Monday, May 16, 2022

जीवधन

 महाराष्ट्रावर इ.स.पुर्व काळात मौर्य राजांची सत्ता होती.मात्र सम्राट अशोकाच्या मृत्युनंतर केवळ पन्नास वर्षात मौर्य साम्राज्याची वाताहात झाली. मौर्य राजा नंतर सत्तेत आलेल्या सातवाहन राजांनी  इ.स.पू. २३६ ते इ.स. २३० या कालखंडात दख्खनच्या पठारावर राज्य केले.यांचे राज्य वर्तमान महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांच्या भूप्रदेशांत पसरले होते. आंध्र प्रदेशातील धरणीकोट व अमरावती, तसेच महाराष्ट्रातील जुन्नर व पैठण ही सातवाहनांची प्रमुख ठाणी होती. इ.स.पू.च्या पहिल्या शतकात भारताच्या मोठ्या भूप्रदेशावर राज्य करणारा सातवाहन हा महाराष्ट्राचा पहिला ज्ञात राजवंश मानला जातो.इसवी सन पूर्व पहिल्या शतकात भारताच्या मोठ्या भूप्रदेशावर राज्य करणारा सातवाहन हे पहिले राजे. हा राजवंश सुमारेचार शतके सलगतेने राज्य करत होता. या काळात त्यांचे तीस पराक्रमी राजे होऊन गेले. या सातवाहनांच्या राजवटीत महाराष्ट्र इतर प्रदेशात सुवर्णकाळ होता असे मानले जाते. प्रतिष्ठान (पैठण), जीर्णनगर (जुन्नर), तगर (तेर), नेवासे, नाशिक अशी भरभराटीला आलेली शहरे या राजवटीत उदयास आली. अशा या सातवाहनांच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी ‘नाणेघाट’ हा प्रमुख मार्ग होता.





जीवधन गडाची विवीध रुपे

    कल्याण बंदरातून येणारा माल जुन्नरहूनच पुढे पैठणला जाई.सुपारक अर्थात सोपारा आणि कल्याण ही प्राचीन काळी पश्चिम किनाऱ्यावरची दोन अत्यंत महत्त्वाची व्यापारी केंद्रे होती. केवळ देशांतर्गतच नव्हे, तर परदेशातील व्यापाराला सुद्धा येथून मोठी चालना मिळत असे. विशेषतः: रोमहून आयात होणारा माल सोपाऱ्याला उतरवला जाऊन तेथून कल्याण, नाणेघाट, जुन्नर, नेवासा मार्गे पैठणकडे नेला जात असे. तसेच निर्यातीच्या वस्तूंची वाहतूक देखील याच मार्गावरून उलट दिशेने होत असे. त्यावेळी कोकण व जुन्नरला जोडणारा नाणेघाट हा प्रमुख मार्ग होता. नाणेघाट रचना हि डोंगर खोदून केलेली आहे. इथं अनेक गुहा आहेत या प्रत्येक गुहे समोर पाण्याचं टाकं पहायला मिळत. इथं असलेल्या दगडी रांजण, गणेश मूर्ती, कातळावर कोरलेले हनुमान शिल्प, गुहेत भिंतींवर कोरलेले शिलालेख, कातळात कोरलेल्या पायऱ्या स्थापत्य शास्त्राची सारी अदभूत किमया इथं अनुभवायला मिळते.या घाटात सातवाहनांनी एक लेणे तयार करत त्यामध्ये त्यांच्या कूलाची गाथाही कोरून ठेवलेली आढळते. येथे असलेल्या लेखात सातवाहन सम्राज्ञी नागणिके विषयी माहिती मिळते. या लेखांमध्ये महाराष्ट्राच्या आद्य राज्यकुल, त्यांचा पराक्रम, दानधर्माबद्दल माहिती आहे. 
    येथील एका लेखात सातवाहनांच्या पराक्रमाशिवाय त्यांनी इथे केलेले यज्ञ, दानधर्माचे उल्लेख आहेत. सातवाहन राजांनी दोनदा अश्वमेध यज्ञ केला असे दिसून येते. याशिवाय वाजपेय यज्ञ, राजसूय यज्ञ असे तब्बल २२ यज्ञ इथे पार पडल्याची माहिती हे लेख देतात. हजारो गाई, शेकडो हत्ती, घोडे, खेडी, धान्य, वस्त्र-अलंकार आणि तत्कालीन सातवाहनांची कार्षांपण या नाण्यांचा मोठा दानधर्म केल्याचाही यात उल्लेख येतो.
   इतका व्यापार आणि आर्थिक उलाढाल होणार तर त्याला सैनिकी सुरक्षा हवीच.यासाठी या परिसरात दुर्गांची साखळी उभी केली गेली.यात शिवनेरी, चावंड,हडसर, निमगिरी,नारायणगड, सिंदोळा, भैरवगड हे सर्व कातळरक्षकच जणु.मात्र भौगोलीक दृष्ट्या हे सर्व गड नाणेघाटापासून लांब आहेत.नाणेघाटाचा थेट रक्षक म्हणजे किल्ले जीवधन !!! ऐन घाटमाथ्यावरचा उभ्या बेलाग कडय़ावरील दुर्ग. सहय़ाद्रीचा भेदक भूगोल, सातवाहनांच्या पाऊलखुणा आणि प्राचीन नाणेघाटाची सोबत या साऱ्यांनीच हा गड भारलेला आहे. पुणे जिल्हय़ातील जुन्नरपासून २७ किलोमीटरवर, प्राचीन नाणेघाटाच्या तोंडाशी आणि घाटघर गावाच्या परिसरात असलेला,सह्याद्रीच्या एब रांगेतील हा किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी उभारण्यात आला होता. नाणेघाटापासून जीवधन किल्ला अगदी हाकेच्या अंतरावर आहे. !
    नाणेघाटाचा सख्खा शेजारी असलेला जीवधन गड निश्चितच सातवाहनकालीन असला तरी आपल्याला त्याचे थेट उल्लेख किंवा पुरावे मिळत नाही.जीवधनचे उल्लेख येतात ते थेट मध्ययुगीन म्हणजेच मुसलमानी सत्तांच्या कालखंडात.या काळात त्याचा उल्लेख जुधान असा येतो. सन १४८२-८३ मध्ये मलिक नायबचा मुलगा अहमद याने कोकण व दक्षिणेकडील डोंगराळ भागात केलेल्या मोहीमेचा वृत्तांत लिहीताना त्याने म्हणजे अहमदने शिवनेरी, जोंड्,लोहगड्,तुंग्,तिकोना,कोंढाणा,पुरंदर्,भोरप्,मुराबदेव ( मुरुंबगड म्हणजे राजगड ) हे किल्ले काबीज केले आणि त्या किल्ल्यावर मातबर सेनानी नेमले.त्यानंतर अहमदने जुधान किल्ल्याला वेढा दिला.त्याच्या सैन्याने केलेल्या जोरदार मार्यामुळे गडावरील शिबंदीचा प्रतिकार संपला आणि त्यांनी शरणागती पत्करली.जरी सैनिकांना जीवनदान देण्यात आले तरी अहमदच्या शिपायांनी गडावरील वास्तुंचे मोठे नुकसान केले,अहमदने गडाची व्यवस्था एका सरदाराकडे सोपवली आणि तो खोज ( हा बहुधा कोहोज असावा ) कडे निघून गेला.
सय्यद अलीच्या याच ग्रंथात या मलिक अहमदचा मुलगा बुर्हाण निजामशहाच्या मृत्युसमयी त्यावेळच्या निजामशाहीत असलेल्या गडाची यादी दिली आहे,त्यात असलेल्या ५८ किल्ल्यात जीवधनचा समावेश होतो. याचा अर्थ निदान ३० डिसेंबर १५५३ पर्यंत तरी जीवधन निजामशाहीत होता असा निष्कर्श काढता येतो. 
    त्यानंतर जीवधनचा उल्लेख मिळतो तो थेट निजामशाहीच्या अखेरच्या कालखंडात !इ.स. १६३३ मध्ये शहाजी राजे निजामशाहीचे सरदार होते.मात्र स्वराज्य स्थापन करण्याचा मनसुबा मनी धरुन त्यांनी एक डाव खेळला.निजामशाही संपवण्यासाठी दख्खनेत उतरलेला शहाजहान व महमद आदिलशहा यांनी एकत्र येउन जवळपास निजामशाहीचा मोठा मुलुख ताब्यात घेतला.१७ जुन १६६३ रोजी मुघल व आदिलशाहीने एकत्र येऊन निजामशाही जिंकली व खुद्द निजामशहाला कैदेत टाकले. शहाजीराजांनी एक हाती निजामशाही वाचवण्याचे ठरवले.थेट शहाजी राजांना सत्ताधीश होण्यास विरोध झाला असता.याचे कारण तोपर्यंत तीनशे वर्षात रक्तात भिनलेली गुलामगिरीची मानसिकता ! म्हणून नामधारी निजामाचा वारस असावा म्हणून शहाजी राजांनी निजामशाहीच्या घराण्यातील मुर्तजा नावाचा दह-अकरा वर्षाचा मुलगा जीवधन गडावर कैदेत होता,त्याला सोडवले आणि संगमनेर जवळचा पेमगिरी ( मुळ कागदपत्रात शहागड असा उल्लेख आहे ) गाठून त्याला मुजर्‍यापुरता सुलतान करुन स्वतंत्रपणे कारभार सुरु केला.मुर्तजाला निजामशहा म्हणून घोषित करून स्वतः वजीर बनले.मात्र सुलतानशाही विरुध्द उगवणारे हे बंडाचे रोप पुढे धोकादायक ठरेल हे ओळखून आदिलशहा व शहाजहान यांनी सध्याच्या ठाणे जिल्ह्यातील माहुलीगडाला वेढा देउन इ.स. १६३६ मध्ये शहाजी राजांना शरणागती पत्करायला लावली. निजामशाही टिकविण्याच्या निमित्ताने शहाजीराजांनी हा स्वतंत्र राज्य निर्मितीचा प्रयत्न केला पण त्यात यश आले नाही. उत्तरेच्या प्रचंड फौजांपुढे निभाव न लागल्याने शहाजीराजांनी मुघलांशी तह केला व त्यात जिवधन व इतर चार किल्ले मुघलांना द्यावे लागले. यावेळी शहाजीराजांनी आपली काही विश्वासु माणसे व गड ताब्यात देण्यासंदर्भातील कागदपत्रे काजी अबु सईद याच्याबरोबत  देउन त्याला मुघल सरदार खानजमानकडे पाठवले.त्यावेळी मोघलांच्या हवाली जे गड केले गेले त्यात जीवधनचा समावेश होता.
      शिवकाळात जीवधन शिवाजी महाराजांच्या ताब्यात होता कि नाही, याचा उल्लेख कोणतीच अस्सल साधने करीत नाहीत.मात्र एक उल्लेख शिवकालातील जयराम पिंडे लिखीत 'पर्णालपर्वतग्रहणाख्यान' या ग्रंथात येतो.इ.स. १६७२-७३ च्या सुमारास शिवाजी महाराजांनी मुघल व आदिलशाही मुलुखातील अनेक गड जिंकून घेतले.त्यात साल्हेर्,अहिवंत, अचला,मार्किंडा,रवऴ्या-जवळ्या वगैरे किल्ल्यांचे उल्लेख आहेत.यात जीवधनचा कोठेही उल्लेख येत नाही.फक्त जयराम पिंडे यांच्या ग्रंथात जुन्नर परिसरातील किल्ले जिंकून घेतल्याचा उल्लेख आहे.
   पर्णालपर्वतग्रहणाख्यान ग्रंथातील पहिल्या अध्यायातील ३८ व्या श्लोकात जीवधनचा उल्लेख खालील प्रमाणे येतो.
 ततो जीवधनाख्योसौ यवनानां गिरीर्महान |
जीवरुपो भवत्येषां तं च ते भ्यो ग्रहीन्नृप : || ३८ ||
           अर्थ : नंतर जीवधन नावाचा यवनांचा ( मोघलांचा ) मोठा किल्ला त्यांचा ( म्हणजे मोघलांना महत्वाचा ) प्राणाभुत असा होता ,तो सुध्दा शिवाजी महाराजांनी त्यांच्याकडून घेतला.
   अर्थात शिवचरित्रासंदर्भातील इतर साधने याला दुजोरा देत नाहीत. संभाजी महाराजांच्या कारकीर्दित किंवा राजाराम महाराजांच्या काळात जीवधन किल्ल्याचे उल्लेख मिळत नाहीत. त्यामुळे या काळात गड मोघलांकडे होता कि मराठ्यांकडे ? हे नेमके समजत नाही.पण महाराणी ताराबाईंच्या काळात जीवधन किल्ला मराठ्यांनी जिंकून घेतला याची नोंद औरंगजेबाने संपादीत केलेल्या अखबारात आहे.ती अशी 
  ता ७ मे १७०२ बादशहाना पुढील प्रमाणे कळविण्यात आले कि "जुन्नरजवळ जोधन किल्ला आहे.मराठ्यांनी तेथील किल्लेदारांना कैद केले आणि किल्ल्याचा ताबा घेतला आहे." बादशहांनी आज्ञा केली कि "याबाबतीत जुन्नरचा किल्लेदार व फौजदार नस्रुल्लाहखान व पट्ट्याचा फौजदार लोदीखान यांना लिहीण्यात यावे."( यावेळी औरंगजेब विशाळगडाच्या मोहीमेवर होता.
    अखबारात जीवधन किल्ल्याचा उल्लेख जोधन असा आलेला आहे.त्यावरुन मराठ्यांनी तो किल्ला दि. ७ मे १७०२ पुर्वी घेतला असणार हे निश्चित.परंतु जीवधन किल्ला मराठ्यांकडे फार काळ राहिलेला दिसत नाही.तो सुमारे तीन चार महिन्यानंतर मोघलांनी पुन्हा जिंकुन घेतल्याचे अखबारातील नोंदीवरुन स्पष्ट होते. त्या नोंदी पुढीलप्रमाणे 
१) ता. २१ नोव्हेंबर १७०२ : मुहिब अली वास जोधनची किल्लेदारी देण्यात आली. ( यावेळी औरंगजेब बादशहाचा मुक्काम बहादुरगडाजवळ होता ). 
२) ता. २३ नोव्हेंबर १७०२ : मुहिब विहीशी ( अली ?) याची जोधनच्या किल्लेदारीवर नेमणुक झाली. त्याच्या मनसबीत वाढ करण्यात येउन त्याला निरोप देण्यात आला. ( यावेळी औरंगजेब बादशहाचा मुक्काम बहादुरगडाजवळ होता ). 
  याच्या पुढच्या नोंदीवरुन जीवधन किल्ला मोघलांतर्फे कोणी जिंकून घेतला याचे उत्तर मिळते. पण केव्हा ते कळत नाही.त्या नोंदी अशा 
१) ता, ७ मे १७०३: बक्षी रुहुल्लाखान याने विनंती केली कि, "दक्षिणेच्या तोफखान्यात दारोगा (अधिकारी ) बरमोजखान ( मन्सुरखान ) याने कळविले कि मावळ्यांचा दारोगा अब्दुल करिम याला १०० जात व २०,००० स्वार ( इथे स्वारांचा आकडा चुकलेला असावा. तो २ असावा ) अशी मनसब देण्यात आली.काय आज्ञा ?
   त्यावर बादशहा म्हणाले." १०० जात याचे २०० केले, १० स्वार योग्य आहेत" ( यावेळी औरंगजेब बादशहाचा मुक्काम पुण्यातील इदग्याजवळ होता ). 
२) ता. ७ मे १७०३ : मतलबखान ( करावल बेगी ) याने विनंती केली कि, "मावळ्यांचा दारोगा अब्दुल करीम याच्या मनसबीत दहा स्वारांनी वाढ करण्यात आली. पण हा परवाना ( एक प्रकारे हुकुम ) मन्सुरखानच्या शिक्क्यानिशी आहे. तर सियाहा ( रजिस्टर ) मध्ये काय नोंद करायची ?" त्यावर बादशहांनी आज्ञा केली कि "१० स्वारांच्या वाढीची नोंद करा". 
या दोन उल्लेखावरुन औरंगजेबाने मावळ्यांच्या मदतीने आणि बहुधा गनिमी काव्याचा वापर करुन जीवधन किल्ला मराठ्यांकडून जिंकून घेतला असणार. कारंण मावळे व मावळ्याचा दरोगा अब्दुल करीम यांचा त्यात उल्लेख आला आहे.
  पुढे पेशवेकाळात जीवधन किल्ला कधी मराठ्याकडे, तर कधी मुघलांकडे ( हैद्राबादच्या निजामाचा मराठी कागदपत्रात मुघल असा उल्लेख येतो ) होता. बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशव्याच्या कारकीर्दित इ.स.१७४९ च्या मे महिन्यात हा किल्ला मराठ्यांनी मुघलांच्या हवाली केला.त्याचा उल्लेख दि. ३१ मे १७४९ च्या सनदेत आला आहे.तो असा.
    रामाजी बापुजी याला पत्र असे कि,नारो खंडेराव याची गुरे जीवधनकडे चारणीस होती. त्यास जीवधन मोघलास दिला ते समयी लोक किल्ल्यावरुन उतरले. त्यांनी किल्ल्यानजीक गावची गुरे धरुन चांवडेस ( म्हणजे चावंड किल्ल्याकडे ) आणिली. त्यामध्ये नारो खंडेराव याची गुरे २ गायी १ म्हैस तीन सर आली आहेत.ती फिरोन (परत) देवावी म्हणुन रा.हरी दामोधर यांनी विनंती केली,त्यावरुन सनद सादर केली आहे.तर नारो खंडेराव याची सदरहु गुरे आली असली तर ( ती) चौकशी करुन देणे".
    परंतु जीवधन किल्ला मुघलांच्या कडे फार दिवस राहीला नाही.त्याच वर्षाच्या जुलै-ऑगस्ट महिन्यात तो मराठ्यांकडे आला.दि. १० ऑगस्ट १७४९ रोजी चांदवड किल्ल्याचा हवालदार संताजी मोहीते याला पाठविलेल्या सनदेत "किल्ले जीवधन फत्ते केली ते समयी लुटीपैकी जिन्नस लोकांकडे ( मराठ्यांकडे ) राहिला आहे". असा उल्लेख आलेला असून त्यात पुढे लुटीच्या मालाची एक भलीमोठी यादी जोडलेली आहे.त्यातील वस्तु खालीलप्रमाणे आहेत.
   १२४ भांडी - तांब्याची ६८,पितळेची ५०, काश्याची ४, कथिलाची २
१२ लोखंडी दागिने ( वस्तु ) ४ तवे,३ कोयते, ३ विळे, १ कुर्हाड, १ पळी साधी २ किरकोळ दागिने- १ सिंगाडा (?), १ रंजकदाणी (?) १५ खिल्लारे सर ( पाळीव प्राणी ) - १० म्हैशी ( ७ एन ३ वासरे सीर खोर ) ३ टोणगे, ( १ थोर २ लहान ) २ गाई ( १ एन गाय १ वासरु )४३ सरकारात शिलेखान्याकडे ( शस्त्रागारात ) दागिने द्यावे.  
९ बंदुका, १ पिस्तोल, २ तलवारी, १३ निमचे ( म्हणजे छोट्या तलवारी ) ७ करट्यारी १ पट्टा ( मोडका ) १ तरकस खोततीर ४ बर्च्या २ परज जुने ( १ कट्यारीचा, १ निमचाचा ) ३ ढाली
   याशिवाय सैनिकांनी घेतलेल्या वस्तुंमध्ये ८ हत्यारे ( १ गुर्दा इंग्रजी, २ निमचा, १ कट्यार उणाख, १ ढाल कबज कागदी, काचेच्या मुठिची सुरी , २ तिवशा ( एक ४ हात लांब १ हात रुंद आणि दोन ५.५ हात लांब व २.५ हात रुंद ) २ अंगठ्या ( १ सोन्याची अंगठी वजन ३ मासे , १ चांदीची अंगठी रुपयाभर ) १ ज्ञानेश्वरीची संपुर्ण पोथी 
   एखादा किल्ला ताब्यात घेतल्यावर तिथे कोणकोणत्या वस्तु मिळतात याची हि यादी मनोरंजक आहे.अर्थात किल्ला किती महत्वाचा आहे, यावर या यादीचे स्वरुप बदलते रहाते.
    इ.स. १८१८ च्या शेवटच्या मराठे-इंग्रज युध्दात जीवधन किल्ला इंग्रजांनी कसा जिंकून घेतला याबध्दल 'Pendhari And Maratha War Papers',page 294  मध्ये हकिकत आली आहे.ती अशी 
In the 1818 Maratha war a brigade under Major Eldridge reached Jivdhan on the 3rd of May 1818. The commandant who had been summoned to surrender two days before, declined to give up the fort saying he would fight for eight days. An advanced reconnoitring party under Captain Nutt of the Engineers, were frequently fired on from the guns and matchlocks in the fort but without loss. A spot was chosen for the mortars and a battery for two brass twelve-pounders till eighteen-pounders could be got ready to play on the masonry about the gate. The mortars opened at about twelve o’clock and after an hour’s firing of about twenty shells a man was sent down to say that the garrison would open the gate. This was immediately taken possession of by a party of the Bombay European Begiment. The garrison was disarmed and dismissed. [Maratha and Pendhari War Papers, 294. An officer in Major Eldridge’s force describes Jivdhan (Bombay Courier, 16th May 1818) as absolutely impregnable as it had bombproofs for the garrison to retire to. The last flight of steps which led to the fort consisted of 240 rock-cut steps each 14 foot high and as steep and hard to climb as a ladder. Midway down the hill on the north-west a level ran out for 100 yards and the mountain then became as steep as before. From the edge of the small level rose a natural pillar of rock about 300 feet high nodding over the abyss below. On the south-west the hillside was so steep that a stone dropped from the hand would reach the Konkan about 2000 feet below.]
वरील हकीकतीचे मराठी भाषांतर असे ,दि. ३ मे १८१८ रोजी मेजर एल्ड्रीचच्या नेतृत्वाखाली इंग्रज सैन्याची एक तुकडी जीवधन किल्ल्याजवळ येउन पोहचली.दोन दिवसापुर्वीच किल्ला सोडून देण्याबध्दल जीवधनच्या किल्लेदाराला आज्ञा देण्यात आली होती.पण किल्लेदाराने ती नाकारली आणि किल्ला आठ दिवस लढवणार असल्याचे इंग्रजांना कळाविले.किल्ल्याचा भेद काढणार्या कॅप्टन नटच्या लोकांनी बंदुका व मॅचलिक्स यांनी किल्ल्यावर सतत ,मारा सुरु केला.परंतु त्याने काही हानी झाली नाही.मग मॉर्टर तोफांसाठी जागा निवडण्यात आली आणि तोफांची बातेरी ज्यामध्ये पितळेच्या बारा पौंड क्षमतेच्या दोन तोफा तिथे आणण्यात आल्या. ( इथे १२ पौंड हे तोफगोळ्याचे वजन आहे.तितक्या वजनाचा तोफगोळ्याचा मारा करण्याची क्षमता असलेली तोफ असे इथे अपेक्षित आहे) १८ पौंडी तोफ दरवाज्याच्या आसपासच्या तटाबंदीवर मारा करण्यापुर्वी त्या १२ पीडर तोफा मार्‍याच्या जागी हलवण्यात आल्या होत्या.  बारा वाजता मॉर्टरचा मारा सुरु झाला आणि अंदाजे एक तासाच्या मार्‍यात वीस तोफ गोळे डागल्यावर किल्ल्यावरुन एक माणुस किल्लेदाराचा निरोप घेउन खाली आला कि, किल्ल्यातील सैनिक दरवाजा उघडायला तयार आहेत.बॉम्बे युरोपियन रेजिंमेटने ताबडतोब किल्ल्याचा ताबा घेतला आणि किल्ल्यातील सैनिकांना निश्स्त्र करुन तिथून घालवून दिले. 
   या युध्द प्रसंगाचे मेजर एल्ड्रीचच्या सैन्यातील एका अधिकार्‍याने जीवधन किल्ल्याचे वर्णन केले आहे.ते असे.
Jivdhan, [Deccan Papers, No. 60; Mr. J. McLeod Campbell, C. S.]about 3000 feet above sea-level and about 970 feet above the plain, is a dismantled fortress commanding the Nana pass sixty-five miles north-west of Poona and sixteen miles west of Junnar. The fort, which is about 1000 yards long by 500 broad and nearly two miles round, stands within the village limits of Ghatghar on a steep and rugged hill which rises about a thousand feet above the crest of the Nana pass. Jivdhan is a square stack of a hill rough on all sides surrounded by steep precipices and presenting an abyss on the Konkan side so sheer that a stone dropped would fall almost 2000 feet into the Konkan at the foot of the Sahyadris. [Hamilton s Description of Hindustan, II. 48,] In general effect Jivdhan is much like Shivner. It differs in three points. The east scarp of Jivdhan is highest near the middle of the hill face while in Shivner the middle part is the lowest; the north point of Jivdhan is much squarer and blunter than the north point of Shivner; and the upper hill in Jivdhan is higher than the upper hill in Shivner. The road from Junnar to the foot of Jivdhan is fit for laden cattle. The ascent, which is about a mile long, is very steep and difficult and consists mostly either of loose masonry or steep sheets of rock not difficult for bare feet but troublesome for boots. For about 300 feet of the ascent a profile of rock has the remains of a stair of steep high and narrow steps with nothing below and very little on either side. The hundred feet in the middle of the stair were blown away when the fort was dismantled about 1820. Of the blown away section the middle part is not difficult to climb on all fours or to come down barefoot face foremost. But about a third at the lower and another third at the upper ends are extremely-steep. Except the hillmen few natives can go up the steepest parts and few Europeans can climb them without a rope and bare feet. The climber’s only helps are small foot-holds which the people have cut in the rock and finger-holds in the bottoms of some of the 1820 blasts. The main gate was on the west towards the Nana pass with what apparently was a fine ascent, a long steep stair partly built and partly rock-cut climbing a narrow gorge completely commanded by the fort. The ascent led to a landing place, a square well about thirty feet deep, and, out of the well, the ascent passed by a tunnelled rock-cut stair to the gate. The stair was blown away and the tunnel filled in 1820 and the gate is now useless. The top has five cisterns which form the main water-supply, and some apparently Buddhist caves with a substantial Muhammadan building in front, plain and with solid masonry arches. Each compartment of the Muhammadan building has a saucer-shaped roof of good well-fitting masonry. The chief Buddhist cave (36′ X 21′ X15′) has a smaller cave on either side and a veranda in front. The caves were used as granaries and when the fort was captured in 1818 they were found stored with grain. The grain was burnt and its ashes remain ankle deep. Jivdhan commands a splendid view west to the Salsette hills, Tungar, and Kaman in Bassein, and, on a clear November day, to the sea.

History

In 1489 Jivdhan was taken by Ahmad I. the founder of the Ahmadnagar Nizam Shahi family (1490-1636), and in 1637 it was one of the five Poona forts which Shahaji gave to the Moghals. [Elliot and Dowson, VII. 60; Grant Duff’s Marathas, 53.] 

    इथं १८१८ साली इंग्रजांनी केलेल्या हल्ल्यामुळे काताळात कोरलेल्या पायऱ्या उध्वस्त झाल्या आहेत त्यामुळे पावसाळ्यात इथली वाट अवघड होते.  इंग्रजांनी जीवधन ताब्यात घेतल्यावर मेजर एल्ड्रीज या अधिकाऱ्याने तो पहिल्यांदा पाहिला व त्यावर बॉम्बे कुरिअर या वृत्तपत्रात १६ मे १८१८च्या अंकात एक लेख लिहिला. या लेखात तो म्हणतो हा किल्ला म्हणजे चहूबाजूने उभा तुटलेला एक कडा आहे. गडावर जाणारी वाट उभ्या कातळातून शिडीसारखी वर चढते. वायव्येस किल्ल्यापासून अलग झालेला निमुळता सुळका असून इथे समोर भयंकर खोल दरी दिसते. किल्ल्याच्या कडय़ावरून जर एखादा दगड खाली टाकला तर तो थेट दोन हजार फूट खाली तळकोकणात जाऊन पडतो. हा किल्ला पाहिल्यावर या वर्णनामध्ये काहीही अतिशयोक्ती नसल्याचे जाणवते.    
इ.स. १८१८ मध्ये इंग्रजांनी जीवधन किल्ला जिंकल्यावर त्यांना गडावरील पुर्वाभिमुख लेण्यात ज्यांना सध्या धान्यकोठ्या म्हणतात, त्यात धान्य ठेवत असल्याचे दिसून आले,सध्या इथे पाउल बुडेल इतकी राख आहे.कदाचित मराठ्यांनी किल्ला इंग्रजांच्य ताब्यात देण्यापुर्वी इथले धान्य जाळून टाकले असावे. किल्ला जरी इंग्रजांना मिळाला तरी त्यांना तिथले धान्य मिळू नये यासाठी कदाचित असे केले असावे.अर्थात याला पुरावा नाही. जिवधन किल्ला इंग्रजांना राखायचाही नव्हता आणि सोडूनही द्यायचा नव्हता. त्यामुळे इ.स. १८२० मध्ये किल्ल्यावर जाणार्‍या कातळातील पायर्‍या इंग्रजांनी सुरुंग लावून उध्वस्त केल्या. 
जायचे कसे : 
जुन्नर पासून २८ किमी अंतरावर वा चावंड किल्ल्यापासून २० किमी अंतरावर हा किल्ला आहे. घाटघर हे त्याचे पायथ्याचे गाव. किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मुख्य दरवाजे असुन नाणेघाटाच्या बाजुने जाणारी वाट कल्याण दरवाजा म्हणुन ओळखली जाते तर घाटघर गावातुन जाणारी वाट जुन्नर दरवाजा म्हणुन ओळखली जाते. यापैकी कल्याण दरवाज्याची वाट घळीतून पायरीमार्गाने वर येते तर दुसरी जुन्नर दरवाजाची वाट कड्यातून वर येते. या दोनही वाटांनी वर येण्यासाठी थोडेसे प्रस्तरारोहण करावे लागते. 
पुणे ते घाटघर रस्ता

१. घाटघर गावातून किल्ल्याच्या पूर्व दिशेने :- 
हा मार्ग जर अवघड आहे. मुळात मार्ग सापडला तर अवघड आणि सोपा हा प्रश्न आहे. म्हणून गावातून कोणीतरी बरोबर घेतलेले बरे. तसा उगाच हिंडायची हौस असेल तर मात्र फार भारी आहे. 
येथे पावसाळ्यात जाणे फारच अवघड आहे. रोप वैगरे लावता येत असेल, अनुभवी मंडळी असेल तर ठीक. 
बसच्या वेळा : 
जुन्नर स्थानकावरून बस व्यवस्था आहे पण वारंवारता कमी आहे. 
जुन्नर ते घाटघर ( घाटघर फाटा) 
१. जुन्नर ते घाटघर/अंजनावळ : सकाळी १०, दुपारी- १२:३०, २, ५, ७:३० (शेवटची गाडी मुक्कामी अंजनावळ)
नाणेघाट ते जुन्नर जाण्यासाठी :
१. अंजनावळ (घाटघर फाटा) ते जुन्नर (कुकडेश्वर वरून) : सकाळी -११, दुपारी -३:३०, ५:३०
जुन्नरवरुन थेट घाटघरला बसची सोय असली तरी हि बस आपल्या वेळेत उपलब्ध नसेल तर चावंडवाडीत जावे.तिथून घाटघरकडे जाणारा रस्त्याने पुर गाव गाठावे.पुर गावातून घाटघरकडे जाण्यासाठी दोन पर्याय आहेत्.
 अ) पहिल्या मार्गाने म्हणजे गाडी रस्त्याने चार तास चालत घाटघर गाव गाठावे.
ब) दुसरा रस्ता हा पुरखिंडीतून जाणारा डोंगरी मार्ग आहे.पुर गावातून खिंडीतून वनराईतुन जाणार्‍या पायवाटेने अर्ध्या ते पाउअण तासात खिंड गाठावी. पुढे तासा-दिड तासाच्या चालीवर आहे फांगुळ गव्हाण गाव ज्याला फांगळी म्हणतात. फांगळीवरुन अर्ध्या-पाउण तासाच्या चालीवर घाटघर गाव गाठता येइल.
२. नाणेघाटातून नानाचा अंगठा पार करून थोडे जंगल लागते. तेथून वरती किल्ल्यावर म्हणजे पश्चिमेकडून. 
हा जरा बरा मार्ग आहे. मोठा ग्रुप असेल आणि उन्हाचा त्रास चुकवायचा असेल तर या मार्गाने जावे. पश्चिमेकडून चढण असल्याने त्रास होत नाही. आणि किल्ल्यावर असलेली ४-५ पाण्याची टाकी याच मार्गात आहेत. 




  नाणेघाटामार्गे जीवधनकडे येणारा रस्ता

 कल्याण - नगर मार्गात नाणेघाट चढून गेल्यावर पठार लागते. या पठारावरून उजवीकडे जंगलात एक वाट जाते. या वाटेने दोन ओढे लागतात, हे ओढे पार केल्यावर एक कातळभिंत लागते. या भिंतीला चिकटून उजवीकडे जाणारी वाट वांदरलिंगी सुळक्यापाशी घेऊन जाते, तर डावीकडे जाणारी वाट एका खिंडीपाशी पोहोचते. जीव मुठीत धरून त्या उभ्या कातळभिंती पार केल्यावर पुन्हा कातळात खोदलेल्या पायर्‍या लागतात. सन १८१८ नंतर सुरुंग लावून इंग्रजांनी हा मार्ग चिणून काढला व पश्चिम दरवाज्याची वाट बुजवून टाकली. या दरवाज्याने वर जाण्यास अनेक वानरयुक्त्या योजाव्या लागतात. वाट जरा अवघडच असल्याने जपूनच जावे लागते. 
     गडावर रहाण्याची सोय नाही.जरी वर कोठी असली तरी रहाण्यासाठी फार योग्य नाही.गडावर फार वावर नाही,त्यामुळे मुक्काम करणार असाल तर सापांपासून सावध रहायला हवे, विशेषतः पावसाळ्यात. घाटघर गावात रहायची सोय होउ शकते. तसेच नाष्टा ,जेवण आधी सांगितले तर व्यवस्था होते. मात्र गडावर मुक्काम करणार असाल तर जेवणाची सोयही स्वतःच करावी.गडावर बारमाही पाण्याची टाकी आहेत,त्यामुळे पिण्याच्या पाण्याची चिंता नाही.घाटघर गावातून जीवधनवर जाण्यास २ तास लागतात. तर नाणेघाटमार्गे पश्चिम दरवाज्याने जाणार असाल तर साधारण दोन ते अडीच तास लागतात.
आपण दोन्ही मार्गाने वाट समाजावून घेणार आहोत.
१) जुन्नर दरवाज्यामार्गे :-
      जीवधनचे पायथ्याचे गाव घाटघर. गाव एकदम टुमदार सुमारे २०-२५ घरं असलेल्या ह्या गावात मुक्काम करुन सकाळी लवकर गड बघून नाणेघाट असे एका दिवसात बघून परत जाता येते.इथेच आपण आपले वाहन पार्क करु शकतो आणि वाटाड्या घेता येतो.इथे फक्त जिओच्या सीमला रे़ज आहे.
जीवधन,नाणेघाटसाठी काही संपर्क क्रमांक देतो
१) नाना मामा- 9763307861
२) श्री. सुभाष अढारी -9850184948, 7767981930
३) श्री.अढारी यांचे जुन्नर येथील बंधु - 9850868251
४) श्री.संतोष शिंदे -9764525247 , 9552750133, 9921649492
५) हॉटेल किल्लेदार -7057135422
६)       ९५५२७५०१३३
७) तालिश - A बुटीक रेसॉर्ट 08408941919
८) करण हॉटेल - 09850184948
९) हॉटेल रानमळा-  9607594344, 7745809614 
शक्यतो एका मार्गाने चढाई करायची आणि दुसर्‍या मार्गाने उतरायचे म्हणजे दोन्ही वाटा पायाळून होतात. जर पुण्याकडून येउन घाटघर गावामार्गे जाणार असू तर जुन्नर दरवाज्याकडून चढावे आणि कल्याण दरवाज्यामार्गे उतरावे.त्याउलट मुंबईकडून नाणेघाट,आर्गे आल्यास कल्याण दरवाज्याकडून चढावे आणि जुन्नर दरवाज्यामार्गे उतरावे.

घाटघर गाव



 



घाटघर गावातून दिसणारा जीवधन गड

घाटघर गावातून जीवधन किल्लयांची पूर्वेकडील बाजू
घाटघर गावातून जीवधन किल्लयांची पूर्वेकडील बाजू 
 घाटघर गावातून डाव्या बाजूने जाणारी वाट थेट गडावर घेऊन जाते. पण पावसाळ्यात झुडपं वाढल्यामुळे शक्यतो वाटाड्या घेऊन जाणे गरजेचंच आहे. 


घाटघर गावातून दिसणारा व्हराडी डोंगर
घाटघर गावाजवळ असणारे लेणे

गावात जवळपास प्रत्येकाच्या उपजीविकेचे साधन हे शेतीच. त्यामुळे गडाच्या जाण्याच्या वाटेच्या दुतर्फा भातशेती दिसत होती.
 गावाच्या सुरवातीला एक महादेवाचं मंदिर लागते त्याचे दर्शन घेऊन चढाईला सुरुवात करायची.
गडाकडे जाणारी वाट दाट झाडीतुन आहे


गडाकडे जाताना आपले लक्ष उजवीकडच्या कातळाकड्याकडे पाहिजे.हि घळ दिसली कि या घळीतूनच चढाईचा मार्ग आहे हे लक्षात ठेवावे
सुरुवातीला लागणार पठारी भाग हळूहळू चढाईचा होतो. गडावर जाणारी वाट ही ३ टप्प्यात विभागली होती असं म्हंटलं तरी वावगं ठरणार नाही. सुरवातीला जंगलवाट, नंतर खडकांची वाट आणि वर गेल्यावर गडमाथा. पावसाळ्यात या वाटेवर धबधबा असतो. हि वाट नवख्या ट्रेकर्सना बर्‍याचदा सापडत नाही.इथे वाट चुकल्याची खुप उदाहरणे आहेत. यासाठी जाताना आपल्या उजव्या हाताला असलेल्या गडमाथ्याच्या कातळकड्याकडे नजर ठेवायची.साधारण अर्धा तासानंतर आपल्याला एक घळ गडमाथ्यावरुन ओघळलेली दिसते.इथेच वाट कोरुन काढली आहे.वाट सापडण्याची खात्री नसेल तर वाटाड्या बरोबर न्यावा, अन्यथा वाट चुकून वेळ आणि श्रम तर वाया जातातच, शिवाय पुन्हा वाटाड्या बघावा लागतो,ते वेगळेच. 
पावसाळ्यात हि वाट घसरडी होते



पावसाळ्यात या वाटेवर शेवाळ असते, तसेच विंचु,खेकडे असतात्,त्यामुळे काळजी आवश्यक आहे

पहिला रॉकपॅच.

   घळीतील वाटेच्या खडकात खोदलेल्या पायऱ्यांचा हा मार्ग ब्रिटिशांनी सुरुंग लावुन तोडल्याच्या खुणा आजही जागोजाग दिसतात. आता फारच गुळगुळीत आहेत. पण चढून जाण्या इतपत आहेत. पावसाळ्यात मात्र ह्या धोकादायक होतात. 

त्यानंतर पुढचे संकट म्हणजे १५ फुटी रॉक पॅच. नुसते चढायला फार अवघड नाही. पण सामान घेऊन चढताना पाठीवर वजन असल्याने उलटा झोक जायची शक्यता आहे. तेथे बोल्ट पण मारलेले आहेत. रोप लावता येत असेल तर मग सोपे आहे.
पायऱ्यांचा हा मार्ग दोन ठिकाणी तुटलेला असुन वनखात्याने तेथे लोखंडी शिड्या लावल्या आहेत तसेच खालील भागात धोक्याच्या ठिकाणी सरंक्षक लोखंडी कठडे लावले आहेत. त्यामुळे हि वाट वर येण्यास सोपी झाली आहे. 

 या बाजुने चढताना मानवनिर्मीत गुंफा लागतात.जुन्नर परिसरात रहाणारे माजी सैनिक श्री.रमेश खरमाळे यांनी त्यांचा शोध घेतला.त्यांच्याच शब्दात या गुहांविषयी जाणून घेउया.
किल्ले जीवधनच्या पाच नागपंथीय गुहा.

व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा - https://youtu.be/VG6EcSwRUb8
१) किल्ले जीवधन च्या जुन्नर दरवाजा मार्गाने चढाई केली की कातळ भिंतीतील पाय-्यांची सुरूवात ज्या ठिकाणाहून चालू होते तेथेच उजव्याबाजूस जवळच १५/२० फुटांवर एक पुर्व पश्चिम दिशेला कोरलेले साधारण अडिच बाय तीन फुट रूंदी व उंची असलेले एक भुयार निदर्शनास पडते. साधारण ४० फुट लांबी असलेले हे भुयार पुर्वेकडुन पश्चिमेकडे कातळात कोरण्यात आले असून आतमध्ये भुलभुलय्या पध्दतीत एक चौकोन कोरलेला असून हे भुयार त्या चौकोणाभोवती फिरते.
 
 एका वेळी एकच मनुष्य या भूयारात जाऊ शकतो. हे भुयार पाहुन झाल्यावर आपण त्याच भुयारापासुन उत्तरेला सरळ पुढे चालत गेल्यावर साधारणतः १०० फुट अंतरावर आजुन एक भुयार निदर्शनास पडते.
 
 
 
२)या भुयाराची रचना पण जुन्नर दरवाज्यापाशी असलेल्या भुयाराप्रमिणेच केलेले आहे. आपण येथुन पुन्हा माघारी फिरून जुन्नर दरवाजाने किल्ले चढाई सुरु केली की आपणास चढाई दरम्यान दोन लोखंडी शिड्या लागतात. पैकी दुसरी शिडी चढून गेल्यावर आपण उजव्या हाताला एक भुयार निदर्शनास पडते.
 
 
३) या भुयारी मार्गात शिरताना काळजी घ्यावी. अगदी तीस फुटावर या भुयारी मार्गाचे अस्तित्वात संपते.परंतु ते संपत असताना आतमध्ये इंग्रजी T आकाराचे कोरलेले असुन त्यामध्ये साधारणतः १० व्यक्ती सहज बसु शकतात. त्या भुयारात एकाच वटवाघूळाच अस्तित्वात असल्याचे समजते. तेच डोळ्यांच्या समोरून जीवाच्या आकांताने इकडून तिकडे फिरताना दिसते. परंतु आपणच घाबरून जातो. आतमध्ये जास्त प्रमाणातच गरमी जाणवते. त्यामुळे घामाच्या धारा वाहु लागतात. यामध्ये प्रवेश करताना सावधानता बाळगणे महत्वाचे आहे. कारण प्रवेश करण्याआधी येथुन खाली कातळाची खोल दरी असून निसरडा भाग आहे.
 
 
 
 या बाबत गावकरी बर्याच उलटसुलट चर्चा करताना आढळून येतात. त्या सर्व भाकीत कथा आहे. त्याची सत्यता मी प्रत्यक्ष अनुभवलेली आहे. त्यामुळे निश्चिंत असावे.
४)  एक भुयारी मार्ग किल्याच्या नैऋत्येला असून तो अर्ध गाडलेल्या अवस्थेत दिसुन येतो. यामध्ये प्रवेश करणे टाळावे.
कारण यामध्ये सर्प असल्याचे निदर्शनास आले आहे. 

 
५)  आजून एक भुयारी मार्ग वानरलिंगी च्या तळाशी उत्तरेकडुन कोरलेले आहे .हे पण इंग्रजीत T आकाराचे असून या मध्ये गिर्यारोहक वानरलिंगी क्लायबिंग करतेवेळी वास्तव्य करतात.
✍️लेख/छायाचित्र - श्री.खरमाळे रमेश, माजी सैनिक
८३९०००८३७०
   येथून किल्ला सुरू होतो. गडाचा आकार आयताकृती आहे.
जीवधन गडाचा नकाशा
फोटोत अवशेष आणि तटबंदी वर्तुळ करून दाखवले आहेत. आणि त्याला धान्यकोठार साठी वाट कशी जाते. ते हि लाल रेषेने दाखवले आहे.
जीवधन किल्याचा जुन्नर दरवाजाने जाताना लागणाऱ्या कातळमधील पायऱ्या
जीवधन किल्याचा जुन्नर दरवाजाने जाताना लागणाऱ्या कातळमधील पायऱ्या 
जुन्नर मार्गे येणारी वाटेचा दरवाजा कडील  बुरुज आणि पायऱ्या. आणि खाली बुरुजाचा जवळ समोर असलेली खांबटाकी
पहिली तटबंदी

दुसरी तटबंदीचा पुढे गेलो असता. तटबंदीचा बाहेरील भाग दिसतो.

तटबंदीच्या खाली असलेला बुरुज आणि त्याच्या कातळातल्या पायऱ्या दिसत आहेत.

या पुर्वाभिमुख दरवाज्याचा उजव्या बाजुचा खांब अस्तित्वात आहे. तसेच लाकडी अडणा घालण्यासाठी असलेली खोबणही दिसून येते.
जुन्नर वाटेच्या दरवाजाचे अवशेष

सुरवातीलाच २ बुरूज दिसतात.



जीवधन गडाला घाटघरकडून येणारी पायर्यांची वाट, जुन्नर मार्ग
जीवधन गडाला घाटघरकडून येणारी पायर्यांची वाट, जुन्नर मार्ग 

गडाचा जुन्नर दरवाजा पुर्णपणे कोसळलेला असुन या भागातील तटबंदी व बुरुजांचे बांधकाम मात्र मोठया प्रमाणात शिल्लक आहे. इथे स्तंभ असलेल्या कातळकोरीव गुंफा आहेत.या पहारेकर्‍यांच्या कोठ्या किंवा अलंगा आहेत.मात्र सध्या इथे पाणी सठल्यामुळे त्या पाण्याची टाकी आहेत असे वाटते.




जीवधन किल्याचा जुन्नर दरवाजाने आत जाताच डावीकडे असलेले पाण्याचे टाके
जीवधन किल्याचा जुन्नर दरवाजाने आत जाताच डावीकडे असलेले पाण्याचे टाके
येथुन काही पायऱ्या उतरून खाली गेल्यावर खडकात खोदलेल्या पहारेकऱ्याच्या खोल्या दिसतात. यात काही प्रमाणात पाणी साठले आहे. हे पाणी पिण्यायोग्य नाही. दुसऱ्या रस्त्यावरून उतरताना लागणारे टाकीतले पाणी बरे आहे.


 यानंतर आपण येतो ते किल्ल्यातल्या सर्वात सुस्थितीतील व सुंदर बांधकामापाशी म्हणजे धान्य कोठीकडे . एखादे लेणे वाटावे अशी ही वास्तू!  हि वास्तू म्हणजे एक अर्धवट खोदलेले लेणे असुन याच्या दर्शनी भागात बांधकाम केलेले आहे तर पाठीमागील भाग आत खोलवर कातळात कोरलेला आहे.दर्शनी भागात बांधकाम तर पाठीमागे खोदकाम! मंडपवजा प्रवेशद्वार, त्यावर संपन्नतेचे प्रतीक असलेले गजान्तलक्ष्मीचे शिल्प! दोन्ही बाजूने जलधारा सोडणारे हत्ती, तर मध्यभागी लक्ष्मीदेवता! आतमध्ये सर्वत्र अंधाराचे साम्राज्य, तेव्हा टॉर्च घेऊनच प्रवेश करावा लागतो. 















एकामागे एक अशी तीन टप्प्यांतील वास्तू! यातील मधल्या भागास डाव्या-उजव्या हातास आणखी एकेक दालन! या साऱ्यांच्या मिळून पाच खोल्या तयार झालेल्या आहेत.यातील बाहेरील दोन बांधीव दालनांच्या छतावर कमळाची झुंबरे असुन कोपऱ्यावरील खांबांच्या वरील बाजुस फणा काढलेले नाग कोरले आहेत.  भिंतीत कमानीच्या खिडक्या आहेत, तळाशी बसण्यासाठी ओटे आहेत. तिसऱ्या कोरलेल्या दालनाच्या वरील बाजुस बालेकिल्ल्याचा डोंगर असुन बाहेरील दालनाच्या भिंतीत कमानीदार दरवाजा व खिडक्या आहेत. पहिल्या भागातील छतावर कमल शिल्प कोरली आहेत. मधल्या भागातून तिसर्‍या भागात जाताना तीन कमानीयुक्त दरवाजा सामोरा येतो.या दरवाज्याच्या वरच्या बाजुला पुष्पाकृती कोरली आहे.अशीच पुष्प शिल्प रायगडावरील गंगासागर तलावाच्या दगडावर कोरलेले दिसते. 
जीवधनच्या पोटातील हे खोदकाम सातवाहन काळातील असावे. शेवटचं दालन हे पूर्णपणे बालेकिल्ल्याच्या पोटात आहे व त्या टेकडीचा संपूर्ण भार त्याच्यावर आहे हे जाणवूनचं अंगावर काटा येतो. गावकरी सांगतात की १८१८ मध्ये झालेल्या शेवटच्या युद्धावेळी या कोठीत मोठय़ा प्रमाणात धान्यसाठा करून ठेवलेला होता. हा साठा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला किंवा त्याला हेतूत: आग लावली गेली पण त्याची राख अजूनही तिथं आहे आणि आत खरोखरचं राख आहेही पण ती खरंच १८१८ ची आहे का ते खात्रीनं कोणी सांगू शकत नाही. पण ती, गडावर राहताना वा इथे आसरा घ्यायची वेळ पडल्यावर ट्रेकिंग ग्रुप्स सुरक्षिततेसाठी पेटवत असलेल्या शेकोटीची राख असण्याची शक्यता जास्त आहे.

 
 
या कोठीच्या पाठीमागे एकात एक गुंफलेली पाण्याची पाच टाकी दिसतात. वरतून पाण्याची एक छोटी धार थेट एका ठिकाणी टाक्यात पडताना दिसते. पाऊस ऐन भरात असताना बऱ्यापैकी धबधबा इथं तयार होत असावा.

या भागात गडाची सदर तसेच एका मोठया वाड्याचे अवशेष दिसुन येतात. गडाची मुख्य वस्ती याच भागात असावी. 
इथून गडाच्या उत्तरेला गेल्यास आणखी उध्वस्त वास्तु आणि काही नाजुक ठिकाणी तटबंदी दिसते.
 Furse
पावसाळ्यात मात्र गडावर अस्ताव्यस्त गवत वाढलेले असते.यावेळी गडफेरी खुप जपून करायला हवी,याचे कारण म्हणजे गडावर असणारे सरपटणारे जीव.

किल्ल्याच्या मध्यभागी असलेल्या टेकडीच्या दिशेने जाते. हि टेकडी म्हणजे किल्ल्याचा बालेकिल्ला आहे. टेकडीवर जाताना वाटेत सर्वप्रथम एक चौकोनी टाके दिसुन येते.

 सह्याद्रीतील एक रौद्रभीषण सौंदर्य म्हणजे जीवधन गडाचा हा वानरलिंगी सुळका. सह्याद्रीतील बहुतेक सुळके स्वतंत्रपणे उभे असल्यामुळे त्यांचे पायथ्यातूनच बघावे लागतात.मात्र हा सुळका एन जीवधनला चिकटून असल्यामुळे याचे थेट माथ्यापासून दर्शन घेता येते, ते ही कोणत्याही ड्रोन कॅमेर्‍याशिवाय. इतक्या अरुंद जागी जमीनीतून जणु उसळून आलेला लाव्हारस इथे शांत झाल्यामुळे हे निसर्गशिल्प उभे ठाकले आहे.गडावरुन हा सुळका,त्याची पार्श्वभुमी असणारी खोल दरी, त्याच्यावरचा चढाईचा मार्ग हे सारे तासनतास निरखत रहावे असेच. 
 
 
 जीवधन ते वांदररलिंगी व्हॅली क्रॉसिंग
 
वांदरलिंगी सुळक्यावर यशस्वी चढाई
 
वांदरलिंगी सुळका जवळुन पहायचा असल्यास माचीच्या या भागात जावे अन्यथा येथे एका वाडयाच्या अवशेषां व्यतीरिक्त इतर कोणतेही अवशेष नाहीत. येथुन टेकडीच्या माथ्यावर आले असता हि वाट उजवीकडे व डावीकडे वळते तसेच समोरील बाजुस जुन्नर दरवाजाच्या दिशेने खाली उतरते. बालेकिल्ल्याच्या डाव्या बाजुस कोणतेही अवशेष नसल्याने नसल्याने सर्वप्रथम उजवीकडे वळावे. 
 
जीवधन गडावरील जिवाई देवीची मूर्ती
जीवधन गडावरील जिवाई देवीची मूर्ती
 

वाटेत सर्वप्रथम एका लहानशा जोत्यावर उघडयावरच गडदेवता जीवाबाईची मुर्ती आहे. या देवीच्या नावावरूनच गडाला ‘जीवधन’ असे नाव पडले. मंदिर पूर्णपणे उध्वस्त झालेलं बिना छपराचे आहे. मंदिराच्या बाजूला दगडाने २ फुट उंच भिंत रचून ठेवली आहे., मंदिरात आत मूर्ती आहे. देवीचा दर्शन घेऊन मंदिराचा पाठी जायचे. तिथे तुटलेले दगडी खांब दिसतात. कदाचित मंदिरचा प्रवेश द्वाराचे खांब असावेत. 
 
 मुर्तीच्या मागील भागात काही अंतरावर दोन समाध्या दिसुन येतात. या समाधीच्या पुढील भागात काही अंतरावर एक लहान साचपाण्याचा तलाव असुन वांदरलिंगीच्या सुळक्याचे टोक दिसते तर पुढे जाणारी वाट खाली माचीवर उतरते. 
गडाच्या माथ्यावरचा भगवा ध्वज

जीवधन किल्ला समुद्रसपाटीपासून ३७५४ फूट उंचावर असुन ६५ एकर परिसरात दक्षिणोत्तर पसरला आहे. इथे आपण गडाच्या सर्वोच्च माथ्यावर पोहचलो असतो.जीवधनने एन सह्याद्रीच्या मुख्य रांगेत स्थान पटकावले असल्यामुळे मोठ्या परिसर एक नजर फेकताच दिसून येतो. 
 
 गडावरुन दिसणारा माळशेजचा परिसर
 
 सुळक्यांचे बिर्हाड मिरवणारा वर्हाडी डोंगर

 
 
ढाकोबा आणि दुर्ग

पुर्वेकडे चावंडगड, पुरचा शंभु डोंगर, दक्षिणेला कातळटोपी घालून बसलेला ढाकोबा , ढाकोबाच्या बगलेतून उतरणारा दार्या घाट तसेच माथ्यावर दगडाची रास असणारा दुर्ग, उत्तरेला समोरच सुळके असणारा वर्हाडी डोंगर, मागे डाईकवर उभारणी केलेला माळशेज घाटातील भैरवगड, 
 
 


 अगदी पायथ्याला दिसणारा नाणेघाट आणि नानाचा अंगठा ( याला अगंठा का म्हणतात, याचा उलगडा येथून होतो ) तसेच भोरांड्याच्या दाराचा परिसर, 
 
लांबवर अलंग,कुलंग्,मदन,कळसुबाई रांग.
 
हवा स्वच्छ असेल तर कदाचित आणखी परिसर दिसु शकेल.
    येथे गवत जास्त असल्यामुळे त्यामुळे आलो त्या वाटेने पाठी फिरून गड उतरायला कल्याण दरवाज्याकडे निघायचे.
हे सर्व पाहुन झाल्यावर जुन्नर दरवाजाच्या वरील बाजुने दक्षिणेकडील तटबंदीच्या दिशेने गडाच्या माचीवरून गड प्रदक्षिणेला सुरवात करावी. या वाटेने संपुर्ण माचीवर फेरी मारता येते. गडाची दक्षिण बाजुची तटबंदी मोठया प्रमाणात शिल्लक असुन या वाटेत काही सुकलेली लहान टाकी,एक जोडटाके तसेच शिबंदीची घरे दिसतात.
 जीवधन किल्यावरील पाण्याचा टाक्या
गडाच्या दक्षिण माचीवर कातळात खोदलेले एक मोठे टाके असुन या टाक्याच्या काठावर एक कोरीव मुर्ती आहे. या गडाची बांधणी नाणेघाटाच्या रक्षणासाठी झाल्याने नाणेघाटाच्या दिशेने तटबंदीत पहाऱ्याच्या २२ चौक्या दिसुन येतात. येथे वावरण्यास सोपे जावे यासाठी तटबंदीच्या कडेने बऱ्याच ठिकाणी कातळात पायऱ्या खोदल्या आहेत. या वाटेने आपण कल्याण दरवाजापर्यंत येतो व आपली गडफेरी पुर्ण होते. 
    आता आपण हिच जीवधनगडावरची चढाई नाणेघाटमार्गे कशी करता येईल ते समाजावून घेउया. 
कल्याण दरवाजामार्गे :-
      हि वाट जे दुर्गारोही नाणेघाट बघून येणार आहेत त्यांच्यासाठी सोयीची आहे. नाणेघाटाचा माथ्यावर पोहचल्यावर समोर एक डांबरी रस्ता जुन्नर- घाटघर मार्गे आलेला आहे. ह्या रस्त्याने गाडीने सरळ नाणेघाटाच्या माथ्यावर पोहचतो. ह्याच रस्त्याने मुंबई किंवा पुणेहून खाजगी गाडी करून आलो असता थेट नाणेघाटापाशी येतो. जीवधन दोन्ही वाटेने करू शकतो.एक वाट घाटघर मार्गे तर दुसरी वाट नाणेघाट मार्गे गडावर जाते. नाणेघाट मार्गे म्हणजेच नाणेघाटाचा पठारावरून दीड ते दोन तासात गड चढता येतो. तर घाटघर मार्गे  दोन ते अडीच तासात गडावर पोहचता येते.
 
 
 
 नाणेघाटातून दिसणारा जीवधन

           नाणेघाटाच्या माथ्यावरून, आपल्या उजव्या हाथाला जीवधन किल्ला दिसतो. जीवधन किल्ल्याला जायायला पठारावरती ठराविक वाट दिसत नाही. पठारावर जर वाट लक्षात आली नाही, तर हे लक्षात ठेवावे. वानरलिंगी सुळका आणि जीवधन गड ह्या मधील घळीच्या दिशेने चालत जावे. त्यानंतर ज्या बाजूला गडाचा टोक येतो तिथूनच वाट पायथ्याचा जंगलातून वर जाते.सुरवातीला डांबरी रस्त्यावरून ५ ते १० मिनटं चालल्यावर, उजवीकडे एक कच्चा रस्ता जाताना दिसतो. त्या रस्त्याने चालू लागलो कि पाच मिनीटांनी डावीकडे तुम्हाला एक हॉटेल  दिसेल, तिथे न जाता, उजवीकडे सरळ रस्ता जाताना दिसतो. त्या रस्त्याने जावे, त्या रस्त्याने थोडा पुढे गेलो असता. अजून एक हॉटेल करण लागते. ह्या हॉटेलच्या पाठून जीवधनकडे वाट जाते.वाटेतील जंगलात दोन झाडावर, वाट दर्शविणारे बाणाचे चिन्ह केलेलं दिसते. 
पश्चिमेकडून पठारावरून दिसणारा जीवधन किल्ला
पश्चिमेकडून पठारावरून दिसणारा जीवधन किल्ला 
जीवधन गडावरती जाताना लागणाऱ्या पायऱ्या
जीवधन गडावरती जाताना लागणाऱ्या पायऱ्या
जीवधन किल्याला मुख्य कल्याण दरवाजा मार्गातील दगडी कातळमधील पायऱ्या
जीवधन किल्याला मुख्य कल्याण दरवाजा मार्गातील दगडी कातळमधील पायऱ्या

    खालून गडाकडे पाहताना नेमके गडाला जाण्याचा मार्ग कुठे आहे तो कळत सुद्धा नाही, गड उतरून गेल्यानंतर थोडे फार लक्षात येते.नाणेघाट पठारा वरून वांदरलिंगी सुळक्याच्या दिशेने जाताना एक वाट डावीकडे जंगलात जाते. या वाटेने वर चढत आपण किल्ल्याच्या डोंगराला भिडतो. येथे कातळात कोरलेल्या २५-३० पायऱ्या असुन किल्ल्याच्या कातळ भिंतीपर्यंत जाताना वाटेत दोन ठिकाणी कोरलेल्या पायऱ्या लागतात. पठारावरती सळसळणारे गवत, वाहणारे झरे पार करत व घनदाट वाढलेल्या झाडी मधून पायपीट करत तासाभरामध्ये पायऱ्यांजवळ पोहचतो.

जीवधन किल्याचा वाटेवरून दिसणारा वानरलिंगी सुळखा

जीवधन किल्याचा वाटेवरून दिसणारा वानरलिंगी सुळका
  
 किल्ल्याच्या कातळ भिंतीपाशी पोहोचल्यावर या भिंतीला लागुन एक वाट उजवीकडे वांदरलिंगी सुळक्यापाशी जाते तर डावीकडील वाट किल्ल्याच्या पायऱ्या असणाऱ्या घळीत जाते. येथुन सर्वप्रथम वांदरलिंगी सुळक्याकडे निघावे. वांदरलिंगी सुळका व किल्ल्याची कातळभिंत यामध्ये एक लहानशी घळ आहे. स्थानिकांनी या सुळक्याचे नाव वांदरलिंगी ठेवले आहे.कदाचित जीवधन गड आणी हा सुळका यातील अंतर इतके कमी आहे कि कदाचित एखादे वानर याच्यावरुन उडी मारुन गडावर जाईल म्हणून वानर लांघी म्हणजे वानर पार करु शकेल असे अंतर या अर्थाने या सुळक्याचे नाव वानरलांघी असावे.त्याचाच अपभ्रंश वांदरलिंगी झाला असावा. मात्र नाणेघाटातून याचे रुप थोड वेगळेच दिसते.एखादी पारशी व्यक्ति टोपी घालून उभी रहावी असा याचा आकार आहे.मुंबईमध्ये भायखळ्याला सेठ कर्सेटजी मोनोकजी यांचा पुतळा आहे.या पुतळ्यासारखाच हा वांदरलिंगी सुळका दिसतो.म्हणून मुंबईकर ट्रेकर्सनी या सुळक्याचे नाव खडा पारशी ठेवले आहे.

 
नाणेघाटाकडून येणारी वाट
दगडांनी भरलेली घळ
जीवधन किल्याला मुख्य कल्याण दरवाजा मार्गातील दगडी कातळमधील पायऱ्या
जीवधन किल्याला मुख्य कल्याण दरवाजा मार्गातील दगडी कातळमधील पायऱ्या
जीवधन किल्याचा वाटेवरून दिसणारा नानांचा अंघठा व नाणेघाटाचा परिसर
जीवधन किल्याचा वाटेवरून दिसणारा नानांचा अंघठा व नाणेघाटाचा परिसर


जीवधन किल्याला मुख्य कल्याण दरवाजाला जाणाररी वाट

जीवधन किल्याला मुख्य कल्याण दरवाजाला जाणारी वाट                                    


 
                     


पावसाळ्यात हि वाट धोकादायक होते


जीवधन किल्याचा मुख्य दरवाजा



 
 

 
जीवधन किल्याचा मुख्य दरवाजा कल्याण दरवाजा

    हि घळ ओलांडुन सुळक्याच्या पायथ्याशी जाता येते. या सुळक्याच्या पायथ्याला एक सात फुट लांब आत खोदलेली गुहा असुन या गुहेच्या आतील टोकाला १०x८ फुट आकाराची दुसरी गुहा खोदली आहे. सुळका पाहुन घळीत आल्यावर कातळात खोदलेल्या पायऱ्या लागतात. १० फुट लांबीच्या व दिड फुट ऊंचीच्या या पायऱ्या झिजलेल्या असुन काही ठिकाणी ढासळलेल्या आहेत. सन १८१८ मध्ये इंग्रजांनी जिवधन ताब्यात घेतल्यावर सुरुंग लावून येथील पायऱ्या उद्‌ध्वस्त केल्या व पश्चिम दरवाज्याची वाट बुजवून टाकली. त्यासाठी जागोजाग सुरुंग लावल्याच्या खुणा आजही आपल्याला पायऱ्या चढताना दिसतात. या ५०-६० कोरीव पायऱ्या चढून आपण एका कातळ टप्प्यापाशी येऊन थांबतो. येथे सुरुंग लावल्याच्या खुणा असुन पायऱ्यांचा हा मार्ग या ठिकाणी तुटला आहे. या तुटलेल्या भागात त्यामध्ये असलेल्या खोबण्यांचा आधार घेत वर जावे लागते. अन्यथा स्थानिकांची मदतीने दोर लावूनच हा भाग पार करावा. घळीच्या तोंडापासुन साधारण २५० पायऱ्या चढुन वर आल्यावर गडाची तटबंदी समोर येते. उभ्या कडय़ातील ही वाट चारी बाजूंनी ताशीव कडे असल्याने एका नाळेतून खोदुन काढली आहे. जिवधन,हडसर व चावंड या गडांच्या प्रवेशमार्गात असलेली समानता पहाता हे तीनही किल्ले एकाच कालखंडात बांधल्याचे जाणवतात. गडाचा दरवाजा तटबंदीत पायऱ्यांच्या काटकोनात असुन वाटेच्या डाव्या बाजुस दरवाजाच्या रक्षणासाठी बुरूज बांधलेला आहे. त्यामुळे पायऱ्या चढून वर आलो तरी गडाचा दरवाजा दिसत नाही. गडाचा दरवाजा दक्षिणाभिमुख असुन गडाचा दरवाजा व परीसर एका अखंड कातळात तासलेला आहे.
              हा पश्चिम महा-दरवाजा अखंड कातळात बेमालूमपणे उभा ठाकलेला. एकावेळी एक घोडा येऊ शकेल एवढीच त्या कातळानंमध्ये  जागा होती. त्याची उंची तर अचाट. शत्रू अगदी येथपर्यंत चढून आला तरी त्याला येथे पोहोचेपर्यंत दरवाज्याचा अंदाज येणार नाही. या उपर वरतीही बुरूज बांधले आहेत. घोरपड आणा वा कोरफड आणा, येथे चढाई करणे अशक्यच. याची स्थापत्यकला करणारा माणूस कोणत्या विद्यापीठातून डिग्री घेऊन आला असावा? असा प्रश्न पडतो. 
 जुन्नर मधल्या जवळपास सर्व किल्ल्यांची अशीच स्थापत्यकला दिसते. शिलाहार राजांनी हे किल्ले वा प्रवेशद्वारे बांधली होती. हे अर्ध गोलाकार घुमट प्रवेशद्वार अजूनही तेवढेच सुस्थितीत आहे. एकाच्या आत एक अश्या तीन कमानी आहेत. त्यावर चंद्र, सूर्य आणि कलश कृती आकृती कोरलेली आहे.  चंद्र, सूर्य कोरण्याचा अर्थ असा की, "जोपर्यंत चंद्र, सुर्य अस्तित्वात आहेत तोपर्यंत हे किल्ले अभेद्य राहूदेत."  

dagad
पुर्वी हि वाट मोठमोठ्या दगडांनी बंद करुन टाकली होती, त्यामुळे जेमतेम एकच जण एका वेळी जाउ शकायचा
नाणेघाट वाटे लागणारा  दरवाजा

 दरवाजाच्या दगडी कमानीवर मध्यभागी कलश कोरलेला असुन कलशाच्या उजव्या बाजुस सूर्य तर डाव्या बाजुस चंद्र कोरलेला आहे. दरवाजाच्या वरील बाजुस मारगीरीसाठी असलेल्या जंग्या तसेच झरोका दिसुन येतो. हा दरवाजा मोठमोठे दगड पडून बुजला होता तो २०१२ साली मोकळा करण्यात आला आहे. दरवाजाच्या आत उजव्या बाजुस अजुनही दगडात अर्धवट बुजलेली गुहा दिसुन येते. 
दरवाजा कडून माथ्यावर येताना. वाटेत टाक्या लागतात. त्याचे वरून काढलेला फोटो.
किल्ल्यात शिरल्यावर काही पायऱ्या चढुन आपला गडमाथ्यावर प्रवेश होतो.बाकी गडमाथ्याचे वर्णन आपण जुन्नर दरवाज्याने आलो तेच आहे,फक्त आता गड आपण उलट्या क्रमाने बघणार इतकेच.
नाणेघाट व किल्ले जिवधनचे आगळे वेगळे रूप.

ऐंशी वर्षे वयाचा नवतरूण अवलीया गाईड.

आज मला नाणेघाटच्या दक्षिणेला असलेल्या किल्ले जिवधन ते दा-याघाट या अफाट व ह्रदयात धडकी भरविणा-या बालाघाट रांगेच्या माथ्यावरून फिरायचे होते. दुपारचे एक वाजले होते. उन्हाचा तडाखा शरिराला चटके बसत असल्याने जाणवत होता. पत्नी स्वातीला बोललो मी फिरून येतोय. तीने पण होकार दर्शविला पण एक अट घातली कुणाला तरी सोबत घेऊन जा.मी हो म्हणत व बॅगेत पाण्याच्या दोन बाटल्या, ओल्या भुईमूगाच्या शेंगा ठेवत स्वारी जाण्यासाठी तयार झालो.
कार ड्राईव्ह करत करत एकच विचार मनात घर करत होता. सुरूवात कुकडेश्वराच्या पाठीमागील डोंगरमाथ्यावरून करावी. पण स्थानिक गाईड मिळेल का? हा मोठा प्रश्न होता. मनातील विचार दाबत ठेवून आपटाळे रोडणे उजविकडे वळण घेतले. तेथे बसथांब्यावर चार जण चावंड, कुकडेश्वर, खडकुंबे व फांगुळगव्हाणचे बस प्रवासी बसले होते. मी गाडी थांबवत त्यांना आवाज दिला. कुणाला यायचय का? मी नाणेघाटला चाललोय. चौघेही गाडीत बसले. मीच विषय काढला. मला या कुकडेश्वराच्या डोंगरावरून नाणेघाट व दा-याघाट यांचे दृश्य पाहता येईल का? कुकडेश्वराचे प्रवासी बोलले नाही. फांगुळगव्हाणचे प्रवाशी बोलले हो आमच्या लिंगीच्या डोंगरावरून करता येईल. मी प्रवासी त्यांच्या थांब्यावर सोडत सोडत फांगुळगव्हाणला पोहचलो. फांगुळगव्हाण बस थांब्यावर चारचाकी थांबवत कुणी गाईड मिळेल का विचारणा करू लागलो. परंतु भातकापणीची कामे असल्याने व तेथील नवतरूणांना वर लिंगी डोंगरावर जाण्याची वाट माहित नसल्याने कुणी यायला तयारच होईना. मी खुप नाराज झालो. एकटे जाणे सोपे नव्हते. परंतु प्रयत्न करूया म्हणुन ओढ्यात म्हशी धुत असलेल्या गृहस्थाला विचारले. त्या गृहस्थाने सोबत येण्यास मनाई केली.त्यांच्या शेजारी एक खुपच वयस्कर बाबा होते.तेवढ्यात ते बाबा बोलले मी येतो.
मला त्या बाबां बरोबर एवढे वर जाणे योग्य वाटत नव्हते. कारण खुपच वय झाले होते त्यांचे,व एवढी जीवघेणी चढाई चढतील का? यांना काही समस्या निर्माण झाली तर ते पण खुप अवघड होईल. मी काहीच बोललो नाही. शेजारच्या व्यक्ती बोलल्या घेऊन जा यांना ते वाट दाखवतील. मी माझा कॅमेरा, ट्रायपॉड, स्टीक व न्याहरीची बॅग बगलेत अडकुन चालु लागलो. बाबा पुढे व मी पाठीमागे प्रवास लिंगी डोंगराच्या दिशेने चालु झाला.
बाबा सांगू लागले. एकच मुलगा होता. भजन खुप छान म्हणायचा व लोकांची सेवा करायची त्याला खुप आवड होती. व्यसन काय हे त्याला माहीत नव्हते. दूर दूरची लोक त्याला भजनासाठी न्यायला यायची. परंतु परमेश्वरास पहावल नाही. त्याला आजाराने ग्रासले होते. पुण्यात ऑपरेशन केले व पोटातून एक किलोचा गोळा बाहेर काढला. त्याला घरी आणले परंतु नियतीला त्याने या जगात रहावे मंजूर नव्हते. शेवटी तो मला दहा वर्षापुरवी सोडून गेला. आज मी तुमच्यात त्याला पाहीले व दहावर्षानंतर प्रथमच बाहेर पडलोय. मी खुप खचून गेलो होतो. घर सोडून निघून जाण्यासाठी निघालो होतो. परंतु एका नातेवाईकाने थांबविले. व नातवांचा सांभाळ कर म्हणजे तुला तुझ्या मुलाचे समाधान मिळेल म्हणून थांबलो.
चालता चालता बाबांच्या गालावरून टप टप ओघळणारे अश्रु पाहून मला पण गहीवरून आल होते. माझ्या डोळ्यांच्या कडा पण ओल्या झाल्या होत्या. मीच विषय हुंदके देत बदली केला. बाबा तुमचे नाव काय हो. खेमा बुळे म्हणुन सांगितले व शिक्षण विचारले तर चक्क अंगठा बहादुर म्हणुन सहज सांगून गेले. शाळा का शिकले नाही? प्रश्न केला तर बोलले येथे त्या काळी शाळाच जवळपास अस्तित्वात नव्हत्या. अफाट जंगले येथे पसरलेली होती. वाघ प्राण्यांचा तर येथे सुळसुळाट असे.त्यामुळे कोठे जायचे म्हटले तर खुप भीती.
सपाट जंगलवाट सोडून आम्ही चढाईला लागलो होतो. बाबांचे पाय त्या सरळ चढाईला पण झपझप पुढे पडत होते. घामांच्या धारा शरिरातुन फुटू लागल्या होत्या. बाबा सांगतात की याच डोंगरावरून आम्ही पुर्वी दोन ओझे गवत कापुन आनायचो. आजची पिढी तर आपण आलोय इथपर्यंत सुध्दा यायला तयार होत नाही. वाळलेल्या व संपूर्ण बुजलेल्या पाय वाटेचा अंदाज घेत कारव्यांची लाकडे बाजुला सारत त्या चढाईवर आम्ही चाललो होतो.
एवढ्या गरमीत बाबांच्या डोक्यात जी टोपी होती ती त्यांनी काढलेली नव्हती. मध्येच बाबा घसरून खाली यायचे व तेवढ्याच जिद्दीने पुन्हा ते वर चढायचे त्यांच्या जिद्दीला मी मनोमन सलाम केला. लगातार दोन तास चालून सुद्धा बाबा थांबायचे नाव घेत नव्हते. माझी मात्र बाबांनी संपूर्ण हवा काढून घेतली होती. मला खुप गर्व वाटायचा की माझ्या एवढे कुणी चालू शकणार नाही. परंतु आज माझे गर्वहरण झाले होते. एक म्हण मला आठवली “दिसत तसे नसत” कारण बाबा चालतील का? या प्रश्नाचे उत्तर माझ्या समोरच मला मिळाले होते. आता उलट प्रश्न हा होता की मी चालेल का?
माझे वय एक्केचाळीस तर बाबांचे ऐंशी. लाजकाज मान खाली घालून बाबांच्या मागे मी चालत राहीलो. वानरलिंगी पाशी खराळ गेलेल्या अवघड भागातुन वर चढलो व लाजेने मी बाबांना बोललो बाबा थकला अशाल थांबा पाण्याचे दोन घोट घ्या. खरेतर मीच थकलो होतो. कोणत्या तोंडाने त्यांना मी सांगणार होतो की बाबा थांबा मी थकलोय. कारण निघताना मी त्यांना बोललो होतो तुम्ही चालशाल ना?
बाबांचे चित्रिकरण व गप्पागोष्टी कॅमेरात मी चित्रित करतच चाललो होतो. हे व्हिडिओ मी आपणास आमच्या या https://www.youtube.com/c/NisargramyaJunnarTaluka…youtube चायनलवर दाखवणार आहेच. आपण पहाल तर निश्चितच थक्क होशाल यात शंकाच नाही. पाण्याचे घोट घेत आम्ही त्या जिवघेण्या चढाईतुन खिंडीत पोहचलो. तेथून पुन्हा उजव्या बाजूने वर चढत पठारावर चढलो. समोरील दृश्य पाहून मी बेधुंद होऊन गेलो. त्या कड्याकडे पळतच सुटलो. बाबा तर जागेवरच थांबले. निश्चितच म्हटले असतील एका वेड्यासोबत मी आज वर आलोय. किल्ले जीवधन, वर्डीहा डोंगर व घाटघरचे दृष्य टिपत पुन्हा बाबांजवळ पोहचलो. बाबा नानेघाट येथून दिसत नाही हो प्रश्न केला. बाबा बोलले तीन कडे पार करून त्या समोरच्या कड्यावर गेल्यावर दिसेल. आता मात्र सपाट पठारावरून जायचे होते. त्यामुळे काहीच चिंता नव्हती. बाबा सांगतात या पठारावर पाच सहा फुट उंच गवत येथे असायचे. परंतु सर्वकाही नष्ट झालय. मनुष्याने आग लावूनच हे सर्व संपवले. मला वाटत होत की उंच उंच वाढलेले गवत मला पुन्हा दहा वर्षांनी पहायला मिळेल परंतु सर्व काही नाश पावलेल दिसतय.
एका कड्याच्या ठिकाणी वाढलेल्या वृक्षाखाली आणलेल्या भुईमुगाच्या शेंगा खाण्यासाठी आम्ही विसावलो घड्याळाकडे लक्ष टाकले तर पावणेपाच वाजले होते. तीनही कड्यावरून दिसणारी दृश्य टिपत व तेथील वातावरण व निसर्गाचा आस्वाद घेत आम्ही परतीला लागलो. उतरणीला खरा कस लागणार होता. क्षणोक्षणी पाय घसरणार होते. बाबांची काळजी वाटत होती. उतरताना बोलू लागले. डोळ्यांचे ऑपरेशन झालय माझ्या. दिसायला कमी झालय. एकमेकांना आधार देणपण शक्य नव्हते. बाबांचे पाय घसरले की माझ्या छातीत धस्स व्हायचे. त्या उतरणीतुन पडतझडत उतरत होतो. अचानकच तीव्र उतारावरील मोकळ्या दगडावर माझा पाय पडला व मी घसरलो. क्षणात डाव्या हातातील घड्याळात त्या साईडच्या कातळभिंतीत हात आदळला व मनगटी घड्याळ तुटले. बाबा बोलले हळुहळु उतरा. डाव्या हाताला दगडाने खरचटले होते. रक्तश्राव होऊ लागला. ते सर्व तसेच दाबत मी उतरू लागलो. बाबांना याबाबत थोडीशी कल्पना सुद्धा येऊ दिली नाही. शेवटी आम्ही बाबांच्या घरी व माझ्या चारचाकी पाशी पोहचलो. बाबांच्या पायाशी लोटांगनच घालून बाबांना दंडवत घातला. माझ्या आयुष्यात प्रथमच मला सोबत लाभलेला ऐंशी वर्षांचा हा नवतरूण अवलिया गाईड होता. बाबांना त्यांचा मोबदला देत. मी चारचाकी सुरू करत जुन्नर शहराच्या दिशेने बाबांना सॅल्युट करत परतीला लागलो.
मी टिपलेली सर्व छायाचित्रे ही बाबांच्या चरणी अर्पण करतो. कारण त्यांचा सहवास लाभला नसता तर कदाचित ही छायाचित्रे मी आपणपर्यंत दर्शनासाठी पोहचू शकलो नसतो.
बाबांच्या शक्तीचा एक चमत्कार मला पहायला मिळाला. बाबांच्या या शक्तीचा चमत्कार समाजासमोर पोहचावा म्हणुन पोष्ट शेर करायला विसरू नका.
लेखक/छायाचित्रे : श्री.खरमाळे रमेश 
वनरक्षक जुन्नर
(माजी सैनिक खोडद) 
मो.नं. 8390008370 
“शिवाजी ट्रेल”
फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .

 संदर्भ :-

१) पुणे जिल्हा गॅझेटीयर
२) महाराष्ट्र देशातील किल्ले- चिंतामण गोगटे
३) गुलशने ईब्राहिमी- फेरीश्ता
४) बुर्हाने मासीर-
५) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
६) साद सह्याद्रीची !  भटकंती किल्ल्यांची !!- प्र.के.घाणेकर
७) पर्णालपर्वतग्रहणाख्यान- जयराम पिंड्ये
८) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
९)  www.durgbharari.in  हि वेबसाईट
१०) www.trekshitiz.com  हि वेबसाईट
११) http://sagarshivade07.blogspot.com/2013/12/blog-post.html हा ब्लॉग
१२) http://www.nisargramyajunnar.in/chawand-bhuyar/ - श्री रमेश खरमाळे
१३) हडसर-निमगिरी-चावंड-जीवधन-नाणेघाट - महेश तेंडुलकर
https://kunalstrek.blogspot.com/2018/11/youtube-httpsyoutu.html 
https://susheelrajagolkar.blogspot.com/2020/12/jivdhan.html
http://sagarshivade07.blogspot.com/2014/01/blog-post_27.html
https://charudattasawant.com/2021/02/11/jivdhan-fort-vanarlingi-valley-crossing/
https://charudattasawant.com/2021/02/11/jivdhan-fort-vanarlingi-valley-crossing/

संदर्भ: https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Poona%20District/places_j.html#.

 

 























 


 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...