मराठवाडा हा मंदिरस्थापत्याने बहरलेला आहे. गावोगावी आपल्याला देखणी मंदिरे आणि त्यावर केलेली सुंदर शिल्पकला बघायला मिळते. लातूरच्या दक्षिणेला अंदाजे ४७ कि.मी. अंतरावर असलेल्या निलंगा या तालुक्याच्या ठिकाणी इ.स. च्या १२ व्या शतकाच्या अखेरीस बांधलेले एक सुंदर शिवमंदिर उभे आहे.
नीलकंठेश्वर मंदिर हे त्याचे नाव. कल्याणी चालुक्यांच्या काळात बांधल्या गेलेल्या या मंदिरावर एकापेक्षा एक सुंदर, सुडौल अशा सुरसुंदरी कोरलेल्या आहेत. खूपच प्रमाणबद्ध आणि विविध अशा या सुरसुंदरींनी हे मंदिर नटलेले आहे.
प्राचीन काळी निलंगा शहराचे नाव निरलिंगपुर होते. हे नाव भगवान शिवशंकराच्या नीळकंठेश्वरेच्या नावावरुन पडले. प्राचीन काळच्या शिल्पकामाचे हे मंदीर हे एक उत्तम उदाहरण आहे. मंदीराच्य बाह्यांगावर कोरीव स्तंभ आणि सुरसुंदरीची शिल्प आहेत. मुखमंडप, मंडप आणि मंडपाला जोडलेली तीन गर्भगृहे असा या मंदीराचा तलविन्यास आहे.
मंदीराचा मुख्य प्रवेशमार्ग म्हणजेच मुखमंडपाचा मुळ भाग पडला आहे.त्यामुळे हा भाग नव्याने बांधला आहे. मंदीराच्या समोर १२.१९ X १८.१९ मीटर आकाराचे प्राकार आहे. मंदीरात प्रवेश करताना २.७८७ स्क्वे. मीटरचा सभामंडप लागतो. मंडपाच्या मुखभागात वामनभिंती असून दरवाज्याजवळ दोन स्तंभ आहेत. मुखभाग सोडल्यास मंडपाच्या दोन बाजु बंद आहेत. मंड्पाच्या प्रत्येक कोपर्यात स्तंभाची चतुष्की आहे. म्हणजेच मंडप एकुण सोळा स्तंभावर उभा आहे. मंडपाच्या मध्ये रंगशीला असून तीच्यावर एक चतुष्की आहे.
मंदिराच्या मंडपात एका देवकोष्ठात महिषासुरमर्दिनी तर दुसऱ्या देवकोष्ठात अजून एक दुर्मिळ अशी अनंतविष्णूची स्थानक प्रतिमा पाहायला मिळते. कल्याणी चालुक्यांच्या मंदिरात दिसणारे अजून एक शिल्प म्हणजे सप्तमातृका. या मंदिरात सप्तमातृकांचा पट बघायला मिळतो. या सात मातृकांच्या सोबत गणपती कोरलेला आहे.
या मंदिराची अजूनही काही वैशिष्ट्ये दिसून येतात. हे मंदिर त्रिदल म्हणजे तीन गाभारे असलेले आहे. मंडपातून या तीनही गाभाऱ्यात जाण्यासाठी प्रवेशमार्ग आहेत. प्रत्येक गाभारा आणि मंडप याच्यामध्ये अंतराल आहे. हि दोन्ही बाजुची गर्भगृहे ०.५५७ स्क्वे.मीटर आकाराची आहेत.
पूर्वाभिमुख मुख्य गाभाऱ्यात शिवलिंग असून दक्षिणाभिमुख गाभाऱ्यात विष्णूची केशव रूपातली अत्यंत सुंदर मूर्ती उभी आहे.
या गाभाऱ्याच्या ललाटावर कोरलेली भूवराह प्रतिमा खूप सुंदर. या दोन्ही गाभार्यावर मुख्य देवतेच्या परिवार देवाच्या मुर्ती दिसतात. शिवशंकराच्या गाभार्यावर कार्तिकस्वामी, गणपती, नंदी या मुर्ती दिसतात.
इथल्या तिसऱ्या म्हणजेच उत्तराभिमुख असलेल्या गाभाऱ्यात एक आगळीवेगळी आणि सर्वांगसुंदर अशी मूर्ती दिसते. ती आहे उमामहेश्वर आलिंगनमूर्ती. इथे शिवाच्या डाव्या मांडीवर देवी बसलेली असून शिवाचा डावा हात तिच्या डाव्या खांद्यावर ठेवलेला दिसतो. यांच्या पायाशी एका बाजूला मोरावर बसलेला कार्तिकेय तर दुसरीकडे गणपती दिसतो. पण हिला म्हणायचे हरगौरीची मूर्ती. त्याला कारणही तसेच आहे.
हिंदू दैवतशास्त्रात तसेच समाजजीवनात गौरीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. गौरी हे शिवाच्या शक्तीचे रूप मानले गेले आहे. विविध पुराणे आणि ग्रंथांमधून गौरीची प्रतिमालक्षणे दिलेली आहेत. अपराजितपृच्छा या ग्रंथामधे द्वादशगौरीं,चा उल्लेख येतो, तर अग्निपुराणामध्ये गौरी मूर्तीचे सामूहिक पूजन केले जाते असे सांगितले आहे. रूपमंडन या ग्रंथात तिची जी लक्षणे सांगितली आहेत त्यानुसार गौरी ही गोधासना, चार हात, तीन डोळे, आणि आभूषणांनी युक्त असावी असे म्हटले आहे. गौरीकडे कुमारिका म्हणूनसुद्धा पाहिले जाते.हरगौरी. गौरी ही घोरपड या वाहनावर उभी असल्याचे दाखवले जाते.

मुख्य गर्भगृहात शिवपिंडी असून डावीकडील गर्भगृहात तीन फूट उंचीची सुरेख अशी विष्णुप्रतिमा आहे. त्याच्याच समोरच्या गर्भगृहात उमामहेश्वर आलिंगन मूर्ती दिसते. शिवाच्या डाव्या मांडीवर देवी बसली असून शिवाचा डावा हात तिच्या डाव्या खांद्यावर ठेवलेला दिसतो. परंतु इथेच एक अजून वैशिष्टय़ आहे. ते म्हणजे शिव आणि पार्वती ज्या पीठावर बसलेले दाखवले आहेत त्याच्या पायाशी एका घोरपडीचे शिल्प कोरलेले आहे. घोरपड ही चिवटपणासाठी प्रसिद्ध आहे. एखाद्या ठिकाणी तिने पकड घेतली तर ती अत्यंत चिवटपणे धरून ठेवते. तिथून तिला हलवणे केवळ कठीण असते. कथा, त्यामागील तत्त्वज्ञान आणि त्यानुरूप घडवलेल्या देखण्या मूर्ती हे आपल्याला मिळालेले वरदानच म्हणायला हवे.
पार्वती ही कधी उमा असते तर कधी ती गौरी असते. तिच्या ह्या रूपांतील फरक मूर्तिकारांनी अतिशय कौशल्याने आणि नेमकेपणाने दाखवलेला आहे. जेव्हा पार्वती ही गौरी रूपात दाखवायची असते तेव्हा तिच्या पायाशी तिचे वाहन म्हणून गोधा किंवा घोरपड आवर्जून दाखवली जाते. घोरपड चिवटपणासाठी प्रसिद्ध आहे. एखाद्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी कठोरातील कठोर तप करण्याचे सामर्थ्य हे घोरपडीच्या रूपाने दाखवले जाते.
पार्वतीने शिवाच्या प्राप्तीसाठी अत्यंत तीव्र आणि कठोर तपश्चर्या केली होती. तिची शिवप्राप्तीची इच्छा अत्यंत प्रबळ होती. त्यासाठी तिने अत्यंत चिवटपणे आपली तपश्चर्या चालू ठेवली. तिची अवस्था एखाद्या पर्णहीन वृक्षाप्रमाणे झालेली होती यावरूनच तिला अपर्णा असे नाव मिळाले आहे. पार्वतीच्या या चिवट तपश्चर्येला घोरपडीच्या चिवटपणाची उपमा दिलेली दिसते. आणि त्याचे प्रतिबिंब आपल्याला मूर्तिशास्त्रामध्येसुद्धा दिसते. हेच वैशिष्ट्य निलंगा इथल्या मूर्तीत आहे. इथे शिव आणि पार्वती ज्या पीठावर पसलेले दाखवले आहेत त्याच्या पायाशी एका घोरपडीचे शिल्प कोरलेले आहे. ‘गोधासना भवेदगौरी’ असे तिचे वर्णन रूपमंडन या ग्रंथात केले असल्यामुळे ह्या निलंग्याच्या प्रतिमेला शिवपार्वती असे न म्हणता हरगौरी प्रतिमा असे संबोधले जाते. शिव म्हणजे हर आणि पार्वतीची होते गौरी. ह्या हरगौरी प्रतिमा खूपच दुर्मीळ आहेत. या अत्यंत देखण्या प्रतिमेवर दक्षिण भारतातल्या शिल्पकलेची छाप पडल्याचे जाणवते.
हिंदू विवाह पद्धतीत गौरीहराची पूजा करण्याचा विधी प्रामुख्याने केला जातो. त्याचा संदर्भ याच संकल्पनेशी जोडलेला आहे.
त्यामागेदेखील घोरपडीच्या चिवटपणाचेच तत्त्व सांगितले आहे. या प्रकारच्या मूर्ती घडवण्यामागे ते तत्त्वज्ञान लोकांच्या समोर दृग्गोचर व्हावे हा उदात्त हेतू तत्कालीन राजसत्तांचा आणि शिल्पकारांचा होता हे विशेषकरून जाणवते. ती प्रतिमा आणि नीलकंठेश्वर मंदिर या दोन्हीही गोष्टी मुद्दाम जाऊन पाहण्याजोग्या आहेत.
निलंगा इथल्या नीलकंठेश्वर मंदिरामधील ही हरगौरीची प्रतिमा चांगली साडेचार-पाच फूट उंचीची भव्य अशी आहे. अत्यंत देखण्या या प्रतिमेवर दक्षिण भारतातल्या शिल्पकलेची छाप पडल्याचे जाणवते. शिवाच्या उजव्या वरच्या हातात त्रिशूळ असून उजव्या खालच्या हातात अक्षमाला असून तो हात अभयमुद्रेत दाखवला आहे. गौरीच्या डाव्या हातात बीजपूरक आहे. शिवाला जटामुकुट असून देवीच्या केसांवर फुलांची वेणी दिसते आहे. ते बसलेल्या पीठावर शिवाच्या पायाशी नंदी असून देवीच्या पायाशी घोरपड अत्यंत सुबकतेने शिल्पित केलेली दिसते.









मंदिराचे हे अंतरंग पाहून प्रदक्षिणा घालायला सुरवात केली कि मंदीराच्या मंडोवरावर म्हणजे बाह्यांगावर सुरसुंदरीची शिल्प बघायला मिळतात. मंदिराच्या बाह्यांगावर विविध सुरसुंदरी कोरलेल्या आहेत. त्यात डालमालिका, दर्पणा, नुपूरपादिका, कर्पूरमंजरी, शुकसारिका सारख्या नितांत देखण्या सुंदरी दिसून येतात. यांच्याचबरोबर, मदन, विष्णू, चामुंडा, गौरी यांच्याही मूर्ती मंदिराच्या बाह्यांगावर कोरलेल्या आहेत. मंदिराला शिखर नाही. आणि सध्या या मंदिराला ऑइल पेंट दिलेला आहे. तरीसुद्धा इथल्या मूर्ती आणि त्यांचे सौंदर्य यात कुठेही कमीपणा आलेला नाही. देखणे शिल्पसौंदर्य आणि सुडौल अशा मूर्तींची मांदियाळी या मंदिरावर बघायला मिळते.

या मंदिराच्या मंडोवरावरील देवकोष्टकात महिषासुर मर्दिनीची मूर्ती आहे. महिषासुराचा वध करण्यासाठी देवीने नउ दिवस उपासना केली. देवीला सर्व देवांनी आपली शस्त्रे बहाल केली. मग ती युद्धावर गेली अशी कथा आहे. या मूर्तीतील वेगळेपण चटकन नजरेत भरते ते म्हणजे देवीच्या हातातील शंख व चक्र ही विष्णुची आयुधे. ही महिषासुर मर्दीनीच आहे का? चक्र धरण्याची पद्धतही जरा वेगळी आहे. शिल्पकाराने चारच हात दाखवले आहेत. सहसा आठ किंवा जास्त हात दाखवले जातात. महिषासुर केवळ डोके न दाखवता पूर्ण दाखवला आहे. खाली रेडाही पूर्ण आहे. डाव्या बाजूला सिंह आहे पण तो नीट दिसत नाही.
देवीचा त्रिशुळ जो भंगला आहे तो जोरकसपणे तिरका महिषासुराच्या देहात घुसवला आहे. देवीचा एक पाय महिषासुराच्या देहावर एक तिरका जमिनीवर. अतिशय सुरेख कलात्मक असा तोल साधलेले शिल्प. तिचे किमान दागिने, चेहर्यावरचे ठाम भाव, नाजूकता स्त्रीची स्वाभाविकता न सोडता शक्ती प्रकट करायची मोठं अवघड कसब इथे साधल्या गेले आहे. किमान अलंकरण आणि कमाल परिणाम असे हे शिल्प आहे.तिचे किमान दागिने, चेहर्यावरचे ठाम भाव, नाजूकता स्त्रीची स्वाभाविकता न सोडता शक्ती प्रकट करायची मोठं अवघड कसब इथे साधल्या गेले आहे. किमान अलंकरण आणि कमाल परिणाम असे हे शिल्प आहे.
लातूरच्या जवळ असलेले इतके सुंदर मंदिरस्थापत्य वेळ काढून बघावे असे आहे.निलंगा शहर लातूरच्या दक्षिणेला अंदाजे ४७ कि.मी. अंतरावर आहे. लातुरपासून इथे जाण्यासाठी बससेवा मोठ्या प्रमाणात आहे.तसेच जव़ळचे रेल्वे स्टेशन लातुर हेच आहे.
संदर्भ :-
१) लातुर जिल्हा गॅझेटीयर
२) स्थापत्य- महाराष्ट्र शासन
३) श्री. आशुतोष बापट, श्री.श्रीकांत उमरीकर यांचे लिखाण
४) https://www.ishtadevata.com/temple/nilkatheshwar-mandir-nilanga-latur/ हि वेबसाईट
नीलकंठेश्वर मंदिर हे त्याचे नाव. कल्याणी चालुक्यांच्या काळात बांधल्या गेलेल्या या मंदिरावर एकापेक्षा एक सुंदर, सुडौल अशा सुरसुंदरी कोरलेल्या आहेत. खूपच प्रमाणबद्ध आणि विविध अशा या सुरसुंदरींनी हे मंदिर नटलेले आहे. नुसत्या सुरसुंदरीच नव्हे तर या मंदिराची अजूनही काही वैशिष्ट्ये दिसून येतात. हे मंदिर त्रिदल म्हणजे तीन गाभारे असलेले आहे. मंडपातून या तीनही गाभाऱ्यात जाण्यासाठी प्रवेशमार्ग आहेत. प्रत्येक गाभारा आणि मंडप याच्यामध्ये अंतराल आहे. पूर्वाभिमुख मुख्य गाभाऱ्यात शिवलिंग असून दक्षिणाभिमुख गाभाऱ्यात विष्णूची केशव रूपातली अत्यंत सुंदर मूर्ती उभी आहे. या गाभाऱ्याच्या ललाटावर कोरलेली भूवराह प्रतिमा खूप सुंदर. इथल्या तिसऱ्या म्हणजेच उत्तराभिमुख असलेल्या गाभाऱ्यात एक आगळीवेगळी आणि सर्वांगसुंदर अशी मूर्ती दिसते. ती आहे उमामहेश्वर आलिंगनमूर्ती. इथे शिवाच्या डाव्या मांडीवर देवी बसलेली असून शिवाचा डावा हात तिच्या डाव्या खांद्यावर ठेवलेला दिसतो. यांच्या पायाशी एका बाजूला मोरावर बसलेला कार्तिकेय तर दुसरीकडे गणपती दिसतो. पण हिला म्हणायचे हरगौरीची मूर्ती. त्याला कारणही तसेच आहे.
पार्वती ही कधी उमा असते तर कधी ती गौरी असते. तिच्या ह्या रूपांतील फरक मूर्तिकारांनी अतिशय कौशल्याने आणि नेमकेपणाने दाखवलेला आहे. जेव्हा पार्वती ही गौरी रूपात दाखवायची असते तेव्हा तिच्या पायाशी तिचे वाहन म्हणून गोधा किंवा घोरपड आवर्जून दाखवली जाते. घोरपड चिवटपणासाठी प्रसिद्ध आहे. एखाद्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी कठोरातील कठोर तप करण्याचे सामर्थ्य हे घोरपडीच्या रूपाने दाखवले जाते. पार्वतीने शिवाच्या प्राप्तीसाठी अत्यंत तीव्र आणि कठोर तपश्चर्या केली होती. तिची शिवप्राप्तीची इच्छा अत्यंत प्रबळ होती. तिची अवस्था एखाद्या पर्णहीन वृक्षाप्रमाणे झालेली होती या वरूनच तिला अपर्णा असेही नाव मिळालेले आहे. तिचा हा चिवटपणा, गोधेच्या रूपात दाखवला जातो. हेच वैशिष्ट्य निलंगा इथल्या मूर्तीत आहे. इथे शिव आणि पार्वती ज्या पीठावर पसलेले दाखवले आहेत त्याच्या पायाशी एका घोरपडीचे शिल्प कोरलेले आहे. ‘गोधासना भवेदगौरी’ असे तिचे वर्णन रूपमंडन या ग्रंथात केले असल्यामुळे ह्या निलंग्याच्या प्रतिमेला शिवपार्वती असे न म्हणता हरगौरी प्रतिमा असे संबोधले जाते. शिव म्हणजे हर आणि पार्वतीची होते गौरी. ह्या हरगौरी प्रतिमा खूपच दुर्मीळ आहेत. या अत्यंत देखण्या प्रतिमेवर दक्षिण भारतातल्या शिल्पकलेची छाप पडल्याचे जाणवते. हिंदू विवाह पद्धतीत गौरीहराची पूजा करण्याचा विधी प्रामुख्याने केला जातो. त्याचा संदर्भ याच संकल्पनेशी जोडलेला आहे.
मंदिराच्या मंडपात एका देवकोष्ठात महिषासुरमर्दिनी तर दुसऱ्या देवकोष्ठात अजून एक दुर्मिळ अशी अनंतविष्णूची स्थानक प्रतिमा पाहायला मिळते. कल्याणी चालुक्यांच्या मंदिरात दिसणारे अजून एक शिल्प म्हणजे सप्तमातृका. या मंदिरात सप्तमातृकांचा पट बघायला मिळतो. या सात मातृकांच्या सोबत गणपती कोरलेला आहे. मंदिराच्या बाह्यांगावर विविध सुरसुंदरी कोरलेल्या आहेत. त्यात डालमालिका, दर्पणा, नुपूरपादिका, कर्पूरमंजरी, शुकसारिका सारख्या नितांत देखण्या सुंदरी दिसून येतात. यांच्याचबरोबर, मदन, विष्णू, चामुंडा, गौरी यांच्याही मूर्ती मंदिराच्या बाह्यांगावर कोरलेल्या आहेत. मंदिराला शिखर नाही. आणि सध्या या मंदिराला ऑइल पेंट दिलेला आहे. तरीसुद्धा इथल्या मूर्ती आणि त्यांचे सौंदर्य यात कुठेही कमीपणा आलेला नाही. देखणे शिल्पसौंदर्य आणि सुडौल अशा मूर्तींची मांदियाळी या मंदिरावर बघायला मिळते. लातूरच्या जवळ असलेले इतके सुंदर मंदिरस्थापत्य वेळ काढून बघावे असे आहे.
- आशुतोष बापट
https://www.marathibuzz.com/hargauri-and-sursundari-nilanga
No comments:
Post a Comment