Monday, May 16, 2022

भूतनाथ लेणी - धामणखोल

 जुन्नरची खरी ओळख ही केवळ शिवनेरी हीच नसून सुमारे दोन हजार वर्षांचा इतिहास या परिसराला लाभलेला आहे. महाराष्ट्रात सातवाहनांच्या राजवटीत लेणी निर्मिती करण्यास प्रारंभ झाला. इ.पू पहिल्या शतकात लोणावळ्या जवळ भाजे लेणे कोरले गेले. पुढे नाणेघाटाची निर्मिती झाली. कल्याण, सोपारा, चौल सारख्या बंदराशी जुन्नर बाजारपेठ जोडली गेली. पैठण, तेर, भोकरदन, उजैन अश्या त्यावेळच्या मोठ्या शहराशी जिर्णनगर उर्फ जुन्नर व्यापारी मार्गाने जोडले गेले.धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी बौध्द भिक्षू या व्यापारी मार्गावरून प्रवास करू लागले. आणि मग त्याच्या निवासासाठी, पर्जन्यकाळी आसरा अश्या उदेश्याने या व्यापारी मार्गावर डोंगरात, कातळ खोदून लेण्यांची निर्मिती झाली.
  जुन्नर परिसरात महाराष्ट्रातील सर्वात जास्त लेणी खोदलेली आहेत. सुमारे दोनशे लेणी या परिसरात पाहता येतात. ती शक – सातवाहनांच्या काळात खोदली गेली होती. 
           स्थानिक, परकीय व्यापाऱ्यांनी यासाठी दान, सहाय्य दिल्याचे शिलालेख लेण्यावर कोरलेले आढळतात. त्यापैकी जुन्नर भागातील मानमुकुट उर्फ मानमोडी डोंगरात असणारा हा आणखी एक भूतनाथ लेणी समूह... जुन्नर शहराच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या २ कि.मी अंतरावर दक्षिणेस असलेल्या माणमोडी डोंगर माथ्याच्या उत्तरेकडुन म्हणजेच जुन्नर शहरातुन दिसणा-या कातळकड्यात असलेला आगार गावच्या हद्दीतील बौद्ध कालीन "भुतलेणी समुह"
    नारायणगांव जुन्नर रस्त्यावर जुन्नर मध्ये प्रवेश करतेपूर्वी डाव्या बाजुला एक डोंगर दिसतो.( ऊंची :  ८६० मी.)

 तीन किलोमीटरचा विस्तार असलेला हा डोंगर म्हणजे मानमोडी डोंगर होय. मानमोडीच्या पोटात तीन लेणी समुह आहेत! मुख्य रस्त्यापासुन साधारणत: दोन किमी आत गेल्यावर मानमोडीच्या पायथ्याशी पोहचता येते. अंबिका नगर नावाची छोटी वस्ती इथे आहे. इथुनच मानमोडीच्या लेण्यांकडे जाण्याची वाट आहे. सध्या हा परिसर जुन्नर वनविभागाच्या ताब्यात आहे. त्यांनी या डोंगरावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपन केल्याने तो दाट झाडीचा बनलाय. मात्र लेणी पहायला येणार्‍या पर्यटकांची संख्या कमी असल्याने झाडीत रुळलेल्या पायवाटाही शोधाव्या लागतात! मानमोडीत तीन लेणीसमुह आहेत. त्यांना डावीकडून अनुक्रमे भीमाशंकर लेणी, अंबिका लेणी व भुतलेणी म्हणतात. यापैकी भीमाशंकर व अंबिका लेण्यांकडे पायथ्यापासून जाण्यासाठी बर्‍यापैकी वाटा आहेत.
    तसेच तीन्ही लेण्या ह्या पायवाटेने एकमेकांशी जोडल्या असल्याने अन्य लेण्याही पाहता येतात. परंतु, सध्या तरी या वाटा व्यवस्थित तयार करणे गरजेचे दिसते. स्थानिक लोक सांगतात की , या लेण्या पाहताना मान मोडल्याची वेळ येते म्हणुन डोंगराला ’मानमोडी’ म्हणतात. परंतु, जाणकारांच्या मते मानमोडी हा मानमुकुट या शब्दाचा अपभ्रंश आहे, असेही म्हटले जाते. खरोखरच मानमोडीच्या लेण्या ह्या जुन्नरचा एकेकाळी मानमुकुट असाव्यात, हे त्यांच्या सर्वांग सुंदर रचनेवरुन दिसते. मानमोडीच्या डोंगरातील लेण्यांचा पहिला गट भीमाशंकराच्या बाजूला असल्याने त्याला भीमाशंकर लेणी म्हणतात. सध्या इथे जाण्याची वाट बर्‍यापैकी ढासाळलेली आहे. त्यामुळे सावधपणे लेण्यांपर्यंतची चढाई करावी लागते. स्थानिकांच्या म्हणण्याप्रमाणे आज लेण्यांची रचना पाह्ताना खरोखरच मान मोडण्याची वेळ येते असे म्हटले तर अतिशयोक्तीचे ठरणार नाही! अठरा लेण्यांच्या या गटामध्ये एक चैत्यगृह व उर्वरित विहार आहेत. मुख्य लेण्यांची नक्षीदार कलाकृती पाहिली की, शिल्पकाराला मनोमन सलाम ठोकावासा वाटते. सर्वांग सुंदर कलात्मकता मानमोडीच्या सर्वच लेण्यांमध्ये दिसते. आधुनिक काळातील स्थापत्य अभियंतेही इतक्या सुंदर लेण्या बनवू शकणार नाहीत, इतका आखीव रेखीवपणा या लेण्यांमध्ये आहे. भीमाशंकर लेण्यांच्या उजव्या बाजुने एक पायवाट ही अंबिका लेण्यांकडे जाते. पंधरा मिनिटांच्या पायपीटीनंतर अंबिका लेण्यांसमोरील सपाट भुपृष्ठावर जाता येते. या लेण्यांसमोर बरीच जागा रिकामी आहे. त्यामुळे पुर्ण लेणी एका दृष्टीतही पाहता येतात. स्थानिकांनी एका विहारात अंबिका देवीची स्थापना केली आहे. यावरुनच या गटाला अंबिका लेणी असे म्हणतात. ही लेणी तीन मजली लेण्यांप्रमाणे तयार केलेली आहेत. या ठिकाणीही एक चैत्यगृह दिसते.
 
 
      शिवाय प्राकृत भाषेतील व ब्राम्ही लिपीत लिहिलेले अनेक शिलालेख मानमोडीच्या सर्वच लेण्यांत कोरलेले आहेत. अंबिका गटात पाण्याची बरिच टाकी खोदल्याची दिसतात. पावसाळ्यात ती जवळपास पूर्ण भरुन जातात. अंबिका लेण्यांतील सर्वात वरच्या विहारांवर जाण्यासाठीच्या वाटा उध्वस्त झाल्यात. त्यामुळे तेथे केवळ रॉक क्लायबिंग करणारेच जावू शकतात. या गटातील काही लेणी अपूर्ण असल्याचे दिसते. अंबिका लेण्याच्या उजव्या बाजुचा रस्ता भूतलेण्यांकडे जातो. झाडीतून पायवाट शोधत तिथवर पोहचातला पंधरा ते विस मिनिटे पुरतात. नावाप्रमाणे भुतलेणीचा भुताशी मोठा संबंध आहेच. अर्थात इथे भुतांचा वावर नाहिये. तर स्थानिकांच्या म्हणण्यानुसार अशी लेणी केवळ भुतच बांधु शकतात त्यामुळे त्यांना भुत लेणी म्हटलं जात. अर्थात लेण्यांच सौंदर्य वर्णन करताना ही बाब सांगितली तरी पुष्कळ आहे. ही लेणी सुध्दा दोन मजली आहेत. मानमोडीच्या लेण्यांचा शेवट भुतलेण्यांच्या चैत्यगृहापाशी होतो. इथुन शिवनेरी व लेण्याद्रीच्या लेणी ही दिसतात. भुतलेणीही अत्यंत अडचणीच्या ठिकाणी आहेत. जुन्नर परिसरातील हा वारसा पाहण्याकरिता केवळ इतिहास तज्ञ तसेच बौद्ध अभ्यासकच येतात. त्यामुळे ती दुर्लक्षित आहेत. त्यांच्या अपूर्ण अवस्थेमुळे ध्यानात येते की पुर्ण मानमोडी डोंगरच लेण्यांनी नटला जाणार होता. असे झाले असते तर एक वैभवशाली अविष्कार आपल्या समोर दिसला असता. १० व्या-१२ व्या शतकात लेणी स्थापत्य कला लोप पावली असे म्हणतात. त्याच सोबत खरी भारतीय स्थापत्य कलाही लोप पावली होती. आपल्या पुर्वजांनी ही कोरीव लेणी बनविताना अत्युच्च कलेचा आविष्कार साध्य केला होता. तो संवर्धन करण्याची जबाबदारी त्यांनी आपल्यावर टाकली आहे.
 
 
 
 
 KSP_2677
 
अंबा अंबिका लेणी समूह पाहून झाल्यावर डावीकडे एक पायवाट गर्द झाडीत जाते, वाटेत डाव्या हाती दगडात कोरलेली पाण्याची दोन टाकी आहेत ती पार केली की, सुमारे १५ मिनिटांत ही पायवाट आपल्याला भूत लेणी समुहाकडे घेऊन येते, मातीच्या १०,१२ पायऱ्या चढलो की आपण दाखल होतो भूत लेणी समूहात, लांबून दिसणारी शिल्पे, मोठी मधाची पोळी आणि मधमाशांच्या आवाज यांनी प्रथमदर्शनीच वातावरण गंभीर बनवते.खरतर या लेण्यांचे डोंगरझाडीतून डोकावणारे रुप आणि अस्पर्शित सौंदर्य प्रथमदर्शनीच प्रेमात पडायला लावते. पण लेण्याच्या अस्पर्शितपणाचे किंवा एकाकीपणाचे खरे कारण आहे यांचे नाव. भुत लेणी ! नावात काय आहे ? असे मानले जाते तरी कधी,कोणी या लेण्यांना हे नाव बहाल केले आणि या लेण्यांकडे वळणारी पावले इकडे यायची बंद झाली. वास्तविक मानमोडी डोंगराच्या या तिन्ही लेणीगटात भुत लेणी हि सर्वात प्राचीन.इ.स.पुर्व पहिल्या शतकाच्या उत्तरार्धात कोरलेली. कड्याच्या एन धारेवरची. पाण्याची कुंडे,एकमजली,दुमजली विहार आणि या सार्‍याला कवेत घेउन मान वर केलेले राजबिंडे असे ते चैत्यगृह. 
KSP_2710
         खरेतर या लेण्या अदभुत्,गुढ अविष्काराने भारावलेल्या आहेत.हे खोदकाम्,त्यावरचे शिल्प कोरीवकाम, चित्रकला,त्यातील लेखाची लिपी हे सर्व सामान्य जनतेला आश्चर्याचे वाटते यात नवल ते काय ? त्यातून अश्या कलाकृतींना अंधश्रंध्दा जोडल्या जातात. कोठे त्यांना पांडव्,गणेश्,अंबा-अंबिका अश्या दैवी नावांची जोड मिळते तर कधी भुताच्या नावाचा शापही मिळतो. त्यातच गरुड्,नागाची शिल्प आणखी गोंधळात टाकतात. त्यातून हि कृत्य मानवी नसून अमानवी भुतांनी केली असावीत असा समज निर्माण होतो.अमावस्या,पौर्णिमेला या डोंगरात भुते फिरतात अशीही जोड दिली जाते.अर्थात या अंधश्रध्दा थोड्याफार फायद्याचीही ठरल्या.यामुळे नको ती घाण करणारे,उगाच घुटमळणारे इकडे फिरकत नाहीत.विशेष म्हणजे याच मानमोडी डोंगरात असलेल्या अंबा-अंबिका लेण्यात देवीमहात्म्यामुळे भाविकांची वर्दळ असते, तरी इथून जवळ असणार्या भुत लेण्यांच्या वार्‍यालाही कोणी उभे रहात नाही. एकच वास्तुप्रकार, शैलकृत्य पण केवळ नावामुळे किती वेगळी वागणुक मिळते याचे हे उत्तम उदाहरण.
  भूतनाथ लेणी समूह हा १६ बौद्ध लेण्यांचा मिळून असलेला लेणी समूह आहे, यापैकी आपण महत्वाच्या लेण्यांची आता माहिती घेऊ...
अंबा-अंबिका समूहातील शेवटच्या लेण्यापासून पुढे काही अंतरावर ‘भूत लेणी-समूह’ लागतो. यात एकूण २१ लेणी व १४ पोढी असून महत्त्वाच्या लेणींना ३५ ते ४९ असे क्रमांक दिले आहेत. यातील चार-पाच वगळता बाकीच्या लेणी अगदी सामान्य आहेत.

       क्र. ३५ ते ३७ या साधारणपणे एक खोलीवजा अर्धवट खोदलेल्या आहेत. या परिसरातील एका पोढीवर दानलेख कोरला आहे. 
लेणे क्र ३७, इथे बाहेर एक पोढी, पाण्याचे टाके आढळते, त्यावर एक ब्राम्ही लिपीतील शिलालेख आहे, त्याचा अर्थ, "कुमीय यांची कन्या सुलसा हिने या पाण्याच्या टाक्याचे धम्मदान दिले" असा आहे.

 लेणे क्र ३८, हा विहार असून, चौरस मंडप व दोन खोल्या आहेत. पुढे जमिनीत पाण्याची लहान टाकी कोरलेली आहेत.
लेणे क्र. ३९ हे सुद्धा अपूर्ण असले तरी याचा आकार थोडा मोठा असून याच्या प्रांगणात पोढी, मंडप व काही खोल्या आहेत.हा ही विहार असून ३ स्तंभ व २ अर्धंस्तंभ असून, ५ अपूर्ण खोल्या आहेत. समोर पाण्याचे लहान टाके आहे.
KSP_2751
लेणी क्र ४० :-
    खरंतर या लेणी समुहाकडे आल्यावर प्रथमदर्शनी आपले लक्ष वेधणारी ही प्रमुख लेणी, इथे चैत्यगृह आहे. समोर दर्शनी भाग ११ मीटर उंच आहे, तो खाली रुंद दरवाजा आणि वर तुटलेला गच्चीचा भाग असा दोन भागात विभागलेला आहे.पैकी खालील भागात रुंद दरवाजा, त्यावर खंडित सज्जाचा शिल्लक भाग, पायऱ्या, प्रांगणात बाक व दोन पोढी आहेत. वरील दर्शनी भागात शिल्पांनी सजविलेले व इतर नक्षीकाम असलेले पिंपळाच्या पानाच्या आकाराचे सुंदर चैत्यगवाक्ष आहे. अगदी वरच्या पट्टीत सात मोठ्या व त्याच्या वरील अंगास लहान चैत्यकमानी असून तशाच त्या दर्शनी भागाच्या दोन्ही बाजूंच्या उभ्या पट्ट्यात कोरल्या आहेत. एकावर अनेक चैत्यगृह कोरून अनेक मजल्यांचा आभास निर्माण केलेला आहे.हा सर्व भाग मधल्या गवाक्षाच्या थोडासा पुढे घेतला आहे. कमानीच्या उजव्या कोपऱ्यात बोधिवृक्ष असून उपासकांनी आणलेल्या माळा त्यास अर्पण केल्याचा प्रसंग आहे. तसेच डावीकडे एक मनुष्याकृती अपूर्ण राहिलेली दिसते. तुळजा लेणी-समूहातही अशा प्रकारची शिल्पे आहेत.
 मानमोडी लेणीसमूहात असलेली ही भूतलेणी इ.स.पूर्व पहिल्या शतकात खोदली गेली. या लेणीचे मुखदर्शन (फसाड) अत्यंत आकर्षक आहे. बाजूच्या भिंतीवर कोरलेला बोधीवृक्ष आपले लक्ष वेधून घेतो. पिंपळाच्या आकाराची चैत्यगवाक्षाची कमान मोठी आकर्षक आहे. इथे दोन मोठे स्तूप आणि बाजूला मनुष्यरूपातल्या नाग आणि गरुडाच्या प्रतिमा कोरलेल्या दिसतात. नाग आणि गरुड हे निसर्गतः एकमेकांचे शत्रू. परंतु बुद्धाच्या सहवासात आल्यावर दोघेही आपले वैर विसरून गेले असेच या स्थपतींना सांगायचे आहे. इथल्या चैत्यगवाक्षाची कमान फारच सुंदर सजवलेली आहे. यात मध्यभागी अभयमुद्रेत उभी असलेली गजलक्ष्मी आणि तिच्या दोन बाजूंनी तिच्यावर अभिषेक करणारे हत्ती. त्यांच्या बाजूच्या पाकळ्यांमध्ये पुरुष-स्त्राr अशी दांपत्ये असून तिथेच खाली ब्राह्मी लिपीतील शिलालेख कोरलेला दिसतो. शेजारीच असलेल्या विहारांचे दरवाजेसुद्धा देखणे आहेत. त्यावर असलेले दोन-दोन स्तूप तसेच त्रिरत्न, फुलांची नक्षी, धर्मचक्र ही बौद्ध स्थापत्यातली शुभचिन्हे फारच सुरेख कोरलेली आहेत. तिथे असलेल्या नीरव शांततेमुळे या लेण्यांचे दर्शन कायम स्मरणात राहते.
 KSP_2720
 cave3     
चैत्यगवाक्षाच्या दोन्ही बाजूंना ठळक मनुष्याकृती कोरलेल्या आहेत. उजवीकडे गरुड तर डावीकडे शेषनागराज शिल्पे कोरलेली आहेत.नागराजाच्या शिल्पाच्या डोक्यावर तुर्रेदार फेटा, कानात कुंडले,बाहुत बाजुबंद आणि कमरेखाली सोडलेला धोतराचा सोगा. हे शिल्प कोरणार्‍या कलाकाराला खरच दाद द्यावीशी वाटते. खरतर गरुड अन् नाग एकमेकाचे शत्रू, तरीपण या चैत्यासमोर आपले वैर विसरून, त्याच्या रक्षणासाठी इथे उभे आहेत, हा त्याचा अर्थ.  या शिल्पांना स्थानिक लोक भुते, तर त्यांच्या बाजूस असलेल्या स्तूपांना लिंग समजत. यावरून या लेण्यास ‘भूत’ किंवा ‘भूतलिंग’ असे नाव पडले असे म्हटले जाते.
   लेण्याच्या दर्शनी भागावरचे हे अलंकरण डोळे आणि पायाला जणु जखडून टाकते. 
KSP_2684
 
KSP_2729
        कमानीच्या आतील अर्धगोलास मण्यांच्या झालरी असून त्यात कमळाच्या आकृती आहेत. यांतील एकाच्या मधल्या पाकळीत समभंगस्थानात गजलक्ष्मीचे शिल्प आहे. गजलक्ष्मीच्या दोन्ही बाजूंवर दोन हत्ती असून त्यांच्या सोंडेत लक्ष्मीवर जलवृष्टी करण्यासाठी कुंभ आहेत. एवढ्याशा पाकळीत त्यांनी आपली सोंड आणि मान वर उचलली आ।हे.तर त्यांचे पाय जवळजवळ आलेले आहे.हे शिल्प कोरणार्‍या कलाकाराचे शरीरशास्त्राचे ज्ञान विशेष आहे. दोन्ही हत्तींच्या पाठीमागील दोन-दोन पाकळ्यांत एक पुरुष व एक स्त्री अशी उभी असलेली युगुले अतिभंगमुद्रेत दिसतात.हि युगुले नृत्य करत आहेत.या युगुलांच्या मागच्या बाजुला कमळ आणि पानासह कळी दाखवली आहे. या सर्व पाकळ्यांच्या आत फुलाचा गाभा एखाद्या जपानी पंख्याप्रमाणे आहे.लक्ष्मी,भोवतालचे हत्ती आणि कमळे हि सारीच रचना अर्थपुर्ण आहे. 
 KSP_2750
 
 KSP_2719-2
 
 KSP_2719
 
 
 
 KSP_2705
या फुलाच्या मध्यभागी चंद्राकार सपाट भाग असून त्यावर अर्धवर्तुळाकार ब्राम्ही लिपीत शिलालेख कोरला आहे.'यवनस चंदानं देयधमं गभदा ( र)'. यवन (ग्रीक) चंद्र याने गर्भद्वार दान दिल्यासंबंधीचा लेख कोरला आहे.या ग्रीक व्यक्ती आयोनिया प्रांतातून आलेले आयोनियन लोक होते, ज्यांना पुढे योन असे नाव पडले.ज्याचा पुढे अपभ्रंश यवन झाला. यावरून त्याकाळी बौध्द धर्म आणि व्यापार कुठपर्यंत पोहोचला होता याचा प्रत्यय येतो. या चैत्यगृहाच्या दर्शनी भागावरील शिल्पांचे कार्ले व बेडसे येथील शिल्पांशी लक्षणीय साम्य आहे.
        चैत्यगृह ३.७ मीटर रुंद आणि ९.१० मीटर खोल आहे. चैत्यगृहाच्या आतील भाग अपूर्ण असून याचे विधान गजपृष्ठाकृती किंवा चापाकार आहे. तसेच छत अर्धगोलाकार आहे. उजव्या बाजूस चार अष्टकोनी खांब असून ते लेण्याच्या आकाराशी थोडेशे असंगत वाटतात.उजवीकडचे अष्टकोनी खांब कोरलेले आहेत्,मात्र डावीकडच्या खांबाची फक्त आखणी झालेली दिसते.  याच्यामागे लेणे कोरणार्‍यांचा पथ खोदण्याचा विचार असावा असे वाटते.मात्र हे काम सुरु होण्यापुर्वी लेण्यांचे खोदकाम थांबले असावे असे वाटते.त्यामुळे हे खांब स्वतंत्र न असता मागच्या भिंतीशी संलग्न दिसतात. डाव्या बाजूच्या भिंतीत खांबांची फक्त सुरुवात केलेली दिसते. पाठीमागे अर्धगोल भिंतीपासून अलग असा स्तूप कोरला आहे. त्यावर हर्मिका नाही. परंतु यष्टीसहित छत्र बसविण्यासाठी चौरस खोबणी मात्र आहे. 
 KSP_2741

KSP_2747

 वास्तविक हे चैत्यगृह मुळ अवस्थेत सुस्थितीत असते तर आज ते पश्चिम भारतातील एक देखणे चैत्यगृह ठरले असते. मुखाच्या भागाची पडझड झाल्यामुळे या चैत्यगृहाच्या वास्तुशास्त्रीय वैशिष्ट्यांचा अंदाज येत नाही.पण आधीच्या काळात चैत्यगृहात आढळतात तश्या लाकडी कमानीचा अभाव व त्याएवजी कोरण्यात आलेली बंद कमान, नंतरच्या काळातील कार्ले लेण्यांशी तुलना करत येईल अशी कलाशिल्पे आणि मुर्तीकाम यावरुन हि लेणी स्थित्यंतराच्या काळातील असावीत असे वाटते. 

KSP_2718

KSP_2717

KSP_2714

KSP_2712

KSP_2709

KSP_2691

KSP_2732

      लेणे क्र. ४१ ते ४७ वरच्या मजल्यावर (क्र. ३९ च्या वर) एकास एक लागून अशा खोल्या आहेत. यांतील काही खोल्यांच्या प्रवेशद्वारांवर चैत्यकमानी कोरल्या आहेत. तसेच स्तूप, वेदिकापट्टी व लहान चैत्य-कमानींच्या आत नक्षीकाम केले असून त्यांत एकातएक गुंफलेली फुले, नंदीपद, त्रिरत्न, श्रीवत्स आणि धर्मचक्र कोरल्याचे थोडेशे अवशेष दिसतात. लेणे क्र. ४८ व ४९ चैत्याच्या वरील डोंगरात असून ती अपूर्ण आहेत.

 

 

 

     लेणी अभ्यासकांनी दिलेल्या संदर्भाचा विचार केल्यास, येथील शिलालेखात या डोंगराचे नाव "मानमुकुड" (संस्कृत मध्ये "मानमुकुट") असे दिले आहे. आजही ते "मानमोडी" या अपभ्रंश रुपात जवळपास दोन हजार वर्षा नंतरही प्रचलित आहे. या लेण्यांमध्ये खूप साऱ्या मधमाश्या आहेत, तेव्हा खूप काळजी घ्यावी. परफ्यूम स्प्रे, विडी, सिगारेट पासून या भागात दूर रहावे.
     शिवजन्मभुमी जुन्नर परिसर, लेण्याबाहेर असलेली नीरव शांतता, मधमाश्यांच्या वावर आणि शांतता भेदणारा आवाज, लेण्यांमधील थंड, गूढरम्य वातावरण अन मूर्ती ! यामुळे इथे दिलेली भेट अविस्मरणीय ठरते.
 संदर्भ :-
१) पुणे जिल्हा गॅझेटीयर
२)  Jadhav, Suresh V. Rock-cut Cave Temples at Junnar-An Integrated Study, Ph.D. Thesis submitted to the University of Poona, 1980.
३)   जाधव, सुरेश वसंत, जुन्नर-शिवनेरी परिसर, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई, १९८२.
४)  जामखेडकर, अ. प्र. संपा., महाराष्ट्र : इतिहास-प्राचीन काळ (खंड-१, भाग-२) स्थापत्य व कला, दर्शनिका विभाग, मुंबई, २००२.  चित्रसौजन्य : बापुजी ताम्हाणे.
 ५)   जुन्नर परिसरातील बौद्ध लेणी - सदानंद आपटे
६)   लेणी महाराष्ट्राची - दाऊद दळवी
७)     प्राचीन महाराष्ट्र - डॉ श्रीधर व्यंकटेश केतकर (प्र आ १९३५)(दु आ १९८९)
८) श्री. प्रतिक साबळे, ऍड हेमंत वडके, श्री. अभिजित बेल्हेकर, केव्हिन स्टँडेज यांचे लिखाण
९) https://www.marathibuzz.com/bhootnath-caves-junnar
१०) सांगाती सह्याद्रीचा-यंग झिंगारो ट्रेकर्स

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...