https://sudarshankulthe.wordpress.com/2018/12/04/%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE/

नामरूपात्मकं विश्वं यदिदं दृश्यते द्विधा |
तत्राद्यस्य कविर्वेधा द्वितीयस्य चतुर्मुखः॥
हे जग दोन प्रकारे पाहता येते एक म्हणजे फक्त नावाने किंवा कल्पनेने तर दुसरे म्हणजे जे जसे दिसते आणि ऐकू येते तसा त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन. पहिल्याचा निर्माता एखादा कवी असतो तर दुसर्या जगाचा निर्माता साक्षात ब्रह्मदेव…
सह्याद्रीत भटकताना असा अनुभव सतत येतो. काही किल्ले, पर्वत, डोंगर, सुळके, घाट आदींची आपण फक्त नावं ऐकलेली असतात. त्या ऐकलल्या नावाप्रमाणे आपल्या मनात त्याविषयीचे एखादे चित्र किंवा कल्पना उभी राहते. पण प्रत्यक्षात ठिकाण बघताना मात्र सृष्टिकर्त्या ब्रह्मदेवाच्या निर्मितीची ती अनुभूती मिळते. मग प्रश्न पडतो की या निर्मितीला ‘अमुक’ नाव कसं पडलं असावं? हे नामकरण कुणी केलं असेल? काय असेल बरं या नावामागची कहाणी?
चला तर बघूया ‘सह्याद्रीतील नाम महिमा’

पौराणीक कथा, व्यक्तिरेखा, देवदेवता आणि गडकोटांची नांवे हे समीकरणच दिसून येतं. किल्ला असो वा डोंगर त्यावर काही ना काही मंदीर किंवा धार्मिक ठिकाण असतं आणि त्याची काहीतरी स्थानिक किंवा प्रचलित कथाही सांगितली जाते. ही देवतांची नावं बघा… देवगड, देवगिरी, भगवंतगड, इंद्रगड, नारायणगड, भवानीगड, शीव, सदाशिवगड, महादेवगड, बल्लाळगड, वल्लभगड, हरिहर, ब्रह्माडोंगर, ब्रह्मगिरी, पद्मनाभदुर्ग, परशुराम, गंधर्वगड, मल्हारगड आदी. ही भगवन्नामावली जपतानाच दोन नावं स्मरतात आणि नामकरणविधी म्हणजेच बाळाच्या बारशामध्ये म्हटल्या जाणार्या प्रसिद्ध उक्तिप्रमाणे गिर्यारोहकही कधीतरी म्हणतो, ‘कुणी गोविंदगड घ्या, कुणी गोपाळगड घ्या…’
वेताळगड, महांकाळ आणि भैरवगड अशी तंत्रदेवतांची नावंही आढळतात. भैरवगड नाव असलेले किल्ले सह्याद्रीत अनेक ठिकाणी आहेत. देवतांबरोबरच रामायणातील रामगड, भरतगड, हनुमंतगड तर महाभारतातील द्रोणागिरी, पांडवगड, भीमगड, अर्जुनगड अशी दोन पवित्र हिंदूमहाकाव्यग्रंथातील नावं देखिल पुराणांचे स्मरण करायला लावतात. नाथपंथीयांची स्थानकं तर सह्याद्रीत अनेक दुर्गपर्वतांवर आढळतात. पण त्यातली गोरखगड, कानिफनाथ, मच्छिंद्रगड, सिद्धगड प्रसिद्ध आहेत.
बर्याचशा किल्ल्यांवर ऋषींची तपस्थानं असल्याचं सांगितलं जातं. जसं त्र्यंबकगडावर गौतम, अणकाईवर अगस्ती, आजोबा पर्वतावर वाल्मिक इत्यादी. तर काही किल्ल्यांची पुर्वीची मूळ नावं ऋषीनाम दर्शक आहेत. जसं मार्कंडेय, कौडिण्य (कोंढाणा/सिंहगड), ब्रह्मर्षी (मुरूंबदेव/राजगड) आदी. सातमाळा पर्वत श्रृंखलेत ‘सप्तश्रृंगी’ हा महिषासूरमर्दीनी देवीचा सुप्रसिद्ध गड आहे. सप्तश्रृंगीच्या पाठीशी ‘अहिवंत-महिवंत’ हे देवीने संहार केलेल्या असूरांच्या नावाचा किल्ला आहे तर देवीच्या बरोबर समोर ‘मार्कंडेय’ ऋषींच्या नावे किल्ला आहे. किल्ल्याच्या माथ्यावर मार्कंडेय ऋषी ‘देवीसप्तशती’ कथन करत आहेत आणि समोरील गडावरून देवी ते श्रवण करत असल्याचे भाव मूर्तीत दिसतात.
राजा हरिश्चंद्राची कथा फक्त सह्याद्रीतच नव्हे तर देशभरात प्रचलित आहे. सुप्रसिद्ध हरिश्चंद्रगड, तारामती शिखर आणि त्याशेजारीच असलेला रोहिदास ही नावं ऐकली की ती सत्यवचनी पुण्यवान राजाची कथा डोळ्यांदेखत उभी राहते. हिमालयातील सांबसदाशीवाचे निवास म्हणजेच कैलास. कैलासगडाचे नाव सह्याद्रीतही हिमालयाची आठवण देते.
नासिकच्या सातमाळेतच धोडप किल्ल्याशेजारील एक बडा पर्वत ‘लेकुरवाळी’ नावाने उभा आहे. तर या लेकुरवाळी मातेच्या आजूबाजूला बंड्या, हंड्या, रावळ्या, जावळ्या अशा लहान बालकांच्या नावानिशी असलेले डोंगर-किल्ले गर्दी करतात.
भास्करगड, चंद्रगड, मंगळगड, तारापूर, सप्तर्षी, अजिंक्यतारा, गगनगड, घनगड, ढग्या डोंगर (सिन्नर) या खगोलीय नावांमुळे धरतीवर भटकंती करताना अवकाश विहाराचा फील येतो. मही म्हणजे पृथ्वी. महीपालगड, महीमतगड, महिपतगड, महीमंडणगड, महीमानगड अशी ही भू नामी दुर्गावली. तर पाणकोट, सागरगड, पाणडोंगर ही नावं ऐकली की जलक्रीडा स्मरते. हेच पाणी नळीतून प्रवाहीत होते आणि त्याचे नियमन करण्यासाठी तोटी लावली जाते. या तोटीची आठवण येते ती ‘नळदुर्ग’ हे दुर्गनाम ऐकल्यावर. या नळदुर्ग किल्ल्यात नदीच्या प्रवाहाचं नियमन केलेलं आहे. आणि हे पाणी तटबंदीवरून दोन नयनरम्य धबधब्यांच्या रूपात कोसळतात. या धबधब्याचं नावंही ‘नर आणि मादी’ असं गमतीशीर आहे. अर्थात नळदुर्गातला हा ‘नळ’ म्हणजेच पुराणकथांतील ‘नल’ राजाशीही संदर्भ दर्शवितो.
पिंपळा, खैराई, निमगिरी, चंदन, आंबागड हे किल्ले आणि बाभुळणे, उंबरदार, सादडे ह्या घाटवाटा वृक्ष संकेत देणारे आहेत. पन्हाळगड म्हणजे पूर्वीचा पर्णालपर्वत. म्हणजे वृक्षांशी संबंधीतच नाम येतं. तर कमळगड, कण्हेरा, कण्हेरगड, पद्मदुर्ग इत्यादी किल्ले पुष्पांची नावं धारण करून आपल्यासारख्या भटक्यांना आकर्षित करत असतात.
भटकंती करत असताना आंबोळगड, घोसाळगड, कोथमिरा (चौल्हेर शेजारील डोंगर), बोरघाट ही भाज्यांची नावं सुचित करतात तर तांदूळवाडी, भातराशी, साखरगड ही दुर्गनावं डोंगरयात्रेत सोबत घेतलेल्या शिधा-शिदोरीची आठवण देतात. तसंच सुधागड, मधुमकरंदगड आणि रसाळगड ही नामं गिर्यारोहकांच्या मनातली तृषा शमवितात.
नासिकच्या इगतपुरी-त्र्यंबकेश्वर रांगेतील काही डोंगरांची नावं ढोर्या, वाघ्या, अस्वल्या, भेकर्या अशी आढळतात. एकाच भागात असलेल्या या प्राणीजन्य नावांमागची कहाणी स्थानिक आदिवासींना विचारली असता फार काही हाती लागत नाही. मात्र ह्या भागात वन्यजीवन आणि जैववैविध्य दिसून येतं आणि मूळ लोक त्यांच्याबरोबर अनेक वर्षांपासून सहजीवन जगत आहेत. त्यावरूनच कदाचित या डोंगरांना ही नावं बहाल केलेली असावीत.
या व्यतिरिक्त सह्याद्री आणि महाराष्ट्रातील अनेक लोकप्रिय गडदुर्ग आणि डोंगरांच्या नावातून प्राणी-पक्षी डोकावतात. जसे सिंहगड, मृगगड, मोरगिरी, मोरधन, कोंबडकिल्ला, कावळ्या, वाघेरा, नागफणी, घोडबंदर, वारूगड, म्हैसमाळ, पालगड, तैलबैल, मांजरसुंबा इत्यादी. वाघबारी, अस्वलखिंड, डुक्करसरी, बैलघाट, गाढवघाट, नागसरी अनेक वाटा-घाटवाटाही प्राणीनामधारी आहेत. या सर्व प्राणीनाममहिमेत वासोटा किल्ल्याचं मुळ नांव ‘व्याघ्रगड’ आणि लोहगडाची देखणी ‘विंचूकाटा’ माची कशी बरं विसरावी.
नासिकच्या बागलाण म्हणजेच सटाणा भागातील काही डोंगर-किल्ल्यांची नावं कोठ्या, तांबोळा, न्हावी, गवळी, गौळणी, लोहारा, सोनारा, कुंभारा, कुणब्या, सुतारा असे मुख्यतः बलुतेदार जातींनी संबोधली जातात. बामन नावाचाही एक डोंगर आहे. मोठा प्रश्न उभा राहतो की हे असं ‘नामकरण’ कसं बरं झालं असेल! खरं तर हा अभ्यासाचा भाग आहे पण ऐकताना मोठी गम्मत वाटते. बरं एवढ्यावरच नाही तर याच भागातील सेलबारी रांगेतील ‘मांगी-तुंगी’ हा प्रसिद्ध पर्वत आधी ‘मांग आणि तेली’ म्हणजे जातींवरूनच ओळखला जात असे. उर्वरीत सह्याद्रीतही चांभारगड (महाड, जि. रायगड), कासारगड (शृंगारतळी, जि. रत्नागिरी) असे काही किल्ले आहेत.
आता पुढील नावं बघा. हातगड, शिरगाव, दातेगड, सुतोंडा, मानगड, नानाचा अंगठा, कोथळा, मदगड, लहूगड. आकाराने जरी प्रत्यक्ष शारीरिक अंगासम दिसत नसले तरी हे गड मानवी शरीरांगाचे नावे लेवून उभे थाटले आहेत. ‘जीवधन’ हे जीव आणि ‘मढे’ हे पार्थिव शरीराशी संबंधीत नांवही सह्याद्रीतल्या पर्वतरांगांतून जीवाशीवाचं नातं दर्शवितात. लिंगाणा किल्ल्याकडे येणार्या घाटवाटांत खानू, माणगावातून कोकणातील वारंगी गावात उतरणार्या वाटेला ‘बोचेघोळ’ असं म्हणतात. असं असभ्य नांव का पडलं असेल याचं उत्तर मिळवायचं असेल तर तिथे प्रत्यक्षच जावं लागतं. मग उत्तर अपोआपच मिळतं. ही वाट इतकी तीव्र आहे की, अनेक ठिकाणी बसत-उठत, पार्श्वभाग टेकवून घसरत घसरत खाली उतरावं लागतं!
‘सूरगड’ ह्या नावातून कुणाला सुरेल गळ्यातला सुर ऐकू येतो तर कुणाला पाण्यात मारलेला सूर दिसतो. सदानंदगड, संतोष, मनसंतोष, मनोहर, हर्षगड ही नावं समोर येताच मूड कसा फ्रेश-आनंदी होऊन जातो आणि गंभीरगडाचं नावं ऐकताच मनःस्थिति स्थिर-धीर होते. गुणी माणसाप्रमाणे सज्जनगड, गुणवंतगड, यशवंतगड, सरसगड, भूषणगड ही नामं स्वभावदर्शक आहेत. तर मदन, बळवंत, विशाळ, वैराट, इरसाल, रांगणा, प्रबळ ही नावं एखाद्या रांगड्या, पिळदार गड्यागत देखणी भासतात. प्रतापगड, फत्तेदुर्ग, विजयदुर्ग, जयगड ही नावं रणांगण जेत्याचे पुरुषार्थदर्शक नामं आहेत.
काही किल्ल्यांचे नामकरण करताना रंगांचाही वापर केलेला आढळतो. काळा किल्ला (धारावी, मुंबई), पांढरा डोंगर (कळसूबाई परिसर), ढवळागड (पुणे) अशी फक्त कृष्णधवलच नाही तर ‘चंदेरी’ आणि ‘सुवर्णदुर्ग’ असे दर्जाचे शाही रंगही वापरलेले दिसतात.
लोहगड, वज्रगड, पितळखोरे अशी काही नावं धातूवरून पडलेली असली तरी डोळ्यांसमोर मौल्यवान धातू अन् रत्नांचे चित्र उभे करणारे सुवर्णदुर्ग, सोनगड, रुपगड, माणिकगड, माणिकपुंज, कांचन, रत्नदुर्ग, रतनगड, हिराकोट ही काही श्रीमंत दुर्गनामं.
पाचवा (पाच्या), आठवा, सोळावा असे अंकीय नामदार डोंगर नाशिकच्या अंजनेरी परिसरात आहेत. या व्यतिरिक्त चौगाव किल्ला, विसापूर, विसागड हे देखील वीस ही संख्या दर्शवितात. तर तिकोना, प्रचंड, विशाल ही नावं गडांचे आकार आणि विस्तारदर्शक आहेत.
कुणी विचारलं की तु सिंगापूर पाहिलं आहे का? आणि तुम्ही सिंगापूर नामक परदेशात गेलेले नसाल तर तुमच्याकडे सांगायला रायगड परिसरातील एक ठिकाण आहे. लिंगाण्याकडेच कोकणातील दापोलीपासून ते देशावरील ‘सिंगापूर’ नामक गावात जाण्यासाठीची ‘सिंगापूर नाळ’ आजही वापरात आहे. सिंगापूरसारखं ‘अजमेर’ या बागलाणातील किल्ल्याबाबतही म्हणता येईल.
नासिक जिल्ह्याच्या सातमाळा रांगेत काही गड-डोंगर अनोखी नावं घेऊन उभी आहेत. अचला किल्ला सर्वश्रृत आहे. अचला लगतच त्रिकोणाकार उंच असा ‘तौला’ नावाचा डोंगर आहे. ‘अचला’ म्हणजे स्थिर, अविचल तर ‘तौला’ म्हणजे हलणारा, दोलायमान असे ढोबळमानाने या नावांमागचे अर्थ. लोणावळा नजीक अंबा खोर्याजवळ घनगड आणि कोराईगड असे दोन दुर्ग एकमेकांजवळ उभे आहेत. ‘घन’ म्हणजे भरीव तर ‘कोराई’ म्हणजे पोकळ असे वरवरचे अर्थ निघतात. मग प्रश्न पडतो ना, की अशी नावं कुणी अन् कुठल्या उद्देशाने ठेवली असतील बरं? असाच विरोधाभासी दुर्गनामविचार केला तर सह्याद्रीत सुंदरगड आहे आणि विचित्रगडही आहे. तसंच पूर्णगड आहे आणि निमगिरीही पण आहे.
नावांची खरी गम्मत तर सुळके आणि कातळभिंतीच्या नावांमध्ये दिसून येते. ‘लिंगी’ नावाने तर अनेक सुळके आहेत. त्यातही आवळ्याची लिंगी, वानरलिंगी, काकडमळा लिंगी, चंदेरी लिंगी, माहुली लिंगी, धावड्याची लिंगी, सिध्दाची लिंगी वगैरे. वानरटोक, माकडकडा, नागनाथ, नागफणी, शिंगरोबा आदी प्राणीनामक सुळकेही आढळतात. नवरा, नवरी, नवर्याची करवली, नवरीची करवली, सासू, सासरा, भटोबा, वर्हाडी आणि वाजंत्री ही नावं कुठल्या लग्नसमारंभातली नाहीत! तर ही आहेत सह्य सुळक्यांची नावं. नवरा-नवरी हे नांव तर सह्याद्रीत अनेक ठिकाणी आढळतं. याव्यतिरिक्त नातेसंबंधांची काही नावं जसं आजोबा, सून, दीर-भावजय आदी आपल्याला आश्चर्यचकित करतात. ब्रम्हा, विष्णू, शंकर, नंदी, पार्वती, गणेश, कार्तिक, सीतेचा पाळणा, महालक्ष्मी अशी देवनामं ऐकताच सह्याद्रीच्या गगनचुंबी सुळक्यांना नमस्कार करावंसा वाटतो. शेंडी आणि बुधा किंवा बुधला हे नावदेखील सर्वत्र आहे. अंकाई किल्ल्याजवळील ‘हडबीची शेंडी’ हे नाव मात्र काहीसं वेगळंच वाटतं. जीभेसारखा चपटा उठावलेला सुळका ‘जीभली’ नावाने ओळखतात.
ब्रह्मगिरी उर्फ त्र्यंबकगडाला लागून असलेले ‘कोथळा मोधळा’ नामक सुळके तर आता ‘संडे’ नावाने ओळखले जाऊ लागले आहेत. कारण, काय तर कुणीतरी रविवारी आरोहण करून हे सुळके सर केले म्हणून! असंच आता साबणाची वडी, गुळाची ढेप, पेन, सिलिंडर, फर्स्ट स्टेप, पॉन, हॉटडॉग, रॉकेट, ड्यूक्स नोज, खडा पारशी ही अलिकडच्या काळातील काही ‘संदर्भहीन’ नावंही आता प्रचलित होऊ घातली आहेत. खरं तर सह्याद्रीतली मुळनावं जपण्यासाठी आरोहकांनी आग्रही असणं गरजेचं आहे. अशीच स्कॉटीश, फंट्या, पार्सिक ही इंग्रजी नावंही गाजलेली आहेत. वज्र, त्रिशूळ, बाण, अग्निबाण नामक सुळके आरोहकांना कायमच आव्हान देत असतात. तर भंडार, घागर, कलश, रांजण अशी नावं ऐकली तर साठवणूकीच्या साधनांनुसार संबोधनं मिळालेली दिसतात.
सक्करलाना, बनीशाह दुर्ग, बक्षींदाबक्ष, नौरसतारा, अजिमतारा, फत्तेहुल्गैब, किली-द-फतेह, इस्लामगड, सुल्तानगड आणि औरंगगड ही नावं आपल्याला ठावूक आहेत काय? ही नावं आहेत अनुक्रमे खेळणा, पन्हाळा, सिंहगड, परळी, सातारा, तोरणा, वर्धनगड, रायगड, साल्हेर आणि मुल्हेर किल्ल्यांची. ही नावं बदलली खुद्द बादशाह औरंगजेबाने. परंतु मोगलाई आणि औरंगजेबाबरोबरच ही नावंही लयास गेली. सह्याद्रीत मराठ्यांनी मोगलांना थारा दिला नाही आणि बादशाहने केलेलं नामकरणही स्विकारलं नाही. याउलट स्वतः शिवाजी महाराजांच्या मुखातून निघालेली गडकिल्ल्यांची नामावली मात्र आजही प्रत्येकाच्या हृदयात अन् वापरातही आहेत. प्रचलित असलेल्या ह्या दुर्गनामांचा वेगळा उल्लेख करण्याची गरज नाही.
सह्याद्रीतल्या नामावलीचा उलगडा करत फिरत असताना जर समाधानकारक उत्तरं नाही मिळाली तर थेट शेक्सपियर आठवतो. ‘What is in a name, that which we cannot use. By any other name, the rose would smell as sweet.’ मग आपण पटकन म्हणतो, ‘अरे छोडो… नाम मे क्या रखा है?’
No comments:
Post a Comment