Sunday, February 14, 2021

महिमंडणगड चकदेव

  महाराष्ट्राची भौगोलिक संरचना ठरते ती प्रामुख्याने सह्याद्रीमुळे. सरासरी आठशे मीटर उंचीचा मंद सपाटीचा देशाचा भाग सह्याद्रीच्या रांगापाशी येउन अचानक समुद्रसपाटीच्या पातळीला खाली उतरतो. सहाजिकच समुद्रमार्गे येणारा परकीय देशातून आलेला माल वर देशावर चढवायचा तर बैल्,गाढव या प्राण्यांवर लादून नेण्याशिवाय पर्याय नव्हता,शिवाय या मालवाहु गुरांबरोबर जाणारे लोक चालत किंवा घोड्यावरुन प्रवास करायचे.हा सर्व तांडा जेव्हा सह्याद्रीच्या परिसरातून मार्गक्रमणा करायचा तेव्हा आवश्यक असा घटक म्हणजे द्विपाद आणि चतुष्पाद जाउ शकतील अश्या सोप्या वाटा,ज्यांना घाट म्हणतात. अर्थात असे घाट निर्माण करायचे तर त्यावाटेला बैल सोडले जायचे.बैल ज्यावाटेने वर चढू शकेल अशी वाट सापडली कि त्यावर वावर वाढून रुळवाट व्हायची आणि त्याचा वर्दळीचा घाट व्हायचा.पण प्रत्येकवेळी हि वाट सोपी असेल असे नसायचे.दाट जंगलातून चढणार्‍या वाटेसमोर शे-दोनशे फुटाचा सरळ कातळकडा उभा ठाकायचा आणि निसर्ग जणु मानवाला आव्हान द्यायचा. चिकाटीने मानवाने त्यावरही मात केली आणि प्रसंगी झाडांच्या मोळ्या एकत्र बांधून शिड्या उभ्या केलया आणि त्यावर आपली पावले रोवीत माथा सर केलाच. आजही सह्याद्रीत अश्या काही दुर्गम वाटा आहेत. आज आपण अशाच एका वाटेची आणि त्या परिसरात संरक्षणाचे ठाणे म्हणून उभा केलेल्या गडाची ओळख करुन घेणार आहोत.

सह्याद्री

 
    सायबर-फायबर हे वैशिष्ट्य असणार्‍या एकविसाव्या शतकात आपण वावरतो आहोत. करलो दुनिया मुठ्ठीमे च्या वल्गना केल्या जाणार्‍या काळात देखील आपल्या प्रगत महाराष्ट्रात असा प्रदेश अजूनही आहे जिथे कोणी आजारी पडले तरी डोलीत घालून चाळीस कि.मी.लांब उपचारासाठी न्यावे लागते. जिथे दिवसातून अजूनही एकच एस.टी.बस येते, जिथे आजही मोबाईलची रेंज मिळेल याची श्वाश्वती नाही. पावसाळ्यात तीन तीन दिवस घराबाहेर पडयला देणार नाही असा महामुर पाउस पडतो.जिथे स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्ष झाली तरी ज्या जिल्ह्यात हा प्रदेश आहे त्या जिल्हयाच्या गावी जाण्यासाठी धड रस्ता नहता. हा परिसर म्हणजे महाराष्ट्राला वीजेचे वरदान देणार्‍या कोयनेच्या अभयारण्याचा आणि जिथे आपण आजची भटकंती करणार तो प्रदेश म्हणजे महिमंडणगड, चकदेव परिसर.  

 महाराष्ट्रात आजही असे काही किल्ले आहेत जे त्यांच्या भौगोलिक स्थांनामुळे दुर्गम आहेत. या गडावर जाण्याचे मार्ग हे अडचणीचे व दाट जंगलातून जात असल्यामुळे या गडांवर आजही दुर्गप्रेमींचा फारसा वावर नाही. कोयना धरणाचा जलाशय व या भागातील व्याघ्रप्रकल्पामुळे परिसरात असलेले किल्ले त्यांच्याभोवती असलेल्या दाट जंगलांमुळे आपले अस्तित्व हरवुन बसले आहेत. जंगली जयगड, मकरंदगड,महिमंडणगड हि त्याचीच काही उदाहरणे.पालीचा किल्ला आणि जुंगटीचा किल्यावर तर मानवी वावर पुर्ण थांबला आहे.  पण हाडाचा ट्रेकर किल्ला आहे म्हटल्यावर तिथे जातोच. महिमंडणगड हा या दाट जंगलात हरवलेला असाच एक दुर्गम किल्ला.
          वास्तविक हा सर्व परिसर अगदी इतिहास काळापासूनच दुर्गम. हा प्रदेश म्हणजे जावळी..मोर्यांची जावळी.इथेच राजांनी चंद्ररावाचा माज उतरवून हा संपन्न प्रदेश स्वराज्यात आणला,
      बाबासाहेब पुरंदरे नेमक्या शब्दात सांगतात.
    “जावळीच्या जाळीत राज्य करायला वाघाचेच काळीज हवे !! “
 जावळीच्या कुबल प्रदेशाचा चंद्ररावाला इतका माज कि त्याने शिवरायांनी स्वराज्य कार्यात सामील होण्याचे आमंत्रणही उद्दामपणे धुडकावले.

    “तुम्ही काल राजे जाहला ! तुम्हास राज्य कोणी दिधले? तुम्ही लिहले कि जावळीत येता ! येता जावळी, जाता गोवळी ! पुढे एक मनुष्य जिवंत माघारा जाणार नाही ! तुम्हां मध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येणार ते आजच या !”
    पुढचा इतिहास सर्वांनाच ठाउक आहे. चढत्या वाढत्या स्वराज्यावर चालून आलेला ,तुळजाभवानींला उपद्रव देणारा,बुतशिकन्,कुफ्रशिकन अफझल खानाला गिळून टाकणारा प्रदेश म्हणजे हाच जावळी. 
        महाबळेश्वरच्या ते कोयनानगरपर्यंत पन्नास साठ किमी उत्तर दक्षिण असा शिवसागर जलाशय पसरला आहे. हा शिवसागर आणि त्याच्या पश्चिमेला असलेली सह्याद्रीची रांग यामधला भूभाग हा सातारा जिल्ह्यापासून तुटलेला आहे. वनसागराने अच्छादलेल्या या भागात आठ दहा छोटी गावे तग धरून आहेत,पण तरीही आजही हा प्रदेश तितकाच दुर्गम आहे. भर दिवसाही सुर्यकिरण जमीनीवर उतरायला धजावणार नाहीत असे दाट जंगल, क्वचित मानवी पावलाचा स्पर्श होणार्‍या वाटा, इतर वेळी यांच्यावर वावरात ते वाघ्,बिबटे,गवे आणि अस्वले.त्यांचेच ते धाडस होउ शकते. भौगोलिक दृष्ट्या हा सर्व प्रदेश सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्याचा.पण इथे जाण्यासाठी सोयीचा मार्ग मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथुन . मुंबई गोवा महामार्गावर चिपळूणच्या दिशेने जाताना भरणे नाक्यानंतर शिरगाव खोपी फाटा लागतो. शिरगाव व खोपी या गावातून रघुवीर घाटमार्गे मेटशिंदी या महिमंडणगडाच्या पायथ्याच्या गावी जाता येते. खासगी वाहन हा येथे जाण्यासाठी उत्तम पर्याय आहे. याशिवाय मेटशिंदी गावापुढे असलेल्या आरव गावापर्यंत जाण्यासाठी खेड बसस्थानकातुन संध्याकाळी ५ वाजता मुक्कामी बस आहे. हि बस सकाळी ७ वाजता तिथुन मागे फिरते. अर्थात बसची वेळ बेभरवश्याची असल्यामुळे खेड बसस्थानकावर आधी खात्री केलेली बरी, खेड बस स्थानक दूरभाष ०२३५६२६३०२६. 

   घाट फारसा वापरात नसुन जीपसारख्या वाहनाने जाण्यासारखा आहे. खेड -खोपी अंतर २० कि.मी. असुन पुढील घाटरस्ता १५ कि.मी.आहे. रत्नगिरी-सातारा सीमेवरील खिंडीकडील भागात साधारण २ कि.मी. कच्चा मातीचा रस्ता असुन पुढे मात्र पक्का रस्ता आहे. रत्नागिरी आणि सातारा जिल्हा जोडणाऱ्या मार्गावर एसटीचा हा प्रवास सुरु झाला तो रघुवीर घाट तयार झाल्यानंतरच !  १९९०/९१ ला काम सुरू होऊन, २००१/२ मध्ये पूर्ण झालेल्या रघुवीर घाटाच्या पायथ्याशी असणारे खोपी गाव हे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातले, तर घाट चढून गेल्यावर येणारे शिंदी गाव हे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातले !
   तसेच खेड (रत्नागिरी जिल्ह्यातील ) बस स्थानकावरून आंबवली या गावी जावे तेथे यादव यांच्या दुकानात चौकशी करून शिडीच्या वाटेने चकदेव डोंगर चढुन पुन्हा खाली उतरून महिमंडणगडकडे जाता येते पण हा मार्ग दिवसभराचा व अतिशय थकवणारा आहे.
याशिवाय बामणोली, तापोळे येथुन बोटीने या भागात येता येते. पण पाण्याच्या कमी होत जाणाऱ्या पातळीचा बोट सेवेवर परिणाम होतो व तिचा येण्याचा थांबा रोज बदलत राहतो. त्यामुळे हा मार्गही तितकासा सोयीचा नाही. ह्या ठिकाणी जायचे म्हणजे आधी एक दिवस तुम्हाला बामणोली बोटिंग जवळ सांगावे लागते.कारण सकाळी ७ वाजता तिथून बोट निघणार असते.वासोटा जाणाऱ्या बोटी ८ नंतर सुरू होत असतात.
   अर्थात या बाजूने अजून एक पर्याय नुकताच निर्माण झाला आहे. तापोळ्याजवळील काट्रोशी-रेणोशी असा पुल झाला आहे.स्वताचे वाहन असेल तर यामार्गे थेट उचाटला जाउ शकतो.पण हा फार लांबचा रस्ता आहे.त्यापेक्षा  जर कमी वेळा हा ट्रेक करावा वाटत असेल तर सातारा ते तेटले मार्गे जावून तिथून तरफ्यातून तुमची वाहने पलीकडे तापोळ्यात घेवून जावू शकता, तिथून सरळ आरव आणि मग वलवण.तिथे गाडी लावून ट्रेकला सुरुवात करू शकता.
जर राहण्याचे नियोजन असेल तर आरव मध्ये श्री कोंडीबा माने उर्फ तात्या (मोबाईल – ९४२३९३६७८२) चकदेवचे पुजारी श्री शंकर जंगम काका(मोबाइल -९९६९६१३८०२ / ९१३६५६४८७८)   
 
 
 
 या सर्व वाटांमध्ये रघुवीर घाटातून जाणारी वाट सर्वात सोयीची आहे.आपण त्यामार्गेच गडाची माहिती घेउया. रघुवीर घाटाने वर जायला सुरु केले कि पुरेसे वर आल्यानंतर उजवीकडे वासोटा दिसू लागतो. दोन कि.मी.चा कच्च्चा रस्ता पार करुन आपण  रघुवीर घाटाने माथ्यावरील खिंडीत येतो. वळणावर एक छोटे घर-वजा ढाबा टाईप हॉटेल आहे. घाटाच्या उजव्या बाजूला दरीच्या एकदम कडेला ते बांधलेले  आहे. हॉटेल शिव-सह्याद्री !!
   या हॉटेलची जागा इतकी अप्रतिम आहे कि ईथून समोरच लांब पर्यंत पसरलेले जंगल,त्या मागे नागेश्वर, वासोटा जुना, वासोटा हे सगळे दिसते.शिव-सह्याद्री हॉटेल मालकाने मस्त बाकडे टाकले आहे शिवाय टुरिस्ट साठी बसायला शेड बनवल्या आहेत. आता ईथे पर्यटकांसाठी खोल्या उभारुन लॉज केला आहे.

   पुढे गेल्यावर वनखात्याची चौकी आहे. महिमंडणगड वनखात्याच्या अखत्यारीत असल्याने गडावर जाण्यासाठी येथे प्रती माणसी व वाहनाचे प्रवेशशुल्क भरावे लागते. येथुन कच्च्या रस्त्याने दोन वळणे पार करून साधारण ५०० फुट खाली गेल्यावर रस्त्याच्या उजवीकडे वर चढणारी पायवाट आहे. या ठिकाणी कातळा वरील दिशादर्शक लहान बाण वगळता कोणतीही खुण नाही. किल्यावर जाण्यासाठी कोणत्याही खुणा किंवा फलक नाही त्यामुळं वाट चुकण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मेंटशिंदी गावातून एखादा वाटाड्या सोबत घेऊन जाणे सोयीस्कर ठरत. किल्यावर जाणाऱ्या वाटेत रानगवे हमखास आढळतात. 
वाटेच्या सुरवातीला एक समाधी दिसते.ती कोणाची हे समजत नाही. या समाधीपासून दोन वाटा फुटतात. सरळ समोर दिसणारी पुर्वेकडे जाणारी वाट सोडायची.हि वाट दाट जंगलात जाते.उजव्या हाताला असणारी म्हणजेच दक्षिणेकडची वर चढणारी वाट पकडायची. हळूहळू वाट उजवीकडे वळून वर जाऊ लागते, समोर चकदेव आणि बाकी डोंगररांग दिसतात. 

थोड्याश्या झाडीभरल्या चढाईने वाट किल्ल्याला डाव्या हाताला ठेवत आणि उजवीकडे खोल दरी ठेवत चाल धरायची. खोदलेल्या पायऱ्या सापडल्यावर आपण योग्य मार्गावर आहोत ह्याची खात्री पटते. उत्तर दक्षिण पसरलेल्या किल्ल्याच्या बरोबर मध्ये खिंडीसारखा एक खोलगट भाग आहे.ते आपले पहिले टार्गेट.
साधारण वीस मिनिट मध्ये आपण सर्वात वरच्या सपाट भागावर येतो. प्रवेशद्वार पूर्ण भग्नावस्थेत आहे. महिमंडणगडावर दोन जोडशिखरे आहेत, त्यांच्या बरोबर मधोमध आपला गडावर प्रवेश होतो आणि समोर एकामागे एक अशा उत्तुंग डोंगररांगांचे दृश्य उलगडते. नेहमी येणारे, पहिल्यांदा आलेले, दमलेले असे कोणीही असले तरी तोंडातून उत्स्फूर्तपणे 'वा !' येणारच असे ठिकाण आहे.खिंडीतून वर आल्यावर डाव्या बाजूला वळावे. डावीकडच्या शिखरावर थोडी अधिक जागा आहे, तिथे देऊळ आणि पाण्याची खोदीव सात टाकी आहेत, गडाचा इतिहास फारसा ज्ञात नसला तरी टाक्यांवरून प्राचीनपणाची खात्री पटते. टेहेळणीचा किल्ला असावा. आधी गडावरच्या टाक्या पाहुया.

ईथे १० टाक्यांचा समूह आहे. एका मध्ये पिण्यायोग्य पाणी आहे.

  पहिलं टाकं दंडगोलाकार विस्ताराचं आणि कातळाच्या पोटात खोदत नेलेलं. पाण्यावरचा हलका तवंग बाजूला केल्यावर थंडगार रुचकर पाणी पोटात भरता येत.
गडा वरील खोदीव टाके

 
 
पल्याडच्या चौकोनी खांबटाक्याच्या माथ्यावर शिवपिंड आणि तीन (पूजा करणाऱ्या शालंकृत राजकन्येचे शिल्प) पूजक खोदलेले. साधी ओबड-धोबड खोदाई. सह्याद्री दुर्गांवर टाकी विपुल असतातच, पण टाक्यावरचं असं शिल्प दुर्मिळ! 

बाकी ४-५ आयताकृती हौदांमध्ये चिखल-गाळ-दगड साचलेले.गडाशी माणसांचा फारसा संबंध नाही, हे आडवे तिडवे वाढलेले तण, काटेरी झुडपं,रानफुलं सांगत असते. 
 
 
 
      टाक्यांना मागे ठेवून मंदिराजवळ पोहचायचे. घोड्यावर स्वार झालेली युद्धसज्ज काळ्या पाषाणातील भैरवाची मूर्ती आणि पितळी मुखवटा असलेली भवानी मातेची मूर्ती आहे. ह्या भैरी भवानीची मे महिन्यात जत्रा असते. अर्थात मंदिर म्हणजे एक चौकोनी दगडी रचना, मागच्या भिंतीस टेकून असलेल्या मूर्ती , काही दिवे-समया आणि घंटा ,ना कुठले खांब ,ना छप्पर,ना दरवाजा.या मंदिराच्या पुढे थोडे चालत गेले कि उजवीकडे लांबवर रसाळ,सुमार,महीपत हे त्रिकुट दिसते.
 
 

   पुन्हा मंदिराजवळ येउन मागील गवतात गुडूप झालेले जोत्याचे अवशेष पाहून राहिलेल्या दक्षिणेकडच्या दुसऱ्या टोकावर जावे.वरुन वळणावळणाने वर चढणारा रघुवीर घाट स्पष्ट दिसतो 

  जिथे डोंगर संपत होता.तिथे नैसर्गिक बुरुजाप्रमाणे आकार आहे.  माळावर तुरळक घरट्यांची जोती अवशेष सोडले, तर आज गडावर फक्त उरलंय भणाणणारं वारं. जावळी जिंकल्यावर शिवाजीमहाराजांनी हा दुर्ग बांधला आणि १८१८ ला इंग्रजांनी ताबा मिळवला, असा त्रोटक इतिहास. समुद्रसपाटीपासून ९५३ मी उंची आणि मुख्य सह्याद्रीधारेवर वसलेला असल्याने, मोक्याची जागा. रघुवीरघाट-आंबिवली घाट यांच्या संरक्षणार्थ हे ठाणं. दुर्गावरून सर्वदूर सह्याद्री दर्शन घडत होते.
माथ्यावरून चौफेर दृश्य दिसते. खालचे शिंदी गाव सर्व बाजूंनी उंच डोंगरांनी वेढलेले दिसते, वायव्येला चकदेवचा उत्तुंग पहाड आणि त्यावरची छोटी जंगम वस्ती,  वायव्येला आंबिवली घाटाची खिंड आणि त्यातून डोकावणारे कोकणातले सुमारगड आणि महीपतगड,उत्तरेला पर्वत या नावाचाच पहाड आणि त्यावरचे देऊळ. पर्वतच्या मागे दिसणारा खोगीराच्या आकाराचा मधुमकरंदगड. या पसाऱ्यातून वाट काढत थोडे पुर्वेला गेले की आरव आणि मोरणी ही शिवसागराच्या काठावरची गावे लागतात, बोटीने यायचे तापोळा वा बामणोलीहून दोन तीन तास जलप्रवास करून या गावाला येणे आणि मग तासाभराची जंगलातून पायपीट असे करता येते. डोळे ताणून दक्षिणेला पाहिले तर पाटणच्या पठारावरच्या पवनचक्क्या दिसतात.
 
 उजवीकडच्या शिखरावरून खाली दरीत खोपी गाव आणि त्याच्या लगतचा खोपी धरणाचा जलाशय असे सगळे दृश्य दिसते.
 
 दक्षिणेला नागेश्वर सुळका, वासोटा आणि जुना वासोटा सहज ओळखता येतात. गडाच्या पूर्व उताराला चांगला जंगलपट्टा आहे.

कोयना अभयारण्याचे आणि पश्चिम कड्यांचे विहंगम दृश्य दिसलं. काय ते जंगलाचे हिरवेगार टप्पे आणि किती त्या दुर्गम डोंगर-दऱ्या. निमुळत्या घसरड्या पाऊलवाटेने शिंदी गावात परतायचे. शिंदी गावातून महिमंडण दुर्गदर्शन करून परत यायला तीन तास लागतात.
संदर्भ :-
१) सातरा जिल्हा गॅझेटीयर
२) दुर्गांच्या देशा- भगवान चिले
३) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
४) डोंगरयात्रा - आनंद पाळंदे

 

चकदेव :-

 कांदाटीच्या खोर्‍याचा दुर्गरक्षक म्हणजे महिमंडणगड असला तरी हा परिसर दुर्गम आणि वारंवार येणे होण्यासारखा नसल्यामुळे या भागात आल्यावर आणखी काही ठिकाणांना भेट देता येईल. त्यामध्ये चकदेव्,पर्वत आणि आयुष्यभर लक्षात रहाणारा अनुभव म्हणजे चकदेवच्या पश्चिम कड्यावरुन शिडीच्या मार्गाने केलेली उतराई आणि तिथून रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आंबिवली गावापर्यंतची वाटचाल ! तर आता माहिती घेउया या थरारक वाटेची.
   अर्थातच या परिसराची भटकंती करायची तर म्हणजे बेस पॉईंट आहे शिंदी हे गाव.शिंदी अतिशय टुमदार अन रोमांचक गाव, बाजुने पर्बतगढ, चकदेव, अन महिमंडनगड असे तिन्ही बाजूने किल्ल्यांनी वेढले गेलेले. हे तिन्ही किल्ले सराइत ट्रेकर्स दोन दिवसात सहज करुन जातात. पण शिंदीमधे नुसतं मुक्काम ठोकुन बसणे हाच एक मस्त विरंगुळा आहे. शिंदीमधे नदिकाठी पाय पाण्यात सोडून जंगलात सुर्यास्त निरखत रहाणे म्हणजे निव्वळ सुख होय.
      जावळी खोऱ्यातील अतिदुर्गम व मागासलेल्या कोयना-कांदाटी खोऱ्यात कोयना धरणाच्या निर्मितीमुळे शिवसागर जलाशय पसरला आहे त्यामूळे निसर्गाच्या सानिध्यात अनेक पिढ्या जगणार्‍या येथील भूमिपुत्र विस्थापित झाले त्यापैकी काही जण कोकण, ठाणे, रायगड, सोलापूर व सातारा जिल्ह्यात जागा मिळेल त्याठिकाणी राहण्यास गेले पण आजही अनेकजण आपल्या मातृभूमीच्या ओढीने येथील अनेक कार्यक्रमाला उपस्थित राहतात .जावळी तालुक्यातील सातारा जिल्ह्याचे शेवटचे टोक म्हणून चकदेव पठाराकडे पाहिले जाते . देशातील सर्वात कमी मतदान केंद्र म्हणून चकदेव शिंदीची नोंद झाली होती . या पठारावरून पलीकडे चिपळूण तालुक्यात जाण्यासाठी पूर्वी वेलाच्या शिडीचा वापर केला जात होता याव्यतिरिक्त कोणतेही दळणवळणाचे साधन नव्हते . या शिडीचा वापर करून येथील ग्रामस्थ चिपळूणला बाजारहाट करण्यासाठी जात होते पण १९९० साली तत्कालीन शाखा अभियंता डी.एच.पवार यांनी दिवंगत माजी आमदार जी.जी.कदम यांच्या प्रयत्नामुळे वेलाच्या शिडीऐवजी लोखंडी शिडी बसवण्याचा निर्णय घेतला त्याप्रमाणे १९९० साली चकदेव पठारावर जाऊन लोखंडी शिडीसाठी माप घेतले आणि सातारा येथे शिडी बनवण्याची ऑर्डर दिली .शिडीचा सांगडा व वेल्डिंगसाठी आवश्यक लागणारी यंत्रणा घेऊन बामणोली पासून लाँच व त्यानंतर डोंगर पठारापर्यंत स्थानिक भूमिपुत्र व कर्मचाऱ्यांच्या मदतीने हे साहित्य चकदेव पठारापर्यंत आणले त्याठिकाणी शिडी तयार करून उताराला ही शिडी जोडून घेतली त्यामुळे चिपळूणला जाणे सोयीस्कर झाले.
      शिंदी गावात वस्ती फारशी नाही पण घरे एकदम व्यवस्थित बांधलेली दिसतात आणि ज्यासाठी हा गाव उठवण्याचा अट्टाहास केला ती वीज देखील पोहचलेली आहे.गावातील बहुतेक सर्व कुटुंबाचे आडनाव मोरेच आहे. शिंदी गावाच्या अगदी समोरच चकदेवची वाट सुरु होते. एका ठिकाणी झाडाच्या तोडलेल्या काटक्यांनी बनवलेली शिडी दिसते. ती उजवीकडे ठेवून पुढे गेल्यावर वाट कडेकडेने वर सरकते, साधारण अर्ध्या तासाच्या चढाईनंतर  पठार लागले. ते पठार इतके विस्तीर्ण आहे कि कोणत्या दिशेला जावे कळतसुद्धा नाही.उजवीकडे वळून साधारण नैऋत्य दिशा पकडून चालत रहायचे.काही अंतर तंगडतोड केल्यावर एक झेंडा झाडीतून दिसतो ,हि वाट बरोबर असल्याची खुण. इथेच आणखी काही घरे होती.हि आहे जंगम वस्ती. डावीकडे काही बांधकाम आणि पुढे एक देऊळ दिसते, हेच चौकेश्वराचे देऊळ !!हे ठिकाण समुद्रसपाटीपासून ३,८४२ फूट उंचीवर आहे. 



20190504_140452
खोपी, शिरगाव, उचाट आणि शिंदी अश्या चार गावांचा हा महादेव. शिवपिंड, त्यावर मांडलेल्या तांब्याच्या फणाधारी नागप्रतिमा आणि शिवमुखप्रतिमा. पाठीमागे मांडलेल्या तांब्याच्या ६ देवता. तिथल्या ग्रामस्थांच्या मते त्या मुर्त्या आहेत - वरदायिनी, पार्वती, राम, लक्ष्मण, भरत, रघुवीर यांच्या. सभामंडप व गाभारा कातळ कोरीव खांबानी तोललेला. त्यावर शिल्पे कोरलेली. आत मंद दिवा तेवत असतो.पुर्व दरवाज्यातनं येणारा उजेडाचा कवडसा मात्र मंदिरातली गूढता निर्माण करतो.  पर्वतशिखरावरच्या या देवाचे पुजारी म्हणजे ईथेच निवास करणारे जंगम! हे लोकं शिवभक्त. देवाचे पुजारी, गळ्यात शिवलिंग-नागप्रतिमा धारण करतात, वशाट खात नाहीत.मंदिराच्या आवारात २०-३० लोक आरामात राहू शकतात . मंदिराच्या बाहेर ५ मिनटाच्या अंतरावर पाण्याची टाकी व नळ आहेत . 

चकदेववरील शेंदूर फासलेला हनुमान आणि गणपतीची मूर्ती। . .


 चकदेववरुन दिसणारा सुमारगड। .



      चकदेव बद्दल एक आख्यायिका देखील सांगितली जाते. ‘रामराजा वनवासात असताना इथे आला होता. शंकराने भिल्लाचं रूप घेऊन आव्हान दिलं .रामाने बाण सोडला, पण तो शंकराला न लागता चकला आणि देऊळ जिथे आहे, तिथे जाऊन पडला. रामाचा बाणही जिथे चकला, ते स्थान म्हणजे चकदेव’.जावळीवर अधिपत्य गाजविणारे शंभू महादेवाचे उपासक मोरे घराणे ह्यांनी जी सात शिवालये निर्माण केली त्यातला पर्वतचा मल्लिकार्जुन, चकदेव.कांदाटी खोऱ्यातील देश व कोकण ह्या सीमेवरील प्रसिद्ध शिडीच्या वाटेवरील चकदेव आणि मल्लिकार्जुन म्हणून ओळखला जाणारा हा पर्वत. पर्वतासारखाच विशाल आणि देखणा डोंगर. सातारा आणि रत्नागिरी ह्या जिल्ह्यांच्या सीमेवरची दोन शिवमंदिरे. महाबळेश्वर, मोळेश्वर, धारदेव, गाळदेव, घोणसपूर हि बाकीची शिवमंदिरे. 

     चौकेश्वर मंदिर एका घनदाट जंगलाच्या मधोमध डोंगरावर आहे आणि तिथे एक जुने शिव मंदिर आहे. मंदिराकडे जाणारा रस्ता निसर्ग प्रेमींसाठी रोमांचकारी आणि साहसी आहे. मंदिरात जाण्यासाठी चकदेव गावाला जावे लागते. मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे ते पांडव काळापासूनचे असल्याचे मानले जाते .ह्या मंदिरात एक शिवलिंग आहे आणि ते “चौकेश्वर” या नावाने ओळखले जाते. हे मंदिर सभोवतालच्या तसेच कोकणातील अनेक लोकांचे भक्तिस्थान आहे. 
 
घनदाट जंगलाच्या मध्ये स्थित ह्या डोंगराचा मार्ग साहसी आहे आणि रोमांचक वन्यजीवनाचे अनुभव देतो. जंगलात वन्य कुत्री, अस्वल, बिबट्या आणि वाघांचा समावेश आहे. पावसाळ्यात या भागात जळू (Leeches) भरलेले असल्याने ज्यादा काळजी घ्यावी लागते.मेट शिंदी गावापासून दोन तासांच्या निवांत चालीनंतर चकदेवच्या वस्तीपाशी आपण पोहचतो. पावित्र्य टिकून राहावे, म्हणून मंदिर परीसरात ट्रेकर्सना शक्यतो राहू देत नाहीत.
20190504_153908
    या मंदिराच्या पुढे एक स्तंभ आहे. चांगला चाळीस पन्नास फुटी झेंडा होता. इथून महाबळेश्वर, मधुमकरंदगड दिसतो.  
आणि आपण येतो या भटकंतीच्या थरारक क्लायमॅक्सकडे अर्थातच शिडीच्या वाटेने उतराईकडे !
 दुर्गभटक्यांमध्ये सह्याद्रीत काही विशेष आकर्षणं आहेत. त्यापैकी एक म्हणजे, चकदेवच्या पश्चिम कड्यावरून चढण्या-उतरण्यासाठी फांद्या-वेली बांधून बनवलेली शिडी अर्थातच स्थानिक लोकांच्या वहिवाटीची वाट म्हणजे ‘चकदेवची शिडीडाक’! चकदेवच्या वस्तीला रोजच्या गरजेच्या वस्तूंसाठी मीठ-मिरचीसाठी थेट कोकणात उतरायला दोन पर्याय एक मेट शिंदीत उतरुन रघुवीर घाटाने खोपीला जायचे किंवा शिडीच्या पायवाटेने आंबिवलीत उतरायचे. रहिवाश्यांसाठी हि खडतर वाट तुडवणे हा एक रोजचे आयुष्य कंठण्याचा अपरिहार्य मार्ग असला तरी या वाटेचे अनोखे थ्रिल ट्रेकर्सना अनुभवायचे असते. चकदेवच्या मंदिराच्या पाठीमागे एक वाट खाली जाते, पुढे पुन्हा एक मोठे पठार लागते, बरीच चाल झाली कि आपण पठारावरुन पश्चिमेला आडवं गेल्यावर, कोकणाचं दृश्य समोर येते. अर्थात हि जागा सहजासहजी सापडत नाही.
    समुद्रसपाटीपासून ९८४ मी उंचीवर आणि सह्याद्रीच्या धारेवर आल्यामुळे, दक्षिणोत्तर पसरलेल्या सह्याद्रीच्या डोंगररांगांचं अथांग अफलातून दृश्य दिसते.

पश्चिमेला रसाळ - सुमार - महीपत ही सह्यरांग लोभस दिसते. 
 IMG_20190504_160944322-01
चकदेव वरून मधू मकरंद (फोटो – सारंग ढेरे)
उत्तरेला महाबळेश्वर खोऱ्यात उंच उठावलेले मधू - मकरंद हि दुर्ग जोडी आणि लांबवर पसरलेला पर्वत, ह्यांच्या पदराच्या घड्या जगबुडी नदीच्या खोऱ्यात विसावलेल्या. तासनतास बघत रहावा असाच हा देखावा.
   स्थानिक लोकांच्या दंतकथेनुसार विष्णूअवतार परशुरामाने चकदेवच्या याच कड्यावरून बाण मारून, समुद्राला मागे हटवून, कोकणपट्टी निर्माण केली. अर्थात हि कथा सह्याद्री परिसरात साल्हेरपासुन सर्वत्र सांगितली जात असली तरी या परिसराशी परशुरामाचे नाते नक्कीच आहे, कारण डावीकडे दरीत लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्र आणि ‘क्षेत्र परशुराम’ देवळाचा परिसर खुणावत असतो. 
   

शिडीची वाट
यानंतर आपण शिडीच्या टोकावर येतो आणि इथून सुरु होतो रोमांचकारी खेळ.शिड्यांच्या माथ्यावर आपण जेव्हा पोहोचतो तेव्हा डावीकडे असणार्‍या रौद्र कड्याकडे आणि उजवीकडे असणार्‍या पाताळवेरी गेलेल्या दरीच्या दृष्याने आपला क्षणभर विश्वास बसत नाही की अश्या अडचणीच्या जागेतून वाट काढली आहे. दरीच्या खोssल दृश्यामुळे आणि एकापाठोपाठ झेपावलेल्या डोंगरदांडांच्या दृश्याने नजर फिरते. 
शिडीच्या पठारावर असलेला पाणी

शिडीची वाट टप्प्यात आल्यानंतर जवळच्या पाणवठ्या वरून  आपल्या बाटल्या भरून घ्यायच्या कारण नंतर खाली धनगराच्या झापापर्यंत पाणी नाही.शिडीच्या वाटेच्या सुरुवातीलाच श्री गजाननाची एक शेंदरी मूर्ती आहे . तिला नमस्कार करून "गणपती बाप्पा मोरया" असा गजर करायचा आणि शिडीच्या वाटेला हात घालायचा.



शेवटची शिडी

शिडी एकदम कड्याच्या घळईत तीन टप्प्यात चपखल बसवलेली. प्रसिद्ध "चकदेवची डाक" हीच. त्यातला तिसरा टप्पा जरा मोठाच. सर्वात वरची ५ मीटर, मग १० आणि २० मीटरच्या अंदाजे असाव्यात. भक्कम आणि मजबूत. शिडीची बांधणी करताना आधारासाठी कठडे, पाईप्सच्या पायऱ्या आणि पायऱ्या बळकट करण्यासाठी दुहेरी आधारतुळया वेल्डिंग केल्या आहेत. पहिल्या शिडीच्या माथ्यावरून दुसऱ्या शिडीची फक्त सुरुवात दिसते. उतराईची सुरुवात करताना, शिडीच्या माथ्याकडचा कठडा घट्ट धरून, दरीकडे पाठ करून शिडीकडे तोंड करुन उतरले तर थेट दृष्टीभय नसल्याने आरामात उतरु शकतो. इथे आपल्याला कळसुबाईच्या शिड्यांची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. दरीकडे जड पाठपिशवीसह पाठ करत असल्याने, पायरीवर पाय नीट रोवून मगच पावले टाकयची.एका वेळी दोन हात एक पाय स्थिर ठेवून फक्त एक पाउल किंवा एकाच हाताची हालचाल करायची. एका मागे एक सावधतेने उतराई करायची. एकंदरीत धमाल अनुभव असतो.20190504_120840
                               लाकडी शिडी
ह्या लोखंडी शिड्या बसविण्याच्या आधी एवढ्याच उंचीच्या लाकडी शिड्या होत्या. तेव्हाचा थरार काय असेल ह्याची नुसती कल्पना केली तरी अंगावर शहारा येईल. भूतलावर आपण उशिराच प्रगटल्याने ते सुख नसलं तरी सध्या जे आहे त्याला सुद्धा तोड नाही. पूर्वी करकरणाऱ्या वेलींच्या शिड्यांवरून बाया-म्हातारे  गावकरी कशी काय चढाई करत असतील, याची कल्पना करवत नाही.
शिडी चा कातळ कडा
      शिडी उतरून एक टप्पा खाली आलो कि १५ फुटी आडवी वाट हि सुटकेचा निश्वास घेउ देत नाही.इथे वाळकं गवत, घसारा आणि डावीकडे कोसळलेली दरी यामुळे अंगाचा कापरा कायम असतो. 
 
पश्चिमे दिशेच्या सोंडेवरून उतरणाऱ्या उभ्या घसरड्या वाटेवर आपण पोहोचतो.इथून मागे वळून पाहिल्यावर आपण कोणते दिव्य पार पाडून खाली आलो हे दिसते, पण त्यावर आपलाच विश्वास बसत नाही. 
यानंतर आपले लक्ष्य अर्थातच पायथ्याचे आंबिवली गाव.मात्र अजून खडतर वाटचाल संपली नसते. उभ्या उतारांचे टप्पे सतत पार करत उतरायचे असतात. 
वाटेत एकुलता एक धनगराचा झाप लागतो. पाच मिनीटाच्या अंतरावर मॉल्,दहा मिनीटाच्या अंतरावर कॉफी शॉप अश्या शहरी सुखसोयींना चटावलेल्या आपल्या मनाला या अश्या एकांड्या जागी रहाणार्‍या कुटुंबाचे आश्चर्य वाटल्यावाचून रहात नाही. त्यांच्या झापात पाणी,ताक मिळु शकते.त्याचा अस्वाद घ्यायचा,शक्य झाल्यास त्यांना काही मदत केउन पुढचा घसरगुंडीवरुन उतरायला सुरवात करायची. दोन-अडीच तासात आपण आंबिवलीत पोहचतो.मागे सह्यपर्वताच्य राकट रुपाकडे पाहिल्यास आपण याच वाटेवरुन आलो यावर विश्वास बसत नाही.पण आयुष्यभर समाधान देईल असा एक अनुभव आपल्या खात्यात जमा झालेला असतो.
 
    हाच ट्रेक आंबिवली ते चकदेव करता येईल.मात्र  आंबिवलीकढून चढाई प्रचंड आहे. कसलेल्या दुर्गयात्रींनीच हिच्या नादी लागावे. आंबिवली सोडली तर पाण्याची सोय थेट चकदेवला आहे.मध्ये धनगराचा झाप असला तरी तो १२ महिने तिथे राहत नाही.   
    थोडक्यात महत्त्वाचं : हा ट्रेक कसलेल्या दुर्गयात्रींसाठी आहे. प्रचंड मानसिक आणि शारीरिक क्षमता असणार्यांनी ही वाट धरावी. सहनशक्तीचा अंत पाहणारी आंबिवली घाट आहे. आंबिवली घाट उतरत असाल तर गुढग्यांना नीकॅप असावी, उतरताना गुढग्यांवर ताण येतो. ट्रेक भिडू संख्या कमीत कमी असावी आणि आपल्या ओळखीचे भिडू असावे. त्यांच्या क्षमतेवर लीडरचा विश्वास असायला हवा.
वाटाड्या : मुरलेले ट्रेकर असाल तर फारशी गरज नाही, बाकी वाट मळलेली आहे. (जावळी खोऱ्यात घुसताना अभ्यास मजबूत हवा)
संदर्भः-
१) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
२) चढाई-उतराई- आनंद पाळंदे
३) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
४) साईप्रसाद बेलसरे यांचा ब्लॉग www.discoversahyadri.in
५) https://abhishekskale.wordpress.com हा ब्लॉग
६ ) http://unadbhatkantee.blogspot.com हा ब्लॉग

 






एसटीने हमखास फिरावा असा मार्ग : शिंदी ❤️ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ . कोयना धरणाच्या जलाशयामुळे संपर्क तुटलेल्या गावापैकी एक गाव म्हणजे शिंदी ! . रत्नागिरी आणि सातारा जिल्हा जोडणाऱ्या मार्गावर एसटीचा हा प्रवास सुरु झाला तो रघुवीर घाट तयार झाल्यानंतरच ! . १९९०/९१ ला काम सुरू होऊन, २००१/२ मध्ये पूर्ण झालेल्या रघुवीर घाटाच्या पायथ्याशी असणारे खोपी गाव हे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातले, तर घाट चढून गेल्यावर येणारे शिंदी गाव हे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातले ! . घाटाची लांबी जरी १० ते १२ किलोमीटरची असली तरी समुद्रसपाटीपासूनची उंची मात्र ४००० फुटापेक्षा जास्तच, त्यामुळे वरती गेल्यावर जो काही नजारा पहावयास मिळतो, तो काही औरच असतो ! . घाटापूर्वी गावातील लोक तापोळा येथे बाजारहाट करायला जायचे, ते देखील जलवाहतूक मार्गे ! पण घाटाचे काम झाले आणि हा प्रवास अधिक सुखकर झाला. . अतिशय नयनरम्य तसेच अत्यंत दुर्गम असलेल्या या भागात एसटीच्या फेऱ्या तश्या फार कमीच, पण त्यातल्या त्यात थेट मुंबई (ठाणे)ला जोडणारी ही गाडी म्हणजे माझा फार आवडतात मार्ग. . शिंदी गावाच्या ही पुढे जाणारी खेड आगाराची 'खेड > उचाट > अकल्पे' ही सेवा तर अप्रतिम आणि ती देखील दुपारी निघून गावात मुक्काम करणारी❤️ मी आजवर या भागात एसटीने जरी गेलेलो नसलो, तरी या मार्गावरील प्रवास अद्यापदेखील माझा विशलिस्टमध्ये आहेच ! . दिवाळी, गणपती, होळी तसेच उन्हाळी सुट्ट्यांमध्ये हा मार्ग हमखास चालू होतो आणि या मार्गावरील गाडीचा फोटो काढत असताना माझा मनात प्रवासाची इच्छा आपोआप दाटून येते. . शिंदीजवळील अतिशय दुर्गम ठिकाण समजल्या जाणाऱ्या महिमान गड आणि चाकदेव या ठिकाणांना जोडणाऱ्या या गाडीने कधी ना कधी आपण प्रवास कराच !
















किल्ले पर्वत (Parvat Fort) 🚩 Date: 28/10/2018 पर्वत हा कोयना क्षेत्रावर लक्ष ठेवणारा एक छोटासा किल्ला आहे. चकदेव व पर्वत दरम्यान असणाऱ्या खिंडीत जाण्यासाठी अंबावली घाट चढणे आवश्यक आहे. हे किल्ले कोयना नदीचे भव्य दृश्य देतात. चकदेव आणि पर्वत किल्ल्यांमध्ये घनदाट जंगल आहे. डोंगराच्या शिखरावर घनदाट जंगलात वसलेले मल्लिकार्जुन मंदिर अतिशय सुंदर स्थान आहे. पर्वत किल्ल्याच्या पायथ्याशी एक सुंदर शिवकालीन निरपजी (महादेव) मंदिर आहे. मंदिराच्या जवळच जावळीच्या पहिले चंद्रराव मोरे ह्यांच्या वाड्याचे अवशेष आहेत.एक काल्पनिक कथा सांगितले जाते. अर्जुन वनवासात तिथं आला. शंकर पार्वतीने भिल्ल - भिल्लीण बनले. अर्जुन बाण टाकायचा आणि शंकर ते हुकवायचा अन बाण पार्वतीच्या पाया जवळ पाडायचा. असं बराच वेळ झाल्यावर अर्जुनाला कळून चुकले कि ही तर जगन्माता पार्वती. त्यानं लोटांगण घातलं मग मल्लिका भिल्लीण ही पार्वतीचं मूळ रूप घेऊन प्रगटली. अन म्हणून हे पर्वतावर मल्लिकार्जुणच देऊळ. ( चढाई उतराई - आनंद पाळंदे )

शिंदीच्या पुढचे गाव आहे वळवण. इथून पर्वत(परबत)नावाचा डोंगर दिसतो.इथेच वर मल्लिकार्जुनाचे मंदिर,अगस्ति ऋषी आणि लोपामुद्रा यांची समाधी आहे.रस्ता पर्वतला वळसा घालून पुढे चंद्रराव मोरे यांचा वाडा जिथे होता, तिथे जातो. (आम्हाला रस्त्यात मोरे यांचे वंशजही,जो सोबत आलेला शिंदीमधला गावकरी होता, त्याने दाखवले) 

गावाचे नाव आहे कांदाट (इथला प्रदेश सुद्धा कांदाट किंवा कांदोशी खोरं म्हणतात).इथल्या वाड्याच्या जागेवर स्मृतिस्तंभ देखील आहे. आता तिथे फक्त अवशेष शिल्लक आहेत. 

शेजारीच मोर्‍यांची कुलदेवी निरीपजी देवीचे मंदिर आहे. हा सर्व परिसर म्हणजे एक देवराई होती. देवीचे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो.चंद्ररावांचा वाडा, मंदिर आणि सभोवतीचे दाट जंगल बघून सगळा इतिहास आठवू लागला होता.


  


चंद्रराव मोरेंच जावळीच मुलुख म्हणजे किल्ले रायगड ते किल्ले पन्हाळा पर्यत पसरलेले विस्तीर्ण हिंस्त्र पशूंनी सर्वसपन्न असे घनदाट जंगल, अभेद्य असा मुलुख , मोरे येथिल अनभिषिक्त राजेच.. चंद्रराव मोरे नि उभारलेला बारा शिवपुऱ्या पैकी मल्लिकार्जुन पर्वत आणि चकदेव येथील देवस्थान आपण पाहणार आहोत, रघुवीर घाट, वासोटा, नागेश्वर वर लक्ष ठेवून असलेल महीमंडणगड आपण ह्या मोहीम मध्ये पाहणार आहोत..




महत्त्वाच्या नोंदी : 
उत्तम कालावधी : वर्षभरात कधीही, पण महिमंडगडावर आढळलेल्या गव्यांच्या पावलांच्या ठशांवरून आणि मला लागलेल्या एका जळूमुळे पावसाळा टाळावा. शिमग्यात गेलात तर कोकणाचा शिमगा अनुभवयास मिळेल. 
ट्रेक दिनांक : २७-२८ ऑक्टोबर २०१८
ट्रेक: मल्लिकार्जुन पर्वत - महिमंडणगड - चकदेव 
लागलेला वेळ : मल्लिकार्जुन पर्वत- आरव ते आरव ५ तास, महिमंडणगड - २.५ तास, चकदेव-मेटशिंदीकडून चढून आंबिवली उतराई - ६ + तास. 
अंतर : संपूर्ण ट्रेक चाल अंदाजे ३० किमी. 
उंची: महिमंडणगड : ९५३ मी. चकदेव : ९८४ मी. , पर्वत: ११२५ मी. 

20190505_084628
मोरे वाडा  स्मृतिस्तंभ
20190505_084643
अवशेष

https://www.discoversahyadri.in/2019/06/ambivalighat-parvat-chakdev-mahimandan-shididak.html


No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...