Monday, May 16, 2022

शिवनेरी

 अग्नि व प़थ्वी यांच्या  मिलनातून सहयाद्रीचा जन्म झाला. ज्वालामुखीच्या उद्रेकातून सहयाद्री निर्माण झाला. सह्याद्रीतील या गड किल्यांचे महात्म्य हे तिर्थक्षेत्रापेक्षाही जास्त आहे. हे दुर्ग म्हणजे स्वातंत्राची धगधगती अग्निकुंड आहेत.   स्वातंत्र, स्वाभिमान, समता, राष्टप्रेम यांची शिकवण देणारी तिर्थक्षेत्रे आहेत. आयुष्य जाणण्यासाठी, जागवण्यासाठी, पेटवण्यासाठी, आपल्यातील आपल्यालाच ओळखण्यासाठी, राष्टीय चारित्र निर्माण करणे व ते टिकवणे या दृष्टीने दुर्गाचे महत्व फार आहे.
       सह्याद्रीतील या दुर्गमालिकेतील एक महत्वाचा दुर्ग म्हणजे 'शिवनेरी'.शिवनेरी गड हा प्राचीन असून नाणेघाटाच्या ओळात व भिमाशंकराच्या जटात वसलेला आहे.किल्ले शिवनेरी माहीत नसलेला व्यक्ती महाराष्ट्रात सापडणे दुर्मिळच! महाराष्ट्राचे दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे हे जन्मस्थान. यामुळे या किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले. शिवनेरी हा गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला समुद्रसपाटीपासून ३,५०० फूट उंचीवर आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरातील नाणेघाट डोंगररांगेत हा किल्ला मोठ्या डौलाने उभा आहे. हा किल्ला अनेक वेगवेगळ्या राजवटींच्या आधिपत्याखाली होता. 





 अनादी काळापासून शिवनेरी व्यापारी व्यापारी व जकातीचे केंद्र होते.दुर्ग शिवनेरी ज्या जुन्नए परिसरात वसला आहे त्या जीर्णनगर’, ‘जुन्नेर’ म्हणजेच जुन्नर हे शहर इसवीसनापूर्व काळापासून प्रसिद्ध आहे. जुन्नर ही शकराजा नहपानाची राजधानी होती. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला आणि जुन्नर व येथील सर्व परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग. या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणावर वाहतूक चालत असे. यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावरील दुर्गांची निर्मीती करण्यात आली. शिवनेरीचे निर्माण कार्य कोणी केले या बाबत इतिहासकारामध्ये मतभेद आहेत. काही अभ्यासकांच्या मते हा किल्ला कोळी राजांनी निर्माण केला.सातवाहनाची सत्ता स्थिरवल्यानंतर येथे अनेक ठिकाणी त्यांनी लेणी खोदवून घेतली. सातवाहनांनंतर शिवनेरी चालुक्य, राष्ट्रकूट,शिलाहार्,यादव या राजवटींच्या सत्तेखाली होता. ११७० ते १३०८ च्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले. आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले.
            त्यानंतर या दुर्गावर शिलाहार, राष्टकुट, वाकाटाक, यादव राजांनी राज्य केल्याचे दिसून येते. इ.स.१३४७ पासून दिल्लीच्या सुलतानशाहीत सत्तासंघर्ष सुरू झाला. त्यात हसन - गंगु - बहामनी याने आपले स्वत:चे राज्य स्थापन केले. हेच बहामनी राज्य होय.नंतर इ.स. १४४३ मध्ये मलिक-उल-तुजार याने यादवांचा पराभव करून किल्ला सर केला. अशा प्रकारे किल्ला बहमनी राजवटीखाली आला.इ.स. १४७० मध्ये ऑर्थरशिअस निकीतान हा रशियन प्रवासी जुन्नर येथे आला होता.तो लिहीतो 'हे शहर एका खडकावर वसले असून सृष्टीकर्त्यानेच हे निर्माण केले कि काय, असे वाटते'. पुढे दौलताबादचा सुभेदार मलिक उतेजार होता.  इ.स.अ १४८५ मध्ये मलिक-उल-तुजारचा प्रतिनिधी मलिक अहंमद जुन्नरला आला. त्यावेळी शिवनेरी किल्ल्याचा किल्लेदार किल्ला त्याच्या हवाली करेना. पण मलिक अहमदशी संघर्ष करण्याची तयारी करु लागला.पण मलिक अहमदने गडाभोवती वेढा आवळला आणि नाकेबंदी केली. त्यावेळी पाच वर्षाची महसुलाची वसुली किल्ल्यात होती.तसेच विपुल अन्नधान्याचा साठा होता.गड ताब्यात आल्यावर जुन्नरची संपुर्ण बाजारपेठ व नाणेघाटाचा वाहता व्यापार हे सर्व मलिक अहमदच्या ध्यानात आले.या पैशाच्या जीवावर त्याने किल्ल्यावर जास्तीचा फौजफाटा ठेवला च आसपासचा मुलुख ताब्यात घेतला.आता त्याला वेध लागले संपुर्ण सत्ता ताब्यात घेण्याचे.पण हि संधी त्याला लगेच पुडह्च्याच वर्षी चालून आली.इ.स.१४८६ मध्ये मलिक उत्तेजारचा खुन झाला.तेव्हा मलिक अहमद जंजिरा प्रांतात राजापुरी बंदरात होता.तो लगेच जुन्नर येथे आला व 'निजाम उल मुल्क बहिरी' अशी पदवी धारण करुन स्वतंत्र कारभार करु लागला.दुसरा बहामनी महमंदशहा याने चाकणचा सुभेदार युसुफ आदिलखान याला त्याचे पारिपत्य करण्यासाठी पाठवून दिले.मलिक अहम्दने आपले कुटुंब शिवनेरी गडावर हलविले आणि आदिलखानच्या फौजेचा सामना करण्यासाठी तो निघाला.प्रथम त्याने चाकणचा किल्ला घेतला व नंतर बहामनी फौजेचा पराभव करुन जुन्नर येथे परत आला.नंतर त्याने आपल्या सत्तेतील राज्याचे परिस्थिती सुधारण्यात वेळ घालवला.इ.स.१४९४ मध्ये या मलिक अहमदने नवीन शहर वसविले व त्याला स्वतःचे नाव देउन तिथे आपल्या सत्तेची स्थापना केली.हे शहर म्हणजेच अहमदनगर. इ.स.१५२९ मध्ये निजामशाहीचा दुसरा सुलतान बुर्हाण निजामशहा (इ.स.१५०८-५३) याचा गुजरातचा सुभेदार सरदार बहादुरखान ( इ.स.१५२५-३५) याने पराभव केला. त्यामुळे बुर्हाण निजामशहा जुन्नरला पळून आला.इ.स. १५६५ मध्ये निजामशाहीचा तिसरा सुलतान हुसेन अली निजामशहा (इ.स.१५५३-६५) याचा विजयनगरचा रामराजा ( इ.स.१५४१-६५) व विजापुरचा बादशहा अलि आदिलशहा ( १५५७-१५८०) यांनी पाठलाग केल्यामुळे तो आपल्या सैन्यासह जुन्नरच्या डोंगरात पळून गेला.त्याने जुन्नरपासून ते पंढरपुरपर्यंतचा प्रदेश बेचिराख करुन टाकला.  इ.स. १५६५ मध्ये सुलतान मूर्तिजा निजामाने आपला भाऊ कासीम याला या गडावर कैदेत ठेवले होते. यानंतर १५९५ मध्ये दुसरा बहादुर निजामधहा ( इ.स.१५९५- १६०५ )याने पुणे व सुपे हे प्रांत व शिवनेरॉ आणि चाकण हे किल्ले शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे भोसले यांच्याकडे आला. 

     






   पुढे अहमदनगरच्या निजामशाहीचे सरदार म्हणून शहाजीराजे भोसले काम पाहत होते. त्यांच्याकडे पुणे, सुपे, इंदापूर, चाकण या परगण्यांची जहागिरी होती. शहाजीराजे निजामशाही  सोडून आदिलशाहीने गेले. याचवेळी शहाजीराजांच्या पाठलागावर निजामशाही फौजा लागल्या. जिजाबाई साहेबांना दिवस गेले होते. अश कठिण प्रसंगी जिजाबाईंना शहाजीराजांनी शिवनेरी किल्यावर ठेवले. यावेळी किल्लेदार म्हणून त्यांचे व्याही म्हणजे थोरले संभाजीराजांचे सासरे विश्वासराव हे होते.  जिजामाता गरोदर असताना जाधवरावांनी ५०० स्वार त्यांच्या सोबत देऊन त्यांना रातोरात शिवनेरीवर घेऊन गेले. ‘शिवनेरी गडावर श्रीभवानी सिवाई, तीस नवस जिजाऊने केला जे आपल्याला पुत्र झाला तर तुझें नांव ठेवीन. त्याऊपर शिवाजीराजे यांचा जन्म झाला. फाल्गुन वैदय तृतीया म्हणजे दिनांक १९ फेबुवारी १६३० रोजी दुर्ग शिवनेरीवर राजमाता जिजाऊ व शहाजी राजांच्या पोटी शिवरायांचा जन्म झाला. पुत्र महाराष्टाला झाला, पुत्र भारतवर्षाला झाला. शतकानुशतके पारतंत्राच्या अंधारात चाचपडणा-या महाराष्टात शिवसुर्याचा उदय झाला.   शिवाजी राजांच्या जन्मामुळे शिवनेरी गड पावन झाला. महाराष्टाचा भाग्यसुर्य या दिवशी शिवनेरीवर उदयास आला. या शिवसुयाने महाराष्टाचे  व भारताचे भविष्यच बदलून टाकले सहयाद्रीच्या साहयाने आपली मातृभूमी सुलतानी सत्तांच्या जोखडा खालून मुक्त करणा-या शिवरायांच्या जन्मासाठी नियतीने सहयाद्रीतीतील हा शिवनेरी किल्ला निवडावा हा एक शुभयोगच होता.शिवरायांचे बालपण, शिक्षण येथेच झाले. असे म्हणतात, की नुकतेच जन्माला आलेले बाळ हे ओल्या मातीच्या गोळ्यासारखे असते. हा गोळा आपण देऊ तसा आकार घेतो. योग्य पद्धतीने घडवून संस्कारित केले, की त्यातून एक उत्तम व्यक्तिमत्त्व आकारास येते. महाराजांच्या बाबतीतही हे खरे ठरले आणि याची सुरवात शिवनेरीच्या साक्षीने झाली. लहान मुलं जीव धरत असताना शारीरिक आणि मानसिक सिंचन या दोघांची आवश्यकता असते. जिजाऊसाहेबांनी बाळराजेंना चालायला तर शिकवलेच, पण ते नुसते नाही, तर सत्य आणि स्वत्त्वाच्या मार्गावर! तसेच शारीरिक स्वास्थ्यासाठी आवश्यक असणारे व्यायाम आणि युद्धनीतीचे प्रशिक्षण दिले. सोबतच रामायण आणि महाभारताच्या गोष्टी होत्याच, ज्यांनी त्यांचे मनही संस्कारित केले. या संस्कारांचे बीज जिजाऊसाहेबांनी शिवनेरी किल्ल्याच्या साक्षीने रुजविले. शिवनेरीच्या साक्षीने झालेल्या या संस्कारांचा उपयोग महाराजांना स्वराज्य उभारणीत आणि त्यांच्या संपूर्ण आयुष्यात झाला. तसेच, हे संस्कार पुढे जाऊन स्वराज्याचे संस्कार म्हणूनही उदयास आले, असे म्हटले तरी ते योग्यच ठरेल.गडावर एकानंतर एक असे सात दरवाजे लागतात. हे दरवाजे पार करूनच आपण मुख्य किल्ल्यात प्रवेश करतो. अंतिम ध्येयापर्यंत पोचण्यासाठीसुद्धा कामाची योग्य विभागणी आवश्यक असते. म्हणूनच हे सात दरवाजे ध्येयप्राप्तीसाठी आवश्यक असणाऱ्या कार्यविभाजनाच्या दृष्टिकोनाचे प्रतिनिधित्व करतात. इतिहासात डोकावून पाहताना महाराजांच्या अनेक मोहिमांत देखील हाच दृष्टिकोन दिसतो.  
              शिवरायांच्या बाळपणचे वर्णन शिवभारत ग्रंथात करतांना कविंद्र परमानंद नेवासकर म्हण्तात, "शिवाजी राजांना ते रांगत असताना घराचा उंबरा ओलांडायलाही अडचण येत असे.  पूर्वी घराचे उंबरे फार मोठे होते. भिंतीवर पडलेलं सुर्याच कवडसे पाहून बाल शिवाजी दासीकडे ते आणून देण्याचा अटहास करत असत, वेगवेगळे आजाज काढून तो दासींना भेडसावत असत. छोटा शिवाजीराजा शिवनेरीवरची माती देखील खात असे. थोडे मोठे झाल्यावर शिवाजीराजे सोबत्यांना घेऊन तेथे दगड-मातीचे किल्ले बनवत व म्हणत असे हे 'दुर्ग माझे मी जिंकून घेणार' अशा अनेक बाललिला कविंद्रानी वर्णन केल्या आहेत. बालपणी उंबरा न ओलांडता येणा-या शिवाजीराजांनी पुढे दिल्ली, आग्रा ते जिंजी तंजावर पर्यंद घोडदौड केली, ते सुर्याचे कवडसे मागणा-या शिवरायांनी पुढे प्रतिपचंद्र ही मुद्रा शिरावर धरली, बालपणी दाईंना भेडसावणा-या शिवाजीराजांनी  पुढे औरंगजेबाच्या दरबारात सिंहगर्जना केली. शिवनेरीची माती खाणा-या शिवाजी महाराजांनी आठ पातशाहयांना धूळ  चारली, आणि ते छोटे गडकोट बांधणा-या राजांनी पुढे ३५० दुर्गांची श्रृंखला बांधून आपले स्वराज्य बळकट व  बलवान करून टाकले. सन १६३० साली निजामशाहीचा अस्त झाला. किल्ला मोंगलाकडे गेला. जिजाऊ व शिवबा पुण्यास राहू लागले.शके १५५६ क्षये नाम संवत्सरे वैशाख शुद्ध पंचमी चंद्रवार इ.स. १६३२ मध्ये शिवरायांनी गड सोडला आणि १६३७ मध्ये मोगलांच्या ताब्यात गेला.
    १६५० मध्ये मोगलांविरुद्धा येथील कोळ्यांनी बंड केले. यात मोगलांचा विजय झाला.मोघलांनी हजारो लोकांची कत्तल केली व हजारो लोकांना किल्ल्यात कैद केले.कैदी लोकांची डोकी शिवनेरी किल्ल्यात उडवली व जिथे त्यांना मारले तिथे एक चौथरा बांधला.त्या चौथर्याला 'कोळी चौथरा' म्हणत्गात.इ.स. १६५७ मध्ये शिवाजी राजंनी जुन्नरवर स्वारी करुन ११ लाख रुपयांची लुट केली. इ.स. १६७३ मध्ये शिवरायांनी शिवनेरीचा किल्लेदार अजीजखान याला फितवून किल्ल्याला माळ लावून सर करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. इ.स. १६७८ मध्ये जुन्नर प्रांत लुटला गेला आणि मराठ्यांनी माळा लावून किल्ला घेण्याचा प्रयत्न केला मात्र अपयश पदरात पडले.अनेक वेळा प्रयत्न  करून देखील हे शिवजन्म स्थान स्वराज्यात येऊ शकले नाही. पुढे ४० वर्षांनंतर १७१६ मध्ये शाहुमहाराजांनी किल्ला मोगलांकडून जिंकला व मराठेशाहीत आणला आणि आपल्या आजोबांची इच्छा पुर्ण केली. इ.स.१७६२ मध्ये मोगलांच्या सैन्याने पेशव्यांचा सैन्याचा पुणे व नगर यांच्या दरम्यान पराभव केला.त्यावेळी राघोबादादाने शिवनेरी किल्ला मोगलांना दिला.इ.स.१७७७ मध्ये नाना फडणवीसांचा मेहुणा बळवंतराव बढे याने फरारी झालेल्या पाच फरारी झालेल्या कोळी लोकांना जुन्नर येथे पकडुन मारले.परंतु ते त्याच्या मागे पिश्चाच रुपाने लागले.तेव्हा त्यांना शांत करण्यासाठी त्याने किल्ल्याच्या पायथ्याशी त्यांच्या नावाने पाच लिंगे स्थापन करुन त्यावर एक देवालय बांधले.त्याला आज 'पंचलिंगाचे स्थान' म्हणतात.
  पुढे इ.स. १७९३ मध्ये नाना फडणवीसानी राघोबादादांचे पुत्र बाजीराव व चिमणाजी यांना जुन्नरच्या गढीत कैद करुन ठेवले होते. इ.स. १७९५ मध्ये सवाई माधवराव कैलासवासी झाल्यावर परशुराम पटवर्धन जुन्नरास गेले व हातात गाईचे शेपुट धरुन दुसर्‍या बाजीरावजवळ शपथ वाहीली 'आपणास पेशवाईचा अधिकार मिळाला आहे'.दुसरे बाजीराव त्यांच्याबरोबर पुण्यास येउन पेशवाई पदी आरुढ झाले.इ.स. १८१८ मध्ये मेजर एल्ड्रीन बाजीरावाचा पाठलाग करत जुन्नर येथे आले व २१ मे १८१८ ला त्याने शिवनेरी किल्ला घेतला.शिवनेरीवरचा किल्लेदार आण्णासाहेब रत्तीकर हडसर गडावर पळून गेला,परंतु पुढे त्याना इंग्रजांनी ताब्यात घेतले. पुढे १८४१ मध्ये इंग्रजांनी चिनी लोकांना शिवनेरीवर कैदेत आणुन ठेवले.त्यांनी किल्ल्यात भाजीपाला व फळफळावळ यांची लागवड केली.आजही गडाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात सागाचे वृक्ष दिसतात.त्याची लागवड याच चिनी लोकांनी केली. इ.स. १८४५ मध्ये राघोजी भांग्रे यांनी बंड केले.त्यावेळी इंग्रजांनी आपली एक तुकडी या किल्ल्यात आणून ठेवली होती. इतका इतिहासाचा कालखंड पाहीलेला हा गड अद्यापही सुस्थितीत आहे.  

प्राचीन भारत अर्थात हिंदुस्थानाला अनेक परकीय प्रवासांनी भेटी दिल्या.त्यांनी त्यांचे निरिक्षण आणि अनुभव लिहून ठेवले.त्यामुळे आज आपल्याला त्याकाळच्या अनेक गोष्टींची कल्पना येते.या परकीय प्रवाशांपैकी एक म्हणजे 'जॉन फ्रायर'.( १६५०–३१ मार्च १७३३ ). परकीय प्रवासी आणि वैद्यक. त्याचा जन्म लंडन येथे झाला. तो विल्यम फ्रायर याचा सर्वांत मोठा मुलगा. त्याचे शिक्षण केंब्रिज येथील ट्रिनिटी कॉलेजमध्ये झाले. येथून तो पेमब्रोक कॉलेजमध्ये गेला (२३ जुलै १६७१). तेथे वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून त्याने ‘बॅचलर ऑफ मेडिसीन’ ही पदवी मिळवली (१६७२).फ्रायरची शल्यविशारद म्हणून सुरतेतील ईस्ट इंडिया कंपनीच्या वखारीत नेमणूक झाली (१६७२). १३ डिसेंबर १६७२ रोजी तो इंग्लंडहून सुरतेला जाण्यासाठी ‘युनिटी’ या जहाजातून निघाला. त्याच्या ताफ्यातील मुख्य जहाजाचे नाव ‘लंडन’ असे होते. ९ फेब्रुवारी १६७३ रोजी तो केप व्हर्दे येथे पोहोचला. पुढे ३ एप्रिल १६७३ रोजी फ्रायरचे जहाज भरकटले. मार्गावर परत येत त्यांनी मालदीव गाठले. १६ जून १६७३ ला त्यांना सिलोन म्हणजे सध्याचा श्रीलंकेचा किनारा दिसला. त्यांना पाँडिचेरीच्या पुढे एका इंग्लिश वखारीवर डच झेंडा फडकताना दिसला. तेथील डच लोकांनी त्या परिसराची नाकेबंदी केलेली होती. पुढे फ्रायर मछलीपट्टनमच्या किनाऱ्यावर उतरला. तेथे त्याने गोवळकोंडा येथील राज्य कारभाराची, तसेच दक्षिणेतील राजकारणाची माहिती मिळवली. त्याने आपल्या लेखनात मछलीपट्टनम मधील इमारती, बागा, ब्रिटिश आणि पोर्तुगीज वसाहती, तेथे असणारे राजपूत, मुरीश म्हणजे मुस्लिम, फ्रेंच, डच व स्थानिक लोक यांचे वर्णन केले आहे. तेथील स्त्री पुरुषांच्या वेशभूषेबद्दल तो माहिती देतो, तसेच राजाच्या राजधानीचे गोवळकोंडा हे शहर मछलीपट्टनम पासून १५ दिवसांच्या अंतरावर असल्याचे नमूद करून राजाचे उत्पन्नाचे मोठे साधन म्हणजे या राज्यात असणाऱ्या हिऱ्यांच्या खाणी अशी माहिती त्याने दिली आहे. गोवळकोंड्याच्या राजाजवळ १ लाखाचे सैन्य आणि २०० हत्ती असल्याचे तो लिहितो. फ्रायरने तेथील चलनाबद्दल त्रोटक माहिती दिलेली आहे.
          फ्रायर ३० जुलै १६७३ रोजी मद्रासला व पुढे प्रवास करत तो १६७३ च्या डिसेंबरमध्ये मुंबईला पोहोचला. त्याने मुंबईला जाताना वाटेत गोव्याच्या किनाऱ्यावरील किल्ल्यांबद्दल व गोव्यातील इमारती, सेंट झेविअर चर्च, त्यातील सेंट झेविअरचा सांगाडा, बागा, दफनभूमी, इतर लहान मोठी चर्च यांबद्दल लिहले आहे. तो गोव्यात असताना दक्षिणेकडील अंकोल्याला गेला होता. तो तेथे पोहोचण्यापूर्वी काही काळ छ. शिवाजी महाराजांनी अंकोला लुटून उद्ध्वस्त केल्याचे त्याने लिहून ठेवले आहे. परतीच्या प्रवासात तो गोकर्ण महाबळेश्वरला भेट देऊन गोव्यातील मिरजन किल्ल्यापाशी आला. मिरजन हा किल्ला उंच टेकडीवर असून किल्ल्याला दुहेरी तटबंदी असल्याचे आणि भोवती खंदक असल्याचे, तसेच बुरजांवर तोफा पाहिल्याचे तो लिहितो. छ. शिवाजी महाराज कर्नाटक मोहिमेवर गेल्याचे तो नमूद करतो. पुढे तो वेंगुर्ल्यातील डच वखारीत गेला व तिचे वर्णन त्याने केले आहे. वेंगुर्ल्यात फिरताना त्याने सती जाण्याचा प्रसंग बघितल्याचे व सतीच्या स्मृतीसाठी काही बांधकामे (सतीशीळा) केलेली असल्याचे तो म्हणतो. याला तो विरगळ म्हणून संबोधतो. मुंबईला जाताना ‘सेरापटनं’ म्हणजे ‘श्रीवर्धन’ जवळ राजापूर येथे छ. शिवाजी महाराजांचा मजबूत किल्ला असल्याचे आणि खाडीत महाराजांचे ३० छोट्या बोटींचे आरमार सज्ज असल्याचे तो लिहतो. यावेळी विजापूरचा कारभार खवासखानाच्या हातात असल्याचे तो नमूद करतो.
           फ्रायरने आपल्या लेखनात छ. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटनांची नोंद केली आहे. या शिवाय ‘रायरी’ हे महाराजांचे मुख्य स्थान असल्याचे तो लिहितो. प्रवास करत तो मुंबईला पोहोचला. मुंबईची बेटे, ठाणे आणि तेथील किल्ले यांची त्याने वर्णने केली आहेत. तेथून तो वसईला गेला. वसईच्या किल्ल्याच्या वर्णनात तो या किल्ल्याला मजबूत तटबंदी असून दोन दरवाजे आहेत, किल्ल्यावर ४२ तोफा असून किल्ल्यात ६ चर्च, ४ कॉन्व्हेंट, २ विद्यालये असल्याचे लिहितो. येथील लोक नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करतात अशीही माहिती तो देतो. यापुढे त्याने हेन्री ऑक्झिंडेनबरोबर राज्याभिषेक समयी रायगडला दिलेल्या भेटीचे वर्णन केलेले आहे. या वर्णनात तो लिहितो, ‘आम्ही रात्री ९ वाजता चौलला पोहोचलो. किल्ल्याचे दरवाजे बंद झालेले असल्यामुळे आम्ही रात्र सेंट सेबॅस्टीयन या छोट्या चर्चमध्ये काढली. दुसऱ्या दिवशी दुपारी ३ वाजता आम्हाला छ. शिवाजी महाराज चिपळूणवरून रायरीला पोहोचल्याचे समजले. आम्ही चौल शहरापासून २ मैल अंतरावरील राजाच्या प्रदेशात वरच्या चौलमध्ये गेलो. तेथे महाराजांच्या सुभेदाराला भेटलो. त्याने आम्हाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्या दिवशी आम्ही बोटीतून ‘अष्टमी’ या गावात पोहोचलो. तेथून आम्ही प्रवास करत निजामपूर, गंगावली मार्गे रात्री ९ वाजता पाचाड येथे पोहोचलो. तेथे आम्हाला महाराज ‘प्रतापगडला’ भवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी गेल्याचे समजले. ते परत येईपर्यंत आम्ही पाचाडातच मुक्काम केला.’ तेथे त्याने निराजी पंडितला भेटल्याचे, तसेच राजा व इतर मंत्र्यांना भेटवस्तू दिल्याचे लिहिले आहे. दोन दिवसांनी त्याला किल्ल्यावर येण्याची परवानगी मिळाली. त्याने रायगडचे वर्णन करून ठेवले आहे. पुढे त्याने इंग्रजांच्या वतीने मांडलेल्या तहाबद्दल लिहून ठेवले आहे. रायगडावरील राज्याभिषेक सोहळ्यास हा उपस्थित असल्यामुळे त्याने राज्याभिषेक सोहळ्याचे वर्णन करून ठेवलेले आहे. पाऊस थांबल्यावर फ्रायर रायगडावरून सुरतेकडे परतला.
     काही काळ सुरतेत वास्तव्य केल्यावर फ्रायर एप्रिल १६७५ मध्ये मुंबईस आला. तेथून त्याला जुन्नरच्या मोगल सरदाराकडे पाठवण्यात आले. जॉन फ्रायर मुंबईवरुन कल्याण्,टिटवाळा,मुरबाड्,धसई मार्गे निघाला.इथे हवालदाराची परवानगी घेउन तो पालखीत बसून घाट चढू लागला.त्याने घाटाच्या नावाचा उल्लेख केला नसला तरी धसई परिसराचा विचार केला तर हा बहुधा अहुपे घाट असणार.कारण या परिसरातून चढणारे दार्या, त्रिगुणधारा वगैरे घाट अवघड आहेत.कारण त्याच्या सोबत त्याचे सामान वाहण्यासाठी बैल आणि माणसे होती.घाट चढून गेल्यावर याठिकाणी घाटाच्या वर असणार्‍या चौकीतील सैनिकांनी त्याला हटकले व घाट चढण्यासाठी असलेला कर भरल्याची पावती अधिकारी तपासत नाही तोपर्यंत तिथेच थांबण्यास सांगितले.एकदा परवानगी मिळाल्यावर फ्रायर घोड नदीच्या किनार्‍याने रात्री उशीरा आंबेगाव येथे पोहचला.
ती रात्र आंबेगाव येथे काढून फ्रायर दुसर्‍या दिवशी जुन्नरकडे निघाला. यावेळी बहुधा वरसुबाईची डोंगररांग ओलांडून तो कुसुरच्या दक्षिणेला असलेल्या मीना नदीच्या किनार्‍यावरील बेलसर या खेड्यात पोहचला.हे अंतर जवळपास पन्नास मैल म्हणजेच पंचाहत्तर किलो मीटर आहे.त्याकाळचा विचार केला तर हि मोठी मजल ठरते. यावेळी त्याला कच्ची अंजीर सोडली तर फारसे काही खायला मिळाले नाही.त्यानंतर त्याने जुन्नरकडे प्रयाण केले.त्याच्या ग्रंथात जुन्नरचे नाव तो Jeneah असे लिहीतो. मात्र फ्रायर सुर्यास्तापर्यंत जुन्नरला पोहचु शकणार नाही असा निरोप जुन्नरच्या सुभेदाराला देतो.सुभेदाराने त्याची व्यवस्था एका राजवाड्यासारख्या इमारतीत केली असे फ्रायर लिहीतो.हा बहुधा सध्याचा हबशी महाल असणार.याच्या भोवती झाडे आहेत असे वर्णन मुळ ग्रंथात आहे. १ मे रोजी जुन्नरच्या सुभेदाराने फ्रायरला बोलावून घेतले. सुभेदार जुन्नरच्या कोटात बंदोबस्तात रहात होता.शत्रु म्हणजे अर्थातच शिवाजी महाराजांच्या सैन्यापासून सतत भिती होती. 
   पुढे रोगी तपासण्यासाठी एक योग्य दिवस मुक्रर करुन फ्रायरला पुन्हा सुभेदाराच्या घरी नेण्यात आले.इथे रोगी तपायचे होते.सुभेदाराच्या बेगमाना तपासण्याआधी फ्रायरची परिक्षा घेण्यासाठी एका सामान्य नोकराची नाडी तपासण्यास सांगितली.फ्रायरने त्याची नस बघून त्याला काहीही झालेले नाही असे सांगितले.मग सुभेदाराची बेगम पडद्या आड बसुन फ्रायरने तिची नाडी बघीतली.जुन्नरच्या या मुक्कामात फ्रायरने काही आजुबाजुची ठिकाणे देखील पाहिली.यात त्याने गणेश लेणी बघीतल्याचा उल्लेख सापडतो.मात्र त्यावेळी लेण्यात वटवाघळे आणि मधमाश्या असल्याचे त्याने लिहीले आहे.याचा अर्थ त्यावेळी लेण्याद्री गणपतीची मुर्ती लेण्यात होती कि नव्हती ते समजत नाही. या लेण्याचे त्याला मुंबई मुक्कामात पाहिलेल्या कान्हेरी लेण्याशी साधर्म्य वाटते.
          आठवडाभराचा मुक्काम उरकून फ्रायरने मुंबईला परत जाण्याचे ठरविले.त्यावर सुभेदाराने त्याला शिवनेरी गडावर येण्याचे किंवा गडाच्या पायथ्याशी जुन्नर गावातील बागेत भेटण्याची इच्छा व्यक्त केली.त्यावर फ्रायर गडावर जाण्यास तयार झाला. सुभेदराने फ्रायरला आणण्यासाठी आपल्या भावाला व एका नातेवाईकाला चार पालख्या घेउन फ्रायरकडे पाठविले..साधार्ण तीन मैल चालल्यानंतर आपण त्या तटबंदीयुक्त गडाच्या पायथ्याशी पोहचलो असे फ्रायर लिहीतो. यानंतर फ्रायरने शिवनेरी गडाचे विस्तृत वर्णन केले आहे. शिवनेरीगडावर अनेक चौक्या असून सुमारे पाच हजार युध्दसज्ज फौज येथे आहे.तसेच गरज पडल्यास उंट सुध्दा आहेत.शिवाजी महाराजांनी हे स्थळ जिंकून घेण्याचा बराच प्रयत्न केला, परंतु एकापाठॉ पाठ एक असलेले सात दरवाजे आणि बळकट तटबंदी इथे प्रवेश करणे अशक्य आहे.
           असे भक्कम लष्करी स्थान मी पुन्हा पाहिले नाही असे फ्रायरचे मत झाले.मात्र शिवनेरीच्या पायर्‍यावरुन पालखीत बसून चढताना त्याला त्रास झाला.अश्या प्रकारे पालखीत बसून पायर्‍यावरुन जाण्यासाठी तुमची पाठ भक्कम पाहीजे असे मजेने तो म्हणतो. यानंतर शंभर पायर्‍या चढून आम्ही सपाटीवर पोहचलो.इथे आधीच्या नबाबांची थडगी असून इथल्या सपाटीवर सैनिकांना प्रक्षिशण दिले जाते.इथेच एक मशिद असल्याचा तो उल्लेख करतो.सध्या तरी गडावर शिवकुंजाजवळ एकमेव मशिद आहे.त्यामुळे फ्रायर उल्लेख करतो ती मशिद कोणती? हे आज समजत नाही. पुढे फ्रायर गडावरची घरे हलक्या दर्जाची असून हि घरे सामान्य प्रतीची,पावसात्,उन्हात तग धरतील असे वाटत नाही असे म्हणतो. गडाच्या पुर्वेकडच्या सपाटीवर लोक रहातात.मोठी घरे बांधण्यापेक्षा छोटी घरे बांधून हे लोक रहातात.
किल्लेदारचे घर मात्र तुलनेने उत्तम बांधले आहे.या घराला कुंपण म्हणुन झाडे लावली आहे.असे कुंपण गडाच्या गडावरच्या इतर घरांना नाही.पुढे तो शिवनेरीच्या किल्लेदाराचे वर्णन करतो. इथला किल्लेदार इतर मोघल सरदारांप्रमाणे आळशी नाही.त्याला अरेबिक व पार्शियन भाषा येतात.इथे येणार्‍या युरोपियन प्रवाशांकडून त्याने अनेक गोष्टी माहिती करुन घेतल्या आहेत.मी गडावर पोहचलो तेव्हा किल्लेदाराने स्वतः येउन स्वागत केले.तसेच माझी व्यवस्था स्वतःच्या घरात केली. तसेच माझे मनोरंजन व्हावे म्हणून नाचगाण्याचा कार्यक्रम ठेवला.रात्री मेजवानी आयोजित करुन स्वतःच्या हाताने मला वाढले.तसेच जेवण संपल्यावर सरबत दिले.
   यानंतर फ्रायरने वर्णन केलेला प्रसंग मनोरंजक आहे.रात्री झोपताना मोघल दिव्सभर वापरलेल्या कपड्यात झोपत असत.त्यामुळे फ्रायर काय करणार ? या कुतुहलातून निजाम बेगने त्याच्या नोकराला विचारले कि 'हे रात्री याच कपड्यात झोपणार काय ?".
इंग्रज सैनिक वापरतात ती रेपियर तलवार

    किल्लेदाराने त्याला आणखी काही प्रश्न विचारले.बेगला फ्रायरच्या तलवारीविषयी काही शंका होत्या.कार्ण इंग्रज लोक रेपियर प्रकारची तलवार वापरत.तसेच युरोपियन सैनिकांची शिस्त याविषयीही किल्लेदाराला आकर्षण होते.गप्पा झाल्यावर खुष होउन किल्लेदाराने फ्रायरला स्वतःच्या बोटातील अगंठी भेट दिली.याला नंतर किल्लेदाराने किल्ला फिरुन बघायची परवानगी दिली.यानंतर फ्रायर शिवनेरी गडाचे वर्णन करतो.'मी सर्वप्रथम शिवाजी राजांचे लोक ज्या किल्ल्यावरुन गडावर चढून आले त्या कड्याजवळ गेलो.खरतर हा कडा अतिशय ताशीव आहे.तरीही कसे काय कोण जाणे ,शिवाजी महाराजांची दोन माणसे हा कडा चढून वर आली.मात्र नेमक्या त्याच वेळी वरुन दगड पडल्यामुळे त्यांचे प्रयत्न वाया गेले.' फ्रायर ज्यावेळी गड फिरत होता त्यावेळी गडावर किल्लेदार आणि त्याची बायका पोरे सोडली तर कोणीही नव्हते.गडावरचे सैन्य शिवाजी महाराजांच्या सैन्याचा मुकाबला करण्यासाठी गडाखाली गेले होते.गडावर धान्य साठविण्यासाठी मोठी कोठारे बांधले असून अनेक टाक्यात तुप साठविले आहे.( हे तुप युध्दात झालेल्या जखमांवर लावण्यासाठी वापरले जात असे )
गडावर पाण्याची मोठ्या संख्येने टाकी असून पाण्याचा रंग कधी हिरवा,अक्धी पिवळा तर कधी लाल दिसतो.पाण्याचे सारखे बाष्पीभवन होत असते.किल्ल्यावरच्या पाण्याची चव अतिशय खराब असल्यामुळे गडावरचे लोक कांद्याने हे पाणी शुध्द करुन पितात.'
  शिवनेरी गडाच्या सज्जतेबध्दल तो लिहीतो 'गडावर एक हजार कुतूंबियांना सात वर्ष पुरेल इतके धान्य आहे.गडावर फारसा तोफखाना नाही.नाही म्हणायला इथे दोन मध्यम आकाराच्या तोफा आहेत. या तोफा पितळी असून २२ फुट लांबीच्या आहेत.त्यामुळे गडाच्या संरक्षणासाठी इथे मोठ्या प्रमाणात दगड जमवून ठेवले आहेत.'
किल्ल्याचा फेरफटका मारुन फ्रायर पुन्हा किल्लेदाराकडे परत आला.त्याचे आभार मानून गडउतार झाला.
    पुढे फ्रायर जुन्नर परिसराचेही वर्णन करतो,' या परिसरात आपल्या देवतांसाठी काही शतकापुर्वी कारागिरांनी इतकी लेणी आणि गुहा खोदलेल्या आहेत.मात्र त्यांना आज कोणी वाली नाही,तसेच तिथे जाणे देखील जाणे देखील कठीण झाले आहे.हा पर्वत ( म्हणजे शिवनेरी गड ) स्रवांपासून बाजुला असला तरी शिवाजी राजांच्या ताब्यात असलेल्या गडांनी वेढला आहे. ( चावंड्,हडसर शिवाजी माहराजांच्या ताब्यात होते ) या सर्व किल्लावरुन सतत युध्दघोषणा एकायला येतात.शिअव्नेरी गडाचे रक्षण जवळपास १००० सैनिक करतात.हा बळकट किल्ला मोघलांच्या ताब्यात असल्यामुळे शिवाजी महारांजाजी महाराजांची घोडदौड एकप्रकारे रोखली गेली आहे.पुर्वी या गडावर मुळचा ब्राम्हण पण नंतर बाटल्यामुळे मुसलमान झालेला हाफिझखान नावाचा किल्लेदार होता, किल्ला जिंकून घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी त्याला सोन्याचे अमिष दाखविले.त्यावर हाफिझखानाने ७००० घोडे पाठविण्यास सांगितले आणि बहादुरखानाला मागून हल्ला करण्यास सांगितले. बहादुरखानाला हा फितुरीचा मनसुबा हाफिझखानाने आधीच सांगून ठेवला होता.या प्रकारामुळे शिवाजी महाराजांना येथे मोठा पराभव पत्करावा लागला.शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेण्याचे इतके प्रयत्न करण्याचे कारण म्हणजे हा किल्ला पाच पातशाह्यांच्या काळात निजामशाहीचे महत्वाचे केंद्र होता,त्याची व्यवस्था शहाजी राजे बघत होते.तसेच हाच गड शिवाजी महाराजांचे जन्मस्थान होता.शिवनेरीच्या गडाच्या उत्तरेला परिसरातील सर्व किल्ले असल्यामुळे हा किल्ला जणु त्यांचे नेतृत्व करत आहे असे वाटते'.
   फ्रायरने केलेले हे  शिवनेरीचे वर्णन अतिशय सखोल आणि सुंदर आहे.त्यामुळे त्याकाळातील जुन्नर्,शिवनेरी व परिसर कसा होता? हे आपल्याला आज समजते.जुन्नरला काही दिवस राहून त्याने २२ मे १६७५ रोजी जुन्नर सोडले व नाणेघाटात दुपारच्या वेळेला तो येउन पोहचला.या प्रवासाचे देखील फ्रायरने वर्णन केले आहे. 
'जुन्नरवरुन निघाल्यावर वाटेत आम्ही शिवाजी महाराजांचे दोन किल्ले सोडले ( हे चावंड व हडसर असणार ) पण नाणेघाटाजवळ पोहचल्यावर जुन्नरच्या किल्ल्याप्रमाणे अस्णार्‍या किल्ल्यावरुन ( म्हणजे जीवधन ) आम्हाला रोखले गेले.मात्र त्यांना उत्तर देउन मी तसाच घाटाकडे निघालो.मात्र त्याच वेळी पाठीवर मीठ लादून तीनशे बैल कोकणातून घाट चढून नाणेघाटाच्या माथ्यावर आले होते,मात्र तासभर थांबून देखील ते निघेणात.त्यामुळे माझ्याबरोबरच्या माणसाला पुढे पाठवून घाट मोकळा असल्याची खात्री करुन घेतली.शेवटी घाट उतरुन फ्रायर खाली असणार्‍या ( वैशाखरे) येथील्ह वालदाराला भेटला.पुढे तो मुरबाड मार्गे तो मुंबईला परतला. सह्याद्री, त्यावरील किल्ले, किल्ल्यांचा कारभार याबद्दल त्याने विस्तृत लेखन केलेले आढळते. यात प्रामुख्याने रायगड व शिवनेरी या दोन वेगवेगळ्या राज्यकर्त्यांच्या ताब्यातील किल्ल्यांची वर्णने विशेष आहेत. पुढे फ्रायरने गोवा, कारवार, परत सुरत असा प्रवास करत १६७९ मध्ये भारताचा निरोप घेतला व पर्शियामध्ये काही वर्षे घालवून १६८२ मध्ये तो मायदेशी परतला. मायदेशात परत आल्यावर त्याने १६८३ मध्ये ‘डॉक्टर ऑफ मेडिसीन’ ही पदवी मिळवली. त्याच्या भारत व पर्शिया भेटीचा पत्ररूपी वृत्तांत अ न्यू अकाउंट ऑफ ईस्ट इंडिया अँड पर्शिया बिइंग नाइन यिअर ट्रॅव्हल्स १६७२-१६८१  या ग्रंथात प्रसिद्ध आहे.पुढे लंडन येथे त्याचे निधन झाले.
असा हा शिवनेरीचा विस्तृत इतिहासाचा पट.आता आपण या महत्वाच्या दुर्गाची प्रत्यक्ष भटकंती करुया.
 अश्या या महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाच्या आणि इतिहास प्रसिध्द गडाला पर्यटक्,दुर्गप्रेमी,शिवप्रेमी मोठ्या संख्येने जातात.इथे जाण्यासाठी मुंबई किंवा पुणे हि सोयीची शहरे आहेत. शिवनेरी किल्ला पुण्यापासून १०३ किमी अंतरावर आहे. पुण्यातून पुणे-नाशिक महामार्गावरुन पुणे-चाकण-राजगुरुनगर-नारायणगाव-जुन्नर असे जाता येते.मुंबईवरुन शिवनेरीला जायचे तर दोन पर्याय आहेत. मुंबई - कल्याण - माळशेज घाट मार्गे - जुन्नर असा रस्ता असून हे अंतर ११३ कि.मी.आहे.या मार्गे अडीच तास लागतात.तर मुंबई -लोणावळा-चाकण-नारायणगाव-मंचर हे अंतर २०० कि.मी.असून यामार्गे चार ते पाच तास लागतात..जुन्नरला येतांना माळशेज घाट पार केल्यावर ८ ते ९ किलोमीटवर ‘शिवनेरी १९ कि.मी.’ अशी एक पाटी रस्त्याच्या कडेला लावलेली दिसते. हा मार्ग गणेशा खिंडीतून शिवनेरी किल्ल्यापर्यंत जातो. या मार्गाने गडावर पुर्ण बघून परत जाण्यास एक दिवस लागतो. जुन्नर गावापासुन ४ किमी अंतरावर शिवनेरी गड आहे.

 जुन्नर शहरात शिरल्यावर समोरच हा किल्ला नजरेस पडतो. गडाची उंची समुद्रसपाटीपासुन ३२०० फुट तर पायथ्यापासुन साधारण ९०० फुट असुन गड दक्षिणोत्तर दीड किमी पसरलेला आहे. किल्ल्याचा दक्षिणेकडील भाग अर्धगोलाकृती असुन उत्तरेकडे निमुळता होत जाणारा आहे.  शिवनेरी किल्ल्याचा आकार शिव-पिंडाप्रमाणे दिसतो. शिवनेरी फार उंच नसला तरी त्याला सर्व बाजुने १०० ते १२५ फुट उंचीचे कातळकड्यांचे नैसर्गिक संरक्षण लाभल्याने काही ठिकाणीच तटबंदी बांधलेली नजरेस पडते. गडाच्या पोटात असणाऱ्या अनेक लेण्यामुळे हा किल्ला लांबुनही सहज ओळखु येतो. त्यातील काही गुहांमध्ये सहजपणे तर काही गुहांत थोडयाफार परिश्रमाने जाता येते. गडावर जायला दोन मार्ग असुन पहिला डांबरी रस्त्याने मुख्य दरवाज्याने वर जाणारा आहे तर दुसरा मार्ग त्या मानाने जरा अवघड असा साखळीची वाट आहे.



      शिवनेरी हा किल्ला पाहण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.   हा किल्ला पाहण्यासाठी २ तासापेक्षा जास्त वेळ लागतो. हा किल्ला संध्याकाळी ६ वाजेपर्यंत पर्यटकांना पाहण्यासाठी उघडा असतो.या किल्ल्यावर शिवकुंजाच्या मागील बाजूस असणाऱ्या वऱ्हांड्यामध्ये १० ते १२ जणांची रहाण्याची सोय होते. किल्ल्यावर जेवणाची सोय नसल्याने ती व्यवस्था आपण स्वतःच करावी. गंगा व जमुना या टाक्यांमध्ये बारामही पिण्याचे पाणि उपलब्ध आहे. गडावर जाण्यासाठी साखळीच्या मार्गेपाउण तास, सात दरवाजा मार्गे दीड तास लागतो.

Sakhaldand.jpg
शिवनेरी साखळदंडाच्या मार्गाने
Sakhaldand_1.jpg
साखळदंडाची वाट:
साखळीची वाट :-
    गडावर येणारे बहुतेक पर्यटक पायर्‍यांच्या सात दरवाजामार्गे येतात. साखळीची वाटेने गडावर यायचे झाल्यास जुन्नर शहरातील शिवपुतळ्या कडून डाव्या बाजुस जाणा-या रस्त्याने साधारण एक किमी गेल्यावर रस्त्याच्या उजव्या कडेला एक मंदिर आहे. या मंदिरासमोर जाणारी मळलेली पायवाट थेट शिवनेरी किल्ल्याच्या कातळभिंतीपाशी घेऊन जाते. पुर्वेकडून असलेली ही वाट गडाच्या लांबीच्या साधारण मध्यावरून सुरू होते व कातळ कड्यातील गुहांच्या दिशेने वर जाते. इथे कातळात खोदलेल्या निमुळत्या पायऱ्यांवरून काही अंतर कापावे लागते. हा भाग थोडा धोक्याचा आहे. भिंतीला लावलेल्या तारेच्या साह्याने आणि कातळात खोदलेल्या पाय-यांच्या सहाय्याने येथुन वर जाता येते. इथे आधारासाठी पुर्वी साखळ्या लावल्या होत्या त्यामुळे ह्या वाटेला साखळीची वाट असे नाव पडले आहे. संकटकाळी वर किंवा खाली जाण्यासाठी ही वाट उपयुक्त असुन आक्रमणाच्या वेळी पळून जाण्यासाठी हा मार्ग वापरला जात असे.

  


शिवनेरी किल्ल्याचे फोटो | Shivneri Fort Photos
किल्ल्याची मजबुत तटबंदी

सात दरवाज्यांची वाट :-
डांबरी रस्त्याने गडाच्या उंचीच्या साधारण मध्यापर्यंत आपल्याला गाडीने जाता येते. इथून पुढे काही पायऱ्यां चढुन आपल्याला गडाचा माथा गाठता येतो. ह्या वाटेने किल्ल्यावर जाण्यास एका मागोमाग एक असे सात दरवाजे ओलांडावे लागतात. गडावर जात असताना सात दरवाजे लागतात. पहिला महादरवाजा, दुसरा पीर दरवाजा, तिसरा परवानगीचा दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, पाचवा शिपाई दरवाजा, सहावा फाटक आणि सातवा कुलाबकर दरवाजा.  
या प्रत्येक ठिकाणी त्याच्या नावाचे फलक लावलेले आहेत. सगळ्यांना काही माहीत असते असे नाही त्या दृष्टीने हे सोयीस्कर ठरते.  
महाराष्ट्रातील किल्ल्यावर सर्वात मोठय़ा प्रमाणावर आढळणारं द्वारशिल्प म्हणजे शरभ. तो आपल्याला शिवनेरी किल्ल्यावरच्या परवानगी दरवाजावरही दिसतो. त्या दरवाजावरील द्वारशिल्पात शरभाने आपल्या पुढच्या पायात गंडभेरुंड पकडलेला आहे असे दिसते तर, मागच्या दोन्ही पायांत दोन हत्ती पकडलेले आहेत असे दाखवलेले आहेत.  
पुरातत्वविभाग आणि वनविभागाने किल्ला स्वच्छ आणि डागडुजी करून नीटनेटका ठेवला आहे.हि त्यांची केलेली कामगिरी खरंच उल्लेखनीय आहे.


पहिला महादरवाजा 
महादरवाजा
   

Shivneri_1.jpg

Shivneri_1_1.jpg

शिवनेरी किल्ल्याचे फोटो | Shivneri Fort Photos
महादरवाजा
त्यातला पहिला दरवाजा महादरवाजा. या दरवाज्याकडे जाणार्या पायर्‍या आणि नक्षीदार दरवाजा देखणा आहे.मात्र या दरवाज्यावर कोणतेही द्वारशिल्प किंवा चर्या नाहीत.
  
 
 
 
Shivneri_2.jpg
गणेश दरवाजा

 दुसरा दरवाजा गणेश दरवाजा किंवा परवानही दरवाजा म्हणुन ओळखला जातो. या दरवाजाच्या वरील भागात दोन मिनार असुन दरवाजाच्या कमानीवर शरभ या सिंहासारख्या दिसणाऱ्या एका काल्पनिक प्राण्याची दोन शिल्पे आहेत. डाव्या बाजुच्या शरभाच्या पुढील उजव्या पंजात एक कुत्रा कोरलेला असुन उजव्या बाजुच्या शरभाने दोन हत्ती व एक गंडभेरुंड पंजात धरलेला दाखवला आहे. गंडभेरुंडही एक काल्पनिक दुतोंडी गरुडासारखा दिसणारा पक्षी आहे.
 काही शरभ शिल्पे पाहिल्यास त्यामध्ये शरभाच्या पायाखाली तसेच शेपटीमागे हत्ती किंवा गंडभेरुंड हे  शिल्पान्कृत केलेले दिसतात. जणू काही शरभ हा त्या हत्तींना पायाने दाबत आहे  किंवा शेपटीने भिरकावून देत आहे!
 शिवनेरीच्या प्रवेशद्वारावरील शरभाचे शिल्प
शिवनेरी किल्ल्याच्या द्वारावरील शरभशिल्प(ह्याच्या मागील दोन पायांखाली हत्ती आहेत आणि पुढील पायाखाली गंडभेरुंड आहे) :
शिवनेरी किल्ल्यावरील शरभाच्या पायाशी असलेले गंडभेरुंड:



शिवनेरी किल्ल्याचे फोटो | Shivneri Fort Photos
वाटेच्या पुढील भागात दोन दरवाजांचा चौक असुन या चौकातील पहिला दरवाजा ढासळलेला आहे या ढासळलेल्या दरवाजावर डावीकडे शरभ कोरलेला आहे. या शरभाच्या उजव्या बाजुला घोरपड किंवा इग्वानासारखा प्राणी कोरला आहे. ढासळलेला हा तिसरा दरवाजा पीर दरवाजा म्हणुन ओळखला जातो.


Shivneri_3.jpg
पिराचा दरवाजा
 


Shivneri_4.jpg

शिवनेरी किल्ल्याचे फोटो | Shivneri Fort Photos
हत्ती दरवाजा

 चौकाच्या पुढील चौथा दरवाजा हत्ती दरवाजा म्हणुन ओळखला जातो. ह्यावर काही विशेष चिन्हे किंवा शिल्पे दिसत नाहीत. हत्ती दरवाजा ओलांडल्यावर आपल्याला गडाचे अवशेष मोठ्या प्रमाणावर दिसायला सुरवात होते. येथुन पुढे जाण्यास बांधीव पायरी मार्ग तसेच खडकात खोदलेल्या पायऱ्या आहेत. 
 

Shivneri_5.jpg
शिवाई देवी दरवाजा

या वाटेने आपण पाचव्या दरवाजासमोर अभे राहतो. या दरवाजाचे नाव आहे शिपाई दरवाजा. या दरवाजाचे मूळ लाकडी दार आजही शिल्लक असुन या दारांवर अणकुचीदार लोखंडी खिळे बसविण्यात आली आहे.
 
 



    पाचव्या दरवाजाची संरक्षण रचना अभ्यासनीय असुन हा गडाचा प्राचीन मुख्य दरवाजा असावा असे वाटते. ह्या दरवाजाच्या चौकटीवर हाताचे पंजे कोरलेले दिसून येतात. शिपाई दरवाजातुन आत गेल्यावर डाव्या बाजुस गेल्यावर खडकात कोरलेली दोन लेणी व पाण्याची आठ-दहा टाकी दिसुन येतात तर उजवीकडची वाट शिवाई मंदिराकडे जाते.
 
शिवनेरी किल्ल्याचे फोटो | Shivneri Fort Photos
खांबांचे कोरिव नक्षिकाम

शिवाई मंदिराकडे जाताना वाटेत पाण्याची दोन खडकात खोदलेली टाकी असुन प्रत्यक्ष मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी एक कोरीव काम केलेला आकर्षक लहानसा कमानी दरवाजा ओलांडावा लागतो. हा दरवाजादेखील अलीकडील काळातील असावा. या दरवाज्यातुन वाट शिवाई देवीच्या मंदीरात जाते. 
 




 
 

शिवाईचे मुळ मंदिर एका कोरलेल्या गुहेत असुन त्यात देवीचा मूळ स्वरूपातील तांदळा आहे. नंतर ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला असुन आज त्याला बांधीव मंदिराचे स्वरुप आलेले आहे.महाराजांचे शिवाजी हे नाव ह्या शिवाई देवीवरुन ठेवण्यात आले असे मानले जाते.




मंदिरावरून सरळ पुढे गेले की डाव्या हाताच्या कातळात ६ ते ७ बौद्ध लेणी लागतात. यातील दोन लेण्यांच्या दारावर डाव्या हाताला एक शिलालेख आहे. 
 


काही गुहांच्या समोर कातळकड्यात खोदलेली पाण्याची टाकी आहेत. ह्या गुहा ख्रिस्तपूर्व दोनशे वर्ष इतक्या जुन्या आहेत. नाणे घाटाचा व्यापारी मार्ग इथून जवळ असल्याने व्यापारी व भिक्षुंसाठी हे विश्रांतीचे स्थान असावे. 

Shivneri_6.jpg
मेणा दरवाजा
मेणाचा दरवाजा आतून

शिवाई मंदिर व परिसर पाहुन परत मुळ वाटेवर येऊन सरळ गेले तर आपण फाटक किंवा मेणा दरवाज्याकडे जातो.
 
 
Shivneri_7.jpg
कुलुप दरवाजा

या प्रत्येक दरवाज्याची बांधकामाची शैली पुर्णपणे वेगळी आहे.याचा अर्थ हे दरवाजे गरज पडेल तसे निरनिराळ्या कालखंडात बांधले गेले असावेत.
Amberkhana.jpg

शिवनेरी किल्ल्याचे फोटो | Shivneri Fort Photos

– –
‘अंबारखाना’च्या आतून


अंबरखाना 
अंबरखान्यातील आतील भाग

  शेवटच्या कुलाबकर दरवाज्यातून गडावर प्रवेश केल्यावर समोरच अंबरखाना आहे. गड वापरात असताना या अंबरखान्याचा उपयोग धान्य साठविण्यासाठी केला जात होता. एखाद्या किल्ल्याला जेव्हा ६-७ महिने वेढा घातला जायचा तेव्हा किल्ल्यावरील लोकांना एवढे महिने पुरेल इतकी रसद कशी साठवली जात असेल हे त्याच्याकडे पाहून आपल्याला अंदाज येतो. अंबरखान्याच्या छताला झरोके आहेत. अंबरखान्याच्या छतावर चढून गेल्यास शिवनेरीच्या पश्चिम बाजुचे दृष्य दिसते.आजमितीस अंबरखान्याची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे.
पर्यटकांच्या सोयीसाठी बाकांची व्यवस्था केली आहे.
अंबरखान्याजवळच एक महाराष्ट्राचा उठावाचा नकाशा करुन त्यावर विवीध किल्ले दाखविले आहेत.

अंबरखान्यापासून दोन वाटा निघतात.एक वाट समोरच असणा-या टेकाडावर जाते. या टेकाडावर एक कोळी चौथरा आणि एक इदगा आहे. दुसरी वाट शिवकुंजापाशी घेऊन जाते
 
 
शिवनेरी किल्ल्याचे फोटो | Shivneri Fort Photos
किल्ल्यावरील भलेमोठ्ठे जाते 
 
 
आधी आपण कोळी चौथरा पाहु आणि मग गडच्या उत्तर टोकाकडच्या वास्तु पाहु.अंबरखान्यासमोरुन एक वाट समोरच असणाऱ्या टेकाडावर जाते. या टेकाडावर एक कोळी चौथरा आणि एक इदगा आहे.आधी आपण कोळी चौथर्‍यासंबधीत काही दुर्गकथा पाहुया.  

या कोळी चौथर्याबाबत परंपरेने असे सांगितले जाते कि निजामशाही अस्तानंतर आदिलशाही आणि मोगल यांचे या भागाकडे दुर्लक्ष झाले याचा फायदा घेऊन  शिवनेरी येथील कोळी सरदारांनी मोठे बंड पुकारले होते.हे बंड मोडण्यासाठी मोठा फौजफाटा पाठविला गेला.अनेक कोळ्यांना कैद करुन बंड मोडून काढले आणि बंडखोर कोळ्याना कैद करुन शिवनेरीवर आणण्यात आले.इथे त्यांना ठार मारुन ज्या जागेवर त्यांची हत्या करण्यात आली तिथे एक फरस बांधण्यात आला. यालाच लोक कोळी चौथरा म्हणू लागले. या चौथऱ्याच्या पुढील बाजुस इदगाह नजरेस येतो.
  याविषयी पहिली दंतकथा अशी सांगतात कि बाळाजी जर्नादन भानु उर्फ नाना फडणवीस यांचा मेहुणा बळवंतराव मुंढे यांनी कोळ्यांचे बंड मोडून काढले तेव्हा यात सामिल असलेले पाच कोळी पळून गेले.बळवंतरावांनी शिपाई पाठवून त्यांना कैद करुन शिवनेरीवर आणले व त्यांना ठार मारले.परंतु मृत्युनंतर कोळ्यांना सदगती प्राप्त न होता त्यांची भुत झाली.आणि त्या भुतांनी आपल्यावरचा अन्यायाचा बदला म्हणून बळवंतरावाला छळायला सुरवात केली.त्यावर उपाय म्हणून बळवंतरावांनी अनेक पंचाक्षरी ( म्हणजे मांत्रिक) बोलावून दानधर्म केले.पुजा,अनुष्ठाण केली.पण भुतबाधेतून सुटला होईना.म्हणून अखेर शिवनेरीच्या पायथ्याशी त्यांच्या नावाची पाच लिंगे स्थापन करुन देवालय बांधले. यानंतर त्या भुतांनी बळवंतरावांचा पिच्छा सोडला.

दुसर्‍या एका दंतकथेनुसार मुसलमानी आमदनीत जुन्नर येथे कोणी ब्राम्हण सुभेदार होता.पुढे काही कारणामुळे बादशहाची त्याच्यावर इतराजी झाली.त्याने जुन्नरच्या सुभेदाराला दरबारात बोलावून घेतले आणि त्याला आरोपी ठरवून कैदेत टाकले. तेव्हा त्या ब्राम्हणाने देवाला नवस केला, 'मी या संकटातून मुक्त होउन आलो तर पंचलिंगाचे मंदीर बांधीन' नंतर चौकशी अंती तो निर्दोष होता हे सिध्द झाले.मग बादशहाने कैदेतून त्याची सुटका केली.केवळ देवाची कृपा म्हणून आपली सुटका झाली असे त्या ब्राम्हणाला वाटले.जुन्नरला परत आल्यावर त्या सुभेदाराने शिवनेरीच्या पायथ्याशी पंचलिंग मंदीर बांधले आणि बोललेला नवस फेडला.   
    या दुसर्‍या कथेत थोडे तथ्य निश्चितच आहे.कारण सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात शिवनेर व चास तालुक्यात कोळ्यांनी बंड केले होते.यावेळी जुन्नरचे सुभेदार होते बाळाजी महादेव नावाचे ब्राम्हण गृहस्थ. कोळ्यांच्या बंडाचे पारिपत्य होउन बंदोबस्त झाला कि श्रींचे देवालय बांधीन म्हणुन त्यांनी नवस केला होता.जेव्हा कोळ्यांचा पुंडावा मोडून शांतता प्रस्थापित झाली तेव्हा पेशव्यांनी २० मार्च १७८७ रोजी सनद पाठवून दोन हजार रुपयात मंदीर बांधावे अशी आज्ञा केली. याविषयीची तपशीलवार सनद सवाई मधावराव पेशवे यांच्या रोजनिशीत १०३७ ( ९४३) पृष्ट क्रमांक २०२ वर प्रकाशित करण्यात आलेली आहे.
   कोळी चौथरा आणि हा इदगाह असलेला परिसर हा गडावरील सर्वात उंच भाग असुन येथुन जीवधन, भैरवगड, चावंड , हडसर अन् नारायणगड या किल्ल्यांचे दर्शन होते.



Ganga_Jamuna_Take.jpg

Ganga_Jamuna_Take_1.jpg 

गंगा जमुना टाके

अंबरखान्याच्या मागील बाजुस गेल्यास गडाची खालपासुन वर आलेली तटबंदी व अभेद्य बुरुज यांचे दर्शन होते. अंबरखान्यापासून समोर जाणारा मार्ग शिवकुंजाकडे जातो. या मार्गाने जात असताना वाटेत गडाच्या उतारावर डाव्या बाजुला पाण्याची अनेक टाकी दिसतात. तर उजव्या बाजुस गंगा जमुना हि शिवनेरीवरील पाण्याची प्रसिद्ध टाकी दिसतात. या टाक्यांमध्ये बारमाही पिण्याचे पाणी उपलब्ध असते. गंगा जमुना हि टाकी सातवाहन काळातील बांधकामाचा उत्तम नमुना आहे.
शिवजन्मस्थान :-


Shiv_Janma_Sthan_2.jpgShiv_Janma_Sthan_3.jpg
 





शिवनेरी किल्ल्याचे फोटो | Shivneri Fort Photos

शिवनेरी किल्ल्याचे फोटो | Shivneri Fort Photos







Shiv_Janma_Sthan_1.jpg
 


 

 

 Shiv_Janma_Sthan_4.jpg








 
 
Badami_Take.jpg
शिवजन्म स्थान वास्तु :-
         यानंतर आपण जाउया केवळ शिवनेरी नव्हे तर अखंड महाराष्ट्र भुमीच्या आणि अखंड भारतभुमीच्या दृष्टीने महत्वाच्या असणार्‍या असणार्‍या पवित्र स्थळाकडे, 'शिवजन्मस्थानाकडे'.गंगा-जमुना टाक्याच्या पुढेच शिवजन्मस्थानाची इमारत आहे. ही इमारत दुमजली असून खालच्या खोलीत जिथे शिवरायांचा जन्म झाला तेथे शिवरायांचा पुतळा बसविण्यात आला आहे.  दुमजली असणाऱ्या ह्या वास्तूत तळ  मजल्यावर शिवाजी महाराजांची मूर्ती व पाळणा आहे.कदाचित याच ठिकाणी महाराष्ट्राची भाग्यभवानी जिजाऊ साहेबांच्या मुखातून अंगाई गायली असेल त्याला झोका देत असताना.इथे आपल्याला शिवकल्याण राजा मधील ४ ओळी आठवतात.
                                          "गुणिबाळ असा जागसि का रे वाया । निज रे निज शिवराया ।"
वरती पायर्‍या चढून गेले की आपला थेट इतिहासात प्रवेश होतो.कदाचित मुळ वास्तुला अशीच खिडकी असावी आणि इथूनच बाल शिवबाने पहिले सुर्यदर्शन घेतले असावे. हे बांधकामच तसे एकदम भक्कम नि सुस्थितीत आहे. इथे पाच खिडक्यांचा सज्जा आहे. सहाजिकच इथे पर्यटकांची स्वतःचा फोटो काढुन घेण्याची धडपड सुरु असते.  त्यामुळे बाहेरुन या वास्तूचा फोटो घेताना अडचण येते. या वास्तुला मोठ्या प्रमाणात शिवभक्त भेट देत असल्यामुळे आत जाण्यासाठी बहुतेक वेळा मोठी रांग असते.

 
    या जन्मस्थान परिसरातच हमामखाना म्हणजे आंघोळीची जागा तसेच पाण्याचे हौद बघता येतात.इथे मोठ्या संख्येने इमारती असणार, पण आज त्या उध्वस्त अवस्थेत आहेत. 

 

कोण्या एकेकाळी शिवजन्मस्थानाची हि वास्तु उध्वस्त अवस्थेत होती.मात्र शिवजन्मस्थानाचा जिर्णोध्दार राजर्षी शाहू महाराजांचे सहकारी सत्यशोधक भास्करराव जाधव व सहकारी यांनी केला होता. या शिवभक्तांनी त्यावेळी वर्तमानपत्रामधुन केलेले मदतीचे आवाहन.
   "शिवनेरी जिर्णोद्धार कमिटी स्वराज्य संस्थापक श्री शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर ज्या ठिकाणी झाला ती जागा महाराष्ट्रीय लोकांच्या ऐतिहासिक स्थलाच्या बाबतीत दिसुन येणाऱ्या उदासिनतेमुळे हल्ली अतिशय वाईट स्थितीत आहे. शिवनेरी सारख्या ऐतिहासिक स्थलाची वाताहात होऊ न देता त्याची योग्य व्यवस्था ठेवणे हे ख-या शिवभक्ताचे आद्य कर्तव्य आहे. याबद्दल नामदार भास्करराव विठोजीराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली 'शिवनेरी जिणोंद्वार' नांवाची कमिटी स्थापन करण्यांत आली. जिर्णोद्धार कमिटी पुराणवस्तु संरक्षक खात्याचे मुख्य अधिकारी मे. जी. सी. चंद्रा साहेब यांच्या सहाय्याने काम करीत आहे. किल्ल्यावरील जुन्या वाड्याचे जे अवशेष कमिटीच्या पैशाने आतापर्यंत उकरून काढले आहेत. त्यांच्या दुरुस्तीच्या खर्चाचे ३६५० रु. चे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून त्या कामाला सुरवात होईल. पुतळ्याचे काम हिंदुस्थानांतील सुप्रसिद्ध मूर्तिकार म्हात्रे यांच्याकडे दिले आहे. धर्मशाळेच्या कामाचे नकाशे व खर्चाचे अंदाजपत्रक तयार होत असुन त्या कामालाही सुरुवात होईल. कमिटीने आखलेल्या जिर्णेद्वाराच्या योजनेस अदमासे रु. चाळीस हजर लागतील असा अंदाज आहे. तरी कार्याचे महत्व जाणुन शिवभक्त ह्या पवित्र कार्यास सढळ हाताने मदत करतील अशी आशा आहे."
       सर्वांचा नम्र,
 शं. शा. मोरे वकील,
जॉ. से. शिवनेरी जिर्णोद्धार कमिटी,
पुणे.
       दुर्गम ठिकाणी आसणा-या शिवजन्मस्थानाचे जिर्णोद्धार कार्य या सत्यशोधकांनी १९२९ सालातच पूर्ण केले होते.

Jijau_aani_Raaje.jpg

बाल शिवाजीला हिंदवी स्वराज्याचे बाळकडू देताना वीरमाता जिजाऊ




 शिवकुंज:  -

        हे शिवनेरी किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचे स्मारक आहे.याची स्थापना व उदघाटन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी केली. जिजाउंच्या पुढात असलेला बालशिवाजी , हातातील छोटी तलवार फिरवीत आईला आपली भव्य स्वप्ने सांगत आहे, अशा अविर्भावातील मायलेकरांचा पुतळा शिवकुंजा मध्ये बसविला आहे.
| निर्धारची जाईन केला । अन शिकविला बाळ शिवबाला ।
| क्षत्रियाचा बाणा शिकविला । एक विचार दोघांनी केला ।
१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य घोषित करण्यात आला ते ठिकाण म्हणजे किल्ले शिवनेरीवरील शिवकुंज इमारत .
      किल्ले शिवनेरी वरील राजमाता जिजाऊ व बाळराजे शिवराय यांचे आकर्षक स्मारक असलेले प्रेरणास्थळ 'शिवकुंज स्मारक ' अवघ्या दुर्गप्रेमींचे लक्ष वेधून घेते. याच शिवस्मारक उभारणीला नुकतीच ६२ वर्ष पूर्ण झाली. १ मे १९६० महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या पुर्व संध्येला, २७ एप्रिल १९६० रोजीच्या शिवजयंती दिनी महाराष्ट्र राज्याच्या अमृतकलश पुजणाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या स्मारकाचे अनावरण करण्यात आले होते.
घडीव दगडी बांधणीतील, जुन्या वास्तूशास्रांच्या आधारे बनवलेली आकर्षक कमानीची ही वास्तू महाराष्ट्राचे प्रेरणास्थाण बनली आहे. शिवकुंज स्मारकातील राजमाता जिजाऊ व बाळराजे शिवराय यांचे पंचधातुतील आकर्षक शिल्प प्रख्यात शिल्पकार व्ही. जी. सहस्रबुध्दे यांनी बनवलेले होते. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या औचित्याने किल्ले शिवनेरीवर शिवरायांचे आकर्षक स्मारक उभारण्याची संकल्पना शिवछत्रपती स्मारक समितीने महाराष्ट्र शासनाकडे मांडली होती. मुंबई राज्याचे बांधकाम मंत्री बाळासाहेब देसाई हे या समितीचे अध्यक्ष होते.शिवकुंज स्मारकाचे बांधकाम १९५८ मध्ये सुरू करण्यात आले होते. हाजी युसूफ बनेमीयाॅ तिरंदाज यांनी या कामाचा ठेका घेतला होता.

किल्ले शिवनेरी वरील शिवकुंज इमारतीचे काम चालू असतानाचे ६२ वर्षे जुने दुर्मिळ छायाचित्र. विशेष म्हणजे ही इमारत म्हणजे याच ठिकाणाहून नवनिर्मित महाराष्ट्र राज्य उदयास आल्याची घोषणा १ मे १९६० साली देण्यात आली.

स्मारकासाठी घडीव दगड, शिवनेरीच्या पायथ्यापासून टोणग्यांच्या पाठीवर लादून किल्याच्या चढणीच्या मार्गाने नेले जात.तर, किल्ल्यावरील सपाटीच्या मार्गापासून बांधकाम स्थळापर्यंत बैलगाडीत दगडांची वाहतूक केली होती.स्मारकाचे उभे खांब सिमेंट काँक्रिटचे असून त्यावर स्टोन क्रीट फिनिशिंग केल्याने हुबेहुब दगडाचेच वाटतात. स्मारकाच्या लाकडी कमानीसाठी साताऱ्यावरून दांडेली टिकवूड मागविण्यात आले होते.
बांधकामासाठी लाकडी तुळ्या मजुरांना डोक्यावर उचलून घेऊन जावे लागले होते. स्थानिक कामगारांनी या स्मारकाच्या कामाला न्याय दिला होता. एकूण ७,१०० रुपये खर्च स्मारकासाठी करण्यात आला होता. पुरातत्व विभागाने केलेल्या अडथळ्यावर बांधकाम मंत्री बाळासाहेब देसाई यांनी मध्यस्ती केली होती.
सन १९६० च्या दशकातील महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री दौलतराव श्रीपतराव ऊर्फ बाळासाहेब देसाई यांच्या कालखंडात सचिवालय, जे.जे हाॅस्पीटलची पुनर्बाधणी, विविध सरकारी कामे पुर्णत्वास आली होती. शिवछत्रपती स्मारक समितीचे अध्यक्ष या नात्याने शिवकुंज स्मारक प्रत्यक्षात त्यांच्या देखरेखीखाली निर्माण करण्यात आले होते.

Shivneri_patra.jpg
शिवरायांचे आज्ञापत्र
 
शिवकुंजात राजमाता जिजाउंच्या पुढे उभे असलेल्या बाल शिवाजीची हातात तलवार घेतलेली पंचधातूची मुर्ती आहे. शिवकुंजाच्या मागील बाजूस असणा-या व-हांडयामध्ये १० ते १२ जणांची राहण्याची सोय होते. किल्ल्यावर जेवणाची सोय नसल्याने ती व्यवस्था आपण स्वत:च करावी.
 



शिवकुंजासमोर राजवाड्याच्या आधी उजव्या हाताला एक मोठी पांढरी कमान आहे व त्याच्या पाठीमागे सातवाहनकालीन पाण्याचे मोठे टाके आहे. ह्या टाक्याला कमानी टाके म्हणतात. ही कमान बऱ्यापैकी मोठी आहे व गडाखालूनही सहज ओळखता येते.या कमानीखालील इमारतीवर घुमट असुन त्यावर फारसी भाषेत कोरलेले दोन शिलालेख आहेत. एकेकाळी या मशिदीच्या दोनपैकी एक मिनार पडला होता.परंतु पुरातत्वखात्याने त्याची पुनर्बांधणी करुन मुळ रुप परत दिले आहे.या इमारतीच्या कमानीवर बसून मुस्लिम धर्मोपदेशक इथे प्रवचन द्यायचा. 
   या मशीदीच्या समोरुनच एक वाट उतरुन साखळी वाटेने खाली शिवनेरी पुर्व लेणी समुहाकडे जाते.तिथूनच थेट उतरुन आपण जुन्नर गावात जाउ शकतो. या वाटेवर देखील एक भुमीगत पाण्याचे टाके दिसते.मात्र त्यात मोठ्या संख्येने वटवाघळे असल्यामुळे पाणी अर्थातच खराब झालेले आहे. 

 Badami_Take_2.jpg
शिवजन्म इमारतीकडून कडेलोट टोकाकडे जाताना वाटेत एक दगडी बांधकामाचे बांधीव तळे दिसते हे तळे बदामी टाके म्हणुन ओळखले जाते. या तळ्यात समोरील बाजुस दगडाचे खोलीवजा बांधकाम केलेले आहे. याला बदामी टाके असे नाव का पडले हे समजत नाही.



बदामी टाक्यापासुन पुढे जाणारा रस्ता किल्ल्याच्या उत्तरेस कडेलोट टोकाकडे जातो. सुमारे दीड हजार फूट उंचीच्या या सरळसोट कडयाचा उपयोग हा गुन्हेगारांना कडेलोटाची शिक्षा देण्यासाठी केला जात असे. या बाजुला संरक्षण म्हणून एक तटभिंत बांधली आहे.एकेकाळी हि भिंतीचीही पडझड झाली होती.मात्र तिची हि आता डागडुजी करण्यात आली आहे. 
 
शिवनेरीवरुन दिसणारा लेण्याद्रीचा डोंगर
 
  शिवनेरी किल्ल्याचे फोटो | Shivneri Fort Photos
  किल्ल्यावरून दिसणारी शेती
 
 जुन्नर शहराचा नजारा
 
येथे आपली गडफेरी पूर्ण होते.संपुर्ण गड डोळसपणे फिरण्यास पाच तास तरी हवेत. गडाचे हे सर्वात उत्तर टोक. कडेलोट टोकावरून लेण्याद्री परिसर,वडूज धरणाचा जलाशय तसेच नाणेघाट आणि जीवधन परिसर दिसतो. तसेच पायथ्याच्या जुन्नरचे मनोहारी दृष्य दिसते. या कडेलोट टोकावर पायथ्यापासून आरोहण करण्याचा यशस्वी प्रयत्न याच भुमीतील सुपुत्रांनी केला आहे. अवघड श्रेणीतील हि चढाई 
इथेच आपली हि पुण्यभुमी शिवनेरीची दुर्गयात्रा पुर्ण होते. महाराष्ट्रातील एका महत्वाच्या दुर्गभेटीचे समाधान पदरी बांधून आणि नवी आपण आपल्या आयुष्यातील संघर्षाना यश्स्वी तोंड देण्यासाठी परतीची वाट धरायची.
अद्भुत भुयारी मार्ग की अंतर्गत खोदलेला जलश्रोत?
जुन्नर तालुक्यातील काही गोष्टी खरोखरच विचार करायला लावणा-या आहेत त्यापैकी हा भुयारी मार्ग होय. किल्ले शिवनेरीच्या पश्चिम पायथ्याशी हा वारसा आपणास पहावयास मिळतो. या ठिकाणी बांधण्यात आलेला हमामखाना वजा वास्तू पाहुन तर आश्चर्याचा धक्काच बसतो. यामध्ये टाकलेली खापरी पाइपलाइन विशेष लक्ष आकर्षित करते. याच वास्तुच्या बाजुला असलेले जुन्या घरांचे अवशेष येथील वेगळाच ऐतिहासिक वारसा असल्याचे दाखले देतात. जेव्हा या जवळपास ३० फुट खोल भुयारात मी प्रवेश केला तेव्हा पुर्वेकडे याचा विस्तार असलेला पहायला मिळाला.तोंडाशी निमुळते असलेले हे भुयार पुढे उभे राहुन चालत जाता येते एवढे आहे. जवळपास १०० फुट पुढे चालत गेल्यावर त्यापुढे काय? असे प्रश्न पडतात. पावसाळ्यात हे पाण्याने भरलेले असते तर मे महिन्याच्या शेवटाला हे कोरडे पडलेले पहायला मिळते. १०० फुट पुढे गेल्यावर त्यापुढे जायचे धाडस होत नाही. विशेष म्हणजे हे भुयार फक्त आणि फक्त मुरमात कोरले असुन अंडरग्राऊंड समपातळीत कसे कोरले असावे हा प्रश्न विचार करण्याची ताकद देतो. सुरवातीला तोंडाशी बांधकाम केलेले हे भुयार मात्र बांधकाम नसुनही सुव्यवस्थित पहायला मिळते.
याबाबत कुठेही काही वाचायला मिळत नाही त्यामुळे हे नक्की काय असावे? याचा वापर कशासाठी असावा? या गोष्टी विचार करण्यासाठी प्रोत्साहित करतात. खरोखरच हा अद्भुत भुयारी खजाना काळाच्या ओघात पडद्याआड गेला असल्याने याचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित होणं गरजेचं वाटते कारण जुन्नर तालुक्याला कदाचित यामुळे अजून एक ऐतिहासिक नवीन ओळख नक्कीच मिळेल. 🙏🙏
लेख/ छायाचित्र - रमेश खरमाळे, माजी सैनिक
८३९०००८३७०







संदर्भ :-
१) पुणे जिल्हा गॅझेटीयर
२) महाराष्ट्र देशातील किल्ले- चिंतामण गोगटे
३) शोध शिवछत्रपतीच्या किल्ल्यांचा -सतिश अक्कलकोट
४) सांगाती सह्याद्रीचा -यंग झिंगारो ट्रेकर्स
५) साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !! - प्र.के.घाणेकर
६) श्री. रमेश खैरमाळे, हर्षद खंदारे, इंद्रजित सावंत, कोल्हापुर यांचे लिखाण























 








 
 

 

 

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...