बागलाण !! बागांचा आणि जागोजागी असलेल्या लानींचा (पाण्याच्या चारी) हा
प्रदेश म्हणजे बागलाण. नाशिक जिल्ह्यातील खानदेशची पारंपरिक मूल्ये जपून
ठेवणारा हा तालुका. या बागलाण भमंतीमधे सकाळी बिष्टा, कर्हा असे अपरिचित
गड पाहून आम्ही दुंधा गडाच्या पायथ्याच्या आश्रमामधे मुक्कामासाठी निघालो.
वाटेमधे देवाळाणे गावात एक पाषाणकमल म्हणावे असे मंदिर पहाण्याचे नियोजन
होते. थोडेफार या मंदिराविषयी वाचले होते, पण प्रत्यक्ष अनुभुतीने मी
अक्षरशः थक्क झालो. आज या मंदिराचा मी तुम्हाला परिचय करुन देणार आहे.

( देवळाणे परिसराचा नकाशा )
कर्हा पाहून गाडी चक्रव्युह शोभावे अशा रस्त्याने तळवडेकडे निघाली.
एकटादुकटा नवखा माणूस असेल तर तो या रस्त्यावर चुकलाच म्हणून समजावा.
विचारत विचारत आम्ही देवळाण्यात पोहोचलो. एखाद्या गाववाल्याला विचारावे तर
तो अहिराणीत सांगे, "तो दखा कळस, तेच शे ते मंदिर." दगडी कलाकुसर, बरेचसे
भग्न झालेले, काळेशार प्रचंड दगड, सुरेख कातलेले. किती कालावधी लागला असेल
बांधायला?
देवळाणे हे गाव सटाण्यापासून १६ कि.मी. अंतरावर दोध्याड नदीच्या तिरावर
निसर्गाच्या सात्रिध्यात गावतळयाच्या किना-यावर प्राचीन जोगेश्वरी शिवमंदिर
हेमाडपंथी स्थापत्य शैलीत आहे. खानदेशच्या या गावात बाराव्या शतकातले एक
सुंदर मंदिर आहे. इ.स. ७८५ ते ८१० या काळात देवळाणे येथे कामदेव
जोगेश्वराचे मंदिर बांधले गेले. खजुराहोच्या मैथुनशिल्पांप्रमाणेच इथे
मैथुनशिल्पे आहेत. हेमाडपंथी बांधणीचे हे पुर्वाभिमुख मंदिर शंकराचे असुन
या मंदिराला "जोगेश्वर कामदेव मंदिर" म्हणून ओळखले जाते. दोधेश्वरहून
येणारी दोध्याड नदी व ओढा या जलप्रवाहांच्या संगमावर हे देखणे शिल्पमंदिर
साकारले आहे. १३ व्या शतकतील यादववंशीय राजा रामदेवराय यांचा वजीर हेमाद्री
याने हेमाडपंथी मंदिरांची बांधकामे केली. त्याच मंदिरांपैकी देवळाणे येथील
ब्रिटिश गॅजेटनुसार जोगेश्वरी शिवमंदिर (हेमाडपंथ) बांधले. या मंदिराच्या
परिसरात चांदीची नाणी ब्रिटिशकाळात संशोधकांना सापडली. या नाण्यांच्या
पुराव्यानुसार ही नाणी कलचूरी घराण्यातील इ.स. ६२५ ते इ.स. ६३० या काळातील
कृष्णराज राजाचे चांदीचे नाणे सापडलेले आहेत. हे नाणे गुप्त काळतील
नाण्यांशी मिळतेजुळते आहेत. यानुसार असा अंदाज काढता येतो. की,पूर्वी या
परीसरात कलचूरी घराण्यांतील राजवट असावी. इ.स.१४९८ च्या काळता सोनज (ता.
मालेगाव) ही पेठ लुटण्याची राजपुत घराण्यांतील पवार जमातीतील देवसिंग व
रामसिंग हे पराक्रमी दोन्ही बंधू जात असतांना ते या मंदिरात मुक्कामाला
थाबलेले होते. यावेळी काही कारणाने दोन्ही भावांमध्ये संघर्ष झाला. यावेळी
रामसिंग हा रागाने निघून गेला. व देवसिंगला हा परिसर आवडल्यामुळे त्याने या
ठिकाणचे जंगल तोडून या परिसरात गाव वसवले. त्याच्या नावानुसार व
मंदिराच्या नावामुळे या गावाचे देवळाणे हे नाव पडले.
प्रथम दर्शनातच दर्शनी मंडपावरील शिखराला केलेला सिमेंटचा गिलावा
मात्र खटकतो. कोणी म्हणतो नवसपूर्तीसाठी कुणी गावक-याने देवाला ‘कळस’ चढवला
आहे, तर जाणकारांच्या मते ब्रिटिशकालीन पुरातत्त्व विभागाने दुरुस्तीच्या
नावाखाली केलेला हा उद्योग आहे. पण या सा-या प्रकारामुळे मूळचे
शिल्पसौंदर्य हरवले आहे. त्याकडे दुर्लक्ष करून आत गेले की, मग मात्र
पुन्हा चित्रवृत्ती उल्हसित होते. आश्चर्याच्या धक्क्यांना येथूनच प्रारंभ
होतो. आतील बाजूने कोरीव कामाची लयलूट केलेली आहे. या शिल्पमंदिराची रचना
गर्भगृह, अंतराळ सभामंडप आणि मुखमंडप अशा स्वरूपाची आहे. चांदणीच्या
आकाराच्या अष्टकोनी दगडी चौथ-यावर मंदिराची सुरेख उभारणी केली आहे.
मुखमंडपापुढील मूळच्या विशाल नंदीचे शीर तुटलेले आहे. त्याच्या घाटदार
शरीरावरील अलंकार व वस्त्रे सुंदरपणे कोरलेली आहेत; पण शीर जागेवर
नसल्यामुळे निराशा होते.
मुखमंडप नक्षीदार अशा चार शिल्पजडित स्तंभांवर तोललेला आहे. स्तंभांची
एकावर एक अशा दोन स्तरांत रचना असून दोहोंमध्ये शिल्पाशिलांची वेगळी जोड
दिलेली आहे. या छोटेखानी मुखमंडपात बसण्यासाठी समोरासमोर दोन आडव्या शिळा
बसवलेल्या आहेत. मुखमंडपाच्या प्रवेशमार्गाच्या दुतर्फा दोन मोठी देवकोष्टे आहेत,प्रत्येक
देवकोष्टामध्ये द्वारपालाची मुर्ती आहे. अर्धखुला मंडप आणि गर्भगृह
याच्यामध्ये अंतराल आहे. मुख्य गर्भगृह आणि त्याचे अंतराळ हे दुय्यम
गर्भगृह आणि त्यांचे अंतराळ याच्यापेक्षा मोठे आहे. अर्धखुला मंडप हे या
मंदीराचे आणखी वैशिष्ट्य मानता येईल. या मंडपाच्या मागील भागात प्रत्येक
कोपर्यात दोन अशी एकुण चार देवकोष्टे आहेत. तर गर्भगृहातील मागील भिंतीत
एकुण तीन देवकोष्टे आहेत.
त्यानंतर सहजच छताकडे लक्ष गेले, तेव्हा तेथील शिल्पकामाच्या ‘अदाकारी’ने
मती गुंग करून टाकली. वर्तुळाकार घुमटाकृती छताच्या मधोमध बासरीवादनात दंग
झालेल्या गोपालकृष्णाची प्रमाणबद्ध मूर्ती आणि छताच्या परिघावर छोट्या
आकाराच्या आठ गोपिका आठ दिशांना फेर धरून वाद्ये वाजवणा-या या शिल्पकृतीची
प्रमाणबद्धता, लयबद्धता काही औरच.
देवळाणे येथील मंदीर त्रिदल गाभारा पध्दतीचे असून ते उंच जगतीवर उभे आहे. मंदीराच्या मुख्य गर्भगृहाचा तलविन्यास पंचरथ तर दुय्यम गर्भगृहाचे तलविन्यास त्रिरथ प्रकारचे आहेत. सर्व गर्भगृहाची बाह्यांगे साधी सपाट असून शिल्पविरहीत आहेत. पीठाच्या वरच्या भागात आणि जंघा भागात काही थर आहेत,पण त्यात वैशिष्ट्यपुर्ण असे काहिच नाही. अंतरपत्राच्या सहाय्याने हे थर वेगळे दाखवले आहेत. जे थर वेगळे ओळखता येतात ते म्हणजे तळाशी असलेले हंसथर आणि कीर्तिमुखाचा थर. मधल्या थरापैकी उदगमाचा थर आणि वरच्या थरापैकी भरणी आणि शिरावटीचा थर हे होत. मात्र मंदीराच्या एकुण बाह्यांगावर जी शिल्पांची कमतरता आहे ती जणू अर्धखुल्या मंडपाच्या बाह्यांगावर, मुखमंडपावर आणि अर्धखुल्या मंडपातील वामन आणि पुर्ण स्तंभावर भरपाई करण्यात आलेली आहे. मुखमंडपाच्या पुढचा सभामंडप बारा अर्धस्तंभांनी तोलुन धरलेला असुन सभामंडपाच्या खांबावर नाजुक नक्षीकाम केलेले आहे.
धार्मिक विधी करण्यासाठी या मंडपाची रचना केलेली असावी. डाव्या व उजव्या
हाताला छोटे दालन असुन डाव्या कक्षात महिषासुर मर्दिनीचे शिल्प आहे तर
उजव्या कक्षात गणपती व रिध्दी-सिध्दी मूर्ती आहेत.
गौरी-शंकंराचा आवडता खेळ म्हणून बहुधा सारीपाट कोरला असावा. सभामंडपाच्या
मध्यभागी मोठय़ा वर्तुळात कासवाचे शिल्प कोरलेले असुन छताकडे मोठय़ा संख्येने
शिल्पाकृती कोरल्या आहेत. सभामंडपातील छतावर मध्यभागी कमळशिल्प आहे.
सभामंडपाच्या छताकडे लक्ष जाताच विविध शिल्पाकृतींची तेथे झुंबड उडालेली
दिसते.
छत आपल्या पाठीवर तोलून धरणारे पुष्ट शरीराचे हसरे यक्ष प्रत्येक
स्तंभाच्या शिरोभागी गटागटाने शिल्पित केले आहेत. त्यांना प्रत्येकाला चार
हात दाखवलेले असून ते दोन हातांनी छताला आधार देत आहेत, तर उरलेल्या दोन
हातांनी वाद्ये वाजवत आहेत. त्यातील काही जण शंखनाद करत आहेत. कष्टकरीही
त्या काळात वृत्तीने आनंदी होते हेच त्या यक्षांच्या हस-या चेह-यावरून
शिल्पकाराला सांगायचे असेल.
छताकडील काही भागात युद्धाचे प्रसंग कोरलेले असुन उंटावरून लढणारे योद्धे
तसेच त्यांच्या मागेपुढे हत्ती व घोडय़ावरून आवेशात लढणारे स्वारही तेथे
दाखवले आहेत. काही ठिकाणी आवेशपूर्ण भावात कुस्ती खेळणाऱ्या मल्लांची जोडी
आहे तर कुठे नागबंध, पानेफुले व काही भौमितिक रचना आहेत. प्रत्येक
कक्षाच्या टोकाला विविध प्रकारची कीर्तिमुखे साकारली आहेत. छताकडील काही
शिल्पशिळात युद्धाचे प्रसंग मोठ्या कौशल्याने कोरलेले आहेत. छताच्या
दक्षिणेकडील गरुडारूढ विष्णू व त्याभोवतीची सर्पाची गोलाकार जाळी विशेष
लक्षवेधी आहे. अर्धस्तंभावरील हंस, मिथुन, मौक्तिकमाळा व इतर कलाकुसरही
बारकाईने पाहण्यासारखी आहे.
मुख्य गाभाऱ्याच्या प्रवेशव्दाराजवळील लहान गाभाऱ्याच्या तोरणभिंतीवर
पंचमातृकांची शिल्पपट्टी कोरलेली आहे. या पंचमातृका राजहंस, ऐरावत, वृषभ,
वराह,मनुष्य यावर बसलेल्या आहेत. गाभाऱ्याच्या मुख्यप्रवेशव्दाराजवळ वरच्या
भागात शंख व चिपळया वाजविताना व नृत्य करीत असलेले स्त्री-पुरुषांचे शिल्प
तसेच वेगवेगळया पध्दतीने गुंतागुंतीचे नक्षीकाम केलेले आहे. गर्भगृहात
प्रवेश करताना दगडी उंबरठय़ावर सुरेख चंद्रशिळा आहे.
सभामंडपातून गर्भगृहात जाताना चार-पाच पायऱ्या उतरून जावे लागते.
तीन गर्भगृहांना मिळून एकच सामाईक मंडप आहे. बिनखांबी असलेल्या मंडपाचा तलविन्यास वैशिष्ट्यपुर्ण आहे.म्हणजे हा मंडप फक्त मागच्या बाजुने झाकलेला आहे. बाजुच्या भिंतीला लागून असणारे स्तंभ रुचक किंवा भद्रज प्रकारचे आहेत. चौरस तळखडा, कमानी, व्याल आणि कीर्तिमुख या वैशिष्ट्यांनी अलंकृत केलेला खांब. त्यावर उदगम, भरणी, शिरावटी आणी कीचकहस्त असा त्याचा क्रम आहे. मंदीराच्या तुळ्यांवर काही कथा सांगणारे शिल्पपट्ट कोरले आहेत. वामनस्तंभाची रचना काहीशी अशीच असली तरी त्यावर अधिक थर दिसतात. वामनस्तंभावर उदगमाखाली पुर्णघट हा जादाचा घटक कोरलेला दिसतो.
अर्धखुल्या मंडपाचे छत शिखराकडे लहान होत जाणार्या वर्तुळांनी बनलेले आहे. या घुमटाच्या मधोमध आणि सर्वात वर असणार्या थरावर गोपी आणि कृष्ण कोरले आहेत. वामनभिंतीचा तळभाग अलंकरणाने समृध्द आहे. या भागावर हंसथर आणि त्याच्या वरच्या भागात आलटूनपालटून येणारे अर्धस्तंभ आणि देवकोष्टांची रांग असलेली वेदीका आहे.या देवकोष्टांमध्ये नर्तक आणि वादकांची शिल्प आहेत.
आत मधोमध उत्तराभिमुख पंचमुखी शिवलिंग आहे. हे गर्भगृह चौरसाकृती असुन
गाभाऱ्याच्या उत्तर दिशेच्या उपगाभाऱ्यात शिवशंकर भगवान पार्वतीमातेला
मांडीवर घेऊन बसलेले अतिशय सुंदर शिल्प आहे. पाठीमागे पुर्वाभिमुख मुख्य
कोनाड्यात आदिशक्ती पार्वतीची चार भुजा असलेली मीटरभर उंचीची मुर्ती असुन
तिचे चारही हात कोपरापासून खंडित झालेले आहेत. छताच्या मध्यभागी उमलत्या
कमळपुष्पाचे शिल्प आहे. मुख्य गाभाऱ्याच्या आत वरील टोकाच्या भागात
शिवशंकर, पंचमुखी नाग, नागरदेवतेचे प्राचीन शिल्प आहेत. पूजा साहित्य
ठेवण्यासाठी दोन्ही बाजूंच्या भिंतीत लांबरुंद कोनाडे ठेवलेले आहेत.
बहुतेक शिल्पमंदिरांच्या प्रदक्षिणा मार्गावर बाहेरील बाजूने शिल्पकार
पुन्हा आपले कसब पणाला लावून बेहतरीन शिल्पकला पेश करतात. इथे तर मंदिराला
चांदणीच्या आकाराचा अष्टकोनी चौथरा ठेवल्यामुळे शिल्पकलेस अधिक जागा उपलब्ध
झालेली आहे. त्यामुळे इथली प्रदक्षिणा अधिक आलंकारिक, मनोरंजक झालेली आहे. विविध प्रकारची छोटी-मोठी शिल्पे या मार्गावर मंदिराच्या बाहेरील अंगाने कोरलेली आहेत.
देवळाणे शिल्पमंदिराचे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे मंदिराच्या दक्षिण व
उत्तरेकडील बाह्य़ांगावर खजुराहोसारखी कामक्रीडा करत असलेली विविध आसन
पध्दतीचे शृंगारशिल्पे कोरलेली आहेत. येथे पुन्हा आश्चर्याचा धक्का बसतो!
छोट्या आकारातील ही शिल्पे लांबलांब शिलांवर पट्टिकेच्या स्वरूपात आधी कोरून मग ती जडवलेली दिसतात.
त्यातील नागमिथुनशिल्पे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण म्हणता येतील. ही दोन्ही
शिल्पे प्रथमदर्शनी श्रीगणेश असल्याचा भास होतो. व्यवस्थित निरीक्षण
केल्यावर दिसते की, एका नागाला दोन नागिणींनी विळखा घातलेला आहे.
मिथुनशिल्पातील सौंदर्य, सौष्ठव उच्च प्रतीचे आहे.
गर्भगृहातील शिवपिंडीवर पडणारे अभिषेकाचे जल बाहेर वाहून जाण्यासाठी या
मार्गावर दोन उत्कृष्ट मकरशिल्पे साकारली आहेत. त्यांच्या मुखातून ते पाणी
बाहेर पडते. अशी मोठ्या आकाराची व सफाईदार मकरशिल्पे क्वचितच आढळतात.
त्या मकरांचा भेदक जबडा, अणकुचीदार दंतपंक्ती व त्यातून बाहेर आलेली जीभ
लहान मुलांना तर दचकून सोडते. शिवाय त्याचा प्रत्येक अवयव, शरीराची चपळता
त्याच्या अंगप्रत्यंगातून प्रकट होताना दिसते. अगदी जिवंत असे हे शिल्प
आहे. वेरूळच्या लेणी कोरल्यानंतर सर्व शिल्पकार वनविहारासाठी या भागात आले
होते आणि अगदी सहज वेळ घालवण्यासाठी एका रात्रीत त्यांनी हे मंदिर उभारले,
असा एक समज आहे. पितळखोरा येथील ‘शृंगार चावडी’, ‘नागार्जुन’ या लेणींवर
असलेल्या शिल्पकामात व या मंदिरात असलेल्या शिल्पातील साधर्म्यामुळे या
समजाला बळकटी मिळते.
मात्र मुखमंडपाच्या तुलनेत मंदिराच्या बाकीच्या बाह्यांगावर कमी प्रमाणात कोरीवकाम दिसते.
येथे पूर्वी कळस कसा असावा याविषयी अनेक तर्क आहेत मात्र तज्ज्ञांच्या मते येथील कळस झोडगे येथील मंदिराच्या कळसासारखाच असावा. मंदिराचा पाषाण जवळच असलेल्या दुंधे या ठिकाणाच्या पाषाणाशी मिळताजुळता आहे.
केंद्र सरकारच्या पुरातत्त्व विभागाने अलीकडे डागडुजीचे काम हाती घेतले आहे. कुणीतरी रखवालदारही नेमला आहे म्हणे. ग्रामस्थांनी त्याला अद्यापही पाहिलेले नाही! कदाचित त्याला नियमित पगारही सुरू असेल. गावातील काही टवाळखोर विरंगुळा किंवा ‘विकृती’ म्हणून शिल्पांची नासधूस करत असतात. हजारो वर्षांपूर्वीचा हा सुंदर ठेवा भग्न अवस्थेत का होईना, बघायला मिळतो; पण येणा-या पिढीला आपण आपले असे कोणते सौंदर्यशिल्प राखून ठेवणार आहोत कि नाही ?
१) नाशिक जिल्हा गॅझेटीयर
२) स्थापत्य - महाराष्ट्र शासन
३) https://durgbharari.in हि वेबसाईट
४) https://www.safarbaglanchi.com/ हि वेबसाईट
५) http://shewaleprakash.blogspot.com हि वेबसाईट
मंदिरात केलेले उल्लेखनिय सुंदर नक्षीकाम
जायखेडा - बागलाण तालुक्यातील पुरातन काळपासुन स्थापन झालेली ऐतिहासिक अशी मंदिरे आहेत. त्यातील बहुतांश मंदिरांचे बांधकाम हेमाडपंथी आहेत. त्यापैकी देवळाणे येथील हेमांडपंथी मंदिराचे अतिशय सुंदर नक्षीकाम असणारी पुरातन काळातील देवदेवतांची यांसह अशी अनेक दगडी शिल्पे आपल्याला येथे पाहावयास मिळतील. एवढी सुंदर असणारी ही शिल्पे व्यवस्तित ठेवण्याची काळजी पुरातत्व विभागाला का घ्यावीशी वाटत नाही ? असा प्रश्न सर्वांना भेडसावत आहे. या मंदिराचे माहात्म्य पुढील काव्यात व्यक्त होते.
माझ्या गावातील शिवमंदिर पुरातन
शिवभक्तात गुंतले माझे मन
मंदिरे हे वसे दोध्याडीच्या काठी
हे मंदिरे आवडते शिवभक्तांसाठी
या मंदिरी राहे विश्वेश्वर ते महान क्षेत्र
जे पाहिन ते पुण्याचे पात्र
या मंदिरी शिव-पर्वती पंचमुखी
जे दर्शन घेईल तो सदा सुखी राहिल
या मंदिराला राष्ट्रीय संत महामंडलेश्वर 1008 शांतीगिरी महाराज, प.पू.कृष्णाजी माउली जायखेडकर, प.पु.शिवभक्त शेषराव महाराज यांनी भेट दिली असून भाविकांना त्यांच्या सत्संगाचा लाभ झाला आहे . या मंदिरात दरवर्षी अखंड ज्ञानेश्वरी तथा किर्तन सप्ताह आयोजित केला जातो. महाशिवरात्रीला दरवर्षी मोठी यात्रा भरते. या मंदिराच्या नित्यपूजा विधीसाठी व विकासासाठी संदीप पगार, जितेंद्र पवार, मदन पवार, मानसिंग ढोमसे, अशोक सूर्यवंशी, समाधान चव्हाण, निरंजन घोडे हे कायम प्रयत्नशील असतात.
जोगेश्वरी शिव मंदिराच्या (हेमाडपंथी) प्रवेश व्दाराजवळ शैलीदार अवस्थेत बसलेला डौलदार नंदी आहे. काळाच्या ओघात या मंदिराची दुरवस्थ्या झालेली आहे. या मंदिरात सर्वात वैशिष्ट्यपुर्न असलेले शिल्प प्रवेशव्दाराच्या क्रमांक 1 च्या गाभार्यात गोपिका कृष्णाभोवती रास क्रीडा करत असताना अप्रतिम उत्कृष्ट शिल्प कोरण्यात आलेले आहे. क्रमांक 2 च्या मुख्य गाभार्यात सभामंडप आहे. सर्व प्रकारचे धार्मिक विधी करण्यासाठी या मंडपाची व्यवस्था केलेली असावी. या मंडपाच्या सभागृहाचा कोष्टकगृहात उजव्या बाजूला गणपती, व डाव्या बाजूला महिषासूर मर्दिनीचे नाजूक पध्दतीचे शिल्प कोरलेले आहेत. यांच्या डाव्या बाजूला असलेले श्रीकृष्णाचे व देवीचे शिल्प गहाळ झाले आहे. मुख्य गाभार्याच्या उत्तर दिशेच्या उपगाभार्यात शिवशंकर भगवान पार्वती मातेला मांडीवर घेऊन बसलेले शिल्प अतिशय सुंदर आहे. गाभार्याच्या वरच्या स्तंभावर ऐरावत, उंट यांच्या वर स्वार झालेल्या, तसेच मल्ल युध्दाचे शिल्प आहेत. सभामंडपाच्या खांबावर नाजूक, बारीक, गोंडस पध्दतीने वेगवेगळे नक्षीकाम केलेले आहे. मुख्य गाभार्याच्या प्रवेशव्दारावर जवळील क्रमांक 3 च्या लहान गाभार्याच्या प्रवेशव्दारावर पंचमातृकांचे शिल्प आहे. या पंचमातृका राजहंस, ऐरावत, वृषभ, वराह, मनुष्य यावर बसलेल्या अवस्थेत आहेत. या गाभार्याच्या मुख्य प्रवेशव्दाराजवळ संगीत वाजविताना व नृत्य करीत असलेले स्त्री-पुरूष यांचे शिल्प आहे. तसेच वेगवेगळया पध्दतीने गुंतागुंतीचे नक्षीकाम केलेले आहे. या मंदिराच्या मुख्य गाभार्यात पंचमुखी शिवलिंग आहे. या गाभार्याच्या मुख्य कोष्टकात आदिशक्तीचे शिल्प आहे. या मूर्तीच्या वरच्या भागात दाक्षिणात्य पध्दतीतला गणपती व रिध्दी-सिध्दी आहेत. गाभार्याच्या वरच्या भागात शंख व चिपळया वाजविणार्या भाविकांचे शिल्प आहेत. मुख्य गाभार्याच्या अंतरंगात अत्युच्च टोकाच्या भागात शिवशंकर, पंचमुखी नाग, नागरदेवतेचे अति प्राचीन शिल्प आहेत. तसेच या भागात कामक्रीडा असलेले विविध आसन पध्दतीचे शिल्प आहेत.
---------------------------------------------------------------------
जतन करण्याऐवजी होतोय पतन
iqjkru foHkkxkP;k nqyZ{kkeqGs >kysys uanh egkjktkaph iM>M
जायखेडा - बागलाण तालुक्यातील 700 ते 800 वर्षापूर्वीच्या हेमाडपंथी शैलीच्या शिवमंदिर रूपी पुरातन ठेव्याची पडझड होउ लागली आहे.या ऐतिहासिक ठेव्याचे जतन व्हावे यासाठी पुरातत्व खात्याने 27 लाख रूपये खर्चाचे संरक्षक भितींचे अडीच वर्षांपूर्वी सुरू केलेले काम आजही अर्धवट अवस्थेत आहे. हे काम पूर्ण होण्याआधिच भिंतीच्या दगड-विटा ढासळू लागल्याने कामाच्या दर्जाविषयी शंका उपस्थित होऊ लागली आहे.
९ व्या शतकात हेमाडपंथी स्थापत्याचे देवळाणे या गावी उत्कृष्ट असे मंदिर बांधण्यात आले आहे. मंदिर व त्याची रचना चांदणीकृती आहे. या मंदिराच्या देखभालीसाठी पुर्वी एक रखवालदार होता. तो ब-याच दिवसांपासून दिसत नाही पुर्वी पत्ते खेळणारे, विश्रांती घेणारे व तळीरामांना हे सुरक्षित ठिकाण होते. मात्र गावातील काही नागरीकांच्या जागरूकतेमुळे या गोष्टींना पायबंद बसला. आजही गावातील ब-याचशा नागरीकांची या अमुल्य ठेव्याबाबत अनास्था दिसत आहे. भिंतीचा ठेकेदार गेल्या अडीच वर्षापासून हे काम करीत आहे. सिमेंट व पाणी पुरेसे न मिळाल्याने दगड-विटा निखळुन पडत असून या संरक्षक भिंतीला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. त्यामुळे हे काम केव्हाही जमिनदोस्त होर्इल, अशी भिती व्यक्त होत आहे. पुरातन काळातले अनेक ठेवे पुर्वजांनी तयार करून ठेवले आहेत. मात्र या ठेव्याबाबत फारशी आस्था नवी पिढीमध्ये दिसत नाही. त्यामुळे या अमुल्य ठेव्यांचे भग्रावस्थेत रूपांतर होताना दिसत आहेत.
या मंदिराच्या कळसाचे काम नव्याने झाले आहे. येथे पूर्वी कळस कसा करावा याविषयी अनेक तर्क आहेत. मात्र तज्ज्ञांच्या मदतीने झोडगे येथील मंदिराच्या कळसासारखा असेल, असे सांगितले जाते. मंदिराचा पाषाण जवळच असलेल्या धुंधे या ठिकाणाशी जुळतो. सध्या सुरू असलेल्या संरक्षक भिंतीच्या कामाचा दर्जा व 700 ते 800 वर्षांपासून ऊन, वारा, पाऊसाशी झुंज देत उभ्या असलेल्या पूर्वीच्या भक्कम दर्जाच्या बांधकामाशी तुलना करताना पर्यटकांडून आश्चर्य व्यक्त होत आहे. एकूणच ज्या वास्तुमूळे देवळाणे गावाची ओळख भविष्यात भारताच्या नकाशावर सन्मानाने कोरली जाणार आहे.
या दुर्लक्षित असलेल्या मंदिरास पुरातत्व विभागाने 27 लाखांचा निधी विकासकामासाठी दिला आहे. हे मंदिर विकासकामाची आस धरून आजही त्याच अवस्थेत उभे आहे. त्या निधीचा पुर्णपणे वापर केला गेला नसल्याचे गावातील नागरिकांकडुन सांगण्यात येते हे विकासकाम लवकर पुर्णत्वास येर्इल, असा आशावाद गावकरी व पंचक्रोशातील भाविकांना आहे. हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. हे काम संरक्षणात्मक नसून, मंदिराला विघातक ठरलेले आहे. जणू हा अमुल्य ऐतिहासिक ठेवा भविष्यात नाहीसा होर्इल, अशी शंका इतिहास संशोधकांना आहे. या कामी पुरातत्व विभागाने लक्ष घालुन हा पुरातत्व ठेवा जोपासावा व दिलेल्या निधीची खातरजमा करावी, अशी मागणी प्रा. संदीप पगार, मदन पवार, र्इश्वर जाधव, अभिमन पवार, गणपत वाघ, कैदा शिरसाठ, बारकू पवार, भीमराव घोडे, सुभाष भदाणे, अरूण रोकडे यांनी केली-














No comments:
Post a Comment