Wednesday, May 10, 2023

कमळेश्वर मंदिर, लोहारा

यवतमाळ जिल्ह्यातील लोहारा येथील छोट्याशा गावात पुरातन महादेव मंदिर अस्तित्वात आहे.यवतमाळ शहरापासून अमरावती रोडवर यवतमाळ पासून अवघ्या ५ कि.मी. अंतरावर लोहारा हे गांव आहे. हे प्रकारचे शिवमंदीर असून ते कमलेश्वर म्हणून ओळखले जाते. अमरावतीला जातांना अगदी रस्त्यावरून येथील महादेवाचे मंदिर दिसते.या मंदीराचे स्वरुप छोट्या आकाराचा लतिन नागर प्रकारचा प्रासाद असा असून मुखमंडप, अर्धखुला मंडप, अंतराळ आणि गर्भगृह असा त्याचा तलविन्यास आहे. 
















मुखमंडपाला आणि मंडपाला वामनभिंती आहेत. खुर आणि त्यावरील दोन निर्गमाचे थर सोडले तर पीठावर अन्य थर नाहीत. वरच्या भागावर ठळकपणे दिसणारे आसनपट्ट आहेत. कक्षासने मात्र नाहीत. मुखमंडप आणि मंडपाचे छप्पर दहा स्तभावर तोलले आहे. स्तंभाचा तलविन्यास चौरस असून, चौरस तळखडा, चौरस खांब, तीन अष्टकोनी पट्ट, त्यावर पुन्हा चौकोनी व अष्टकोनी पट्ट ,त्यानंतर पीठाकृती शीर्ष व कीचकहस्त असे त्याचे स्वरुप आहे. चौरस घटकावर अलंकारीक शिल्पे व मूर्तिशिल्पे आहेत. बाह्य रेषेच्या सतंभाच्या हस्तावर नागशीर्षे आहेत. तर मधील स्तंभावर कीचकहस्त आहेत. मागील भिंतीतील अर्धस्तंभाचे वैशिष्ट्य म्हणजे या अर्धस्तंभावरील चौरस घटकावर कीर्तिमुख असून त्याच्या तोंडातून साखळी असलेली घंटा दाखवलेली आहे. 




गर्भगृहाच्या चौकटीवर खालच्या भागात कोणतीही उतीशिल्पे नाहीत. उत्तरांगावरही कोणत्याही मुर्ती नाहीत. मात्र दरवाज्याच्या आतील शाखेवर चौकटीचा नक्षीपट्ट आहे. मंदीराचे छत साधे असून छताच्या तुळ्या एकमेकाला झाकतील अश्या प्रकारच्या आहेत. गर्भगृहाच्या जमीनीची पातळी अंतराळाच्या जमीनीपेक्षा खालची आहे, त्यामुळे या मंदीराचे वर्णन पाताळलिंग असलेले मंदीर असे करण्यात येत आहे. 
मंदीराच्या विमानाच्या बाह्य अंगावर कोणतेही अलंकरण नाही. पीठ अगदी सामान्य असून त्यावर खालपासून खुर, जाडंब, त्यावर कुंभ, अंतरपत्र, कलश, मंची आणि कपोताली असे थर आहेत. त्यावर सपाट भिंत असून त्यावर उदगम आहे. शिखराचा सर्वाधिक बाहेर येणारा भाग भद्र असून प्रत्येक बाजुवर तीन फालना आहेत. मूलमंजरी आणि फालनावर नेहमीच जाल अलंकरण नाही. या मंदीराची स्थापत्यशैली आणि शिल्पे हे भाग लक्षात घेता हे मंदीर १३ व्या शतकाच्या शेवटी बांधले गेले असावे.  हे मंदिर यादवकालीन असून यादवांचे प्रधान हेमाद्री यांनी त्याची बांधणी केल्याचे मंदिराच्या धाटणीवरून लक्षात येते. हे मंदिर म्हणजे शिल्पकलेचा उकृष्ट नमुना असल्याचे दिसून येते. ह्या मंदिराचा परिसर अत्यंत प्रसन्न व शांत आहे. अशा या मंदिरातील महादेवाची उंच पिंड बघायला मिळते. महादेवाच्या पिंडीसमोरील श्री गणेशाचे विलोभनीय रूप आपणास पाहावयास मिळते. महाशिवरात्रीला येथे भक्तांची गर्दी जमते. हे प्राचीन मंदिर निसर्गरम्य परिसरात असल्यामुळे  भक्तांना एक अद्भुत शांती चा अनुभव देते.



महागाव कसबा येथील द्विदल  शिवमंदीर :-

महाराष्ट्राच्या भूमीत प्राचीन संस्कृतीचे दर्शन घडविणारे अनेक गड-किल्ले, मंदिरे वैभवशाली इतिहासाची साक्ष देतात. प्राचीन कलाविष्काराचा उत्तम नमुना असलेले यवतमाळ जिल्ह्यातील महागाव कसबा येथील  शिवालय अप्रतिम शिल्पकलेच्या दुनियेत घेऊन जाते. शिवशंकर व भगवान विष्णू यांची मूर्ती असल्यामुळे संयुक्त असे विदर्भातील एकमेव मंदिर म्हणता येईल. हे वैशिष्ट्यपुर्ण असे लतिन नागर शैलीचे मंदिर म्हणता येइल.

 कळमेश्वरी नदीच्या तीरावर ते वसले आहे. विशेष म्हणजे कळसाखाली विष्णू तर गाभाऱ्यात शंकराचे अधिष्ठान आहे. भगवान विष्णूंच्या मूर्तीसमोर गरुड व शिवलिंग असलेल्या गाभाऱ्यासमोर नंदी हे दोन्ही देवतांचे वाहन आराधना करतानाचे मनोहारी दृश्य प्रसन्न करते. या वैशिष्ट्यामुळे कळमेश्वर मंदिर या नावाने संबोधले जाते. 
Mahashivratri festival of Mahagaon celebrates the tradition of social cohesion | महागावच्या महाशिवरात्री उत्सवाने जपली सामाजिक एकोप्याची परंपरा


   गावात प्रवेश केल्यावर कळमेश्वराचे शिवालय मोठ्या दिमाखात आपला डोलारा सांभाळून उभे दिसते. मंदीराच्या भोवती प्राकार आहे. मंदीराच्या प्राकारात प्रवेश करण्यासाठी पुर्वेकडे एक गोपुर आहे. सदर मंदिराचे महाद्वार पूर्वाभिमुखी असून दुमजली आहे. 
पुरातत्त्व विभागाने मुख्य प्रवेशद्वाराचा जीर्णोद्धार केला आहे.मंदीर उत्तराभिमुख असून उत्तरेकडून प्रवेश करण्यासाठीही रस्ता आहे. मात्र हा रस्ता ओढ्याच्या वाटेने पायर्या चढून यावे लागते. मात्र उत्तरेकडील प्राकाराला गोपुर नाही. 

 पडझड झालेल्या प्रवेशद्वाराची उभारणी झाल्याने मंदिराच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे. मंदिराची रचना अचंबित करणारी आहे. बाहेरच्या बाजूने चार व आतील बाजूने चार अशा अष्ट स्तंभावर हे मंदिर विराजमान आहे. महाद्वाराचे स्तंभ चित्तवेधक असून आत प्रवेश केल्यावर कोरीव खांबावर आधारलेले सभामंडप आढळते. 
पुर्व आणि पश्चिम दिशेकडे अर्धमंडप असलेला अर्धखुला मंडप, त्याच्या पश्चिम आणि दक्षिण भागी गर्भगृहाकडे जाणारी अंतराळे आणि त्याच्या मागे असलेली गर्भगृहे असा तलविन्यास आहे.
 मंडपाच्या दक्षिणेला मुख्य गर्भगृह असून त्यात विष्णु तर मंडपाच्या पश्चिम बाजुला उप गर्भगृहात शिवलिंग आहे. प्रत्येक अर्धमंडपासमोर छोटा वाहनमंड्प आहे. पुर्वेकडील वाहनमंदीरात नंदी आहे. तर उत्तरेकडील वाहनमंडपात गरुडमुर्ती असावी पण आता ती अस्तित्वात नाही.प्रत्येक खांबावर रामायणकालीन चित्रे कोरलेली आहेत. दहा पायºया उतरल्या की गाभाºयात मधोमध शिवशंकराचे स्वयंभू शिवलिंग दृष्टीस पडते. 


शिवलिंगाच्या अगदी समोर मंदिराच्या पूर्वेला नंदी मंदिर आहे. घुंगरमाळा, बेलपत्री व चाळ अशा आभूषणांनी सजलेला भव्य नंदी लक्ष वेधून घेतो. हा नंदी म्हैसूरच्या चामुंडेश्वर मंदिरातील जगप्रसिद्ध नंदी मूर्तीची लघुप्रतिकृती आहे. पोळ्याच्या दिवशी नंदीची मनोभावे पूजा केली जाते.
 मंदिराची शिल्परचना औंढा नागनाथ, वेरुळचे कैलास लेणे आदी प्राचीन वस्तूच्या शिल्पासारखी आहे. मंडप चौरसाकृती असून त्याच्या मधोमध चौरस रंगशिला आहे. रंगशिलेच्या चार कोपर्यात चार स्तंभ असून मंडपाच्या पुर्व व उत्तर बाजुना वामनभिंती व त्यावर लहान वामनस्तंभ आहेत. मंदीरातील स्तंभ लोहारे येथील नागरस्तंभासारखेच आहेत. मुख्य स्तंभावर कीचकहस्त तर वामनस्तंभावर नागशीर्ष हस्त आहेत. लोहारे येथील नागर मंदीराप्रमाणे याही मंदिरावर उल्लेखनीय असे कोणतेही आडवे थर नाहीत. भिंतीचे पृष्टभाग साधेसपाट असून लतिन नागर शिखरावर कोणतेही शिल्पकाम नाही. मंडप आणि शिवलिंग असलेले गर्भगृह यावर आज शिखर अस्तित्वात नाही. मंदीराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदीराच्या अंतराळात प्रवेश करण्यासाठी पुर्वेकडे छोटा अर्धमंडप असून त्यावर आणि वाहन मंडपावर फासना पध्दतीची शिखरे आहेत. 


  

 आज  मंदीराचा प्राकार पडलेल्या अवशेषांनी भरुन गेला आहे. शिवलिंग असलेल्या गर्भगृहाची पातळी जमीनीपेक्षा खोल आहे. परिणामी गर्भगृहाच्या उत्तरेकडून एक झरा निघालेला आहे. लोहारे येथील मंदीराप्रमाणे हे ही मंदीर तेराव्या शतकाच्या अखेरीस बांधण्यात आले असावे. परंतु महागाव येथील मंदीराचा गुंतागुंतीचा तलविन्यास पहाता त्यातील दरवाजे, स्तंभ आणि मुर्तीशिल्पे यांचा विचार करता हे मंदीर लोहारे येथील मंदीरापेक्षा निश्चितच प्राचीन आहे. 
 या मंदिराला क वर्ग ती र्थक्षत्र दर्जा प्राप्त आहे.यवतमाळ जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात हेमाडपंथी प्राचीन शिवालये आहेत. बाराव्या शतकातील या मंदिरांची अलिकडे मोठी दुरावस्था झाली होती. ठिकठिकाणच्या मंदिरांचे चिरे ढळले होते. तर काही ठिकाणी मंदिरेही खचली आहेत. परंतु आता भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभागाने या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याची योजना केंद्र शासनाने हाती घेतली आहे. त्यासाठी सर्व प्राचीन मंदिरांचे सर्वेक्षण करण्यात आले. शक्य तेथे डागडुजी आणि आवश्यकतेनुसार नवीन बांधकामांची जोड या मंदिरांना दिली जाणार आहे. त्याकरिता केंद्र शासनाने खास बजेटही पुरातत्व विभागाला मंजूर केले आहे. विदर्भातील हेमाडपंथी मंदिरांची अधिक संख्या लक्षात घेता पुरातत्व विभागाच्या नागपूर कार्यालयाने या मंदिरांवर लक्ष केंद्रीत केले आहे. या मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेण्यात आले आहे. या जीर्णोद्धाराच्या माध्यमातून प्राचीन शिवालयांना गतवैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न पुरातत्व विभागामार्फत केला जाणार आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने केंद्र शासनाकडून प्राप्त निधीतून मंदिराच्या प्रवेशद्वाराचा जीर्णोद्वार केला असून या प्राचीन शिवालयाला गतवैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न होत आहे. मंदिरालगत लघुसिंचन प्रकल्प पूर्णत्वास आल्यामुळे हा परिसर हिरवळीने नटला असून पर्यटकांना खुणावतोय.
शिवमंदिरात महाशिवरात्री सप्ताहात परिसर भक्तिरसात न्हाऊन निघतो. भागवत, भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सप्ताहात दिवसरात्र अखंड टाळ -वीणेच्या गजरात ‘जय जय राम कृष्ण हरी’ असा हरिनाम जप केला जातो. सातही दिवस अन्नदान केले जाते. महाशिवरात्रीला आबालवृद्ध भाविक उपवास करतात. शिवलिंगाची पालखीतून भव्य मिरवणूक काढली जाते. विदर्भातून हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. विशेष म्हणजे दोन दिवस सामाजिक एकोपा जपणारा यात्रा महोत्सव सर्वांसाठी पर्वणी ठरतो. यामध्ये सर्वधर्मीय उत्साहात सहभागी होतात. ग्रामीण भागातील महागावची जत्रा एक नवी ऊर्जा देऊन जाते.तेथे महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर सामाजिक एकोपा निर्माण करणारा यात्रा महोत्सव वर्षानुवर्षांपासून साजरा केला जातो.
दारव्हा-आर्णी राज्य मार्गावर असलेल्या महागाव कसबा येथे सर्वधर्मीय गुण्यागोविंदाने नांदतात. सामाजिक एकात्मता जपणारा महाशिवरात्री यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 
संदर्भ :-

१) यवतमाळ जिल्हा गॅझेटीयर 

२) स्थापत्य - महाराष्ट्र शासन 

३)  श्री. सुनील पु. आरेकर यांचे लिखाण (माहिती - प्रशांत मोरे)

४) छाया चित्र  #vidarbha_darshan

 



No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...