Friday, May 12, 2023

कालंका माता मंदिर, बार्शीटाकळी, अकोला, पुरातन शिव मंदिर, कोथळी, मोताळा, बुलढाणा, महागाव कसबा येथील हेमाडपंती

टंकावती नगरी बार्शिटाकळी :
   विदर्भातील प्राचिन शहरांपैकी एक असा बार्शीटाकळी शहराचा उल्लेख करावा लागेल. इसविसनाच्या चवथ्या शतकातील वाकाटक काळापासून येथे मानवी वस्ती होती. त्या काळी या शहराला विषेष महत्व होते व येथे बाजारपेठ होती. संपूर्ण शहरात गल्लोगल्लीत प्राचिन काळातील बांधकामाचे अवषेष सापडतात. गावात एक किल्लाही होता. येथे भुयारांची श्रृंखलाच आहे. अनेक ठिकाणी भुयार आहेत. त्यामुळे याला भुयारी शहर म्हणूनही संबोधिल्या जाते. शहरात भरमसाठ तळघरे आहेत. प्रत्येक गल्लीत दोन ते तीन तळघरं असल्याचे आजही दिसतात. बारशी टाकळी येथे पूर्वी बारा वेशी होत्या व या गावाचे पूर्वीचे नाव टंकावती होते. टंकावतीचा अपभ्रंष होवून टाकळी असे झाले तर बारा वेशी असल्यामुळे बारषी. त्यामुळे गावाचे नाव बारशी टाकळी पडले. या ठिकाणी पूर्वी वाकाटकांची एक शाखा होती. येथील कालंका देवीच्या मंदिरात असलेल्या षिलालेखात भिल्लम, टेकल्ली असा उल्लेख आहे. भिल्लम हा यादव घराण्यातील राजा होता. येथे मुस्लीम, हिंदू, जैन धर्मियांचे मंदिरे व मषीदी आहेत. यावरून या ठिकाणी सर्वधर्मिय लोक नांदत होते, असे निदर्षनास येते. येथे एक तीन मजली पायविहिरही आहे. येथील चार जैन मुर्ती नागपूर येथील मध्यवर्ती वास्तू संग्रहालयात;  ठेवण्यात आलेल्या आहेत.
प्राचिन मूर्तीकलेचा अदभूत नमुना, कालिका देवी मंदिर :
   अकोला शहरापासून १५ ते १७ किलोमीटर अंतरावर असलेल्या बार्शीटाकळी शहरात अकराव्या शतकात काळ्या दगडांपासून कालंका देवीचे मंदिर बनवण्यात आले होते. एप्रिल ११७७ मध्ये या मंदिराचे बांधकाम करण्यात आल्याचे पुरावे उपलब्‍ध आहेत. मंदिरात कायम सूर्यप्रकाश राहावा अशा प्रकारचे बांधकाम करण्यात आले आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी लहानसा दरवाजा आहे. मंदिराच्या आत व बाहेरील भिंतीवर अप्रतिम कोरीव काम करण्यात आले आहे. मंदिराचे प्रवेशद्वार छोटे असून चार मोठ्या खांबावर मंदिराचा डोलारा उभा आहे. मंदिराच्या दगडांवर रामायण व महाभारत काळातील दृष्यांचे कोरीव नक्षीकाम करण्यात आले आहे.
















धार्मिक विधीच्या गरजा भागवण्यासाठी करण्यात आलेल्या आगळ्यावेगळ्या तलविन्यासाचे उदाहरण म्हणजे बार्शी टाकळी येथील देवी मंदीर, मुख मंडप, मंडप,अंतराळ आणि गर्भगृह अशी या मंदीराची रचना आहे. गर्भगृह पुर्वाभिमुख आहे.मात्र मंदीराचा अर्धमंडप मात्र मंडप्,अंतराळ आणि गर्भगृहाच्या रेषेत नसून मंडपाच्या काटकोनात म्हणजे उत्तरेला आहे. अर्धमंडपाच्या पायर्या मात्र मंडपामध्येच आहेत. त्यातून आपण थेट मंडपाच्या चतुष्कीत ( अंकणात ) प्रवेश करतो. या अंकणाला चार स्तंभ आहेत. मंडपाच्या अंतर्भागात पुर्वेला चार, दक्षिणेकडील भिंतीत सात आणि पश्चिमेकडील भिंतीत दोन देवकोष्टे आहेत. दक्षिणेकडील भिंतीत असणार्या सात देवकोष्टात सातमातृका होत्या. 










या मंदिराचे बांधकाम व त्यावर चहुबाजूने कोरलेल्या मुर्ती व विविध शिल्प अप्रतिम आहेत. प्राचिन बांधकाम शैलीचा एक अदभूत नमुना असलेले हे मंदिर पर्यटक व अभ्यासकांसाठी पर्वणीच आहे. मार्कंडा व खजुराहो येथे असलेल्या मंदिराप्रमाणेच यावर मुर्ती कोरल्या आहेत. अशाचप्रकारचे एक मंदिर लोणार येथे असून, ते दैत्यसूदन मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. 

























मंदीर उंच जगतीवर उभे असून त्यात काही थरांची पुनरावृत्ती करण्यात आलेली आहे. मंडोवर आणि मंडोवराच्या वर नेहमी आढळून येणारे थर आहेत. मंडप, अंतराळ आणि गर्भगृहावरील शिखरे पुर्ण पडून गेली आहेत. पण यातील एक असाधारण वैशिष्ट्य म्हणजे कपोतावर आढळणारा स्त्रीमुर्तीचा पट्ट. विमानाचा म्हणजे गर्भगृहाचा व शिखराचा मिळून तलविन्यास ताराकृती आहे. ज्या मुर्ती मंदीराच्या मंडोवरावर म्हणजे बाह्य भिंतीवर दिसतात, त्यावरुन हे मंदीरात वैष्णव व शाक्त पंथीय मुर्ती दिसतात. मंदीराच्या बाहेर असलेल्या कट्ट्यावर असलेल्या मुर्तीवर शेंदराचे इतके थर चढले आहेत कि मुळ मुर्तीचे स्वरुप ओळखणे कठीण झाले आहे. गर्भगृहावर जे प्रतिहारी कोरले आहेत, ते वैष्णव शैलीतील आहेत,मात्र मंदीराच्या बाह्य अंगावर असणार्या मुर्तीची लांछने, दक्षिण भिंतीतील सप्तमातृकासाठी असलेली सात देवकोष्ठे, मंडपाच्या स्तंभावरील मुर्ती हे मंदीर वैष्णव संप्रदायातील देवीचे असावे असे दर्शविते. एका स्तंभावर विष्णुचे अवतार तर दुसर्या स्तंभावर आठ दिशाना मुख करुन असलेले दिक्पाल दाखवले आहेत. आणखी एका स्तंभावर विष्णुची वेगवेगळी रुपे व देवीच्या मुर्ती दाखवल्या आहेत. 








मंदीराच्या स्तंभातील घटकांचा क्रम, मंदीरात असलेला शिलालेख यावरुन हे मंदीर, इ.स.१२ च्या उत्तरार्धात बांधले असावे असे वाटते. मुर्तीयोजनेच्या दृष्टीने हे मंदीर खुप निराळे आहे. मंदीराचे बांधकाम सुरु असताना पुरोहिताने जी मुर्तीयोजना ठरवून दिली होती, ती प्रत्यक्षात आणताना, मंदीराच्या पुर्व, दक्षिण व पश्चिम भिंतीवर देवकोष्ठे करुन त्यात मुर्ती बसविण्याखेरीज स्थपतीला दुसरा पर्याय नसावा. म्हणूनच मंड्पाचा प्रवेशमार्ग उत्तरेकडे ठेवावा लागला असावा. 


    मंदिर वेगळया धाटणीचे आहे. मंदिर वर्तुळाकार, चौकोनी किंवा अष्टकोनीही नाही, हेमाडपंथी तर मुळीच नाही. मंदिरावर कळस नाही. मंदिराच्या बाहय भिंतीवर चारही बाजुने मूर्ती कोरल्या आहेत. मंदिराच्या आतमध्ये चार खांब असून, त्यावर चारही बाजुने मूर्ती आहेत. खांबावर यक्षाच्या मुर्ती आहेत. हे यक्ष मंदिराचा भार पृथ्वीवर पडू देत नसून, आपल्या खांद्यावर घेतात. खांबावर व मंदिराच्या आतील भागात विविध शिल्प कोरल्या आहेत. तसेच मंदिराचे बांधकाम हे नागवंशीय कारागीरांनी केले असल्यामुळे ठिकठिकाणी नागाच्या आकृती व शिल्प आहेत. मंदिरावरील चारही बाजुच्या मुर्ती विशिष्ट आकारात असून, एकसुरात त्यांचे कोरीव काम केले आहे. मूर्तीचा भूमीतीय, गणीतीय आकार सारखाच आहे.


या मंदिरात पूर्वी कल्कीची मूर्ती होती. ती मूर्ती १९०४ साली इंग्रज अधिका-यांनी दिल्लीला नेली असल्याचे काही नागरिक सांगतात.येथील कालंका देविच्या मंदिरातील काळ्या दगडांवर काेरीव काम करण्यात आले आहे. त्यामधील काही दगड अखंड आहेत तर काही दगडांच्या तुकड्यांवर नक्शीकाम करण्यात आले आहे. 
 

सध्या मंदिरात शेंदूर लावलेले दोन उभे दगड असून, त्यांना मुकूट लावून देवीच्या रूपात सजविण्यात आले आहे. यावरुन ते आधूनिक काळातील असल्याचे स्पष्ट जाणवते. बार्शीटाकळी या दगडांवर देवी, देवतांचे मुखवटे अतिशय सुंदररित्या कोरण्यात आले आहेत. काही दगडांवर आतून व बाहेरुन कोरीव काम करण्यात आल्याने मंदिराला एतिहासिक वारसा लाभला आहे. 





मूर्तीवर सुर्यप्रकाश येण्यासाठी दोन छिद्रे आहेत. पहाटे या छिद्रातून मूर्तीवर प्रकाष पडतो. या मंदिराची सध्या दुरवस्था होत आहे. भिंतीच्या दगडांची पडझड होत असून, त्यावरील मुर्ती / मुर्त्या नामशेष होत आहेत. या मंदिराला भवानीचे देउळ म्हणूनही संबोधतात.


मंदिरातील शिलालेख:
यामध्ये एक शिलालेख आहे. यावर भिल्लम, हेमाद्रि, मालुगी वगैरे यादव वंशीय राजाची नावे असून, टेकल्ली राजधानी असा उल्लेख आहे. सदरहू शिलालेख शके १०९८ इ.स. ११७६ मधील आहे. यादव वंशाच्या दुस-या एखाद्या शाखेने टाकळीस राजधानी केले असावे व येथे स्वतंत्र राज्य असावे असा अंदाज इतिहासकार या.मा. काळे यांनी व-हाडचा इतिहास या ग्रंथात वर्तविला आहे.
      गत काही वर्षांपासून सदर मंदिराची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. त्यामुळे मंदिराचे संवर्धन करण्यासह त्याचे सौंदर्य कोरीव काम टिकून राहावे यासाठी याठिकाणी रासायनिक प्रक्रिया करण्यात येणार आहे, 

नामषेष होत असलेला किल्ला :
कालंका देवीच्या मंदिरासमोर दिसत असलेल्या अवषेषांवरून कधी काळी येथे भव्य किल्ला असावा असे निदर्षनास येते. मंदिरासमोरच मोठ मोठया दगडांच्या भिंतीचे अवषेष दिसतात. हाच किल्ल्याचा बाहेरचा परकोट आहे. थोडे आत गेल्यावर पडक्या अवस्थेत असलेले किल्ल्याचे प्रवेषव्दार दिसते. तसेच किल्ल्याच्या चारही बाजुच्या भिंती व आतील इमारती दिसतात. या इमारती पाहून किल्ल्याच्या भव्यतेची साक्ष पटते. किल्ल्याच्या प्रवेषव्दारावरच नगारखानाही आहे. सध्या या भिंतीची व खोल्यांची पडझड झाली आहे. तसेच परिसरातील नागरिकांनी त्यावर अतिक्रमण करून घरे बांधली. प्रषासनाने वेळीच दखल घेतली नाही तर शिल्लक असलेले अवषेषही राहणार नसून, त्या ठिकाणी वस्ती होणार आहे.

प्राचिन जलसाठवणींचा नमुना पायविहीर :
पूर्वी पाण्याच्या सोयीसाठी पायविहीर, बारव बांधण्यात येत होत्या. सध्याच्या वर्तुळाकार आकाराच्या खिराडी लावून पाणी ओढणा-या विहिरींपेक्षा त्यांची बांधणी पूर्णता वेगळी राहत होती. या विहिरी चौकोनी, अष्टकोनी किंवा आयाताकृती बांधण्यात येत होत्या. मराठवाडयात अनेक बारव या महादेवाच्या पिंडीसारख्या बांधलेल्या आहेत. बारवमध्ये पाणी काढण्यासाठी पाय-या असतात. तसेच आतमध्ये खोल्याही बांधण्यात येत होत्या. बुलडाणा जिल्हयातील लोणार व सिंदखेड राजा येथे पायविहीरी मोठया प्रमाणात पहायला मिळतात. अकोला जिल्यातही काही गावांमध्ये पायविहिरी आहेत. मात्र, वापरात नसल्यामुळे त्यांची दुरवस्था झाली असून, काही विहिरी खचल्या आहेत. पूर्वी जेथे मोठया प्रमाणात वस्ती राहत होती तेथेच पायविहिरी बांधण्यात येत होत्या. पुरातन काळी पिण्याच्या पाण्याचे पायविहीरी महत्वाचे साधन होते. जिल्हयात बार्षिटाकळी, अडगाव, आकोट यासह आणखी काही गावांमध्ये पायविहिरी आहेत.
बार्शिटाकळी येथील पायविहीर :
येथील पायविहीर चैकोनी असून, तीन मजली आहे. प्राचिन काळातील विहिरींच्या बांधकामाचा हा एक उत्कृष्ट नमुना आहे. या विहिरीत बाराही महिने पाणी असते. विहिरीचे बांधकाम विटांमध्ये करण्यात आले आहे. विहिरीत उतरण्यासाठी तीन बाजुने पाय-या आहेत. पहिल्या माळयावर एका बाजुने दोन खोल्या आहेत. या खोल्यांमध्ये थंडावा असतो, त्यामुळे परिसरातील नागरिक उन्हाळयात येथे आराम करतात. त्याखालच्या मजल्यावर पाणी असल्यामुळे जाता येत नाही. सध्या ही विहीर वापरात नाही. वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी या विहिरीतील खोल्यांमध्ये स्थानिक लोक महाप्रसाद, रोडगे करीत होते.




आकोट येथील पायविहीरः
आकोट येथे नंदिकेष्वर मंदिरासमोर एक पायविहीर आहे. विहिर खचली असून, सर्वत्र पडझड झाली आहे. सर्वत्र झुडूपे वाढली आहेत. बांधकामावरून विहिर भव्य असल्याचे निदर्षनास येते. ही विहीर अष्टकोनी असून तीन मजली आहे. आतमध्ये खोल्या आहेत. सध्या विहिरीची अवस्था कचराकुंडीसारखी झाली आहे. विहिरीमध्ये उतरण्यासाठी पाय-या आहेत. विहिर बरीच मोठी आहे.
व्दारकेष्वर मंदिरासमोरील पायविहीरः आकोट- हिवरखेड मार्गावर असलेल्या अडगाव येथे व्दारकेष्वर मंदिरासमोर एक पायविहीर आहे. विहिरीचे बांधकाम विटांमध्ये करण्यात आले आहे. आतमध्ये उतरण्यासाठी पाय-या आहेत.
भव्यतेची साक्ष देणारे खोलेश्वर मंदिर :
बार्शिटाकळी येथे भव्य असे महादेवाचे हेमाडपंथी मंदिर आहे. हे मंदिर खोलेश्वराचे मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. मंदिराचे बांधकाम दगड व विटांनी केले असून, मंदिर तीन मजली आहे. नदीकिनारी असलेल्या या मंदिराचा मुळ गाभारा नदिपात्रात आहे. गाभा-यात षिवलिंग असून, तेथे बाराही महिने पाझरणारा एक झरा आहे. या झ-यातून येणा-या पाण्याने शिवलिंग पाण्यात बुडते व पिंडीला नैसर्गिकच जलाभिषेक होतो. शिवलिंग असलेल्या गाभा-यापूढेच नंदी आहे. गाभा-यासमोरच गणेषाची मूर्ती आहे. तसेच आतमध्येच एक कालंका देवीचे उपमंदिर आहे. यामध्ये चार फुटाची कालंका देवीची मूर्ती आहे. मंदिराच्या पायथ्याषी दोन्ही बाजुने किर्तीमुख आहे. या देवीच्या मंदिराच्या खांबांवरही बारिक नक्षी कोरलेली आहे. मंदिरांचे बांधकाम नागवंशीयांनी केल्यामुळे खांबांवर नागाचे चिन्ह आहे. मंदिराचा भार आपल्या खांद्यावर घेवून असलेले भारोत्तोलक यक्ष प्रत्येक खांबांवर आहेत. मंदिरावर तीन ते चार गोपुरं आहेत. नदीकिनारी असलेल्या या मंदिराचे बांधकाम टनक व सुंदर केले आहे. त्यामुळे मंदिर आकर्षक दिसते.....


लिखाण ... विवेक चांदूरकर, अकोला
























कमळेश्वर मंदिर, लोहारा, यवतमाळ
यवतमाळ जिल्ह्यातील लोहारा येथील छोट्याशा गावात पुरातन महादेव मंदिर अस्तित्वात आहे, हे मंदिर जवळपास 1100 वर्षे जुने आहे.
अमरावती रोडवर यवतमाळ पासून अवघ्या 5कि.मी. अंतरावर लोहारा हे गांव आहे. अमरावतीला जातांना अगदी रस्त्यावरून येथील महादेवाचे हेमाडपंथी मंदिर दिसते. हे मंदिर यादवकालीन असून यादवांचे प्रधान हेमाद्री यांनी त्याची बांधणी केल्याचे मंदिराच्या धाटणीवरून लक्षात येते. हे मंदिर म्हणजे शिल्पकलेचा उकृष्ट नमुना असल्याचे दिसून येते. ह्या मंदिराचा परिसर अत्यंत प्रसन्न व शांत आहे. अशा या मंदिरातील महादेवाची उंच पिंड बघायला मिळते. महादेवाच्या पिंडीसमोरील श्री गणेशाचे विलोभनीय रूप आपणास पाहावयास मिळते. महाशिवरात्रीला येथे भक्तांची गर्दी जमते. हे प्राचीन मंदिर निसर्गरम्य परिसरात असल्यामुळे भक्तांना एक अद्भुत शांती चा अनुभव देते.
 
 
 



















पुरातन शिव मंदिर, कोथळी, मोताळा, बुलढाणा
कोथळी येथे दोन पुरातन शिव मंदिर आहेत. यापैकी एक गावाच्या बाहेर विश्वगंगा नदीच्या तीरावर आहे तर दुसरे गावात आहे. आज आपण गावातील मंदिर बघुया. ह्या मंदिरावरील शिल्प पाहून हे मंदिर त्याकाळी विष्णूचे मंदिर असावे. असे दिसून येते. मात्र आज रोजी मंदिरात शिवलिंग स्थापित आहे.
या मंदिरात श्रावण महिन्यात भाविकांची मोठी गर्दी होते. मंदिराच्या चहूबाजूने यक्षाचे शिल्प कोरलेले दिसून येतील. हे यक्ष मंदिराच्या भार आपल्या खांद्यावर घेऊन आहेत. तसेच चहूबाजूने दगडावर सुरेख नक्षी कोरल्या गेली आहे.
ह्या शिवलिंगाला शाळिग्राम महादेव म्हणून ओळखतात ह्या शिवलिंगाच्या खाली विष्णूचे वाहन असलेल्या गरुडाच्ये शिल्प आहे. सकाळी सूर्य उगवताना ह्या शिवलिंगावर सूर्यकिरणे पडतात त्यामुळे ह्या मंदिराची रचना किती वैशिष्ट्य पूर्ण पद्धतीने केलेली आहे हे बघून आपण भारावून जाल..!
मंदिराच्या प्रवेशद्वारावरील बारीक कोरीव मूर्ती व शिल्प कोरण्यात आलेली दिसून येतील येथे विष्णू देव व सुरसुंदरीचे शिल्प देवी देवतांची अनेक उल्लेखनीय शिल्प ह्या मंदिरात बघायला मिळतातं...!
माहित आणि फोटो - Stories by Atul









नंदी मंदिर, महागाव कसबा, यवतमाळ
महागाव कसबा येथील प्राचिन शिवालयाच्या गाभाऱ्यातील शिवलिंगा समोर पूर्वेला नंदी मंदिर कोरीव स्तंभावर डौलात उभं आहे. घुंगरमाळा, बेलपत्री व चाळ अशा आभूषणांनी भव्य असा नंदी आपले लक्ष वेधून घेतो. सदर नंदी हा मैसूरच्या चामुंडेश्वर मंदिरातील जगप्रसिद्ध पाषाणी नंदी मूर्तीची लघुप्रतिकृती आहे. तो नंदी जणू भगवान शंकराची आराधना करतोय. शेतकऱ्यांचा सण असलेल्या पोळ्याच्या दिवशी नंदीची मनोभावे पूजा करतात. मंदिर परिसरात बैल पोळा भरतो. यावर्षी मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने घरीच पारंपरिक पोळा सण साजरा केला ..!
माहिती - सुनिल आरेकर

महाराष्ट्राच्या भूमीत प्राचीन संस्कृतीचे दर्शन घडविणारे अनेक गड-किल्ले, मंदिरे वैभवशाली इतिहासाची साक्ष देतात. प्राचीन कलाविष्काराचा उत्तम नमुना असलेले यवतमाळ जिल्ह्यातील महागाव कसबा येथील हेमाडपंती शिवालय अप्रतिम शिल्पकलेच्या दुनियेत घेऊन जाते.

Mahashivratri festival of Mahagaon celebrates the tradition of social cohesion | महागावच्या महाशिवरात्री उत्सवाने जपली सामाजिक एकोप्याची परंपरा

महागावच्या महाशिवरात्री उत्सवाने जपली सामाजिक एकोप्याची परंपरा

  • सुनील पु. आरेकर

महाराष्ट्राच्या भूमीत प्राचीन संस्कृतीचे दर्शन घडविणारे अनेक गड-किल्ले, मंदिरे वैभवशाली इतिहासाची साक्ष देतात. प्राचीन कलाविष्काराचा उत्तम नमुना असलेले यवतमाळ जिल्ह्यातील महागाव कसबा येथील हेमाडपंती शिवालय अप्रतिम शिल्पकलेच्या दुनियेत घेऊन जाते. शिवशंकर व भगवान विष्णू यांची मूर्ती असल्यामुळे संयुक्त असे विदर्भातील एकमेव मंदिर म्हणता येईल. तेथे महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर सामाजिक एकोपा निर्माण करणारा यात्रा महोत्सव वर्षानुवर्षांपासून साजरा केला जातो.
दारव्हा-आर्णी राज्य मार्गावर असलेल्या महागाव कसबा येथे सर्वधर्मीय गुण्यागोविंदाने नांदतात. सामाजिक एकात्मता जपणारा महाशिवरात्री यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रेरणादायी परंपरेची साक्ष देणारे भव्य
शिवमंदिर आजही डौलात उभे आहे. प्राचीन संस्कृती, कलेचे दर्शन घडविणारे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महागावचे हेमाडपंती शिवालय होय. कळमेश्वरी नदीच्या तीरावर ते वसले आहे. विशेष म्हणजे कळसाखाली विष्णू तर गाभाऱ्यात शंकराचे अधिष्ठान आहे. भगवान विष्णूंच्या मूर्तीसमोर गरुड व शिवलिंग असलेल्या गाभाऱ्यासमोर नंदी हे दोन्ही देवतांचे वाहन आराधना करतानाचे मनोहारी दृश्य प्रसन्न करते. या वैशिष्ट्यामुळे कळमेश्वर मंदिर या नावाने संबोधले जाते. यादवकालीन राजवटीत १२६९-७० दरम्यान हेमाद्री नावाचा प्रधान हा प्रख्यात पंडित व शिल्पतज्ज्ञ होता. त्याने उभारलेल्या मंदिरांना हेमाडपंती म्हणून संबोधले जाते. गावात प्रवेश केल्यावर कळमेश्वराचे हेमाडपंती शिवालय मोठ्या दिमाखात आपला डोलारा सांभाळून उभे दिसते. सदर मंदिराचे महाद्वार पूर्वाभिमुखी असून दुमजली आहे. पुरातत्त्व विभागाने मुख्य प्रवेशद्वाराचा जीर्णोद्धार केला आहे. पडझड झालेल्या प्रवेशद्वाराची उभारणी झाल्याने मंदिराच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे. मंदिराची रचना अचंबित करणारी आहे. बाहेरच्या बाजूने चार व आतील बाजूने चार अशा अष्ट स्तंभावर हे मंदिर विराजमान आहे. महाद्वाराचे स्तंभ चित्तवेधक असून आत प्रवेश केल्यावर कोरीव खांबावर आधारलेले सभामंडप आढळते. प्रत्येक खांबावर रामायणकालीन चित्रे कोरलेली आहेत. दहा पायºया उतरल्या की गाभाºयात मधोमध शिवशंकराचे स्वयंभू शिवलिंग दृष्टीस पडते. शिवलिंगाच्या अगदी समोर मंदिराच्या पूर्वेला नंदी मंदिर आहे. घुंगरमाळा, बेलपत्री व चाळ अशा आभूषणांनी सजलेला भव्य नंदी लक्ष वेधून घेतो. हा नंदी म्हैसूरच्या चामुंडेश्वर मंदिरातील जगप्रसिद्ध नंदी मूर्तीची लघुप्रतिकृती आहे. पोळ्याच्या दिवशी नंदीची मनोभावे पूजा केली जाते. मंदिराची शिल्परचना औंढा नागनाथ, वेरु ळचे कैलास लेणे आदी प्राचीन वस्तूच्या शिल्पासारखी आहे. या मंदिराला क वर्ग तीर्थक्षत्र दर्जा प्राप्त आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने केंद्र शासनाकडून प्राप्त निधीतून मंदिराच्या प्रवेशद्वाराचा जीर्णोद्वार केला असून या प्राचीन शिवालयाला गतवैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न होत आहे. मंदिरालगत लघुसिंचन प्रकल्प पूर्णत्वास आल्यामुळे हा परिसर हिरवळीने नटला असून पर्यटकांना खुणावतोय.
शिवमंदिरात महाशिवरात्री सप्ताहात परिसर भक्तिरसात न्हाऊन निघतो. भागवत, भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सप्ताहात दिवसरात्र अखंड टाळ -वीणेच्या गजरात ‘जय जय राम कृष्ण हरी’ असा हरिनाम जप केला जातो. सातही दिवस अन्नदान केले जाते. महाशिवरात्रीला आबालवृद्ध भाविक उपवास करतात. शिवलिंगाची पालखीतून भव्य मिरवणूक काढली जाते. विदर्भातून हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. विशेष म्हणजे दोन दिवस सामाजिक एकोपा जपणारा यात्रा महोत्सव सर्वांसाठी पर्वणी ठरतो. यामध्ये सर्वधर्मीय उत्साहात सहभागी होतात. ग्रामीण भागातील महागावची जत्रा एक नवी ऊर्जा देऊन जाते.

https://www.lokmat.com/manthan/mahashivratri-festival-mahagaon-celebrates-tradition-social-cohesion/


अज्ञातवासातील बार्शी टाकळी येथील कालिंका देवी मंदिर-

काही महिन्यांपूर्वी अकोल्याला जाणे झाले तेव्हा पुनश्च एकदा असद गडावरून इतिहासाची वाटचाल सुरू झाली आणि मग बार्शी टाकली जाण्याची इच्छा झाली.
बार्शी टाकळी येथील कालिका देवी मंदिर हे अतिशय प्राचीन असे सुमारे आठशे वर्षांपूर्वीचे मंदिर आहे. हे मंदिर गर्भगृह अंतराळ सभामंडप युक्त असे आहे. या मंदिराची बांधणी सुरेख असून त्याच्या कलशाचा भाग नष्ट झाला आहे. मात्र तत्कालीन शिल्पकलेचा तो एक आजोड आणि अप्रतिम नमुना आहे. मंदिराचे प्रवेशद्वार हे नेहमीप्रमाणे गाभाऱ्याच्या
समोर नसून सभामंडपाच्या बाजूस काटकोनात आहे. ते गाभाऱ्याच्या डाव्या बाजूस आहे. सभामंडप साधारणत चौकोनी असून गाभारा हा चांदणीच्या आकाराचा आहे.

अप्रतिम नक्षीदार स्तंभ

सभामंडपास चार प्रमुख नक्षीदार खांबांचा आधार आहे. त्यावर देवदेवतांच्या आकृती कोरलेल्या आहेत. मंदिरा वरील विविध देवतांच्या ज्या प्रतिमा आहेत त्यामध्ये प्रमुख महाकाली महिषासुरमर्दिनीच्या आहेत.
मंदिराच्या भिंती नक्षीदार असून त्यावर विविध आकृत्या कोरलेल्या अनेक स्तरांनी युक्त आहेत.

गर्भगृह व सभामंडप यांच्या बाहेरील एका पट्टीत देवादिकांची शिल्पे आहेत. काही मिथुन शिल्पेही आहेत.
मंदिराच्या भिंतीवर एक लांबलचक संस्कृत भाषेतील शिलालेख आढळतो. मात्र तो बऱ्याच प्रमाणात नष्ट झालेला आहे. तरी त्यावरील तारीख गुरुवार वैशाख शुक्ल ७, दुर्मुख संवत्सर शके १०९८ अशी, म्हणजे ७ एप्रिल ११७७ अशी आहे.(महाराष्ट्र व गोवे शिलालेख)
हा लेख संस्कृत व नागरी लिपी मध्ये कोरलेला आहे. या शिलालेखाप्रमाणे टेक्कली येथून यादवांचा एक मांडलिक राजा राज्य करीत होता. दंतुराज हा या राजवंशाचा मूळपुरुष तर लेख घेताना हेमाद्रीदेव हा राजा शाशन करीत होता.
हिमाद्रीदेवाने आपल्या राजधानीवर चालून आलेल्या मालुगीपुत्र राजल याचा पराभव केल्याचा उल्लेख शिलालेखात केलेला आहे.
या राजाने आपल्या सत्कृत्यांनी राजधानी टेक्कलीस वाराणसीचे सौंदर्य प्राप्त करून दिले आहे असा उल्लेख त्यात केला आहे.
लेखांमध्ये पुढे वंशपरंपरेने मंत्रीपद भोगत असलेल्या भिल्लम या वल्लभ गोत्रीय मंत्र्याची वंशावळ दिलेली आहे. या घराण्यातील गामियाय या व्यक्तीने टेक्कलीस विष्णूचे मंदिर बांधले तसेच लोककल्याणासाठी विहिरी व तलाव बांधल्याचा उल्लेख केलेला आहे.
असो, प्रस्तुत मंदिरातील कालिंका मातेची मूर्ती काही दूर अंतरावर असलेल्या खोलेश्वर शिव मंदिरांमध्ये स्थापन केलेली आहे.

 खोलेश्वर मंदिरात स्थापन केलेली कालिंका मूर्ती

दुसरे महत्त्वाचे म्हणजे यादवांचा सेनापती खोलेश्वर याचा हा प्रशासकीय भाग असावा कारण बार्शीटाकळी तसेच अकोला व इतरही भागामध्ये खोलेश्वर या नावाने शिव मंदिरे बांधलेली आहेत.

काही दूर अंतरावर असलेले खोलेश्वर मंदिर

आता प्रश्न येतो तो बार्शी टाकळी येथील हिंदू प्रजेचा घट व मुस्लिम संख्येची वाढ. त्यास मला असे कारण वाटते की बहामनीच्या कालखंडांमध्ये हा मुलुख कुण्यातरी मुस्लिम सरदाराकडे असावा. बहामनी राजवटीचा अभ्यास करताना त्यामध्ये हसन बार्शी असं एका मुस्लिम सरदाराचा नाव आढळत. बहुतेक हसन बार्शी या सरदाराकडे व्यवस्थेसाठी हा मुलुख असावा. त्याने येथे आपली जहागीर वाढविली व टेक्कली या गावास बार्शी टाकली असे नाव प्राप्त झाले असावे असे वाटते. अर्थात अभ्यास सुरू आहे, ज्ञान असीम आहे!
असो, असे हे अप्रतिम कलेचे दिव्य स्थान आज बार्शीटाकळी गावाच्या बाहेर बाजूस एकाकी अवस्थेत पडलेले आहे. यादवकाळातील  टेक्कळीचे सुवर्णयुग आता राहिले नसले तरी नंदादीपाप्रमाणे या मंदिराचे तेच आजही शाश्वत आहे. शासनातर्फे त्याच्या पुनर्निर्माणाचे कार्य बहुतेक अर्धवट राहिल्याचे दिसते, काम थांबले असावे. अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील विशेष म्हणजे विदर्भातील महाकालीचे हे मंदिर हा कलेचा अजोड नमुना आजही सामान्यांच्या दृष्टीपासून फार दूर आहे.
-प्रा रवि आत्माराम बाविस्कर

-शौर्यशंभुचा शिलेदार
।।फक्तइतिहास।।







No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...