भैरव हे जनमानसात रुळलेले शिवाचे एक रूप. सामान्य जनमानसात लोकप्रिय असलेल्या या देवतेची केवळ मंदीरे बांधून पूजा केली गेली नाही तर अनेक डोंगरांना व किल्ल्यांना या देवतेचे नाव दिले गेले आणि याचमुळे आपल्याला महाराष्ट्रात भैरवगड नावाचे एक दोन नव्हे तर तब्बल सहा दुर्ग आढळतात. एक आहे माळशेज घाटातील डाईकवर उभारलेला भैरवगड उर्फ सारंगगड्,दुसरा हरिश्चंद्र-रतनगड परिसरातील आंबितजवळचा भैरवगड, तिसरा कोयनेच्या जंगलाची वन्यभ्रमंती घडवून आणणारा भैरवगड आणि चौथा या सर्वांच्या तुलनेत अप्रसिध्द आणि अगदी अस्सल दुर्गभटक्यांनाही अपरिचीत असणारा कणकवली घाटाजवळचा भैरवगड.याशिवाय विदर्भातील वारी भैरवगड आणि ठाणे जिल्हयात उत्तर कोकणातील भैरवगड आहे.
आज याच उपेक्षित दुर्गाची आपण ओळख करुन घेणार आहोत.
आज याच उपेक्षित दुर्गाची आपण ओळख करुन घेणार आहोत.
आधीच अप्रसिध्द असणार्या या गडावर जाणेही तितके सोपे नाही. नरडवे हे या किल्ल्याजवळील मोठे गाव असल्याने हा नरडवेचा भैरवगड म्हणुन ओळखला जात असला तरी गडावर जाण्याच्या वाटा दिगवळे रांजणवाडी आणि नरडवे भेर्देवाडी येथुन आहेत. कणकवली बस स्थानकातून दिगवळे रांजणवाडी येथे जाण्यासाठी बसची फारशी सोय नसल्याने नरडवे भेर्देवाडी येथुन गडावर जाणे व रांजणवाडी येथे उतरणे जास्त सोयीचे आहे. कणकवली ते नरडवे अंतर २६ कि.मी.असुन भेर्देवाडी तेथुन ३ कि.मी.अंतरावर आहे. रांजणवाडीत दिवसभरात ४ एस.टी बस येतात अन्यथा खाजगी रिक्षाने कनेडी गाव व तेथुन कणकवलीला जाता येते. राजंणवाडी गडाच्या उत्तर बाजुला असून भेर्देवाडी गडाच्या दक्षिण बाजुला आहे. उत्तर पायथ्याच्या राजंणवाडीमुळे याला 'राजंणगड' असे म्हणले जात असले तरी भैरवगड हेच जास्त प्रचलित नाव आहे.
गडाच्या दोन्ही बाजूने चढणार्या वाटांची आपण माहिती घेउया.सर्वप्रथम दक्षिणेच्या भेर्देवाडीच्या वाटेची माहिती घेउया. भेर्देवाडी गावात शिरण्याआधी मुख्य रस्त्याला लागुनच डावीकडे एक पायवाट गडाच्या डोंगरावर जाते. गावकऱ्यांचे गडावरील भैरवनाथ मंदिरात सतत ये-जा असल्याने वाट चांगलीच मळलेली असुन कोठेही चुकण्याची शक्यता नाही. शिवाय लाकुड गोळा करण्यासाठी आलेल्या आणि गुरे चारणार्या गावकर्यांची वर्दळ अस्ल्याने वाट चुकण्याची शक्यता नाही.
गडाची सोंड वगळता संपुर्ण वाटेवर जंगल असल्याने फारसे उनही जाणवत नाही. गडावरील पाण्याचे ठिकाण सहजपणे सापडत नसल्याने पुरेसे पाणी सोबत घेऊनच चढाईला सुरवात करावी. पायथ्यापासुन साधारण तासाभरात आपण गडाच्या सोंडेवर पोहोचतो.
या वाटेवर काही ठिकाणी लोखंडी कठडे बांधले आहेत. सोंडेवरून गडासमोरच्या माचीवर पोहोचण्यास २० मिनीटे लागतात पण हा चढ चांगलाच थकवतो. वाटेच्या शेवटच्या टप्प्यात दगडी पायऱ्या बांधलेल्या असुन सुरक्षेसाठी लोखंडी कठडे उभारले आहेत.
गडासमोरील माचीवर थोडीफार सपाटी असुन या ठिकाणी एखादी चौकी असावी. माचीवरून सोनगड व गड नदीचे संपुर्ण पात्र नजरेस पडते. समुद्रसपाटीपासुन २१६० फुट उंचावर असलेला गडाचा डोंगर दक्षिणोत्तर पसरलेला असुन सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून सुटावलेला हा डोंगर एका लहान डोंगरधारेने सह्याद्रीशी जोडला गेला आहे. गडाचा परीसर ६-७ एकरमध्ये सामावलेला असावा. माचीवरून पाच मिनिटे चालत पुढे गेल्यावर आपण गडाच्या उध्वस्त तटबंदीत पोहोचतो.
गडाला माचीपासुन वेगळे करण्यासाठी तटाबाहेर खंदक खोदलेला असुन तटबंदीचे दगड या खंदकात कोसळलेले आहेत. या तटबंदीत एक बुरुज असुन बुरुजाच्या मध्यभागी असलेला तोफेचा चौथरा व बुरुजातील मारगीरीच्या जंग्या पहायला मिळतात. या ठिकाणी गडाचा दरवाजा असावा पण सध्या त्याचे कोणतेही अवशेष दिसुन येत नाही.
येथुन पुढे जाताना वाटेच्या डाव्या बाजुस असलेल्या उंचवट्यावर चौथऱ्याचे अवशेष दिसुन येतात. चौथऱ्याच्या पुढील भागात सपाटीवर काही घराचे अवशेष आहेत.
येथुन पुढे आपण गडावरील मुख्य वास्तु असलेल्या भैरवनाथाच्या मंदिरात पोहोचतो. जुन्या मंदिराच्या पायावर नव्याने उभारलेल्या या मंदिराची मुळ रचना कायम ठेवण्यात आली असुन त्यावर चौखापी कौलारू छप्पर आहे.
मंदिरात लाकडी गाभारा असुन त्यात तीन देवता तांदळा स्वरुपात विराजमान आहेत. मंदिराबाहेर एका चौथऱ्यावर जांभ्या दगडात बांधलेली १२ फुट उंचीची दीपमाळ असुन ४ फुट लांबीच्या २ तोफा स्टीलच्या गाड्यावर ठेवलेल्या आहेत.
दिपमाळेच्या चौथऱ्यावर दगडी वृंदावन व काही कोरीव अवशेष ठेवलेले आहेत.
दीपमाळेच्या बाजुला अर्धा फुटाहून जास्त व्यासाचा वाटोळा दगड असून तो बारा माणसांनी एक बोट लावले तर उचलला जातो. मंदिरात जेवणासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी मोठ्या प्रमाणात असुन गडावर मुक्काम करण्यासाठी हे सुंदर ठिकाण आहे. पाण्याची सोय मात्र थोडी अडचणीची आहे. गडावरचा हा भैरव इथल्या पंचक्रोशीत प्रसिध्द आहे.फेब्रुवारी-मार्च मध्ये ईथे जत्रा भरते.त्यावेळी इथे गावकरी जमतात.याला स्थानिक लोक 'जय भैरी ब्राम्हणदेव' म्हणतात.जत्रेच्या दिवशी अवसर स्वारी इथे देवभेट घेते.यावेळी देवाला बळी दिला जातो. मंदिरात जेवण बनवता यावे यासाठी भांडी ठेवली आहेत.कदम नावाचे लोक येथील गडकरी असून त्यांची गड पायथ्याला वस्ती आहे.मंदिराजवळ असलेल्या औदुंबराच्या झाडाखाली बसून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बराचसा उत्तर भाग दृष्टीस पडतो.
मंदिराच्या मागील बाजुस खाली उतरत जाणाऱ्या वाटेवर पाण्याचे टाके असुन या टाक्यात मार्च महिन्यापर्यंत पाणी असते. भैरवनाथाचे दर्शन घेऊन आपण आपल्या पुढील गडफेरीस सुरवात करायची.
दिपमाळेच्या पुढील भागात एक उध्वस्त चौथरा असुन या चौथऱ्यावर लहान हनुमान मुर्ती आहे. हि मुर्ती अलीकडील काळातील असावी. मंदिराकडील वाटेने पुढे निघाल्यावर डावीकडे झाडीत एक मोठा चौथरा व उध्वस्त बांधकाम पहायला मिळते. या ठिकाणी किल्लेदाराचा वाडा अथवा गडाची सदर असावी. येथुन वाटेतील २-३ उध्वस्त चौथरे पहात पुढे गेल्यावर आपण गडाच्या उत्तर दिशेला असलेल्या उध्वस्त तटबंदीजवळ पोहोचतो. या ठिकाणी एक मोठा बुरुज असुन त्यावर मोठमोठी झाडे वाढलेली आहेत. या ठिकाणी कधीकाळी दरवाजा असल्याच्या खुणा ठळकपणे जाणवतात.
पायऱ्यांची हि वाट तटबंदीला वळसा घालत खाली असलेल्या सोंडेवर उतरत जाते. हि सोंड सह्याद्रीच्या डोंगररांगाना भिडली आहे. या ठिकाणी आपली एक तासाची गडफेरी पुर्ण होते. येथुन आल्यामार्गे परत फिरावे
गडावरुन नैऋत्येला सोनगड त्याच्या कातळमाथ्यामुळे आणि त्यावर असणार्या असिताष्म स्तंभामुळे सहज ओळखता येतो. पायथ्याची नरडवे,दिगवळे हि गाव दिसतात.गड नदीचे पात्र हि सुंदर दिसते.
भेर्देवाडीच्या वाटेप्रमाणेच राजंणवाडीतून चढणारी वाटही निसर्गरम्य आहे.दिगवळे गावानंतर राजंणवाडी येते.गावातून एखादा वाटाड्या घेतल्यास तो गर्द जंगलाच्या वाटेवरील वन्यखुणा दाखवू शकतो.
या वाटेच्या तळातील भागात १००-१५० सिमेंटच्या पायऱ्या बांधलेल्या आहेत. जंगली प्राण्यांच्या पाउलखुणा आणि झाडावर अंग घासलेल्या जागा बघत आपण गड केव्हा चढून येतो हे समजत नाही.या गडाच्या आसपासचा घनदाट जंगल पाहता हा केवळ गिरीदुर्गच नाही तर वनदुर्ग देखील आहे.अर्धी चढण चढून आल्यावर खडकाळ परिसर लागतो.इथे एका खडकावर वाघाशी साम्य असलेले पांढर्या रंगातील चित्र दिसते.गावकरी याला 'वाघचित्र' असेच म्हणतात.यानंतर अरुंद पाउलवाटेने वर चढायचे.वाटेत मार्गेश्वराचे स्थान लागते.ईथे झाडाचे पान अथवा फुल अर्पण करायचे अशी प्रथा आहे.योग्य मोसमात आल्यास वाटेत असणार्या रान आवळ्याची मजा घेत आपण साधारण दीड ते दोन तासात गडमाथ्यावर पोहचतो. गडावरच्या मंदिरापाशी जाण्याआधी वाघिणीचे पाणी नावाचा वर्षभर वहाणारा झरा दिसतो.हा जंगलातील प्राण्यांचा पाणवठा आहे.इथले पाणी थंडगार आहे,मात्र हे पाणी अस्वच्छ असल्याने गाळून घेणे योग्य होईल.अशाप्रकारे आपण गडमाथ्यावर पोहचतो.
या गडाची उभारणी नेमकी कधी झाली हे आज तरी अज्ञात आहे.बहुधा कोकणातून होणार्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी चालुक्य किंवा शिलाहार राजवटीत गडांची उभारणी झाली असावी. या परिसरातून घोटगे,वर्हाडाची पाज आणि भैरवगड अशा तीन घाटवाटा देशावर चढतात. शिवकाळात या गडाचा उल्लेख येत नाही.फोंड सावंत (१७०९-३८ ) हा किल्ला बांधल्याचे सांगीतले जाते पण त्याला कागदोपत्री आधार नाही. आलमगिरी वावटळीनंतर मराठा साम्राज्याचे दोन भाग झाले.यात करवीर संस्थानात या भैरवगडाचा समावेश होत होता. करवीरकर व सावंतवाडीकर यांच्या सततच्या कुरबुरीत सावंत नेहमी भैरवगड व सोनगड या किल्ल्यास उपद्रव करत पण एप्रिल १७८२ मध्ये रांगण्याचा वेढा उठवल्यावर सावंतानी या किल्ल्यास उपद्रव होणार नाही असे वचन दिले. सन १८२२ मध्ये सोनगड व भैरवगड या किल्ल्यांचा तनख्याचा निकाल ब्रिटीश सरकारने करवीरकरांच्या बाजूने दिला. इ.स.१८४२ आबाजी सदाशिव गडाचे सबनीस तर मुंजाजी जाधव यांची किल्लेदार म्हणुन नेमणुक होती. यानंतरच्या काळात गडाची कोठेही नोंद दिसुन येत नाही. इ.स. १८५० मध्ये सोनगड उर्फ नरसिंहगडाचा उल्लेख मिळतो परंतु भैरवगडाचा उल्लेख येत नाही. सन १८६२च्या पहाणीत या गडावरील सर्व अवशेष नष्ट झाल्याचे नोंदले आहे म्हणजे १८४४ मधील करवीर मधील गडकऱ्यांच्या उठावात इंग्रजांनी बहुदा या किल्ल्यावरील वास्तुची तोडफोड केली असावी.
एकंदरीत या गडाचे आडवाटेवरचे स्थान बघता फक्त भैरवगड पहायला येण्यापेक्षा भैरवगड पाहून सोनगड तिथून वेळ असल्यास घोटग्याच्या वाटेने देशावर जाउन सिध्दाचा डोंगर पाहून पुढे रांगणा व शक्य असल्यास त्याला जोडून मनोहर-मनसंतोषगड पहाता येतील.
भैरवगड माहिती संपर्क 098218 49823
स्थानिक संपर्क क्रमांक- 9422636858
संदर्भग्रंथः-
१) गड्,किल्ले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील- सतिश अक्कलकोट
२) www.durgbharari.com हि वेबसाईट
३) डोंगरयात्रा-आनंद पाळंदे
४) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
१) गड्,किल्ले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील- सतिश अक्कलकोट
२) www.durgbharari.com हि वेबसाईट
३) डोंगरयात्रा-आनंद पाळंदे
४) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : सिंधुदुर्ग
उंची : २१६० फुट
श्रेणी : मध्यम
































No comments:
Post a Comment