जुन्नर शहर हे अतिप्राचिन शहर आहे. जुन्नानगर असा याचा उल्लेख आढळतो. धार्मिक, आर्थिक व राजकिय दृष्ट्या जुन्नर हे महत्वाचे ठाणे होते. जुन्नर प्राचिन महाराष्ट्राची राजधानी होती. हिन्दु, बुद्ध, जैन, प्रणालींशी निगडीत विविध प्राचीन कालिन संदर्भ व पुरातन अवशेष जुन्नर भोवती आढळतात. जुन्न्नरच्या भोवताली डोंगर आहेत. या डोंगरात सातवाहनकालीन बौद्ध धर्मातील थेरवाद (हीनयान) पंथीय लेणी आहेत. संख्येच्या दृष्टीने हा भारतातील सर्वांत मोठा लेणी–समूह आहे. जुन्नर हे ठिकाण पुण्यापासून ९० किमी. अंतरावर कुकडी नदीकिनारी वसले असून अवतीभोवती सुमारे आठ-दहा किमी. च्या परिघात मानमोडी, शिवनेरी, मांगणी, हाटकेश्वर, लेण्याद्री, दुधारे इ. टेकड्यांनी वेढलेले आहे. यांतील काही टेकड्यांत प्राचीन बौद्ध लेणी खोदली आहेत. अंदाजे ५७ विविध ठिकाणी असलेल्या लेण्यांमध्ये महत्वाचे चैत्यगृह आहेत, विहार आहेत. या लेण्यांचा संबंध बुद्ध, हिंदु व जैन धर्मांशी आहे. जुन्नर लेणीसमुहाचे खाली दाखविल्याप्रमाणे वर्गीकरण होते. १) तुळजा लेणी :- जुन्नरपासून ५ कि.मी. पश्चिमेला तुळजा डोंगरामध्ये २) मानमोडी डोंगर:- जुन्नर शहराच्या नैऋत्येला हा डोंगर पसरला आहे.या एकाच डोंगरावर तीन लेणीसमुह आहेत. अ) भीमाशंकर लेणी ब) अंबा-अंबिका लेणीसमुह क ) भुतलिंग लेणीसमुह ३) शिवनेरी- शिवनेरी गडाच्या दक्षिण्,पुर्व व पश्चिम बाजुला हा लेणीसमुह आहे. ४) लेण्याद्री- याच लेण्यांना गणेश लेणी असेही म्हणतात. जुन्नर शहराच्या उत्तरेला हा लेणीसमुह आहे.
इ.स.पुर्व १५० ते इसवी सन नंतर १५० वर्षे या कालावधित येथील लेणी बनविल्या
असाव्यात असे मानले जाते. जुन्नरच्या लेण्यांमध्ये ३६ शिलालेख आहेत.
मानमोडी लेण्यातील गिध लेण्यात (भीमाशंकर) लेण्यात एक महत्वाचा शिलालेख
आहे. महाक्षपत्र नहपान याचा मंत्री अयम वत्सगोत्री याने धर्मकृत्य केले असा
या लेखात उल्लेख आहे. नहापान राजाने भरुच वरुन येथे आक्रमण केले. त्याने
पुणे, जुन्नर, नाशिक भागावर कब्जा केला. शक क्षत्रपाचे राज्य फार काळ टिकले
नाही. गौतमीपुत्र सातकर्णी सातवाहनाने शक क्षत्रपाचा पराभव केला.
लेण्यांव्यतिरिक्त येथे विविध गडकिल्ले आहेत. 

निरनिराळ्या लेण्यांच्या कमानीत होत गेलेला बदल
जुन्नर येथील लेणी
समूहांना वेळोवेळी अनेक यात्रेकरूंनी भेटी दिल्या. यांमध्ये इंग्रज वैद्य
जॉन फ्रायर (सतराव्या शतकाचा उत्तरार्ध) व तत्कालीन मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड
एल्फिन्स्टन (१८१४) यांचा प्रामुख्याने नामनिर्देश करता येईल. या
लेण्यांचा अभ्यास जॉन विल्सन (१८५१), जेम्स बर्जेस (१८७४, १८७७ व १८८०),
विद्या दहेजिया (१९७२), सुरेश जाधव (१९८०, १९८२, १९८६, २०००), एस. नागराजू
(१९८१), म. के. ढवळीकर (१९८४), अ. प्र. जामखेडकर (२००२), शोभना गोखले
(२०१९) इ. पुरातत्त्वज्ञांनी केला. सुरेश जाधव यांनी जुन्नर परिसरातील सर्व
समूहांचा स्वतंत्रपणे एकत्रित, सखोल व विस्तृत अभ्यास करून १९८० साली आपला
पीएच. डी. प्रबंध सादर केला. जुन्नर लेणींचे साधारणतः नऊ समूह पाडता
येतात. यांमध्ये भीमाशंकर, अंबा-अंबिका व भूतलेणी हे मानमोडी टेकडीवर;
शिवनेरी पूर्व, शिवनेरी दक्षिण व शिवनेरी पश्चिम हे शिवनेरी किल्ला
असलेल्या टेकडीवर; तर गणेश लेणी व तिच्या पूर्वेकडील समूह हे दोन समूह
लेण्याद्री टेकडीवर खोदले आहेत. तुळजा लेणी हा स्वतंत्र समूह शिवनेरी
किल्ल्याच्या पलीकडे आहे. 
बिटिश लेखकांच्या मते जुन्नर भागात ५७ ठिकाणी लेणी आहेत. जुन्नर भोवताली
असलेल्या महत्वाच्या ५ लेणी समुहात, नैऋत्येकडे शिवनेरी, पश्चिमेकडे तुळजा,
दक्षिणेस मानमोडी, व उत्तरेकडे लेण्याद्री व सुलेमान लेणी आहेत. या सर्व
लेण्यांमध्ये मिळुन १० चैत्यगृह, १७४ विहार, ११६ पाण्याची टाकी व ३६
शिलालेख आहेत. शिवनेरी लेणी येथे ३, लेण्याद्री येथे २, मानमोडी येथे ३,
तुळजा येथे १ व गणेश पुर्व येथे १ चैत्यगृह आहेत. शिवनेरी लेणी येथे ७८,
लेण्याद्री येथे २८, मानमोडी येथे ४९, तुळजा येथे १२ व गणेश पुर्व येथे ७
विहार आहेत. शिवनेरी लेणी येथे ३, लेण्याद्री येथे ६, मानमोडी येथे २१,
शिलालेख आहेत. शिवनेरी लेणी येथे ६०, लेण्याद्री येथे १५, मानमोडी येथे ३८,
तुळजा येथे २ व गणेश पुर्व येथे १ पाण्याची टाकी आहेत. जुन्नर
भोवतालची लेणी कार्ले, भाजे, बेडसे, नाशिकजवळच्या पांडव लेण्यांच्या
तुलनेने कलेच्या व वैभवाच्या दृष्टीने कमी दर्जाची आहेत. मात्र लेण्यांच्या
स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने येथील लेणी महत्वाची आहेत. येथील काही लेणी
डोंगराच्या गाभ्यातील भेगेमुळे व त्रुटींमुळे अर्धवट कोरलेली आहेत. यामुळे
येथे लेण्याच्या कोरिवकामातील वेगवेगळे टप्पे पहावयास मिळतात. प्रदिर्घ
काळ येथे लेण्यांचे काम झाले असल्याने वेगवेगळ्या काळातील विविध शैली येथे
पहावयास मिळतात. येथील लेण्यांच्या कोरिव कामाचा काळ निश्चित पणे सांगणे
कठिण असले तरी अंदाजे इसविसन पुर्व १५० ते इसविसन नंतर १५० वर्षे या
कालावधित येथिल लेणी बनविल्या असाव्यात असे मानले जाते.
जुन्नर परिसरात एकूण १८४ लेणी खोदली आहेत. यांपैकी १० चैत्यगृह असून
उर्वरित विहार, मंडप व भिक्षुंसाठीच्या ध्यान-गुंफा आहेत. या सर्व
लेण्यांच्या परिसरात एकूण ११५ पाण्याची टाकी (पोढी) आहेत. यांशिवाय २५
अपूर्ण लेणी ज्यांना विशिष्ट आकार नाही, परंतु खोदण्याचा प्रयत्न केल्याचे
दिसते, अशी आहेत. जुन्नर येथील काही लेणी अपूर्ण असली तरी त्यांचा विशिष्ट
आकार व त्यांचे प्रयोजन याची कल्पना येते. अशाप्रकारे जुन्नर परिसरात एकूण
३२४ लेणी किंवा लयनस्थापत्याशी संबंधित खोदकाम केल्याचे आढळून येते.
अलीकडच्या काळात तुळजा लेणी समूहात काही अर्धवट बुजलेली लेणी प्रकाशात आली
आहेत. याशिवाय जुन्नर परिसरातील टेकड्यांत आणखी काही लेणी व पाण्याची टाकी
असण्याची शक्यता आहे. जुन्नर लेणींत एकूण ३७ शिलालेख कोरण्यात आले
आहेत. ते सर्व ब्राह्मी लिपीत असून त्यांची भाषा प्राकृत आहे. या लेखांत
प्रामुख्याने कोणी व कशासाठी दान दिले याचा उल्लेख आला आहे. शिलालेखांतील
समाविष्ट असलेल्या गोष्टींवरून तत्कालीन सामाजिक, आर्थिक, धार्मिक जीवनाचा
प्रत्यय येतो. तसेच इ. स. पहिल्या-दुसऱ्या शतकांत क्षत्रपांचा जुन्नरशी
आलेला संबंध कळून येतो. कार्ले व शिवनेरी दक्षिण येथील शिलालेखांच्या आधारे
ढवळीकरांनी जुन्नरचे प्राचीन नाव ‘धेनुकाकट’ असावे, असे सुचविले आहे.
सुमारे दहाव्या शतकात जुन्नरचे नाव ‘जीर्णनगर’ म्हणून प्रचलित असावे, असे
इ. स. ९६५ च्या एका ताम्रपटावरून लक्षात येते.
जुन्नर येथील
चैत्यगृहांचे साधारणपणे चार प्रकार सांगितले जातात. त्यांमध्ये १.
वर्तुळाकारमध्ये स्तूप व त्याच्या सभोवताली स्तंभ, २. गजपृष्ठाकृती छत व
चापाकार तलविन्यास, दर्शनी भागावर चैत्यगवाक्ष, आत मागील बाजूस स्तूप व
मागील व दोन्ही बाजूंस स्तंभांची रांग (गजपृष्ठाकृती छत अपूर्ण
राहिलेल्यांत स्तंभ येत नाहीत) ३. दर्शनी स्तंभ, आतील आलेख चौरस, मध्ये
स्तूप व सपाट छत, ४. यातही दर्शनी स्तंभ, आत काटकोनात मंडप किंवा सभागृह,
मागील बाजूस स्तूप व सपाट छत. ढवळीकरांनी सर्वसाधारणपणे चैत्यगृहांचा क्रम,
तुळजा लेणीतील लेणे क्र.३ (इ. स. पू. पहिले शतक), गणेश लेणीच्या
पूर्वेकडील चैत्यगृह (इ. स. ५०-७०), भूत लेणीतील लेणे क्र. ४० (इ. स.
८०-१००), गणेश लेणीतील लेणे क्र. ६ (इ. स. ११०), अंबा-अंबिका लेणीतील लेणे
क्र.२६ (इ. स. १२०), भीमाशंकर लेणीतील लेणे क्र. २ (इ. स. १४०), गणेश
लेणीतील लेणे क्र. १४ (इ. स. १५०), शिवनेरी पूर्व लेणीतील लेणे क्र.२ (इ.
स. १६०), शिवनेरी दक्षिण लेणीतील लेणे क्र. ५९ (इ. स. १७०) व शिवनेरी पूर्व
लेणीतील लेणे क्र. ४८ (इ. स. १८०) याप्रमाणे ठरविला आहे. इ. स.
पहिल्या शतकाच्या उत्तरार्धात जुन्नर येथे खोदण्यात आलेल्या
चैत्यगृहांबरोबरच चैत्यगृहस्थापत्य विकासाच्या नव्या टप्प्याचा प्रारंभ
झाल्याचे मानण्यात येते. हा नव्या प्रकारचा विकास मानमोडी येथील लेणे क्र.
२६ आणि गणेश लेणी येथील लेणे क्र. ६ या दोन चैत्यगृहांच्या स्वरूपात साकार
झाल्याचे दिसते. चैत्यगृहाचा सभामंडप आणि मुखभाग यांवरील तपशीलवार
बारीकसारीक कोरीवकाम मागे पडत जाणे आणि या टप्प्याच्या सुरुवातीला जरी
गजपृष्ठाकार छत असले तरीही हळूहळू टप्प्याच्या नंतरच्या अवस्थेत पूर्णपणे
नाहीसे होणे, ही या टप्प्यातील स्थापत्याची प्रमुख वैशिष्ट्ये सांगता
येतात. मानमोडी येथील लेणे क्र. २ च्या मुखभागावर चैत्यगवाक्षाद्वारे छत
सूचित केले असले, तरी प्रत्यक्ष छत मात्र पूर्णतः सरळ आणि सपाट आहे. हे
वैशिष्ट्य पारंपरिक तंत्रज्ञान मागे पडल्याचेच द्योतक आहे, असे अ. प्र.
जामखेडकर यांचे मत आहे. जुन्नर येथील विहारांचे मुख्यतः दोन प्रकार
सांगितले जातात. पहिल्यात प्रथम ओसरी, ओसरी स्तंभासह किंवा स्तंभरहित, एक
प्रवेशद्वार, क्वचित त्याच्या दोन्ही बाजूंस खिडक्या, आत चौरस मंडप,
मंडपाच्या मागील व बाजूंच्या भिंतींत भिक्षूंना झोपण्यासाठी खोल्या, त्यांत
काहीत दगडी बाकांची व्यवस्था, काहीत खोल्यांच्या समोर तिन्ही बाजूंस दगडी
बाक आणि सपाट छत. दुसरा प्रकार अगदी साधा आहे. त्यात प्रथम छोटीसी ओसरी,
प्रवेशद्वाराच्या आत चौरस मंडप, सपाट छत, क्वचित मागील व बाजूंच्या भिंतींत
दगडी बाक आणि सपाट छत. लेण्यांत ठिकठिकाणी रंगकाम व चित्रे रेखाटल्याचे
पुरावे आढळून येतात. अनेक लेण्यांना लागून अगर जवळपास पाण्यासाठी टाकी
खोदण्यात आली आहेत. जुन्नर लेणींचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे
सर्वप्रथम या ठिकाणी ‘मंडप’ नावाचा नवीन वास्तूप्रकार उदयास आला. यांचा
उपयोग विशेषतः सामूहिक पूजा-विधी, बैठका इ. गोष्टींसाठी होत असावा. शिवनेरी
लयनसमूहातील लेणे क्र. ६४ मधील एका शिलालेखात ‘भोजनमंडप’ उभारल्याचा
उल्लेख आहे. गणेश लेणी येथील लेणे क्र. २१ व २३ चा उपयोग भोजनमंडप म्हणून
केला जात असे. याशिवाय जुन्नर येथे ध्यान साधनेसाठी खोल्या, आसन, कोढी इ.
वास्तूघटक खोदण्यात आले आहेत. गणेश लेणी येथील लेणे क्र. २, १०, १२, १३,
१७, १८, २४, २६,२७ व २९ तसेच शिवनेरी दक्षिण समूहात लेणे क्र. ५५, ५६, ६०,
६१, ६६ व ६९ यांच्या आकारावरून यांचा उपयोग ध्यान साधनेसाठी केला असावा,
असे दिसते. शिवनेरी, मानमोडी व गणेश लेण्यांत कोढी (कोनाडे) आढळून येतात.
तिसऱ्या शतकानंतर सदर लेण्यांचे खोदकाम थांबल्याचे दिसून येते. महायान
पंथीयांनीही येथे विशेष रुची दाखवली नसल्याचे स्पष्ट होते. त्यानंतर बौद्ध
भिक्षू व बौद्ध धर्माचा प्रभाव ओसरल्याने बराच काळ ह्या लेणी दुर्लक्षित व
उपेक्षित राहिल्या. पुढे जुन्नर परिसरात हिंदू व जैन धर्मांचे प्राबल्य
वाढीस लागल्याचे जुन्नर येथील शिल्पे व इतर अवशेषांवरून दिसून येते. सुमारे
बाराव्या शतकात अंबा-अंबिका येथील लेणे क्र. ३० मध्ये काही जैन शिल्पे
कोरण्यात आली, तर संभवतः सतराव्या-अठराव्या शतकांत शिवनेरी पूर्व, तुळजा
लेणी व गणेश लेणी येथील काही लेण्यांत हिंदू देव-देवतांची स्थापना झाल्याचे
दिसून येते. संदर्भ :
- Dehejiya, Vidya, Early Buddhist Rock Temples: A Chronological study, London, 1972.
- Dhavalikar, M. K., Late Hinayana Caves of Western India, Pune, 1984.
- Fergusson, J. & Burgess, J. The Cave Temples of India, London, 1880.
- Jadhav, Suresh V. Rock-cut Cave Temples at Junnar-An Integrated Study, Ph.D. Thesis submitted to the University of Poona, 1980.
- Nagraju, S. Buddhist Architecture of Western India, Delhi, 1981.
- जाधव, सुरेश वसंत, जुन्नर-शिवनेरी परिसर, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई, १९८२.
- जामखेडकर, अ. प्र. संपा., महाराष्ट्र : इतिहास-प्राचीन काळ (खंड-१ भाग-२) स्थापत्य व कला, दर्शनिका विभाग, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई, २००२.
|
॥ श्री गणेशाय नमः ॥
छत्रपती
शिवाजी महराजांची जन्मभूमी म्हणून नावलौकिकास आलेलं जुन्नर हे
तेवढ्यापुरतं मर्यादित नाही. जुन्नरला सातवाहन काळापासूनचा इतिहास आहे जो
इसवी सन पूर्व २५० म्हणजेच आज पासून सुमारे २२०० वर्ष मागे जातो.
सातवाहनांच्या समकालीन क्षत्रप राज्यकर्त्यांची ही राजधानी होती. बावीसशे
वर्षापूर्वी मोसमी वाऱ्यांचा शोध लागल्यावर भारतातून रोम , ग्रीस इ
देशांशीपण व्यापार सुरु झाला. त्या काळी नाला सोपारा ( शूर्पारक ) , कल्याण
( कलिअणस ), भरूच ( भरुकच्छ ) , चौल इ. बंदरांमधून व्यापार चालत असे. या
बंदरांमधून आणलेला माल नाणेघाटातून जुन्नर मार्गे पैठणला म्हणजेच
सातवाहनांच्या राजधानीत पोहोचवला जाई. डोंगर फोडून आणि दगडांत बांधलेला
नाणेघाट हा सर्वात प्राचीन व्यापारी मार्ग आहे.
शिवनेरी
, तुळजा आणि गणेश लेण्यांच्या डोंगरसमूहाच्या कुशीत वसलेलं जुन्नर
ज्याच्या ताब्यात, व्यापारी मार्ग त्यांच्या ताब्यात हे सुस्पष्ट समीकरण
होतं. त्यामुळे जुन्नर आणि नाणेघाटावर ताबा ठेवण्यासाठी क्षत्रप आणि
सातवाहनांमध्ये नेहमी संघर्ष चालू असे. पण ह्या अश्या राजकीय परिस्थितीतही
जुन्नर स्वतःची धार्मिक ओळख टिकवून होतं ते म्हणजे शहरभर पसरलेल्या
लेण्यांमधून !
सर्वसाधारणतः
ही सर्व लेणी हिनयान पंथीयांची आहेत. गौतम बुद्धांनी केलेल्या उपदेशात
मूर्ती पूजा वर्ज्य होती. कालांतराने मूर्ती पूजेचं महत्व पटल्याने मूर्ती
पूजा मानणारे बौद्ध भिख्खू स्वतःला महायान म्हणवू लागले आणि मूर्ती पूजा न
मानणारे हीनयान पंथात गणले जाऊ लागले. हिनयान लेणी ही अगदी साधी असतात.
वर्षभर धर्मप्रचारासाठी फिरणाऱ्या भिख्खूंना पावसाच्या काळात राहाण्याची
सोय म्हणून ह्या लेण्या खोदल्या गेल्या. हीनयान लेण्यांमध्ये नेहमी
आढळणाऱ्या गोष्टी म्हणजे चैत्यगृह, विहार , पाण्याच्या टाक्या आणि स्तूप !
विहार म्हणजे भिख्खूंच्या राहण्याच्या खोल्या ! हिनयान पंथाने मूर्तिपूजा
नाकारली होती तरी मन एकाग्र करण्यासाठी भौतिक वस्तूची गरज होती आणि म्हणून
बुद्ध किंवा त्यांच्या समतुल्य व्यक्तीचे केस, उपरणं, अस्थी किंवा त्यांनी
वापरलेल्या वस्तू जसं की वस्त्र ,वाडगा इ. ठेवून त्याभोवती दगडी स्मारक
घडवलं जाई त्याला स्तूप म्हणत. त्याभोवती प्रदक्षिणा पथ आणी भिख्खूंच्या
वावरण्याची सोय म्हणून भली मोठी खोली घडवली जाई त्याला चैत्यगृह म्हणतात.
हिनयान लेण्यांचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ह्यात बुद्धाची मूर्ती जरी आढळत
नसली तरी इतर काही शिल्पं आढळतात जसं की दान देणारी माणसं, द्वारपाल ,
हत्ती , नाग इत्यादी प्राणी. लेण्या डोंगरमाथ्यावर कोरल्या जात नाहीत.
त्यासाठी मुख्य कारण म्हणजे वारा पावसापसून वाचण्यासाठी त्या कोरल्या जात.
दुसरं कारण वर राहणाऱ्यांना पायथ्याशी असलेल्या गावाशी संबंध ठेवावा लागे.
तिसरं कारण डोंगर माथ्यावरून आलेलं पावसाचं पाणी हे टाक्यांमधे आपोआप
साठवता येई.
जुन्नर
मध्ये १८० पेक्षा जास्त लेण्या आढळतात. एखाद दुसरं लेणं सहसा आढळत नाही.
आजूबाजूची पाच पंधरा लेणी मिळून त्यांचा एक समूह असतो आणि त्या समूहाला
विशिष्ट नावाने संबोधलं जातं. जुन्नर मध्ये लेण्यांचे मुख्य ४ समूह आहेत ते
खालीलप्रमाणे :
१) शिवनेरी लेणी समूह २) मानमोडा लेणी समूह ३) गणेश लेणी समूह ४) तुळजा लेणी समूह http://www.chaturthamiti.in/2022/07/blog-post_10.html
१) शिवनेरी लेणी समूह
ह्या
लेण्या शिवनेरी किल्याच्या अगदी खालोखाल वसलेल्या आहेत. गड चढून गेल्यावर
शिवाई देवी मंदिराच्या उजवीकडे खाली पायऱ्या उतरून गेल्यावर दृष्टिस पडतात.
बर्याचश्या लेणी , पाण्याच्या टाक्या , लहानसा स्तूप, सुंदर सुबक आणि
आखीव रेखीव असे ब्राम्ही लिपीतले शिलालेख आणी समोर दिसणाऱ्या मीना नदीवर
बांधलेल्या धरणाचं विहंगम दृश्य दिसतं .
चित्र क्र . १ . शिवनेरी लेण्यांमधून दिसणारं जुन्नर शहर आणि उजवीकडे भिंतीवर कोरलेला शिलालेख .
चित्र क्र . २ शिवनेरी लेणी बाहेरील भाग
चित्र क्र . ३ . शिवनेरी लेण्यांमधील स्तूप
२) मनमोडा लेणी समूह
मनमोडा
लेणी समूह हा अंबिका, भीमाशंकर, आणि भूतलिंग / भूतलेणी ह्या तीन
उपसमूहांपासून बनलेला आहे. लेण्यांच्या पायथ्याशी असलेल्या मुख्य रस्त्याने
वर आल्यानंतर अंबिका लेण्यांचे दर्शन होतं. अंबिका लेणी ही दोन मजली असून
प्रशस्त आवारात सामावलेली आहेत. वरती चढून जाण्यासाठी जिने चैत्यगृह विहार
आणि मधोमध स्तूपाची रचना आढळून येते .अंबिका लेण्यांच्या समोर प्रशस्त
पटांगण आहे. अंबिका लेण्यांकडे पाहिल्यास उजवीकडे भूत लिंग आणि डावीकडे
भीमाशंकरची लेणी आहेत. हे तिन्ही लेणी समूह जवळपास एकाच उंचीवर असून
एकमेकांपासून थोडे दूर विखुरलेले आहेत. सदर लेण्यांमध्ये विहार, चैत्यगृह
आणि पाण्याची टाकी आढळून येतात.
चित्र क्र . ४ . अंबिका लेणी समूहातील विहार .
चित्र क्र . ५ . अंबिका लेण्यांमधील ब्राम्ही लिपीतला शिलालेख .
चित्र क्र. ६ . अंबिका लेण्यांसमोरील प्रशस्त अंगण
मनमोडा
लेण्यांमधला दुसरा उपसमूह म्हणजे भूत लिंग किंवा भूत लेणी. यामध्ये चित्र
क्रमांक सात मध्ये दाखवल्याप्रमाणे एक प्रशस्त चैत्यगृह दिसतं ज्यामध्ये
आजही त्याकाळी बांधलेला स्तूप अगदी सुस्थितीत आढळतो. दरवाजावरील शिल्पकाम
अगदी वाखण्याजोगे आहे. द्वारपाल, वेदिका पट्ट, दारावरची कमान , त्यात मधोमध
देवीचं शिल्प, त्याच्या बाजूची हत्तीची शिल्प सहजपणे लक्ष वेधून घेतात.
भूत लिंग लेण्यांचे हे प्रवेश द्वार अभ्यासकांचं लक्ष वेधून घेतं. या लेणी
समूहातली बाकीची काही लेणी दगडाचा प्रस्तर खराब निघाल्यामुळे अर्धवट सोडून
देण्यात आली.
चित्र क्र. ७ . भूतलिंग लेण्यांमधील चैत्यगृहाचे प्रवेशद्वार
चित्र क्र. ८ . भूतालिंग लेण्यांच्या प्रवेशद्वाराची कमान आणि त्यावरील गजशिल्पं .
अंबिका
लेण्यांच्या डावीकडे गेलेल्या रस्ता भीमाशंकर लेण्यांना जाऊन पोहोचतो.
भीमाशंकर लेणी स्थापत्यकलेत वैशिष्ट्यपूर्ण आहेत. इतर लेण्यांप्रमाणेच
यातही सभामंडप चैत्यगृह विहार आणि पाण्याच्या टाक्या आढळतात. लेण्यांच्या
आत मध्ये पुरेसा उजेड येण्यासाठी खोदलेली गवाक्ष म्हणजेच लहान झरोकेही
दिसून येतात. या लेण्यांमध्ये काही शिलालेख झिजलेल्या अवस्थेत आढळतात.
चित्र क्र. ९ . भीमाशंकर लेणी
चित्र क्र . १० . भीमाशंकर लेण्यांमधील पाण्याची टाकी
जुन्नर
मध्ये लेण्यांवर आढळून येणाऱ्या शिलालेखांमध्ये मुख्यत्वे त्या काळाच्या
लोकांची नावे तसेच ते करत असलेल्या व्यापारांची नावे आढळून येतात. लेखांची
लिपी ब्राह्मी असून भाषा प्राकृत आहे. सर्वसाधारणतः धनिक व्यापारी किंवा
तत्कालीन राज्यकर्त्यांनी दिलेल्या दानाचा उल्लेख हा शिलालेखांमध्ये असतो.
सदर लेणी खोदण्यासाठी किंवा पाण्याची टाकी खोदण्यासाठी ज्या धनिकाने दान
दिलं त्यांचा उल्लेख त्या त्या शिलालेखांमध्ये केला जातो. शिलालेख
आढळण्याची सर्वात मुख्य जागा म्हणजे व्हरांडा आणि पाण्याच्या टाक्यांच्या
वरची बाजू. जुन्नरच्या ह्या लेण्यांमध्ये एकूण सदतीस शिलालेख आढळून येतात.
शिलालेख हे इतिहास जाणून घेण्याचं एक विश्वसनीय साधन आहे. त्यामुळेच
त्यांची जपणूक करणे हे आपलं कर्तव्य आहे !
संदर्भ : Junnar Inscriptios, डॉ. शोभना गोखले.
गणेश
लेणी आणि तुळजा लेण्यांबद्दल माहीतीसाठी दुसरा भाग येईल. त्यासाठी
संपर्कात राहा. वेबसाईट वरील " Follow Us" बटनावर क्लिक करा. किंवा
rahulabhyankar5@gmail.com वर ई-मेल करा .
लोभ असावा ! राहुल अभ्यंकर, विरार . |
No comments:
Post a Comment