आदिलशाही सेवेत रूजू झाले.  इ. स. १५७२ मधे पाटणकरांचे कर्तृत्व पाहून बादशाहने त्याचवर्षी ज्योत्याजीराव पाटणकर यांना ५०० स्वारांची मनसब दिली व त्यांचे वडील नागोजीराव यांस दातेगडची देशमुखी दिली. १६ व्या शतकाखेर आदिलशाहीच्यावतीने याची व्यवस्था व अधिकार पाटणकर घराण्याकडे होता, मात्र अफ़जलखानाच्या वधानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून घेतला.शिवकालात गडावर कचेरी व कायम शिबंदी होती. या शिबंदीकरता गडाशेजारच्या गावातील जमिनी नेमून देण्यात आल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी दातेगड पाहताच त्यांच्या मुखातून पहिला शब्द निघाला तो म्हणजे "सुंदर".त्यामुळे दातेगडास सुंदरगड म्हणून देखील ओळखले जाते, अशी समजुत आहे. याचवेळी आदिलशाहीच्या चाकरीत असलेले सरदार चालुक्यवंशीय घराण्यातील पंचसहस्त्री सरदार चांदजीराव पाटणकर हे छत्रपतींचे झाले, स्वराज्याचे झाले. छत्रपति शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज, राजाराम महाराज व पुढील काळात देखील या पाटणकर घराण्याने स्वराज्याची एकनिष्ठ सेवा केली. छ. संभाजी महाराजांच्या निर्घृण हत्येनंतर अनेक मातब्बर घराणी सैरभैर होऊन वतनाच्या लालसेने मोगलांच्या बाजूला गेल्याचे इतिहास पुरूषाने पाहिले आहे, मात्र अशा कठीण प्रसंगी सरदार पाटणकर घराण्याच्या वारसदारांनी स्वराज्याची भक्कम साथ सोडली नाही. छ. शिवाजी महाराजांच्या व छ. संभाजी महाराजांच्या कालखंडात हा किल्ला स्वराज्यातच होता. इ. स. १६८९ च्या दरम्यान काहीकाळ मोंगलांच्या ताब्यात गेला होता, तो धनाजी जाधव व शंकराजी नारायण सचिव यांच्या सैन्याने जिंकून घेतला. सेनापति संताजी घोरपडे यांच्यासह चांदजी पाटणकर यांनी चांगली सैन्य कार्यवाही केली म्हणून छ. राजाराम महाराजांनी २२ सप्टेंबर १६९३ रोजी लिहलेल्या पत्रानुसार पाटण महालातील ३४ गावे इनाम दिल्याचे ऐतिहासिक संदर्भ दिसून येतात. पेशवाईच्या काळामधे पेशवे नानासाहेब व तुळाजी आंग्रे यांच्यात बेबनाव झाल्यामुळे तुळाजीने सुंदरगड उर्फ घेरा दातेगडला वेढा घालून किल्ल्याची रसद खंडित केली, मात्र तो जिंकून घेता आला नाही. इ. स. १८१८ च्या मे महिन्यात कॅप्टन ग्रँट डफ हा इंग्रज अधिकारी हा किल्ला घेण्यासाठी गेला असताना, किल्ल्यावरील अधिकारी व्यक्तीने डफला निरोप दिला की, तुमच्या लोकांनी आमचे पाच घोडे धरून नेले आहेत, ते परत द्यावे आणि आमच्या सैनिकांची हत्यारे व सामान सुरक्षितपणे घेऊन बाहेर पडण्यास अडथळा होणार नसेल तर किल्ला तुमच्या ताब्यात देतो. कॅ. डफने या दोन्हीही अटी मान्य केल्या आणि फक्त पाच घोड्याच्या मोबदल्यात कोणतीही लढाई न करता हा दातेगड ब्रिटिश सरकारच्या ताब्यात घेतला हे उभ्या महाराष्ट्राचे दुर्दैवच ना ?     
कसे जाल ?
  या गडावर जायचे तर दोन मार्ग आहेत.
१) स्वताचे वाहन असेल तर- सातारा जिल्ह्यातील कराड-चिपळूण रोडवरील पाटण शहरातून एक रस्ता चाळकेवाडी पठाराकडे जातो.
 
 या डांबरी रस्त्याने प्रवास करताना जवळपास सर्व डोंगर चढून आलो कि भैरवनाथ पोल्ट्री फार्मजवळून एक रस्ता दक्षिणेकडे दातेगडकडे जातो तर एक रस्ता वळून उत्तरेकडे चाळकेवाडी पठाराकडे जातो.
 
 
 
 
 
हा कच्चा गाडी रस्ता आहे,त्यामुळे पावसाळ्यात या रस्त्याने टाळलेले बरे.जीपसारखे वाहन किंवा बाईक घेउन आपण थेट गड पायथा गाठू शकतो.

 
 
२) दुसरा मार्ग अर्थातच डोंगरभटक्यांसाठी. पाटण शहरातून कोयनेच्या दिशेने चालत निघाले कि ज्ञानोजीराव साळुंखे हायस्कुल लागते.ईथून रस्ता उजवीकडे म्हणजे उत्तरेकडे वळतो.इदगाह मैदान आणि पाटण जलशुध्दीकरण केंद्राजवळून एक पाउलवाट समोर दिसणार्‍या टेकडीवरील दर्ग्याकडे जाते. टेकडीच्या अर्ध्या उंचीवर हा दर्गा आहे.ईथून वाट तशीच रमतगमत टेकडीच्या माथ्यावर दिसणार्‍या मोठ्या आंब्याच्या झाडाच्या दिशेने चढते. या वाटेने पठारावर आलो कि दोन्हीकडे शेती दिसते.समोरच एक डोंगर आणि त्याच्या पायथ्याशी वस्ती दिसते.
 
 
 
हा डोंगर दातेगड वाटला तरी प्रत्यक्षात दातेगड या डोंगराच्या मागे लपला आहे. हि वस्ती म्हणजे बौध्दवाडा. तसेच पुढे चालत निघाले कि टोळेवाडी लागते.ईथेच आपल्याला दातेगडाच्या डोंगराचे आणि त्याच्या चौथर्‍यासारख्या कड्यांचे दर्शान होते. आजूबाजूच्या निसर्गाच्या सानिध्यामुळे आपण कधी टोळेवाडीत येऊन पोहोचतो ते लक्षात देखील येत नाही. टोळेवाडी म्हणजे वीस पंचवीस लाल मातीच्या भिंती व तीव्र उताराच्या छप्परांची लहान घरे असलेली ग्रामीण लोकवस्ती. येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या गोलाकार दगडी बांधकामातील विहिरीच्या रहाटावर माता भगिनी पोहरा बांधून पाणी काढताना हमखास दिसतात. त्यांच्या पोह-यातील पाण्याने हात, पाय व तोंड धुऊन हाताची ओंजळ करून पाणी पिऊन ताजेतवाने व्हायचे. लाल मातीच्या गाडीरस्त्याने काही अंतर गेल्यावर डाव्याबाजूस संपूर्ण काळ्याकातळाची नैसर्गिक तटबंदी असलेला दातेगड आपणांस आकर्षित करतो. पायथ्याशी एक नवीन लहान इमारत बांधलेली असून त्याच्या शेजारच्या वाटेने दोन वळणे चढल्यावर झाडाझुडुपातील अर्धवट पायऱ्या असलेल्या वाटेने सुमारे दहा मिनिटांत आपण गडमाथ्यावर पोहोचतो. आयताकृती किल्ल्याचा आकार आटोपशीर असल्याने संपूर्ण किल्ला एका नजरेत दिसून येतो.  पाटणमधून निघाल्यापासून दोन तासात आपण गडापाशी पोहचतो. 

 
    साधारण आग्नेय-वायव्य असा विस्तार असलेल्या या गडावर पूर्वेकडील दरवाजाचे अवशेष देखील राहिले नाहीत तिथे डागडूजी सुरू आहे.गडाच्या पश्‍चिम बाजूस भग्न प्रवेशद्वार आहे.या बाजूस जाण्यासाठी पश्‍चिम तटाजवळील कातळात खोदलेल्या तीस पायऱ्या आहेत.
 
तसेच दक्षिणेकडील बाजूच्या दगड गोट्यातील पायवाटेने आपण किल्ल्यावर पोहोचतो.गडाचे क्षेत्रफळ दोन हेक्‍टर आहे तर उंची समुद्रसपाटीपासून सुमारे ३४२५ फूट आहे. लांबून हा गड बघताना एक चौथरा वाटतो. गडावर प्रवेश करण्याचा मार्ग आणि पाण्याची टाकी कोरुन काढलेली आहेत.
   किल्ल्याच्या मध्यभागी असलेल्या खोलगट भागातील तलवारीच्या आकाराची विहीर व पश्चिमेस असलेल्या किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या खडकात खोदलेल्या पायऱ्या दिसून येतात. 
 
 
 
भल्यामोठ्या सुमारे चाळीस पायऱ्या उतरत असतानाच समोरील कातळातील श्री गणेशाचे दर्शन होते. डाव्या सोंडेची गणेशाची सहा फूट कातळात कोरलेली मूर्ती सर्वांग सुंदर असून मूर्तीचे कान हे जास्वंदीच्या फुलांच्या पाकळी समान भासतात. मांडी घातलेल्या मूर्तीच्या पोटावर नागाची प्रतिमा कोरलेली असून पायात मोठा वाळा घातल्याचे शिल्प कोरले आहे. 
 
शेवटच्या चार पाच पायऱ्या राहिल्यावर उजव्या हाताला कातळात खोदलेली एक लहान खोली दिसून येते. 

गणेशमूर्तीच्या काटकोनात असलेल्या कातळावर दक्षिणाभिमुखी आठ फूट उंचीचे हनुमानाचे रेखीव शिल्प कोरलेले आहे.
 
 उभ्या असलेल्या हनुमान शिल्पाच्या पायाखाली दुष्कर्माचे प्रतिक असलेल्या राक्षसाचे मर्दन केलेले दिसून येते. मूर्तीची शेपटीची डोक्यावर अर्धवर्तुळाकार कमान तयार झाली आहे, तर उजवा हात वर केलेला असून डावा हात कमरेवर स्थिरावला आहे. या किल्ल्याच्या दोन दरवाजापैकी सुस्थितीत असलेला हा एकमेव भव्य दरवाजा तत्कालीन वैभवाचे उदाहरण म्हणावे लागेल. 
 
 
 
 
 पुर्वी या हनुमान आणि गणेश शिल्पाची दुरावस्था होती.मात्र दुर्गसंवर्धन करणारे हात ईथे वळाले आणि या दोन्ही मुर्तींना जणु नवसंजीवनी लाभली.
तीस भव्य पायऱ्या चढून आपण वर येत असताना डाव्या बाजूच्या कातळात खोदून तयार केलेली दोन भुयारी दालणे आढळून येतात. 
 
 
 

 इ. स. १९६७ साली झालेल्या भूकंपाने दरवाजाची बरीच नासधूस झाली असावी.  दरवाजाची कमान जांभ्या दगडातील आहे. वास्तविक काही वर्षापुर्वी हि कमान झाडांच्या वेलीत्,दाटीत लपून गेली होती,या दरवाज्याने वावरणे शक्य नव्हते.पण टीम दातेगडच्या कामाने या दरवाज्याने मोकळा श्वास घेतला.दरवाजाच्या आतील दोन्ही बाजूला सैनिकांसाठी खडकात कोरलेल्या देवड्या आहेत. दोन्ही बाजुला असलेल्या पहारेकर्‍यांच्या देवड्याही वैशिष्ट्यपुर्ण आहेत. 
या बाजुला बहुधा सावलीसाठी आणि उन्हा,पावसापासून संरक्षण म्हणून तिरके उतरते कौलारु छत असावे.त्या छताला आधार देणारी कोरीव खाच आजही भिंतीत पहाता येते.
 
ऐतिहासिक वैभवाची साक्ष पाहून आपण पायऱ्या चढून आल्यावर त्याच्या शेजारीच अतिशय खोल अशी चौकोनी विहीर खोदलेली 'तलवार' आहे. या विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्यांचा जो मार्ग आहे तो मराठा तलवारीच्या पात्याच्या आकाराचा आहे. प्रत्येक गडाचे काही ना काही वैशिष्ट्य असते.दातेगडावर खडकात खोदलेली विहीर हेच एक बघण्यासारखे विशेष आहे 
 
 
 
 
 
 
 
 

 
 
  दक्षिणोत्तर तलवार विहीर ५० मिटर लांब, ३ मिटर रुंद तर ३० मीटर खोल असून आत जाण्यासाठी विहिरीस एकूण ४४ पायऱ्या आहेत. यातील काही पायऱ्या तुटलेल्या आहेत.विहिरीच्या पायऱ्या खोदकाम करताना युगशिल्पी कारागीराने मोठ्या कल्पकतेने डाव्याबाजूच्या कातळात एक गजशिल्प कोरलेले दिसून येते.
 
 
 
 शेवटच्या चार पाच पायऱ्यांच्या डाव्याबाजूस खडक खोदून तयार केलेले ७ फूट रुंद, ७ फूट लांब व ७ फूट उंचीचे शंभू महादेवाचे मंदिर असून आतमधे महादेवाची पिंडी तर बाहेरील बाजूस सुरेख नंदीशिल्प आहे. 
 
तेथून वर आकाशाकडे पाहिल्यास आपणांस तलवारीचा आकार सहज दिसून येतो. विहिरीतील पाणी उपसा न झाल्याने व आजूबाजूची माती, पालापाचोळा गेल्याने अस्वच्छ आहे. कधीकाळी या विहिरीने या किल्ल्यावरील अधिकारी व सैनिकांची तहान भागवविली असणार यात दुमत असू शकत नाही. विहिरीच्या उजव्याबाजूस पावसाळी पाणी साठवणूक करणारे लहान टाके असून यातील पाणी विहिरीत पाझरत असावे. जि विहीर बघता कमळगडावरची विहीर आणि दातेगडावरची हि विहीर याच्यात साम्य जाणवते.हे दोन्ही एकाच कालखंडात उभारले असावेत हे निश्चित.  
 

तेथून पश्चिमेकडील बुरूजाकडे जाताना खडकात खोदून चौकोनी इमारती निर्माण केलेल्या असल्याचे अवशेष आहेत.  
 
  
 
 
 
आता मात्र खडकात सुमारे ८ फूट खोलीच्या असलेल्या अवशेषांबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. 
 
जवळच्या पृष्ठभागावर असलेल्या काळ्या कातळात वळणदार आकारात मानवनिर्मित लहान रूदींची पण खोल भेग आढळून येते. नैसर्गिक तटबंदी लाभलेल्या पश्चिम बुरूजावरून लहानमोठी खेडी, डोंगररांगांचे विलोभनीय दृश्य दिसते.  
समोरच पुर्वेला सडा वाघापुरचे पठार दिसते. 
 
या किल्ल्याहून दक्षिणेकडे असलेला मोरगिरी (गुणवंत गड) व कोयनेचा प्रवाह दिसून येतो.
 
 पावसाळा सरताना या गडावर आल्यास एक अनोखा नजारा दिसतो.गवताची हिरवीगार चादर पांघरलेला गडावर सोनकीच्या पिवळ्या फुलांचा जणु भंडारा उधळलेला असतो.
          शिवकाळाचा साक्षीदार असलेला दातेगड आपणांस इतिहासात नक्कीच घेऊन जातो. या किल्ल्याच्याबाबत इतिहासात विशेष घटना घडल्याची नोंद नसली म्हणून काय झाले? या सह्याद्रीतील किल्ल्यांनी स्वराज्य निर्माण केले, वाढविले व टिकविण्यासाठी दिलेले योगदान काळ पुरूषाने पाहिले आहे. अशा या दातेगडला नक्कीच एकदा भेट द्या, तो तुमच्याशी हितगुज करण्यासाठी कायमच उत्साही आहे.
 
 संदर्भ :-
१) सातारा जिल्हा गॅझेटीयर
२) शोध शिवछत्रपतींच्या दुर्गांचा- सतिश अक्कलकोट
३) महाराष्ट्र देशातील किल्ले- चिंतामण गोगटे
४) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
५) सांगाती सह्याद्रीचा-यंग झिंगारो ट्रेकर्स
६) प्रशांत लवटे-पाटील यांचे लिखाण
७) फोटो साभार इन्स्टाग्राम हि वेबसाईट
 





























































































No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...