मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात गंगाखेड तालुक्यात दैठणच्या पुढे १ कि.मी.वर उजव्या हाताला एक फाटा लागतो तिथून ७ कि.मी.वर धारासुर हे ऐतीहासीक गाव आहे. गंगाखेड परभणी रोडवर रोड पासून आत ५ ते ६ किलोमीटर अंतरावर हे धारासुरचे गुप्तेश्वर मंदिर आहे. परभणीपासून ३५ कि.मी.वर असलेले धारासूर हे गाव तसे सामान्य गावासारखेच आणि तितकेच दुर्लक्षित! पण गोदावरीसारख्या जीवनदायिनी नदीचे सान्निध्य साध्या गावाची महती अनेक पटींनी वाढवली आहे. नदीच्या तटातटाने तीर्थ संकल्पना उदयास येताना दिसते व मानवी वस्ती नदीकाठाने वाढू लागते. अशाच एक ४०-५० फूट नदीच्या तीरावर आणि प्राचीन पांढरीच्या टेकडीवर आजचे आपले गुप्तेश्वर मंदिर वसले आहे! या धारासूर गावाचा धारासूर कोण होता, मंदिर कोणी बांधले किंवा गुप्तेश्वर नाव कसे पडले याचे फारसे संदर्भ आपल्याला मिळत नाहीत; पण मंदिर बांधणीच्या शैलीवरून काळासंदर्भात काही आडाखे बांधू शकतो.ग्रामनाम धारण करणारे धारेश्वर नंदीसह गोदावरीच्या पात्रात आहेत. कधीकाळी गोदेच्या धारेत संततस्नान करणारे धारेश्वर आता धार आटल्याने वाळवंटात बसले आहेत. उत्तर चालुक्यकालीन म्हणजे साधारण ११ व्या शतकाच्या अखेरीचे हे दगड आणि विटांनीयुक्त देखणे स्थापत्य असावे.
गावात कदम आणि जाधव आडनावाची लोक असुन गावात मराठा कालखंडातील भव्य वाडे तसेच गावाभोवती वेस आहे. धारासुर हे गाव गोदावरी नदीच्या काठावर वसले असुन स्थानिकांच्या सांगण्यानुसार नदीच्या मध्य भागात म्हणजेच धारेमधे महादेवाची पिंड व नंदी असल्यामुळे या गावाचे नाव धारेश्वर व त्याचा अपभ्रंश होऊन धारासुर असे झाले आहे.
मंदिराच्या जवळुन दिसणारे गोदावरी नदीचे विशाल पात्र
गावामध्ये चालुक्यकालीन प्राचीन व सुंदर शिल्प कलाकृतीनी सजलेले गुप्तेश्वर हे शिवमंदीर तसेच पेशवेकालीन केशवराज मंदिर आहे. गुप्तेश्वर मंदिर हे चालुक्यकालीन असून मुळ मंदिराच्या दगडी बांधकामावर नंतरच्या काळात विटांचा कळस बांधण्यात आला आहे. गुप्तेश्वर मंदिर पूर्वभिमुख असुन मंदिराच्या पश्चिमेकडून गोदावरी नदी वाहते.
मंदिराची दक्षिणेकडील बाजू
मंदिराची उत्तरेकडील बाजू
मंदिर नदीच्या काठावर असल्याने जवळपास १० फूट उंच अधिष्ठानावर उभे आहे. नदीच्या पुराने मंदिराला क्षती पोहोचवू नये म्हणून स्थापत्यकाराने काळजी घेतलेली दिसत होती. जमिनीपासून साधारण 10 फूट उंचीवर मंदिराचा मूलाधार बांधलेला दिसत होता. जमिनीपासून चार बिट्टीचे थर, त्यानंतर पद्मथर, गजथर व कपोताली असे शिल्पथर संपल्यावर आदिष्ठान आहे. मग पद्मस्तर, कणीस्तर, महापट्टा, कुंभस्तर, कुमुदस्तर यानंतर मंडोवर.धारासुर येथील मंदीराचा भाग दगडी असून शिखर मात्र वीटांनी बांधलेले भुमिज पध्दतीचे आहे. मंदिर पुर्वाभिमुख असुन मुखमंडप, मंडप, दोन अर्धमंडप, अंतराळ व गर्भग्रुह असा मंदिराचा तलविन्यास आहे. मंदिराला पिठावरून प्रदक्षिणा मारण्यासाठी मार्ग आहे. मंदिराच्या भिंती काळ्या पाषाणात बांधलेल्या असुन मंदिराचे शिखर महाराष्ट्रात नेहमी आढळणा-या भूमिज या शैलीचे आहे. काही अभ्यासकांच्या मते मंदीराचा तलविन्यास आणि शिल्पशैली यावरुन हे मंदीर तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात बांधले असावे.
मंदिराचा दर्शनी भाग, मुखमंडप, दक्षिणेकडील अर्धमंडप व कक्षासनाची बाहेरुन अप्रतिम कोरीवकाम असलेली भिंत
मंदिर असलेल्या पीठावर जाण्यासाठी पूर्व, दक्षिण व उत्तर दिशेने पायर्या आहेत. उत्तर दिशेच्या पायर्या धोकादायक झालेल्या आहेत. (आता उत्तरेकडचा भाग ढासळला आहे.) पायर्यांच्या सुरुवातीलाच दोन्ही बाजूला देवकोष्ठे आहेत, पण रिकामी. पायर्या चढून पीठावर पोहोचलो की, मंदिराभोवती रुंदसा प्रदक्षिणा मार्ग आहे. तीन बाजूंनी उतरत्या छपराचा सभामंडप आहे. सभामंडपाच्या उपपीठावरच्या गजथरात विविध मुद्रेतील हत्ती लक्ष वेधून घेतात. पूर्वेकडे कक्षासनयुक्त मुखमंडप आहे. उत्तर व दक्षिण बाजूस वामनस्तंभांवर तोललेले अर्धमंडप आहेत. बाहेरील बाजूस जाळीयुक्त नक्षीकाम आहे. खाली अर्धस्तंभावर सूरसुंदरी व अन्य मानवी देहधारी आहेत. मंदिराच्या उत्तर आणि दक्षिण बाजूस अर्धमंडप आणी कक्षासने असुन उत्तर बाजुचा मंडप पूर्णपणे कोसळलेला आहे व त्याचे कोरीव दगड सर्वत्र विखुरलेले आहेत. (उत्तरेकडचा अर्धमंडप पूर्णतः ढासळल्याचे धारासूरचे ग्रामस्थ निवृत्ती विठ्ठलराव कदम यांनी सांगितले.) अर्धमंडपातून मुख्य सभामंडपात येता येते. या चौकोनी सभामंडपात रंगशिळा होती. (सध्या फरशी बसवण्यात आल्याने रंगशिळा दिसत नाही.) मंदिराचे वितान (छत) नवरंगी स्वरूपाचे आहे. म्हणजे छताला वेगवेगळे नऊ चौकोन करण्यात आलेले आहेत. सभामंडपाची जालवातायने हे मुख्य वैशिष्ट्य सांगता येतील. नाजूक शंकरपाळ्याच्या आकारात एकसंध कोरलेल्या या खिडक्या हवा खेळती ठेवतात व प्रकाशही पुरवतात; त्याचवेळी पुरेसा आडोसाही देतात. सभामंडपातील दोन देवकोष्टे रिकामी आहेत.मंदिराच्या मुखमंडप व अर्धमंडपात कक्षासने आहेत. या कक्षासनाच्या भिंतींवर बाहेरुन अप्रतिम कोरीवकाम आहे.
मंदिराच्या कक्षासनाची बाहेरुन अप्रतिम कोरीवकाम असलेली भिंत
अंतराळाच्या सुरवातीस दगडी नक्षीकाम असलेली जाळी आणि द्वारशाखा युक्त दरवाजा आहे. ललाटबिंबावर गणेश आहे मात्र त्याला शेंदूर फासल्याने त्याच्या हातातील आयुधे नक्की समजत नाहीत.अंतराळात प्रवेश केल्यावर मुख्य गर्भगृहाच्या द्वारशाखेवर पात्र,गंधर्व, स्तंभ,व्याल, स्वल्प अशा पाच शाखा दिसून येतात. दरवाजावरील द्वारपाल वैष्णव म्हणजेच जयविजय असुन गंगायमुनासह चामरधारिणी कोरल्या आहेत. अंतराळातील देवकोष्टात गणेशाचे व विष्णूंचे शिल्प आहे. गर्भगृहाला पात्र, गंधर्व, स्तंभ, व्याल, स्वल्प असे पंचशाखद्वार आहे. पाचही खांबांवरील कोरीव काम लक्षवेधक आहे. ललाटबिंबावर श्रीगणेश विराजमान आहेत. या पंचस्तंभांपैकी उजव्या-डाव्या रूपस्तंभावर वैष्णव द्वारपाल आहेत. गंगा-यमुनेसह चामरधारिणीदेखील कोरलेल्या आहेत. वर कीर्तिमुख आहे. गर्भगृह पंचरथ प्रकारचे चौकोनी आहे. आत महादेवांची पिंडी, त्यावर मुखवटा चढवलेला आहे. अंतराळात पितळेचा नंदी आहे.
मंदिराचे पक्क्या विटांनी बांधलेले शिखर
या मंदिराचे शिखर पंचभूम पद्धतीचे आहे. म्हणजे पाच थरात बांधलेले भूमिज प्रकारचे घडीव विटांचे हे शिखर आहे. आतून पोकळ असल्याने या शिखराचा भार मंदिरावर कमी येतो. अशा प्रकारचे अजूनही टिकून असलेले हे महाराष्ट्रातील तरी एकमेव शिखर आहे. अंतराळावरील शुकनास डौलात भर घालणारा. (कळसाचा उत्तरेकडील भाग निसर्गहत झालेला आहे.) अभिषेकतीर्थ वाहून नेणारी वरुणवाहन मकरप्रणाल नक्षीदार आहे.
मंदिराच्या बाह्यभिंतीवरील पत्रलेखिकेची प्रतिमा
मंदिराचे गर्भगृह चौकोनी असून पंचरथ प्रकारचे आहे. मंदीराच्या बाह्यांगावर शिल्पे आहेत. गर्भगृहावरील शिखर आतून पोकळ आहे. शुकनासेच्या पातळीवर एकच मजला आहे.मात्र आज शुकनासेचा फारच थोडा भाग शिल्लक आहे.इतरत्र न टिकलेले घडीव विटांचे मूळ शिखर व अंतराळावरील शुकनास, मंदिराच्या एकूण डौलात भर घालताना दिसते. शिखर भूमीज प्रकारचे असून, पाच थरांमध्ये बांधले आहे व मंदिराचा भार कमी करण्यासाठी आतून पोकळ ठेवले आहे. मुख्य सभामंडपात आज नवीन फरशी बसवल्याने मूळ रंगशिलेचे अवशेष दिसत नाही. अर्धमंडपाच्या आणि मूळ गर्भगृहाच्या द्वारशाखांवर वैष्णव द्वारपाल कोरले आहेत व ललाट बिंबावर गणेश प्रतिमा आहेत.
मंदिरातला चालुक्य शैलीचा खांब
गर्भालय व अंतराळाच्या बाह्यांगावरील देवकोष्टात विष्णूच्या पंचब्रह्म संकल्पनेतील श्रीधर, त्रिविक्रम (वामन), हृषीकेश, पद्मनाभ व दामोदर ही पाच शिल्पे संध्यावंदनेतील क्रमानुसार पाहायला मिळतात. मदन, नृत्यगणेश व चामुण्डा यांचे एकेक शिल्पही अंकित केले आहे. नृत्य गणेशाचे सुंदर शिल्प सध्या सेंदूरमार्जित दिसते. खरे तर तंत्रसाधनेतील गणेशालाच शेंदूर लावतात, परंतु इथे नृत्यमग्न गणेशाला शेंदूर फासला गेला आहे. मंदिराच्या बाह्य भिंती वरील देवकोष्ठतील बैठ्या विष्णूची सुंदर प्रतिमा आहे. असीच एक विष्णू मुर्ती रस्त्याच्या कडेला भंगलेल्या अवस्थेत ठेवलेली आहे.
मंदिराच्या बाह्यभिंतीवरील देवकोष्ठतील बैठ्या विष्णूची प्रतिमा
तीन बाजूच्या देवकोष्ठात अनुक्रमे विष्णूच्या उपेंद्र, ऋषिकेश व त्रिविक्रम मूर्ती आहेत. तसेच, गर्भगृह व अंतराळाच्या बाह्यभिंतींवर ऋषिकेश, मदन, गणेश, चामुंडा ही देवताशिल्पे अंकित आहेत. विष्णूच्या चतुर्विन्शती मूर्तीपैकी (२४ विभव /प्रकार), समाजातील विविध जातींनी विशिष्ट मूर्ती पूजणे अपेक्षित आहे. या मंदिरातील, ऋषिकेशाची मूर्ती ही चांभार, परिट, नर्तक, शिकारी आणि मेड भिल्ल समाजांना वरदायी आहे, तर त्रिविक्रम मूर्ती वैश्य समाजाला वरदायी आहे, अशी सूचना शास्त्र ग्रंथातून मिळते. एकूण स्थापत्य व शिल्पांच्या शैलीवरून हे मंदिर कल्याणी चालुक्य व सुरुवातीच्या यादव काळाच्या सीमेवर साधारण १२ व्या शतकात बांधले असावे.
मंदिराच्या बाह्यभिंतीवरील मदनाची प्रतिमा
मंदिराच्या बाह्यभिंतीवरील अजुन एक विष्णु प्रतिमा
मंदिराच्या जंघा भागात उत्कृष्ट कोरीव काम केलेल्या अप्सरा, गणेश, सुरसुंदरी यांच्या मूर्ती आहेत. मंदिराबाहेरील उत्तर दक्षिण आणि पश्चिम भिंतींवरील देवकोष्ठात श्रीधर, ऋषिकेश, पदमनाभ स्वरूपातील विष्णुमूर्ती आहेत. मूर्तींच्या केशरचना, शरीरसौष्ठव ,अलंकार , भावमुद्रा ,लयबद्धता याबाबत शिल्पकाराने त्याचे पुर्ण कसब पणाला लावले आहे. प्रदक्षिणा पथावर मंडोवरावरील विविध सूरसुंदरी आपल्याला मराठवाड्यात चालत आलेल्या कल्याणी चालुक्यांच्या कला प्रभावाची आठवण करून देतात.
मंदिराच्या मंडोवरावर २८ सूरसुंदरी आहेत. मंदिराच्या बाह्यभिंतीवर अनेक सुरसुंदरींची अप्रतिम शिल्पे आहेत. यात मर्दला आहेत. मृदंग वादक, तंतुवादक, वीणाधारी, बासरीवादक अशा या मर्दला आहेत. तसेच प्रमुख्याने पत्रलेखिका, पुत्रवल्लभा, दर्पणा, कर्पुरमंजिरी, तिलोत्तमा, मर्दला अश्या विविध सुरसुंदरी आहेत. यांच्या बरोबरच मंदिराच्या बाह्य भिंतीवर मदन, चामुंडा, गणपती अशा काही देवताही आहेत.पत्रलेखिका, पुत्रवल्लभा, खंजिर धारण करणारी, विंचू आणि सर्प हातात खेळवणारी, चौरीधारिणी, मर्दला, शत्रूमर्दिनी, डालमालिनी, चंद्रवकत्रा, मुंगूस आणि नाग खेळवणारी, सर्प ल्यायलेली विषकन्या, दर्पणा, नर्तकी, वीणावादक, अप्सरा व मर्कट, आळता काढणारी, कर्पूरमंजिरी अशा उत्कृष्ट बांधीव सूरसुंदरी, मंदिराचे सौंदर्य अनेक पटींनी वाढवतात.
मंदिराबाहेरील दक्षिण भिंतीवर पत्र लिहिणारी प्रेमिका असून तत्कालीन समाजात स्त्री शिक्षण असल्याचा हा पुरावा आहे. मंदिराच्या बाह्य भागावर एक गाऊनसारखे विदेशी वस्त्र घातलेल्या सुरसुंदरीच्या शिल्पात काखेत कागदाची भेंडोळी दर्शविलेली असून एक हात उंचावलेला आणि पंजा अभय मुद्रेसारखा उघडलेला दाखवला आहे. एका शिल्पात स्त्रीची प्रसुती दर्शविली आहे. याशिवाय मंदिराच्या बाह्यभागावर विषकन्या, आम्रपाली, पुत्रवल्लभा,दर्पणा यासारख्या अनेक सुरसुंदरी कोरल्या आहेत.
मंदिराच्या बाह्यभिंतीवरील पत्रलेखिकेची प्रतिमा
विरहोत्कंठिता (पत्रलेखिका), मनातले विकार आपोआप तुटत नाहीत; ते मुद्दाम तोडावे लागतात, असे सांगणारी एका हातात कट्यार व दुसर्या हातात तुटलेले मुंडके असलेली शत्रुमर्दिनी, सर्पधारिणी विषकन्या, चामरधारिणी, भैरवी, आलसा, वसनभ्रमसा, डालमालिनी, सिंहमर्दिनी, तोरणा, चंद्रावली, पुष्प हाती धरलेली पद्मगंधा, दर्पणा, आळतं (मळवट) लावणारी सुंदरी, सर्पबंधा, नाग व मुंगूस खेळवणारी वनिता, कर्पुरमंजिरी, जलकुंभ घेऊन निघालेली जया, मनातला विकार आणि पायातला काटा एकाच वेळी दूर करणारी शुभगमना, मर्कटासंगे सुंदरा, खंजिरधारिणी, विंचू व सर्प हातात खेळवणारी सुंदरा येथे पाहायला मिळतात. या सर्वच सूरसुंदरींची केशरचना, अलंकार, भावमुद्रा, लयबद्धता याबाबतीत शिल्पकारांनी कमालीचे काम केलेले आहे.
गंगेचे वाहन असलेले नक्षीदार मकर प्रणालाच्या रूपात गाभा-यातील अभिषेकाचे पाणी बाहेर टाकते.
सहसा शिवमंदिरात पाहायला मिळणारी मिथुनशिल्पे येथेही जंघा भागात आहेत. पण, खरे लक्ष वेधते ते येथील मातृशिल्पांनी! पुत्रवल्लभा अनेक ठिकाणी दिसतात, पण प्रसूतिस्थितीतील मातृशिल्प बघायला मिळते. आधी हे शिल्प लज्जागौरीचे वाटते. पण या शिल्पात वेगळेपणान दिसतो. इथे जन्मक्षण कोरला आहे. हे शिल्प जसे हटके आहे, तसे येथील पुत्रवल्लभाही हटके आहे. येथील शिल्पात बाळ आईचा मुका घेते आहे. आईने डाव्या हाताने त्याची कंबर सावरून धरली आहे. उजवा हात बाळाच्या मानेला सांभाळत आहे. या स्वर्गसुखाने दोघांनीही डोळे मिटून घेतले आहेत. बाळाच्या पायात वाळा आहे. आईपेक्षा बाळलीलेकडे आपले लक्ष अधिक जाते.
या मंदिरात शिवपरिवार दिसत नाही.फक्त विष्णुशिल्पेच दिसतात. द्वारशाखेवरही वैष्णव द्वारपाल उभे होते. अंतराळातील नंदी मागाहून आलेला दिसत होता. स्थानिक व्यक्ती निवृत्ती विठ्ठलराव कदम म्हणाले, ‘‘आम्ही याला ‘के-शिव’ देव म्हणतो. येथे पहिल्यापासून केशवराज व शिव असावेत. काही कारणाने केशवराजाची मूर्ती येथून हलवण्यात आली. शिवपिंडी तेवढी राहिली. केशवराज येथून मूर्तिस्वरूपात दूर गेले, तरी गुप्तरुपात येथेच महादेवासंगे आहेत, अशी आमची श्रद्धा आहे. म्हणून गुप्तेश्वर महादेव. आता महादेवाचे मंदिर म्हणून ओळखले जात असले, तरी आमच्या मनात दोन्ही देवांबद्दल सारखीच श्रद्धा आहे. येथे विष्णूही वास करतात.’’
आज जरी मंदिरातील मुख्य देवता शिव म्हणजेच शिवलिंग असले तरी एकेकाळी हे मंदिर नक्कीच विष्णू या देवतेचे असावे. याचे कारण म्हणजे मंदिराच्या बाह्य भिंतीवरील बहुतेक सर्व शिल्पे विष्णूची आहेत. या मताला पुष्टी देणारा अजुन एक पुरावा म्हणजे मंदिराच्या परिसरात अलीकडेच सापडलेली एक अप्रतीम विष्णू मूर्ती. ही विष्णु मूर्ती सध्या मंदिराजवळच्या दुस-या एका मंदिरात ठेवलेली आहे.कधी काळी ही विष्णू मुर्ती मुघल किंवा बहामनी आक्रमणापासून वाचविण्यासाठी मुळ मंदिरातुन उचलून इथे आणून ठेवली आसावी. या विष्णु मूर्तीच्या बाजूलाच एक अप्रतिम महिषासुर मर्दिनीची सुंदर मुर्ती आहे.
मूळ गाभा-यात आज नवीन शिव पिंड बसवली आहे, जी गुप्तेश्वर महादेव नावाने ओळखली जाते; पण मूळ मंदिराचा स्वामी हा विष्णू आहे याची साक्ष आपल्याला वैष्णव शिल्पांच्या रेलचेल आणि निर्णायक जागेवरील अंकनावावरून कळते. मंदिरातून आज गुप्त झालेला विष्णू मात्र थोडा शोध घेतल्यावर धारसुरातच एका उत्तरकालीन मंदिरात सुरक्षित आहे.
गुप्तेश्वर मंदिराच्या अलीकडील भागात पेशवेकालीन केशवराज मंदिर असून त्यात काळ्या पाषाणात कोरलेली अतिशय सुंदर विष्णुमूर्ती आहे. हि मुर्ती कदाचीत गुप्तेश्वर मंदिरातील मुळ मुर्ती असावी. विध्वंसक आक्रमकांच्या काळात ती मंदिरातुन हटवून इतरत्र लपविण्यात आली असावी पण नंतर मूळ जागी नेणे शक्य न झाल्याने तिची येथे प्रतिष्ठापना करण्यात आली असावी. मंदीर व मुर्तीस्थापत्याची आवड असणाऱ्यानी या स्थानाला जरूर भेट द्यायला हवी. केशवराजांचे हे मंदिर उत्तरकालीन आहे. मंदिरात गणपती व महिषासुरमर्दिनी यांच्या मूर्ती आहेत.
मंदिराजवळच्या दुस-या मंदिरात असलेली महिषासुरमर्दिनीची वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती
चालुक्य कलेचा परमोच्च आविष्कार असलेली केशवराजांची चार फुटी मूर्ती अतिशय देखणी लोभस आहे. प्रभावळीत दशावतार कोरलेले आहेत. मूर्तीवरील अलंकार अतिशय रेखीव आहेत. झिलई असलेल्या दगडावर कोरलेली ही माधव रूपातील विष्णू मूर्ती कुठल्याही विध्वंसाशिवाय नाकी डोळे नीट उभी आहे. हे खरेतर धारासुराच्या मागील पिढ्यातील ग्रामस्थांचे श्रेय आहे.मुकूट, पादमुद्रिका, सुवर्णसूत्र, यज्ञोपवित, मेखला, उदरबंध, कटिबंध, चारही हातातील आयुधे अतिशय नजाकतीने कोरलेली आहेत. बाजूला चवरीधारिणी आहेत. पंख असलेला गरुड व लक्ष्मीही संगे आहेत. केशवराजांच्या पायापाशी दाम्पत्य आहे. केशवराजांचे भक्त असलेल्या या अनामिक दाम्पत्याने या मंदिरासाठी दान दिल्याची लोकसमजूत आहे. महादेव मंदिरातील शिल्पवैभव पाहिल्यानंतर केशवराजांच्या या देखण्या मूर्तीचे दर्शन घेतल्याखेरीज धारासूरची वारी पूर्ण होत नाही.
राज्य सरकारच्या पुरातत्त्व खात्याने २७ फेब्रुवारी १९९८ ला या मंदिराचा ताबा घेतला. संरक्षित वास्तू जाहीर केली गेली, पण संरक्षणाचे उपाय मात्र योजले गेले नाहीत. या मंदिराची दुरुस्ती देखभाल करण्यासाठी पुरेसा निधी कधीच मिळाला नाही. मंदिराचा भाग ढासळत चालला आहे. उत्तरेकडचा भाग ढासळल्याचे समजले होते. आता तर अजूनही हानी होते आहे. शिखरालाही धोका पोहोचला आहे. सभामंडप झुकतो आहे. गावकर्यांनी लाकडी जिकन्या (टेकू) देऊन हा डोलारा सांभाळला आहे. पण आता आतील भागातील दगडही निसटू लागले आहेत, हे मंदिर राखले जावे यासाठी ग्रामस्थांनी उपोषणही केले. हे मंदिरशिल्प नीट संवर्धित व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात आले. पण सरकार दरबारी अजून तरी नन्नाचा पाढा ऐकू येतो आहे. आश्वासने मिळतात, पण कार्यवाही होत नाही. आपल्या संस्कृतीचे वैभव असलेले मराठवाड्यातील हे सुंदर शिल्पवैभव टिकविण्यासाठी शासनाला लवकर जाग येवो, ही विष्णू-महादेवापाशी प्रार्थना.
दरवर्षी प्रमाणे यंदाही रंगपंचमीला
घराच्या बाहेर असण्याचा शिरस्ता कायम राहिला, कृत्रिम रंग उधळन्यापेक्षा
प्राचीन कलाकृती,मंदिरे,गडकिल्ले,वारसा आदी बहुरंगी ठिकाणी पुर्वजानी
उभारलेल्या रंगात ऐन रंगपंचमीच्या दिवशीच मिसळून जाण्यातही वैगळीच मजा
असते, आमच्यासाठी आता ही परंपराच झालीय, फक्त यावेळी सातपुड्यातील
डोंगररांगा व मेळघाटातील पानगळ सोडावी लागली, (सालबर्डी रद्द करणाऱ्यांनो
तुम्हाला निवांत बघून घेऊ😏)
नेहमी प्रमाणेच काहींनी वेळेवर दगा
दिला, तर सवयीचा भाग म्हणून निघताना झालेला उशीर यामुळे ऐनवेळी औढा नागनाथ व
धारासुर हे शेजारील मराठवाड्यातील पर्याय निवडले, त्यातही धारासुर ला
प्रथम प्राधान्य! दोघांचे म्हणता-म्हणता ५जण झालो आणि सदैव ऐकाच जागेवर उभी
असलेली इंगोले सर यांच्या चारचाकीचेही त्या दिवसापूरते भाग्य घरून निघताना
तर उजळले, परंतु मराठवाड्यात प्रवेश करताच तिच्याही चक्कीतून पीठ निघालं🤣
कारण याहीवेळी मराठवाड्यात रस्त्यात खड्डे नाही तर खड्ड्यातच रस्ते आहेत, व
नेहमीच राहतील बहुदा!!
असो...!
कोनेऐकेकाळची प्रभावती नगरी ही आजची परभणी! आणि या परभणी
पासून कुठल्याही मार्गाने २०-३० किमी गेलं की
होयसळ-चालुक्य-राष्ट्रकूट-यादव आदी राजवटीच्या समृद्धीच्या पाऊलखुणा दिसतात
म्हणजे दिसतातच, त्यातीलच गंगाखेड तालुक्यातील धारासुर हे एक होय!
मराठवाड्याची जीवनदायिनी गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे,
मराठवाड्यात ज्या गावात पाणी आहे, ते गाव-खेडे,
वाडी-वस्ती काहीही असो, श्रीमंत समजल्या जाते, या हिशेबाने हे धारासुर गाव
गर्भश्रीमंत आहे! कारण इथे गंगाच अवतरली आहे(गोदावरी ला इकडे बरयाच ठिकाणी
गंगाही म्हणतात) आणि विशेष म्हणजे या गावात ही गोदावरी दक्षिणवाहिनी होते!
हिच्याच पात्रात धारेच्या मधोमध शिवपिंडी आहे, जी आजघडीला पाण्यात आहे,
तिच्यामुळे गावाला धारासुर असे नाव पडले अस गावकर्याच म्हणन आहे,हे
गावही आपल्याला अठराव्या शतकात घेऊन जाते कारण बऱ्यापैकी
दगडी बांधकामाचे घरे व चिरेबंदी वाडे इथे मुबलक आहेत, आम्ही गावात प्रवेश
करताच बालासाहेब नेमाणे नावाचे सद्गृहस्थ भेटले, ते माजी प.स. सदस्य होते
हे त्यांनी अगदी सरतेशेवटी सांगितले, यावरूनच त्यांचे आदरतिथ्य कायम लक्षात
राहील, त्यांनी आम्हाला मंदिराजवळ सोडले चहा-पाणी विचारून तेथिलच बुजुर्ग
लोकांत मिसळले,अगदी प्रारंभीच मंदिर बघून स्तिमित झालो आम्ही सर्व!
मंदिर जमिनीपासून १० फूट उंच दगडी चौथऱ्यावर आहे स्थापित
आहे, जवळ गेल्यावर थोडीशी निराशा ही झाली कारण मंदिराची ऐक बाजू पूर्णतः
ढासळली आहे, त्याचा प्रचंड ढिगारा झाला आहे! मंदिराला पूर्वी ३ बाजूने
अर्धमंडपातून प्रवेशाची सोय होती, त्यापैकी ही बाजू पूर्णपणे ढासळली आहे,
तर दुसऱ्या बाजूच्या पायऱ्या ह्या जाग्यावरच निखळल्या आहेत, तीही
ढासळण्याच्या मार्गावर आहे, आम्ही बाह्यांगाने मंदिर पाहणे सुरू केले
ढिगाऱ्यापासून..!
या ढिगाऱ्यामध्येही अनेक शिल्पे दबलेली असावीत, १०
फुटाच्या चौथऱ्यावर हत्ती, अश्व, व्याल आदींचे थर होते, यातील गुळगुळीत
हत्ती लक्ष वेधून घेतात,डौलात चालणारे, झुंजीच्या तयारीत, काही व्यालाच्या
भीतीने भयग्रस्त,काही लगबगीने चालताना काही हळूच मागे वळून पाहताना असल्या
विविध रुपात हे मदमस्त हत्ती कोरलेले आहेत, ऐके ठिकाणी तर दोन गजराज आपल्या
गणपती बाप्पाच्या भोवती ऐटीत उभे आहेत!!☺️
पण यांचे आजचे दुर्भाग्य थोडे मोठे आहे,कारण काही ठिकाणी
झाडे उगविली आहेत, काही मातीने माखल्या गेलीत, हे कमी की काय शेजाऱ्यांनी
त्यावर गोवऱ्या ही थापल्या आहेत यावर🙈🤦🏽♂️!
त्याच शेजाऱ्यांकडून झाडू+तुराट्या घेऊन थोडी बहुत
स्वच्छता केली, हे झाल्यावर उजव्या बाजूने ७ पायऱ्या चढून आम्ही चौथर्यावर
गेलो पायर्यांच्या दोन्ही बाजूने दोन
देवकोष्टक आहेत पण त्यात काहीच नाही,सभा मंडपात न जाता पुन्हा
बाह्यांगानेच बघणे सुरू केले, अगदी सुरवातीला लागली ती प्राचीनकाळातील
सुशिक्षित स्त्री-चा पुरावा म्हणजे "पत्रलेखिका✍🏾" हिच्यावरची धूळ काढून
हिचे फोटो घेतले फोटो काहिकेल्या व्यवस्थित मिळत नव्हते, मग पुन्हा झाडू
घेऊन सर्वच शिल्पे स्वच्छ केली आणि मग नंतर पुन्हा फोटोचा प्रयत्न केला,
आणि का बरं करू नये या मंदिराच्या सर्वाधिक देखण्या वास्तू आहेत त्या
सुरसुंदर्या म्हणजेच अप्सरा👸🏽💃🏾!
प्रत्येकीच वेगवेगळ मोहक रूप, प्रत्येकीच वेगवेगळ
प्रयोजन, खर म्हणजे आपल्या दिलखेचक अदांनी/गुणांनी मंदिरात येणाऱ्या
भक्तांच्या वासना, मोह,माया,विकार या सर्वांपासून परावृत्त करावे हा मुख्य
हेतूने मंदिराच्या बाह्यांगावर ह्यांना स्थापित केल्या जाते! पण धारसुरला
थोडं उलट झालंय, येथील अनामिक शिल्पकाराने जीव ओतलाय या सर्व अप्सरे मध्ये!
आमच्या सारखे दगडी मने ही इथे प्रेमाने भिजून चिंब झालेत इथे💗😜!!!
(In short dekha tujhe to yaar Dil me baji gitar🥰)
यातील पत्रलेखिका, मदन,मदनिका, दर्पणा, मर्दला, विणावादक,
विषकन्या,पुत्रवल्लभा,आलसकन्या, तोरणा,शत्रुमर्दिनी,नर्तकी,चामरा,
शुभंगामीनी,शुकसारिका, साप व विंचू, खेळविणारी,स्त्री व
माकड, वाद्यमग्न यौवणा आदी ज्ञात-अज्ञात शिल्पे सर्वच देखणे आहेत, ज्यांची
सविस्तर माहिती नंतर कधीतरी....!!!
बाह्य भागाने संपूर्ण नेत्रसुख उपभोगल्यानंतर
मंदिरात प्रवेश केला, चौकोनी रंगशीळा व त्यावर बेरंगी फरश्या बघून बासुंदी
मध्ये मिठाचा खडा लागावा अस वाटले,सुमारे ८ नक्षीयुक्त स्तंभावर सभामंडपाचा
भार तोललेला आहे, स्तंभावरील किर्तीमुख आकर्षक आहेत, अजून भन्नाट बाब
म्हणजे सभामंडपाला दोन्ही बाजूने अतिशय कोरीव गवाक्ष/ खिडक्या आहेत, अखंड
दगडाचा असा वापर कल्पनेच्या बाहेर आहे, गाभार्याच्या थोडस बाहेर पितळेचा
नंदी बसवलेला आहे, तसेच दोन्ही बाजूने मंदिराचे छत/शिखर हे नक्षीदार
विटांनी बनविले आहे, जे फारशे कुठेही आढळत नाही,शिखराची एक बाजू ढासळली
आहे, मुख्य गाभार्याच्या द्वारपट्टीवर ही अप्रतिम नक्षीकाम आहे,आणि समस्त
मंदिराचे महत भाग्य म्हणजे कुठेही ऑईलपेंट चा मारा अजून तरी झाला नाही,
गाभाऱ्यात भरगच्च अंधारात श्री गुप्तेश्वराची पिंड आहे मंदिराची एकंदरीत
रचना बघता ही शिवपिंडी आधुनिक वाटते, गावकर्याच्याच म्हणण्यानुसार जवळच
असलेल्या केशवराज मंदिरातील मूर्ती ही येथे असावी!!! असे त्यांचे म्हणणे
होते, लागलीच गुप्तेश्वराचे दर्शन घेऊन आम्ही केशवराज मंदिराकडे गेलो,
इथेही अंधारच होता, सहा अवाढव्य स्तंभावर सभामंडप व त्यामध्ये छोटेसे
गर्भगृह अस स्वरूप केशवराज मंदिराच होत, पण अंधाऱ्यारात्री नंतर दुसऱ्या
दिवशी तेजोमयी सूर्यप्रकाशात स्वयं तेजस्वी वाटावी अशी अत्यंत सुंदर विष्णू
मूर्ती इथे होती,
अर्ध मळालेला पितांबर, खांद्यावर पांढरा रुमाल, गळ्यात
एक तुळशीच्या मंजुळाची व दुसरी कापसाची अश्या २ माळा ऐवढाच या "लक्ष्मी"
पतीचा पेहराव होता, पण नखापासून ते शिखापर्यंत निव्वळ दगडी नक्षीकामाने
केशवराज सजलेले होते, मला कधी-कधी वाटते की "देवाचेही" भाग्य असावं
लागतं...••• नशीब, प्रारब्ध,भोग त्याच्या ही वाटेला असतेच! आता बघा ना सेम
टू सेम अशीच मूर्ती औढा-नागनाथ येथे काचेच्या पेटी मध्ये संरक्षित आहे,
त्याला फुलांचे हार मावता मावत नाही,पुजा-पाती अखंडपणे चालूच असते, साधा
फोटोही घेऊ देत नाहीत तिथे!!
आणि इकडे धारासुरला बिचारे हे केशवराज निव्वळ एकांतातच...!!
साधा उजेडही त्यांच्या नशिबी नाही काय म्हणावे याला???🤷🏽♂️टिम्ब...
टिम्ब...!!!
पण केशवराज मात्र खूपच आकर्षित करत होते आणि म्हणू औढा
नाहीतर इथे च आडमाप फोटो काढले, जवळच महिषासुरमर्दिनीचे प्राचीन शिल्प ही
अंधारातच होते, या सर्वांचे दर्शन घेऊन श्री केशवराज श्री गुप्तेश्वर यांना
त्याचेच मंदिराचे गतवैभव पुन्हा लवकरात लवकर येऊ द्या🙏🏽🙏🏽⛳ हेच
मनोभावे साकडं घातलं!!!
आणि शिमग्याचे औचित्याने इथे काहीच अस्तित्व नसलेल्या पुरातत्व विभागाच्या नावाने बोंबललो सुद्धा आम्ही🙈🙉🙊!!!
हळहळ...उद्दिग्नता घेऊन मुदगल, पोखरनी, औढया च्या मार्गी लागलो..!
मराठवाड्यातील मंदिरे...!!!
सहकारी मंडळी:- श्री मारोती इंगोले, धनंजय अडपल्लूवार, प्रशांत घुगे, अमित ढोले,
No comments:
Post a Comment