बुलढाणा जिल्हयातील लोणार हे तसे जगप्रसिध्द गाव. उल्कापातामुळे नैसर्गिकरित्या तयार झालेल्या सरोवरामुळे संपुर्ण जगातील पर्यटकांचे लक्ष लोणारकडे लागलेले असते. आता या गावात पर्यटन विभागाने पर्यटकांना थांबण्यासाठी विश्रामगृहाची सोय केलेली आहे.
लोणार हे गाव मेहकरच्या दक्षिणेत बारा मैलावर आहे. वऱ्हाडातील सर्वात प्राचीन असे हे गाव आहे. विरज क्षेत्र असे या गावाचे पुराणात नाव आहे. विष्णुने लवणासुरावर या ठिकाणी विजय मिळविला. येथे दैत्य सुदनाचे सुंदर हेमांडपंती देवालय शिल्प आहे. ऐने-इ-अकबरीत या स्थळाचा विष्णुगया म्हणून उल्लेख आहे.
लोणारला हेमांडपंथी फार जुने देवालय आहे. महाराष्ट्रातील स्थापत्य शिल्पातले नमूने म्हणजे मध्य युगात येथे बांधले गेलेली देवालय, डोंगरातील कोरीव लेणी हे महाराष्ट्राचे खास वैशिष्टये आहे. भारतीय स्थापत्य व शिल्प शास्त्रातील सहा पध्दती पैकी नागर, वेसर आणि द्राविड या तीनच पध्दती विशेष प्रचारात होत्या.
मध्य भारतातील देवालयांच्या पायाची आखणी नक्षत्राकृती असते. देवालयांची शिखरे दक्षिण भारतातील मजलेदार गोपुरांपेक्षा अगदी वेगळया तऱ्हेने उभारलेली दिसतात. रामदेव यादवांचा प्रधान हेमाडपंत याने मध्य भारतातील पुष्कळ देवळे महाराष्ट्रात बांधली म्हणून या शिल्पपध्दतीस हेमांडपंती हे नाव प्राप्त झाले. हेमांडपंती पध्दत ही मध्य भारतातील आर्य शिल्पाचीच एक उपशाखा आहे. या बांधणीत चुना वापरीत नाही. या देवळातील शिखरांची बांधणी विशिष्ट प्रकारची असते.
महाराष्ट्रात यादवकालीन हेमांडपंती देवळे ठाणे जिल्हयात अंबरनाथ, पुणे जिल्हयात पुर, बेल्हे. पश्चिम खानदेशात एरंडोल, संगमेश्वर, घरखेड, चांगदेव, वाघली, पाटण. पूर्व खानदेशात झोडगे, देवलण, चांदोर, अंजनेरी, सिन्नर, त्रिंगणवाडी. अहमदनगर जिल्हयात कोकमठाण, अकोले, टाकरी, पेडगाव, कर्जत, श्रीगोंदे, मांडगाव, रत्नवाडी. सातारा जिल्हयात सिंघणपूर, खटाव. सोलापूर जिल्हयात माळसिरस, वेळापूर, पंढरपूर. बार्शीटाकळी, सानगाव, साकेगाव, मेहकर, शिरपूर, लोणार व औंध वऱ्हाड येथे आहेत.
हेमांडपंती मंदिराची रचना चुन्याच्या किंवा कसल्याही सहाय्यावाचून केवळ एकावर एक दगड ठेवून केली जाते. दुसऱ्या कोणत्याही पध्दतीपेक्षा अगदी वेगळी असलेली या मंदिराच्या शिखराची घडण हे प्रमुख हेमांडपंती वैशिष्टये आहे.
देवालयाच्या पायाची आखणी ज्या आकाराची असेल नेमकी त्याच प्रकारची अगदी लहान आकृति शिखरावरील आमलकाची बैठकी बनते. प्रमुख दिशांना कोन येतील असा चौरस कल्पून एका कोनासमोर प्रवेशव्दाराची व्यवस्था केलेल्या या इमारतीच्या पायाची आखणीच अनेक कोनबध्द अशी केली जाते. त्या पायावर उभारलेल्या भिंतीनी जे कोन बनतात. त्या सर्व कोनांच्या रेषा जमिनीपासून निघून थेट कळसापर्यंत उभ्या गेलेल्या दिसतात. आणि त्या शिखराच्याच छोटया छोटया प्रतिकृती खालपासून वरपर्यंत एकीवर एक प्रमाणशीर बसविल्यामुळे ही सर्व लहान लहान शिखरे रचूनच मोठे शिखर तयार झाल्यासारखे वाटते. शिखराच्या सर्व प्रतिकृति जागच्या जागी मजबूत राहव्यात म्हणून उपयोगात आणलेल्या मधल्या दगडावर नक्षीकाम केल्या कारणाने शिखराला चांगला उठाव मिळतो.
मंदिराच्या कोनाकृति भिंती पायापासून वरपर्यंत चढत गेल्यामुळे त्या अगोदरच उठून दिसतात. आणि छायाप्रकाराच्या परिणामामुळे त्यांच्या भरीवपणाला अधिक उठाव मिळतो. तळापासून कळसापर्यंत गेलेल्या भितीकोनाच्या रेषांमुळे भासणारा बांधणीचा उभटपणा वेगवेगळया थरांच्या आडवटींनी कमी झाल्यासारखा वाटतो. या थरामध्ये विविध प्रकार व आकार आहेत. त्यात अश्वथर, गजथर, पुरुषथर कणि हे प्रकार प्रामुख्याने वापरले आहेत. दोन मोठया थरांच्या मध्यभागी योजना झालेल्या कणीच्या दगडाचा आकार दुधारी सुरीच्या पत्याचा आडवा छेद घेतल्या सारखा दिसतो.
हेमांडपंती देवालय म्हटले की ते अगदी साधे, लहानसे, आणि ओबडधोबड बांधणीचे असते. असा सर्वसाधारणपणे समज आहे. परंतु सिन्नर किंवा अंबरनाथचे भरीव मंदिर पाहिल्यावर भ्रमनिवास व्हायला वेळ लागणार नाही.
— श्री अनिल ठाकरे
(‘महान्यूज’मधून साभार)
हेमाडपंती स्थापत्यशैली: भारतीय स्थापत्यशैलींपैकी एक प्रमुख शैली म्हणून हेमाडपंती शैलीचा उल्लेख केला जातो. देवगिरीच्या यादवांच्या राज्याचे सन १२५९ ते १२७४ याकाळात मुख्य प्रधान राहिलेल्या हेमाद्री पंडित किंवा हेमाडपंत यांनी या प्रकारच्या इमारतबांधणीचा महाराष्ट्र आणि दख्खन पठारावर अनेक ठिकाणी उपयोग केल्याने ही बांधणीपद्धत त्यांच्या नावावरून हेमाडपंती म्हणून ओळखली जाऊ लागली. मंदिरांचे हेमाडपंती पद्धतीने झालेले बांधकाम टिकून राहिले आणि त्यामुळे ते आजही अभ्यासकांना उपलब्ध आहे. सामान्यतः इमारत बांधणीत घडवलेल्या दगडांमध्ये चुना किंवा त्याप्रकारचा दर्जा न भरता दगडच वेगवेगळ्या कोनातून कापून, त्यांनाच खुंट्या आणि खाचा पाडून ते एकमेकांत घट्ट बसू शकतील अशी रचना केली जाते. मंदिरांसारख्या वास्तूत पायापासून शिखरापर्यंत ही दगड एकमेकांत गुंफून केलेली रचना एकसंध उभी राहाते आणि टिकाऊही बनते. वेरूळचे घृष्णेश्वर मंदिर, औंढा नागनाथ येथील मंदिर ही हेमाडपंती स्थापत्यशैलीची काही उदाहरणे होत.
या शैलीत बांधण्यात आलेली काही मंदिरे
- श्री मल्लिकार्जुन मंदिर दहिटणे तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर
- . श्री मल्लिकार्जुन मंदिर चपळगाव तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर
- सिद्धेश्वर नागनाथ मंदिर झरी बु ता. चाकुर जी. लातूर
- हेमाडपंथी महादेव मंदिर साकेगाव, ता. चिखली जिल्हा. बुलढाणा.
- हेमाडपंथी महादेव मंदिर बाराहाळी ता, मुखेड जि, नांदेड
- महारनाथ पंढरपूर जि. सोलापूर
- जगदंबामाता मदिंर, टाहाकरी - अकोले तालुका
- अमृतेश्वर मंदिर - रतनवाडी, अकोले तालुका
- अंबरनाथ येथील शिवमंदिर
- आदासा - गणेश मंदिर
- औंढा नागनाथ येथील मंदिर
- कमळगड - धोमचे हेमाडपंती शिवमंदिर
- करमाळा येथील कमालादेवीचे मंदिर
- किल्ले पुरंदर रामेश्वर मंदिर : पुरंदेश्वर
- चाळीसगाव येथील पाटणादेवी मंदिर
- त्र्यंबकेश्वर - शिव मंदिर
- माणकेश्वर शिवालय- झोडगे (मालेगाव)
- रतनगड येथील अमृतेश्वर मंदिर
- अर्धनारीनटेश्वर मंदिर, वेळापूर
- गोंदेश्वर मंदिर - सिन्नर
- नरसिंह मंदिर,मोगरा ता माजलगाव जि. बीड
- महादेव मंदिर, रहिमाबाद ता सिल्लोड जि. औरंगाबाद
- महादेव मंदिर, मळोली, ता माळशिरस जि सोलापूर
- अंबाजोगाई येथील योगेश्वरी मंदिर, खोलेश्वर मंदिर,सकलेश्वर (१२ खांबी मंदिर), अमलेश्वर महादेव मंदिर, चौभारा गणेश मंदिर *मंडपेश्वर महादेव मंदिर मांडवड ता नांदगाव जिल्हा नाशिक
- वेल्हाळा ता. भुसावळ जि. जळगाव येथिल कपिलेश्वर महादेव मंदीर.
- गारखेडा ता. जामनेर जि. जळगाव येथील हेमाडपंथी शिवमंदिर.
- लोहारा ता पाचोरा जि.जळगांव येथिल हेमाडपंथी तपेश्वर महादेव मंदीर
- लोहरा ता मानवत जि. परभणी येथिल तपेश्वर महादेव मंदिर. (हेमाडपंथी बांधणीचे) [१]
- श्री पुरुषोत्तम भगवान मंदिर पुरुषोत्तमपुरी ता.माजलगाव जि.बीड
No comments:
Post a Comment