Saturday, February 27, 2021

वेताळगड

महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषीत झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धामापुर तलाव हा पर्यटकांचे आकर्षण आहे.याच धामापुर परिसरात एक दाट जंगलात दुर्गरत्न लपलेले आहे.मात्र पर्यटकांचा प्रचंड ओघ या परिसरात असून उपेक्षित राहीलेल्या या वेताळगडाची आपण ओळख करुन घेणार आहोत.

      सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील धामापूर तलाव व गडनदी यांच्या मध्ये वेताळगड उभा होता. आता मात्र वेताळगडावर कुठलेही अवशेष नाहीत. 
    वेताळगडाला जाण्यासाठी तीन मार्ग आहेत.
१) कसाल -मालवण रस्त्यावर कट्टा हे गाव आहे. मालवणहून कट्टा गाव साधारण २० किमी वर आहे. कट्टा गावातून एक रस्ता पेंडूर गावाकडे जातो. पेंडूर हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव कुडाळ पासुन १७ कि.मी. अंतरावर तर कसालपासुन २४ कि.मी. अंतरावर आहे. वेताळगड हे किल्ल्याचे नाव पेंडूर गावात असलेल्या वेताळ मंदिरावरून पडले असले तरी पेंडूर गावाच्या विरुद्ध दिशेला असलेल्या मोगरणे गावातील गावडेवाडी तसेच चुरीवाडी येथुन किल्ल्यावर जाण्यासाठी वाट आहे.या रस्त्यावर ३ किमीवर चुरीवाडी नावाची वाडी आहे. या वाडीतून गडावर जाण्याची वाट आहे.गडावर जाण्यासाठी चुरीवाडीतून ३० मिनिटे लागतात.
२) कट्टा गाव गाठून तेथून २-३ किमीवर दक्षिणेकडे असलेली एक छोटीशी वाडी,गुरामवाडी गाठायची होती.मात्र वाडीकडे जाणारी वाट खूपच लहान आणि खराब होती .त्या वाडीच्या मागेच वेताळगड आहे. मात्र इकडून जाणे फारच अवघड आहे आणि वाटेत घनदाट जंगल पण आहे. 
३) तिसरा पर्याय म्हणजे कुडाळ-मालवण रस्त्यावर धामापुर तलावाच्या मागे उत्तरेला असलेल्या मोगरने या गावातून गडावर जायचे. 
     वेताळगडला जाण्यासाठी  या मार्गावर एस.टी.सेवा खुपच मर्यादीत असल्याने स्वत:चे वाहन सोयीचे पडते. मोगरणे गावातील दोन्ही वाटांनी गडावर जाण्यासाठी एक तास पुरेसा होतो. 
 आपण मोगरने गावातून गडाची चढाई करुया.मोगरणे गावातुन गावडेवाडीपर्यंत रस्ता गेला आहे. गडावर पाणी नसल्याने आपल्याकडील बाटल्या गावात भरुन घ्यायच्या.   वाडीतील शेवटच्या घरापासुन एक कच्चा रस्ता वरील पठारावर गेला आहे. 
सध्या हा रस्ता वापरात नसल्याने मोठया प्रमाणात खचला आहे त्यामुळे वाहन येथेच ठेऊन पठारावर चालत जावे. वाडीपासून पठारावर येण्यास १५ मिनिटे लागतात. पठारावर रस्ता जेथे संपतो तेथे डाव्या बाजुस विजेचा खांब दिसतो. 
या खांबाकडून सरळ जाणारी वाट शेवटच्या टप्प्यात वर चढत आपल्याला थेट वेताळगडावरील उध्वस्त तटबंदीवर आणुन सोडते. अलीकडील काळात होऊ लागलेल्या ट्रक्टरच्या वापराने गावातील गुरेढोरे कमी झाल्याने गडावर चरण्यासाठी जाणारी गुरे व गुराखी बंद झाले आहेत. 
त्यामुळे गडावर मोठया प्रमाणात गवत वाढत असुन गडाचे अवशेष लुप्त झाले आहेत. गुराखी गडावर जात नसल्याने वाटाही मोडत चालल्या आहेत. 
पायांचे ठसे

कोकणातील बहुतांशी गडावर हिच परीस्थीती दिसुन येते. त्यामुळे अवशेष पहाण्यासाठी सोबत माहीतगार वाटाड्या असणे गरजेचे आहे.वाटाड्या असेल तर आपल्याला बरेच अवशेष कोयत्याने साफ करून दाखवतो. 

दगडात कोरलेली मूर्ती

वेताळगडची टेकडी समुद्रसपाटीपासून ५५० फुट उंचावर आहे. वेताळगडाचा माथा म्हणजे अस्ताव्यस्त पसरलेले १५ एकरचे पठार असुन या पठारावर मोठया प्रमाणात गवत व झाडी असल्याने नेमकी कुठुन सुरवात करावी ते कळत नाही. 

गडावर आपण प्रवेश केला त्या ठिकाणची तटबंदी वगळता इतर कोठेही तटबंदी अथवा बुरुज दिसत नाही.

 प्रवेश केलेल्या ठिकाणावरून उजव्या बाजुच्या कडेने फिरताना एक ढासळलेली व झाडीने भरलेली विहीर दिसते.

 वाटेच्या पुढील भागात एका ठिकाणी खडकात कोरलेले चौकोनी कोरडे टाके पहायला मिळते. 


पठारावर फिरताना एक साचपाण्याचे तळे, काही खळगे, एक चौथरा व पाण्याने भरलेली दोन लहान टाकी पहायला मिळतात पण यातील पाणी पिण्यायोग्य नाही. संपुर्ण किल्ला पहाण्यासाठी २ तासाची शोध मोहीम करावी लागते पण फारच तुरळक अवशेष असल्याने आपला वेळ कारणी लागत नाही. 

गडावर मानवी वावर कमी झाल्याने मोठ्या प्रमाणात रानडुकर आणि बिबट्याचा वावर आहे.तेव्हा भटकंती सावधपणे करणे चांगले. गडावरुन हवा स्वच्छ असेल तर पुर्व बाजुला रांगणा गड दिसतो तर द्क्षीणेला कर्ली नदीचे पात्र दिसते.वेताळगडाचे पश्चिम कडे प्रेक्षणीय आहेत.





पेंडूर गावात असलेले वेताळ मंदीर व जवळच असलेल्या उध्वस्त जैन मंदीरातील प्राचीन मुर्ती आवर्जुन पाहण्यासारख्या आहेत.
पाय फुटले पाषाणांना -
    हजारो वर्षांचा इतिहास सांगणा-या पाषाणांना पाय फुटल्याचे गावातील ज्येष्ठ मंडळी सांगतात तेव्हा पिंपळाची मगरमिठी ही आईच्या पदराप्रमाणे वाटते. अंबिका मातेचे हे शिल्प अष्टाच्या पदराखाली सुरक्षित आहे असे वाटू लागते. नाही तर तेही बेपत्ता झाले असते..  हे वास्तव पेंडुर कट्टा येथील भग्नावस्थेत असलेल्या पाषाणांचे!
   आपल्याला सहज काही मिळालं तर त्याची किंमत नसते. अगदी असंच काहीसं सिंधुदुर्गातल्या प्राचीन इतिहासाबाबत झाले आहे. या भूमीत पावलापावलावर इतिहासाचे साक्षीदार भेटतात. काही आजही आपले अस्तित्व राखून उभे आहेत. तर काही अस्तित्वहीन झाले आहेत.
  काही जमिनीखाली अनवधानाने गाडले गेले.पेंडुर (मालवणच्या) डोंगरावर अशी अनेक शिल्प होती. अप्रतिम आणि अतिप्राचीन..या शिल्पाना अलीकडच्या काळात पाय फुटले आहेत.गेल्या काही वर्षात काही शिल्प आपोआप नाहीशी झाली.हजारो वर्षापूर्वीचा हा ठेवा झाडीझुडपात खितपत पडून आहे.
  पेंडुर येथील या जैनाच्या डोंगरावर अतिप्राचीन सुमारे दीड हजार वर्षापूर्वीची संकीन-डंकीनची शिल्प पाहायला मिळतात. आंबिका मातेची आठवण येते. पिंपळ आणि अष्टाच्या अजस्त्रमुळांनी मगरमिठी घातल्यानंतरही अंबिका मातेचे शिल्प  आपले अस्तित्व राखण्यासाठी धडपडत आहे.तिच्या कडेवर असलेले बाळ..ऊन-पावसाने हैरान झाले आहे. हे सगळं पाहताना मन थराथरून जाते.
     अंगावर काटा उभा राहतो.हजारो वर्षापूर्वीचा इतिहास आणि भूगोलही डोळय़ांसमोर तरळू लागतो. शिल्पकाराची नेत्रदीपक कलाकृती आणि या भूमीचा धार्मिक इतिहास मग प्रज्वलीत होतो. नजर भिर-भिरते, येथील देखण्या शिल्पकृती हजारो वर्षाचा इतिहास सांगणा-या पाषानांना पाय फुटल्याचे गावातील ज्येष्ठ मंडळी सांगतात तेव्हा अष्टाच्या झाडाची मगरमिठी ही आईच्या पदराप्रमाणे वाटते.
    अंबिका मातेचे हे शिल्प या वृक्षाच्या पदराखाली सुरक्षित आहे असे वाटू लागते. नाही तर तेही बेपत्ता झाले असते..  हे वास्तव पेंडुर कट्टा येथील सातेरी मंदिरापासून जवळ असलेल्या डोंगरावरचे आणि तेथील भग्नावस्थेत असलेल्या पाषाणांचे!
    आम्हाला आमच्या इतिसाबद्दल तेवढीशी ओढ नाही.त्याची जपणूक करावी याचेही भान नाही. या उदासीनतेमुळे अनेकांचे फावले आहे. इतिहासप्रेमी म्हणणा-या मंडळींनी येथील साक्षीदारांना सहजगत्या उचलून नेले.किल्ल्यावरच्या तोफा जशा नाहीशा झाल्या तशी देवराईत असलेली पाषाणे (विरगळ) हेही नाहीसे झाले.
 आंतरराष्ट्रीय बाजारात या प्राचीन पाषाणांना मोठी किंमत आहे. हे मान्य असले तरी आम्ही आमच्याकडे असलेल्या खजिन्याबाबत तेवढेसे जागरूक नाही आहोत, याचेही भान ठेवायला हवे.
   कोकणात अनेक सत्तांतरे झाली आणि आपणही बदलत गेलो. कधी काळी सिंधुदुर्गात म्हणजे बाराशे वर्षापूर्वी जैन धर्माला मानणा-या शिलाहार राजांची सत्ता कोकण प्रांतावर होती. त्यांच्या काळात जैन संस्कृती येथे रुजली आणि वाढलीसुद्धा.. मात्र सत्ता बदल झाला, धर्म बदल झाला आणि सिंधुदुर्गात मंदिरांची रचनाही बदलली. येथे जैनांची असलेली धार्मिक स्थळे कालौघात नष्ट झाली;परंतु त्या संस्कृतीच्या पाऊलखुणा आजही आढळतात. सिंधुदुर्गातील अनेक ठिकाणी जंगलात आड बाजूला डोंगरदऱ्यांमध्ये त्या काळातील सुरेख मूर्ती ऊन-पावसाचा मारा झेलत आजही उभ्या आहेत. हजार – दीड हजार वर्षापूर्वीचा हा अमूल्य ठेवा जंगलात खितपत पडला आहे.
 पेंडुर(तालुका मालवण, जि. सिंधुदुर्ग)मधील संकीन आणि डंकीन या स्थळावरची शिल्प अशीच लक्ष वेधून घेतात. या मूर्तीचा मोठा खजिना आपण जपायला हवा. या  शिल्पांना बोलके करायला हवे.हजार वर्षापूर्वीचा इतिहास आणि संस्कृतीचा भूतकाळ जागृत करायला हवा.
    शिलाहार राजवटीत अपरांतात जैन धर्माचा प्रभाव होता. आठव्या शतकात राष्ट्रकुटांनी चालुक्याचे अधिपत्य झुगारून सत्ता स्थापन केली. राष्ट्रकुट नृपती गोविंद (तिसरा) या राजाने उत्तर कोकणाच्या राज्यकारभाराची जबाबदारी कपर्दिस (पहिला) याच्यावर सोपविली. ही शिलाहारांची पहिली शाखा. दक्षिण कोकणावर प्रभाव असलेल्या कृष्ण राजाने या भागावर शिलाहार वंशातीलच सणफुल्ला याची प्रशासक म्हणून नियुक्ती केली.
येथून शिलाहारांच्या कोकणातील कारकिर्दीला प्रारंभ झाला. अकराव्या शतकापर्यंत शिलाहारांची दुसरी शाखा दक्षिण कोकणात म्हणजे गोवा ते रत्नागिरी या भागावर राज्य करीत होती. त्यांची पहिली राजधानी गोव्यातील. त्यावेळचे चंद्रपूर ऊर्फ गोपकपट्टण म्हणजे आताचे चांदोर येथे होते. त्यांनी नंतर ही राजधानी सिंधुदुर्गातील बलिपट्टण म्हणजे खारेपाटण येथे हलविली.
     शिलाहार राजा श्वम्मीयराने खारेपाटणमध्ये किल्ला आणि बंदर उभारून ही राजधानी वसविली. या राज्याचा कार्यकाल ७८५ ते ८२० या दरम्यान होता. पुढे अकराव्या शतकापर्यंत त्यांचा ब-यापैकी प्रभाव राहिला. हे सर्व सांगायचे कारण एवढेच की, त्यांच्या राज्यादरम्यान सहयाद्रीच्या द-या-खो-यात जैन संस्कृतीचा धार्मिक आणि सांस्कृतिक प्रसार वेगाने झाला.
       याबाबत अनेक मतमतांतरे आहेत. परंतु मुद्दा हा की, या प्रांतात असलेल्या जैन धर्माच्या खुणा आजही पाहायला मिळतात. बुद्धोत्तर आणि अशोकपूर्व कालखंडात जैन धर्म गोमांतकात आल्याचे मानले जाते. पुढे उपेक्षा, परकीयांची आक्रमणे आणि नैसर्गिक प्रकोपामुळे जैनधर्मियांच्या मूर्ती, श्रद्धास्थाने आणि वास्तू काळाच्या उदरात गडप झाल्या.
        शिलाहार राजांचा प्रभाव संपल्यानंतर या धर्माचा प्रभावही ओसरत गेला.कारण याचे आचरण सोपे नाही. ब्रह्मचर्य, आहारामधील पावित्र्य ही कठीण बाब होती. याचा फटका जैन धर्माला बसला. परकीय शत्रूंच्या हल्ल्यात पळवापळवीच्या काळात धार्मिक स्थळे उद्ध्वस्त करण्याचे सत्र सुरू झाले.
यावेळी काही मूर्ती लपविल्या गेल्या आणि काही मूर्ती अज्ञात स्थळी टाकण्यात आल्या.
      सिंधुदुर्गातील पेंडुर येथील जैन धर्मियांचे प्रार्थना स्थान आणि येथील भग्न पाषाणे हा गतकाळ जागृत करतात.या पेंडुरच्या जंगल परिसरात अशी अतिप्राचीन पाषाणे लोटून टाकण्यात आली आहेत.
जिल्हयाच्या धार्मिक क्षेत्रातही जैन धर्माचा प्राचीन प्रभाव आजही जाणवतो. मसुरे, माणगाव, काळसे या गावांमध्ये जैन संस्कृतीच्या खाणाखुणा, गावऱ्हाटीत मुद्दामहून केली जाणारी जैन स्थळाची आठवण, काही ठिकाणी असलेली जैन ब्राह्मणांची मंदिरे, कट्टा येथील जैनांची विहीर, कणकवली तालुक्यातील बोर्डवे येथील मारुतीच्या मंदिरातील जैनाचा धोंडा आदी खुणा पाहायला मिळतात.
जैन धर्माचे प्रथम र्तीथकर आदिनाथ यांच्या नावाने ओळखली जाणारी काही स्थळे आणि डोंगरही जिल्हयात आहेत. या मूर्तीना ऊन, वारा, पावसाच्या मा-याबरोबरच चोरटय़ांपासून धोका आहे. कोकणात प्राचीन मूर्ती चोरीच्या घटना वाढल्या आहेत. जैन धर्माशी संबंधित अनेक मूर्ती आज ऊन-पावसात उभ्या आहेत. त्यांचे जतन होण्याची गरज आहे. हा ठेवा खूप प्राचीन असल्याने राज्यकर्त्यांनी त्यासाठी ठाम भूमिका घेऊन धोरण ठरविणे गरजेचे आहे.
जैनांचा धोंडा
    कोकणात आणि सह्याद्रीला लागून असणा-या घाटमाथ्यावर असणा-या ग्रामदैवतांच्या अनेक देवळात असे जैनाचे धोंडे दिसून येतात. याचा अर्थ कोणे एके काळी या भागात जैन मंदिरांचे मोठया प्रमाणावर सामूहिक धर्मातर झाले असा होतो. जैन मंदिरांचे परिवर्तन हिंदू मंदिरांमध्ये झाले हे खरे. पण हे परिवर्तन केवळ देवळांचेच झाले नाही, तर माणसांचेही झाले.
       या भागातील जो बहुजन समाज जैन धर्म पाळत असे तो आता ब्राह्मण धर्माकडे वळला. पण त्यांच्या इच्छेनुसार देवळांमध्ये आपल्या आधीच्या धर्माची आठवण म्हणून देवळांमध्ये जैनाचा दगड त्यांनी कायम ठेवला. अनेक ग्रामदेवतांच्या ठिकाणी जैन स्थळ हे जपण्यात आले आहे.येथील संस्कृती ही आदराची आहे.कुणाला अंतर देऊ नये अशी आहे.जैन संस्कृती नाकारली तरी ती याच पद्धतीन टिकवून ठेवण्यात आली आहे.
हजारो वर्षापूर्वीचा इतिहास खुणावतोय
   मालवणमधील पेंडुर येथे काही हजार वर्षापूर्वीचे जैन धर्माचे प्रार्थनास्थळ ऊन-पावसात अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न करत आहे. येथे असलेली पाषाणे वृक्ष-वेलींच्या मिठीत, अर्धी-अधिक मातीत विसावली आहेत.
पेंडुर-देऊळवाडीकडून या स्थळांपर्यंत जाण्यासाठी कच्ची वाट आहे. सुमारे पाच हजार चौरस फूट जागेत वृक्षांनी वेढलेल्या स्थितीत हे प्रार्थनास्थळ आहे. सभामंडप, गाभा-याचे अवशेष स्पष्ट दिसतात. तेथे लहान-मोठी १४ शिल्पे दृष्टीस पडतात.
   (आमच्या लहानपणी या डोंगर भागात पूर्वी २५ हून अधिक शिल्प आम्ही पाहिली आहेत, असे साठोत्तरी उलटलेले पेंडुरवासीय सांगतात). या स्थानावर सध्या पार्श्वनाथ, महावीर, अंबिका किंवा आम्रा, सर्वानुभुते, यक्ष, शासनदेवी, चमधरणीदेवी, गोमेधा, हत्तींची दोन शिल्पे, अशी नावे स्थानिक सांगतात. जैन संस्कृती अभ्यासकांच्या मते ही सारी पाषाणे तीर्थकार, यक्ष यक्षिणी यांची प्रतीके आहेत.
ग्रामस्थांच्या मते पूर्वी येथे विशिष्ट प्रकारच्या विटा, नक्षीदार खांब होते. ब्रिटिश अमलाच्या वेळी हे खांब सोबत नेले. या भागाला ‘डंकिनी-शांकिनी’ नावाने ओळखले जाते.
        शिल्पांसोबत सभामंडपाचे अवशेष, विखुरलेले खांबांचे दगड, अडीच-तीन फूट भिंतीचे अवशेषही पाहायला मिळतात. हत्तींची दोन आकर्षक शिल्पेही आहेत. वाघावर बसलेल्या रक्षक देवतेची मूर्ती अर्धी-अधिक जमिनीत पुरलेल्या स्थितीत आहे. आभूषणांनी नटलेली मूर्ती लक्ष वेधून घेते. मुकुट, कर्णफुले, बाहू आणे, गळयात हार असलेली ही मूर्ती ध्यानस्थ स्थितीतील आहे. ती गोमेधा देवीची मूर्ती असल्याचे सांगतात.
पेंडुरमधील ज्येष्ठ ग्रामस्थ नाना राऊळ म्हणाले, या स्थळाची मध्यंतरी काही शासकीय अधिकाऱ्यांनी पाहणी केली. या मूर्तीची शिल्पकला अजिंठा-वेरूळमधील लेण्यांशी साधम्र्य दाखविणारी असल्याचे त्यांनी सांगितले होते. जैन धर्माचे अभ्यासक डॉ. दीपक तुपकर म्हणाले, हा ठेवा खूप प्राचीन आहे. त्याचे जतन व अभ्यास होण्याची गरज आहे. यासाठी अलीकडच्या काळात या भागातील जैन बांधवांनी वर्षातून एकदा तरी या भागात भेट देण्याचे ठरविले आहे. गाववासीयांच्या अनुमतीने या स्थळाकडे सभामंडप उभारला जाणार आहे.
सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान
    या मूर्तीच्या समूहात कडेवर मूल घेतलेली अंबिका किंवा आम्रा देवीची मूर्ती सर्वच धर्मातील लोकांसाठी श्रद्धास्थान बनली आहे. देवीला नवस बोलण्याची प्रथा आहे. छोटी पाळणी, बांगडया आदी नवस म्हणून देण्याची प्रथा आहे. या मूर्तीसमोर नव्याने आयुष्य सुरू करणारे नवउभयता आशीर्वादासाठी दाखल होतात.
पेंडुरच्या पाषाणांकडे अख्खा गाव नतमस्तक होतो.संसार वेलीवर अपत्य जन्मले की, उभयता पाषाणांच्या दर्शनासाठी दाखल होतात. जैन संस्कृतीतील ही यक्षिणीची मूर्ती मात्र येथील जनता या पाषाणाला आंबिका माता म्हणतात.तिची आपल्यावर कृपादृष्टी आहे.आपला संसार सुरक्षित आणि संपन्न करण्यासाठी तिचे आशीर्वाद मोलाचे आहेत अशी गाववाल्यांची श्रद्धा आहे.
    या श्रद्धेतूनच एक वर्षाआड या भूमीत उत्सव होतो. या उत्सवाची परंपराही अनोखी आहे.येथे कुणी वाद्य वाजवित नाही.कोणत्याही प्रकारे येथे मांसाहार चालत नाही.हजारो वर्षापूर्वीची जैन संस्कृती देवतांच्या रूपाने का होईना जपली जात आहे.या गावात एकही जैन बांधव वास्तव्यास नाही.जैन बांधव नसतानाही जैन संस्कृतीतील पाषाणांची पूजा करणे, येथील काही परंपरा जपणे म्हणजे कोकणचे कोकणपण समजून घेण्यासारखे आहे.
या स्थळाचे धार्मिक अधिष्ठान होणार जागृत
   या गावात कुणीही जैन बांधव नसला तरी जिल्ह्यात असणा-या जैन बांधवांनी एकत्र येत. जंगलात अस्ताव्यस्त पडलेल्या या पाषाणांना एकत्रकरावेत का असे प्रयत्न सुरू केले.मात्रगाववासीयांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला.यापुढे गावातील पाषाणे गावातच राहतील ती बाहेर कुणी घेऊन जाण्याचा प्रयत्न करू नये असे निश्चित केले.यामुळे जैन बांधवांनी येथील मूर्ती अन्यत्रहलविण्याबाबतचा निर्णय बाजूला ठेवत आता याच स्थळावर ही पाषाणे संरक्षित करताना ऊन-वारा-पाऊस यापासून संरक्षण व्हावे म्हणून मंडप उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत जैन बांधवांची गाववासीयांशी चर्चा सुरू आहे.







    ही पाषाणे जैन संस्कृतीचा उलगडा तर करतातच शिवाय हिंदू संस्कृतीशी याचा कसा मिलाप झाला आहे.याचेही दर्शन घडवितात.नवविवाहितेने या परिसरात येत या पाषाणांसमोर डोके ठेवावे हे ठरलेले. कुणीतर या पाषाणांसमोर विणवनी करत लग्नाचे निमंत्रण देतात.या परिसरात हजारो लग्नपत्रिका इतरत्रपडलेल्या आढळून येतात.
    यक्षिणीची मूर्ती सुमारे साडेतीन ते चार फुटे उंचीची, तर तीर्थकारांची मूर्ती त्या तुलनेत छोटी आहे.येथील अनेक पाषाणे गायब झाली आहेत यात अप्रतिम शिल्पाचीही नोंद असावी असे वाटते.या ठिकाणी जैनांच्या अनेक समाध्या आहेत. त्यांच्या धर्म गुरूंची समाधी अगदी रस्त्यालगत आहे. त्याला स्वामीची समाधी म्हणतात.
या इतिहासाची साक्षीदार असलेला हजारो वर्षापूर्वीचा हा खजिना आजच्या पिढीला बघायला मिळतो हे भाग्यच..कोकणातील या दुर्मीळ ठेव्याचा भुतकाळ जागृत करायला हवा कारण हजारो र्वषऊन-पाऊस झेलत असणा-या या पाषाणाना वाचा कधी फुटेल याची इतिहासप्रेमी वाटत पाहत आहेत.

©किशोर राणे ( प्रहार )
 
       अल्पपरिचित अशा या गडाला फारसा इतिहास नाही. मराठा राज्याच्या वाटणीनंतर निर्माण झालेली करवीर येथील गादी व वाडीकर सावंत यांच्या सीमा एकमेकाला लागुन असल्याने त्यांच्यात सतत कुरबुरी चालू असत. एकमेकावर कुरघोडी करण्यासाठी त्यांनी कोकण प्रांतात काही किल्ले नव्याने बांधले. वाडीकर सावंतानी नोव्हेंबर १७८६ ते जानेवारी १७८७ दरम्यान करवीरकरांच्या रांगणा व सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मार्गावर मध्यभागी मालवण तालुक्यात वराड पेट्यात वेताळगड किल्ला बांधला. पायथ्याच्या पेंडूर गावात असलेल्या वेताळाच्या मंदिरावरुन गडाला वेताळगड नाव देण्यात आले.घाईगर्दीत व नीटशी दखल न घेता बांधलेले हे किल्ले पाण्याची व्यवस्था नसल्याने व बांधकाम मजबुत नसल्याने भक्क्कम नव्हता,तरी करवीरकरांचा या किल्ल्यामुळे सिंधुदुर्गाशी संपर्क तुटण्याचा धोका होता.सावंतवाडीकरांना नेमके तेच हवे होते. यावरून करवीरकर व सावंत यांच्यात कलह निर्माण झाला. यावर १९ जानेवारी १७८७ रोजी सवाई माधवराव पेशव्यांनी खेम सावंतांना पाठविलेल्या पत्रात हा कोट पाडून तेथे फक्त ५ माणसांची शिबंदी ठेवण्यासाठी लिहिले आहे इतकेच नव्हे तर तटबंदी पाडण्यासाठी हैबत उबला व राघोजी रानवडा यांना रवाना केल्याचे कळविले आहे. सन १८६२मध्ये इंग्रजांनी केलेल्या किल्ल्यांच्या पाहणीत हा किल्ला पूर्णपणे मोडकळीस आल्याचे लिहिले आहे.
       कधी मालवणला गेलाच तर थोडी वाट वाकडी करून वेताळगडला नक्की भेट द्या, इथला इतिहास आणि इथले गावकरी तुमचे तितकेच जोरात स्वागत करतील.
      वेताळगडावर फारसे काही बघण्यासारखे नसले तरी परिसरातील धामापुर तलाव निसर्गरम्य आहे.  मालवण तालूक्यातील धामापूर हे एक रमणीय ठिकाण आहे .सदैव हिरवीगार असणारी घनदाट वृक्षराजी, माड पोफळीची दौलत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दुतर्फा डोंगराच्याच मधोमध असलेला ऐतिहासिक धामापूर तलाव यामुळे धामापूर हे उत्कृष्ठ पर्यटन केंद्र बनले आहे .

     १६ व्या शतकात इ. स. १५३० मध्ये विजयनगर साम्राज्याचे देशमुख नागेश देसाई यांनी धामापूर गावात एक विस्तीर्ण तलाव बांधला आणि त्या तलावाकाठी श्री भगवती देवीचे सुंदर देवालय उभारले. जवळच बत्तीस पायऱ्यांचा देखणा सुंदर घाट बांधला. १९५२ साली तलावावर कायमस्वरुपी बंधारा बांधला. सुमारे ४७५ वर्षाहूनही अधिक काळाचा इतिहास असलेल्या श्री देवी भगवती देवालयामुळे धामापूर हे गाव इतिहासात नोंदले गेले आहे. गावातील ग्रामस्थ व बंधा-याचे रक्षण ही देवीच करते, अशी भावना आहे.
 या ऐतिहासिक धामापूर तलावाच्या काठावर श्रीभगवतीचे प्राचीन देवालय आहे . मुख्य मंदिर लाकडी असून सभामंडप खूपच प्रशस्त आहे.मंदिराच्या थोड्या पायर्‍या चढुन गेल्यावर श्री भगवती देवीचे दर्शन घडते. आतील भगवतीची मुर्ती सुबक आहे .मंदिरामध्ये देवी भगवतीची पाषाणात कोरलेली सुमारे चार फूट उंचीची सुबक मूर्ती आहे. पुराणात महिषासूरमर्दिनीचे जे वर्णन करण्यात आले आहे ते वर्णन तंतोतंत येथील मूर्तीला लागू पडते. देवीच्या एका हातात शंकराची आयुधे आहेत. तर दुस-या हातात शक्तीची आयुधे आहेत. यामुळे मूर्तीमध्ये शिव आणि शक्तीचा सुंदर मिलाप पहावयास मिळतो. भगवतीची मूर्ती चतुर्भूज असून विविध आभुषणांनी युक्त आहे. देवी भगवतीचे मंदिर कौलारू असले तरीही मूळ गाभारा दगडी आहे.
     मंदिर पुरातन असुन कोरीव कलाकुसर केलेले आहे. हेमाडपंथी शैलीमध्ये मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे. शके १८२७ ला सभामंडपाचे बांधकाम झाले असल्याची नोंद सापडते.





 ५ एकर क्षेत्रात पसरलेल्या विस्तीर्ण तलावाचा जलाशय अत्यंत नितळ आणि स्वच्छ आहे.  पाण्यात उतरण्यासाठी पायर्‍यांची सोय केलेली आहे. इथे नौकाविहार उपलब्ध आहे.धामापूर (ता. मालवण) येथील तलावाला वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन साईटने पुरस्कृत केले गेले आहे.या तलावाविषयी एक आख्यायिका सांगितली जाते ती अशी - फार पूर्वी धामापूरमध्ये ज्यांच्या घरी लग्नसमारंभ असेल, ती व्यक्ती लग्नाच्या आदल्या रात्री फुलांनी बनविलेले दागिने एका परडीत घालून ते तळ्यात सोडत असे. दुसर्‍या दिवशी त्या परडीतील दागिने सोन्याचे झालेले असत. लग्नसमारंभ आटोपल्यानंतर दुसर्‍या दिवशी ते दागिने पुन्हा तळ्यात सोडले जात असत. खूप वर्ष असं चाललं. मात्र, एका व्यक्तीला दागिन्याचा लोभ झाला आणि त्याने ते दागिने तळ्यात न सोडता स्वतःकडेच ठेवले. त्यावेळी भगवती देवीचा कोप होऊन हि प्रथा पुढे बंद झाली. स्थानिक संस्थेमार्फत या तलावामध्ये बोटिंगची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. या तलावाचे वैशिष्ट्य म्हणजे कितीही पऊस पडला तरीही या तळ्यातील पाणी वाहत नाही व कितीही दुष्काळ पडला तरीही येथील पाणी आटत नाही.

संदर्भग्रंथः-

१) रत्नागिरी जिल्हा गॅझेटीयर

२) गड-किल्ले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील-सतीश अक्कलकोट

३) महाराष्ट्र देशातील किल्ले-चिंतामण गोगटे

४) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे

५) www.trekshitiz.com हि वेबसाईट

६) https://www.vinoddhamanna.com हा ब्लॉग








https://www.bhampak.com/vetalgad-fort-video/

 













































 

 

 

 

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...