Saturday, February 13, 2021

मोरगिरी उर्फ गुणवंतगड

सिंधु सागराच्या तीरावर असणार्‍या डहाणु ( डहाणुका ),नालासोपारा ( शुर्पारक ),चौल्,महाड या बंदरातून परदेशी व्यापार चालायचा.या बंदरात आलेला माल देशावरच्या प्रमुख शहरात म्हणजे नाशिक (नासिक ),पैठण ( प्रतिष्ठान ) ,जुन्नर ( जीर्णनगर ) तेर (तगर ) या त्याकाळच्या शहरात सह्याद्रीतील घाटवाटांनी नेला जायचा, अशीच वहातुक चालायची दाभोळ ( दाभ्यलक) ते कराड ( करहाटक ) दरम्यान.आजच्या कुंभार्ली घाटातून हि वहातुक चालायची. पुढे या व्यापारी मार्गाचे संरक्षण करण्यासाठी दुर्ग उभारणी करण्यात आली.कोयनेच्या जंगलात एन सह्याद्रीच्या कण्यावर भैरवगड तर थोडे आत पाटणजवळ गुणवंतगड उर्फ मोरगिरी तर दातेगड उर्फ सुंदरगडाची उभारणी झाली. 

       पाटण या तालुक्याच्या पश्चिम - नैऋत्येला सुमारे दहा किलोमीटर अंतरावर गुणवंतगड बामणोलीच्या डोंगररांगेत भक्कमपणे उभा आहे. याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ८६२ मीटर असली तरी पायथ्यापासून फक्त २०० मीटर इतकी आहे. या गडाची उभारणी नेमकी कधी झाली ते समजत नाही.मात्र दातेगड व मोरगिरी या दोन्ही गडांच्या सभोवतालचा प्रदेशावर आदिलशाही सरदार पाटणकर ( मुळ नाव साळुंखे ) यांचे वर्चस्व होते.यांना सोळाव्या शतकात पाटणची जहागिरी मिळाली.शिवाजी महाराजांच्या ताब्यात सन १६५९-६० मध्ये आला,सन १६८० साली हे गड मराठ्यांच्या ताब्यात होते.संभाजी महाराज पकडले गेल्यानंतर सन १६८९ मध्ये दोन्ही गड मोघलांनी घेतले,राजारामचरित्राप्रमाणे रामचंद्रपंत अमात्य गुणवंतगडावर गेले आणि तेथील लोकांना पळवून गुणव्ंतगड ताब्यात घेतला. नंतर सुंदर्गड उर्फ दातेगड घेतला.हि घटना १४ सप्टेंबर ते ३० ऑक्टोबर १६८९ दरम्यान झाली.सन १६९३ मध्ये गड मराठ्यांच्या ताब्यात होता आणि चांदजी पाटणकरांना चौतीस गावांचा मोकासा देण्यात आला.पुढे अठराव्या शतकात या गडावर पेशव्यांची शिबंदी होती तर समोर दातेगडावर पंतप्रतिनिधींचे वर्चस्व होते. या दोन्ही गडावरचे किल्लेदार आणि पेशवे व प्रतिनिधींचे आपापसात पटत नसल्यामुळे विरुध्द्द पक्षाचा एखादा हुकुम आल्यास तो दुसरी बाजु मान्य करत नसे.सन १८१८ च्या अखेरच्या इंग्रज मराठे समरप्रसंगात कोणताही प्रतिकार न होता गुणवंतगड ब्रिटीशांच्या हातात पडला.

 या गडावर जायचे तर सोयीचे ठिकाण अर्थातच पाटण.या गावात आपली रहायची सोय होउ शकते. पाटणमधून पायथ्याच्या मोरगिरी गावाला जाण्यासाठी साधारण दर तासाला बस आहेत.शिवाय खाजगी जीपही आपल्याला घेउन जातात.  हे मोरगिरी गाव म्हणजे गगनगिरी महाराजांचे मुळ गाव.

      मोरगिरी गावच्या नागरी वस्तीच्या पाठी असलेल्या गुणवंतगडच्या चढणीस सुरूवात होते.  गुणवंतगडाला " मोरगिरीचा" किल्ला म्हणून संबोधण्यात येते, कारण यांच्या दक्षिण पायथ्याशी मोरगिरी नावाचे गाव आहे. मोरगिरी या गावातील नुतनीकरण केलेल्या ग्रामदैवताचे दर्शन घेऊन बाजूलाच अर्धवट मातीत गाडलेले तोफ पाहता येते. हि तोफ सध्या बाहेर काढून तिची व्यवस्था योग्य प्रकारे लावल्याचे समजते. 

वृक्षराईच्या शितल छायेत असलेली गावातील सुंदर घरे व त्यांच्या अंगणात असलेली मनमोहक फुलझाडे पाहत, मंदिराच्या शेजारील वाटेने किल्ल्याच्या चढणीकडे जावे लागते. किल्ल्याच्या एका बाजूस हे गाव आहे तर दुसऱ्या बाजूने कोयना नदीचा प्रवाह आहे. या किल्ल्यावर जाण्यासाठी वेड्यावाकड्या वळणाची पाऊलवाट असल्याचे दिसून येते. या गावात आंबा, फणस, जांबूळ इत्यादी वृक्षांची मांदियाळी असल्याने वातावरणात शितलता जाणवते. डोंगरात गवत चरण्यासाठी येण्या - जाणाऱ्या गुरांच्या वाटातून आपणांस योग्य ती वाट शोधावीच लागते अन्यथा उगाचच दमछाक खात्रीने होणार. अर्ध्या तासाच्या आतच आपण आपण गडमाथ्यावर येऊन पोहोचतो. साधारणतः प्रत्येक किल्ल्यास एखादे प्रवेशद्वार, त्याच्या शेजारी असणारे बुरूज हे दिसून येते, मात्र येथे यापैकी येथे काहीही नाही, मात्र कधीकाळी येथे असल्याचे पुरावे आढळतात.

 हा किल्ला म्हणजे एक अरूंद व थोडे निमुळता डोंगरमाथा होय. गडमाथा म्हणजे दोन टेकड्या आहेत. 

पूर्वेला काहीसा उंच भाग असून तेथे एका लोखंडी स्तंभावर भगवा ध्वज डौलाने फडकत असतो, ती पूर्वेकडील माची असावी. नैसर्गिक तटबंदी लाभल्याने माची प्रेक्षणीय आहे. 

याच माचीवर पुरातन इमारतीचे अवशेष असल्याचे दिसून येते. या माचीवरून पश्चिमेकडे जाताना किल्ल्याच्या सुमारे मध्यभागी मोठी कोरडी विहीर असून ती झुडपांनी वेढलेली आहे. पश्चिमेस असलेल्या बुरूजावर एका कोरड्या तळ्याचे दृश्य दिसते. गडमाथ्यावर एका पुरातन इमारतीचे जोते आढळून येते. 

 गडावर आपल्याला कॉलम्नर बेसाल्ट अर्थात स्तंभित बेसाल्ट प्रकारचा दगड पहायला मिळतो. हे अनोखे भुशास्त्रीय वैशिष्ट्य ईथे दिसते.गडाची तटबंदी अजून हि तशीच दिसते ,गडावर फिरत असताना त्यावेळच गडाच वैभव काय असेल याची कल्पना नक्कीच करता येते आणि त्यावेळचे वैभव डोळ्यासमोर उभे राहते.येथे बेभान वाहणारा वारा, समोरच दिसणारा या किल्ल्याचा भाऊ असलेला दातेगड तर मोरणा व कोयनेची विपुल निसर्गसंपती असलेला परिसर मनाला भुरळ पाडतो. मनशांती देणाऱ्या मोजक्या ठिकाणीपैकी हे एक निश्चितपणे व काहीशा अभिमानाने सांगता येईल. आजूनही गडाचे बुरुज चांगल्या स्थितीत आहेत. पावसाळा संपता संपता येथे आले तर गडावर मस्त गवत असते, बर्याच रंगांची छोटी-छोटी फुले असतात.

    सह्याद्रीतील किल्ल्यांचे हे उपेक्षित भावंड असेलही पण ते आपल्याशी नक्कीच काही तरी हितगुज करू इच्छित असणार. मग आपण कधी जाताय गुणवंतगड पाहायला? 

 संदर्भ :-

१) सातारा जिल्हा गॅझेटीयर

२) शोध शिवछत्रपतींच्या दुर्गांचा- सतिश अक्कलकोट

३) महाराष्ट्र देशातील किल्ले- चिंतामण गोगटे

४) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे

५) सांगाती सह्याद्रीचा-यंग झिंगारो ट्रेकर्स

६) श्रीकांत लवटे-पाटील यांचे लिखाण

७) फोटो साभार शिवसाहीत्य हि वेबसाईट

गुणवंतगड......एक छोटे खाणी किल्ला. यालाच मोरगिरी या नावाने सुद्धा ओळखले जाते. इ.स. १५२६च्या सुमारास गुणवंतगड परगण्याचे देशमुखी यांनी घेतला. चालुक्य राजकुलोत्पन्न सोरबाजी सावंत साळुंखे यांचे वंशज तुकोजीराव आणि रामराव या बंधुची सातारा व कोकणपट्टय़ातील भागाच्या बंदोबस्ताकरता विजापूर दरबाराच्या वतीने नेमणूक झाली होती.
विजापूरच्या कल्याण सुभ्याहून तुकोजीराव आपले बंधू रामराव यांच्यासमवेत ५ हजारांच्या फौजेसह स्वारीस निघाले. सर्वप्रथम ते साताराप्रांती आले आणि त्यांनी पाटण परगणा सर केला. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा रत्नागिरीकडे वळवला. या कामगिरीमुळे आदिलशहाने तुकोजीरावांनी जिंकलेला सर्व प्रदेश त्यांच्या तैनातीला नेमून दिला.
अठराव्या शतकांत या किल्ल्यावर आणि दातेगडावर पंतप्रतिनिधीचे लोक रहात असत व जेव्हा पेशव्यांच्या पक्षाकडील हुकूम सुटत तेव्हां त्यांच्या अंमलबजावणीस ते अडथळे निर्माण करीत. या जाचाला कंटाळून पेशव्यांनी या गडाचा ताबा घेतला व तेथे आपले ठाणे ठेवले. इ.स.१८१८च्या मराठा-इंग्रज युद्धात हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. किल्लावर अवशेष फार नाहीत पण त्याचे भौगोलिक महत्व आणि वेगळेपणा जपून किल्ला शेवटचा घटका मोजतोय.
 
 
 
ब्रम्हचैतन्य महाराज स्थापित प्रभू श्रीराम मंदिर 
 
दगडी भांड्याचे अवशेष...
 
वीरगळ आणि काही भग्न अवस्थेतील मूर्ती
 
 
 
प्रत्येक गडाची चढाई तिची वेगळी ओळख आणि अनुभव करून देत असते.
 
बालेकिल्ला आणि माची यांना वेगळा करणारा काताळातील मार्ग...
 
 
   उध्वस्त पायरी मार्ग..
गडावरील पूर्व माची...
 
 चुण्याचा टाकं
 
निरखून बघितल्यास कातळतील वेगळीच रचना या गडावर बगायला मिळते. उभ्या सरळ रेषेतील तासीव खुणा खास लक्ष वेधून घेतात.
 
 
बालेकिल्लावरील वाड्याचे अवशेष... 
 


ज्या दगड धोंड्याच्या जोरावर उभे स्वराज्य उदयास आले तेच दगड धोंडे कोण्या एकाच्या कल्पकतेने (राजे अक्षर रचना करून) साज रुपी दिसत आहेत.

समोर दिसणारा दातेगडाचा घेरा...
 
दगडाला दगड सोबती बनून अगदी शेवटचा श्वास मोजताना...
 

 
उध्वस्त वाड्याच्या पायाचे अवशेष...
 









 






















गडावर फिरताना नक्कीच गडाची ताकत जाणवते ... 

















No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...