राजुरा: स्त्रीशक्तीचा शौर्य स्तंभ’
बऱ्याच
वर्षांपासून राजूरा या गावाविषयी अनेक लोककथा कानावर येत होत्या. येथील
बुरूजबंदी वाडा, प्राचीन देवळं आणि लोकमुखातून पिढ्यान् पिढ्या बोलली
जाणारी एक शौर्यकथा. मग जे जे जुनं ते ते कुतूहल अन् जिज्ञासा निर्माण
करते. आणि मनास वेध लागतात ते इतिहासाचे.!
राजूरा येथील ७६ वर्षांचे वयोवृद्ध किर्तनकार श्री नामदेव विठोबा गोरे यांनी गावाच्या चालीरीती व ऐतिहासीक घटनांबद्दल बरीच माहिती दिली.
सन १८०० मध्ये राजुरकरांच्या घराण्यांतील बाजीराव, उत्तमराव, त्रिंबकराव, धारराव, नारायणराव, रूस्तुमराव व बहादूरराव या बंधूंचे गावात व शेजारील भागात बरेच वर्चस्व होते.
![]() |
| रामराव राजुरकर |
तो काळ होता ब्रिटिश सत्तेचा, स्वातंत्र्यापूर्वीचा.
चांदनी चतारी या
गावात एक दरोडा पडला. त्याच्या संशयाहून तत्कालिन ब्रिटिश शासनाने
रावसाहेब मंडळींना वाशीम येथे बोलावले. शिंदेशाही पगड्या व बुलंद पेहराव
धारण करून घोड्यावरून मोठ्या थाटात ते वाशीमला गेले. वाशीम हे ब्रिटिश
शासनाचे जिल्ह्याचे ठीकाण. रावसाहेब मंडळींचा थाट पाहून ब्रिटिश
अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले व त्यांना ब्रिटिश शासनात सामावून
वेग-वेगळ्या अधिकारपदावर नियुक्त केले. एक मात्र बोलले जाते, की त्या
दरोड्यातून रावसाहेब मंडळींना पाच किलोग्राम वजनाची सोन्याची मूर्ती मिळाली
होती. पण आज तीचे अस्तीत्वाबाबत कुणालाच काहीही ठावूक नाही. तसे कुणी
सांगेलही कसे.? पण मानसाच्या जिज्ञासेची कमाल, ती ठीक-ठीकाणच्या
खड्ड्यांमधून बघावयास मिळाली.
असो,
![]() |
| बुरूजबंदी वाड्याचे अवशेष |
गावातून माहिती गोळा करत आम्ही मग गेलो त्या बुरूजबंदी वाड्याकडे.
राजुरकरांच्या घराण्यांतील श्री अजीत राजुरकर यांनी आपल्या पूर्वजांच्या
बुरूजबंदी वाड्या बद्दल बरीच माहिती दिली. कधिकाळी ज्या बुरूजबंदी वाड्याने
सत्ता गाजवली त्याचे आज मात्र अवशेष उरले आहेत. बुरूजावर आज एक प्राचीन
विहिर आहे. बुरूजावरील बहूतांश भाग ढासळला आहे. या बुरूजबंदी वाड्याच्या
पायथ्याशी समोरील भागात जमिनीवर एक विस्तीर्ण वाडा होता. तोही आज पडक्या
अवस्थेत आहे. एक- दोन दालना शिवाय फक्त भिंतीच उरल्या आहेत. त्यातील
दिवानखाना नावाची एक इमारत ध्वस्त पण बऱ्यापैकी शाबूत आहे. त्याच्या
दरवाजे व खिडक्यांच्या बांधणीवरून ब्रिटिश कालाची जाणीव होते.
मागील २५
वर्षांपूर्वी या वाड्यात शाळाही भरत असे. पण आज केवळ पाऊलखूनाच उरल्या.
गावाच्या बाजूस राजूरकरांची वंशपरंपरागत स्मशानभूमि आहे.
![]() |
| श्री अजीत राजुरकर |
श्री अजीत राजुरकर यांच्या सोबत आम्ही त्या स्मशानभूमिकडे निघालो. एक लोखंडी गेट ओलांडून आम्ही आवारात दाखल झालो. त्यांच्या पूर्वजांनी बांधलेले महादेवाचे एक प्राचीन देवालय तेथे दिसले. त्याची बांधनी दगड -विटांची असून चून्याचा वापर केलेला आहे. मात्र सालाचा अंदाज लावता ते १७०० च्या उत्तरार्धातील असावे असे वाटते.
![]() |
| पूर्वजांच्या समाध्या |
पण आवारात असलेल्या पूर्वजांच्या समाध्या ह्या त्यावरील सालावरून
अतिप्राचीन असल्याचे वाटते. स्त्रीयांच्या समाध्या व पुरूषांच्या समाध्या
ह्या दोन वेगळ्या रांगांमध्ये बांधलेल्या आहेत.
सन १२९९ असे साल
व्यक्तिच्या नावाच्या वर कोरलेले आढळते. याचा अर्थ ह्या समाध्या सन १२००
मधिल आहेत असे अनुमान चूक ठरते. कारण त्या शतकात इंग्रजी सन वापरला जात
नसे. तसे इंग्रजांचा प्रवेश भारतात १५ व्या शतकात झाला. मग समाधिवरील हे
साल कदाचीत सुहूर सन असेल. त्या कालात दक्षिणेत फारसी सुहूर सन वापरला जाई.
सुहूर सनात ६०० मिळवले असता आजचे इंग्रजी सन निघते. याप्रमाणे १२९९+६००=
१८९९ हे मृत्युचे साल निघते. अर्थात सन १८०० मधिल काही व्यक्तिंच्या या
समाध्या होत.
![]() |
| शिवमंदिर व शिलालेख |
श्री गणेशभाऊ मोहळे यांनी गावाच्या दुसऱ्या बाजूस असलेल्या दोन देवळांबद्दल सांगितले. तेव्हा आम्ही सर्व ते बघावयास गेलो. या दोन्ही देवळांबद्दल स्थानिक लोकांना फार काही माहित नाही. त्यातील एक शिवमंदिर होते. कारण देवळात शिवलिंग होते. तसेच बाहेरील भिंतीवर एक शिलालेख कोरवलेला होता. आता यावरून काहीतरी माहिती नक्कीच हाती लागेल असे मला वाटले. एक विटीने तो घासून पाहिल्यावर समजलं, की तो संस्कृतमध्ये असून शके १८१० मध्ये या देवळाचा जिर्णोद्धार केल्याचा उल्लेख त्यात आहे.
![]() |
| देवी मंदिर |
शेजारील दुसरे देऊळ ज्यातील मूर्ती बाहेर ठेवलेली होती. ते देवीचे होते. मात्र फार वर्षांपूर्वी असलेली मूर्ती भग्न झाली असावी. कारण देवळाच्या पायथ्याशी देवीचा फक्त दगडी मुखवटा दिसला. अर्थात शिव-पार्वतीचे हे दोन देवालये आहेत.
दोन स्त्रीयांनी केलेल्या एका देदिप्यमान जंगाची ती कहानी, जी रोमांच खडे करणारी ती दृष्टिपुढे तरळू लागली-
मुलूखगीरीच्या कालात १५० वर्षांपूर्वी वा कदाचीत जास्तच. एक दिवस राजुरकरांच्या घरची पुरूष मंडळी बाहेर निघून गेल्याची बातमी मिळताच कोठूनतरी काही लोक जमून राजुरकरांच्या बुरूजबंदी वाड्यावर चालून गेले. दरोडा टाकून त्यांच्या संपत्तीची लूट करावी या हेतूने ती हत्यारबंद टोळी गावात शिरली. मात्र या समयास बुरूजबंदी वाड्यावर राहणाऱ्या दोन तरूण धाडसी स्त्रीयांनी मनाशी एक प्रण करून रावसाहेबांचा पुरूष वेश धारन करून लढण्याचा निर्धार केला. हातात तलवार धारण करून त्या घोड्यावरून सवार होऊन दौडत निघाल्या. त्यांना पुरूष समजून आक्रमकांनी पलायन केले. सर्व आक्रमकांना हूसकावून लावल्यानंतर पिंपळवाडीजवळ जंगलात त्या थांबल्या.
सर्व आक्रमक गेल्याचे पाहून त्या बोलू लागल्या…
![]() |
| शक्तिस्तंभ’ |
या वीरांगनांच्या शौर्याची याद देणारे राजूरकरांनी उभारलेले ते स्मृतिस्तंभ आजही खडे आहेत. आणि आता आम्हीसुद्धा तेथे पोचलो होतो.
गांगलवाडीच्या
समोर काही अंतरावर एक वळण लागते. येथून पिंपळवाडीस व राजूरा गावात जाता
येते. येथून राजूरा गावाचे अंतर फक्त ३ किलोमीटरच भरते. अर्थात याच
रस्त्याने त्या स्त्री घोडेस्वार आल्या होत्या. आणि याच वळणावर ते
शौर्यस्तंभ आजही त्यांच्या बलिदानाची साक्ष देत खडे आहेत. आजही या रणभूमिवर
त्यांच्या शौर्यस्मृति दृष्टिपुढे खड्या राहतात…तेव्हा दिसू लागतात
मर्दानी वेशातील त्या दोन स्वार…. हातात तेग धरून घोड्यावरून दौडणाऱ्या
त्या साक्षात महिषासूरमर्दिनीच वाटू लागतात….. घेराव टाकनाऱ्या हत्यारबंद
टोळीवाल्यांच्या किलकाऱ्या…. गर्दितून तलवार चालवनाऱ्या वीरांगना….
त्यांच्या देहातून सांडणारे ओजस्वी रक्त….भूमिवर पडणारे ते ज्वलंत
रक्तथेंब…. आणि शेवटी रणभूमिवर निवांत पहुडलेले त्यांचे देह व आसमंताकडे
निर्वीकारपणे बघनाऱ्या त्यांच्या नजरा बोलून जातात की हे मरण नव्हे…!
हे तर अमरण होय.!
मॄत्यूनापि शूरांगना।।
क्षण विध्वंसीनी काया।
चिंता का ती मरणे रणे।।
वाशीम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील ४००० लोकसंख्येच्या या सामान्य गावाकडे पाहिलं की कुणालाच न वाटाव की किती गुपितं अन् किती कथा आपल्या अंर्तमनात सांभाळून हा आजही कसा साधेपणाने मानसाच्या वर्दळीकडे बघतोय. माणसाच्या पिढ्या अन् मनाच्या घड्या पाहिलेला हा साक्षिदार बोलू पाहतोय त्याची कहानी.! मातीचे ढिगारे अन् दगडावरचे नक्षिकाम हिच त्याची जूबानी…!!!
-प्रा रवि आत्माराम बाविस्कर,मालेगाव















No comments:
Post a Comment