Monday, May 16, 2022

हडसर

महाराष्ट्राच्या दुर्गसंपदेचा अभ्यास करायचा असेल तर तब्बल दोन हजार वर्षांपूर्वीच्या सातवाहन काळापासून सुरवात करावी लागेल. सातवाहन राजसत्ता म्हणजे महाराष्ट्राला पडलेलं सुरेख स्वप्नं. इतिहासात खोलवर डोकावल्यास आपल्याला दोन हजार वर्षांपूर्वी सातवाहन राजांचा उल्लेख नाणेघाटाच्या लेण्यांमधील शिलालेखात आढळतो. सुमारे सव्वादोन हजार वर्षापूर्वी नाणेघाटाची निर्मिती झाली. सातवाहन काळात कल्याण ते सातवाहनांची राजधानी प्रतिष्ठान (पैठण) या राजमार्गावर जुन्नरजवळ डोंगर फोडून नाणेघाटाची निर्मिती केली गेली. सातवाहन हे महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन ज्ञात कुळ. इ.स.पूर्व २५० ते इ.स.२५० असे जवळपास पाचशे वर्ष त्यांचे महाराष्ट्रावर राज्य होते. प्राचीन काळी कल्याण बंदरामध्ये उतरणारा माल घोडे अथवा बैलावर लादुन सातवाहनांची राजधानी असलेल्या प्रतिष्ठान नगरीत व्यापारासाठी नेला जाई. सातवाहनांची बाजारपेठ जुन्नर. या बाजारपेठेसाठी व व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठीच जीवधन, चावंड, हडसर, शिवनेरी या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली.
 किल्ले हडसर उर्फ पर्वतगड
 
     वास्तविक हडसर हि सातवाहनकालीन दुर्गनिर्मिती असावी.पण याचे आज आपल्याकडे कोणतेही पुरावे नाहीत. हडसरचा इतिहासात उल्लेख मिळतो तो निजामशाहीच्या अस्ताला.शहाजी राजांनी इ.स.१६३३ ते १६३६ या कालावधीत जीवाचे रान करुन निजामशाही वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला.पण त्यात त्यांना यश आले नाही.१६३६ मध्ये निजामशाहीचा आदिलशाह आणि मोगलांपासून बचाव करण्यासाठी शहाजीराजांनी माहुलीगडाच्या पायथ्याशी शरणागती पत्करुन केलेल्या तहानुसार लहानग्या मुर्तीजा निजामशहाला मुघलांच्या ताब्यात द्यावे लागले.त्याचबरोबर त्यांनी आपली काही विश्वासु माणसे व किल्ल्याचा ताबा देण्याविषयक पत्रे अबु सईद याच्याबरोबर देउन त्याला मुघल सरदार खान जमानकडे पाठवावे लागले.त्यावेळी मोघलांच्या हवाली करण्यात जे गड होते त्यात हडसर मोगलांना मिळाला.
     शिवकाळात हडसर किल्ल्याबद्दलचा उल्लेख पर्णालपर्वतग्रहणाख्यानम् या संस्कृत काव्यग्रंथात मिळतो. या काव्यग्रंथाचा कर्ता कवी जयराम पिंडे तंजावरच्या व्यंकोजीराजे भोसले यांना शिवाजी  महाराजांनी मुघल आणि आदिलशाहीचे कोणकोणते किल्ले कसे जिंकले यांचे वर्णन करताना ग्रंथाच्या पहिल्या अध्यायातील ३७ व्या श्लोकात चावंडचा उल्लेख करतो.
                                             तथैव चामुण्डगिरी हरिश्चंद्रस्तथैव च।
                                             महिषोष्यड्सरस्तावद गृहीतावतिसंगरात्।। ३७।।
       याचा अर्थ असा कि त्याचप्रमाणे चामुण्डगिरी (चावंड), हरिश्चंद्रगड, महिषगड (?) आणि हडसर हे (किल्ले) सुद्धा (शिवाजी महाराजांनी) निकराने लढून घेतले.परंतु या श्लोकाला दुजोरा देईल असा समकालीन अन्य पुरावा मिळालेला नाही. वास्तविक जयराम पिंडे हे शिवाजी महाराजांचे समकालीन होते.त्यांचे दोनच ग्रंथ आज उपलब्ध आहेत. पैकी एक 'राधा माधव विलास् चंपु' आणि 'पर्णालपर्वग्रहणाख्यान'.त्यांच्या इतर ग्रंथाचा शोध सुरु आहे.वर दिलेल्या श्लोकाला दुजोरा मिळेल असा समकालीन पुरावा अजून पुढे आलेला नाही. कृष्णाजी अनंत सभासद यांनी हडसरचा उल्लेख पर्वतगड असाच केलेला आहे.मात्र त्यांनी आणखी माहिती दिलेली नाही.
कदाचित  मे १६७२-७३ मध्ये शिवाजी महाराजांनी साल्हेर्,अहिवंत्,रवळ्या-जवळ्या,मार्किंडागड,अचला हे गड जिंकुन घेतले होते.त्याच सुमारास हडसर-जीवधन आणि चावंड उर्फ चामुंडगड जिंकला असावा.तेव्हा त्याचे नाव पर्वतगड ठेवले असावे.शिवकाळात राजाभिषेकाच्या आदल्या वर्षी म्हणजे मे १६७३ च्या सुमारास ब्रिटीश डॉक्टर फ्रायरने जुन्नर परिसराला व शिवनेरीगडाला भेट दिली. त्याचे तो आपल्या पुस्तकात वर्णन करतो.त्यात शिवनेरीवरची फौज शिवाजी महाराजांच्या सैन्याशी मुकाबला करण्यासाठी खाली उतरली असे लिहीले आहे.याचा अर्थ यावेळी शिवाजी महाराजांचे सैन्य जुन्नर भागातील चावंड्,हडसर्,जीवधन जिंकून घेण्यासाठी या परिसरात आले असणार.
  संभाजी महाराजांच्या काळात हडसर मराठ्यांच्या ताब्यात होता कि नाही हे आपल्याला पुराव्या अभावी समजत नाही, परंतु  छत्रपती राजारामाच्या व महाराणी ताराबाईंच्या काळात हा गड मुघलांच्या ताब्यात असल्याच्या नोंदी मुघलांच्या दरबारातील कामकाजाची माहिती देणार्‍या अखबारात मिळतात.त्यात हडसरचा उल्लेख मरसल किंवा हरसुल किंवा हरसल असा केलेला असून त्याच्या मुख्य नेमनुका अशा आहेत.
 १) ता. १२ नोव्हेंबर १६९४ : जुन्नरचा किल्लेदार फख्रुद्दीनखान याला मरसालची किल्लेदारी देण्यात आली.त्याची मनसब वाढविण्यात आली.मुर्तीजा कुलीखान याला मरसालच्या किल्ल्यावर नायब ( म्हणजे उप) म्हणुन नेमण्यात आले.
२) ता. २२ ऑक्टोबर १७०२ : नस्त्रुल्लाहच्या जागेवर पेडगाव ( बहादुरगड) चा किल्लेदार फख्रुद्दीन याला शिवनेरी,हरसुल येठील किल्लेदार व जुन्नरचा फौजदार म्हणून नेमण्यात आले. ( यावेळी औरंगजेब बादशहाचा मुक्काम वेळापुर ता-माळशिरस जि.-सोलापुर येथे होता )
३) ता. २० नोव्हेंबर १७०२ : अब्दुल अजीजखान मरहुम ( म्हणजे मृत ) याचा मुलगा अबुलखैरखान याला शिवनेरी,हरसुलची किल्लेदारी व जुन्नरची फौजदारी हे हुद्दे देण्यात आले होते.त्याला खिलतीची वस्त्रे म्हणजे बहुमानाची वस्त्रे देब्यात येउन त्याला जाण्यासाठी निरोप देण्यात आला. यावेळी औरंगजेबाचा मुक्काम बहादुरगडावर होता.
४) ता. १९ डिसेंबर १७०२: हरसुलच्या किल्लेदारीबरोबर अबुलखैरखान याचा नायब म्हणुन सिकंदर चक्त ( जंग ) याची नेमणुक करण्यात आली.त्याच्या मनसबीत वाढ करण्यात आली/यावेळी औरंगजेबाचा मुक्काम निमगाव म्हाळूंगे येथे होता.
५) ता. १३ ऑगस्ट १७०४ : जुन्नर येथे अब्दुल अझीझखान हा किल्लेदार व फौजदार होता. ( पण ३ क्रमाकांच्या मुद्दयानुसार अब्दुल अझीझखान तर मेला होता. ) हरसलच्या किल्लेदारीवर सिकंदर जंग हा किल्लेदार होता.अब्दुल अझीझखानच्या लिहीण्यावरून बादशहांनी हरसलच्या किल्ल्यावर अब्दुल अझीझखानचा नायब म्हणुन त्याच्याच भाउबंदापैकी ( बिरादरजादा ) हसन अली याची नेमणुक केली. यावेळी औरंगजेब याचा मुक्काम माकरी ( पागरी ) येथे होता.
     या नोंदीवरुन १२ नोव्हेंबर १६९४ ते १३ ऑगस्ट १७०४ अशा सुमारे साडे नौ वर्षापेक्षा जास्त काळ हडसर किल्ला मुघलांच्या ताब्यात होता हे स्पष्ट आहे.यादरम्यान औरंगजेबाचा मुक्काम निरनिराळ्या ठिकाणी होता याचा अर्थ औरम्गजेब त्यावेळी मराठ्यांचे किल्ले जिंकुण घेण्याच्या मोहीमेवर होता.त्यामुळे मोहीमेच्या ठिकाणी तो दरबाराचे कामकाज करत होता.त्याच्याबरोबरच त्याचा दफ्तरखाना फिरत होता.
          हडसरचा किल्ला पेशवे काळात मराठ्यांकडे आला आणि तो इ,स.१८१८ पर्यंत मराठ्यांकडेच होता.इ.स. १८१८ च्या शेवटच्या इंग्रज-मराठे युध्दात  हडसरचा किल्ला इंग्रजांनी कसा जिंकून घेतला याबध्दल "Pendhari and Maratha war papers" page no. 293-94 मध्ये हकीकत आली आहे.
  Soon after the fall of Junnar ( 25th April 1818) the command of Junnar hearing that the Engliash were marching on Junnar..Left the town and fled to Hadsar. Major Eldridge learning of the flight to Hadsar send a small detachment under major M'Leod which reduced Hadsar and captured the fugitive commandant with twenty five horses and two camels.
   वरील हकीकतीचे भाषांतर खालील प्रमाणे :
जुन्नरच्या पाडावानंतर दि.२५ एप्रिल १८१८ रोजी हडसर किल्ला इंग्रजांनी काबीज केला.येथील अधिकार्‍यांच्या किंवा मामलेदाराच्या कानावर बातमी आली कि इंग्रजांचे सैन्य जुन्नरवर चालून येत आहे.त्याने ताबडतोब शहर सोडले आणि तो हडसरच्या आश्रयाला आला.मेजर एल्ड्रीचने मेजर एमलियॉडच्या हाताखाली सैन्याची लहान तुकडी देउन त्याला हडसरकडे रवाना केले. त्या तुकडीने हडसर किल्ला काबीज केला आणि जुन्नरहून पळून गेलेल्या अशिकार्‍याला ( याचे नाव अन्याबा रहातेकर ) कैद केले.त्याबरोबर २५ घोडे व २ उंत देखील इंग्रजांच्या हाती लागले.
        दि. १६ मे १८१८ रोजी बॉम्बे कुरियरच्या प्रतिनिधीने हडसर किल्ल्याचे वर्णन केले आहे.ते असे.
Hadsar fort as deserving of notice,apart from the natural strength from the labour spent on its two gates and its entire rock cut passage. The gates and connecting passages were entirely rock cut and had not a foot masunry about them.you enter the side of the mountain, go up the hill and then get into the interior of the fort as if you were entering a well'.
  सुमारे १९० दोनशे वर्षापुर्वी केलेल हडसर किल्ल्याचे वर्णन आजच्या घडीला बरेचसे मिळते जुळते आहे.
   
 
जुन्नर परिसराचा नकाशा
 
जायचे कसे ?:-

  हडसर गडाला भेट देण्यासाठी जुन्नर हे सोयीचे ठिकाण. पुण्यापासून जुन्नर १०३ किमी अंतरावर आहे. पुण्यातून पुणे-नाशिक महामार्गावरुन पुणे-चाकण-राजगुरुनगर-नारायणगाव-जुन्नर असे जाता येते.जुन्नरजवळ माणिकडोह धरणावरून नाणेघाटाच्या दिशेने अंजनावळे, घाटघर गावाकडे एक रस्ता जातो. या रस्त्यावरच जुन्नरपासून १५ कि.मी.वर हडसर गावाच्या पश्चिमेला हा किल्ला आहे. इथे येण्यासाठी स्वत:चे वाहन नाही तर अंजनावळे येथे जाणाऱ्या एस.टी.बस सोयीच्या आहेत.
     मुंबईवरुन हडसरला जायचे तर दोन पर्याय आहेत.
१) मुंबई - कल्याण - माळशेज घाट मार्गे - जुन्नर असा रस्ता असून हे अंतर ११३ कि.मी.आहे.या मार्गे अडीच तास लागतात.तर मुंबई -लोणावळा-चाकण-नारायणगाव-मंचर हे अंतर २०० कि.मी.असून यामार्गे चार ते पाच तास लागतात..

कोठीवडे गावातून दिसणारा हडसर


२) माळशेज घाट ओलांडल्यावर कोठिवडे हे गाव हडसरला जाण्यासाठी सोयीचे. मुंबई -कोठिवडे हे माळशेज घाटमार्गे अंतर १४० कि.मी. आहे.इथून हडसरवर तीन मार्गे चढाई करता येते.सर्व म्हणजे पश्चिमेकडच्या वाटेने तसेच पुर्व व दक्षिणेकडच्या वाटेने जायचे तर साधारण दीड ते दोन तास लागतात. 

गडावर जाण्याचा वाटा :-

हडसर गडाची नैसर्गिक रचना मजेशीर आहे.एका त्रिकोणाला एका टोकाशी गोल जोडावा असा याचा माथा आहे.हडसर गावात उतरले कि समोर भव्य कातळकडे आणि उजवीकडे म्हणजे पश्चिमेकडे वाटोळी टेकडी दिसते आणि पुर्वेकडे गडाचा मुख्य डोंगर दिसतो. ता दोन डोंगराच्या मध्ये नैसर्गिक घळ आहे.पैकी दक्षिणेकडची घळ अनगड्,दगडगोट्यांनी भरलेली आहे.तर उत्तरेकडच्या घळीत पायर्‍या खोदून राजमार्ग तयार केला आहे. 
  
हडसर परिसराचा उठावाचा नकाशा

 हडसरवर चढणार्‍या वाटा
 
     सहाजिकच किल्ल्यावर जाण्यासाठी तीन वाटा असुन यापैकी राजदरवाज्याची मुख्य वाट घळीतून पायरीमार्गाने वर जाणारी तर दुसरी वाट गावकऱ्यांनी त्यांच्या सोयीसाठी कड्यात कोरलेली तर तिसरी वाट गावकऱ्यांनी कातळात सळ्या व खाचा मारून दक्षिणेकडील कड्यातील तटातुन वर नेली आहे. यातील पहिल्या दोन वाटा सोप्या असुन तिसरी वाट काहीशी अवघड आहे. किल्ला संपुर्णपणे फिरायचा असल्यास घळीच्या पहिल्या वाटेने वर चढुन दुसऱ्या वाटेने खाली उतरावे. कोणत्याही वाटेने गडावर पोहचण्यासाठी हडसर या गावी यावे लागते. जुन्नरहून निमगिरी, राजूर किंवा केवाडी यापैकी कोणतीही बस पकडून पाऊण तासात हडसर या गावी पोहचता येते.
१) नळीची वाट :-
 आधी समजावून घेउया नाळेची वाट. गडाला खेटूनच एक वाटोळी टेकडी आहे. या दोन डोंगरांच्या दरम्यानच्या घळीतून एक लपलेली वाट गडावर जाते. दगड-गोटे आणि झाडोऱ्याने भरलेली ही वाट परीक्षाच पाहते. 

हडसर गावातून दिसणारी घळीची वाट 


 

 


पण या साऱ्या अडचणी आणि शेवटचे छोटेसे प्रस्तरारोहण करत या दोन डोंगरांदरम्यानची खिंड गाठली की, आपण हडसरच्या मुख्य मार्गाला येऊन मिळतो.या वाटेन शत्रु वर आला तर थेट गडावर चढू नये यासाठी तटबंदी बांधली आहे. या वाटेने चढत आपण १८.५ मीटर किंवा २० यार्ड लांबीच्य तटबंदीजवळ येउन पोहचतो.त्यामुळे या वाटेने वर आल्यावर उजव्या बाजुला सोपे प्रस्तरारोहण करुन तटबंदीवरुन थेट गड आणि शेजारची टेकडी याच्यामधल्या सपाटीत आपण दाखल होतो. मात्र या वाटेने चढण्यापेक्षा उतरणे सोयीस्कर. एकतर उतरताना फार त्रास होत नाही.शिवाय टेकडीला जो मोठा वळसा घालावा लागतो तो वाचतो. 
२) खिळ्यांची वाट :-
   गडावर चढणारी दुसरी वाट म्हणजे सुप्रसिध्द किंवा थरारक वाट, 'खिळ्यांची वाट'.हि वाट थोडाशी आव्हान झेलणाऱ्यांसाठीच आहे. दक्षिणेकडील ऐन कडय़ात स्थानिक गावक ऱ्यांनी लोखंडी मेखा ठोकत आणि खोबण्यांचा आधार देत एक कडय़ातली वाट तयार केली आहे.या खुंटीच्या वाटेने जाणार्‍या पर्यटकांना इशारा देणारा सुचना फलक गावात लावला आहे.इथूनच खुंटीच्या वाटेकडे जाणारी वाट फुटते.
 13077069_1696370590617712_5917580773966930525_n
  या वाटेकडे जाण्यासाठी हडसर गावातून गड डाव्या हाताला ठेवत बरेच अंतर चालत जावे लागते.वर फोटोत दाखवलेल्या जागी खिळ्याची वाट आहे.हि वाट तशी मोडलेली नाही.म्हणून शक्यतो एकट्या,दुकट्याने तसेच नवखे असाल तर वाटाड्या बरोबर घेउन गेलेला श्रेयस्कर. या वाटेवर झाडी आहे.या परिसरातील बिबट्यांची संख्या विचारात घेता सावध वाटचाल केलेली चांगली.
    गावकर्‍यांनीच लोखंडी शीग किंवा मेखा वापरुन हि वाट तयार केली आहे.मुळ वाट कातळकोरीव खोबण्यांची आहे.अशीच खोबण्या कोरुन केलेली वाट जीवधन गडावर चढण्यासाठी तयार केली आहे.पहारीचे तुकडे आणि पाय ठेवायला खाचा अगदी योग्य प्रमाणात आहेत.कमी उंचीच्या माणसालाही या वाटेन चढणे अशक्य नाही. फक्त प्रयत्न थोडे जास्ती लागतात. हाताची पकड मजबूत असल्याशिवाय पाय उचलणे धोकादायक ठरते. गवतकाडी आणि देवदर्शनासाठी वरखाली करणारे गावकरी या वाटेने दहा-वीस मिनिटात गडावर ये-जा करतात. ज्याची तयारी आहे अशांनी माहीतगाराच्या बरोबरीने एकदा या वाटेचाही अनुभव घ्यावा. ऐन कडय़ातून हे चढणे आणि चढताना वाटेत दिसणारी एक खोदीव गुहा पाहणे हे या वाटेवरचे आकर्षण!या वाटेने अवघ्या दहा मिनीटात आपण गडमाथ्यावर दाखल होउ शकतो.





 
 

खाली एका दगडावर पांढरा बाण दिसतोय ती या वाटेची सुरवात आहे.
या वाटेने एकवेळ चढणे शक्य आहे.मात्र उतरणे जीवावरचा खेळ होउ शकतो.

 हा पुढचा टप्पा आहे. हा तुलनेने सोपा आहे. इथे पाय ठेवायला खाचा केलेल्या आहेत. खुंट्याही मोठ्या आणि चांगल्या स्थितीत आहेत.
 हा टप्पा थोडा सोपा आहे

 
41735462092_60dd5d9270_o
 खिळ्यांच्या वाटेवर दिसणारी कातळकोरीव गुहा किंवा लेणे
 
40877447175_439a28120e_o
    मात्र या वाटेने खाली उतरने म्हणजेच प्रत्यक्षात यमराजालाच आव्हान करण्यासारखे आहे. कारण हे कातळ ८५ अंश कोनात असुन यामध्ये दोन दोन फुट अंतरावर झिकझॅक पध्दतीने लोखंडी खिळे एन कड्यात ठोकलेले आहेत. साधारण ही चढण किंवा उतरण 100 फुट आहे. दिवसाच फक्त या वाटेचा उपयोग धाडसी पर्यटक चढाई किंवा उतरण्यासाठी करतात. कारण हा कडा उतरल्यावर पुन्हा हडसर गावात साधारण एक कि.मी अंतरापर्यंत अतिशय तीव्र उताराने व बुजलेल्या पाऊलवाटेने जंगलातून पोहचावे लागते व हे खुपच जिकरीचे आहे. तेव्हा शक्यतो या वाटेचा उपयोग पर्यटकांनी न करणेच योग्य आहे.. 

  याच वाटेवर १९ फेब्रुवारी २०१९ रोजी एक दुर्दैवी अपघात घडला.सह्याद्री फाउंडेशन ठाणे ह्या गड किल्ले भटकंती करणाऱ्या संस्थेचे ३५ सभासद बुधवार दि.१९ रोजी सकाळी शिवजयंती साजरी करण्या करिता हडसर किल्ल्यावर गेले असता या किल्ल्यावरील खुंटीच्या वाटेने असलेल्या लोखंडी गजाच्या बाजूने चढाई करण्याकरिता ह्या संस्थेच्या वतीने तिथे दोर खंड बांधण्यात आला होता ह्या दोरखंडा च्या साहाय्याने ४/५ मुली सुखरूप पणे वर आल्या होत्या. सिद्धी सुनील कामठे वय २० रा.चिंचपोकळी मुंबई  ही हातात भगवा झेंडा घेऊन व पाठीवर सॅक घेऊन दोरखंडाच्या साहाय्याने किल्ल्यावरील शेवटच्या टप्प्यावर पोहचली.खिळ्याची चढाई करून आता ती तटबंदीची भिंत ओलांडणार होती. हातात शिवछत्रपती शिवाजी महाराजांची प्रतीमा असलेला भगवा स्वत:कडे ठेवत प्रतीमेला पुजन करण्यासाठी असलेली पिशवी ती पल्लवीकडे देताच तीचा पाठीमागे अचानक तोल गेला. व क्षणात हातात भगवा झेंडा घेऊन ती घरंगळत खाली गेली व सिध्दी_वरून ४५० फुट खाली_कोसळून मृत्युमुखी पडली. तेव्हा साहस करताना ते डोळस असावे.तसेच आपल्याला झेपेल असे वाटले तरच या खिळ्याच्या वाटेने वर चढण्याचा प्रयत्न करा.अन्यथा राजमार्गाची सोपी वाट आहेच.
हडसरगडावरची ठिकाणे
हडसर गडाचा नकाशा

३) राजमार्ग :-

हडसर हे गाव जुन्नर- निमगिरी-घाटघर रस्त्यावर आहे.इथे येण्यासाठी एस.टी.बसची सोय असली तरी त्यांची वारंवारता फार कमी आहे.शकयतो स्वतःचे वाहन घेउन गडाकडे येणे सोयीचे.आपले वाहन आपण हडसर गावात पार्क करु शकतो.
    या हडसर गडाकडे येणार्‍या रस्त्याचे वर्णन 'महाराष्ट्र देशातील किल्ले' या चिं.ग.गोगटे यांच्या पुस्तकात दिले आहे.'किल्ल्यावर जाण्यासाठी जुन्नरवरुन निघाले म्हणजे कुकडी नदीच्या खोर्‍यातून दोन उंच डोंगरामधून रस्ता आहे.हा रस्ता गाड्या येण्या-जाण्यासारखा आहे.परंतु पावसाळ्यात नदीला पुर आला म्हणजे उतार मिळत नाही.' असे वर्णन वाचायला मिळते.अर्थात हि परिस्थिती जवळपास सव्वाशे वर्षापुर्वीची आहे.त्यावेळी कुकडी नदीवर माणिकडोह धरण बांधले नव्हते. कदाचित वनराईतून हि वाटचाल सुखकर असेल.आज मात्र डांबरी रस्याने उजाड भागातून वहानाने किंवा पायगाडीने प्रवास करावा लागतो.
41857697802_4ba4fd637d_o
 गावातूनच गडाकडे जाणारा रस्ता आहे.वाट झाडीतून जाते.तसेच वाटेला बरेच फाटे फुटले आहेत.त्यामुळे तुम्ही नवखे ट्रेकर असाल किंवा हडसरला पहिल्यांदाच भेट देत असाल तर शक्यतो गावातून वाटाड्या घेतलेला चांगला.वाया जाणारा वेळ आणि वाट चुकल्याने होणारा मनस्ताप यापेक्षा वाटाड्याला दिलेले शे-पाचशे रुपये परवडतात.
 
हडसर गावात एक वीरगळ तसेच प्राचीन बारव आपल्याला पहायला मिळते.हडसर गडाच्या भेटीत ती जरुर पहावी.
 
गावातून गडाकडे जाताना लागणारी विहीर 
 
  हडसर या गावातून वर डोंगरावर जाताना एक विहीर लागते. येथून थोडे वर गेल्यावर डावीकडे पठारावर चालत जावे. पठारावरील शेतामधून चालत गेल्यावर १५ मिनिटांच्या अंतरावर दोन डोंगरांमधील खिंड व त्यामधील तटबंदी दृष्टिक्षेपात येते. हा शेजारचा डोंगरदेखील हडसरचाच एक भाग आहे.गडावर जाणार्‍या वाटेवर आता माहितीफलक लावलेले आहेत.तसेच लोखंडी अँगल व पत्रे वापरुन एक पर्यटक विश्रामकक्ष उभारला आहे.वनखाते व दुर्गसंवर्धन करणार्‍या संस्था यांचा हा अतिशय उत्तम उपक्रम आहे
41857661612_5b1eb8f0e2_o
 
 इथेच वनखात्याने एक वॉच टोवर उभारलेला आहे.
हडसर आणि त्याला चिकडून असणार्‍या टेकडीमधील घळ.इथूनच घळीतील वाट वर चढते
या टेकडीला आपण वळसा घालून पायर्‍यांच्या वाटेला लागतो.

 
पायर्‍याच्या वाटेत दिसणारे पाण्याचे टाके

 या डोंगरात खोदलेल्या पाण्याच्या टाक्या याचाच एक भाग आहे. या छोटय़ा डोंगराचा आकारही अगदी कुणीतरी तासल्याप्रमाणे सरळ-गुळगुळीत. एखाद्या वाटोळा बिनीचा बुरुज वाटावा असा.खरेतर हडसरची मुख्य वाट या त्याच्या शेजारच्या डोंगराला वळसा घालतच वर चढते.खिंड समोर ठेवून चालत गेल्यावर अर्ध्या तासात बुरूजापाशी पोहचता येते.  या खिंडीकडे न वळता सरळ पुढे चालत जाऊन डाव्या बाजूस असणाऱ्या डोंगराला वळसा घालून डोंगराच्या मागील बाजूस पोहचावे.
 
कोरुन काढलेल्या पायर्‍यांची वाट
 
पायर्‍यांच्या वाटेच्या मागच्या बाजुला दिसणारे माळशेज परिसरातील डोंगर
 

 


41183585124_c86db793a0_o

तटबंदीवरून दिसणारी पायर्‍यांची वाट

हडसरच्या पहिले कातळकोरीव प्रवेशद्वाराचा परिसर

 या घळीतून ३० मीटर किंवा ६५ यर्ड लांबीच्या वाटेत तब्बल तीनशे पायऱ्या चढून गेल्यावर आपण खिंडीतील मुख्य दरवाज्यापाशी पोहचतो.यावरुन चढताना चांगलीच दमछाक होते. ही राजदरवाज्याची वाट असून अत्यंत सोपी आहे.हडसर, राजूर भागातील गावकरी या खिंडीतून पलीकडील मढ या बाजाराच्या गावी ये-जा करत असतात. दुर्गम भागातील रस्ते, पाऊलवाटा या अशाच डोंगरातून धावतात. या भागातील लोकांना आजही मुंबईला कसे जाता असे विचारले तर ते या डोंगररानातून नाणेघाटमार्गे उतरत कल्याण कसे गाठतो याचा प्रवास ऐकवतील.
  राजमार्गाने जाण्याचे दोन फायदे आहेत. वाटेत पिण्याच्या पाण्याचे एक भुयारी टाके लागते अगदी पायर्‍यांपर्यंत गेल्या शिवाय त्या ठिकाणी अशी काहि पायर्‍यांची वाट आहे हे लक्षात येत नाही. वाट अगदी सोपी आहे.
     या मार्गाच्या शेवटी हडसरचा रंगीत नकाशा बसविला आहे.या सर्व गोष्टी नक्कीच स्तुत्य ! हडसरचा हा मार्ग आज जरी दुर्गम झालेला असला तरी गडाच्या प्रवेशद्वारात हजर झालो की, त्याचे हे कातळरूपच सौंदर्य बनून पुढय़ात येते. आज या ठिकाणी रेलिंग लावून पर्यटकांची सुरक्षा पाहिली आहे. मूळच्या कातळातच पायऱ्या खोदून तयार केलेला मार्ग, त्याला अंगच्या कातळाचेच पुन्हा कठडे, पुढे या कातळात खोदून काढलेली दोन अत्यंत रेखीव प्रवेशद्वारे, त्यावरच्या त्याच्या त्या लयबद्ध कमानी, भोवतीचे बुरुज, आतमधील चौकीदारांच्या खोल्या ऊर्फ अलंगा ..खोदकामातील ही सारी कला पाहताना एखाद्या लेण्यातून फिरल्याचाच भास होऊ लागतो.कातळात खोदुन काढलेल्या पायऱ्यांनी काही अंतर गेल्यावर गडाच्या एका अखंड कातळातच खोदुन काढलेल्या दरवाज्यापाशी पोहचतो .
 
 हडसरचे पहिले कातळकोरीव प्रबेशद्वार

प्रवेशद्वाराच्या आत गेल्यावर दिसणारी कातळकोरीव पहारेकर्‍याची कोठी किंवा अलंगा

गडाकडे चढणारा खडकात कोरुन काढलेला मार्ग
 
हडसरचा हे दरवाजे आवर्जून थोडा वेळ देउन पहावे असे दुर्गस्थापत्य म्हणता येईल.एकात एक कोरलेल्या तीन कमानी दिसतात.मात्र इथे कोणतेही द्वारशिल्प किंवा शिलालेख दिसत नाही.  दरवाज्यात पहारेकर्‍यांच्या देवड्या आहेत. हडसरच्या दरवाज्यावर असलेल्या खोदिव पायर्‍या म्हणजे स्थापत्यशास्त्राचा एक अतिउच्च नमूना आहे. या पायर्‍यांतून पावसाचे पाणी जाण्यास पन्हाळी सुद्धा खोदलेली आढळतात.महाराष्ट्रातील दुर्गसंपदेचा अभ्यास करायचे ठरवले तर हडसरच्या या प्रवेशद्वारांची दखल घ्यावीच लागेल. कोणी केले हे सारे! त्याचे उत्तर शोधण्यासाठी तब्बल दोन हजार वर्षे मागे, सातवाहनांच्या काळात जावे लागेल. हडसर ही त्यांचीच निर्मिती.या मार्गातील पहिल्या दरवाज्यानंतर दुसऱ्याकडे जातानाच्या वळणावर लगतच्या कठडय़ावर एक कोरीव दगड आहे. त्यावर केलेले नक्षीकाम पाहता हे शिल्प नक्कीच काहीतरी विशेष असावे असे वाटते.
     सातवाहनांची बाजारपेठ जुन्नर, तर या बाजारपेठेसाठी या राजवटीतच नाणेघाट या व्यापारी मार्गाची निर्मिती करण्यात आली. या व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठीच जीवधन, चावंड, हडसर, शिवनेरी या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली.
 
 
पायर्‍या चढून जाताच तट-बुरुज आपली वाट अडवतात व आपण परत कातळकड्याच्या डाव्या बाजूने खोदीव प्रवेशमार्गात प्रवेश करतो. दोन्ही घळी एका अरूंद डोंगरधारेने जोडलेल्या आहेत.
     यानंतर थोडी सपाटी येते.गडावरील मुख्य दरवाजातून वर आल्यावर दोन वाटा फुटतात. यातील उजवीकडील वाट समोरील लहान डोंगरावर जाते तर डावीकडील वाट किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजाकडे जाते.इथेच आपण हडसरच्या मुख्य डोंगराला चिकटून असलेल्या गोल आकाराच्या टेकडीच्या माथ्यावर जाउ शकतो.दुर्गस्थपतींनी या नैसर्गिक रचनेचा फायदा घेउन इथे बुरुज निर्माण करुन त्याचा यथायोग्य वापर केला आहे. समोरील डोंगराला घळीतून येणाऱ्या वाटेच्या दिशेने तटबंदी असुन टोकाला बुरूज बांधलेला आहे.


40093251990_5af6caef14_o


 
इथे जवळच एक पुरातन छोटेखानी मंदिर दिसते, त्यातला गणपती.
 
आखीवरेखीव असलेली हि मूर्ती उजाड अवस्थेत पडून आहे. मूर्तीच्या सोंडेखालच्या भागला तडा गेला आहे. सह्याद्रीतल्या प्रत्येक गडावर वेगवेगळ्या आसनात विराजमान झालेले गणराज पहायला मिळतात. गडावर वर्षानुवर्षे ऊन, वारा, पाऊस झेलत अनेक राजवटी पाहिलेले गडगणेश आपले ऐतिहासिक अस्तित्व टिकवून आहेत.


  या डोंगरावर दोन पाण्याची दोन टाकी असुन उघडयावर एक गणेशमुर्ती आहे. या मूर्तीसमोर एक झीज झालेला नंदी व समाधीचा कोरीव दगड आहे. 

 
 

दगडी पायर्‍यात खोदलेली पन्हाळी
 
हा डोंगर व किल्ल्याचा डोंगर एकमेकाला २०x४० फुट लांबरुंद तटबंदीने जोडलेले असुन या तटबंदीवर बांधकामाचे काही अवशेष दिसुन येतात. दुसऱ्या दरवाजाकडे जाताना कठडय़ाच्या टोकावर एक कोरीव स्तंभ दिसतो 
दगडात कोरलेला हा कातळकोरीव पायरी मार्ग म्हणजे एक आश्चर्य म्हणता येईल.

     येथून मागे वळावे. इथेच नाळेची वाट वर येते. उजवीकडे गडाचा मुख्य भाग आहे. उजवीकडे येताच प्रथम कातळात कोरलेले प्रवेशद्वार नजरेत भरते. प्रवेशद्वार सहजासहजी न दिसावे अशीच याची रचना आहे. कातळात खोदून काढलेली प्रवेशद्वारे हे हडसरचे एक वैशिष्ठ्य आहे. अजिंठा वेरूळ सारखी कलाकुसर येथे नक्कीच नाही पण दुर्गप्रेमींना नक्किच मोहात पाडावी अशी याची रचना आहे. दरवाज्यातून आत शिरताच डाव्याबाजूला पहारेकारांच्या देवड्या आहेत. 
 
41857545602_a3df60e8e1_o
 
 
कातळात कोरलेला दुसरा दरवाजा

आता या पहिल्या आणि दुसर्‍या दोन्ही दरवाज्यांना दुर्गसंवर्धनांतर्गत नवीन लाकडी दरवाजे बसविले आहेत.

 हाच दरवाजा आतल्या बाजुने

41857606752_7706675dda_o

इथे देखील पहिल्या दरवाज्यासारख्याच अलंगा आहेत.

कातळकोरीव वाट.हि चढून आपण हडसरच्या दुर्गमाथ्यावर प्रवेश करतो.
 
पावसाळ्यात या पायर्‍यावर पाणी साठून घसरडे होउ नये म्हणून पाणी वाहून जायची व्यवस्था आवर्जून बघावी अशीच आहे
 41059303594_32662924fd_o
 खडकात कोरलेले गडाचे हे दोन्ही दरवाजे म्हणजे शिवपुर्वकालीन वास्तुशास्त्राचा आदर्श नमुनाच. पुर्वी हे दोन्ही कातळकोरीव दरवाजे रिकामे होते.पण आता दुर्गसंवर्धन होउन इथे नवीन दरवाजे बसविले आहेत.इथे थोडावेळ थांबून एकाच कातळात हे दरवाजे आणि पायर्‍या कश्या कोरल्या असतील याची कल्पना करावी.त्यांची रचना आवर्जून निरखावी आणि कौतुक मनात साठवत गडमाथ्याकडे निघावे. 

बाराव्या शतकात सोमेश्वर नावाच्या एका लेखकाने लिहीलेल्या 'अभिलषतार्थ चिंतामणी' या ग्रंथात अश्मदुर्ग या प्रकाराचे वर्णन केले आहे.अश्म म्हणजे दगड.दगडात कोरुन केलेला दुर्ग म्हणजे अश्मदुर्ग.हडसरवर प्रवेश करणारा हा मार्ग बघीतला तर हा अश्मदुर्ग म्हणावा कि काय, असे वाटते. सर्पिलाकार पायऱ्यांवरून पुढे जाताच गडाचा परिसर नजरेत भरतो.हड्सरच्या वास्तुंवर दुर्गसंवर्धन करणार्‍या संस्थानी पाट्या लावून मोठी सोय केली आहे.
 
 कमानी टाक

कमानी टाक्याच्या काठावर कोरलेले शिवलिंग
 
             दुसऱ्या दरवाज्यातून वर आल्यावर समोरच जमिनीलगत खोदलेले पाण्याचे टाके असुन याच्या काठावर एक छोटेसे शिवलिंग कोरलेले आहे.पावसाळय़ात टाक्यातून उतू जाणारे पाणी या शिवलिंगावर सतत अभिषेक करत असते.दुसर्‍या दरवाज्याच्या अगदी जवळ असल्यामुळे याला कमानी टाक म्हणतात.कातळात कोरलेली अशीच शिवलिंग मदनगड्,कुलंगगड या कळसुबाई रांगेतील गडावर देखील पहायला मिळतात.कदाचित हे गड समकालीन असावेत.
पावसाळय़ात आले, की सारा गड हिरवाईने माखून जातो. श्रावण-भाद्रपदापर्यंत त्यावर सर्वत्र सोनकीच्या फुलांची नक्षी उमटते. तेरडा, सोनकी, पंदांच्या या फुलांनी तळय़ांचे काठ सुंदर होतात. उन-पाऊस-ढगांच्या खेळात ही रानफुले पुन्हा पुन्हा नवी होत सृष्टीला चैतन्य बहाल करत असतात. हडसर गड समुद्रसपाटीपासून ४६८७ फूट (१०२८ मी) उंचावर असुन साधारण त्रिकोणी आकाराचा हा गड ९० एकर परिसरावर दक्षिणोत्तर पसरला आहे.
41735608692_fdc45d84e8_o
इथेच आपल्याला झाडीत पडलेले बलभीम हनुमानाचे शिल्प दिसते.
 
41776654651_8c83bb9839_o
गडाचा पसारा मोठा असल्याने मोठ्या प्रमाणत सपाट प्रदेश आहे.आत शिरताच सुरुवातीला सर्वत्र फक्त माजलेले गवतच दिसते.  या गवतामधूनच हिंडताना मग किल्लेदाराचा वाडा, शिबंदीची घरटी, मंदिरे, पाण्याची तळी असे एकेक दिसू लागते. त्यामुळे गावकरी त्यांची जनावरे चरण्यासाठी गडावर घेऊन येतात. जळण, चारा, गडावरच्या टाक्यात, तलावात असणारे पाणी यांची गावकऱ्यांना मदत होते. शिवकाळात स्वराज्य राखत पायथ्याच्या गावातल्या रयतेला आपल्या कुशीत सामावून घेत आधार देणारे हे गडपुरुष आजही ३५० वर्षांनंतर रयतेला आधार देत आहेत. 
      त्रिकोणी आकाराच्या या गडाला सर्व बाजूने तुटलेले कडे असल्याने तटबंदीची गरज केवळ पश्चिमेकडे होती, ती पूर्ण केलेली आहे.  येथुन पुढे जाणारी पायवाट किल्ल्याच्या मध्यभागी असलेल्या टेकडीच्या दिशेने जाताना दिसते. 
 
 
41059262844_2719a01efa_o
 या टेकडीच्या पायथ्याशी एक पेशवेकालीन शिवमंदीर असुन टेकडीकडे जाताना वाटेत एक खडकात खोदलेले मोठे टाके दिसते. या टाक्यातील पाणी सध्या पिण्यासाठी वापरले जाते. या गोलाकार तलावातच खडकात खोदलेली पाण्याची ३ टाकी आहेत. पाण्याबरोबर वाहुन आलेला गाळ या टाक्यात जमा होऊन टाके पुर्ण भरल्यावर केवळ पाणी तलावात पाझरावे यासाठी हि रचना केली आहे. 
 
    तलावाच्या काठावर झाडीत एक वनदेवतेची मुर्ती असुन कोरीव दगडांनी बांधलेल्या दोन मोठया समाध्या दिसुन येतात. यातील एक समाधी ढासळलेली असुन दुसरी समाधी मात्र आजही व्यवस्थीत उभी आहे. या तळय़ाच्या काठावरच एक अनामिक स्मारक संशोधनाच्या प्रतीक्षेत उभे आहे.या तलावास वळसा मारुन चिरेबंदी काळ्या दगडात बांधलेल्या शंभुमहादेवाच्या मंदिराजवळ येऊन पोहचायचे. बहुतेकदा गडावर असणार्‍या या शिवमंदीराना काहीतरी नाव असते.अगदी गडाच्या नावापुढे श्वर जोडून या देवालयांचे नामकरण केलेले असते.मात्र इथे या शिवमंदीराला कोणतेच नाव नाही. हे आश्चर्य म्हणावे लागेल.
41776721091_64b8cabe9e_o
 
 
  
 
 मंदीरासमोर असलेला नंदी
 
     दगडी बांधकामातील गर्भगृह व सभामंडप अशी या शिवमंदिराची रचना असुन मंदिरासमोर मोठा नंदी आहे. गडावर मुक्काम करायचा झाल्यास या महादेव मंदिरात ४ ते ५ जणांना रहता येईल.  महादेवाच्या या राऊळी आपल्या आधी गणेश, हनुमान आणि विष्णुभक्त गरुडही मुक्कामाला असतात. या तिन्ही देवतांच्या रेखीव मूर्ती पाहण्यासारख्या आहेत.

 

 

 
 मंदीराच्या सभामंडपात एकुण सहा कोनाडे आहेत.त्यापैकी डाव्या बाजुच्या भिंतीच्या कोनाड्यात श्री गणेशाची मुर्ती आहे.तर उजव्या बाजुच्या भिंतीतील कोनाड्यात शक्तिदेवता हनुमानाची मुर्ती आहे. तर दरवाज्याजवळच्या उजव्या भिंतीच्या कोनाड्यात  श्री विष्णुवाहन गरुडाची मुर्ती आहे.पण इथे विष्णुमुर्ती मात्र दिसत नाही. एकंदरीत या मुर्तींची संख्या बघता या सर्वांची स्वतंत्र देवालये गडावर असावीत.मात्र ती कालौघात नष्ट झाल्याने त्यांना इथल्या कोनाड्यात आश्रय घ्यावा लागला. विशेष म्हणजे गणपती मुर्तीवरील दगडात नक्षीकाम केलेली महिरप फार सुंदर आहे.
 

गर्भगृहातील शिवशंभोच्या पिंडीचे दर्शन घ्यायचे.इथेच डबे सोडायचे आणि अंगतपंगत करायची.कारण गडावर भोजनायोग्य जागा अन्यत्र नाही.शिवाय माकडांचा उपद्र्व होतो, तो निराळाच.समोर असलेल्या टाक्यातून पाणी भरुन घ्यायचे.
 
39969199820_6cb436b41a_o
मंदीराच्या बाहेरच्या आवारातच जंगमाचे घर आहे.


 महादेव मंदिराला लागूनच गवताने भरलेली एक छोटी टेकडी आहे. निलगिरीचीही असंख्य झाडे आहेत. आमच्या सुमार वृक्षारोपणाची ही तऱ्हा! कधी निलगिरी, नाही तर कधी केवळ साग; अशी एकाच पद्धतीची झाडे लावायची आणि डोके न वापरता काम केल्याचा आव आणायचा. ही टेकडी म्हणजे गडाचा बालेकिल्ला! पण स्थानिक देवतांचे शेंदूर लावलेले चार दगड वगळता बालेकिल्ला म्हणावा अशा कुठल्याही खाणाखुणा इथे नाहीत. नाही म्हणायला बालेकिल्ल्याची चौफेर फिरणारी नजर या उंच माथ्याला आहे. यातूनच मग केवळ हडसर नाही, तर सारा जुन्नर प्रांत नजरेच्या टापूत येतो. उंच-सखल डोंगर-दऱ्यांचा भाग, पिंपळगाव जोगे-माणिकडोहचे निळेशार जलाशय, अनेक छोटी-मोठी खेडी, त्यांच्याकडे धावणारे रस्ते हे सारे मनाचा गुंता वाढवत जातात. या साऱ्यांमध्ये शिवनेरी, चावंड, जीवधन, निमगिरी, हाटकेश्वरची गिरिशिखरे ठळकपणे दिसतात आणि नकळतपणे त्यावेळच्या स्वराज्याची आखणी मनात सुरू होते. या एका दर्शनातूनही राष्ट्रप्रेमाची भावना मनी फडफडू लागते. मग याच जाणिवेपाशी इंग्रजांनी गडकोटांच्या तोडलेल्या वाटांचे उत्तरही सापडते. पण तरीही एक प्रश्न तसाच उरतो की, मग इंग्रजांना असलेली ही राष्ट्रप्रेमाची जाणीव आमच्या मायबाप सरकारच्या ठायी का नाही?
   येथुन बालेकिल्ल्याला प्रदक्षिणा मारत गडाच्या पुर्व टोकाकडे निघावे. या वाटेवर सर्वत्र गवत असुन या गवतात शिबंदीची घरटी, खडकात कोरलेल्या पायऱ्या, रांजणखळगे, पहाऱ्याच्या जागा व रचीव तटबंदी यासारखे अनेक अवशेष दिसुन येतात. त्रिकोणी आकाराच्या या गडाला सर्व बाजूने तुटलेले कडे असुन गडाच्या दक्षिण व पुर्व बाजुला असणाऱ्या सोंडा तोडुन गडाला इतर भुभागापासून वेगळे केले आहे. पश्चिमेकडून गडावर येणारी वाट असल्याने केवळ याच भागात तटबंदी बांधलेली दिसते. गडाच्या पूर्व टोकाच्या बुरुजाकडे जाताना वाटेत पाच ठिकाणी पाण्याची टाकी दिसुन येतात. यातील एका टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे.


41776768781_34ba16a976_o
 
 
 
 
 
 
 
 
गडाच्या पुर्व टोकाच्या या बुरुजाच्या भागात खुप मोठया प्रमाणात उध्वस्त अवशेष दिसतात. या अवशेषात खडकावर खोदलेले शिवलिंग, मारुतीची मुर्ती,कारंज्याचे दगडी भांडे, ढालकाठीचा बुरूज, तटबंदी व घोडयाच्या पागा पहायला मिळतात.या हिरवाईतूनच चिखलमातीची एक वाट गडाच्या पूर्व टोकापर्यंत जाते. या टोकावर बांधलेला एक बुरुज निष्ठेने या दिशेचे संरक्षण करत असतो. या भागात पाण्याची एकुण पाच टाकी असुन गडावर येणारी तिसरी खिळ्याची वाट याच बुरुजावरून वर चढते. 
 
 याच बुरुजाजवळ चपेटदान मुद्रेतील एक मारुतीची मुर्ती उघड्यावर धुपताना दिसते.
 
बुरुजाच्या भिंतीच्या उजवीकडे खाली उतरल्यावर एक बुजलेले टाके आहे. येथून थोडे पुढे कातळात खोदलेली एक प्रशस्त गुहा आहे. गुहा पाहुन परत बुरुजावर यावे व पुढील वाटेला लागावे. या वाटेवर अजुन एक सुकलेले टाके असुन हि वाट शिवमंदिराकडे जाते. मंदिराच्या खाली उतारावर एकाखाली एक अशी पाण्याची तीन टाकी असुन टाक्याच्या वरील बाजुस गडाची सदर व वाड्याचे अवशेष आहेत.
 
इथून डावीकडे कारकाई डोंगर व शिंदोळ्या दिसतो व अगदी समोरचाच मांगीन डोंगर थेट सप्तशृंगीवरून दिसणार्‍या मार्कंडेयाचीच आठवण करून देतो









 
गडमाथा फिरत आपण पश्चिम अंगाला पोहचलो की, कडय़ालगत जमिनीच्या पोटात खोदलेला एक मार्ग दिसतो. वळण घेत गेलेला हा मार्ग एका चौकात येतो.  या वळणदार वाटेच्या शेवटी एक दरवाजा असुन याच्या पुढय़ात तीन लेण्या खोदलेल्या आहेत. या वाटेवर व चौकात कधीकाळी छत असल्याच्या खुणा दिसुन येतात. यातील दोन गुहांच्या दरवाजावर चौकट कोरलेली असुन एका गुहेचा दरवाजा मात्र साधारण आहे. इथे दरवाज्याच्या माथ्यावर गणेश पट्टी पहायला मिळते. या प्रत्येक लेणीत आतमध्ये पुन्हा काही खोल्या खोदलेल्या आहेत. पण या प्रत्येक दालनाचे दरवाजे मात्र छोटेसे चौकोनी आकाराचे ठेवलेले आहेत. तसेच या खोल्याही आतमध्ये खोलवर खोदलेल्या आहेत. याअर्थी ही रचना राहण्यासाठी नसून बहुधा धान्य कोठारांसाठी असावी.पण सध्यातरी या लेण्यांत काळोखच भरून राहिलेला आहे. या अंधारात ती कोठारे पाहण्याचा प्रयत्न केला असता त्या कातळावरून सरडय़ाच्या आकारातील मोठाल्या पाली फिरताना दिसल्या कि एकक्षण अंगावर काटाच उमटतो. आज ही कोठारे राहण्यासाठी अयोग्य आहेत. 
    इथेच एक गोष्ट सांगून टाकाविशी वाटते. या अशा अनगड गडांवरून फिरताना चित्त सतत सावध असू द्यावे. या प्रवासात अनेकदा सरपटणाऱ्या अनाहूत मित्रांची गाठभेट होण्याचा धोका असतो. तेव्हा डोंगरदऱ्यातून हिंडण्याची हौस ज्यांना जोपासायची आहे, त्यांनी एकतर अशा सरपटणाऱ्या प्राण्यांची माहिती, यातही किमान विषारी सापांची ओळख करून घेणे महत्त्वाचे. न होवो, पण वाईट प्रसंग उद्भवलाच तर किमान प्रथमोपचार तरी माहित असायला हवा. अन्यथा, केवळ भावनेवर चालणारे गिरिभ्रमण अनेकदा स्वत: बरोबर अन्य सहकाऱ्यांनाही अडचणीत आणू शकते.
  येथे आपली गडप्रदक्षिणा पुर्ण होते. संपुर्ण गड फिरण्यास अडीच तास लागतात. गडावरुन माणिकडोह जलाशय, चावंड, नाणेघाट, शिवनेरी, भैरवगड, जीवधन असा निसर्गरम्य परिसर दिसतो. 
 
गडावरुन उतरताना गडाच्या आग्नेय दिशेला एका मंदीराच्या समोर सहा समाधीचे दगड म्हणजे थडी दिसतात.अर्थात हि थडी म्हणजे मराठेशाहीत जर कोणी वीरगतीला प्राप्त झाले तर त्याची समाधी म्हणून उभी केली जात.बहुतेक निजामशाही कारकीर्दित झालेल्या झुंजात धारातिर्थी पडलेल्या वीरांचे हि स्मारके असावीत.
 
अजून काही :
१. चावंड आणि हडसर किल्ला पण एका दिवसात होतो. चावंड गावातून बोटीने माणिकडोह धरणातून पलीकडे जाता येते.
२. हडसर किल्ल्याच्या बाजूस, राजूर पासून थोड्या अंतरावर वाघ्र प्रकल्प आहे. माणिकडोह परिसरात सापडलेले वाघ, बिबटे पकडून येथे ठेवले जातात. सध्या तेथे तब्बल २८ वाघ आहेत.
३. कुकडेश्वर मंदिरापासून पुढे डोंगर चढून गेल्यास आपण डायरेक्ट दाऱ्या घाटात पोहोचतो. तेथूनच दुर्ग ढाकोबा ला हि जाऊ शकतो.
४. ५ दिवस हाताशी असतील तर माणिकडोह ला प्रदक्षिणा मारता येते.
 जुन्नर ->चावंड -> कुकडेश्वर -> जीवधन -> नानाचा अंगठा -> नाणेघाट -> निमगिरी -> हडसर -> माणिकडोह  वाघ्र प्रकल्प-> शिवनेरी ->जुन्नर

संदर्भ :-
१) पुणे जिल्हा गॅझेटीयर
२) महाराष्ट्र देशातील किल्ले- चिंतामण गोगटे
३) गुलशने ईब्राहिमी- फेरीश्ता
४) बुर्हाने मासीर-सय्यद अली
५) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
६) साद सह्याद्रीची !  भटकंती किल्ल्यांची !!- प्र.के.घाणेकर
७) पर्णालपर्वतग्रहणाख्यान- जयराम पिंड्ये
८) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
९)  www.durgbharari.in  हि वेबसाईट
१०) www.trekshitiz.com  हि वेबसाईट
११) http://sagarshivade07.blogspot.com/2013/12/blog-post.html हा ब्लॉग
१२) http://www.nisargramyajunnar.in/fort-hadasar/ - श्री रमेश खरमाळे
१३) हडसर-निमगिरी-चावंड-जीवधन-नाणेघाट - महेश तेंडुलकर
१४)  https://bijoor.me/2013/01/14/trek-to-hadsar-fort/
१५)  https://divakarsatam.com/2021/04/27/hadsarfort/

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...