सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर वसलेले आंबोली हे थंड हवेचे ठिकाण पर्यटकांना सूपरीचित आहे. महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणले जाणारे आंबोली पूर्वीपासुनच सावंतवाडी संस्थानाचे थंड हवेचे ठिकाण होते. या आंबोलीतील "कावळेसाद" पॉंईंट्च्या विरुध्द बाजूस नारायणगड हा किल्ला आहे. पूर्वीच्या काळी कोकणातील मालवण, वेंगुर्ला, रेडी इत्यादी बंदरात उतरणारा माल विविध घाटमार्गांनी घाटामाथ्यांवरील बाजारपेठात जात असे. यापैकी पारपोली घाटवर लक्ष ठेवण्यासाठी नारायणगड हा किल्ला बांधण्यात आला.

सह्याद्रीतील निसर्गसौंदर्य न्याहाळण्यासाठी येथे काही ठिकाणे असुन त्यापैकी एक ठिकाण म्हणजे कावळेसाद पॉंईंट. आंबोली हे थंड हवेचे ठिकाण मुंबईपासून कोल्हापुरमार्गे ५०६ कि.मी.वर तर सावंतवाडी पासुन ३२ कि.मी अंतरावर आहे. मुंबई पासून सावंतवाडी ५२१ किमीवर आहे. सावंतवाडीहून एसटीने आंबोलीला जाता येते. आंबोली पासून गेळे हे नारायण गडाच्या पायथ्याचे गाव ७ किमी अंतरावर आहे. गेळे गावात जाण्यासाठी आंबोली - बेळगाव रस्त्यावर आंबोली पासून ५.५ किमीवरील (आजरा फाट्याच्या अगोदर १ किमीवर) "कावळेसाद" पॉंईंट आणि गेळे गावाच्या फाट्या पर्यंत जावे. येथे डाव्या हाताला वळून येथून पुढे गेल्यावर २ रस्ते फूटतात. उजवीकडचा रस्ता "कावळेसाद" पॉंईंटला तर डावीकडचा रस्ता गेळे गावात जातो.
या कावळेसाद पॉंईंटला अनेक पर्यटक भेट देतात पण याच्या विरुध्द बाजूस असलेल्या नारायणगडकडे मात्र कोणाची पावले वळत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे नारायणगडच्या परीसरातील लोकांना या किल्ल्याबद्दल काहीच माहिती नाही. इतकेच नव्हे तर किल्ल्याजवळ असलेल्या गेळे गावात काही जुनी माणसे वगळता तरुण वर्गाला देखील या किल्ल्याबद्दल माहिती नाही.
गेळे गावातील रवळनाथ मंदिरापर्यंत गाडी जाते. गावात मुक्काम करायचा झाल्यास या मंदिरात मुक्काम करता येईल. गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने पुरेसे पाणी सोबत घेऊनच गडावर निघावे.गडाकडे जाण्याच्या मार्गावर असंख्य ढोरवाटा असल्याने तसेच किल्ल्याचे अवशेष झाडीत लुप्त झाल्याने गडावर जाण्यासाठी वाटाड्या सोबत असणे आवश्यकच आहे. गेळे गावातील मंदिरा पर्यंत गाडी जाते. पुढे सिमेंटच्या रस्त्याने चालत गेल्यावर उजव्या बाजूस शेतात पायवट शिरलेली दिसते. या पायवाटेने गडावर जाता येते.
नारायणगड गड एका खिंडीमुळे सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून वेगळा झालेले आहे. कावळेसाद कडून डावीकडच्या डोंगररांगेतील तिसऱ्या डोंगराचे टोक म्हणजे नारायणगडआंबोली घाटाच्या परीसरात असल्यामुळे पावसाळ्याचे ४ महीने सोडून वर्षभर गडावर जाता येते.

नारायण गडाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे गेळे गावातून गडावर जातांना फारसा चढ नाही आहे. तर वाट चक्क सरळसोट व काही ठिकाणी उतार असलेली आहे. माणसांचा या भागात वावर नसल्यामुळे वाटेत व आजूबाजूला घनदाट अरण्य आहे. त्यामुळे नशिबात असेल तर वन्यप्राणी दर्शन देऊ शकतात. आंबोलीला येणार्या आणि वेगळे काही पाहू इच्छीणार्यांसाठी हा २ तासांचा सुंदर ट्रेक आहे.
रवळनाथ मंदिराच्या मागील बाजुस असलेली घरांची वाट संपल्यावर उजव्या बाजुस वळणाऱ्या पायवाटेने गडावर जाता येते.
या वाटेवर बिबट्या, वाघ, गवा, तरस, साळींदर, अस्वल, रानडुक्कर अश्या अनेक प्राण्यांच्या पायाचे थोडे ताजे-ताजे ठसे बघायला मिळू शकतात.वाटेवर असणार्या जंगलात तमालपत्र,शिकेकाई आणि अनेक औषधी वनस्पती बघायला मिळतात. या जंगलात असलेल्या गेळेझाडाच्या फळावरून गेळे हे नाव गेळेगावाला पडले असे स्थानिक लोक सांगतात.या वाटेवर एका ठिकाणी उजवीकडे काही अंतरावर खडकात खोदलेले पाण्याचे टाके असुन त्यात वर्षभर पिण्याचे पाणी असते पण ते टाके पायवाटेवरून नजरेस पडत नाही.
वाटेच्या पुढील भागात डावीकडे शंकराचे उध्वस्त मंदीर असुन या मंदिराच्या अवशेषात एक शिवलिंग व समोर एक नंदी असुन शिवलिंगाशेजारी दोन घडीव मुर्ती व काही तांदळा पहायला मिळतात. स्थानिक लोक या स्थानाला लिंगी म्हणतात. येथुन पुढे जाणारी वाट दाट झाडीतुन जाते.फॉरेस्ट खात्यातर्फे इथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवून कोणी प्राण्यांची शिकार करतात
का यावर नजर ठेवली जाते आणि कोणकोणते प्राणी या जंगलात आहेत ते यावरूनच समजते.
या झाडीत डाव्या बाजुस काही घडीव मुर्ती असुन स्थानिक या जागेला म्हार्ताळ म्हणुन ओळखतात. मंदिराची पूर्ण
पडझड झाली आहे फक्त मुर्त्या तेवढया शाबूत आहेत.इथे पितळेच्या घंटा बांधलेल्या आहेत
यावरून असे समजले की गावातील मंडळी इथे येत असावीत.स्थानिक वाटाड्या असल्या शिवाय य जागा सापडणे अशक्य आहे.येथुन पुढे एक उतार पार करत आपण नारायणगडच्या खिंडीत येतो. घनदाट जंगल पार करताना मधेच दरी आणि दरीतून दिसणारा कोकण भाग रमणीय दिसतो.नारायणगड सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून काहीसा वेगळा झाला असुन गेळे गावातून गडावर जातांना लहानमोठे चढउतार पार करत आपण नारायणगड व सह्याद्रीरांग यामधील खिंडीत पोहोचतो.
गडमाथ्यावर पोहचेपर्यंत या गडाचा इतिहास जाणून घेउया.सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून कोकणात उतरण्यासाठी अनेक घाटमार्ग असले तरी त्यातील आंबाघाट, बावडाघाट, फोंडाघाट व पारपोली घाट हे चार महत्वाचे घाटमार्ग होते. यातील पारपोली घाटांचे वैशिष्ट म्हणजे याच्या माथ्यावर महादेवगड व नारायणगड हे किल्ले आहेत तर पायथ्याशी मनोहर-मनसंतोषगड ही दुर्गजोडी आहे. कोकणातील बंदरात उतरणारा माल विविध घाटमार्गांनी घाटामाथ्यांवरील बाजारपेठात जात असे. यातील सावंतवाडी संस्थानाच्या हद्दीत असलेल्या पारपोली घाटावर लक्ष ठेवण्यासाठी सावंतवाडी संस्थानाचे अण्णासाहेब फोंडसावंत यांनी १७०९ ते १७३८ दरम्यान नारायणगड हा किल्ला बांधला. पारपोली घाटाचे संरक्षण व जकात वसूली केंद्र या किल्ल्यावर होते. इ.स. १७७२-७३ दरम्यान सावंतांचे कारभारी जिवाजी विश्राम यांनी महादेवगड व नारायणगड जिंकुन रांगणा देखील घेतला तेव्हा करवीर राणी जिजाबाई यांनी स्वतः स्वारी करत महादेवगड व नारायणगड हे किल्ले जिंकुन घेतले पण काही काळातच सावंताना परत केले. यानंतर जानेवारी १७८८ मध्ये करवीरकरांनी फितुरीने घेतलेला नारायणगड इ.स.१७९३ मध्ये सावंतांना परत केला. २० नोव्हेंबर १८०४ मधील एका पत्रानुसार करवीरकरांच्या ताब्यात असलेला नारायणगड सावंतानी हल्ला करून जिंकुन घेतला. इ.स. १८२८ मध्ये फोंडसावंत तांबुळकर यांनी सावंताविरुद्ध बंड करत गडाचा ताबा घेतला पण इंग्रजांची फौज सावंतांच्या मदतीस येताच त्यांनी पळ काढला. तेव्हा इंग्रजांनी करवीरकर छत्रपतींना पत्र लिहीले ,"बंडवाले तुमच्या इलाक्यात आले तर त्यास पकडावे आणि त्यांना पकडून देणार्यांना दोन हजार रुपये दिले जातील".इंग्रजांनी गड सावंतांच्या ताब्यात दिला. इ.स.१८३२ पर्यंत नांदता असलेला हा किल्ला नंतरच्या काळात सावंतांची आर्थिक परीस्थिती डळमळीत झाल्याने ओस पडला तो कायमचाच.
अर्थात सावंतांच्या रक्षणाची जबाबदारी इंग्रजांनी घेतल्यामुळे त्यांनाही हे गड सांभाळावे असे वाटले नाही.पुढे सन १८३० मध्ये इंग्रज सेनानी कर्नल मॉर्गन याने महादेवगड व नारायणगड जिंकून घेतले.
अर्थात सावंतांच्या रक्षणाची जबाबदारी इंग्रजांनी घेतल्यामुळे त्यांनाही हे गड सांभाळावे असे वाटले नाही.पुढे सन १८३० मध्ये इंग्रज सेनानी कर्नल मॉर्गन याने महादेवगड व नारायणगड जिंकून घेतले.
खिंडीतुन डाव्या बाजुचा चढ चढत पाच मिनिटात आपण गडावर प्रवेश करतो. किल्ल्याचा दरवाजा व त्या शेजारील तटबुरुज आज पुर्णपणे नष्ट झाले आहेत.
किल्ल्यावर प्रवेश केल्यावर समोरच एक दगडी ढोणी असुन या ढोणीच्या मागील बाजुस २-३ बांधकामाची जोती आहेत.
येथे असलेल्या उंच खडकावर चढल्यास संपुर्ण किल्ल्याचा परीसर नजरेस पडतो. किल्ल्यावर फारसे अवशेष नसले तरी असलेले सर्व अवशेष झाडी वाढल्याने त्यात लपले आहेत. किल्ल्यावर सातेरी देवीचे स्थान असुन येथील मुर्ती गावात नेण्यात आली आहे.
तिथे एका झाडाखाली काही घडीव दगड पडलेले आहे. याशिवाय गडावर कोरडा पडलेला एक साचपाण्याचा तलाव आहे. गडाच्या काही भागात ढासळलेली तटबंदी पहायला मिळते. गडावर जुन्या वास्तूंचे आणि दगडी वस्तूंचे अवशेष दिसतात. उदा.घराचा चौथरा,वाटणासाठी
वापरण्यात येणारा पाटा, इ. सध्या गडावर तसे बाकी काही पहाण्यासारखे नाही. गडाच्या काही भागात ढासळलेली तटबंदी पहायला
मिळते. दक्षिणोत्तर पसरलेल्या या किल्ल्याची समुद्रसपाटीपासुन उंची जवळपास २३३० फुट आहे.
नारायण गडाच्या बाजूला (उत्तरेला) ३ सुळके असलेला डोंगर दिसतो. याला स्थानिक लोक गंगोत्री लगिनवाडा म्हणतात. या सुळक्यांमधील मोठ्या दंडगोलाकार सुळक्याला म्हातारीचा गुंडा (दगड) म्हणतात. त्याहून लहान सुळक्यांना नवरा व नवरी म्हणतात. या ठिकाणी सांगितली जाणारी दंतकथा आणि सह्याद्रीच्या इतर भागात सांगितली जाणारी कथा यात विलक्षण साधर्म्य आहे.

दक्षिणोत्तर पसरलेल्या या किल्ल्याची समुद्रसपाटीपासुन उंची २३३० फुट आहे. गडावरून दुरवर पश्चिमेला असलेली मनोहर-मनसंतोष ही दुर्गजोडी, पुर्वेला कावळेसाद पॉंईंट व खाली लांबवर पसरलेला कोकण परीसर तसेच पारपोली घाट इतका दूरवरचा प्रदेश नजरेस पडतो. गडावर रहाण्याची सोय नाही. जेवणाची सोय आपण स्वत: करावी.गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.
गेळे गावातुन संपुर्ण किल्ला पाहुन परत येण्यास ३ तास पुरेसे होतात. आंबोलीतून एका दिवसात महादेवगड व नारायणगड हे २ किल्ले सहज पहाता येतात.
संदर्भः-१) रत्नागिरी जिल्हा गॅझेटीयर
२) महाराष्ट्र देशातील गड्,किल्ले-चिंतामण गोगटे
३) गड्,किल्ले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील- सतिश अक्कलकोट
४) www.trekshitiz.com हि वेबसाईट
५ ) www.durgbharari.in हि वेबसाईट
६ ) https://manchali3.blogspot.com हा ब्लॉग






















No comments:
Post a Comment