Monday, May 16, 2022

नारायणगड

 जुन्नर तालुक्यातील या नारायणगावच्या उत्तर दिशेला सपाट प्रदेशात मुख्य डोंगररांगेपासून थोडासा वेगळा असलेल्या एका डोंगरावर नारायणगड हा किल्ला वसला आहे. जुन्नर बाजारपेठ आणि नाणेघाट यांच्याशी असलेली जवळीक व सपाट प्रदेशात मध्यभागी असणारा हा डोंगर पहाता नारायणगड हा टेहळणीसाठी महत्वाचा किल्ला असावा. किल्ल्यावरील कातळात खोदलेल्या पायऱ्या व पाण्याची टाकी पहाता या किल्ल्याची बांधणी सातवाहन काळात झाली असावी. नारायणगड नावाचा अजून एक गड सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोलीजवळ आहे.
Standalone Narayangad and Road from Gadachiwadi to base of fort

    नारायणगडला जाण्यासाठी मुंबई-पुणे येथुन सर्वप्रथम नारायणगाव गाठावे. पुणे जिल्ह्यातील नारायणगाव तमाशाची पंढरी म्हणुन ओळखले जाते. पुणे -नारायण गाव हे अंतर  ७७ कि.मी. आहे. पुणे-चाकण-राजगुरुनगर-मंचर-नारायणगाव असा मार्ग आहे.तर मुंबईवरुन येताना दोन पर्याय आहेत.मुंबई-माळशेज घाटमार्गे जुन्नर-नारायणगाव किंवा मुंबई-लोणावळा-तळेगाव-चाकण-राजगुरुनगर-नारायणगाव.
        नारायणगाव एसटी स्थानका समोरुन एक रस्ता खोडदला जातो. या रस्त्याने ९ किमी अंतरावर डाव्या बाजूचा रस्ता गडाचीवाडी या किल्ल्याच्या पायथ्याच्या गावातुन मुकाईदेवी मंदिरापर्यंत जातो. नारायणगाव ते मुकाईदेवी मंदिर अंतर साधारण ११ कि.मी आहे. नारायण्गाव ते खोडद अशी एस.टी.ची बस सेवा आहे,पण मर्यादीत.त्यामुळे स्वतःचे वाहन असेल तर सोयीचे. 
map




 
नारायणगाव वरुन गडाच्यावाडीकडे पायी जाताना

बस आणि स्वत:चे वाहन दोन्ही नसेल तर नारायणगावातीन ११ नंबरच्या बसने म्हणजे पायगाडीने निघावे.नारायणगाव स्टँडच्या समोरुन पुणे-नाशिक महामार्गावरुन उजवीकडे वळून रस्त्याने निघावे.वस्ती संपली कि शेतातून येडगाव धरणाच्या कालव्याच्या कडेने चालायला सुरवात केली कि अर्ध्या तासात वस्ती व पुल लागेल.तो ओलांडून निलगिरीच्या वनातून अर्ध्या तासात आपण गडाच्या पायथ्याशी पोहचतो.

Mukai Devi Temple
 
20180120_103026
 मुकाई देवीचे मंदीर

इच्छा असेल तर गडपायथ्याच्या मुकाई देवीच्या मंदीरात थोडी विश्रांती घ्यायची आणि गडाकडे निघायचे.गडाच्या पायथ्यापासून कोरीव पायर्‍या आणि काळ्याभिन्न कातळाची नैसर्गिक तटबंदी सहज दिसुन येते. गडाच्या पायथ्याला मुक्ताई देवीचे मंदिर आहे. मंदिराच्या मागून जाणारी पायवाट गडाकडे जाते. गडचढाई तशी सहज सोप्पी आहे. गडाचा डोंगर पुर्वपश्चिम दोन भागात विभागलेला असुन गडाची समुद्रसपाटी पासूनची उंची २६४० फुट आहे. Coordinates: Narayangad 19°06’47.4″N 74°01’58.0″E, (19.113154, 74.032777)
20180120_103419

मुकाईदेवी मंदिरापासुन गडावर जाणाऱ्या नव्याने बांधलेल्या सिमेंटच्या पायऱ्या सुरु होतात. गावकर्‍यांनी पायर्‍या सुस्थितीत ठेवण्यासाठी त्यांचे बांधकाम केले आहे. 
Old Steps
 या पायऱ्यानी पुढे गेले असता आपल्याला कातळात खोदून काढलेल्या पायऱ्या दिसतात. 
Serpentine and camouflaged steps

हि पायर्‍यांची वाट सर्पिलाकार अश्या पधातीने बांधली ज्यामुळे वर येणारी व्यक्ती शेवटपर्यंत नजरेच्या टप्प्यात राहील
20180120_114037
या पायऱ्यांच्या बाजुने कठड्याचे किंवा तटाचे दगड बसविण्यासाठी कोरलेल्या खोबणी पहायला मिळतात.  ह्या कातळकोरीव पायर्‍या चढून वीस मिनिटात आपला गडावर प्रवेश होतो. या कातळकोरीव पायर्‍या बघीतल्यावर हा दुर्ग निंसशय प्राचीन असणार्,याची खूण पटते.तसेही जुन्नर परिसरातील शिवनेरी,चावंड्,हडसर, जीवधन हे सातवाहन कालाशी नाते सांगतात.हा गडही कदाचित त्याच काळात उभारला गेला असावा.
नारायणगडाची तटबंदी

    आता या गडाच्या इतिहासात डोकावुया. गडाची बांधणी जरी सातवाहन काळात झाली असली तरी याचा सर्वप्रथम उल्लेख पेशवेकाळातच मिळतो. इ.स.१६०५ पासून जुन्नर परगणा मालोजीराजांकडे होता. शहाजीराजांनी अनेकदा आपली नोकरी बदलली मात्र जुन्नर ते चाकणपर्यंतच्या परिसराचा ताबा सोडला नाही. जुन्नर परगण्यामध्ये नारायणगड आणि खोडद गावाचा समावेश होत होता. किल्याची तटबंदी बाळाजी विश्वनाथ यांच्या कालखंडात बांधली गेली व उर्वरित बांधकाम नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीत पूर्ण झाले याची नोंद नानासाहेब पेशव्यांच्या रोजनिशीमध्ये मिळते. ( हि माहिती B.P. Pune District Gazetteer  मध्ये दिली असली तरी ती विश्वसनीय वाटत नाही.कारण एकतर हा गड प्राचीन आहे.शिवाय बाळाजी विश्वनाथ पेशव्यांचा कार्यकाळ १७१३ ते १७२० असा आहे.या अवधीत बाळाजींचे चरित्र वाचले तरी लक्षात येईल कि बाळाजींचे स्थान इतके बळकट झाले नव्हते कि ते निजामाच्या हद्दीत जाउन नवा गड उभारतील.फारतर बाळाजीनी या तटबंदीची दुरुस्ती केली असे म्हणता येईल ) पहिल्या बाजीराव पेशव्यांचा नारायणगडाशी जवळचा संबंध होता. बाळाजी विश्वनाथाच्या मृत्यूनंतर छत्रपती शाहूंनी पेशवेपदाची सूत्रे बाजीरावाकडे सोपवली तेव्हा नारायणगाव आणि नारायणगडाचा सरंजाम त्यांना दिल्याचे पत्रांमध्ये उल्लेख सापडतात.छ. शाहू महाराजांनी बाजीरावांना पेशवे पदाची सूत्रे देताना नारायणगाव परिसराचा सरंजाम दिला. १७१३ मधे सर्काजी राउ पासलकर हा गडाचा हवालदार म्हणून नेमणुकीस होता. १७२८ मधे निजामांनी या प्रांतावर स्वारी केलेली होती, तेव्हा चिमाजीअप्पांचे या भागातील निजामाच्या हालचालीवर लक्ष होते. जुन्नरच्या पूर्वेकडील गावांचा महसूल या किल्ल्यावर जमा होत असे. या किल्ल्याचा सरंजाम पेशव्यांनी उदाजी पवार या सरदाराला दिल्याचे दिसते. १७३८ मधील एका पत्रानुसार हा किल्ला स्वराज्यात असल्याचे दिसते. दाऊजी इंदुलकर याची नेमणूक किल्ल्यावर केलेली असल्याचे दिसते. १७४१-४२ मध्ये या किल्ल्यावर हवालदार म्हणून अंताजी काटकर याची नेमणूक केलेली दिसते. नानासाहेब उर्फ बाळाजी बाजीराव पेशव्याच्या कालावधीत पेशवाईचा आर्थिक कारभार सदाशिवराव भाऊकडे असता इ.स.१७५८ मधील नारायणगडाचा आर्थिक हिशेब आपणाकडे तातडीने सादर करावा हा त्यांचा आदेश पेशवे दप्तरामध्ये पहायला मिळतो.१८१८ च्या शेवटच्या इंग्रज-मराठा युद्धात इंग्रजांच्या तोफांनी किल्ल्यावर हल्ला केला, तेव्हा गडातील शिबंदीने आपली शस्त्रे खाली ठेवली. १४ जून १८१८ मधे अहमदनगरचा जिल्हाधिकारी (कलेक्टर) हेन्री पॉटींजर याच्या हुकमानुसार तत्कालीन शिवनेर तालुक्याचा कमाविसदार रामराव नरसिंह याने बोइट याच्या ताब्यात हा किल्ला दिला. पुढे १८ डिसेंबर १८१८ मधे जुन्नर तालुक्यातील किल्ले पाडण्यासाठी कॅप्टन इस्टनर या भागात आला. त्याने किल्ल्यावर जाणारे रस्ते, पाण्याची टाकी, तटबंदी उद्ध्वस्त केली. १८३० साली येथील एका टाक्यात नारायणाची मुर्ती सापडली पण सध्या ती मुर्ती कोठे आहे याचा ठावठिकाणा लागत नाही. १९४२ मध्ये महात्मा गांधीच्या भारत छोडो आंदोलनाला या गावातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. माजी पोलीस पाटील कै.रावजी पाटील काळे, श्री बाळा पाटील गायकवाड यांच्या समवेत ग्रामस्थांनी नारायणगडावर राष्ट्रध्वज फडकविला होता.
नारायणगडाचा नकाशा
Pomegranate plantation and Mukai Devi temple, gadachi wadi is seen at distance
इथून वळून मागे बघितल्यावर आपण गडाकडे आलो ती वाट 
Giant Meterwave Radio Telescopes (GMRT) at Khodad
तसेच लांबवर GMRT दुर्बिण दिसते

गडाचे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख व अवशिष्ट रूपात असून प्रवेशद्वारातून आत गेल्यावर वाटेच्या दोन्ही बाजूंस खांब उभे करण्यासाठी खोदलेले खड्डे दिसतात. हा दरवाजा शिल्लक असताना त्यावर नारायणाची मुर्ती व वाद्यांचीं चित्रें असल्याचे उल्लेख आढळतात. पायथ्यापासुन गडावर यायला अर्धा तास पुरेसा होतो. गडाचा डोंगर पुर्व-पश्चिम असा पसरलेला आहे.सहाजिकच गडावर पुर्वेला एक आणि पश्चिमेला एक अश्या दोन टेकड्या आहेत.
गडावर प्रवेश केल्यावर उजव्या आणि डाव्या बाजूला हि टेकाड दिसतात. त्यातील डाव्या बाजूच्या टेकाडावर हस्तमाता मंदिर आहे. 
GPS map of our trek on Strava
या दोन्ही टेकाडाचे माची व मधील उंचवटा असे दोन भाग पडलेले असुन दोन्ही टेकाडाच्या माचीवरून वरील उंचवट्याला फेरी मारता येते. गडमाथा आकाराने निमुळता असुन २० एकर परिसरावर पुर्वपश्चिम पसरलेला आहे. मंदिरामुळे स्थानिकांचा गडावर वावर असल्याने पायवाटा बऱ्यापैकी रुळलेल्या आहेत. सरंक्षण दृष्ट्या नारायणगडाची उंची जास्त नसली तरी किल्याला तीन बाजुंनी नैसर्गिक कातळकड्याचे सरंक्षण असल्याने फारशी तटबंदी बांधलेली नाही.किल्ल्याच्या दक्षिणेची तटबंदी उद्ध्वस्त झालेली असून उत्तरेकडील तटबंदी बरीच शाबूत आहे. या तटबंदीत काही बुरूज बघायला मिळतात. तटबंदीवर काटेरी झुडपे उगवलेली आहेत.

Rampart and Bastion on south ridge of Narayangad
गडाची पुर्वेकडे जाणारी सोंड

गडावर प्रवेश केल्यावर आपण मंदिराकडे न जाता उजव्या बाजुच्या टेकडाकडून गडफेरीला सुरवात करायची. 
Small water tank filled with rain water
या टेकडीच्या डाव्या बाजुने म्हणजे दरी डावीकडे व टेकाड उजवीकडे ठेवत सुरवात केल्यावर वाटेत सर्वप्रथम खडकात खोदलेले पाण्याचे टाके दिसते. हे आहे नाग टाक.

Narayan Take (Tank)
नारायण टाके
Stone Inscription

हे टाके पाहुन पुढे गेल्यावर खडकाच्या उतारावर खोदलेले दुसरे टाके दिसते. हे टाके खांबटाके  आहे. हे टाके नारायण टाके म्हणुन ओळखले जाते.इ.स.१८३०ला गडावर टाक्यात सापडलेली नारायणाची मुर्ती या टाक्यात सापडली असावी असे वाटते. या टाक्यामध्ये एक खांब असुन टाकीच्या वर देवनागरी मध्ये लिहिलेला एक झिजलेला देवनागरी शिलालेख आहे. जी  टाकी कड्यांच्या पोटात आडवी खोदून ज्या  मध्ये खांब असतात ती टाकी यादवकालीन आणि जी टाकी जमिनीलगत  सरळ  खोदून बनवली जातात ती शिवकालीन टाकी. शिवकालीन टाकी बनवताना खोदलेले दगड सहसा किल्ल्यांच्या बांधकामासाठी वापरले जायचे . शिवकालीन टाकीच उदाहरण म्हणजे रायगडवरील गंगासागर टाकी. याच भागात पाच-सहा टाक्यांचा एक समूह आहे.
     या टाक्याच्या पुढे दरीच्या बाजूस गडाच्या उत्तरेस असणाऱ्या तटबंदीत झाडीत लपलेला चोर दरवाजा आहे पण तेथे खुप मोठया प्रमाणावर झाडी वाढली असल्याने व तेथे जाण्याची वाटही धोकादायक असल्याने तेथवर जाता येत नाही. त्यातील माती, दगडधोंडे काढण्याचे काम दुर्ग संवर्धन मोहिमेअंतर्गत करण्यात आले आहे.येथुन पुढील भागात कोणतेही अवशेष नसुन सरळ जाणारी हि वाट गडाच्या पुर्व टोकावरील बुरुजावर जाते. या टोकावर आपल्याला बुरुजांचे अवशेष आणि तटबंदीच्या खुणा पहायला मिळतात.येथून पुढे जाणाऱ्या वाटेवर काटेरी झुडपे उगवलेली असल्यामुळे गडाचा पूर्वेस सांभाळून जावे
West ridge as seen from east ridge
 हस्तमातेचे मंदिर असणारे गडाचे पश्चिम टोक

येथुन मागे न फिरता समोरील उंचवट्यावर चढुन जावे. या उंचवट्यावरून संपुर्ण किल्ला नजरेस पडतो.

 येथुन हस्तमाता मंदिराच्या दिशेने उतरायला सुरवात केल्यावर वाटेत गवतात लपलेले घरांचे अवशेष नजरेस पडतात. हे अवशेष पहात डाव्या बाजुने खाली उतरल्यावर गडाच्या उत्तर दिशेला सलग पाच पाण्याच्या टाक्यांचा समूह पाहायला मिळतो. 
Paanch Take (Tank)

हि टाकी गडाचच्या आग्नेय भागात आहेत.पाच टाक्यांचा हा समुह असल्यामुळे यांना 'पाच टाकी' असे नाव पडले आहे.हि टाकी पाहून आपल्याला चावंड  किंवा अलंग,कुलंग यांच्यावरील टाक्याची आठवण येते.हे सर्व दुर्ग बहुधा समकालीन असावेत.
टाक्यांचा समूह पाहुन पुढे आल्यावर आपण खालुन गडावर येणाऱ्या पायऱ्यांच्या वरील भागात येतो. इथे एक भुयारासारखा खड्डा दिसतो.याचे कारण कळत नाही.

Chambhar Take (Tank)
येथे खडकात खोदलेले २० x १५ फुट आकाराचे भलेमोठे टाके आहे. या टाक्याला चांभार टाके असे म्हणतात. अर्थात या सर्वच टाक्यातील पाणी खराब असल्यामुळे पिंण्यायोग्य नाही.
या टाक्यासमोरची तटबंदीचे आजही काही प्रमाणात शिल्लक आहे. हे टाके पाहुन पुढे आपण गडावर प्रवेश केलेल्या ठिकाणी येतो.
येथे आपली गडाची एका बाजुची प्रदक्षिणा पूर्ण होते.आता समोरच्या बाजूला हस्तमाता मंदिर असलेले नारायणगडाचे दुसरे टेकाड दिसते. येथे टेकाडाकडे जाणाऱ्या दोन पायवाटा दिसतात. एक वाट उजव्या बाजूला वर चढत जाते तर दुसरी वाट डाव्या बाजुला खाली झाडीत वळते. या वाटेने खाली उतरल्यावर कातळात खोदलेले पाण्याच टाक पाहायला मिळते. यातील पाणी पिण्यायोग्य आहे. हे टाक पाहून परत मूळ वाटेवर आले असता नुकतेच साफ केलेले पाण्याचे दुसरे कोरडे टाके दिसते.
Sadar or Admin block
 येथून पाच-दहा पावले चालल्यावर उजव्या बाजूला वाड्याचे अवशेष आहेत. 

20180120_110137
 
किल्लेदाराच्या वाड्याचे अवशेष
20180120_110248

Structure like tiger figure

इथे आपल्याला दोन शरभ शिल्प दिसतात.
20180120_110231

Ganesh sculpture

हि गणेश पट्टी बहुधा इथे असणार्‍या एखाद्या मंदीरावर असावी
20180120_110202
दगडात कोरलेले भांडे
20180120_110344
बहुधा गडावर फार संवर्धन करणे शक्य नसल्यामुळे गावकर्‍यांनी गडावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले आहे.

    यात शरभशिल्प कोरलेले दोन कमानीचे दगड असुन व्दारपट्टीवर गणपतीची सुंदर छोटीशी मुर्ती आहे. याच्या मागील बाजुस वाडयाचा चौथरा व अर्धवट ढासळलेल्या भिंती पहायला मिळतात.किल्ल्यावर खुप मोठया प्रमाणात असलेल्या गवतामुळे किल्याचे बरेचसे अवशेष हे गवतामधून शोधावे लागतात. वाडयाच्या मागील बाजुने हस्तमाता मंदिराच्या टेकाडाला वळसा घालत टेकाडाखालील माचीच्या भागात जाता येते. या भागात दोन पाण्याची टाकी असुन त्यातील एक टाके बुजलेले आहे. वाडयाच्या मागील टेकाडावर जाऊन चढत उतरत किंवा मूळ वाटेवर जाऊन रुळलेल्या वाटेने किल्ल्याच्या सर्वोच्च टोकावरील गडदेवता हस्तमाता मंदिराकडे जाता येते.
Hastamata Temple




20180120_112030
 हस्तमातेचे दगडी बांधकामातील मूळ मंदीर तसेच ठेवुन गावकऱ्यांनी त्यावर नविन सिमेंटचे मंदिर बांधलेले आहे. 
20180120_111517





मंदिराच्या चार फुट उंचीच्या गाभाऱ्यात देवीचा तांदळा आणि हस्तमातेची चतुर्भुज मुर्ती असुन मंदिरासमोर दगडी दीपमाळ आहे. नागपंचमी आणि दसर्‍याला हस्ताईमातेची जत्रा असते.
  नारायणगड बघणे तसे तासा-दोन तासाची गोष्ट.पण जर मुक्कामाचा प्रसंग आलाच तर या हस्तमातेच्या मंदीरात देवीचिये द्वारी पथारी पसरता येईल.
मंदिराच्या उंचवट्यावरून किल्यावर नजर टाकली असता किल्याचा व आसपासचा संपूर्ण परिसर नजरेस पडतो.स्वच्छ हवा असेल तर या हस्तमातेच्या मंदीराजवळून पश्चिमेला शिवनेरी,चावंड,हडसर हे दुर्ग तसेच हटकेश्वर दिसतो. येथे आपली गडफ़ेरी पूर्ण होते. संपूर्ण किल्ला पाहाण्यास दोन तास लागतात. 
         नारायणगड तसा छोटासा असल्यामुळे बघण्यासाठी फार वेळ लागत नाही.त्यामुळे जुन्नर परिसरातील इतर गडांच्या बरोबर बघता येतील.मात्र त्यासाठी व्यवस्थित नियोजन आवश्यक आहे.

नारायणगडावरुन काढलेला या दुर्बिणीचा फोटो 


  कोणताही गड म्हणले कि आपल्या दृष्टीने त्याचा संबध फक्त इतिहासाशी येतो.पण नारायणगडाच्या पायथ्याशी खोडद गावाच्या परिसरात GMRT दुर्बीण बसवली आहे.गडाच्या माहितीबरोबरच या आधुनिक विज्ञान स्थळाची माहितीही घेउया.म्हणजे व्यवस्थित नियोजन केले तर इतिहासाच्या सफरीबरोबर या भविष्याचा वेध घेणार्‍या ठिकाणालाही भेट देता येईल.
संदर्भ :-
१) पुणे जिल्हा गॅझेटीयर
२) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
३) डोंगरयात्रा -आनंद पाळंदे
४) शोध शिवछत्रपतींच्या दुर्गाचा- सतिश अक्कलकोट
५) www.durgbharari.in  हि वेबसाईट
६) www.trekshitiz.com हि वेबसाईट
  Abhang, Chandrakant, Unpublished documents of East India Company regarding destruction of forts in Junnar region, Indian History Congress, 2014.
    गोगटे, चिं. गं. महाराष्ट्र देशातील किल्ले : भाग १ व २ (सुधारित आवृत्ती), शिवसमर्थ सेवा प्रकाशन, नाशिक, २०१९.
    पारसनीस, द. ब.; वाड, ग. चि. बाळाजी बाजीराव पेशवे रोजनिशी, डेक्कन व्हर्न्याक्युलर ट्रान्सलेशन सोसायटी, पुणे, १९०७.

खोडदची रेडिओ दुर्बीण

    खोडदची रेडिओ दुर्बीण ........................
.................जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप - (जी. एम. आर. टी.)........


     जुन्नरचं एक वैज्ञानीक महत्व म्हणजे खोडदला असलेली महाकाय रेडिओ दुर्बीण! खगोलशास्त्रात भारताने जी काही आपली ओळख निर्माण केली आहे त्यामध्ये या शक्तीशाली रेडिओ दुर्बीणीचे महत्वपुर्ण योगदान आहे. जागतीक पातळीवर ही दुसर्‍या क्रमांकाची शक्तीशाली रेडिओ दुर्बीण मानली जाते.
  अर्थात नारायणगाववरुन जुन्नरकडे जाताना डावीकडे जी डिश दिसते ती आर्वी या गावी आहे व या प्रकल्पापासून वेगळी आहे. तसल्या दोन डिशेस आहेत. त्या केंद्राचा वापर दुरसंचार व इतर कारणासाठी जे उपग्रह आपण प्रक्षेपीत केलेले आहेत त्यांच्या नियंत्रणासाठी केला जातो.मुख्य फरक म्हणजे तिथे डिशमध्ये सलग धातूची शीट वापरली आहे. जाळी नव्हे. त्या बर्‍याच आधीपासून तिथे आहेत.
     या अफाट विश्वाबद्दल मानवाला नेहमीच कुतुहल वाटत आले आहे आणी या अथांगतेचा शोध अखंडपणे सुरुच आहे. यातूनच खगोलशास्त्र विकास पावत गेले.  रात्री आकाशात दिसणाऱ्या तारे, ग्रह, चंद्र, धूमकेतू अशा सगळ्यांबद्दल मानवाला नेहमीच कुतूहल वाटत आलेले आहे. अगदी प्राचीन काळापासून मानव नुसत्या डोळ्यांनी आकाशाचे निरीक्षण करत आलेला आहे. इ.स. सोळाव्या शतकात गॅलिलिओने आकाशाकडे दुर्बीण रोखण्यापूर्वी केवळ डोळ्यांचा वापर करून भारतीय, चिनी, ग्रीक, इन्का इत्यादी संस्कृतींमधल्या माणसांनी रात्री दिसणाऱ्या चंद्राचे, ताऱ्यांचे, ग्रहांचे भरपूर निरीक्षण केलेले होते आणि त्यांच्या गतीविषयीही आपले अंदाज मांडलेले होते. दुर्बिणीचा वापर सुरू झाल्यापासून मात्र माणसाच्या खगोलशास्त्रविषयक ज्ञानात मोलाची भर पडली. 
     काळानुसार विज्ञान आणि तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीचा वापर करून खगोलशास्त्रातही बरीच मोठी मजल मारली गेली. विसाव्या शतकात खगोलनिरीक्षणासाठी फक्त दृश्य प्रकाशावर अवलंबून न राहता इतर प्रकारच्या लहरींचा उपयोग करायलाही सुरुवात झाली. प्रथमतः ऑप्टिकल दुर्बिणीचा (डोळ्यांनी निरिक्षण करता येणार्‍या) वापर याकामी केला जात असे मात्र पुढे रेडिओ दुर्बिणीचा शोध लागला. प्रत्येक ग्रह, तारा स्वतःमधून विविध तरंगलांबीच्या चुंबकीय लहरी सर्वत्र सोडतात हे काही शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. व या लहरींच्या अभ्यासावरुन त्या ग्रहाच्या वा तार्‍याच्या निरीक्षणाची अचुकता कित्येक पटीने वाढते हे लक्षात आल्यावर पुढे या लहरी पकडणार्‍या दुर्बिणीचा वापर अवकाश निरीक्षणासाठी वाढला. त्यामध्येही इतर तरंगलांबी पेक्षा रेडिओ तरंगलांबी (१ मीटर) असलेल्या लहरींचे संकलन व अभ्यास अधिक सोयीस्कर ठरला.
       या इतर प्रकारच्या लहरी कोणत्या? अवकाशात असलेले तारे त्यांच्या अंतरंगात घडत असलेल्या घडामोडींमुळे विद्युच्चुंबकीय लहरींचं ( electromagnetic waves) उत्सर्जन करत असतात. आपल्याला दिसणारा प्रकाश हाही विद्युच्चुंबकीय लहरींचा एक प्रकार आहे. एएम आणि एफ़एम रेडिओच्या लहरी, दूरचित्रवाणीच्या लहरी, उपग्रहांकडून होणारे संदेशवहन, क्ष-किरण, मायक्रोवेव्ह्ज ही सगळी या विद्युच्चुंबकीय लहरींची विविध रूपं आहेत. या विविध रूपांपैकी काही रूपांचा वापर खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी केला जातो. त्यासाठी ऑप्टिकल दुर्बिणी ( उदा. आपण नेहमी पाहतो त्या लहान दुर्बिणी किंवा आयुकाची गिरवली येथील महाकाय दुर्बीण, अवकाशात असलेला हबल स्पेस टेलिस्कोप इत्यादी), एक्स रे आणि गॅमा रे टेलिस्कोप, रेडिओ दुर्बिणी ( उदा.जीएमआरटी, जॉड्रेल बँक, अरेसिबो इत्यादी) अशी साधने वापरली जातात.
जातात.
electromagneticspectrum.jpg
हा आहे विद्युच्चुंबकीय लहरींचा वर्णपट ( spectrum). यात आपण जसे उजवीकडून डावीकडे जाऊ, तशी लहरींची तरंगलांबी ( wavelength) कमी होत जाते, तर लहरींची वारंवारिता ( frequency) आणि लहरींमधील ऊर्जा ( energy) वाढत जाते. या वर्णपटातल्या २ ’ खिडक्या’ आपल्याला अवकाशात डोकावून पाहण्यासाठी उघड्या आहेत. त्या खिडक्या म्हणजे दृश्य प्रकाश ( visible light) आणि रेडिओ लहरी. अवकाशातील तार्यांकडून येणार्या लहरींपैकी बाकी जवळजवळ सर्व लहरी ( एक्सरे, गॅमा रे इत्यादी) पृथ्वीच्या वातावरणामुळे वरच्या वर रोखल्या जातात. जणू त्या खिडक्यांवर वातावरणाचा जाड पडदा ओढलेला आहे. त्यामुळे त्या लहरींचा अभ्यास करायचा असेल तर तो त्या पडद्यापलीकडे, म्हणजेच पृथ्वीच्या वातावरणापलीकडे जाऊन करावा लागतो.
  अंतरिक्षयानांशी संपर्क साधण्यासाठी सुध्दा या रेडिओ लहरीच वापरल्या जातात. युरोपियन स्पेस एजन्सीने मंगळावर पाठवलेल्या यानातून जे मॉड्यूल मंगळावर उतरलं किंवा सोडून दिलं, त्याच्याकडून येणाऱ्या क्षीण रेडिओ लहरी पकडण्यासाठी GMRT चा यशस्वीरीत्या उपयोग केला गेला.
फरक असा आहे की या यानांकडून येणारे संदेश हे आपल्यासाठी 'अर्थपूर्ण' असतात. ते ज्या प्रकारे संकेतबद्ध ( coded) असतात, त्याची सगळी माहिती आपल्याला असते. त्यामुळे त्यांचा अर्थ कसा लावायचा हे आपल्याला ठाऊक असतं.
याउलट अवकाशातील एखाद्या ताऱ्याकडून येणाऱ्या लहरी या कुणी पाठवलेल्या नसतात. त्यांचा अर्थ कसा लावायचा ते आपण शोधून काढतो. त्या काही coded नसतात. त्या लहरींमधून त्या ताऱ्याबद्दल शास्त्रज्ञ अधिकाधिक माहिती मिळवतात.
atm_opacity.jpg
Credit:
ESA/Hubble (F. Granato)
रेडिओ दुर्बिणींमधून अवकाशातल्या रेडिओ स्त्रोतांचा अभ्यास केला जातो. सूर्य हाही एक रेडिओ स्त्रोत आहे. त्याचप्रमाणे आपल्या आकाशगंगेचे केंद्र हाही एक महत्त्वाचा रेडिओ स्त्रोत आहे. याशिवाय इतर तारकाविश्वे/ दीर्घिका (galaxies), स्पंदक ( pulsars) अशा अनेक रेडिओ स्त्रोतांची निरीक्षणे रेडिओ दुर्बिणींद्वारे घेतली जातात. विश्वाची निर्मिती, विश्वाच्या प्रसरणाचा वेग अशा खगोलभौतिकशास्त्रातल्या ( astrophysics) अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर या निरीक्षणांद्वारे संशोधन केले जाते. त्याचबरोबर, परग्रहावर जर कुठे प्रगत जीवसृष्टी असेलच, तर तिचा वेधही रेडिओ दुर्बिणींमार्फत घेतला जाण्याची शक्यता आहे.
आता आपण दुर्बिणींचा आकार ठरवताना कुठल्या कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात ते पाहू.
    दुर्बीण ऑप्टिकल असो किंवा रेडिओ किंवा एक्स-रे, भिंग वापरून तयार केलेली असो वा परावर्तक वापरून, तिची बारकावे दाखवण्याची क्षमता ( resolution) प्रामुख्याने दोन गोष्टींवर अवलंबून असते. पहिली गोष्ट म्हणजे दुर्बिणीच्या ग्राहकाचा, म्हणजे दुर्बिणीच्या भिंगाचा/ परावर्तकाचा (लहानमोठा) आकार ( याला आपण D म्हणू) आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुर्बिणीवर पडणार्या लहरींची तरंगलांबी ( Lambda). या दोन्हींमधलं गुणोत्तर ( D/lambda) हे जितकं जास्त, तितकी दुर्बिणीची बारकावे टिपण्याची क्षमता जास्त. तरंगलांबी सारखीच असेल, तर दुर्बिणीचा व्यास जितका जास्त, तितकी बारकावे टिपण्याची क्षमता जास्त. ( मूळ सूत्रात D हा व्यास या अर्थाने नाही, तर आकार मोजण्याचा एक निकष म्हणून घेतलेला आहे. पण आपण सोपेपणासाठी इथे व्यास म्हणतोय) म्हणूनच, डोळ्यांनी जे बारकावे दिसत नाहीत, ते ४ इंच व्यासाचा आरसा किंवा भिंग असलेल्या ऑप्टिकल दुर्बिणीतून अतिशय स्पष्ट दिसतात. ( उदा. डोळ्यांनी आपल्याला शनीची कडी किंवा गुरूचे उपग्रह दिसत नाहीत, पण ४ इंची दुर्बिणीतून दिसतात) कारण डोळा आणि ऑप्टिकल दुर्बीण, दोन्ही दृश्य प्रकाशाचा वापर करतात. म्हणजेच, तरंगलांबी तीच, पण व्यास वाढला, त्यामुळे रिझोल्यूशन वाढलं. ( तरंगलांबी कमी असल्याने क्ष-किरण आणि गॅमा किरण या प्रकारच्या किरणांमध्ये भरपूर ऊर्जा असते. त्यामुळे क्ष-किरण आणि गॅमा किरणांचा वापर करणाऱ्या दुर्बिणींचं तत्त्व ( Working principle) थोडं वेगळं असतं. पण अशा दुर्बिणी तयार करून सोडलेल्या आहेत. भारतातर्फे सोडला गेलेला ॲस्ट्रोसॅट हा उपग्रह खगोलशास्त्रविषयक संशोधनासाठी तयार केलेला आहे. त्यात क्ष-किरण तसेच इतर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या लहरींवर काम करणारी उपकरणे आहेत. नासाने सोडलेली चंद्रा क्ष-किरण वेधशाळा ( Chandra X-RAY observatory) आहे. नोबेल पारितोषिक विजेते महान भारतीय शास्त्रज्ञ सुब्रमण्यम चंद्रशेखर यांच्या सन्मानार्थ चंद्रा हे नाव या अवकाशातल्या वेधशाळेला देण्यात आले आहे. )  रेडिओ दुर्बीण तयार करायची असेल, तर मात्र २ किंवा ४ इंच व्यासाचा अँटेना पुरणार नाही. असं का बरं?
      याचं उत्तर शोधण्यासाठी आता आपण परत मगाचच्या वर्णपटाकडे जाऊया. दृश्य प्रकाशाच्या तरंगलांबीपेक्षा रेडिओ लहरींची तरंगलांबी लाखो-करोडो पटीने जास्त असते. त्यामुळे उत्तम resolution मिळवण्यासाठी दुर्बीणही लाखो-करोडो पटीने मोठी हवी, महाकाय असायला हवी.
       अशा महाकाय रेडिओ दुर्बिणी जगात अनेक ठिकाणी बांधल्या गेल्या आहेत ( उदा. अमेरिकेतील अरेसिबो येथील तब्बल ३०५ मीटर व्यासाची एकच डिश असणारी रेडिओ दुर्बीण). परंतु दुर्बीण आकाराने जितकी मोठी, तितकी ती फिरवायला (ऑपरेट करायला) अवघड. यावर उपाय म्हणून अनेक दुर्बिणींचा एक समूह बनवला जातो आणि त्यांनी घेतलेल्या वेधांचा एकमेकांशी समन्वय साधून त्यातून निष्कर्ष काढले जातात. या तंत्राला Interferometry असं म्हणतात.
     Interferometry चं तत्त्व वापरणारी अशीच एक अक्षरश: महाकाय, जायंट दुर्बीण आपल्या पुण्याजवळच्या जुन्नर तालुक्यात खोडद या ठिकाणी आहे. तिचं नाव जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (GMRT), म्हणजेच मीटर तरंगलांबी असणार्‍या लहरींचा वापर करणारी महाकाय दुर्बीण. साधारणपणे २० सेमी ते २ मीटर तरंगलांबी असलेल्या रेडिओ लहरींचा अभ्यास येथे केला जातो. जीएमआरटीमध्ये ४५ मीटर्स व्यास असणारे, ३० डिश अँटेना आहेत. त्यापैकी १४ अँटेना केंद्रस्थानी असलेल्या १ चौरस किमी क्षेत्रफळात ( central square मध्ये) आहेत,तर Y अक्षराच्या आकारात पसरलेल्या ३ भुजांवर एकूण १६ अँटेना आहेत. ( या प्रकल्पापुरते बोलायचे झाल्यास वायच्या रेषा जेथे मिळतात तेथे खोडद आहे व न दिसणार्‍या अँटेना त्या चौकोनात आहे. वायचे आर्म्स आग्नेय, वायव्य व ईशान्य दिशेत गेलेत. पैकी वायव्य चा शेवटचा अँटेना जवळजवळ जुन्नरमध्ये आहे तर ईशान्येचा शेवटचा अँटेना कल्याण-नगर मार्गावरील बेल्हे गावच्या पुढे आहे. आग्नेयेचे अँटेना नारायणगाव शिरुरच्या मार्गावर आहेत त्यामुळे ते पुणे-नाशिक महामार्गावरुन मंचर परिसरातून पुर्वेला दुरपर्यंत बारीक निरीक्षण केल्यासच ते दिसू शकतात. ) या भुजा साधारणपणे प्रत्येकी १४ किमी लांब आहेत. अशा प्रकारे या अँटेना बसवण्याचे कारण Aperture synthesis या संकल्पनेत आहे. याच्या फार खोलात न जाता आपण एवढेच लक्षात घेऊ, की एकमेकांपासून क्ष अंतरावर असलेल्या २ किंवा अधिक रेडिओ अँटेनांनी एखाद्या रेडिओ स्त्रोताची, तो स्त्रोत उगवल्यापासून मावळेपर्यंत पुरेशी जास्त निरीक्षणे घेतली, तर त्या निरीक्षणांमधून मिळणारा एकत्रित निष्कर्ष वापरून, त्यावर गणिती प्रक्रिया करून त्या रेडिओ स्त्रोताची जी प्रतिमा तयार होते, ती जवळजवळ क्ष व्यासाच्या एकाच मोठ्या दुर्बिणीतून निरीक्षण घेऊन तयार केलेल्या प्रतिमेइतकी चांगली करता येते.
mod1.jpg
जीएमआरटीच्या डिश अँटेना कशा प्रकारे उभारलेल्या आहेत त्याचे एक प्रतिरूप
P1150199.JPG
वरच्या फोटोमध्ये आपल्याला जीएमआरटीचा एक डिश अँटेना दिसतोय. या अँटेनाची जी खोलगट डिश आहे, ती परावर्तक किंवा आरसा म्हणून काम करते. अवकाशातल्या रेडिओ स्त्रोतांकडून येणार्या लहरी या परावर्तकावर आदळतात आणि परावर्तित होऊन त्या परावर्तकाच्या नाभीवर ( focal point) एकत्र येतात. या ठिकाणी या लहरी झेलण्यासाठी दुसरा एक अँटेना बसवलेला असतो. हा दुसरा अँटेना या विद्युच्चुंबकीय लहरी पकडतो आणि त्यांचे विद्युतप्रवाहात रूपांतर करतो. हा विद्युतप्रवाह अगदी क्षीण असतो. त्यामुळे तो विविध टप्प्यांवर वर्धित ( amplify) करून, त्यावर योग्य त्या गणिती प्रक्रिया करून त्याचा अभ्यास केला जातो.
GMRT1.jpg
टिंबांनी जोडलेला गोल हा सगळ्या अँटेनांचा कसा एकच मोठी डिश म्हणून वापर होतो ते स्पष्ट करतो.

    हे एवढे मोठे अँटेना बनवताना त्यात व्यावहारिक अडचणी अर्थातच बर्याच असतात. शिवाय भारतासारख्या विकसनशील देशात खर्चावरही मर्यादा येतात. अमेरिकेतील व्हेरी लार्ज अ‍ॅरे ( VLA) या रेडिओ दुर्बिणीच्या धर्तीवर जीएमआरटीची Y आकाराची रचना केली गेली आहे, पण VLA मधील डिश अँटेना या रेलवर सरकू शकणार्‍र्‍या आहेत. त्यामुळे त्यांच्यातील अंतर आवश्यकतेप्रमाणे कमीजास्त करता येते. ही खर्चिक सुविधा GMRT मध्ये नसली, तरी केंद्रस्थानी एकमेकींजवळ असलेल्या १४ दुर्बिणी आणि तीन भुजांमध्ये लांबवर पसरलेल्या एकूण १६ दुर्बिणी ही ( कमीजास्त अंतरांची ) कसर भरून काढतात. परावर्तकाच्या नाभीवर असलेले, लहरी ’झेलणारे' अँटेना ( feed antennas) तयार करतानाही कमीतकमी खर्चात जास्तीत जास्त परिणामकारक आणि उत्कृष्ट परिणाम कसे मिळवता येतील याचा विचार केला गेलेला आहे. डिशचे एकूण वजन आणि वार्यामुळे होणारा अवरोध कमी करण्यासाठी SMART ( Stretched mesh attached to rope trusses) हे नवीन तंत्रज्ञान शोधून काढण्यात आले. म्हणजेच, एक सलग डिश न बांधता जाळी वापरून, तिला योग्य आकारात ताणून धरून हे अँटेना तयार करण्यात आले.
gmrt1.jpg
जीएमआरटीच्या भव्यतेची कल्पना यावी म्हणून हे प्रकाशचित्र.
प्रथमच बघत असू, तर अँटेनाजवळ गेल्यावर त्याच्या आकारामुळे आणि उंचीमुळे आपल्याला दडपून जायला होतं. शिवाय, ऑप्टिकल दुर्बिणीतून जसे आपल्याला तारे, ग्रह ’दिसतात’ तसे या दुर्बिणीतून थेट ’दिसत’ नाहीत. अनेक किचकट गणिती प्रक्रियांनंतर रेडिओ स्त्रोताची ’ प्रतिमा’ मिळते.
GSwarup.jpg
प्रकल्पाचे संस्थापक जेष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. गोविंद स्वरुप.

    भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. होमी भाभा यांनी भारतातील डॉ. विक्रम साराभाई यांना अंतराळ संशोधनासाठी, डॉ. सिद्दिकींना मुलभूत संशोधनासाठी तर डॉ. गोविंद स्वरुप यांना रेडिओ एस्ट्रॉनॉमीसाठी योगदान देण्याविषयी आवाहान केले. डॉ. गोविंद स्वरुपांनी पुढे अतिशय महत्वकांक्षी अशा या शक्तिशाली दुर्बिणीची संकल्पना तात्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींसमोर मांडली व त्याला मान्यता मिळविली.
प्रकल्पासाठी खोडदची जागा निवडताना मुख्य बाबी महत्वपुर्ण ठरल्या त्या म्हणजे या भागामध्ये रेडिओ लहरींना प्रभावीत करु शकेल अशा इतर चुंबकीय लहरींचे अस्तित्व अतिशय नगण्य होते. म्हणजे चुंबकीय लहरींचे संकलन सोपे व अचूक होऊ शकणार होते. हा भाग भुकंपप्रवण क्षेत्राच्या बाहेर होता. तसेच पुण्यापासून दळणवळणासाठी सुलभ होता. व तांत्रीकदृष्ट्या पृथ्वीच्या ठराविक भागावर चुंबकीय लहरी विखुरण्याचे प्रमाण कमी असते हे लक्षात आले आहे. हा परिसर याच प्रकारामध्ये मोडतो.
    प्रकल्पाचे काम प्रत्यक्ष १९८२-८३ च्या सुमारास चालू झाले व १९९४ च्या सुमारास पुर्ण झाले. या प्रकल्पाअंतर्गत अवकाशातून येणार्‍या रेडिओ लहरी पकडण्यासाठी ४५ मीटर व्यास डिश असणार्‍या एकूण ३० अँटेना उभारल्या गेल्यात. लहरींचे संकलन समजावून घेणे अतिशय सोपे आहे. सर्व अँटेनाच्या डिशेस ज्या तार्‍याचे, ग्रहाचे वा लहरीच्या स्त्रोताचे निरिक्षण करायचे आहे त्या स्थानाकडे वळविल्या जातात. अँटेनाची मोठी डिश ही अवकाशातून येणार्‍या चुंबकीय लहरी परावर्तीत करुन डिशच्या वर जोडलेल्या रिसिव्हरकडे पाठवते. व या रिसिव्हरद्वारे त्या ग्रहण करुन फायबर ऑप्टिकल केबलद्वारे मुख्य प्रयोगशाळेत संगणकाकडे पुढील संशोधनासाठी पाठवल्या जातात.
एकूण ३० पैकी चौदा अँटेना खोडदमध्ये तर इतर १६ अँटेना इंग्रजी वाय शेपमध्ये आजूबाजूच्या २५ किमी च्या परिसरात उभारल्या आहेत. (पहा खालील आकृती क्रं. ०१). या सर्व डिश एकाच वेळी लहरी ग्रहण करण्यासाठी एकाच दिशेने वळविण्यात येतात. होते काय की त्यामुळे सुमारे २५ किमी. व्यासामध्ये त्या स्त्रोताकडून येणार्‍या लहरी एकाच वेळी पकडता येतात. म्हणजे अशा वेळी या सर्व डिश वेगवेगळ्या नव्हे तर एकच अँटेना म्हणून अप्रत्यक्षरित्या वापरल्या जातात. लहरी पकडण्यासाठीची डिश जेवढी मोठी तेवढ्या जास्त लहरी पकडता येणार व संशोधनातली अचुकता वाढणार हे ओघाने आलेच. व त्यामुळे ही दुर्बीण जागतीक पातळीवर दुसर्‍या क्रमांकाची शक्तीशाली ठरली आहे.
antenas_GMRT.jpg
जी.एम.आर.टी. अँटेना.
डिशसाठी वापरलेली जाळी व डिशच्या वर चुंबकीय लहरी ग्रहण करण्यासाठी लावलेला रिसिव्हर स्पष्ट दिसत आहेत.

    या प्रकल्पातील एक वैशिष्ट्यं म्हणजे अँटेनाच्या डिशसाठी प्रथमच वापरले गेलेले मेश (जाळी) तंत्रज्ञान! यापुर्वी अशा प्रकारचे अँटेना उभारताना डिशमध्ये लहरी परावर्तीत व्हाव्यात म्हणून सलग धातूची शीट (पत्रा) वापरली जात असे. डॉ. स्वरुपांनी इथे त्याऐवजी धातूची जाळी वापरली आहे. या जाळीची घनता अशी आहे की जाळीच्या मोकळ्या भागातून रेडिओ तरंगलांबीच्या लहरी आरपार जावू शकणार नाहीत व पर्यायाने त्या परावर्तीत होतील. या तंत्रज्ञानाने अनेक गोष्टी साध्य झाल्यात. जसे की डिशचे वजन कमी झाल्याने अर्थातच तो फिरवण्यासाठी कमी शक्ती लागते. वार्‍याचा अवरोध कमी होतो. एकंदरीतच उभारणीचा खर्चही खुप कमी होतो. या तंत्रज्ञानाचे पेटंट सध्या भारताकडे आहे.
    या प्रकल्पाच्या उभारणी बरोबरच भारताने खगोलशास्त्रीय संशोधनामध्ये महत्वाचा टप्पा गाठला. डॉ. स्वरुपांच्या या अजोड कामगिरीमुळेच ते भारतातील खगोलशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जावू लागले. आजही ८० वर्षे वयाच्या आसपास असतानाही हा माणूस तेवढ्याच उत्साहाने मार्गदर्शकाची भुमिका बजावतो आहे. त्यांच्याबरोबरच डॉ.कपाही, प्रो. अनंथकृष्णन अशा इतर अनेक शास्त्रज्ञांनी पण या प्रकल्पामध्ये मोलाचा वाटा उचलला आहे.
ही साईट जरूर पहा.
http://www.ias.ac.in/meetings/annmeet/70am_talks/rnityananda/img2.html
.........................................................................................
हा प्रकल्प दुसर्‍या व चौथ्या शनिवारी सगळ्यांना भेटीसाठी खुला असतो.राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त तिथे मोठे विज्ञान प्रदर्शनही भरवले जाते.

भेटीची वेळ घेण्यासाठी संपर्क : ०२१३२ - २५२११२, २५२११३, २५२११४.
स्थान : खोडद, ता.जुन्नर, जि.पुणे. पुणे नाशीक महामार्गावरील नारायणगावपासून ९ किमी पुर्वेकडे.
वाहन व्यवस्था : पुण्याच्या शिवाजीनगर एस.टी.स्थानकावरुन नाशिककडे जाणार्‍या गाडीने नारायणगाव (७६ किमी) येथे उतरावे. तेथून खोडदला जाण्यासाठी दर तासाला एस.टी. ची सोय आहे.
       शालेय सहली आल्यास जेवणासाठी आजुबाजूच्या मोठ्या गावांमध्ये (नारायणगाव, आळेफाटा परिसरातील) हॉटेल्स मध्ये सोय होऊ शकेल. अथवा विद्यार्थी जर प्रमाणात असतील तर तशी व्यवस्था प्रकल्पाच्या कँटीनमध्ये होण्यासाठी संबधीत अधिकार्‍यांशी बोलता येऊ शकेल. 
संदर्भ:
  http://www.eso.org
http://www.gmrt.ncra.tifr.res.in
http://www.ncra.tifr.res.in
https://www.miniphysics.com
https://en.wikipedia.org
आकाशाशी जडले नाते - प्रा. जयंत नारळीकर

Anything and Everything that happens between Heaven and Hell….
Narayangad as seen from Gadachiwadi

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...