Tuesday, May 10, 2022

राजगुरुनगर

 

भटकंती एका दिवसाची

mulashi

शिवरायांनी आणि जिजाऊमातेने पुण्यामध्ये कसबा गणपतीचे पूजन करून सोन्याचा नांगर फिरवला आणि खरोखरच पुण्याला चांगले दिवस आले. पुढे पेशव्यांनी पुणे हेच राजधानीचे शहर केल्यामुळे तर पुण्याची खरोखर भरभराट झाली. शिक्षणाचे माहेरघर असलेले पुणे आता माहिती तंत्रज्ञानाचे भारतातील अव्वल ठिकाण झाले आहे. पुण्याच्या आसपास कोणत्याही दिशेला केलेली भटकंती ही कायमच आनंददायी असते. इथे किल्ले, लेणी, मंदिरे, अशी वारसास्थळे आहेतच त्याशिवाय नैसर्गिक नवल असलेली ठिकाणे, दाट झाडीत विसावलेली ठिकाणे, जुन्या घाट वाटा अशा गोष्टी सुद्धा सर्वत्र पसरलेल्या आहेत. नेहमीची प्रसिद्ध ठिकाणे तर पहिली जातातच; परंतु त्याचसोबत तेवढीच तोलामोलाची काही अल्पपरिचित ठिकाणे मुद्दाम वेळ काढून पाहिली जावीत हा उद्देश. पुण्याचे भौगोलिक स्थान अगदी वैशिष्ट्यपूर्ण असे आहे. मुंबई, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद ही महत्त्वाची शहरे इथून जवळपास समान अंतरावर आहेत. या ठिकाणी जाणाऱ्या रस्त्यांवर जागोजागी विविध छोटी-मोठी स्थळे आपले स्वतःचे असे खास वैशिष्ट्य जपून आहेत. दोन घटका त्या ठिकाणी थांबून, त्या अनगड ठिकाणांना आवर्जून भेटी द्याव्यात अशा दर्जाची ती ठिकाणे आहेत. सार्वजनिक सेवेवर न विसंबता स्वतःचे वाहन घेऊन भटकंतीला जाणे हे हल्ली अगदी सरसकट सर्वत्र लोकप्रिय झालेले दिसते, त्यामुळे एकाच सहलीमध्ये अनेक ठिकाणे पाहता येतात आणि त्यासाठी आपल्याला हवा तसा वेळ देता येतो, त्यामुळे पुढील ठिकाणे देताना हाच विचार करून ती इथे दिलेली आहेत. याशिवाय देखील अनेक ठिकाणे आपल्याला प्रवासात वाटेवर लागतील. काही स्थानिक मंडळी अजूनही काही ठिकाणांची माहिती आपल्याला देतील. ती सुद्धा आपल्या भटकंतीमधे समाविष्ट करावीत आणि आपले पर्यटन अजून समृद्ध व्हावे. पुण्याच्या पूर्व आणि अग्नेयेचा भाग हा पर्जन्यछायेचा भाग असल्यामुळे या भागात उन्हाळा जरा तीव्र असतो; परंतु पावसाळ्यात इथे अवश्‍य जावे. हवा ढगाळ असते आणि पाउस पडत नाही. अशावेळी प्रवासाचा आनंद लुटता येतो. नगर रस्ता आणि सोलापूर रस्ता आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर असा सगळा प्रदेश यामध्ये समाविष्ट होतो. इथे सुद्धा वैविध्य असलेली स्थळे आपली वाट पाहत उभी आहेत. प्राचीन मंदिरे तर इथे आहेतच परंतु काही निसर्गनवल सुद्धा इथे पाहता येतात.


निघोजचे रांजणखळगे

शिरूरहून नगरला जाताना घोडनदीवर एक पूल लागतो. तो ओलांडून पुढे गेले की डावीकडे निघोजचा फाटा लागतो. तिथून 25 कि. मी. वर निघोज गाव आहे. इथे मळगंगा नदी आणि एक बारव आहे. इथून थोडे पुढे गेले की तिथेच आहे एक भूशास्त्रीय नवल. जमिनीपासून खाली खोलवर कुकडी नदीचं पाणी दिसतं आणि पाण्याच्या दुतर्फा दिसतात काळ्या पाषाणातले असंख्य रांजणखळगे. त्याला शास्त्रीय परिभाषेत “पॉट होल्स’ असे नाव आहे. पाण्याच्या प्रवाहातील भोवरे-दगड-गोटे यांमुळे नदीतळाच्या दगडावर खळगे तयार होतात. त्या खळग्यात अडकून दगडगोटे फिरू लागतात. परत परत तिथे झीज होते आणि खळगे मोठे होत जातात. त्यांना रांजणाचा आकार येतो. कधी कधी शेजारी शेजारी तयार झालेल्या दोन रांजणामधील दगडी भिंत झिजून जाऊन ते एकमेकांशी जोडले जातात. हा निसर्गाविष्कार आवर्जून पाहण्याजोगा आहे. अभ्यासाकांच्यामते हे रांजणखळगे आशिया खंडामधील सर्वात मोठे खळगे आहेत.

सुपे घाटातील प्राचीन पाणपोई
शहाजीराजांनी पुणे व सुपे परगण्याची जहागिरी जिजाऊ साहेब व बालशिवाबावर सोपवली होती. पुणे-सोलापूर रस्त्यावर पाटसहून सुपे गावी जाता येते. सुपे ते कुसेगाव या चार कि. मी. लांबीच्या पुही घाट रस्त्यावर घाटाच्या माथ्यावर यादवकालीन उत्तराभिमुख अशी ही पाणपोई आहे. तीन बाजूंनी प्रशस्त भिंती आणि उत्तरेकडे प्रवेशद्वार अशी इथली रचना. आतमध्ये दगडी खांब व एकावर एक रचलेले दगड यादवकालाची साक्ष देतात. आतल्या भागात एक दगडी रांजण आहे. इथे वनविभाग आता वनीकरण योजना राबवीत आहे. दौंड व बारामती तालुके जोडणारा हा पुही घाट अवश्‍य पाहावा. पुही इथला रांजण, नाणे घाटातील रांजण व पुरंदर किल्ल्याच्या जवळील श्रीनारायाणेश्वर मंदिरातला असाच दगडी रांजण यात काही साम्य दिसते. पुही इथले हे स्थापत्य पाणपोई होती का जकातीचे ठाणे होते हे स्पष्ट होत नाही.

yadnyavarahलोणी भापकरचा यज्ञवराह
जेजुरी मोरगावला भाविकांची तुडुंब गर्दी असते; पण तिथेच जवळ असलेले लोणी भापकर माहीतही नसतं. पुण्याहून अवघ्या 95 कि. मी. वर मोरगाव जवळ हे ठिकाण आहे. इथे एक यादवकालीन मंदिर आहे. त्यासमोर एक अत्यंत देखणी पुष्करणी आहे. इथेच बाजूला शेतात एक आश्‍चर्य दिसते. विष्णूच्या वराह अवतारांपैकी यज्ञवराहाची सुंदर मूर्ती इथे शेतात उभी आहे. याच्या चार पायांशी विष्णूची चार आयुधे दिसतात. वराहाच्या पाठीवर झूल असून, त्यावर अनेक विष्णू प्रतिमा कोरलेल्या आहेत. सदर मंदिरसुद्धा विष्णू मंदिर असावे. सध्या गाभाऱ्यात शिवपिंडी आहे. मंदिरावर उत्कृष्ट वैष्णव शिल्पांची कलाकुसर दिसते. छतावर दगडी झुंबर, देखणे कोरीव खांब यांनी मंदिर समृद्ध आहे. खजुराहोला यज्ञ वराहाचे मंदिर सापडते; पण इथे मात्र ही सुंदर मूर्ती उन्हापावसात एका शेतात उभी आहे.

सोमेश्वर – पिंपरी दुमाला
रांजणगावच्या महागणपतीला वर्षभर भक्तांची रीघ लागलेली असते; पण याच रांजणगावच्या अगदी शेजारी असलेले पिंपरी दुमाला गाव मात्र अजूनही दुर्लक्षितच आहे. पुण्याहून रांजणगावला गेले की मंदिराच्या अलीकडे डाव्या बाजूला रस्ता जातो. तिथून तीन कि.मी. वर पिंपरी दुमाला हे गाव आहे. या गावचे सोमेश्वर मंदिर हे यादवकालीन असे एक सुरेख मंदिर आहे. मंदिरावर यादव स्थापत्याच्या खुणा तर दिसतातच; परंतु उत्तम अशी शिल्पकला या मंदिरावर आहे. मंदिराचा जीर्णोद्धार केला असल्यामुळे काही शिल्पांची, मूर्तींची जागा बदललेली दिसते, तसेच काही वीरगळ सुद्धा भिंतीमध्येच बसवलेले दिसतात; पण भिंतीवरील पुत्रप्रसवा, सापळ्यासारखी दिसणारी चामुण्डा, ही शिल्पे मुद्दाम पाहण्याजोगी. सभामंडपातील खांबावर असणारे श्रीकृष्णाच्या मूर्तीचे शिल्पश्‍लेष (एकाच मूर्तीमधून दिसणाऱ्या विविध मूर्ती) तर केवळ अप्रतिम आहे. मंदिराबाहेरच एक काहीशी झिजलेली विष्णूची नितांत सुंदर मूर्ती ठेवली आहे. मंदिराच्या बाजूलाच एक उतरत गेलेल्या पायऱ्यांची पुष्करणी आहे. तिथेच जवळ एक भग्न असे यज्ञवराहाचे शिल्प पाहायला मिळते. सबंध मंदिर परिसर हा शांत आणि देखणा आहे.

जुन्नर आळेफाटा परिसर
पुण्यापासून नाशिकला जाताना 95 कि. मी. वर असलेला जुन्नर तालुका म्हणजे अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींची अक्षरशः खाण आहे. “जीर्णनगर’ अशी प्राचीन ओळख असलेल्या या परिसराचा संबंध थेट सातवाहन कुलापर्यंत जातो. सातवाहनांची राणी नागनिका हिने नाणेघाटासारख्या अद्वितीय कलाकृतीशेजारीच सुंदर लेणे खोदवून घेतले आणि त्यातील शिलालेखांमुळे सातवाहन कुलाचा सलग इतिहास आपल्यासमोर उघड झाला. जुन्नरपासून अवघ्या 28 कि. मी. वर हे शिल्पलेणे आहे. आजही जुन्नरला अनेक ठिकाणी जुनी नाणी, खापराचे तुकडे मिळत असतात. याचबरोबर जुन्नरच्या आजूबाजूच्या डोंगरांमधून अनेक लेणी कोरलेली आहेत. ज्यात अंबिका, भीमाशंकर, तुळजा, गणेश अशा काही मातब्बर लेण्यांचा उल्लेख करावा लागेल.
मध्ययुगीन कालखंडात सुद्धा जुन्नर ही एक मोठी बाजारपेठ आणि मुघलांचे मोठे ठाणे होतेच. जुन्नरच्या दक्षिणेकडील बुरुजावर एक चित्र कोरलेले आहे त्यात हत्तीच्या पाठीवर पोपट, तर त्याच्यामागे वाघ तोंडात चांदणी धरून उभा आहे. म्हणजेच या शहरात गजांत लक्ष्मी आहे, शुकासारखी विद्वत्ता आणि वैराग्य आहे आणि वाघासारखे पराक्रमी शूर योद्धेही इथे आहेत. खरं तर हे जुन्नरचे बोधचिन्ह व्हायला हवे.


पूरचा कुकडेश्वर

जुन्नरहून आपटाळे मार्गे नाणेघाटाकडे जाताना वाटेत पूर या गावी अतिशय देखणं ठिकाण आहे. कुकडी नदीच्या उगमावरचे कुकडेश्वर. इ. स. नवव्या शतकामध्ये शिलाहारवंशीय झंझ राजाने जी बारा शिवालये उभारली त्यात कुकडी नदीच्या उगमाजवळचे कुकडेश्वर हे एक शिवालय आहे. कालौघात या मंदिराची खूपच पडझड झाली होती; पण आता पुन्हा जीर्णोद्धार करून हे मंदिर जसेच्या तसे बांधले आहे. पाश्‍चिमाभिमुख असलेलं हे मंदिर अनेक शिल्पांनी नटलेले आहे. गणेशपट्टी, कीर्तिमुखे, बह्यभिंतींवर असलेला वराह अवतार, शिवतांडव शिल्प अशी बरीच शिल्पे अगदी आवर्जून पाहण्याजोगी आहेत. मंदिराच्या आजूबाजूला पण काही शिल्पांचे अवशेष मांडून ठेवले आहेत. इथून जवळ असलेले चावंड, जीवधन हे किल्ले, नाणेघाटासारखी अजोड कलाकृती असा हा सगळाच परिसर मनसोक्त भटकण्याचा आहे. गर्द झाडीत, ओढ्याकाठी असणारे हे नितांत रमणीय मंदिर मुद्दाम जाऊन पाहण्यासारखे आहे.

भोरांड्याचे दार
आडवाटेवरची निसर्गरम्य ठिकाणे पाहण्यात खरी मजा आहे. पर्यटकांच्या लोंढ्यापासून वाचलेली तरी पण आपल्या जवळ असणारी अशी ठिकाणे मुद्दाम जाऊन पाहण्यासारखी आहेत. नाणेघाटाच्या जवळ असूनही अपरिचित असलेले हे ठिकाण आहे. सह्याद्रीतून देश व कोकण जोडणारे मार्ग म्हणजे घाट. एका बाजूला सातवाहनांचा नाणेघाट आणि दुसरीकडे माळशेज घाट यांच्या मधोमध आहे भोरांड्याची नाळ. अंजनावळे गावापासून जवळच असलेल्या या घाटमाथ्यावरील प्रवेशद्वारापाशी डोंगराला एक नैसर्गिक दार पडले आहे. हेच ते भोरांड्याचे दार. या प्राचीन घाटवाटेने खाली कोकणात भोरांडे या गावी उतरता येते. समोरच भैरवगडाचे रौद्रभीषण कडे आपल्याला दर्शन देतात. देवदांड्याच्या डोंगरात असलेल्या या निसर्गरम्य ठिकाणी पाण्याची टाकी, प्रचंड घेराचे वृक्ष यांचे अनाघ्रात सौंदर्य पाहण्यासाठी वाट वाकडी करून आवर्जून भेट द्यावी. नाणेघाट-जीवधन या सहलीमध्ये या ठिकाणाचा पण समावेश व्हावा. 1962 साली अलिटालिया कंपनीचे विमान इथे कोसळले होते त्याच्या आठवणी स्थानिक अजूनही सांगतात.


निसर्गरम्य आहुपे

अत्यंत रमणीय ठिकाण, निसर्गाची उधळण, आजूबाजूला डोंगरदरी, जवळच गर्द अशी देवराई, आणि इतकं असूनही पर्यटक काय माणसांची पण वर्दळ अजिबात नाही असं हे ठिकाण म्हणजे आहुपे. घाटमाथ्यावरून कोकणात उतरणारे जे अनेक घाटरस्ते आहेत त्यातलाच हा एक आहुपे घाट. मंचर-घोडेगाव-डिंभे वरून आहुपे हे 52 कि. मी. अंतर आहे. रस्ता वळणावळणाचा. डावीकडे डिंभे जलाशय कायम सोबतीला असतोच. या गावाच्या अलीकडे आहे रम्य देवराई. जवळच आहे वचपे गावचे प्राचीन सिद्धेश्वर मंदिर. अहुप्याच्या अलीकडे असलेल्या पिपरगणे गावातून दुर्ग आणि धाकोबा ही शिखरे दिसतात. अहुप्याच्या अलीकडे एक छोटी देवराई आहे. तिच्या अलीकडे खाली घोड नदीचे उगमस्थान दिसते, तिथे भैरोबाचे मंदिर आणि काही भग्न शिल्पावशेष दिसतात. इथेच एक तुटलेला कडा आहे ज्याला स्थानिक लोक ढग असे म्हणतात. अहुप्यातून घाटवाटेने गेले की पायथ्याचे खोपिवली गाव लागते. समोरच गोरखगड आणि मच्छिंद्र सुळका कायम दर्शन देतो.

रेड्याची समाधी – आळे
निवृत्ती-ज्ञानदेव-सोपान-मुक्ताबाई या संन्याशाच्या पोरांना पुन्हा समाजात येण्यासाठी अनेक दिव्ये पार करावी लागली. पैठणच्या अधिकारी मंडळींकडून शुद्धीपत्र घेण्यासाठी ही भावंडे गेली असता तिथून एक रेडा चालला होता. एका महाभागाने ज्ञानेश्वरांना सांगितले की तू जीवाशिवाचं तत्त्वज्ञान सांगतोस मग या रेड्याच्या मुखातून वेद म्हणवून दाखव. ज्ञानदेवांनी रेड्याच्या डोक्‍यावर हात ठेवला आणि वेदांचे उच्चारण रेड्याच्या मुखातून होऊ लागले. बोपदेवाच्या शुद्धीपत्रानुसार हा प्रसंग माघ शुद्ध 5 , शके 1209 ला घडला. पुढे तो रेडा या भावंडांच्याबरोबरच आळंदीची वाट चालू लागला असता आळेगावाजवळ त्याचे पुण्य संपले व त्याने आपला देह ठेवला. ज्ञानदेवांनी त्याला तिथेच मूठमाती दिली. आळे गावात त्याचे एक मंदिर बांधले आहे. गर्भगृहात समाधीचा दगड हा रेड्याच्या तोंडासारखा आहे. त्याच्याच जवळ ज्ञानदेवांचा मुखवटा आहे. देवळामध्ये अखंड हरीनाम चालू असतो. चैत्र वद्य एकादशीला इथे मोठी जत्र भरते. संत निळोबारायांनी लिहिलेच आहे- येथुनी जाता अलंकापुरीसी । पशु आळीयासी स्थापियेला !!

शिलासेतू गुळंचवाडीचा
हजारो वर्षांच्या प्रक्रियेमधून नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या काही चमत्कृती आपल्या आजूबाजूला सापडतात. कल्याण-नगर रस्त्यावर आळेफाट्याजवळ गुळंचवाडी ची वस्ती आहे. रस्त्याच्या बाजूलाच एक ओढा वहात जातो. ओढ्यामधील पाण्यामुळे दगडाची धूप झाली आणि त्या ओढ्यावरच 21 मीटर लांबीची कमान असलेला 9 मीटर रुंदीचा एक नैसर्गिक पूल तयार झालाय. अग्निजन्य बसाल्ट खडकात तयार झालेला हा एकमेव पूल असावा. या नैर्सर्गिक पुलाच्या खाली आता पाण्याचा साठा असलेला पाझर तलावही बांधलेला आहे. अमेरिकेमध्ये वालुकाश्‍मात नैसर्गिकरीत्या तयार झालेली एक मोठी दगडी कमान आहे. तिथे हजारो लोक आश्‍चर्य म्हणून भेट देतात आणि हे निसर्ग लेणे आपल्या अंगणात असूनही दुर्लक्षित आहे. गुळंचवाडीचा हा निसर्गाविष्कार तयार व्हायला काही हजार वर्षे लागली आहेत. क्रेटाशियस ते इओसीन या कालखंडात तयार झालेले लाव्हाचे थर इथे आहेत. पावसाळा संपता संपता इथे दुपारी किंवा संध्याकाळी आले तर हा निसर्गाविष्कार खळाळत्या पाण्याच्या साथीने पाहायला मोठा रमणीय असतो.

ओतूरचा कपर्दिकेश्वर
आळे फाट्यावरून माळशेज घाटाकडे जाऊ लागले की ओतूर हे गाव लागते. इथे मांडवी नदीच्या काठावर कपर्दिकेश्वराचे सुंदर मंदिर आहे. दगडी बांधणीचे हे मंदिर अंदाजे इ. स. 13 व्या 14 व्या शतकातील असावे. 1990 साली या मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला. श्रावणसरी कोसळत असतानासुद्धा अनेक भाविक इथे महादेवाचे दर्शन घ्यायला आवर्जून येत असतात. अत्यंत सुंदर अशा तांदळाच्या पिंडी करायची इथे प्रथा आहे. श्रावण महिन्यात इथले गुरव डोळे बांधून शिवलिंगावर तांदळाच्या एकावर एक अशा पाच पिंडी तयार करतो. त्यासाठी वापरलेले सगळे तांदूळ सव्वा मण भरतात. हे तांदूळ भाविकांना प्रसाद म्हणून वाटण्यात येतात. इथे नवसाच्या पिंडी वाहण्याची सुद्धा प्रथा आहे. श्रीकपर्दिकेश्वर मंदिराच्या या प्रसन्न वातावरणात भर घालणारे अजून एक स्थान इथे आहे ते म्हणजे तुकाराम महाराजांचे अध्यात्मिक गुरू श्रीचैतन्यप्रभूंची संजीवन समाधी. श्रीचैतन्यप्रभूंनी तुकाराम महाराजांना स्वप्नात दृष्टांत देऊन हे गुरू-शिष्याचे नाते निर्माण झाले अशी कथा सांगतात.

टाकळी-ढोकेश्वरचे गुहामंदिर
खोदीव गुहांसाठी केवळ पश्‍चिम महाराष्ट्रच प्रसिद्ध आहे असे नसून, नगर जिल्ह्यातसुद्धा आपल्याला या अशा खोदीव गुहा पाहायला मिळतात. नितांत सुंदर ठिकाण असूनही पर्यटकांची काहीच वर्दळ नसलेल्या या ठिकाणी मुद्दाम भेट द्यायला हवी. नगरासून जेमतेम 32 कि.मी अंतरावर पारनेर तालुक्‍यातील टाकळी गावाजवळच असलेल्या डोंगरात हे एक सुंदर गुहा मंदिर आहे. इ. स. 5 वे- 6 वे शतक हा त्याच्या निर्मितीचा काळ असावा. डोंगराच्या अर्ध्या चढणीवर ही लेणी असून, तिथपर्यंत जायला पायऱ्या आहेत. मुख्य लेण्याचा दालनासमोर चौकोनी शीर्ष असलेले दोन स्तंभ व दोन अर्धस्तंभ आहेत. लेण्यातील भिंतीवर गजलक्ष्मीचे शिल्प आहे. भिंतीवर हातात फुले घेतलेल्या दोन द्वारपालांची शिल्पे असून, त्यांच्या डोक्‍यामागील प्रभामंडळ आणि त्यांच्या वर असलेले विद्याधर केवळ पाहण्याजोगे आहेत. लेण्यांच्या दक्षिण भिंतीवर सप्तमातृका व गणेश दिसतात. त्यांच्या शेवटी वीरभद्राची प्रतिमा आहे. गर्भगृहामध्ये शिवलिंगावर मानवी चेहरा असलेला तांब्याचा मुखवटा आहे.

ताम्हिणी-माणगाव परिसर
पुण्याहून कोकणात जाण्यासाठी पौड-मुळशी मार्गे ताम्हिणी घाट रस्ता हा एक नवीन रस्ता सुरू झाला. तुलनेनी उंचीला कमी असलेल्या या घाटाचा परिसर मात्र अत्यंत रमणीय आहे. कोणत्याही ऋतूमध्ये गेले तरीसुद्धा हा परिसर सुखावणारा असतो. मुख्यत्वे पावसाळ्यात तर इथे अवश्‍य जावे. अंधारबनचा सुंदर ट्रेक आणि परिसरात कोसळणारे असंख्य धबधबे आपले पाय जागीच खिळवून ठेवतात. या परिसरातसुद्धा वेगवेगळ्या गोष्टींचा खजिना दडला आहे.

पोर्तुगीज घंटा – पळसे
ताम्हिणी घाटामुळे कोकणात जायला पुणेकरांना एक जवळचा मार्ग मिळाला आहे. पौड-मुळशी सोडून पुढे गेले की गोनवडी गावाच्या नंतर उजव्या हाताला पळसे हे गाव लागते. एका बाजूला डोंगररांग आणि दुसरीकडे सेनापती बापट जलाशय या मध्ये हे गाव वसले आहे. मुख्य रस्त्याच्या उजवीकडे एक छोटासा रस्ता गावात जातो. तो थेट शिवमंदिरापर्यंत जातो. मंदिराच्या दारातच एक मोठी मिश्र धातूची घंटा टांगून ठेवली आहे. खास पोर्तुगीज बांधणीची ही घंटा असून, त्यावर क्रॉसचे चिन्ह आहे. त्याखाली रोमन लिपीमध्ये काही मजकूर लिहिलेला स्पष्टपणे दिसतो. घंटेचा नाद खूपच सुरेख आहे. चिमाजी अप्पांच्या काळात वसईहून आणलेल्या अनेक घंटापैकीच ही एक घंटा असणार. मुद्दाम थांबून पाहावी अशी ही गोष्ट आहे. ऐन पावसाळ्यामध्ये इथे कोसळणारे असंख्य धबधबे पाय खिळवून ठेवतात.

निसर्गरम्य अंधारबन
सध्याच्या जगात जंगले, वने यांची बेसुमार होणारी कत्तल पाहिली की अंधारबन नावाची काही गोष्ट अस्तित्वात असेल यावर विश्वासच बसत नाही; पण अशी गोष्ट पुण्याच्या जवळच आहे. गर्द रान आहे, दिवसा पण अंधार पडेल एवढी झाडे अजूनही आहेत. ताम्हिणी घाटाच्या अलीकडे लोणावळ्याला जाणारा फाटा आहे. इथून उजवीकडे दोन कि. मी. अंतरावर एक बांधलेला तलाव दिसतो. इथूनच सुरू होते अंधारबनची वाट. समोरच्या डोंगरावरील गर्द झाडी खुणावत असते. वाटेतच नावजी बलकवडे यांचे स्मारक आहे. राजाराम महाराजांच्या काळात याच नावजीने तानाजीसारखाच सिंहगड जिकून घेतला होता. पुढे आपण निबिड रानातून चालत असतो. जांभूळ-हिरडा-आंबा-उंबर-गेळ अशी मातब्बर मंडळी वाटेत भेटतात. वर्षाऋतूमध्ये इथे असंख्य रानफुले, भूछत्रे यांची केवळ गर्दी दिसते. हा रस्ता पुढे हिरडी गावामार्गे गाढवलोट घाटाने भिरा किंवा नागशेतला उतरतो. नागशेतला सुंदर कोंड आहे. तासांची ही पायपीट नितांत रमणीय आहे. कुंडलिका खोऱ्याचा परिसर इथून फारच सुरेख दिसतो.

ताम्हिणीची विंझाई देवी
चांद्रसेनीय कायस्थ प्रभू मंडळींची कुलदेवता असणारी श्रीविंझाईदेवी हे ताम्हिणी गावचे एक जागृत देवस्थान आहे. समुद्रसपाटी पासून 438 मीटर उंचीवर असणारे हे ठिकाण दाट झाडी आणि आल्हाददायक हवेमुळे अतिशय रमणीय असे आहे. पुणे माणगाव रस्त्यावर ताम्हिणी घाटाच्या अलीकडे असलेले हे एक रम्य ठिकाण आहे. श्रीविंझाईदेवी देवस्थानने इथे भक्तांसाठी राहण्याची व्यवस्थासुद्धा केली आहे. पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकावरून इथे जाण्यासाठी दिवसभर बस उपलब्ध असतात. 21 नोव्हेंबर 1991 रोजी त्रिपुरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर या देवस्थानच्या जीर्णोद्धारास सुरुवात झाली. इथे निसर्गाचे लोभस रूप पाहायचे असेल तर पावसाळा संपताना यावे. सर्वत्र हिरवेगार गालिचे आणि आजूबाजूला कोसळणारे असंख्य धबधबे आपले पाय खिळवून ठेवतात. जुळा आणि नीळा नद्यांचा संगम ताम्हिणी गावाजवळ होतो. ते पाणी पुढे मुळशी जलाशयामध्ये जमा होते.

नागशेतची रांजणकुंड
रांजणकुंड हा एक खरोखरीच पाहण्याजोगा निसर्गचमत्कार आहे. रांजणकुंड म्हटले की डोळ्यासमोर चटकन निघोज हे नाव येते. कारण तिथले रांजणकुंड आता बऱ्यापैकी प्रसिद्ध झालेले आहेत; परंतु नागशेत हे ठिकाण सुद्धा असेच अत्यंत रमणीय आहे आणि इथले रांजणकुंड सुद्धा मुद्दाम पाहण्याजोगे असे आहेत. पुण्याहून ताम्हिणी घाट उतरून गेल्यावर एक रस्ता कोलाड या गावाकडे जातो. त्या दिशेने गेल्यावर पुन्हा एक रस्ता गणपती पालीच्या दिशेने जातो. त्या रस्त्यावर नागशेत नावाचे गाव आहे. गावापासून पुढे अंदाजे दोन कि. मी. वर नागशेतची कोंड आहे. कोंड म्हणजे जमिनीच्या पातळीच्या बरेच खाली पडलेली मोठ्ठी घळ. इथून काळ नदी वाहते. भूपृष्ठाच्या खाली जवळजवळ 15 ते 25 फूट खोलवर नदीचे पाणी दिसते. पाण्याच्या दोन्ही बाजूंनी रांजणकुंडे दिसतात. त्यांना शास्त्रीय भाषेत “पॉट होल्स’ असे म्हणतात. पाण्याच्या प्रवाहातील भोवरे, दगड-गोटे यामुळे नदीतळाच्या पत्थरावर खळगे तयार होतात. त्या खळग्यात अडकून दगडगोटे फिरू लागतात. त्यांची अजून झीज होते आणि त्यांना रांजणाचा अथवा कुंडांचा आकार येतो. हा निसर्गअविष्कार आवर्जून पाहण्याजोगा आहे. या ठिकाणी एक कोंडाई देवीचे छोटेखानी देऊळसुद्धा आहे. ठाकरे घराण्याची उपास्य देवता असल्यामुळे इथपर्यंत चांगला रस्ता केलेला आहे. मात्र इथे काही ठिकाणची खोली खूपच असल्यामुळे काळजी घ्यावी लागते. डोंगरमित्रांसाठी इथे यायला एक सुंदर रस्ता आहे. अंधारबनच्या जंगलातून एक रस्ता गाढवलोट घाटमार्गे नागशेतच्या कोंडावर उतरतो. तो सगळाच रस्ता अत्यंत गर्द झाडीमधून येतो. पावसाळा संपल्यावर भरपूर फुललेली फुले आणि आजूबाजूचा हिरवागार निसर्ग इथून फारच सुंदर दिसतो.

खंडाळा-कर्जत-अलिबाग परिसर
पुणे मुंबई मार्गावर असलेला खंडाळा घाट हा कायमच पर्यटकांचे आकर्षण राहिला आहे. लोहगड-विसापूर राजमाची हे किल्ले आणि ड्यूक्‍स नोज सारखी ठिकाणे, भुशी धरण ही तर खास गर्दीची ठिकाणे; परंतु इथे सुद्धा काही आगळीवेगळी ठिकाणे आहेत जी मुद्दाम पाहिली पाहिजेत पण पर्यटक फारसे फिरकत नाहीत. यावेळी आवर्जून तिथे भेट द्यावी. निसर्गाचे काही वेगळेच रूप बघण्याची संधी मिळेल.


वडगाव विजयाचे स्मारक

14 जानेवारी 1779 रोजी महादजी शिंद्यांच्या नेतृत्वाखालील मराठी सैन्याने ऐन पुण्याच्या जवळ वडगाव मावळ येथे मुजोर ब्रिटीश फौजांची धूळधाण उडवली. भीवराव पानश्‍यांचा तोफखाना आणि तुकोजी होळकर, हरिपंत फडके यांच्या पराक्रमाने ब्रिटिश सैन्य नामोहरम झाले आणि ऐतिहासिक वडगावचा तह अस्तित्वात आला. आपल्या देशात परकीयांच्या विजयाची स्मारके आहेत; पण मराठी सैन्याच्या विजयाची स्मारके तुरळकच. पुणे-मुंबई जुन्या हमरस्त्यावर वडगाव मावळ गावात आता एक स्मारक उभारले आहे. महादजी शिंद्यांचा पुतळा आणि बाजूला बगीचा असे हे स्मारक आहे. ते आवर्जून पाहिले पाहिजे. त्याचा प्रचार केला गेला पाहिजे. याच लढाईत मारला गेलेला ब्रिटिश आधिकारी कॅप्टन जेम्स स्टुअर्ट याचे मुंडके उडून शेतात पडले तिथे एक चौथरा उभारला आहे आणि तिथे फक्कडबाबाचा उत्सव साजरा केला जातो. नवसाला पावणारे ठिकाण म्हणून आमचीच माणसे त्याची पूजा करतात. लोक मराठी सैन्याच्या विजयाच्या आठवणी विसरून परक्‍याची पूजा करतात यापेक्षा अजून दुर्दैव ते काय असणार !!

शेलारवाडीचा घोरवडेश्वर
पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर सोमाटणे फाट्याच्या जवळच्या डोंगरावर शेलारवाडीची लेणी आहेत. या लेण्यांमध्ये वसला आहे श्रीदेव घोरवडेश्वर. रस्त्याच्या डाव्या बाजूला कमान आणि तिथून पायऱ्यांची वाट डोंगरावर जाते. तिथून वर चढून आल्यावर 11 लेण्यांचा समूह दिसतो आणि त्याच्या आसपास 28 पाण्याची टाकीही खोदलेली आहेत. इ. स.च्या तिसऱ्या शतकात या लेण्यांची निर्मिती झाली. यातल्याच एका लेण्यात घोरवडेश्वराची पिंड आहे. इथल्या भिंतीवर ब्राह्मी लिपिमधील एक शिलालेख कोरलेला आहे. आजूबाजूच्या शेलारवाडी, गहुंजे, शिरगाव, धामण, साळूम्ब्रे अशा गावामधून हजारो शिवभक्त महाशिवरात्रीला इथे येतात. 1981 साली घोरवडेश्वर पंचक्रोशी मंडळाची स्थापना झाली. तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर अशा किल्ल्यांच्या ऐन मध्ये असलेला घोरवडेश्वर परिसर भर पावसाळ्यात हिरवागार आणि अत्यंत मोहक दिसतो. असंख्य धबधबे आणि खालीपर्यंत उतरलेले ढग आपले पाय खिळवून ठेवतात.

संदर्भ व सौजन्य : आशुतोष बापट

राजगुरूनगर मधील 'दिलावरखान गुंबज'



आपल्या महाराष्ट्रात अशी अनेक गावे आहेत जिथे  विविध कालखंडातील इतिहासाच्या पाऊलखुणा लपलेल्या आहेत अश्याच इतिहासाच्या पाऊलखुणांचा माग घेत आपण येऊन पोहोचतो ते पुण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर वसलेल्या 'राजगुरूनगर' या गावामध्ये. या 'राजगुरुनगर' गावाचे जुने नाव हे 'खेड' होते प्राचीन काळामध्ये या गावाचा उल्लेख खेटक असा येतो तर याच गावातील 'सिद्धेश्वर' मंदिरामध्ये असलेल्या एका शिलालेखात 'खेट' असा उल्लेख सापडतो. 

खेड हे गाव हुतात्मा 'राजगुरू' यांचे जन्मस्थान देखील आहे त्यामुळेच 'खेड' गावाचे नाव आता 'राजगुरुनगर' असे करण्यात आले आहे. याच गावामध्ये निजामशाही काळात सेनापती 'दिलावर खान' आणि त्याचा भाऊ यांच्या कबरी असून त्यावर एक उत्कृष्ट घुमट बांधलेला आहे. हाच घुमट आज संपूर्ण राजगुरुनगर परिसरात 'दिलावरखान गुंबज' किंवा 'हजरत दिलावरखान दर्गाह' या नावाने ओळखला जातो.   

निजामशाही काळातील वास्तूकलेचे उदाहरण  असलेला 'दिलावरखान गुंबज' 

राजगुरुनगर मधील हि ऐतिहासिक वास्तू जर पाहायची असेल तर राजगुरुनगर बस  स्थानकापासून हि वास्तू अगदी जवळ आहे. साधारणपणे ४०० वर्षे जुनी असलेली हि वास्तू आज 'आर्किओलॉजी सर्व्हे ऑफ इंडिया' यांच्या देखरेखीखाली आहे. निजामशाही सेनापती 'दिलावरखान' आणि त्याचा भाऊ यांच्या कबरी या सुंदर वास्तुमध्ये आपल्याला पहायला मिळतात. या निजामशाही कालीन वास्तूच्या प्रवेश द्वाराच्या चौकटीवर आपल्याला फारसी लेख पहायला मिळतो. या लेखाची सुरुवात हि 'ला इलाही इल्लाहलाह मुहमद रसुलुल्लाह' या वाक्याने झालेली आपल्याला पहायला मिळते.

तसेच त्याखाली असलेल्या लेखामध्ये आपल्याला 'रहमतके हक शुद बर खजा दिलावरखाना मुक्काम दरमयानी मिसरबाग व बहकजुई' अशी वाक्य आपल्याला दिसतात. याचा अर्थ पुढीलप्रमाणे उद्यानात पाण्याचा पाट जसा कायम वाहत असतो, तशी या बागेत विसावणाऱ्या दिलावरखानावर परमेश्वराची कृपा कायम राहो'. या वरील शिलालेखातील काळाचा उल्लेख हा हिजरी सन १०२२ म्हणजे इ.स. १६१३ मध्ये हि वास्तू बांधली असावी असे दिसून येते. दिलावर खानाच्या गुंबजाची जागा ही पाच एकर परिसरात आहे. 

'ला इलाही इल्लाहलाह मुहमद रसुलुल्लाह' आणि 'रहमतके हक शुद बर खजा दिलावरखाना मुक्काम दरमयानी मिसरबाग व बहकजुई' अशी वाक्य आपल्याला दिसतात.


निजामशाही कलास्थापत्यामधील ही एक सुंदर वास्तू आपल्याला राजगुरुनगर येथे बघायला मिळते. अत्यंत सुंदर असलेल्या या घुमटाच्या भोवती केलेले कोरीवकाम लक्षवेधी आहे. या वास्तू मध्ये वेलबुट्टी केलेले नक्षीकाम जास्त भावते. तसेच पूर्वी येथे बाग देखील असावी हे तेथील अवशेषांवरून आपल्याला समजते. तसेच या गुंबजाच्या आजूबाजूने बांधलेली मध्ययुगीन ढासळलेल्या तटबंदीचे अवशेष देखील आपल्याला दिसून येतात. दिलावर खानाच्या गुंबजाच्या बाजूला बांधलेले छोटे मिनार हे देखील वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

दिलावर खान गुंबजाच्या आतील बाजूस जास्त काही नक्षीकाम आढळून मात्र येत नाही. या संपूर्ण पाच एकर असलेल्या परिसरातील देखण्या वास्तूभोवती आपल्याला बावडी देखील दिसून येते. 'आर्किओलॉजी सर्व्हे ऑफ इंडिया मुंबई सर्कल प्रोटेक्टेड हिस्टोरिकल मोनुमेंट' यांच्या नियमानुसार ही वास्तू मुंबई सर्कल यांच्या अंतर्गत १८ क्रमांकावर असून एवढ्यातच या वास्तूचे थोडेफार संवर्धन केलेले आहे. निजामशाही काळातील अप्रतिम वास्तुकलेचे उदाहरण असलेला हा 'दिलावरखान गुंबज' आजही उपेक्षित आहे.

'दिलावरखान' आणि त्याचा भाऊ यांच्या कबरी

____________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-
१) मुंबई गॅझेटीयर (Bombay Presidency) खंड १८, भाग ३ रा इ.स. १८८५.
२) The political geography of the Deccan Sultanates prevented it to flourish and exist in rigid isolation. (Research Paper)
३) मध्ययुगीन कालखंड- महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक महामंडळ.
४) Protected Historical Monuments:- Press Information Bureau Government of India Ministry of Culture.

कसे जाल:-

पुणे - नाशिकफाटा - भोसरी - चाकण - राजगुरुनगर.

टीप:- 
पुणे येथील शिवाजीनगर बस स्थानकामधून रोज पुणे - नाशिक जाणारी बस हि राजगुरुनगर येथे थांबते तसेच पुण्यामधून कार्पोरेशन येथील स्थानकावरून पुणे - राजगुरुनगर अशी पी.एम.पी ची बससेवा देखील उपलब्ध आहे.

 

खेडचे पश्चिमरंग

या गावातीलच जोशी घराण्यातील लाडुबाई यांचा विवाह थोरल्या बाजीरावांशी झाला.

(संग्रहित छायाचित्र)
ओंकार वर्तले

सरत्या पावसाळ्यात जर तुम्ही आडवाटेवरची ठिकाणे शोधत असाल तर पुणे जिल्ह्य़ातील खेड तालुक्याच्या पश्चिम भागात जायलाच हवे. निसर्गाने अगदी भरभरून दान दिलेल्या या तालुक्यात भटकंतीच्या ठिकाणांची अगदी मनसोक्त उधळण आहे. काहीशा आडवाटेवरच्या परंतु तेवढय़ाच तोलामापाच्या आणि काही अल्पपरिचित ठिकाणांनी समृद्ध असलेल्या या भागात फिरण्याची मजा काही औरच आहे.

खेड म्हणजेच राजगुरूनगर पुणे-नाशिक रस्त्यावर वसलेले तालुक्याचे ठिकाण. येथून वाडा गावाकडे जाणारा रस्ता पकडायचा. महामार्गापासून जसजसे पश्चिमेला जाऊ तसे निसर्गाचे बदलेले स्वरूप डोळ्यांना जाणवल्याशिवाय राहणार नाही. गर्द होत गेलेली व डोळ्यांना सुखवणारी वनराई, ग्रामीण बाजाचं जनजीवन, चहुबाजूंनी वेढलेल्या डोंगररांगा यामध्ये चाललेली आपली वाटचाल ही स्वप्नवत असते. हा सारा भाग सह्य़ाद्रीच्या कुशीत वसला असल्यामुळे या भागाला इतिहासाचीदेखील झालर लाभली आहे.

या रस्त्यावरून आपल्याला पहिल्यांदा लागते ते चास गाव. ऐतिहासिक आणि भौगोलिक अशा दोन्ही बाबींनी समृद्ध असलेले. कौटुंबिक भटकंतीसाठी सुरेख ठिकाण. भीमा नदीच्या तीरावर वसलेले हे गाव म्हणजे थोरले बाजीराव पेशवे यांची सासुरवाडी. या गावातीलच जोशी घराण्यातील लाडुबाई यांचा विवाह थोरल्या बाजीरावांशी झाला. विवाहानंतर त्यांचे नाव काशीबाई असे झाले. त्यांचे वडील महादजी कृष्ण जोशी हे पेशव्यांचे सावकार होते. चास गावात आजही त्यांचा वाडा पाहावयास मिळतो. याशिवाय पेशव्यांनी भीमा नदीवर बांधलेला घाटदेखील पाहता येतो. जुनी मंदिरे, प्राचीन वाडे हे चासचे वैशिष्टय़. येथील शंकराचे प्राचीन मंदिर सोमेश्वर हे आणखी वेगळे आकर्षण! मंदिर स्थापत्यातील उत्कृष्ट नमुना असलेल्या मंदिराची दीपमाळ आवर्जून पाहण्यासारखी आहे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट दीपमाळेत तिची गणना होते. एकूण २५६ दिवे लावता येतील अशी ही दीपमाळ एरवीदेखील सुरेख दिसतेच, पण त्रिपुरारी पौर्णिमेला तिचे सौंदर्य आणखीनच खुलून येते. तो सोहळा अत्यंत नयनरम्य असतो. मात्र त्यासाठी त्रिपुरारी पौर्णिमेला तेथे हजर असायला हवे.

चासनंतर लागतो तो चासकमान जलाशय. या भागातील जनतेसाठी जीवनदायिनी ठरलेला हा जलप्रकल्प म्हणजे आधुनिक मंदिरच होय. त्याच्या काठावर उभे राहून लांबवर पसरलेले निळेशार जलसौंदर्य पाहात राहण्यात काही औरच मजा आहे. चहुबाजूंनी डोंगरांच्या कोंदणात वसलेला हा जलाशय मनाला आनंद देऊन जाते. या धरणाच्या कडेकडेने आपला रस्ता पुढे जात राहतो. हळूहळू डोंगर आपल्या भोवतीचा विळखा अधिकच घट्ट करत जातात. पावसाळ्यात तर हे दृश्य आणखीनच रम्य असते. हिरवेगार डोंगर व या डोंगरांना लगडलेल्या धबधब्यांच्या पांढऱ्याशुभ्र माळा हे चित्र आवर्जून अनुभवावे असेच आहे.

मजल दरमजल करत आपण एका फाटय़ापाशी येऊन थांबतो. येथून डावीकडचा रस्ता भोरगिरीला जातो, तर उजव्या बाजूचा रस्ता भीमाशंकरला. भीमाशंकरचा रस्ता खडय़ा चढाचा आहे. या वाटेवर असणाऱ्या मंदोशी गावात आपल्याला जायचं आहे. हे गाव म्हणजे गाव कमी आणि निसर्गचित्रच अधिक आहे. येथील धबधबा प्रसिद्ध आहे. डोंगरमाथ्यावरून कोसळणारा जलप्रवाह येथील मूळ सौंदर्यात भर घालतो. हा धबधबा देखणा तर आहेच, शिवाय मनसोक्त भिजवणारा आहे. अगदी रस्त्यावरूनच त्याचे दर्शन होते. कडेला गाडी लावून चालत दहा मिनिटांत आपण हा धबधबा गाठू शकतो. अर्थातच सर्वच धबधब्यांवर जाताना जी काळजी घ्यायची तीच येथे देखील घ्यावी लागेल.

मंदोशीवरून पुन्हा मागे येऊन भोरगिरीकडे जाणारी वाट पकडायची. सात-आठ किलोमीटरवर असलेले भोरगिरी म्हणजे येथील भटकंतीचा उत्कर्षबिंदूच म्हणायला हवा.

भोरगिरी किल्ल्याशेजारून एक वाट भीमाशंकरला जाते. पावसाळी भटकंतीत ही वाट एकदा तरी अनुभवावी अशीच आहे. निसर्ग आपल्याला किती भरभरून देतो हे या वाटेशिवाय तुम्हाला कळणार नाही. तीन-साडेतीन तासांच्या डोंगरभटकंतीत निसर्गाचे जे काही रूप दिसते ते आयुष्यभर पुरून उरेल, असे असते. असे हे खेड तालुक्याचे पश्चिमरंग! येथला कोपरा न् कोपरा देखणा आहे. कॅलिडोस्कोपमधल्या रंगसंगतीसारखा.

 

भोरगिरी

या ठिकाणाला धार्मिक संदर्भ तर आहेतच, पण निसर्गानेही भरभरून दिले आहे. गावाजवळच भोरगिरी नावाचा प्राचीन किल्ला आहे. राजा भोज याने निर्मिलेला हा किल्ला पावसाळ्यात खुलून येतो. किल्ल्यावर लेणीवजा गुहा असून त्यामध्ये एक शंकराची पिंड आहे. विशेष म्हणजे यावर बारा ज्योतिर्लिगांच्या पिंडी आहेत. याबद्दल गावातील लोक अनेक आख्यायिका सांगतात.

ovartale@gmail.com

 

ह्या कार्यक्रमांतर्गत खाली नमूद केलेल्या ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन त्यांचा संक्षिप्त इतिहास , वैशिष्ट्ये आणि वास्तुरचनेबाबत मार्गदर्शन करण्यात येईल -

१ - शनी मंदिर
२ - दिलावर खानाचा घुमट
३ - दिलावर खानाचे धरण
४ - जुना मोटार स्टॅन्ड
५ - हुतात्मा राजगुरू पुतळा
६ - हुतात्मा स्मारक
७ - सिद्धेश्वर मंदिर
८ - उमामहेश्वर मंदिर
९ - राजगुरू वाडा
१० - रामेश्वर मंदिर
११ - विष्णू मंदिर
१२ - केदारेश्वर मंदिर

कार्यक्रमाची वेळ - सकाळी ८.३० वाजता
एकून चालवायचे अंतर : ३ km
एकूण लागणार वेळ - २ ते २.३० तास
स्थळांचा नकाशा - https://goo.gl/XDtuHN

टीप -
१ - 'Heritage Walk Rajgurunagar' ची सुरुवात शनी-मारुती मंदिरापासून सकाळी ठीक ८:३० ला होईल आणि सांगता केदारेश्वर मंदिरात १०:३० पर्यंत
२ - सदर कार्यक्रम विनामूल्य आहे .
३- नावनोंदणी करण्यासाठी पुढील लिंकवर जाऊन नाव आणि मोबाईल नंबर टाकावा - https://goo.gl/forms/qPuaatlObqFhdQJg1
४ - कार्यक्रमाबाबत अधिक माहितीसाठी संपर्क - ९८८१९८९११८

 

निमगावची ऐतिहासिक गढी

Codingest

भिमानदीच्या निळ्याभोर पाण्याच्या प्रवाहाला खेटूनच ही निमगावची ऐतिहासिक गढी आहे.

कोरोना संसर्ग प्रमाण कमी झाल्याने व नुकतीच या आजारावर लस आल्याच्या वृत्ताने जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. दि.१६ जानेवारी २०२१ ला सकाळी ८ वाजता मी पुण्याहून (कात्रज) येथून चाकणला निवासी असणारे आमचे लेखक मित्र श्री.मनोहर मोहरे यांच्याकडे निघालो. भेटीचे नियोजन व इतर चर्चा अगोदरच झाली होती. कात्रज मधेच एका दिवसाचा ७० रुपयेचा बसचा पास घेतला. सकाळी ९ वा.भोसरी येथे पोहोचलो तर राजगुरुनगरला जाणारी बस त्वरित मिळाली. आंबेठाण चौकात ९:४५ ला पोहोचलो. मग मोहरे सरांना मी तेथे उतरल्याचे चलभाषवरून कळविले व ते लगेचच दुचाकी घेऊन आले. मग आमचा दुचाकीचा प्रवास सुरू झाला. भिमानदी पार करून निमगाव येथे पोहोचलो. राजगुरुनगर पासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. गावाचे प्रवेशद्वारासमोर असलेल्या उपहारगृहात गरमा गरम चहा घेतला व प्रवासाचा काहीसा आलेला थकवा घालविला. मग गावातील ऐतिहासिक गढी/ वाडा पाहण्यास निघालो. पूर्वीच्याकाळी संपूर्ण गावाला तटबंदी असावी हे पुरातन गाव प्रवेशद्वाराहून निश्चित होते. शिरुर, राजगुरुनगर या तालुक्यातील बहुतेक गावांना तटबंदी असल्याचे अवशेष आजही दिसून येतात. निमगाव हे सर्वदूर परिचित आहे ते येथे असलेल्या श्री खंडोबा देवस्थानासाठी पण ही ऐतिहासिक गढी सामान्यजनांपर्यत पोहोचली नाही किंवा काय? हा प्रश्नच आहे.

भिमानदीच्या निळ्याभोर पाण्याच्या प्रवाहाला खेटूनच ही ऐतिहासिक वास्तू आहे. नदीच्या तीरावर दुतर्फा विविध वृक्षांची मांदयाळी असून हिरवाईने नटलेल्या भागातील घडिव दगडी बांधकामातील वाड्याची तटबंदी पाहताच मनाला अतिशय आनंद होतो. राजगुरुनगर हा तालुका प्रामुख्याने अनेक ऐतिहासिक वाडे व प्राचीन मंदिरांसाठी ओळखला जातो. वाफगांवचा होळकर भुईकोट, श्रीमंत सरदार दमाजी गायकवाड वाडा दावडी, चंद्रचूड वाडा कन्हेरसर व निमगाव इत्यादी महत्त्वाची ठिकाणे या तालुक्यात येतात तर ब्रिटिशांच्या विरूध्द आपले बलिदान देणारे भगतसिंग, सुखदेव व राजगुरु यापैकी राजगुरु हे तालुक्याच्या गावचे मूळ निवासी. भक्कम तटबंदी, चारही बाजूस असलेले बुरूज व उत्तराभिमुख तीस फूट उंचीच्या भव्य मुख्य प्रवेशद्वारासमोर उभे राहिल्यावर नकळत मन इतिहासात जाते. छत्रपति शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करून सुराज्य निर्माण केले ते सर्वसामान्य मावळ्यांच्या व सह्याद्रीच्या सहकार्याने. 'औत धरणारे, राऊत झाले' हे छत्रपतींच्या प्रेरणेमुळे हा गौरवशाली इतिहास आहे. छत्रपतींच्यानंतर स्वराज्याचे एका साम्राज्यात रूपांतर करण्यात अठराव्या शतकात मराठी माणसाने दिलेले योगदान इतिहास पुरूषाने पाहिले आहे. अठरावे शतक हे अनेक घराण्याच्या पराक्रमांचे, शौर्याचे व कर्तृत्वाचे आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या काळात सुभेदार मल्हारराव होळकरांचे कर्तृत्व बहरास आले. याच दरम्यानच्या काळात कन्हेरसर व निमगाव येथील चंद्रचूड हे घराणे नावलौकिक मिळवून होते. सुभेदारांच्या उर्जित काळात यशवंतराव चंद्रचूड यांचे बाजी व गंगाधर हे पुत्र स्वकर्तृत्वाने प्रसिद्धीस आले होते. गंगाधर यांनी सुभेदार होळकर यांच्याकडून फडणिशी मिळविली होती. ह्या गंगाधररावांनी हा निमगावाचा वाडा बांधला असावा मात्र निश्चितपणे कोणत्या वर्षी बांधला हे ज्ञात होत नाही.( गंगाधर चंद्रचूड यांच्या ऐतिहासिक आढावा कन्हेरसर वाड्याच्या भेटी वेळी घेऊ)

वाड्याच्या प्रवेशद्वारावर अणकुचीदार गजखिळे असून एक दिंडी दरवाजा देखील आहे. हे पाहताना पुण्यातील शनिवारवाडा किंवा सासवडचा पुरंदरेवाडा पाहत असल्याचा संभ्रम होतो. दरवाजाच्या बरोबर वर अतिशय रेखीव नगारखाना आहे. दिंडी दरवाजातून आत प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूस असलेल्या रेखीव देवड्या आहेत, तर उजव्या बाजूच्या ढेलजातून नगारखान्यात जाण्याचा जिना असावा. निसर्ग बहरतो तो मानवी वर्दळ नसलेल्या शांत, निवांत ठिकाणी आणि येथे हेच झाले आहे. सुमारे पाचसहा एकर क्षेत्रफळ असलेला हा आयताकृति वाडा नैसर्गिक वृक्षाच्या सहवासाने भरून गेला आहे, त्यामुळे आतील भागातील अवशेष दिसून येत नाहीत. मग पुन्हा बाहेर यायचे मुख्य दरवाजाच्या बाहेरील डाव्या बाजूस पूर्वाभिमुखी प्राचीन दोन शिवपिंडी असणारे हेमाडपंति मंदिरात भक्तीभावाने दर्शन घ्यायचे. वाड्याची तटबंदी व बुरूज पाहताना तत्कालीन स्थपति यांनी किती अप्रतिम शैलीत बांधकाम केले आहे याची जाणीव होते कारण दोन घडीव दगडांच्या सांध्यात गवताची काडी देखील जाणार नाही इतके एकरूप केले आहेत. सुमारे तीनशे वर्षाचा कालखंडानंतर तटबंदीत कुठेही वड - पिंपळ किंवा लहान गवत वाढले नाही मात्र पश्चिमेकडील दक्षिणोत्तर तटबंदी क्षतिग्रस्त झालेली आहे. पूर्वेकडील तटबंदीत पूर्वाभिमुख लहान दिंडी दरवाजा व दक्षिणेकडील पूर्वपश्चिमेस तटबंदी मध्यम आकाराचे परसदिंडी दरवाजा आहे. या दरवाजातून भिमानदी पात्रापर्यंत दगडी पायऱ्या होत्या. वाड्याच्या चारही कोपऱ्यात असलेल्या बुरूजातून तटबंदीच्या तटावर जाण्यासाठी अतंर्गत दगडी जिने आहेत. याच जिन्यातून वर जाताना आत प्रकाश यावा व बाहेरील बाजूला लक्ष देता यावे यासाठी लहान सुरेख दगडी गवाक्ष असलेले दिसून येतात.वाडा व भिमानदी प्रवाहाच्या दरम्यान असलेल्या भूभागावर श्री विष्णू मंदिर व श्री गरूड मंदिर हे अप्रतिम स्थापत्यशैलीचा नमुना असलेली मंदिरे आहेत. स्थानिक नागरिकांशी संवाद साधल्यावर या वाड्यात सूर्यमहल व चंद्रमहल अशा दोन नक्षीदार वास्तू होत्या ही माहिती मिळते तर चंद्रचूड वाड्याची सद्यस्थितित मालकी अन्य व्यक्तीकडे असल्याचे समजते. महाराष्ट्राच्या वैभवात भर घालणाऱ्या अनेक ऐतिहासिक वास्तू व इतिहास पुरूष काहीसे उपेक्षितच असल्याची भावना घेऊन मी व मोहरे सर श्रीमंत सरदार दमाजी गायकवाड यांची गढी असलेल्या दावडीकडे निघालो. आता लवकरच भेटू ऐतिहासिक दावडी गडी मधे!

- सुरेश नारायण शिंदे, भोर (shindesn16@gmail.com)

 

निमगाव-खंडोबा

निमगाव हे खंडोबा मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे गाव , निमगाव हे ग्राम नाव अनेक गावांचे असल्याने ओळख पटवण्या साठी या नावास जोड देण्याची प्रथा आहे, जुन्याकाळी या निमगाव जवळ नागना नावाचे गाव होते, त्यामुळे या निमगावचा उल्लेख निमगाव – नागना असा होत असे, काळाचे ओघात नागना गाव उध्वस्त झाले आणि निमगाव जवळील दावडी या दुसरया गावावरून हे गाव निमगाव – दावडी या नावाने प्रसिद्ध झाले, आत्ता हे गाव निमगाव – खंडोबा या नावाने रूढ होत आहे, पेशवाई काळात पेशव्यांचे दिवाण चंद्रचूड यांचे येथे वास्तव्य होते त्यामुळे या गावास ऐत्यासिक महत्व ही होते. हे गाव भीमा नदी काठी वसलेले आहे तेथील भग्न अवस्थेतील घाट, वाडे आपल्या पुर्व वैभवाची साक्ष देत आहेत .

nimgoan dawadi

निमगाव – खंडोबा हे गाव पुणे जिल्ह्यात पुणे- नासिक मार्गावरील खेड तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या राजगुरूनगर पासून ६ किमी अंतरावर आहे. निमगावचे उत्तरेस १.५ किमी अंतरावरील टेकडीवर खंडोबाचे मंदिर आहे. येथे थेट गाडी मार्ग मंदिरा जवळ जातो. पायरी मार्गानेही येथे पोहचता येते.

nimgoan dawdi bahirav

कोटाचे दक्षिण बाजूने सुमारे १०० पायरी चढून कोटा पर्यंत जाता येते. पायरी मार्गाचे सुरवातीस एक पूर्वाभिमुख भैरवनाथाचे मंदिर आहे

nimgoan hegdi

कोटाचे पुर्व बाजूने ही पायरी मार्ग आहे या पायरी मार्गाचे दक्षिण बाजूस मंदिराचे कोटाचे पुर्व बाजूस हेगडी प्रधानाचे पश्चिमाभिमुख मंदिर असून मंदिरात हेगडीची बैठी दगडी मूर्ती आहे.

nimgoan khandoba temple gate

समोरच मंदिराच्या कोटाचे पुर्व प्रवेशद्वार दिसते या द्वारावर नागखाना बांधलेला आहे
पुर्वद्वाराचे दोन्ही बाजूस छोट्या मंडपी असून त्या मध्ये दक्षिण बाजूस गणपती व उत्तर बाजूस हनुमान मूर्ती आहेत.
मंदिराचा कोट मजबूत दगडी बांधकामाचा असून चारही बाजूस बुरुज आहेत. या तटाची उंची सुमारे २५ फुट आहे कोटाचा पश्चिम दरवाजा कायम स्वरूपी बंद केलेला आहे. कोटास आतील बाजूने ७६ ओवारी आहेंत कोटाची फरासबंदी लांबी १९५ फुट व रुंदी ११८ फुट आहे या कोटाचे काम ईस १७६९ मध्ये बडोद्याचे सरदार मल्हारराव गायकवाड यांनी केलेले आहे .

nimgoan khandoba temple court

पुर्वाद्वारातून कोटात प्रवेश केला की दरवाज्याचे उत्तर बाजूस दोन घोडे व वृंदावन आहे मंदिराचे समोर तीन भव्य दिपमाळा व दोन दिपमाळाचे चोथरे आहेत.

nimgon nandi

मंदिराचे समोर एका मेघदंबरीत नंदी प्रतिमा आहे.

nimgoan khandoba temple

समोरच दिसते ते खंडोबाचे पूर्वाभिमुख मुख्यमंदिर मंदिराची रचना सदर, मंडप, गर्भगृह, अशी आहे सदर पंचकमानी असून दोन्ही बाजूचे कमानीत सोफे आहेत मधील कमानी समोर मंडपाचे प्रवेशद्वार आहे.

nimgoan khandoba
मंडप घुमटकर असून आठ कमानी युक्त खांब विरहित आहे, मंडपास पुर्वाद्वारा बरोबर दक्षिण व उत्तरे कडून ही दरवाजे आहेत. दक्षिण व उत्तरद्वाराचे दानही अंगास प्रत्येकी दोन खोल्या आहेत दक्षिण बाजुस देवाचे शेजघर आहे.

मंडपाचे पश्चिम बाजुस गर्भगृह आहे गर्भगृहात मध्यभागी एका योनीत खंडोबाची पंचलिंगे आहेत ती पितळी मुखवट्याने झाकलेली असतात, यांचे मागे चोथर्यावर धातूच्या बानाई, खंडोबा, म्हाळसा व खंडोबा म्हाळसा यांच्या उत्सव मूर्ती आहेत. या उत्सवमुर्तीचे पाठीमागे भिंतीत उभी बानाई बसलेला खंडोबा व म्हाळसा यांच्या मोठ्या मूर्ती आहेत.
हे मंदिर निमगाव खंडोबाचे तिसरे स्थान होय, देव अरुडमल येथील धामणटेक येथे प्रथम व नंतर मुख्य मंदिरामागील टेकडीवर व तेथून येथे प्रगट झालेचे मानले जाते. या ठिकाणी रविवार दि. २६ नोव्हेबर १४२४ मार्गशीर्ष ५ रोजी देव लिंगरूपाने प्रगट झाले व ग्रामस्थानी तेथे मंदिर बांधले, पुढे ईस १७३८ मध्ये गंगाधर यशवंत व बाजी गंगाधर चंद्रचूड यांनी या मंदिराचे पुनर्निर्माण केले. मंदिराचे गर्भगृह मंडप यावर शिखरे आहेत.

nimgoan mahalsa

मंदिराचे प्रदक्षिणा मार्गावर गर्भगृहच्या पाठ भिंतीस एक पश्चिमाभिमुख देवडी असुन त्या मध्ये म्हाळसाबाई शिळा व महिषासुर मर्दिनी भवानीची दगडी मुर्ती आहे.
मंदिराचे परिसरात मंदिराचे दक्षिण बाजुस एक थडगे आहे ते खंडोबाची निस्सीम भक्त असलेल्या मुरुळीचे असल्याचे सांगितले जाते.
मंदिराचे कोटाचे सज्यावर जाणेसाठी उत्तर व दक्षिण बाजुने पायरी मार्ग आहे. कोटाचे सज्या व नगारखान्या वरून परिसराचे विहंगम दृश्य दिसते.

nimgoan panchling

मंदिराचे कोटाचे पश्चिमेस एक छोटी टेकडी दिसते या टेकडीवर एक पूर्वाभिमुख देवडी आहे यात पंचलिंग असुन समोर नंदी आहे. या देव्डीस कडेपठार असे म्हणतात खंडोबाचे हे मंदिरातील स्थाना अगोदरचे दुसरे स्थान या ठिकाणाहून देव आजचे मंदिराचे ठिकाणी आल्याचे मानले जाते,

धामणटेक

nimgoan dhamantek

निमगाव खंडोबा मंदिरा पासुन ईशानेस सुमारे ३ किमी अंतरावर धामणटेक टेकडी आहे. मंदिराचे पश्चिमेकडील रस्त्याने या टेकडीच्या पाथ्याशी पोहचता येते, या टेकडीवर एक पूर्वाभिमुख मंदिर असुन एक दीपमाळ आहे या मंदिरात खंडोबाचे पादुका आहेत हे या परिसरातील खंडोबाचे मुळस्थान असल्याचे सांगितले जाते, पौष शुद्ध पौर्णिमा १७०१ मध्ये गोसासी येथील हरनाक महाराने हे मंदिर बांधले.

भीमा नदी

bhima nadi

निमगाव गावा मध्ये भीमा नदीचे तीरावर घाट असुन या नदीवर सोमवतीस देव अंघोळी साठी आणले जातात. या परिसरात काही जुनी मंदिरे उध्वस्त अवस्तेत आहेत

chandrachud wada

या नदी काठी चंद्रचुडांचा भव्य वाडा आहे तो व आजूबाजूची मंदिरे आता अंतिम क्षण मोजत आहेत.

यात्रा

bullcart race

चैत्र पौर्णिमा, माघ पौर्णिमा, चंपाषष्टी, दसरा, सोमवती ला येथे यात्रा उत्सव असतात , यात्रा मध्ये घाटा मधून पळविलेले नवसाचे बैल गाडे हे येथील विशेष आकर्षण होय.

https://jejuri.net/khandoba/

 

 http://www.nisargramyajunnar.in/narayangown-history-damaged/


नारायणगाव (जुन्नर)चे अस्तित्वात असलेले व भुतकालीन मिटलेल ऐतिहासिक साम्राज्य

नारायणगाव (जुन्नर)चे अस्तित्वात असलेले व भुतकालीन मिटलेल ऐतिहासिक साम्राज्य…

जुन्नर तालुक्यातील प्राख्यात शहर, देशातील तमाशा केंद्र म्हणून ख्याती असलेल, आधुनिक बाजारपेठ म्हणून अग्रगण्य असलेल, व मीना नदी माईचे पुर्व व दक्षिणोन्मुख किनारा लाभलेल गाव म्हणजे पुण्यापासुन 80 कि.मी अंतरावर उत्तरेस व नाशिक पासुन 120 कि.मी दक्षिणेस पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर वसलेले गाव अर्थात नारायणगाव होय.
या गावाला आपली एक ओळख करून दिली व आपले स्वतःचे नाव दिले ते स्वातंत्र्य साम्राज्यात मराठी मावळ्यांना आपल्या उदरी बाळगुन लढाईचे नवे डावपेच शिकवून या मातृभूमीला पारतंत्र्यातुन मुक्त करण्यासाठी महत्वाचा सिंहाचा वाटा उचललणार्या व आपले अस्तित्व आजही टिकून पुर्वेला 9 कि.मी अंतरावर खोडद गावच्या उत्तरेलस उभा असलेल्या नारायणगडाने.


त्यावेळी हेच नारायणगाव एक टोलेजंग व दिमाखात एक भुईकोट किल्ला म्हणून उभे राहिले होते. परंतु या किल्याला वर्तमान काळाची नजर लागली व तो किल्ला काळाच्या ओघात जमीनदोस्त करण्यात आला. आज जवळपास याच कालखंडातील व बांधकाम शैलीतील चाकणचा संग्रामदुर्ग अंतिम स्वास घेतानाचे चित्र दिसत आहे. आणि दुसरा किल्ला म्हणजे लोहगड किल्ला. या दोन्ही किल्यांच्या बांधकामाची वास्तविकता मिळती जुळती वाटते.
नारायणगावच्या भुईकोट किल्याचे अस्तित्व शोधायचे असेल तर आपणास तिन पुरावे मिळतात दोन पुरावे म्हणजे पुर्वेकडील दळवी हार्डवेअर पाशी उत्तरेस लागुनच असलेली वेस, कि जिचा जिर्णोध्दार मा.तात्यासाहेब गुंजाळ यांनी नारायणगावच्या तरूण तडफदार पिढीतील व ऐतिहासिक वास्तूची जपवणूक करणार्या तरूणांना एकत्र आणून केला. म्हणून आज ही वेस आपले पौराणिक वस्र त्यागुन नवपरिधान पेहरावात अगदी थाटात व दिमाखात उभी राहिली आहे. रंगरंगोटी करण्यात आल्याने तीची पौराणिक छाप व ओळख लोपपावली आहे. कारण पौराणिक शिल्प कला स्वतःची झालेल्या झिजेतुन आपली कारकीर्द सांगत असतात. रंगरंगोटी केलेल्या शिल्पाची ओळख लवकर करता येत नाही. असो.

दुसरी वेस आहे ती नारायणगावच्या पश्चिमेकडुन गावात प्रवेश करतो तेथेच असणाऱ्या मारूती व विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या प्रवेश द्वारास लागुन उत्तरे असलेली व जुन्नर नारायणगाव रस्त्यावर जेथे बाजार भरतो तेथे लागुनच 50 फुट दक्षिणेस असलेली वेस याही वेसीचा जिर्णोध्दार करण्यात आला आहे. या दोन्ही वेसी म्हणजेच नारायणगावच्या भुईकोट किल्याची प्रवेशद्वारे होय. ही प्रवेशद्वारे पेशवाई कालखंडातील बांधकामाची ओळख सांगणारी असुन जर आपण सुक्ष्म निरिक्षण केले तर यांचे असणारे चौथरे अतिशय पौराणिक स्वरूपाचे दिसून येतात. याचा अर्थ असा केला जातो कि या भुईकोट किल्याचा जिर्णोध्दार पेशवाईकालीन असावा.
13015199_1692180997703338_7995334424309250230_n 12512643_1692181041036667_7088781855290819875_n 12987212_1692181107703327_4298231002129563942_n 13015435_1692181134369991_4876877175008002704_n 13012709_1692181074369997_2696703872942604411_n
तिसरा पुरावा आपणास पहावयास मिळतो तो याच पश्चिम वेशितुन प्रवेश केल्यानंतर उजवीकडे वारूळवाडीला जाणाऱ्या रस्त्याने अगदी 100 मी. गेलात तर उजवीकडेच नविन बांधण्यात आलेल्या इमारतीमध्येच तोंडकाढून स्वतःची ओळख करून देत आहे. लोखंडी दरवाजा असलेल्या बुरूजाच्या स्वरूपात हा बुरुज आहे. याचा विस्तार मोठ्याप्रमाणात असुन याला आधुनिक तलवार व ढाल बसवलेला लोखंडी दरवाजा लावण्यात आलेला आहे. वर निरिक्षणासाठी उत्क्रृष्ठ दगडी तोडीतील जीणा बनविण्यात आलेला आहे. याचे पुर्ववत रूप जसेच्यातसे असून पडझड झालेली आहे. परंतु त्याचे असलेल रूप आजही एक पौराणिक वास्तु म्हणुन पाहण्यायोग्य आहे.
नारायणगाव मध्ये मुक्ताईदेवी मंदिर, शनिमंदिर, मारूती मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, भक्त पुंडलीक मंदिर तसेच श्री. हरिस्वामी समाधी मंदिर आशा अनेक पौराणिक मंदिरांचा वारसा लाभलेला आहे. येथील असणारे विविध शिल्प व शिलालेख आपापल्या कालखंडातील पुराव्याची जाण करून देतात.भक्त पुंडलिक मंदिर पुणे जिल्ह्यातील असलेल्या चार भक्त पुंडलिक मंदिरापैकी नदिच्या पाण्यात असलेले मंदिर आहे. तसेच श्री.हरिस्वामी मंदिर 1777 मधील दगडी बांधकाम शैलीतील जुणे मंदिर आहे. मुक्ताईदेवी मंदिराची परंपरा तर नारायणगाव चे एक वैशिष्ट्य माणले जाते. व या मातेचा यात्रोत्सव जुन्नर तालुक्यात सर्वाधिक मोठा मानला जातो. महाराष्ट्रातील सर्व तमाशा मालक आपल्या तमाशाचा एक फ्री कार्यक्रम येथे करत असतात. व येथेच तमाशांना प्रतीचा दर्जा दिला जावून बक्षिसे देण्यात येतात. म्हणूनच नारायणगावला म्हनुनच तमाशा केंद्र म्हटले जाते.

नारायणगावचा जर पौराणिक इतिहास व पौराणिक ओळख जिवंत ठेवायची असेल तर किंवा ज्या वास्तुकडे बोट करून नारायणगावचा इतिहास सांगायचा असेल तर या पौराणिक वास्तुची जपवणूक नारायणगावच्या नागरीकांकडून होण खुप गरजेचे आहे. म्हणूनच नारायणगाव ग्रामवासियांना एक विनंती करू इच्छितो की आपण सर्वांनी एकत्र येऊन पुढाकार घेऊन खर्याअर्थाने या वास्तुचे संवर्धन करणे खुप गरजेचे आहे. मला खात्री आहे की आपण या शिवजन्मभुमीतील या मोडकळीस आलेल्या वास्तुंचे संवर्धन करून राजे शिवछत्रपतींचा हा लाभलेला ऐतिहासिक अनमोल ठेवा जतन करून नविन पिढीला अभ्यासण्यासाठी आदर्श निर्माण कराल. याच संवर्धनाच्या माध्यमातून आपण राजे श्री. शिवछत्रपतींचा शिवजयंतीउत्सव खरा साजरा केल्याचे समाधान आपणास लाभेल असे मला वाटते.
लेखक/ छायाचित्र : श्री.खरमाळे रमेश
(माजी सैनिक खोडद)
मो.नं. 8390008370
शिवाजी ट्रेल
फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .
विकसित अंड्राॅईड अॅप- निसर्ग रम्य जुन्नर तालुका कृपया अँड्रॉइड अँप ची लिंक खालील प्रमाणे वाचावी


 



















 रामवाडा - अवसरी खुर्द
         पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द या गावी रामवाडा आहे. अवसरी खुर्द हे गाव पुणे - नाशिक महामार्गावर आहे. गावात प्रवेश करतानाच गावची वेस पहायला मिळते. बुरूज असलेले प्रवेशद्वार आहे. वेशीजवळच राम मंदिर आहे तोच रामवाडा होय. श्रीराम, लक्ष्मण, सीता यांच्या अप्रतिम अशा मूर्ती असलेले पेशवेकालीन राममंदिर आहे. या मंदिरास चोहोबाजूंनी तटबंदी असावी. त्याचे बांधकाम भक्कम दगडातील असून त्याची कमान अजून आपले मूळ स्वरूप टिकवून आहे. भक्कम सागवानी लाकडी दरवाजावरील नगारखाना अजून सुस्थितीत असल्याचे दिसते. आत प्रवेश केल्यावर दोहो बाजूंस देवड्या आहेत. सभामंडप, गर्भगृह अशी रचना आहे मंदिराची. मंदिराचे परंपरागत पुजारी बैरागी या घराण्यातील पाच महंतांच्या समाध्या आहेत. एका समाधीवर महंत मानदास महाराज बैरागी असा शिलालेख आहे. या महंतांनी सन १९०४ मध्ये समाधी घेतली. राममंदिरास रामवाडा म्हणून संपूर्ण पंचक्रोशी ओळखते.. प्रतिवर्षी रामजन्मोत्सवाचा उत्सव बैरागी करतात.

 






         हा रामवाडा पेशवेकालीन असून प्रतिवर्षी होणाऱ्या रामनवमीच्या नऊ दिवसांच्या उत्सवासाठी व रोजच्या पूजा-अर्चा व नैवेद्यासाठी पेशव्यांनी बैराग्यांना सनद करून दिली आहे. सदरची सनद श्री. सीताराम गिरिधारी बैरागी यांच्याकडे आहे. बैरागी यांना इनाम म्हणून मिळालेल्या २६ एकर माळरान जमिनीत सध्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय उभे आहे असे भानुदास बैरागी सांगतात.
साभार - डाॕ सदाशिव शिवदे सर
टीम - पुढची मोहीम


वाघमारे गढी - पिंपळगाव खडकी #पुढचीमोहीम
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव खडकी या गावी मल्हारराव होळकर (पहिले) यांची कन्या उदाबाई वाघमारे यांची गढी आहे. पिंपळगाव खडकी हे गाव पुणे-नाशिक महामार्गावरील अवसरी खुर्दपासून ७ कि.मी अंतरावर आहे. गावात घोड नदीवर घाट आहे आणि उदाबाई व त्यांचे पुत्र अवचितराव यांची छत्री आहे. गावात प्रवेश करताना दोन भव्य बुरूज आणि प्रवेशद्वार आपले स्वागत करते. तटबंदीचे काहीसे अवशेष नजरेस पडतात. हा भुईकोट तसा नामशेष झाला आहे. भुईकोटाची उभारणी मल्हारराव होळकर (पहिले) यांनी केली व मुलीला चोळीबांगडी म्हणून गाव इनाम दिले.
नदीच्या घाटावर जाण्याचा जिना उतरू लागताच समोरच एक शिलालेख दिसतो. त्या शिलालेखात खालील मजकूर कोरला आहे.
१ ली ओळ - श्री गणेशाय नमः प्रतापी महाराज मल्हार राजा नारी लक्ष्मी गौतमा नाम जाता तथा उदरली बान्या विराजे ।
२ री ओळ उदाबाई हे नाम पृथ्वीत गाजे शके १७१९ सौम्यनाम संवत्सरे चैत्र शुद्ध ९ नवमी मंदवासरे ते दिवसी ।।
३ री ओळ बाबुराव व ।। मानाजी पाटील वाघमारे ||
मौजे खळकी तर्फ महाळुंगे भार्या उदाबाई || ४ थी ओळ पुत्र अवचितराव वाघमारे यांनी पीतृ उद्धरणार्थ परलोक साधनार्थ छत्रीचे काम केले असे ||१||
छत्रीच्या आतल्या भिंतीवर ह्याच मजकुराचा शिलालेख आहे.
साभार - डाॕ सदाशिव शिवदे सर
टीम - पुढची मोहीम

 

 

 






















No comments:

Post a Comment

Aihole

 आयहोळ येथील डोल्मेन :        सध्या बहुतेक पर्यटक आयहोळला चालुक्यांच्या सुरवातीच्या काळात बांधलेल्या मंदीरांना भेट देण्यासाठी येतात. मात्र ल...