Tuesday, May 9, 2023

आंबोली लेणी आणि कोंडिविते लेणी (जोगेश्वरी लेणी आणि महाकाली लेणी)

 मुंबई परिसरात प्रसिद्ध कान्हेरी व एलिफंटा या गुफांव्यतिरिक्त आणखीही काही गुफा आहेत त्या म्हणजे जोगेश्वरीची गुफा, अंधेरी येथील महाकाली गुफा तसेच दहिसरची मंडपेश्वर गुफा. यापैकी दोन गुफा पाहण्यासाठी कुटुंबातीलच आम्ही सहा जण लोकलने सकाळी दहा वाजता जोगेश्वरी स्टस्टेशनला पोहचलो.

आंबोली लेणी किंवा जोगेश्वरी लेणी
लेणी सहाव्या शतकातील असून पूर्वी आंबोली लेणी म्हणून ओळखली जात असे. एका छोट्या टेकडीचा सम्पूर्ण भाग आतून कोरलेले हे मुंबई परिसरातील (कदाचित भारतातील) सर्वात मोठे हिंदू गुफा मंदिर आहे असे मानले जाते.

जोगेश्वरी स्टेशन पूर्व येथून गुफांसाठी शेअर रिक्षा मिळतात. १०-१५ मिनिटात रु.१२/- माणशी भाडे देऊन गुफांना पोहचलो.

रिक्षातून उतरल्यावर रस्त्यालगतच टेकडीचा खडक कोरून लेण्यात जाणारा रस्ता नजरेस पडतो .

लेणीची माहिती सांगणारा, भारतीय पुरातत्व खात्यातर्फे लावलेला फलक

प्रवेश द्वारापाशी पोहचल्यावर दोन्ही बाजूस एक याप्रमाणे मूर्तीचे भग्न अवशेष असलेल्या खोल्या आहेत. लेणीला दोन प्रवेशद्वारे असून सध्या पश्चिम दिशेला असलेलले हे मुख्य प्रवेशद्वार आहे. पूर्वीचे मुख्य प्रवेशद्वार हे पूर्वेला असावे त्यामुळे सोयीच्या दृष्टीने आपण पूर्व द्वाराकडून माहिती घेऊ.
टेकडीवरून काही पायऱ्या उतरत पूर्वद्वाराकडून आपण अग्र मंडपात येतो.

दोन्ही बाजूला एक याप्रमाणे चार स्तंभ व दोन अर्धस्तंभ असलेल्या खोल्या आहेत. उजव्या बाजूस भव्य व सुंदर अशी गणेश प्रतिमा आहे.

डावीकडील बाजूस सप्त मातृकांचे अवशेष आहेत असे वाचले आहे पण मी निरखून पहिले नसावे किंवा अंधार असल्याने नजरेस पडले नसावे.
अग्रमंडपातून आपण एका मोकळ्या प्रांगणात येतो


येथून वरच्या मजल्यावर एक खोली दिसते ते सध्याचे दत्त मंदिर. गुहेतून येथे जाण्यासाठी पायऱ्या नाहीत. गुफेच्या बाहेर येऊन छताकडून येथे उतरावे लागते.

दत्त मंदिर

प्रांगणातून आपण मुखमंडपात येतो . मुखमंडपाच्या दोन्ही बाजूस चार स्तंभ व दोन अर्धस्तंभ असलेल्या खोल्या आहेत. मुखमंडपातून मुख्य सभागृहात जाणाऱ्या दरवाजाच्या बाजूस व वर सुदर कोरीव काम आहे दरवाज्याच्या दोन्ही बाजूस द्वारपाल आपल्या सेवकासहित दिसतात.

वरच्या बाजूस मध्यभागी लकुलीश आपल्या शिष्यांसहित दिसतो.

लकुलीषबद्दल माहिती येथे वाचावयास मिळेल

डाव्या बाजूस 'कल्याणसुंदर शिव ' मूर्ती आहे.

कल्याणसुंदर बद्दल माहिती येथे वाचू शकता
उजव्या बाजूस शिवपार्वती सारीपाट खेळताना दिसतात.

मुखमंडपातून प्रवेश झाल्यावर आपण वीस स्तंभांवर आधारित भव्य सभामंडपात येतो.

मंडपाच्या मध्यभागी जोगेश्वरी (योगेश्वरी) देवीचे मंदिर आहे. यावरूनच लेणीला तसेच उपनगराला जोगेश्वरी नाव पडले.

सभामंडपाच्या पश्चिमेला सध्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे जेथून आपण सुरुवातीला प्रवेश केला होता.
सभामंडपाच्या दक्षिणेला तीन दारे व दोन खिडक्या आहेत ज्या एका मोठ्या व्हरांड्यात उघडतात. सध्या एकच दार उघडे असते.
दार

खिडकी

सभागृहाच्या दक्षिणेकडील दरवाजातून बाहेर पडले कि एक लांबलचक व्हरांडा आहे. व्हरांडा १०० फुटाहूनही अधिक लांबअसून त्यास दहा स्तंभ व दोन अर्धस्तंभ आहेत.
व्हरांड्यात सुरु असलेले धार्मिक विधी.

लेणीच्या वरून घेतलेला फोटो

व्हरांड्याच्या पुढे प्रांगण असून एका बाजूस महादेव मंदिर आहे.

येथील एक खडक व त्यातील कोरीव शिल्प

शेवटच्या कोपऱ्यात हनुमान मंदिर आहे.

या बाजूच्या कोपऱ्यात सांडपाण्याची दुर्गंधी जाणवते. गुफेच्या वरील व आजूबाजूचे अनधिकृत बांधकाम यास कारणीभूत असावे.

सध्या तरी गुफेवरील काही बांधकामे तोडल्याचे नजरेस पडते.

साधारण दीड तास गुफेत फिरून पश्चिम दरवाजाने परत मुख्य रस्त्याला आलो. आता पुढे महाकाली गूंफाना जायचे होते. येथून बहुतेक सर्व रिक्षा (शेअर) जोगेश्वरी स्टेशनला जाणाऱ्याच होत्या. कोणीही महाकाली गुफांकडे यायला तयार होत नाही.गुफांच्या दिशेने चालत निघालो. थोडे अंतर गेल्यावर मात्र दोन रिक्षा मिळाल्या, दोन्ही वेगवेगळ्या रस्त्याने गेल्या. एकीचे भाडे झाले रु.३८/- तर दुसरीचे रु ४८/- . जास्त भाड्याची रिक्षा मात्र अंतर जास्त असूनही रस्ता चांगला व कमी रहदारीचा असल्याने कमी वेळात पोहचली.

कोंडिविते लेणी किंवा महाकाली गुफा लेणी

पूर्वीच्या कोंडीविते गावालगत असल्याने या लेणीस कोंडीविता लेणी असे ओळखले जाते. नंतर या टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या देवी कालीमातेच्या मंदिरामुळे ही लेणी महाकाली गुफा म्हणून ओळखली जाऊ लागली.
लेणी सकाळी ९.०० ते संध्याकाळी ५.०० पर्यंत पाहता येते.

बेसाल्ट खडकात कोरलेली १९ लेणी येथे आहेत. लेण्यांचा काळ इसवी सन पूर्व २ रे शतक ते इसवी सन 6 व्या शतक सांगितला जातो.
लेणीसाठी तिकीट लोगो स्कॅन करून काढावे लागते. एक तिकिट जास्तीत जास्त पाच जणांमिळून काढता येते. आम्ही सहा जण असल्याने एकासाठी वेगळे तिकीट काढावे लागले. (नांव , ई-मेल देणे , ऑनलाईन पेमेंट करणे वयस्क किंवा काही लोकांसाठी कंटाळवाणे ठरते). प्रवेश फी रु.२०/- प्रत्येकी.
आवारात प्रवेश करतो त्या बाजूने पुढे गेल्यावर लांबट टेकडीच्या आग्नेय (दक्षिण-पूर्व) दिशेला १५ लेणी आहेत

टेकडीच्या मागील बाजूस म्हणजे या वायव्येस (उत्तर-पश्चिम) बाजूने चौथ्या ते पाचव्या शतकातील 4 लेणी.
या फलकावर प्रत्येक गुफेबद्दल माहिती दिली आहे.

गुगल लेन्स वापरून फलकावरील माहिती जशीच्या तशी :
मुंबई उपनगराच्या पश्चिम विभागातील अंधेरी येथील कोंडीविटे लेणी इ.स.पूर्व २ ते ६ व्या शतकात कोरल्या गेलेल्या मानवनिर्मित एकुण 19 बौद्ध लेण्यांचा समावेश असलेले दोन गट असुन १४ पाण्याच्या टाक्या व १ शिलालेखाचे संशोधन आहे. कालौघात लुप्त झालेल्या या लेणीची सर्वप्रथम नोंद १९ व्या शतकात ब्रिटिश सेक्रेटरी श्री एंथोवेन यांच्या निदर्शनाखाली १९०९ मध्ये मुंबई किल्ला (Bombay Castle ) येथे क्र. ५२२७ सर्वे नं ३ मध्ये नोंद करण्यात आली. यात १५ लेण्या पुर्वाभिमुख व ४ लेण्या पश्चिमाभिमुख आहेत येथील खडक ज्वालामुखीय जाळीदार ब्रेशिया प्रकारातील असुन सखल टेकडीवर स्थित आहे.
लेणी क्र. १ ओसरीसहीत लहान विहार आहे. लेणी क्र. २ मध्ये अर्ध उठावदार स्तुपाचे शिल्प असुन ते आता ठिसूळ अवस्थेत आहे. लेणी क्रमांक ३ हे बौद्ध भिक्खू विश्रामस्थान असुन लेणी क्र. ४ मोठी पाठशाला आहे. या लेणीच्या उजव्या बाजुला सप्तमस्तकी फणाधारी नागाचे शिल्प जे बुद्ध धम्माचे प्रमुख प्रचारक उपासक असलेल्या नाग वंशाशी संबंधित आहे. समोरच ४ फुट उंचीचे एक खंडीत स्तूपाची शिला आढळते. लेणी क्र. ५,६,७,८. लहान मोठी विहारे आहेत. लेणी क्र.९ हे मुख्य चैत्यगृह असुन आयाताकार सभागृहस्थीत बंदीस्त चैत्यशैलीत व दर्शनी भाग हा गोलाकार भिंत, मध्यभागी दार व दोन्ही बाजूस जाळीदार खिडक्या आहेत. उजव्या खिडकीच्यावर पाली प्राकृत भाषेत व धम्मलिपितील २ ओळीतील दानवर्णीत शिलालेख आहे.
सभागृहाच्या उजव्या भिंतीवर मुखभग्न तथागत गौतम बुद्धांच्या धम्मचक्कपवत्तन मुद्रेतील पद्मप्रलंबीत (आसनावर बसुन पाय कामळपुष्पावर ठेवलेले) आसनस्थ शिल्प आहे. वरील बाजुस उडते २ गंधर्व (विद्याधर) आहे. वरील चौकटित तथागत गौतम बुद्धांच्या मुखभग्न पद्मासनातील धम्मचक्कपवत्तन मुद्रास्थीत कमळावरील आसनस्थ १२ शिल्पापैकी सध्या १० शिल्पे पाहता येतात. खालच्या बाजुस सप्तमस्तकी फणधारी २ नाग वंशातील उपासकांनी कामळाच्या देठाला तोलुन धरलेत सोबत स्त्रीया व चवरीधरी सेवक आहेत. तथागत गौतम बुद्धांच्या उजव्या व डाव्या बाजुस कमळ पुष्पावर उभे असलेले पद्मपाणी बोधीसत्व व वज्रपाणी बोधीसत्व शिल्प कोरलेले आहे. लेणी क्र. १० विहार असुन उजवीकडे दुसरे सप्तमस्तकी नागाचे शिल्प पुर्ण झिजलेल्या अवस्थेत आहे. लेणी क्र. ११,१२,१४,१५ ही लहान मोठी विहारे आहेत. लेणी क्र.१२ भिक्खु निवास असुन भिक्खूच्या आरामाकरीता / झोपण्याकरीता शैलमंचक (दगडी बाक) कोरण्यात आले आहे. लेणी क्र. १३ मोठा मंडप विहार असुन ४ भव्य नक्षीदार आधारस्तंभ आहे. यात ८ लहान शुन्यागार खोल्या व शैलमंचक आहेत. पश्चिमेकडील लेणी क्र. १६ दाराजवळ विशिष्ट पाण्याची टाकी पाहता येते पावसाचे पाणी टाक्यात जमा होण्यासाठी वरुन खालपर्यंत एक लांब चरसुद्धा खोदण्यात आली आहे. ४ लेण्यापैकी २ विहारात ६ फुट ला लांबीचे भिंतीमध्ये कोरलेले शैलमंचक आहे. लेणी क्र. १७ व १८च्या ठिकाणी सर्वात मोठे पाण्याचे टाके असुन १८ च्या दर्शनी भागात अर्धउठावातील २ फुट स्तुपाची प्रतीकृती कोरण्यात आली आहे.

भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण खात्यातर्फे या लेणी गॅझेट नोटिफिकेशन क्र. २७०४-ए दिनांक २६-०५-१९०९ नुसार राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित तथा संरक्षीत केल्या आहेत.

पाली -: पश्चिकामाथे वाथवस बमणस गोतम गोतस पितुलस देयधमं विहारोस भातुकाय*
मराठी -: पथिकामा येथे राहणार्या गोतम गोत्राच्या, पितुल नावाचा बमणाने आपल्या त्याचा भावाबरोबर विहार (लेण्याचे) धम्मदान दिलेले आहे

तुटून पडलेला एक अवशेष.

एका खडकावर विसावलेल्या दोन म्हाताऱ्या.

नाग शिल्प

नऊ नंबरचे मुख्य लेणे / चैत्यगृह

अजून काही लेण्यांचे फोटो

समोरच्या बाजूच्या गुफा बघून झाल्या. खूप भूक लागली होती. प्रवेश करतानाच आतमध्ये जेवता येत का अशी विचारणा केली होती. लेणीत बसून खाऊ नका. बागेत बसून खायला काही हरकत नाही असे सांगण्यात आले आहोत. सोबत आणलेल्या गोड दशम्या, शेंगदाण्याच्या कुटाची चटणी व इतर पदार्थ असे मस्त सहभोजन झाले. पिण्याच्या पाण्यासाठी असलेले कूलर बंद पडले आहेत पण एक नळ सुरु होता त्यामुळे पाण्यासाठी अडचण आली नाही.

जेवण झाल्यावर मागील बाजूच्या गुफा पाहिल्या व लेण्यांच्या वरील टेडीवर फेरफटका मारला.

लेण्यांच्या वरून दिसणारा दोन्ही बाजूंचा नजारा

लेणी पाहून बाहेर पडलो. अगदी प्रवेश द्वाराजवळून अंधेरी (पूर्व) स्टेशनकरिता बेस्टच्या बस सुटतात. तिकीट दर रु.५/- मात्र. येथून चौघे जण परत फिरले.

आम्ही दोघेच उरलो. कोंडीविते लेणीला महाकाली नाव कसे पडले ते जाणून घेण्याची उत्सुकता होती. लेणीच्या बाहेर पडतांना येथील कर्मचाऱयांकडे चौकशी केली. त्यातील एकाने माहिती दिली. पूर्वी मागील बाजूस टेकडीवरून उतरण्यासाठी एक रस्ता होता. पायथ्याशी कालीमातेचे मंदिर आहे त्यावरून लेणीस हे नाव पडले. आता रस्ता नाही. तुम्हाला जायचे झाल्यास बाहेर पडून टेकडीला वळसा घालून गेल्यास मंदिर सापडेल. अंतर जास्त आहे त्यामुळे रिक्षा करून गेल्यास बरे पडेल.
बाहेर येऊन १०-१२ रिक्षावाल्यांकडे विचारणा केली. कोणालाही हे ठिकाण माहित नव्हते. शेवटी एक रिक्षावाला भेटला. त्यालाही मंदिर माहित नव्हते पण त्याने येण्याची तयारी दाखवली. टेकडीच्या मागे सिप्स भागातून विचारात विचारत निघालो. छोट्या रस्त्याहून जात जात एका ठिकाणी रस्ताच संपला. पुढे पायी जाण्यासाठी घरांच्या दोन रांगांमधून फरश्या बसवलेली वाट होती. मंदिर याच रांगेत शेवटी आहे असे समजले. रिक्षा तेथेच थांबवून आम्ही पायी निघालो. (लेणी पासून जवळपास ४-५ किमीचा फेरा पडला होता)

जवळ आल्यावर 'जुना महाकाली मंदिर' असा बोर्ड असलेले मंदिर मिळाले. बांधकाम अलीकडच्या काळातले वाटत होते आणि दरवाजाही बंद होता.

तेव्हड्यात कुंपणाच्या आत एक महिला दिसली. तिच्याकडून मंदिर दु.१२ ते ४ बंद असते असे कळले. तुम्ही कोण, कुठून आलात अशी विचारणा केल्यावर तिने दरवाजा उघडला. देवीची मूर्ती असलेले मंदिरही पडते टाकून बंद केलेले होते.

त्या हिंदी भाषिक बाईशी अजून थोड्या गप्पा झाल्या. सुमारे १५० वर्षांपूर्वी त्यांच्या कुर्ला येथील पूर्वजांच्या स्वप्नात दैवी आली होती व या टेकडीच्या पायथ्याशी माझा शोध घ्या असे तिने सांगितले होते. त्यानुसार शोध घेतला असता ही स्वयंभू मूर्ती सापडून तिची स्थापना केल्या गेली होती. आता त्यांची पाचवी पिढी देवीची सेवा करीत आहे असे कळले. देवीच्या नावावरूनच मरोळ व आजूबाजूचा भाग महाकालीच्या नावाने ओळखला जाऊ लागला.
नंतर तिने मंदिराचे पडदे बाजूला सारले, दिवे लावले व आम्हास देवीचे दर्शन घडविले.

जाणत्या लोकांनी हेच ते जुने महाकाली मंदिर आहे का यावर जरूर प्रकाश टाकावा .
(सध्या महाकाली केव्ह्स रोडला कुठेतरी एक नवीन महाकाली मंदिरही झाल्याचे कळते.)
थोडा वेळ थांबून आम्हीही परतीच्या प्रवासास सुरुवात केली. 

 जोगेश्वरी लेणीच्या माहितीबद्दलचा हा एक फोटो

 https://www.misalpav.com/node/51278

लकुलीश : (इ.स.सु. २००). शिवाच्या अठरा अवतारांपैकी लकुलीश हा पहिला अवतार मानला जातो. त्याला ‘नकुलीश’ असेही म्हणतात. गुजरातमधील ‘कायारोहण’ (सध्याचे कारवान) क्षेत्रात हा अवतार होऊन गेला. स्मशानातील मृत शरीरात भगवान शिवाने प्रवेश केला व मृतदेह सजीव झाला. त्याने हातात दंड/काठी/लाकूड(लकुल) धारण केले म्हणून तो लकुलीश या नावाने प्रसिद्ध झाला.

भारतातील पाशुपत पंथाचा लकुलीश अध्वर्यू असून त्याने या पंथाचे तत्त्वज्ञान सुसूत्रपणे मांडले व त्याला दार्शनिक रूप दिले. कलियुगात त्याने शैव मताचा जोरदार प्रचार केला. त्याने सांगितलेल्या या दर्शनाला लकुलीशदर्शन/पाशुपतदर्शन किंवा लकुलीशागम/लकुलागम अशी संज्ञा मिळाली.

लकुलीशाचे कुशिक, गर्ग, मित्र, कौरुष्य हे चार शिष्य होते. सुरुवातीला या पंथाचा प्रसार गुजरात व राजस्थान राज्यांमध्ये झाला. लकुलीशरचित पाशुपतसूत्र हा पाशुपत पंथाचा मूळ ग्रंथ असून त्यावरील पंचार्थीभाष्य हे कौंडिण्य याने रचले आहे (इ.स. चौथे ते सहावे शतक). पंचार्थीभाष्य हे राशीकरभाष्य वा कौण्डिन्यभाष्य म्हणूनही ओळखले जाते. भारतातील अठ्ठावीस प्रसिद्ध योगाचार्यांपैकी लकुलीश हा शेवटचा आचार्य होय.

मूर्ती : लकुलीशाच्या मूर्ती भारतभर, विशेषत: कुमाऊँ प्रदेशात आढळतात. नग्न व ऊर्ध्वमेढ्र (उत्थितलिंग) अशा स्वरूपात त्या आढळतात. मूर्ती तयार करण्यासाठी खालील सूत्र दिले आहे :

न(ल)कुलीशं ऊर्ध्वमेढ्रं पद्मासनमुपस्थितम्|

दक्षिणे मातुलिङ्ग च वामे दण्ड: प्रकीर्तित:|| (विश्वकर्मावतार वास्तुशास्त्र)

अर्थ : लकुलीश पद्मासनात बसलेला व जननेंद्रिय उत्थित असा करावा. उजव्या हातात महाळुंग व डाव्या हातात दंड असावा.

हातातील सोटा हे लकुलीशाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. मूर्ती नग्न असल्यामुळे ऊर्ध्वमेढ्र ठळकपणे दिसून येते. गुडघ्याभोवती पट्टबंध असेल, तर ती ध्यानस्थ लकुलीशाची मूर्ती समजावी. ब्रह्मांडपुराणात ऊर्ध्वमेढ्र दाखविण्यामागील एक कथा आढळून येते, ती अशी : ब्रह्मदेवाने रुद्राला प्रजोत्पादनाची आज्ञा दिली. तेव्हा तो ऊर्ध्वलिंगी झाला, पण ब्रह्मदेवाला मरणधर्मी प्रजा हवी होती. ती उत्पन्न करण्यास रुद्राने नकार दिला व तेव्हापासून तो ऊर्ध्वलिंगीच राहिला.

मूर्तीची वैशिष्ट्ये : सोबतच्या छायाचित्रातील मूर्तीतील लकुलीशाचे केस कुरळे, कानाच्या पाळ्या लांब व त्यात रुद्राक्ष धारण केलेले दिसतात. डोळे काचेसारखे असून डाव्या खांद्यावरून उजव्या नितंबापर्यंत वस्त्राची किनार (यज्ञोपवीत) दिसून येते. कर्नाटक येथील संगमेश्वर मंदिर हे इ.स. सातव्या शतकातील चालुक्य राजवटीतील असून तेथील लकुलीशाची मूर्ती सॅण्डस्टोन प्रकारच्या दगडातील आहे.

लकुलीशाच्या प्राचीन मूर्तींपैकी एक इ.स. चौथ्या शतकातील गुप्तकालीन शिलालेखाच्या वर चौरसात कोरलेली आहे. मथुरा येथील पुराणवस्तुसंग्रहालयात एक मूर्ती ठेवलेली आहे. आणखी एक मूर्ती प्रभासपट्टण येथील सिद्धनाथ मंदिराच्या आवारात आढळते. द्वितीय चंद्रगुप्ताने उभारलेल्या स्तंभलेखात ‘गुरुवायतन’चा उल्लेख आढळतो. या गुरुवायतनाची स्थापना उदिताचार्याने केली, असाही उल्लेख त्यात आहे. हा उदिताचार्य कौशिकापासूनचा दहावा शिष्य आहे, असा उल्लेख लिंगपुराणात सापडतो.

इसवी सन अकराव्या शतकाच्या सुमारास लकुलीश पंथाचा प्रसार दक्षिणेकडे झाला. एलिफंटा गुहांमध्ये सुद्धा लकुलीशाची मूर्ती आढळते. भुवनेश्वर येथील लक्ष्मणेश्वर मंदिरसमूहामध्ये सुद्धा ‘शत्रुघ्नेश्वर’ या नावाने लकुलीशमूर्ती आढळते.

लकुलीशाचे पाशुपतसूत्र भेदाभेद-तत्त्व मानते. पशु म्हणजे सजीव आणि पती म्हणजे महेश्वर किंवा शिव. या पंथात शिव ही सर्वोच्च शक्ती मानली आहे. कुठल्याही साधनाशिवाय त्याने विश्वनिर्मिती केली म्हणून तो स्वतंत्र कर्ता आहे. तोच सर्व कार्यांचे कारण आहे. मात्र काही विद्वानांच्या मते लकुलीश पंथ पूर्वीपासूनच प्रसिद्ध होता. लकुलीश या पंथाचा पहिला गुरू होता. डॉ. भांडारकर यांनी लकुलीश पंथाचे पाशुपत पंथाशी साधर्म्य दाखविले आहे.

प्रसार : लकुलीशाच्या चार शिष्यांनी भारतभर हिंडून लकुलीश पंथाचा प्रसार केला. कुशिकाने उत्तर दिशेला प्रसार केला. त्याचा दहावा शिष्य उदिताचार्य याने उपमितेश्वर व कपिलेश्वर या दोन शिवलिंगांची स्थापना केली. गर्ग या शिष्याने गुजरातमध्ये या पंथाचा प्रसार केला. अनहिलपट्टण येथे सोळंकी राजवटीत जे मठ आणि देवळे निर्माण झाली त्यांचे निर्माते गर्गशाखेचेच होते.

लकुलीशाच्या जन्मानंतरचा जवळपास नऊ शतकांचा इतिहास स्पष्टपणे उपलब्ध नाही. इ.स. अकराव्या शतकातील सोळंकी राजवटीपासून या पंथाचा उल्लेख किंवा इतिहास पुन्हा उपलब्ध होतो. या पंथाला दिलेली चालुक्य राजांची दानपत्रेसुद्धा उपलब्ध आहेत. सौराष्ट्रामधील लकुलीश पंथाच्या अस्तित्वाचा पुरावा कुमारपालाच्या राजवटीतील एका शिलालेखात सापडतो (इ.स. १३०३).

म्हैसूर राज्यातील बेलगामी येथे लकुलीश पंथाचे महत्त्वाचे केंद्र होते. संगमेश्वर येथील शिलालेखात (इ.स. ११४७) विजापूर येथील काश्मीरमुनीच्या वंशावळीतील शेवटचा लकुलीश हा शिवतत्त्वज्ञ झाला, असा उल्लेख सापडतो. लकुलीशाला भक्तांमध्ये ‘शिरोरत्न’ व लकुलागम या अमृतसागरातील चंद्र असे म्हटले आहे. दक्षिण भारतात या पंथाच्या जुनी व नवी अशा दोन शाखा होत्या, असे म्हैसूर राज्यातील गोळकेरी येथील शिलालेखावरून दिसते.

संदर्भ :

  • ‘श्रीमाधवाचार्य’ कंगले, र. पं. सर्वदर्शनसंग्रह, मुंबई, १९८५.
  • https://www.wisdomlib.org/hinduism/book/a-history-of-indian-philosophy-vol5/d/doc210070.html

 

शिव आणि पार्वती या दैवी जोडप्याचा विवाहप्रसंग ‘कल्याणसुंदर’ या नावाने शिल्पांकित केला गेला आहे. विवाहप्रसंगाची लगबग, पाहुण्यांची गर्दी, सलज्ज वधूवर आणि विधींचे तपशील या सर्व घटकांची रेलचेल दर्शविणारे कल्याणसुंदर शिल्पपट भारतात सर्वत्र आढळून येतात.

कल्याणसुंदर मूर्ती, रतनपुरा (जि. बिलासपूर, छत्तीसगढ).

दक्ष प्रजापतीने एक यज्ञ केला आणि त्यासाठी सर्व देवदेवतांना निमंत्रण दिले. मात्र स्वतःची मुलगी सती आणि जावई शिव यांना कटाक्षाने वगळले. पित्याच्या या कृतीमुळे अपमानित झालेल्या सतीने त्याच यज्ञकुंडात स्वतःची आहुती देऊन प्राणत्याग केला. पुढे तिने हिमालयाच्या पोटी पार्वती म्हणून जन्म घेतला. याही जन्मात शिवच आपल्याला पती म्हणून लाभावा यासाठी तिने घनघोर तप सुरू केले. त्यावेळी शंकरही तपश्चर्येत मग्न होते. इकडे, तारकासुर नावाचा दैत्य देवादिकांना त्रास देत होता. विधिलिखिताप्रमाणे त्याचे पारिपत्य शंकराच्या पुत्राच्या हातून व्हावयाचे होते. त्यासाठी शंकराने लवकर विवाह करावा म्हणून देवांनी मदनाला त्याची तपश्चर्या भंग करण्यास पाठवले. हे लक्षात आल्यावर क्रोधित झालेल्या शिवशंकरांनी आपला तिसरा डोळा उघडून मदनाला भस्म केले. मात्र नंतर सर्व देवतांच्या इच्छेचा मान राखून त्यांनी पार्वतीशी विवाह केला. या कथेवर आधारित दोन प्रकारच्या प्रतिमा अस्तित्वात आल्या; पहिली कामांतक/मदनांतक शिव आणि दुसरी कल्याणसुंदर.

अंशुमद्भेदागम, पूर्वकारणागम, उत्तरकारणागम इत्यादी आगमग्रंथांमध्ये कल्याणसुंदर मूर्तीचे वर्णन तपशीलवार केलेले आढळते. त्यानुसार या विवाहप्रसंगाच्या चित्रणात वरवधू शिव आणि पार्वती हे पूर्वेस तोंड करून मध्यवर्ती असावेत. चंद्रशेखर शिव हा त्रिभंगावस्थेत एक पाय जमिनीवर व दुसरा पाय किंचित उचललेला, अशा स्थितीत उभा असावा. त्याच्या मागील दोन्ही हातांत परशू आणि मृग असावेत, तर पुढच्या दोन हातांपैकी डावा हात वरदमुद्रेत व उजवा हात वधूच्या हातात असावा. त्याच्या कानात वासुकी सर्पाची कुंडले, पुष्कर सर्पाचा हार, तक्षकाचा उदरबंध व जटामुकुटादी आभूषणे असावीत. शिवाची प्रतिमा चतुर्भुज, त्रिनेत्र आणि रक्तवर्णीय असावी; अपवादात्मक परिस्थितीत तो द्विभुज असतो. शिवाच्या डावीकडे (कधी उजवीकडे) उभी असलेली पार्वती सावळ्या वर्णाची, सलज्ज असून आपला उजवा हात तिने पाणिग्रहणासाठी शिवापुढे लांबविलेला असावा. तिची उंची शिवाच्या छाती, खांदा किंवा हनुवटीइतकी असावी. ती द्विभुज असून रेशमी वस्त्रे आणि यथायोग्य अलंकारांनी नटलेली असावी. ब्रह्मा आणि विष्णू हे अनुक्रमे पुरोहित व वधुपित्याच्या भूमिकेत असावेत. विष्णूच्या हाती उदकपात्र असून तो कन्यादान करत असावा. चतुर्मुख व चतुर्भुज ब्रह्मा हा खाली यज्ञकुंडाजवळ बसून होम व इतर विधी पार पाडत असावा. क्वचित एखाद्या ठिकाणी तो अग्नीजवळ नसून दूर, कमंडलू घेऊन उभा असल्याचे पाहावयास मिळते. विष्णूच्या दोन्ही पत्नी लक्ष्मी आणि भूदेवी पार्वतीच्या मागे, तिला विवाहवेदीकडे आणण्याच्या आविर्भावात असावयास हव्यात. पार्श्वभूमीवर विविध देवतांचे अंकन असावे, त्यात अष्टदिक्पाल, विद्याधर, सिद्ध, यक्ष, गंधर्व, ऋषी, मातृका आणि इतर देवदेवतांचा समावेश असावा. काही ठिकाणी शिव-पार्वतीचा विवाह पर्वताच्या आत म्हणजेच पार्वतीचा पिता हिमालयाच्या घरी होत आहे, असे दर्शविलेले आढळते.

कल्याणसुंदर प्रतिमा सहसा इ. स. सातव्या शतकानंतर विकसित झालेल्या आढळून येतात. त्यांपैकी सर्वांत भव्य आणि कलात्मक आविष्कार म्हणून मुंबई येथील घारापुरी (एलिफंटा) बेटावरील लेण्यातील प्रतिमेकडे बोट दाखवता येईल. यात शिव आणि पार्वती मध्यवर्ती ठिकाणी उभे असून पार्वती शिवाच्या उजव्या बाजूस आहे. चतुर्भुज शिवाचा पुढचा उजवा हात पार्वतीच्या उजव्या हातात आहे. पार्वतीची देहयष्टी अतिशय आकर्षक असून तिची अधोवदन मुद्रा सलज्ज आहे. तिच्या एका बाजूस पिता हिमालय व दुसऱ्या बाजूस लक्ष्मी आणि तिच्या मागे हाती उदकपात्र घेऊन विष्णू उपस्थित आहेत. ब्रह्मा होमाशेजारी बसून पौरोहित्य करत आहे. या मंगलप्रसंगासाठी अंतराळात अष्टदिक्पाल व इतर देवदेवतांनी गर्दी केलेली दिसते. वेरूळच्या धुमार लेण्यातील (लेणे क्र. २९) शिल्पपटाशी घारापुरी येथील शिल्पाचे लक्षणीय साम्य आहे, मात्र कलादृष्ट्या घारापुरीचे शिल्प अधिक उजवे आहे.

कल्याणसुंदर शिव, वेरूळ लेणे क्र. २९, (जि. औरंगाबाद, महाराष्ट्र).

वेरूळच्या रामेश्वर लेण्यात (लेणे क्र. २१) उत्तर भिंतीवर भव्य कल्याणसुंदर शिल्पपट आहे. तो तीन भागांत विभागलेला आहे. सर्वांत डावीकडे पार्वती पंचाग्नीसाधना (चारही दिशांना अग्नी व माथ्यावर तळपता सूर्य यांच्या दाहक तेजामध्ये उभे राहून तप करणे) करताना दिसते. तिच्या एका हातात अक्षमाला असून दुसरा हात सैल सोडलेला आहे. तिच्याजवळ एक याचक अन्नाची याचना करताना दिसतो. वराहपुराणातील कथेनुसार प्रत्यक्ष शंकर तिची परीक्षा पाहण्यासाठी याचकाचे रूप घेऊन आले. पार्वतीने अन्नदान करण्यापूर्वी त्यास स्नान करून येण्यास सांगितले, तेव्हा नदीत एका मगरीने त्याचा पाय धरला; याचकाच्या हाका ऐकून पार्वती तेथे गेली असता तिच्या लक्षात आले की, मगरीच्या तोंडातून सोडविण्यासाठी त्याचा हात धरून वर ओढणे आवश्यक होते. उजवा हात शंकरासाठी राखून ठेवलेला असल्यामुळे तिने आपला डावा हात देऊन याचकाला बाहेर यायला मदत केली व त्याचा जीव वाचविला. या भक्तीमुळे शंकर प्रसन्न झाले व त्यांनी आपले खरे स्वरूप प्रकट केले. हा सारा कथाभाग या शिल्पात चित्रित केलेला आहे. उजवीकडच्या शिल्पात ब्रह्मा, बृहस्पती व पार्वतीपिता हिमालय विवाहप्रस्तावासंबंधी चर्चा करीत आहेत. एका बाजूला पार्वतीही उभी दिसते. मध्यवर्ती शिल्पात प्रत्यक्ष विवाहाचे अंकन दिसते. पार्वती शिवाच्या उजवीकडे उभी असून तिचा उजवा हात शिवाच्या उजव्या हातात आहे. विष्णूच्या हाती उदकपात्र असून तो कन्यादानाच्या पावित्र्यात आहे. ब्रह्मा व इतर ऋषीमुनी उजव्या कोपऱ्यात खाली बसून होमादी विधी करत आहेत. सोहळ्यास उपस्थित असलेले इतर देवदेवता आजूबाजूला दिसतात, तर खालच्या सलग पट्टिकेत शिवगण वाद्ये वाजवत, नाचत आहेत. अशीच काही भावस्पर्शी शिल्पे वेरूळ येथील दशावतार लेणे (क्र. १५) आणि कैलास (लेणे क्र. १६) मध्येसुद्धा पाहायला मिळतात. कैलासमधील मंदिरासभोवतीच्या व्हरांड्यात असलेले शिल्प खूप बोलके आहे. या लग्नासाठी पार्वतीचा पुढाकार असल्यामुळे तिने शिवाचा हात हातात घेतला आहे, असे दिसते. तसेच ती विवाहप्रसंगी सलज्जा असल्यामुळे अंगठ्याने जमीन खरवडताना दाखवली आहे.

झाशीच्या राणीमहाल येथील संग्रहात एक मिश्र प्रतिमा आहे. येथे कल्याणसुंदर आणि उमामहेश्वर हे दोन्ही प्रकार एकाच मूर्तीत दाखविले आहेत. शिव आणि पार्वती एका हाताने पाणिग्रहण करीत असतानाच दुसऱ्या हाताने एकमेकांना आलिंगन देत आहेत. शंकर चतुर्भुज असून त्याच्या मागच्या दोन्ही हातांत त्रिशूळ व सर्प आहेत, तर पुढील हातांपैकी उजवा हात पाणिग्रहण व डावा हात पार्वतीस स्तनस्पर्श करीत आहे. खाली होमाजवळ ब्रह्मदेव विधी पार पाडत आहे. वधूवरांच्या दोन्ही बाजूंस प्रत्येकी आठ घटांच्या उतरंडी ठेवलेल्या असून सर्वांत वरच्या घटांवर कळस आहेत. तमिळनाडूतील तिरुवोट्टियुर येथे कांस्याची एक सुरेख चोलकालीन प्रतिमा आहे. त्यात शिव आणि पार्वती हे वेगवेगळ्या पद्मपीठांवर उभे असून शिवाची प्रतिमा त्रिनेत्री व चतुर्भुज आहे. त्याच्या मागच्या उजव्या हातात परशू व डाव्या हातात मृग असून पुढचा डावा हात अभयमुद्रेत आहे. त्याने आपल्या पुढच्या उजव्या हाताने पार्वतीचा उजवा हात धरला आहे. शिव द्विभंगावस्थेत उभा असून त्याने जटामुकुट, यज्ञोपवीत, हार, कटिबंध ही आभूषणे धारण केली आहेत; तर पार्वतीची द्विभुज प्रतिमा सलज्ज व काहीशी अधोवदन आहे. तिच्या मस्तकावर करंडमुकुट असून ती इतर अनेक अलंकार ल्याली आहे. ही कलात्मक प्रतिमा अकराव्या शतकातील आहे.

या व्यतिरिक्त रतनपुरा (जि. बिलासपूर, छत्तीसगढ), गया (बिहार), औंढा नागनाथ (जि. हिंगोली, महाराष्ट्र), सुंदरेश्वर मंदिर (मदुरा, तमिळनाडू) येथे काही उल्लेखनीय कल्याणसुंदर प्रतिमा आढळतात.

संदर्भ :

  • Rao, T.  A. G., Elements of Hindu Iconography, Vol., II, Part I, Motilal Banarasidas Publishers Pvt. Ltd., Delhi, 1997.
  • खरे, ग. ह., मूर्तिविज्ञान, भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे, २०१२.
  • जोशी, नी. पु., भारतीय मूर्तिशास्त्र, प्रसाद प्रकाशन, पुणे, २०१३.
  • देगलूरकर, गो. बं., शिवमूर्तये नम.., स्नेहल प्रकाशन, पुणे, २०१४.

                                                                                                                                                                          समीक्षक : मंजिरी भालेराव

 

 

 

 

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...