Monday, May 16, 2022

शिवनेरी किल्ल्यावरील अपरिचित लेणी

   छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला आपल्या सर्वांच्याच परिचयाचा आहे. हा शिवनेरी किल्ला ज्या जुन्नर तालुक्यात आहे त्या परिसरात महाराष्ट्रातील सर्वात जास्त लेणी आहेत यावर कदाचित विश्वास बसणार नाही.परंतु हे खरे आहे या किल्ल्यावर अंदाजे ८० लेणी असुन त्या सर्व बौद्ध लेण्या आहेत. त्यापैकीच काही अपरिचित लेण्यांची माहिती मी आज आपण घेणार आहे. कुतूहलाची बाब म्हणजे ब्रिटिश व दक्षिणेतील एक प्रसिद्ध पुरातत्वज्ञ यांनी या लेण्यांचा ज्यावेळेस सर्वे केला असेल त्यानंतर याठिकाणी कोणीही पाय ठेवला नसेल अपवाद काही अभ्यासक असतीलही. वास्तविक शिवनेरी गडावर पर्यटकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते.गडाकडे जाताना या लेण्या नजरेत भरतातही.पण दुर्लक्ष ,उपेक्षा आणि मोडलेल्या वाटा यामुळे या लेण्यांकडे सहसा कोणीही फिरकत नाही.

   शिवनेरी गडाची उंची समुद्रसपाटीपासून ११०० मीटर. दक्षिणेकडची बाजु सोडली तर सर्व अंगाला उंच कातळकडे आहेत.याच कातळकड्याच्या पोटात कधीतरी दोन हजार वर्षापुर्वी या लेण्या कोरल्या गेल्या. शिवनेरी गडाला असलेली ८४ लेण्यांचा हा कमरपट्टाच जणु. या लेण्या किल्ल्याच्या पुर्व,पश्चिम व दक्षिण दिशेला आहेत. अभ्यासकांनी सोयीसाठी या लेणीसमुहाला दिशांचीच नावे दिली आहेत. काही लेण्या किल्ल्याच्या पायथ्यापासून अगदी जवळ असूनही झाडी जास्त असल्याने समजुन येत नाहीत.सध्या या लेण्या अनेक वन्य पशु पक्षांचे निवासस्थान झालेल्या आहेत.या तिन्ही लेणीसमुहांकडे जायचे मार्ग खडतर किंबहुना अगदी हातपाय रोवून चढावे लागते. या दुर्लक्षामुळे हा ठेवा पर्यटकांपासून दूर राहीला. मात्र एकदा इथे जाण्यासाठी या रानवाटांना भिडलो कि आपल्याला इतिहासाचा हा ठेवा भरभरुन मिळतो. यातील दक्षिण गट पहाण्यासाठी गडावरील शिवाई देवी मंदीरापासून एक वाट खाली उतरते. तर पुर्वेकडचा लेणीसमुह पहाण्यासाठी साखळीची वाट सोयीची.एकेकाळी धोकादायक वाटणारी हि वाट आता रेलिंग लावल्यामुळे सोपी झाली आहे. तर पश्चिम दिशेची लेणी पहाण्यासाठी पायथ्यापासून त्या बाजुने शिवनेरी गडावर चढाई करत जावे लागते. यातील बराचसा मामला एन कड्यावरील चढाईचा असल्यामुळे ज्यांना असे कडे चढण्याची सवय त्यांनीच त्यात हात घालावा. 

    जुन्नरपासून जुन्नर-कुसूर या रस्त्याने या लेणींकडे जाता येते. या लेण्यांच जर वैशिष्टय सांगायचे झाले तर याठिकाणी भरपूर प्रमाणात पाण्याच्या टाक्या कोरलेल्या आहेत व आजही त्यात मुबलक प्रमाणात पाणी असुन वन्यजीव त्यातील पाण्याने त्यांची तहान गेली दोन हजार वर्षे भागवत आहेत. तसेच थोडी चैत्यगृह असुन बाकीच्या सर्व  विहार आहेत.लेण्यांना दरवाजे असुन खिडक्याही सुंदर कोरलेल्या आहेत.तसेच भीखुंच्या झोपण्यासाठी दगडी बाकही त्यात कोरलेले असुन भिंतीवर स्तुपही आहेत. सध्या या लेण्यांत वन्य पशु पक्षांचा अधिवास असुन त्यांच्याशिवाय इतर कोणीही याठिकाणी फिरकत नाही. या लेण्यांकडे जाण्याचे मार्ग हे अंत्यत बिकट असुन साधी पायवाटही सापडेल कि नाही अशी परिस्थिती आहे. त्याचप्रमाणे दोन हजार वर्षांपुर्वी बलाढ्य समजले जाणारे ग्रीक लोकही याठिकाणी येऊन या लेण्या कोरण्यासाठी दान देत होते हे येथील शिलालेखातून आपल्याला समजते.
 या टेकडीवर पूर्ण-अपूर्ण मिळून ८४ लेणी, ६० पोढी (पाण्याची टाकी) व ९ ब्राह्मी शिलालेख आहेत. यांपैकी शिवनेरी पूर्व समूहात ५५ लेणी (२ चैत्यगृहे), ४० पाण्याची टाकी व ६ शिलालेख आहेत. शिवनेरी दक्षिण समूहात २३ लेणी (१ चैत्यगृह), १४ पाण्याची टाकी व ३ शिलालेख आहेत, तर शिवनेरी पश्चिम समूहात ६ लेणी व ६ पाण्याची टाकी आहेत. यांतील महत्त्वाच्या लेणींना विद्वानांनी १ ते ८१ क्रम दिले आहेत. यांतील बरीच लेणी सामान्य असली तरी काही महत्त्वाची आहेत.

शिवनेरी पूर्व लेणी-समूह, जुन्नर.

– –



शिवनेरी-पूर्व : 

  जुन्नर गावातून शिवनेरी किल्ल्याकडे जातेवेळी समोरच लेणी दिसायला लागतात. किल्ल्याच्या पूर्वेस, थोडेसे डाव्या बाजूस, पायथ्यापासून हा क्रम सुरू होतो. यातील वरच्या बाजूस असलेल्या कपारीतील काही लेण्यांचे मार्ग पूर्णतः तुटलेले आहेत; त्यामुळे तेथे जाणे अवघड आहे.महाराष्ट्रातुन शिवनेरी किल्ला पाहण्यासाठी लाखो पर्यटक येत असतात परंतु खुप कमी असे पर्यटक आहेत की जे साखळदंड़ाच्या मार्गाने किल्ल्यावर जातात.लेणी वर जाण्यासाठी खाली साखळदंड ज्या मार्गाने आहे त्या मार्गावर दिशा दर्शक बाण दाखवले आहेत.साधारणता १ तासाची चढाई केल्यावर आपण साखळदंड आहे त्याठीकाणी येउन पोहचतो. त्या इथे एक मोठा लेणी समुह आपल्याला पहायला मिळतो. शिवनेरी गडावर वरती ज्या मोठ्या प्रमाणात पाण्याच्या टाक्या कोरलेल्या दिसतात त्याच प्रमाने या लेणीच्या समोरच पाण्याची टाकी आहे.उन्हाळ्यात सुद्धा या टाक्यां मधे मुबलक प्रमाणात पाणी साठा उपलब्ध आहे यावरून आपण त्याकाळातील जलव्यवस्थापन हे किती उत्तम होते याची जाणीव होते.या टाकी जवळच एक सुंदर लेण आहे,या लेण्याच्या द्वारावर सुंदर असे नक्षी काम कोरलेले आहे
 
 
 
लेणे क्र. २ :- हे एक चैत्यगृह असून याचा प्रकार इतर चैत्यगृहांपेक्षा वेगळा आहे. याच्या दर्शनीभागी कलश असलेले स्तंभ असून मागे अरुंद ओसरी आहे. याचा दरवाजा बराच रुंद असून दाराची चौकट बसविण्यास वरच्या आणि खालील कोपऱ्यात खूप मोठे चौरस खड्डे आहेत. आत चौरस मंडप असून मध्यभागी एक खंडित स्तूप आहे. वरील छत सपाट असून त्यात कसलीच कलाकुसर नाही.


  लेणे क्र. ३ ते ५ :- या एकाला एक लागून असलेल्या चौरस खोल्या असून त्यांच्या उजव्या बाजूस पाण्याचे मोठे टाके आहे. लेणे क्र. ४ मधील शिलालेखात ‘भूतेनक’ नावाच्या व्यक्तीने हे पाण्याचे टाके व लेणे दान दिल्याचे म्हटले आहे.
  क्र. 
६ ते १५ :- या सामान्य एक खोलीवजा लेणी असून त्यांस बाहेर ओसरी आहेत. लेणे क्र. १६ व १७ ही दोन मजली असून खालच्या मजल्यास छोटेसे अंगण आहे. मधल्या रुंद दरवाजाच्या दोन्ही बाजूंस खिडक्या असून आत चौरस मंडप व मागील भिंतीत सात खोल्या आहेत. यात दर्शनी भिंतीवर स्तुप कोरलेला आहे याच्या छतालाही रंगकाम केलेल्याच्या खुणा आजही आपल्याला दिसतात.उजवीकडील कोपऱ्यातून वरच्या मजल्यावर जाण्यास जिना आहे. वरती छोटासा मंडप असून, दर्शनी उघडा; परंतु लहानसा कठडा जमिनीवर कोरला आहे. या लेण्यातील शिलालेखानुसार या उपस्थानासाठी ‘मुधकिय मल’ (मूर्धकीय मल्ल) व ‘गोलिकीय (गवळी) आनंद’ (गौल्लिकीय आनंद) यांनी दान दिले.
   या शिलालेखाचे वाचन असे "मुधकियस मलस गोलिकियस आनदस बेण जणान देयधम उपठाण"

            लेणे क्र. २१ व २२ :- एकाला एक लागून दोन मोठे मंडप असून आत दोन्ही खोल्यांच्याच चौरस आकारांचे खड्डे आहेत. येथील भिंतींवर हनुमान, दुर्गा इ. देव-देवतांची लहानशी मध्ययुगीन शिल्पे कोरली आहेत. या लेण्यांच्या जवळून, शिवनेरी किल्ल्यावर जाण्यासाठी दगडी पायऱ्या असणारी चोरवाट आहे. लेणे क्र. २५ हे बराच मोठा काटकोनी मंडप असून आतील तिन्ही भिंतींत प्रमाणशीर दगडी बाक कोरला आहे.खरे तर हे लेण भन्नाट म्हणायला हवे. वरवर साध्या दिसणार्या खोलीत शिरताच जमीनीलगत दोन चौकोनी खड्डे आणि बसण्य्याचा ओटा दिसतो. या दोन्ही खड्ड्यातून डोकावल्यास दोन कोठारे कोरलेली दिसतात. हि धान्याची कोठारे असावीत. वर बसणार्‍या अधिकार्‍याच्या परवानगीने कोठारातील धान्य दिले जात असावे. या एवढ्या छोट्या झरोक्यातून इतकी मोठी कोठारे कशी कोरली असावी? असा प्रश्न पडतो.
         लेणे क्र. २७ :- हे बरेच मोठे असून यास प्रशस्त अंगण आहे. परंतु सुमारे १२-१३व्या शतकांत याचा उपयोग देवालय म्हणून केला गेला असावा, असे दिसते. आतमध्ये काटकोनात मोठा मंडप असून काही खोल्या आहेत. या लेण्यातील खंडित शिलालेखात फक्त ‘यवन’ हा शब्द वाचता येतो.
  
  लेणे क्र. ३५ व ३६ :- ही लहान परंतु शिलालेखामुळे महत्त्व प्राप्त झालेली लेणी आहेत. यांस लागूनच एका ओळीत क्र. ३७ ते ४० या एक-खोलीवजा लेणी आहेत. क्र. ३६ ला छोटीशी ओसरी असून डाव्या बाजूस उठावदार स्तूप कोरला आहे. त्याचा काही भाग तुटलेला असून खालच्या बाजूस पाण्याचे टाके आहे. ओसरीत दरवाजाच्या डाव्या बाजूस भिंतीवर पाच ओळींत खंडित लेख आहे. यानुसार अपगुरिय सवगिरिय याचा पुत्र ‘पतिबधक गिरिभूति’ याने हे लेणे व बाजूचे टाके दान दिले. तसेच या लेण्यास व टाक्यास आणि गावातील धर्मोत्तरीयांच्या भिक्षुणी-संघास कार्षापणांची एक कायम ठेव दिली. या लेखात तत्कालीन जुन्नर नगरीतील भिक्षुणी-संघाचा आलेला उल्लेख महत्त्वाचा आहे. दुसरा महत्त्वाचा उल्लेख ‘धर्मोत्तरीय’ संघाचा आहे. जुन्नर गावात धर्मोत्तरीय संघाचे भिक्षू राहत असावेत, हे यावरून स्पष्ट होते. तिसरा महत्त्वाचा उल्लेख या भिक्षुणी-संघाची मुख्य ही एक स्त्री होती व तिच्या नावावरून (सिवपालितनिका) तो संघ ओळखला जात असे, हे विशेष.
        
लेणे क्र. ४२ हे या समूहातील मोठे लेणे असून आतमध्ये असलेल्या बारा खोल्यांमुळे यास स्थानिक लोक ‘बारा गडद’ किंवा ‘बारा कोठडी’ असे म्हणतात. 
 

      लेणे क्र. ४७ :- हे एक लहानसे विहार असून प्रवेशाजवळ ओसरी तर आतमध्ये चौरस मंडप व पाच खोल्या आहेत. मागील दोन खोल्यांच्या मधील भिंतीवर कोनाड्यात उठावात एक स्तूप कोरलेला असून त्यावर हर्मिका (स्तूपाच्या अंडावरील चौकोनी कठडा) व छत आहेत. बाजूच्या भिंती व छतावर मातीचा गिलावा लावून त्यावर चित्रे काढली होती. छतावर चौरसात वर्तुळे व कमळाची फुले दिसतात.हि अशी चित्र कोरण्यासाठी लेण्यांचे छत सपाट केलेले आणि मग त्यावर चुन्याचा गिलावा दिलेला. त्यावर तुसाचे गिलावे चढवलेले आणि त्यावर चुन्याचा पुन्हा गिलावा.मग लाल्,पांढरा, पिवळा,केशरी ,पोपटी अशा रंगात चित्रकाम केलेले. निरनिराळी निसर्गाची रुपके आणि भौमितिक आकार यांची गुंफण म्हणजे हि चित्रे. मोठमोठ्या चौकोनांची जाळी त्यात कमी होत जाणारी वर्तुळे, त्याच्या परिघावर कमळांची नक्षी अश्या थक्क करणार्‍या रचना दिसतात. हे रंग नैसर्गिक तरीही दोन हजार वर्ष तग धरुन राहिलेले.मात्र मानवाचे विध्वसंक हात इथेही वळाले, ते रंग खरवडून काढले आणि आज आपल्याला फक्त कल्पना करणे हाती राहिले.अशीच चित्रे जुन्नर जवळील तुळजा,भीमाशंकर, गणेश आणि भुतनाथ लेण्यातही होती.,मात्र त्यांचाही विध्वंस झाल्याने फक्त कल्पना करणे इतकेच आपल्या हाती उरले आहे,.

    लेणे क्र. ४८ :-   
     हे एक चैत्यगृह आहे. त्याचे छत दर्शनी भागाच्या बरेच पुढे असून त्यावर मातीचा गिलावा व रंगकाम केल्याचे दिसते. प्रवेशाजवळ पायऱ्या आणि त्याला लागूनच दगडी बाक कोरला आहे. प्रवेशद्वार प्रशस्त असून त्याच्या दोन्ही बाजूंस खिडक्या आहेत. आतील भागात काटकोनात भव्य मंडप असून समोर दोन कलश, अष्टकोन, उपडा कलश अशा रचनेचे स्तंभ व बाजूंस अर्धस्तंभ दिसतात. मंडपाच्या मागे मागील भिंतीपासून वेगळा असलेला स्तूप अत्यंत सुंदरपणे कोरला आहे. त्यास वेदिकापट्टी व हर्मिका असून त्याची सुबक छत्री दगडी छतात कोरली आहे. सपाट छत, काटकोनात मंडप व स्तूपाची छत्री छतात कोरणे, तसेच याचे स्तंभ आत आडव्या ओळीत कोरणे, हे या चैत्यगृहाचे खास वैशिष्ट्य आहे. या लेण्यातील लेखात गृहपतिप्रमुख व व्यापारी असणाऱ्या ‘वीरसेन’ याने या चैत्यगृहासाठी दान दिले आणि ते सर्व लोकांच्या कल्याणासाठी व सुखासाठी अर्पण केले, असा उल्लेख आहे.
 

 
 
   लेण्याच्या प्रवेशद्वारा समोरच्या छताला दोन हजार वर्षां पुर्वीचे रंगकाम केलेले आढळते.आज ते रंगकाम शेवटची घटका मोजत आहेत परंतु जेवढे शिल्लक आहे ते ज्या वेळेस आपण पाहतो तर असे वाटते की आताच कोणीतरी रंग काम केले असावे एवढा ताजेपणा आजही त्या कलेत दिसते. विचार मनात येतो की ज्या वेळेस ते रंगकाम केले गेले असेल त्याचे सौंदर्य किती अप्रतिम असेल.चैत्यगृहा मधे प्रवेश केल्यावर चार खांब दिसतात. आत मधे एक भव्य असा परिपुर्ण चैत्यस्तुप दिसतो,हे चैत्यगृह चौकोनी आहे. याच्या छतालाही रंगकाम केलेले होते,आज त्यातील थोडेच रंगकाम शिल्लक आहे.याची चकाकी सुद्धा अप्रतिम आहे. स्तुपाचा आकार हा खुप भव्य आहे. या स्तुपाला हर्मिका आणि दगडात कोरलेली छत्री सुद्धा आहे की जी छताला जोड़लेली आहे.या स्तुपाची पुजा जेव्हा बौद्ध भीक्खु आणि उपासक करत असतील तेव्हा येथील वातावरण खुप धम्ममय होत असेल यात शंका नाही. बुद्ध स्तुपाच्या सानिध्यात एक विलक्षण शांती अनुभवयास मिळते.या चैत्यगृहा समोर पाहिले असता विस्तीर्ण असा जुन्नरचा परिसर दृष्टीक्षेपात पडतो.अंबा अंबिका लेणी समुह सुद्धा याठीकाणा वरून दिसतो.

    लेणे क्र. ४९ ते ५३ :- सामान्य प्रकारची लेणी असून येथील पाण्याच्या दोन टाक्यांवर शिलालेख आहेत. त्यांतील पहिल्या लेखानुसार ‘गता’ देशाचा यवन (ग्रीक) ‘इरिल’ याने पाण्याची दोन टाकी दान दिली, तर दुसऱ्या टाकीवरील लेखानुसार उपगुरिय सवगिरिय याचा पुत्र पतिबधक, गिरिभूति व त्याची पत्नी शिवपालनिका यांनी लेणे व टाक्यांस कायम निधी दिला असल्याचे म्हटले आहे.
चैत्यगृह, लेणे क्र. ५९, शिवनेरी दक्षिण, जुन्नर.

शिवनेरी दक्षिण : 

    शिवनेरीच्या दक्षिणेकडील लेणीसमूहाकडे जाण्यासाठी किल्ल्यातील पाचव्या दरवाजातून उजवीकडे वळावे लागते. शिवाई मंदिराच्या खालील पाऊल वाटेने गेले असता लेणी दिसतात. या समूहातील तीन लेणी महत्त्वाची असून इतर सामान्य आहेत. पहिल्या लेण्यातच कधीकाळी शिवाई देवीची स्थापना झाली. या लेणीसमुहात तेवीस गुंफा असून एक चैत्य तर उर्वरीत विहार आहेत. 
     लेणे क्र. ५५ :-यास लांबट ओसरी असून मागे काही खोल्या व बाक आहेत. या लेण्यातील लेखानुसार उपासक उगाहचा पुत्र ‘इसिपालित’ (ऋषिपालित) व त्याच्या मुलांनी दानकर्म केले.

    लेणे क्र. ५७ :-  हे आकाराने लहान असून, यास छोटीशी ओसरी, मंडप व बाक आहेत. बाहेर उजवीकडे प्रशस्त पाण्याचे टाके खोदले असून त्यावरील लेखात गता देशाचा यवन ‘चित’ (चैत्र) याने संघास हा ‘भोजनमंडप’ दान दिल्याचे म्हटले आहे.   हे लेणे जरी विहार असले तरी याची रचना किंचीत वेगळी आहे.बाहेर ओसरी आहे.त्यावर डावीकडे दगडी बाक आहे तर उजवीकडे पाण्याचे टाके आहे.आतमध्ये चौरस मंडप व त्यामध्ये तिन्ही बाजुने बाक कोरला आहे.पहाताक्षणीच हे लेणे सार्वजनिक उपयोगासाठी कोरले असे लक्षात येते. याची माहिती बाहेर कुंडावर कोरलेल्या शिलालेखात मिळते. या शिलालेखाचे वाचन असे 'यवणस चिटस गतानम भोजन मटपो देयधम सधे'. याचा अर्थ गता देशाचा यवन ( ग्रीक ) चित ( चैत्र ) याने या संघास भोजनमंडप दान दिला आहे. लेण्याचे विहार्,चैत्य ,पोढी ( न्हाणपोढी,पाणपोढी ) असे भाग पडतात.फार क्वचित भोजनमंडप पहायला मिळतो.इथे शिवनेरी लेण्यात असा भोजनमंडप दिसतो.हे दान देखील एका ग्रीक व्यक्तीने दिले आहे हे विशेष.

 

    लेणे क्र. ५९ :- हे एक जोड लेणे असून त्याच्या डाव्या बाजूस चैत्यगृह व उजवीकडे भिक्षुगृह आहे. हा चैत्याचा एक नवीन प्रकार दिसून येतो. चैत्याला दर्शनी स्तंभ होते, ते सध्या खंडित झाले आहेत. दर्शनी स्तंभांच्या मागे छोटीशी ओसरी असून प्रवेशद्वारातून आत गेल्यावर काटकोन मंडप दिसतो. याचे छत सपाट आहे. तसेच मागील भिंतीपासून अलग स्तूप अखंड दगडात कोरला आहे. पण त्यावर हर्मिका व छत्र नाही. बहुतेक हे दोन्ही भाग विटांत व लाकडांत केले असण्याची शक्यता आहे. या मंडपाच्या उजव्या भिंतीत दार असून त्यातून बाजूच्या खोलीत मोठा मंडप व त्याच्या मागील भिंतीत दगडी बाक कोरला आहे. या लेण्यातील लेखातून उगाहचा पुत्र इसिपालित (ऋषिपालित) आणि त्याच्या कुटुंबीयांनी हे चैत्यगृह दान दिल्याचे समजते. या चैत्यगृहाच्या रचनेतही वैशिष्ट्य दिसते.वास्तविक चैत्यगृह हि साधनेची जागा. बहुधा चैत्यगृह पुर्णपणे स्वतंत्र असते.पण इथे चैत्यगृहाला जोडून खोली आहे.बहुधा या खोलीतही उपासनेशी संबधीत काही क्रियाकर्म होत असावीत. या चैत्यगृहाच्या दारावरच दात्याचा शिलालेख आहे.या चैत्यगृहानंतर एक लेणे असून तेथे तटाच्या भिंती व बुरूज संपतो.या तटाच्या बाहेर डोकावले कि शिवनेरीच्या पुर्व बाजुची लेणी खुणावू लागतात.

शिवनेरी पश्चिम : 

     या समूहाकडे जाण्यास सोयीचा मार्ग किल्ल्याच्या उत्तरेकडील पायथ्याने आहे. जुन्नर गावातून पुढे किल्ल्याचे उत्तरेकडील टोक पार केल्यानंतर पश्चिमेच्या बाजूने एका बिकट पाऊलवाटेने वरती जाता येते. या लेणी-समूहातील दोन लेणी महत्त्वाची आहेत.


       लेणे क्र. ७६::-हे या समूहातील मोठे लेणे आहे. यास लांबट ओसरी असून छतावर चार उतरत्या पायऱ्यांची चौकट असून त्यास प्रत्येकी खाली एक छिद्र आहे. जमिनीवर खांबांच्या पायाचे अवशेष नाहीत. यावरून येथे घडीव दगडांचे स्तंभ उभारले असावेत, असे दिसते. ओसरीतील छतावर रंगकामाचे अवशेष दिसतात. प्रवेशद्वार रुंद असून दोन्ही बाजूंस खिडक्या आहेत. लेण्याच्या आत प्रशस्त मंडप असून त्याच्या सर्व भिंतींस दगडी बाक कोरले आहेत. संपूर्ण छत सुबकतेने चितारले असून त्यावर कमळ व वर्तुळे रंगविलेली दिसतात. शिवनेरी पूर्व व गणेश लेणी समूहांत अशाच प्रकारे छत रंगविले आहेत. त्यामुळे या लेणी समकालीन वाटतात. लेणे क्र. ८१ हे शेवटच्या टोकास असून त्यास चौरस मंडप, तीन खोल्या व डाव्या बाजूस पाण्याचे टाके आहे.

संदर्भ :

१) पुणे जिल्हा गॅझेटीयर 
२) Jadhav, Suresh V. Rock-cut Cave Temples at Junnar-An Integrated Study, Ph.D. Thesis submitted to the University of Poona, 1980.
३) जाधव, सुरेश वसंत, जुन्नर-शिवनेरी परिसर, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई, १९८२.
४) श्री.अभिजित बेल्हेकर , सिद्धार्थ कसबे (7757891409) श्री.रमेश गणपत खरमाळे यांचे लिखाण
५) सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो ट्रेकर्स


No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...