Monday, May 16, 2022

अंबा अंबिका लेणी समूह

 महाराष्ट्रात सातवाहनांच्या राजवटीत लेणी निर्मिती करण्यास प्रारंभ झाला. इ.पू पहिल्या शतकात लोणावळ्या जवळ भाजे लेणे कोरले गेले. पुढे नाणेघाटाची निर्मिती झाली. कल्याण, सोपारा, चौल सारख्या बंदराशी जुन्नर बाजारपेठ जोडली गेली. पैठण, तेर, भोकरदन, उजैन अश्या मोठ्या शहराशी जुन्नर व्यापारी मार्गाने जोडले गेले. धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी बौध्द भिक्षू या व्यापारी मार्गावरून प्रवास करू लागले. आणि मग त्याच्या निवासासाठी, पर्जन्यकाळी आसरा अश्या उदेश्याने या व्यापारी मार्गावर डोंगरात, कातळ खोदून लेण्यांची निर्मिती झाली.
मौर्यानंतर इ.स.पुर्व.184 नंतर ते इ.स 250 पर्यंत नर्मदेच्या खालचा संपूर्ण प्रदेश सातवाहनांनी समृद्ध व भरभराटीला आणला होता. देशविदेशात व्यापार समृध्द केला तो याच सातवाहनांनी. म्हणूनच सातवाहनांची नाणी क्विंटलच्या प्रमाणात मिळतात.
जेव्हा मौर्यांचे प्रांताधिकारी होते तेव्हा पासूनच सातवाहन जुन्नरला राहत होते. मौर्यानंतर त्यांनी आपले स्वातंत्र्य घोषित केले. महाराष्ट्रात 30 सातवाहन राजे होऊन गेले. व यांनीच जवळपास सर्वच लेण्या कोरल्या आहेत. सादवाह, सातवाहन व सप्तकर्णी ही त्यांचीच नावे होय. त्यांची दानपत्रे,नाणी,ग्रंथ व शिलालेख त्यांनी ब्राम्ही , पाली प्राकृत लिपीत लिहिले आहे.
सातवाहन काळ अन्न, वस्र, निवारा, धार्मिक संकल्पना, साहित्य, देश-विदेश व्यापार व लोकजीवनाच्या दृष्टीने खुपच महत्वपूर्ण आहे.
येथील खास भुतलेणी (खोरेवस्ती) वैशिष्ट्य म्हणजे लेणीच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात दोन स्तुपाच्या मधोमध दोन व्यक्ती कोरलेल्या आपणास दिसून येतात. त्यातील एक व्यक्ती गरूड वंशीय तर एक नागवंशिय आहे. गरूडाचे आणि नागाचे वैरभाव किती प्रसिद्ध आहे हे आपणास ठाऊक आहे. परंतु या काळात हे दोन्ही वैरभाव असलेल्या व्यक्ती एकमेकांना किती आदराने जवळ होत्या की तेव्हा वैरत्वाला विसर पाडणारे तत्वज्ञान शिकविले जात होते असा सांस्कृतिक वारसा जपुन ठेवणार जुन्नर हे ऐतिहासिक शहर होत.
 KSP_6351
  एकट्या जुन्नर परिसरात दोनशेहून जास्त लेणी आहेत. स्थानिक, परकीय व्यापाऱ्यांनी यासाठी दान, सहाय्य दिल्याचे शिलालेख लेण्यावर कोरलेले आढळतात. त्यापैकी जुन्नर भागातील मानमुकुट उर्फ मानमोडी डोंगरात असणारा हा अंबा अंबिका लेणी समूह ! जुन्नर शहराच्या जवळच 1.5 कि.मी अंतरावर उत्तरेस असलेल्या डोंगर रांगामध्ये 1.5 कि.मी अंतर विस्तार असलेल्या या लेण्या तिन समुहात पहावयास मिळतात. जुन्नर शहराच्या दक्षिणेला व खोरे वस्तीपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या नारायणगावहून जुन्नरला जाताना रस्त्याच्या डाव्या बाजूला धामणखेल खंडोबा डोंगरात मोठा लेणीसमूह दिसतो तो ‘मानमोडी लेणी समूह’. पायथ्याशी असलेल्या पोल्ट्रीपासून सरळ एक पायवाट या लेणींकडे जाते. हा समुह तीन भागात व्यापलेला असून पुर्वेकडील भागाला “भिमाशंकर_लेणी” समुहाने ओळखले जाते. मध्यंतरी असलेला लेणी समूह “अंबा_अंबिका_लेणी” समुहाने ओळखला जातो तर पश्चिमेला असलेल्या लेणी समुहास “भुतलेणी” म्हणुन ओळखले जाते. या तीन गटांना मिळून मानमोडी_लेणी म्हणुन संबोधण्यात येते. विशेष म्हणजे या सर्व लेण्यांची निर्मीती ही 2200 वर्षाची असून बौद्ध कालीन आहे. त्याच पैकी एक लेणी समुह म्हणजे अंबा_अंबिका लेणी होय. येथील लेण्यांपैकी एका लेणीत अंदाजे इ.स.च्या ६ ते ८ व्या शतकात जैनांनी आपल्या देवता कोरलेल्या दिसतात. त्यात श्री पार्श्वनाथ आणि आंब्याच्या झाडाखाली बसलेल्या देवी अंबिकाचे अंकन केलेले दिसते.या लेणीचे मुखदर्शन (फसाड) रस्त्यावरूनसुद्धा दिसते.यातील एका लेणीत अंदाजे इ.स.च्या 6 ते 8 व्या शतकात जैन देवता कोरलेल्या दिसतात. त्यात श्री पार्श्वनाथ आणि आंब्याच्या झाडाखाली बसलेल्या अंबिका देवीचे अंकन केलेले दिसते. त्यावरून या लेणीला अंबिका लेणी नाव पडले.
       येथीलच एका लेणी समुहात पुढे एका चैत्यगृहाचे पाषाण ढेसूळ लागल्याने काम अर्धवट राहिलेले आहे. व जवळच शेजारच्या दोन छोट्या लेण्यांच्या बाहेर ब्राह्मी लिपी मधील सुबक अक्षरे असलेला शिलालेख आहे. भृगुकच्छ अर्थात भडोच इथल्या ‘बुद्धमित्र आणि बुद्धरक्षित (बुधमितस आणि बुधरखितस) नावाच्या दोन भावांनी ह्या लेणीसाठी दान दिलेले आहे. त्यांच्या वडिलांचे नाव लिहायचे राहिले म्हणून ते मधल्या ओळीत छोट्या अक्षरात लिहिलेले आहे !!! या लेणीचा संदर्भ काही महाभारतातील अंबा- आंबिकाशी जोडतात म्हणून त्यांचे नाव जोडले गेले असावे. त्यामुळे या ठिकाणी हिंदू, बौद्ध व जैन धर्मीय बांधवांचे दर्शनासाठी ऐक्य पहावयास मिळते.
 KSP_6358
 

      जुन्नर शहराच्या जवळच 1.5 कि.मी अंतरावर उत्तरेस असलेल्या डोंगर रांगामध्ये 1.5 कि.मी अंतर विस्तार असलेल्या या लेण्या तिन समुहात पहावयास मिळतात. जाण्याचा मार्ग खोरे वस्ती मधुन जो मार्ग दक्षिणेस जातो त्याच मार्गाने पुढे 1 कि.मी अंतरावर गेल्यावर उजवीकडे जी डोंगररांग दिसते तेथेच या लेण्या तीन समुहात विखुरलेल्या दिसतात.साधारणतः येथे 50 कोरीव लेण्या पहावयास मिळतात. विशेष म्हणजे या लेणी जैनतिर्थनकार यांच्या कालखंडातील असुन तीनही लेणी समुह सुंदर अशा कोरीव कलाकृतीत पहावयास मिळतात.
10560355_304452163059453_6732921587295176944_o
   लेणी पाहायला फारसे कुणी येत नसल्याने गवत वाढल्याने वा सागाच्या पानगळीने ही वाट बुजून गेलेली असते. जंगल-झाडीतला हा अनुभव घेत अर्धा-एक तासात आपण अंबा-अंबिका लेणीगटापुढे पोचतो. एक मोठे पटांगण पुढय़ात असलेला कातळावरचा देखावा अचानक समोर येतो. विहार, चैत्यगृह, पाण्याची कुंडे अशी ही ३३ खोदकामे आहेत. बरीचशी जमिनीलगत ओळीने, तर काही कातळावरच्या भागात आहेत. ‘भीमाशंकर’च्या सतरा लेण्यांनंतर इथे १८ ते ३४ असे क्रमांक लेण्यांना दिले आहेत.   भीमाशंकर गटातील शेवटच्या लेण्यापासून पुढे सु. अर्धा किमी. वर अंबा-अंबिका लेणी-समूह आहे. यांत २२ लेणी व ११ पोढी असून यांतील महत्त्वाच्या लेणींना १८ ते ३४ हे क्रमांक दिले आहेत. यात एक चैत्य आणि बाकीचे विहार व साध्या खोल्या आहेत. तसेच येथे एकूण १५ शिलालेखही आहेत.  पूर्वेकडून क्रमाने सुरुवातीची दालने साध्या खोल्या आहेत. त्यांच्यासमोर पाण्याची काही कुंडे खोदली आहेत. यातील काही जमिनीखाली दोन टप्प्यांत आहेत.
अंबा अंबिका लेणी समूह हा बौद्ध आणि जैन लेण्यांचा मिळून असलेला लेणी समूह आहे, यापैकी आपण महत्वाच्या लेण्यांची आता माहिती घेऊ...
   क्र. १८ ते २० पर्यंतची लेणी खोलीवजा असून त्यांत काही पोढी आहेत.
 लेणे क्र २१, हा चौरस मंडप असून आत बौध्द भिक्षुच्या निवासासाठी ५ खोल्या कोरलेल्या आढळतात.२१ क्रमांकाच्या लेण्यात पाच खोल्या आहेत. आतले खोदकाम खडक ठिसूळ लागल्याने सोडून दिले आहे. लेणे अपूर्ण राहिले, पण बाहेर प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस एक खंडित शिलालेख या लेण्यामागील कुणा भावांच्या दानधर्माची माहिती मिळते. यानंतर पुन्हा काही खोल्या वजा लेणी आणि पाण्याची कुंडे लागतात. त्याच्या डोक्यावरही एक मजला खोदला आहे. तिथे जाण्यासाठी बाहेरच्या बाजूने एक जिना आहे. पुरातत्व विभागाने जतन-संवर्धन कामांतर्गत हा जिना दुरुस्त केला. पण हे करताना सौंदर्यदृष्टी न ठेवल्याने लेण्यांच्या प्राचीन देखाव्यात नवे बांधकाम नजरेत खुपते.
      लेणे क्र. २२ ते २४ या एक खोली किंवा साधे मंडप असलेल्या लेणी आहेत. 


 
 
KSP_6352
      लेणे क्र. २५ स्तूप असलेले लहानसे लेणे असून याचा दर्शनी भाग तुटलेला आहे. प्रांगणात पाण्याची पोढी आहेत. आत मागील भिंतीपासून वेगळा असलेला अखंड स्तूप असून त्याची छत्री छतातच कोरली आहे. स्तूपावर वेदिकापट्टी व हर्मिका (स्तूपाच्या अंडावरील चौकोनी कठडा) आहेत. हर्मिकेतील यष्टीचा वरील भाग तुटलेला आहे. स्तूप सुंदर कोरलेला असून त्याचे छत सपाट व लेण्याचे विधान काटकोनात आहे. अशाच प्रकारचे स्तूप भाजे, कान्हेरी, नाडसूर (ठाणाळे) व पितळखोरे येथे आहेत.






लेणे क्र. २६ हे चैत्यगृह थोड्या वेगळ्या धाटणीचे आहे. याचे चैत्यगवाक्ष नेहमीप्रमाणे दर्शनी नसून दर्शनी स्तंभांच्या मागे ओसरीत आहे. तत्कालीन कारागीर चैत्यगृहात कसे नवीन प्रयोग करीत असावेत, हे यावरून दिसते. चैत्याच्या दर्शनी भागामध्ये दोन भव्य उंच स्तंभ व बाजूंस अर्धस्तंभ दिसतात. दर्शनी भागाची उंची सुमारे ६.७० मी. आहे. ओसरीच्या मागील भिंतीत खालच्या अर्ध्या भागात प्रवेशद्वार व वरती प्रमाणबद्ध आरपार कोरलेले चैत्यगवाक्ष दिसते. छतावर सु. २ मी. रुंदीचा ठिसूळ दगडांचा थर गेला असल्याने तसेच पाणी झिरपत असल्याने चैत्यगृहाच्या आतील स्तूप व गाभारा बराचसा अपूर्ण अवस्थेत आहे. स्तूपाची हर्मिका फक्त काही प्रमाणात व्यवस्थित कोरली आहे. या अपूर्ण स्तूपावरून तो डेरेदार कसा कोरला जात असावा, याची प्रचीती येते. 
    या लेण्याची चैत्यकमान नुसती विकसित नाही, तर तीला मागच्या बाजुला चौरस गोल छत ही आहे.नेमका याच कारणामुळे चैत्यगृहाचा आकार तुलनेने लहान आहे.या लेण्यात आधी मुखमंडप ( ६ मीटर रुंद ७.६ मीटर उंच) लागतो. मुखमंडप काहीसा बेडसे येथील लेण्यांसारखा आहे.इथे दोन पुर्ण तर दोन भिंतीमध्ये असलेले स्तंभ आहे.मात्र या स्तंभावर बेडसे लेण्यासारखे स्वार दाखवलेले नाहीत.
      या मानमोडी लेणे क्रमांक २६ चा काळ इ.स. पहिल्या शतकाची शेवटची पंचवीस वर्ष असावा. या लेण्याच्या दर्शनी भागावर गोलाकार चैत्यगवाक्ष असल्यामुळे छत गजपृष्टाकार म्हणजे हत्तीच्या पाठीसारखे असेल असे वाटले तरी प्रत्यक्षात छत सपाट आहे.लेण्याच्या कोरण्याच्या शैलीत होत जाणारा बदल इथे सुचीत होतो. चैत्यगृह वरुन खाली आणि पुढून मागे कोरली जातात. त्यामुळे चैत्यगवाक्ष कोरण्याचा फायदा असा होतो कि कोरीवकाम करणार्‍या कारागिरांना आत पुरेसा प्रकाश मिळतो. अजिंठा सारख्या प्रचंड खोल आणि लांब चैत्यगृहे कशी कोरली ? असा प्रश्न तज्ञ लोकांना पडतो.कदाचित लेण्याच्या मुखमंडपात पाणी साठवून त्यावरुन परावर्तित होणार्‍या सुर्यप्रकाशाचा वापर केला जात असावा.दिवे किंवा मशाल यांचे कोणतेही सहाय्य न घेता असे कोरीवकाम अशक्य आहे.पण चैत्यगवाक्ष आधीच कोरल्यास हि यातायात होत नाही. 
 KSP_2636
 
 KSP_6353
 
 KSP_2628
 
 
या एका लेण्यात एकूण ११ कोरीव लेख आहेत. यांतील एका लेखात या डोंगराचे नाव ‘मानमुकड’ (संस्कृत मानमुकुट) असे दिले असून आजही ते ‘मानमोडी’ या अपभ्रष्ट रूपात प्रचलित आहे. इतर लेखांमध्ये येथे निवास करणारा बौद्धभिक्षु-संघ व त्यास ‘गेध विहार’ असे दिलेले संबोधन, अनेक व्यक्तींनी संघाच्या चरितार्थासाठी दिलेल्या जमिनी, दान व इतर संबंधित बाबी यांचा प्रामुख्याने उल्लेख आहे. देणगीदारांत बुरूड (वासाकार), तांबट (कांस्यकार), सोनार (सुवर्णकार) वगैरेंनी जमिनी व पैसे संघास दिल्याचा उल्लेख आहे. तसेच ‘आदुथुमा’ नावाच्या मूळ शक किंवा पार्थियन व्यक्तीने जमिनी दान दिल्याचाही उल्लेख आहे. या लेखांवरून बौद्धभिक्षुसंघास असलेला लोकाश्रय, तत्कालीन सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक परिस्थितीची कल्पना येते.
    लेणे क्र. २७ व २८ चैत्यगृहाच्या उजव्या बाजूस एकाला एक लागून खोदली आहेत. या दोन्हीस ओसरी व मागील बाजूस प्रत्येकी दोन खोल्या, तसेच क्र. २८ ला समोर दोन स्तंभ आहेत. लेणे क्र. २७ मधील शिलालेखानुसार ‘भरुकच्छ’ (भडोच) येथील आससमाचे पुत्र बुद्धमित्र व बुद्धरक्षित यांनी लेण्यातील दोन खोल्या (बिगभं) दान दिल्याचे समजते. लेणे क्र. २८ मधील शिलालेखात गृहपति सयितीचा पुत्र गृहपति शिवदास, त्याची पत्नी आणि त्याचे सर्व नातेवाईक यांनी सदर लेणे दान दिल्याचा उल्लेख आहे.
KSP_2640
    लेणे क्र. २९ अपूर्ण असून स्तंभ कसे कोरले जात, याची पद्धती यावरून समजून येते. याच्या बाहेरील भिंतीत भग्न अवस्थेत उठावात कोरलेल्या स्तूपांचे अवशेष दिसतात. त्याच्या वरच्या बाजूस असणाऱ्या शिलालेखात स्तूप दान देणाऱ्याचा गणाचा आचार्य सुलस याचा शिष्य चेतीय, त्याचा नातू नंदन याने हा स्तूप दान दिल्याचा उल्लेख आढळतो.
    लेणे क्र. ३० हे वरच्या मजल्यावर (लेणे क्र. २१ च्या वर) असून त्यात पाच खोल्या आहेत. वरच्या मजल्यावरील या सलग पाच खोल्यांच्या लेण्यास ३० क्रमांक दिला आहे. या खोल्यांसमोर पूर्वी गच्ची असावी. आज मात्र तिचा बराचसा भाग तुटला आहे.सिमेंटच्या नव्याने बांधलेल्या, दगडी जुन्या पायऱ्यांना जोड देणाऱ्या दगडी जिन्याने आपण पहिल्या मजल्यावर पोहोचतो, पहिल्या खोलीच्या दरवाजाच्या दोन्ही बाजूस मूळ खोदकामात कोनाडे करत मागाहून दोन शिल्पे कोरली आहेत. डावीकडे जैनांचा क्षेत्रपाल, तर उजवीकडे जैन देवी चक्रेश्वरी! चौथ्या खोलीतही जैन शिल्पकाम दिसते. जैनांचे प्रथम र्तीथकर ऋषभनाथ, बावीसावे र्तीथकर नेमिनाथ आणि जैन देवता अंबिकेची मूर्ती इथे आहे. यातील अंबिका आंब्याच्या झाडाखाली बसलेली दाखवली आहे. या देवीवरूनच या गटाला अंबा-अंबिका असे नाव मिळाले.
 
 
 
 
       मूळ लेणे बौद्धकालीन. दोन हजार वर्षांपूर्वी खोदलेले! त्यात आठव्या-नवव्या शतकात ही जैन कला अवतरली आणि त्याहीनंतर केव्हातरी या देवांना हिंदूंनीही आपलेसे केले. कुठल्याही स्थापत्याविष्काराच्या भल्यामोठय़ा कालखंडात असे बदल स्वाभाविक असतात.
     हा सारा इतिहास आहे. कुठल्याही धर्म-जाती-पंथाच्या दृष्टिकोनातून त्याकडे पाहण्यापेक्षा देशाचा वारसा म्हणून पाहिले पाहिजे. या वास्तू राष्ट्रीय संपत्ती समजून त्यांचे जतन व्हायला हवे. पण अनेकदा या वारशामागील देश-राष्ट्र ही भावना नाहीशी होऊन फक्त धर्म-पंथ तेवढे उरतात. या स्थळांना देवत्व बहाल केले जाते आणि मग त्यातून खऱ्या इतिहासाला धोका निर्माण होतो. अंबा-अंबिका लेण्यातील शिल्पांनाही देवत्व बहाल झाल्याने त्यामागील राष्ट्रीय वारशाचा विसर पडून, या मूर्ती-शिल्पांवर हळद-कुंकवाचे थर जमा झाले आहेत. त्यातील अनेकांची झीज झाली आहे.
 KSP_6383
 
 KSP_6362

 KSP_6386

KSP_6369

KSP_6382

KSP_6392

KSP_6393

KSP_6397

या दुमजली लेण्यांच्या पुढे या गटातील चैत्यगृह आहे. त्याच्या दारातील भारदस्त खांब इथे पाऊल ठेवल्यापासून खुणावत राहतात. बेडसे लेण्याची आठवण करून देणारे हे खांब! दोन पूर्ण, तर बाजूचे दोन अर्धव्यक्त! तब्बल पावणेसात मीटर उंचीचे! एका चौथऱ्यावर घट, त्यातून बाहेर आलेले हे अष्टकोनी खांब, त्यावर पुन्हा उपडा कलश! जणू या लेण्याचे सौष्ठवच या स्तंभांतून डोकावते. या खांबांच्या आत ओसरी, त्यानंतर चैत्यगवाक्षाची भिंत आणि त्यापुढे प्रत्यक्ष चैत्यगृह! पण आतील स्तूप कोरत असताना तो खडक ठिसूळ असल्याचे कलाकारांच्या लक्षात आले आणि त्यांनी काम थांबवले.
  या चैत्यगृहात शिरण्यापूर्वी डाव्या हाताला एक छोटेसे लेणे दिसते. आत एक सुंदर स्तूप कोरलेला आहे. चैत्यगृहाच्या शेजारी हा स्तूप का बरे खोदला असावा, असा प्रश्न आत शिरताना पडतो. चैत्यगृहातील अर्धवट काम पाहिले की मग त्यामागचे उत्तर कळते. आतील ही उणीव भरून काढण्यासाठी बाहेर हा स्तूप कोरला असावा.
दुसरीकडे स्तूपाविना रिकाम्या चैत्यगृहाचाही इथे आगळा-वेगळा उपयोग करून घेतला आहे. त्याची दर्शनी भिंत, गवाक्ष कमान, खांब या साऱ्यांवर दहा मोठे ब्राह्मी लिपीतील लेख कोरले आहेत. त्यांतून ही लेणी, त्यात निवास करणारा संघ, त्याला झालेला दानधर्म आदींची विस्तृत माहिती देण्यात आली आहे. या सर्व लेखांचे वाचन झालेले आहे. पण आज मात्र यातले आठच लेख दिसतात. नष्ट झालेले लेख चैत्यगृहातील खांबांवर होते. फार वर्षांपूर्वी या खांबांच्या जतन-संवर्धन प्रक्रियेत त्यांना सिमेंटचा गिलावा चढवला गेला आणि त्यात हे लेख बुजले. नशीब, की हे कृत्य घडण्यापूर्वी ज्येष्ठ पुरातत्त्व अभ्यासक व ब्राह्मी लिपीच्या तज्ज्ञ डॉ. शोभना गोखले यांनी या लेखांचे वाचन नोंदवून ठेवले होते. इतिहासाच्या अभ्यासात अशा नोंदी किती महत्त्वाच्या ठरतात, याचे हे उदाहरण!

        या शिलालेखांतून हा डोंगर, इथली लेणी व इथे राहणाऱ्या भिक्षूंच्या संघाविषयी बरीच माहिती मिळते. या डोंगराचे मूळ नाव ‘मानमुकुड’ (संस्कृत- ‘मानमुकुट’) या लेखावरूनच कळते. आज दोन हजार वर्षांनंतरही हे नाव ‘मानमोडी’ या अपभ्रंश रूपात वापरात आहे. या लेण्यास किंवा इथे निवास करणाऱ्या संघास ‘गिध विहार’ असेही म्हटले जाई, त्याचाही उल्लेख येतो. यातील काही लेखांतून जमिनीच्या दानधर्माचे उल्लेख आहेत. ही जमीन मोजण्यासाठी त्याकाळी ‘निवर्तन’ हे परिमाण वापरले जात असे. आता निवर्तन म्हणजे किती क्षेत्र, हे समजत नाही. या जमिनीवर काही वृक्षलागवडीचे उल्लेखही लेखांत आले आहेत..

‘गामे वलाहकेसुकर
जभति उदेसेण निवत
णानि बारस।। गामसे
उरकेसु निवनणानि’

हे शिलालेख करंज, आंबा, जांभूळ आदी वृक्षांच्या लागवडीबद्दल सांगतात. या वृक्षलागवडीमागेही काही उद्देश असल्याचा अभ्यासकांचा कयास आहे. करंज हा औषधी गुणधर्म असलेला वृक्ष! त्याच्या तेलाचा उपयोग तेव्हा ‘अॅकन्टिसेप्टिक’ म्हणून केला जाई. आंबा-जांभळाच्या लागवडीमागे व्यापारी उद्देश ठेवून इथे राहणारा संघ स्वयंपूर्ण होण्याच्या प्रयत्नात असावा. या जमिनीचे भाग, दिशा, गावांची नोंदही लेखात आहे. जमिनींशिवाय काही पैशांच्या स्वरूपातील देणग्याही यात नोंदवल्या आहेत. त्यांना ‘कार्षांपण’ असे म्हटले जाई. या देणग्या देणाऱ्यांमध्ये बांबूकार म्हणजे बुरूड, कास्यकार म्हणजे तांबट आणि सुवर्णकार म्हणजे सोनार असे विविध थरातील लोक आहेत. यातून या लेणीनिर्माणाला असलेला सामान्य जनतेचा पाठिंबाही दिसतो. तत्कालीन महाराष्ट्रात ही अन्यधर्मीय वास्तुकला कोरली, रुजली व बहरली त्यामागे या सहभागाची मोठी भूमिका आहे. सहिष्णू आणि पुरोगामी महाराष्ट्राच्या या खऱ्याखुऱ्या पाऊलखुणा आहेत.
 
 
      चैत्यगृहातील या ब्राह्मी शिलालेखांच्या मांदियाळीत एक फारसी लेखही आहे. महम्मद अली नावाच्या कुणा व्यक्तीने हिजरी ९८८ (इ. स. १५८०) या दिवशी या स्थळाला भेट दिल्याचा उल्लेख आहे. आपण एखाद्या स्थळी जाऊन आलो, हे स्वत:चे नाव तिथे लिहून ठेवण्याचे जे ‘फॅड’ हल्ली प्रचलित आहे, ते असे बरेच जुने आहे तर!KSP_2637

KSP_2625

KSP_2638

या चैत्यगृहानंतर ओळीने २७, २८ आणि २९ क्रमांकाच्या लेण्या (विहार) येतात. प्रत्येकी दोन खोल्यांचे हे विहार. पुढय़ात ओसरी. पण कालौघात तिचे खांब नष्ट झालेले. नाही म्हणायला तिसऱ्याच्या ओसरीतील या सालंकृत खांबांचे कलावशेष आणि भिंतीत एक भंगलेला स्मारक-स्तूप कसाबसा आपले अस्तित्व टिकवून आहे. पण या खोदकामापेक्षाही इथे लक्ष जाते ते त्यांच्या भिंतीवरील शिलालेखांकडे! त्यातही लेणे क्रमांक २७ वरचा लेख तर पाहण्यासारखाच! दोन्ही खोल्यांच्या मधोमध भिंतीवर एक घासून सपाट जागा केलेली आहे. या आडव्या पट्टीतच कुणा अज्ञात सुलेखनकाराने सुंदर अक्षरांत हा लेख कोरला आहे. सुरुवातीस स्वस्तिक, तर शेवटी श्रीवत्स ही शुभचिन्हे असलेला हा लेख असा-

‘भारुकछकानं लंकुडियानं भातूणं
अससमस पुताण
बुधमितस बुधरखितस च बिगभं देयधंमं’

अर्थ- भरुकच्छ म्हणजे आजच्या गुजरातमधील भडोच येथील अससमचे पुत्र बुधमित व बुधरखित या बंधूंनी या शैलगृहासाठी देणगी दिली आहे. हे दोघे लाकडाचे व्यापारी होते. भडोच हे तत्कालीन व्यापारी बंदर. तिथून निघालेले हे दोघे प्राचीन बाजारपेठ असलेल्या जुन्नरमध्ये आले आणि त्यांनी इथल्या लेण्यांसाठी हा दानधर्म केला आहे. म्हटले तर हा फक्त दानधर्माचा लेख; पण त्यातून तत्कालीन समाज, लोक, त्यांचे व्यवसाय, स्थळ, प्रवास, दळणवळण अशा कितीतरी गोष्टींची माहिती मिळते. म्हणूनच हे शिलालेख इतिहासाची साधने आहेत. एकूणात- लेणी काय किंवा कुठलीही ऐतिहासिक वास्तू काय, ते फक्त इतिहास सांगत नाहीत, तर त्यांच्या अभ्यासातून इतिहास, भूगोल, तत्कालीन समाज, लोक, भाषा, लिपी, चालीरीती, परंपरा अशा कितीतरी गोष्टी उलगडत जातात. शिलालेखांची ही परिभाषा हे न उलगडलेले जग दाखवतात.
 क्र. ३१ ते ३४ लेणी डोंगराच्या वरच्या भागात असून ती अगदीच सामान्य व अपूर्ण आहेत.

        सर्व प्रथम दक्षिणेकडील लेणी समुह पाहुन नंतर जुन्नर शहराच्या दिशेला गेलेल्या पाऊलवाटेने चालत राहिले की याच पाऊल वाटेने दोन्ही समुह पहावयास मिळतात. या लेणी पाहण्यासाठी साधारणतः 3 तास लागतात.परंतु या लेण्या पाहताना शांतता बाळगणे महत्वाचे आहे. कारण येथील लेण्यामध्ये असलेल्या मधमाश्या कॅमेराच्या फ्लॅश व आपल्या आवाजाने उठतात व चावतात. अनेक पर्यटकांवर त्यांनी हल्ला चढविला आहे. त्यामुळे आपण विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.पाण्याची एक बाटली सोबत ठेवावी. मध्यम चढाई असल्याने दमछाक होत नाही. पश्चिमेस उभ्या असलेल्या किल्ले शिवनेरीचे शिवलिंग रूपातील दर्शन मनमोहीत करते. लेण्याद्री गणपती गिरीजात्मजाचे उत्तरेकडे तर हाबसी गोल घुमटाचे पुर्वेकडील दृश्य आपणास आकर्षित केल्या शिवाय राहत नाही.
 

 संदर्भ -

१)  जुन्नर परिसरातील बौद्ध लेणी - सदानंद आपटे
२)   जुन्नर शिवनेरी परिसर - सुरेश वसंत जाधव
३)  लेणी महाराष्ट्राची - दाऊद दळवी
४)   प्राचीन महाराष्ट्र - डॉ श्रीधर व्यंकटेश केतकर (प्र आ १९३५)(दु आ १९८९)
५) https://junnartourism.wordpress.com/2015/06/14
६) https://www.marathibuzz.com/amba-ambika-leni
७) श्री. अभिजित बेल्हेकर,अ‍ॅड हेमंत वडके , केव्हिन स्टँडेज यांचे लिखाण
८) सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो ट्रेकर्स
 
 

 

Update 2017 : Click here for instructions on how to successfully see all three cave complexes on Manmodi Hill in a single visit !

 


You’re welcome to ‘Like’ or add a comment if you enjoyed this blog post. If you’d like to be notified of any new content, why not sign up by clicking the ‘Follow’ button.

If you’re interested in using any of my photography or articles please get in touch. I’m also available for any freelance work worldwide, my duffel bag is always packed ready to go…

KevinStandage1@googlemail.com

No comments:

Post a Comment

Aihole

 आयहोळ येथील डोल्मेन :        सध्या बहुतेक पर्यटक आयहोळला चालुक्यांच्या सुरवातीच्या काळात बांधलेल्या मंदीरांना भेट देण्यासाठी येतात. मात्र ल...